मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—१ ?

आज पासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण  मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’

दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे.  हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव,  विजयाचा उत्सव असे  अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’.  यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात.  आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते.  लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे “सुरभि”. हीच गोमातांची अधिदेवता आहे.  दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘गो-ग्रास’ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो.  वसुबारस तर  काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.

यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण  व्यक्त करणे हा मुख्य  संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो , त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात.  मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात.  त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे,  शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.

कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने,  कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही.  ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम,  वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे.  “निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊ या. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करू या.  दिवाळीची सुरुवात आनंदाची करू या.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

परवा पुस्तकांच्या कपाटातून सारखी खुडबुड ऐकू येऊ लागली. मनात म्हटले ,“एवढा बंदोबस्त करुनही खारुताईने आपल्यावर कुरघोडी केलेली दिसतेय. पुन्हा घरटे बांधले वाटते.” असे म्हणून त्या बाजूचे दार उघडले तर खारुताई ऐवजी उंदीरमहाशयांनी दर्शन दिले. मी घाबरून पटकन दार बंद करुन घेतले. आमच्या  कपाटाच्या मागच्या बाजूला खिडकी आहे.   ती एका बाजूने कायम थोडीशी उघडी राहते आणि त्याच चोरवाटेने प्रवेश करुन या खारुताईनी दोन वर्षे आपले बस्तान बसवले होते. बिचारी मोठ्या कष्टाने घरटे बनवते आणि तेव्हा लेकुरवाळी पण असते. म्हणून मी पहिल्या वर्षी तिचे बाळंतपण संपेपर्यंत धीर धरला. नंतर सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्त केला. पण बाईसाहेब माझ्यापेक्षा हुश्शार निघाल्या. अगदी लहान राहिलेल्या फटीतून त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा आपला कार्यभाग साधला. यावर्षी मग मी अधिक जोमाने बंदोबस्त केला. आणि बाईसाहेब तिकडे फिरकल्या नाहीत. मी एकदम आनंदात होते. आणि एक दिवस दुसऱ्या बाजूचे कपाट उघडले तर बाईसाहेब दिमाखात घरट्यात बसून माझ्याकडे “ जितम् मया।” अशा अविर्भावात बघत होत्या. तिच्या जिद्दीला मी सलाम केला आणि बाईसाहेब निघून गेल्यावर त्यांच्या घरात आश्रय घेतलेल्या या  मूषकमहाशयांनी दर्शन दिले. आता यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेत मी असतानाच आणखी एक समस्या उद्भवली. आमच्या बाथरूमचे आउटलेट तुंबू लागले होते. आणि चाचपणी केली असता लक्षात आले की बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला उगवलेल्या झाडाच्या मुळ्यांनी पाण्याशी मैत्री करत त्या पाईपमध्ये हात- पाय पसरले होते. ते बघितले आणि मनात विचार आला ,“शेवटी  प्रत्येक जीवाची ही जगण्याचीच तर धडपड आहे. जगण्याची हीच उर्मी त्याची संजीवनी देत असते.”

मध्यंतरी  परदेशातील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका तीन ते चार वर्षाच्या  मुलाचे आई- वडील एका विघातक घटनेत मृत झाले होते आणि ‛मृत्यू’ या शब्दाचाही अर्थ माहीत नसलेला  आणि आपल्या आईच्या आठवणीने  रडणारा तो चिमुरडा बघून वाटले,“ कसे जगणार हे पिल्लू ?” पण तरीही तो जगतो आहेच की! आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. आपण त्यावेळी हळहळतो आणि काही दिवसांनी विसरून पण जातो. पण त्या जीवांची जगण्याची धडपड आणि उर्मी तशीच असते. म्हणूनच जीवनप्रवाहसुद्धा अविरत चालू राहतो.

आज अनेकदा पर्यावरणप्रेमी- अभ्यासक सतत आपल्याला म्हणजेच मानवाला जाणीव करुन देत आहेत की आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत आणि पर्यायाने तेथे निवास करणाऱ्या जीवसृष्टीचा पण! गोष्ट शंभर टक्के खरीच आहे. पण एका दृष्टीने हीसुद्धा माणसाची जगण्याचीच धडपड नाही का? पण त्यात मूलभूत फरक हा आहे की बाकीची जीवसृष्टी आपल्या गरजेपुरताच निसर्गाचा विनियोग करते. आम्ही मात्र आमच्या भौतिक सुखाच्या हव्यासापोटी त्या संपत्तीचा हवा तसा उपयोग करुन घेत आहोत आणि म्हणूनच ही केवळ जगण्याची उर्मी न राहता हाव बनली आहे. म्हणूनच कदाचित बाकीच्या सजीवांना जगण्यासाठी नवनवीन मार्ग शोधावे लागत आहेत. सिंधुदुर्गमध्ये उद्भवलेला हत्तींचा प्रश्न , हल्ली वारंवार ऐकू येणाऱ्या मानववस्तीतील बिबट्याचा वावर, माझ्या घरात घरटे बांधणारी खारुताई किंवा भिंतीत मूळे रुजवणारी वनस्पती हे त्याच समस्येतून निर्माण झालेले प्रश्न आहेत. जगण्यासाठी त्यांनी शोधलेले हे नवीन पर्याय आहेत.अर्थात सजीवांची खासियत हीच आहे की आहे त्या परिस्थितीला तोंड देत जीवन चालू ठेवायचे. आधार शोधून घेऊन नवीन मार्ग निवडायचा! तर काहीवेळा आमच्यातीलच सहृदय व्यक्ती स्वतःहून आधाराचा हात पुढे करतात.म्हणूनच अनाथ मुलांचे आश्रयस्थान एखादी सिंधुताई सकपाळ बनते, तर आमच्याच सिंधुदुर्गातील संदीप परब वृद्धांना सहारा देणारा आधारवड  बनतो. दिव्यांगाना आपल्या मायेची ऊब देत एखादी नसीमादीदी स्वतःच्या शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांना नवीन पंख देते. एखादी तमक्का  आयुष्यभर वृक्षांना मुले मानून त्यासाठी देशभरात बिया रुजवत फिरते आणि लाखो वृक्षांना जन्म देऊन त्यांची आई बनते. तर जंगल अधिवास  नष्ट होऊ नये म्हणून एखादा आसाममधला मोलाई अख्खे जंगल निर्माण करतो.  तात्पर्य काय तर प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि  जगण्याची उर्मी हा त्याचा स्रोत आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत  3 – भीमपलासी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  3 – भीमपलासी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

“मेल न हर प्रिय चतुर मिलावत

रागनि भीमपलासि कहावत।

आरोहनमे रि ध न लगावत

सुर वादी मध्यमको बनावत

समय तृतीय दिन प्रहर कहावत ।।”

भीमपलासि या रागाचे थोडक्यांत वर्णन करणारे हे गीत. शास्रीय संगितात अशा गीतांना लक्षणगीत अशी पारंपारिक संज्ञा आहे.

मागील लेखांत काफी थाटांतील काफी या जनक रागासंबंधी विवेचन केल्यानंतर त्याच थाटांतून उत्पन्न झालेल्या भीमपलासि या रागाविषयी काही सांगावेसे वाटते.

शास्राःनुसार काफी थाटाचे  सा रे ग(कोमल) म प ध नि(कोमल) असे स्वर असतात, त्यामुळे भीमपलासि राग कोमल गंधार व निषाद घेऊनच सादर करायचा असतो. सहाजिकच अनभिज्ञ व्यक्तीस प्रश्न पडेल असे असतांना काफी आणि भीमपलासि हे दोन राग भिन्न कसे? त्याचे उत्तर असे की वर लक्षणगीतांत सांगितल्याप्रमाणे भीमपलासीच्या आरोहांत रिषभ व धैवत वर्ज्य आहेत. म्हणजे

नि(मंद्र कोमल) सा ग(कोमल) म प नि(कोमल)सां ~ आरोह

सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा ~ अवरोह.

याप्रमाणे आरोहांत पांच व अवरोहांत सातही स्वर असल्यामुळे या रागाची जाति ओडव संपूर्ण आहे. मानव निर्मित जातींप्रमाणेच शास्रकारांनी स्वरांच्या संख्येनुसार रागांच्या जाति ठरविल्या आहेत. पांच स्वरांचा राग ओडव, सहा स्वरांचा षाडव आणि सात स्वरांचा संपूर्ण.

वादी मध्यम आणि संवादी षडज.पंचम हा स्वर ह्या रागाचे बलस्थान आहे. हा राग सादर करतांना कलावंत ह्या तीन स्वरांभोवती करामत करून आपले नैपुण्य रसिकांपुढे प्रदर्शित करीत असतो. वानगी दाखल हे काही स्वरसमूह पहावेत.

प(मंद्र)नि(कोमल)सा~ प(मंद्र)नि(कोमल) सा ग(कोमल) रे सा~

नि(मंद्र कोमल)सा ग(कोमल) म प~~

ग(कोमल) म प नि(कोमल) ध प~~

ध म प ग(कोमल) म ग रे सा~~

अतिशय विस्ताराने पेश करण्यासारखा हा राग असल्यामुळे बडा ख्याल, छोटा ख्याल,अशा प्रकारे मैफीलीत हा राग प्रस्तूत केला जातो.

अब तो बडी बेर भई

वारि बेगुमान न करिये सजनी साहेब को तो डरिये या विलंबित लयीतील पारंपारिक बंदिशी आजही प्रचलित आहेत. तसेच “गोरे मुखसो मोरे मन भाई, बिरजमे धूम मचायो शाम, जा जा रे अपने मंदरवा या मध्य लयीतील बंदिशी खूपच गोड वाटतात.

रागदारी संगीतात आज आपल्या माहितीप्रमाणे बंदिशींचे दोन भाग असतात. पुर्वार्ध म्हणजे स्थाई आणि उत्तरार्ध म्हणजे अंतरा! परंतु १७/१८व्या शतकांत बंदिशींचे चार भागांत सादरीकरण होत असे. १) स्थाई २) अंतरा ३) संचारी ४) आभोग. या भीमपलासि रागांतही अशा प्रकारच्या बर्‍याच बंदिशी आढळतात. त्या प्रामुख्याने चौताल, आडाचौताल, धमार या तालांत बंदिस्त असतात.

रागदारी बरोबरच भजन, अभंग ह्या गीतप्रकारांसाठी हा राग विशेष उचित वाटतो.

माणिक वर्माजींचे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, विजय पताका श्रीरामांची झळकते अंबरी ही प्रसिद्ध भक्तीगीते भीमपलास रागांतीलच आहेत.संत कान्होपात्रेचा अभंग अवघाची संसार सुखाचा करीन हाही भीमपलासच!

भक्तीरसाचा परिपोष करणारा असा हा राग अतिशय सुमधूर आहे. संगीतांतील विविध घराणी उदाहरणार्थ किशोरीबाईंचे जयपूर अत्री घराणे, भिमसेनजींचे किराणा, जसराजचींचे मेवाती आपापल्या नियमांनुसार जेव्हा राग प्रदर्शन करतात तेव्हा सुरांची क्षमता रसिकांच्या लक्षांत येते. कसेही असले तरी संगीत ही एक दैवी शक्ति आहे आणि त्याचा योग्य तो परिणाम मानवी मनावर झाल्याशिवाय रहात नाही.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकोसा तो लखपती ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ नकोसा तो लखपती ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

एका देखण्या आणि हुशार कुत्र्याने स्वतःच्या कर्तृत्वावर लखपती होऊन जागतिक कीर्ती मिळविलेली कुठे ऐकली आहे का ?..होय आहे!!!

एका वयस्कर जोडप्याने एक का़ँली़ जातीचा कुत्रा पाळला होता त्याचं नाव पाँल. अत्यंत हूड होता. तो कोणाच्याही अंगावर जायचा. मिळेल ते  फाडायचा. गाड्यांच्या मागे धावायचा. वयस्क असल्याने मालकाला त्रास व्हायला लागला. अखेर त्यांनी त्याला ‘श्वान प्रशिक्षण’ केंद्रात दाखल केले. थोडा मोठा असल्याने नाखुषीतच त्यांनी त्याला ठेवून. घेतले पाँलचे तेथे शिक्षण सुरू झाले.एका महिन्यातच ‌शिक्षक विदरवँ त्याच्यावरक्स त्याच्यावर बेहद्द खुश झाले .आता तो नविन मालकाचा, शिक्षकाचा लाडका झाला. त्याचा हूडपणा कमी झाला.पाच ते सहा महिन्यात अत्यंत अवघड कामे तो चपळाईने आणि डौलदार पणे करायला लागला. पाणीदार डोळे,  सुळसुळणारे पिंगट केस, पन्नास पौंड वजन यामुळे तो देखणा आणि रुबाबदार दिसायला लागला.

सात आठ महिने गेले. एक दिवस पाँ आणि त्याचे शिक्षकल आणि त्याचे शिक्षक विदरवँक्स यांना सुवर्णसंधी आली. उज्ज्वल भविष्य दिसायला लागलं. चित्रपटासाठी ‘काँली जातीचा कुत्रा पाहिजे’  अशी जाहिरात आली. हॉलीवूडमध्ये निवड करण्यासाठी 300 कुत्रे आले होते. पाँलने स्टुडिओमध्ये उत्तम आणि अवघड कामे रुबाबात करून दाखवून वाहवा व टाळ्या मिळविल्या. अनेक चाचण्या झाल्या आणि त्यात पाँल हा चित्रपटासाठी निवडला गेला. चित्रपटाचे नाव “लँसी कम होम” या चित्रपटाचा नायक म्हणून पाँलचे काम सुरू झाले. एका चाचणीत नदीमध्ये होडीतून उडी मारून नदीच्या दुसऱ्या टोकाला पोचताच थकल्यासारखे रांगत जाऊन नंतर उभं रहायचं हे काम त्याने अतिशय उत्तमरीत्या वठविले.  विदरवँक्सना धन्यता वाटली आणि आनंदाने डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले .चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला. तो काळ 1943. लँसीचे आणखी चित्रपट काढण्यासाठी अनेक देशातून पत्रे येऊ लागली. अनेक करारही झाले. आणखी चित्रपट यायला लागले .आता लँसीची स्वतःची कमाई किती झाली असेल ?? आश्चर्य वाटेल…!!!

वार्षिक 50000 डॉलर (1945-46)

दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईत शत्रूचे संकट पुढे असताना सैनिकांना मार्गदर्शन करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम, बर्फाळ प्रदेशात सैनिकांबरोबर पँराशूट मधून उतरून शत्रूला जेरीस आणण्याचे काम लँसी-पाँलने अतिशय उत्तमरितीने पार पाडून शाबासकी मिळवली. काहीवेळा प्रेक्षकात हास्याचे फवारे उडविले.तसेच डोळ्यात अश्रू उभे करण्याची खुबी आणि तंत्रही त्याला जमले होते. त्याच्या देखण्या रुपाची आणि कर्तबगारीची स्तुती करणारी हजारो पत्रे यायला लागली. त्याच्या पायाचा ठसा आणि फोटोसाठी मागण्या यायला लागल्या.त्याच्या रेखा चित्रांची मासिके निघाली. त्याच्या स्वामीनिष्ठेच्या गोष्टी शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांना सांगायला लागले. त्याच्या निष्ठेवर धर्म उपदेशक प्रवचन सांगायला लागले . लँसी-पाँल हॉलीवूडचा एक अमोल कुत्रा होता. केवळ श्वान प्रदर्शनात उपस्थित राहण्यासाठी त्याला दिवसाचे 1000 डॉलर्स मिळत होते. आता चित्रीकरणासाठी लांबचा प्रवास तो स्वतःच्या विमानातून, रेल्वेचा प्रवास वातानुकूलित खास डब्यातून आणि इतर प्रवास खास बांधणीच्या गाडीतून करत होता.

लँसीच्या मोठेपणाचे आणि समजूतदारपणा चे उदाहरण सांगता येईल. चित्रीकरणासाठी त्याचा कॅनडाला मुक्काम होता. त्यावेळी जखमी झालेल्या सैनिकांच्या हॉस्पिटल मध्ये जवानानीच पाँलला आमंत्रित केले .त्याचे चित्रपट पाहून सैनिकांना त्याला प्रत्यक्ष पहाण्याची उत्सुकता होती. हॉस्पिटल मध्ये पाँल-लँसी फिरू लागला. सैनिकांना खूप आनंद झाला. त्यांचे चेहरे खुलले. अनेक जण त्याला हात लावण्याची इच्छा व्यक्त करू लागले .निराश होऊन शय्येवर पडलेला सैनिक त्याला पहाताच उठून बसला. त्याने सैनिकाचा हात चाटून शेक हँड केले. सैनिकाला आनंद  झाला .डॉक्टर आणि औषधाचे काम पाँल-लँसीने केले.

मूळ मालकाला नकोसा झालेला, शिक्षकांनीही थोड्या नापसंतीने ठेवून घेतलेला पाँल-लँसी लखपती झाला.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

शाळेमध्ये असल्यापासून अनेक स्पर्धांमध्ये मला बक्षीसं मिळत होती. सुरूवातीला अर्थातच वक्तृत्व स्पर्धेमध्ये. शाळेतली एक आठवण अजूनही माझ्या लक्षात चांगली राहिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केले होते. माझा नंबर ही आला होता, कितवा ते आत्ता आठवत नाही. पण बक्षीस समारंभ सुरू झाल्यावर माझे नाव पुकारले गेले. मी खाली ग्राउंड वर बसले होते. मी उठून उभी राहिले आणि मैत्रिणी बरोबर स्टेज कडे जाणार तोच बक्षीस देणारे प्रमुख पाहुणे मला म्हणाले, थांब तू बोलू नको मीच खाली येतो. आणि आश्चर्य म्हणजे स्टेजवरून प्रमुख पाहुणे माझ्यासाठी खाली आले आणि माझी पाठ थोपटून त्यांनी मला बक्षीस दिले. त्यांच्या या मोठेपणाची अजूनही मला आठवण येते.

अशीच एक कॉलेजमधली आठवण. त्यावेळी गॅदरिंग मध्ये माझे नृत्य ठरलेलेच असायचे. एफ वाय ला असताना बक्षीस वितरणासाठी माननीय शिवाजीराव भोसले यांना कॉलेजमध्ये बोलावले होते. त्यावेळी मला तीन_चार बक्षिसे मिळाली होती. माझे ठरलेले वक्तृत्व, कथाकथन, कॉलेजमध्ये अंताक्षरी स्पर्धा होती. आमच्या ग्रुपचे प्रमुख मीच होते. त्यामध्ये वेगवेगळे राऊंड झाले. आमच्या ग्रुप चा पहिला नंबर आला. शिवाय मला प्रश्नमंजुषा मध्ये बक्षीस मिळाले होते. स्टेजवर घेण्यासाठी मी तीन-चार दा गेले होते. गॅदरिंग असल्यामुळे साडी नेसली होते. त्यावेळी शिवाजीराव भोसले सरांनी माझे कौतुक केले आणी म्हणाले,”किती बक्षीस मिळवलीस ग”. अजूनही त्यांचा तो आवाज, कौतुकाचे बोल माझ्या कानात आहेत. त्यांनी दिलेली शाबासकी माझ्या डोळ्यांना ना न दिसता ही मला जाणवली. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये अर्धा भाग ते माझ्यावरच बोलले. माझ्यावर एक छोटीशी कविता सुद्धा केली आणि ती म्हणूनही दाखवली. मला त्याचे शब्द आठवत नाहीत. पण अर्थ आठवतो आहे. परमेश्वर मला म्हणतोय, तुझे डोळे माझ्याकडे आहेत, पण माझं लक्ष तुझ्याकडे आहे. हा मोठा आशय अजूनही माझ्या लक्षात आहे. त्याचा गर्भितार्थ मी कधीच विसरणार नाही.

२००७ च्या एप्रिल मध्ये, रंगशारदा मिरज तिथे मुंबईच्या लोकांनी योगाचे शिबिर घेतले होते. केला मी जात होते. शेवटच्या दिवशी गप्पांमध्ये मी नृत्य शिकते, विशारदची परीक्षा देणार आहे, असं त्यांना सांगितल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. जुलैमध्ये त्यांचा मला फोन आला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईला एका कार्यक्रमात नाच करशील का असे विचारले. येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करतो. बाबांनी होकार दिला. खरंतर माझ्या मनात शंका होती. मुंबईच्या स्टेजवर माझे कसं होईल ही भिती होती, माझाच मला अंदाज नव्हता. पण काय सांग त्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. नाचाचे पूर्ण गाणे संपेपर्यंत टाळ्या थांबल्या नाहीत. माझा मेकअप, आत्मविश्वास यामुळे त्यांना मी अंध आहे, हे पटतच नव्हतं. कितीतरी बायकांनी नंतर माझा हात हातात घेऊन, गालावरून हात फिरवून, अगदी डोळ्यांना हात लावून खात्री करून घेतली. त्यावेळी मुंबई गाजवली. कितीतरी संस्थांमार्फत मला बक्षीस मिळाली.

आणखी एक अनुभव सांगते. सांगलीमध्ये अपंग सेवा केंद्रातर्फे माझा एक कार्यक्रम झाला. तो पाहायला वालचंद कॉलेजचे रिटायर्ड जोगळेकर सर आले होते. त्यावेळी ते 80 वर्षांचे असतील. माझा नाच झाल्यावर मुद्दाम मला भेटून ते म्हणाले,”छान नृत्य केलेस.अग, आम्हाला रस्त्यावरूनही नीट चालता येत नाही.”त्यांचं हे कौतुक ऐकून उत्साह वाढला आणि आपण काही कमी नाही हे जाणवले. नुसतं सहानुभूती म्हणून ते बोलत नव्हते, हे त्यांच्या शब्दातून कळले.

या माझ्या नृत्यासाठी माझ्या मैत्रिणी, शिक्षिका आणि माझी आई या सगळ्यांचे खूपच सहकार्य आणि मदत मिळत होती. माझी ड्रेपरी दागिने घालणे , मेकअप करणे यासाठी त्यांची मदत मोलाची होती. स्टेजवर जाऊन उभ करायलाही कोणी तरी मैत्रीण लागायची. नृत्याचे फोटो आले की त्याच मला वर्णन करून सांगायच्या. असे ते शाळा कॉलेजचे रम्य दिवस होते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये ☆

आत्ताचा श्वास उच्छवासात रुपांतर होताच भूतकाळात जमा होत जातो. कधीच न थांबणारं हे निरंतर चक्र. . !सृष्टीच्या उत्पत्तीपासून सतत दमछाक न होता एका लयीत ते फिरतं ठेवण्याची ही किमया अचंबित करणारीच. भूतकाळात जमा होणाऱ्या या आपल्या साऱ्या श्वासांचा चोख हिशोब ठेवण्यासाठीचं आवश्यक साॅफ्टवेअर या व्यवस्थेत In Builtच असतं. तिथं ना निष्काळजीपणा ना चूकभूल. आपल्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीचीच नव्हे तर त्या त्या क्षणी मनात उमटलेल्या पण कृतीत न उतरलेल्या बऱ्या-वाईट विचारांचीही त्याच क्षणी नेमकी अचूक नोंद होत असतेच. या नोंदी म्हणजेच आपली कर्मे. याचाच अर्थ आपला भूतकाळ आपणच घडवत किंवा बिघडवत असतो आणि त्याचीच कर्मानुसार कडू-गोड फळं भविष्यकाळात कर्मफलांच्या परिपक्व होण्याच्या क्षमतेनुसार आपल्यालाच मिळणार असतात. ती स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा कोणताच अधिकार आपल्याला नसतो. सत्कर्माच्या गोड फळांच्या आस्वादाचं सुख उपभोगणारे आपणच आणि कडू फळांचे भोग भोगणारेही आपणच. भविष्यकाळांत काय घडणाराय हे आपल्याला माहित नसतं असं म्हणतात. पण हे पूर्ण सत्य नव्हे. कारण आपल्या कर्मांच्या नियतीच्या नोंदवहीत होणाऱ्या नोंदी त्या त्या क्षणी आठवणींच्या रुपात आपल्या मनातही होत असतातच. त्यामुळे आपल्या बऱ्यावाईटाचे आपणच साक्षीदार असतो आणि म्हणून त्याची जबाबदारीही आपलीच. या गतकाळातल्या चांगल्या आठवणी आपला भविष्यकाळ सुखकर करीत असतात. नकोशा आठवणी सोईस्करपणे विसरायचा प्रयत्न करणारेही त्या आठवणीरुपी कर्माची कडू फळं टाळू शकत नाहीत.

याचाच अर्थ आपला भविष्यकाळ आपल्याला माहित नसला, तरी तो घडवणारे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो. आपला प्रत्येक श्वास  उच्छवासाबरोबरच भूतकाळात जमा होत असतो. तो सत्कर्माने सजलेला हवा कि कुकर्माने बाधित हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण हा निर्णय योग्य आणि सुखकर व्हायला हवा असेल तर आपणच क्षणोक्षणी निर्माण करीत असलेला आपला गतकाल हाच आपला भविष्यकाळातला श्वास असणार आहे हे विसरायचं नाही. . !!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

अलिबाग, रायगड जिल्ह्यातील, तालुक्याचे गाव! अलिबाग पासून सुमारे तीन मैलावर थळ हे लहानसे खेडं!आगर भागात ब्राम्ह्णाची पन्नास, शंभर घरे, थळ बाजाराकडे कोळी, आगरी, यांची वस्ती! आता आर. सी. एफ.  या रासायनिक खत प्रकल्पामुळे, थळ–वायशेत हे जोडनाव आता प्रसिद्ध झाले.

आशा या गावात, मोरुकाका सुंकले एक नामदार व्यक्ती होत्या.  शेतीवाडी, असलेले, गणपतीकार, आयुर्वेदिक वनस्पती, औषधींची जाण असणारे गावच्या जत्रेत, हलवाई होऊन दुकान मांडणारे, थोडीफार भिक्षुकी करणारे, असे, बहुआयामी व्यक्तीमत्व! गोरेपान, उंच, धोतर आणि वर लांब बाह्याचा पांढरा शर्ट, डोक्याला टक्कल, कानात बिगबाळी अशी त्यांची मूर्ती दिसे. ओटीवर त्यांचेकडे अनेकांची दिवसभर ये जा असे.

त्यावेळी तो चैत्र महिना होता. घरात, आगोटीची (पावसाळ्या पूर्वीची) कामे चालू होती. त्यांची लाडकी लेक सुभद्रा, सुभाताई, पहिलटकरीण, बाळंतपणाला आली होती.

आगारात असलेली, त्यांची शेतीवाडी संपन्नतेत होती. अलीकडे देशाला स्वातंत्र मिळाल्यावर, काही झळाही त्या घराला बसल्या होत्या. त्यात दहा बारा मुले, गाई–गुरे, शेती-वाडी करत, कालक्रमणा चालु होती.

सुभाताई, त्यांची लेक,  गोरीपान, धारदार नाक, लांब केस, बांधेसूद, देखणी होती. बायला काही कमी पडू द्यायचे नाही असे त्या प्रेमळ पित्याला वाटे. आता तिचे दिवस भरत आले होते. त्या दिवशी दुपारपासून पोह्याचे पापड करायला शेजारपाजारच्या बायका आल्या होत्या. उखळात डांगर कुटायला, कांडपीणींची लगबग चालु होती. आणखीन काहीजणी भात कांडत होत्या.

सुभाताई पापड लाटायला बसली होती. हळूहळू, संध्याकाळ होऊ लागल्याने, कामे आवरती घ्यायला सुरवात झाली. इतक्यात, सुभाताई आपल्या पोटाचा भार सावरत उठली. हातात दोर बांधलेला पोहरा आणि काखेत कळशी घेऊन, “मी पलीकडल्या, वाडीतले गोड ढोऱ्याचे पाणी घेऊन येते”!, असे म्हणत,  ती चालायला लागली. सगळ्या म्हणाल्या, “अग, सुभाताई, तू पोटुशी कशाला जातेस इतक्या तिन्हीसांजा. ”पण ती ते ऐकायला ती थांबलीच नाही. आणि ती लांब अर्धाकीलोमीटर असलेल्या वाडीत गेली सुध्दा. तेथे पोहचेपर्यंत तशा तिन्हीसांजेच्या सावल्या पडू लागल्याच होत्या. ताईंने पोहरा विहिरीत सोडला त्या शांत वातावरणात, बुडूबुडू आवाज येत पोहरा आडवा होऊन पाणी भरून आत गेला. मग दोर ओढत ताईने कळशी भरून घेतली. पोहरा व दोरगुंडाळून घेतले. कळशी

घ्यायला वाकली, तर गर्भभाराने जड झालेला देह सावरता सावरता, तिचा पाय घसरला. ती त्या ढोऱ्यात घरंगळत गेली तिलाच कळले नाही. दोन गटांगळया खाल्ल्यावर तिच्या लक्षात आलं पोटाकडे हाताने पाणी ओढले की आपण तरंगू शकू. तिने प्रयत्न केला आणि ती काठाला आली. तिने काठाला वरून आलेल्या वेलींचा ताणा घट्ट पकडला. ती वर येण्याचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात, वाळलेल्या झाडाच्या पाल्याचा चुरूचुरू आवाज ऐकू आला. कोणीतरी येत आहे ह्याची चाहूल लागली. तिने हाकारले, “कोण आहे? इकडे या”! मी या विहिरीत पडले आहे!” आवाज ऐकून तो गुरे चरायला घेऊन गेलेला कातकऱ्याचा मुलगा विहिरीत डोकावला. त्याने तिला हाताला धरुन वर काढले. विहिरी बाहेर पडलेली सुभा, जराही घाबरली नाही, तिने धीर एकवटून आपली कळशी कंबरेवर घेतली. पोहरा उचलला आणी निघाली घराच्या दिशेने! तो मुलगा आवाक होत पहात राहिला, व तिच्या मागे चालू लागला.

घर जवळ आलं, पायरीवरून अलगद् चढत, ताईने कळशी उतरवली. इतक्यात घरातले सर्व बाहेर पडवीत आले. आगो, ताई, ”हे काय? एवढी कशी भिजलीस!”

कातकऱ्याच्या मुलाने सर्व हकिकत सांगितली. सर्वजण स्तब्द होऊन पाहात राहिले. आण्णा, म्हणाले, ”अग, बायो, काही झाले असते तर केवढा आपेश आला असता आमच्यावर!”, पण, देवाचीच कृपा दोन जीव वाचले.”

ह्या घटनेनंतर काही प्रश्न अनुत्तरीत राहिले. ताईला कोणीच कसे अडवले नाही. की  कामाच्या धांदलीत तितकेसे लक्षात आले नाही.

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

एक लेख वाचून वाचकाने फोन केला, “लेख आवडला पण ” गढवापुढे गायली गीता… असं मुलगा आईला म्हणतो ते खटकले.”

“आई मुलात मोकळेपणा असल्यावर म्हणू शकतो. त्याने म्हण वापरली. आईला थोडेच गाढव म्हटला?”

लिहिताना असा विचार मनात येत नाही, लोक कसा विचार करतील वगैरे… कल्पनेतली पात्रे घेऊन लेखन करताना कधी कधी एकतर्फी पना येतो. मग वाचक असे कान धरतात. अशा वाचकांचा खूप आदर वाटतो. प्रत्येकाने जाब विचारायलाच हवा. प्रश्न पडायलाच हवेत.

आई मुलाचे नाते वात्सल्यचे असते. एकमेकांचा आदर प्रेम असते म्हणून मुलाने काही सांगू नये का? मुलगा का नाही आईला नव्या विचारांची शिकवण देऊ शकत?

आपल्या शेतकरी, कुनब्यांच्या घरी शिक्षणाची गंगा आता कुठे वीसतीस वर्षांत आलीय. शिकलेली मुलं सांगतात आईला  वैज्ञानिक गोष्टी.  अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, सण, व्रते यांच्यातील फोलपणा त्यांना समजलेला असतो. अशिक्षित, अर्धशिक्षित आईला तो सांगू शकतो. नव्हे सांगतातच!!

शिकले तरी शिक्षणात देव, धर्म, अंधश्रद्धा याबद्दल कुठे काय शिकवतात. मुळात विचार करायला, प्रश्न उपस्थित करायला शिकवत नाहीत. प्रश्न विचारणारा उद्धट ठरतो. आज्ञा पालन करणे हाच सद्गुण ठरतो. नवे काही शोधून काढणाराला विरोध सहन करावा लागतो.

बाईच्या बुद्धीवर सण, देव, धर्म, व्रते यांची एवढी झापडे बांधली आहेत की, या जगात वेगळे काही असू शकते यावरच ती विश्वास ठेवत नाही. ज्या देवीची ती पूजा करते त्या शक्तिशाली देवीचा आपण अंश आहोत हे वैज्ञानिक सत्य तिला कुणी सांगितले नसते, शिकवलेले नसते. पूजा, कर्मकांडे करत राहणे म्हणजेच खरी भारतीय नारी असणे असं शिकलेल्या बाईला ही वाटते.

साधं कुंकवाचा करंडा सांडला तरी तिला सतत अशुभाची चुटपुट काही दिवस लागून राहते. हातात बांगडी नसणे तिला अशुभ वाटते. केस कपण्याबद्दल तर इतक्या टोकाच्या अंधश्रद्धा आहेत, याची शहरी लोक कल्पनाही करू शकणार नाहीत. आताच्या काळात ही.

‘केस कापल्याने तिच्या नवऱ्याचे आयुष्य कमी होते.’

केसांचा कितीही त्रास झाला, जटा आल्या तरी बाई केसाला कात्री लावत नाही.

कुलाचार कुलधर्म या नावाखाली तर बाई वर्षभर पिळवटून जाते. पूर्वीसारखे घर भरलेले नसते. एक किंवा दोन मुले. ती ही शहरात. मग एकट्याने सगळे रेटायचे. भीती पोटी. आपली पोरं असतील तिथे सुखरूप ठेव म्हणून देवापुढे भाकणुक करायची. सणाला नाट लावायचा नाही. अशावेळी आईला होणारा त्रास पाहून कुठलाही शहाणा समंजस मुलगा सात्विक संतापाने , पोटतिडकीने सागणारच की. मग सांगताना आईनेच शिकवलेल्या म्हणी ओठावर येणारच की….

हेच तर जिव्हाळ्याचे नाते असते. आपल्या लोकांना शहाणे करून सोडण्याची कळकळ असते. आता हे बोलताना वडील असते तर भाषा थोडी वेगळी असली. पण आई ही जन्मताच मैत्रीण असते. बाळ तिच्याशी सगळे मोकळेपणाने बोलते. सांगते. मनात काही ठेवत नाही. मैत्री अशीच असते ना…

आईसारखी मैत्रीण कुठे असणार? आईला तरी मुलासारखा विश्वासाचं मित्र कुठे मिळणार?

आईने शिकवलेल्या पायावरच असे प्रश्न निर्माण होतात. गणपतीला आणायची पत्री आता कुठे मिळते का?  साध्या दुर्वा मिळणे मुश्कील झाले आहे. पेपरात येते या पत्री औषधी असतात म्हणून वाहा. पण त्या बाईची किती त्रेधतिरपीट उडत असेल. कारण तिलाच पुण्य मिळवायचं असते पोरा बाळांसाठी….

असे महिन्यातून एक दोन तरी सन व्रते असतात. हे करा म्हणजे ते होईल. असे करा म्हणजे तसे होईल…

एका अमेरिकेतल्या माणसाचा व्हिडिओ आला. सगळे सण कसे आम्ही मंत्र पाठणात करतो. वगैरे…

त्या काहण्यात काय असते, शंकर पार्वतीला सांगतो, ” हे व्रत खूप श्रेष्ठ आहे. जसे चार वरणात ब्राम्हण श्रेष्ठ तसे सगळ्या व्रतात हे व्रत श्रेष्ठ आहे. हे व्रत करणाराला अखंड सौभाग्य प्राप्त होते. पण जे करत नाहीत त्याला वैधव्य, दारिद्य्र येते.”

हे ऐकूनच डोके सटकले. अज्ञानी असताना हे सगळे मी करत होते पण अताही अशा कहाण्या ऐकूण व्रते करायची. तेही अमेरिकेत… व्वा व्वा… तिथे सौख्य मिळवायचे. आम्ही भारतीय परंपरा सांभाळतो याचा झेंडा मिरवायचा.

कशाने अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि कशाने दारिद्र्य येते हे यश प्राप्तीची पुस्तके वाचून कळू येईल. पण परंपरा, संस्कृती याची नशाच भारतीयांना अतोनात आहे. वैज्ञानिक साधने वापरून परंपरा सांभाळतात. पण अशा परंपरा सांभाळण्यासाठी आपण काही साधने निर्माण करावी असं काही भारतीयांना वाटत नाही. पत्री औषधी आहेत ना तर का नाही करत  डोंगर, टेकड्यांवर याची लागवड???

सुबाभूळ, गुलमोहर, सप्तपर्णी, असे झटपट वाढणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करायचे आणि चिमण्या सारख्या पाखरांना दाहीदिशा वनवास आणायचा. संस्कृती, परंपरेचा डांगोरा पिटत रह्याचे.

थोडे विषयांतर झाले. मुलाचे आणि आईचे नाते हा विषय होता.

जात, धरमदेव, परंपरा या मानवाने निर्माण केल्या आहेत. त्याची भीती बाळगू नये असं मुलगा आईला सांगू शकतो. पण आईला लगेच पटत नाही. तिची मानसिकता (त्यालाच म्हणतात निष्ठा) एवढी लवचिक नसते. वाद घालतो मुलगा. आधुनिक विचारांच्या मुलांची घुसमट होते. सण व्रते हे कसे थोतांड आहे. हे सांगताना नवीन पिढीची दमछाक होते. मग मुलगा म्हणतो, ” गढवापुढें वाचली गीता….”

मी माझ्या  लेकसुनेला टिकली लावण्याबाबत सक्ती करत नाही. तिने मंगल सूत्र घातले की नाही याची चौकशी करत नाही. शिकल्या सवरल्या पोरींना कशाला अशी बंधने घालायची. कितीही शिकले , नोकरी केली, बिझनेस केला तरी त्यांना चूल मूल सुटत नाही. आणखी ही जोखडं त्यांच्या खांद्यावर का द्यावीत?

मेल्यावर आमचे म्हाळ वगैरे घालू नयेत असे मी  मुलाला स्पष्ट सांगणार आहे. तेवढे मैत्रीचे नाते आहे आमच्यात. अशा गोष्टींवर वाद घालतो आम्ही.

 

© सौ. सावित्री जगदाळे

१८/९/१८

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी

☆ विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी 

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-Gaints Causeway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. “चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर.” ती हातात लॅच की घेऊन ऊभी.

तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे….

“आई, २० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा.”

“बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे.” असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. “आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं.”

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यवानाची सावित्री ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ सत्यवानाची सावित्री  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जवळपास गेली चाळीस वर्षे इंदू माझ्या घरी काम करते ती माझ्याकडे आली तेव्हा आम्हा दोघींची मुले पहिलीत होती आज आम्हा दोघींच्या घरी गोकुळ आहे.

इतक्या वर्षांचा ऋणानुबंध आमचा! आता ती आमच्या कुटुंबातीलच एक झाली आहे. स्वतःचं एवढं मोठं कुटुंब असूनही ती माझ्या घरात रमलेली असते. आणि माझ्यात गुंतलेली!

तिचा सगळा जीवनप्रवास तसा खडतरच! अशिक्षिततेची झालर असलेलं जिणं तिच!! ठेंगणी ठुसकी अशी इंदू कष्ट करून नीटनेटका संसार करणारी अशी.. ‘तुमच्या वानी तुमच्या वानी’असं म्हणून जमेल तेवढं माझं अनुकरण करणारी . अशी ही इंदू……

माझ्याच घरात तिने स्वयंपाकाचे धडे घेतले. जेवढ्या म्हणून माझ्या गोष्टी तिने डोळ्याने पाहिल्या हाताने शिकल्या त्याचं तिला अप्रूप आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीचे भान ती ठेवते पण तिच्या नशीबाची गाडी मी पळवू शकत नाही हे तिला चांगलेच ठाऊक आहे.

तिचा नवरा पहिल्यापासूनच व्यसनी…रोजची भांडण रोज वाद, कधीकधी होणारा नशेचा अतिरेक हे मी इतकी वर्ष पाहात आले आहे जीवनाचा समतोल राखत ती बिचारी जन्मभर राबते आहे.

सततच्या व्यसनासाठीच्या पैशाची मागणी आणि पुरवले नाहीत की होणारी मारहाण यांनी कातावून गेलेली इंदू माझ्याकडे आल्यावर सगळं दुःख विसरते आताशा तर रोजचेच रडगाणे गायचे ही तिने सोडून दिलेआहे.

कधीतरी तिचा चेहरा पडलेला दिसला की मी खोदून तिला विचारत असते पण दुःखाचं प्रदर्शन मांडायचं आणि नवऱ्याला नावं ठेवायची हे तिच्या स्वभावात नाही पण अती झाले की कधीतरी ती माझ्यापुढे मोकळी होते.

करोनाचे अस्मानी संकट आले तशी तिच्या जीवनाची घडीच विस्कटली यंत्रमाग बंद पडले. दोन्ही मुलांचं काम गेलं. पैशाची चणचण भासू लागली. माझ्याकडून होता होईल तेवढी मदत करत होतेपण ती खिन्न आहे.

त्यात आणखी तिच्या नवऱ्याची रोजची दारूसाठी पैशाची मागणी

चार दिवस सलग ती आलीच नाही तिच्या मुलाचाही फोन लागेना.एखादा दिवस वाट बघावी आणि मग पाठवावं कुणालातरी तिच्याकडे असा मी विचार करत होते तोवरच दारात उभी !मान खाली घालून काहीशी अस्वस्थच दिसली .घरात आली आणि मटकन खाली बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ती दुसऱ्याच कारणासाठी….कुणा मुलाला कोवीड झाला की काय असे वाटले. बऱ्याच वेळानंतर बोलती झाली…

“मालक गेलं वहिनी “…..

“अगोबाई कशानं गं? मला एकदम धक्का बसला.”

“वहिनी जनमभर मी त्याला दारूला कधीबी कमी केलं न्हाई.त्यांच्या व्यसनासाठनं राबलो.तुम्हाला ठाव आहे. घरात दुध नसलं तर चालल पर त्याच्यासाठनं मी कायम पैका दिला. परवा दिवशी त्यांच्या हातात पैसे हुतं पर दारू मिळना म्हनूनशान लै चिडचिड चिडचिड करत हुतं आणि कुठं जाऊन ते हाताला लावत्यात ते काय म्हणतात शनि टायझर पिऊन आलं बघा आनी दवाखान्याला न्यूस तो पतुर डोळ्या देखता गेलं.” असं म्हणून तिने अक्षरशः हंबरडा फोडला.

“म्या त्यांची दारू कवा बंद केली न्हाई. मी त्यांच्या दारू साठनच राबलो का न्हाई वहिनी? मला ठाव असतं दारू कुठं मिळतीया ते तर कुठून बी दारू आनून पाजली असती. त्यांच्यासाठनं काय बी केलं असतं म्या”….. आणि पदर डोळ्याला लावून ती हमसाहमशी रडू लागली

मी आ वासून पाहत बसले त्या सत्यवानाच्या सावीत्रीकडे !!……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

Please share your Post !

Shares
image_print