मराठी साहित्य – विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर 

रोज सकाळी त्या रस्त्यावर लगबग चालू असायची. सकाळी पाच वाजताच मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची गडबड! हातातल्या काठ्यांनी रस्ता बडवत आणि तोंडाने  राजकारणावर चर्चा करत  जाणारे ज्येष्ठ नागरिक! मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यासारखे उत्साहाने धावणारे तरुण! पहिल्या एस. टी. साठी जाणाऱ्यांची तुरळक वर्दळ! “आयेगा आनेवाला$$$ आयेगा$$ “किंवा कधीतरी अचानक सकाळीच,” एक, दो, तीन ,चार…..” लावून माधुरीला आपल्या खिशातील मोबाईलमध्ये नाचवत जाणारे एक आजोबा! आपल्या घरातील कुत्र्यांना फिरवून आणण्यासाठी आणि त्या निमित्ताने स्वतःचा व्यायाम होईल या उद्देशाने फिरणारी मालक मंडळी! लांबूनच त्या कॉलनीतील गच्चीवरुन येणारा ओंकाराचा सामूहिक नाद! वर्तमानपत्र विक्रेत्यांची आलेले गठ्ठे वेगळे करण्यासाठी चाललेली धडपड!

नुकत्याच उघडलेल्या पेट्रोल पंपावर आलेले एखादे चुकार वाहन! आणि दूध, वर्तमानपत्रे टाकणाऱ्या त्या मुलाची वाजणारी सायकलची घंटी! तेवढ्यात येणारी स्कुलबस आणि उत्साहाने लवकर उठून तयारी करुन आलेले, आई- बाबांना टाटा करुन मित्र- मैत्रिणींच्या गराड्यात सामील होणारे ते युनिफॉर्ममधील चिमुरडे!  रस्त्यावरचे  येणाऱ्या – जाणाऱ्या नवीन वाटसरुना आपल्या हद्दीची जाणीव करुन देण्यासाठी गुरगुरु लागणारे श्वानपथक!   एखादा घाबरुन त्यांचा अंदाज घेत चालू लागणारा, तर एखादा मोठा आवाज काढून त्यांना हटकणारा!  तेव्हा शेपूट घालून माघारी वळणारे हेच पथक!

रोजचे जिवंतपणा आणणारे हे दृश्य हल्ली मात्र एकदम स्थिर झाल्यासारखे झाले आहे. ‛कोरोना’ संपूर्ण जगाला विळखा घालत या रस्त्यापर्यंत पोहोचला आहे.  त्यामुळेच एकाकी झालेला रस्ता रोजच्या वाटसरूंची वाट बघत थकतो आहे. सूर्य रोजच्यासारखाच पूर्वदिशेला रंगांची उधळण करत माथ्यावर येतो. पक्षी रोजचाच  किलबिलाट करतात. एखादा चुकार हॉर्नबील शेजारच्या नाल्यात  काहीतरी ढवळू लागतो. गाई- म्हशी रानात चरत असतात.  झाडांची सळसळ आपल्या जिवंतपणाची साक्ष देतात.  पण… पण आज त्या रस्त्याला जाग आणणारे मानवी जग मात्र काही काळासाठी गोठून गेले आहे. मानवाचा अव्याहत चालणाऱ्या गतीला आज एका सूक्ष्म जीवाने रोखले आहे. कुठूनशी येणारी वाऱ्याची मंद झुळूक पण आज या रस्त्यावरुन जाताना चाचपडत आहे. वाहनांच्या गजबजाटाने अव्याहत धुरळा उडवणारी धूळ आज जणू काही नतमस्तक होऊन रस्त्यावर सुस्त होऊन पडली आहे. वाऱ्याने उडणारा पाचोळा सतत टाळ्या वाजवून रस्त्याला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे.ही भयाण शांतता मानवाच्या मर्यादेची जाणीव करुन देत आहे. जणू काही त्याला प्रश्न विचारत आहे,“ आज हरलास ना? हतबल झालास ना? किती गोष्टींवर तू जय मिळवला आहेस? तुला गर्व झाला होता ना की मी काहीही करु शकतो! आज उपग्रहसुद्धा माझ्या ताब्यात आहेत. मी अनेक तंत्र विकसित करुन मला हवे तसे सुख मिळवले आहे. मला फक्त पुढे जायचे आहे. नाती- गोती, भावभावना नगण्य आहेत त्याच्यापुढे! मला फक्त विकास आणि त्याने प्राप्त होणारे धन हवे आहे. मिळाले तुला पाहिजे ते? आज तुझ्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका सूक्ष्म जीवाने तुझ्यावर मात केली आहे. तुला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. तुझी गती काही काळासाठी गोठवून ठेवली आहे. आता तरी जागा हो. या संकटातून जगशील – वाचशील तेव्हा नव्याने आयुष्य सुरु कर. लहानपणी वाल्या कोळ्याची गोष्ट ऐकली होतीस ना ? ‛तुझ्या पापाचा धनी फक्त तू एकटाच आहेस.’ हे लक्षात आल्यावर वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागला नाही. त्यासाठी त्याला रामनामाचा जप करत अंतर्मनात डोकावावे लागले. तुला तेच करावे लागेल. आत्मपरीक्षण! असे सांगतात की पूर्वी खूप मोठा प्रलय झाला आणि सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. त्यावेळी फक्त ‘मनू’ जिवंत राहिला आणि त्याचेच वंशज आम्ही मानव आहोत. आता गोष्ट खरी- खोटी हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही. पण त्यातील आशय जास्त महत्वाचा! प्रलय प्रलय म्हणजे तरी काय? आत्ता जो हाहाकार माजला आहे ते त्याचेच रुप आहे. तुला त्यातून तरुन जायचे आहे, नव्याने घडी बसवायची आहे. त्यासाठीच आहे ही स्थानबद्धता! जागा हो!विचार कर आणि तुझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे हे कायम लक्षात ठेव. तरच ही गती पुन्हा सुरु होईल.”

माझ्या मनात कोरलेले हे चित्र ! अजूनही तिथेच गोठून राहिलेले… स्थिर चित्र… स्टीललाईफ…. बट स्टील देअर इज लाईफ….

 

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कुठल्याही देशप्रेमी भारतीयाला अभिमान वाटावा, असे त्यांचे भाषण होते.अशा स्पष्ट आणि परखड वक्तव्यामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे,  हातापायात बेड्या, साखळदंड पडले. दुस-याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नव्हतं. तुरुंगात ” गीता ” व ” बायबल” हे दोन ग्रंथ जवळ बाळगण्यावरून खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी आमरण उपोषण केले. अफवा उठली होती की देशपांडे या उपोषणामुळे मरण पावले.घरचे सगळे हादरून गेले. पण देवाच्या कृपेने ती अफवाच ठरली. सोळा दिवसानंतर सरकार शरण आले, व ग्रंथ त्यांना परत देण्यात आले. देशपांडेना दुस-या तुरूंगात हलवण्यात आले. ते शांतपणाने शिक्षा भोगणा-यातले नव्हते. बंडखोर वृत्ती आणि अन्यायाची चीड   त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना 1954 मध्ये पोर्तुगाल मधील लिस्बनच्या तुरूंगात रवाना केले.तेथे त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. केवळ छळ करायचा म्हणून.  ते मनोरुग्ण नाहीत, हे डाॅक्टर्स व इतर स्टाफला माहीत होतं. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळत होती. इतर मनोरुग्णांच्या त्रासापासून दूर ठेवले जाई. 19 डिसेंबर 1960 ला गोवा स्वतंत्र झाल्यावर 1962 साली त्यांची सुटका झाली व ते भारतात परत आले.

सर्व परिवारा समवेत ते वास्को येथे राहू लागले. Indian National Trade Union Congress ( INTUC) च्या गोवा ब्रॅचची स्थापना त्यांनी केली. व INTUC चे गोव्यातील पहिले अध्यक्ष झाले. गोवा डाॅक लेबर युनियन, टॅक्सी युनियनचे ते नेता होते. प्राथमिक शिक्षकांच्या युनियन चे ते अध्यक्ष होते. जात-पात, धर्म,  भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांचा नेता म्हणून लोकांच्या विविध प्रश्नांना, तक्रारींना न्याय मिळवून देण्याचे व्रत त्यांनी घेतले.जेव्हा जेव्हा सामाजिक प्रश्न किंवा गुंतागुंत सोडविण्यास सरकार असमर्थ ठरले, तेव्हा तेव्हा स्वतः त्रास सोसून लोकांसाठी उभे ठाकण्यास आणि   लढण्यास ते सज्ज झाले आणि यशस्वी झाले.माणूस मोठा धडाडीचा. त्यांच्या प्रत्येक शब्दात आंतरिक तळमळ होती. प्रत्येक कृतीत परिपूर्णता होती. प्रेमळ स्वभाव, उदार अंतःकरण,  सहानुभूती,  कुटुंबाबद्दल जिव्हाळा, सगळंच उधाणलेलं होतं. असं अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व..

19 डिसेंबर 1960 ते 2020, साठ वर्षे झाली गोवा स्वातंत्र्य लढ्याच्या यशस्वी घटनेला. त्या निमित्ताने सर्व  स्वातंत्र्य सैनिकांना आणि माझे मोठे दीर कै. दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मृतीला नम्र

अभिवादन! ??

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जे जे मनात भावे| ते ते इथे उतरावे|

मनमोकळे करून घ्यावे|आपले निसंकोच |

असं म्हणून मी पहिल्यांदा माझं मन कधी मारलं हे आठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट अट्टाहासाने पूर्ण करून घ्यायचा स्वभाव त्यामुळे हौस फिटेल हौस भागेल असं काहीसं करून मन भरून घेतल्याचा आठवलं.

असं केल्याने आज मन तृप्त आहे का? की हूरहूर आहे? हे शोधायचा प्रयत्न केला आणि कबीरांचा दोहा आठवला

गेली कामना चिंता सरली मनमुक्त असे सैराट |

ज्याला काहीच नको असतो तोच खरा सम्राट |

माझ्यासारख्या पामराला कुठेतरी माझ्यातला सम्राट जागा करायचा होता म्हणून सतत मनाची कामना पूर्ती कशी होईल हा अट्टाहास कमी व्हायला हवा हे जाणवलं आणि मन मारायची सवय लावायची असं ठरवलं.

माझ्या मनाचा ठाव घेऊ लागले.मी मनाच्या आरशात पाहू लागले. माझे विचार मांडायची ती जागाच आहे ना? मला त्यात माझं प्रतिबिंब दिसलं. माझं मन आरशासारखं चकचकीत कधी होईल? असा प्रश्न मी त्या प्रतिबिंबाला विचारला. त्याचे उत्तर मार्मिक होतं बाह्य कर्म हा मनाचा आरसा आहे. त्यासाठी सदैव प्रसन्नचित्त असले पाहिजे.

थोडक्यात काय….

मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण|

केवढा खजिना सापडला होता आज मला!!

मनाला लागली दूषणे मला त्याचा शोध घ्यायला भाग पाडू लागली ‘प्रसन्न’ या शब्दाचा गर्भितार्थ शोधण्यासाठी मी माझ्या मनाला भेटायचं ठरवलं……

आपुलाची वाद आपणासी या व्यवस्थेत असताना अचानक मी माझ्या मनात शिरले ती एका चोर वाटेने. थोडी आडवळणी असली तरी तिने मला दिशा दाखवली. थोडी गुंतागुंतीची असली तरी तिने माझ स्वागत केले. आणि मग माझं मन किती अवाढव्य आहे याचा मला अंदाज लागला.

उगाच नाही बहिणाबाईंनी मनाची व्याप्ती वर्णन करताना म्हटलयं ‘मन वढाय वढाय’

‘असं कसं मन असं कसं रे घडलं?

कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं?

अशी साशंकता त्यांनी वक्त केल्यावर मात्र मी माझ्या मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

मन हे बंद बाटलीतल्या राक्षसासारखा आहे. अफाट शक्ती असलेलं आणि बुद्धीवर ताबा नसलेलं! बुद्धीचा वापर करून ते बाटलीच्या बाहेर आलं तर ठीक… नाहीतर विस्फोट ठरलेला. बुद्धीचं तारतम्य असलेलं मन विधायक काम करत.

मन अनाकलनीय, गूढ, विविधरंगी, विविधढंगी असं आहे. हवी ती उपाधी त्याला द्यावी ते तसं दिसू लागतं. क्षणात हळवं क्षणात चौफेर उधळणारं, क्षणात एकटं, क्षणात क्रूर, क्षणात कपटी, क्षणात पवित्र…..

मन राजासारखा आहे म्हटलं तर ते तसंच रुबाबदार आणि बलदंड वाटू लागतं. मनस्वी आहे असं म्हटलं तर ते मस्तवाल वाटू लागतं. उन्मत्त आहे असं म्हटलं तर खरच ते कुणाचेही ऐकत नाही. प्रेमानं सांगितलेली गोष्ट ते साशंकतेने घेतं कोणीही कोणताही उपदेश केला तरी ते वळत नाही.

मनाचा वेगही अचाट! ते कधी तळ्यात तर कधी मळ्यात.

अचपळ मन माझे, नावरे आवरीता |

तुझं विण शिण होतो, धावरे धाव आता|

मनाचा वारू आवरायला भगवंताला पाचारण करावे लागले.

मन लोभी मन लालची मन लंपट मन चोर

मन के मतनाचे पलक पलक मनोर

असंही मनाला दूषण दिलेलं आहे.

मनाचं अस्तित्व हे माझ्या देहापासून वेगळं नाही. अशरीर असं मन अस्तित्वातच नाही त्याचा चेहरामोहरा मी पाहिलेला नसला तरीदेखील माझ्या अस्तित्वाचा धनी तोच आहे मला तो गूढ अनोळखी वाटत असला तरी माझा चेहरा हा माझ्या मनाचा आरसा आहे माझ्या जीवनात घडणाऱ्या मानसिक घटनांची मालिका म्हणजे माझं मन आहे.

माझ्या मनाचा लगाम माझ्याच हाती हवा.

कधी कधी मनाची मनमानी चालते तो मालक बनू पाहतो त्याच्यासारखे नाही वागले तर रुसत. आंधळ्या मनाबरोबर चालत राहील तर खड्डे अटळ आहे आपल्या मनाला डोळस केलं पाहिजे आपण त्यांचे गुलाम होऊन चालणार नाही कबीरांनी पुढे आपल्या दोह्यात म्हटलंच आहे.

मन के मते मत चलिये |मन जिया तिया ले जाये\

मन को ऐसा मारिये |मन टुकडा टुकडा हो जाये\

तात्पर्य काय तर माझ्या मनावर माझं नियंत्रण हवं नाहीतर माझी अवस्था अशी होईल की माझी न मी राहिले………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

15 ऑगस्ट 1947c  … इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात अगणित बलिदाने देऊन भारत स्वतंत्र झाला. मोकळ्या हवेत श्वास घेऊ लागला.

त्यावेळी गोवा ह्या छोट्याशा प्रदेशावर पोर्तुगीजांचे राज्य होते. भारत स्वतंत्र झाला तरी सीमेलगतचा गोवा प्रदेश अजून परकीयांच्या त्रासात पिचत पडला होता.  सालाझार या पोर्तुगीज अधिका-याने. हैदोस घातला होता. स्वातंत्र्य पूर्व काळी भारतीयांवर जे अत्याचार चालले होते,  तेच गोमंतकीयांवर पोर्तुगीजांकडून चालू होते. अशा वेळी भारतीय संग्रामाच्या वारे गोव्याकडे आले नसतं, तरंच नवल.

1946, डाॅ. राम मनोहर लोहियांच्या सत्याग्रहापासून गोव्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.

अॅड. विश्वनाथ लवंदे, श्री प्रभाकर सिनारी यांच्या बरोबर श्री दत्तात्रय देशपांडे हे गोवा स्वातंत्र्य संग्रामात स्थापन केलेल्या आझाद गोमंत दलाचे founder member.

श्री.  देशपांडे हे निपाणी जवळील रामपूर गावचे. बालपण सुखवस्तू परिस्थितीत गेलं तरी मालमत्तेच्या,  जमिनीच्या वादावरून हे कुटुंब त्रासात पडलं. रामपूर हे इतकं खेडं होतं की शाळेचीही सोय नव्हती. त्यांना तीन तीन मैल चालत जावं लागे. आपल्या बुद्धिची चमक त्यांनी दाखवली आणि ते मॅट्रीक उत्कृष्ट रित्या पास झाले. विद्यार्थी  जीवनापासून त्यांचे वाचन अफाट होते. ते एकपाठी होते.  लेखनाचीही आवड होती.

जेव्हा SSC  च्या पुढचे शिक्षण शक्य नाही असे समजले तेव्हा त्यांनी मिलिटरीत जाण्याचा विचार केला. घरच्यांची परवानगी न घेताच ते बेळगावला गेले आणि सैन्यात भरती झाले सुद्धा. सिकंदराबाद, जबलपूर येथे त्यांना पाठविण्यात आले. इराक व इराण ला सुद्धा ते गेले होते. तिथे सरकार विरोधी कारवाया केल्याने त्यांना कोर्टाला सामोरे जावे लागले.  नंतर त्यांना कोलकाता येथे पाठवले. तिथेच त्यांनी मिलिटरी सोडली व 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन ते Forward Block मध्ये गेले. तेव्हा ब्रिटिश सरकार विरुद्ध लढ्याच्या हालचाली जोरात सुरू होत्या. ब्रिटिश पोलीस त्यांना पकडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी तिथून निघून  देशपांडे गोव्यात दाखल झाले. 1945 साली वास्को मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. 1946 साली गोवा मुक्तीसाठी लढा सुरू झाला. हजारोंच्या संख्येने लोक ह्यात सामील झाले होते. 1947 साली अशाच कारवायांच्या संदर्भात देशपांडे ना अटक करण्यात आली. व कोर्टात हजर रहावे लागले. त्यांनी तिथे सडेतोडपणे व परखडपणे सांगितलं की,  गोवा हा भारताचाच भाग असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे हा गुन्हा ठरत नाही. आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर कुठलीही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. कोर्टात त्यांनी सादर केलेले स्टेटमेंट त्यांच्या तल्लख बुध्दीमत्तेचं, साहसी वृत्तीचं आणि कडव्या देशभक्तीचं प्रतीक आहे. या त्यांच्या स्फोटक व जाज्वल्यपूर्ण स्टेटमेंटमुळे त्यांना 28 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली.

क्रमशः….

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

३. डाल्फिन-

स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डाल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.

अलास्कन कॅरिब्यू –

सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६०० कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.

नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर

बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग ते जवळच्या तळ्याकाठी,  पाण्याचा साठा असेल,  तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहेर येणार्‍या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात. पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.

मगर आणि सुसर

मगरी आणि सुसरी, त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्‍यावर येते. गवत रानटी झुडुपे वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.

 समुद्री कासव

हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८ चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे. पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी.चा प्रवास करून तिथे पोचतात.

मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्‍यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं .अर्थात अनेक जण अन्य भुकेल्यांचं भक्ष्य बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले,  म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतात आणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावर ती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंतसापडलेले नाही.

समाप्त

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन ( भाग २ ) – ख्याल गायकी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग २ )  – ख्याल  गायकी☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद~धमार गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली. जौनपूर भागातील नियामत खाॅं या महंदशा राजाच्या दरबारी असलेल्या बीनवादकाने ख्याल गायकी लोकप्रिय केली.

ख्याल या शब्दाचा अर्थ विचार किंवा कल्पना! म्हणजेच ख्याल गायनांत कलावंताला श्रोत्यांपुढे राग सादर करतांना रागाचे सर्व नियम पाळून, आपल्या कल्पनाविलासाने रसिकांना रंजवायचे असते. गाण्यासाठी जी शब्दरचना केली असते तिला रागदारी संगीतात बंदीश अशी संज्ञा आहे.

वर नामोनिर्देश केलेल्या नियामतखाॅंने सदारंग या नावाने अशा अनेक बंदीशी रचल्या आणि त्यांच्या अंतर्‍यांत स्वतःच्या व महंमदशाच्या नावाचा त्याने उल्लेख केलेला आढळतो. ह्या पारंपारिक बंदीशी आजही गायल्या जातात.

बंदीशींचे दोन भाग असतात. एक अस्ताइ व दुसरा अंतरा! अस्ताई मंद्र व मध्य सप्तकांत गायली जाते व अंतरा मध्य आणि तार सप्तकात गायचा असतो असा नियम आहे. ह्रया बंदीशींचे दोन प्रकार. १) बडा ख्याल २) छोटा ख्याल.

बडा ख्याल विलंबीत म्हणजे अतिशय संथ गतीने(शास्त्रीय संगीतात ज्याला लय म्हणतात) गायला जातो. बडा ख्यालाच्या बंदीशी प्रामुख्याने विलंबीत एकताल,तीनताल,तिलवाडा,झुमरा इत्यादी तालात निबद्ध असतात. छोटा ख्याल कधी मध्य लय झपताल,रूपक किंवा द्रुतलयीत गायला जातो. द्रुतलय बंदीशी बहुधा तीनताल आणि एकतालातच गायल्या जातात.

ख्याल गायन सुरू करतांना रसिकांना रागाचे स्वरूप दाखविण्यासाठी रागाच्या वादी संवादी स्वरांवर अधिक आघात देऊन आकारात आलाप घेण्याची पद्धत आहे. (अलिकडचे बरेच गायक रिदनतोम् अशाप्रकारे आलापी करतांना आढळतात.) उदा. बागेश्री राग घेतला तर त्याचे वादीसंवादी स्वर अनुक्रमे मध्यम व षडज आहेत. तेव्हा गायक म~ध~कोमल नी~(मंद्र)~सा~~ अशी सर्व साधारण सुरवात करील. ह्या सुरांवरून शांतपणे आलाप घेत घेत साधारणपणे आपला कलाविष्कार दाखवत मध्य सप्तकांतील मध्यमापर्यंत येऊन पोहोचल्यावर बंदीश गाण्यास सुरवात करील.बरोबर सम मात्रेवर(तालाची पहिली मात्रा) आल्यावर साथीला असलेल्या तबल्याची पहिली थाप पडेल. ह्या समेवर जेव्हा श्रोत्यांची पहिली दाद मिळेल तेव्हा कलावंताने श्रोत्यांवर ताबा मिळविला असे समजावे. प्रत्येकवेळी बंदीशीचा मुखडा घेऊन वेगवेगळ्या ढंगांनी स्वरांशी खेळत खेळत तालाचे एक आवर्तन पूर्ण करून कलाकार जेव्हा श्रोत्यांना सम दाखवितो त्यावेळी मैफीलीत कलावंत व रसिक यांच्यांत सुसंवाद साधून चांगलाच रंग भरतो. पूरिया,दरबारी कानडा, बागेश्री, मालकंस,शुद्धकल्याण वगैरे रागांचा आवाकाच इतका मोठा आहे की एका आवर्तनांतील आलाप गुंडाळल्यासारखे वाटतात.अशा वेळी दोन आवर्तनेही घेतली जातात. आलापांद्वारे हळूहळू राग स्वरविस्तार करत तार षडजापर्यंत पोहोचल्यानंतर अंतर्‍याचे शब्द गाण्याची पद्धत आहे. गायक आपल्या आवाजाच्या क्षमतेनुसार जितके अधिक तार सप्तकापर्यंत जाता येईल तितके जाण्याचा प्रयत्न करतो.हे आलाप घेत असतांना विविध प्रकारे स्वरयोजना करून रागसौंदर्य खुलविणे हे गायकाचे कौशल्य असते. बोल आलापांतील रसास्वाद घेत असतानांच छोटा ख्याल किंवा द्रुतलयीतील गायन सुरू होते.कधी कधी गायक विलंबीत लयीतून मध्यलयीतील छोटा ख्याल गातात आणि द्रुत लयीत तराणा गाऊन गायन संपवितात. द्रुत लयीत आलाप न घेता बोलताना,वक्रताना,खटक्याच्या ताना,अलंकारिक अश्या विविध प्रकारच्या ताना घेऊन आपले गानचातूर्य सिद्ध करतात.

प्राचीन काळी गुरूगही राहून शिष्याने गुरूची सेवा करत संगीत साधना करण्याची प्रथा होती.

गुरू आपली वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. काही प्रतिभावंत कलाकारांनी आपली स्वतंत्र गायनशैली तयार करून शिष्यांकरवी ती जतन केली त्यावरून भिन्न भिन्न शैलीची घराणी तयार झाली. एकूण एकोणीस घराणी आहेत अशी नोंद आहे, परंतु ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर,  मेवाती अशी काही घराणी आजही प्रसिद्ध आहेत.(घराण्यांची सविस्तर माहिती या लेखांत देत नाही,त्यावर एक स्वतंत्र लेखच होईल.)

आधुनिक काळांत गुरूकुल पद्धती राहिली नाही परंतु तयार शिष्याला रियाज करून आणि निरनिराळ्या पद्धतीने केलेले गायन ऐकून स्वतःची गायन शैली प्रस्थापित करण्यांत अधिक आनंद मिळतो. सहाजिकच कट्टर घराणेशाही आज अस्तंगत होत चालली आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 77 – आलेख – सहजीवन ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 77 ☆

☆ आलेख –  सहजीवन  ☆

आमचं लग्न झालं तेव्हा मी वीस वर्षांची आणि हे बावीस वर्षाचे होते. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय-म्हशींचे गोठे आणि गावाला शेती होती.ह्यांचा जन्म पुण्यातला,पदवीधर असूनही विचारसरणी सनातन- “न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति” अशी मनुवादी!  खुप जुन्या वळणाचं सासर, एकत्र कुटुंब, सणवार, कुळधर्म, कुळाचार, रांधा,वाढा उष्टी काढा हेच आयुष्य असायला हवं होतं, पण मी त्यात रमले नाही.

बाहेर जायला विरोध होता, कविता करणं, ते सादर करायला बाहेर जाणं एकूणच उंबरठा ओलांडून बाहेर काही करणं निषिध्द !

प्रतिकुल परिस्थितीत बाहेर पडले,कुणीही प्रोत्साहन दिलं नाही तरी लग्नानंतर चौदा वर्षांनी एम.ए.ला अॅडमिशन घेतलं ….पुढे पीएचडी चं रजिस्ट्रेशन केलं…पूर्ण करू शकले नाही. स्वतःच्या अपयशाचं खापर मी इतर कोणावर फोडत नाही. नवरा डाॅमिनेटिंग नेचरचा आहे पण माझी जिद्द ही कमी पडली.

पण आज या वयात माझा नवरा आजारपणात माझी जी काळजी घेतो त्याला तोड नाही…..

चाकोरीबाहेरचे अनुभव घेतले, चारभिंती बाहेर पडले खुप प्रतिकुल परिस्थितीत थोडं मुक्त होता आलं याचं आज समाधान आहे.

आणि पतंगासारखं काही काळ आकाशात उंच उडता आलं हा आनंद, पतंगांचा मांजा कुणी पुरूष बाप, भाऊ, नवरा नसताना नियतीने ती दोर कवितेच्या रूपाने पाठवली. जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ।

ते पदवीधर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पण तो प्रश्न कधी आला नाही आमच्यात! प्रोत्साहन दिले नाही तरी शिक्षणाला विरोधही झाला नाही फारसा!

एका विशिष्ट वयानंतर “अभिमान” ची संकल्पना नाहीशी होते, कधीच पतंगाची दोर न बनलेल्या जोडीदाराविषयीही कृतज्ञताच वाटू लागते!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची ही अतिशय तरल,सुंदर अशी विराणी आहे. नाच-गाणे करणाऱ्या एका कोठीवालीच्या आयुष्यात घडणाऱ्या विफल प्रीतीची ही कहाणी आहे. बैठक संपली. रसिकांना विन्मुख होऊन ती दार बंद करून आली. आता पुन्हा ती अतिशय तन्मयतेने विडा लावते आहे. गाणे गुणगुणते आहे. मनासारखा विडा लावला आणि ती आर्त स्वरात गाऊ लागली. डोळे पाण्याने भरले आणि या स्वरओल्या जोगियाने वेड्या प्रीतीची कहाणी सांगितली.

“मी देह विकून त्याचे मोल घेणारी.  इथे सगळ्या भांगेच्याच बागा.  असाच एक दिवस एक सावळासा तरुण जणू वनमालीच आला आणि या भांगेत तुळस पेरून गेला. मी त्याला नावही विचारले नाही. हळूच दबकत इथल्या सगळ्या व्यवहाराच्या विपरीत असे नवखेपणाने बोलला, “राणी, माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे.”

इथे सगळा नीतीचा उघड सौदा आणि हा खुळा इष्कालाच प्रीती समजतो. हसून त्याला म्हटले,’ थोडा दाम वाढवा ‘ आणि पान पुढे केले. तोवर तो निघून पण गेला. खरे प्रेम फक्त पैशातच नसते. पैशाने ते मोजताही येत नाही हे मला त्यावेळी कळले.

माझा हात तसाच थबकून राहिला. मी त्याची प्रीत जाणलीच नाही. आता माझे मन सतत त्याला हुडकते आहे. पण तो आता कशाला येईल इथे ?

तो हाच दिवस,हीच तिथी आणि अशीच ही रात्र होती. मी थकून बसले होते आणि एखादा तारा तुटावा तसा तो मागं वळूनही न पाहता अंधारात निघून गेला.

आजच्या दिवशी त्याच्यासाठी विडा लावून, त्याचे ध्यान करते. त्याच्यासाठी व्रतस्थ राहते. असा वर्षातून एकदा ‘जोगिया’ रंगतो. असा हा खुळ्या प्रीतीचा खुळा सन्मान. ”

ही कहाणी कविवर्य.  माडगूळकरांनी सरळ,ओघवत्या, तरल शब्दरचनेने मांडली आहे.   ‘जोगिया’ ही अत्यंत आर्त स्वरांची रागिणी. ऐकणाऱ्याच्या हृदयाची तार छेडते. हा राग आत्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची आर्तता व्यक्त करतो. या कोठीवालीला सच्ची प्रीत कधी ठाऊकच नसते. तिचा असतो सगळा देण्या-घेण्याचा रोकडा व्यवहार. भांगेतही तुळस उगवते हे तिच्या गावीही नसते. त्यामुळे त्या प्रीतवेड्या तरुणाची प्रीत जेव्हा तिला समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ती अतिशय कासावीस होते.

आता तो येऊन गेलेल्या तिथीला त्याची आठवण म्हणून प्रीतीचा विडा तयार करून त्याच्यासाठी तयार होणे एवढेच तिच्या हाती उरते. जोगियाचे आर्त सूर त्याला साद घालतात. तीच आर्तता आता तिच्या जीवनात उरलेली असते. त्यांच्या असफल प्रेमाची ही आर्तता आपल्यालासुद्धा बेचैन करते. खऱ्या प्रीतीला नाव,गाव,जात-पात, पेशा, व्यवसाय यांच्याशी काही देणेघेणे नसते. ती असते दोन मनांना छेडणारी तार. कधी सुरेल बनते तर कधी आर्त बनून ‘जोगीया’ गाते.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

तारीख 29 ऑक्टोबर सकाळी काळूराम बोका घरात आला तो लंगडतच. मागच्या उजव्या पायाचा तळवा चांगलाच सुजला होता. पायाला कोणालाही हात लावू देत नव्हता. खाणंपिणं झालं आणि पुन्हा रात्री जो बाहेर गेला तो चार दिवसांनीच परत आला. चार दिवसात ती सूज आणखी वाढली होती. घरात तो उपचार करू देणे शक्य नव्हतं. जनावरांचा दवाखाना जवळच असल्याने बास्केट मधून त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी भराभर इंजेक्शन दिली. दुसरे दिवशी पुन्हा चार इंजेक्शन्स झाली. शूज थोडी कमी झाली पण पाय टेकता येत नव्हता. पंजा पूर्ण लाकडासारखा कडक आणि निर्जीव झाला होता. पाय सारखा झाडत होता. नंतर विजयनगरच्या डॉक्टर ढोके ना दाखवून आणलं. रक्त कुठं पर्यंत पोचतय हे पाहण्यासाठी छोट अपरेशन केलं. पायाला बांधलेलं बँडज रहात नव्हत. दोन दिवसांनी पुन्हा दाखवायला नेल. पायात किडे होऊन गॅंगरीन झालं होत. डॉक्टरांनी दोन पर्याय सांगितले. जीव वाचवायचा असेल तर पाय मांडीपासून काढावा लागेल. 100% याला साप चावलेला आहे. त्याशिवाय अस होणार नाही. दुसरे दिवशी मोठं ऑपरेशन झालं. त्याची भूल उतरली आणि काही वेळातच खायला लागला. तीन पायावर घरात हिंडत काय पण चांगला पळत होता. आठ-दहा दिवस त्याला खूप जपायला हव  होतं. जखम चाटू द्यायची नव्हती. रोज रात्री घरातले सगळेजण आळीपाळीने जागत होतो. त्याचा तोकडा पाय बघवत नव्हता.

सगळं ठीक होत , तोपर्यंत जखमेवर घातलेले टाके त्याने काढून टाकले. पुन्हा दवाखाना पुन्हा टाके आता त्याचे हाल बघवत नव्हते. दुधातून गोळ्या अँटिबायोटिक औषधे देत होतो. खाण्यापिण्याचे तक्रार नव्हती. 21 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा घातलेले टाकेही पुन्हा निघाले. जखम पूर्ण उघडी झाली. औषधे तर चालूच आहेत. आता पक्क ठरवलं की तो खातोय पितोय घरात फिरतोय फक्त बाहेर हिंडायला जाता येत नाही. तेव्हा आता दवाखाना टाके इंजेक्शन काहीही विचार करायचा नाही. त्याचे हाल करायचे नाहीत. हळूहळू जखम भरून येईल. कितीही दिवस लागू देत ,पण आता काहीही नको. त्याची घरात सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याला सारखे बाहेर जायचे असते.पण बाहेर कसे सोडणार? काळूराम सावकाश का होईना बरा होऊन बाहेर जायला लागू दे. शेवटी तो निशाचर प्राणी आहे ना! लवकर बरा होऊ दे अशी प्रार्थना करुया.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 १. उत्तरेकडील फर सील

उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात.  सीलची मादी जवळ जवळ ९६०० कि.मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला येतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्या बेटापासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि.मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.

२. व्हेलचं स्थलांतर

मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळते. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९,२०० कि.मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिकमहासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला , दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्‍या पाण्याच्या सरोवरांकडे ती जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात. आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सन डिअ‍ॅगोच्या किनार्‍यापासून सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्‍यावर गर्दी करतात.

३. माशांचे स्थलांतर  – ईल आणि सालमन

गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील, सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लाव्र्हा असं म्हणतात. या छोट्या लाव्र्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशाकडे वाहू लागतात. या  माठ्या होत जाणार्‍याया ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना २/३ वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लाव्र्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात.  त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्‍या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाने ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्‍या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.

पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्‍या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला,  त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात .त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो?  नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं,  त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print