मराठी साहित्य – विविधा ☆ गीतेतील मोक्ष कल्पना… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

गीतेतील मोक्ष कल्पना☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गीता जयंतीच्या निमित्ताने थोडेसे चिंतन…

रंगबिरंगी नवरसांनी भरलेल्या जीवनात सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग येतात. ते चाकाच्या आऱ्या प्रमाणे निरंतर खाली वर फिरत असतात. कधी कधी तर काय करणे श्रेयस्कर होईल हे ठरवणे अवघड असते. अशा वेळी मार्गदर्शक ठरणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता. गीतेचे महत्त्व सांगणारा एक सुंदर श्लोक आठवतो….

“सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:|

पार्थो वत्स:सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतम् महत्||”

अशी ही गीता केवळ मृत्यू नंतरच्याच मोक्षाचा मार्ग दाखविते असे नाही तर जगताना येणाऱ्या प्रश्नांमधून मिळणाऱ्या मोक्षाचा मार्गही दाखविते. अर्जुनाला कृष्णाने दाखविला त्याप्रमाणे.

मोक्ष म्हणजे मुक्ती. आपल्या धर्मात पुनर्जन्माचा सिद्धांत मांडला आहे. म्हणजे पूर्वीच्या जन्माच्या कर्मानुसार या जन्मात फळ मिळते व पुन्हा पुन्हा जन्मही मिळत राहतो. या कर्मबंधनातून सुटका पाहिजे असल्यास या जन्मात कर्माचे बंधन लागणार नाही असे कर्म करायला हवे. ते कसे असावे? याचा मार्ग गीतेत सांगितला आहे.

गीतेवर अनेक टीकाकारांनी निरनिराळा अर्थ लावून टीका सांगितली आहे. त्यात प्रामुख्याने शंकराचार्यांनी लिहिलेल्या गीता टिकेत गीतेत प्रामुख्याने ज्ञानयोग सांगितला आहे असे मत मांडले आहे. म्हणजेच आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच पिंडी तेच ब्रम्हांडी असल्याचे ज्ञान झाले की मग कर्म संन्यास घेतला की मगच मोक्ष मिळतो. म्हणजेच आत्मा परमात्म्यात विलीन होऊन मोक्ष मिळतो म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मत मांडले आहे.

तर भक्ती मार्ग हेच भगवंतापर्यंत जाण्याचे अत्यंत सुलभ साधन आहे म्हणून गीतेतील मुख्य प्रतिपाद्य विषय भक्तीयोग हा आहे हे सांगणारा आहे एक पंथ आहे. हा भक्तिमार्ग अतिशय उत्कृष्ट आणि रसाळ वाणी व सुंदर दृष्टांतांनी फुलवून सांगणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी.

त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी या दोन्ही ग्रंथांचा आधार घेऊनच पुढची वाट चोखाळली आहे. त्यांच्या मते युद्धभूमीवर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्यानंतर त्याला केवळ युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठीच भगवान कृष्णांनी गीता सांगितली आहे. त्याअर्थी गीतेचा प्रतिपाद्य विषय कर्मयोग हाच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ग्रंथाला कर्मयोगशास्त्र अथवा गीता रहस्य असे नाव दिले आहे.

प्रत्येकाने आपापल्या काळात समाजाची गरज ओळखून व जे ठासून सांगण्याची गरज आहे ते ओळखून गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय कोणता आहे ते मांडले आहे असे मला वाटते.

शंकराचार्यांना त्यांच्या काळात समाजाला ज्ञानयोग सांगण्याची म्हणजेच ब्रह्मसत्य जगत् मिथ्या हे सांगण्याची मुख्यत्वे करून गरज वाटली. म्हणून त्यांनी समाजमान्य असलेल्या गीता या ग्रंथाचा आधार घेऊनच ज्ञानयोग सांगितला.

 ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात कर्मकांडाचे अतिशय स्तोम माजले होते व त्यापायी समाजातील माणुसकीच नष्ट झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. व

“अद्वेष्टा सर्व भुतानाम् मैत्र: करुण एव च |

 निर्ममो निरहंकार: समदुःखसुख:क्षमी||”

याप्रमाणे कोणाचा द्वेष न करणारा व सर्व प्राणिमात्रांशी मित्र भावाने वागणारा असा भक्तच भगवंताला प्रिय असतो हा उपदेश करणे त्यांना आवश्यक वाटले. म्हणून त्यांनी गीतेवर प्रवचन करताना भक्तियोगाचे महत्त्व जनसमुदायाला पटवून सांगितले.

लोकमान्य टिळकांना वाटत होते की आपण पूर्वी मोगलाईत अत्याचार सहन केले. आता ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहोत व इकडे लोकांची प्रवृत्ती तर ईश्वराची इच्छा होईल तसे घडेल अशी आहे. अशा वेळी त्यांचा जो गीतेचा सखोल अभ्यास होता त्यावरून त्यांनी प्रकर्षाने मांडले की गीता अर्जुनाला शस्त्र हाती घेण्यासाठीच सांगितली आहे. तेव्हा गीतेत प्रामुख्याने कर्मयोग सांगितला आहे. त्या काळात, स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचीच आवश्यकता आहे आणि आपल्या मुख्य धर्मग्रंथातही तेच सांगितले आहे असे मत मांडले.

आपल्या तत्त्वज्ञानात मोक्षप्राप्तीसाठी निवृत्ती मार्ग व प्रवृत्ती मार्ग चोखाळावे असे निरनिराळ्या तत्त्वज्ञांनी मांडलेल्या मतातून दिसून येते.

निवृत्ती मार्ग म्हणजे संसाराचा त्याग करून संन्यास घ्यायचा व कर्म संन्यासच घेऊन तपश्चर्येला बसावयाचे. कर्म जळून खाक होतील तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल हे मत. पण एक असाही मतप्रवाह आहे की पूर्ण कर्मे कोणाला सुटूच शकत नाहीत. जीव जगवायला खावे लागणार. खाणे मिळण्यासाठी कमीत कमी का होईना परंतु कर्मे करणे आवश्यकच आहेत. संन्याशाची पण एक कुटी असतेच.

प्रवृत्ती पर मार्ग म्हणजे कर्म करावयाची पण निष्काम भावनेने करायचे. भगवंतांनी गीतेत म्हटलेच आहे…

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोsस्त्व कर्मणि”

भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की केवळ कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. फळ मिळणे तुझ्या अधिकारातच नाही. म्हणून तू फलाशा मनात धरून कर्म करूच नकोस. फलाशा न धरता कर्म केले तर कर्माचे बंधन न लागता मोक्ष मिळतो.

ज्याप्रमाणे कर्म करण्यापासून मनुष्य मुक्त होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सामान्य माणूस फलाशेपासून तरी मुक्त होऊ शकतो का? आपल्या मनात अनेक गोष्टींची तीव्र इच्छा असते. ती मनात धरूनच आपण आपल्या कामांची आखणी करतो. संपूर्णपणे वैराग्य आपल्यासारख्या सामान्यांना येऊच शकत नाही.

निष्काम कर्माचे महत्त्व सांगताना आचार्य विनोबांनी गीता प्रवचने मध्ये खूप सुंदर उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की लहान मूल खेळण्याची क्रिया करते त्यातून त्याला फक्त आनंद मिळतो. कुठलाही हेतू मनात ठेवून तो खेळत नाही. पण खेळण्याच्या व्यायामातून प्रकृती चांगली राहणे हे फळ त्याला आपोआप मिळते. त्याप्रमाणेच बालकाचे निरागस मन घेऊन आपण कर्म केले तर त्याचे चांगले फळ फलाशा मनात न धरता ही आपल्याला मिळतेच.

असेच आणखी एक उदाहरण! एक मानसशास्त्रज्ञ अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी समुपदेशन करताना विद्यार्थ्यांना ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हाच श्लोक सांगायचे. आणि म्हणायचे की अभ्यासानंतरच्या निकालात अमुक मार्क्स मिळतील याचाच विचार करशील तर निकालाच्या विचारांवरच तुझे मन केंद्रित होईल व अभ्यासावरून मात्र उडेल म्हणून तू चांगला अभ्यास कसा करायचा याचाच फक्त विचार कर. निष्काम कर्मयोगाचे महत्त्व या उदाहरणावरून लक्षात येते. रोजच्या जीवनात कर्मबंधनाची मुक्तता हीच नाही का?

आता इथे प्रश्न निर्माण होतो की कृष्णाला फक्त अर्जुनाला युद्ध करताच प्रवृत्त करायचे होते तर “अर्जुना फालतूपणा करू नकोस चल उठ धनुष्य हातात घे” एवढे जरी कृष्णांनी म्हटले असते तरी अर्जुनाने शस्त्र हातात घेतले असते. पण तो अर्जुन होता. श्रीकृष्णाची आज्ञा त्याने पाळली असती तरी मनापासून लढला नसता. कारण आपल्याच आप्तांना व वडीलधाऱ्यांना कसे मारू? ही शंका त्याच्या मनात होतीच. त्यासाठी भगवंतांना ज्ञान- भक्ती- कर्म ;या सर्वांचीच चर्चा करणे आवश्यक वाटले. अर्जुन एक एक शंका विचारत गेला. त्याचे निरसन करता करता प्रत्यक्ष भगवंताने ‘परिजनाला मारलेस तरी तू कर्तव्य कर्मच करतो आहेस म्हणून तू मोक्षालाच जाशील’ असे अर्जुनाला सांगितले.

सर्वप्रथमच आप्तांना समोर बघून यांना मारून स्वर्गाचे राज्य हे मला नको असे अर्जुन सांगतो. त्यावेळी आत्मा अमर असून तो फक्त हे शरीर मारणार आहेस. आत्मा कशानेही मारल्या जाऊ शकत नाही. हे कृष्णाने सांगितले व जन्म घेणाऱ्याला मृत्यू व मृत्यूनंतर पुन्हा जन्म निश्चित आहे. म्हणून तू त्याचा शोक करू नकोस. असे सांगितले आहे.

तरीदेखील अर्जुन तयार होत नाही त्यावेळी भगवान सांगतात;

“यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||”

या श्लोकातून भगवान सांगतात की जेव्हा जेव्हा अनाचार माजतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. आताही हे आप्त असले व वंदनीय असले तरी ते अविवेकाने वागले आहेत. व आता तू माघार घेतलीस तर दुसऱ्यांवर अन्याय केला तरी काही कोणाचे बिघडत नाही. असे विचार समाजात प्रसार पावतील. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असेच जणू भगवंतांना म्हणायचे होते. म्हणून ते अर्जुनाला सांगतात तू युद्धासाठी उभा राहा. तू क्षत्रिय आहेस म्हणून अन्यायाचे परिमार्जन करण्यास तुला स्थिर बुद्धीने तुझ्या क्षत्रिय धर्माला जागून युद्ध करावयाचे आहे स्थितप्रज्ञ बुद्धीने, म्हणजेच कुठलाही दुष्टभाव मनात न ठेवता सगळ्यांना सारखे मानून लढलास तर त्याचे पाप तुला लागणार नाही. “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: ” असे कृष्ण वारंवार अर्जुनाला सांगतात.

आणि हे आत्म्याबद्दलच्या मी सांगितलेल्या ज्ञानामधूनही निष्काम कर्मयोगामधूनही तुला हे समजत नसेल तर तू माझा खरा भक्त आहेस म्हणून मला फक्त शरण ये आणि मी सांगतो त्यावर विश्वास ठेवून युद्ध करता उठ. कारण तुझ्याकरता योग्य तेच मी सांगतो आहे. परंतु तुझा कर्माबद्दलचा मोह नष्ट होऊ देऊन मगच मला शरण ये. ज्ञानानंतर स्थितप्रज्ञ होऊन तथा मला शरण येऊन केलेल्या या युद्धरूपी कर्तव्य कर्माने अखेरीस तुला मोक्षच मिळेल.

व्यवहारातही वडीलधारे पुष्कळदा समजावून सांगतात. तरीही न ऐकल्यास मोठ्यांना जीवनाचा अनुभव असतो. त्या आधारावर ते आपल्या मुलांना निश्चयाने सांगतात, ‘मी सांगतो तसे कर’. बहुतांश वेळा मुलांना त्याचा फायदाच होतो.

तसेच आपल्या मनात खूप गोष्टींचा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी व. पु. काळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण अर्जुनच असतो. त्यावेळी कृष्णही आपल्यालाच व्हावे लागते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला कृष्णाच्या रूपात कोणी भेटेलच असे थोडीच असते! आपण आपले कृष्ण होतो त्यावेळी गीतेचा कुठलाही अध्याय मराठीतून वाचायला घेतला तरी काही ना काही मार्गही सापडतोच. व समोरच्या संकटातून मुक्ती पण मिळवता येते. म्हणजेच संकटातून मार्ग शोधता येतो. कृष्णाने ज्ञान -कर्म -भक्ती मधून सांगितलेली मोक्ष कल्पना मांडण्याची माझी योग्यता पण नाही. तेवढे माझे ज्ञान पण नाही. पण आजच्या गीता जयंतीच्या दिवशी केलेला तोकडा प्रयत्न गोड मानून घ्यावा.

‌ सर्वांना नमस्कार व धन्यवाद!

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभेच्छा व शुभेच्छा पत्रे… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

शुभेच्छा व शुभेच्छा पत्रे… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

मला लहानपणापासून वाचनाची लेखनाची अतिशय आवड आहे. विशेषत: कविता लिहिण्याची. अर्थात आवड असणं आणि जमणं यात फरक आहे. पण मी नव वर्ष, संक्रांत, गुढी पाडवा, दिवाळी, ख्रिसमस, आशा काही काही निमित्ताने, र ला र आणि ळ ला ळ जोडत चार दोन ओळी रचते आणि कविता करण्याची माझी हौस भागवून घेते आणि मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना या काव्यमय शुभेच्छा पाठवून मला तुमची आठवण आहे, बरं का ! असंही जाणवून देते.

आता हेच बघा ना, यंदाच्या वर्षी, मावळतं वर्ष आणि नवीन वर्ष यांची सांगड घालत मी लिहीलं होतं,

गत वर्षाच्या सरत्या क्षणांबरोबर विरून जाऊ दे

उदास मलीन धुके, कटू स्मृतींचे

येऊ दे सांगाती सौरभ सुमधुर स्मृतींचा

जो सेतू होऊन राहील भूत – भविष्याचा.

आणि पाडव्याला लिहिलं होतं,

‘नववर्षाचा सूर्य नवा, निळ्या नभी प्रकाशेल.

त्याच्या प्रकाश दीप्तीने, अंतरंग उजळेल.

अनातरीच्या उजवाडी हीण- मालिन्य जळावे.

नव आशांचे, नव स्वप्नांचे झरे वाहावे वाहावे.

अशा तर्‍हेची शुभेच्छाची देवाण-घेवाण करणारी अनेक प्रकारची रंगीत, मनोहर, आकर्षक चित्रे असलेली ग्रीटिंग्स, त्या त्या दिवसाच्या आधीपासून दुकानात सजलेली, मांडलेली दिसतात.

विविध, भाषांमधली, विविध प्रकारचे संदेश देणारी ही भेट कार्डे आताशी इंटरनेटच्या महाजालावरून किंवा व्हॉट्स अ‍ॅपवरूनही आपल्यापर्यंत येऊ लागली आहेत.

अलीकडे, कधी कधी वाटू लागतं, या सार्‍याला फार औपचारिकपणा येऊ लागलाय. अनेकदा पुनरावृत्ती झालेली असते. पण त्यात काही असे वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण संदेश असतात की ते मनात रुजून रहातात. अत्तरासारखे दरवळत असतात.

शुभेच्छा पत्रे, महणजेच भेटकार्डं व्यवहारात कधी आली, मला माहीत नाही. पण मी साधारणपणे, आठवी – नववीत असल्यापासून आमच्याकडे ग्रीटिंग्स येत असल्याचा मला

आठवतय. एक जानेवारी, दिवाळी, संक्रांतीला ती यायची. पुढे पुढे, वाढदिवस, विवाह, अमृत महोत्सव अशी त्यांची व्याप्ती वाढत गेली.

एकदा सहज मनात आलं, भेट कार्डे पाठवण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली, याचा शोध घ्यावा आणि खूपच गमतीदार माहिती मला कळली. हिंदुस्थानात पुराण काळापासून शुभेच्छापर संदेश पाठवण्याची परंपरा दिसते. त्या काळात संदेशवाहक दुसर्‍या राजाच्या दरबारात जाऊन आपल्या राजाच्या वाटेने त्याला शुभसंदेश देत. युद्ध, विजयोत्सव, विवाह, पुत्रप्राप्ती, या निमित्ताने ते पाठवले जात. मध्ययुगातही ही परंपरा कायम होती. पाश्चात्य राष्ट्रांचा विचार करताना कळलं की अमेरिकन विश्वकोशात असा उल्लेख आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 600 वर्षे रोममध्ये शुभेच्छा देणारा संदेश प्रथम तयार झाला. एका धातूच्या तबकावर अभिनंदनाचा संदेश लिहून रोमच्या जनतेने आपल्या सम्राटाला तो भेट म्हणून दिला.

इंग्लंडमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार चार्लस डिकन्स याला ग्रीटिंग कार्डाच्या नव्या परंपरेचे जनक मानले जाते. सुंदर हस्ताक्षरात शुभ संदेश लिहून तो छोटी छोटी भेटकार्डे तयार करी व आपल्या परिचितांना ती, तो पाठवी. अमेरिकेमध्ये बोस्टन लुईस याने १८७५मध्ये पहिले ग्रीटिंग कार्ड बनवले होते. जगातील सगळ्यात महाग ग्रीटिंग म्हणजे, रेसॉँ या चित्रकाराची दुर्मिळ अशी कलाकृती. त्यावर शुभसंदेश लिहून एका जर्मन नागरिकाने आपल्या मित्राला पाठवले होते. आज त्याची किंमत लाखो डॉलर्स आहे.

जगातील सगळ्यात मोठं ग्रीटिंग कार्ड केवढं असेल? त्याची लांबी ७ किलोमीटर एवढी आहे. १८६७ मध्ये व्हिएतनामयेथील युद्धाच्या वेळी अमेरिकन जनतेने आपल्या सैनिकांना त्यावर शुभ संदेश लिहून पाठवले होते. त्यावर एक लाख अमेरिकन जनतेने सह्या केल्या होत्या.

आहे ना भेट कार्डाचा इतिहास मनोरंजक…..

सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

१८६५ मध्ये एक ब्रिटिश सैन्यातील डॉक्टर मरण पावला. तसं पाहिलं तर त्याच्या मृत्यूबद्दल सांगण्यासारखं काही विशेष नव्हतं. त्याला खूप जुलाब झाले होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. तरी देखील तो वाचू शकला नाही. अजूनही ओ. आर. एस. किंवा अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता. जुलाब झाल्यामुळे मृत्यू येणे, हे सर्वसामान्य होतं. या डॉक्टरच्या मरण्याचं कुणाला काही फारसं वाटलंही नाही. पण… पण… पण काय? 

जेम्स मिरांडा बॅरी (१७८९-१८६५) सैन्यातील एक उच्च पदावर असणारा तो डॉक्टर ब्रिगेडियरच्या हुद्द्यापर्यंत पोहोचला. जेम्सचे वडील जेरेमिया व आई मेरी ॲन बर्कली (barkali).. यांचं ‘जेम्स’ हे दुसरं अपत्य. १७८९ मध्ये ते आयर्लंडमध्ये राहत होते. वडिलांचं किराणाचं दुकान होतं. तेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन. वडील जेरेमिया खूप खर्चिक स्वभावाचे ! “बचत” या शब्दाशी त्यांचं काही नातं नव्हतं. त्यामुळे ते लवकरच कर्जबाजारी झाले. उधारी देणे अशक्य होऊन बसल्याने कुटुंबासमवेत डब्लिन येथील मार्शल सिया इथे स्थायिक झाले. इथेही त्यांची सुटका झाली नाही. फसवणुकीच्या गुन्ह्यादाखल त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यामुळे आई व मुलं लंडनला आली. जेम्स बॅरी चांगला कलाकार होता. हे छोटं मूल आपल्या मामाच्या सहवासात इतकं रमलं की, त्याच्या मित्रांनाही त्यांनी आपलंसं केलं. त्यापैकी फ्रान्सिस्को द मिरांडा व डॉक्टर एडवर्ड फ्रेयर हे खूप जवळचे झाले. एडवर्ड फ्रेयर यांनी जेम्सच्या शेवटच्या दिवसात खूप सेवा केली व त्याच्यावर एक पुस्तकही प्रकाशित केलं. मिरांडा व फ्रेयर इतके जवळचे झाले की या दोघांनी मिळून जेम्सच्या शिक्षणाचा खर्च केला. मामाच्या मृत्यूनंतर त्याची सगळी प्रॉपर्टी या मुलाच्या नावाने झाली. त्यामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घेणे सहज शक्य झाले.

३० नोव्हेंबर १८०९ मध्ये ‘लॅडीस स्माक’ जहाजामधून लंडनहून ”विश्वविद्यालया”मध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाला जेम्स मिरांडा बॅरी.

वैद्यकीय कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून जेम्स बॅरी ओळखला जाऊ लागला. नापास हे लेबल कुठेही न लागता वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षापर्यंत आला. त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊ नये, वयाने लहानसर दिसतो या कारणाने त्याच्यावर बंदी घालण्यात आली. ‘थोडा मोठा होऊ दे, थोडी वर्षे जाऊ दे’, असा निर्णायक मंडळांनी आदेश दिला. तरी जेम्स बॅरीने हार मानली नाही. त्याची इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिन जो श्रीमंत, नावाजलेली व्यक्ती म्हणून ओळखला जायचा, त्याची जेम्सने भेट घेतली. मंत्रिमंडळाशी बोलणी करून त्यांना जेम्सचं म्हणणं पटवून दिल्याने जेम्सला शेवटच्या वर्षाला बसण्याची परवानगी मिळाली.

अशा तऱ्हेने १८१२ मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन जेम्स बॅरीला डॉक्टरची पदवी मिळाली. लगेचच म्हणजे १८१३ मध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये ‘हॉस्पिटल असिस्टंट’ म्हणून रुजू झाला. अवघ्या दोनच वर्षांत म्हणजे १८१५ मध्ये जेम्स ‘असिस्टंट स्टाफ सर्जन’ म्हणून रुजू झाला. त्याची कुशाग्र बुद्धी, कामातील तत्परता व डॉक्टरी पेशातील ज्ञान त्याला इथवर आणू शकलं. मिलिटरी भाषेत हे ‘लेफ्टनंट’च्या हुद्द्यावर असल्याप्रमाणे होतं.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिनकडून एक पत्र घेऊन केप टाऊनला १८१६ मध्ये आला. केप टाऊनचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री सॉमरसेट यांची त्याने भेट घेतली. योगायोगाने त्याच वेळी गव्हर्नरच्या मुलीची तब्येत बिघडली होती. जेम्सने इलाज करून तिला अगदी ठणठणीत बरी केली. त्यामुळे जेम्स गव्हर्नरच्या मर्जीतला बनला आणि त्यांच्या घरातील एका सदस्यासारखा तिथेच राहू लागला. गव्हर्नर व जेम्सच्या नात्यासंबंधी काहीबाही बोललं जाऊ लागलं. ‘होमोसेक्शुअल संबंध असावेत’, अशीही कुजबूज सुरू झाली. १८२२ मध्ये गव्हर्नरने ‘कलोनियल मेडिकल इन्स्पेक्टर’च्या पदावर नियुक्ती केली. त्याच्याबाबतीत ही खूपच मोठी उडी होती. त्याच्या कामामुळे सर्वत्र जेम्सचा गवगवा होऊ लागला. पैसा व प्रतिष्ठा त्याच्या दाराशी लोळण घेत होते.

१८२६ मध्ये त्याला नावलौकिक मिळण्यासाठी आणखीन एक घटना घडली. एक गरोदर बाई पोट खूप दुखू लागल्याने जेम्सकडे आली. नॉर्मल डिलिव्हरी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे जेम्सने सिझेरियन करून बाळाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आई व बाळ सुखरूप होते. ही दक्षिण आफ्रिकेतील पहिली सिझेरियन शस्त्रक्रिया होती. त्यामुळे बाळाचं नाव “जेम्स बॅरी मुनिक” असं ठेवलं. पुढील काही वर्षांत ‘जेम्स बॅरी मुनिक हेरटजोर्ग’ नावाचा पंतप्रधान झाला. एवढं “जेम्स बॅरी” हे नाव प्रसिद्धीला आलं.

केप टाऊन शहरात जेम्स आपल्या क्रांतिकारी कामामुळेही प्रसिद्ध झाला. मानवी हक्कासाठी लढणे हा त्याचा स्वभाव. आरोग्याविषयी सगळीकडे भाषण देत असे. त्याची अंमलबजावणी होते ना, याकडेही त्याचं लक्ष असे. केप टाऊनमध्ये बनावट डॉक्टर, नकली औषधे पुरवून लोकांना लुबाडत. जेम्स बॅरीने गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री यांना त्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विनंती केली. हा अन्याय जेम्सला सहन होत नसे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी त्याने बरेच उपक्रम हाती घेतले.

त्याकाळी जेलमध्ये कैद्यांच्या बरोबर कुष्ठरोगीही होते. त्यांना स्वतंत्रपणे खोली देण्यात आली. स्वच्छता पाळण्यासाठी नियम घालून दिले. समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळण्याची व्यवस्था केली.

भांडण, हातापायी, मारामारी करावी लागल्यास कधी माघार घेत नसे. त्याच्या अशा वागण्याने फ्लोरेन्स नाइटिंगेलपासून बऱ्याचजणांना हा “भांडखोर जेम्स” म्हणून आवडत नव्हता.

जेम्स याने जमैका, सेंट हेलीना, वेस्टइंडीज, माल्टा इत्यादी ठिकाणी काम केले. १८५७ मध्ये तो कॅनडाला गेला. तिथे त्याची ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री हॉस्पिटल’ या हुद्यावर नियुक्ती झाली. १८५९ मध्ये जेम्स बॅरीची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला आपल्या मायदेशी लंडनला परतावं लागलं.

१८६५ मध्ये जुलाब खूप झाल्याने तो मरण पावला. त्याने आपल्या मृत्युपत्रात पूर्वीच लिहून ठेवलं होतं – ‘आपण परिधान केलेल्या कपड्यासहितच आपले शवसंस्कार करावेत. ‘ पण मृत्युपत्र वेळेवर न मिळाल्याने त्याला नग्नावस्थेत आंघोळ घालावी लागली. त्यावेळी अशीच प्रथा होती. अंघोळ घालण्याकरिता जेव्हा विवस्त्र करण्यात आलं, तेव्हा कुणाचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. जेम्स बॅरी हा पुरुष नसून “मार्गरेट ॲन बर्कली” ही स्त्री आहे, हे जगजाहीर झालं. नाही तर हे गूढ – गूढच राहिलं असतं व तिच्याबरोबरच दफन केलं गेलं असतं. जेम्स हा पुरुष नसून स्त्रीच आहे, यावर बऱ्याचजणांना आश्चर्य वाटलं. काहींचा विश्वास बसत नव्हता. तर काहीजण ‘आपल्याला तो पुरुष नसावा’, असा संशय येत होता, अशी कुजबूज सुरू झाली.

या घटनेमुळे फक्त डॉक्टरच नव्हे, तर पूर्ण ब्रिटिश साम्राज्यच हादरलं. त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटनचा प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकन्सने “ए मिस्ट्री स्टील” नावाची कादंबरी लिहिली. बॅरीबद्दल अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. “द स्ट्रेंज स्टोरी ऑफ जेम्स बॅरी” लेखिका – ‘इझाबेल रे’.

 तसंच एक नाटकही रंगमंचावर आलं. डिकन्सच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स बॅरीची कथा गूढ व कुतूहलपूर्ण आहे.

मार्गरेट ॲन बर्कली, आता ‘जेम्स बॅरी’ या नावाने ओळखू जाऊ लागला. तिने आपली केशभूषा, वेशभूषा बदलली. स्तन दिसू नयेत म्हणून मफलरने घट्ट बांधून घेतले. खांदे रुंद दिसण्यासाठी त्याला शोभेसा वेष परिधान केला. गळा दिसू नये म्हणून तो झाकण्यासाठी कोट घालू लागली. भाषा राकट व आवाजात जरबीपणा आणला. उंची कमी असल्याने उंच टाचेचे बूट वापरू लागली. एवढं सगळं करूनही दाढी मिशा नसल्याने चेहऱ्यावरचा नाजूकपणा उठून दिसायचा. आपल्या आवाजात जरब, कर्कशपणा व वागण्यात बेफिकीरपणा आणला. हालचाल, चालणं, बोलणं सगळं पुरुषी दिसण्याकडे ती प्रयत्नशील राहिली.

अशा तऱ्हेने मार्गारेटला ‘जेम्स बॅरी’ म्हणून “पुरुष” होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कारणही तसंच होतं. त्या काळी स्त्रियांना डॉक्टर होण्यास अनुमती मिळत नव्हती. स्त्रियांना दुसरा दर्जा मिळायचा. स्त्रिया पुरुषांएवढ्या हुशार नसतात. त्यांची कार्यक्षमता पुरुषांएवढी नसते, असा समज होता. स्त्रिया म्हणजे फक्त मुलांना जन्म द्यायचं साधन. त्यांना शिक्षण कशाला हवं? – असाच सर्वत्र समज होता. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत डॉक्टरचे शिक्षण घेणे स्वप्नवतच. ‘डॉक्टर होऊन दाखवेनच’ ही तिची प्रबळ इच्छा तिला स्वस्थ बसू देईना. त्यासाठी तिने पुरुषी वेश, आवाज, चालणं, बोलणं इत्यादीमध्ये बदल करण्याचं ठरवलं व ती सगळीकडे ‘पुरुष’ म्हणूनच वावरू लागली.

अधिकृत दाखल्याप्रमाणे ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर एलिझाबेथ गॅरेट अँडरसन (१८३६-१९१७) १८६५ मध्ये वैद्यकीय परीक्षा पास झाली. पण हिला पदवी मिळाली त्याच वर्षी जेम्स बॅरीच निधन झालं. यावरून हे सिद्ध होतं की, ‘जेम्स बॅरी उर्फ मार्गारेट’ ही ‘ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर’ असं म्हणता येईल.

अशी ही ब्रिटनची आगळीवेगळी अचंबित करणारी सत्य घटना तिच्या मरणोत्तर उघडकीस आली. “तो” नव्हे, तर “ती” होती “मार्गरेट ॲन बर्कली”.

मूळ लेखक: डॉक्टर ना. सोमेश्वर 

अनुवाद: मंगल पटवर्धन 

(विश्ववाणी कन्नड पेपर)

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आणि तो जाड होऊ लागला…  – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ आणि तो जाड होऊ लागला…  – लेखक – अज्ञात ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

आणि तो जाड होऊ लागला…

माणूस भुकेची किंमत न करता अन्नाची किंमत करायला लागला आणि तो जाड होऊ लागला.

अनलिमिटेड थाळी किंमत वसूल होऊन वर थोडीफार खाण्याचा प्रयत्न करू लागला.

एका वेळच्या भुकेची गरज एक रोटी असताना महागडी भाजी संपविण्यासाठी जास्तीची रोटी आणि राईस मागवून खाऊ लागला.

महागड्या डिशेस खाण्याच्या नादात भरपूर लोणी तुपात घोळलेले पदार्थ बिनदिक्कत चापू लागला.

घरचा स्वयंपाक शिल्लक राहिला तरी चालेल पण हॉटेलमधली डिश चाटून पुसून संपवू लागला.

पैसे खर्च झाले तरी चालेल पण बायको माहेरी गेल्यावर पदार्थ घरी करायचे कष्ट न करता, बाहेर जाऊन खाणे श्रेयस्कर समजू लागला.

मिसळ खायला पाव आणि पाव संपवायला अनलिमिटेड तर्री हाणू लागला.

हॉटेलमध्ये संध्याकाळी भरपूर खाल्ले तरी रात्री घरी पोळीभाजी खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही म्हणून रात्री सुद्धा घरी आडवा हात मारून जेवू लागला.

हॉटेल हि गरजेची सुविधा असणे विसरले गेले आणि चैन हि माणसाची नित्य गरजेची सवय बनली.

नुसतेच खाणे बदलले असे नाही तर खाण्यानंतर चहा किंवा कॉफी बरे वाटू लागले.

जेवताना कॉल्डड्रिंक मानाचे होऊ लागले.

पूर्वीच्या जेवणाच्या ताटावरच्या गप्पा हॉटेलमधल्या टेबलावर घडू लागल्या आणि गप्पांच्या वेळे बरोबर खाण्याची बिलेही वाढू लागली.

आम्ही दोघांनी मिळून कैरीचं लोणचं केलं किंवा आम्ही दोघांनी मिळून पापड केले असे कामाचे सहचर्य कुणाकडूनच कधी ऐकू आलं नाही.

कामाच्या विभागणीत स्त्री पुरुष समानता आलेली फार क्वचित दिसली पण आळशीपणामध्ये मात्र स्त्री पुरुष समानता हटकून आली.

स्वयंपाक बिघडला म्हणून घरी बायकोला घालून पाडून बोलणारे महाभाग हॉटेलमध्ये जे समोर येईल ते माना डोलवून डोलवून खाऊ लागले आणि निषेधाची वाक्य बाहेरच्या वहीत नोंदवून ठेऊ लागले.

किंवा अगदीच घरगुती किंवा साधे हॉटेल असेल तर त्या बदल्यात दुसरा पदार्थ फुकटात मिळवू लागले.

हळूहळू स्वयंपाकाची कला घरांमधून नाहिशी होते कि काय अशी भिती वाटू लागली आहे.

कुणाला घरी जाऊन भेटणे या पेक्षा हॉटेलमध्ये भेटणे जास्त प्रशस्त वाटू लागले आहे.

कुणाच्या घरी जाणं झालंच तर चहाच्या ऐवजी कोल्डड्रिंक्स आणि नाश्त्याच्या ऐवजी ब्रँडेड चिवडा लाडू किंवा सामोसे आणि पॅटिस ऑफर होऊ लागले आहेत.

गरमागरम पोहे पाच मिनिटात करून आपुलकीने पुढ्यात ठेवणारी आईची पिढी आता पंचाहत्तरीची झाली आहे.

या गल्लोगल्ली उघडलेल्या हॉटेल्सनी तसेच महागड्या आणि स्टायलिस्ट हॉटेल्सनी आपली खाद्य संस्कृती पूर्णपणे बदलू लागली आहे.

महाराष्ट्रीय पदार्थ तर हळूहळू विस्मरणात जाऊ लागले आहेत.

कुरड्या पापड्या भुसवड्या भरल्या मिरच्या पंचांमृत आता गौरीच्या जेवणापुरत्याच आठवणीत राहिल्या आहेत आणि त्या सुद्धा ऑर्डर देऊन मागवाव्या लागत आहेत.

फोडणीची पोळी फोडणीचा भात आताशा पूर्णपणे दिसेनासाच झाला आहे.

कुणाच्याही घरी जाऊन वहिनींच्या हातची हक्काने खायची पिठलं भाकरी आता शेकडो रुपये देऊन विकत मिळू लागली आहे.

कुणाच्या घरी हक्काने जेवायला जायची सोयच राहिलेली नाही, खिशात पैसे नाहित म्हणून आलेला दिसतोय अशी शंका सुद्धा घेतली जाऊ लागली आहे.

आमच्या पिढीतल्या सर्व वहिनींना स्वयंपाक येतो याची सगळ्यांनाच खात्री आहे पण मुलांच्या पिढीमध्ये मात्र सगळंच जरा अवघड आहे.

आता सुखी संसारासाठी विवाहेच्छूक स्त्री पुरुषांसाठी किंवा नवपरिणीत जोडप्यांसाठी एकत्रित पाककलेचे वर्ग सुरू करणे अनिवार्य होऊ लागले आहे असे मला वाटते.

स्वतःपुरतातरी स्वयंपाक दोघांनाही करता यायला हवा असे माझे मत आहे.

लेखक : अज्ञात

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 चैतन्याचा दिवा 

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पप्पा ज्ञानेश्वरीतील ओव्या सुरेल स्वरात गात. सहजपणे साखर झोपेत असताना सुद्धा आमच्या कानावर त्या अलगद उतरत. नकळतपणे असं कितीतरी आमच्या अंतःप्रवाहात त्यावेळी ते मिसळलं आणि आजही ते तसंच वाहत आहे. पप्पांच्या खड्या आवाजातलं सुस्पष्ट, नादमय पसायदान आणि त्या नादलहरी अशाच मधून मधून आजही निनादतात.

।।दुरितांचे तिमिर जावो 

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो 

जो जे वांछील तो ते लाहो

प्राणीजात।। 

खरोखरच माऊलीने मागितलेलं हे पसायदान किती अर्थपूर्ण आहे! यातला संदेश वैश्विक आहे. त्रिकालाबाधित आहे.

आज दिवाळी सारखा प्रकाशाचा सण साजरा करत असताना मनात असंखय विचारांचं जाळं विणलं जातं. दिवाळी म्हणजे उजळलेल्या पणत्या, रंगीत रांगोळ्या, वातावरणातला तम सारणारे कंदील, खमंग —मधुर फराळ, नवी वस्त्रे, गणगोतांच्या भेटी, आणि अनंत हार्दिक शुभेच्छा. आनंद, सुख समाधानाच्या या साऱ्या संकल्पना. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं कुठेतरी यात “मी” “ माझ्यातले अडकले पण” आहे फक्त. यात प्रवाहापासून लांब असलेल्या, वंचित, उपेक्षितांच्या जीवनातही आनंदाचा उजेड पडावा यासाठी काही केले जाते का आपल्याकडून ?अनोख्या चैतन्याने आणि मांगल्याने भारणारा हा सण आहे. पण या चैतन्य उत्सवाच्या तरंगात सर्वव्यापीपणा अनुभवास येतो का? आपण आपल्यातच मशगुल असतो. आपल्या पलीकडे काय चाललं आहे, इतर जन कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आपल्या पलीकडल्यांचा विचार करणे हे या निमित्ताने गरजेचे वाटायला नको का? केवळ आर्थिक विषमतेच्या पातळीवरच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे. आनंद सुख समाधानाचे भाव केवळ आपल्या आपल्यातच अनुभवण्यापेक्षा विवंचनेत असणाऱ्या, परिस्थितीने गाजलेल्या, वंचित, उपेक्षित कारणपरत्वे कुटुंबाने व समाजानेही नाकारलेल्या, टाकलेल्या व्यक्तींच्या जीवनातले काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण उजळण्याचा का प्रयत्न करू नये?

माझ्या मनात बालपणापासून जपलेली एक आठवण आहे. खरं म्हणजे आज त्या आठवणीला मी एक संस्कार म्हणेन. बाळपणीच्या त्या दिवाळ्या स्मरणातून जाणे ही अशक्य बाब आहे. एका गल्लीतलं एकमेकांसमोर असलेल्या एक खणी दोन खणी घरांच्या वस्तीतलंच आमचंही घर. तिथली माणसं, तिथलं वातावरण, तिथले खेळ, सण, विशेषता दिवाळीची रोषणाई, पायरीवरच्या मंद पणत्या, ओटीवरच्या रांगोळ्या आणि एकमेकांच्या घरी जाऊन केलेले फराळ हे सतत फुलबाजी सारखे मनात उसळत असतात. पण या साऱ्या आनंदाच्या उन्मादात एक आकृती मात्र विसरता येत नाही. वृद्ध, थकलेल्या गात्रांची, घरासमोरच्या काशीबाईच्या घराच्या बाहेरच्या ओसरीवर कधीतरी कुठून तरी आश्रयाला आलेली— नाव, गाव, स्थान, जात धर्म कशाचीच माहिती नसलेली एक उपेक्षित वृद्ध अनामिका. पण अभावितपणे ती या गल्लीची कधी होऊन गेली हे कळलेच नाही आणि कुठलाही सण असो सोहळा असो गल्लीतली सगळी माणसं प्रथम तिचा विचार करायचे. पहिला फराळ तिला पोहोचवला जायचा. आम्ही गल्लीतली मुलं तिच्या पायरीवर पणत्या लावायचो. रांगोळ्या काढायचो. काशीबाईंनीही तिला तिचा ओसरीवरचा आश्रय कधीही हलवायला सांगितले नाही. या ऋणानुबंधाचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण त्या सुरकुतलेल्या अनामिकेवरच्या चेहऱ्यावरची आनंदाची लकेर आम्हाला खरा सणाचा आनंद द्यायची. आणि ती लकेर तशीच आजही मनात जपून आहे.

या सणानिमित्ताने भावंडात होणारी वाटणी कशाचीही असू दे, फराळाची, नव्या कपड्यांची. फटाक्यांची पण त्या सर्वांमधून बाजूला काढलेला एक सहावा हिस्सा असायचा. तो घरातल्या मदतनीसांच्या मुलांचा, रोज रात्री “माई” म्हणून हाक मारणाऱ्या त्या भुकेल्या याचकाचा, जंगलातून डोक्यावर जळणासाठी सालप्याचा भार घेऊन येणाऱ्या आदिवासी कातकरणीचा आणि घटाण्याच्या मागच्या गल्लीत वस्ती असलेल्या तृतीयपंथी लोकांचाही. त्यावेळी सहजपणे, विना तक्रार, विना प्रश्न होणाऱ्या या क्रियांचा विचार करताना आता वाटतं, वास्तविक तेव्हा हे उपेक्षित, वंचित, प्रवाहापासून दूर गेलेले कुणीतरी बिच्चारे म्हणून मुद्दाम का आपण करत होतो ? तेव्हा या विषमतेचा भावही नव्हता. तो केवळ एक रुजलेला उपचार होता. पण तरीही नकळत “कुणास्तव कुणीतरी” हा संस्कार मात्र मनावर बिंबवला गेला. या एका जीवनावश्यक सामाजिक संवादाची गुणवत्ता, आवशक्याता जाणली गेली हे मात्र निश्चित आणि पुढे वाढत्या वयाबरोबर हे पेरलेले बीज अंकुरित गेलं. साजरीकरणाकडे डोळसपणे, अर्थ जाणून आणि मन घालून कृती करण्याची एक सवय लागली.

इनरव्हील क्लब ची प्रेसिडेंट या नात्याने आम्ही दिवाळी सणांचे काही उपक्रम राबवत असू. वृद्धाश्रमातील फराळ भेट हा एक अत्यंत हृद्य कार्यक्रमअसायचा. रिमांड होमच्या मुलांबरोबर तिथेच फराळ बनवण्याचा कार्यक्रम असायचा, तसेच रांगोळ्या फटाके वाजवणे अशी धम्माल त्या मुलांबरोबर करताना खरोखरच एक आत्मिक समाधान अनुभवले. तांबापुरा वस्तीत घरोघरी जाऊन पणत्यांची रोषणाई केली, फराळ वाटप केले, कपडे, शाली त्यांना दिल्या आणि हे संवेदनशील मनाने केले. केवळ पेपरात फोटो येण्यासाठी नक्कीच नव्हे. रोटरी, इनरव्हील तर्फे आजही या सणांचं हे भावनिक बांधिलकीच रूप पाहायला मिळतं. शिवाय समाजात “एक तरी करंजी” सारख्या तरुणांच्या संघटना आहेत, जे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा करतात. या दृष्टीने दिवाळी ही मला नेहमीच महत्वाची वाटत आली आहे.

कविवर्य ना. धो. महानोर एकदा सहज म्हणाले होते,

 मोडलेल्या माणसाचे

 दुःख ओले झेलताना

 त्या अनाथांच्या उशाला

 दीप लावू झोपताना

अमळनेरला माझ्या सासरी पाडव्याच्या दिवशी घरातले सर्व पुरुष प्रथम धोबीणी कडून दिवा उतरवून घेतात. तिला ओवाळणी देतात. खूप भावुक असतो हा कार्यक्रम. धोबीणी कडून दिवा उतरवून घेणे आजही शुभ मानले जाते. या प्रथा गावांमध्ये आजही टिकून आहेत. विचार केला तर असे वाटते, हर दिन त्योहार असलेल्यांसाठी हे सण नसतातच. ज्यांच्या घरी रोजची चूल पेटण्याची विवंचना असते त्यांच्यासाठीच या सणांचं महत्त्व असतं आणि म्हणून सण साजरा करताना त्यांची आठवण ठेवून काही करण्यात खरा आनंद असतो

दिवाळीच असं नव्हे तर कुठलाही सण साजरा करताना अगदी सहज आठवण येते ती निराधार, बेघर, रस्त्यावर झोपणाऱ्या असंख्य लोकांची. भविष्याचा अंधकार असणाऱ्या, उघड्या नागड्या उपासमारीत वाढणाऱ्या मुलांची, दुष्काळामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, शरीराचा बाजार मांडणार्‍या लालबत्ती भागातल्या असाहाय्य, पीडित, लाचार स्त्रियांची, कुटुंबाने नाकारलेल्या लोकांची, सीमेवर राष्ट्रासाठी स्व सुखाकडे पाठ फिरवून प्राणपणाने थंडी, वारा, ऊन पावसाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची, अनाथ —अपंगांची, सुधार गृहात डांबलेल्या, विस्कटलेल्या मुलांची. कोण आहे त्यांचं या जगात? त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कोणाची जबाबदारी? या समाज देहाचा तोही एक अवयवच आहे ना मग एक तरी पणती त्यांच्या दारी आपण लावूया. स्नेहाची, अंधार उजळणारी.

एक तरी करंजी त्यांना देऊया. एक मधुर, भावबंध साधणारी.

एक फुलबाजी त्यांच्यासमवेत लावूया. ज्याने त्यांच्याही चेहऱ्यावर हास्याची कारंजी उसळतील.

नकारात्मक बाबींच्या अंधकारावर प्रकाशाचे असे चांदणे पेरूया.

आपल्या भोवती असंख्य अप्रिय घटनांचा काळोख पसरलेला असला तरी अवघे विश्व अंधकारमय नाही. सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात समाजात कार्यरत आहेत. जे पणती म्हणून सभोवतालचा अंधकार छेडण्याचे कार्य करत आहेत. आपणही अशीच त्यांच्यातली एक मिणमिणती पणती होऊया. तिथे जाणीवांचा, संवेदनाचा उजेड पेरूया..

बाळपणी झालेल्या संस्काराच्या या ज्योतीला असेच अखंड तेवत राहू दे !

 नका मालवू अंतरीचा दिवा

 नैराश्य तम दूर करण्यासी हवा

 आपुला आपल्याशी जपलेला

 मनोगाभार्‍यात चैतन्याचा दिवा…..

क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्माचा सिद्धांत — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

कर्माचा सिद्धांत — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात….. हाच असतो कर्माचा सिद्धांत. 

“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 

क्षणिक सुखासाठीच आपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट “……  हेच केलेल्या कर्माचे फळ आहे

काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,…!!! अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, … जसे की…!!!

1) शारिरीक, आर्थिक, फसवणूक करणे …

2) समाजात, समारंभात अपमानास्पद वागणुक, देणे…

3) कोणाचे जाणीवपूर्वक मन दुखावले असू शकते,…                  

 4) कोणावर जाणीवपूर्वक अन्याय केला गेलेला असतो,…

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,…

6) मानसिक, सामाजिक, राजकीय छळ केलेला असेल,…..

7) कोणाची हक्काची फसवूनक करून खोट्या कागद पत्रा मार्फत व पुरावे देऊन, दबावतंत्राचा वापर करून प्रॉपर्टी हडपली असेल…

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल…

9) राजकीय, सामाजिक, शारीरिक दुखापत केलेली असेल, …

10)  विश्वासघात करून गद्दारी करून गैरफायदा घेतला गेलेला असेल…              

11) ज्याने आपल्यावर अनेक उपकार केले असतील आणि त्याच्याच पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप करून खंजीर खुपसुन गद्दारी केली असेल…

12) कोणाचे आपल्यावर उपकार असतील त्याचा त्याला जाणीवपूर्वक विसर पडणे किंवा त्याने आपल्यासाठी केलेला आकास्मित खर्चाचे पैसे बुडवणे, किंवा त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवणे, भ्रष्ट बुद्दीने वागणे.आणि बदला घेणे…

अश्या प्रकारच्या त्रासाचे कुठलेही कारण असो… वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला असतो व होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत मनस्ताप होत असतो, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते, आणि त्या जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे जाणीवपूर्वक समजत नसेल. 

पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो, त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, अशी माणसे निर्दयी, निष्ठुर, व हरामखोर असतात.

….. पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग त्या समोरच्या व्यक्तीला हाय हाय लागते, त्यालाच जनता ‘ तळतळाट ‘ 

असे म्हटले जाते.

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,…

आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त त्या महाखोटारड्या व्यक्तीस व आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच सर्व माहीत असते.

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो त्यास याच जन्मात त्याला कुठल्यातरी मार्गाने करावीच लागते, तो जरी कितीही जोरात बोलत असेल अथवा हसून बोलत असेल परंतु ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असते.  मात्र तो अंतर्मनातून बेचैन व अस्वस्थ असतो. त्याला सहज शांत झोप व स्वास्थ मिळत नाही. अनेक आजारांनी त्रस्त असतो…

तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो.  मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या -शंभर पुत्र युध्दात मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की “ असे का व्हावे ? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे?“  

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टीद्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.            

….. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले. कर्म हे त्याचे फळ देऊनच शांत होते.

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे.  चांगले कर्म, चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे.आता आपणच ठरवायचे आहे, आपले कर्म कसे हवे.

….. ” जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 

क्षणीक सुखासाठीच आपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट “….  हेच केलेल्या कर्माचे फळ आहे म्हणून ….. 

🌺 सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही  व संविधान जिवंत ठेऊन वाचवा…!!!

🌺 एकमेकांना अडचणीत आणू  नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नको त्या उठाठेवी करू नका, वाद  वाढवू नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे …!!!

🌺 समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासून नेहमीच दूर रहा, खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा…!!!

🌺 “प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे.  ते आनंदात जगा व दुसऱ्यांनाही आनंदी जगू द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे कुणीही सांगूच  शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!! 🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणासोबत तरी मैत्री असावी … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

कोणासोबत तरी मैत्री असावी … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

एकदा एका माकडाला अति दु:खामुळं मरण्याची इच्छा झाल्यावर, त्यानं झोपलेल्या सिंहाचे कान ओढले…

सिंहानं उठून रागानं गर्जना केली, की हे धाडस कोणी केलं ? स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावलं ?

माकड : मी कान ओढले, – महाराज, सध्या मला मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका…

सिंहानं हसून विचारलं, माझे कान ओढताना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना.. ?

माकड : नाही महाराज…

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय… !

या कथेचं सार :

एकटा राहून जंगलाचा राजादेखील कंटाळतो… यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच.. !!

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात राहा…

त्यांचे कान ओढत राहा…

म्हणजे त्यांची चेष्टा मस्करी करीत रहा…

आपल्याला मेसेज येणं हे

भाग्याचं समजा. कारण या जगांत कोणीतरी आपली आठवण काढतंय, हे लक्षात ठेवा. …

वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाणघेवाण करा. आनंद हा देण्यात- घेण्यात असतो…

कंटाळवाणे होऊ नका.

वयाला विसरा, मजा करीत रहा. …

संसार- प्रपंच तर सगळ्यांनाच आहे. …

विश्वास ठेवा, की तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल, तरच आपण नेहमी निरोगी राहू शकतो….

मैत्री-श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली वा अडाणी असावी, असंही काही नसतं. …

कारण –

मैत्री ही केवळ मैत्रीच असते. आणि ती निखळ राहू द्या.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आनंद जीवनाचा – कवी – अज्ञात ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? काव्यानंद ?

☆ आनंद जीवनाचा – कवी – अज्ञात ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर 

आनंद जीवनाचा ☆

*

आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा

पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा,,,

आनंद या जीवनाचा,,,

*

झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा

हे जनता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा

आनंद या जीवनाचा,,,

*

संसार वेली वरही सुख दुःख फुलुनी फुलावे

संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्षवावा

आनंद हा जीवनाचा,,, 

जीवनी जगता हसुनी सुख दुःख प्रतिसाद द्यावा

हसता हसता हसुनी गतकाळ ही आठवावा

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा

पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा

 गीतकार – अज्ञात

 *

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा

पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

*

आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात.

माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.

बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.

 झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा

हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा

स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जाणता आलं पाहिजे. जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.

हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी. आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत, काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करायला हवे. जीवन फार सुंदर आहे. ते जगता यायला हवं. दुसऱ्या साठी जगायला हवं. तेंव्हाच मनुष्य मूर्ती रूपाने गेला तरी किर्ती रूपाने कायम राहतो. जीवनाचा अर्थ ज्याला कळतो तो आमरत्व प्राप्त करून जातो. त्यांना कोणीही विसरू शकत नाही. जसे आपले रतन टाटा जी, सिंधुताई सपकाळ असे अनेक आहेत ज्यांनी चंदनासारखे झिजून दुसऱ्याला सुंदर जीवन दिल.

 संसार वेलीवरही सुख दुःख फुलुनी फुलावे

संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्षवावा

संसाराची वेल नाजूक आणि कठीण असते. सुख दुःख अपार असतात. त्याही पलीकडे जाऊन ते फुलावावे लागतात. संसार प्रेमाने हळू हळू बहरत जातो, फुलत जातो. संयम, त्याग, एकमेकांची साथ असेलतर फुलत जातो. हार न मानता फुलावावा लागतो.

पूर्वी एक म्हण होती ” संसार सुई वरून बारीक आणि मुसळहून ठोसर आहे ” काटकसर, तडजोड, नियोजन करून संसार पुढे न्यावा लागतो.

सुख न सांगता जीवनाचा हा संदेश दुःखीत मनांना आनंद देईल असे करावे. आपलं सुख सांगून इतरांना दुःख देण्यापेक्षा आपण काय करून कुठले दुःख भोगून संकटांचा सामना करून इथपर्यंत पोहचलो याची जाणीव करून प्रेरणा द्यावी.

जीवनाची कहाणी सांगावी. म्हणजे दुःख सहन करण्याची ताकद मिळते.

 जीवनी जगता हसुनी सुख दुःख प्रतिसाद द्यावा

हसता हसता परंतू गतकाळ ही आठवावा

आपण जीवन हसत जगत असलो तरी इतरांच्या सुख दुःखाला प्रतिसाद देता आला पाहिजे. त्यात सहभागी होता आलं पाहिजे. सुखमय सगळे होतात. दुःख वाटून घेता आलं पाहिजे. सुखात सगळेच बरोबर असतात. दुःखात राहता आलं पाहिजे. हेच जीवनाचं सार आहे. हाच जीवनपट आहे.

आपल्याला सुख आल्यावर चेहऱ्यावर हसू आल्यावर आपला भूतकाळ आठवत राहिलं पाहिजे. म्हणजे पाय जमिनीवर राहतात व माणूस माणसा सारखा वागतो. त्याला गर्व अहंकार शिवत नाही. मी पणाची बाधा होत नाही. आपला गतकाळ नेहमी स्मरणात असावा. यशाची दिशा आपोआप मिळत जाते.

भुकेलेल्याला अन्न तहणनेलेल्याला पाणी ही आपली संस्कृती जपावी हेच मोठं सुख आणि श्रीमंती.

हे तत्व पाळले तर आनंद मिळेल. आनंद वाटता येईल आणि सुगंध किर्ती रूपाने दरवळत राहील

अप्रतिम गीत लिहिले आहे लेखकास विनम्र आभिवादन 🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – २. अन्नाचा सन्मान ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – २. अन्नाचा सन्मान ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण बऱ्याच गोष्टी नकळत करत असतो. त्यात काही चुकीच्या गोष्टी पण आपल्या हातून नकळत घडतात. त्याच जर हेतुपुरस्सर बदलल्या तर ती सवय होऊन जाते. आणि भावी पिढी साठी ते संस्कार बनून जातात. यातील काही आवश्यक गोष्टी विविध कारणांनी मागे पडत चालल्या आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे अन्नाचा सन्मान

आपल्याही नकळत आपण बरेचदा अन्नाचा अपमान करत असतो. कदाचित ते लक्षात पण येत नाही. इथे मला एक गोष्ट आठवते. एक खूप मोठे कुटुंब असते. घरातील सगळे काम करणारे असतात. रात्री ते एकत्र जेवत असतात. एक दिवस घरात फक्त तांदूळ असतात. त्या घरातील मोठी सून त्या तांदुळाची खिचडी करायला ठेवते. तितक्यात तिची सासू येते. तिला वाटते सून मीठ घालायचे विसरली म्हणून ती त्यात मीठ घालते. असेच घरातील तिन्ही सुनांना वाटून प्रत्येक जण स्वतंत्र पणे मीठ घालून जाते. त्याच वेळी लक्ष्मी व अवदसा या घरात असतात. आणि या घरात कोणी राहायचे या वरून त्यांच्यात वाद होतो. आणि असे ठरते, या कुटुंबातील एकाही व्यक्तीने अन्नाला नावे ठेवली नाही तर त्या घरात लक्ष्मी निवास करेल. आणि कोणी नावे ठेवली तर अवदसा त्या घरात राहील. त्या दोघी घरात एका बाजूला बसून निरीक्षण करत असतात. घरातील सर्व पुरुष मंडळी प्रथम जेवायला बसतात. सासरे पहिला घास घेतात त्याच वेळी भात खारट झाल्याचे लक्षात येते. पण घरातील स्त्रियांचे कष्ट लक्षात घेऊन ते काहीही न बोलता गुपचूप जेवतात. ते बघून त्यांची मुलेही गुपचूप जेवतात. त्यामुळे छोटी मुले, स्त्रिया कोणीही काहीही न बोलता जेवतात. थोडक्यात अन्नाला कोणीही नावे ठेवत नाहीत. म्हणजेच अन्नाचा सन्मान ठेवतात. आणि लक्ष्मी कायमची त्या घरात निवास करते.

अन्नाचा सन्मान हे खूप मोठे व महत्वाचे व्रत आहे. त्या सन्मान करण्यात शेतकरी त्यांचे कष्ट, घरातील स्त्रिया त्यांची कामे या सगळ्यांचा सन्मान असतो. परंतू हल्ली वाया जाणारे अन्न पाहिले की मनाला त्रास होतो. एकीकडे आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो. त्यावर आपला देह पोसला जातो. जेवणाला उदर कर्म न मानता यज्ञ कर्म मानतो. मग अन्न टाकून देताना ही भावना का विसरतो? असा प्रश्न पडतो. एखाद्या कार्यात बघितले तर अन्नाची नासाडी दिसते. आणि त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अन्नासाठी व्याकूळ झालेले लोक दिसतात. आणि अन्न वाया जाणार नाही, या साठी पण कायदे करण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न पडतो.

पुण्यातील एका कार्यालयात मी असा अनुभव घेतला आहे. ताटात कोणी अन्न ठेवून ताट ठेवायला गेले की तेथे उभी आलेली व्यक्ती ते ताट ठेवू देत नाही. ताट रिकामे करून आणा म्हणून ती व्यक्ती सांगते. सावकाश संपवा अशी विनंती केली जाते. सुरुवातीला लोकांना हे आवडले नाही. पण त्या कार्यालयाचा तो नियमच आहे. एकदा समजल्यावर लोक मर्यादेत वाढून घेऊ लागले. एका डायनिंग हॉल मध्ये पण अशी पाटी लावली आहे. ताटातील अन्न संपवल्यास २० रुपये सवलत मिळेल. असे सगळीकडे व्हावे असे वाटते. त्याही पेक्षा आपण ठरवले तर अन्नाचा योग्य सन्मान करु शकतो. आणि आपले बघून पुढची पिढी हेच संस्कार स्वीकारणार आहे.

अन्नाचा सन्मान तर पूर्वी पासूनच आहे. पण पुन्हा त्याला नव्याने उजाळा देण्याची वेळ आली आहे. तर अन्नाचा सन्मान हे व्रत आचरणात आणण्यास कोणाची हरकत नसावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तो सुवास दरवळतो तेव्हा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ तो सुवास दरवळतो तेव्हा… ☆ सौ राधिका भांडारकर

जेव्हा जेव्हा मी माहेरपणाचा आनंद उपभोगून जळगावला परतत असे तेव्हा जीजी (माझी आजी) माझ्यासोबत खाऊचे डबे भरून देत असे आणि ते डब्बे तिच्या जुन्या झालेल्या लुगड्यांचे रुमाल करून त्यात बांधून देत असे. तेव्हा मी तिला म्हणायचे, ” काय ग जीजी माझं सामान वाढवतेस. मी खाल्लं ना सारं इथेच. ”

तेव्हा ती म्हणायची, ” कुठे ग ?अनारसे राहिले की, शिवाय तुला सुकलेले मासे आवडतात ना? जळगावला कुठे मिळतात? जा घेऊन. काही नाही वाढत सामानबिमान.. ”

परवा मी माझं कपाट आवरत होते. तिथे एका कोपऱ्यात सांभाळून ठेवलेला जीजीच्या लुगड्याचा तो रुमाल मला सापडला आणि माझं अंग शहारलं. त्या लुगड्याच्या तुकड्याला जीजीचा वास होता. त्या वासातलं प्रेम, ती मायेची उब, तिचा स्पर्श जाणवला. मन आणि डोळे तुडुंब भरून गेले. किती बोलायचे मी तिला पण तिच्यासारखी माया माझ्यावर जगात कोणीच केली नसेल. एक तुकडा लुगड्याचा आणि त्याचा गंध म्हणजे माझ्यासाठी त्या क्षणी जीजीचं संपूर्ण अस्तित्व होतं.

आयुष्यात असे कितीतरी आठवणींचे गंध साठलेले आहेत. जेव्हा जेव्हा मी तांदुळाच्या शेवया, उकडीचे मोदक अथवा अळूच्या वड्या करते किंवा कुणाकडून त्या मला आलेल्या असतात तेव्हा तेव्हा त्या पदार्थांचे ते सुगंध माझ्या बालपणीच्या श्रावण महिन्यात मला घेऊन जातात. श्रावण सोमवारी आणि शनिवारी आईने सोवळ्यात रांधलेला तो सुवासिक स्वयंपाक आणि पाटावर बसून ताटाभोवती रांगोळ्या रेखलेल्या त्या संध्याभोजनाच्या पारंपरिक पंगती आठवतात. केळीच्या पानावर वाढलेला तो गरमागरम वरणभाताचा, साजुक तुपाचा सुवास केवळ अस्विस्मरणीय! बालपणीच्या सणासुदीच्या आठवणी आणि वातावरणाला जागं करणारा.

मार्च महिन्यात कधीकधी काहीसं अभ्रं आलेलं आभाळ असतं बघा! ऊन— सावलीचा खेळ चालू असतो. कुठून तरी मोगरा, बकुळ, सुरंगीच्या फुलांचा मस्त गंध दरवळतो आणि मला का कोण जाणे आजही शालेय परीक्षा जवळ आल्याचे ते दिवस आठवतात. तो अभ्यास, त्या वह्या, ती पुस्तके आणि परीक्षेची एक अनामिक धडधड पुन्हा एकदा अनुभवास येते.

खरं म्हणजे आयुष्याच्या प्रवासात मी अनेक देश पाहिले पण कुठेही पावसात भिजलेल्या मातीच्या गंधाने मला मात्र नेहमीच भारतात आणून सोडले आहे. अचानक आलेला पहिला पाऊस, छत्री रेनकोट नसल्याने माझी आणि सभोवताली सर्वांचीच झालेली तारांबळ, ते भिजणं आणि मृद्गंधासह अनेक वातावरणातील सुगंध जगाच्या पाठीवर कुठेही मला आठवत राहतात. इतकंच नव्हे तर खरं सांगू का? या वासांची एक मजाच असते. हे आठवणीतले गंध ना तुम्हाला कुठल्याही क्षणी कुठेही घेऊन जातात. पुण्यात मी जेव्हा दोराबजीच्या दुकानात हिंडत असते तेव्हा मला तिथल्या खाद्यपदार्थांचे अथवा इतर वस्तूंवरून येत असलेले वास थेट परदेशात घेऊन जातात. असते मी भारतातच पण दुकानातल्या शीतपेटीतून दरवळणारे वास मला इटली, रोम जर्मनीतही घेऊन जातात. तिथले बेकरी प्राॅडक्टचे, खमीरचे काहीसे भाजके आंबट वास मला ठिकठिकाणच्या देशाची सफर घडवतात. मग तिथल्या आठवणीत मी पुन्हा एकवार रमून जाते.

एकदा मी लेकीकडे.. अमेरिकेला असताना भाजणीच्या चकल्या करत होते. तेव्हा लेक म्हणाली, ” मम्मी मला अगदी आपल्या जळगावच्या घरात असल्यासारखं वाटतंय गं! या तुझ्या चकलीच्या वासाने. ”

आणि तिने दिलेला परफ्युम मी जेव्हा भारतात आल्यावर वापरते तेव्हा मला अमेरिकेत माझ्या लेकीपाशी असल्यासारखं वाटतं.

वॉशिंग्टनला फिरत असताना मॅग्नोलियाचा तो पांढऱ्या फुलांनी गच्च लगडलेला वृक्ष पाहिला आणि त्या फुलांच्या सुगंधाने मला माझ्या अंगणातल्या अनंताच्या झाडाची आठवण झाली. भारतातला पांढरा सुवासिक चाफाही आठवला.

खरोखरच अशा कित्येक निरनिराळ्या सुवासांबरोबर केलेल्या मनाच्या प्रवासाला ना नकाशांची जरूर लागते ना वाहनांची. हा प्रवास निर्बंध, मुक्त असतो.

मी दहावी अकरावीत असेन. घर ते शाळा असा साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांचाच रस्ता असेल. ते वय उमलणारं, भावभावनांचं, काहीसं तरल, देहातली कंपने अनोळखी, न समजणारी. त्यावेळची एक आठवण. गंमतच बरं का? 

एक युवक, दिसायला वगैरे बरा होता, छान उंच होता. रोज मध्येच रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावरून माझ्याबरोबर शाळेपर्यंत अगदी न बोलता चालत यायचा. शाळेच्या आवारात शिरताना मला दोन सोनचाफ्याची फुले द्यायचा. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, ” आला ग तुझा चंपक!”

आज मला इतकं आठवत नाही की त्यावेळी माझ्या मनात त्याच्याविषयी काय भावना होत्या किंवा मी त्यांनी दिलेली फुलं केवळ भिडस्तपणे घेत होते की मनापासून घेत होते? कोण जाणे! पण आजही जेव्हा जेव्हा या सोनचाफ्याच्या फुलांचा सुगंध येतो तेव्हा त्या कुरळ्या, दाट केसाच्या, उंच युवकाची आठवण जागी होते मात्र आणि तितकंच हसूही येतं. आयुष्यातले असे वेडपट क्षण किती मजेदार असतात ना याची जाणीव होते केवळ ती या आठवणीतल्या गंधांमुळे.

मुलाचे घरदार, शिक्षण, रूप, भविष्य चोखंदळपणे पाहून, पारखून माझं लग्न जमलं. सासर अमळनेरच, मी मुंबईची. तेव्हापासून साहित्यप्रेमी असल्यामुळे गावाविषयीच्या अगदी बा. भ. बोरकरी कल्पना! लग्नाआधी मी अमळनेरला गेले होते. होणाऱ्या नवऱ्याने अगदी रोमँटिकपणे मला मोटरबाईक वरून गावात, गावाबाहेर फिरवून आणले. गाव छानच होता. गावाला शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक, अध्यात्मिक परंपरा होती आणि त्याचबरोबर एक घराघरातून ढणढण पेटलेल्या मातीच्या चुलींचा, खरपूस भाकऱ्यांचा, तसाच गाई म्हशींच्या गोठ्यांचा, शेणामुताचा, कडबा —पेंढ्यांचा असा एक संमिश्र वेगळाच वास होता आणि तुम्हाला म्हणून हळूच कानातच सांगते, हा वेगळा वास माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही असल्यासारखे मला तेव्हा जाणवले होते आणि ते मी त्याला स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हा तो म्हणाला होता, ” मग काय विचार आहे तुझा? लग्न कॅन्सल?”

आमचं लग्न झालं. गेल्या पन्नास वर्षात खूप काही बदललं असेल नसेल पण चुकूनमाकून पेटलेल्या मातीच्या चुलीचा तो भाजका वास आणि गायीगुरांच्या सहवासातला वास मला पुन्हा पन्नास वर्षे मागे घेऊन जातो. एका अनोळखी पण जन्माची गाठ बांधली जाणार असलेल्या व्यक्तीबरोबरची ती पहिलीवहिली रोमँटिक बाईक सफर आठवते. आहे की नाही गंमत?

अशा कित्येक आठवणी. माझी आई जळगावला यायची. काही दिवस रहायची आणि परत जायची. ती गेल्यावर मला खूप सुनं सुनं वाटायचं. कितीतरी दिवस मी तिची रुम तशीच ठेवायचे कारण त्या खोलीला आईचा वास असायचा. आणि नकळत त्या वासाचा मला आधार वाटायचा.

तसे तर अनेक वास सुवास! रेल्वे स्टेशनचा वास, विमानतळावरचा वास, समुद्रकिनारी ओहोटीच्या वेळचा वास आणि त्यासोबतच्या कितीतरी आठवणी.

… गंधित आठवणींची एक मजेदार यात्रा. कधीही न संपणारी. कधी भावुक करणारी, हळवी, संवेदनशील तर कधी खळखळून हसवणारी.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print