मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सकारात्मक विचार… ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

☆  इंद्रधनुष्य ☆ सकारात्मक विचार… ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपला दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे.

एका रात्री तिने लिहीले की….

★ मी फार सुखी समाधानी आहे.

माझा पती रात्रभर फार मोठयाने घोरतो कारण काय तर त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर मच्छर – खटमल झोपून देत नाही. म्हणजेच तो रात्री घरी असतो,आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

दर महिन्याला लाईट बिल,गैस,  पेट्रोल, पाणी वगैरेची बिलं भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहे, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असते. ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

दिवस संपे पर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर काम कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

रोज मला घरातील केर कचरा काढून घर साफ स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या साफ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे की माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर,छत नाही त्याचे काय हाल होत असतील.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्या जवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेट देऊ शकते. जर हे लोक नसते तर जीवन कीती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

रोज पहाटे अलार्म वाजला, की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.

जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत  माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.

ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे- की तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.

“सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.”

“Gratefulness” is the Best Prayer. ??

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

9422409713

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वा.रा. कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर

स्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत ) 

Va Ra Kant Kavya Vishwa - Posts | Facebook

जन्म – 6 ऑक्टोबर 1913

मृत्यु – 8 सप्टेंबर 1991

☆ काव्यानंद ☆ वा.रा.कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर ☆

बगळ्यांची माळ फुले….

त्या तरुतळी विसरले गीत…

हे अजरामर गीत लिहिणारे नांदेडचे कवी वा. रा .कांत !

त्यांच्या काव्याचा आठव व त्यांचे स्मरण याहून अधिक काय हवे त्यांना? त्यांच्या काव्य रसनेने रसिकांची तृषा वाढते आणि शमतेही!

कवी आणि रसिक हे नातेच मोठे विलक्षण! कवी हा रसिकांमध्ये ‘ काव्यतृष्णा ‘ शोधतो आणि रसिक  कवींच्या काव्यात ‘काव्यरससुधा’ !

जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींकडे, अनुभवांकडे कवी इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि ते ‘बघणे ‘ असे काही काव्यात मिसळतात की ते वाचल्यानंतर रसिकालाही ती दृष्टी मिळते  आणि तो ही  त्या अनुभवाचा तरल ,सूक्ष्म पदर अनुभवतो आणि भावविभोर होतो.

आता हेच पहा ना….. गावातील मातीचे घर… तुम्ही-आम्हीही बघितलेले. पण वारा कान्त लिहितात….

….. माझ्या मातीच्या घराची

भुई सुंदर फुलांची

दारावर अंधाराच्या

पडे थाप चांदण्यांची…..

 

किती सुंदर आहे ही कल्पना!

 

शरद ऋतूतील निळेभोर आभाळ, त्यात उडणारे शुभ्र पांढरे पक्षी….एक सुंदर निसर्ग दृश्य! कवींना मात्र काय वाटतं बघा….

 

शरदाच्या आभाळाचा

रंग किती निळा ओला

उड जपून विहंगा

डाग लागेल पंखाला !

 

अशा ओळी वाचल्या की वाटतं, या कवींच्या हृदयात काव्यरसाची एक कुपी कुणीतरी लपवून ठेवली आहे. त्यातले अत्तर त्यांच्या शब्दाशब्दात सांडत असावे!

अनुभवांच्या परिपक्वतेमुळे येणारी तृप्ती शब्दांमधून मांडताना कांत लिहितात…

 

….    असे बोलता हसता

गेले निघून दिवस

आता उरलीसे मागे

पिक्या फळांची मिठास !

 

अशा साध्या सरळ अनुभवांचे कवींच्या हाती सोने होते !

वा रा कांत यांचे ‘ बगळ्यांची माळ फुले’ हे काव्य म्हणजे एक चित्रच आहे. ती रम्य जागा, ते तरल ,मंतरलेले क्षण प्रत्येकाने आपल्या मनात जपून ठेवलेले आहेत.

 

…….. कमळापरी मिटती दिवस

उमलुनी तळ्यात…..

 

या सुंदर अनुभवात आपण रमलेलो  असताना कांत अचानक प्रश्न करतात….

 

……. सलते ती तडफड का

कधी तुझ्या उरात?…..

 

आणि मग हा प्रश्न कट्यारीसारखा आपल्या हृदयाच्या आरपार जातो!

अशा सुंदर सुंदर काव्य रचना करणाऱ्या वा रा कांत यांनी दोनुली, पहाट तारा, बगळ्यांची माळ, मावळते शब्द, रुद्रवीणा असे एकूण दहा काव्यसंग्रह लिहिले.

माझ्या मनात हे गीत नेमकं गातो कोण या प्रश्नाचा विचार करताना वा रा कांत लिहितात…

अभिमानाने कधी दाटता

रचिले मी हे गाणे म्हणता

‘गीतच रचते नित्य तुला रे’

फुटे  शब्द हृदयात

कळेना गाते कोण मनात…

आपल्या काव्य प्रतिभेचे श्रेयही ते स्वतःकडे घेत नाहीत. अशा या प्रतिभासंपन्न , विनम्र कवींना माझीही शब्दसुमने अर्पण!

 

© सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆  वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

वर्क फ्रॉम होम, ही कनसेप्ट आता साऱ्या जगभर दुमदुमते आहे. या बाबतीत कुणाला काही माहिती नाही असे नाही किंबहुना त्याचे महत्व ही आता सगळ्यांना पटायला लागले आहे. अर्थात हे काम इंजिनियर्स, टिचर्स. ऑफीस  वर्कर्स यांच्याच साठी अॅप्लिकेबल आहे असेच मानले जाते.

पण खरं सांगू का? शतको न शतके आपल्या संर्वांच्या घरातील महिला, गृहिणी वर्क फ्रॉम होम करतच आल्या आहेत. पण त्यांच्या कामाची, कष्टाची कोणीही दखल घेतली नाही. अन् घेतली जाणार ही नाही. घरीच असते म्हणजे घरातील कामे तिचीच असेच गृहीत धरले जाते. ती कामे करताना ती किती दमून जाते याचा कोणी विचारच करत नाही. ऑफीसचे काम घरामधून केले की निदान त्याचा रिटर्न पगाराच्या रुपामध्ये मिळतो. बँक बॅलेन्स वाढत जातो. एक प्रकारे मानसिक शांतता ‘ ऊ ब, समाधान नकीच मिळते. मात्र गृहिणी ना तेवढा आधारही नाही. पगार वाढ करा म्हणून संप करू शकत नाहीत की हौसेनं एखादी वस्तू मनात आले म्हणून घेऊ शकत नाही.

काही वर्षापूर्वी मलेशियाला जाण्याचा, तिथे रहाण्याचा मला योग आला होता. तेव्हा तिथल्या मित्रांना यांनी घरी जेवायला बोलावले होते. आपल्या पद्धती प्रमाणे मी जेवण वाढत होते. साधे मीठ वाढले, भांड्यात प्यायला पाणी घातले तरी ते प्रत्येक वेळी ‘ थँक्यू ‘ म्हणत होते. पहिल्यांदा ते थँक्यू ऐकून माझे मन भरून आले. डोळ्यात पाणी जमायचेच बाकी राहिले होते. मला आपल्या सगळ्यांच्या घरातल्या आई, आजी काकू, मावशी, आत्या सगळ्या सगळ्या आठवल्या. आयुष्यभर संसाराचा रामरगाडा ओढला तरी एकदाही तिला ऐकायला मिळाला नसेल ‘ धन्यवाद’ शब्द !

अर्थात आपल्या कडे तशी अपेक्षा नाही आणि प्रथा तर नाहीच नाही. पण घरातल्या कोणीतरी मनापासून दखल जरी घेतली तरी तिला आणखीनच काय करण्याचा उत्साह येतो. पण गृहीत धरणे हे आपल्या कडे रुटीन असल्यामुळे तिकडे कोणाचे लक्ष्य जात नाही.

असे दुर्लक्ष्य फक्त महिलांचे होते असेही नाही. पूर्वी एकत्र कुटुंब काळामध्ये मोठ्या व्यक्तिचा घरावर दरारा असायचा, दबदबा असायचा. त्याचाच लहान भाऊ किती जरी कर्तबगार असला, तरी त्याचे एका शब्दानेही कौतुक होत नसे. त्याची दखलही घेतली जायची नाही. हे कुणाच्या लक्षातही यायचे नाही.

आजच्या वर्क फ्रॉम होम मुळे निदान सर्वांना गृहिणीचे अस्तित्व, कर्तृत्व अन् महत्व समजायला लागले आहे असे आपण आनंदाने मानूया.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ५) – अभंग/भजन/भावगीत गायन ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ५) – अभंग/भजन/भावगीत गायन ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

शास्त्रीय संगीतावर लिहीत असतांना भक्तीगीत गायन, भावगीत गायन ह्यावर विचार होणे आवश्यक आहे असे मला वाटते कारण रागदारी संगीताला आपण “Music of class म्हटले तर अभंग, भावगीत गायनाला Music of mass म्हणणे योग्य होईल.

संगीताची आवड नाही असा मनुष्य विरळाच! त्याला गायनाविषयी कसलीही जाण नसली तरी देव माझा विठू सांवळा सारखे एखादे भक्तीगीत किंवा शुक्रतारा सारखे भावगीत कानांवर आले की मनाला कसे प्रसन्न वाटते. श्रोताही ते नकळतपणे गुणगुणु लागतो.

ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, तुकाराम आदि महाराष्ट्रांतील संत मंडळींनी असंख्य अभंगरचना करून ठेवल्या आहेत आणि त्यांतील कित्येक अभंगांना र्‍हुदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकीसारख्या दिग्गज संगीतकारांनी स्वरबद्ध केल्यामुळे ते अभंग आपल्या ओठांवर रेंगाळत रहातात.

शास्त्रीय संगीताचा आधार असलेली ही एक स्वतंत्र गायन शैली असे आपल्याला अभंग/भजन याविषयी म्हणतां येईल. अभंग एक व्यक्ति गाऊ शकते आणि भजन हे टाळ, झांजा यांच्या गजरांत सामूहिकरित्या सादर केले जाते असा अभंग व भजनांतील फरक! दोन्हीही प्रकार पूर्णतया भक्तीरसांत भिजलेले. यमन, यमनकल्याण, भीमपलास हे अभंग~ गायनाचे अगदी खास राग! समाधी साधन। संजीवन नाम। हा श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेला व गायिलेला अभंग, किंवा माणिकबाईंची कौसल्येचा रामबाई, धननीळा लडिवाळा ही भक्तीगीते ही यमन, यमन कल्याणची उदाहरणे नमूद करता येतील, तसेच मा. कृष्णराव यांनी संगीत दिलेला अवघाची संसार सुखाचा करीन हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग भीमपलासीच्या सुरांनी नटलेला आहे. माणिक वर्मांचे अमृताहुनी गोड हे भीमपलासांतील भक्तीगीत तर वर्षानुवर्ष्ये संगीतप्रेमी गात आहेत. याचा अर्थ असा नाही की दुसर्‍या कोणत्या रागांत भक्तिरचना नसतात. अबीर गुलाल उधळीत रंग यांत देसकारचे दर्शन घडते, ओंकार स्वरूपा या एकनाथ महाराजांच्या अभंगाला श्रीधर फडके यांनी बैरागीचा स्वरसाज चढविला आहे. आजि सोनियाचा दिनु हा ज्ञानेशांचा अभंग र्‍हुदयनाथांनी भैरवीच्या स्वरांनी भक्तीरसांत बुडविलेला आहे. कानडा राजा पंढरीचा हा तर मधूर मालकंस, भीमसेन अण्णांनी अजरामर केलेला आणि आता यूट्यूबवरून राहूल देशपांडे आणि महेश काळे ह्या द्वयीॅनी घराघरांत पोहोचविलेला. एकूण रागदारी संगीतावर आधारित हे अभंग गायन!

साथीला एकतारी, टाळ आणि मृदुंग असले की भक्तीचे वातावरण चांगलेच तयार होते आणि पट्टीचा कलावंत समर्थपणे सूर, ताल व लय सांभाळून जेव्हा भक्तीगायनाची कला सादर करतो तेव्हा तो श्रोत्यांच्या ह्रुदयाचा ठाव घेतो.गायकाने अभंग संपवितांना विविध ढंगाने पांडुरंग पांडुरंग किंवा विठ्ठला मायबापा असा नामाचा गजर सुरू केला की आपण गाण्याच्या कुठल्या मैफिलीत नसून प्रत्यक्ष ईश्वरदरबारीच बसलो आहोत अशी मनोधारणा होते. हेच खरे भक्तीगीत/अभंग गायन!

भावगीत गायन हा गाण्याचा अगदी स्वतंत्र आणि वेगळा प्रकार! भावनांचा मेळ दर्शविणारी काव्य रचना~कविता, मग त्या मीलनाच्या असतील,  विरहाच्या असतील,प्रीतीच्या असतील अथवा निसर्गांतील रंगछटांविषयी असतील,त्या त्या भावरूपी शब्दांना चढविलेला स्वरसाज म्हणजे कवितेचे होणारे भावगीत!

शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर,  सुरेश भट आदि काव्य रत्नांच्या कवितांना ह्रुदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, अरूण दाते वगैरे संगीत कारांनी व गायकांनी कवितांचा हा अनमोल ठेवा भावगीतांच्या स्वरूपांत जनतेला,आम्हा रसिकांना दिला.ह्या भावगीत गायनांत आलापी, तानबाजी यांची जराही अपेक्षा नसते. अमूक एक रागांतच ते असले पाहीजे असेही काही बंधन नाही.मात्र शब्दांतून भावना प्रकट करतांना सुरांच्या श्रृतींवर विशेष लक्ष दिल्यास ते भावगीत श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते.

कांटा रुते कुणाला, शूर आम्ही सरदार, ऋतु हिरवा ऋतु बरवा, काय बाई सांगू कसं ग सांगू, दिवस तुझे हे फुलायचे,या जन्मावर या जगण्यावर शतदां प्रेम करावे,दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मेंदीच्या पानावर,तरूण आहे रात्र अजुनी,श्रावणांत घननीळा बरसला ही व अशी कित्येक भावगीते अवीट गोडीची आहेत नि ती आपल्याला कायम आवडतात,आपल्या ओठांवर गुणगुणली जातात याचे कारण त्यांच्यावर चढविलेले स्वरालंकार हे बनावट नसून अस्सल बावनकशी आहेत. ही अशी गीते ऐकली की मनांत येतं, गाणं कोणतंही असो जे कानाला गोड वाटेल आणि मनांत रेंगाळत राहील तेच खरं संगीत!

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुर्वेद कोश – फोडणी ! ☆ वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे

 ☆  विविधा ☆ आयुर्वेद कोश – फोडणी ! ☆ वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे ☆ 

फोडणी वरती कधी लेख लिहावा लागेल असे वाटले नव्हते.. चार दिवसांपूर्वी शेवटची अपॉइंटमेंट आणि गप्पिष्ट रुग्ण असा योग जुळून आल्याने ‘खाण्यावर’ गप्पा रंगल्या होत्या. लॉकडाउन मधे अनेक निरनिराळे ‘ट्रेंड’ आले. लोकांनी फावल्या वेळात अनेक पदार्थ करून पाहिले. विविध पदार्थानी सोशल मीडिया सजला. आपण घरी जिलेबी, खारी, ब्रेड, पफ-पेटीस असे पदार्थ करू शकतो असा आत्मविश्वास अनेकांना आला. सर्वांच्या कष्टाचे आणि हौसेचे अभिनंदन! रोजच्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग फोडणी हे शास्त्र आणि कला मात्र अस्तंगत होत आहे असे सामान्य निरीक्षण आहे ! त्यावर थोडे मत प्रदर्शन.. चुकून कोणाला ठसका लागला कोणाला उचकी लागली तर जमल्यास मला माफ करावे!

हिंदुस्तानची ओळख ‘मसाल्यांचा’ देश अशी होती. आजही आहे. दक्षिणेत मसाल्याचे पदार्थ फार उत्तम पद्धतीने वापरतात. ठराविक प्रमाणात वापरतात. आपल्याकडे आताच्या पिढीला मसाल्याचे पदार्थ एकतर सगळे ठाऊक नसतात. असले तर ते कोठे, का आणि कसे वापरायचे याची माहिती नसते. खरं सांगू.. आजीबाईच्या बटव्यात कधी त्रिभुवनकीर्ती, सूतशेखर, सितोपलादी, चंद्रप्रभा नव्हतेच. तिला यांची कधी गरजच लागली नाही. जिरे, मिरे, हिंग, ओवा, ओव्याची पानं, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जिरे, शहाजिरे, वेलदोडा, मोठा वेलदोडा -मसाला वेलदोडा, जायफळ, धने, जावित्री, कसुरी मेथी, सुके खोबरे, मेथी, आमचूर, बडीशेप, मोहरी, काकडी बी, भोपळा बी, आवळकाठी, लसूण, चिंच, कोकम, खसखस, सैंधव, शेंदेलोण, पादेलोण, काबाबचिनी, केशर, सुंठ, चक्र फुल, हळद, तीळ, डिंक, खडीसाखर हा आजीबाईचा बटवा आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्यात औषधी कल्प घातले आणि आजीबाईच्या नावाअडून ‘बिन डिग्री फुल अधिकरी’ हातचलाख्या सुरु केल्या. असो !

आजीबाईचा बटवा आणि त्यातील शास्त्र स्वयंपाकघरात खुलतो. आम्ही अन्न हे “महा भेषज” – सर्वोत्तम औषध असे म्हणतो त्याचे मूळ फोडणीत असते. टोमॅटो प्युरी मधे नाही ! सध्या सगळेच पदार्थ टोमॅटो प्युरी मधे करायची घाणेरडी सवय रुळली आहे. हॉटेल असो किंवा घर अशा प्युरी चे डबे फ्रिज मधे तयार असतात. टोमॅटो प्युरी भाजीचा ‘बेस’ असो म्हणे ‘बेस’! अतिशय अयोग्य आणि अशास्त्रीय पद्धतीने आपल्या आरोग्याचा बेस बिघडवला आहे हे नक्की! टोमॅटो हिंदुस्तानात पोर्तुगीजांनी आणला १६ व्या शतकात. त्याच्या आधी अत्यंत चविष्ट, शास्त्रीय हिंदुस्थानी खाद्याचा ‘बेस’ काय होता ?? आजकाल कांदे पोहे मसाला पासून मिसळ मसाला याची पाकिटं मिळतात. पाकीट फोडले की विषय संपला. इन्स्टंट पदार्थ तयार… ज्या घरात फोडणी व्यवस्थित होते ते घर निरोगी आणि घरातील व्यक्ती नशीबवान !

तेल गरम झाल्यावर त्यात आधी कमी प्रमाण असलेले जिन्नस, त्यांचा अर्क तेलात उतरला की पुढील पदार्थ सर्वात शेवटी भाजी असा सामान्य क्रम आहे. स्वयंपाकाचा हात उत्तम असला की पळीभर तेलात टाकलेले चिमूटभर हिंग सुद्धा जळत नाही. आपली सवय अशी.. तेल गरम करायचे, कांदा टोमॅटो मिरची कढईत टाकायची वरून मसाला भुरभुरायचा किंवा मसाला फक्त दोन तीनदा झाऱ्याने हलवून त्यात भाजी घालायची. सोपे उदाहरण देतो.. महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य कांदे पोहे आपण सगळेच खातो. त्यात खुसखुशीत कढीपत्ता कोणाला कधी सापडला आहे का? दही पोहे यावर काही लोक फोडणी घालतात त्यात भरलेली मिरची घालतात.. मिरचीचे आतील सारण किती वेळा खुसखुशीत फ्राय झालेले असते? एखाद्या म्हणजे एखाद्या तरी भाजीला ”अहाहा.. जिऱ्याचा काय सुंदर वास लागलाय?’ असे होते का? हॉटेल मधे ३०० रुपयाला वाटीभर मिळणाऱ्या जिरा राईस मधे जिरा चा आस्वाद कितीसा असतो ? हे सांगायचे कारण असे.. खाद्य हे पौष्टिक होण्या पेक्षा प्रेझेंटेबल होण्याकडे कल बराच वाढला आहे.. तेलात/तुपात भाजलेला हिंग-लसूण पोटात जात नाही. ओवा लवंग तिखट लागतो म्हणून आपण वापरत नाही. कढीपत्ता बोअर असतो म्हणून पानाच्या साईड ला काढून ठेवतो. त्यामुळे पोटात अन्न भरपूर जाते शास्त्र मात्र जात नाही!

पचन संस्थेचे वाढत चालणारे आजार आणि उठसुठ होणाऱ्या एन्डोस्कोपी-कोलोनोस्कोपी याचे कारण अशास्त्रीय पद्धतीने बनवलेला – खाल्लेला आहार आहे. फोडणीत भाजलेला लसूण चावून खाणे किंवा बटाटा भाजी सारख्या पचायला जड असलेल्या भाजीच्या फोडणीत ओवा जिरे असणे हा आजीबाईचा वारसा आहे. पोट टम्म झाल्यावर इनो पिऊन बुलबुले काढणे हा ग्रॅनी चा वारसा आहे. अधोरेखित करायचा मुद्दा असा, मिरच्यांच्या धुरी आणि लालेलाल स्वयंपाक मौज म्हणून करायला हरकत नाही. फोडणी मात्र बायपास व्हायला नको… चिंच कधी आणि आमसूल कधी हे गृहिणीला बरोबर माहित असते. त्याच घरात आरोग्य असते.. कामाच्या व्यापामुळे अनेकांकडे स्वयंपाकाला बाई असते. हरकत नाही.. ऑफिस मधे जसे आपण प्रोजेकट डिझाईन करतो तसे आपला स्वयंपाक डिझाईन करून द्यायला काहीच हरकत नाही!

कोणत्याच तयार मसाल्यात काहीच ‘मॅजिक’ नसते. मॅजिक असते ते करणाऱ्याच्या हातात. केलेल्या फोडणीत.फोडणीत आपले सत्व सोडणाऱ्या मसाल्यात. केलेले अन्न आनंदाने खाणाऱ्या व्यक्तीत. वैद्य असो किंवा अन्नपूर्णा ”योजक: तत्र दुर्लभ:” हा सिद्धांत दोघांनाही लागू होतो !

 

© वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे

एम डी (आयुर्वेद )

आरोग्य मंदीर, सांगली -पुणे -कणकवली

7276338585

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

‘ ती नसताना ‘

मी नसताना …. कल्पनेने…..मी पुरुषी कल्पनेतून पतीचे  पत्नीबद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय…..

तिच्या श्वासतील ऊबेने मी रोमांचित होत असताना, मला अचानक जाग आली….आणि बघतो तर ‘ती’ नव्हती जवळ…ती ४ दिवसांसाठी ट्रीपला गेली होती.  मी विचार करू लागलो की……किती सुखद भास होता तो! मग मी उठून सगळ्या खोल्यात फीरलो…ती नाहीए कुठेही हे माहित असतानाही…मी सर्व खोल्यात गेलो…कारण मला अनुभवायचं होत ती! त्या त्या खोलीत असतानाची… कल्पनेतील तीच वास्तव्य, विचार करता जाणवलं की आभासी असलं तरीही सुखावणार होत! कारण गेल्या अनेक वर्षात ती असताना मी ते अनुभवलं होत.

देवघरात देवाची पूजा करताना….त्या देवांची ठराविक जागा,तिचे अथर्वशीर्ष,श्रीसुक्त म्हणणे, फुल घालताना ती सर्व देवांशी त्यांची नाव घेऊन बोलते!ते तिलाच जमत, आणि तिला जे जमत ते मला आवडत!?

आम्ही दोन दिवसात ओट्यावर खूपच पसारा करून ठेवलाय…पण पसारा किती केलाय म्हणून आता ओरडायला ती नाहीए…नेहमी नाही पण, तीही पसारा करते कधीतरी…पण ते आवरण्याचं चातुर्य, time मॅनेजमेंट,चटपटीतपणा तिलाच जमत सगळं…कारण ह्या आम्ही केलेल्या पसाऱ्यात मला तर आवरायला नक्की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहिए. ?

फ्रिज मध्ये दूध आणि ताकाच पातेलं बघून खूप गोंधळ झाला, वास व चव घेऊन बघता ताक व दुध कोणत.. हे लक्षत आलं.किती साधी सोपी गोष्ट, पण ती करते सगळं म्हणून कधी फार लक्ष दिल गेलं नव्हतं.

तिच्या कवितेच्या डायरीची एक एक पान उलटली… आणि तीची कवितेची साहित्याची ओढ आणि तिचे विविध विषयांवरील लेख कविता किती सध्या भाषेतील पण प्रगल्भ विचार आहेत हे लक्ष्यात आलं. कवितेतील जास्त काही मला कळत नाही पण त्यात माझ्यावरील काही कविता होत्या…मी त्या जोरात म्हणू लागलो आणि जणू तीच त्या कविता म्हणत आहे असा भास मला होत होता…. तीच ते कवितांचं सादरीकरण… त्यात माझयाबद्दलची रोमँटिक कविता… त्यात हळूच तीचं माझ्याकडे चोरून बघणं… लाजण…. मी सगळं जणू कल्पनेनेच पण  खरंखुरं अनुभवत होतो!

मुलांच्या कपड्याच कपाट उघडून मी आत बघणार तोवर सगळे कपडे धाडकन अंगावर पडले..मग परत आठवली ती, तीव्रतेने….मुलांचे कपडे धुवून कसे नीटनेटके ठेवते..आता तर ह्या कपड्यात धुतलेले कळेना, न धुतलेले कळेना.

कधीकधी वाटायचं …काय करते ही? घरी असते,पण हिला कुठं काय इतकं काम असत?

पण साखर सम्पली तेव्हा गुळ घालून चहा केला… तेव्हा आठवली ती! Emergency बटाट्याच्या काचऱ्या कशा करायच्या हे तिने शिकवलेलं होत ते करताना आठवली ती! भाताचा अंदाज किती वेळा सांगितला होता तिने, पण कधी प्रयत्नच नाही केला…शिकलो असतो तर आलं असतआज,असा विचार करताना आठवली ती! पोळ्या तर विकतच आणल्या आम्ही…पण तीचं  पोळी लाटतानाच दृश्य समोर आलं, खरच ती किती गोल व लुसलुशीत पोळ्या करते हे बाहेरच्या पोळ्या तोडताना जाणवलं, तीच घरासाठी करणं हे मनापासून  असत आणि त्यात तिचा जीव असतो. ती अनेकदा काही स्तोत्र म्हणत स्वयंपाक करते, त्यावर तीच वाक्य मला नेहमी च पटत की त्या स्तोत्रामधून  positive vibration अन्नात उतरतात, आणि ते शरीर व मनासाठी खूप पोषक व सकारात्मक असतात, हितकारक असतात.

बारीक बारीक गोष्टीत मला आठवत आहे ती!  आठवते म्हणण्यापेक्षा उणीव भासते अस म्हणावं लागेल.

हे, कुलदेवता, वास्तुदेवता तुझ्या आशीर्वादाने  ह्या वास्तूतील वस्तू आम्ही घेतल्या, ज्या भौतिक रूपाने मला फक्त माहिती आहेत. पण ‘ती’चा प्रत्येक वस्तू मध्ये प्राण आहे,आत्मा आहे . त्या सर्वानाही आमच्यापेक्षा तीच जास्त हवी असते अस जाणवलं.

ती नसतानाची वास्तूही, ‘ती’ च्या केवळ विचारांनी, कल्पनेने आनंद देते, सकारात्मक ऊर्जा देते, मला, मुलांना, आमच्या गॅलरी मधील झाडांनाही…मग ती असतानाची वास्तू व प्रसन्नता, ती असतानाचे नंदनवन काय वर्णू?

बोलताना आणि जगताना…बाला, प्रेमला आणि वत्सला अशा विविध रूपातील ती, खूप साधी….

येताजाता तिच्या बांगडयांच्यां मंजूळ नादाने, पावलांच्या लगबगिने, कधी गोड प्रेमळ बोलण्यातून,तर कधी स्पष्टवक्ते पणाने, आपले विचार मांडणारी…

‘ती’… माझी अर्धांगिनी?

ती नसतानाही…ती स्पर्शली!!!!?

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भातुकली ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ मनमंजुषेतून ☆ भातुकली ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

भातुकली हा शब्द ऐकताच आलं ना हसू ओठांवर आणि डोळ्यासमोर आलं की नाही बालपण?

किती गंमत असते नाही का ती मांडलेली भातुकली आपल्या डोळ्यासमोरून अशी सरकन जाते आणि जुन्या आठवणींना परत उजाळा देऊन जाते आणि काही काळ का होईना आपण त्या सुखद आठवणींमधे पार हरवून जातो. परत मांडावी सारखी वाटतात ती खेळणी आणि परत खेळावा सारखा वाटतो तो खेळ.

ती सुबक, सुंदर भांडी, काचेची कप बशी, रंगीत कळशी, ते छोटेसे पोळपाट लाटणे, ती इवलीशी खिसणी, छोटासा मिक्सर, ते चमचे, झारे, बापरे!!! केवढी ती भांडी.

हा खेळ खेळताना आपण इतके कष्ट घेऊन त्याची सुबक मांडणी करतो जणू खरा संसार थाटला आहे. मांडणी तरी झाली पण आता तो खेळण्यासाठी किराणा सामान हवं की. मग सुरू होतो आईला लाडीगोडी लावून तो मिळवण्याचा कार्यक्रम ज्यात आपण यशस्वी होतो. आता आई सारखं दिसायला हवं ना मग घेतो एखादी ओढणी गुंडाळून आणि साडी म्हणून आणि सुरू होतो एकदा स्वयंपाक.

लगबगीने कळशी भरली जाते. आई कडून मिळालेले दाणे, गूळ, चिंच, तिखट, मीठ, पोहे, चुरमुरे, थोडं दाण्याचे कूट आणि हट्टाने घेतलेली थोडी मळलेली कणीक कसं जागच्या जागी सजते.

प्रथम काय, तर काय करायचे हे न सुचल्यामुळे चहाचे आधण चढते आणि हा चहा प्यायला देण्यासाठी पहिला बकरा कोण तर अर्थात आपल्या हक्काचा बाबा,आणि तेही , तो चहा पिऊन म्हणतात वा काय फक्कड झाला आहे ग खूप मस्त अगदी आई सारखा. आता रोज तूच देत जा मला चहा करून. मग काय हे वाक्य ऐकल्यावर आपला आनंद द्विगुणित झालेला असतो. आता पुढे काय तर कढईत गरम पोहे शिजतात आणि ते कच्चे पोहे आता आजी, आजोबांच्या वाट्याला येतात. ते ही  दोघ ते पोहे खाऊन इतके सुखावतात जणू नातीच्या हातचे खरे खरे गरम पोहे खात आहेत त्यांची शाबासकी मिळवून सुरू होतो खरा स्वयंपाक.

इवल्याश्या पोळपाटावर उमटू लागतात वेगवेगळे नकाशे, दाण्यात गूळ भरून भरून छान लाडू तयार होतात, पाण्यात तिखट मीठ घालून बनते तिखट आमटी, खोट्या कुकर मधे होतो चुरमुर्यांचा भात, आणि दाण्याच्या कुटाची चटणी अश्या नाना पाककृतीने सजते इवलेसे पान. आता हे सारे पहिले द्यायचे कोणाला? अरे अर्थातच आपल्या बंधुरायांना.

पण इतके सारे होई पर्यंत आईचा स्वयंपाक तयार असतो आणि आतून हाक येतेच चला जेवायला पान वाढलेली आहेत. की लगेच आपणही म्हणतो माझाही तयार आहे स्वयंपाक आज सगळ्यांनी मी केलेलेच जेवायचे आहे.

बाबा तर तयारच असतो लेकीच्या हातचे सुग्रास जेवायला. आणी बिचारा ती कच्ची पोळी, ती तिखट आमटी खाऊन सुद्धा तृप्तीची ढेकर देत म्हणतो वा खूप फक्कड झाला आहे हो सगळा स्वयंपाक. ते त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून आई ही सुखावलेली असते आणि लेकीचा ऊर आनंदाने भरून आलेला असतो जणू आपण विश्वविक्रम केलेला आहे.

काय गेले ना सारे बालपण डोळ्यासमोरून??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

माती किती शहाणी असते ना? तशी ती दगडापासून बनते.  पण मातीजवळ सृजनाची एक वेगळीच ताकद आहे. दगडाचा कठीणपणा मातीला नाही. तिच्या जवळ दगडात असलेलीच मूलद्रव्य आहेत. पाणी शोषून घेण्याची क्षमता मात्र फक्त मातीकडं! दगड थोडेसे ही पाणी शोषून घेऊ शकत नाही. पाणी शोषून घेऊन मातीचा मात्र चिखल होतो. वरवर जो चिखल वाटतो, तो सहजपणे कशालाही चिकटतो. असं लाघव दगडाजवळ नाही. ऊन्हानं, पावसानं दगड झिजतो, तडकतो पण याच ऊन-पावसानं माती सुगंधीत होते. सगळ्या विश्वाला आधार देण्यासाठी सज्ज होते. तिच्या रंध्रारंध्रातून जीवन अंकुरते. तिच्या गात्रागात्रातून इवलाली हिरवी पानं टाळ्या वाजवू लागतात. हिरवळीचा गारवा सगळ्या सजीव सृष्टीला थंडावा देतो. छोटे छोटे जीव जिवाणू तिच्या कुशीत वाढू लागतात. आधार शोधतात. आनंदानं, ऊत्साहानं जीवन जगतात. शेवटी धावून धावून थकतात तेंव्हा तीच हात पसरून सगळ्यांना सहजपणानं सामावून घेते. मातीतच मिसळल्याशिवाय, एकरुप झाल्याशिवाय शांती नाही. माती लागू नये म्हणून आयुष्यभर जपलं तरी मातीतच माती होऊन मिसळण्याची आस शेवटी लागतेच. ही आस तरी कशासाठी? नव्यानं अंकुरण्यासाठी!, पुनःश्च पालवण्यासाठी!!

कवयित्री  इंदिरा संत म्हणतात,

रक्तामध्ये ओढ मातीची

मनास मातीचे ताजेपण

मातीतून मी आले वरती

मातीचे मज अधुरे जीवन

केशवकुमार मात्र ‘होता डोंगर माथ्यावर पडला धोंडा भला थोरला’ …. असं म्हणत दगडातही काव्य शोधतात. खरंतर दगड केव्हढा सामर्थ्यवान! किती कठीण! म्हणूनच तो भक्कम इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात येतो. कित्येक मजली उंच टोलेजंग देखण्या वास्तूंचा पाया बळकट करतो. तरीही नुसता दगड इमारत बनवू शकत नाही. दोन दगड सांधायला चिकट मातीच लागते.

काही दगड सागरगोटे बनून अल्लड सान हातात खेळत राहतात. गोफणीतून भिरकावलेला दगड शेतातील पिकांचे रक्षण करतो. तर लगोरीचा दगड ववात्रटपणाचा शिक्का घेऊन कैऱ्या, चिंचा पाडतो.

दगडाला टाकीचे घाव घातले की तो देव बनतो. गाभाऱ्यात सजवला जातो. पूजला जातो.

पायरी ओळखून पायरीशीच थांबणारे काही

असले तरी, देवाआधी त्यांनाच पहिला नमस्कार मिळतो. काही दगड कळसावर सुवर्ण कलश घेऊन सजतात.

हाच दगड कोरीव नक्षीकामानं सजवला की, महालांची, राजवाड्यांची शोभा वाढवणारा खांब बनतो. एखादा कुशल कारागीर त्यातून सारेगमचे सप्तसूर उमटवतो. कोरीव शिल्पकाम करून कुणी शिलाकार त्या दगडाला इतिहासाच्या कागदावर कायमस्वरूपी कोरुन ठेवतो.काही दगडांना पाटीचा, सरस्वती पूजनाचा मान मिळतो. काही दगडांना शीलालेखानी अजरामर केले. पाऊस, पाणी, ऊन, वारा यांना वर्षानुवर्षे तोंड देत तो इतिहासाचा साक्षीदार बनतो अनेक पिढ्यांना शौर्य, शृंगार, धैर्य, देशप्रेमाच्या रसात चिंब करतो. संगमरवरी असेल तर ताजमहाल बनून प्रेमकहाणी सांगतो….. तरीही.. तरीही… जीवनचक्र सुरू ठेवण्यासाठी मातीलाच नतमस्तक होतो.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

स्व विंदा करंदीकर

 ☆ काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

रसग्रहण 

“चुकली दिशा तरीही  हुकले न श्रेय सारे….”ही कविता वाचताना मनात एक आकृती आकारते. एका मुक्त, बंधनात न अडकलेल्या, स्वत:च्याच धुंदीत, बेफिकीर, अखंड चालत राहणार्‍या मुशाफिराची… हा मुशाफिर वेगळ्याच वृत्तीचा आहे.

आणि कवी या मुशाफिराची सफर एका तटस्थ दृष्टीकोनातून पहात आहेत.. समाजाने नाकारलेल्या अथवा समाजाने स्वीकारलेल्या अशा कुठल्याच मार्गावरुन वाटचाल न करणारा…भले इतरांसाठी दिशा चुकलेला अथवा भरकटलेला पण स्वत:साठी मात्र सगळेच मार्ग खुले ठेवणारा हा वेडा मुशाफिर कवीला मात्र त्याच्या याच विशेषत्वाने आकर्षित करतो.त्याच्यात एक सामर्थ्य जाणवतं…

मला नेहमी असं वाटतं की विंदांची काव्य वृत्ती ही प्रहारक आहे.प्रहार प्रस्थापित वैचारिकतेवर. प्रहार प्रचलिततेवर… म्हणूनच त्यांचे शब्द वेगळ्या वाटेवर वणव्यासारखे फुलतात…

“डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे..

हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे,..”

लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल हीच भिती बाळगून जगणार्‍यांना कवी रूढी ,परंपरेचे दास मानतात.

ही गतानुगतिक माणसं त्यांना डरपोक वाटतात.भित्री,भेदरट अरुंद छातीची वाटतात…शीड तोडणारीच माणसं प्रिय  वाटतात. झपाटलेली, झोकून देणारी या मुशाफिरा सारखी माणसंच इतिहास घडवतात,

“मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा…”

नशीबावर विश्वास ठेवणारी वा नशीबाला दोष देत जगणारी माणसं नाकर्तीच असतात.ग्रह तार्‍यांची गणितं मांडून सावधानतेने फुंकर मारत जीवन जगणारा, कवीला मर्द वाटत नाही, त्यापेक्षा, मग्रुर प्राक्तनाचा नकाशा फाडून, ईशारे झुगारणारा असा एखादा ,अधिक बलवान निग्रही,घट्ट मनोधारणेचा वाटतो.

“चुकली दिशा तरीही आकाश एक आहे….”

चुकतमाकत ,चाचपडत चालाणारा हा मुशाफिर नाही.

दिशा चुकेल याचं भय त्याला  नाही.कारण त्याच्यासाठी आकाश एकच आहे.इथे कोलंबसची आठवण येते. त्याचीही दिशा चुकली पण त्याला अमेरिका सापडली. माघार न घेता पुढे जाणं हेच सामर्थ्याचं लक्षण..

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे…?

इथे बेसावध याचा अर्थ जागरुक नसणारा असा नकारात्मक नसून ,जो बेसावध तोच शूर आणि तोच खरा वीर.कारण आशा निराशेचे निखारे त्याच्यातलं झपाटलेपण नाही जाळू शकत.

हा वेडा,दिशा चुकलेला, निराळ्या वाटेवरुन बेधडक चालणारा, बेसावध, झोकून देणार्‍या मुशाफिरांत  विंदाना एक तळपतं सामर्थ्य  दिसतं अन् ते भावतं.

त्याच्या  झपाटलेपणाला त्यांना या कवितेतून दाद द्यावीशी वाटते…

ही संपूर्ण कविता, अर्थाची ऊलगड करत, वाचत असतांना, विंदांच्या वैचारिक प्रतिभेला, पुरोगामीत्वाला, सच्चेपणाला वंदनीय दाद द्यावीशी वाटते.

एक सुंदर संदेश घेऊन ही कविता मनात रुजते…

व्हा वेडे..द्या झोकून..फाडून टाका सारे बुरखे…

शोधा वेगळे रस्ते…..नव्या वाटा तयार करा…जुन्या इतिहासातील जुन्याच चुकांना ग्लोरीफाय करण्याऐवजी,

नवा ऊज्वल इतिहास घडवा…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.कारण तो परावलंबी आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी बुध्दिचा वापर करून तो कोणत्या ही थराला जावू शकतो.तो स्वार्थी आहे. गरजे पेक्षा जास्त घेण्याची आणि साठवण्याची त्याला सवय लागली आहे.ही सवय निसर्गातील कोणत्यांच सजीवात दिसत नाही. खरं तर वनस्पती सोडल्या तर कोणच स्वत:चे अन्न स्वत:करू शकत नाही.निसर्गात प्रत्येकाच्या अन्नाची सोय आहे.”जीवो जीवस्य जीवनम्”या साखळीत सजीव जगत आहे.आपले अन्न तो शोधतो मिळवण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रत्यय निसर्गात पावलो पावली दिसतो.

पाखरांच्या किलकिलाटाने मी बाहेर आले.रस्त्यावर चिमण्या आनंदाने दाणे टिपत होत्या, उडत होत्या.इकडून तिकडे जात होत्या. त्या स्वछंदी होत्या.हलचाली मोहक होत्या.सकाळी सकाळी तो चिवचिवाट प्रसन्न वाटत होता.आपल्या नादात होत्या. एवढ्यात… गल्लीतली दोन तीन कुत्री तिथे आली.चिमण्यांना बघून ती हरकून गेली.त्यांच्या जिभेला पाणी सुटले.आज आपली चांगली मेजवानी होणार, या आविर्भावात ते होते. दबा धरून राहीले. हळूहळू पुढे झाले. आता ते चिमण्यावर  झडप घालणार..त्या बळी पडणार. असे मला वाटले,. त्यांना मी हाताने  उसकवणार… तेवढ्यात सगळ्या चिमण्या भूर्र…कन्…उडाल्या. कुत्री… भुंकली चरफडली.मागे फिरली.चला चिमण्या वाचल्या… म्हणून मी खुश झाले, मागे फिरले ,तो पुन्हा चिमण्यांचा थवा दाणे टिपायला  आला.चिमण्यांची चाहूल लागताच कुत्र्यांची झुंड पुन्हा मागे फिरली. पुन्हा आशा पालवल्या.पुन्हा दबा धरून राहिले. चिमण्या वर  झडप टाकणार… तेवढ्यात चिमण्या उडाल्या.आता मात्र कुत्रे मुक झाले.त्याच्या डोळ्यात आता भूक  दिसू लागली.मला त्याची कीव आली.मी पडले शाकाहारी. घरातल्या पावाचे तुकडे कुत्र्यांना टाकले.चिमण्याना  दाणे टाकले.

दोघे ही भूक भागवण्याचा आपला मार्ग सोडत नव्हते.रोजच हे हेच दृश्य बघत होते.

निसर्गत: आपलं रक्षण करण्याचे ,भूक भागवण्याचे सामर्थ्य सर्वाना बहाल केले आहे.तरी मझ्या मनात आले या कुत्र्यांना माणसांसारखी  बुध्दी असती तर….भूक भागविण्यासाठी, त्यांनी या चिमण्यांनसाठी जाळे टाकले असते.त्यात दाणे पेरले असते.अगतिक चिमण्या फसल्या असत्या,तडफडल्या असत्या.कुत्र्याची भूक भागली असती.पण एवढी बुध्दी निसर्गाने कुत्र्याला दिली नाही,हे बरेच झाले, नाही का?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print