मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही…

जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’ तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही.

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….

कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…

ते आले की उतरावेच लागते…

म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात. ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान…

Friends Forever…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज विजयादशमी. नऊ रात्र ( दिवस) साधना केली, शक्तीची आराधना केली तर विजयाची दशमी येणे अगदीच स्वाभाविक….. !!!

आपल्या पूर्वसुरींनी याचि अनुभूती घेऊन आपल्याला हे करायला सांगितले. भारतात जशी टाटांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट चांगली असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात खात्री /विश्वास आहे, अगदीच तीच खात्री/विश्वास आपल्या धर्माने सांगितलेल्या प्रत्येक कर्मकांडावर ठेवून, आपण त्याप्रमाणे आचरण केले तर भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघेल यात शंका नसावी.

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।। 

हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम।।”

(अभंग क्रमांक २०७६ : सार्थ तुकाराम गाथा)

सध्या बाजारात SAP, oracle, ERP अशी विविध प्रकारची softwares उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या त्या विकत घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी करतात. सनातन धर्माचे एक software आणि एक हार्डवेअर आहे. ते आपण नीट आचरणात आणून पाहिले तर ते चांगले की वाईट हे ठरविणे सोपे जाईल. पण आजची तथाकथित विद्वान मंडळी, अमलात, आचरणात न आणता हिंदू धर्माला नावे ठेवतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

मनुष्य श्रद्धेवर जगत असतो. पुढचा क्षण नक्की आनंदाचा असेल अशी श्रद्धा मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. ही श्रद्धा टिकून रहावी म्हणून धर्माने काही कर्मकांड सांगितली आहेत. एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये अमुक बटण दाबले की अमुक होते आणि दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये तेच बटण दाबून काहीतरी वेगळे होते, याचा अर्थ पाहिले software निकामी झाले आहे असे म्हणणे हे जितके हास्यास्पद तितकेच सनातन धर्माचे पूर्ण श्रध्देने आचरण न करता त्याला नाव ठेवणे हास्यास्पद नव्हे काय ? कितीही महाग सॉफ्टवेअर घेतले, महागडा मोबाईल घेतला तरी त्यात एक anti virus software घ्यावं लागते. आपल्या धर्माने अशी काही antivirus software तयार केली आणि अमुक करू नका, अमुक करा असे सांगितले तर ते उचित नव्हे काय ?

आपल्या मागील अनेक पिढ्या सनातन धर्माचे प्रॉडक्ट आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्वावान होते, आनंदात होते, समाधानी होते असे म्हणता येईल कारण त्यांनी उभारलेल्या इमारती, किल्ले, निर्माण केलेल्या अनेक वास्तू, कलाकुसर आणि अनेक गोष्टीयाचि साक्ष देत आहे…..

जुने अवघे खराब हा मंत्र दुराग्रहाने आचरणात न आणता, त्यातील दोष (असल्यास) कमी करून नवीन पद्धतीने मांडणी करून, त्याचे आचरण आपण करू. हे एक प्रकारचे सिम्मोलंघन ठरावे.

शक्तीची उपासना करून प्राप्त केलेली शक्ति देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी खर्च करता आली तर ती शक्ती दुप्पट होऊन आपल्याकडे परत येईल, असा मला विश्वास आहे.

भारतासारख्या महान देशात आपण जन्माला आलो हेच आपल्या आयुष्याचे सोने म्हंटले तर अतिशयोक्ति होणार नाही. आज आपण सर्वांना शिलांगणाचे सोने वाटतो, लुटतो. हा उपक्रम याचि साक्ष देतो की भारतात रस्त्यावर मेथीच्या भाजी सारखे सोने विकले जात होते…….

जो दुसऱ्याला सोने द्यायला शिकवितो, तिळगुळ द्यायला शिकवितो, राखी बांधायला शिकवितो, तो धर्म किती महान असेल……

“ धर्मो रक्षति रक्षितः ।। “ 

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!! भारत माता की जय!!!!

सर्वांना विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगणातले ऋतू (श्रावण) ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

🔅 विविधा 🔅

अंगणातले ऋतू (श्रावण) ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

आषाढाच्या रिपरिपीने आताशा कुठं उघडीप दिलीय. सूर्य नेहमी सारखा केशरी गोळा दिसत नाही तो सुद्धा पिवळसर दिसतोय. पूर्वेकडे पिवळा रंग सांडला आहे. सकाळी सकाळी झाडांवर पक्ष्यांची मधूर किलबिल सुरू आहे. पाणकोंबडा त्याच्या धीरगंभीर आवाजात खोलवर घुमत आहे. सातभाई क्षणात कुंपणावर तर क्षणात भुईवर येत कलकलाट करत आहेत. चिकूच्या झाडावर बुलबुल गोड आवाजात गाणे गात आहे. गच्च भरलेले पाण्याचे रांजण रिते होऊन खडबडाट व्हावा, तसे काळे मिट्ट ढग आता पांढरट दिसत आहेत. क्षणात काळा ढग येतो न एक सर पाझरून जातो.

…. ‘क्षणात येते सरसर शिरवे

 क्षणात फिरुनी ऊन पडे’ 

विटांवर, कठीण भुईवर हिरव्यागार शेवाळाचे मऊ मऊ गालिचे पसरलेत. हिरवे हिरवे घनदाट जंगलच जणू! लहानपणी मुंग्यांची शेते म्हणायचो आम्ही. तगरीचे शेंडे पांढऱ्याशुभ्र फुलांनी डवरले आहेत. जणू आकाशातून कुणी चांदण्या अलगद झाडावर उधळून दिल्या आहेत. झाडाखाली अलगद झेपावणारा पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा बघितला की चांदण्या सांडल्याचा भास होतो. तगरीची ही एकेरी पाकळीची फुले देवाला प्रिय असतात म्हणे. दुसरी एक तगर असते टपोऱ्या पांढऱ्या फुलांची. या फुलांचा मात्र मंद गंध असतो.

सागाच्या उंच शेंड्यावर फुलांचे गुच्छ उमलले आहेत. त्याची इवली इवली पांढरी शुभ्र फुले लाह्या सांडल्यासारखी जमिनीवर पडली आहेत. किती नाजूक इवल्याशा पाकळ्या. वाऱ्याने इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. शिव शम्भोला प्रिय असणाऱ्या बेलाच्या हिरव्यागार पानांनी झाकोळलेल्या झाडावर कवठासारखी गोल गोल हिरवीगार फळे लटकत आहेत.

तगरीची हिरवीगार पाने खाऊन फुलपाखरांच्या अळ्या सुस्त झाल्यात. आता निवांत कोषात पडून राहण्याचे मनसुभे आखत त्या पानांचे भोजन मिटक्या मारत खात आहेत. पण हे काय?कोषात जाण्याचे मनसुभे त्या पाणकोंबड्याने आणि बुलबुलानी उद्धवस्त केलेत. त्यांच्या सूक्ष्म नजरेने त्यांना कधीच हेरून ठेवले होते फक्त संधी हवी होती. एकाच झपाट्यात दोघांनीही सगळ्या जाडजूड अळ्या फस्त करून टाकल्या. पुन्हा फुलपाखरे तिथंच पानावर चिकटून बसलीत. इवल्याशा जीवानी पुन्हा या सृष्टीत बागडण्यासाठी.

ती पहा गोगलगाईची चमचमणारी वाट. कुठं गेलीय बरं?तिचे चमचमणारे शंख हळदीच्या पानावर चमकत आहेत. आपल्या इवल्याश्या दातांनी पाने कुरतडत आहेत. निसर्ग सगळ्यांनाच हवे ते खायला प्यायला देतो, सगळ्यांनाच सारखे पोसतो नाही का?

तांबड्या वाणी किड्यांचे पुंजके इथं तिथं वळवळत आहेत. ओल्या जमिनीतून गांडूळ वर येऊन इकडे तिकडे वळवळत आहेत. ही केसाळ सुरवंटे आपल्या पाठीला कुबड काढून इकडे तिकडे खुशाल फिरताहेत. पण दुरूनच बघा, चुकून जरी स्पर्श झाला तर आग आग ठरलेली. पण घाबरू नका, ती झेंडू किंवा मखमलीची पाने तोडा आणि चुरून तो रस सुरवंट फिरलेल्या जागेवर लावा, त्वरित आराम मिळेल.

ही कर्दळीची फुले एखाद्या सुस्नात तरुणीच्या ताज्या तवान्या मुखड्यासारखी तजेलदार दिसत आहेत. पानेही अंगाखांद्यावर दहिवराचे काचमणी मिरवत आहेत. आणि राम प्रहरी हा मंद धुंद हवाहवासा सुगंध कुणाचा?प्राजक्त फुलला की रातराणी?नाही हं, हा आहे केशरी पिवळ्या सोनचाफ्याचा हवाहवासा धुंद करणारा गंध. शेंड्याशेंड्यावर फुललेली ही आकर्षक फुलं उमलताना जणू सुगंधाचे घडे हवेत सांडत आहेत. सगळे अंगण दरवळून गेले आहे. छाती भरभरून कितीही गंध हुंगला तरीही एक नाक आणि एक फुप्पुस अपुरेच वाटते. झाडाखाली नका निरखू. चाफा, प्राजक्त, तगरीप्रमाणे या फुलांचा सडा नाही तुम्हाला दिसणार. ही फुलं खाली गळलेली दिसत नाहीतच. पाकळ्या पाकळ्यानी हवेच्या झुळुकिसरशी ही जमिनीकडे झेपावतात अन मातीत मिसळून जातात. तसेही इथं जन्माला येणारा प्रत्येकजण शेवटी मातीतच मिसळतो नाही का?फुले तर कशी अपवाद असतील?फुलामागे गोलगोल खरखरीत फळांचे गुच्छ येतात त्यात छोट्या छोट्या बिया असतात. त्या किंचित झुकलेल्या बोरीकडे पाहिलेत?असंख्य कळ्या फुलांनी कशी डवरलीय!

हा पहा टपटपणारा केशरी नाजूक देठांचा इवल्या फुलांचा प्राजक्त सडा!खरखरीत खोड न पाने पाहून हे सुंदर सुगंधी फुलांचे झाड असेल असे कुणालाच वाटणार नाही. इतक्या छान फुलांना कोण्या इंग्रजी लेखकाने शॉवर ऑफ टिअर्स का म्हणावे बरे?त्या वेड्याला मुळात त्याचे समर्पण कळलेच नाही. भल्या पहाटे अवकाशात फिरणाऱ्या देवाच्या भ्रमणासाठी ही सुगंधी कुपी तो उघडून स्वतःस प्रभू चरणी आनंदाने विलीन करतो.

त्या भिंतीच्या फटीतून ते बघा कोण डोकावतेय?तो आहे शंकरोबा. गौराईच्या फुलोऱ्यातील एक महत्वाचा फुलोरा, याची पांढरीशुभ्र इवली इवली तेरड्यासारखी फुले किती खुलून दिसतात ना?

सर्वच पक्ष्यांना आपला मनाजोगता खाऊ अगदी मनसोक्त मिळत आहे. बेडकांची पिले डबक्यात सुळक्या मारत आहेत. खारुताई आपली शेपटी फुलवून झाडावरून खालीवर सरसर तुरुतुरु धावत आहे आणि मांजर सावज सहज घावते का ?याचा अंदाज घेण्यासाठी फिस्करून दात विचकत तिला घाबरवत आहे. पण ती जणू त्याला वाकुल्या दाखवत अजून उंच उंच जात आहे.

मोकळ्या मैदानावर अमाप हिरवे गवत दाटीवाटीने उगवले आहे आणि कितीतरी गवतफुले त्यांच्या शेंड्यावर दिमाखात झुलत आहेत. विंचवीच्या झुडुपांनी जांभळट गुलाबी फुले धारण केली आहेत. जाता येता नाना रंगांची फुलपाखरे त्यांना चुंबीत आहेत. कुणी कुणाचा रंग घेतला?फुलांनी फुलपाखरांचा की फुलपाखरांनी फुलांचा?काही समजेना झालेय. मधूनच एखादी पावसाची सर सुकल्या पंखांना ओलावत आहे. सकाळपासून उन्हात शेकत बसलेले झाडांचे शेंडे पुन्हा भिजून चिंब होताहेत. पानांवर थांबलेल्या जलबिंदूवर सूर्यकिरणे पडून पाने चांदणं सांडल्यासारखी चमचम करताहेत.

या दोन झाडांमध्ये पहा काय गम्मत आहे!भल्या मोठ्या कोळ्याच्या जाळ्यात भक्ष्य अडकायचे सोडून हे काय अडकलेय बरं?राम प्रहरीच्या दहिवराचे असंख्य छोटे छोटे थेंब की जणू काचमणी?आणि ते कसे अलवार झुलतेय! काचमण्यांनी विणलेला पडदाच जणू. किती विलोभनीय आणि मनोहारी दृश्य आहे हे! आणि ही पहा टाचणी. लांबट शरीर, बटबटीत डोळे आणि चार पायांचा तांबूस चतुरासारखा दिसणारा कीटक. पाने कुरतडतोय.

झाडांचा पर्णसंभार वाढला आहे आणि पानात लपून एक कारुण्य कोकीळ किती आर्ततेने प्यावप्याव करत आहे. चिरकाची जोडी आणि होल्यांची जोडी छोटे छोटे कीटक आणि धान्याचे कण वेचत आहेत;इतक्यातच पावसाची जोरदार सर आली अन त्यांची अश्शी त्रेधातिरपीट उडाली की काही बोलू नका. पटकन त्यानी झाडाच्या फांदीचा आसरा घेतला.

रात्री कधी बाहेर अंगणात गेलात तर एखाद दुसरा काजवा चमचम करत तुमचे लक्ष वेधून घेईल, मात्र त्यासाठी बाहेर काळोख हवा, विजेच्या लख्ख प्रकाशात काजवे चमकत नाहीत;आणि हो, दंगा, हॉर्नचा कोलाहल पण चालत नाही. एकदम शांत निरव रात्र काजव्यांना आवडते.

…. या श्रावणाचा किती वर्णावा महिमा

 सुगंधी हिरव्या रंगांचा जणू हा महिना

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नकाशात केंब्रिज शोधताना… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

☆ नकाशात केंब्रिज शोधताना… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

पुण्यात असतानाची गोष्ट आहे. एकटाच बॅचलर म्हणून राहत होतो. भाजीपाला विकायचे बंद झाले होते. एका चांगल्या कंपनीत मी वॉचमन म्हणून पर्मनंट झालो होतो. आणि त्याच कंपनीत राहत होतो. राहण्याची आणि खाण्याची माझी सोय फुकटात झालेली असल्यामुळे माझं चांगलं चाललेलं होतं.

मला आठवतंय त्या दिवशी तेरा मे तारीख होती. त्या दिवशी गावाकडून वडिलांचा मला फोन आला आणि वडील म्हणाले, “ हे बघ, येत्या सतरा तारखेला म्हणजे अजून चार दिवसांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे. तयार रहा. ” एवढं बोलून डायरेक्ट वडिलांनी फोन कट केला. पुढं बोलायची संधी जरी मिळाली असती तरी त्याचा काही उपयोग नव्हता. वडिलांचे ठरले की ठरले. त्यात बदल होत नसतो. हे मला माहीत होतं.

चार दिवसांनी आपलं लग्न. कुणासोबत, मुलगी कोण? कशी आहे? कुठं असते. ?असे असंख्य प्रश्न मनात. मी ड्युटी वर होतो. माझी चाललेली तडफड मी कुणालाही सांगू शकतं नव्हतो. कारण मी वॉचमन होतो. माझी केबिन गेटवर होती. त्या केबिन मध्ये मी एकटाच असायचो.

ड्युटी संपल्यावर रात्री आईला फोन केला. मग आईने सांगितले, “मुलगी पिंपरी मध्ये असते. आपल्या खूप जवळच्या नात्यातील आहेत. आम्ही सर्वांनी मुलगी बघितली आहे. तुझी आजी आणि तिचे आजोबा ही सख्खे बहिण भाऊ आहेत. मुलगी चांगली शिकलेली आहे. उद्या पिंपरीत जा. तिथं भाजी मंडई मध्ये त्यांचा भाजीपाल्याचा गाळा आहे. त्यांचं आडनाव रूपटक्के. सुखदेव रूपटक्के म्हणून विचारत जा सापडतील. ” मी होय म्हणून फोन बंद केला.

दुसऱ्या दिवशी शिफ्ट बदलून घेतली. आणि सकाळी दहा वाजता पिंपरी गाठली. पिंपरीची ती भली मोठी भाजी मंडई बघून जीवात कालवा कालव झाली. त्याच गर्दीत आता नाव विचारत विचारत चालू लागलो. भांबावून गेलो होतो. आयुष्याचा जोडीदार पहिल्यांदा बघणार होतो. उत्सुकता होतीच पण त्याहून जास्त भिती. विचारात दंग होऊन माझी नजर गर्दी चिरत होती. एवढ्यात चालता चालता एका पोरीला माझा धक्का लागला. तिच्या डोक्यावर कोथंबिरीचं पोतं होतं. तिच्या गालावर कोथंबिरीची पाने चिकटली होती. जसा माझा धक्का लागला तसं तिने रागाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणली, “ ये बाबा बघून चाल की जरा नीट.. ? डोळ्यात काय माती गेली का.. ? ” अजून काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबड करून ती गर्दीत नाहीशी झाली.

भाजीवाले रूपटक्के हे नाव विचारत विचारत मी योग्य जागी पोहचलो. तिथं आजोबा आणि आजी दोघेजण मांडी घालून बसलेले होते. ज्या पोरीला धक्का लागला होता तीच पोरगी तिथं बाजूला खाली वाकून मक्याची कणसे रचत होती. मी आजोबांना आवाज दिला. “ ओ आजोबा, मी कवठेमहांकाळचा. चंदनशिवे यांचा मुलगा. हिराबाईचा नातू. तुमच्या बहिणीचा नातू. ” आजोबा ताडकन उभे राहिले. खाली बसलेल्या आजीने डोक्यावरचा पदर नीट केला. आणि माझ्या हातात हात देत बाजूच्या कणसे रचणाऱ्या त्या पोरीला आजोबा म्हणाले, “ दीपा अगं तुझा नवरा आलाय की, कंबरेत वाकलेली ती एका सेकंदात ताठ झाली. आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली. तिच्या अंगावर मळलेला पांढरा फुल्ल शर्ट. त्याच्या आत तिने पंजाबी ड्रेस घातलेला होता. डोक्याला रुमाल गुंडाळून उभी राहिलेली ती. माझी नजर काही नजरेला मिळाली नाही. ती काहीच बोलली नाही. पसंत नापसंत या असल्या भानगडींची ओळख दोघांनाही नव्हती. आमच्या दोघांची कुटुंबे त्यावेळी मध्यम वर्गातही मोडत नव्हती. हातावर पोट असणारी गरीब माणसं आम्ही.

सतरा मे या दिवशी आमचं लग्न थाटामाटात झालं. मी पिंपळे निलख मध्ये भाड्याने खोली घेतली. आमचा संसार सुरू झाला. नंतर एकमेकांना आम्ही ओळखू लागलो. मी कवी आहे हे तिला कळलं. माझ्या कविता तिला ऐकवू लागलो. हळूहळू माझी कविता पसरू लागली. नोकरीतून वेळ काढून संमेलनात जाऊ लागलो. पण बऱ्याचवेळा नोकरी महत्वाची मानून अनेक संमेलने रद्द करावी लागत होती. अगदी महाराष्ट्र राज्यातून सगळीकडून मागणी यायला सुरवात झाली. पण नोकरी मुळे जाता येत नव्हते. कवितेचा कार्यक्रम नोकरीमुळे रद्द केला की डोळ्यातून पाणी सांडत राहायचं. आणि त्या पाण्यातून कविता ही ओघळून जायच्या.

नोकरीत मन रमत नव्हतं. सगळा जीव कवितेत अडकला होता. आतल्या आत घुसमट वाढत चालली होती. रोज कुणाचा तरी फोन यायचाच. कार्यक्रमाचे आमंत्रण असायचेच. पण नकार द्यावा लागायचा. एके दिवशी हिला मनातली घुसमट बोलून दाखवली. आणि एका क्षणात तिने मला उत्तर दिलं. “ द्या सोडून नोकरी.. मन रमत नाही तिथं थांबायचं कशाला.. माझं घर चालेल एवढं जर तुमच्या कवितेने मला दिलं तरी मी आनंदी राहीन.. ” मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. आणि त्याच दिवशी मी राजीनामा दिला. नोकरी सोडली. आता नाही तर कधीच नाही. असा विचार करून राजीनामा लिहिला. विनाकारण इथ राहून घरभाडे भरावे लागणार. कार्यक्रम करतच फिरायचे आहे तर पुण्यात राहण्यापेक्षा गावी जाऊ तिथच राहू. आई वडील ही सोबत असतील. हे ही तिनेच सुचवले. आणि ज्या दिवशी नोकरी सोडली त्याच दिवशी पुण्याचा निरोप घेतला. आणि गावी आलो.. पर्मनंट नोकरी सोडून गावी आल्यामुळे मला अनेकांची बोलणी ऐकावी लागली. कित्येक नातेवाईकांनी तर मला नावे ठेवताना कसलीही कसर केली नाही.

या गोष्टीला आता दहा वर्षे झाली. माझी कविता दूरवर पोहचली. कार्यक्रम सुरू आहेत. तिने ही गावी येऊन शांत न राहता किराणा दुकान सुरू केले आहे. टेलरिंग व्यवसाय ही वाढला आहे. नाही म्हणले तरी आम्ही मध्यम वर्गाच्या यादीच्या शेवटच्या पानावर का होईना पण पोहचलो आहोत. आणि दोन मुले आमच्या पदरात आहेत. ती आई आणि मी वडील आहे.

हा सगळा प्रवास आज डोळ्यांसमोर उभा राहण्याचे कारण म्हणजे, आजच इंग्लड मधल्या केंब्रिज वरून मला फोन आला आहे. पंचवीस डिसेंबर या दिवशी केंब्रिज मध्ये मी माझी कविता घेऊन उभा राहणार आहे. आणि आयोजकांनी आम्हाला जोडीने बोलावले आहे. दोघांचाही तिकीट खर्च ते करणार आहेत. म्हणजे आम्ही दोघेही केंब्रिज मध्ये जाणार आहोत. ती पहिल्यांदाच विमानात बसणार आहे.

तिला जेव्हा हे सांगितले तेव्हापासून ती, गुगलवर केंब्रिज हे नाव सर्च करत आहे. आणि मी आमचा सगळा प्रवास आठवत तिच्याकडे एकटक पाहत आहे. तिने त्या क्षणाला माझ्या मनाची घुसमट ओळखून जर निर्णय घेतला नसता तर आज या क्षणाला मी केंब्रिजचे स्वप्न न पाहता त्याच केबिन मध्ये वॉचमन म्हणून बसलेलो असतो.

एखादा कलावंत असला तरी तो कलंदर असतो. त्याच्यातला माणूस विसरून त्याच्या आतला कलावंत सांभाळणारा जोडीदार जर त्याला भेटला तरच तो कलेला न्याय देऊ शकतो. मला हे मिळालं. म्हणूनच माझ्या घराच्या उंबरठयावर माझी कविता माझं स्वागत करण्यासाठी नेहमी उभी असते.

आयुष्यात आलेल्या या जोडीदाराची कविता, कथा, कादंबरी कधीच लिहिता येणार नाही. पण माझ्या कलाकृतीची प्रस्तावना मात्र तिच्याच काळजातून येत राहणार आहे.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रतन टाटा´ यांची अंत्ययात्रा – – ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

  रतन टाटा´ यांची अंत्ययात्रा – – ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(‘रतन टाटा यांची अंत्ययात्रा कव्हर करतांना जाणवलेल्या ठळक बाबी-) 

१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता… साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं… एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी, त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती…

२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते… सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली… `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं…

३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले… आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला… काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली… तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला… `शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या… चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला `everything is over´… केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले 

४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला… एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही… बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली… अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या… त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली… शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-

 `टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´… बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं – 

`टॅक्सी´से जाते है… स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच… शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला

५) या प्रसंगानंतर मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं… माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता… काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते… समोरुन टाटांचं पार्थिव गेलं, पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते… डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या…

६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता… ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले… तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले… भेट झालीच नाही 

७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला… हा पण तिथला लहानसा उद्योजकच… मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला 

८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला… एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली… यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात… या प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती… रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं

९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच… पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय- त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला… त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली…

१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता… आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन 

`टाटांचंच पाणी´ पुरवत होता…

लेखिका : सुश्री मनश्री पाठक 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘डॉ. तारा भवाळकर कोण आहेत !’ — लेखक : हेमंत राजोपाध्ये ☆ प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? इंद्रधनुष्य ?

डॉ. तारा भवाळकर कोण आहेत !‘ — लेखक : हेमंत राजोपाध्ये ☆ प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे ☆

८७ वर्षाची तरुण, तडफदार लेखिका!

इथल्या उग्र जातीय दर्प आणि पुरुषप्रधान दुर्गंधीने बरबटलेल्या विषम समाजव्यवस्थेची चीड असलेली..

केवळ परंपरेतील सत्त्वाचे पोवाडे गात बसण्यापेक्षा त्या परंपरातील हीण कसे दूर करता येईल, यासाठी आयुष्यभर लेखन- संशोधनासोबतच प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारी..

उच्चभ्रू पेठांमधल्या आणि गढींमधल्या पवित्र सरंजामी वातावरणात झाकून ठेवलेल्या दुर्गंधी वास्तवांना समाजासमोर आणणारी…

तंजावरमधल्या राजे आणि दरबारी कवींपासून ते कैकाडी समाजातल्या उन्मुक्त बाणेदार ‘महामाये’पर्यंत सर्वांमध्ये सहज मिसळून जाणारी…

शनिवार पेठेतील वेदशास्त्रसंपन्न चित्रावशास्त्रींच्या व्युत्पन्न सहवासाच्या बालपणीच्या स्मृतींविषयी चिकित्सक आदर बाळगणारी…

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या नावाखाली शिरजोर झालेल्या अमर्याद मुजोर पुरुषप्रधानतेच्या ‘हलक्या दिलाची’ चिरफाड करणाऱ्या आदिवासी बाईचं तेज अंगी बाणवणारी…

भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून, देवल, खाडिलकरांच्या नाटकांपर्यंत कानोसा घेत लोकनाट्य आणि अभिजन व बहुजन समाजातील विविध लोकपरंपरांचा समग्र, साक्षेपी आढावा घेणारी,

आदिशक्ती महामायेच्या महन्मंगल रूपाला कुबटपणा आणणाऱ्या व्यवस्थेत पिचलेल्या कैकाडी समाजातील स्त्रीपासून कथित उच्चभ्रू जातीय, वर्गीय सोन्याच्या पिंजऱ्यात डाळिंबाचे दाणे मिटक्या मारत खाणाऱ्या ब्राह्मण, मराठा स्त्रीपर्यंत समस्त स्त्रियांच्या मुक्तीची गरज ओळखणारी,

लोकश्रद्धांना गौण न मानता त्यांचं सामाजिक, राजकीय स्थान ओळखणारी मात्र अंधश्रद्धा आणि त्यातील शोषण यांच्याविरोधात ८४-८५ व्या वर्षीही खणखणीत आवाज उठवणारी,

अभिजन आणि बहुजन संस्कृतीतील अमर्याद विविधांगी मर्यादा आणि त्यांना उन्नत, समावेशक आणि प्रगल्भ करू शकणाऱ्या त्याच सांस्कृतिक संचितातले सत्त्व आधुनिकतेच्या चौकटीत बसवू पाहणारी,

डॉ. रा. चिं. ढेरेंसारख्या महविद्वानासोबत अभ्यास, संशोधन, लेखन करणारी, लक्ष्मण मानेंसारख्या शोषित समाजातून आलेल्या माणसासोबत तळागाळातील लोकांच्या दुःखांना वाचा फोडण्यात अग्रणी असणारी,

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारख्या प्रागतिक विचारवंतांच्या कौतुक/आदरास पात्र ठरलेली,

हरिवंशराय बच्चन यांच्या संस्कृतप्रचुर मधुशालेचा अनुवाद करण्यापासून ते तेलुगू, तमिळ प्रदेशातील भटक्या स्त्रियांच्या गाण्यांतील शब्द आणि भावनांचा तरल पण चिकित्सक भाष्यासह अनुवाद करणारी,

अन्याय पाहून चिडणारी, रस्त्यावर उतरणारी, जवळच्या माणसांपासून ते मोठाल्या पदांवरील माणसांच्या चुका परखडपणे मांडणारी,

बाणेदार, आक्रमक, सहृदय, ग्रेसफुल, प्रेमळ बाई म्हणजे डॉ. ताराबाई भवाळकर.

त्यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं हे मराठी समाज आणि एकूण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विश्वासाठी सुखावह बाब आहे.

कर्कश, एकांगी आणि मुजोर झालेल्या राजकीय सामाजिक भवतालात अशा विद्वान, परखड आणि सहृदय व्यक्तींना पुन्हा अशा जबाबदारीची धुरा देणं हे येऊ घातलेल्या बदलाचं लक्षण आहे, ही आणखी सुखावह बाब!

ताराताई भवाळकर यांच्या ग्रंथसंपदेची आणि निवडक मानसन्मानांची सूची ज्येष्ठ, साक्षेपी लेखिका डॉ. वीणा गवाणकर यांनी दिली आहे, ती अशी:

ग्रंथसंपदा 

अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)

आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)

तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)

निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)

प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)

बोरी बाभळी (रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)

मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)

मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)

मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे

मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद

महामाया

माझिये जातीच्या (सामाजिक)

मातीची रूपे (ललित)

मायवाटेचा मागोवा

मिथक आणि नाटक

यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा

लोकनागर रंगभूमी (माहितीपर)

लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा (माहितीपर)

लोकपरंपरेतील सीता

लोकसंचित (वैचारिक)

लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह

लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)

लोकांगण (कथासंग्रह)

संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)

स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)

स्नेहरंग (वैचारिक)

सन्मान आणि पुरस्कार 

पीएच. डी. च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार.

आवास (अलिबाग) येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं. ल. गद्रे साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)

‘लोकसंचित’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार

पुणे शहरात ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

(१. ताराबाईंच्या ग्रंथांची आणि मानसन्मानांची सूची आयती उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्येष्ठ, साक्षेपी लेखिका Veena Gavankar यांचे आभार

२. चौफेर व्यासंगी वाचक, रसिक असलेले पुण्यातील ज्येष्ठ, सुप्रतिष्ठ व्यावसायिक आणि आर्याबाग सांस्कृतिक मंचाचे संस्थापक श्री. Kalyan Taware यांनी सूचना केल्याने हा परिचय लिहायची प्रेरणा मिळाली.)

लेखक : हेमंत प्रकाश राजोपाध्ये

प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘यत्र तत्र सर्वत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘यत्र तत्र सर्वत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

सकाळचा सुगंधी चहा टाटा…

जेवणातले चिमुटभर मीठ टाटा…

वेळेचे गणित टायटन टाटा…

वास्तू भक्कम आधार स्टील टाटा…

अखंड उर्जा निर्मिती टाटा…

गरीबांना विमा आधार टाटा…

असाध्य रोगावर इलाज टाटा…

मध्यमवर्गीय स्वप्न नॅनो टाटा…

श्रमिकांचा आधार ट्रक टाटा…

श्रीमंतांचे उड्डाण एअर इंडिया टाटा…

बोलण्याचे माध्यम संचार टाटा…

तंत्रज्ञान विकास टिसीएस टाटा…

ऐशोरामी स्वप्नवस्तु ताज हॉटेल टाटा…

चित्त्याच्या वेगाचे जॅग्वार टाटा…

देशाचे दिशादर्शक, आधार, विश्वास, शोअभिमानाचे नाव, सामाजिक भानाचे नाव, सुरक्षित गुंतवणुकीचे नाव, देश विकासात सिंहाचा वाटा, तत्त्व, स्वत्व, अस्तित्व, यत्र तत्र सर्वत्र साम्राज्य तरीही विनम्र आणि साधेपणाचे नाव, अनमोल रत्न, अजातशत्रू, घराघरात आणि जनसामान्यांच्या मनात असे हे रतनजी टाटा यांना अखेरचा टाटा.

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “हृदयशल्य !!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

हृदयशल्य !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही…. मायेची सावली लागते माणसाला.

आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती, ज्ञानदेव, सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती.. याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं. आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.

……. नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता.

पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला.. स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा, राजबिंडा तरुण. सालस, सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे, शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही, सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं…… त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता.

तो आला तसा इथलाच झाला. आजी, धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले.. पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती. कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना….. लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती.

लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.

काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या… पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला…. त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता… ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते! 

अगदी तसंच झालं….. देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं.

नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात, त्यांची झाडं होतात, त्यांना बहर येतो, कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं….. अनेकांचं आश्रयस्थान बनतं.

हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले… नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.

आपल्या मनातील प्रेमाच्या, त्यागाच्या, समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं…. त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही…. ! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही.

तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली… एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला…. हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल.

रतनजी टाटा…. नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत…. विश्व जाले वन्ही…. संते आपण व्हावे पाणी…. हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले…. भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!

(माहिती समाज माध्यमांतून साभार.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभिनंदन — ‘अविस्मरणीय दिवस‘ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ अभिनंदन — ‘अविस्मरणीय दिवस‘ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

अभिनंदन ! अभिनंदन !! 

पुणे मराठी ग्रंथालय या नामवंत ग्रंथालयातर्फे पुस्तक – परीक्षणासाठी नुकतीच एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री विभावरी कुलकर्णी यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध लेखक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या “ अष्टदीप “ या पुस्तकाचे त्यांनी केलेले परीक्षण पुरस्कार प्राप्त ठरले. आपल्या सर्वांतर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करणारा त्यांचा हा लेख – – 

अविस्मरणीय दिवस…..

२ ऑक्टोबर २०२४ माझ्या आयुष्यातील दिवस! 

साधारण जून महिन्यात एक मेसेज प्राप्त झाला. पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम या कडे दुर्लक्ष केले. कारण असे बरेच मेसेज असतात. पण पुणे मराठी ग्रंथालय यांचा मेसेज असल्याने आणि तेथील माझे अनुभव व आठवणी फार महत्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागेची अडचण असायची त्यांना हे ग्रंथालय म्हणजे फार आपुलकी व जिव्हाळ्याचे वाटायचे. कारण पुण्यातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. सायकलवर अगदी ५/७ मिनिटात पोहोचता यायचे. आणि या ग्रंथालयात अत्यंत शांत व अभ्यास पूरक वातावरण असणारी अभ्यासिका होती. मी व माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य तेथे अभ्यास करून घडवले आहे. त्यामुळे या संस्थेची पोस्ट असल्याने थोडे लक्ष दिले. त्या नंतर तीच पोस्ट ३/४ लोकांच्या कडून आली. त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्याचा विषय होता पुस्तक परीक्षण. तसे मी मला वाटले तसे म्हणजे पुस्तक वाचून जे जे विचार मनात येतात ते पूर्वी पासून माझ्या डायरीत लिहून ठेवत असे. पण ते म्हणजे पुस्तक परीक्षण नव्हे! मग काही पुस्तक परीक्षणे बघितली आणि यात मला रंग उगवतीचे ग्रुप व हा ग्रुप ज्यांच्या साहित्य वाचनासाठी तयार करण्यात आला ते आदरणीय श्री देशपांडे सर यांची फार मोलाची मदत झाली. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे पुस्तक परीक्षण कसे लिहावे हे समजले. मी पहिले पुस्तक परीक्षण लिहिले ते पुस्तक होते आकाशझुला अर्थात सर्वांचे आवडते व सरांचेच पुस्तक. आणि हे परीक्षण आपल्या गृप वर पाठवले. आणि आश्चर्य म्हणजे ते बऱ्याच जाणकार मंडळींना आवडले. आणि मग पुस्तक परीक्षण लिहिण्याचा छंदच लागला. आत्ता पर्यंत वाचता वाचता २०/२५ पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. हे सांगण्याचे कारण म्हणजे या सगळ्याचे फळ, सरांचे अनमोल मार्गदर्शन आणि आपल्या गृप वर जे कौतुक केले जाते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. या सगळ्या मुळे मी स्पर्धेत भाग घेतला आणि अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे. या पुस्तकाचे परीक्षण केले. आणि ८/१० दिवसा पूर्वी एक पत्र मिळाले. त्यात त्यांनी माझ्या परिक्षणासाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे असा उल्लेख केला होता. या ग्रंथालयाच्या परीक्षकांनी नंबर देणे म्हणजे आपण काही लिहू शकतो याची पावतीच! आणि चक्क ती मला प्राप्त झाली.

 २ ऑक्टोबर २०२४ या दिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुणे मराठी ग्रंथालय या संस्थेचा या दिवशी वर्धापनदिन असतो. काल ११३ वा वर्धापनदिन होता. आणि त्यात आम्हाला सहभागी होता आले. अतिशय मंगल व पवित्र वातावरणात हा सोहळा पार पडला. अगदी संस्थेच्या दरवाजातच प्रत्येकाचे पेढा देऊन स्वागत केले जात होते. आणि सगळी मंडळी लग्न कार्याला यावे तशी आली होती. फार सुंदर वातावरणात बक्षीस स्वीकारताना फार समाधान व आनंद अनुभवला. हा आनंद आपल्या माणसांच्या बरोबर वाटावा असे वाटले, म्हणून हा लिखाणाचा प्रपंच! आता आवरते घेते नाहीतर पुरस्कार मिळाला म्हणून लिही, असे व्हायला नको.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृतज्ञता… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ कृतज्ञता… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मंडळी !!

आपली सनातन संस्कृती महान आहे याबद्दल आपल्या मनात शंका नसेलच. पण आपली संस्कृती महान आहे याचि प्रचिती कशी यावी?

गुढी पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो.

त्यानंतर पावसाळ्याच्या आधी वडाची पूजा. पर्यावरण समतोल राखण्यासाठी…..

त्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे संगोपन व्हावे, रक्षण व्हावे म्हणून नागपूजा….

त्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा…

… इथे परत पर्यावरणाचे रक्षण हा भाव…

त्यानंतर गणपतीचे आगमन

त्यानंतर पितृ पंधरवडा….. !!

साधी कोणी आपल्याला क्षुल्लक मदत केली तर आपण त्याला किमान धन्यवाद देतो….

मग इथे तर आपले आईवडील आपल्याला तळहातावरील फोडासारखे जपतात, फुलझाडांसारखे वाढवतात, जगायला सक्षम करतात…. आज जे आईबापाच्या भूमिकेत आहेत, त्यांना कळेल की त्यांच्या आई बाबांनी त्यांच्यासाठी काय काय केले असेल….

आपल्याला चांगल्या कुळात जन्म मिळाला. ते कूळ चांगले ठेवण्यासाठी ( शुद्ध ) अनेकांनी आपल्याला मोह आणि माया बाजूला ठेवल्या असतील… अनेकांनी अनेक व्रते केली असतील, अनेक नियम पाळले असतील, तेव्हा कुठे ते शुद्ध राहिले असतील……

थोडा गांभीर्याने विचार करावा….

आज आपण कदाचित मुलाच्या भूमिकेत असू, तर उद्या आपण आई बाबांच्या भूमिकेत जाणार आहोत…..

आपला धर्म कर्म सिद्धांत मानणारा आहे. त्यामुळे मेल्यानंतर मनुष्याला दुसरा जन्म मिळतो यात शंका नाही. तसेच इथून पाठवलेले पैसे चलन बदलून अमेरिकेतील मिळू शकतात. इथून फोन केला तर परदेशातील आपल्या नातेवाईकांशी आपण बोलू शकतो, तर श्रध्देने केलेलं श्राद्ध आपल्या पित्रांपर्यंत पोचू शकते असा तर्क आपण करू शकतो….

मूळ मुद्दा असा आहे की आपल्या कृतज्ञ रहावेसे वाटते की नाही ?

आपल्या शास्त्रकारांनी याचा अभ्यास केला आणि विशिष्ट काळ निवडून, त्याला विशिष्ट पद्धती निर्माण केली.

एक उदा. पाहू. पंतप्रधान येणार असतील तर वेगळा शिष्टाचार असतो, पण अमेरिकेचे अध्यक्ष येणार असतील तर….. ?

श्राद्ध करून काय होते असे म्हणणारे लग्नात ज्या विधीला शास्त्रीय आधार नाही असे अनेक विधी खर्चाचा विचार न करताच करतात, तेव्हा नवल वाटते…

आपला धर्म सांगतो म्हणून आपल्याला योग्य वाटतील ती काही कर्मकांडे अगदी अट्टाहासाने करावी……… आधी करून पहावे आणि अनुभव घ्यावा.

महान तत्त्ववेत्ता रेने देकार्त म्हणतात त्याप्रमाणे “जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. त्याची कडूगोड फळे आपण सध्या चाखत आहोत. सध्या आपल्याकडे प्रचलित असलेल्या शिक्षणपध्दतीचे ‘पुनरावलोकन’ करण्याची नितांत गरज आहे.

आपण सर्वजण जाणते आहोत. विवेकाने निर्णय करावा.

निव्वळ आपले पूर्वज नाही तर आजपर्यंत आपल्या, आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञ असलेच पाहिजे.

उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत. आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य करण्या आधी नांदी श्राद्ध करण्याची पद्धती आहे. (थोडक्यात thanks giving)

पूर्वजांचे स्मरण करून, स्मरण ठेवून आपण उद्यापासून शक्तीची उपासना केली तर ती अधिक फलदायी होऊ शकेल…. !

आपण प्रयत्न करू.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares