मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ मनमंजुषेतून  ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

असचं एकदा   काही  कारणानं  मला मुंबईला जावं लागलं होतं.माझी एक  जुनी शाळासखी इथं राहते. काम झाल्यानंतर मुद्दाम वेळ काढून मी तिच्याकडं गेले. अर्थातच फोन करुन  तिला इंटिमेट केलं होतंच. मनात मात्र बालमैत्रीणीला भेटण्यासाठी आजकाल हा जो शिष्टाचार पाळावा  लागतो याविषयी थोडी नाराजी होतीच.

बेल वाजवून दारात ऊभी राहिले. दार ऊघडताच गळाभेटीसाठी हात पसरणार इतक्यात..  हाय रे.. कामवालीनं दार उघडलं.  मला बाहेरच थांबायला सांगून ती आत गेली. थोड्या वेळानं येऊन तिनं मला हॉलमध्ये नेलं. तो ऐसपैस, किंमती वस्तूंनी सजलेला दिवाणखाना मालकिणीच्या  सधनतेची जाणीव करुन देत होता. काही मिनिटांनी मॅडम बाहेर आल्या. गळाभेट झाली. दोघीही गहिवरलो. ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिच्या मिस्टरांची कर्तृत्वगाथा समजली. मुलांची चौकशी करुन झाली. तसं सगळं छान होतं. पण कुठंतरी काहीतरी खटकत होतं. भेटीनंतर शाळेत असताना मिळणारा आनंद, गवसणारं समाधान … छे.. छे.. मान झटकून मी मनाला आवरलं. घरी नसतील कुणी.. त्यामुळं कदाचित भेटले नाहीत  आपल्याला.. पण.. गप्पांच्या ओघात समजलं, सगळे घरीच  होते. शेड्यूल  ठरलं होतं. मला भेटायला त्यांच्या जवळ  वेळ नव्हता. मी सकाळी कळवलं होतं ना. त्यांचे प्रोग्राम्स पूर्वीच ठरले होते.

घरी परतल्यावर मी माझ्या  मुलाशी  बोलत होते.मैत्रिणीच्या घराच वर्णन, पण मनातील खदखद जास्त. तेव्हढ्यात माझ्या नवर्‍यानं  माझा मोबाइल  घेतला.” अगं, ते ICICI बॅंकेचं स्टेटमेंट बघायचंय. तुझ्या कडं  मेसेज आला  असेल.”माझा  लेक तिथंच  डायनिंग टेबलवर पेपर पसरुन वाचत बसला होता.मी नुकत्याच भाजून ठेवलेल्या शेंगदाण्याच्या बुट्टीत हात घालत  तो म्हणाला,” आई, याला स्पेस जपणं  म्हणतात. हाय सोसायटीतला हा एक  शिष्टाचार आहे. सगळे आपआपापल्या खोल्यात बंद. आत्ता आपण बसलोय ना तसं बसायचं नाही एकत्र. परवागनी घेऊन, दारावर टकटक करुनच एकमेकांच्या खोलीत जायचं. बाबांनी आत्ता तुझा मोबाइल घेतला ना; तुला न विचारता ; तसा नाही घ्यायचा. आजकाल असं वागणं म्हणजे स्पेस  देणं.कळलं ?”

माझा  वेडा प्रश्न,” म्हणजे, एकत्र बसून जेवायचं  नाही का? सासवा- सुनांनी, मायलेकींनी हसत खेळत गप्पा मारत घरकाम, स्वयंपाक करायचा नाही ?”

“अं हं. आणि तसंही आजकाल स्वयंपाकाला वेळ असतोच  कुणाला? आणि दहा- बारा तास ऑनलाइन काम. ते जास्त महत्त्वाचं नाही का ?”

तो ऊठून आपल्या  कामाला  गेला. माझे हात काम करत होते. पण मन भूतकाळात गेलं  होतं. रोज रात्री एकत्र गप्पा मारत जेवणं हा एक दंडकच होता म्हणा ना. त्यामुळं कोणाचा दिवस कसा गेला हे कळत  असे.दूसर्‍या दिवशीचं सगळ्यांच  वेळापत्रक समजे.बाबांचे ऑफिस ऑफिशिअल नसे. आईच्या शाळेतील विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचं वेळापत्रक आम्हांला देखील ठाऊक असे. माझ्या भावांच्या मित्रांची मी खास ताई होते. माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांचे, घरातले झाले होते. आई तर चेष्टेनं म्हणत असे, की माझ्या न पाहिलेल्या कॉलेजातील शिक्षकांनाही  ती रस्यावर सुद्धा ओळखेल. मी तेव्हढी बडबड रोज करतच होते घरात.

भाजी निवडणार्‍या आईला मुलंही हातभार  लावत. भुईमुगाच्या शेंगा फोडणार्‍या आजोबांच्या भोवती नातवंडांचं कोंडाळं असे. पेपर मधील बातम्या,” बरं का गं… ” असं म्हणत  बाबा  मोठ्यानं  वाचून  दाखवत. सकाळच्या  धावपळीत पेपर  हातात  न घेताही आईला, आजीला महत्त्वाच्या घडामोडी कळत. स्वयंपाकघरातल्या  कोपर्‍यात दोन पायांवर बसून आजोबा ताक करत तेंव्हा  घरातलं एखादं लहान नातवंड नाचणार्‍या रवी बरोबर  खिदळत असे. हलकेच लोण्याचा गोळा त्याच्या जिभेवर ठेवला  जाई.

मागच्या पिढीनं स्पेस जपली असती तर सुदृढ भावबंध असलेली नाती कशी  तयार झाली  असती? तेंव्हाच्या आई बाबांची ऑफिसं कशी  बरं  बिनधास्त झाली असती?  मध्यमवर्गीय  संसार कसे बरं  बिनघोर झाले असते? पण छे:, न्युक्लियर फॅमिली ची ही कॅप्सूल समाजात आली, लोकप्रिय झाली. पाळणाघरांची गरज निर्माण झाली. एकमेकांना वेळ देणं एकमेकांच्या  वस्तू शेअर करणंही  जिथं  दुरापास्त  होऊ लागलयं, तिथं मी खुळी  नात्याला भावबंधांचे रेशमी  पदर असावेत  असल्या अपेक्षा करत बसलेय.

अचानक माझ्या गळ्यात मऊ लडिवाळ हात पडले. माझी सहा वर्षांची नात मला  लाडीगोडी लावत होती. “आजी चल ना गं. बागेत झाडांना पाणी घालूया. फुलं काढूया. काल तू प्रॉमिस केलं  होतसं शाळेत जाताना गजरा करुन देईन. माझ्या मॅमना द्यायचाय  गं मला.” मी तिचा गालगुच्चा घेतला. तिचा हात धरून बागेकडं निघाले. ती माझ्या हाताला झोके देत चालत होती. प्रत्येक झोका मला माझ्या कुटुंबातील सगळ्यांना बांधून ठेवतोय, समाधानाचं हसू माझ्या घरकुलात पसरतयं याची सुखद जाणीव करुन देत होता. मी मनात म्हणत होते,’ बरं गं बाई, मी महानगरातल्या हायफाय सोसायटीत रहात नाही.’

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

माझा होशील ना, सिरियल पाहिली आणि नकळत डोळ्या समोरून सारे बालपण गेले. सुखात होतो मध्यम वर्गीयात. श्रीमंतीत असणार्‍या लोकांसारखे जास्त अपेक्षेचे ओझे घेऊन फिरत नव्हतो डोक्यावरून. सुखी समाधानी होतो आम्ही . हव्यास संपतच नाही ह्या लोकांचा, अजून पैसा, अजून एक गाडी, अजून एक जागा खरेदी…..

कपाट भरलेले असते सिल्कच्या साड्यांनी, सुटनी आणि दागदागिन्यांनी. पण ही श्रीमंती मिरवताना स्वतः च कधी गरीब होऊन जातात मनानी, हेच त्यांना कळतं नाही. नात्यांच्या गोधडीला प्रेमाची ऊब लागते पैश्यांची नाही, हे त्यांच्या लक्ष्यातच येत नाही. आणी जेव्हा लक्ष्यात येते तोवर खुप उशीर झालेला असतो. रणरणत्या उन्हात एसी गाडीतून फिरतांना डेरेदार झाडाच्या सावलीचा आनंद कधीच अनुभवता येत नाही त्यांना.

ताजं कढवत ठेवलेल्या लोणकढी तुपाच्या वासाचा घमघमाट आम्हां मध्यमवर्गीयांनाच माहिती, तो खमंग वास रेडी बटर, आणि चिझ ला कुठे ?? जेव्हा घरी बेसनाचे लाडू बनताना खमंग वास दरवळतो ना, सगळीकडे आणि तोंडाला पाणी सुटते तो अनुभव फक्त आम्हालाच. भडंग करतांना लसणीचा खमंग वास घरभर फिरतो आणि वर्दी देऊन जातो ताज्या भडंगावर ताव मारण्याची, तो रेडीमेड भडंगात कुठे?

पॉकेट मनी साठवून आपल्या आई बाबांच्या वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट आणण्याचे सुख आमच्याच नशिबात, हां आता सो कॉल्ड ग्रँड पार्टी आमच्या दैवात नसेल, ना तो भपका आणि पैश्यांची उधळपट्टी, कारण आम्ही वर्षभर विचार करून साधारण तेच गिफ्ट घेतो ज्याची खरच गरज आहे आणि जे आमच्या खिशाला परवडणार पण आहे.

सगळीच नाही काही, पण असे बरेच श्रीमंत लोक आहेत जे फक्त आपला स्टेटस जपण्यासाठी पैश्यांची उधळपट्टी करतात. डिनर पार्टीला, एक पंधरा वीस तरी आयटम असतात खायला, ज्यातले निम्मे अधिक फुकट जातात. आम्ही भले दोनच जिन्नस करू पण वाया नाही कुठला घालवणार. आम्हां मध्यमवर्गीयांना गरजेला सारे काही पण उधळपट्टी कधी जमली नाही आणि श्रीमंतांना गरजेपुरते अस काही असते हेच कधी कळले नाही.

मला आठवतय चार लहान खोल्या असल्या तरी अगदी सगळे नातेवाईक मे महिन्यात जमलो की मस्त पंधरा पंधरा दिवस धमाल करायचो कधी अडचण नाही झाली आम्हाला कोणाची आणि तेच श्रीमंतीत राहणार्‍यांचा महाल असला ,तरी चार चे पाच जण झाले तरी त्यांची स्पेस हरवल्या सारखी वाटते त्यांना. आत्ता पटते माणसांच्या मनात स्पेस लागते, जागेत नाही.

श्रीमंतां सारखे गरजेपुरता माणूस, अस नसते आमच्यासाठी. लोकं कामापुरती मनात अस होत नाही. आम्ही नाती पैश्यांसाठी, कामापुरती जपत नाही, एकदा नाते जोडले तर ते मनापासून जोडतो आणि ह्रदयात जपतो कायमकरता. It is not a deal or contract for us or a source to earn money.काम झाले की हात पुसून टीशुपेपर सारखे फेकून देत नाही, कारण मुळात टीशुपेपर हेच आधी आमच्या संस्कृतीत बसत नाही.

मातीत बागडून, खेळून धडपडून मोठे झालो आम्ही. उन्हाचे चटके बसले की सावली कशी शोधायची हे शिकवायला लागले नाही आम्हाला. सुखी आहोत ह्याचे कधी नाटक नाही करावे लागले, कारण खरच होते त्यात सुखी होतो आम्ही. तेच श्रीमंतांना एसीत बसुन घाम फुटतो, आणि किती ही सुखी असला माणूस तरी वर्षाच्या शेवटी त्यांच्या balance sheet मधे समाधानी आहोत हे मांडावे लागते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

05.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

कुणाचं नशीब कसं आणि कधी बदलेल ते सांगता येत नाही.

असाच एक घडलेला प्रसंग. रस्त्यात एका झुडुपात एका कुत्रीला चार पिल्ले झाली होती. भुकेने बिचारी खूप रडत होती. ओरडत होती. रस्त्याने जाणारे येणारे फक्त बघून पुढे जात होते. दुसरे दिवशी ही पिलांची आई आली नव्हती. तिचं काय झालं कोण जाणे? पिल्ल‌ सारखी आईसाठी आक्रोश करत होती. हर्षद ने चित्र पाहिले आणि त्याला रहावले नाही. त्याने चारही पिल्ले घरी आणली. घरात  कुरबूर झाली. त्यांना दूध दिल्यानंतर ती शांत झाली आणि झोपी गेली. त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवले. त्यांचं काय करायचं ते बघूया, असं ठरलं. पैकी दोन पिल्ले सांभाळायला चांगल्या घरी दिली. उरलेल्या दोन पिलांनी घरातल्या सगळ्यांना जीव लावला. मोठी झाली की राखण करतील असू देत आपल्याकडे असं ठरलं. त्या दोघांचं भाऊ-बहीणीच नामकरण झालं. गुंड्या आणि बंडी. दोघांच्या कुस्ती लपंडाव आणि अनेक खेळाने सर्वांची खूप छान करमणूक होत होती. आता त्यांनी सगळ्यांनाच लळा लावला होता.

घरातल्या सगळ्यांना अचानक परगावी जायलाच हव असं निमित्त निघाल. आता या दोन्ही पिलांचं काय करायचं? प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शेवटी असं ठरलं की, “राहत” या प्राणी प्रेमी संस्थेत त्यांना देऊया. जड अंतकरणाने त्यांना त्या संस्थेत दाखल केलं. लवकरच बंड्या आणि गुंडी तेथील प्राणीपक्ष्यांबरोबर छान रुळली. मजेत राहू लागली.

या संस्थेतच मालकांनी दुर्लक्ष केल्याने, अतिश्रमाने, जखमी झालेली काही गाढवे जप्त करून, त्यांच्यावर उपचार करून बरी झाली होती. त्यांना डॉंन्की यार्डमध्ये उटीला पाठवायचे ठरले होते. (मसीनगुडी) उटी याठिकाणी डॉक्टर इलोना ओटर या नार्वेच्या व्हेटर्नरी डॉक्टर व त्यांचे पती नायजेल ओटर यांनी 20 एकर जागेत इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर ही संस्था सी स्थापन केली आहे. असे प्राणी मुक्तपणे मोकळे आणि निवृत्त जीवन जगत असतात. तेथे “राहत” मधील गाढवांना व त्यांच्याबरोबर बंड्या आणि गुंडी यांनाही पाठवायचे ठरले. समाजसेवी संस्था किंवा व्यक्ती तेथील प्राण्यांना दत्तक घेतात. म्हणजे त्यांचा खर्च पाठवतात. बंड्या आणि गुंडी उटीला पोहोचले. त्यांचे फोटो पाहून अमेरिकन जोडप्याने त्यांना पसंत केले. कागदपत्रांची पूर्तता झाली .दत्तकविधान झाले. त्यांच्या पालकांनी खर्च पाठवायला सुरुवात केली. नवीन मालकांनी त्यांची दत्तक नावे पा़ँल आणि नन्सी अशी ठेवली. बंड्या आणि गुंडीचे  पाँल आणि नैन्सी झाले.पूर्ण आयुष्य बदलून गेले. मराठी होते ते  अमेरिकन झाले.

रस्त्याच्या कडेला झुडुपात आईविना दिवसरात्र भुकेने कासावीस होऊन ओरडत राहिलेली बंड्या आणि गुंडी पाँल आणि नँन्सी होऊन आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. काय नशीब असतं ना एकेकाच!

 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

मनाच्या कुपीत..आठवणींच्या सा‌‌ठवणीत पडून असतं बरंचसं. आठवूच नये असं जसं , तसंच आठवत रहावं असंही बरंच कांही. असं असो वा तसं जुनंच सगळं. भूतकाळातलं. आठवत रहावं असं असलं , तरी सारखं तेच आठवत रहाणं म्हणजे भूतकाळातच जगणं. आठवू नये असं तर दामटून बसवलं नाही, तर डोकं वर काढतच रहातं सारखं सारखं लवचटासारखं. आठवणी हव्या-नकोशा कशाही असोत त्या उपटून फेकून नाहीच देता येत. मग करायचं काय? हव्याहव्याशा, चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या निगुतीनं. आवडती वस्तू सहज कधी हाताळून पहातो ना , तसं अलगद आठवून पहायच्या क्षणकाळ. तेवढाही श्वास पुरुन उरतो वर्तमानात जगण्यासाठी. नकोशा आठवणींकडे करायचं दुर्लक्ष. मुद्दामच. पाहूनही न  पाहिल्यासारखं. हिरमुसल्या होऊन मग रहातात पडून न् जातात विरुनही कधीतरी हळूच खाली मान घालून निघून गेल्यासारख्या. आठवणी कशाही असोत, त्या हव्यातच. पण भल्याबुऱ्याचं भान जागं ठेवण्यापुरत्या. जगायचं कसं आणि कसं नाही हे सांगण्या-सुचवण्यापुरत्या.

आठवणी हव्यातच सोबतीपुरत्या. अंधारल्या वाटेवरच्या इवल्याशा दिव्यासारख्या. मिणमिणताच पण प्रकाश देणाऱ्या. चुकत असेल वाट तर रस्ता दाखवणाऱ्या.

आठवणी म्हणजे अनुभवच तर असतात भूतकाळात जमा झालेले. हवेसे किंवा नकोसेही. मनाच्या खोल तळाशी पडून असतात वाट पहात, हांक आली की झरकन् झेपावण्यासाठी. आठवणी कशाही असोत सारखं कुरवाळत नाही बसायचं आवडती गोळी चघळल्यासारखं, किंवा झिडकारायच्याही नाहीत कडवट कांहीतरी थुंकून टाकल्यासारख्या. न जाणो, त्या कडवट असल्या, तरी उपयोगीही पडत असतात कधीतरी औषधासारख्या..!

औषधासारख्याच तर असतात आठवणी. (मनाच्या) तब्येतीला भानावर आणणाऱ्या. गोड सिरप गोड असतं म्हणून आवंढा न गिळताच तोंडात नसतंच ना धरून ठेवायचं. किंवा असेल गोळी औषधाची कडवट किंवा गोडसरही, पण तीही चघळत नसतीच रहायची तासनतास. गिळून टाकायची पाण्याच्या एका घोटाबरोबर क्षणार्धात. आठवणी लगडलेल्या असतातच विचारांना , येणाऱ्या.. जाणाऱ्या..! जाऊ द्यायच्या आल्या तशाच जाणाऱ्या विचाराबरोबर तशाच अधांतरी तरंगत. जात नाहीतच त्या कायमच्या. जाऊन बसतात आपल्याच मनाच्या तळाशी वेळ येईल, तेव्हा अलगद.. हळूवार सावरायला आपल्याच मनाला…!!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 4 – राग मालकंस ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  4 – राग मालकंस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

ती मध्यरात्रीची वेळ

सूर आले कानी

होते कोमल ग ध नी

मन माझे गेले मोहुनी…

क्षणांत भावना श्रृंगाराची

तसेच पवित्र भक्तिभावाची

हेच असे स्वरांचे ह्या वैशिष्ठ्य खास

प्रचलित तो राग मालकंस…

 

वरील माझ्या या काव्यपंक्तींवरून वाचकांच्या लक्षांत आले असेलच की आजच्या लेखांत आपण कोमल स्वराधिष्ठित मालकंस या रागाचे विवेचन करणार आहोत.

भैरवी थाटजन्य हा राग! किंबहुना भैरवी रागांतून रिषभ(रे) व पंचम(प) हे स्वर काढून टाकले की झाला मालकंस! म्हणजे सा ग(कोमल)म ध(कोमल)नि(कोमल) या पांचच स्वरांचा हा ओडव जातीचा राग! तरीसुद्धा गायन/वादनासाठी फार विस्तृत बरं का.

नि सा ग म ध नि सां असा याचा आरोह तर सां नि ध म, ग म ग सा असा थोड्या वक्र स्वरूपाचा अवरोह.

कोमल स्वरांमुळे अतिशय कर्ण मधूर पण त्याच बरोबर करूण रसाचा आविष्कार करणाराही.

ह्या रागांतील स्वररचना ही त्यांतील शुद्ध मध्यमाभोवती फिरत असते.त्यामुळे सहाजिकच मध्यम वादी आणि त्याच्याशी सुसंवाद साधणारा षडज हा संवादी स्वर मानला आहे. असे असले तरी गंधार व धैवतही सातत्याने वावरत असतातच. अतिशय भारदस्त असा हा राग सर्वच रसिकांचा आवडता नि लाडका आहे.

स्व. भारतरत्न भीमसेन जोशींनी अतिशय प्रचलित केलेली ‘रंग रलिया करत सौतन के संग’ ही बंदिश ऐकतांना नायिकेचा प्रियकर तिला सोडून सवती सोबत रात्र घालवितोह्या विचाराने श्रृंगारावाचून तळमळणारी आणि विरहाने व्याकूळ झालेली नायिका आपल्या डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य मालकंसच्या ह्या स्वरांत असल्याचे जाणवते. अर्थात पेश करणारा कलावंतही तितक्याच ताकदीचा असला पाहीजे हे निश्चित!

सौ. बकूळ पंडितांनी सहजसुलभतेने गाऊन अजरामर केलेले ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे पाणिग्रहण नाटकांतील पद न ऐकलेला रसिक विरळाच असेल. याच मालकंसांत निबद्ध केलेली कानडा राजा पंढरीचा किंवा बैजू बावरा या चित्रपटांतील ‘मन तरपत हरी दरसनको आज’ ही भक्तीगीते भक्तीरसांत भिजलेली आपण पहातो. श्री.अनूप जलोटा यांचे सर्वश्रृत भजन

‘क्षमा करो तुम मेरे प्रभूजी

अबतकके सारे अपराध

धो डालो तन की चादरको

लगे है उसमे जो भी दाग’ ।। यांत भक्ताची जी तळमळ आहे, जी क्षमायाचना आहे ती केवळ मालकंसच्या स्वरसाजामुळेच प्रभूपर्यंत पोहोचली असे वाटते.

छोटा गंधर्वांचे देवमाणूस नाटकांतील ‘सुखवित या संसारा’ या पदांतून दोन जिवांच्या प्रीतींतून मिळणारे समाधान हेच स्वर व्यक्त करतात तर रणदुंदुभी नाटकांतील’दिव्य स्वातंत्र्य रवी’ हे मातृभूमीचे प्रेम व्यक्त करणारे पद मालकंसातच गुंफलेले आपण ऐकतो.

एकूणच विशाल अंतःकरणाचा हा राग  श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प..  ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प.. ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆

थोड्या दिवसांपूर्वी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होते, तेव्हा सहज विषय चालला होता, त्या ओघात ती म्हणाली “नवरा बायकोच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त
अंतर नसावं. पाच-सहा वर्षे तर नाहीच. कारण मग विचार करण्याचा पद्धतीत जनरेशन गॅप राहतो “.

हल्ली हल्ली “जनरेशन गॅप “हा शब्दप्रयोग खूप कानांवर येतोय. म्हणजे ” दोन पिढ्यांमधलं अंतर. ” हा त्यांचा शब्दश: अर्थ होतो, पण व्यक्ती व्यक्तीप्रमाणे त्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे देवाच्या बाबतीत आहे तसं, मानलं तर.  तो आहे ..च आणि तो वेगवेगळ्या रूपात आहे. तसेच.. काहीसे. काही वेगवेगळ्या वयोगटातील किंवा वेगवेगळा अनुभव घेतलेल्या काही लोकांचे म्हणणे ऐकून हे लक्षात येते.

वीस वर्षाची तरुणी : ” हो.. मला तर माझ्याहून पांच वर्ष लहान बहिणीच्यात आणि माझ्यात जनरेशन गॅप जाणवतो, ती माझ्या पेक्षा स्मार्टली ही टेक्नोलॉजी हाताळू शकते

85 वर्षांचे आजोबा : ” अंतर तर आहेच, आमची पिढी एकदम धीरगंभीर, ही पिढी म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि धूडगूस. सगळे आपले वरवरचे. कुठे ही खोलपणा नाही, की गांभीर्य नाहीच..”.

चाळीशीच्या बाई: ” हो..खरंच ही पिढी हुशार आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अजून माहित नाहीत. ह्यांना त्या कधीच शिकवायला लागल्या नाहीत…”
तर हे असे मतमतांतर ऐकायला मिळते.. हे तर ठीक.. पण प्रत्येकाच्या त्याबद्दलच्या भावना वेगवेगळ्या. कोणाला त्याचे कौतुक, तर कोणाला कुतूहल, कोणाला हेवा आणि काही जणांना तर भारी रागच आहे.

आता हेच पहा ना एक गृहस्थांचे म्हणणे असे की “पुढच्या पिढीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, ही मुले एकदम ध्येयनिष्ठ आहेत॰  एकदा मनांत आणलं तर ते करणारच “. तर एका आजोबांना त्यांचे खूप कुतूहल. म्हणाले की ” मी तर माझ्या नातवाशी सतत संवाद करत असतो, नवीन यंत्रणा त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मला ह्या पिढीचा कधी कधी हेवाच वाटतो. ” एक जण जरा त्रासिक आवाजात म्हणाले “काही नाही हो… कुठलेही प्रयोजन नाही पुढच्या आयुष्याचे. मजूरा सारखं राबायचं आणि पैश्याची उधळपट्टी करायची.”

स्वतःचा अनुभव, वय, परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाचे पिढीतील अंतराविषयीचे म्हणणे असते.

मला असे वाटते की दोन पिढ्यांमधे काळाचे अंतर हे असणारच आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. आधीच्या पिढीने अंतर ठेवून न रहाता त्याचा स्वीकार करून पुढच्या पिढीशी एकरूप व्हावे. बाकी आधीच्या पिढीनेच पुढच्या पिढीवर संस्कार केलेले असतात आणि शिकवणही दिलेली असते. म्हणजेच त्यांचात असणारे गुण व दोषही काही प्रमाणात…या गोष्टी पिढीजात असणार नाही का?

© सौ. स्मिता माहुलीकर

अहमदाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—६ ?

!! दिवाळी–नव्या जाणिवांची !!

यावर्षी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपण दिवाळीचा सण साधेपणाने पण मनापासून साजरा केला.आनंद घेतला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे.त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची.निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची.विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो.काही गोष्टी परंपरा म्हणून,रूढी म्हणून करतो.पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे.याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे.म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात.शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही.त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण  जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही.स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे.पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा,वेगवेगळे दिवे आपण लावतो.तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे.दिवा हा चैतन्याची,मांगल्याची उधळण करतो.तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा दिवा असंख्य दिवे पेटू शकतो.लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जपताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते.या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल.त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘दृष्टीदाना’ चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा  हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल रुजायला लागलेली आहे.आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे,नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते.

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडून मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे.सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

शुभ दीपावली.  ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

फ्रेंडशिप, मैत्री किती छान कल्पना त्यादिवशी फ्रेंडशिप डे होता. सर्वजण एकमेकांना फ्रेंडशिप ब्याण बांधून आपल्या  मैत्रीची एकमेकांना आठवण करून देत होते. मी हे सगळं पहात होते. माझ्या मनात विचार आला. याप्रसंगावर चार ओळी तरी लिहाव्यात. म्हणून मी कागद पेन घेऊन बसले. आणि कविता लिहू लागले. तीच ही कविता.

फ्रेंडशिप

फ्रेंडशिप ही कल्पना आहे किती छान

एकच दिवस असतो मैत्रीचा मान

तीच असते या दिवसाची शान

रोजच्या जीवनात नसतं याच भान

पण आठवण होताच वाटतं किती छान

एकमेकांना होतात फोन

गर्दीने भरतात गावांचे कोन

गप्पांच्या फडात रहात नाही वेळेचं भान

आठवणीचे गोफ विणले जातात छान

एकमेकांना बांधतात फ्रेंडशीपचे बँण

सगळेच असतात एकमेकांचे फँन

जीवनाच्या फेऱ्यात होतात अनेक प्लॉन

केव्हातरी होतात छोटी छोटी भांडण

मनमोकळ बोलण्याचं हेच असतं ठाणं

कारण ह्यात नसतं कोणतच बंधन

आठवणीने मनं होतात म्लान

भेटल्यावर होतात परत भेटण्याचे ल्पॉन

भेट न झाल्यामुळे होतं रुदन

विचारांचे होते मंथन

मनांचं होतं मिलन

अन् भावनांचं होतं प्रज्वलन

शंकाचं होतं शमन

संकटकाळी होतं जीवाचं रान

असच असतं मैत्रीचं अतुट बंधन

मैत्रीचं महत्त्व अन् किर्ती महान

त्यावर होतं कवनांच गान

त्यानं भरतं पेपराचं पान

वातावरण ही होतं खूप छान

खरच फ्रेंडशीप ही कल्पना फारच महान

बघा कशी वाटते.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दसऱ्याला टीव्हीवर अनेक ठिकाणचा ‘ रावण- दहन’ सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतांना पाहिला आणि अचानक मनात विचारांची गर्दी झाली. ‘रावण वध’ हे सुष्ट वृत्तीने दुष्ट वृत्तीवर विजय मिळवल्याचे ठळक उदाहरण  असे वर्षानुवर्षे मानले जाते. रावण राक्षसी वृत्तीचा होता- स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याने सीतेला पळवले- आणि म्हणून  रामाने युद्ध करून त्याचा वध केला …. एवढेच वर्षानुवर्षे लक्षात ठेवले गेले आहे. पण या  दोन घटनांच्या मधल्या सत्याकडे मात्र कुणीच लक्ष दिले नाही याचे आश्चर्य, आज समाजात घडणाऱ्या घटना पहाता प्रकर्षाने वाटते. आज इतर बातम्यांइतक्याच आवर्जून येणाऱ्या बातम्या असतात त्या स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, शारीरिक- मानसिक छल …यांच्या, ज्यामध्ये कामवासना – पूर्ती हाच उद्देश बहुतांशी असलेला दिसतो. सामूहिक बलात्कार हा त्याहूनही भयानक प्रकार. मग कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून तिला मारूनच टाकायचे हेही तितकेच सहजसोपे वाटते. एखाद्या मुलीने आपल्याला नकार दिला तर, तिचा जो चेहेरा आवडत असतो तोच एसिड टाकून विद्रूप करणे, तिला आयुष्यातून उठवणे हाही भावनांच्या – विचारांच्या विद्रूपतेचा कळसच. असे असंख्य अत्याचार अनेक प्रकारे सतत होतच असतात. पण बरेचदा लोकलज्जेखातर आणि भीतीने ती त्याचारित स्त्रीच ते समाजापासून लपवून ठेवते हे तिच्याइतकेच पूर्ण समाजाचेही दुर्दैव आहे. अशा-काही घटना व्हाट्यावर येतातही. त्यांचा बभ्रा होतो. कोर्टकचेऱ्याही होतात. आरोपींना शिक्षाही ठोठावली जाते …… पण शिक्षेची अंमलबजावणी? …. ती जास्तीत जास्त लांबणीवर कशी पडेल , माफी मागण्याचे नाटक करून ती रद्दच कशी करता येईल, याचेच जोरदार प्रयत्न सुरू होतात, ज्यात समाजाचे प्रतिनिधीसुद्धा स्वतःचे ‘वजन’ वापरतांना दिसतात. हे पाहून कुणाही संवेदनशील असणाऱ्याचा तात्पुरता संताप होतोच. पण नंतर ती अत्याचारित स्त्री बाजूलाच रहाते, आणि खमंग चर्चा रंगत रहातात त्या फक्त खटल्याच्या……..

हे सगळे चित्रच अतिशय विकृत आहे.. आणि ते पहातांना खरोखरच प्रश्न पडतो की रावणाने सीतेला पळवण्याची मोठीच चूक केली होती, पण आत्ताची परिस्थिती पाहता तो इतका गंभीर गुन्हा म्हणता येईल का, की आज इतकी युगे लोटल्यानंतरही त्याचे आवर्जून प्रतीकात्मक दहन करावे ? समाजाने याचा नक्कीच विचार करायला हवा. आणि तो का ? या प्रश्नाला समर्पक अशी बरीच उत्तरे आहेत ……….

बहिणीच्या अपमानाचा बदला घेणे एव्हढाच तेव्हा रावणाचा हेतू होता, जो भावनेच्या भरात घाईघाईने पूर्ण करण्याची घोडचूक त्याने केली होती. पण सीतेवर कुठलाही अत्याचार करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, हे नंतरच्या त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते. तो तिला कुठल्याही अज्ञातस्थळी घेऊन गेला नाही. त्याने तिला पहिल्यापासूनच अतिशय आदराने वागवले. इतक्या आदराने, की जो आदर आजही स्त्रीला सामान्यपणे दिला जात नाही.  अशोकवनासारख्या निसर्गरम्य जागी त्याने तिची रहाण्याची व्यवस्था केली. तिच्यासाठी आवर्जून स्त्री – सेविकांचीच नेमणूक केली. तिला उत्तम भोजन मिळण्याची व्यवस्था केली. तिथे तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्या काळात स्त्रीने परक्या घरी राहणे पाप मानले जायचे. हा नियम आणि स्वतःची चूक लक्षात घेऊन, केवळ माणुसकी म्हणून सीतेशी औपचारिक लग्न  करण्याची तयारीही त्याने दाखवली होती. आत्तासारखा एसिड फेकून , बलात्कार करून सूड घेण्याचा विचार त्याच्या मनात येणेही अशक्य होते हे यावरून नक्कीच सिद्ध होते. रामाने युद्धाआधी पूजा करायचे ठरवले, आणि ती सांगायला , ‘ व्युत्पन्न ब्राह्मण‘ म्हणून रावणालाच बोलावले. आणि रामाचा मान राखत रावणही गेला. असे सगळे घडणे आज अशक्याच्याही पलीकडचे आहे. विशेष म्हणजे मरण्यापूर्वी त्याने रामाची माफी मागितली. आता हा सगळा रावणाचा ‘शुद्ध मूर्खपणा‘ समजला जाईल. पण त्याच्या मनाची शुद्धता, मोठेपणा याचा विचारही कुणी करणार नाही,  जो सगळ्यांनीच करणे  फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आवर्जून असे म्हणावेसे वाटते की रावण- दहन करणे कायमचे थांबवून, आता प्रत्येकानेच स्वतःच्या मनातल्या राक्षसी वृत्तीचे , दुष्ट आणि घातक विचारांचे आणि दुष्ट वासनांचे जाणीवपूर्वक वेळोवेळी दहन करत राहण्याची फार जास्त गरज आहे. आणि  त्यासाठी  ” दसरा” उजाडण्याची गरजच नाही. कारण अशी प्रत्येक वेळ सोने वाटण्यासारखीच असेल………

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा–भाऊबीज ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—५ ?

!! बलिप्रतिपदा–भाऊबीज !!

शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते.शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो.तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते.दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.

या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो.याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे.जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी,नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष,  भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.

कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो.म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात.थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान,श्रद्धा,सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ  आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे.

याच्या दुसऱ्या दिवशी येते भाऊबीज.बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला  ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. यमराजाची बहिण यमुनाने या दिवशी आपल्या घरी त्याची पूजा केली, त्याला ओवाळले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. ती म्हणाली, “दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस.” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून दरवर्षी  भाऊबीज साजरी होते

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते  निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते.सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची,तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला बहिणीची आठवण येते.

या नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे,मावस भावंडं कोणतीही असोत हे नाते मनापासून जपावे हेच हा दिवस सांगतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print