खूप जवळची माणसे, मनःशांती, मुक्त वावर, मंदिरातून देवदर्शन, प्रवास, भेटीगाठी, असं खूप खूप..
हाती राहिलं:
भीती, सावधपणा, अलिप्तता, उदासी.
हरवलेलं मिळालं:
-स्वच्छतेचे, आत्मनिर्भरतेचे आणि कुटुंब व्यवस्थेवर ठाम उभ्या असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीचे आचारविचारांचे संस्कार.
आपल्यातलेच हरवलेले, विसरलेले, दुर्लक्षित केलेले कलागुण .
नवीन मिळालं:
विश्वासाठी प्रार्थना करण्याची इच्छा, रक्ताच्या एका थेंबाची किंमत, एका श्वासाची किंमत, आणि आपल्या माणसाच्या अस्तित्वाची किंमत आणि अनमोल असा ई-अभिव्यक्ती चा सहवास.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. संपादक मंडळाचे आभार.
सर्व लेखक- लेखिका, कवी- कवयित्री ना 2021 च्या शुभेच्छा!
2021 सर्वांना मनसोक्त लेखनाचे, आनंदाचे, आरोग्याचे व सुरक्षिततेचे असो. हीच सदिच्छा!!
असं कधीतरी लिहून गेले होते. तार्किकदृष्ट्या लिहायला सोपं आणि सत्यही, मात्र प्रत्यक्ष असे क्षण निभावणं हे फार कठीण, आतून हलवून सोडणारे! एक काहीतरी जे काही काळ आपल्यासोबत असतं ते मागे सुटत चाललंय ही आर्तता आणि नवीन काहीतरी आपल्याशी जोडलं जाणार असल्याची जाणीव असं काहीतरी पराकोटीच्या वेगळ्या गोष्टींच्या संमिश्रतेत भरून गेलेले हे क्षण… म्हणूनच मन कातर करणारे! निसर्गसुद्धा ह्याला अपवाद नाही… म्हणून तर अशा वेळेला कातरवेळा म्हटलं जातं! आपल्या जाणिवा जागृत असतील तर ‘संधिप्रकाशातील’ ह्या क्षणांत मनाचं आपसूक कातर होणं जाणवतंच! मानवाच्या अशा सूक्ष्म जाणिवांच्या आधारेच रागगायनाच्या शास्त्रनिर्धारित वेळा निश्चित केल्या गेल्या आहेत.
वातावरणातली ही जिवाला वेड लावणारी ‘अपूर्णतेची गोडी’ घेऊनच अवतरणारा ‘मारवा’… कातरवेळचा म्हणजे संध्याकाळचा संधिप्रकाशी राग! षाडव जातीचा हा राग… पंचमवर्जित… नि (रे) ग म(तीव्र) ध नि सां, (रें) नि ध म(तीव्र) ग (रे) सा असे मारव्याचे आरोह-अवरोह आहेत… अर्थातच आपण मारवा थाटाचे सूर पाहिलेत त्यानुसार रे कोमल आणि म तीव्र आहे आणि थाटाचंच नाव रागाला आहे त्यामुळं हा मारवा थाटाचा जनकराग आहे…
ह्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रागाचा डोलारा हा रिषभ व धैवत ह्या दोन सुरांच्या आधारे पेलला जातो… रे व ध च्या तुलनेमधे आधारस्वर षड्जालाही कमी महत्व असणारा असा हा राग म्हणूनच अत्यंत आर्तभावना जागृत करतो… म्हणूनच कदाचित मनाची कासाविशी जशीच्या तशी उतरते ती मारव्याच्या सुरांतून! अर्थातच दोनच सुरांनी राग नाही उभा राहू शकत त्यामुळं इतर सुरांना टाळता येत नाहीच, परंतू विशेषत: ह्या रागात इतर सूर हे फक्त रे आणि ध ला जोडण्याइतपतच वापरले जातात म्हटलं तर वावगं ठरणार नाही… थांब्याची जागा ही फक्त रे आणि ध हेच सूर आणि अर्थतच हेच त्याचे अनुक्रमे वादी आणि संवादी सूर आहेत.
सुमन कल्याणापुरांचं ‘शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी’ हे गीत त्यातला नेमका भावार्थ ज्या सुरांतून स्पष्ट होईल त्या मारव्याच्या सुरांतच विश्वनाथ मोरे ह्या संगीतकारांनी बांधलेलं आहे आणि जीवनातलं एक मोठं तत्वज्ञान अधोरेखित करणारं ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ हेही हृदयनाथांनी मारव्याच्या सुरांत चपखलपणे सजवलं आहे. ‘मावळत्या दिनकरा’ किंवा ‘मायेविण बाळ क्षणभरी न राहे’ ही गीतं मात्र मारव्याची आठवण करून देतादेता पुढे इतर सुरांना सामावून घेत वेगळा रंग निर्माण करतात.
साज और आवाज ह्या चित्रपटातलं ‘पायलिया बावरी’ आणि कोतवाल साब मधलं ‘ना फूलों की दुनिया’ ही गीतंही वेगळ्या ढंगानं जवळपास ह्याच सुरांत रंगलेली! साथी रे भूल ना जाना मेरा प्यार हे गाणं मात्र मारव्याच्या सुरावटीतून उमलताना पुढे मात्र इतर सुरांच्या सोबतीने इतकी प्रचंड वेगवेगळी वळणं घेतं कि गायकासाठी ते ‘चॅलेंज’ ठरावं!
सुरवातीच्या भागांमधे चर्चा केल्यानुसार भारतीय शास्त्रीय संगीताची सूक्ष्मतेतून उलगडत जाणारी महानता आपल्याला मारवा, पुरिया आणि सोहनी ह्या तीन रागांमधूनही जाणवेल. तीनही रागांचे आरोह अवरोह अगदी तेच, मात्र प्रत्येक राग संपूर्ण वेगळा दिसतो.
मारव्याचा संपूर्ण डोलारा पेलून धरणारा रे व ध हे पुरियामधे अगदी दुर्बल होऊन जातात, ग वरून सा वर येताना आणि नि वरून म वर येताना अनुक्रमे रे आणि ध ला अलगद स्पर्श करायचा इतकंच त्यांचं स्थान! प्रवासात काही गावांच्या नावाची पाटी दिसते पण आपली गाडी त्या गावाकडे वळून तिथे थांबत नाही, फक्त मधे ते गाव लागतं म्हणून तिथून गाडी न्यावी लागते तसाच हा प्रकार! ग आणि नि हे पुरियाचे वादी संवादी स्वर! थोडक्यात दोंहीतले महत्त्वाचे आणि दुर्बल स्वर हे अगदी विरुद्ध आहेत.
सोहनीचं चलन तर आणखीनच वेगळं! त्याचं केंद्रस्थान हे वरचा म्हणजे तारषड्ज आणि विस्तारक्षेत्रही मुख्यत्वे त्याच्या आसपासच! शिवाय रागाच्या चलनामधेही मारवा व पूरियापेक्षा भिन्नता आहेच. ह्या तीनही रागांचा थाट मारवाच आहे मात्र मारवा व पुरिया हे संध्याकाळचे संधिप्रकाश राग तर सोहनी हा मध्यरात्री नंतरचा राग आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतातील हे बारकावे अनुभवता आले तर त्याहून मोठा आनंद नाही.
शंकर महादेवनच्या ह्या गाण्याचे सूर कानावर पडले. किती छान गाणं, आवाज, आशय. आणि विचार आला, मन किती छोटा, सरळ शब्द. ज्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार, नाही. पण त्यात किती काहीही सामावण्याची शक्ती आहे.
खरंच त्याचा वेग किती आहे?क्षणात इकडे तर क्षणात आणि कुठे भरकटेल त्याचा नेम नाही. त्याला कुठलेच बंधन नाही. थोडाफार आपण लगाम घातला तरच.
बहिणाबाईच्या भाषेत सांगायचे तर आता होते भुईवर गेलं गेलं आभाळात. त्या मनाला फिरायला त्रिखंड पण कमीच.
त्याला फिरायला स्थळ, काळ, वेळ कसलं बंधन नसतं. कघी ते बालपणीच्या रम्य आठवणीत रमतं तर कधी ते तारुण्यातील स्वप्न पाहतं. सासुरवाशीण कधी मनाने माहेरी आईच्या कुशीत शिरेल. तर एखादी माऊली परदेशी असलेल्या आपल्या वासराकडे मनानेच फेरफटका मारून येईल. 5, 6वर्षाच्या मुलाला बॅट कशी धरायची ते शिकवताना एखादा बाबा आपला मुलगा सचिन झाल्याचे मनात चित्र रंगवेल. मनाच्या भरा-या मोठ्या असतात. जिवाला थोड्या वेळासाठी का होईना सुखावणा-या असतात.
मनांत काय सामावत नाही? राग लोभ प्रेम, इर्षा, द्वेष. सकारात्मक, नकारात्मक विचार. आणि एकदा का ह्या मधला कोणत्याही प्रकारचा विचार आला की मग ते त्याच्या पाठपुरावा करतच. अशावेळीच त्याला लगाम घालण्याची आवश्यकता असते.
मन असले तरी ते इतर अवयवां सारखे दिसत नाही. पण खूप नाजूक असते. म्हणून जपावे लागते. आपले आणि समोरच्या व्यक्तीचे. एकदा का ते दुखावले गेले तर कितीही फुंकर मारली तरी सुखावणं कठीण असतं म्हणून शब्द आणि कृती जपून विचारपूर्वक करावी. जो समोरच्याच मन जपतो, जिंकतो तो खरा माणूस.
आपलं स्वतःचे मन पण आपल्या शरीरासारखंच जपायचं असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. ‘ मी शरीर कमावलं, मेनटेन केलं’ तसच मानसिक संतुलन सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. बाहेरुन छान मेकअप केला आणिचेहरा ओढून ताणून हसरा ठेवला, पण मन दुःखी असले तर तो आनंद तात्पुरता. जीवनातील आनंद हा मनस्थितीत अवलंबून असतो. त्यात जास्त नकारात्मक भावनांना थारा द्यायचा नसतो. त्या साठवणं तर दूरच. मनाची पाटी ताबडतोब पुसून टाकायची. नाहीतर मानसिक, शारीरिक दोन्ही त्रास होतात. आपल्याला, स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना. परिणामी वातावरण बिघडवून सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. आठवणी पण चांगल्या गोष्टीच्या ठेवायच्या.
या मनांत एखादा काळजीचा, चिंतेचा किडा शिरला कि मग संपलचं. तो मन आणि त्याच्या बरोबर शरीर पण पोखरुन कमकुवत करतो. येणा-या प्रत्यक्ष संकटापेक्षा मन कल्पनेनेच भयानक चित्र रेखाटत आणि त्या विचाराच्या डोहात खोल खोल जाते. आणि त्रास करुन घेते. त्याला वेळीच लगाम घातला पाहिजे.
हे मन कधी, कुठे, कोणात, केवढे गुंतवायचे त्यावर प्रत्येकानी नियंत्रण ठेवायला पाहिजे. आपण आपल्या मुलांमध्ये गुंततो. कधीकधी जरुरीपेक्षा जास्त. मग त्यांच्याकडून अपेक्षा पण जास्त ठेवतो. त्याचा त्यांना पण त्रास होतो आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या कि आपल्या मनाला त्रास होतो. आपण मनाने एखाद्याला आपले मानण्याआधीच त्याला पारखून घ्यायचे. नाहीतर त्याच्याकडून पण आपल्या भावनिक अपेक्षा पूर्ण न झाल्याने मानसिक त्रास होतो.
त्या मनाला कसे, कुठे, किती वळवायचे
काय मनांत ठेवायचे, काय सोडून द्यायचे
ह्याची सुंदर योग्य ती शिकवण आपल्याला समर्थानी मनाचे श्लोकाद्वारे दिली आहे.
आपण मनांने खूप स्वप्न रंगवतो ती योग्य वेळीच पूर्ण होतात. आंणि जर नाही झाली तर सोडून द्यायची असतात. ती नाही झाली कारण ती न होण्यातच आपलं हित आहे असा सकारात्मक विचार करायचा.
☆ विविधा ☆ मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆
मिरज आणि म्हैसाळमध्ये एकमुखी दत्तमूर्ती
निरंजन रघुनाथांनी सुरू केली परंपरा
मिरज तालुक्यात एकमुखी दत्तमूर्ती असलेली तीन ऐतिहासिक मंदिरे आहे. उत्तर पेशवाईत मिरजेत आलेल्या निरंजन रघुनाथ या थोर दत्तभक्तांनी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिरात एकमुखी दत्तांची मूर्ती स्थापना केली. त्यानंतर म्हैसाळ आणि मिरजेत अशाच पध्दतीच्या हुबेहुब मूर्ती अन्य दत्तभक्तांनी स्थापन केल्या. एकमुखी दत्तांच्या या मूर्ती दुर्मिळ असून, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मिरज आणि म्हैसाळ येथील एकमुखी दत्तमंदिरात दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात.
पेशवाईच्या उत्तर काळात निरंजन रघुनाथ नावाचे थोर दत्तभक्त होऊन गेले. त्यांनी गिरनार पर्वतावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले, असे सांगण्यात येते. हे दर्शन सहा हस्त आणि एकमुख अशा स्वरूपाचे होते. निरंजन रघुनाथांनी दत्तभक्तीपर काही ग्रंथ आणि काव्यात्मक रचना केल्या. पुढे रघुनाथ निरंजन हे मिरजेत आले. त्यावेळचे मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (दुसरे) यांनी त्यांना आश्रय दिला. निरंजन रघुनाथांनी मिरजेत मठ स्थापना केली. सध्याच्या अंबाबाई तालीमसमोर शिराळकर (बेकरीवाले) यांच्या वाडय़ात आजही हा मठ आहे.
निरंजन रघुनाथांचा अनुग्रह श्रीमंत बाळासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी सन 1853-54 मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या माधवजी मंदिरात दत्त मंदिर बांधले. या मंदिरात निरंजन रघुनाथांच्या हस्ते काळ्या पाषाणातील एकमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली. ही मूर्ती त्याकाळी मिरजेच्या पंचक्रोशीत प्रसिध्द होती. निरंजनबावांनी सन 1855 मध्ये मिरजेत कृष्णानदीत जलसमाधी घेतली. त्यांचे पुत्र योगीराजबावा यांना श्रीमंत बाळासाहेबांनी जमिन इनाम दिल्या होत्या. मिरज किल्ल्यातील या दत्तमंदिर स्थापनेसंदर्भातील आणि निरंजनबावांच्या मुलांना दिलेल्या इनामाबाबतची कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.
निरंजबावांच्या हस्ते स्थापन झालेली किल्ल्यातील दत्तमूर्ती पाहून तत्कालीन अन्य दत्तभक्तांनीही त्याच कारागिराकडून हुबेहुब अशा मूर्ती तयार करवून घेतल्या. या तीनही दत्तमूर्तींना एक मुख असून, सहा हात आहेत. या सहाही हातांपैकी दोन हातात विष्णूंची शंख आणि चक्र ही आयुधे, शिवाची डमरू आणि त्रिशुल ही आयुधे आणि ब्रम्हाचे कमंडलू आणि माळ अशी रचना आहे. पायात खडावा आहेत. मूर्तीभोवती कोरीव नक्षीकाम असलेली सुंदर प्रभावळ असून, त्यावर मध्यभागी कीर्तिमूख आहे.
मिरजेतील भुईकोट किल्ल्याच्या बाहेर उत्तर बाजूला असणाऱया मोकळ्या मैदानात दत्तभक्त असणाऱ्या वेदमूर्ती सीतारामभट आपटे यांनी 1881 सालच्या माघ शुध्द पंचमीला एकमुखी दत्त मूर्तीची स्थापना केली. किल्ल्याच्या मैदानातील मंदिर म्हणून त्याला ‘मैदान दत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
याच काळात मिरजेजवळच असणाऱ्या म्हैसाळ गावातील देवल नामक दत्तभक्ताने आपल्या घरालगत एकमुखी दत्तमूर्तीचे मंदिर बांधले. त्यामुळे मिरज तालुक्यात 19 व्या शतकात एकसारख्या दिसणाऱ्या तीन एकमूखी दत्तमूर्ती होत्या. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत. सन 1948 साली मिरज संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यानंतर मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराच्या आवारात असणाऱ्या दत्तमंदिरातील एकमुखी मूर्ती स्थलांतरीत करण्यात आली. सध्या मैदान दत्त मंदिर आणि म्हैसाळ येथील दत्त मंदिरात या मूर्ती पहावयास मिळतात.
एकमुखी दत्तमूर्ती या महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळतात. मैदान दत्त मंदिरात नैमित्तिक कार्यक्रमांबरोबर कार्तिक महिन्यात होणारा दीपोत्सव प्रेक्षणीय असतो. दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा होतो. पूर्वी येथे राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकारांची प्रवचने होत असत. या मंदिराचे शतकमहोत्सव आणि शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले होते.
क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षणात विरुनही जातो. सर्वसामान्य माणसं येईल, होईल ते स्विकारत जगत असतात. कालपटलावर अशा सर्वसामान्यांची नावे पुसटशीही उमटलेली नसतात. एखादे स्वप्न, एखादं ध्येय उराशी बाळगून, त्यासाठी सर्वस्वाची आहुती देत झपाटल्यासारखी जगणारी माणसे मात्र त्यांच्या पश्चातही कधीच न पुसणारा अमीट ठसा कालपटलावर उमटवून जातात आणि म्हणूनच दीर्घकाळानंतरही जनमानसावर अधिराज्य गाजवत स्मृतिरुपात अमर रहातात. प्रत्येक क्षेत्राचा आढावा घेतला, तर त्या त्या क्षेत्रातल्या किर्तीरुपाने उरलेल्या अशा अनेक महान व्यक्तिंचा महिमा आदर्शरुपात पुढील पिढ्यांना जगण्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ बनलेला
आपल्याला दिसून येईल. इथे प्रत्येक क्षेत्रातल्या वानगीदाखल कांही नावांचा उल्लेख करायचा ठरवलं, तरी त्या त्या क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींची असंख्य नावे मनात गर्दी करु लागतील आणि यातली कांही मोजकी नावे निवडणे म्हणजे इतरांवर अन्याय केल्याची रुखरुख मनाला लागून राहील. चित्रपटक्षेत्र, नाट्यक्षेत्र, गायन, वादन, नृत्यादी कला, लेखन, वक्तृत्त्व, शिक्षण, क्रिडा समाजसेवा… कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. झोकून देऊन काम केलेल्या आणि दर्जाच्या बाबतीत कधीच कसली तडजोड न करता आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिंचा महिमा कालातीत आहे हीच त्यांची महानता..!
राजकारण हे क्षेत्र तसं दलदलीचं. भल्याभल्यानाही लोकानुनयासाठी तडजोडी करीतच इथे श्वास घेता येतो यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारं हे क्षेत्र..! पण याही क्षेत्रात वीर सावरकर, म.गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, लालबहादूर शास्त्री अशी मोजकी का होईना चटकन् आठवणारी नावे आहेतच. क्षेत्र कोणतेही असो महानतेच्या निकषावर खरी उतरतात ती तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, ध्येयाने पछाडलेली चांगल्या अर्थाने ‘वेडी’ माणसे..! आणि त्यांचाच महिमा निर्विवाद महान ठरतो.
अर्थात हा सगळा व्यक्तिगत महिमा लौकिकार्थाने, रुढार्थाने दखल घ्यावी असाच आहे. पण माझ्यामते खरा ‘अपार’ महिमा काळाचाच..! अल्पकाळ, प्रदीर्घकाळ या अनेक काळरुपांच्या पलिकडचा हा ‘काळ’..! ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ म्हणतात त्यातला ‘काळ’नव्हे, तर ‘काळासारखं दुसरं औषध नाही’ म्हणतात ना, तो ‘काळ’..!
क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षण क्षणात विरुन जातो. या विरुन गेलेल्या अविरत क्षणांचा बनतो तो हाच ‘काळ’..! दु:ख वियोगाचं असो, कांहीतरी निसटल्याचं, हरवून गेल्याचं असो, असह्य असो वा न विसरता येणारं असो, सगळ्या दु:खांवरचं काळ हेच एकमेव रामबाण औषध..! क्लेशकारक, दु:खदायी आठवणींची तिव्रता जसा हा काळ कमी करतो, तसंच सुखद, समृध्द आठवणी आपल्या कूपीत अलगद जपून ठेवत त्या आठवणींचा सुगंध वृध्दींगत करत असतो तोही हाच काळ..! एरवी महान वाटणार्या व्यक्तिंच्या कार्यकर्तृत्वाचा कस घासून पहातो
तो हा काळच आणि त्याच्या निकषावरच खरा महिमा, खरी महानता टिकून तरी रहाते किंवा विरुन तरी जाते. कोण चूक कोण बरोबर याचं उत्तर काळाच्याच उदरात दडलेलं असतं. काळाचा महिमा अपार, अपरंपार म्हणतात ते यासाठीच..!
प्रकाश हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही.
आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पने विषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. पण प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते एका खास कार्यक्रमात.
एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.
त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक वीस-बावीस वर्षांची विवाहित मुलगी स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हे खूप भारावले होते. घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, स्वयंपाक करणे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामं या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने किती क्षुल्लक कामे, पण त्यासाठी त्यांना परावलंबित्व आले होते. थोडक्यात निरुपयोगीपणाची अगतिक भावना त्यांच्या मनातून आता दूर झाली होती.
त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता करताना या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.
आपले आयुष्य आनंदात घालवल्यानंतर आपल्या पश्चात आयुष्याचे सार्थक करण्याचा नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा सोपा उपाय आहे. त्यामुळे दोन अंधांची आयुष्य प्रकाशमान होतात. त्यासाठी नेत्रदाना बाबत जागरूक असायला हवे. आपण तर नेत्रदानाचा संकल्प करायचाच पण जवळपास, ओळखीत कुणाचा मृत्यू झाला तर अगदी शांतपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेत्रदाना विषयी सुचवायचे. कारण दु:खामुळे त्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येईलच असे नाही. तेव्हा अशी जागृती करीत प्रत्येक जण नेत्रमित्र बनू शकतो.
आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्याचा आनंदाने उपभोग घेतला. आपल्या पश्चात या छोट्या कृतीने आपण आनंद वाटू शकतो. मग काय हरकत आहे. हीच आपल्या माणुसपणाची जाणीव जागृती आहे.
कसं गेलं हे वर्ष? फार नकारात्मक गेलं…या वर्षीच्या आठवणी जरुर राहतील पण त्या भेदक, भयावह, भकास असणार आहेत….
म्हणावं तर सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारा पण आक्राळविक्राळ अस्तित्व बजावणार्या या विषाणुने सर्या जगाला विळखा घातला… त्याची ऊत्पत्ती कशी झाली, त्याचं ऊगमस्थान कोणतं हे वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असलं तरी ज्या पद्धतीनं त्याने समस्त मानवी जीवनालाच वेठीला धरलं ते अनुभवत असताना, नेमकी आपली भूमिका काय याचे आत्मसंशोधन अधिक महत्वाचे वाटते…… करोडो लोक बाधित झाले आणि लाखो बळी पडले…. आणि या सालाबरोबरचा हा थरारक संहार नव्या सालाचे ही बोट पकडूनच ठेवणार का हाही प्रश्न आहेच….
तशा जगात अनेक गोष्टी घडल्या…
जाॅर्ज फ्लाॅईड या कृष्णवर्णीय नेत्याचा मिनीआपाॅलीस अमेरिका या शहरात, अमानुष पोलीस कारवाईत मृत्यु झाला…
धर्मद्वेषाचे अघोर परिणाम सोसूनही पुन्हा पुन्हा तेच घडावे याचेच वैषम्य वाटते..
अमेरिकेत ट्रंप यांची सत्ता गेली. बायडेन नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले…भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची ऊपराष्ट्रपती म्हणून निवड झाली….
पण या सगळ्या गदारोळात आर.के. लक्ष्मणचा, मानवजातीचा प्रतिनिधी मात्र होरपळून निघालाय…. पण २०२० या सरत्या सालाचा लेखनप्रपंच मांडताना केवळ घटनांचाच ऊहापोह करणे इतकाच हेतु नाही.
भल्याबुर्या घटना अव्याहत घडतच असतात.. पण या वर्षी एका विषाणुने दिलेला भयावह, थरारक अनुभव हा केवळ न भूतो न भविष्यती..!!
जीवन स्तब्ध झाले! बंदीस्त झाले…भयाण डोहात बुडाले….तांडवी मंथनात घुसळून गेले… कलीयुगाचा हा अंतीम काळ… जगबुडीच ही.. महाप्रलय म्हणतात तो हाच… शंकराने तिसरा डोळाच ऊघडला…महेशाचं हे संहार सत्रच… मग इथे येउन मन थबकतं…संपलं नाही सारं. संपणारही नाही .. हा सृष्टीचा नियमच नाही….बंदीस्ततेत, स्तब्धतेतही एक दार ऊघडतं.. अगदी आत, मनातलं..आणि अनादी काळाच्या पळापळीत खूप हरवलेलं पुन्हा गवसतं….
हरवलेली संसकृती, नीती, वाढलेला हव्यास, तुटलेली नाती, संवाद, गोडवे, माणूसपण, विनाकारण वाढलेल्या गरजा… या सर्वांचा नव्याने विचार करावासा वाटतो.
एक विषाणु येतो आणि विश्वाला संदेश देतो”
“घरात बसा… सुरक्षित रहा.”
नकारात्मक पार्श्वभूमीवर २०२० सालाने जर काही दिलं असेल तर आत्मसंशोधनाचं आवाहन…
म्हणून नव्या वर्षाचं स्वागत करताना मनाची मरगळ नको.
सृष्टीनं अंजन घातलंय् ..या संजीवन दृष्टीने नववर्षाला सामोरे जाऊ…
मानव कधीच निसर्गाहून श्रेष्ठ नाही .पण मानवाने निसर्गाची अनेक रौद्र रुपे पचवली आहेत… लढाऊ, अहंकारी वृत्तीने नव्हे तर शरणागत होऊन निसर्गाची पूजा बांधूया आणि येणार्या नव्या वर्षाचे स्वागत करुया…..!!
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन ( भाग ३ ) – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
उपशास्त्रीय गायनांत नाट्य~संगीत हा एक स्वतंत्र आणि अतिशय महत्वाचा विषय मानावा लागेल. मराठी माणूस हा संगीत नाटकवेडा! ह्या संगीत नाट्य क्षेत्रांत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नांव फार मोठे आहे.त्यांनी पुण्यांत १८८० साली पारसी नाटके पाहीली आणि त्यांना मराठीत नाटके रचण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांतूनच संगीत शाकुंतल या नाटकाचा जन्म झाला.”पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो” ह्या मंगलाचरणाने नाटकास सुरवात झाली. संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचे युग सुरू झाले. त्यावेळचे मंगलाचरण किंवा नमनाचे पद्य हे नंतर नांदी म्हणून ओळखले जावूृ लागले. आजही शाकुंतलातील या नांदीने नाट्यसंगीताच्या मैफीलींना सुरवात होतांना आपण ऐकतोच. १८८२ मध्ये सौभद्र हे दुसरे संगीत नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणले. १८८२ ते ९० हा आठ वर्षांचा काळ किर्लोस्कर संगीताचा काळ गणला जातो. त्यांच्या ह्या नाटकांत पदांची रेलचेल होती.
नाटकाच्या अर्थाला आणि कथानकाच्या अनुषंगाने पोषक अशी पदे साकी,दिंडी,कामदा अशा जातिवृत्तांत त्यांनी रचली व सादर केली.त्यावेळच्या लोकप्रिय गीतांच्या आधारावर नाट्यपदांना चाली लावल्या व ती पदे श्रोत्यांच्या विलक्षण लोकप्रियतेस उतरली.सौभद्रांतील नाट्यसंगीत आजतागायत टिकून राहिले ते त्यांतील संगीताचा ताजेपणा,अण्णासाहेबांची सरस,प्रासादिक आणि सुबोध पद्यरचना ह्यामुळेच.सामान्य प्रेक्षकांच्या तोंडी ही गाणी सहज बसली व ती महाराष्ट्रांतील घराघरांत पोहोचली. “नच सुंदरी करू कोपा”, पांडूनृपती जनक जया” यासारख्या पदांच्या चाली मूळ कानडी पदांवरून घेतल्या आहेत.खाडिलकरांच्या मानापमान या नाटकांतील”दे हाता या शरणागता” या पदाची चालही मूळ कानडी पदाचीच! यमन, भूप, ललत, जोगीया, पिलू, आसावरी, भैरवी यासारखे लोकप्रिय राग तर अण्णासाहेबांनी वापरलेच परंतु “वद जाऊ कुणाला शरण ग” किंवा “बलसागर तुम्ही वीरशिरोमणी” अशा पदांना लावणीची चाल देउन लावणीला मराठी कुटुंबांत प्रतीष्ठा मिळवून दिली.
१९०५ साली नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व ह्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींत प्रवेश केला आणि सतत पन्नास वर्ष्ये त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. गोविंदराव टेंबे त्यांच्याविषयी लिहितात, “जवारीदार सुरेल आवाज,अत्यंत लवचिक गळा, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा, एकंदरीत गाण्यातील संथपणा आणि संयम त्यांच्याइतका क्वचितच पहावयास मिळेल.” गातांना सर्वसामान्य रागांतील पदांत ते एखादा विसंवादी, अशास्त्रीय स्वर असा काही लावायचे की त्यामुळे त्या रागाला नाही पण चालीला काही नवीनच शोभा येत असे.
गंधर्वांच्या संगीताचा परिपक्व आविष्कार गंधर्व नाटक मंडळीत रसिकांना पहायला मिळाला.बाल गंधर्वांनी कृ.प्र.खाडिलकरांच्या मानापमान नाटकाला यथार्थ न्याय दिला आणि मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक नवे युग निर्माण केले.
स्वयंवर नाटकांतील पदांनी उच्चांक गाठला.रागदारी संगीतावर आधारलेली ही पदे गायक नटांसाठी आव्हानच होते. नाट्य संगीताचा दर्जा उंचावला आणि संगीत नाटकाला
नाट्यसंगीताच्या बैठकीचे स्वरूप येऊ लागले.
प्रेक्षकांचे ones more घेतां घेतां रात्रभर नाटके रंगू लागली. भास्कर बुवा बखले आणि वझेबुवा यांच्यासारखे स्वर रचनाकार नाट्यकलेला लाभल्यामुळे महाराष्ट्रीय समाजाला उच्च शास्त्रीय संगीताची ओळख झाली. देसी, खोकर,बरवा असे अनवट राग प्रथमच महाराष्ट्रांत अवतरले.
आजच्या पीढीला बाल गंधर्व अंगाचे गाणे ऐकावयास मिळते ते श्री आनंद भाटे(आनंद गंधर्व) आणि सौ मंजूषा पाटील कुळकर्णी यांच्याकडून.
एक अनोख्या पद्धतीचे नाट्य गायन रंगभूमीवर आणले ते मो.ग.रांगणेकर यांच्या नाट्य निकेतन या संस्थेने. ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या सुमधूर गळ्यांतून “क्षण आला भाग्याचा”,”मनरमणा मधुसूदना” ही पदे ऐकतांना मन लुब्ध होते.मा.कृष्णरावांच्या या चाली अवीट गोडीच्या आहेत.
साधारण १९६०च्या दशकापासून गंधर्व ढंगांतील गाण्यांत बदल दिसू लागला. छोटा गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली”अंगणी पारिजात फुलला”,”रतिहुनी सुंदर मदनमंजीरी,”राम मराठ्यांची “जयोस्तुते उषादेवते,” किंवा “सोsहम् हर डमरू बाजे,”वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली”नयन तुझे जादुगार,””नारायणा रमा रमणा,” पं.जितेंद्र अभिषेकींची “नको विसरू संकेत मीलनाचा,” “तव भास अंतरा व्हावा,” “तेजोनिधी लोहगोल,” “घेई छंद मकरंद” ही नाट्यपदे ह्या बदलाची उदाहरणे देता येतील.
शास्त्रीय रागांवरील हे नाट्यसंगीत नाटकांतील प्रसंगानुरूप असल्यामुळे अतिशय भावपूर्णही आहे आणि ते श्रोत्यांच्या पूर्ण पसंतीस उतरले आहे.
मंडळी नमस्कार, इंग्रजी वर्ष २०२० चा हा शेवटचा मंगळवार म्हणजेच यावर्षी साठीचा हा शेवटचा स्तंभ लेख. अजून २ दिवसात हे वर्ष संपेल. केंव्हा एकदा हे वर्ष संपतय असं सगळ्यानाच वाटतयं, याची कारणे सांगण्याची गरजच नाही, ती प्रत्येकाला माहिती आहेतच. अर्थात १ जानेवारी २०२१ पासून लगेच काही चांगले घडेल असे नाही. किंबहुना नवीन नवीन बातम्या येत असताना परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता जास्त दिसते आहे.
काही खास दिवस असतात ज्या दिवसांपासून आपण नवीन सुरवात करु, झालेल्या चूका टाळू, नव्या जोमाने कामाला लागू, जास्त प्रयत्न करु असे वाटते त्यातील एक दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस.
अनेक जण नवनवीन ठराव/ नियम ( दरवर्षी प्रमाणे) ठरवतील, अनेक जण पूर्णत्वास नेतील. आमच्यासारख्या काहीजणांचा वेळ दरवर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुढील वर्षात काय करता येईल (नवीन) हे चाचपण्यातच जाईल. तरी देखील यामागची भावना महत्वाची ठरेल.
मोठ्याला कंपन्या आपला ताळेबंद मार्च एन्डींग झाल्यावर मांडतात. १ एप्रिल पासून त्यांचे नवीन फायनान्शीअल वर्ष सुरु होते. अनेक व्यापारी दिवाळीत ( पाडवा) नवीन चोपडी घेऊन नववर्षाची सुरवात करतात. सामान्य जण एक तर वाढदिवस किंवा बहुतेक वेळा नवीन वर्ष हे आपल्या इव्हाॅल्यूएशन साठी धरतात. १ तारीख आली नवीन वर्ष कसे जाईल यासाठी जोतिषांकडे ही अनेकांची विचारणा होते.
म्हणूनच हे वळण मला महत्वाचे वाटते आणि प्रत्येकाने ‘भले बुरे जे घडून गेले’ ते विसरून नव्या वळणावर नव्या उर्मीने तयारीत राहिले पाहिजे.
मंडळी यावर्षी मी काय नवीन गोष्ट शिकलो सांगू? तर यावर्षी मी आत्तापर्यंत कधीही न खेळलेला मोबाईल गेम ‘ कॅन्डी क्रॅश ‘ खेळलो. एकदम भारी. मस्त गेम आहे. दिलेली टास्क सुटून पुढच्या लेवलला गेलं की भारी वाटायचं. सध्या १५१ च्या पुढं असेन. पण सुरवातीच्या सोप्या लेवल नंतर एक एक लेवल सुटायला २-२ दिवस लागू लागले. कधी कधी हरतोय असं वाटत असतानाच अचानक शेवटच्या क्षणी लेवल सुटायची. मग त्या येणाऱ्या स्माईली वगैरे वगैरे. किंवा मग out of moves, level failed, you did not reach the goal हे तर ठरलेले. मग परत पहिल्यापासून ती लेवल यात पण एकच लेवल ठराविक वेळा खेळून ही सुटली नाही की हा खेळ एक टाइम लिमीट देतो. १० मिनिटांन पासून ते ३० मिनिटांपर्यत तुम्हाला हा खेळ खेळताच येत नाही. तोवर तुम्ही कदाचित इतर काही कराल पण हा खेळ खेळू शकणार नाही. त्या टाईम लिमीट नंतर परत सुरवात करायची खेळाला.
काही येतंय लक्षात ☝?. अशी लेवल म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणी. सुटत नसतील तर थोडं थांबायचे. चक्क दुर्लक्ष करुन दुस-या गोष्टीत मन रमवायचं आणि ‘जरा विसावू या वळणावर’ नंतर नव्या जोमाने कामाला लागायचं. पटतयं का सांगा.
आणि थोड्या कालावधी नंतर जिवनातील अवघड गणित/ त्रासदायक काळ /परिस्थिती सुटायला लागली की आपणच आपणाला शाबासकी द्यायची आणि म्हणायचं
wonderful, level completed
मंडळी आजची , टवाळखोरी आवरती घेता घेता, आज श्रीदत्त जयंती निमित्य दत्तमहाराजांच्या कृपेने येणारे नवीन वर्षे सर्वांना सुखाचे ( ब्रह्मा), समाधानाचे( विष्णू) आणि चांगल्या आरोग्याचे( महेश्वर) जावो या सदिच्छा
१९४७ मधली गोष्ट..! डाॅ .आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे…!
तो जुलै महिना होता. रात्री तुफान पाऊस पडत होता. डॉक्टरांचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं. बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या-काठ्या घेतलेली सात-आठ माणसं उभी होती.. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीड एक तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार..! लाठीधार्यांनी डाॅक्टरना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी.. बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती…!
डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर.. मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमिनदार आहेत. मी मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं आहे.. त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे नां.. मरू दे तिला माझ्यासारखे भोग तीच्या नशिबी येतील…!”
डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १००रु. देण्यात आले.. त्याकाळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या निमित्ताने डाॅक्टर खोलीत आले.. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, ” आक्का.. आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरंवाईट करून घेऊ नको. संधि मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा. आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णींनी पाठवलंय असं सांग.. ते तुला नक्की मदत करतील. ही भावाची विनंती समज…! ”
पुढे डॉक्टरांनी स्त्री-प्रसूती विषयात विशेष प्राविण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला ते गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ.चंद्राच्या भाषणानी ते खूप प्रभावित झाले.. डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना अदबीने ” डाॅ.आर्.एच्.कुलकर्णी सर.. “अशी हाक मारली.. हे ऐकताच डाॅ. चंद्रानं चमकून डॉक्टरांकडे पाहिलं आणि म्हणाली, “सर.. तुम्ही कधी चंदगढ़ला होता कां..?” “हो.. पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला बेटा..”
डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. स्वतःला सावरत ती म्हणाली, ” तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल…!”
” डाॅ.चंद्रा.. मी तुला आज पहिल्यांदाच बघतोय.. तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो.. असं अचानक घरी यायचं म्हणजे..” “सर please…” “आई.. बघितलंस काम कोण आलंय ते..?”
डाॅ. चंद्राच्या आईने क्षणभरंच पाहिलं आणि डाॅक्टरांचे पायच धरले.. ” डॉक्टर.. तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले.. आपटेंना भेटले.. स्टाफ नर्स झाले.. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं.. तुमचा आदर्श ठेवून तीला स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं…! ”
आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती. ” चंद्रा.. बेटा तू मला कसं ओळखलंस..? ”
“तुमच्या नावामुळे.. सतत जप चाललेला असतो आईचा..” ” तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलं.. तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय.. तुमचाच आदर्श ठेवून चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते…!”
डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या.. सुप्रसिद्ध लेखिका.. इन्फोसिसच्या सर्वेसर्वा. असलेल्या सुधा मूर्तींचे वडील…!