डॉ. व्यंकटेश जंबगी
संक्षिप्त परिचय
शिक्षा – बी.ए.एम्.एस्. एम्.ए.(संस्कृत), आयुर्वेदाचार्य, पी.जी.डी.एच्.ए., निवृत्त प्राध्यापक
प्रकाशित साहित्य –
पावसाचं वय..काव्यसंग्रह, तुझं घर माझं घर..कथासंग्रह, व्रात्यकथा….विनोदी कथासंग्रह, पाच प्रयोगक्षम एकांकिका, बालमंच..बाल एकांकिका, विषय विविधा(निबंध), बीसीजीपासून इसीजीपर्यंत…आरोग्य लेखसंग्रह.
पुरस्कार – 1. उत्कृष्ट वाड्मय निर्मिती..महाराष्ट्र शासन 2018. 2. बाल साहित्य परिषद,कोल्हापूर. 3. उत्कृष्ट एकांकिका लेखन..नाट्यदर्पण,मुंबई. 4. उत्कृष्ट नाट्यछटा लेखन.. नाट्यसंस्कार,पुणे. 5 . आरोग्य लेख..शतायुषी,पुणे. 6. कविभूषण..फ्रेंडस् सर्कल,पुणे. 7. जीवन गौरव..ज्येष्ठ नागरिक वाचनालय,जयसिंगपुरस्कार
अन्य –
माजी अध्यक्ष..चंद्रकिरण काव्यमंडळ,तळेगाव दाभाडे / माजी अध्यक्ष..संस्कार भारती,सांगली
शिवाजी विद्यापीठ युवक महोत्सवात एकांकिका स्पर्धा परिक्षक / आकाशवाणी, सांगली, विविध साहित्यिक सादरीकरण.
☆ विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆
* धार्मिक महत्त्व *
“यद्यज्जन्यकृतं पापं मया सप्तसु जन्मसु ।
तन्मे रोगं च शोक॑ च मा करी हन्तु सप्तमी ।।”
अर्थात “गेल्या सात जन्मात मी जे काही पाप केले असेल, त्याचे फळ (परिणाम) म्हणून रोग, दुःख इत्यादि काहीही होऊ नये, माझ्या पापाचा नाश व्हावा” अशी सूर्याला
प्रार्थना करतात, तो दिवस म्हणजे माघ शु. सप्तमी म्हणजेच ‘रथसप्तमी’ !
मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरु होते. सूर्य आपल्या सात घोडे जोडलेल्या रथाने ‘अरुण’ या सारथ्यासह उत्तरेकडे प्रयाण करु लागतो. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. आदिती आणि काश्यप ऋषी यांचा पुत्र असलेला हा सूर्य …. याचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी ! या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. सूर्योदयापूर्वी उठून फुले, चंदन, कापूर इ. अर्पण करतात. कोणी सूर्याची प्रतिमा रथात ठेवतात. कोणी सूर्याच्या रथाची रांगोळीकाढतात. पूजा करुन खिरीचा नैवेद्य दाखवितात. मकरसंक्रांतीपासून सुरु झालेले कार्यक्रम हळदी कुंकू, लुटणे इ. रथसप्तमीला समाप्त होतात. रथसप्तमी दिवशी व्रत म्हणून काहीजण उपवासही करतात. सूर्य ही तेज, उर्जा देणारी देवता आहे. सूर्यदेवता
वर्षमर आपल्याला प्रकाश देते. वनस्पती, अन्नधान्य, फुले, फळे उत्पन्न करण्यास सहायभूत ठरते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ”गायत्री मंत्र” हा सूर्याला उद्देशून असलेला प्रार्थनास्वरुप मंत्र आहे. बुध्दीला प्रेरणा देण्याची त्यात प्रार्थना आहे.
* वैज्ञानिक महत्व *
‘आरोग्य’ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या आहे. कारण सूर्याची सकाळची कोवळी उन्हे (Ultraviolet rays) ‘ड’ (D) जीवनसत्व देणारी आहेत. हे सर्वपरिचित आहे. उत्तरायणात सूर्यापासून निघणारी लंबरुप किरणे हवेतील व मातीतील जंतूंचा नाश करतात. वनस्पतीमध्ये जी कर्बग्रहण (Photosynthesis) ही अन्न निर्माण करण्याची क्रिया असते. त्यामध्ये सूर्याची मदत मोठ्या प्रमाणात होते. सर्व ग्रह परप्रकाशी असून त्याना प्रकाश देणारा सूर्यच आहे. आजकाल ‘सोलर’ सिस्टीम भरपूर प्रमाणात वापरली जाते. ती उर्जा सूर्याचीच ! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्याचेच स्थान अग्रगण्य आहे. एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे –
“आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेशु दारिद्र्यं नोऽपजायते ।।”
अर्थ – “जो नित्यनेमाने रोज सूर्यनमस्कार घालतो त्याला सहस्र जन्मापर्य॑त दारिद्र्य येत नाही.” याचा मतितार्थ असा की सूर्यनमस्काराने बुध्दी, बल, क्रीयाशक्ती (Stamina) वाढतात. मग अर्थातच मनुष्य कष्ट करतो .. मग तो दरिद्रि कसा राहील ? थोडक्यात वैज्ञानिकदृष्ट्या सूर्य ही जीवसृष्टीची उर्जा आहे. सूर्य प्रकाश देतो. (पण कघीही ‘लाईट
बिल’ पाठवीत नाही.) त्याला कृतज्ञता म्हणून रथसप्तमी साजरी करावी. कोणी नुसता चहा पाजला तरी आपण Thanks म्हणतो.. हा सूर्यनारायण वर्षभर इतके काही करतो
मग एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायला नको ? म्हणून रथसप्तमीलाच “आरोग्यसप्तमी” असेही म्हणतात.
जाता जाता भगिनींसाठी एक ‘टीप’ देतो. जर रथसप्तमीदिवशी नवी साडी मिळली, तर सात साड्या मिळतात म्हणे … !
© डॉ. व्यंकटेश जंबगी
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈