कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । आज रक्षा बंधन के इस पर्व पर इस लेखमाला की शृंखला के अंतर्गत आलेख रक्षाबंधन :- स्नेह संवर्धन को हम विशेष रूप से गुरुवार को प्रस्तुत कर रहे हैं । आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। )
☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प बारावे # 12 ☆
☆रक्षाबंधन :- स्नेह संवर्धन ☆
*चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला*
किंवा
*रेशमाच्या धाग्यांनी सजली राखी पौर्णिमा*
*बंधुत्वाच्या बंधुतेची दे प्रेरणा मजला*.
अशा भावस्पर्शी ओळीतून ही भावस्पंदने मनात रूजली आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक काळात संधी, तह, सलोखा, सामंजस्य, राज्य विस्तार, देशरक्षण, अशा भावनेतून सुरू झालेली ही रक्षाबंधन परंपरा एक संस्कार क्षम सण आहे.
समाजपारावरून हा कौटुंबिक विषय चर्चेला घेताना मन भरून आले. पण सध्या साजरे होत असणारे सण पाहिले की मन विषण्ण होते. मूळ उद्देश समजावून न घेता केवळ मनोरंजनाचे माध्यम आणि एकत्र येण्याचे निमित्त म्हणून रक्षाबंधन या सणांकडे पाहिले जाते.
आधुनिक काळात मात्र देणे घेणे यात नवी
पिढी जास्त गुंतलेली आहे. भावनेला दिखाऊ पणाची आणि नात्याला हिशेबी व्यवहारीकतेची जोड मिळाल्याने या सणाचे मांगल्य, पावित्र्य कुठेतरी हरवत चालले आहे. बहिणीचे रक्षण आणि बहिणीने भावाच्या दिर्घायुष्यासाठी केलेले औक्षण , देवाकडे केलेली प्रार्थना ,भाऊ बहीण यांचे स्नेहभोजन हा हेतू या सणाचा बाजूला पडून या सणाकडे फक्त एकत्र येण्याचे निमित्त म्हणून पाहिले जात आहे.
रक्षाबंधनाचा आणखी एक हेतू म्हणजे बहिणीने भावाला राखीच्या नाजूक भावबंधनात बद्ध करताना आपल्यावर जर एखादे संकट आले तर तै निवारण करण्यासाठी केलेली विनंती आणि भावाने आशिर्वाद देऊन रक्षण करण्याचे दिलेले वचन हा आहे. यासाठी : आपला भाऊ सदैव सावलीप्रमाणे उभा असावा आजन्म त्याचे प्रेम, स्नेह बहिणीला लाभावा म्हणून बहाणीने केलेले स्नेहबंधन म्हणजे रक्षाबंधन होय ……!
कौटुंबिक मालमत्तेत बहिणीला मिळणारा वाटा यावर आता हे नाते आपला तोल सांभाळत आहे. कित्येक वेळा बहिण भावाचे रक्षण करते अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळत आहेत. अशा वेळी भाऊ आणि बहिण यांच्यातील भावनिक नाते, एकमेकांना साथ देण्याची आश्वासक भूमिका रक्षाबंधनाचा मूळ हेतू साध्य करू शकेल असे मला वाटते.
भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला काय दिले यापेक्षा परस्परांनी एकमेकांना आपल्या ह्रदयात दिलेली जागा तो चंदनी पाट, एकमेकांची वाट पहाताना पाणावलेले डोळे, भेट झाल्यावर उजळलेले चेहरे आणि रेशमी राखीने अंगभर फिरणार्या मोरपिशी आठवणी या रक्षाबंधनाची महती जास्त प्रगल्भ करतात.
बहिण लहान की मोठी या पेक्षा बहिण आणि भाऊ यांनी एकमेकांना बहाल केलेली अंतरीक माया ममतेची उंची या राखीला अलौकिक उंची प्राप्त करून देते. भावाला पोटभर जेवताना पाहून दाटून आलेला बहिणीचा स्वर, स्वतःची काळजी घे, येत जा या वाक्यातला आपलेपणा हा सण साजरा करून जातो. भावना, विचार आणि आचार यांच्या त्रिसूत्रीने हे रक्षाबंधन फक्त बहिणीची नाही तर प्रत्येक व्यक्तीमत्वात दडलेल्या माणसाची, त्याच्यातल्या माणुसकीची रक्षा करणारे आहे.
चंद्राच्या सोळा कला ज्या प्रमाणे कला,सुख, समृद्धी, यांची वृद्धी आणि दुःख, दैन्य, दारिद्र्य यांचा क्षय करतात त्या प्रमाणे भाऊ बहीणीचे हे नाते स्वभाव, कला, स्नेह यांच्या चांदण्याने फुलत राहो अशी कवी कल्पना या सणाचे महत्त्व अधिक संवेदनशील करते. राखी हे निमित्त आहे माणूस माणसाशी जोडला जाणे ही मूळ भावना हे भावबंधन हा सण शिकवून जातो हेच खरे.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.