मराठी साहित्य – विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

श्री उद्धव भयवाळ

संक्षिप्त परिचय 

सेवानिवृत्त बँक अधिकारी

  • विनोदी कथा, एकांकिका, बालकथा , बालकवितेपासून लावणी प्रकारापर्यंत लिखाण .
  • “इंद्रधनू” हा कवितासंग्रह आणि “हसरी फुले” हा बालकवितासंग्रह  “तारांबळ” हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
  • “हसरी फुले” या बालकवितासंग्रहास  “अंकुर वाड्मय पुरस्कार-२००८” प्राप्त.
  • “सुभद्रा प्रतिष्ठान” सेलू (जि. परभणी) यांचा कवितेसाठीचा प्रतिष्ठेचा “गौरव पुरस्कार” .
  • नाशिक येथील “कलाकुंज”  प्रकाशनाच्या वतीने साहित्यसेवेबद्दल नाशिक येथे सत्कार.
  • भारतीय नरहरी सेना {महाराष्ट्र प्रदेश} यांचा ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार.
  • ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे मी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या “साने गुरुजींच्या छान छान गोष्टी” या पुस्तकाचा समावेश.
  • अ.भा.सानेगुरुजी कथामाला,जालना यांच्या बालकुमार कविसंमेलन अध्यक्षपद.
  • “सलिला साहित्यरत्न सन्मान” प्रदान.”अहिंदी भाषी क्षेत्रामध्ये हिंदी भाषेतील साहित्य निर्मिती” यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान.

☆ विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

एका पाहणीनुसार भारतामध्ये साठ वर्षांवरील जनसंख्या आठ कोटी आहे. याचा अर्थ आज घडीला भारतातील सात टक्के लोक ‘ज्येष्ठ नागरिक’ या व्याख्येत येतात. आणि दरवर्षी वेगवेगळ्या आस्थापनांमधून साधारणपणे सात लाख लोक निवृत्त होत आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेदिवस वाढत जाणार हे निश्चित. यावरून कुणाचा असा समज होऊ शकतो की, या ज्येष्ठ नागरिकांपुढे जगण्यासाठीच्या खूप समस्या असणार आहेत. काही प्रमाणात ते खरे असेलही. पण निवृत्तीनंतरचे जीवन सुखी, आनंदी आणि चैतन्यमय कसे करायचे ते आपल्या हातात आहे.

निवृत्त जीवन आनंदाने जगण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१. आर्थिक स्थैर्य  २. आरोग्य   ३. प्रेमाची माणसं  (आप्तेष्ट, मित्र इत्यादि )

त्यापैकी आर्थिक स्थैर्य हवे असण्यासाठी निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी पाहिजे. दरमहा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त बँकेमधील ठेवीवर मिळणारे मासिक व्याज हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण कष्टाने कमावलेल्या पुंजीचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला उपयोग व्हावा म्हणून जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी पैसा गुंतवावा. मात्र त्या गुंतवणुकीत कमीत कमी जोखीम असावी. कारण जसजसे वय वाढत जाते, तसतशी जोखीम घेण्याची मानसिकता कमी होत जाते. त्याचप्रमाणे अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासारख्या गोष्टींसाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवावेत म्हणजे ऐनवेळी त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. ते चांगले राहण्यासाठी आपणास झेपेल तसा नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे आणि स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. जसे की, नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये आपले काही छंद जोपासायचे राहून गेले असतील तर आता ते आपण करू शकतो. कारण अशा गोष्टींमुळे आपला मेंदू तरतरीत राहतो. त्याचप्रमाणे स्वत:चा आणि जोडीदाराचा आरोग्यविमा आपण नोकरीमध्ये असतांनाच काढून ठेवणे हेसुद्धा आवश्यक आहे.

सुखी निवृत्त जीवनासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाची माणसे. यामध्ये ज्याप्रमाणे आपले कुटुंबीय आहेत, त्याचप्रमाणे नातेवाईक आणि मित्रही आहेत. या सर्वांना आपल्याविषयी प्रेम आणि काळजी वाटत असतेच. पण ते प्रेम वृद्धिंगत कसे होईल हे पाहणे आपल्याच हातात आहे. यासाठी आधी काही पथ्ये आपण पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे घरामध्ये कुणालाही अनाहूत सल्ला देण्याचे टाळावे. मुलांना त्यांचा संसार त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. त्यात अनावश्यक ढवळाढवळ नको. घरातील मुले, सुना, नोकरीस असतील तर नातवंडांची काळजी घेणे हे आपणास जमू शकते. त्याचप्रमाणे विजेचे किंवा टेलिफोनचे बील भरणे इत्यादी छोटी छोटी कामे आपण करू शकतो. त्यामुळे कुटुंबियांना आपली मदतच होते. दुसरे म्हणजे नोकरीमध्ये व्यस्त असतांना आपण जास्तीत जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी  घालवलेला असतो. कुटुंबियांना देण्यासाठी तेव्हा वेळच नसतो. आता निवृत्तीनंतर मात्र आपण जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसाठी द्यायला हवा. कुटुंबियांसोबत पर्यटनाला जाणे, सर्वांनी एकत्र बसून नाटक, सिनेमा पाहणे हे आपण करू शकतो. आपल्या जोडीदाराच्याही काही इच्छा, आकांक्षा आपल्या नोकरीच्या व्यग्रतेमुळे पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर आता त्या पूर्ण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढत असते ही गोष्ट सदैव ध्यानी असू द्यावी.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यासाठीसुद्धा थोडा वेळ आपल्या दिनक्रमातून काढला पाहिजे. कारण ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचेही आपण देणे लागत असतो. तसेच नवनवीन मित्र मिळविणे, एखाद्या सामाजिक संस्थेशी स्वत:ला जोडून घेणे, सदैव उत्साही राहण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी नक्कीच आपले निवृत्त जीवन सुखी बनवितील यात शंका नाही.

© श्री उद्धव भयवाळ

औरंगाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

 

“स्वत:साठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत असतो. ते पूर्णपणे खरं आहे. पण या वाक्याचा विपर्यास ही झालाय असं आपलं मला वाटतं.

आजूबाजूला काय दिसतं?

पूर्ण आयुष्य संसाराला, मुलांना वाहिलेली गृहिणी असते. तिचं समर्पण वंदनीय असतं. पण सतत दुसऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या, घरातल्या संदर्भात जगण्याची तिला सवय होते. मात्र एका वळणावर मुलं स्वयंपूर्ण होतात. त्यांचं आईवर खूप प्रेम असलं तरी दैनंदिन आयुष्यात आईची गरज कमी होते. घरही स्थिरस्थावर होतं. मग मिळालेल्या या एवढ्या मोठ्या वेळेचं करायचं काय हा प्रश्न पडतो. शरीराची दुखणी, मनाचा एकटेपणा यांचा संबंध मग जुन्या घटनांशी, व्यक्तींशी, अगदी ज्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकलं, त्या

मुलांशीही जोडला जातो.

पुरूषांचं  हेच होतं. नोकरी, व्यवसायातले कष्ट संपतात. घरात राहण्याचा वेळ वाढतो. मग घरातल्या अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्षे चालू होत्या पण जाणवलेल्या नव्हत्या , त्या अचानक जाणवायला  लागतात. बारिक सारिक गोष्टीत हस्तक्षेप सुरू होतो. समाजातल्या,  राजकारणातल्या समस्यांवर कृतीशून्य चर्चा मोठ्या उत्कटतेने सुरू होते. आणि समवयस्कांखेरीज इतरांना त्यातली निरर्थकता जाणवल्यामुळे ती निरस वाटू लागते.

या दोन्ही मागचं कारण मला वाटतं, आपण नेहमी”दुसऱ्यांच्या संदर्भात”जगतो. “दुसऱ्यांसाठी”असं मी म्हणणार नाही. कारण दुसऱ्यांसाठी आपण जे करतो त्याचा आपल्याला आनंद होतो म्हणून करतो हे खरं आहे. त्यामुळं तसं आपण दुसऱ्यांसाठी काहीच करत नाही. दुसऱ्यांच्या संदर्भात करतो. तर आपण मूलतः आपल्यासाठी जन्मलो आहोत आणि आपल्यासाठी जगतो आहोत हेच आपण विसरतो.

आपण सवड असली तरी व्यायाम करत नाही,  फिरायला जात नाही. स्वत:साठी योग्य ते खात नाही.

मनाला विकसित करण्यासाठी ध्यान, स्वसंवाद,  विवेकपूर्ण विचारप्रक्रियेची समज याकडे लक्ष देत नाही. (अर्थात या विवेकाची सवय लगेच होत नाही. बऱ्याचवेळा अविवेकानं वागून झाल्यावर “अरेरे. . . चुकलं आपलं”असं वाटतं. )पण तेही ठीक आहे. निदान यामुळे दुसऱ्यांवर रागवण्याचा क्षणिक उद्रेक झाला तरी नाराजीची पुटं चढत नाहीत मनावर.

स्वत:साठी काही पाठांतर करण्यात आपण वेळ देत नाही. कारण पाठांतर वगैरे लहान मुलांशी संबंधित. . . आता या वयात मला काय गरज? असं वाटतं. पण वाढत्या विस्मरणशक्तीवर काही श्र्लोकांच्या पाठांतरासारखे इतरही स्मरणशक्तीचे व्यायाम उपयुक्त असतात.

यातल्या कशालाही पैसे लागत नाहीत. २४तासात कमी होत चाललेल्या आणि कधीकधी वाढलेल्यासुध्दा जबाबदाऱ्या सांभाळून यातलं सगळं नाही पण थोडं काहीतरी आपण करू शकतोच. पण असं फक्त स्वत:साठी काही करायची आपल्याला सवय नसते. या अर्थानं स्वत:साठी जगणं हे फार महत्त्वाचे आहे. पैसा उडवणं आणि गुंतवणं यात फरक आहे. तोच फरक स्वत:पुरतं जगणं आणि स्वत: साठी जगणं यात आहे असं मला वाटतं. स्वत:पुरतं जगताना तुम्हाला दुसऱ्याचा विचार करायची,  दुसऱ्यासाठी झिजण्याची गरज नसते. पण स्वत:साठी जगण्यासाठी दुसऱ्यांसाठीचं जगणं सोडायची गरज नसते. गरज असते ती फक्त सतत दुसऱ्यांच्या संदर्भात जगणं सोडायची.

हेच तर “कैझान”आहे जे आपण कंपन्यांमध्ये राबवतो पण स्वत:च्या  आयुष्यात कैझानची गरज आणि ते अत्यंत छोट्या गोष्टीतून कसं इंम्प्लिमेंट करता येईल याचा विचार करतच नाही. माझ्या posts हे माझं loud thinking ही असतं हं. . . कारण मीही प्रवासीच आहे की कैझानची.

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

मोबाईल नं. ९८५०९३१४१७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखु  ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर

☆ जीवनरंग ☆ सखु  ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆

 

चांगल रुपया येवढ मोठ ठसठशीत कुंकू लावणारी, हातात कायम हिरवा चुडा असणारी, नीट नेटक स्वच्छ नऊवारी लुगड नेसणारी, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदा सर्वदा हसतमुख असणारी आमची सखु.

मध्यम बांध्याची, सावळ्या रंगाची, आणि स्वच्छ राहणारी सखु आमच्या कडे गेली कित्तेक वर्ष काम करत होती. कितीही दुःख, कष्ट असले तरी त्याचा लवलेश नाही चेहर्‍यावरती. सदा हसतमुख. पदरी तीन मुले आणि दारुडा नवरा. हिने रात्रंदिवस काम करायचे, मुलांना चार घास खाऊ घालायचे आणि रात्री नवऱ्याचा यथेच्छ मार खायचा. हा नित्य क्रम…. तरी ही माऊली हसतमुख चेहर्‍याने दुसरे दिवशी कामा वर येत होती.

एकेदिवशी तिच्या पाठीवरचे वळ खूप काही बोलून गेले. आणि तिला त्या दिवशी मी न राहून विचारले, काय झाले, मारले आहे काय काल नवऱ्याने ?? त्यावर हसत म्हणाली रोजचं हाय की. आम्ही राबायचे कष्ट करायचे, खायला घालायचे आणि वर मार खायचा. मला आधीच खूप राग आला होता तिचे वळ बघून म्हणून पोटतीडकीने, जरा रागातच म्हणाले मग सोडून का देत नाहीस त्याला?? नाही तरी स्वतः कमावतेस, तो काही तुला पोसत नाही मग हवाच कश्याला तो ? कधी नाही ते ती आज खूप त्रासलेली होती, म्हणाली स्वतः साठी नाही हो आज लढून आली आहे माझ्या हिरकणी साठी, हिरकणी म्हणजे तिची पंधरा वर्षाची वयात आलेली पोर. दिसायला गोरी पान, नाकी डोळी नीटस असलेली आईसारखीच हसतमुख. आज तिच्या बापाने चक्क पैश्यांसाठी विकायचा प्रयत्न केला होता. आज मात्र सखु भरभरून बोलत होती पहील्यांदा. नागाच्या शेपटी वर पाय दिल्यावर जसा नाग चवताळून फणा काढतो तसा. त्यावर मी परत तोच प्रश्न केला तिला, सोडून का देत नाहीस त्याला? आता मात्र ऐकुन घ्यायची वेळ माझी होती. म्हणाली कसा ही असला तरी कुंकू आहे माझं, आज त्याच कुंकवा मुळे घुबडासारख्या घाणेरड्या नजरा वर तोंड करून बघायची हिम्मत ठेवत नाहीत. हे काळे मणी गळ्यातले रक्षण करतात माझे ताई. आणी दारुडा असला तरी माझ्या वर लई प्रेम करतोय. आज कोणाच्या सांगण्यावरून पैश्यांसाठी खूप मोठी चूक करायला निघाला होता, पण आज मी पण हात उगारला बघा नाही सोडला आज त्याला, माझ्या पोटच्या गोळ्याचा सौदा करायला निघाला होता, जागेवर आणले टक्कुर त्याचे, कस काय मती फिरली त्याची काय माहीत, लई जीव आहे त्याचा पण हिरकणी वर, नशा उतरली तेव्हा ढसाढसा रडला,पोरीला कवटाळून.

आणि तिने नंतर जो मला प्रतिप्रश्न केला त्याने मात्र मी अंतरबाह्य हलले.

ती म्हणाली आमच्या सारखीअनाडी लोकं पिऊन रात्री नशेत असतात पण तुमच्या सारखी सुशिक्षित लोक दिवस रात्र नशेत असतात. फक्त पैसा मिळवणे एवढाच ध्येय. घर दार मुलं बाळ तुम्हा मोठ्या माणसांना पण आहेच की. ती म्हणाली, मी जिथे जिथे काम करते तिथे पाहिले आहे ताई घर तर तुम्ही बायकाच सांभाळता की. खर सांगु ताई तुमच्या सुशिक्षित लोकात पण पितात फक्त झाकून. हाणामारी तर तुमच्यात पण होते फक्त चार भिंतीत दडवून ठेवली जाते आणि आमची चवाट्यावर येते. ही सुशिक्षित लोकं जेव्हा त्यांची पायरी सोडतात तेव्हा जास्त त्रास होतोय ताई. फक्त पैशांचे खेळ आहेत. तुम्ही झाकून ठेवता, गरिबी काही झाकून देत नाही एवढेच. उलट आम्ही बोंबाबोंब करून अन्याय विरूद्ध आवाज उठवतो वेळ प्रसंगी हातही उगारतो, पण तुम्ही निमुटपणे सोसता आणि कुणाला कळायला नको म्हणून लपवून सहन करता.

खरच की, ती एवढ बोलून गेलीपण दुसर्‍या कामावर. आणि मी बधीर मनानी नुसते विचार करत होते. ती बोलून गेली ते अगदी खर होत. अशी कित्येक सुशिक्षित घर आहेत जिथे नवरा रोज पिऊन येतो मारहाण करतो, ज्याची बाहेर आपल्या एज्युकेटेड लोकांच्या भाषेत गर्लफ्रेंड असते, अशिक्षित त्याला रखेल म्हणतात. आपण थोबाडीत खाऊन चेहेरा लपवितो तर त्या एक घेऊन दोन ठेऊन द्यायची हिम्मत ठेवतात.

मग नक्की अबला कोण आपण की त्या? एक ना अनेक प्रश्न मला भेडसावत होते ज्याची उत्तरे माझ्या जवळ पण नव्हती.

सहज मनाच्या कोपऱ्यातून☺️

 

©  सुश्री श्रेया सुनील दिवेकर 

मो – 9423566278

30.8.2020

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ मी मला भेटले  ☆ सौ. मानसी काणे

सौ. मानसी काणे

संक्षिप्त परिचय  

शिक्षण –  एम ए.

दूरसंचारमधे ३० वर्षे नोकरी. अनेक मासिकात कथा लेखन. अनुवाद. वर्तमानपत्रात सदर लेखन.

☆ विविधा  ☆ मी मला भेटले  ☆ सौ. मानसी काणे ☆

आयुष्याच्या भर मध्यान्हीत मी स्वेच्छानिवृत्ती घेतली.  कितीही विचारपूर्वक घेतलेला निर्णय असला तरी एकदम आलेल रिकामपण अंगावर आल. मुल मार्गी लागलेली. घरापासून दूर रहाणारी,नवरा नोकरीत आणि मी अशी एकटी रिकामी घरात. मग घरात साफसफाई कर,पंखे पूस,खिडययांच्या जाळया साफ कर अशी सटरफटर काम काढली. वाचून वाचून वाचणार तरी किती? कथाकीर्तन आणि अध्यात्माचा ओढा मला कधीच नव्हता. सामाजिक कार्यात झोकून देण्याची वृत्ती नव्हती. मी ऐहिक सुखात रमणारी साधी बाई. मग करायच तरी काय? अशाच एका संध्याकाळी मावळतीच्या सोनेरी किरणासारखी ती मला भेटली. रिकामपण अंगावर घेऊन संथ बसलेल्या मला तिन हलवून जाग केल. म्हणाली,‘‘काय ग,चांगली आनंदी असायचीस की नेहमी. मग आता का अशी सैरभैर झालीस? चल ऊठ. शिवणकाम,भरतकाम किती सुंदर करायचीस. मला नातू झाला आहे. नव्यान सुरुवात कर छान झबली टोपडी शिवायला. भरतकाम करून दुपटी शीव.  पॅचवर्क कर. आणि लिहायच का बंद केलस ग? किती छान लिहायचीस तू कॅालेजमधे,ऑफिसच्या मॅगझिनमधे. कधी पेपरमधे. अस कर एक कथाच लिहून टाक झकासपैकी किंवा प्रवासवर्णन लिही  आणि दे दिवाळी अंकात आणि इतर मासिकात  पाठवून. दारात मस्त रांगोळी काढचांगली मोराची काढ. तुझी स्पेशालिटी होती ती. पानफुल आणि विविध प्रकारचे मोर. प्रत्येक मैत्रीणीच्या वाढदिवसाला छानशी पर्स किंवा पिशवी द्यायचीस भेट म्हणून स्वत: शिवलेली. त्यावर नाजुक मोर भरलेला असायचा. कुठ गेल ग ते सगळ? आणि पेंटिंग करायच का सोडलस?. ’’तुझ्या जुन्या घरातल्या बिंतींवर किती छान वेलबुट्टी काढलेली होती. आणि इथ साध स्वस्तीक नाही?

‘‘अग हो, हो किती बोलशील धबधब्यासारखी? कशी देवासारखी भेटलीस बघ.  मी हे सगळ विसरुनच गेले होते. ’’मी म्हणाले. ‘‘हे भेटीचे क्षण घट्ट पकडून ठेवायचे. आनंदी रहायच अन आनंद वाटायचा विसरू नकोस. विनोदी बोलून सर्वाना हसवणे हे तर तुझ शस्त्र होत. ते नको म्यान करूस. बर निघू मी? उशीर झाला. ’’आली तशी वार्‍याच्या झुळुकीसारखी ती निघून गेली. तिन सांगितलेल सगळच तर माझ्याकड होत. मग मी हा मिळालेला वेळ का बर वाया घालवते आहे.  मी झडझडून उठले. सुई , दोरा, रेशीम, कापड सगळ जमवल. शिवणाच मशीन स्वच्छ करून त्याला तेलपाणी केल आणि सुरु केल दणययात काम. सुंदर झबली टोपडी शिवली. जरीच्या कुंचीला मोती लावले. दुपट्यावर इटुकली पिटुकली कार्टून पॅच केली. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे जोडून मऊमऊ गोधडी शिवली. एक मस्त पिशवी शिवली. हे सगळ पहात असताना मला हे कपडे घालून दुडदुडणार गोंडस बाळ दिसू लागल.

मी हातात पेन घेतल आणि सुरू केल लिहायला. मनातल्या भावना शब्दरूप घेऊन झरझर कागदावर उतरू लागल्या. काय लिहू आणि किती लिहू अस मला झाल. सकाळी रांगोळी हातात घेतली आणि तुळशीसमोर एक मोर पिसारा फुलवून उभा राहिला. माझ्या मनात नाचू लागला. आता मला वेळ पुरेना. इतकी आनंदात तर मी यापूर्वीही नव्हते. मला अचानक भेटलेली कोण ही जादुगारीण? माझच आस्तित्व मला पुन्हा मिळवून देणारी कोण होती बर ती? आणि एका क्षणी मला लख्ख समजल की ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या आतली मीच होते. माझे माझ्याशीच ऋणानुबंध जुळले होते. जिवाशिवाची भेट झाली होती. ‘‘भेटीत तुष्टता मोठी’’ हे अगदी खर होत. मी नव्यान आनंदाला सामोरी जात होते. आनंद लुटत होते. नव्यान स्वत:ला भेटत होते.

© सौ. मानसी काणे

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये ☆

मराठी भाषेच्या शब्दसौंदर्याइतकाच तिचे शब्दसामर्थ्य हाही सखोल अभ्यासाचा विषय आहे. व्यूह हा शब्द याचीच प्रचिती देणारा वाटतो. चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ ल्यालेला हा शब्द!बेत, योजना, धोरण, युक्ति, हे जसे सकारात्मकता ध्वनीत करणारे अर्थ, तसेच कट, कारस्थान, डाव, डावपेच असे नकारात्मकतेच्या कृष्णछायाही याच शब्दाच्या. . ! युध्दात युध्दनीति, रणनीति ठरवताना शत्रुपक्षाच्या कसब/कुवतीचा अंदाज/अभ्यास जसा महत्वाचा तसाच त्यांच्या रणनीतिला छेद देण्यासाठी बुध्दीकौशल्यही तेवढेच आवश्यक. . ! हे बुध्दीकौशल्य अपरिहार्य ठरतं जेव्हा शत्रूपक्ष सर्वार्थाने प्रबळ असतो. ठाम निर्धार, खंबीर मन,  संघटन कौशल्यआणि उत्कट राष्ट्रप्रेम याच मुख्य भांडवलाला तीव्र बुध्दीमत्तेची जोड मिळाली आणि शिवाजीमहाराजांनी अतिशय प्रबळ मोगलसम्राटाशी लढताना युध्दनिती ठरवली ती स्वनिर्मित अशा ‘गनिमी कावा’या संकल्पनेनुसार. . !

व्यूह या शब्दाला रचनाकौशल्याची जोडही तेवढीच आवश्यक असते. विशेषत: बुद्धीबळासारख्या खेळात(लुटूपुटूच्या लढाईत)सुध्दा व्यूहरचनाकौशल्य अपरिहार्यच. . !

युध्दरचना, युध्दनीति यांची कसोटी लागते ती रणांगणावर हे कालपरवापर्यंतचं

वास्तव होतं. पण कालौघात व्यूहरचनेची गरज ही आज कुटुंबव्यवस्थेलाच खिळखिळी करु पहात आहे. सहजीवनातील अस्वस्थता, घटस्फोटांचं वाढत चाललेलं प्रमाण ही कौटुंबिक पातळीवरील छुप्या युध्दाचीच परिणती. या रणांगणावर व्यूह शब्दाचे नकारात्मक अर्थच ठळक होतात आणि ते सार्थ ठरवायला कट कारस्थानं प्रबळ होतात. टोकाचा आत्मकेंद्रीपणा नात्यातला गोडवा शोषून घेत स्वत; पुष्ट होत जातो आणि युध्दशस्त्रं परजली जातात. परस्पर सामंजस्य रणांगणावरील युध्दविरामासाठी अपरिहार्य असतं तसंच गृहकलहातही. देवाणघेवाण तिथल्यासारखी इथेही. पण इथे त्याची जाणिव  व्हायची तर ती उशीरा सुचलेल्या शहाणपणा सारखी नसावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण त्या युध्दांच्या बाबतीत रम्य वगैरे असणार्या ’ युध्दस्य कथा’ या प्रकारच्या युध्दात मात्र अतिशय क्लेशकारक असतात. . . !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली.

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

☆ विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

जन्म: कोल्हापुर ९ ऑगस्ट १९६१.

शिक्षण: पदवीधर: शास्त्रशाखा, पदव्युतर : मनुष्यबळ संसाधन विकास.

वेगवेगळ्या औषधनिर्माण आस्थापनांमधे मनुष्यबळ  संसाधन विकास अधिकारी म्हणून ३४वर्षाचा अनुभव.

सध्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था मधे जाऊन  व्यक्तीमत्व विकास, वेळेचे नियोजन, मुलाखतीचे तंत्र, आयुष्यात  सुरक्षिततेचे महत्व इ.विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शाळा- कॉलेजमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात विशेषतः नाट्याभिनयामधे प्रावीण्य.  सध्या  बदलापूरमधे वास्तव्य. बदलापूर कलासंगम ह्या स्वतःच्या संस्थेमार्फत बालकलाकारांना भारतीय अभिजात कलामधे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मराठी साहित्यात विशेष अभिरूची.

☆ विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

शाळेत कॉलेजमधे असताना वह्या,पुस्तके,प्रयोगवह्या, dissection box…खास डायरी हे सारं एकत्र ठेवणारा कपाटातली एक कप्पा….रोज हव्या त्याच विषयाची वही,पुस्तक  घेऊन शाळेत वा  कॉलेजला नेणे..बाकी सारं त्या कप्प्यात एकदम सुरक्षित…दोन तीन महिन्यातून एकदा तो विस्कळीत कप्पा पुन्हा आवरला जायचा….. एकाच कपाटात खाली-वरती असे एकमेकांचे कप्पे असले तरी खरंतर आपला कप्पा विस्कळीत करण्याचं काम ही आपलंच असायचं.

मोठी बहीण ग्रॅजूएट झाली….एक कप्पा रिकामा झाला. पण ती जागा तिच्या वाचनाच्या इतर पुस्तकांनी घेतली. दुसरी बहीण ही ग्रॅजूएट झाली पण पी.जी.च्या reference books नी ती जागा व्यापली. अस्मादिकांनी पदवी गळ्यात पाडून घेतली नि शिक्षणापासून सुटका करून घेतली नि कप्पा रिकामा करून टाकला आणि त्यात माझ्यासाठी अशा मराठी मधील वेगवेगळ्या नाटकांच्या संहितानी स्थान पटकावलं.

बंधूराजांचा कप्पा नेहमीच ड्रॉईंग पेपर, वेगवेगळ्या शिसपेन्सीली, खडूच्या रंगपेट्या, वॉटर कलर, कॅनवास पेंट,ऑईल पेंट… असल्या काहीच्या काही..मला अनाकलनीय गोष्टींनी खच्च भरलेला….तो काही कधी रिकामा झाला नाही.

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मराठी साहित्याचा संभाळ करण्याची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागली. त्यात केशवसुत, बालकवी, वि.दा.करंदीकर,वसंत बापट,मंगेश पाडगावकर, पु.लं. देशपांडे, प्र.के.अत्रे, वि.स.खांडेकर कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर, दुर्गाबाई भागवत या आणि बर्याच मराठी सारस्वतांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या साहित्याचा सहभाग होता.

मी जरी सायन्स ग्रॅजूएट झालो तरी घरात असलेल्या या  अथांग मराठी साहित्य सागरात आजही  डूंबत राहिलो आहे. मूळातच, जीवशास्त्रात, प्रचंड गोडी असल्याने दूसर्या बहिणीच्या, किटकशास्त्राचेही खूप आकर्षण राहिले.

घरच्या अध्यात्मिक वातावरणामुळे सार्थ दासबोध,अभंग ज्ञानेश्वरी, इतर संतमहात्म्यांचे साहित्य तर वडिलांची वैद्यकीय क्षेत्रातील वाग्भट,चरकसंहिता, धूतपापेश्वर, medical dictionary अशी बरीच साहित्य संपदा होती (आजही जपली आहे.)

माझ्या नोकरीच्या निमित्ताने human resources वरील कित्येक संदर्भपुस्तकांची माझ्या कप्प्यात भर पडली. आज  माझ्या मुलाच्या आवडीनूसार नी व्यवसायानूसार हिंदी, इंग्रजी, मराठीतील नाट्य,चित्रपट, वगैरे संबंधीत,तसेच त्याच्या खास आवडीच्या उर्दू गझला, उमर खय्याम, गालिबसाहब, कैफी आझमी साहब यांच्या सह मराठी गझलकार कवी सुरेश भटांच्या साहित्याचा समावेश आहे.

थोडक्यात काय तर तीन पिढ्यांच्या वेगवेगळ्या साहित्यसंपदेने कपाटातील कप्पे आजही सजलेले आहेत .

कपाटातले कप्पे जसे भिन्न भिन्न पुस्तकांनी  भरलेले … तसेच मनातले,हृदयांतील कप्पेही आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांवर,वळणावर भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लीनी भरलेलंही आहे नि भारलेलं ही आहे..जन्मांला आल्यापासून अगदी बालक मंदीर, प्राथमीक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज , नुकत्याच सरलेल्या क्षणापर्यंत जे जे कोणी मित्र,मैत्रिणी,सगे,सोयरे,हितचिंतक, काही प्रमाणात दुरावलेलेही हे सारे मनाच्या,हृदयाच्या कप्प्यात विसावलेले असतात.

जशी काही पुस्तकं आपल्याला आवडत नाहीत तरीही ती आपण कप्प्यात ठेऊन देतो तशा काही व्यक्ती आवडत नसल्या तरीही मनाच्या कप्प्यात एका कोपर्यातली जागा  पकडून बसतात. कालांतराने अशीच एखादी दुरावलेली  व्यक्ती पुनः आपल्या आयुष्यात येते नि दोघांचंही परिपक्व झालेलं मन एकमेकांना वाचतं नि मग आपण समजतो …

अरे त्यां पुस्तकासारखंच झालं…पूर्वी वाचलं तेव्हा कळलं नाही नि आता नीट कळलं?..म्हणजे फरक वाचण्यात होता  कि  समजण्यात??

कपाटातली कप्प्यातली विस्कळीत झालेली पुस्तकं व्यवस्थित करता येतात पण विस्कळीत झालेली नाती व्यवस्थित करणं मात्र खूप अवघडच!!!!

काही पुस्तकातील चांगल्या ओळी,विचार आपण आवडल्या नंतर लिहूनही ठेवतो नि स्मरणातही…तसंच चांगल्या व्यक्ती बद्दल आपण आपल्या मनात कोरून ठेवतो.

पुस्तकं खूप झाली.. तर एक कप्पा भरला कि दूसरा….एक कपाट भरलं कि दुसरं…..

आपले खूप मित्र,सवंगडी झाले अगदी…..अगणित झाले तरी मनाचा,हृदयाचा कप्पा तेवढाच असतो. तरीही सारे जण त्यात सामावतात. तिथं कधीच दाटीवाटीनी सारे बसत नाहीत मुंबईच्या लोकलच्या गर्दीसारखे…….

सगळीच पुस्तक सतत आपल्या बरोबर नसतात………

मिळवलेला पैसा तो ही कायमच आपल्या सोबत असतो असं नाही….थोडा घरी…थोडा बॅंकेत….थोडा खिशात…..पण मनात नि हृदयांतील सखे पावलोपावली आपल्या सोबत असतात…..म्हणूनच….कपाट किती मोठं असावं,खिसा किंवा बॅंक किती मोठी असावी याला मर्यादा आहेत, पण मन आणि  हृदय किती मोठं असावं याला मात्र मर्यादा नाही.

 

© राजीव पुरुषोत्तम दिवाण

बदलापूर(ठाणे)

फोन:९६१९४२५१५१

वॉट्स ऍप :८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

☆ मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

मन हे माणसाचे सहावे इंद्रिय आहे.नाक,कान,डोळे, रसना आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांना माणूस जेवढा ओळखतो त्याच्या पावपटही तो या सहाव्या इंद्रियाला ओळखत नाही.त्याचे सर्वात महत्वाचे कारण ही पाच ज्ञानेंद्रिये शरीरबाह्य आहेत आणि मन हे देहान्तर्गत आहे.जशी पाच ज्ञानेंद्रिये आपण दाखवू शकतो तसे मन दाखविता येत नाही.

मन दिसत नसले तरी सर्व इंद्रियामध्ये ते बलवान असते.सर्वावर त्याची सत्ता असते.जेव्हा माणसतली राक्षसी वृती जागृत होते माणसाचे मनोबल त्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते.ही मानवी जीवनाच्या

विनाशाची सुरवातच म्हणावी लागेल.माणसाचे पहिले दुष्कृत्य म्हणजे सुधाकराचा एकच प्याला असतो.

हे लक्षात घेऊन आपण आपले मनोबल विधायक कामासाठी वापरले पाहिजे.विधायक कामासाठी मनही सदाचारी होणे महत्वाचे!

मन सदाचारी बनवायचे असेल तर आपल्या सहा शत्रूंना आपण जिंकले पाहिजे.हे सहा शत्रू म्हणजे काम,क्रोध, मद, मत्सर, लोभ! त्याना जिंकणे तसे सोपे नसते तरीही प्रतत्नपूर्वक सोपे करण्याचा प्रयत्न अशक्य नसतो. भूतकाळातील चांगल्या घटना, आठवणीना उजाळा देत आपण सकारात्मक विचार करू शकतो,आपल्या शत्रूंना आपल्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात हळूहळू यशस्वी होऊ शकतो.अशा यशस्वी होण्याने आपोआपच आपले मनोबल वाढते.

आनंद हे सुध्दा मनोबल वाढविण्याचे महत्वाचे कारण होऊ शकते.त्यामुळेच आपली आनंदीवृत्ती सहजपणे संकटाशी सामना करू शकते .प्रत्येकाने आनंदीवृत्ती जोपासून आपले मनोबल वाढविले जगणे सोपे होईल.अर्थात प्रत्येकाचे आनंद मिळवण्याचे मार्ग निश्चितच वेगळे असतात.

मनोबल वाढण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा असतो.एखादा पाण्याने अर्धा भरलेला पेला बघताना तो अर्धा भरला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा आहे म्हणायचे हे जसे त्या पेल्याकडं बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते तसेच मनोबलाचे असते.मानवी जीवनाच्या विकसासाठी सकारात्मक मनोबल उपयोगी पडते.जगायचेच आहे तर स्वप्नपूर्तीच्या मनोरथावर स्वार व्हावे म्हणजे जीवन यशस्वी होईल.

 

©  सुश्री अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बकुळ ☆ सौ.दीपा पुजारी

ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन’?

 

☆ विविधा ☆ बकुळ ☆ सौ.दीपा पुजारी 

ते एक बकुळीचे झाड.

लहानपणीचं

छे! झाड कसलं? तो तर आमचा कल्पवृक्ष!!

किती आठवणी,किती रेशीमबंध विसावलेत   याच्या सावलीत.

अल्लड बालपण,खेळकर किशोरपण आणि हो  चैतन्यानं भारलेलं तरुण मनही यानंच जाणलं.

किती आनंद दिला या बकुळीनं!

किती गोष्टी शिकवल्या त्या गर्द हिरव्या पानपिसार्‍यानं.

रोज संध्याकाळी आई आम्हांला घेऊन बकुळीखाली जायची.माझ्या हातात सुईत ओवलेला दोरा असायचा. खाली पडलेली बकुळीची फुलं दोर्‍यात ओवली जायची.फुलाच्या सूक्ष्म छिद्रातून सुई ओवणं हे त्या वयात खूपच आव्हानात्मक होतं. एकाग्रता,कोऑर्डिनेशन, संयम आणि इतर अनेक.

या झाडानं कायकाय नाही शिकवलं?किंबहुना

बकुळीच्या रुपात आईनं शिकवलं. फारसं न बोलता, सुवासाची मुक्त उधळण करत बोलणार्‍या बकुळीनं मुग्ध संवाद शिकवला. नाजूक रेघांसारख्या पाकळ्यांनी संयोजनातून नियोजन करण्याचं कसब सांगितलं. वर्षभर हिरवी सावली देताना सोबत्यांना सावली  देणारं  शांतचित्त दिलं . वार्‍याच्या झोताबरोबर सलगी करून नागमोडी कड असलेल्या पानांनी सळसळणारी हास्यलहर चेहर्‍यावर आणण्याचं कौशल्य दिलं.

एवढंसं चिमुरडं,सावळंस,नाजूक  रुप.कुठलाही आकर्षकपणा नसतांनाही सगळ्यांना वेड लावण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे . सुकलेली बकुळही आपला सुहास उधळतच राहते. या एव्हढ्याश्या फुलात एव्हढं सामर्थ्य कुठून येतं? जगण्याची सहज सुंदर अभिव्यक्ती आली कुठून?

केवळ स्वत:जगणं नाही तर;आनंदकंदाची उधळण करत जगणं,जगण्याचाही सोहळा व्हावा  असं जगणं !!! निसर्गानं आपल्या अवतींभोवती खूप गोष्टी पेरून ठेवल्या आहेत.आपण  यातून काय व किती घेतो यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. या सिमेंटचे जंगल निर्माण करण्याचा अट्टाहास असाच सुरु राहिला तर?मुलांना बागेत हुंदडण्याचा,मातीत खेळण्यातला आनंद कसा मिळणार ? मित्रांबरोबर खेळण्याची संधी मिळणार नाही का?ऑनलाइन शाळेत खडू फळ्याशी गट्टी कशी होणार ? खिडकितून दाखवायला चिमण्याच नाही राहिल्या तर काऊचिऊची गोष्ट कशी सांगावी या चिमुरड्यांना? मित्रांबरोबर पतंग उडवताना वार्‍यावर डोलणारं गवतफुलात भान विसरेल अशा रंगकळा असतात; त्या कशा दिसतील या बालचमूला? वार्‍याची पावरी वाजवणारं बांबूच बन कसं दाखवायचं या नव्या पिढीला?

डोंगर दर्‍या काय फक्त टी. व्ही वरच बघायच्या या मावळ्यांनी?

आज आलेला  कोरोनाचा रोना थांबेलही. आकाश स्वच्छ होइल ही!तरीही आपण खडबडून जागं होणं अत्यंत गरजेच आहे. जुन्याच विचारांची

नव्यानं पेरणी करायला हवी. निसर्गात रमण्याचं,निसर्गात खेळण्याचं, निसर्गासवे वाढण्याचं शिक्षण घ्यायला हवं . नाहीतर . . . .

“घनदाट इमारतींच्या

अल्याड वा पल्याड

थकलेल्या चांदोबाला

मिळेल का कडुलिंबाच झाड?”

या ओळींचा प्रत्यय यायला वेळ लागणार नाही. चांदोमामाच्या गोष्टी शिवायच ही पिढी मोठी झाली तर? ही मुलं स्मार्ट असतील,बुध्दिमान असतील पण सिमेंटचे जंगल यांना भावना देईल का? आजूबाजूला निसर्गाच्या ऐवजी गॅझेटस् असतील तर माणुसकी संपूनच जाईल.म्हणूनच

अंगण आणि तुळशी वृंदावनाशी असलेलं नातं जपलं पाहिजे .सावळी बकुळ गंधीत होऊन बहरली पाहिजे .

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  बंद दरवाजा ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

संक्षिप्त परिचय 

माणगाव, सिंधुदुर्ग येथे वास्तव्य आणि वैद्यकीय व्यवसाय.

लेखन व वाचनाची आवड. अनेक नियतकालिके, मासिके, दिवाळीअंक यामधून वेगवेगळ्या विषयांवर लेखन! ललीतलेखन हा अधिक आवडता लेखनप्रकार! विनोदी लेखनाची आवड! काही कविता, कथा आणि व्यक्तीचित्रणे वेगवेगळ्या अंकातून, इ- अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.

☆ विविधा ☆  बंद दरवाजा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

दोन दिवस या माझ्या स्मार्ट भ्रमणध्वनीने हैराण केले बाई !मी आपली सारखी उचलून उचलून त्याला अंजारुन गोंजारुन इंटरनेटशी सख्य करायला सांगत होते, तो बिचारा माझा सोनूला पण  दहा दहा वेळा विनवणी करुन त्याला आपल्या कवेत घ्यायला विनवत होता.पण आज भारत संचार निगमच्या नेटमहाराजानी संप पुकारला होता.बाकीचे नेटकर पण जरा तोऱ्यात असल्याने आखडून दाखवत होते. त्यामुळे माझे कायप्पा (WAP) आणि मुखपुस्तक (fb) पण बिचारे हवालदिल झाले होते. त्यांचे सर्वच दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून मैत्रिणींबरोबर चिवचिवाट, हळूच एकमेकींना private मेसेज टाकून दुसऱ्या एखादीबद्दल गॉसिप करायला न मिळाल्याने आणि सख्यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला न मिळाल्याने माझ्या जीवाची नुसती घालमेल होत होती. रोज सकाळी पुन्हा पुन्हा मी त्या भारत संचार ची विनवणी करत होते, पण पठ्ठ्या काही दाद देत नव्हता. शेवटी मनावर दगड ठेवून त्या माझ्या भ्रमणसोन्याला हातातून बाजूला ठेवले आणि ‛आलीया भोगासी’ असे म्हणून कणिक तिंबायला घेतली. सगळा राग तिच्यावर असा काढला की प्रत्येक पोळी तव्यावर टम्म फुगली. त्यावर मुलांचे बाबा म्हणतात कसे, “ चला रे मुलांनो, पट्कन जेवायला बसा. आज आपल्यावर कायप्पा आणि मुखपुस्तकाने कृपा केलीय. गरगरीत पोळी आणि झणझणीत रस्सा खाऊन टाका बरे! परत कधी नशिबात असेल सांगता येणार नाही. ”मला जरा रागच आला. त्याच रागात दणादणा भांडी घासली, खसाखसा ओटा पुसला आणि लख्ख केला. ती टमटमीत पोळी आणि झणझणीत रस्सा रागारागाने गिळला. मग बराच वेळ एकट्या पडलेल्या त्या माझ्या भ्रमणसोन्याला पुन्हा प्रेमाने हातात घेतले. चांगले अंजारले-गोंजारले आणि नेटमहाराजांची आराधना करायला सुरुवात केली .

श्वास रोखून बघत राहिले तर काय आश्चर्य? चक्क नेटमहाराज प्रसन्न झाले आणि  सर्व बंद दरवाजे उघडले गेले आणि कायप्पा धबधब्यासारखा कोसळू लागला. मुखपुस्तकाच्या संदेशानी इनबॉक्स भरुन गेला आणि त्या वर्षावात मी चिंबचिंब भिजून गेले.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  गारवा ☆ सौ. अंजली गोखले

☆ विविधा ☆  गारवा ☆ सौ. अंजली गोखले ☆

रण रण त ऊन! मे महिन्याचा रखरखीत उन्हाळा! धरती तप्त ! उन्हामध्ये आंबा घाटामध्ये, एक पांढरी शुभ्र आली शान गाडी थांबली. गाडी मधून सहा सात बहिण भाऊ उतरले अन् त्यांची मनं जणू काही फुलपाखरं बनली . घाटामधल्या वृक्षांनी आपली सळसळ करून त्यांचं स्वागत केलं . हिरवी काळी टपोरी करवंदं म्हणाली,” या रेया ‘ बाळांनो, आम्ही तुमचीच वाट पहात होतो . तुमच्याच साठी आम्ही या उन्हातही आमच्या तला गोड रस टिकवून ठेवलाय”.

बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेल्या या बहिण – भावंडांना खूप आनंद झाला होता . आंबा घाटातला हिरवागार निसर्गही त्यांच्याच साठी फुलला होता . सगळीकडे रखरखत ऊन असलं, तरी झाडाच्या मुळांनी खोलवर जाऊन आपल्या खोडासाठी, पानां साठी, पाणी आणलं होतं . पानाचा रसरशीतपणा, तजेलदार पणा टिकवून ठेवला होता . मध्येच एखाद्या झाडाला, नाजूक नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झुबके लागले होते . वाऱ्या बरोबर डोलत डोलत, ते झुबके यांचे स्वागत करत होते . अंतरा अंतरावर लाल चुटुक गुलमोहोर बहरला होता .

अशा या रम्य आणि अवखळ निसर्गाच्या सानिध्यात ही भावंडं आपली वय विसरली, आपल्या कामाचा ताण विसरली, ऑफीस मधल्या कामाचे डोंगर विसरली, पैशाचे व्यवहार विसरली आणि आपल्या मुलांच्या वयाएवढी पुनः एकदा लहान झाली . आपल्या बालपणात रमली.

अधून मधून एखाद्याचा मोबाईल वास्तवा मध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता पण आज मोबाईल वरुनही मस्ती तच उत्तर जात होते . उन्हामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाचं चांदणं बरसत होतं . आपल्या नाजूक, रंगबेरंगी फुलपाखरी पंखांनी हे सगळे घाटातमध्ये इकडून तिकडे, तिकडून इकडे छानपैकी फिरत होते मधूनच एखादा क्षण कॅमेऱ्यात टिपला जात होता .

आज कुणाला कुणाकडून का S ही नको होत . निखळ आनंदाचा पाऊसच जणूकाही बरसत होता.

आंबा घाटाचा हा अविस्मरणीय दौरा, पन्हाळ्यावर झेललेलं गार गार वारं, हेच यांना उरलेले वर्षातले दिवस मजेत घालवायला पुरणार होतं . आनंदाचा हा ठेवा, सगळ्यांनी भरभरून मनातल्या कुपीमध्ये जपून ठेवला.

खरच, भाऊ बहिणीचं प्रेम किती निखळ, निरागस आणि पवित्र असतं. साठीनंतर भेटले तरी सगळे बालपणात रमतात. त्या गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतात.” तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा” म्हणत डुलतात . त्यांच्याकडे आठवणींच्या रेशमाच्या मऊमऊ लडी असतात, शिंपल्यातल्या मोत्यांप्रमाणे दुर्मिळ प्रेमाचे क्षण असतात , रमणीय सुखांचे तुषार असतात आणि धो धो पावसा प्रमाणे धोधो प्रसंग असतात. कधीतरी अशी मैफल जमली की आनंदाचा शिडकावा होत असतो, हास्यांची बहार फुलत असते . या स्मृतिगंधाच्या फुलांमुळेच बहिण भावाचे नाते पक्के विणले जाते आणि किती जरी एकमेकांपासून दूर गेले तरी या रेशिम गाठी घट्ट च रहातात . त्याचमुळे उन्हाळ्यातही त्या सर्वाना प्रेमाचा गारवा अनुभवता येतो आणि आपुलकीची ऊब ही मिळते.

 

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print