मराठी साहित्य – मराठी आलेख – * माझ्या अंगणातील पऱ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे 

*माझ्या अंगणातील पऱ्या*

(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी आलेख के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)

कन्या अभिमान  दिना निमित्त सर्वांच्या कविता कथा लेख वाचले आणि तीस वर्षा पूर्वीचे दिवस आठवले. पहिल्या मुला नंतर एक गोजिरवाणी परी आयुष्यात यावी आपल्याला अवगत सर्व कलागुणांनांनी एक संपन्न आपली प्रतिकृती निर्माण करावयाची खूप इच्छा होती आपल्याला मुलगी या कारणामुळे ज्या गोष्टी करण्यापासून वंचीत राहावे लागले ते सर्व काही तिला भरभरून द्यायचं होते .परंतु पुन्हा नशीबानं कलाटणी दिली याही वेळी मुलगाच झाला. मन खट्टू झाले परंतु त्याच क्षणी ठरवलं आपल्या भोवती बागडणाऱ्या या सोनपऱ्या आपल्याच समजून वागायचं.

जेव्हा आपण एखाद्याला मनापासून आपलं मानतो तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीचं ठरते सातवी पर्यंत आणि तीही कन्या शाळा असल्यामुळे शेकडो चिमण्याची चिवचिव दिवसभर असायची, काहीजणी तर अगदी रात्री अंधार पडे पर्यंत घरीच असायच्या.

लहानपणी आई अनेक गोष्टी साठी का रागवायची हे आता समजायचं. आपल्या चिमणीवर कुणाचीही वाईट नजर पडू नये हा त्या मागचा मुख्य उद्देश तेव्हा कळायचा नाही आईचा रागही यायचा परंतु आता मात्र माझ्यातली आईचं जागी व्हायची. तसं आमचं बालपण लाडात परंतु कडक शिस्तीत गेलेले असल्यामुळे आईची तीच करडी जरब माझ्यात नकळत डोकावत असे. मुलींचा लाड ही खूप करायची परंतु शिस्त मोडली की सगळं बिघडायचं. मुलीही मला राग येणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यायच्या. कधीकधी वाटायचं आपण हुकूमशाही पद्धतीने वागतो का?

एकदा कॉलेजमध्ये असणाऱ्या सहासात मुली कुठल्यातरी कार्यक्रमाला जाण्यासाठी अगदी नटून थटून निघाल्या होत्या. खूप सुंदर दिसत होत्या गप्पांच्या नादात त्यांनी मला जवळ येईपर्यंत पाहिलं नाही अचानक एकीचं लक्ष गेलं आणि सगळ्याजणी चक्क जवळच्या दुकानात शिरल्या लिपस्टिक पुसलं केस आवरले. आणि खाली मान घालून निघून गेल्या त्या दिवशी मला खरंच खूप वाईट वाटलं. आज पासून रागवायचं नाही पक्कं ठरलं. या घटनेने  नकळत सुखावले सुद्धा. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा आपला शब्द मुलं जपतात यातचं खूप काही जिंकल्यासारखं वाटलं. यापुढे मुलींना रागवायचं नाही असं मनोमन ठरवलं परंतु व्यर्थच माझी छाप ठरली ती ठरली.

आजही लग्न झालेल्या मुली माहेरी आल्या की आवर्जून घरी येतात काही तर घरी बैग टेकली की थेट इकडेच निघतात. काही जावई स्वतःच आणून सोडतात. अगदी धन्य झाल्या सारखं वाटतं. आपल्याला मुलगी नाही ही सलं कुठल्या कुठं पळून जाते. ज्यांना मुली आहेत त्यांना मी तेव्हा का रागवायची ते प्रकर्षाने जाणवतं. त्या जेव्हा मोकळेपणानं हे कबुल करतात तेव्हा आपण हुकुमशाही पद्धतीने वागून चूक केली ही सलं सुद्धा आनंदात बदलते.

माझ्या दोन सुनबाई सोनपावलांनी येतील तेव्हा येतील परंतु आजही मी अनेक सोनपऱ्यांची  परिपूर्ण आई असल्याचे सुख नक्कीच अनुभवत आहे.

आज कन्या अभिमान दिनाच्या माझ्या सर्व कन्यकांना हार्दिक शुभेच्छा 

      कळत नकळत दुखावल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते

आपली ….

रंजना मधुकर लसणे

© रंजना लसणे
बाळापूर आखाडा,  हिंगोली मो. -9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * सून…? सून…?…..कसमसे ! * – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

* सून…? सून…?…..कसमसे ! *

(ज्येष्ठ मराठी साहित्यकार सुश्री प्रभा सोनवणे जी  का e-abhivyakti में स्वागत है।  सास-बहू के सम्बन्धों पर आधारित सुश्री प्रभा सोनवणे जी का यह  विनोदपूर्ण आलेख निश्चय ही आपका हृदय प्रफुल्लित कर देगा।)  

सासू सुनेचं नातं हे एक अजबच रसायन आहे! दोघींच्या एकमेकींकडून असलेल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत!

सगळ्यात प्रथम माझ्या नजरेसमोर येते माझी आजी (आईची आई) कोकणात आजी आजोबा गावाकडे रहायचे आजोबा नोकरी तून सेवानिवृत्त झाल्यावर शेती करायचे. …आजी आजोबा दोघेही सुशिक्षित! अगदी देवमाणसं !

सूना मुंबई ला असायच्या त्या ही सुशिक्षित घरंदाज…पण त्यांच्या मध्ये कधीच सुसंवाद घडलेला मला आठवत नाही…कर्तव्य केली त्यांनी  ..पण खुप सुंदर खेळीमेळीचे संबंध असायला काही हरकत नव्हती…पण एक अंतर जाणवायचंच त्या नात्यात!

एकदा मामांच्या पायाला काहीतरी झालं होतं ते आजी ला दाखवत होते …आजी म्हणाली “रिंग वर्म म्हणतात त्याला!” यावर आजी तिथून उठून गेल्यावर मामी म्हणाल्या,”इंजिनिअर मुलाला आई इंग्रजी शिकवतेय”!

सासू ची टर उडवणं हा सगळ्या सूनांचा आवडता विषय असावा!

दुसरी सासू म्हणजे इकडची आजी वडिलांची आई त्या अशिक्षीत होत्या, पण स्वतःची सही करायला शिकल्या होत्या. त्या अंगठा द्यायच्या नाहीत सही करायच्या “कलावती शंकरराव जगताप” सूनांनाही अहो जाहो म्हणायच्या पण सूनांशी त्यांचंही फारसं पटलं नाही!

एकदा त्या स्वतःशीच बोलत होत्या,” तशाच पडल्या चतुर,एक ही नको आवडायला आणि निवडायला…सगळ्या सारख्याच” हे त्या सुनांविषयी बोलताहेत हे मला समजलं होतं!

माझ्या सासूबाईंशी ही माझं फारसं पटत नव्हतं पण माझ्या विषयी त्यांच्या मनात सॉफ्ट  कोर्नर आहे हे जाणवायचं!

आज समवयस्क मैत्रिणी जमलो की सूनांचा विषय निघतोच!

सून हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय पण त्या नात्यात जिव्हाळा असत नाही ही खंत!

माझी एक मैत्रीण  खुप कामसू, सुगरण, गृहकृत्यदक्ष, आणि कर्तृत्ववानही! सून नोकरी करते, ही घरात चविष्ट स्वयंपाक बनवते, नातवाला सांभाळते!

पण सून कधीच कुठला पदार्थ छान झालाय म्हणत नाही..कृतज्ञता व्यक्त करत नाही!

मी म्हटलं सोडून द्यावं, “ती म्हणो न म्हणो आपल्याला माहित आहे ना आपला स्वयंपाक चांगला होतो ते! आणि नावाजणारे इतर आहेतच की!”

मला आठवलं, आमच्या सरांच्या पत्नी एकदा जोगेश्वरीच्या  देवळात भेटल्या होत्या….खुप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे! त्या म्हणाल्या, “टीव्ही पहात असले की सून टीव्ही बंद करते. काही बोलायला गेलं की ती बोटांनी ओठ बंद करते, बोलू नका म्हणत!” मग मी दुपारी देवळात येऊन बसते! ऐकावं ते नवलच ना!

असे अनेक किस्से आणि कहाण्या हे नातं इतकं बदनाम झालंय की काही विचारू नका! यात सासवांची काही चूक नसेल असं मला वाटत नाही….पण आजकाल च्या करिअर करणा-या सूनांनी तर हे समजूनच घ्यायला हवं, पाळणाघर तर आहेच पण नातवंडांना आजी ची माया ही हवी असते!

ब-याच सासवा व्यथित असतात आणि सुसरीबाई सुसरीबाई तुझी पाठ मऊ म्हणून साजरं करत असतात. या सर्व चर्चेत असं ही लक्षात आलं की, आपल्या आई पेक्षा सासू कितीही चांगली असली तरी माझी आई किती सुपिरियर आहे (नसताना) हे भासविण्याकडे मुलींचा कल असतो.  आणि हल्ली मुलींच्या हातात कायद्याचं शस्त्र ही आलंय, महिला सुरक्षा कायद्याचा गैरवापरही होतोय.

खरं तर किती सरळ साधं आहे हे नातं पण खुप अवघड होत जातं. वर्षानुवर्षे हे असंच चाललंय !

या मुली नव-या मधल्या शंभर कमतरता दाखवतील पण स्वतःविषयी अवाक्षर ही ऐकून घ्यायला तयार नसतात.

कधी कधी वाटतं हे नातंच असं आहे तर त्याकडून वेगळ्या अपेक्षा का करायच्या? सासू सूनांना एकमेकांविषयी प्रेम नसतं असं नाही….पण नेमकी कुठे माशी शिंकते कळत नाही.

एका मैत्रिणी कडे गेले होते तिची सून नुकतीच वेगळी रहायला लागली आहे. ती त्या  दुःखात मी तिला म्हटलं जाऊ दे…प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं…लांब राहून च चांगले संबंध रहातात! तिचं सून पुराण चालू असतानाच तिची सून दारात हजर!

आल्या आल्या तिनं सासूवर शब्दांचा भडीमार करायला सुरुवात केली. कुठे कुठे. काय काय जाऊन सांगता हो माझ्या विषयी, तुमची काय लायकी आहे मला माहित आहे! अर्धा  तास ती अखंड बोलत होती…सासू गप्प!

मला एक जुनं गाणं वेगळ्या अर्थाने म्हणावंसं वाटत होतं….

सुन… सुन …कसमसे लागू तेरे कदमसे …..तू चली जा…..

      पण आम्ही दोघीही त्या तोफेच्या तोंडी…मूग गिळून गप्प !

ती गेल्यावर मी फक्त एवढंच म्हणून मैत्रीणीचा निरोप घेतला —

सून? सून  ??……आई शप्पथ  !!

त्या नंतर आठच दिवसांनी मी रिक्षाने मसाप त जात असताना मला त्या दोघी पु.ना.गाडगीळ सराफांच्या दुकानात शिरताना दिसल्या!

 

© प्रभा सोनवणे

पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * विषवल्ली .. . ! * – डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

विषवल्ली .. . !

(डॉ. रवीन्द्र वेदपाठक जी का e-abhivyakti में स्वागत है। डॉ वेदपाठक जी का यह लेख हमें  राष्ट्रीय एवं सामाजिक उत्थान के लिए सकारात्मक दृष्टिकोण से  विचार करने के लिए बाध्य करता है।)

आपल्या भारत देशासारख्या खंडप्राय विकसनशिल देशाला *जात* ही एक लागलेली किड आहे. तीची सुरुवात किंवा आपण त्याला उत्पत्ती म्हणु शकतो, तर ही कशानेही *”न जाणारी जात* कोठुन उत्पन्न झाली त्याचं मुळ शोधणं खुप अवघड आहे. आणी आजच्या लेखाचं ते प्रयोजनही नाही..

आजचा विषय जरा वेगळा आहे, विषय डोक्यात येण्याचं कारण म्हणजे, मी सध्या एक फ्लँट  विकत घेण्याचं नियोजन करतोय, मला हवा तसा तळेगाव मध्ये हवेशीर असावा अशी इच्छा, म्हणुन मग नव्यानेच ओळख झालेल्या एका मित्राने नाव सुचवले म्हणुन मी एके ठिकाणी फ्लँट पहायला गेलो. मित्राने सांगीतलेच होते…. अरे आपलाच आहे, पाहुणाच आहे नात्याने….. जावुन ये.. म्हटलं चला आपला माणुस म्हटलं की कुठेतरी विश्वास असल्यासारखं वाटतं.

मग मी सकाळीच गाडी काढली आणी नविनच सुरु असलेल्या साईटवर गेलो, साईटच्या बाजुलाच एका शेड मध्ये ए.सी. केबीन मध्ये ऑफिस होते.

मित्राने आधीच ओळख करुन दिली असल्याने स्वागत चांगलेच झाले….. या या डॉक्टर साहेब… बसा, असे सगळंच अगत्यपुर्वक चालु होते.

सगळा स्टाफ नविनच दिसत होता, मला त्यांनी त्यांची ओळख पण करुुन दिली, मी पण थोडसं समाजाचं, जातीचंच सामाजिक काम करत असल्याने,  तो सुध्दा मला इंम्प्रेस करण्यासाठी सांगु लागला.

कसं आहे ना, डॉक्टर…. मी माझा सगळा स्टाफ आपल्या जातीतलाच भरलाय, हा बघा माझ्या लांबच्या आत्याचा नातेवाईक, तो मामेबहीणीच्या सासरच्या पाहुण्यांचा, असे आपलेच लोक असले म्हणजे काम विश्वासाने होते, दगाफटका रहात नाही, आणी आपल्याच माणसांनी चार पैसे कमविले तर बिघडले कोठे ?

मला पण ते पटले, पण तरीही एक शंका मनात आली म्हणुन विचारली….

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण सरकारी नियमानुसार जातीनिहाय आरक्षण असावे लागते ना ?

आमची चर्चा जरा वेगळ्याच विषयाकडे वळली…..

हो ना डॉक्टर, पण तुम्ही बघा, सगळेच तर तसे करतात, प्रत्येक जण, प्रत्येक व्यावसायिक आज आपल्याच लोकांना काम देण्याचा विचार करतोय, व देतोय, त्याने दोन फायदे होतात आपल्या जातीत आपल्या समाजात आपल्याला किंमत मिळते, सामाजिक कार्य केल्याचे पुण्य मिळते, आणी मुख्य म्हणजे विश्वासू माणसे मिळतात.,  त्याने त्याचा मुद्दा क्लिअर केला…

मी पण, ते मान्य करुन खरेच यातुन आपल्या जातीची, समाजाची भरभराट होतेय म्हणुन त्यास दुजोरा दिला, व घरी परतलो.

पण हे विचार डोक्यातुन जात नव्हते, हे योग्य कि अयोग्य, सरकारी नियम आहे, नोकरी देताना जातीनिहाय आरक्षण देवुन नोकर भरती करावी, तरीही सरकारी क्षेत्रे सोडली तर आज कित्येक खाजगी कंपन्या किंवा कार्पोरेट जगत आपण म्हणू शकतो अशा ठिकाणी प्रत्येकजण स्वताच्या जातीच्या माणसांना, जवळच्या नातेवाईकांना चिकटविण्याचा प्रयत्न करीत आहे.…

*हे कितपत योग्य आहे….* कार्पोरेट जग जरी सोडून दिले तरी प्रत्येक व्यक्ती आज विचार करतेय कि माझ्यामुळे माझ्याच कुणाचा तरी फायदा व्हावा…..  मला काही खरेदी करायची आहे तर, माझ्याच समाजाच्या व्यक्तीकडुन मी तो व्यवहार पुर्ण करावा…..

आज आपला भारत देश ज्या संक्रमणातुन जात आहे, जिथे आज जातीय दंगली, जातीयवाद, आरक्षण वेगवेगळ्या जातींचे संप व मोर्चे असे प्रकार आहेत, तिथे आता प्रत्येकजण पोटजातींचा विचार करु लागलाय.

असा विचार करणे योग्य कि अयोग्य, मोठमोठ्या कंपनीमध्ये सुध्दा आजकाल सरसकट हा विचार होतो, जो कुणी चेअरपर्सन असेल त्याच्या मर्जीतील लोकांना जातीतील लोकांना काम देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे….

जर भारत देश सोडला तर इतर कोणत्या विकसीत देशात जातींचे एवढे स्तोम वाढलेले दिसत नाही, जाती आहेत, पण त्या उच्चनिच दाखवण्यासाठी नाहीत, आपल्या देशात मात्र जातीवरुन लायकी ठरवली जाते.

हा जातीवाद एक विष बनुन संपुर्ण देशाला हळुहळु पोखरत आहे.

एक सुभाषित आहे…. *जर तुझे कर्म महान तर तु महान* 

आणी याला इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत कोणतीही व्यक्ती जात श्रेष्ठ आहे म्हणुन महान बनली नाही…….. शिवाजी राजे मराठे होते म्हणुन राजे नव्हते…. ते त्यांच्या पराक्रमाने राजे होते… महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, विनोबा भावे, सरदार पटेल,  किंवा अगदी कपिल, सचिन, धोनी हे सगळे त्यांच्या जातीमुळे महान न्हवते, तर ते महान झाले कर्तुत्वाने. आणी तरीही आपल्या भारतात जातीच्या धर्माच्या गोष्टी सांगुन  स्वताला श्रेष्ठ समजतात. अरे या लोकांना कळत नाही का? स्वता प्रभु श्रीराम सुर्यवंशी या उच्च जातीचे असुन त्यानी शबरीची उष्टी बोरे खाल्ली., अरे या हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करायचे.

नक्कीच मला जो प्रश्न पडलाय, त्याचे उत्तर देणारे मला नक्कीच भेटतील नव्हे अगदी पटवुन देणारे भेटतील. पण यातुन जी विषवल्ली पेरली जातेय, ज्या वाईट चालीरीतींचा उदय होतोय, स्वताची जात व दुसऱ्याची जात असा भेदभाव निर्माण केला जातोय….. त्यातुन आपण कोणत्या अंधाराकडे ढकलले जातोय… याचा विचार कधी करणार, आतापर्यंत दोन चार धर्मांमधील धार्मिक तेढ होती, ती आता अठरापगड जातींच्या उंबऱ्यावर येवुन ठेपली आहे… तिच्याकडे किती दिवस कानाडोळा करायचा. माणुसकी मानवता हे शब्द आता फक्त पुस्तकातच वाचायचे का ?

कुणी असा विचार करु लागला तर त्याला गप्प बसविणारेच खुप भेटतात…..

पण खरेच व्यावायिक जगतात जो जातीवाद चालु झाला आहे त्याला कोण रोखणार.. कसे रोखणार.., आपल्याच जातीच्या लोकांची भरती करायची, फक्त त्यांनाच प्रमोशन मिळाले पाहीजे असा विचार करायचा… हे कुठेतरी थांबले पाहीजे…

अरे नुसतेच म्हणायचे, विविधतेने नटलेल्या,  अनेकात एकता असणारा माझा भारत….. अनेकात एकता नाही…… सात रंगांचे सुध्दा आता पोटरंग झालेत गुलाबी, बेबी गुलाबी,  रोझ गुलाबी…, आणी तसेच जातींचे सुध्दा झालेय…. पोटजाती.

कधी थांबायचं हे सारे, आहे काही उपाय ?

 

© डॉ. रवींद्र वेदपाठक

तळेगाव

Mob. No. :- ९००४३६३८७३

Email :- [email protected]

(इस लेख में उल्लिखित विचार लेखक के व्यक्तिगत विचार हैं। )

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * अभिव्यक्ती स्वातंत्र्य – गरज व अतिरेक… * – सुश्री आरुशी दाते

सुश्री आरूशी दाते

अभिव्यक्ती स्वातंत्र्य – गरज व अतिरेक…

(e-abhivyakti में सुश्री आरूशी दाते जी का  स्वागत है। ई-अभिव्यक्ति में अभिव्यक्ति की स्वतन्त्रता एवं उससे संबन्धित तथ्यों पर विचारपरक लेख निःसन्देह एक उपहार ही है। इस आलेख के लिए हम सुश्री आरुशी जी के हृदय से आभारी हैं। )

अभिव्यक्ती ही देवाने दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. प्राण्यांनासुद्धा ही देणगी आहे, पण मनुष्यप्राणी अधिक चांगल्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाने अभिव्यक्त होऊ शकतो. त्याच्या बुद्धीची भरारी गगनाचा ठाव घेऊ शकते…

अभिव्यक्त होताना मग ते प्रेमरूपात असो, राग असो, अबोला असो, इतकंच काय गायन, वादन, नृत्य, चित्रकला किंवा शिल्पकला असो, नैसर्गिक असल्यामुळे अभिव्यक्ती थांबवता येणारच नाही, ती फक्त कधी, कशी आणि कुठे करावी हे नक्कीच ठरवू शकतो… हे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तिला मिळणं गरजेचं आहे, त्याला कारणंही तितकीच महत्वाची आहेत…

अभिव्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे, आपल्या विचारांचा मनाशी, भावनांशी झालेला वाद-संवाद अभिव्यक्तीतून प्रगट आणि प्रगत होत असतो. वर म्हटल्याप्रमाणे त्याचे मार्ग अनेक आहेत, पण अभिव्यक्त होण्याची खरंच गरज आहे का? तर निःशंकपणे हो, हेच उत्तर मिळेल…

आपल्या मनातील भाव जर दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यात दोन पायऱ्या आहेत… पहिली म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात व्यक्त होणे (अंतस्थ अभिव्यक्ती), आपल्याला स्वतःला काय वाटतं, ह्याचा अभ्यास करून बाह्यरूपात व्यक्त होणं गरजेचं आहे… त्यासाठी मनन, चिंतन आवश्यक आहे… ह्यावर आपली क्रिया अवलंबून असते…

उदाहरणार्थ, भूक लागली असेल तर, तसा संदेश मेंदूकडून मिळतो, तो मिळाला कि मनातल्या मनात भुकेची भावना जागृत होते, पोट रिकामं आहे, हा विचार मनात येतो, काही तरी खाल्लं पाहिजे नाहीतर विपरीत परिणाम होऊ शकतो हा संवाद घडतो (अंतस्थ अभिव्यक्ती)… मग खायचं कि नाही किंवा काय खायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि त्यानुसार क्रिया केली जाते…

म्हणजेच जेव्हा एखादा विचार मनात येतो, तेव्हा तो कदाचित आपल्याला भावतो किंवा भावत नाही. कदाचित विचारातूनच त्याची अनुभूती मिळते… तो AWARENESS आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपयोगी येतं… आपण मनात आलेल्या विचारांना RESPOND करतो कि रिऍक्ट करतो हे ठरवता येते, मात्र अभ्यासपूर्ण सवयीनेच होऊ शकते…ह्याबरोबरच ह्या स्वातंत्र्याची दिशा ठरवणेही गरजेचे आहे. म्हणजे आपला मुद्दा मांडताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना नक्की काय मांडलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि ते सर्वस्वी आपल्या हातात आहे…

तुम्हीच बघा ना… एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल किंवा एखाद्या माणसाचं मत आपल्याला पटत नसेल तर आपण लगेचच ते बोलून दाखवतो, समोरचा माणूस किती चुकीचा आहे, हे सांगायचा, मी तर म्हणेन ते सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करतो… ह्यातून कदाचित आपला अहंकार नक्कीच सुखावतो, पण असे केल्याने आपण नक्की काय साध्य केलं ह्याचा अभ्यास होणं खूप आवश्यक आहे…. अभिव्यक्त होण्याच्या पद्धतीने माणसे दुरावू शकतात किंवा जवळ येऊ शकतात… ह्याबरोबर समोरच्या व्यक्तीलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हेच आपण विसरवून जातो, जे अयोग्य आहे….

तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे

१) विचार

२) त्यांच्याशी निगडित भावना (अंतस्थ अभिव्यक्ती)

३) त्यानुसार होणारी क्रिया (बाह्य अभिव्यक्ती)

ह्याचा सतत अभ्यास होणं आवश्यक आहे. नाहीतर अभिव्यक्तीसारख्या सुंदर देणगीचा अतिरेक होऊन अयोग्य गोष्टी घडायला वेळ लागणार नाही… ह्याचा अर्थ स्वत्व पणाला लावणे असा अजिबात होत नाही… पवित्रता, शांतता, सुख, समाधान, प्रेम, ज्ञान, शक्ती, युक्ती, सत्यता ह्यात कुठेच कमी पडणार नाही, ह्याची खात्री आहे आणि अभ्यासाने हे सहज शक्य आहे…

आता ह्यापुढची बाब लक्षात घेऊ या… विचार, भावना, क्रिया ह्या गोष्टी आयुष्याकडे किंवा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन ठरवतात, आणि मग त्याचेच रूपांतर सवयीमध्ये होऊ शकते, हीच सवय आपली वृत्ती बनते, त्यातूनच मानसिकता घडते आणि आपले व्यक्तिमत्व आकाराला येते… तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व नाकारून चालणार नाही आणि त्याचप्रमाणे त्याचा गैरवापर करूनही चालणार नाही…

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि कुटुंब ज्या समाजाचा किंवा देशाचा भाग आहे त्याच्या विकासासाठी, ते सुदृढ बनवण्यासाठी आवश्यक आहे, जीवन सुखकर बनवण्यासाठी, नवनवीन शोध, प्रयोग घडवण्यासाठी मनुष्य वैचारिक दृष्ट्या सशक्त होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची सृजनशीलतेचा उपयोग नक्कीच होतो… यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप हातभार लागतो… पण अति तिथे माती, ह्या नियमानुसार स्वातंत्र्याचा अतिरेक स्वैराचारात बदलून हानी पोहोचवू शकतो किंवा हे स्वातंत्र्य हिरावून घेतले तर विपरीत परिणाम होऊ शकतात… स्वातंत्राबरोबर येणारी जबाबदारी लक्षात ठेवून त्याप्रमाणे क्रिया प्रतिक्रिया झाल्या पाहिजेत… गरजेचं व्यसन आणि त्याचा अतिरेक ह्यातील सीमारेषा ओळखता आल्या की अनेक गोष्टी सुखकर होतील, ह्यात दुमत नाही…

हल्ली आपल्याला मीडियाच्या माध्यमातून होणार अतिरेक नाकारता येणार नाही… आजकाल सोशल मीडियाला प्राधान्य दिलं जातं, त्यावर घडणाऱ्या अभिव्यक्ती कितपत योग्य किंवा अयोग्य असतात हेही किंवा त्याची पद्धत काय आहे ह्यावर अवलंबून आहे… त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव टाळता येईल की नाही ही व्यक्तिगत गोष्ट आहे… त्यामुळे नैसर्गिक गरज भागवण्यासाठी अभिव्यक्तीचं मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा अतिरेक टाळून आनंदी राहता येते, त्या दृष्टीने अभ्यास सतत चालू ठेवला पाहिजे…

© आरुशी दाते

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * घराचे घरपण * – कवी श्री सुजित कदम.

श्री सुजित कदम

 

*घराचे घरपण*

(श्री सुजित कदम जी का यह आलेख टूटते हुए संयुक्त परिवारों जीवन एवं जीवन की सच्चाई को उजागर करता है।)

आजकाल घरांची वाढत जाणारी संख्या बघता काही घरांमध्ये अस्तित्वात असणारी एकत्र कुटुंब पध्दत ही लयाला जाईल की काय असं वाटायला लागलंय.  कुटुंबातील माणसं माणसाशी औपचारिक पणे वागतात. कौटुंबिक  ओलावा कुठेतरी नष्ट होत चाललाय.

एकत्र कुटुंबात राहणं त्रासदात्रक वाटू लागलय की काय कळत नाही . छोट्या छोट्या गोष्टीत  एकमेकांच मन जपायचं असत हेच  आम्ही विसरलोय. सतत एकमेंकाशी जुळवून घेणं, एकमेकांची मन संभाळणं, ह्याचा उगाचच नको इतका बाऊ करु लागलोय आपण. अगदी छोट्या छोट्या कारणावरून आपण एकत्र कुटुंबातून वेगळं राहण्याचा निर्णय घेऊन मोकळे होतो.

कालांतराने लोकांनी विचारल्यावर कारण देतो…, आधीच घर लहान होतं म्हणून.. पोरांना जरा आभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून…हवा पालट.. स्पेस,  प्रायव्हसी  अशी  एक ना अनेक कारण आपल्याजवळ तयार असतात. .अर्थात ती आपण नव्या घरात रहायला येण्या आधीच पाठ करून ठेवलेली असतात..!

पण..,   खरं कारण कधी सांगत नाही. मनात जे चाललय ते सांगायला घाबरतो. तेव्हा आपण आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतो.. आणि

खरं कारण  लोकांना समाजाला कळल्यावर मात्र

लोक काय म्हणतील ह्याचा विचार करतो..!

हाच विचार आपण वेगळ राहण्या आधी का करत नाही,आपण कुटुबापासून विभक्त होताना जरासुद्धा विचार करत नाही. आपण लहानपणापासून ज्या घरात लहानाचे मोठे झालो.. ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानाचे मोठे झालो, माणसांना  ओळखायला शिकलो,

ज्या घराने,घरातल्या आपल्या माणसांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळून घेतलं.. त्याच माणसांचा आपण जरासुद्धा विचार नाही करता घराबाहेर पडतो.  ज्या  माणसांनी आपल्याला घडवलं त्याच माणसांचा आपण मोठे झाल्यावर त्रास होऊ लागतो..

कदाचित…मनात नव्या घराला जागा हवी असल्याने मनातली..,आपल्या माणसांची जागा आपण नकळतपणे कमी करत जातो..! बाहेरचं जग आणि घरातल जग समजून घेण्यात गल्लत करतो. आपल्या स्वतःच्या विचारापुढेस अनुभवी बोलांकडे आपण दुर्लक्ष करत  आहोत हे  आपल्या लक्षात देखील येत नाही.

आपण नव्या घरात राहायला जाण्या आधी जर..

एकदा … लोकांना काय वाटेल हा विचार सोडून जरा शांत पणाने घरच्यांना काय वाटेल हा विचार केला…

तर घरांची वाढत जाणारी ( विभक्त कुटुंब ची) संख्या  निश्चितच कमी होईल…,!

नव्या घरात रहायला जा…अगदी आंनदाने जा .

स्वतःच्या कर्तबगारीवर नव्या घरात राहायला जाणारच असाल तर एकत्र कुटुंब घेऊनच रहायला जा…कारण

घर मोठ नसलं तरी चालेल मन मोठं असल पाहिजे…!

मनात जागा  असली की जनात देखील  आपोआप मानाचे स्थान मिळते. बघा विचार करा. स्वतःच घरकुल सजवताना घरातल्या माणसांच्या काळजात असलेले घर देखील तितकेच मजबूत ठेवा.

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * पारंपरिक उत्सव काळाची गरज * – सुश्री रंजना लसणे 

सुश्री रंजना लसणे 

पारंपरिक उत्सव काळाची गरज – गणेश जयंती
(e-abhivyakti में  सुश्री रंजना लसणे जी का स्वागत है।  प्रस्तुत है  पारंपरिक उत्सवों  की महत्ता पर  सुश्री रंजना जी का एक आलेख) 
माघ शु. चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती  घरा शेजारी असलेल्या गणेश मंदिरात काल खूप  मोठा गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला अगदी नियोजन बद्ध रीतीने साजरी करण्यात आली आठ दिवस अगोदरच बच्चे कंपनी ते आजी आजोबा सगळे जोमाने कामाला लागले ज्यांना जे जमेल ते काम कुठल्याही जबरदस्ती शिवाय उचलले गेले अगदी गल्ली बोळी सफाई ते व्यासपीठ उभारणी पर्यंत सगळी कामे शिस्तबद्ध रितीने व उत्साहात पार पडली तृतीयेला लहान मुलींची भजन जुगलबंदी अक्षरशः बारा तास रंगली. नऊ ते चौदा वयोगटातील मुली परंतु अंगावर शहारे येईल असे सादरीकरण रात्री बारा पर्यंत चालले, भजनाच्या तालावर सगळी कामेही जोरात सुरूच होती. अगदी जवळपासच्या गावातील लोकांनीही कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
ज्या दिवसाची आतूरतेने वाट पाहात होते तो दिवस म्हणजेच माघ शु. चतुर्थीचा दिवस उगवला.  पहाटेच  ब्रह्म मुहूर्तावर सुमधुर आवाजात गणेश वंदना लावण्याता आली. फक्त गल्लीच नव्हे तर पूर्ण गावच सडा रांगोळ्यांनी साजला गेला अगदी दिवाळी सारखा. लहान मुले ते वयस्कय मंडळी पर्यंत सारेच उत्साहाने कामाला लागले , सगळे भेदभाव विसरून ज्याला जे जमेल ते काम तो करू लागला. मंगलमय  गणेश याग करण्यात आला  नंतर गणेश प्रतिमेची उत्साहाने कलश यात्रा काढण्यात आली. गावाती लहान मुली ते प्रौढ स्त्रिया कलश घेऊन  मिरवणूकीत सामील झाल्या ,वृद्ध पुरूष सुद्धा टाळ वीणा घेऊन हजरच होते. मागच्या वर्षी  या मंडळाला गणेशोत्सवाचा  जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार  मिळाला . त्यातूनच ढोल पथकासाठी साहित्य आणून सुंदर ढोल पथकतयार करण्यात आले होते.   दररोज सायंकाळी हरीपाठ भजन घेतले जाते यात लहान मुले ते वयस्कर मंडळी यांचा समावेश असतो. पूर्ण गावच जणू मिरवणूकीत सहभागी झाला होता.  या दिवशी बारा ते तीन कीर्तन घेण्यात आले त्या नंतर महाप्रसाद ठेवण्यात आला अगदी रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला  प्रत्येकजण शिस्तबद्ध रीतीने एकमेकांच्या सहकार्याने काम करत होते. दिवसभर मिळणारा प्रसाद मोदक यावर बच्चा पार्टी एकदम खूष होती सार्वजनिक सकस आहाराची सर्वांनाच मेजवानी होती .शिवाय परस्पर सहकार्य प्रेम सेवा , एकात्मता , सृजनानंद , संस्कृतीचा आदर इत्यादी अनेक मूल्ये विकसित होण्यास मदत झाली.
कुठलाही सांस्कृतिक उत्सव केवळ अंधश्रद्धा कालबाह्य परंपरा म्हणून ते नाकारण्या पेक्षा त्यातील चांगल्या गोष्टी घेवून त्या वृद्धींगत केल्या पाहिजेत शिवाय आजच्या गरजा ओळखून त्यात आवश्यक ते बदल करून ते नव्याने सुरू केले तर अनेक सामाजिक सांस्कृतिक मूल्ये सहज राबवता येतील लहान थोर मंडळी एकत्र येऊन कार्य केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होऊन विचारांची देवाणघेवाण होईल समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होत असल्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल यासाठी जुन्या उत्सवांना असे नवीन रूप मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते.
© रंजना लसणे
बाळापूर आखाडा,  हिंगोली

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * मोबाइल एक चिंतन. . . . * – कवी श्री सुजित कदम.

कवी श्री सुजित कदम.
मोबाइल एक चिंतन. . . .
(e-abhivyakti में श्री सुजित कदम जी का स्वागत है।  प्रस्तुत है उनका मोबाइल फोन पर एक आलेख) 
मोबाइल फोन्स हे आजच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे.मोबाईल  . . .  एक जीवनावश्यक  वस्तू. जितके फायदे तितके तोटे.   आपली मुले या तंत्रज्ञान विश्वात हुशार झाली आहेत.  पूर्ण वाक्य स्पष्ट पणे बोलू न शकणारा तीन वर्षाचा छोकरा आज चित्रे पाहून हवी ती गेम डाऊनलोड करून खेळत बसू शकतो. हा मोबाईल  एकमेकांशी होणारा  संवाद कमी करतो पण मेसेज मधून यात्रीक किंवा छापील संवाद साधतो.
ज्या दिवसांमध्ये मोबाइल फोनला लक्झरी वस्तू म्हणून मानले गेले ते दिवस गेले. मोबाईल उत्पादकांमधील वाढत्या स्पर्धेमुळे मोबाईल फोन्सच्या किमती इतकी कमी झाल्या आहेत की आजकाल मोबाईल फोन खरेदी करणे फारसे काही नाही. फक्त काही पैसा खर्च करा आणि आपण मोबाइल फोनचा गर्व मालक आहात. आजच्या काळात, मोबाईल फोन नसलेल्या व्यक्तीस शोधणे फार कठीण आहे. लहान गॅझेट ही जीवनाची मूलभूत गरज आहे. पण मोबाईल फोनची मूलभूत गरज म्हणून टॅग का करतात? आपल्या आयुष्यातील मोबाईल फोनचे महत्व काय आहे? येथे उत्तर आहे.
काही वर्षापूर्वी चिठ्ठी, संदेश, पत्र यातून संपर्क साधला जात  असे. बिनतारी संदेश यंत्रणा अस्तित्वात  आली.  टेलिग्राम युगानंतर निवासी दूरध्वनी  लॅन्ड लाईन अस्तित्वात आले. यानंतर वायरलेस फोन ची संकल्पना  कार्यरत झाली. त्याची जागा  आता मोबाईल, स्मार्ट फोन यांनी घेतली आहे.
आजच्या युगात मोबाईल हे मनोरंजनाचे महत्त्व पूर्ण साधन बनले आहे. सावली पेक्षा ही जास्त जवळची वस्तू म्हणून मोबाईल ने स्थान पटकावले आहे. हा मोबाईल चा वापर सवयी चा गुलाम बनला आहे. 1973 मध्ये  पहिला मोबाईल  अस्तित्वात आला. भारतात त्याचे आगमन 1995 साली झाले. हा भ्रमणध्वनी  आता केवळ संपर्क साधण्याचे माध्यम नसून गजराचे घड्याळ, विविध समारंभाची क्षणचित्रे, चित्रफीती,  व्हिडिओ गेम्स, विविध सोशल नेटवर्किंग चे संदेश, ई मेल यंत्रणा, आणि जुन्या नव्या काळाची, कलेची,  साहित्याची सांगड मोबाईल ने घातली आहे.
आज खेळण्याची जागा मोबाईल ने घेतली आहे.  मुलांना मोबाईल दिला की घर शांत रहाते हे  आजचे वास्तव आहे.  क्षणभरात हव्या त्या विषयावर मार्गदर्शन, माहिती हा मोबाईल पुरवतो. मोबाईल टेक्नॉलॉजी कडे वैज्ञानिक चमत्कार म्हणून पाहिले जाते. नव्या जुन्या मित्रांना एकत्र येण्याची संधी या मोबाईल ने दिली आहे.
एखाद्या गावी जाताना स्वतःचे  वाहन घेऊन निघालो की हा मोबाईल जगभरातील कुठल्याही ठिकाणी  आपल्याला सुरक्षीत पोचवू शकतो.  शालेय अभ्यास क्रमा व्यतिरिक्त अवांतर कला,क्रीडा, विज्ञान चे अद्ययावत ज्ञान हा मोबाईल देतो. हे फायदे मोबाइल चे  जगाचा वेध घरबसल्या घेत आहेत . आज दूर राहूनही  आपण  एकमेकाच्या संपर्कात आहोत ते मोबाइल मुळे.
मोबाइल मुळे गुन्हे गारी विश्वात वचक बसला आहे.  सी सी टि व्ही यंत्रणेने तपास कार्यात सोयी सुविधा निर्माण झाली आहे.
अस मोबाइल कौतुक होत  असले तरी सर्वात जास्त नुकसान शालेय विद्यार्थांचे होत आहे.  अभ्यासातील लक्ष कमी होऊन अनेक गेम्स,  व्हिडिओ यातून शालेय शिक्षणापासून आपला पाल्य दुरावण्याची भिती निर्माण झाली आहे. वेळेचा अपव्यय या मोबाईल मुळे होतो  आहे.  आपण पालकांनी मोबाइल चा काळजीपूर्वक वापर केला तरच नवी पिढी  मोबाईल चा अतिरेक टाळेल.
आपण मुलांना घडवताना चिऊ काऊचा घास भरवायचो. मोबाइल टॉवर च्या रेडिएशन मुळे या पाखरांची संख्या कमी झाली आहे. मोबाईल किरणांचा दुष्परिणाम विविध मानसिक ताणतणावात होतो आहे.
घरातले खेळीमेळीचे वातावरण या मोबाईल मधल्या खेळांनी हिरावून घेतले आहे. लहान वयात पाल्यांना चष्मा लागण्याचा धोका या मोबाईल मुळे निर्माण झाला आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुले हट्टी झाली आहेत. मोठय़ांचा अनादर करण्याची वृत्ती मुलांमध्ये बळावलीआहे.  खोट बोलण्याची सवय या मोबाईल ने आबाल वृद्धांना लावली आहे.  कॅशलेस व्यवहारात मोबाइल खूप महत्त्व पूर्ण कामगिरी बजावतो आहे.
हा मोबाईल जीवलग तर  आहेच त्याला जीव किती लावायचा हे मात्र जागरूक नागरिक  आणि जागरूक पालक या नात्याने  आपण ठरवायची  वेळ आली आहे. .
© सुजित कदम. पुणे
मोबाइल 7276282626.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * वृद्धाश्रम : जबाबदारीतून पळवाट * – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

वृद्धाश्रम : जबाबदारीतून पळवाट

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  का  वर्तमान सामाजिक परिवेश में वयोवृद्ध पीढ़ी पर एक विचारणीय आलेख) 

काळ बदललाय, माणूस बदललाय, जमाना बदललाय. . . नेहमी ऐकतो  आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली  आणि दोष बदलत्या काळाला देऊन मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . .
ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला  अधिक महत्त्व दिले  अन तिथेच नात्यात परकेपणा आला.
चार पायाच्या प्राण्यांना
हौसेने पाळतात माणसं
दोन पायाच्या  आप्तांना
मोलान सांभाळतात माणसं
हे आजचं वास्तव.  विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा  एक”  चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात.  अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते.  एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात.  वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद  आणि दरी निर्माण करतात.
आज प्रत्येकाला पैसा हवा आहे. पैशामुळे माणसाला दुय्यम ठरवणारी स्वार्थी विचारसरणी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
इथे कोण लेकाचा कुणाची देशसेवा पाहतो
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो.
हे ओवाळणं,  एकमेकांची तळी उचलून धरणं या प्रवृत्तीतून माणूस माणसाशी स्पर्धा करतो आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात  आता ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होतो हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. वास्तल्य, ममत्व या भावनेने ज्येष्ठ,आपल्या  अपत्यांना  आपल्या जवळील आर्थिक धन देऊन टाकतात.  आपला लेक वृद्धापकाळी आपला सांभाळ करील,  आपल्या म्हातारपणाची काठी बनेल या संकल्पना आता कालबाह्य बनू पहात आहेत.
वृद्धाश्रम काळाची गरज हा विचार पुढे आला आणि मग नवीन पिढीला रान मोकळे झाले.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा  असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा  अनुभव त्याला  आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार,  नव्या पिढीला नकोसे वाटतात.
”पैसा फेको तमाशा देखो ”
हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा  मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
जुन्या पिढीचा स्वभाव दोष हे कारण पुढे करून ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. पण नवी पिढी स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, जबाबदारी नवी पिढी व्यवहारी दृष्टीने तोलते. आमच पालन पोषण करण त्यांची जबाबदारी होती त्यात जगावेगळे असे काय केले?  अशी मुक्ताफळे  उधळली जातात.  घर  उभे करताना घरातल्या माणसाला  आपलेस करण्याचा संस्कार पैसा नामक द्रव्याने काबीज केल्याने ही वैचारिक दरी निर्माण झाली आहे.  आणि या दरीवर सेतू बंधनाचे कार्य वृद्धाश्रमाने केले आहे.
वृद्धापकाळी हवा  असलेला मायेचा  ओलावा, समदुःखी ,  समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर  एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो.  प्रत्येक व्यक्ती  आपला राग  आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते. .वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना  आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.
नवीन पिढीला घडविण्यात  आपण कुठेतरी कमी पडत  आहोत का? याचा विचार करण्याची गरज  आता निर्माण झाली आहे. कारण  आईवडिलांना सांभाळण्याचे दायित्व नाकारून नव्या पिढीने शोधलेली ही पळवाट कुटुंब व्यवस्थेला हानीकारक आहे. आज  आई बापांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा आदर्श पुढील पिढीने घेतला तर  नातेसंबंध अजूनच मतलबी होतील.
या स्पर्धेच्या युगात स्वतःचा निभाव लागण्यासाठी नव्या पिढीने शोधलेली ही पळवाट नातेसंबंधाला सुरूंग लावणारी आहेच पण त्याच बरोबर दिखाऊ पणाचे समर्थन करणारी आहे.  आज  आई बाबा वृद्धाश्रमात रहातात ही गोष्ट ताठ मानेने सांगितली जावी यासाठी काही समाज कंटक प्रयत्न शील आहेत.  आपण वृद्ध झाल्यावर  आपल्याला सन्मानाने जगता यावे यासाठी शोधलेली वृद्धाश्रमाची पळवाट नात्यातले स्नेहबंध कमी करीत आहे हेच खरे  आहे.
आपण कुणाचा  आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा?  आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर  आपण  आपल्या  आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला  अतिशय कठीण जाईल.
आपण  आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत  ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला ,  कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
मी माणसाचा आहे,  माणूस माझ्या आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी  आद्य कर्तव्य आहे हे जोपर्यंत नवीन पिढी मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार.
आपण घडायचं की आपण बिघडायचं हे  आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * संवाद मुका झाला * – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

संवाद मुका झाला

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी ते का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। पढ़िये श्री सातपुते जी का एक विचारणीय आलेख) 

 भावनांचा कोंडमारा
शब्दातुनीच वाहतो
व्यक्त मी, अव्यक्त मी
स्मरणात तुमच्या राहतो.
मनामध्ये व्यक्त अव्यक्त भावनांचा कोंडमारा सुरू झाला की, प्रत्येकाला आपल मन कुणाजवळ तरी मोकळं करावसं वाटतं. बर्‍याचदा समवयस्क व्यक्तींकडे असा संवाद साधला जातो. सुखदुःखाच्या अनुभूतींचे आदानप्रदान होते. एकमेकांना समजून घेऊन धीर दिला जातो. काही समस्या  असल्यास त्यावर चर्चा करून त्यातून मार्ग सुचवला जातो.  अनुभवाचे बोल या प्रसंगी  आपली कामगिरी चोख बजावतात.
संवाद साधला जात  असताना प्रत्येक वेळी समस्या असतेच असे नाही. समोर घडणार्‍या  एखाद्या वास्तवदर्शी घटनेवर सहज भाष्य करता करता संवाद साधला जातो. वादासह संक्रमित होणारा संवाद ही मतपरिवर्तन घडवू शकतो. संवाद हा प्रत्यक्ष बोलाचालीतून, वाचनातून, लेखनातून, साहित्य निर्मिती मधून, तसेच नृत्य, नाट्य, कला,क्रीडा, यांच्या अविष्कारातून साधला जाऊ शकतो. विद्या आणि कलेच्या व्यासंगातून साधला जाणारा संवाद प्रत्येकाला कार्यप्रवण राहण्यास प्रेरक ठरतो .
आपल्या देशात आपण अनेकविध स्वातंत्र  अबाधितपणे उपभोगत असतो ,त्यामुळे कुणी,कुठे, कधी, कुणाशी, कसा संवाद साधायचा हे व्यक्तिसापेक्ष आहे. हा संवाद साधत असताना, त्यातून घडणार्‍या क्रिया, प्रतिक्रिया, परिणाम, सर्वप्रथम त्या व्यक्तीवर, कुटुंबावर,समाजावर, गावावर, शहरावर, देशावर आणि तरी संपूर्ण जगतावर होत  असतो.
” संवाद मुका झाला ” , या वाक्याचा अर्थ संवादाचे स्वरूप बदलले आहे,  असा घ्यायला हवा. सोशल नेटवर्किंग, मिडीया चा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपल्या  आवडीनुसार, सोशल मीडियाचा उपयोग करीत संवाद साधत आहे. विचारांची देवाणघेवाण होत आहे. ..’घरात विचारत नाही कुत्रं,पण फेसबुक वर हजारो मित्र ‘.. हे वास्तव नाकारता येत नाही. लेखनातून, वाॅटस अपच्या माध्यमातून संवाद होतो आहे.
कुटुंबात, नात्यांमधे, प्रत्यक्ष बोलाचाली नसली तरी मोबाईल, स्मार्ट फोन मधून संपर्क  साधला जातो  आहे. मतभेद झाले की मनभेद होतात. मने दुखावली, की ,मनात अढी, किंतू, किल्मिष, घृणा,द्वेष, मत्सर, असूया  उत्पन्न होऊन नाती दुरावतात. नाती कायमची दुरावण्यापेक्षा मोजका, गरजेनुसार आवश्यक संवाद सोशल मीडिया द्वारे  आज होत आहे. नात्यात अंतर राखून नातेसंबंध टिकवले जात आहेत.
संवाद साधताना  उपयोगात येणारा फोन, भ्रमणध्वनी बनला असून तोच हा मुका संवाद साधत आहे. हरिपाठ, अभंग, शुभंकरोती, भजन, कीर्तन,   अंगाई, सारं संस्कारित वाड़्मय (मोबाईलची ) कळ दाबताच उपलब्ध होत आहे. बाप-लेक , दोन पिढ्यातिल संवादही लोकल न राहता ‘सोशल ‘बनला आहे. रोज नियमित पेपर वाचून, चर्चाचर्वण करणारा ज्येष्ठ नागरिकही या सोशल नेटवर्किंग संवादातून  ‘ग्लोबल’ झाला आहे. साठ सत्तर वर्षापूर्वीचा बालपणीचा सखा सोबती या माध्यमातून घरबसल्या संवाद साधू शकतो.
समोरासमोर प्रत्यक्ष संवाद साधताना, त्या व्यक्तीचा चेहरा ही,न बोलता बरच काही बोलून जायचा. पण हा मुका संवाद,माणसाला  माणूस ओळखायला, माणूस जोडायला शिकवायचा. आता लेखी पुरावा असतानाही,  ‘अरे माझ्या मनात तसं नव्हते, ते बोल माझे नव्हते, फाॅरव्रडेड मेसेज होता’, असे सांगून वेळ मारून नेली जाते.
‘संवाद मुका झाला ‘याचा जितका फायदा झाला, तितका तोटा ही ,मावळत्या पिढीला सहन करावा लागला. डोळ्यातून बोलणारा माणूस,आता  शब्दातून बोलतो आहे.  रागातून, धाकातून व्यक्त होणारा माणूस  आचार, विचार, आणि कृतीतून व्यक्त होत आहे. ठराविक गोष्टीसाठी विशिष्ट व्यक्तींवर  अवलंबून राहणारा माणूस या मुक्या संवादाने  अक्षर ब्रम्हांडाशी जोडला गेला आहे.   माणूस माणसाशी जोडला जाण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ‘संवाद ‘साधत  असतो.
संवाद मुका असो वा बोलका,  ”या ह्रदयीचे त्या ह्रदयी विचारधन संक्रमित होते आहे”  माणूस माणसाच्या संपर्कात आहे, मतपरिवर्तन होते  आहे हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे. .

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * निसर्गायन * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

निसर्गायन 

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का प्रकृति पर  एक अतिसुन्दर आलेख।)

पाऊस पडून आकाश अगदी मोकळं झालेलं! स्वच्छ निळाईचं छत माथ्यावर, आजूबाजूला तृप्त हिरवाई, आणि संगतीला पाखरांची किलबिल! प्रसन्न सकाळ आणि तृप्त भंवतालाचा नजरेने आस्वाद घेत पावलं झपझप पडत होती.

साऱ्या बहराची भरभरून वाहणारी ओंजळ अनंत हस्ते रिती करून अतीव समाधानात अनंत उभा होता. बकुळ मात्र एखाद्या सम्राज्ञीच्या थाटात आपल्या ऐश्वर्याची मुक्त हस्ते उधळण करीत होती . कदंब दिवास्वप्न बघण्यात गढल्यासारखा भासत होता. आवडत्या झाडांवर मायेने नजर फिरवतांना कोण सुख होत होतं ! आणि तेवढ्यात चिरपरिचित ‘चीची’ जरा कर्कश्श आवाज कानी पडला ! नजर त्या दिशेने वळतेय तेवढ्यात झाडाच्या फांदीवरून ग्रे हाॅर्न बिल्सची जोडी मोठ्या डौलात आकाशात झेपावली ! निमिषार्धात दुसऱ्याही जोडीने त्यांच्या मागोमाग आकाशात झेप घेतली !

क्षणभर विश्वासच बसेना ! काय सुंदर दृष्य होतं ते ! मुक्त आकाशात आपल्या जोडीदाराबरोबरचा मुक्त विहार …! साथसंगत …जिवलगाची ..किती हवीहवीशी ! त्याच्या साथीने गगनभरारी घेण्यासाठी पंखात संचारणारं  बळ…त्याच्या संगतीने सारे ऋतू अंगावर घेण्याचं सामर्थ्य …बरोबरीने नवनव्या अवकाशाला घातली जाणारी गवसणी …! सहजीवनाचं सारच ती पक्ष्यांची जोडी नकळत सांगून गेली.

खरंच निसर्ग सा-या चरांचरांतूनच काही तरी सतत सांगत असतो, आपल्याशी संवाद साधत असतो ! निसर्गाची शिकवण ही अव्याहत सुरूच असते, उन्हाचे चटके सोसत तीव्र जीवनेच्छेने ग्रीष्मात तग धरून राहिलेली झाडं असू दे, की उन्हाचा चटका कमी करणारा, सुखवणारा मोगरा असू दे, की उन्हाच्या तडाख्यातही अंगांगी फुलणारा आणि सगळ्यांना खुलवणारा पळस, बोगन, गुलमोहोर असू दे, की पावसाच्या एका सरीतच उमलून आलेली लीली असू दे, की हातचं काहीही न राखता मुक्त हस्ते भरभरून देणारं झाड असू दे, किती आणि काय काय !!जगण्याची असोशी, जगण्याचं सार, जगण्याची कला सारं ह्या पठ्ठ्याला अगदी आत्मसात झालेलं !

मनोमन निसर्गाला मुजरा करत,  मनावर कोरल्या गेलेल्या दृष्याची उजळणी करत एका वेगळ्याच तृप्तीत पावलं घराकडे वळत होती !

© ज्योति हसबनीस, नागपूर

Please share your Post !

Shares
image_print