मराठी साहित्य – विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

सुख कोणी पाहिले आहे का?

सुख म्हणजे नक्की काय, कोठे मिळते सुख?

सुखाच्या कल्पना आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.

मला बरेचदा हा प्रश्न पडतो की सुख म्हणजे नक्की काय? कोठे मिळते ? शांत पणे विचार केल्यावर लक्षात आले की सुख तर आपल्याला प्रतेक टप्प्यावर मिळते ते आपण कस स्वीकारतो हे आपल्यावर आहे.

प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे स्वरूप बदलत जाते.काहीना खूप पैसा, अफाट संपती नोकर चाकर, भरपूर दागदागिने ऐशोआराम म्हणजे सुख. तर काही लोकांना आपल्या मनासारखे वागवून घेणे, आपली सत्ता गाजवणे, मी म्हणीन ते आणि तसच ह्यात सुख मिळते.

प्रतेक जण आपापल्या वया अनुसार सुख शोधत असतात.

तान्हं मूल आईच्या कुशीत. तर शाळकरी मुलं आपल्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात.

काहींना प्रत्येक  गोष्ट जींकण्याची नशा असते त्यांना त्यातच सुख मिळते. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. माझ्या मते,

श्रम केल्या नंतर गादी वर पडल्या पडल्या शांत झोप लागणे म्हणजे सुख.

गरम गरम वरण भात खाऊन दिलेली तृप्तीची ढेकर म्हणजे सुख.

रणरणत्या उन्हात अचानक मिळालेली झाडाची सावली म्हणजे सुख.

एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरचे समाधान म्हणजे सुख.

वेदनांचा दाह कमी होण्या साठी कोणी मायेने हात फिरवणे म्हणजे सुख.

आपल्या जोडीदाराने मी आहे, हो पुढे हे ऐकणे म्हणजे सुख.

लेकीने आई तू दमलीस, अस म्हणत गरम पोळी करून वाढणे म्हणजे सुख.

आजी आजोबांनी नातवंडांवर केलेली माया म्हणजे सुख.

बापरे किती गोष्टीतून आपल्याला सुख मिळत असते नाही का??

मग आपण सुख का शोधत फिरतो असाच आलेला मनात एक प्रश्न

 

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

10.08 20202

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर

☆ मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर ☆ 

आज आजी उदास आहेत.•••• हे आजोबांच्या लक्षात आल .••काय झालं ग??? आजोबांनी विचारल .•• आजी म्हणाल्या•• अहो, आता थकवा येतो .••आधी सारखं राहिलं नाही.•• आता गडबड ,तडतड सहन होत नाही.•• कुठे जायचं  म्हंटल तर जास्त चालवत नाही. •••अॉटो मधे चढताना त्रास होतो .••• कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते तर कधी जास्त असत.कशाकरीता हे एवढं आयुष्य देवाने दिल आहे. ••माहित नाही .••

आजोबा म्हणाले,••• देवाचा हिशोब मला माहित नाही.••आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. ••त्याच्या planning मधे  एक क्षणाचाही बदल करणे. आपल्या हातात नाही.•• जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे?? त्याचा विचार करावा.•• अग ,वयानुसार हे सर्व होणारच.••  आधीचे दिवस आठव ना•• किती काम करायची .पूर्ण घर तू खूप छान सांभाळले••. मला कशाची काळजी नव्हतीच कधी .•••  आता  वयामाना  प्रमाणे हे सर्व होणारच  पण त्यातुनच मार्ग काढायचा असतो .•••आलेला दिवस आनंदात काढणे ••आपल्या हातात आहे••. जिवनाच्या प्रत्त्येक फेज मधे थोडे शारिरीक बदल होतातच .•••थोडे आपल्या ला करायचे असतात. ••आपली ‘ lifestyle’reorganize करायची ,••म्हणजे ,आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते •••.कळल का ?

आजोबा पूढे म्हणाले •••• चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण. छान ती नारंगी साडी नीस. •• बाहेरच जेवू ••  .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. ••व  जवळच असलेल्या  बसस्टोप वर जाऊन बसले.•• दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . ••आजोबा आजी ना म्हणाले•• अगं, पाय दुखत असतील  तर ,मांडी घालून बस छान ••. . नंतर ,’गणेश भेळ ‘खाऊनच घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing आज होते दोघांचे .••• आजींची उदासी मात्र कुठे पळाली?? हे त्यांना कळलेच नाही .•• अगदी ‘refresh’ झाल्या . ••आज आजोबांनी आजीसाहेब  साठी  on line  ‘Mobile  stand ‘ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .•••

आज कुलकर्णी आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगुन  टाकलं ,की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही .••काही तरी चमचमीत खायला  घेऊन या .••• आजोबांनी आनंदाने समोसे ,ढोकळा , खरवस   दोन पूरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली . ••.ते बघून आजी म्हणाल्याच अहो, एवढ आणलत  ?? अग आज आणि उद्या मिळुन संपेल की .•••  आज कुलकर्णी आजीं आजोबांनी पार्टी छान  झाली. ••••

कोणी तरी खरच  खूप छान म्हंटल आहे •••

“खुशियां बहुत सस्ती है इस दुनिया में ,

हम ही ढुंढतें फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

देशपांडे आजोबा बऱ्याच वेळा पासुन एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ••ते पाहून अजय म्हणाला , द्या आजोबा मी उघडून देतो. •••तेंव्हा आजोबा म्हणाले••• अरे ,नको मी उघडतो. ••आता आम्हाला प्रत्त्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . ••पण काही हरकत नाही. जो पर्यंत करू शकतो तोपर्यंत काम करायचे  .हे मी ठरवलं आहे .•••  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे   ,washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशी बरीच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला पण मदत होते. व माझा वेळ जातो . Something new and different .I am enjoying it. And I feel good .

तो तुमचा actor आहे ना, अक्षय  कुमार त्याने एका advertisement मधे म्हंटले आहे

“बस ,तुम कभी  रुकना मत”

अक्षय कुमार ने  म्हंटलेले हे वाक्य  .मला  खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य.••  मोजक्या शब्दात ••.

पण किती अर्थपूर्ण .••जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .•••एक छोटासा उपदेश जिवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो..••  विचारांत परिवर्तन  आणत. ••••

तो म्हणतो •••••• कधी थांबू नका,•• चालत रहा. •••• म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’

वाहत पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते .’ धारा ‘ म्हणजे पूढे पूढे जाणारी, वाहणारी .•••• तेच  जमलेल  पाणी म्हणजे अनेक रोगांचा ऊदगम. ••म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.•••  जमलेल्या पाण्यात मच्छर कीडे पडतात•• .पाण्याला  वास येतो डेंग्यू पसरतो.•••

आयुष्याचे पण तसेच आहे. •••शक्य तेवढ active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते •••.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल  , ते करत रहाणे गरजेचे आहे. •••••

” चलती का नाम ही तो  जिंदगी है “।

आपल्या पीढीने तरूणपणी  एकमेकांचे हात हातात  घेतले नाही  /नसतील  .•••पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजी ने ,विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे . ••••

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे•••!

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है  •••!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”•••!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है ।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में ,

इसलिये सफर जारी  है ।

“प्रत्त्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा .”

“बस , तुम कभी  रुकना मत “।

 

(सहजच मनातल शब्दांत )

© सुश्री संध्या बेडेकर

भ्रमणध्वनी:- 7507340231

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर☆ 

\गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात “मौजमजेसाठी युवाईकडून ‛वाट्टेल ते’ …”ही बातमी आली होती.  काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे असेही त्यात  म्हटले होते. परंतु या बातमीतच चौकटीमध्ये मांडलेला विचार मला जास्त महत्वाचा वाटला . “अशी कृत्ये करणाऱ्या मुलांच्या  पालकांवर आधी गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा या मुलांना अल्पवयीन असूनही योग्य ती शिक्षा झाली झाली पाहिजे.”

मुळात मुलांना योग्य वयात आल्याशिवाय हातात गाडी देणे ही चूक आहे हेच  पालकांना पटत नाही. आज अनेकदा बऱ्याच पालकांना आपली मुले “लहान वयात उत्तम गाडी चालवतात” ही आत्मप्रौढी मिरवण्यात धन्यता वाटते. वास्तविक ज्यावेळी 18 वर्षे ही स्वयंचलित गाडी चालवण्याचे वय ठरवले आहे त्यामागे काहीतरी शास्त्रीय  अभ्यास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातात पैसे देऊन संपूर्ण घरखर्च चालवायची जबाबदारी दिली तर ते योग्य होईल का ?  तीच गोष्ट गाडी चालवण्याच्या बाबतीत आहे. कदाचित या मुलांची शारीरिक क्षमता परिपूर्ण असेल , पण मानसिक क्षमतेचे काय? सिनेमात बघून ‛धूम’ स्टाईल गाडी चालवणे इतकाच मर्यादित अर्थ वाहन चालवण्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने असतो. त्याच्या परिणामांची पर्वा या वयात त्यांना नसते.

अगदी दोन दिवसांपूर्वीच माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग घडला. रहदारीच्या रस्त्यावरुन एक स्कुटर सरळ जात होती. त्याच वेळी एका 15 ते 16 वर्षाच्या मुलाने एका दुकानासमोर पार्क केलेली आपली स्कुटर काढली. त्याच्या कानाला हेडफोन होते व तो गाणी ऐकत होता. त्या नादात समोरुन येणारी गाडी त्याला दिसली नाही व दोन्ही गाड्या एकमेकींवर आपटल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांचा वेग जास्त नसल्याने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पण असे काही घडले असते तर ? हा त्या वयातील मानसिकतेचा, अपरिपक्वतेचा परिणाम नाही काय?

एकंदरीतच पालक म्हणून सर्वच गोष्टींमध्ये आपले मूल प्रवीण असावे अशी आपली धारणा झाली आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपोटी आपण शिक्षण, क्रीडा, कला किंबहुना सर्वच क्षेत्रात आपल्या मुलांना घुसमटून टाकत आहोत का? किंवा अकाली त्यांच्या हातात स्वयंचलित वाहने, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप यासारखी उपकरणे देत आहोत का? हल्ली एखादे पाच- सहा महिन्यांचे मूल सुद्धा मोबाईल हातात घेण्यासाठी हट्ट करते.त्याने नीट खावे म्हणून मोबाईल दाखवला जातो. त्यामुळे काहीही भरवताना तो मोबाईलशिवाय तोंडात घास घेत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. वास्तविक सुरवातीला आपणच ही सवय लावल्यामुळे हे होत असते. त्यामुळे जे साध्य व्हावे असे आपल्याला वाटते त्याऐवजी  बूमरँगसारखी ती आपल्यावरच उलटत आहेत. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ ही उपकरणे मुलांनी वापरु नये असा नसून ती क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्यावर जर ती त्यांना दिली तर  ते हाताळण्याची प्रगल्भता त्यांच्यात येईल.

अर्थात काहीजण असेही समर्थन करतील की आमची मुले लहानपणापासून या गोष्टी हाताळत आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण नियमाला अपवाद असतोच. झी टीव्हीच्या संगीत कार्यक्रमात एखादा आठ वर्षाचा चिमुरडा इतके अप्रतिम गाऊन जातो की दिग्गज कलाकारसुद्धा तोंडात बोटे घालतात. पण म्हणून सर्वच आठ वर्षांची मुले इतके अप्रतिम गाऊ शकतील असे नाही. कारण ती क्षमताच त्यांच्यात नाही. एवढेच सत्य जरी लक्षात घेतले तरी आज ज्या अनेक समस्यांना पालक म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत – 2 – राग~काफी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

परिचयः

गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य.

शिक्षणः एम्.ए. एलफिन्स्टन काॅलेज, मुंबई युनिव्हर्सिटी.

संगीत विशारद~ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

गद्य/पद्य लेखनाची आवड!

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  2 – राग~काफी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील लेखांत यमन रागाविषयी लिहिल्यानंतर आज काफी रागाचा परिचय करावा असे मनांत आहे.

कल्पद्रुमांकूर या पुस्तकांत चार ओळीत काफी रागाचे वर्णन आहे.

“काफी रागो भुवनविदितः कोमलाभ्यां गनिभ्यां।

मन्यैस्तीव्रैः परममधुरः पंचमो वादीरूपः।।

संवादी स्यात् स इह कतिचिद्वादिनं गं वदंति।

सांद्रस्निग्धं सरसितिर्भिर्गीयतेsसौ निशायाम।।

अर्थात सर्वांना माहीत असलेला हा राग अतिशय मधूर आहे. गंधार व निषाद कोमल आहेत. वादी पंचम,संवादी षड् गायन समय मध्यरात्र जाति संपूर्ण

आरोहः सा रे ग(कोमल)म प ध नि(कोमल) सां

अवरोहः सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा

सर्व रागांना सामावून घेणार्‍या विशाल र्‍hridayii

थाटांतील हा जनक राग! ” अतहि सुहावन लागत निसदिन” असे या रागिणीचे पारंपारिक लक्षणगीतांतून वर्णन केले आहे.एक अत्यंत श्रुतिमधूर रागिणी म्हणून ती रसिकांच्या पसंतीस उतरली आहे कोमल गंधार व निषाद आणि शेष स्वर शुद्ध असलेली ही रागिणी थाटांतील स्वरांचे पालन करते,परंतु कंठाच्या सोयीसाठी याच्या उत्तरार्धात म प ध नि सां असा कोमल निषाद लावणे कठीण जाते म्हणून शुद्ध निषाद लावण्याची मुभा आहे, तसेच पुर्वार्धात क्वचित शुद्ध गंधार घेण्यास परवानगी आहे.मधुनच असा प्रयोग कलात्मकही वाटतो.मात्र वारंवार हा प्रयोग अमान्य आहे,त्यामुळे रागाच्या शुद्धतेला बाधा येईल व रसहानीही होईल.

रागाचे स्वरूप सा सा रे रे ग ग(कोमल) म म प——, रेप मप धप, धनि(कोमल) धप रेप मप मग(कोमल) रेसा अशा स्वर समूहाने स्पष्ट होते.

ख्याल गायनासाठी हा राग प्रचलित नाही.ठुमरी,दादरा,टप्पा,होरी वगैरे उपशास्रीय गायन प्रकारांत हा प्रामुख्याने वावरतांना दिसतो.याचे कारण ह्या रागाचे अंग श्रृंगार रसपरिपोषक आहे. मध्य लयीत बांधलेल्या पारंपारिक बंदिशी पाहिल्या असता असे दिसून येते की त्या राधा कृष्ण, रास लीला, कृष्णाचे गोपींना छेडणे याचेच वर्णन करणार्‍या आहेत.जसे “काहे छेडो मोहे हो शाम” किंवा “जिन डारो रंग मानो गिरिधारी मोरी बात”, “छांडो छांडो छैला मोरी बैंया दुखत मोरी नरम कल्हाई वगैरे.

ठुमरी दादरा प्रकारातही “बतिया काहे को बनाई नटखट कुवर कन्हाई” “मोहे मत मारो शाम भरके रंग तुम पिचकारी” अशीच काव्यरचना असते.

काफी रागावर आधारीत “एक लडकीको देखा तो ऐसा लगा”~1942 लव्ह स्टोरी

“हर घडी बदल रही है धूप जिन्दगी”~कल हो ना हो ही चित्रपटांतील गाणी सर्व श्रुत आहेत.

याठिकाणी असे सांगावेसे वाटते की कलावंताला या शास्राचे नुसते संपूर्ण ज्ञान असणे पुरेसे नाही.कलाविष्कार करतांना योग्य ती रसोत्पत्ती झाली तरच रसिकांचे मन जिंकतां येते.नाट्यशास्रानुसार रागाच्या अभिव्यक्तीचा विचार होणे अत्यावश्यक आहे. नाट्यांतील प्रसंग दृष्य स्वरूपाचे असतात.त्याचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी नेपथ्य, पात्र,वाच्य या गोष्टींची योजना केली असते. साहित्यांत दृष्याचे वर्णन असते. स्वरभाषेत या तत्वांची फक्त जाणीव असते.स्वरभाषेतून श्रोते,रसिकजन आंतरिकरित्या योग्य तो परिणाम अनुभवत असतात. कलाकाराने रागाचे सादरीकरण करतांना त्या त्या रागांच्या भावाला अपेक्षित अनुकूल सांगितिक वातावरण निर्मिती केली नाही तर मैफीलीत रंग भरणार नाही. जो कलावंत रागभावाच्या पूर्ण स्वरूपाची जाण श्रोत्यांच्या मनांत संक्रमित करतो तोच खरा यशस्वी कलाकार!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

आरसा ज्याला दर्पण ‘असेही म्हणतात, तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘

सांग दर्पणा दिसे मी कशी? असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो. कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो. सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी  या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो . तो आरसा म्हणजे मनाचा आरसा. ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी,दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण, रागीट, भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो. म्हणूनच म्हंटले जाते.

चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं

चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं।

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो. पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो. म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच. याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही.  उभा,आडवा,चौकोनी, गोल,षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात. मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवा वस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत. चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो. चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

लहानपणी छोटेमोठे कित्येक गुन्हे केले आणि ते लपवण्यासाठी आळी मिळी गुप चिळी हे शस्त्र बिनबोभाट वापरले.घड्याळ फुटलं,बरणीतला खाऊ संपवला,कधी शाळा सुटल्यावर परस्पर मैत्रीणीकडे खेळायला गेलो,कधी वहीत लाल रंगातला शेरा मिळाला, कधी वर्गाच्या बाहेर ऊभं राहण्याची शिक्षाही भोगावी लागली…पण सगळे अपराध कबुल करायलाच हवेत कां?  काही अवश्यकता नाही .”आळी मिळी गुपचिळी..” हेच मस्त. मला वाटते ,अभिनयकला ही जन्मजात देणगी प्रत्येकालाच मिळालेली असते. म्हणूनच “मला काय माहीत?” “मी काय केले.?.”असे निरागस भाव चेहर्‍यावर वागवून आळी मिळी गुप चिळी यशस्वी करता येते… पण एक प्रसंग मात्र खूप कठीण होता.

माझे आजोबा म्हणजे अतिशय शिस्तीचे.नीटनेटके.  स्वच्छता ,टापटीप वाखाणण्यासारखी असली तरी अत्यंत त्रासदायक. वस्तुंच्या जागा ठरलेल्या. एक पेन्सील जरी इकडची तिकडे झाली तरी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटायचे नाही. मग त्यांच्या कोर्टात आरोपी म्हणून आम्हाला ऊभं रहावं लागायचं… किरकोळ शिवणकामासाठी लागणारी आजोबांची एक सुई होती.सांगितलं तर खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल! ती एकच सुई ते ३३वर्ष वापरत होते..वापरुन झाल्यावर लहानशा दोर्‍यासकट ते सुताच्या गुंड्यात टोचून ठेवत. त्याचीही विशीष्ट पद्धत होती आणि विशीष्ट जागाही…

एक दिवस मला काय बुद्धी झाली कोण जाणे! आजोबा घरात नसताना मी रूमाल शिवण्यासाठी ती सुई घेतली.

माझा मावसभाऊ रंजन होताच तिथे. त्याने मला फटकारलेही. भांडणच ऊकरुन काढलं आणि त्याच्याशी वाद घालता घालता ती सुई तुटुनच गेली…बाप रे!!

आता काय होणार? खालच्या मजल्यावर माझी मैत्रीण रहायची .तिच्याकडे धावत गेले.तिला सर्व सांगितले.

ती म्हणाली ,”हात्तीच्या! इतकी काय घाबरतेस..ही घे सुई.

आणि ठेवून दे तिथे..सुयांसारख्या सुया…काही कळणार नाही आजोबांना..आळी मिळी गुप चिळी…

रंजनने जमेल तशी ती गुंड्यात खोचून जागच्या जागी ठेवलीही..तेव्हढे बंधुप्रेम दाखवले त्याने….

ही आळी मिळी गुप चिळी मात्र आजोबांच्या मृत्युपर्यंत टिकून राहिली.मैत्रीणीच्या सुईने ३३वर्षांची परंपरा सांभाळली…

पण आज आठवण झाली तरी वाईट वाटतं. अपराधीही वाटतं. महत्व वस्तुचं नसतं.शिकवणीचं असतं.

संस्काराचं असतं. सांभाळणं, जपणं, बारीकसारीक गोष्टींबाबतही निष्काळजी नसणं,जबाबदारी जाणणं, हा मौल्यवान संस्कार आजोबांच्या वागणुकीतून ,अगदी सहज रुजला होता….

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१६/१०/२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये☆

‘c/o जानकीबाई बापट, दुसरा मजला, नूर बिल्डिंग रेल्वे स्टेशनसमोर, दादर(पश्चिम) मुंबई’ हा माझ्या आयुष्यातल्या कधीकाळच्या अडीच एक वर्षांसाठीचा पत्रव्यवहाराचा पत्ता ! जुनी महत्वाची कागदपत्रे जपून ठेवतानाच अगदी जीर्ण झालेली पन्नास वर्षांपासूनची अनेक पत्रेही मी जपून ठेवलेली आहेत. नोकरी निमित्ताने प्रथमच घर सोडून मुंबईला जातानाच्या अनेक हळव्या अस्वस्थ आठवणी यातील प्रत्येक पत्राला या ना त्या रुपाने लगडलेल्या आहेत. जेमतेम वीस वर्षाचं माझं वय. घरापासून पहिल्यांदाच दूर जातानाचं हळवेपण आणि आयुष्यात मुंबईला प्रथमच आणि तेही दीर्घ वास्तव्याला जाताना असणारं अपरिहार्य दडपण सोबत घेऊन घराबाहेर पडल्यानंतरच्या पुढच्या अडीच एक वर्षातल्या असंख्य आठवणी सामावून घेतलेली मला घरुन येणारी ती जुनी पत्रे. त्या पत्रांवरचा ‘c/o जानकीबाई बापट. . . . ‘ हा पत्ता जेव्हा जेव्हा नजरेस पडतो, तेव्हा कधीच विसरता न येणार्या बापट काकूंच्या आठवणी उसळी मारुन वर येऊ लागतात.

बॅंकेत जाॅईन झाल्यानंतर काही दिवसांनंतरचा आमचा संपर्क न् सहवास पुढे माझी कोल्हापूरला बदली होईपर्यंत अबाधित राहीला,तरी त्यांचा निरोप घेऊन निघताना घरी ओढ घेणारी माझी पावलं त्यांच्या दारात अडखळली होती एवढं मात्र खरं. माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला मदतीचा हात द्यायला त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि स्वत:ची दुखरी आठवण मागे ठेऊन निघून गेल्या.

काकूनी त्यांच्या लग्नानंतर नूर बिल्डिंग मधल्या चाळीतील  दोन रुम्सच्या त्या ब्लाॅकमधेच गृहप्रवेश केला होता. आता उतारवयात तो ब्लाॅकच त्यांच्या चरितार्थाचं साधन बनलेला. त्या ब्लाॅकमधे माझ्यासारखी मुंबईत नोकरीनिमित्ताने आलेली मुलं त्या पेईंग गेस्ट म्हणून ठेऊन घ्यायच्या.  एकावेळी जास्तीतजास्त चार.  फक्त रहाणं,सकाळचा चहा, अंघोळ अशी सोय माफक दरात व्हायची. त्या दोनशे रुपयात त्याकाळी त्यांचा चरियार्थ जेमतेम चाले. त्यातही काटकसरीची सवय अंगी बाणवून त्या चार पैसे बाजूला ठेवीत.

तिथे माझ्यासाठी ओळख करुन घ्यायला आणि नीट सगळी चौकशी करायला मीच आग्रह केला म्हणून माझी डोंबिवलीची मावशीच आधी त्याना भेटून आली होती.

“त्याला सवय नसल्याने डोंबिवलीहून रोज लोकलच्या गर्दीतून ये जा करणे त्याला त्रासाचे वाटतेय हो. त्यामुळे इथे यायचं म्हणतोय. तो इथे राहील,दोन्हीवेळचा जेवणाचा डबा त्याच्यासाठी डोंबिवलीहून  मी पाठवीन. इथं तुमच्याकडे त्याची जेवणाची सोय होऊ शकली असती तर हा प्रश्न नव्हता. जमेल का तुम्हाला. . . ?”

“अडकून पडायला होतं हो. शिवाय मुलांच्या आवडीनिवडी फार असतात. म्हणून मी ते गळ्यात घेत नाही. ”

“त्याच्या काहीही आवडीनिवडी नाहीयेत हो. हवं तर चार दिवस करुन बघा. नको वाटलं तर बंद करा. सोय झाली तर त्याला निदान रात्रीतरी गरम जेवण मिळेल. म्हणून गळ घालतेय. शेवटी तुम्ही म्हणाल तसं”

आमचे ऋणानुबंधच असे की काकू राजी झाल्या. आमचं ना नातं ना गोतं. पण काकूनी मला त्या एका होकारात घरचं जेवणच नाही फक्त तर घरपणही देऊ केलं होतं. त्यामुळे अगदी थोड्या दिवसातच मी त्या घरचाच होऊन गेलो होतो जसा कांही. त्या काळी मोबाईलच काय घरोघरी फोनही नव्हते. वडील आजारी. घरुन पाठवलेलं साधं चार ओळींचं खुशालीचं पत्रही आठ दिवसांनंतर हातात पडायचं. घरच्या काळजीने न् आठवणींनी मन व्याकुळ होत असे. आधी मावशीने आणि नंतर या बापटकाकूनी दिलेलं घरपण त्या मनोवस्थेत तर माझ्यासाठी लाखमोलाचं होतं. त्याकाळी घरोघरी गॅस नव्हते.  अल्युमिनियमच्या कुकरमधे वातीच्या स्टोव्हवर रोजचा डाळभात शिजायचा. सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता वाफाळलेला गरम भात माझ्या पानात असायचा. भात संपेपर्यंत  तव्यावर मऊसूत पोळी तयार असायची. स्वैपाक साधाच पण अतिशय रुचकर असायचा. प्रत्येक घासागणिक तृप्ततेबरोबरच कृतज्ञतेची जाणिव मनात झिरपत रहायची.

त्या आनंदी,हसतमुख होत्या. समाधानी होत्या. त्या मुखवट्याआड एखादं बोचरं दु:ख लपलेलं असेल अशी शंकाही मला कधी आली नाही. त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखात होती. ती, जावई, नातवंडं सगळेच यांना ‘ब्लाॅक विकून टाका.  आमच्याकडे या. आरामात रहा’ म्हणायचे. आणि या ‘होईल तितके दिवस रहाते. ‘म्हणत हसण्यावारी न्यायच्या. काकूंचा भाऊ पूर्वापार नागपूरला. तेच यांचं माहेरघर.  दिवाळीनंतर दरवर्षी न चुकता एक महिना त्या माहेरघरी जाऊन राहून यायच्या. एका वर्षी त्या नागपूरहून परत आल्या न् लगेच दुसर्या दिवशी चारधाम यात्रेची चौकशी करुन बुकींग करुनही आल्या. आठ दिवसानी यात्रेचा प्रवास सुरु होणार होता. त्या रात्री पान वाढता वाढता त्यानी हे सांगितलं

“काकू,लांबचा प्रवास करुन कालच तर आलायत.  पुन्हा इतक्या लगेच चारधामची दगदग कशाला? पुन्हा नंतर जा कधीतरी”

“नंतरचं कुणी पाहिलंय आला दिवस आपला” त्या कसनुसं हसत म्हणाल्या. एरवी देवधर्म, सोवळं-ओवळं या कशाचं कधी अवडंबर न करणार्या त्यांची चारधामची ओढ आश्चर्य वाटावं अशीच होती. शिवाय लेक जावयालाही बुकींगपूर्वी त्यानी विश्वासात घेतलेल़ं नव्हतं.

“बरोबर कोण मग?” काळजीपोटी मी विचारलं.

“यात्राकंपनी बरोबरच तर जातेय. मग वेगळी सोबत ती कशाला?” त्या बोलल्या खर्या पण का कुणास ठाऊक जाताना स्वस्थचित्त नव्हत्या एवढं खरं. ट्रीपहून परतल्या ते तीच अस्वस्थता बरोबर घेऊन.

“काकू, प्रवासात कांही त्रास झाला का? तब्येत बरी नाहीय तुमची. “रात्री त्यानी अगदी घासभरच भात घेतला ते पाहून जेवताना मी विचारलं. त्यांचे डोळे भरुन आले. त्या मानेनेच ‘नाही’ म्हणाल्या.

“काकू, मला सांगा बघू काय झालंय. मोकळेपणानं बोललात तरच समजेल ना मला ?” मी काकुळतेने हे बोललो न् त्याचाच धक्का लागल्यासारखा त्यांचा बांध फुटला. त्याही परिस्थितीत उचंबळून आलेलं मनातलं सगळं त्यानी कसंबसं थोपवलं. स्वत:ला सावरलं.

“तुझं जेवण होऊ दे. मग सांगते. आत्ता बोलले तर घास अडून राहील उगीचच. . “त्या शांतपणे म्हणाल्या. त्या रात्रीचं ते सुग्रास जेवणही मला बेचवच वाटत राहीलं. ऐकलं ते मला उध्वस्त करणारं तर होतंच आणि त्या माऊलीची किंव वाटावी असंही. इतके दिवस त्यांच्या आयुष्यातली ही पडझड त्यानी मनातच कोंडून ठेवली होती. पण आज. . . . ?

त्याना एक मुलगीच नव्हती फक्त. एक मुलगाही होता. थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांचा नवरा गेला तेव्हा ही दोन्ही भावंडं शाळकरी वयाची होती. आल्या परिस्थितीला तोंड द्यायला आपल्या मुलांकडे पाहूनच तर त्या पदर खोचून उभ्या राहिल्या. शिक्षण जेमतेम.  स्वैपाकपाण्याची कामं करुन पुढे मुलांच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचं काय करायचं?मग त्यानी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. एका ओळखीच्या डाॅक्टरांच्या हाॅस्पिटलमधे त्यांना नोकरीही मिळाली. दोन्ही मुलांचं सगळं व्यवस्थित करता यावं म्हणून त्यांनी कायमची ‘नाईट ड्युटी’च घेतलेली होती. मुलांची रात्रीची जेवणं आवरुन त्या ड्युटीवर जायच्या. पहाटे परत यायच्या.  दिवस मुलांसाठी मोकळा ठेवायच्या. मुलं शाळेत गेली की दुपारी थोडा आराम. मग घरची सगळी कामं. मुलीनं समजुतीनं घेतलं. पण मुलाची आदळआपट हट्ट दिवसेंदिवस वाढत चालला. तो असा बिथरत का चाललाय याना समजेचना. त्या रात्री तर कहरच.

“तू आजपास्नं नाईट ड्युटीवर जायचं नाही बघ. ”

“का?”

“रात्रीच कशाला हवी ड्युटी? तू  दिवसाची ड्युटी घे बघ. ”

“वेडा आहेस का तू? मग घरची कामं कुणी करायची? आणणंसवरणं, स्वैपाक, धुणीभांडी कमी कामं असतात का?”

“मुलं शाळेत चिडवतात गं मला. त्या डाॅक्टरांचं नाव घेऊन चिडवतात. मला आवडत नाही ते” ऐकलं आणि त्या संतापल्याच.

“मला नावं सांग त्यांची.  उद्याच शाळेत येते तुझ्या. आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईबाबांनाही भेटते. गुडघ्याएवढी पोरं तुम्ही,अकला आहेत का तुम्हाला?”

मुलगा न जेवता घुसमटत रडत राहीला. त्याच मन:स्थितीत त्या रात्री ड्युटीवर गेल्या. सकाळी घरी आलो की त्याला जवळ घेऊन शांतपणे समजवायला हवं हा सुज्ञ विचार मनात डोकावून गेलाच. पहाटे घरी आल्या तर दार लोटलेलेच होतं. तेही किलकिलं.  दार ढकलून आत आल्या न् पाहिलं तर मुलगी एकटीच झोपलेली. मुलाचं पांघरुण तिथं तसंच विस्कटलेलं. मुलगा नव्हताच. खूप शोधाशोध,पोलीस कम्प्लेंट,पेपरमधे जाहिराती सगळं झालं पण मुलगा सापडला नाहीच.

काळजाला चरे पाडणारं हे दु:ख तसंच मनाच्या तळाशी दडपून ठेऊन काकू दिवस ढकलत राहिल्या. कांहीतरी चमत्कार घडेल आणि मुलगा दत्त म्हणून समोर येऊन उभा राहिल या एकाच आशेवर त्या इतकी वर्षं दिवस ढकलत राहिल्या. यावेळी त्या नागपूरला नेहमीप्रमाणे भावाकडे गेल्या तेव्हा तिथल्या कुणी ओळखीच्या एकानं त्याना सांगितलं होतं. . ,’आम्ही चारधामला गेलो होतो नुकतेच.  तेव्हा तुमच्या मुलाला आम्ही पाहीलं होतं. साधूवेशात होता.  तरीही ओळख पटली होती.  अंदाज घेत आम्ही त्याला नावाने हांक मारली तेव्हा त्याने दचकून मागे वळूनही पाहिलं होतं आणि मान फिरवून तरातरा निघून गेला. गर्दीत दिसेनासा झाला. ”

नेमका कुठे दिसला, भेटला काकूनी त्याना विचारुन घेतलं होतं. त्या तातडीनं चारधाम यात्रेला गेल्या होत्या ते मुलगा भेटेल या आशेने. एक नवी आशा मनात पालवली आणि क्षणात कोमेजूनही गेली. मुलगा भेटलाच नाही. कसं नशीब म्हणायचं हे ?मला हे समजलंच नसतं तर बदलीनंतर काकूंचा निरोप घेऊन निघताना माझा पाय अडखळला नसता.

आज बापट काकू हयात नाहीयेत. पूर्वी कारणपरत्त्वे कितीही धावपळीत मुंबईला जाणं होई तेव्हा त्याना आवर्जून भेटून तरी येत होतो. त्याना जाऊनही तीस वर्षं उलटून गेलीयत. पण त्यांच्या या सगळ्या दुखर्या आठवणी मात्र कालपरवाच सगळं घडून गेलं असावं इतक्या ताज्या आहेत. मला हवं ते भरभरुन द्यायलाच आल्यासारख्या त्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या. मला असं उपकृत करुन ठेऊन गेलेल्या त्यांची कधीतरी अचानक आठवण येते आणि मला जेवतानाचा तो प्रसंग आठवतो.

“तू आल्यापासून मला दोन घास जास्त जायला लागलेत” एकदा त्या म्हणाल्या होत्या.

“सं का म्हणताय? उलट दोघांचा स्वैपाक करायचा तुमचा त्रास मी वाढवलाय” मी चेष्टेने म्हणालो होतो. ऐकलं आणि त्या गंभीरच झाल्या होत्या क्षणभर. का ते मला तेव्हा कुठं माहित होतं?

“त्रास कसला रे?कितीक वर्षात कुणासाठी तरी रांधायचं, त्याची जेवणासाठी वाट पहायची हे मी विसरुनच गेले होते. तू आलास तेव्हापासून हरवलेलं ते सगळं पुन्हा परत मिळाल्यासारखं वाटतंय”  त्या म्हणाल्या होत्या. . . .  त्यांच्या तेव्हाच्या त्या बोलण्याचा खरा अर्थ मला त्या चारधाम यात्रेहून परत आल्या त्यानंतर समजला होता. पुढे सगळं निसटूनच गेलं. त्यांच्या हातून आणि माझ्याही. इतकी वर्ष मनात जपून ठेवलेल्या त्याच्या या आठवणी त्यांच्या नसण्यामुळे अधिकच केविलवाण्या वाटतायत मला….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मिरजेच्या पासून जवळ असलेल्या आरग या रेल्वे स्टेशन वर माझं लहानपण गेल. आसपास काहीच नव्हतं. पण मागच्या बाजूचा गाई-म्हशींचा गोठा त्यांची लहान पिल्ल कुत्री मांजर अशा प्राणिसंग्रहालयाच्या सहवासातच लहानपण गेल. शिक्षणानिमित्त मिरजेला आलो. प्राणिमात्रांची आवड फक्त मांजरावरच भागवावी लागली. मी अभ्यास करताना आमची सोनाली मांजरी माझा अभ्यास होईपर्यंत मांडीवर जागत बसायची. माझ्या यशाचा वाटा माझ्या या मुलीला दिल्याशिवाय रहात नसे.

लग्नानंतर आमची गावाबाहेर पोल्ट्री आणि त्याला लागून घर होत. टॉमी आणि बंड्या दोन कुत्र्यांच्या आधारावरच आम्ही रहात होतो म्हणा ना! ओसाड परिसर साप विंचू गोम मुंगूस बेडूक आणि चोर अस चित्र होत. एकदा रात्री अकरा वाजेपर्यंत कोणीच घरी आले नाही. लाईट गेले काय कराव सुचेना. अखेर माझ्या बाळाला घेऊन मी बाहेर टॉमी आणि बंड्या यांच्याजवळ येऊन बसले. 100% खात्रीचे अंगरक्षक. बाळाला नवख्या कोणी घेतले आणि तो रडायला लागला की दोघे बेचैन व्हायचे. “बाळ रडतोय लक्ष आहे की नाही” अस नजरेतून मला सांगायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला मीत्यांच्याजव,ळ ठेवायची. काम होईपर्यंत जबाबदारपणे दोघे त्याला सांभाळायचे. टॉमी, मी साडी बदललेली दिसली की, “मी पण येणार” असं म्हणून मागं मागं यायचा. दोघांच्या भुंकण्यातून साप आहे की चोर आहे की त्याला काही हवंय, हे बरोबर समजायचं. आठ नऊ वर्ष या मुलांनीच आम्हाला सांभाळलं म्हणायला हवं. टॉमीला कॅन्सर झाला. ऑपरेशन झाले. निमूटपणे तोंड वर करुन औषध घ्यायचा. दिवाळीचा सण साजरा झाला. दिवाळीचा लाडू थोडासा खाल्लान आणि दुसरे दिवशी स्वर्गवासी झाला. बंड्या ही किरकोळ दुखण्याने गेला. दोन मुलांची उणिव सतत भासू लागली. लवकरच आपण होऊन छानशी गोंडस कुत्री पिंकी आपण होऊन आली. आणि आमचीच झाली. पहिल्या वेळेला दहा पिल्ले झाली. तिला कोणीतरी पळवून नेल.तीन आठवड्यानी पोट खपाटीला गेलेलं, अंगावर गोमाशा भरलेल्या अशा अवस्थेत परत आली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. प्रथम पिलानी आईला ओळख ले नाही. नंतर मात्र आनंदाने नाचायला लागली. कोरडीच आचळ ओढायला लागली. नाईलाजाने एक पिल्लू ठेवून घेतलं. टोनी. दिसायला पिवळाबारीक, गोरा रंग ,उंच, कायम ताठ बसणारा असा टोनी नौ वर्षे  साथ दिलीन त्यानं. त्याला फिरायला मीच न्यावं असा त्याचा हट्ट असायचा. “तूच चल” अस म्हणून माझ्या मागे लागायचा. मुलांबरोबर चेंडू खेळायचा. एकदा मुलांच्या मागे लागून शाळेत ही गेला. शेवटी त्याला घेऊन मुलं परत आली. किती अनुभव सांगावे तितके कमीच. चिमा मांजरी पिलांना शिकार शिकवण्यासाठी काहीना काही घेऊन यायची. एक दा तर जिवंत साप घेऊन आली. पिलांसाठी उंदीर पाली किडे सगळ्यांचा फडशा पाडायची. मागे बांधलेली जयू नावाची गाय ही एक मुलगी. तीच शिंगाचा ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या जखमेवर रोज औषध घालायला हव ती माझ्याशिवाय कोणालाच घालून देत नव्हती. आपल्या सूक्ष्मातल्या भावभावना ही तिला कळत असाव्यात याची खात्री झाली. या सगळ्या मनाच्या नात्याच्या मुला-मुलींनी अनेक  संकटांपासून चोर, विंचू, साप, यापासून वाचवलंयआम्हाला. आता आमच्याकडे चिंगी आणि गोल्डी ही श्वान जोडी काळूराम सुंदरी आणि टिल्ली हे मार्जार त्रिकूट मस्त मजेत राहून आम्हालाही खूप आनंद देतात. या मुलांशी मी गप्पा मारत असते. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायचं ,प्रश्न विचारायचे, आणि उत्तरही आपणच द्यायचं. बाहेरून घरी आलो की पहिलं स्वागत तेच करतात  किती आनंद वाटतो ना! ही सगळी आमची मुलं आणि आम्ही त्यांचे आई वडील अस नातं आहे म्हणाना. रस्त्यात जखमी झालेल्या प्राण्यांनाही “राहत “,पीपल फॉर अनिमलच्या” मदतीने उपचार करतो. निपचित पडलेल्या बैलाच्या पोटाचे ऑपरेशन झाले. आणि चार बादल्या प्लास्टिक पिशव्या काढल्या. पिशव्यातून खरकटे टाकणाऱ्यांना काय सांगावे?बऱ्या झालेल्या प्राण्यांच्या डोळ्यातले भाव पहाताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं “जीव सेवा हीच ईश्वरसेवा” हे तत्व मनोमन पटत.

कर्मयोग, ज्ञानयोग, आणि भक्ती मार्गाद्वारे आमची मुलं-मुली, (प्राणिमात्र )यांच्यामधील परमेश्वराच्या रूपात पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या सहजीवनाच्या धाग्यांच्या गुंफणीतूनच माझ्या जीवनाच सुंदर वस्त्र विणलं गेलंय. किती सुंदर  म ऊ मुलायम उबदार आणि रंग बिरंगी.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

 ☆ विविधा ☆ बदलता दृष्टीकोन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

ऐका सख्यांनो, ‘तिची’ कहाणी. ‘ती’ तुमचीच एक सखी. तिची कहाणी पण संसार, मुलं-बाळं, जिवलग, निसर्ग, कुटुंबाचे हीत, परमार्थ, व्रत,त्याग,साफल्य या भोवतीच फिरणारी.

तिचे माहेर छोट्याशा गावातले.  घरी धार्मिक,अध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक अशा सर्व विचारांचा मेळ. सर्व देवधर्म, पूजाअर्चा, परंपरा श्रद्धेने जपणारे आई-वडील. इतरांच्या मदतीला धावणारे, सर्वांच्या उपयोगी पडणारे, गावाचा आधारस्तंभ होते. धार्मिक व्रतवैकल्यांबरोबर सामाजिक व्रताचा वसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला. वारीची परंपरा, त्यातले मर्म समजले.

लग्नानंतर ती मोठ्या शहरात, मोठ्या गोतावळ्यात गेली. तिथले वातावरणही पूर्ण श्रद्धाळू, धार्मिक. तिच्या सासूबाई त्या काळाप्रमाणे कमी शिकलेल्या, सण-वार,परंपरांच्या धबडग्यातल्याच.पण तरीही अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या. असंख्य पुस्तकांच्या वाचनाने विचारात, आचारात काळानुरूप बदल केलेल्या. जुन्या कालबाह्य गोष्टी त्यांनीच सोडून दिलेल्या होत्या. त्यामुळे सुनांना त्यांनी कसलीच बंधने कधी घातली नाहीत. ती घरात सर्वात लहान. त्यामुळे सासूबाई नंतर कुळधर्म मोठ्या घरी सुरू झाले. सर्वांनी आपापल्या घरी करण्याऐवजी एका घरी करताना सर्वांनी एकमेकांकडे जाणे, या निमित्ताने नाती जपणे हे तिने कटाक्षाने पाळले. घरामध्ये, नातलगांमध्ये मिळून-मिसळून, सर्वांना धरून राहण्याचे व्रत ती अखंडपणे जपते आहे. या व्रतवैकल्यांचा अंतिम उद्देशच सर्वांचे हित,कल्याण हा आहे. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे खरे आहे.

तिने पुढच्या पिढीला श्रद्धा जपायला शिकवले आहे. प्रथेचे अवडंबर न करता काळानुसार जे शक्य आहे ते मनोभावे करा. माणसातला, स्वत:च्या मनातला देव जपा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. तो सदैव पाठराखण करतो हेच मनी बिंबवले आहे.

सण उत्सव, व्रतवैकल्ये हवीत. नियम, बंधने, संयम अवश्य हवा. पण या सर्वांसाठी निसर्गाला हानी पोहोचवू नये असे तिचे ठाम मत आहे. फुलं- पानं, फांद्या हव्यात म्हणून झाडांना ओरबाडायचे, निर्माल्य नदीत सोडायच्या निमित्ताने सगळा कचरा, घातक रंगांच्या प्लॅस्टरच्या मूर्ती पाण्यात सोडून जलप्रदूषण करायचे, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करायचे ही कसली आलीय श्रद्धा ? यामुळे उत्सवांच्या मूळ उद्देशालाच दूर सारले जाते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्सवाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला हवे असे तिला वाटते.

या सणावारांना ऋतू बदलानुसार योग्य खाद्य पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. ही गोष्ट आहारशास्त्राशी निगडित आहे. ती निश्चितपणे पाळावी. चातुर्मासाच्या निमित्ताने अनेक नेम धरले जातात. जे आरोग्यास योग्य ते अवश्य करावे. पण या जोडीला आणखी काही नवीन नेम धरता येतील. जास्ती समाजाभिमुख होऊन काही वेगळे संकल्प करावेत असे तिला वाटते.

असे उपक्रम म्हणजे — हॉस्पिटलमधील अॅडमिट पेशंटना भेटणे.एखादे फूल, फळ देऊन ‘लवकर बरे व्हा’ सांगत मानसिक उभारी देणे.

अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील लोकांना भेटणे.त्यांना चांगली गाणी, गोष्टी ऐकवून मनमोकळ्या गप्पा मारणे.

शाळा-शाळांतील मुलांना चांगली गाणी, गोष्टी, कथा ऐकवणे. त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे.

घराबाहेर पडू न शकणार्‍या ज्येष्ठांना आवर्जून जाऊन भेटणे.

दर आठवड्याला एका नातेवाईकाला जाऊन निवांतपणे भेटणे.जवळीक वाढवणे.

सर्वांनी मिळून देऊळ, बागा अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे.

झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवणे. यासारख्या कितीतरी उपयोगी गोष्टी करता येतील.

“मनी वसो रामनाम, हात करो पुण्यकर्म” हेच तर ब्रीद असावे.  पुढच्या पिढीला पण अशा विचारांची दीक्षा देऊन त्यांना या कामात सहभागी करून घ्यायला हवे. ज्याला ज्या मार्गाने जमते त्या मार्गाने त्याने समाजसेवा करावी.

तिने समाजसेवेचा वसा आई-वडिलांकडून घेतला आहे. तो ती वेगवेगळ्या मार्गाने अमलात आणते. आपण ‘समाजाचे देणे’ लागतो ते फेडायचा ती यथाशक्ती प्रयत्न करते. शेवटी समाज म्हणजे कोण?  तुम्ही आम्हीच ना! म्हणून या चांगल्या कामांची स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे तिचे मत आहे.

तिला ‘खुलभर दुधाची’ कहाणी फार आवडते. प्रत्येकाने आपल्या श्रद्धा जपत उत्सवाच्या निमित्ताने थोडा थोडा हातभार लावला तर समाज प्रबोधन, समाजरक्षण, पर्यावरण रक्षण यांचा हा गोवर्धन निश्चितपणे उचलला जाईल.

तेव्हा मैत्रिणींनो आनंदात समाधानात सण साजरे करूयात.धन्यवाद.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

जून  महिन्यातील  असाच  एक  दिवस. संध्याकाळचे  चार वाजून गेले असावेत . आज सकाळपासूनच  आभाळ जड  झालयं. काळंभोर, घनबावरं झालयं. कोसळू पाहतंय  पण  कोसळत नाहीय. इथं , कोईमतूर मध्ये मी घरी एकटीच . मुलगा  आणि  सून  ऑफिसला गेलेत. नातूही दुपारचा झोपलाय . खिडकीतून दिसणारे काळे जडावलेले ढग बघत बसलेय मी . मोरही अगदी  सहज  फिरताना दिसतात या बाजूला . त्यानंही केकारव केला . अरे! हा तर थिरकू लागला !! बघता बघता पावसाचे टपोरे टपोरे  थेंब येऊ  लागले . थेंबांच्या सरी झाल्या . धो धो कोसळू लागल्या . मन  तर बालपणीच्या  अंगणात  जाऊन गारा  वेचून आलं . . . . परकरपोलक्यातून केंव्हाच सटकलं . . . मैत्रिणींच्या बरोबर नाचू लागलं. . .

सरींवर सरी कोसळू लागतात

आठवणींचे मोती सरीत गुंततात

अगबाई . . लग्नंही  जूनमधलचं. . त्याही दिवशी असाच  पाऊस . . .  आता सरींचे  हिंदोळे झाले . चांदणफुलांनी त्याची माझी ओंजळ  भरली. . . थांब, थांब ना जरा. . .

अंबरातून सावळघन बरसताहेत

मनजलधित तरंग उठताहेत

आता अनेक आठवणी, अनेक साठवणी. . .

उडून गेलेली छत्री, झालेली फजिती. .

ऊटीच्या थंडीतही पावसात भिजत खाल्लेलं आईस्क्रीम. . . .

आठवणींचे तरंगावर तरंग. पाण्यात दगड टाकल्यावर ऊठावेत तसे.

मनाच्या डोहात किती वलयं उठतायत. एकात एक, पुन्हा त्यात एक.. . एकाच केंद्राभोवती. . . की. . की प्रत्येकाचा केंद्र बिंदू निराळा? माझं मन हे केंद्र बिंदू प्रमाणं समजलं तर समकेंद्री . पण असंख्य जीवनाभुवानं वेगवेगळ्या क्षणी मला बहाल केलेल्या स्मृती . . विकेंद्री!!

आठवणी काही आनंदाच्या,  काही माझ्याच जीवनवेलीवरील फुलांनी दिलेल्या समाधानाच्या. .

हे काय सरीतील मोती अजूनही ओघळतच आहेत. . . . स्वैर. . . . बेबंद. . . आणि हा वेडापिसा झालेला मोर तर , मान उंचावून; निळाभोर होऊन; आनंदघनात चिंब झालाय.

. . . . . . मी ही एक गिरकी घेतली. मीच मला टाळी दिली. गदिमांच्या थुई थुई नाचणारा निळा सवंगडी मनाच्या अंगणात पदन्यास करु लागला.. . . . .

तशी मी बाथरूम सिंगरही नाही. पण आज या आठवणींच्या सुरावटीनं माझं गाणं ही सुरेल झालंय. माझ्या नकळत माझ्या चेहऱ्यावर उठणारे तरंग आजूबाजूला ऊबदार, सुखद तशाच ‘Positive vibes’ पसरवताहेत. . . . माझं आनंदगान घननील  नभापर्यंत उंच उंच झेपावतय.

सरींवर सरी

सरींवर सरी कोसळत  राहतात,

आठवणींचे मोती सरीत गुंततात,

सरींचे हिंदोळे अंबरी झुलतात,

चांदणफुले वेचून मने डोलतात,

अंबरातले सावळ घन बरसतात

मनजलधित तरंग ऊठतात,

तरंगांची वलये तनमनात झरतात,

वलयांची कंपने झंकारतात,

सरींचा ताल पकडून,

थेंबांचा ठेका धरून,

हिंदोळ्यांच्या लयीत,

आठवणींच्या सरीतील थेंबांचे मोती,

स्वैर बेबंद ओघळत राहतात __. . . . . .

मनमोरही आता धरतो ताल

ऐटीत लहरते एक अल्लड चाल

केकावलीची तानही थिरकते सुरेल

सरींची लकेर घेऊन मनगीत भिजते सचैल !!!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

? – 9665669148

[email protected]

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print