मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अद्वैत ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

परिचय

  • एम. ए. (म्युझिक), SNDT विद्यापीठात प्रथम क्रमांक
  • संगीत अलंकार (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) विशेष योग्यता प्राप्त.
  • एम. कॉम. (अकाउंट्स अँड कॉस्टिंग)
  • PHD student (ABGMVM)
  • सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.
  • गेल्या दहा वर्षांपासून मराठी मासिकांमधे, दिवाळी अंकामध्ये सातत्याने लेखन.
  • पूर्वी शब्दबंध हा कथासंग्रह, गवतूचं गाणं आणि घनिष्ठ मैत्री हे बाल कथासंग्रह व कल्पवृक्ष कन्येसाठी ही काव्यसंवादरुपी पुस्तिका प्रकाशित झाली आहे.
  • गेल्याच महिन्यात निरभ्र  व भूपातला निषाद हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • कालच जाहीर झालेल्या डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय कथस्पर्धेच्या निकालानुसार ‘ज्याचं त्याला’ ह्या कथेस विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला

अर्थातच कविवर्य ग्रेस!

आज अचानक ह्या ओळी सामोऱ्या आल्या आणि नव्यानं भेटल्या! पूर्वी हे वाचल्यावर काय उमटलं होतं मनात आठवत नाही… मात्र आज राधा आणखी खोलवर रुतली…! खरंतर पदोपदी मोहवणाऱ्या, भूल पाडणाऱ्या ह्या गोष्टी तरीही सगळ्याचे अर्थ लागणं तितकं सोपं नाही.. पण माणूसपणातला न आवरणारा हाही एक मोह… आपल्या नजरेतून सगळं पाहाण्याचा!.. म्हणून अक्षरं मांडणं अनावर झालं!

राधा स्वतः कृष्णमय होऊन गेली आणि कृष्णाला तिच्याजवळ असण्या-नसण्याचा  पर्यायच तिनं ठेवला नाही… तिनं त्याला कधी स्वतःपासून वेगळं केलं/मानलं नाही आणि ना कधी स्वतः त्याच्यापासून वेगळी झाली… त्यामुळं तिच्याजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडे उरला नाही… म्हणूनच तो तिला पुरून उरला… आजही तो उरलाय तो फक्त राधेसोबत… राधाकृष्ण होऊन!

इतकं अतूटपण निभावणं म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर क्षणोक्षणी चटके सोसत निखाऱ्यावर चालत राहाणं… त्यातला सोपं वाटण्याचा पर्याय विश्वासाशी जोडलेला… अंतरी तो आहेच ह्या अढळ विश्वासाशी… जगण्यातल्या क्षणांत त्याच्या असण्या-नसण्याशी तसूभरही संबंध नसलेला…! अपार मोह पडला तरी हे निभावणं सोपं नाही… पण हे जमलं तर मिळवण्यासारखं काही  उरतच नाही… तोच मोक्ष तीच मुक्ती म्हणजेच ‘राधा’ अनुभवणं!

तुलना मनात उभी राहातेच राहाते… ग्रेस प्रभृतींनीही ह्या रचनेत रूक्मिणी-सत्यभामा आणि राधा ह्यांच्यातलं तुलनात्मक वेगळेपणच इतकं अचूक मांडलंय की वाचताक्षणी राधा नेमकेपणी कडकडून भेटावी… त्यांनी म्हटलंय रुक्मिणी-सत्यभामेला साध्यापेक्षा साधन महत्वाचं वाटलं आणि राधेला साध्य कळलं होतं, तिचं लक्ष फक्त साध्याकडं होतं… फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण… म्हणूनच त्यानं त्यांना साधन दिलं आणि स्वत: राधेला साध्य झाला!

मनात आलं की  रुक्मिणी-सत्यभामेला कृष्णापेक्षा  कृष्णाचं आपल्यावरचं  प्रेम आणि आपला त्याच्यावरचा हक्क जगासमोर सिद्ध होणं जास्त गरजेचं वाटलं आणि राधेनं त्याला ते सिद्ध करून दाखवायचा पर्यायच ठेवला नाही, अर्थात तिला त्याची गरजही भासली नाहीच… कारण तो आपल्याजवळ च असल्याचा तिचा विश्वास!… तसंही आपणच पर्याय निर्माण न करणं किती चांगलं! आपल्याला मिळणार असलेल्या गोष्टीवर आणि ती मिळणारच ह्यावर अतूट विश्वास ठेवणं हा एकच पर्याय, हे एकच ध्येय आणि हा एकच ध्यास… कुठल्या अडथळ्याला मधे येण्याचा पर्यायच उपलब्ध नाही… आणि त्यातूनही काही आलंच आड तरी विश्वासाच्या भक्कम तटबंदीसमोर ते दिसणार नाही आणि टिकणारही नाही!… केवढं प्रचंड आत्मबल, केवढा दुर्दम्य आशावाद आणि किती अर्थपूर्ण जगणं… कृष्णानं राधेला बहाल केलेलं कि राधेनं कृष्णमय होऊन अल्लद ओंजळीत पाडून घेतलेलं!?

सत्यभामा-रुक्मिणीच्या बाबतीत तो लौकिकार्थाने त्यांचा होऊनही त्यांच्याजवळ उरला नाही आणि राधेजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडं नव्हता!… भूल पडते ह्या अशा आयुष्याची… त्याच्याशिवायही त्याच्यासोबत त्याचं होऊन जात जगण्याची आणि खरंतर राधेचं गारूड पसरत जातं मनभर… पण ती स्वतः उरलीच कुठं होती म्हणून मग तिच्या अवघ्या अस्तित्वावरचं त्याचं गारूड आपल्यातही भिनत जातं आणि आपल्या दृष्टीनं सर्वव्यापी ठरतो तो! तसा तो आहेच सर्वसाक्षी, सर्वव्यापी.. पण राधेचा होऊन अंतरी ठसला, तिच्या नेत्रांतून दिसला, तिच्या जाणिवांनी अनुभवला की परिपूर्णतेचं एक वेगळं वलय त्याच्याभोवती तेजाळतं आणि कसलाच किंतू मनात न उरता त्याच्या अस्तित्वाचीच खात्री पटते!

अस्तित्वाची खूण ही अंतरीच पटावी… प्रतिकांतून नाही, दृश्य स्वरूपात नाही! बाह्यरूपात भुलावण होऊ शकते, अंतरी नाही! त्याच्या प्रीतीच्या प्रतिकाचा ध्यास घेतलेल्यांना साधं ते प्रतीकही पूर्णपणे मिळालंच नाही आणि फक्त त्याचा ध्यास घेतलेल्या राधेसोबत तो युगानुयुगे उरलाय! एका दृष्टीनं हाही त्याच्या अस्तित्वाचा पुरावाच… ज्याला जे हवं त्याला ते देणारा ‘तो’… राधेला ‘तो’च हवा होता तर फक्त त्या एका जन्मी नाही तर युगानुयुगे तिची साथ निभावणारा!

कुणाची आस धरण्यापेक्षा कुणाचं तरी होऊन जाणंच खरं… कारण ती आपली स्वत:ची अनुभूती, कुणावरही अवलंबून नसलेली… हे ढळढळीत सत्य राधा जगली आणि अनंतयुगे त्याच्यासोबत अमर झाली!

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लक्ष्मण रेषा ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

शिक्षण  B.A . मराठी

नोकरी EDC, A Semi Govt Financial Institution.

निवृत्ति नंतर मराठी लेखनास सुरवात. अनेक कविता प्रकाशनाच्या मार्गावर, दिवाळी अंकांमधून कथा, कविता प्रकाशित. वाचन लिखाण यांची आवड.

‘स्मृति कलश’ या ज्योती देशपांडे यांच्या पुस्तकाचे शब्दांकन, संपादन.

☆ विविधा ☆ ल्क्ष्मण रेषा☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

प्रभु श्रीराम कस्तुरीमृगामागे गेले, रामाची ‘धाव लक्ष्मणा धाव’ अशी आरोळी ऐकून सीता घाबरली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जाण्यास भाग पाडले.  सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने आश्रमाभोवती आपल्या बाणाच्या टोकाने एका रेषेचे कुंपण घातले आणि त्या बाहेर पाऊल न टाकण्याचा इशारा सीतामाईला देऊन तो रामाच्या आवाजाच्या दिशेने गेला.

पुढे काय झाले, हे आपण सर्वचजण जाणतो. त्याचे कारणही जाणतो. तेव्हापासून हेच कुंपण ‘लक्ष्मणरेषा’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथे सीतामाई होती, तिचं अपहरण झालं,  म्हणून लक्ष्मणरेषा फक्त स्त्रियांसाठीच असते, असा सोयीस्कर अर्थ नोंदवला गेला.

लक्ष्मणरेषा ही एकदाच ओढली गेली आणि तिचे उल्लंघन केल्याने जो अनर्थ घडला, त्यामुळे पुराणातील एक शिकवण किंवा एक इशारा म्हणून ती अजरामर झाली.

लक्ष्मणरेषा म्हणजे आत्मसंयमन, लक्ष्मणरेषा म्हणजे स्वत्वाचे रक्षण, लक्ष्मणरेषा म्हणजे आचारविचारांसाठी एक नियम,  लक्ष्मणरेषा म्हणजे चारित्र्य, शील यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक सुरक्षित कवच.

चारित्र्य आणि शील यांचे जतन आचार-विचार, आहार-विहार, याच्या माध्यमातून व्यक्त होते. आचार म्हणजे आपले वागणे,बोलणे, समाजात वावरणे, पोषाख, दुस-याला मान देणे, आदर करणे.

विचार म्हणजे पूर्वकाळातील अनुभव आणि संस्कार यातून आपल्याला झालेले ज्ञान व त्याचा सद्यः परिस्थिती साधलेला समन्वय.

आहार म्हणजे शरीराला आवश्यक,  प्रकृतीला अनुरूप असा आणि गरजेपुरताच करावयाचा अन्नपुरवठा.

विहार म्हणजे शरीर व मनाला उत्साह,  आनंद,  तरतरी देणारा अनुभव. तो व्यायाम असेल, पर्यटन असेल किंवा स्थलपालट असेल.

वरील चारही गोष्टी करत असताना,  सृष्टीवर त्या जगन्नियंत्याचे अधिपत्य आहे,  हे जाणून कर्म करणे. चांगले- वाईट दोन्ही कर्मे तो पहात आहे, याची जाणीव सतत ठेवणे. हे संस्कार मनावर असावे लागतात. यश, आनंद, समाधान ही चांगल्या कामाची फलश्रुती असते तर वाईट कृतीची शिक्षा ही भोगावीच लागते. हे ध्यानात ठेवून चांगले कर्म करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

भारतीय संस्कृतीचा हा अलिखित पण अधोरेखित नियम आहे. समाजात वावरताना देहबोली ही महत्त्वाची असते.  ही एक अलिखित बोली आहे.ती व्यक्तीच्या व्यवहारातून, चालण्या बोलण्यातून राहणीमानातून, पोषाखावरून, व्यक्त होते.  ही संयमाची लक्ष्मणरेषा अतिशय काटेकोरपणे पाळावी लागते. जरासं सुद्धा रेषेबाहेर पडलेलं पाऊल पाय घसरायला कारणीभूत ठरू शकते. हे केवळ नीतीमत्तेच्या संदर्भात नाही तर सर्व बाबतीत आहे.

हा नियम स्त्री-पुरूष,  गरीब-श्रीमंत, लहान-मोठे,  सर्वांना लागू असतो. स्थलकाल, वर्णजाती,  याचे परिमाण न राखता, पृथ्वीवरच्या मनुष्याला सर्व समान लागू असतो. प्रत्येकाचे वर्तन, उपजीविकेचे व्यवहार यासाठी ही आहे.

ह्याची जाणीव घराघरातून वडीलधा-यांनी स्वतः सांभाळावी, तरूण वर्गाला करून द्यावी. शिक्षण संस्थांनी याबाबतीतले नियम कडक केले पाहिजेत. अनेक संस्थांनी अशी पावले उचलली आहेतही.

प्रत्येकानेआपल्या मनात लक्ष्मणरेषेचे भान ठेवलेच  पाहिजे. प्रत्येक वेळी,  प्रत्येक ठिकाणी आपले रक्षण करण्यासाठी आईवडील, भाऊ,दीर, मित्रमैत्रिणी, पोलिस बरोबर असतीलंच असं नाही,  पण मनातली लक्ष्मणरेषा आपल्याला संरक्षण नक्कीच देते.

धुंद होऊन जगताना संयम हवा. बोलताना संयम हवा.विचार करताना लक्ष्मणरेषेची जाणीव असावी. लक्ष्मणरेषा प्रत्येकाने आपल्या पुरती सीमित केली तरी खूप आहे.

छोटे-मोठे अनर्थ घडूच नयेत म्हणून लक्ष्मणरेषेचा आदर करावा, स्वतःच्या आणि दुस-यांच्याही.

 

© सौ. अमृता देशपांडे

पणजी

9822176170

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हॅप्पी स्पून डे….☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ हॅप्पी स्पून डे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नमस्कार मंडळी…जागतिक चमचा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… ‘सेम टू यू‘ तरी म्हणा.. निदान अंगठा तरी….. काय? तुम्हाला‘ चमचा दिन‘ माहितीच नाहीये? आत्ताच “स्वयंपाक दिन” नाही का साजरा झाला व्हॉटस् अप वर?  ..म्हणजे माहिती असणारच… तरीही चमचा दिनाबद्दल नाही माहिती? आश्चर्य आहे. बरं ऐका …. हल्ली चमच्याशिवाय कुणाचेच पानही हलत नाही… बरोबर? विदेशी पदार्थ तर चमच्याशिवाय खाताच येत नाहीत अनेकदा. मग त्यांचे अनुकरण केलेच पाहिजे. म्हणून हल्ली घरोघरी “प्लेट-बाऊल-ग्लास” या जेवणाच्या सरंजामामध्ये चमचाही असतोच असतो. का काय?

आवडत्या आमटीची वाटीच उचलून तोंडाला लावणं आता अशिष्ट समजलं जातं. अळूच फतफत सगळ्या बोटांनी गोळा करून तोंडात घालून सूर्र् ss  आवाज करत तृप्त व्हायचं, बासुंदी-खिरीच्या वाट्याच्या वाट्या मनसोक्त तोंडाला लावत मनमोकळी ढेकर द्यायची, हा तर चक्क गावंढळ पणाच ठरतो हल्ली. त्या ऐवजी बोटांची देखणी हालचाल करत चमचा हळूवारपणे अशा पदार्थांच्या अर्ध्या पाऊण भरलेल्या बाऊलमध्ये बुडवून, एकही थेंब न सांडता ओठाला लावायचा, आणि फूर्र.. बीर्रा असला कुठलाही असभ्य आवाज न करता जिभेवर रिकामा करायचा… तोपर्यंत तो पदार्थ गार होऊन जातो, चव कळत नाही, असले वायफळ आरोप अजिबात करायचे नाहीत. शेवटी sophisticated दिसणं महत्वाचं.

याचं बाळकडू आताशा लहानपणापासूनच पाजलं जातं. बाळाला बाटलीतून दूध पाजणे आरोग्याला घातक असल्याने ते चमच्याने पाजावे असा विचार पुन्हा प्रचलित झाला आहे. त्यामुळे तान्हेपणा पासूनच बाळाची चमच्याशी ओळख होते. पुढे त्याला  “आत्मनिर्भर” करण्याच्या उदात्त हेतूने, “हायचेअर” वर बसवून, समोर पोळीचे तुकडे व भाजी ठेवली जाते. बाळ एक तुकडा महत्प्रयासाने चमच्यातउचलते. मग तो भाजीत टेकवून पुन्हा उचलण्याचे कष्ट करण्यापेक्षा ते हुशार पिढीतले मूल, फक्त पोळीचा तुकडा तोंडामध्ये कोंबून, मग चमच्यात भाजी घेतल्यासारखे करून तो तोंडाला लावतो. हीच — “आत्मनिर्भरता”. इथे पोटात भाजी किती जाते हा मुद्दा गौण ठरतो. पण चमच्याने जेवण्याच हे नाटक मुलं इतकं लांबवतात की शेवटी मम्मी वैतागून त्याला हाताने भरवून टाकते, हे इथे महत्वाचे नाही.

तर अशा रीतीने “चमचा” आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच महत्वाची  भूमिका बजावायला लागतो. आणि हे महत्त्व लक्षात घेऊनच त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा “चमचा डे” साजरा केला जातो…. बरोब्बर…. Mother‘s डे, father‘s डे कसे वर्षातून एकदा साजरे केले की इतिकर्तव्यता होते.. तसंच. पण एक फरक आहे. मदर-फादर प्रत्येकाला एकेकच असतात. पण चमचे?…. प्रत्येक घरात इतके वेगवेगळ्या प्रकारांचे, आकारांचे आणि उपयोगाचे चमचे असतात की,  “माझ्याकडे सगळे मिळून इतके चमचे आहेत”, असं कमालीची गृहकृत्यदक्ष स्त्रीही १००% खात्रीने सांगू शकणार नाही हे मी खात्रीने सांगू शकते.

याशिवाय घराबाहेरही कित्ती चमचे असतात. शेजारच्या दारापासूनच त्यांची जी रांग सुरू होते, ती थेट फक्त दिल्लीपर्यंतच नाही, तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्यांचं काम इतकं वैशिष्ट्यपूर्ण असतं की ” चमचेगिरी” हा शब्द त्यांच्यासाठी पुरेसा नसतो. विशेष म्हणजे हे चमचे अदृश्य असतात. त्यांचे रंग-रूप- आकार आणि कामाचा आवाका, अगदी मुरब्बी मातब्बरांनाही समजू शकत नाही. तरीही सगळ्याच प्रकारच्या कार्यक्षेत्रात ते सतत वापरले जातात. अहो घरातले चमचे एकवेळ चिकाटीने नेमके मोजता येतील, पण हे घराच्या बाहेरचे चमचे?….ते चमचे आहेत हेच मुळात कितीदा समजत नाही, मग मोजणं तर लांबच… म्हणजे बघा, चमचा कुठल्याही प्रकारचा असला , तरी त्याचं काम कुणासाठी तरी गरजेचं आणि महत्वाचं असतंचना? मग त्याच्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करणं हा औपचारिक रिवाज पाळायला हवाच …. पटतंय ना? मग म्हणा तर ….”जागतिक चमचा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ” …….

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

ती आईला आणि नातवाला भेटायला निघालीय. म्हातारपण लहान मुलासारखं अस तं  म्हणून आईला काय खाऊ न्यायचा, नातवाला काय न्यायचा याचा ती विचार करते. आता तीही थकलीय पण दोन्ही ठिकाणी काळजाचे घड होते. त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तिला उत्साह येतोच. नवऱ्याच्या रिटायरमेंटनंतर  ते गावाजवळ राहत होते। मुलगा नोकरिमित्त शहरात। माहेर जवळच होतं तिथून.  आईला भेटून तसंच मुलाकडे जायचं.  दोघांनाही काहीतरी न्यायला हवं हे सतत आतून वाटतं. मोकळं जाणं बरं वाटत नाही. विकतचे खाण्याचे पदार्थ घेणे पटत नाही. भले ही भेट महिन्या दोन महिन्यातून का असेना.  विकतचे काही नेणं तिला आवडतच नाही.  विकत त्याचं ते घेऊ शकतातच की.  आपलं माया, प्रेम त्यात उतरणार आहे का?

आईसाठी बिनतिखटाची चार थालीपीठ केली.  नातवाला एक घेतल. खजूर आईसाठी तर काजू बदाम नातवासाठी खडीसाखर दोघांना आवडते.  रव्याचे लाडू लेकासाठी बेसनाचे सुनेला आवडतात.  माहेरी भाऊभवजयीला, भाचरांना लाडू. असा सगळा हिशोब करत तिची आवरा आवरी चाललेली.  नवऱ्याचा दोन्ही वेळेचा सैपाक करायचा.  उद्यासाठी मदतनि

साला सांगायचं कसा कसा सैपाक कर…  नवऱ्याला बजावलं, चारदा जेवण झालं की, नीट झाकून ठेवा। चपतीचा डबा पाण्याच्या ताटात ठेवा, नाहीतर मुंग्यांनी लगेच भरतो। वेळेत गोळी खा आणि तसा मेसेज करा. हे सगळं करुन नऊच्या गाडीने निघायला हवं. नाहीतर गाडी चुकली कीं बारालाच एकदम. तिची घाई चाललेली.

नवऱ्याच्या सूचना ऐकयला लागत होत्याच.  परवा लवकर निघ. वगैरे, वगैरे…

तिला आईजवळ दोन दिवस आणि नातवाजवळ चार दिवस राहावं वाटत होतं, पण नवऱ्याला एकटं सोडून नकोही वाटत होतं. ती म्हणायची आपण मुलाजवळच राहू पण नवऱ्याला हे पटत नाही.  स्वातंत्र हवं प्रत्येकाला.

एकत्र राहून नाही का मिळत????  कुणाच्या जगण्यात ढवळाढवळ नाही करायची.  आपापली कामे करायची.

तिला मात्र एकत्र राहण्यामुळे सुरक्षित वाटतं. तसं एकेकट नाही वाटत. आतापासून सवय लागली एकमेकांची तर पुढे सेवा करतील. तिला मुलांपासून दूर राहणं पटतच नाही. मुलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या भावना का कळू नयेत???

ती एसटीत बसली तेव्हा तिला विसावा मिळाला. शांतपणे ती डोळे मिटून बसली.  काय घेतलं, काय राहिलं तर नाही ना याची मनोमन उजळणी करत असताना तिचं मन भरून आलं.  का कुणास ठाऊक तिला रडावस वाटलं.  दुःख नाही राग नाही तरी असं का व्हावं????

ती विचार करत असताना जाणवलं,  आपली आई असच सगळ करायची.  नको म्हटलं तरी ऐकायची नाही. तिचा त्रास बघून रागवायचेही, तरी ती करत राहायची॰  एकदा दिवाळी झाल्यावर आम्ही गेलो होतो आणि तिचे लाडू संपलेले. लेक आली आणि लाडू नाहीत म्हणजे काय….

आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी परतायचे होते. ती पहाटे उठली,  जात्यावर डाळ दळली.  कारण बेसनही संपले होते। आम्ही उठायच्या आत तिचे लाडू तयार झाले होते. किती वाजता उठली होतीस असं विचारलं तर म्हणाली,  झोपले कुठे होते ?…

आत्ता कळू लागलंय ती हे सगळं का करत होती?  हे करण्यात तिला केवढी ऊर्जा मिळत होती. कष्टाचं तिला काहीच वाटत नव्हतं. यालाच तर प्रेम माया जिव्हाळा म्हणतात.

हे प्रेम एकत्र राहून नातवाला शिकवायला हवं.  सहवासातील प्रेम त्याला नाही मिळालं तर तो माणूसघाणा होईल, असं तिला वाटायचं. पण नवरा ऐकत नाही.

तिला नातवापासून दूर राहावं लागतं.  त्यामुळे तिला वाईट वाटतं….

आई फोनसाठी जीव तोडते. सतत फोन कर म्हणते,  तेव्हा कळते की आपल्या माणसाचा आवाज ऐकण्यासाठी जीव किती आसुसलेला असतो.

ही असोशी कशानेही मिटत नाही. नातवाचा आवाज ऐकण्यासाठी तीही अशीच व्याकुळ होते.  आत्ता तिला आईचं मन कळू लागलंय.  ती आजी झाल्यानंतर……

 

© सौ. सावित्री जगदाळे

१४/२/१९

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र फुलांची ओंजळ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ ? मैत्र फुलांची ओंजळ ?☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आम्हा दोघा पती-पत्नींना माणसे जोडायची आवड आहे. याच ओढीतून पंधरा वर्षांपूर्वी आम्ही सांगलीत आमच्या घरी एका ग्रुपची स्थापना केली. सोमवारी जमतो म्हणून ‘सोमवार ग्रुप’. १२-१५ जणांचा हा ग्रुप ५० जणांचा कधी झाला हे कळलेच नाही. ज्ञान- विज्ञान- माहिती, छंद आवडीनिवडी, सुखदुःख, जिवाभावाचे सर्व काही एकमेकांशी वाटून घेत हा ग्रुप एक मोठे कुटुंब बनले आहे. आज आम्ही तिथून पुण्यात आलो तरी या ग्रुपशी नाळ घट्ट बांधलेली आहे. नित्य संवाद सुरू असतो.

काही वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या या ‘सोमवार ग्रुप’ साठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची रूपरेषा अशी काहीच ठरवलेली नव्हती. एकत्रित गप्पा सुरू होत्या. एका मैत्रिणीची बहीण आमच्या ग्रुपचा कार्यक्रम पाहायला आलेली होती. पुण्याची ही पाहुणी मैत्रीण सुरेल गायिका निघाली. तिने आग्रहाखातर गाणे म्हटले ‘ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे ‘, आणि पाहता पाहता सगळ्यांचा मूडच पालटला.

कोणीतरी ह्यांना मागच्या आठवणी विचारल्या. आमच्या लग्नाच्या संदर्भातील प्रश्नांनी मन भूतकाळात गेले. असंख्य आठवणींनी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. मैत्रिणींच्या चेष्टामस्करीला जोर चढला. जणू सगळ्यांच्यातच तरूणाईचे चैतन्य संचारले होते. आमच्या सदस्यांचा वयोगट साधारणपणे ३५ते ८२-८३ वर्षांचा आहे. जवळजवळ पंचवीस तीस जण हजर होते. हास्यविनोदात वय विसरून सर्व जण मन मोकळे झाले होते.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच प्रत्येकापाशी मुखावरचा निर्मळ आनंद आणि मनापासून भरपूर शुभेच्छा होत्या; ज्यामुळे खूपच भारावून जायला झाले. शेवटी मैत्री ही आयुष्यातील मोठी मिळकत असते. एका मैत्रिणीने तर आम्हा दोघांना दोन ओंजळी भरून अतिशय सुवासिक अशी तिच्या बागेतली जुईची फुले दिली. तिची ही सुगंधी भेट तर फारच अनमोल अशी होती. शेवटी मैत्रीत ‘देणं-घेणं’ काही नसतंच. असतो फक्त एकमेकांना आनंद वाटायचा. ह्या फुलांनी आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद दिला. सारा हॉल सुवासाने भरून गेला. एका मैत्रिणीने एक छानशी कविता वाचली. या छोटेखानी कार्यक्रमाचा हा एक मनोहारी आनंद मेळावा झाला. आमच्यासाठी हा आयुष्यातील एक सुखद क्षण ठरला आणि याची सांगता झाली पाहुण्या मैत्रिणीच्या गाण्याने ” जीवनात ही घडी…… !”

खरोखरच ‘ही घडी’ मनात जपून ठेवावी अशीच होती. आपण आयुष्यात एकमेकांशी अनेक नात्यांनी बांधलेले असतो. पण त्यात मैत्रीचं नातं हे अतिशय मोलाचं असतं. हक्क-जबाबदाऱ्या  यांच्या कसल्याही फूटपट्ट्या नसणारी निरपेक्ष मैत्री ही आयुष्यातील वाटचालीची शिदोरी असते. सर्व सुख-दु:खात, कठीण प्रसंगात, हास्यविनोदात साथ देते ती मैत्री. या मैत्रीमुळे ‘एकला चलो रे ‘चा एक तांडा बनतो. या मैत्रीच्या जोरावरच आपण आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे करत असतो. अशी निखळ मैत्री ज्यांना लाभली ते खरोखरच भाग्यवान. या मैत्रीचा स्नेह सुगंध मनात सदैव दरवळत राहतो आणि आपली आयुष्य निश्चितच पुलकित होतात.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोरवी ज्ञानेश्वरीची ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – BA मराठी, M. A. भरत नाट्यम

नृत्या मध्ये पारंगत, कविता, लेख, दिवाळी अंकांमधून प्रकाशित . स्वतःचा कथा, नकला, नृत्य यांचा कार्यक्रम प्रसारणाच्या टप्यावर.

आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। आदरणीय सौ अंजली गोखले जी का आभार। ई- अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग एडिटर – हेमन्त बावनकर 

 

☆ विविधा ☆  थोरवी ज्ञानेश्वरीची ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौअंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

‘ज्ञान देव बाळ माझा, सांगे गीता भगवंता

लक्ष द्या हो विनविते .

मराठी मी त्याची माता’

माझे हे सगळ्यात आवडते गाणे आहे. B.A. ला मराठी शिकत असताना ज्ञानेश्वर माउलींची ओळख झाली आणि मनोमन मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्याबद्दल जे जे ऐकायला मिळालं ते सगळं माझ्या हृदयावर, मनावर कोरले गेले. त्यातलीच एक छोटी आठवण सांगते.

ज्ञानदेवांनी आपल्या गुरूंच्या, निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून भावार्थ दीपिका लिहिली. तीच पुढे ज्ञानेश्वरी म्हणून उदयाला आली. त्यावेळी लोकांना ज्ञानेश्वरी इतकी भावली इतकी भावली की लोकांनी ज्ञानदेवांची हत्तीवरून मिरवणूक काढायची ठरवली. ज्ञानदेवांच्या संमतीशिवाय हे होणे अशक्य. म्हणून सगळेजण ज्ञानदेव आंकडे परवानगी मागायला गेले. पण ज्ञानदेव कसले ऐकत आहेत? नम्रपणे त्यांनी सांगितलं, “अहो, हे केवळ गुरुकृपेने घडलं आहे. त्यांचाच तो मान आहे”. झालं सगळे निवृत्तिनाथ कडे आले. तेही निस्पृह.अजिबात ऐकायला तयार नाहीत.

कोणी म्हणाले सोपान लहान आहे, त्याला हा मान देऊया. मुक्तालाही लोकांनी विचारले. मुक्ता म्हणाली, “अहो,आम्ही संन्यासाची मुले, ज्ञानोबांनी लिहिलेला हा ग्रंथच खरा श्रेष्ठ आहे. तोच सर्वांना पुढेही मार्गदर्शन करणार आहे. खरामान या ज्ञानेश्वरीचा आहे. आम्ही निमित्तमात्र आहोत.”

अखेर निश्चित झाले. ज्ञानेश्वरीचा हत्तीवरून सन्मान करायचा, मिरवणूक काढायची. धन्य ती भावंडे ज्यांनी ज्ञानेश्वरीची थोरवी लिहिली गायली पटवली अन्न आचरणात आणून धन्य केली.

ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांचे मोठेपण आजही टिकून आहे. सातशे वर्षानंतरही ही ही ग्रंथसंपदा तोलामोलाचे आहे. आजही त्याची थोरवी, महत्व, मार्गदर्शन आपल्याला अनमोल ठरते आहे.

 

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ थेंबाचे अस्तित्व☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ क्षण सृजनाचा ☆ थेंबाचे अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

पावसाळ्यात माझ्या घराच्या पागोळ्यांवरून पडणारे थेंब निरखणे हा माझा विरंगुळा ! समुद्राच्या लाटा पाहण्यात जसा वेळ जातो ना अगदी तसंच काहीसं…….पुन्हा पुन्हा तीच गोष्ट पण मनाला नव्याने जाणवणारी अशी…..

थेंबांचे निरीक्षण करता करता मी थेंबांच्या अस्तित्वा विषयी विचार करू लागले. माझ्या डोळ्यांना दिसतो तोवर त्याचं अस्तित्व का? मातीत विरे पर्यंतच त्याचं अस्तित्व का ?की माझ्या मनात हृदयात आठवणीत तो असेपर्यंत त्याचं अस्तित्व?…..

थेंब नंतर कुठे जातो? ओढ्यात, डोहात, नाल्यात, समुद्रात ,नदीत ,मातीत की पुन्हा ढगात ?

मला तो नानाविध रूपात, रंगाढंगात  दिसतो. किमान माझ्या मनात तो आहे हे त्याचं अस्तित्व मी नाकारू शकत नाही.

ह्या त्याच्या नश्वर प्रवासाची कहाणी मी कविता स्वरूपात लिहिली .

 

थेंबाचं अस्तित्व

एकदा एक थेंब……

मातीवर पडला

मृदगंध आला

अन् श्वासात भरला

 

एकदा एक थेंब

फुलावर पडला

दवबिंदू झाला

अन् चमकू लागला

 

एकदा एक थेंब

डोहात पडला

मित्रांसोबत डुंबला

अन् न्हाऊन निघाला

 

एकदा एक थेंब

बीजाला बिलगला

बीज अंकुरले

भरून पावला

 

एकदा एक थेंब

अळवा वर पडला

अळवावरचे पाणी म्हणून

नाकारला गेला

 

एकदा एक थेंब

अग्नित पडला

वाफ होऊन

ढगात गेला

 

एकदा एक थेंब

गाला वर पडला

खळी होऊन

गोड हसला

 

एकदा एक थेंब

हातावर पडला

तीर्थ होऊन

पवित्र झाला

 

एकदा एक थेंब

चक्षूतून ओघळला

अश्रु होऊन

मुग्ध गहिवरला

 

एकदा एक थेंब

अमृत होऊन आला

मोहिनीच्या हातून

जीवनदायी ठरला

 

एकदा एक थेंब

समुद्राच्या फेसातून उठला

सूर्याच्या किरणांनी

सोनेरी झाला

 

एकदा एक थेंब

चातकाला मिळाला

तृषा त्याची भागवून

पुण्यवान ठरला

 

एकदा एक थेंब

नदीला भेटला

एकरूप होऊन तिच्याशी

सार्थकी लागला

 

एकदा एक थेंब

शिंपल्यात पडला

मोती होऊन

चमकत राहिला

 

एकदा एक थेंब

दुसऱ्या थेंबाला मिळाला

थेंबे थेंबे तळे साचले

पुढे त्याचा प्रवाह झाला

 

इटुकला थेंब

पिटुकलं अस्तित्व

थेंबा थेंबा ची एकजूट

करी संपन्नतेची लयलूट

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नातं कस असावं, तर एखादा गोफ सुरेख विणलेला असतो तस असावं. एकमेकांची मने घट्ट सुबक विणलेली असावीत.

एकाच्या दुःखाने नकळत दुसर्‍याच्या पापण्या ओल्या व्हाव्यात, तर एकाचे सुख दुसर्‍याच्या चेहर्‍यावर ओसंडून वहावे.

नात्याला कोणते लेबल असलेच पाहिजे असे नाही,पण असलाच तर खरेपणा असावा, प्रेम, जिव्हाळा असावा, विश्वास असावा आणि महत्त्वाचे म्हणजे नात्यात पारदर्शकता असावी. जे असेल ते उघड आत बाहेर काही नाही, लख्ख प्रकाशा सारखे.

नातं माऊ गोधडी सारख असावं, मायेच्या उबेन भरलेल हव. हव हव असवाटणार खरखरीत रगा सारख नसावं, जे हव तर असत पण नाईलाज म्हणून.

मला खरच मनापासून वाटते की एखाद तरी नातं अस नक्की असावं, जिथे हक्काची एक हाक असावी, मायेची एक थाप असावी आणि न मारलेली हाक सुद्धा त्या व्यक्तिला ऐकु जावी.

खूप कमी जणांच्या नशिबात अशी नाती असतात आणि ज्याला ती मिळतात तो खरा भाग्यवान नाही का? असे मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संवाद ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ संवाद ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

संवाद हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग/घटक आहे. संवादाशिवाय माणूस राहुच शकत नाही. दोन व्यक्तिंमध्ये नाते निर्माण होते तेदेखील त्यांच्यामधील सतत घडणार्‍या संवादामुळेच. संवादामुळे नुसतेच नाते निर्माण होत नाही तर ते फुलते, विकसित होते आणि ते सुदृढही होते. मग नाते कोणतेही असो. मैत्रीचे असो, पतिपत्नीचे असो, आईवडील, भाऊबहीणीचे असो. या सर्व नात्यांचे मूळ सुयोग्य संवादातच असते. संवाद संपला, थांबला अथवा खुंटला तर त्या नात्याला घरघर लागलीच म्हणुन समजा. तेंव्हा नात्यामध्ये सतत संवाद हा हवाच. रोजच्या जीवनात म्हणुन संवादाला फार महत्व आहे.

संवादामधून आपण अनेक गोष्टी साध्य करीत असतो. संवादामुळे दोन व्यक्तिंमधील गैरसमज दुर होतात. नियमित संवाद असेल तर गैरसमज निर्माणच होत नाहीत.

संवाद म्हणजे बोलणे. नुसतेच बोलत राहणे म्हणजे संवाद नव्हे. दुसरे काय म्हणताहेत, दुसर्‍यांचे म्हणणे काय आहे हे शांतपणे लक्ष देऊन ऐकणे यालासुध्दा संवादच म्हणतात.

पण बर्‍याचवेळा आपण संवादाशिवायही आपण आपले म्हणणे सांगु शकतो. आपण आपल्या देहबोलीतूनही (body language) अनेक गोष्टी व्यक्त (राग, प्रेम, आनंद) व्यक्त करीत असतो. अशावेळी बोलण्याची आवश्यकता नसते. एक गोष्ट मात्र नक्की की आपण हे नेहमी पाहीले पाहीजे की संवाद बंद होता कामा नये, संवाद हरवता कामा नये.

दुसर्‍या व्यक्तिशी आपण सहज संवाद साधु शकतो. पण आपल्याला स्वत:शी संवाद साधता आला पाहीजे. स्वत:शी बोलता आले पाहीजे. यातुनच आपण स्वत:ला ओळखु शकतो. बर्‍याचवेळा आपण अनेक चुका करतो. स्वत:शी केलेल्या संवादातुनच या चुका आपल्याला ऊमगतात.एकदा का चुक समजली की ती दुरूस्त करू शकतो किंवा भविष्यात आपण त्या चुका करणार नाही. स्वत:शी संवाद सुरू केला की आपण अहंगड/न्युनगंडावर सहज मात करू शकतो कारण यामधुन आपण स्वत:ला ओळखु लागलेलो असतो. स्वत:शी केलेल्या संवादावरून आपण नॉर्मल लाईफ जगु शकतो.

संवाद जसा दोन व्यक्तिंमध्ये घडत असतो तसाच तो दोन देशांमध्ये/दोन राष्टांमध्ये सुध्दा घडत असतो. दोन देशांमध्ये नियमित संवाद असेल/ बोलणे असेल तर सर्व व्यवहार सुरळीत होतात. व्यापार तसेच संबंध सुरळीत होतात. अगदी युध्दजन्य परिस्थिती असेल आणि त्या देशांमध्ये संवाद असेल तर ती परिस्थिती निवळण्यात मदतच होते. युनोचे कामच हे आहे की सर्व राष्टांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये नियमित संवाद घडवून आणणे. त्यामुळे संवादाला आपल्या आयुष्यात फार महत्व आहे.

तेंव्हा आपण काळजी घेऊया की आपल्या दैनंदीन जीवनात संवाद हरवणार नाही.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

(निवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण। )

☆  काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘पैंजण’ ही नीलम माणगावे यांचीनिवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण कविता, चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे.

आजी जड, वजनदार पैंजण घालून  आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

आईने जड, वजनदार पैंजण  वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ने हे सगळं सहन केलं.

आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊदेत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी….’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’ असं म्हणणारी तिची मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

कविता मुक्तछंदात आहे. प्रत्यक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची….’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं , ना खुपणं, ना चिघळणं,’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळाणं, फाटणं काहीच नको. …’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले असणार.

२०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास ती अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे.

महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भरतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print