शाळेला सुट्टी मिळालेल्या पोरासोराने अंगणामध्ये सुंदर किल्ला बांधला. मावळे विराजमान झाले.. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर अरुढ झाले.. जागोजागी भगवे झेंडे फडकू लागले… पोर आनंदाने टाळ्या पिटू लागली.. पहाटे अंगणात केरवारे झाले.. सडा टाकला गेला. सुंदर रंगवलीत रंग भरले गेले.. पणत्यांच्या रूपाने आकाशीची नक्षत्र अंगणात ऊतरून आली.. अंगणाचे रूप कसे दिमाखदार रंगीबेरंगी झाले. नहाणी घरात सुवासिक तेलाचा आणि उटण्याचा सुवास दरवळू लागला.. घंगाळाच्या पाण्यातन वाफा निघू होऊ लागल्या… मनसोक्त पाण्याने आंघोळीझाल्या.. साबणाच्या वासाने देहाला घमघमाट आला. देवघरामध्ये मंत्रोच्चार होऊन पूजा झाल्या अभिषेक झाले देवासाठी केलेल्या खास बेसनाच्या लाडवांचा प्रसाद त्यांना दाखवला गेला. इथे पावेतो घरातल्या सगळ्या बायका नटून थटून तयार झाल्या नव्या साड्यांची सळसळ कानी येऊ लागली बैठकीच्या हॉलमध्ये पाट रांगोळी झाली फराळाची जय्यत तयारी सुरू झाली. सारी मंडळी आरतीसाठी देवघरात जमली आरती आणि प्रसाद झाल्यावर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेणं सुरू झालं नमस्कार आशीर्वाद झाल्यानंतर सगळी मंडळी फराळाच्या पानावर स्थानापन्न झाली लाडू चकली चिवडा शंकरपाळे कडबोळे अनारसे यांनी पान सजली पुरुष मंडळी बायकांचे कौतुक करून फराळावर ताव मारू लागली आणि बायका त्यांना आग्रह करून वाढू लागल्या… चेष्टा मस्करी हसणे खिदळणे आणि पोरट्यांचा कल्ला यात फराळ उरकला मग महिलांची पंगत.. छे छे बायकांची पंगत माज घरात रंगली.. पुरूष मंडळी गाद्यांवर सुपारी खात बैठक मारून होते. दिवाळी अंकाची पानं चाळण्यात सगळे मग्न. पोर सर्व फटाके उडवायला केव्हाच पळाली. आतून आजी आजोबांची लकेर सावकाश उडवा रे – काळजी घ्या– भाजून घ्याल नाहीतर…. इत्यादी सूचनांचा भडीमार सुरू झाला पण लक्षात कोण घेतो ? पोरं फटाक्यात मग्न आणि बायका पुढच्या स्वयंपाकाला लागलेल्या….
असो… ! दिवाळीचे हे दृश्य फक्त आता कथा कादंबऱ्यात वाचावं. घरात इन मीन चार माणसं.. सगळं रेडीमेड.. फराळ, इडली वडा यांना डिशमध्ये स्थान आले. सगळ्यांनी मोबाईलमध्ये तोंड खूपसायचे आणि हॅप्पी दिवालीचे मेसेजेस पाठवायचे —-
पण वरील वर्णनाची दिवाळी ज्यांनी अनुभवली ते भाग्यवान… अशा सर्व भाग्यवंतांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
☆ अशी ही एक दिवाळी…☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
दिवाळीच्या आधीचा दिवस ! सगळीकडे फटाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. वसुबारसपासूनच
आकाश कंदिल आणि दिव्यांच्या माळा वातावरण सुशोभित करत होत्या. दारासमोर रांगोळ्या दिसत होत्या. नवीन कपड्याने बाजार गजबजलेला होता. दिवाळीच्या पणत्यांनी घरे उजळून निघाली होती. घराघरातून फराळाचे वास दरवळत होते. एकंदर वातावरण दिवाळीच्या उत्साहाने भारून गेले होते आणि मी मात्र हॉस्पिटलच्या दिशेने चालले होते, आज सासूबाईंची तब्येत कशी असेल या विचारात !
आठच दिवसापूर्वी सासूबाईना अचानक पॅरॅलेसिसचा अटॅक आला होता, तसे त्यांना ब्लडप्रेशर होतेच. माझे मिस्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल आॅफिसर म्हणून काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. माझे मिस्टर तिथेच काम करत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला घरच्यासारखेच होते! तिथे नेल्याबरोबर लगेच स्पेशल रूम, ऑक्सिजन, सलाईन सर्व चालू झाले. मॉनिटरिंग नीट होत असल्यामुळे त्यांना लवकरच आराम वाटू लागला. तरीही आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्याने आम्ही दिवाळीपर्यंत दवाखान्यातच होतो. त्या काळात अनुभवली ती हॉस्पिटलची दिवाळी! आमच्या घरातील सर्वजण आळीपाळीने दवाखान्याच्या वेळा सांभाळत होतो. पण रात्रपाळी माझ्याकडेच होती. ज्या स्पेशल रूममध्ये ठेवले होती ती रूम वाॅर्डच्या दाराजवळच असल्याने मला खोलीतूनच बाहेरील सर्व हालचाल दिसत असे.
खरंच, हॉस्पिटलचे वातावरण कसे असते ना! त्यातून सिव्हिल हॉस्पिटलचे! केव्हाही पेशंट्स येत- जात असत, कॅज्युअलिटी डिपार्टमेंट 24 तास चालू असे, कधी एक्सीडेंट पेशंट तर कधी इमर्जन्सी पेशन्ट्स तर कधी डेड बॉडी अचानक येत! त्यांच्यासोबत पोलीसही आलेले असत. सतत काहीतरी घडामोडी चालू असत, पण मी होते त्यावेळी दिवाळी जवळ आल्याने जरा वेगळे वातावरण होते. हॉस्पिटलमध्ये वाॅर्ड स्वच्छ करणे, सुशोभित करणे यासंबंधी स्पर्धा लावलेल्या होत्या. त्यामुळे एरवी गॉज् तयार करणे, इंजेक्शन साठी कापसाचे बोळे तयार करून ठेवणे, ग्लोव्हज पावडर मध्ये घालून ठेवणे अशी कामे करणाऱ्या आया आता वाॅर्डच्या सुशोभीकरणाकडे वळल्या होत्या. रात्री जागून रंगीबेरंगी कागदांच्या पताकांच्या माळा तयार होत होत्या, प्रत्येक वार्डमध्ये आकाश कंदील लावले होते, वाॅर्डच्या दारात रांगोळ्या घातल्या होत्या. मेण पणत्या तेवत होत्या. आपले दुःख, आजारपण विसरून आजारी लोक आणि त्यांचे नातेवाईकही उत्साहाने यात जमेल तेवढा भाग घेत असत. मी रोज झोपायला जात असल्याने मला हे सर्व रात्री उशिरापर्यंत बघायला मिळत होते. नर्सेस आया आपली कामे उरकून दिवाळी सजावटीला हातभार लावत होत्या. आनंद कुठेही निर्माण करता येतो आणि ती माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे हे खरं आहे!
दिवाळी घरी काय आणि इथे काय! जिथे आनंद तिथे दिवाळी! दिवाळीच्या दिवशीच सासूबाईंना डिस्चार्ज देणार होते, त्यामुळे आधीच्या रात्री मी हे सर्व पाहत होते. एरवी कोण सिव्हिल हॉस्पिटल ला जाते! सकाळी सकाळी फराळाचे खोकी तिथे आली होती. काही वाॅर्डात फळांच्या करंडयाही दिसत होत्या. लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये तर बिस्कीट पुडे, फराळांची खोकी याची रेलचेल दिसत होती! आपापल्या परीने आनंदाची दिवाळी चालू होती. पहाट झाली, सनई वादनाची रेकॉर्ड लागली आणि आम्ही घरी जायच्या तयारीला लागलो. तिथे नेलेले सामान भरणे, डिस्चार्ज पेपर तयार करून घेणे, ॲम्बुलन्सची वेळ ठरवून घेणे वगैरे चालू होते. हे स्वतः ड्युटीवर असल्याने सकाळी कॅज्युअलिटी संपवून ते आमच्याबरोबर घरी येणार होते.
इकडे घरी काय चालले आहे याची कल्पना नव्हती. पण माझा भाऊ आणि वहिनी मी दवाखान्यात असल्यापासूनच घरी आलेले होते. त्यामुळे मला मुलांचे टेन्शन नव्हते. तसेच माझे दीर-जाऊबाईही तिथेच रहात होते. दिवाळीच्या सर्व फराळाचे सामान वहिनी घेऊन आली होती. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा वहिनीने दारात सडा रांगोळी केली होती. सासूबाईंची तब्येतही आता बरी होती. त्यामुळे आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला होता. सासुबाईंची एका खोलीत व्यवस्था लावली आणि आम्ही जरा निवांत झालो. त्या पहिल्या अटॅक नंतर चार-पाच वर्षे सासूबाई होत्या. जवळपास 30 वर्ष होत आली या गोष्टीला! पण दिवाळी आली की हॉस्पिटलमध्ये साजरा केलेला दिवाळीचा पहिला दिवस आठवतो. एरवी आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हटले की थोडे नाराजच असतो, पण तिथे राहून अनुभवलं की लक्षात येते तेथील सर्व लोक किती व्यस्त असतात. त्यांनाही सणवार सोडून ड्युटी करावी लागत असते. सतत आजारी माणसांच्या सेवेत राहूनही आनंदाचे काही क्षण ते वेचत असतात आणि आनंद घेत असतात. या सिस्टर्स, ब्रदर्स आणि इतर स्टाफ सतत कार्यरत असतो. पेशंटची कुरकुर चालू असते, ते सर्व त्यांना संयमाने ऐकावे लागते अर्थात तिथेही काही काम चुकार लोक असतात पण ते प्रमाण कमी असते. या आठ दिवसात हॉस्पिटलच्या वातावरणाबरोबरच तिथली दिवाळीची तयारीही मला पाहायला मिळाली !
अलीकडे आपण कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व स्टाफ किती काम करीत होते हे पाहिले, ऐकले. हॉस्पिटलची सेवा म्हणजे लोकसेवेचे, चिकाटीचे, काम ! संयमाने काम करीत असलेली ही मंदिरे आहेत ! त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. हे सर्व अनुभव स्वतः घेतले म्हणून त्याबद्दल आत्मीयता वाटली आणि अशी ही एक आठवणीतील दिवाळी कायमच माझ्या स्मरणात राहिली !
☆ शौर्य गाथा : हुतात्मा मेजर सोमनाथ शर्मा – अंग्रेजी लेखक : अज्ञात ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
शौर्य गाथा – – मेजर सोमनाथ शर्मा,
भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते, मेजर सोमनाथ शर्मा, १९४७ च्या युद्धाचे नायक.
मागील शतकात भारताने बऱीच युद्धं पाहिली होती. भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्यापुर्वी पहिल्या व दुसऱ्या विश्वयुद्धात भाग घेतला होता.
फाळणीनंतर भारताने पाकिस्तान शी चार वेळा आणि एकदा चीन सोबत युद्ध लढले होते. या युद्धांमध्ये आपल्याला बरेच चांगले योद्धे गमवावे लागले होते. काही सैनिकांचा त्यांच्या कामगीरीबद्दल विशेष उल्लेख होणे हा त्यांचा हक्क आहे.
असेच एक सैनिक मेजर सोमनाथ शर्मा हे होते ज्यांना भारताचा सर्वोच्च सैन्य सन्मान, भारतीय सैन्य इतिहासात सर्वात पहिले परम् वीर चक्र देवून गौरविण्यात आले.
काय योगायोग आहे पहा, मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर यांच्या पत्नी सावित्री खानोलकर, ज्यांनी भारतीय सैन्यासाठी ब्रिटन च्या व्हिक्टोरिया क्राॅस च्या तोडीचे ‘परम् वीर चक्र’ पदकाचे प्रारुप (डिझाईन) बनवले, त्यांचे मेजर सोमनाथ शर्मा हे जावई होते.
मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी हिमाचल प्रदेशातील दाढ, कांडा येथील ब्राम्हण कुटुंबात झाला. ते एका विख्यात सैनिक परिवाराचे सदस्य होते. त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा जे सैन्याचे मेडीकल सर्विसेसचे डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले. त्यांचे बंधू लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा हे इंजीनियर- इन-चीफ म्हणून निवृत्त झाले आणि दुसरे बंधू जनरल विश्वनाथ शर्मा हे भारताचे सरसेनापती (१९८८-१९९०) आणि त्यांची बहिण मेजर कमला तिवारी या सैन्याच्या वैद्यकीय विभागात डाॅक्टर होत्या.
मेजर सोमनाथ शर्मा यांना 19 व्या हैदराबाद रेजीमेंटच्या आठव्या बटालियन (नंतरची कुमाऊँ रेजीमेंट ची चौथी बटालियन), (तेव्हाच्या ब्रिटीश इंडीयन आर्मी) मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अधिकारी म्हणून २२ फेब्रुवारी १९४२ रोजी रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या अरकान मोहिमेदरम्यान त्यांनी युद्धात भाग ही घेतला होता.
३१ ऑक्टोबर १९४७ रोजी सोमनाथ शर्मा यांच्या कंपनी ला विमानाने श्रीनगर येथे आणण्यात आले. आधी हाॅकी खेळत असतांना उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्यावर प्लॅस्टर चढविलेले होते तरीही युद्धात आपल्या कंपनीबरोबरच रहाण्याची त्यांची मागणी मान्य करीत परवानगी देण्यात आली.
या मोहिमेत मेजर सोमनाथ शर्मा यांच्या कुमाऊँ रेजीमेंटच्या चौथ्या बटालियनच्या डी कंपनीला काश्मीर खोऱ्यातील बडगाम या गावी सुरक्षेसाठी गस्त घालण्यासाठी आदेश देण्यात आला. ते त्यांच्या तुकडीसह शत्रूने तिन बाजूंनी घेरले गेले व शत्रूसैन्य संख्येने जास्त असल्याने त्यांच्या तुकडीला मोठे नुकसान सहन करावे लागले.
त्यांच्या लक्षात आले की ते व त्यांच्या सैनिकांनी ती पोस्ट सोडली तर श्रीनगर विमानतळ व श्रीनगर शहर शत्रूसैन्याच्या ताब्यात जाणार होते. त्यांनी आपल्या सैनिकांना रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्यास सांगितले. शत्रूच्या सात सैनिकांना आपला एक, इतकी संख्या घटूनही ते आणि त्यांची कंपनी हत्यार टाकायला तयार नव्हती आणि आपल्या सैनिकांना ते शौर्याने लढा देण्यास प्रोत्साहित करीत होते.
सैनिकांची संख्या कमी झाल्याने गोळीबार करण्याचा वेग मंदावला होता. त्यांचा हात प्लॅस्टर मध्ये असूनही बंदुकांमध्ये गोळ्या भरण्याचे काम त्यांनी त्यांचेकडे घेतले. बंदुकांमध्ये गोळ्या भरून सैनिकांना देऊ लागले व स्वतः लाईट मशीन गन चा ताबा घेतला.
ते शत्रूशी लढण्यात मग्न असतांनाच त्याच्याजवळच्या गोळ्यांच्या साठ्यावर एक बाॅम्ब येऊन फुटला व त्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या ब्रिगेड मुख्यालयाला पाठविलेल्या आवाजी संदेशात ते म्हणाले, “शत्रू आमच्यापासून पन्नास फुटांवर आहे, आणि आमची संख्या कमालीची घटली आहे. तरीही आम्ही एक इंचही माघार घेणार नाही पण आम्ही शेवटचा माणूस आणि शेवटची गोळी शिल्लक असेपर्यंत लढणार आहोत. “
त्यांनी जी हिम्मत, नेतृत्व व शौर्य दाखवत शत्रूसैन्याला सहा तास रोखून धरले ज्यामुळे भारतीय सैनिकांना घेऊन भारतीय हवाई दलाच्या विमानांना श्रीनगर विमानतळावर उतरता आले व श्रीनगर शहर आणि विमानतळावर ताबा मिळवण्याचे शत्रूचे मनोरथ धूळीस मिळवले.
स्वतः जखमी असूनही वयाच्या चोविसाव्या वर्षी अतुलनीय शौर्य, नेतृत्वगुण, सैनिकांचे मनोबल उंचावत ठेवून देशरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले म्हणून त्यांना भारताचे पहिले ‘परम् वीर चक्र’ पदक (मरणोपरांत) देऊन सन्मानित करण्यात आले. हे वीर जवान, तुझे सलाम। 🇮🇳
मुळ इंग्रजी लेखक- अनामिक.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
विवेकी : फटाके-मुक्त दिवाळी साजरी करा. फटाक्यामुळे प्रदूषण होते.
धर्मांध : का? 😡 आम्ही फटाके फोडणारच. 💥 कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे होणारे प्रदूषण तुम्हाला दिसत नाही. आम्ही हिंदुनी ४ दिवस फटाके फोडले की तुम्ही बोंबा मारता. हिंदुद्वेषी कुठले!
विवेकी : कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे प्रदूषण होते हे खरे आहे; पण ते चालू असल्यामुळे आपल्याला कित्येक सुख-सुविधा मिळतात, त्यामुळे ते अपरिहार्य असले तरी तेही प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि फटाके फक्त दिवाळीतच नाहीतर पूर्ण वर्षभर क्रिकेट, निवडणूक, लग्न, वाढदिवसाला फोडले जातात. फटाका फोडल्यामुळे काय फायदा होतो याचे एकतरी उदाहरण तू देवू शकतोस का?
धर्मांध : (थोड्या वेळ गप्प) उदाहरण द्यायची आम्हाला गरज नाही. आम्हाला फटाके फोडताना आनंद होतो. फटाके फोडणे ही जुनी हिंदू संस्कृती आहे… आमची परंपरा आहेे. हिंदूंचा आनंद हिरावला तर याद राखा 💪कानाखाली “शिवसूर्यजाळ” काढू. 😡
विवेकी : हा अहंकारच माणसाला रसातळाला नेतोय. खरंच या प्रदूषणामुळे सूर्यच एक दिवस असा सूर्यजाळ काढेल की, तुम्ही-आम्ही “मेलो” म्हणायलाही शिल्लक राहणार नाही. फटाका फोडल्याने स्वतःचे तसेच आपल्या अवतीभोवतीच्या अनेक लोकांचे नुकसान होते. तरीही तुला आनंद होणार असेल तर तो आनंद विकृत आनंद आहे. आणि मला सांग, हिंदूंच्या कोणत्या धर्म ग्रंथात दिवाळीत फटाके फोडावेत असे लिहिले आहे? खरे तर फटाके फोडणे ही आपली हिंदू संस्कृती नाही. ही विकृती चीन देशातून आपल्याकडे आली. जुनी वैगरे काही नाही. 150 वर्षापूर्वी भारतीयांना आजचे रासायनिक फटाके माहीतच नव्हते, हे तुला माहित आहे काय? मग परकीय चुकीची परंपरा आपण का स्वीकारायची? महत्वाचे म्हणजे फटाक्याचा उगम चीन मधला आहे. चीन मध्ये अतृप्त आत्मा ड्रॅगनसारखे प्राणी, भूते यांना पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर करीत. या मागील अंधश्रध्देला आपण पुरस्कृत करायचे का? याचाही विचार केला पाहिजे.
धर्मांध : खरंच की, मला हे माहितच नव्हतं! 😳 असा मी विचारच केला नव्हता!! 🙀
विवेकी : फटाके फोडल्यामुळे ध्वनी-वायू प्रदूषण होते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मालमजूर वापरले जातात त्या बेकायदेशीर बाल-मजुरीला आपण नकळत प्रोत्साहन देतो. त्यांचे अनेक अपघात होतात, दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपयांची चक्क राखरांगोळी होते. 🔥पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. हे आहेत फटाक्याचे १००% दुष्परीणाम! हवा, पाणी, जमीन ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ती संपत्ती फटाक्याने प्रदूषित होते. त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्यच नाही काय? म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारातील फडणवीस-शिंदेसुद्धा आता फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करत आहेत. आपणच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करायला हवे की नको? तसेच फटाका जाळणे म्हणजे पैशाचा दुरुपयोग करणे… कचरा करणे होय. सगळ्यात महत्त्वाचे आपल्या क्षणिक आनंदासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? परदेशात फटाके वाजविण्यावर बरेच निर्बंध आहेत. कारण त्यांना त्याचे दुष्परिणाम माहित झाले आहेत. त्याएवजी ते लेसर लाईट वापरुन फटाक्यांची आतषबाजी करतात.
धर्मांध : 😯😷
विवेकी : सर्वात महत्त्वाचे दिवाळी हा दिवा+रांगोळी याचा सण आहे. अरे दिवाळी तर आपण जोमाने साजरी करायचीच आहे, विरोध आहे तो अशास्त्रीय, अवैज्ञानिक परंपरांना… विनाकारण काही विचार न करता उठसूट जाळ काढत बसू नका… जरा थंड डोक्याने विचार करायला आपण केव्हा शिकणार?
शुभ दीपावली ! दिवाळीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणांच्या संमेलनात विविध भावनांचा उत्सव आपण साजरा केला. निसर्गाची पूजा केली. प्राणीमात्रांचे कौतुक केले. लक्ष्मीदेवी, श्रीविष्णू, श्रीकृष्ण यांचे पूजनअर्चन झाले. आरोग्यरक्षक धन्वंतरीचे पूजन झाले. शिवशक्तीचा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान केला. तसाच आता शेवटच्या दिवशी बहीण भावंडांच्या प्रेमाचा उत्सव साजरा होतो आहे. हीच आपली भाऊबीज. दिवाळी उत्सवातल्या शेवटचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’.
बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुनेकडे गेले. तिने अतिशय आनंदाने आपल्या घरी त्यांची पूजा केली, त्यांना ओवाळले. गोडधोड करून प्रेमाने जेऊ घातले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ” दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस. ” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून तेव्हापासून दरवर्षी भाऊबीज साजरी होते.
एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते. सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची, तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला नेहमी बहिणीची आठवण येते. म्हणूनच या दिवशी भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाने जेऊ घालायचे. त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायू लाभावे म्हणून यमराजाची पूजा, प्रार्थना करायची.
या पवित्र, मधुर नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे, मावस भावंडं यानिमित्ताने जवळ येऊ लागली आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी भावंडं कोणतीही असोत हे नाते असतेच मायेचे, प्रेमाचे. म्हणूनच ते मनापासून जपायला हवे हेच हा दिवस आपल्याला सांगतो. मानलेले बहीण भाऊ पण अगदी असोशीने हे नाते जपतात. बहिणीने औक्षण करून आणि भावाने स्नेहाची ओवाळणी घालत एकमेकांच्या सुखाची, स्वास्थ्याची, आनंदाची कामना करायची. यासाठी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
लहानपणी भाऊबीजेचे खूप अप्रूप असे! भावाकडून काय भाऊबीज मिळवायची याचे प्लॅनिंग आधीपासूनच चालू असे. पैसे खूप नव्हते, पण उत्साह खूप होता. दिवाळीला एकच ड्रेस घेतलेला असे. तोच भाऊबिजेला पुढे केला जाई. एक वर्षी माझ्या भावाने गंमत म्हणून नाणी गोळा करून त्याचे छान पॅकिंग करून दिले होते. तेव्हा १९६२ सालच्या एक पैशाच्या नाण्यात सोनं आहे अशी बातमी होती! त्यामुळे ती नाणी पॅक करून मला भाऊबिजेला दिली !त्यात काय आहे ह्या उत्सुकतेने ते गडबडीने उघडले, तो आनंद आगळाच होता. पुढे मोठे झाल्यावर दोन्ही भाऊ नोकरीला लागले. . दोन दोन साड्या मिळू लागल्या!
लग्न होऊन सासरी गेल्यावर भाऊबिजेला भावाचे येणे अपुर्वाईचे असे. कधीतरी त्या निमित्ताने माझेही माहेरी जाणे होई ! मग मुले बाळे झाल्यावर आपल्या पेक्षा मुलांची भाऊबीज महत्वाची होऊ लागली! एक मुलगा, एक मुलगी असा भाऊबिजेचा कोटा पूर्ण झाला! दरवर्षी त्यांत काही ना काही नाविन्य असे. पाहुणे मंडळी येत, मग हसत खेळत दिवाळी साजरी होई. आमच्याकडे माझ्या पुतण्या उत्साहाने मोठा कार्यक्रम
आखत असत. जवळपास ३५/४० जण एकत्र येऊन भाऊबीज साजरी करत ! वरची पिढी, मधली पिढी आणि छोटी मुले. . . सर्वांची ओवाळण्याची गडबड, मिळालेल्या भाऊबिजेच्या वस्तू गोळा करणे, आणि शेवटी खाण्यापिण्याचा कार्यक्रम ! गेली दोन वर्षे हे सगळं बंद होतं ! पण यंदा भाऊबीज साजरी झाली!
भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक ! आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट सणाच्या निमित्ताने गुंफली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. अशा सणांमुळे नाती दृढ होण्यास मदत होते. बहिण-भावातील बंध रेशमाचे भाऊबीजेसारख्या सणामुळे अधिक मुलायम बनतात हे नक्कीच ! कधी चुकून झालेले समज गैरसमज अशा सणांच्या निमित्ताने दूर केले जातात. आपले सण ही आपली समाज मन एकत्र जोडतात !
… दिवाळीचा हा शेवटचा दिवस असा गोड आनंदात साजरा होतो !
यमही आपल्या बहिणीकडे जातो आणि यमीकडून औक्षण करतो. बदल्यामधे आजच्या दिवशी कुणा भावाला मरण नाहीच पण भावासाठी दीर्घायूचे वरदान. ही धारणा.
पण आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे समजून सगळ्यांसाठीच चांगले वरदान मागता येईल ना? हेच ज्ञानेश्वरांसारखे पसायदान होऊ शकेल ना?
मग ज्यांना भाऊ नाही त्यांनीच फक्त चंद्राला ओवाळायचे या पेक्षा सगळ्या बांधवांपर्यंत जाता येत नाही म्हणून या एका वैश्विक बंधूला औक्षण केले तर सगळ्या बांधवांपर्यंत हे औक्षण जाईल ना? अगदी मनापासून केलेली प्रार्थना सगळ्यांपर्यंत पोहोचेल ना?
मनापासूनची केलेली प्रार्थना सकल बांधवांपर्यंत पोहोचल्यावर त्यांचेही बंधुत्व जागृत होईल ना? मग स्त्री दाक्षिण्य, नारी आदर हे आपोआपच आल्यावर आपली संस्कृती जी महानच आहे ती अढळपदावरच धृवतार्याप्रमाणे राहील ना?. . . . . दिवाळीचा शेवटचा दिवस गोड होईल ना? आपले सर्व बांधव, जे सीमेवर असतात, जे पोलीस रुपात वावरत असतात जे दुसर्यांचा रोग बरा करणंयासाठी रात्रंदिवस झटत असतात आणि जे कोणत्याही पेशात असून कायम आपल्यासाठी समाजासाठी जागृत असतात अशा सगळ्या भावांसाठी माझे आजचे औक्षण आहे. सगळ्याचे केलेले हे स्मरण आहे.
चला नवा जमान्यात नवा विचार करू आणि आजचा भाऊबिजेचा दिवस परिवारापुरता मर्यादित न ठेवता वैश्विक रूप देऊ. … आपल्या महान भारताला समृद्ध आणि प्रेमाच्या ताकदीने सशक्त करू.
७६२ दक्षिण कसबा भाग, काळी मशीद, या ठिकाणी आम्ही राहत होतो एकाला एक असलेले दोन वाडे जोडून होते मालक राहत असलेल्या वाड्यातून आमच्या वाड्यात येण्यासाठी एक चोरवाट होती. एका घराच्या खोलीमध्ये ती वाट उघडत असे तिथे एक कपाट होतं अगदी हिंदी सिनेमा प्रमाणे ते कपाट पुढे सरकवलं की मालकाच्या घरात जायचं जिना असे. अशा दुहेरी वाड्याचा उपयोग रझाकार जेव्हा सोलापूरला होते तेव्हा त्या दंगलीच्या वेळी लोकांना खूप झाला त्याच्या ऐकलेल्या गोष्टी कधीतरी पुन्हा सांगेन
तर वाड्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची ती आमची पहिली सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षा सत्र हा शब्द अलीकडे आलाय तर ती झाली की वाड्यातली सगळी पिलावळ एकत्र जमायची. मग तिकडे सो कॉल मीटिंग लावायच्या साधारण 25 ते 30 लहान मुले आम्ही होतोच 15 वयोगटापासून ते अगदी तीन-चार वर्षापर्यंत. मग सुरुवात व्हायची वर्गणी जमा करण्यापासून साधारण दोन आणि चार आणे अशी ऐपतीप्रमाणे वर्गणी गोळा होत असे. त्यातून वाड्याचे मालक जरा जास्त द्यायचे त्या पैशातून पिवडी नावाचा एक रंग मिळत असे त्या रंगाने वाडा रंगवायचा तत्पूर्वी आधी जाळ्या काढून तो स्वच्छ झाडून घ्यायचा 12 बिराडकरूंचा तो वाडा दोन मजली सगळ्या भिंती वगैरे सगळं झाडून घ्यायचं मग वाड्यात एक पेंटर राहत होते खरंतर ते खूप महान होते बुगाजी पेंटर ते बालगंधर्वांचे पडदे रंगवण्याचे काम करीत त्यांची नातवंड तीही त्याच उद्योगात हातात प्रचंड कला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काथ्याच्या ब्रशने वाडा रंगवला जायचा भंग्याकडून संडास स्वच्छ करून घेतले जायचे कारण पूर्वी वाड्याचा तोंडाशीच संडास असायचे त्यानंतर वाड्यासमोरचा नगरपालिकेचा रस्ता नगरपालिकेत जाऊन पत्र देऊन स्वच्छ केला जायचा मुरूम टाकण्याविषयी त्यांना बजावण्यात यायचे मग त्यांनी मुरूम टाकला की आम्ही ती चालून चालून जमीन धुमस करून घेत असू. त्यामुळे तिथे आम्हाला रांगोळी काढायला येत असे या बुगाची पेंटरच्या घरची मुलं रांगोळी काढण्यात वाकबगार पाडवा भाऊबीज लक्ष्मीपूजन या दिवशी आमच्याकडे वाड्यासमोर ती दृश्य साकारणारी रांगोळी असायची. हे सगळं आता अलीकडे नंतर आले भाऊबीजेची रांगोळी बघायला तर आमच्या वाड्यासमोर गर्दी व्हायची.
अशी सुंदर सगळी व्यवस्था झाली की मग घराघरातून फराळाचे वास यायचे भाजणी मसाले कुटणे इत्यादी कामे सुरू व्हायची जात्यावर दळणे उखळात कांडणे. काही गोष्टी धुवून वाळवन करणे घरात सावलीत अनारश्याच्या पिठासाठी तांदूळ पसरून एका चांगल्या पांढऱ्या शुभ्र फडक्यावर घालणे आणि मग ते उखळात गुळ घालून कुटणे असे बरेच प्रोसेस सुरू होत असत.
आम्ही मुले पणत्या करणे, त्याच्यावरती पणत्या भिजत घालणे आकाश कंदील बनवणे. . . आमच्या वाड्यात प्रभाकर आणि बंडू नावाची दोन मुले होती ती आकाशकंदील बनवत असत. ते बनवत असताना अत्यंत भक्तिभावाने आणि आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहत असू. एक मोठा आकाशकंदील वाड्यात बांधला जायचा. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे छोटे-मोठे कंदील असायचे. दारासमोर रांगोळी काढायला कोणाला दार नव्हतं. समोरची गॅलरीचे दोन फूट जागा त्यामुळे खाली काढलेली सामुदायिक रांगोळी किंवा उंबऱ्यात काढलेली छोटीशी रांगोळी एवढाच रांगोळीचा संबंध !
एका बाथरूममध्ये तीन बिऱ्हाडं आंघोळ करायची. त्यासाठी रात्री पाण्याची पिप भरून ठेवले जायचे. त्या तीन दिवसात मात्र अजिबात कोणी भांडत नसे, सोयी गोयीने प्रत्येकाच्या बंबातले कोणाचेही पाणी घेतले तरी चालत होते आणि सकाळी सहापूर्वी सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या. मग फटाके उडवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग फराळ…. फराळाची ताटे पहिल्याच दिवशी शेल्याने झाकून (विणलेल्या) एकमेकांच्या घरी जायचे. आता ते एवढे एवढे पाकीट मध्ये बांधून देतात तसं नव्हतं. मोठ्या ताटात सगळे पदार्थ असायचे …. चकली चिवडा करंजी अनारसे शंकरपाळ्या कडबोळी चिवड्याचे दोन-तीन प्रकार शेव. . . ताट कसे गच्च भरलेलं असायचं. वर्तमानपत्रात इतर जे कोणी सेवक असत त्यांच्यासाठी म्हणजे रामोशी, त्यानंतर वाडा साफ करणारा माणूस, कचरा उचलणारा माणूस, यांच्यासाठी पुड्या बांधल्या जायच्या. हे काम प्रत्येक घरी चालत असे. चार दिवस कुणी कुणाच्याही घरी फराळ करत असे. . . . दिवाळी संपली की मग प्रत्येकाच्या घरी फराळाचे निमंत्रण चकली चिवडा लाडू. आमच्या घरी मात्र आई सगळ्यांना उपीट करत असे … चकली चिवडा लाडवाबरोबर गरम गरम उपीट आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे बसायला थोडीशी गच्ची होती, त्यामुळे तिकडे मस्त मैफिल जमत होती. वडिलांचे मित्र त्यांचा फराळ, आईच्या मैत्रिणी, आमचे मित्र मैत्रिणी, आमच्यापेक्षा तरुण मुली असलेल्या आमच्या घरातल्या बहिणी भाऊ त्यांचे मित्र मैत्रिणी, असे चार-पाच फराळाच्या पार्ट्या व्हायच्या. जेवायला रोज टोमॅटो घातलेली आमटी संध्याकाळी असायची. आमटी आणि भात हे संध्याकाळचे साधे जेवण असे.
दिवाळी अंकाची रेलचेल … मामाची लायब्ररी होती त्यामुळे दोन-तीन दिवाळी अंक सहज आमच्या हाती लागत असत. पालथे पडून दिवाळी अंक दुपारभर वाचणे हा कार्यक्रम. त्यानंतर दिवाळी संपली की मग उरलेल्या सर्व फराळांचा विचार करून बाहुला बाहुलीचे लग्न, आमच्या वाड्याचे मालक हुंडेकरी यांची एक मोठी गच्ची होती त्या गच्चीवर लावायचे. दोन गच्ची होत्या एक वरची आणि एक खालची. एकीकडे वधू पक्ष – एकीकडे वर पक्ष. आमच्या घरात एक तीन चाकी सायकल होती त्यावरून वरातीची व्यवस्था केली जायची. पताका लावल्या जायच्या. सगळे वाड्यातली मोठी माणसं सुद्धा लग्नाला झाडून हजर असायचे. लग्न झाल्यानंतर सगळे विधी मात्र व्यवस्थित केले जायचे आणि मग वरात काढली जायची. वाड्यातील ही सर्व मंडळी काडेपेटी टिकलीच्या डब्या याच्यामधून पैसा 2 पैशाचा आहेर पॅकिंगसह आम्हाला करत असत त्यामुळे आपण खरोखरच लग्न लावले असे वाटत असे. बाहुला बाहुली सजवण्याचे काम हे फार नेटाने केले जाई. मग गच्चीवरती आमच्या मालकीण बाई सर्वांसाठी पोहे उपीट चिवडा यासारखे पदार्थ करून पत्रावळीचे अर्धे अर्धे तुकडे करून सर्वांना फराळ दिला जात असे. . तेच लग्नाचे जेवण होय.
इथे पावे तो निम्मी सुट्टी संपलेली असायची. मग आमच्या वाड्यामध्ये राहणाऱ्या राणूअक्का या नावाच्या एक बाई होत्या, एकट्याच राहत असत त्या. अतिशय देखण्या होत्या. . स्मिता तळवळकरसारख्या त्या दिसायच्या. मी नेहमी त्याना म्हणायची. . ‘ यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढला तर त्यात कामाला घ्यायला पाहिजे. ‘ इतक्या सुंदर होत्या. त्यांच्या घरी चूल असायची आणि शेगडी. आम्ही सगळी मंडळी म्हणजे लहान मुलं घरून गुळ डाळ मसाले वगैरे आणून अगदी कणीकसुद्धा त्यांच्या घरी जमा करीत असू आणि म्हणायचो की राणूअक्का तुमची पुरणाची पोळी झाली पाहिजे आणि कटाची आमटी. त्यांची कटाची आमटी खाल्ली की अर्धा तास हात झिनझिनला पाहिजे अशी मस्त तिखट असायची. मग कटाची आमटी आणि पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी असा बेत. त्यांच्याकडे एक गोठा होता त्या गोठ्यात पत्रावळ्यावरती होत असे ती 40 माणसाची म्हणजे मुलांची पंगत उठायची. फार प्रेमाने करायच्या. त्या जातीने धनगर होत्या. वाड्यात कधी कुणी कुणाची जात विचारली नाही आणि कधी ती जाणवली सुद्धा नाही. माळी धनगर सोनार वाणी लिंगायत सारस्वत ब्राह्मण मराठा गुरव अशा अठरा पगड जातीने वाडा राष्ट्रीय एकात्मतेची साक्ष देत होता. वाड्याच्या मालकीणबाई साक्षात लक्ष्मी होत्या सुकन्या मोने इतक्या देखण्या होत्या. त्यांचे डोळे आणि भुवया अतिशय कोरीव, काळेभोर डोळे, छान कुरळे केस – साक्षात लक्ष्मी वावरते आहे असं वाटायचं आणि तितकीच पोटात माया. पाच रुपये भाडं सुद्धा न परवडणारी माणसं वाड्यात सुखाने नांदायचे. मालकाने कधी तगादा केला नाही. उलट एखाद्याच्या घरी कमी असेल तर मालक ते आणून देत असत. इतका माया करणारा मालक जगात कुठे नसतील. . कोणाला जागा सोडण्याचा तगादा नाही, कुणाला भाड्यासाठी किरकिर नाही, ते तरी खूप श्रीमंत होते असं नाही, पण मन मात्र खूप मोठं होतं. सगळ्या पोरी बाळी बघायचे कार्यक्रम त्यांच्याच घरी व्हायचे. सगळा वाडा त्यांना भाऊ आणि वहिनी असेच म्हणत होता, आणि ती नाती त्यांनी शेवटपर्यंत निभावली. करोडोंची स्टेटस असलेली ती मंडळी पण आजही त्यांची पुढची पिढी सुद्धा अतिशय विनम्र आहे. राणूअक्काची पुरणपोळी संपली की मग आमचे उरलेल्या फराळांची भेळ असायची. कार्यकर्ते बाईंची छोट्या मुलांची लायब्ररी असायची, कॅरम बोर्ड खेळायचा, भोवरे फोडायचे, काचा पाणी खेळायचे, नाटक बसवायचे असे सगळे करण्यामध्ये आमची सुट्टी मजेत जाई…
… अशी दिवाळी पुन्हा कधीच झाली नाही. लाईफबॉय साबणाच्या वडीच्या डब्यात मोती साबण आणि दुसऱ्या डब्यात मैसूर सॅंडल दिसला की खूप आनंद व्हायचा. हळूहळू पंधरा दिवसात त्या वड्या झिजायच्या, मग सुट्टी संपताना पुन्हा त्यामध्ये लाईफबॉय ठाण मांडून बसायचा वर्षभर. . . पण त्या लाईफ बॉय ने उर्वरित वर्षभर आमच्या शरीरावरील घाण स्वच्छ केली, तजेला दिला, आम्ही प्रसन्न झालो. त्यालाही आमच्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे.
अशी ही सुंदर दिवाळी साडेतीन हजार स्क्वेअर फूटच्या बंगल्यात, दारासमोरच्या प्रशस्त गाडीत ढीगभर खरेदी एकावेळी करून आणावी अशी पैशाची श्रीमंती असतानाही आज आम्ही बघू शकत नाही. त्या दिवाळीची चव अंगावर जिभेवर मनामध्ये रेंगाळतेच आहे नव्या कपड्याना तो वास येत नाही. टाटाच्या तेलाच्या बाटलीचा वास भारी तेलाने नाही… नाही म्हणायला फक्त एक गोष्ट टिकून राहिली ती म्हणजे मोती साबण … मैत्रिणींनो आज मी जो हा लिहिलेला आहे तो बुद्धीने नाही.. अंतःकरणांनी लिहिलेला आहे कदाचित त्याच्यामध्ये समन्वय असेल नसेल, पण त्या सगळ्या भावना मात्र व्यक्त झाल्या. त्या आठवणी डोळ्यासमोर येऊन पुन्हा एकदा शब्दात चितारल्या गेल्यात !
मला वाटतं आपल्या पिढीची सर्वांची दिवाळी थोडीफार अशीच होती जिने अनेक मनं आजतागायत उजळून ठेवली आहेत. आताच्या पिढीला फुसके फटाके शोधून दुपारी सगळी घरातली मंडळी झोपली की ते उडवण्याचा कार्यक्रम माहित नाही… किंबहुना त्यांना काटकसरीने काही वापरणेच माहीत नाही… समृद्धी आली ना की सुख संपतं… हे मात्र खरे की मला वाटते सुख असले तरी समाधान नसतं… हे तर अधिक खरे नाही का?
☆ आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा… पण का ?? – लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
पावसाळा एकच असला तरी, एकाच पावसाचे तीन रंग आणि त्यानुसार आहारातला नेमकेपणा, ही भारतीय परंपरेची परिपक्व देणगी. आषाढ महिन्यात तळलेलं, श्रावण महिन्यात भाजलेलं आणि भाद्रपद महिन्यात उकडलेलं खाणं म्हणजे तब्येतीबरोबरच पावसाळ्याचा यथेच्छ आनंद लुटणं ! पण असे खाणे कितपत सुरक्षित आहे ? असे खाणे म्हणजे नेमकं काय खाणे ?
आषाढ महिना म्हणजे पावसाळ्यातला सुरुवातीचा काळ. शरीराच्या आतून कोरडेपणा आणि बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी, फडसे, थंडीताप अशा वाताच्या समस्या तीव्रतेने वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी शरीरात पित्त वाढते आणि वात अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर “तळलेलं खाणं” हा अफलातून उपाय आहे. विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ आषाढाच्या वातावरणात शरीराला गरम ठेवण्याचे काम अचूक करतात, शरीरात वंगन निर्माण करून मेडिकल इमर्जन्सी टाळायला मदत करतात. (हे केवळ आषाढ महिन्यातच घडते!). म्हणूनच, मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, लोणची इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. शिवाय; ओल्याचिंब पावसातली गरमागरम कांदा-भजी, चहा यासारखा इन्स्टंट रोमँटिक ‘आषाढ डायट’ जगात शोधूनही सापडणार नाही. !
श्रावण महिना म्हणजे पावसाळ्यातला दुसरा टप्पा. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. परिणामी वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्ताला बॅलन्स करणे महत्त्वाचे, म्हणून “भाजलेलं खाणं” सर्वोत्तम आहे. उदा: तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेली भाकरी, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला मका / वाटाणा, भाजलेले लाडू (शेंगदाणा / राजगिरा / रवा इ. ), भाजलेल्या वांग्याचे भरीत, भाजलेले पापड इत्यादी. असं खाल्ल्याने पित्त तर सुरळीत राहतेच, शिवाय अम्लपित्त, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारी डोकेच वर काढत नाहीत. आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी. . . ” असे म्हंटले आहे !
भाद्रपद महिना म्हणजे पावसाळ्यातला शेवटचा आणि पावसाचा परतीचा टप्पा. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. अधून-मधून पाऊस असूनही उकाडा मात्र प्रचंड असतो. यामुळे आधीच श्रावणात वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे लगेचच अडकून बसते. परिणामी अचानक हार्ट अटॅक येणे, पॅरॅलिसिस झटका येणे, कोणताही आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी भाद्रपद महिन्यातच घडू लागतात. म्हणूनच मृत्यू होण्याचे प्रमाण या महिन्यात अधिक असते. अनुचित घटना टळाव्यात म्हणून, भाद्रपद महिन्याच्या आसपास बहुतांश उपवास आलेले आहेत. जेणेकरून, कमी अन्न खाल्ले जाईल आणि पित्त अडकायला वावच भेटणार नाही. पित्त अडकून कुठलीही इमर्जन्सी येऊच नये, यासाठी “उकडलेलं खाणं” हा सर्वोत्तम उपाय आहे. जसे की; उकडलेला भात, उकडलेल्या शेंगा, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेले मोदक, उकडलेली कंदमुळं इ. असं प्रयत्नपूर्वक केल्याने October Heat चे रूपांतर आपण October Hit नक्कीच करू शकू. कदाचित म्हणूनच, आपल्याला भेटण्यासाठी गणपती, गौरी, दुर्गा या सर्वांनी भाद्रपदाचा आसमंत मुद्दामच निवडला असेल… हो ना ?
लेखक : डॉ. शिवानंद बासरे
दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड
९४२३२६७४९२
लेखक : श्री मंदार जोग
माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग- २ – लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆
(या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.) – इथून पुढे —
लाडू…
उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.
लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडिशेप, बाळंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.
करंजी
आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.
चकली
वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.
चिवडा
तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.
अनारसे
अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.
… अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचन शक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांच भौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
– समाप्त–
लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन
योग प्रशिक्षक, अमरावती.
प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈