मराठी साहित्य – मराठी आलेख – * वृद्धाश्रम : जबाबदारीतून पळवाट * – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

वृद्धाश्रम : जबाबदारीतून पळवाट

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  का  वर्तमान सामाजिक परिवेश में वयोवृद्ध पीढ़ी पर एक विचारणीय आलेख) 

काळ बदललाय, माणूस बदललाय, जमाना बदललाय. . . नेहमी ऐकतो  आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली  आणि दोष बदलत्या काळाला देऊन मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . .
ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला  अधिक महत्त्व दिले  अन तिथेच नात्यात परकेपणा आला.
चार पायाच्या प्राण्यांना
हौसेने पाळतात माणसं
दोन पायाच्या  आप्तांना
मोलान सांभाळतात माणसं
हे आजचं वास्तव.  विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा  एक”  चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात.  अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते.  एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात.  वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद  आणि दरी निर्माण करतात.
आज प्रत्येकाला पैसा हवा आहे. पैशामुळे माणसाला दुय्यम ठरवणारी स्वार्थी विचारसरणी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
इथे कोण लेकाचा कुणाची देशसेवा पाहतो
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो.
हे ओवाळणं,  एकमेकांची तळी उचलून धरणं या प्रवृत्तीतून माणूस माणसाशी स्पर्धा करतो आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात  आता ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होतो हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. वास्तल्य, ममत्व या भावनेने ज्येष्ठ,आपल्या  अपत्यांना  आपल्या जवळील आर्थिक धन देऊन टाकतात.  आपला लेक वृद्धापकाळी आपला सांभाळ करील,  आपल्या म्हातारपणाची काठी बनेल या संकल्पना आता कालबाह्य बनू पहात आहेत.
वृद्धाश्रम काळाची गरज हा विचार पुढे आला आणि मग नवीन पिढीला रान मोकळे झाले.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा  असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा  अनुभव त्याला  आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार,  नव्या पिढीला नकोसे वाटतात.
”पैसा फेको तमाशा देखो ”
हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा  मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
जुन्या पिढीचा स्वभाव दोष हे कारण पुढे करून ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. पण नवी पिढी स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, जबाबदारी नवी पिढी व्यवहारी दृष्टीने तोलते. आमच पालन पोषण करण त्यांची जबाबदारी होती त्यात जगावेगळे असे काय केले?  अशी मुक्ताफळे  उधळली जातात.  घर  उभे करताना घरातल्या माणसाला  आपलेस करण्याचा संस्कार पैसा नामक द्रव्याने काबीज केल्याने ही वैचारिक दरी निर्माण झाली आहे.  आणि या दरीवर सेतू बंधनाचे कार्य वृद्धाश्रमाने केले आहे.
वृद्धापकाळी हवा  असलेला मायेचा  ओलावा, समदुःखी ,  समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर  एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो.  प्रत्येक व्यक्ती  आपला राग  आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते. .वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना  आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.
नवीन पिढीला घडविण्यात  आपण कुठेतरी कमी पडत  आहोत का? याचा विचार करण्याची गरज  आता निर्माण झाली आहे. कारण  आईवडिलांना सांभाळण्याचे दायित्व नाकारून नव्या पिढीने शोधलेली ही पळवाट कुटुंब व्यवस्थेला हानीकारक आहे. आज  आई बापांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा आदर्श पुढील पिढीने घेतला तर  नातेसंबंध अजूनच मतलबी होतील.
या स्पर्धेच्या युगात स्वतःचा निभाव लागण्यासाठी नव्या पिढीने शोधलेली ही पळवाट नातेसंबंधाला सुरूंग लावणारी आहेच पण त्याच बरोबर दिखाऊ पणाचे समर्थन करणारी आहे.  आज  आई बाबा वृद्धाश्रमात रहातात ही गोष्ट ताठ मानेने सांगितली जावी यासाठी काही समाज कंटक प्रयत्न शील आहेत.  आपण वृद्ध झाल्यावर  आपल्याला सन्मानाने जगता यावे यासाठी शोधलेली वृद्धाश्रमाची पळवाट नात्यातले स्नेहबंध कमी करीत आहे हेच खरे  आहे.
आपण कुणाचा  आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा?  आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर  आपण  आपल्या  आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला  अतिशय कठीण जाईल.
आपण  आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत  ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला ,  कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
मी माणसाचा आहे,  माणूस माझ्या आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी  आद्य कर्तव्य आहे हे जोपर्यंत नवीन पिढी मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार.
आपण घडायचं की आपण बिघडायचं हे  आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * संवाद मुका झाला * – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

संवाद मुका झाला

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी ते का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। पढ़िये श्री सातपुते जी का एक विचारणीय आलेख) 

 भावनांचा कोंडमारा
शब्दातुनीच वाहतो
व्यक्त मी, अव्यक्त मी
स्मरणात तुमच्या राहतो.
मनामध्ये व्यक्त अव्यक्त भावनांचा कोंडमारा सुरू झाला की, प्रत्येकाला आपल मन कुणाजवळ तरी मोकळं करावसं वाटतं. बर्‍याचदा समवयस्क व्यक्तींकडे असा संवाद साधला जातो. सुखदुःखाच्या अनुभूतींचे आदानप्रदान होते. एकमेकांना समजून घेऊन धीर दिला जातो. काही समस्या  असल्यास त्यावर चर्चा करून त्यातून मार्ग सुचवला जातो.  अनुभवाचे बोल या प्रसंगी  आपली कामगिरी चोख बजावतात.
संवाद साधला जात  असताना प्रत्येक वेळी समस्या असतेच असे नाही. समोर घडणार्‍या  एखाद्या वास्तवदर्शी घटनेवर सहज भाष्य करता करता संवाद साधला जातो. वादासह संक्रमित होणारा संवाद ही मतपरिवर्तन घडवू शकतो. संवाद हा प्रत्यक्ष बोलाचालीतून, वाचनातून, लेखनातून, साहित्य निर्मिती मधून, तसेच नृत्य, नाट्य, कला,क्रीडा, यांच्या अविष्कारातून साधला जाऊ शकतो. विद्या आणि कलेच्या व्यासंगातून साधला जाणारा संवाद प्रत्येकाला कार्यप्रवण राहण्यास प्रेरक ठरतो .
आपल्या देशात आपण अनेकविध स्वातंत्र  अबाधितपणे उपभोगत असतो ,त्यामुळे कुणी,कुठे, कधी, कुणाशी, कसा संवाद साधायचा हे व्यक्तिसापेक्ष आहे. हा संवाद साधत असताना, त्यातून घडणार्‍या क्रिया, प्रतिक्रिया, परिणाम, सर्वप्रथम त्या व्यक्तीवर, कुटुंबावर,समाजावर, गावावर, शहरावर, देशावर आणि तरी संपूर्ण जगतावर होत  असतो.
” संवाद मुका झाला ” , या वाक्याचा अर्थ संवादाचे स्वरूप बदलले आहे,  असा घ्यायला हवा. सोशल नेटवर्किंग, मिडीया चा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपल्या  आवडीनुसार, सोशल मीडियाचा उपयोग करीत संवाद साधत आहे. विचारांची देवाणघेवाण होत आहे. ..’घरात विचारत नाही कुत्रं,पण फेसबुक वर हजारो मित्र ‘.. हे वास्तव नाकारता येत नाही. लेखनातून, वाॅटस अपच्या माध्यमातून संवाद होतो आहे.
कुटुंबात, नात्यांमधे, प्रत्यक्ष बोलाचाली नसली तरी मोबाईल, स्मार्ट फोन मधून संपर्क  साधला जातो  आहे. मतभेद झाले की मनभेद होतात. मने दुखावली, की ,मनात अढी, किंतू, किल्मिष, घृणा,द्वेष, मत्सर, असूया  उत्पन्न होऊन नाती दुरावतात. नाती कायमची दुरावण्यापेक्षा मोजका, गरजेनुसार आवश्यक संवाद सोशल मीडिया द्वारे  आज होत आहे. नात्यात अंतर राखून नातेसंबंध टिकवले जात आहेत.
संवाद साधताना  उपयोगात येणारा फोन, भ्रमणध्वनी बनला असून तोच हा मुका संवाद साधत आहे. हरिपाठ, अभंग, शुभंकरोती, भजन, कीर्तन,   अंगाई, सारं संस्कारित वाड़्मय (मोबाईलची ) कळ दाबताच उपलब्ध होत आहे. बाप-लेक , दोन पिढ्यातिल संवादही लोकल न राहता ‘सोशल ‘बनला आहे. रोज नियमित पेपर वाचून, चर्चाचर्वण करणारा ज्येष्ठ नागरिकही या सोशल नेटवर्किंग संवादातून  ‘ग्लोबल’ झाला आहे. साठ सत्तर वर्षापूर्वीचा बालपणीचा सखा सोबती या माध्यमातून घरबसल्या संवाद साधू शकतो.
समोरासमोर प्रत्यक्ष संवाद साधताना, त्या व्यक्तीचा चेहरा ही,न बोलता बरच काही बोलून जायचा. पण हा मुका संवाद,माणसाला  माणूस ओळखायला, माणूस जोडायला शिकवायचा. आता लेखी पुरावा असतानाही,  ‘अरे माझ्या मनात तसं नव्हते, ते बोल माझे नव्हते, फाॅरव्रडेड मेसेज होता’, असे सांगून वेळ मारून नेली जाते.
‘संवाद मुका झाला ‘याचा जितका फायदा झाला, तितका तोटा ही ,मावळत्या पिढीला सहन करावा लागला. डोळ्यातून बोलणारा माणूस,आता  शब्दातून बोलतो आहे.  रागातून, धाकातून व्यक्त होणारा माणूस  आचार, विचार, आणि कृतीतून व्यक्त होत आहे. ठराविक गोष्टीसाठी विशिष्ट व्यक्तींवर  अवलंबून राहणारा माणूस या मुक्या संवादाने  अक्षर ब्रम्हांडाशी जोडला गेला आहे.   माणूस माणसाशी जोडला जाण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ‘संवाद ‘साधत  असतो.
संवाद मुका असो वा बोलका,  ”या ह्रदयीचे त्या ह्रदयी विचारधन संक्रमित होते आहे”  माणूस माणसाच्या संपर्कात आहे, मतपरिवर्तन होते  आहे हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे. .

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * निसर्गायन * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

निसर्गायन 

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का प्रकृति पर  एक अतिसुन्दर आलेख।)

पाऊस पडून आकाश अगदी मोकळं झालेलं! स्वच्छ निळाईचं छत माथ्यावर, आजूबाजूला तृप्त हिरवाई, आणि संगतीला पाखरांची किलबिल! प्रसन्न सकाळ आणि तृप्त भंवतालाचा नजरेने आस्वाद घेत पावलं झपझप पडत होती.

साऱ्या बहराची भरभरून वाहणारी ओंजळ अनंत हस्ते रिती करून अतीव समाधानात अनंत उभा होता. बकुळ मात्र एखाद्या सम्राज्ञीच्या थाटात आपल्या ऐश्वर्याची मुक्त हस्ते उधळण करीत होती . कदंब दिवास्वप्न बघण्यात गढल्यासारखा भासत होता. आवडत्या झाडांवर मायेने नजर फिरवतांना कोण सुख होत होतं ! आणि तेवढ्यात चिरपरिचित ‘चीची’ जरा कर्कश्श आवाज कानी पडला ! नजर त्या दिशेने वळतेय तेवढ्यात झाडाच्या फांदीवरून ग्रे हाॅर्न बिल्सची जोडी मोठ्या डौलात आकाशात झेपावली ! निमिषार्धात दुसऱ्याही जोडीने त्यांच्या मागोमाग आकाशात झेप घेतली !

क्षणभर विश्वासच बसेना ! काय सुंदर दृष्य होतं ते ! मुक्त आकाशात आपल्या जोडीदाराबरोबरचा मुक्त विहार …! साथसंगत …जिवलगाची ..किती हवीहवीशी ! त्याच्या साथीने गगनभरारी घेण्यासाठी पंखात संचारणारं  बळ…त्याच्या संगतीने सारे ऋतू अंगावर घेण्याचं सामर्थ्य …बरोबरीने नवनव्या अवकाशाला घातली जाणारी गवसणी …! सहजीवनाचं सारच ती पक्ष्यांची जोडी नकळत सांगून गेली.

खरंच निसर्ग सा-या चरांचरांतूनच काही तरी सतत सांगत असतो, आपल्याशी संवाद साधत असतो ! निसर्गाची शिकवण ही अव्याहत सुरूच असते, उन्हाचे चटके सोसत तीव्र जीवनेच्छेने ग्रीष्मात तग धरून राहिलेली झाडं असू दे, की उन्हाचा चटका कमी करणारा, सुखवणारा मोगरा असू दे, की उन्हाच्या तडाख्यातही अंगांगी फुलणारा आणि सगळ्यांना खुलवणारा पळस, बोगन, गुलमोहोर असू दे, की पावसाच्या एका सरीतच उमलून आलेली लीली असू दे, की हातचं काहीही न राखता मुक्त हस्ते भरभरून देणारं झाड असू दे, किती आणि काय काय !!जगण्याची असोशी, जगण्याचं सार, जगण्याची कला सारं ह्या पठ्ठ्याला अगदी आत्मसात झालेलं !

मनोमन निसर्गाला मुजरा करत,  मनावर कोरल्या गेलेल्या दृष्याची उजळणी करत एका वेगळ्याच तृप्तीत पावलं घराकडे वळत होती !

© ज्योति हसबनीस, नागपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * भारत स्वतंत्र आहे का? * – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

भारत स्वतंत्र आहे का ?

(कविराज विजय यशवंत सातपुते का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। पढ़िये श्री सातपुते जी का एक विचारणीय आलेख) 

भारत स्वतंत्र  आहे का? या प्रश्नाचे उत्तर जरी  ‘होय, आहे, असे  असले तरी, तरी हा प्रश्न लोकसत्ताक राज्यातील प्रत्येक सदस्याला विचार करायला लावणारा आहे.  लोकप्रतिनीधी निवडून स्थापन झालेली लोकशाही राजवट,  अजूनही सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत गरजांचे निवारण करू शकलेली नाही.

विकसनशील देशात  आपल्या देशाचा डांगोरा पिटताना,  गरीब, श्रीमंत यांच्या मधील दरीत विषमतेच्या,  असंतोषाच्या,  भ्रष्टाचाराच्या, विळख्यात सर्व सामान्य माणूस  खितपत पडला आहे हे विसरून चालणार नाही.  हातावरच पोट  असणारी लाखो, करोडो बेरोजगार जनता  आज  उदरभरणासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळत आहे.  अन्न,  वस्त्र, निवारा यांची भ्रांत  असलेला माणूस पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. गुन्हेगारी ही पहिली पायरी आहे. . . पण पैशाची चटक लागलेले पैशाचा गुलाम बनले आहेत.

भारता सारख्या कृषी प्रधान देशात, कर्जबाजारी, शेतमालाला रास्त दर न मिळाल्याने शेतीमालाचे होणारे नुकसान, पतसंस्थाची ,  भूविकास बॅकांची दिवाळखोरी, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या,  शिक्षण श्रेत्रातील डोनेशन गीरी या सर्व समस्या सामान्य नागरीकाला अडचणीत  आणत आहेत.  सरकारी मदतीचा एक रूपया ,  लाभार्थी पर्यंत पोहोचताना,  सरकारी दरबारी त्याच्या तिप्पट खर्च दाखवला जातो.  ईमानदारी शब्दाचा वापर काचेवर लावलेल्या पार्यासारखा केला जात आहे.  प्रत्येकाच्या नजरेतून हे भीषण वास्तव समोर येत आहे.

मित्र हो,  या विदारक वास्तवतेचा उहापोह करण्याचे कारण इतकेच की  आपला देश ही आर्थिक, मानसिक, सामाजिक गुलामगिरी सहन करीत येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढीत आहे. ही सहनशीलता त्याला स्वाभिमान विकायला भाग पाडते आहे. आणि जिथे स्वाभिमान विकला जातो तिथे माणूस माणसाला बळीचा बकरा बनवू पहातो. राजकारणी व्यक्ती मनुष्य बळाचा वापर करून सत्ता काबीज करते व त्याच सत्तेचा वापर करून, ‘रंकाला राव  आणि रावाला रंक करते’.

ही  गुलामगिरी, बळी तो कान पिळी, दाम करी काम  ही विचारसरणी  आज  आमचे विकसनाचे हक्क, तंत्र,  हिरावून नेत  आहे. बोल्ड कवी,  म.  भा. चव्हाण म्हणतात,

” इथे कोण लेकाचा कुणाची देशसेवा पाहतो. 

  तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो.”

जर  असे  इथले वास्तव  असेल तर, स्वतंत्रता, स्वराज्य  या संकल्पनांना येथेच सुरूंग लागतो.  आज कौटुंबिक स्तरावर जर विचार करायला गेलो तर प्रत्येक जण स्वतःच्या कौटुंबिक समस्यामध्ये पुरता गुरफटून गेला आहे.  मुलभूत गरजा,  सोयीसुविधा  उपलब्ध  असणारा माणूसच देशाचा, समाजाचा विचार करू  शकतो.

शेतकरी कुणबी यांचीअवस्था अतिशय बिकट  आहे .  वावरात दिवसभर काबाड कष्ट करायचे, घाम गाळायचा आणि पिकलेल्या पिकाचा मोबदला, हमीभाव परस्पर सरकारने,दलालाने ठरवायचा. असे भीषण वास्तव आहे.  पण कुचकामी झालेली राजकीय किंवा सरकारी यंत्रणा यांना या वास्तवाचे  काहीच सोयर सुतक नाही . केवळ मतांचा बाजार मांडून सत्ता काबीज करणारी  ,लाचार  भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी  देशासाठी नाही तर स्वार्थासाठी  इथले मनुष्य बळ वेठीस धरतात  .

परिस्थितीने लादलेली गुलामगिरी,  आणि वैचारिकता स्वराज्य या संकल्पनेला दूर नेत  आहे.  आज भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्याचे सर्व  मूलभूत  हक्क,  अधिकार,  आरक्षणे सुरक्षित असताना नागरीक सुखी, समाधानी नाही हे स्वतंत्र भारताचे ‘वास्तव’ आहे.

इंग्रजांनी जेव्हा जेव्हा भारत देश ताब्यात घेतला तेव्हा, “फोडा , झोडा , दुही माजवा , एकी तोडा, आणि राज्य करा हे दबाव तंत्र होते. तेव्हा भारत देश संस्थानिकांच्या ताब्यात होता. . .  आणि  आता राजकारण्यांच्या ताब्यात  आहे.  शेतकरी शेतात राबला तरच या देशाची आर्थिक घडी सुरळीत होणार आहे.  अन्न, वस्त्र, निवारा, यातून निर्भर रहाणाराच स्वतंत्र भारतातील समृद्धीचा उपभोग घेऊ शकतो.  व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, धर्म, जात पंथ,  भाषा,  आचार विचार, गरीब, श्रीमंत यामधील तफावत ‘स्वतंत्र भारत’

आहे का? या प्रश्नावर प्रत्येकास चिंताक्रांत करते म्हणून भारत स्वतंत्र  आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय  असे जरी दिले तरी मग या देशाचे  आजचे चित्र  असे का? ही गुलामगिरी का? हे प्रश्न  उपस्थित होतात.

“भारत”, या  शब्दाचा  अर्थ  ‘भा -रत’ म्हणजे  प्रकाशात रत रममाण झालेला  असा सांगितला गेला आहे.  बुद्धी च्या  आणि सुर्याच्या प्रकाशात रममाण झालेला हा देश आजही ‘परिस्थितीचा गुलाम ‘ आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. कर्जबाजारी ठाळण्यासाठी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही वेठबिगारीची लक्षणे पांढर पेश्या वर्गालाही विचार करायला भाग पाडतात.

परदेशातून  उच्च शिक्षण घेणारा भारतीय नागरिक त्याचे ज्ञान,  कला,कौशल्य,  परकियांना विकतो. . . सुखासीन  आयुष्य जगण्यासाठी परदेशात स्थायिक होतो. म्हणजे खत, पाणी, वीज, कच्चा माल सारे देशी  आणि उत्पन्न मात्र परकीयांनी घ्यायचे. भारतीयांनी त्यांची बौद्धिकता भारत देशासाठी खर्च केली तर नक्कीच भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. भारतीय विकसित व्हायचा  असेल तर ही वास्तवाची गुलामगिरी नष्ट व्हायला हवी.  परदेशी गोष्टीच आकर्षण, हव्यास यांनी आणि इथली राजकीय परीस्थिती यामुळं  आपण स्वावलंबी नाही. आपले स्वातंत्र आज या  वास्तविकतेचे गुलाम बनले आहे. म्हणून म्हणावेसे वाटते,

“.. भारत माझा देश आहे,

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

त्यांना परिस्थितीच्या गुलामगिरीतून

मुक्त करण्यासाठी साठी पुन्हा एकदा संघर्ष करीन. ”

हा जीवन संघर्ष जोवर चालू आहे तोवर खेदाने म्हणावे लागेल.

..”होय,  आजही भारत स्वतंत्र नाही. . . !”

जय हिंद. . . !

माझ्यातला माणसाला. . !

स्वतंत्र, स्वावलंबी,

समृद्ध  आणि सुखासीन

देशी  आयुष्य जगण्यासाठी. . . . !

वंदे मातरम. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * अवचित एका सायंकाळी * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

अवचित एका सायंकाळी

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  द्वारा  एक सुमधुर संगीत के कार्यक्रम की अति सुंदर व्याख्या ।  )

कधी कधी ध्यानी मनी नसतांना अचानक एखादा खजिना गवसावा तसं काहीसं काल झालं . सिव्हील लाईन्सच्या वसंतराव देशपांडे हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याचं उत्सवी रूप बघून हरखूनच गेले मी आणि नकळतच पावलं उत्सुकतेने हॉलच्या दिशेने वळली, रस्त्याच्या दुभाजकावर रोवलेले, आणि फडफडणारे रंगीबेरंगी झेंडे, मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेली अत्यंत आकर्षक कमान ,हाॅलपर्यंतच्या रस्त्यावर घातलेला रेड कार्पेट, सुरेख रंगसंगतीतली संस्कारभारतीची रांगोळी, हाॅलच्या प्रवेशद्वारासमोर मंद ज्योतींच्या प्रकाशात जणू कलेचा सारा वैभवशाली इतिहासच उजळून काढणारा भव्य दीपस्तंभ, गच्च मोगऱ्याचं घमघमणारं मुख्य दारावरलं तोरण, आणि आत हाॅलमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सोडलेले मोगऱ्याचे कलात्मक पडदे, सारं वातावरणच गंधभारलं झालं होतं. ‘सूर -वसंत’ च्या रूपांत जणू वसंतच फुलला होता, परिसरात, मनामनात!

आज अगदी मेजवानी होती रसिकांना ! सुरेल वाद्यांची जुगलबंदी, आणि ऊस्ताद रशिदखान  यांचे खणखणीत सूर ! डायसवर सारी दिग्गज कलाकार मंडळी आपापल्या वाद्यांशी थोडंसं हितगुज करतांना जाणवत होतं, हळूहळू पडदा उघडला, आणि थोर कलाकारांचा परिचय करून दिल्यानंतर ज्याची रसिक अगदी श्वास रोखून वाट पाहत होते त्या जुगलबंदीस सुरूवात झाली. सॅक्साफोन, बासरी, तबला, मृदुंग, आणि मोरसिंग साऱ्यांच्या आपसात गप्पा सुरू झाल्या. कधी सॅक्साफोन, बासरीचं हितगुज चाललं होतं तर, कधी त्यांच्यात एकदम वादाची ठिणगी पेटल्यासारखी वाटत होती, तबला आणि मृदुंग काळोकाळ न भेटलेल्या मित्रासारखे संवादी सूर आळवत होते तर कधी त्यांच्यातही एखादा विसंवादी सूर लागावा तशी खडाजंगी होत होती, मोरसिंग खट्याळ सारखं अध्ये मध्ये लुडबुडत होतं, चित्र विचित्र  आवाजांनी साऱ्यांना ‘अरे ऐकारे माझंही थोडं ‘ जणू असं म्हणत आपलं अस्तित्व दाखवून देत होतं, मध्येच तबल्याला आपलं तेच खरं करायची तल्लफ येत होती तर , मृदुंग  देखील हम किसीसे कम नहीं करत बेभान थिरकत होता !मधूनच सुरेल पदन्यासात बासरी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती, तिच्या दैवी सुराच्या चांदण्यात तर सारीच उजळली होती ! अधून मधून शिस्तीत सारे ‘ मिळून साऱ्याजणी ‘ चा साक्षात्कार झाल्यासारखे सूरात सूर

मिसळून, गप्पाष्टकांत गुंग झाल्यासारखे वाटायचे, तर मध्येच एखादा, एकांड्या शिलेदारासारखा किल्ला लढवायचा …..! कलेची साधना म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, याचा साक्षात्कारच झाला मला ! ती थिरकणारी आणि क्षणभर अंतर्धानच पावणारी बोटं, केवळ कानांना जाणवणारी त्यांची थाप त्यातली त्यांची लय, रागाच्या विशिष्ट  सुरावटीच्या रिंगणातच त्यांनी एकमेकांबरोबर केलेलं लयबद्ध नृत्य अत्यंत विलक्षण ! माझ्यासारखा संगीताचा सा ही न कळणारा कानसेन अगदी तृप्त तृप्त झाला. उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी मानवंदना दिली त्या थोर कलाकारांना !

जुगलबंदीनंतर ऊस्ताद रशीदखान यांच्या गायकीला सुरूवात झाली. क्षणात उंची खोलीचे पल्ले लीलया गाठणारी त्यांची खणखणीत आवाजातली सुरावट त्यांनी सादर केलेल्या बंदिशीतून झळकत होती. स्वरांबरोबरचा त्यांचा विहार रागांच्या शिस्तीच्या  चौकटीत असला तरी अतिशय विलोभनीय होता. जणू सुरांची आणि त्यांची अशी गळामिठी रंगली होती की ती सुटूच नये असं वाटत होतं . आवाजातल्या फिरतीचं गारूड रसिकमनावर अगदी गोंदलं गेलं होतं. साथीला असलेला तानपुरा, तबला आणि गोsड सारंगी, सुरावटीचं ऐश्वर्य अधिकाधिक समृद्ध करत होते …! गुरूबरोबरच साथ संगत करणारा त्यांचा शिष्य देखील आपल्या गानकौशल्याने रसिकमनावर आपला एक वेगळा ठसा उमटवून गेला !

कलेचा समृद्ध आविष्कार माझ्यासारख्या कलाप्रांतातल्या अनभिज्ञ जिवाच्या आयुष्यात एक अनमोल असा खजिना रिता करून गेला. घरी परतले तरी ते सूर होतेच सोबतीला, झोपतांना देखील वाद्यांचं रंगलेलं गप्पाष्टक आठवत होतंच. कदंबाला भेटायला गेलेली मी ..मला नाराज नाही केलं त्याने …माझी पावलं वळवलीत देशपांडे हाॅलच्या दिशेने … त्याच्याचसारख्या सुगंधी स्मृतींच्या खजिन्याच्या दिशेने ..मनातला माझा कदंब अधिकाधिक जिव्हाळ्याचा वाटायला लागलाय आता !!

© ज्योति हसबनीस, नागपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * जेथे जातो तेथे तू माझा सांगाती * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का  रोचक आलेख तो तेथे तू माझा सांगाती  हमें  बताता है कि कैसे मोबाइल हमारे जीवन का एक महत्वपूर्ण  अंग बन गया है और हम उसके बिना कितने अपूर्ण हैं ?)

बागेला पाणी घालता घालता आज मी हेच गुणगुणत होते. आणि जशी मी रंगून गेले ना तशी नजरेसमोर  माझा सांगातीच  फेर धरू लागला. माझा सांगाती ..माझा मोबाईल !! हो..विश्वास बसत नाहीय ना ..माझा माझ्यावरही विश्वास बसत नाहीय ..पण अगदी खरं तेच सांगतेय ! अगदी गाता गाता ‘सांगाती’ ह्या शब्दाशी मी अडखळले आणि जणू मला साक्षात्कारच झाला ! सांगाती ह्या शब्दाचा खराखुरा अर्थ मला उमगला !

अक्षरश: जिथे जाईन तिथे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी येणारच माझ्या बरोबर तो ! कधी एखाद्या नम्र सेवकासारखा उशा पायथ्याशी निमूटपणे बसणार, तर एकांतात सारं जग पुढ्यात टाकून ‘काय प्रिय करू गं मी तुझं’ करत माझ्या हातचं बाहुलं बनत बघ्याची भूमिका घेणार ! एकाग्रपणे काही वेगळं करू म्हंटलं तर सारखा साद घालणार, जणू ओरडूनच सांगतोय जसा ‘बघ तरी कोण आलंय तुला भेटायला, ‘काय आणलंय बघ तरी, ‘अगं काय म्हणणं आहे ते तरी बघ जरा डोकावून .. ! ‘अक्षरश: लहान मुलासारखं लक्ष्य वेधून घेणार, भंडावून सोडणार, आणि हातातलं काम टाकून एकदाचा जवळ घेतला की जिवाला निवांतता … त्याच्या आणि माझ्याही ..! हो कधी कधी मुकाट बसवावंच लागतं त्याला, किती सारखा सहन करायचा त्याचा टणटणाट !

त्याला न घेता बाहेर जायची काय बिशाद ! सारे रस्ते, पत्ते, फोन नंबर्स, माझ्यापेक्षा यालाच पाठ ! माझ्यापेक्षा तीक्ष्ण याचे डोळे, तल्लख  याची स्मरणशक्ती, आणि उत्तुंग बुद्धीची झेप ! इकडून तिकडे सांगावा धाडण्याचा वायूवेग तर विचारूच नका ..साऱ्याचंच कौतुक करावं तेवढं थोडंच ! महत्वाच्या भेटीगाठीच्या वेळा, औषधाच्या वेळा, एकवेळ मी विसरेन पण हा पठ्ठा नाही विसरणार ! ती वेळ वेळेवारी पाळण्यात, साधण्यात याचा वाटा लाख मोलाचा ! दऱ्या , खोऱ्या , समुद्र किनारे किर्रजंगल ,सगळीकडे हा माझ्याबरोबर असणारच ! मी डोळ्यात साठवण्याआधीच सारं काही टिपायची याला कोण घाई ! याच्या या घाईपायी कित्येकदा सारं नीटपणे डोळ्यात साठवायचं पण राहून जातं आणि थोडी चुटपूट लागते जिवाला ! मनस्वी संताप येतो त्याच्या अगोचरपणाचा आणि स्वत:च्या धांदरटपणाचा देखील ! पण मग कधीतरी याने गोळा केलेला खजिना न्याहाळतांना अपार कौतुक मनात दाटतं, त्याच्या एकनिष्ठपणाची साक्ष पटते, आणि उगाचच रागावतो आपण याच्यावर म्हणून मन खंतावतं देखील ! कधी मनात काही दाटून आलं की सारं ह्याला सांगून मी मोकळी ! अगदी सगळी माझी स्पंदनं तोही तितक्याच असोशीने अनुभवणार आणि  क्षणार्धात माझ्या सख्यांपर्यंत ती तशीन् तशी पोहोचवणार. संवाद राखला जाणं याचं पुरतं श्रेय या तत्परतेने सांगावा धाडणाऱ्या माझ्या सांगात्याला ! सकाळी कितीही वाजता उठायचं असलं तरी ‘तूच उठवशील रे’ असा माझा लाडिक हट्ट असतो त्याच्याजवळ ! मंद मंद संगीत ऐकत हळूच डोळे उघडावेत, काही क्षण परत ते सूर कानामनात  साठवून घेत डोळे अलगद मिटावेत असा नित्यक्रमच ठरवून टाकलाय मी.. !

अरे हो ! एक तर सांगायचंच राहिलं.

चिमुरड्या नातींना सोबत करण्यात, त्यांना अंगाई म्हणून झोपवण्यात, आवडती गाणी गोष्टी, व्हिडिओ दाखवण्यात काय interest घेतला ह्या माझ्या दोस्ताने !  तिथे जर तो माझ्या सोबत आला नसता ना तर मग मात्र माझी काही खैर नव्हती…! अवखळ  नातींचे मनस्वी हट्ट पुरवणं तर माझ्या आवाक्याबाहेरचंच  झालं असतं !

आणि अजून एक, जरा आतली गोष्ट सांगते हा माझा दोस्त अगदी सावलीसारखा पाठीराखा,

आणि म्हणूनच माझ्या जोडीदाराचा अगदी कडवा प्रतिस्पर्धी ! ह्याची माझ्याशी वेळी अवेळीची जवळीक हा एक वादाचा ज्वलंत विषय ..कायम धगधगता ..!ठिणगीच पडू दे की वणवा पेटलाच म्हणून समजा …

तर असा आहे हा माझा सांगाती, जिथे मी जाते तिथे हा असतोच! आणि मी कसली चालवतेय त्याला, तोच मला चालवतो, साऱ्या जगाची सैर करवतो, अक्षरश: सुखात आणि निवांत असते मी त्याचा हात धरून ..!!

© ज्योति हसबनीस, नागपूर

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * प्रेमाला उपमा नाही * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

प्रेमाला उपमा नाही

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख प्रेमाला उपमा नाही)

आयुष्याची खुमारी  वाढवणारं प्रेम वयाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्याला किती वेगळं पण तितकंच मनोरम भासतं ना! सोळाव्या वर्षी नजरेचं  भिरभिरं आपल्या प्रेमाच्या शोधात असल्यासारखं सतत टेहळणीवर असतं. कधीतरी नजरभेट होते, ह्रदयाची धडधड ओळख पटवते, आणि प्रेम गवसल्याचा आभास होतो. हाती गवसलेल्या प्रेमासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी मनाची असते. कधी सफलतेचा आनंद मिळतो तर कधी वैफल्य गाठी येतं. मागचा पुढचा विचार न करता जीव ओवाळून टाकणारं वेडं प्रेम खरंच कित्येकांची आयुष्य उध्वस्त करतं किंवा उजळून टाकतं, पण मला ह्या प्रेमाचं नेहमीच एक विलक्षण आकर्षण वाटत आलंय. जगण्याचा कैफ, जगण्यातली मस्ती, सारं काही आसूसून अनुभवण्याची आणि त्यासाठी उभ्या दुनियेशी लढा देण्याची ह्या ओढाळ आणि झुंजार प्रेमाची जातकुळ खुपच अनोखी असते.

आयुष्याचं दान कधी उजवं तर कधी डावं, सारं नियतीच्या हातात. मिळालेल्या दानाचा हंसतमुखाने स्वीकार करत, जिवलगाचा हात हाती घेत केलेली वाटचाल, वाट्याला आलेली सुखदु:ख, प्रसंगी परिस्थितीशी केलेली हातमिळवणी तर कधी तिच्याशी केलेले दोन हात सारेच क्षण परस्परांवरील प्रेमाची वीण घट्ट करणारे ठरतात आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत अतिशय जवाबदार असं प्रेम आकाराला येतं. हे प्रेम उबदार असतं, सुरक्षित असतं, हवंहवंसं वाटणारं असतं, गुंतलेपणातली तृप्ती ल्यालेलं  असतं.

सारी वेडी वाकडी नागमोडी वळणं पार करत गतीशील होत जाणारं आयुष्य आणि त्या त्या टप्प्याला फुलणारं आणि परिपक्व होत जाणारं प्रेम अंतिम टप्प्यावर एक वेगळीच उंची गाठतं. ह्या प्रेमाची भाषा मूक असते, समंजस असते, शब्दांच्या आधाराशिवायच व्यक्त होण्याची कला त्याला अवगत झालेली असते, फक्त आणि फक्त नजरेच्या टप्प्यात जिवलगाचा वावर असावा एवढी माफक अपेक्षा हे प्रेम बाळगून असतं. आशा, अपेक्षांच्या पलिकडे गेलेलं हे प्रेम निर्वाणाच्या वाटेवर इंद्रधनुषी साजात झगमगत असतं!

© ज्योति हसबनीस, नागपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – *गुंतूनी गुंत्यात साऱ्या* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

गुंतूनी गुंत्यात साऱ्या

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख गुंतूनी गुंत्यात साऱ्या)

आज खुप दिवसांनी एका जिवाभावाच्या मैत्रिणीकडे गेले होते.साऱ्याच जिव्हाळ्याच्या विषयांवर अगदी पोटभर गप्पा झाल्या. नातेसंबंधांचा फेरफटका मारून झाल्यावर लवकरच होणारे गौरी गणपतींचे आगमन, आणि कामाचं सुसूत्र नियोजन ह्याची आखणी करता करता दोन तास कधी संपलेत कळलं देखील नाही. घरी येतांना तिचं गुंतलेपण, प्रसंगी कृतार्थतेने फुललेला तर क्वचित तणावलेला तिचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता. तिचं सामाजिक बांधिलकी जपणारं संवेदन क्षम मन, त्या संवेदनक्षमतेतूनच  सामाजिक संस्थांशी तिचं स्वत:ला जोडून घेणं, झोकून देऊन काम करणं, आणि कुटुंबाच्या गरजा ओळखून प्रसंगी त्याही जिवाचा आटापिटा करत पूर्ण करणं आज विशेषत्वाने जाणवलं. कधी कधी अव्याहत बडबडीचा देखील एक प्रकारचा ताण येतो की काय नकळे ! कॉफी आणि बरंच काही असा मैत्रिणीकडे वेळ घालवून देखील घरी आल्यानंतर कडक कॉफीची अगदी नितांत गरज भासली मला !

वाफाळत्या कॉफीचे घोट घेता घेता सुरेश भटांच्या ‘रंग माझा वेगळा’ कवितेतल्या ‘गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ ह्या ओळीने अक्षरश: पिंगा घातला माझ्या मनात ! उलट सुलट विचारांचं चक्र सुरू झालं. खरंच असं शक्य आहे?  इतकी अलिप्तता माणसात असते?  असू शकते? आणि असणं योग्य की अयोग्य ह्या प्रश्नाने विचारांचं मोहोळ उठलं मनात. माणूस एकटा राहू शकत नाही.  कुटुंबाशी आणि समाजाशी त्याची नाळ घट्ट जुळलेली असते. हे माझं, ह्याचे प्रश्न माझे, ते माझ्याशिवाय कोण सोडवणार? अमक्याचा  आनंद, तमक्याचं सुख साऱ्यासाठी झटणं मलाच गरजेचं, ह्या भावनेनं आलेलं झपाटलेपण माणसाला असं काठाकाठाने उभं राहून निव्वळ बघ्याची भूमिका घेऊच देत नाही, तर सूर मारून तळाशी जाऊन ऊपसा करायला आणि पाणी निर्मळ वाहतं ठेवायला भाग पाडतं.

जन्मत:च नात्यांचा गोफ गळ्यात मिरवतच ह्या जगात येणारी स्त्री तर ह्या गुंतलेपणाच्या भूमिकेतून बाहेरच पडू शकत नाही. तिच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनप्रवासांतील विविध टप्प्यांत काळानुरूप  ह्या गोफाचे पदर वाढतात. भावनिक, मानसिक गुंतवणूकीच्या रूपांत ह्याची वीण घट्ट होत जाते किंवा भावनांच्या योग्य नियमना अभावी पदर एकमेकांत गुंतून एक न सोडवता येणारा क्लेशदायक गुंता देखील तयार होतो. सारी नाती जोपासण्याची कला जिला आत्मसात करता येते,  तिचा भावनिक पसारा, त्याचा तो वाढत जाणारा डोलारा आणि त्याला लीलया पेलण्याचा तिचा आवाका अक्षरश: अवाक् करतो मला. कधी कधी मनाला प्रश्न पडतो, आपणच निर्माण केलेली ही नाती, त्यातला राखलेला जिव्हाळा, ओलावा, अडीअडचणींच्या वेळी धावून जाऊन केलेली मदत, वेळी प्रसंगी दिलेला भावनिक आधार ह्या साऱ्यातून आपलं गुंतलेपणच तर सिद्ध होतं. मग ह्या अशा गुंतलेपणातून आपली सुटका आपण खरंच करून घेऊ ? ह्या गुंतलेपणाला एका विशिष्ट वयानंतर थोडं बाजूला सारणं, त्याला दुरून न्याहाळणं जमेल का? तितकी अलिप्तता शक्य आहे का? मग त्याला नक्की अलिप्तता म्हणावं की कोरडेपणा? अलिप्तता आणि कोरडेपणा ह्यांच्यातही अगदी पुसटशी सीमारेषा असतेच,  आपलं असलेलं /नसलेलं गुंतलेपण स्पष्ट करणारी. एका विशिष्ट वयानंतर जवाबदाऱ्यांचं ओझं पेलवतही नाही, आणि ते कुणाकडे सोपवायला ‘ अजून यौवनात मी’ म्हणणारं मन देखील तयार होत नाही. आणि ह्या गुंत्यातून नकळत येणारा ताण मात्र बऱ्याचदा आपलं आयुष्य झाकोळून टाकतो.

आपल्या आजूबाजूच्या पसाऱ्याचा एक भाग बनून राहणं आणि जमेल तसा तो आटोक्यात ठेवत त्याच्यावर मायेने नीटनेटका हात फिरवणं योग्य की तटस्थपणे त्याच्यावर एक कटाक्ष टाकत आपणही केवळ त्याचा एक भाग आहोत अशी खूणगाठ मनाशी पक्की करत असतांनाच क्वचित होणारी उलथापालथ त्रयस्थाच्या नजरेने न्याहाळत केवळ निवांत राहणं योग्य? तुडुंब भरलेल्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उठणारे तरंग हे त्याच्यापेक्षा वेगळे करता येतील का? गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय मोकळा ठेवणं किंवा पाय गुंतवणं हे शेवटी ज्याच्या त्याच्या जगण्याच्या कलेवरच अवलंबून आहे, नाही का?

© ज्योति हसबनीस

नागपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – *वास्तु म्हणते तथास्तु* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

वास्तु म्हणते तथास्तु

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख वास्तु म्हणते तथास्तु)

आपण ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुत एक वास्तुपुरूषही कायम वस्तीला असतो असं म्हणतात. आपले हुंकार, चित्कार, उद्गार साऱ्यांची स्पंदनं ह्या वास्तूत झिरपतात, आणि अलगद  ह्या  वास्तुपुरूषापर्यंत पोहोचतात असा समज आहे. हे कितपत खरं आहे मला कल्पना नाही. पण आपली मानसिकता ज्या वेळी जशी असते तसे पडसाद वास्तूत उमटतात एवढं मात्र नक्की !

खरंच दिवसा कधीतरी लागलेला विसंवादी सूर घरातला नूर घालवल्याखेरीज राहत नाही. घरातलं चैतन्य, घरातला खळाळ साऱ्यालाच खीळ लागल्यासारखं होतं. स्तब्ध, वरवर शांत, पण आतमध्ये धगधगत असणाऱ्या तगमगीची झळ घराच्या भिंतीत शोषली जाऊन अगदी कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचते, आणि ती वास्तू पण कुठेतरी शिणल्यासारखी त्रासल्यासारखी दिसू लागते. आज हा काय सूर लागलाय असा जाब तर तो वास्तुपुरूष आपल्याला विचारत नाहीय ना असं उगाचच वाटायला लागतं.

अतिशय प्रेमाने घर सजवतांना, सजलेलं घर डोळ्यात साठवतांना ते घर पण आपल्याकडे खुप कौतुकाने बघतंय असा नकळतच भास होतो. घराच्या भिंती आपल्याशी खुष होऊन बोलतायत, नविन पडद्यांआडून खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूकही आनंदाने काही सांगू बघतेय, काळीभोर मैना झाडाच्या डहाळीवर झुलतांना हळूच उत्सुकतेने खिडकीतून डोकावतेय, आणि दुसऱ्या क्षणी झाडाला टांगलेला कंदिल निरखून बघतेय असा उगाचच भास होतो. पक्ष्यांचा गोड किलबिलाट, बागेतल्या झाडापानांची हिरवी अपूर्वाई , फुलांची उमलती नवलाई साऱ्यांचे आनंदी हुंकार परिसरात दाटतायत आणि ह्या साऱ्यामुळे तृप्त झालेला  वास्तुपुरूष खुप आनंदलाय असं अकारणच मनात येऊ लागतं !

खरंच असं असतं का, नाही माहित मला! पण एक गोष्ट मात्र नक्की, मनातला आनंद घरातल्या भिंतीभिंतीत साठवला जातो, आणि तोच परत परत जमेल तसा भेटायला येत असतो, चित्तवृत्ती अधिकाधिक प्रफुल्लित करायला!

मनातलं मळभ सतत काजळी धरत असतं, प्रकाशाने घर जरी लखलखत असलं ना तरी वास्तुच्या भिंती ती काजळीच उजळ करायला मदत करतात!

मग वास्तुपुरूष ही जर संकल्पना खरंच अस्तित्वात असेल तर  ‘ वास्तुपुरूषाने चैतन्याच्या खळाळालाच मनापासून  ‘तथास्तु’  म्हणू दे ना !!

© ज्योति हसबनीस

नागपूर

Please share your Post !

Shares
image_print