‘Miss World’ contest मधे ‘हरियाणा’ ची डॉ मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते.
शेवटच्या निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे? तेंव्हा तिचे ‘winning’ उत्तर हे होते की “सर्वात जास्त पगार ‘आई’ला मिळाला पाहिजे.” आईच्या कामाचे मोल नाही!
तिच्या या उत्तराने तिने ती स्पर्धा तर जिंकलीच. बरोबर जगात एक नवीन विषय चर्चेला दिला.
त्यानंतर फोर्ब्स व्दारे संचालित वेबसाईट ‘Salary.com’ वर research सुरू झाला की एक आई जेवढं काम करते, त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली, तर त्यांना किती पगार द्यावा लागेल? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता, एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर (१,१५,००० डॉलर) असायला हवा. हा निष्कर्ष निघाला. म्हणजे तिला महिन्याला अंदाजे ९,५०० डॉलर मिळायला हवा. म्हणजे भारतीय आईला ९,५०० × ७५ = ₹ ७,१२,५०० अंदाजे एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.
तिच्या उत्तराने जगात ही गोष्ट प्रकर्षाने उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची भूमिका समोर आली. अनंत काळापासून आई हेच काम करते आहे रोजच, वर्षानुवर्षे. न थकता, न थांबता आनंदाने. कुठेही उपकाराची भावना नाही. अहंपणा नाही. कंटाळा नाही. ती सुखी घराची किल्ली आहे.
एकाच वेळी ती असंख्य departments सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य कामं सहज करते. अगदी काटेकोरपणे बिनबोभाट. ती घरची Administrative officer आहे. वेळ पडली तर डॉक्टर, टीचर, सल्लागार आहे आणि कधी कधी हिटलरही होते. जवळ जवळ सर्वच मंत्रालये तिच्याकडे असतात. घराची गृह मंत्री, वित्त मंत्री आहे ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ आहे.
तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही मिळतात त्यांना. येथे प्रत्येक घरची आई प्रत्त्येक department किती कुशलतेने सांभाळते.
I think she is ‘The Best CEO’ in the world.
जगाची रीतच आहे ही. जुन्या काळापासून चालत आलेली. कुठेही न लिहिलेले नियमच आहेत ते की ही सर्व कामे तिनेच केली पाहिजेत. ही कामे करण्यात तिला आनंदही आहे. समाधान आहे. एखादं काम जरी नीट झालं नाही, तर ती disturb होते. म्हणजे अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते. माझी कुठे चूक झाली? याचा विचार करते व पुन्हा असे होणे नाही याची काळजीही घेते.
या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनातही येत नाही.
“प्रत्त्येक घरी देव पोहचू शकत नाही म्हणून आई असते. आईच्या पायाशी स्वर्ग आहे. आईला केलेला नमस्कार देवाला पोचतो” वगैरे वगैरे हे मोठे, महान विचार पुस्तकात वाचायला मिळतात. काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे, “आई” आईच राहणार आहे.
तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी, सांभाळणारी….!
प्रत्येकाच्या या आईला साष्टांग नमस्कार !
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अश्या असंख्य ओळी ह्या ओळी नसून आत्मस़ंतुष्टी आहे असे जाणवले व शाश्वत आनंदात परावर्तित झाल्या की आपल्याच ह्दयाचा सन्मान झाला असे समजण्यास हरकत नसावी.
पिंडी ते ब्रह्मांडी…या उक्तीप्रमाणे जे बाह्यजगत आहे तेच आत आहे निश्चितच.
व्यर्थ जमवाजमवी दु:खास आमंत्रण देते हे पक्के मनाला समजावयाचे.
“मन चिंती ते वैरि न चिंती” हे “सकारात्मक* घेतले तर मनासारखा सखा नाही. मनाने आपले ऐकावे, आपण मनाच्या आधीन होऊ नये. मग मनासारखा सखा नाही.
मन सत्याकडेच दृढ करावे मग आपल्या अस्तित्वाची “जाणीव” होते, ज्यात हृदयास अग्रक्रम असतो.
“स्वत: च्या हृदयाची साक्ष व साक्षीदार आपण” वा वा वा काय हा दुर्मिळ योग.
नराचा नारायण तोच मी….
तोच मी….
🦋 सुरवंटाचे फुलपाखरात परिवर्तन 🦋
✨भगवंताने कशातच भेदभाव केला नाही. आपापल्या कर्मानुसार काही तरी सहन केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही !! पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी क्लेशदायक प्रक्रियेतून जावेच लागते याचे हे चालते बोलते उदाहरण आहे.
किती यातना होत असतील त्या जीवाला !! पण कोषातून बाहेर पडल्याशिवाय मोकळ्या आसमंतात भरारी घेता येत नाही व सौदर्याची अफाट उधळणही शक्य नाही.
आपल्याच कोषात राहिलो तर त्याच कोषात मृत्यू अटळ आहे संधीचे सोने करण्यासाठी आपला तो कोष फाडूनच बाहेर पडावे लागते. हे सगळे निसर्ग आपल्याला शिकवत असतो. साप, गरूड अशी उदाहरणे आहेत ज्याकडे पाहून आपला comfort zone सोडणेच आवश्यक आहे हे कळते व मग तटातट पाश तोडून स्वैर बागडण्यास ही सुवर्णसंधी आहे हे लक्षात येते.
या लहानशा जीवाला जर हे आपोआप जमते असे वाटते पण त्यासाठीही त्याचा पक्का निग्रह कारणीभूत ठरतो. त्यांना ती नैसर्गिक देणगी आहे त्याप्रमाणे ते वागतात. आपल्याला ही विशेष देणगी ईश्वराने प्रदान केली आहे फक्त त्याचा उपयोग करता यावा इतकेच!!
आपला वेगळा अनुभव आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो व इतरांना प्रेरणादायी ठरू शकतो.
सामान्य काम करत राहिलो तर असामान्य अद्भुत असे आपल्या जीवनात परिवर्तन होऊ शकणार नाही.
🥀…🌺🌺
कळ्यांची फुले होणे हेच झाडांचे ही ध्येय असते!!
क्लेशदायक प्रक्रिया पार करून अगदी तसेच परिवर्तन आपल्या जीवनात घडवून आणणे हेच आपले परमकर्तव्य आहे !!
मग सुरवंट फुलपाखरू झाल्यावरचा नितळ परमानंद शिल्लक राहतो..
☆ “मनातला पाऊस” – लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
श्री मयुरेश उमाकांत डंके
॥मनातला पाऊस॥
(देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका ***)
काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती.
अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.
पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)
पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे.
कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का?
काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला.
“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.”
“मग?”
“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”
“मग तुम्ही काय केलंत?”
“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”
“मग आता?”
“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”
त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं.
“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो.
ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”
“मग काय, पैसे कमवू नयेत का?”
“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”
“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी.
“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”
मी पुन्हा सपशेल आडवा.
“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”
शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं.
“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं.
मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं.
“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले.
“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?”
“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती.
“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”
आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो.
“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं.
“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”
त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !
☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(विविध व्यवसायाच्या संतांच्या दृष्टीतून)
विठ्ठलाचे रूप म्हणजे शेकडो वर्षाच्या मराठी संस्कृतीचे एक खूपच वेगळे स्वरूप आहे ! सगळ्या भक्तांचा, जातीपातींचा, व्यावसायिकांचा, बलुतेदारांचा तो देव ! मातीसारखा, अत्यंत वात्सल्याने भरलेल्या धरतीसारखा !! जेवढे तुम्ही पेराल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला परत करतो. बरं त्याला तुमच्याकडून हवं तरी काय तर फक्त तुमची भक्ती, तुमचे शब्द, तुमचं प्रेम याचा तो भुकेला..
या विठ्ठलाने शेकडो वर्षे, महाराष्ट्राची अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, संगीत, कला अशी सगळीच क्षेत्रे समृद्ध केली. अठरापगड जातींच्या समाजाला भक्तीसमृद्ध केले. अध्यात्मातील चारीही मुक्तींचा सोपा मार्ग, समाजातील शेवटच्या पायरीवरील माणसांनाही कळला. पुरुषसूक्तात जरी ” ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् ” अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू ( अगदी ब्राह्मणसुद्धा ) हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही. परंतु ” पद्भ्यां शूद्रो अजायत ” अशी उपमा दिलेल्या पायांनाच हात लावून, पायांवर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो.
संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवतगीता प्राकृतात आणली आणि मराठीत एक अध्यात्मिक क्रांतीच झाली. येथे त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रत्येक जाती व्यवसायात थोर संत होऊन गेले. अनेकांचा विविध कारणांनी छळ झाला तरी त्यांनी विठ्ठलाला सोडले नाही. खुद्द ज्ञानेश्वर माउलींनी, त्यांच्या कुटुंबीयांचा अपरिमित छळ होऊनही कुणालाही शिव्याशाप दिले नाहीत. उलट देवाकडे पूर्ण विश्वाच्या भल्याचे पसायदान मागितले.
नंतरच्या मांदियाळीतील संतांच्या स्वभाव, व्यवसाय, कार्यानुभवांमुळे एकच विठ्ठल त्यांना कसा कसा दिसला, भावला हे पाहणे आपल्याला भावणारे आहे.
संत गोरा कुंभार आपल्या अभंगात ” देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ” आणि ” न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ” असे म्हणतात.
संत नरहरी सोनार तर थेट विठ्ठलाला आपल्या व्यवसायातील वर्णन सांगतात — देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।। त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।। जीव शिव करूनी फुंकी । रात्रन्दिवस ठोकाठाकी ।। विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।। मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।। ज्ञान ताजवा घेऊन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।। खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पेंल थंडी ।। नरहरी सोनार हरीचा दास । भजन करा रात्रं दिवस ॥
संत सावता माळी यांना आपल्या मळ्यातील भाजीमध्येच विठ्ठल दिसतो.ते म्हणतात, “आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी, लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि || “
संत तुकाराम महाराज समाजातील जातीभेदाबाबत उपरोधकपणे म्हणतात, बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों II
संत जनाबाई त्यांना पडणाऱ्या तत्कालीन हलक्या कामांबद्दल म्हणतात — तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥ ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥
संत कान्होपात्रा या महान संत कवयित्री, जन्माने गणिका कन्या. त्यांचे सांगणे कांही वेगळेच ! —
दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।
संत चोखामेळा म्हणजे सर्वात साध्या भाषेत, सर्वात उच्च तत्वज्ञान —— ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४ II
संत सोयराबाई या सहजपणे सर्वोच्च तत्वज्ञान सांगतात — अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५II
प्रत्येकाला दिसलेला विठ्ठल हा आपापल्या दृष्टीने दिसलेला आहे. पं. भीमसेन जोशी हे विठ्ठल हा शब्द गातांना दोन टाळ एकावर एक वाजविल्यासारखे ठणठणीत वाटतात तर श्रीधर फडके यांचा विठ्ठल, जरा अधिकच मृदू असतो. ग.दि.माडगूळकरही विठ्ठलाला विविध घट बनविणारा ” वेडा कुंभार ” असे म्हणतात. जगदीश खेबुडकर ” ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी ( ठिणगी रुपी फुले ) वाहू दे ” असे म्हणतात.
आता आषाढी एकादशी आली आहे. लाखो वैष्णवांचा मेळा माऊलीभेटीला निघाला आहे. सर्वांचा विठ्ठल एकच, पण त्याचे दर्शन मात्र व्यवसाय, समाज, अनुभूती यांच्या विविध खिडक्यांमधून घेतले जाते. वारीमध्ये चालणारा, धावणारा, टाळकरी, माळकरी आणि ज्याला भेटायचे आहे तो, असे सगळेच ” माऊली “! चंद्रभागेच्या तीरी या माऊलींच्या रूपातील अवघा भक्ती रंग एकच ” विठ्ठल रंग ” होतो. मग सर्वांचे फक्त एकच काम उरते — बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव II
लेखक : श्री मकरंद करंदीकर
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “एपिक्यूरसचा पॅराडॉक्स…” – लेखक – डॉ. विजय रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
एपिक्यूरस
देवाच्या अस्तित्वाबाबत सर्वात स्पष्ट, परखड आणि समर्पक मत मांडणारा माझा सर्वात आवडता फिलॉसॉफर म्हणजे “एपिक्युरस”.
“देव आहे” म्हटलं तरीही अन “देव नाही” म्हटलं तरीही , दोन्ही परिस्थितीत ईश्वरवाद्यांना तोंडावर पाडणारा एपिक्यूरस चा पॅराडॉक्स जगप्रसिद्ध आहे. ह्या पॅराडॉक्स ला चॅलेंज करण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न जगभरातील ईश्वरवादी दार्शनिकांनी केले आहेत , परंतु असं करताना ते जे तर्क देतात ते अत्यंत हास्यास्पद आणि बालबुद्धी असतात.
एपिक्युरीअन पॅराडॉक्स मर्मभेदी आहे. अचूक आहे. अभेद्य आहे.
काय आहे एपिक्युरिअन पॅराडॉक्स?
एपिक्युरस ईश्वरवाद्यांना पहिला प्रश्न विचारतो. ” DOES EVIL EXIST ? ” (ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती , दुर्दैवी /वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत का?
ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असंच द्यावं लागतं. ते अन्यथा देता येत नाही. तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक तुम्हाला हे मान्य करावंच लागेल कि ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती आणि दुर्दैवी घटना (खून बलात्कार दरोडा अन्याय अत्याचार इत्यादी) अस्तित्वात आहेच आहे.
आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर “होकारार्थी” दिल्यावर एपिक्युरस दुसरा प्रश्न विचारतो अन इथूनच आता तो आस्तिकांना लपेटायला सुरवात करतो.
दुसरा प्रश्न.. “CAN GOD PREVENT EVIL ?” अर्थात देव ह्या दुष्टतेला रोखण्यास समर्थ आहे का?
आता ह्या प्रश्नाचं उत्तर “नाही” असं दिलं तर देवाच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह लागतं. देव “सर्वशक्तिमान” नाही हे मान्य करावं लागतं .
पण जर का ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असं दिलं तर मग एपिक्युरस तिसरा प्रश्न विचारतो..
“DOES GOD KNOW ABOUT THE EVIL ?” अर्थात देवाला ह्या दुष्टतेबद्दल संज्ञान आहे का?
आता जर “नाही” म्हटलं तर देव “सर्वज्ञ” आहे ह्यावर प्रश्नचिन्ह लागेल.
आणि जर का “होय” असं उत्तर दिलं तर मग एपिक्युरस चौथा प्रश्न विचारतो…
“DOES GOD WANT TO PREVENT EVIL ?” अर्थात जगात दुःख नसावं असं देवाला वाटतं का ?
आता “नाही” म्हटलं तर देव दयाळू किंवा प्रेमळ नाही हे मान्य करावं लागेल. आणि जर “हो” म्हटलं तर मग एपिक्युरस पाचवा प्रश्न विचारतो..
“IF GOD WANT TO PREVENT EVIL THEN WHY IS THERE EVIL ?” अर्थात दुष्टता /दुःख दूर करण्याची इच्छा देवाची आहे तर मग त्याच्या इच्छेविरुद्धहि दुःख अस्तित्वात का बरं आहे ?
ह्याचं उत्तर देताना आता ईश्वरवाद्यांना चलाखी करावी लागते. ती अशी..
पहिला तर्क ईश्वरवादी देतात तो असा ,” दुष्टतेला देव नाही तर सैतान कारणीभूत आहे”
पण मग सर्वशक्तिमान ईश्वर सैतानाला नष्ट का करत नाही ? आता परत देवाच्या सर्वशक्तिमान असण्यावर शंका आली.
दुसरी चलाखी केली जाते हा दुसरा तर्क देऊन, “आपली सत्वपरीक्षा घेण्यासाठी देवाने दुष्ट प्रवृत्ती तयार केल्या आहेत”
पण मग जर देव सर्वज्ञ आहे तर त्याला आपली परीक्षा घेण्याची गरज काय? त्याला तर सर्व माहीतच असते न ?
तिसरी चलाखी ,” दुःख आणि नाकारात्मकतेशिवाय जगाचे अस्तित्व टिकून राहणे शक्य नाही”
म्हणजे दुखविरहित जगाची निर्मिती करण्यात देव “असमर्थ” आहे तर ! आणि जर समर्थ आहे तर मग त्यानं दुखविरहित जगाची निर्मिती केली का बरं नाही?
आता इथं ईश्वरवादी कोंडीत सापडतात . कारण आता त्यांना तेच तेच तर्क घुमून फिरून द्यावे लागतील , “देवाची मर्जी” , “सैतान” “लीला” “सत्वपरीक्षा” इत्यादी इत्यादी.
पण ह्यातला कोणताही तर्क दिला तरी एपिक्युरस म्हणतो कि देव एकतर अस्तित्वातच नाही. किंवा असेलही तरी तो सर्वशक्तिमान नाही, सर्वज्ञ नाही किंवा सर्वव्यापी नाही. आणि जर का तो सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असूनही ह्या जगातलं दुःख दूर करत नसेल तर मग तो स्वतः दुष्ट असावा.
कोणत्याही परिस्थितीत एपिक्युरसला देवाची भक्ती करणे किंवा त्याला मानणे हे शहाणपणाचे कृत्य वाटत नाही. आणि गरजेचे तर नाहीच नाही.
एपिक्युरस शेवटी म्हणतो.. “ जर देव नसेल तर प्रश्नच मिटला, परंतु तो जर असेलही तरी माझ्यासाठी तो “रिलीव्हन्ट” नाही अन पूजनीय नाही. दूर आकाशात बसून मानवी दुःखांकडे पाहून त्यातून आनंद लुटणारा निष्ठुर देव तुम्हाला लखलाभ असो, मला त्याची गरज नाही “ असे तो ठामपणे सांगतो.
☆
लेखक : डॉ. विजय रणदिवे
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सदाफुली………… उमलावं हिच्या सारखं. बहरावं हिच्या सारखं…….. ना असते ऋतूंची ओढ ना कधी मावळतीचे वेड……….. नसते कधी ईश्वराच्या चरणी…… ना कधी कोणी केसात माळत…… तरीही बहरत राहते स्वतः साठी…….. अनेक रंगात……. कुठे आहे ती कडे कपारीत , तर कधी छान बगीचात तर कधी एकटीच उंच डोंगरावर………… असतात कधी सोबती तर कधी एकटी……… तरीही बहरायचं एवढंच माहिती असतं……… मिळणार नसतो कधी मानाचा मुकूट…… ना मिळणार असते कधी कौतुकाची थाप………… असेच येतात अनेक प्रसंग तरीही रहायचं सदाफुली सारखं नेहमी प्रसन्न…….. ना उगवतीची आस ना मावळतीची भिती .. लक्षात ठेवायचं आपण नेहमीच बहरायचं……….. आयुष्य जगावं सदाफुली सारखं ……….. Be happy anytime anywhere in any condition ……..
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अंधेरी रातों में..सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले…पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी! (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर…ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार?
लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो…पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने,विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.
श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल..म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल….रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो…दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.
कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी,हलकी वाहने(कार,रिक्षा इ.) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.
कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत…आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे…आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात…कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार..तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य…थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो…या स्तंभ शब्दावरून आठवले….कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे..साधन नव्हे!
सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे…अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन.जी.सी.,डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे,प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली…(बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!)
वाघ,सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत,हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं..हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते…नाहीतर आपले सरकारी फलक…वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.
दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात,अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी,मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत…यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो…आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो..शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.
आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत…आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी,कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात..आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते…ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत..उलट मागून येणा-या दुस-या वाहनांच्या मागावर…नव्हे वासावर राहतात…त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही!
पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री…तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.
एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती ,गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे…काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत…..अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत…दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत…लोकल ही भाई…इधर के ही हैं….(आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत…!) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही…असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो..पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो…शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम!
(या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!)
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
☆
१३ जुलै. तब्बल पावणे चारशे वर्षे होत आली. हिंदवी साम्राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला तोच हा दिवस. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन खिंड पावन झाली, तोच हा दिवस.
बाजी, आजही तुम्ही तेथे लढता आहात का? आज ही तुमचे कान ५ तोफांचे आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत का? आजही तुम्ही तुमच्या शूरवीर मावळ्यांच्या समवेत अभेद्य अशा खडकाप्रमाणे उभे आहात का?
बाजी, तुम्ही आपल्या स्वामी-भक्तिचा संदेश केवळ मराठी मनालाच नव्हे, महाराष्ट्रलाच नव्हे तर संपूर्ण जगताला देऊन अमर झाला आहात .आणि म्हणूनच प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक मराठी ओठावर
☆ अन्नपूर्णेची परिक्षा— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆
मी राधिका गोपीनाथ पंडित. माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा.”अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.
लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे.
असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला…
मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.
एकदा शाळेत जाताना आईने मला त्या गुरुजींना “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले.
धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पूजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी माजगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय.”
गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली.”
ते काय पुटपुटले ते मला काहीच कळल नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरं .
इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरूजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.
आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या,’ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं.
तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर..”
गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो.”
तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. साडे बारा ला नक्की जेवायला या हं!. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल”. आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्ह ता.
आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली गेली आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.
“बसा नं जेवायला. माझ्या मुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला.” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न- प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे.
आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, च विष्ट होतं जेवण. खरं सांगू!माई आमची मंडळी गेल्या पासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.
आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरूजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होत. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.
त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझ्या मोठ्या बहिणीने लीलाने गाठले.आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्या मुळे बघ आईला केवढा त्रास झाला,’ असं म्हणून भरपूर झापलं.
मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली.
माझ्या क्षमाशील आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले.”
तर, असा सकारात्मक विचारांचा धडा आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणू काही..
पावनखिंड बद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोय.शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली.पुर्वी तिचं नाव घोडखिंड होतं..पण बाजीप्रभूच्या बलिदानाने ती पावन झाली.. म्हणून मग पावनखिंड.
काही वर्षांपुर्वी काही शिवप्रेमींनी ठरवलं.शिवाजी महाराज या खिंडीतून ज्या प्रकारे गेले.. तस्साच प्रवास करुन गडावर पोहोचायचे.तश्शाच एका पावसाळी रात्री त्यांनी ती पावनखिंड पार केली.गो.नी.दांडेकर,बाबासाहेब पुरंदरे यांनी पण अनेकदा ती पार केली.इतिहास प्रेमी जे असतात.. किंवा इतिहासाचे अभ्यासक..ते अश्या प्रकारची साहसी करतच असतात.
कालीदासाचं मेघदुत हे एक दीर्घ काव्य.या काव्यातील मेघाचा प्रवास सुरु होतो तो मध्य भारतातुन.. साधारण नागपुरच्या परिस्थितीनं निघालेला मेघ उत्तर भारतात कसा जातो .त्याला भारताच्या या भागातील निसर्ग कसा दिसतो याचे वर्णन म्हणजे मेघदुत.
मध्यंतरी याच मार्गाने एकाने प्रवास केला.. हेलिकॉप्टर मधुन..आणि मेघदुतामधील वर्णन अनुभवलं.
सिंदाबादची सफर पण आपण वाचत आलोय.. मुळ अरबी भाषेतील या सुरस कथा.सिंदाबादच्या सात सफरी वाचुन एकाला वाटलं की आपण सुध्दा अश्या सफरी कराव्यात.सिंदाबादने ओलांडले तसे..त्याच मार्गाने.. तश्याच पध्दतीच्या जहाजातुन.
टीम सेव्हरीन त्यांचं नाव.हा एक आयरीश संशोधक होता.या संपूर्ण मोहिमेचा खर्च उचलला होता ओमानच्या सुलतानाने.ओमान मधील सोहर हे एक बंदर.सिंदबाद या गावचा होता अशी येथील गावकऱ्यांची समजुत.त्यामुळे या जहाजाचे नाव ठेवलं गेलं..सोहर.
टीम सेव्हरीन ओमान मधील शहरांमधून..बंदरांमधुन भटकला.सिंदबाद ज्या प्रकारच्या जहाजातुन निघाला होता,ते जहाज नेमकं कसं होतं यावर त्यानं संशोधन केलं.त्याला समजलं की हे जहाज बांधण्यासाठी आपल्याला लाकुड आणावं लागणार आहे ते.. भारतातील मलबार किनारपट्टी वरुन.
तो कालिकतला पोहोचला.फार पुर्वी कालीकत बंदरामधुन मसाल्याचा व्यापार चालत असे.येथे येणाऱ्या अरबी जहाजांमुळे येथे बरेच उद्योग बहरले होते.जहाज बांधणारे.. दोरखंड वळणारे..जहाजांसाठी लागणारे लाकूड विकणारे.
येथे आल्यावर सेव्हरीनला समजलं की सागवान लाकडांच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी आणली आहे.मग ऐनाचं लाकूड वापरायचं ठरवलं.मंगलोरच्या आसपास जंगलं, टेकड्या धुंडाळल्या.शेवटी कोचीन जवळ हवं तसं लाकूड मिळालं.
जहाजाच्या तळाचा भाग हा सगळ्यात महत्वाचा.त्यासाठी साधारण बावन्न फुट लांबीचा सरळसोट वासा हवा होता.बराच तपास केल्यानंतर तोही मिळाला.बाकी महत्त्वाची खरेदी होती काथ्याची.चारशे मैल इतक्या लांबीचा काथ्या मिळणं आवश्यक होतं.लक्षद्विप बेटावरच्या या विषयातला तज्ञ म्हणजे कुन्हीकोया.त्याच्या सल्ल्यानुसार ही पण खरेदी झाली.
फळ्या जोडण्यासाठी पाव टन डिंक.. चुन्याची पोती..जहाजाला बाहेरुन लावण्यासाठी माशांचं तेल..ते सहा पिंप..हत्यारे..हातोड्या..अशी ही भली मोठ्ठी यादी.
जहाज शिवण्याची कला असलेले मोजकेच माणसं होते.. तेही लक्षद्वीप बेटावर.मग तेथुन दहा माणसं ओमानला आणण्यात आली.
आणि मग एका शुभ दिवशी जहाज बांधणीला सुरुवात झाली.तो दिवस होता ४ फेब्रुवारी १९८०.काही दिवसांतच सोहर नावाचं ते भव्य जहाज उभं राहिलं.
मस्कतमधील बंदरात जहाज उभं राहीलं.. अगदी मध्ययुगीन काळात होतं तसं.मग त्यावर एक एक साहित्य जमा होऊ लागलं.जनरेटर..कंदील..लाईफ जॅकेटस्.. खाद्य वस्तु..हजारो अंडी.. कांदे बटाटे.. आणि ओमानी खजुर.
सोहरवर कमीत कमी वीस कर्मचारी होते.परंपरागत जहाज हाकण्याची कला असलेले खलाशी.. देखभाल करणारे..शिडं हाताळणारे.. त्याशिवाय रेडिओ ऑपरेटर.. कॅमेरामन.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ.
२३ नोव्हेंबर १९८० या दिवशी सोहर ची वाटचाल सुरु झाली.ज्या मार्गाने आठव्या शतकात सिंदबाद गेला होता..त्यांचं मार्गाने सोहर निघालं.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोहर लक्षद्वीप बेटावर आलं.इथुन पुढे कालीकत.. मग श्रीलंका.पंचावन्न दिवसांच्या प्रवासानंतर सोहर सुमात्रा बेटावर पोहोचलं.नंतर सिंगापूर आणि शेवटी चीनचा किनारा.
नकाशा पुढे ठेवून बघितलं तर कळतं की सेव्हरीनची ही सफर सुरू झाली मस्कत पासून.अरबी समुद्र.. हिंदी महासागरातुन सहा हजार मैलांचा प्रवास करत साडेसात महिन्यांनी ही सफर पुर्ण झाली.खलाशांचं जीवन तसं धोक्याचचं असतं.सोहर वरील निम्मे खलाशी कधी ना कधी संकटात सापडले होते.अनेक संकटांचा सामना करत टीम सेव्हरीनची ही सफर पार पडली.ती मुळच्या सिंदबादच्या सफरीइतकीच रोमांचक होती.
या प्रवासासाचा सुरस तपशील आपल्याला वाचायला मिळतील मिळतो तो टीम सेव्हरीन ने लिहीलेल्या आपल्या पुस्तकात..१९८२ सारी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे नाव आहे.. ‘दि सिंदबाद व्हॉयेज’