मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ धारणा…  – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ धारणा…  – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

गौतम बुद्धांकडे एकजण आला आणि त्याने विचारलं, भगवान, आत्मा आहे की नाही?

बुद्ध म्हणाले, स्वत:च्या आत उतरूनच याचा शोध घेता येईल तुला.

तो म्हणाला, ते मी करीनच. पण, मुळात आत्मा आहे की नाही, ते सांगा.

बुद्ध म्हणाले, मी तुला आत्मा आहे, असं सांगितलं तरी ते खोटं आहे आणि आत्मा नाही, असं सांगितलं तरी तेही खोटंच आहे.

तो माणूस म्हणाला, असं कसं होईल? दोन्ही खोटं कसं असेल? एकतर आत्मा आहे हे खोटं असलं पाहिजे किंवा आत्मा नाही हे खोटं असलं पाहिजे.

बुद्ध म्हणाले, मी यातलं काहीही एक खरं आहे, असं सांगितलं तर तीच धारणा घेऊन तू अंतरात्म्यात उतरशील आणि मग आत्मजाणीव झाली तरी नाकारशील किंवा ती झाली नाही, तरी ती खोटी खोटी करून घेशील.

माणसांना हव्या त्या गोष्टी ‘पुराव्याने शाबित’ करता येतात, त्याचं कारण हेच आहे. आपली धारणा हेच अंतिम सत्य आहे, यावर माणसाचा विश्वास पटकन् बसतो आणि तो त्यादृष्टीनेच सगळ्या विचारव्यूहाची मांडणी करतो, तसेच पुरावे त्याला सापडत जातात. तेवढेच ‘दिसतात. ‘ माणसं ध्यानात, अंतरात्म्यापर्यंत उतरतानाही धारणांची ही वस्त्रं त्यागू शकत नाहीत. ती ‘स्व’च्या तळात उतरतानाही हिंदू असतात, मुसलमान असतात, ख्रिस्ती असतात, बौद्ध असतात… मग त्या त्या धारणांनुसार त्यांना ‘स्वरूप’दर्शन घडतं आणि तीच त्यांना आत्मजाणीव वाटू लागते… तो त्यांच्या धारणांनी निर्माण केलेला एक आभास आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

 

लेखक: ओशो

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे 

परवाच आमच्या ऑफिसने निवृत्त स्टाफसाठी स्पेशल पिकनिक ठरवली होती……त्याबद्दल..

एखादा दिवस असाही असेल… याची कधी कल्पनाही केली नव्हती. असा विचार करताना मन मागच्या 25 वर्षे मागे धावलं. खूप खूप आठवणी  ” मी आधी, मी आधी ” करत धावू लागल्या.

आपल्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा कोट घालून, दर्जेदार पोस्टचा काटेरी मुकुट स्वीकारलेले सर्वेसर्वा ऑफिसर्स.

जबाबदारीची जागा सांभाळताना त्यांची होणारी तारेवरची कसरत त्यांच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होत होती. बिनचूकपणा, शिस्त, आणि वक्तशीरपणा यांचा परिपाठ स्वतः कृतीत आणून इतरांना मार्गदर्शन करणारे वरच्या श्रेणीचे ऑफिसर्स ही काॅर्पोरेशनची दर्जेदार संपत्ती होती. तसेच

त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे काम करणारे कर्मचारी ह्या सर्वांचा एकसंध परिवार म्हणजे आपले काॅर्पोरेशन. हा परिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र एका छताखाली नांदत होता.

लहान लहान कामापासून मोठ्या मोठ्या कामात येणा-या अडचणी एकमेकांच्या सहाय्याने, सल्लामसलतीने सोडवल्याही जात होत्या. काम करताना अनेकदा चुकाही होतच होत्या, पण त्यात सुधारणा करून आपला परफाॅर्मन्स चांगला होण्यासाठी धडपडही होती.

व्यक्तिगत आयुष्यातले चढ-उतार, आनंदाचे-दुःखाचे प्रसंग , एकमेकांना मानसिक आधार देणे, अशी वाटचाल चालू होती.

प्रमोशन मिळालेले खुशीत, तर न मिळालेले नाराज! अशा संमिश्र घटना 3-4 वर्षात घडायच्या.

त्यावेळी  काम करताना ऑफिस फाईल्स हे महत्वाचं आणि एकमेव माध्यम होतं. जेव्हा आपल्या प्रपोजल नोटवर APPROVED असा शेरा मिळून ठसठशीत, वळणदार सही दिसली की खूप मस्त वाटायचं.

कित्येकदा अनेक शासकीय, बिन शासकीय आस्थापनातून, विभागातून ( गोव्यातच नव्हे तर देशभरात ) लेडीज स्टाफवरती होणारे नकोसे अनुभव कानावर यायचे. त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये मिळणारी मानसिक, भावनिक आणि शारिरीक सुरक्षितता प्रकर्षाने जाणवायची.

ऑफिसमधले असलेलं वातावरण अतिशय सौजन्यपूर्ण होतं. साधेपणा, शालीनता , आदर, नम्रता ह्या शब्दांना मान होता. तो प्रत्येकाच्या बोलण्यातून     वागण्यातून दिसत होता. माझ्याकडे जर कुणी काही विचारायला आले तर नकळत उभी राहून त्यांचे बोलणे ऐकणे, ही न सांगता होणारी प्रतिक्रिया होती. आवाज मोठा करून बोलणे, मोठमोठ्याने हसणे ह्यावर  स्वतःच घातलेली बंधने होती.

 हा

ऑफिसमधल्या आधीच्या लोकांनी घालून दिलेला संस्कार- ठेवा होता.

वर्षामागून वर्षे गेली. हळूहळू एक एक जण 58-60 वयाला येवून निवृत्तीला पोचले. आणि गेल्या दहा पंधरा वर्षात बघता बघता एक पिढीच निवृत्त झाली.

काल पहिल्यांदाच कितीतरी वर्षांनी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि पूर्वीचे राग-लोभ, रुसवे-फुगवे सर्व विसरून एकमेकांना भेटताना, बोलताना, क्षेमकुशल विचारताना होणारा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वहात होता. जे कुणी हे जग सोडून गेले, त्यांच्या आठवणींनी मन भरून येत होते. कालचा दिवस एक अलौकिक, अकल्पनीय आनंदाने भारलेला होता. . काहीतरी हरवलेलं सापडल्याचा अनुभव होता.

इतक्या वर्षांनी एकत्र भेटून झालेला आनंद एक अनामिक आत्मिक सुखदायी होता. हे मात्र नक्की.

तरूण पिढीच्या शिलेदारांनीही भरभरून , आपुलकीने आणि आतिथ्यपूर्वक सरबराई केली, पाहुणचार केला.

PICNIC EVENT

WELL PLANNED

WELL ORGANISED

WELL MANAGED

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काडी काडीचे घरटे… – लेखक : मुसाफिर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ काडी काडीचे घरटे… – लेखक : मुसाफिर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

मधुचंद्राहून ठाण्याला घरी आल्यावरची पहिली रात्र… नाही नाही. ‘ती’वाली रात्र नव्हे. त्या रात्रीचा पहिला स्वयंपाक, शेजारच्या शेगडीवर कुकर फुसफुसत होता.(कोकणस्थ) गोड-आमटी करायची गोड जबाबदारी माझ्यावर होती.

मी गॅस लावायला काडेपेटी हातात घेतली मात्र. माझ्या पाठीवर एक स्पर्श झाला. मी लाजून चूर. मनाने कायशिशी मोहरून गेले. अजूनही आमचा माफक रोमान्स चालू होता ना.

माझे गाल लाल व्हायला लागले, सॉरी मी गोरी नाही. सबब माझे गाल चॉकलेटी व्हायला लागले.

तिरपा कटाक्ष टाकून मागे बघते तो साक्षात सासु माँ.. शेजारी गॅस चालू आहे ना मग नवीन काडी कशाला पेटवली ? त्या काडीने माझ्या रोमान्सची झिंग क्षणात काडीमोल होऊन मी भानावर आले. सासूमाँनी मला दुसरी काडेपेटी दाखवली,

ज्यात जळलेल्या काड्या होत्या एक शेगडी पेटलेली असेल तर नवीन काडी लावायची नाही. जळलेल्या जुन्याकाडीनेच पेटलेल्या शेगडीवरून विस्तव उचलायचा. आता कुकरचा अती प्रशस्त-ओबेस देह शेगडीवर तापलेला असताना, त्याखालून जुन्याकाडीने विस्तव कसा पळवावा ? 

मग सांडशीच्या तोंडात जुनी काडी.. आणि तो पलीता कुकरच्या कुल्ल्या खाली अशी कसरत झाली. अखेर आमटीखाली गॅस लागला.तो पर्यंत मी गॅसवर होते कारण कर-कटेवरी घेऊन सासु माँ माझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे बारीक करून बघत होत्या. 

दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभे उभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली. त्या लांब लांब – तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवल.

हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही. आम्ही काडी-काडी जोडून वाचवलेल आहे, तेव्हा कुठे हे आजचे दिवस दिसतायत. आज मनात येत, नवीन पिढीची सून असती तर त्या एका न पेटवलेल्या काडीने तिने एव्हाना काडीमोड सुद्धा घेतला असता.

सासूमांची काडी-काडी कॉन्सेप्ट स्वयंपाकघरातच नव्हे तर घरभर वावरत असे. प्रत्येक वस्तू वापरताना आणि जुनी होऊन टाकताना त्यांची परमिशन लागे. अगदी अंतर्वस्त्रसुद्धा त्यातून सुटली नव्हती.चिंधीवाली कडे अंतर्वस्त्र विकली जातात हा ज्ञान साक्षात्कार मला त्यांनीच घडवला.

जुने परकर, ब्लाऊझ, साड्या वगैरे मंडळींची रवानगी, कपाटातून स्वयंपाकघरात होत असे. घासलेली भांडी पुसून जागच्या जागी ठेवायला,हात पुसायला आणि स्वयंपाकघरातला कार्यभाग संपला की त्यांचे deputation पाय पुसणे म्हणून होत असे.

आंघोळीच्या गरम पाण्यात रवी व ताकाचं भांडं धुणे. दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून विकणे.दुधाच्या कोरड्या पिशव्यांनी तर आमच्या घरात इतिहास घडवला होता. त्या पिशवीने काय काय पाहिलं नव्हतं ? त्यात सासु माँ च्या प्रभातफेरीतील पुष्पचौर्य – रहस्यमयी कथा लपलेल्या असत.

जास्वंदीच्या अन मोग-याच्या टप्पोऱ्या कळीचा उमलण्यापूर्वीचा कळीदार प्रवास त्या पिशवीतून होत असे. त्यातच देवळातल्या मैत्रिणींना वाटण्यासाठी तिळगुळ असत.दशभुजा गणपतीच्या देवळातून संकष्टीच्या प्रसादाचे मोदक त्या दूध पिशवीच्या पालखीतूनच घरी येत. हनुमान जन्मोत्सवाचा सुंठवडा त्यातूनच येई आणि रामा- शिवा- गोविंदा ह्या मानक-यांचे प्रसाद सुद्धा कधी चैत्र तर कधी श्रावण महिना साधून, त्या पिशवीतून आमच्या घरी येत.

त्यात कधी सुट्टी नाणी विराजमान होत तर एखादी फाटलेली पण खपावयची असलेली दहा रुपयांची नोट ही असे. कहर म्हणजे एकदा तर बँकेच्या लॉकरमधले किडुक-मिडुक सासु मां नी त्या पिशवीतून घरी आणल्यावर मात्र मी त्यांना कोपऱ्यापासून हात जोडले होते.

जी गत दुधाच्या पिशवीची तीच इतर वस्तूंची.

आणि केवळ सासुमाँच नव्हे तर तिच्या पिढीने हाच पुनर्वापर-मंत्र जपला. दिवाळीच्या वेळी वापरलेल्या मातीच्या पणत्या स्वच्छ पुसून माळ्यावरती चढत. तीच कथा कंदील किंवा चांदणीची असे.तीच कथा मोती साबणाची असे एक मोतीसाबण सलग सहा वर्ष वापरलाय आहात कूठे दिवाळी भाऊबीज झाली की मोतीसाबण सूकवून परत खोक्यात भरून ठेवणीच्या कपाटात. इस्त्रीची एकदा वापरलेली साडी त्याच घडिवर घडी पाडून कपाटात जायची आणि अर्थातच पुन्हा नेसली जायची. अश्या कित्येक गोष्टी.

चहाच्या कानतुटक्या-अँटिक-कपमध्ये वाटलेली हिरवी चटणी ठेवणे, क्वचित तो कप विरजणासाठी वापरणे त्याच क्रोकरी सेटच्या (?) विजोड झालेल्या बश्या झाकण म्हणून वापरणे. तुटक्या प्लास्टिक बादल्यामध्ये झाडे लावणे. रिकाम्या डालडा-डब्यात तुळस लावण्याचे सत्कार्य ज्या कुणी सर्वप्रथम केले असेल त्याला काटकसर आणि पर्यावरण प्रेमाचे एकत्र नोबेल कां बर देऊ नये ?

पूर्ण वापर झाल्याशिवाय फेकणे ह्या गुन्ह्याला त्या सर्वांच्याच राज्यात क्षमा नव्हती. फ्रीजमधे हौसेने आणून ठेवलेल्या आणि न वापरून एक्सपायरी डेटलेल्या सरबताच्या, व्हिनेगरच्या बाटल्या टाकायला काढल्या की सासु मां चा तिळपापड होत असे. वापरायची नव्हती तर आणली कशाला इतकी महागातली बाटली ? आम्ही नाही बाई अश्या वस्तू कधी टाकल्या.

एक्सपायरी डेट नसलेले अमर आयुर्वेदिक काढे त्यांना भारी प्रिय. वस्तूंचा पुनर्वापर हा शब्द कधीही न ऐकता सासू मां नी त्या कल्पनेची अम्मल बजावणी किती तरी वर्षे आधीच केलेली होती. साधे इस्त्रीचे कपडे घरी आले तरी त्या कागदाचा बोळा न होता तो रद्दीच्या गठ्ठ्यात जाई आणि त्याला बांधलेला पांढरा दोरा गुंडाळून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवलेला असे.

भेटवस्तुचे चकचकीत रंगीत कागद निगुतीने घडी करून ठेवलेले असत. त्यांच्या पिढीने अश्या अनेक प्रकारे कचरा संवर्धन केले. लाकूड, प्लास्टिक, काच आणि कपड्यांचेच नव्हे तर तव्यावरच्या उष्णतेचे सुद्धा रीसायकलिंग केले.पोळ्या झाल्यावर त्या तापलेल्या तव्यावरच फोडणी करणे. फोडणीचे काम नसेल तर क्वचित त्या तव्याचा शेक दुधाच्या पातेल्याला देणे.

वरणभात शिजल्यावर कुकर गरम असतानाचे तळातले पाणी फोडणीची-वाटी, किंवा दह्याची – वाटी वगैरे ओशट भांडी धुवायला वापरणे हे सर्वमान्य होते. भांड्याच्या बिळात लपलेले तूप गरम कुकरात ठेवून पातळ करून ते पोळीला लावणे आणि शेवटी ते भांड घासायला टाकण्यापूर्वी त्यातून हात फिरवून तो ओशटपणा हाता किंवा पायाला चोळणे हे करणारी सासु मां ची पिढी आता राहिली नाही.

काय ती जुनी बोचकी सांभाळून ठेवता तुम्ही ? सगळ फेकून द्या हे वाक्य त्या पिढीला आमच्या पिढीकडून अनेकदा ऐकायला लागलं असेल आणि त्या मंडळींनी ही नव्या संसारात आमच्या वस्तूंची अडगळ नको म्हणून गपचुप ऐकलेही असेल.

आम्हीही शौर्य दाखवून अशी अनेक प्लास्टिकची, कपड्यांची, भांड्यांची, काचेची, कागदाची बोचकी बेमुर्वतखोरपणाने फेकली आहेत. जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या आणणे ह्याला मुळीच डोकं नाही लागत, लागते ती फक्त मस्ती आणि बेफिकिरी पण वस्तू, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरायला बुध्दी आणि मन ह्या पलीकडेही जाऊन एक पर्यावरण प्रेम लागत ज्याचा उल्लेख त्या पिढीने कधी केला नसेल पण त्या विचाराचं आचरण मात्र आवर्जून केलं.

ती पिढी जगलीही तशीच आणि गेलीही तशीच शरीराच्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करून ते जीर्ण शिर्ण झाल्या शिवाय त्या पिढीतल्या कुणी मरण ही पाहिले नाही. सासु मां सुद्धा अठ्याईंशी वर्षे परिपूर्ण जगून मग गेल्या.

आज निसर्गाचा, सृष्टीचा पोएटिक जस्टिस लावायला बसल तर आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीला निसर्ग पूर्ण जगून नाहीं देणार. आम्ही न वापरता फेकलेल्या आणि अकाली टाकलेल्या वस्तुंसारखाच आमच्या ही शरीराचा आणि आयुष्याचा ही अकाली शेवट होईल आणि आम्हीच ह्या पृथ्वीतलावर तयार केलेल्या, टाकलेल्या वस्तूंच्या कचऱ्यात विलीन होईल अस वाटत राहात.

लेखक : मुसाफिर …

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जुवे बेट…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “जुवे बेट”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे कोकणाचे वर्णन केले जाते. याच कोकणात सुंदर समुद्र किनाऱ्यांसह अनेक छुपी पर्यटनस्थळ आहेत. यापैकीच एक आहे चारही बाजूने पाण्याने वेढलेले छुपं गाव. इथं घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात. रत्नागिरीतून राजापूर आणि मग जैतापूर असा बस प्रवास. यानंतर मग जैतापूरहून होडी किंवा बोटीतून जुवे गावात पोहचता येते. पर्यटन दृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. यामुळे हे ठिकाण पर्यटकांपासून अलिप्त आहे. नारळी पोफळीच्या बागा. मधोमध भुई आणि चहुबाजूंनी निळेशार पाणी. या गावचे निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेते तिथेच हे सुंदर ठिकाण आहे. चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या गावात जाण्यास होडी शिवाय पर्याय नाही. जैतापूर, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली यांच्या मध्ये जैतापूर खाडीत जुवे हे गाव आहे. जैतापूर जवळ धाऊलवल्ली जवळ हे जुवे बेट आहे. कोकणातील या छुप्या बेटाचे नाव आहे जुवे बेट.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ शांत स्वरात बोला… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

शांत स्वरात बोला…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो .

चढलेला मोठा आवाज…

आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.

घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.

घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये. कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसा आपलाही राग आवरला जातो.

शुभ लहरींचेही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे  उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.

एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, ‘थँक यू’ म्हणणार नाही; पण त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळावेगळा उत्साह वाटेलच.

म्हणून दानधर्माचे अपार माहात्म्य आहे.

फक्त मनुष्ययोनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते.

म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना, आपला स्वर कमालीचा मृदू असावा.  भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा; पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच तुमचा रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा. तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल. नाही तर  सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्याची सुरावट ”सा रे ग म प ध नी सा’ या सप्तसुरातून साकार होत असते किंवा केली जाते. हे सूर जितके सच्चे, तितके त्यातून निर्माण होणारे गीत सुरेल निघते. सप्तसुरांच्या संगतीने आपले आयुष्य सुंदर सुरमयी बनते कारण यातील प्रत्येक सूर हा त्याच्या विचाराशी किंवा आशयाशी सच्चा राहतो.

*सा.. *आयुष्याचा प्रारंभ हाच ‘सा’ मधून होतो त्यामध्ये जीवनाचे सातत्य समाविष्ट आहे.

 रे… रेंगाळणे.. आयुष्याची वाटचाल चालू असताना आपण अधून मधून थांबतो किंबहुना रेंगाळतो..

ही वाटचाल जेव्हा शांतपणे सुरू असते, तेव्हा ‘रे’ सुराची निर्मिती होते.

ग.. विचारांना ‘ग’गती देतो. तर कधी

‘ग’ हा गमावल्याची भावनाही निर्माण करतो.

म… मानून घेणे, हे ‘म’ चे वैशिष्ट्य आहे.. जे आहे त्यात समाधान मानून आपल्या आयुष्याची वाटचाल आपण सुखद करतो.

प.. मनाची व्याप्ती वाढवणे किंवा पसरवणे हे ‘प’ चे वैशिष्ट्य! सप्तसुरांतील ‘प’हा चढती कमान दाखवतो. !

ध.. ‘ध’धारण करणे.. मनाची शांतता धारण करणे हे शिकवणारा

हा ‘ध’ आहे. ‘ध-‘ धारयती हा पुढे

‘नि’ मध्ये जातो.

नि – निवृत्ती कडे वाटचाल..

जगण्यातून निवृत्ती घेता येणे हे बोलणे सोपे पण आचरण्यास अवघड असे तत्व!ही निवृत्ती ज्याला साधली त्याला ‘सा’ची सायुज्यता साधणे कठीण जात नाही..

सायुज्यता – मोक्षाच्या चार अवस्थांपैकी चौथी सायुज्यता!

ही साधली तर वरच्या ‘सा’च्याजवळ आपण पोचू शकतो असे म्हणायला हरकत नाही..

आयुष्याच्या सरगमातील हे ‘सारेगमपधनीसा’ चे सूर विचार केला तर किती वेगळे अस्तित्व दाखवतात ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

अण्णा

कितीतरी वर्षं “आण्णा गद्रे” आमचे भाडेकरू होते. गल्लीतले सगळेजण त्यांना अण्णाच म्हणायचे. त्यांचे प्रथम नाव काय होतं कोण जाणे! त्यांची मुलंही त्यांना आण्णा म्हणायचे म्हणून सगळ्यांचेच ते आण्णा होते. त्यांचा संसार याच घरात फुलला असे म्हणायला काही हरकत नाही. तीन मुली आणि एक मुलगा. एका पाठोपाठ एक मुलीच झाल्या म्हणून आण्णा आणि वहिनी फारच निराश असत. पण तीन मुलींवर नवस सायास करून त्यांंना एक मुलगा झाला आणि आण्णांचा वंश तरला. वहिनी म्हणजे अण्णांची पत्नी. अण्णांचे एक भाऊ आमच्याच गल्लीत राहायचे. ते “वहिनी” म्हणून हाक मारायचे म्हणून त्याही समस्त गल्लीच्या वहिनीच.

कोकणातून आलेलं हे दाम्पत्य. ब्राह्मण वर्णीय. जातीय श्रेष्ठत्वाची भावना पक्की मुरलेली. दोघांच्याही स्वभावात चढ-उतार होते. चांगलेही वाईटही पण धोबी गल्लीवासीयांनी सगळ्यांना सामावून घेतलेलं. नाती बनायची नाती बिघडायची पण नाती कधी तुटली नाहीत. आमच्या कुटुंबाचा आण्णा- वहिनींशी सलोखा नसला तरी वैर नक्कीच नव्हतं. म्हणजे मालक भाडेकरू मधल्या सर्वसाधारण कुरबुरी चालायच्याच पण प्रश्न आपापसात सामंजस्याने सोडवले ही जायचे. शिवाय त्यांच्या विजू, लता, रेखा या मुली तर आमच्या सवंगडी समूहात होत्याच.

अण्णा शिस्तप्रिय होते म्हणण्यापेक्षा तापट आणि हेकेखोर होते. कुटुंब प्रमुखाचा वर्चस्वपणा त्यांच्या अंगा अंगात भिनलेला होता त्यामुळे विजू लता रेखा या सदैव धाकात असत.

अगदी उनाड नव्हतो आम्ही… पण मनात येईल तेव्हा, केव्हाही, कुठल्याही खेळासाठी आम्ही एकत्र जमायचो. खेळणं भारी प्रिय. खेळतानाचा आरडाओरडा, गोंधळ, हल्लाबोल मुक्तपणे चालायचा, गल्लीत घुमायचा. अण्णा घरात आहेत म्हणून विजू लता रेखा उंबरठ्यातूनच आमची खेळ मस्ती बघायच्या. त्यांचे खट्टू झालेले चेहरे मला आजही आठवतात. बाहेर आमचा खेळ चालायचा आणि या उंबरठ्यावर बसून गृहपाठ पूर्ण करायच्या नव्हे गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करायच्या. का तर? अण्णा ओरडतील म्हणून. त्यांच्या घरात मुलांना सरळ करण्यासाठी वेताची छडी होती म्हणे! 

एक दिवस आण्णा आमच्या पप्पांना म्हणाले होते, ” का हो ढगेसाहेब? मी ब्राह्मण ना मग ही सरस्वती तुम्हाला का म्हणून प्रसन्न?”

तेव्हा पप्पा उत्तरले होते, ” अण्णा ती वेताची छडी बंबात टाका मग बघा काय फरक पडतो ते. ”

अण्णांचं कुटुंब विस्तारलं. मुलं मोठी झाली आता त्यांना हे भाड्याचं घर पुरेनासं झालं. आण्णांचे जोडधंदे ही चांगले तेजीत होते. त्यांची वखार होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसा जोडला होता. वृत्ती कंजूष आणि संग्रही त्यामुळे गंगाजळी भरपूर. आण्णांनी धोबी गल्ली पासून काही अंतरावर असलेल्या चरई या भागात प्लॉट घेऊन चांगलं दुमजली घर बांधलं. घराची वास्तुशांती केली आणि एक दिवस गद्रे कुटुंबाने धोबी गल्लीचा निरोप घेतला. मात्र त्यांनी आमच्या घराचा ताबा मात्र सोडला नाही.

काही दिवस जाऊ दिले. त्या दरम्यान आण्णा रोज त्यांच्या या जुन्या घरी येत. झाडलोट करत, पाणी भरून ठेवत. बऱ्याच वेळा दुपारच्या वामकुक्षीच्या निमित्ताने ते येतही असत. वखारीच्या हिशोबाच्या वह्या वगैरे तपासत बसत आणि फारसं कुणाशी न बोलता गुपचूपच पुन्हा कडी कुलूप लावून निघून जात. भाडं मात्र नियमित देत.

जीजी (माझी आजी) मात्र फार हैराण झाली होती. ती बऱ्याच वेळा आण्णांना गाठून शक्य तितक्या उंच आवाजात सांगायची, ” आमच्या घराचा ताबा सोडा. आणि व्यवहार मिटवून टाका. बांधलंत ना आता मोठं घर? जरूर काय तुम्हाला हे घर ताब्यात ठेवायचे आणि माझ्या जनाच्याही मुली आता मोठ्या झाल्यात. आम्हालाही आता घर पुरत नाही. अण्णा नुसतंच हसायचे. निर्णयाचं काहीच बोलायचं नाही.

“सोडतो ना आजी. एवढी काय घाई आहे तुम्हाला ?”

त्यावेळी भाडेकरूंचे कायदे अजबच होते. आपलं स्वतःचं घर असूनही भाडेकरूनकडून ते रिकामं करून घेणे हे अत्यंत तापदायक काम होतं. कायदा हा भाडेकरूधार्जिणा होता. असे म्हणायला हरकत नाही. आतासारखे मालक आणि टेनंट मध्ये ११ महिन्याचा करार, कायदेशीर रजिस्ट्रेशन, इच्छा असेल तर कराराचे नूतनीकरण वगैरे मालकांसाठी असलेले संरक्षक कायदे तेव्हा नव्हते. शिवाय भाडोत्री जर अनेक वर्षं तिथे राहत असेल तर ती जागा त्याच्या मालकीची होऊ शकते अशी एक भीती कायद्याअंतर्गत होती पण पप्पांच्या वकील मित्रांनी त्यांना चांगला सल्ला दिला होता.

“हे बघ! त्या गद्र्यांनी घर बांधले आहे. आता त्यांच्या मालकीची स्वतःची जागा आहे. शिवाय तुझी गरज आणि तुझे घर ही दोन कारणे तुला न्याय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहेत. तुझी बाजू सत्याची आहे. आपण गद्रेंवर केस करूया, तशी नोटीस त्याला पाठवूया”

“शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. ” असा काळ होता तो! पण आमच्या कुटुंबाचा नाईलाज होता.

तर ही कायद्याची लढाई लढायला हवी. साम दाम दंड भेद या तत्त्वातील ही शेवटची पायरी होती. भेद.

घर रिकामं करायची नोटीस आण्णांना गेली. गरम कढईत उडणाऱ्या चण्यासारखे अण्णा टणटण उडले त्यांनी नोटीसीला गरमागरम उत्तर दिले.

“नोटीस देता काय ?एवढ्या वर्षांचे आपले संबंध? थांबाच आता.. बघतोच घर कसे काय खाली करतो ते!” पप्पा कधीच कचखाऊ नव्हते. डगमगणारे तर मुळीच नव्हते.

केस कोर्टात उभी राहिली. आता नातं बदललं. आरोपी आणि फिर्यादीचे नाते निर्माण झाले. आमचं कुटुंब तसं लहानच. माणूसबळ कमी. स्वतःच्या व्यवसायाचा ताप सांभाळून कोर्टाच्या तारखा पाळताना पप्पांची एकट्यांची खूप दमछाक व्हायची.

केस खूप दिवस, खूप महिने चालली. तारखावर तारखा पडायच्या. निकाल लागतच नव्हता. हळूहळू अण्णांना आणि पप्पांनाही कोर्टाच्या वातावरणाची सवय झाली असेल. शिवाय पप्पा म्हणजे माणसं जोडणारे. नावाचा पुकारा होईपर्यंत कोर्टात नियमितपणे येणारी माणसं पप्पांची दोस्त मंडळीत झाली जणू काही. विविध लोकांच्या विविध समस्या पण पप्पा गमती, विनोद सांगायचे. त्यांच्या उपस्थितीत वातावरण हलकं व्हायचं आणि आश्चर्य म्हणजे या समूहात आण्णाही आनंदाने सामील असायचे. न्यायपीठापुढे आरोपी आणि फिर्यादी आणि बाहेर फक्त वक्ता आणि श्रोता. कधीकधी तर कोर्टाच्या बाहेर अण्णा आणि पप्पांच्या गप्पाच चालायच्या. खूप वेळा आण्णा माथ्यावरची शेंडी गुंडाळत, टकलावरून हात फिरवत. डोळ्यात पाणी आणून त्यांच्या कौटुंबिक समस्या सांगत आणि पप्पा त्यांच्या पद्धतीने त्यांचे सांत्वनही करत.

घरी आल्यानंतर आम्ही सारे पप्पांभोवती कडे करायचो. “केस चे काय झाले? निकाल लागला का? कुणाच्या बाजूने लागला ?वगैरे आमचे प्रश्नांवर प्रश्न असायचे आणि पप्पा म्हणायचे, ” हे बघा अण्णांनी डबा भरून खरवस आणला होता. मी खाल्लाय तुम्ही खा. मस्त झालाय खरवस.. ”

याला काय म्हणायचे ?

आज हे लिहिताना माझ्या मनात सहजच आलं. अण्णांनी दिलेला खरवस पप्पांनी कशाला खावा? अण्णांनी त्यांच्यावर विषप्रयोग वगैरे केला असता तर? टीव्हीवरच्या माणूसकी शून्य मालिका बघून झालेली ही मानसिकता असेल पण त्या वेळचा काळ इतका वाईट नक्कीच नव्हता. माणूस काणूस नव्हता झाला.

यथावकाश केसचा निकाल लागला. पपा केस जिंकले, अण्णा हरले. कोर्टाच्या आदेशानुसार अण्णांना तात्काळ घर रिकामे करून द्यावे लागणार होते.

दुसर्‍याच दिवशी आण्णा घराची चावी द्यायला आले. थोडा वेळ आमच्यात बसले. गप्पा -गोष्टी, चहा -पाणी झाले. पपानीही नवे कुलूप आणले होते. दोघेही खाली गेले. आम्ही खिडकीतूनच पाहत होतो. गल्लीतले सर्व आपापल्या गॅलरीतून पाहत होते. बाबा मुल्हेरकर मात्र खाली आले होते. दोघांच्याही सोबत ते उभे होते. आण्णांनी त्यांचे कुलूप काढले आणि पप्पांनी आपले लावले. विषय संपला. कोणीच कोणाचे वैरी नव्हते. “केस” संपली होती. मैत्र उरले होते.

आण्णा दोन पावले चालून गेले आणि माघारी फिरले. आम्हाला वाटले, ” आता काय?”

अण्णांनी घराच्या दोन पायऱ्या चढून दाराला पप्पांनी लावलेले कुलूप ओढून पाहिले. नीट लावले होते आणि त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या खांद्यावर पपांनी हात ठेवला. तेव्हा ते म्हणाले, ” ढगे साहेब! या वास्तूचं खूप देणं लागतो मी. इथेच माझा संसार बहरला. आयुष्य फुललं. तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं भेटली. माझा कुलदीपक इथेच जन्मला. या वास्तूचा निरोप घेताना माझं मन खूप जड झाले आहे हो ! पाऊल उचलत नाहीय. ”

हिरव्यागार डोळ्यांचा, डोक्यावर टक्कल असलेला, बोलण्यात अस्सल कोकणी तुसडेपणा असलेल्या या तापट, हेकट माणसाच्या अंतःप्रवाहात हा भावनेचा झरा कुठून उत्पन्न झाला असेल?

“याला उत्तर आहे का?”

“नाही” 

याला फक्त जीवन ऐसे नाव… 

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हळद कुंकू लावून ओटी भरणारं उस्तादांचं घर…  लेखक : श्री दीपक प्रभावळकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हळद कुंकू लावून ओटी भरणारं उस्तादांचं घर…  लेखक : श्री दीपक प्रभावळकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

आता कलेला धर्मचौकटीत बांधणार काय?

उस्ताद झाकीर हुसेन गेले. त्यांना अनेकदा प्रत्यक्ष ऐकले, पण प्रत्यक्षात कधी भेटू शकलो नाही. अगदी कौटुंबिक जिव्हाळा आणि नाते असूनही !

कहाणीची सुरुवात होते, माझा मावसभाऊ संजूदादापासून. संजूदादाला लहानपणापासूनच तबल्याची नितांत आवड, सांगलीचा संजूदादा मिरजेच्या भानुदास बुवा गुरव यांच्याकडे तबला शिकत होता. तो साधारण 16 वर्षाचा असताना बुवांना देवाज्ञा झाली. आता संजूच्या तबल्याचे काय होणार, याची काळजी लागली. त्याचवेळी कोल्हापुरात झाकीरभाईंचा कार्यक्रम होता. आमची आत्या सुनंदा म्हणजे आमची ताईआत्या आणि संजूची थोरली बहीण सुहासिनी उर्फ आमच्या गोट्याताई हे संजूला घेऊन झाकीरभाईंना ऐकावायला गेले. सारं सभागृहत मंत्रमुग्ध झालं असलं तरी झाकीरभाइं&च्या बोटावर संजूदादाच्या काळजाचे ठोके नाचत होते. भाईंना ऐकून झालं. सारेच सांगलीला परतले.

इथं सुरु झाला प्रवास

तीनच दिवसात झाकीरभाई सांगलीत येणार होते. भाईंना ऐकून झालं होतं. आता त्यांच्याशी बोलायचं हे साऱ्या कुटुंबाने ठरवले आणि तुफान गर्दीत ते घडलेही. संजूदादाची ओळख करून दिली. जवाहिऱ्याला हिऱ्याची परख असते. चार मिनिटाच्या ओळखीत झाकीरभाइंनी तू मुंबईला ये आणि आब्बाजींकडे म्हणजे पंडित उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे शिक.

कला पूजा पूर्णत्वास आली…. दिवाळीत घरापुढे किल्ला करणाऱ्या पोराला अचानक हिमालयाच्या गिर्यारोहणाचे निमंत्रण मिळाल्यासारखंच होते.

अब्बाजी तुसी धन्य हो

संजूदादा आत्या आणि गोट्याताई मुंबईत घर शोधत शोधत भाईंच्या घरी पोहोचले. आता प्रश्न होता, संजूच्या मुंबईत राहण्याचा, ते आर्थिकदृष्ट्या अवघड होते. आब्बांनी एका वाक्यात तो सोडवला. अल्लारख्खांनी आपल्या आपर्टमेंटच्या पार्किंगच्या जागेत एक खोली बांधून संजूदादाच्या राहण्याची व्यवस्था केली. आणखीही तीन विद्यार्थी नव्हे नव्हे शिष्य तिथेच राहत होते.

झालं, संजूदादाचा तबला पुन्हा सुरू झाला. तुमचं काम, लगान गुरूकडे तुम्हाला घेऊन जाते, ते झालं. गुरूमंडळात आब्बाजींसाठी आणि झाकीरभाईंसाठी संजू आवडता झाला. झाकीरभाई अनेकादा दौऱ्यावर असत. झाकीरभाईंना आणखी दोन भाऊ आहेतच फजल आणि तोफीक तरी घरच्या अनेक जबाबदाऱ्या संजूवर आल्या होत्या. संजूदादा हा पंडीत उस्ताद अल्लारख्खाँ उर्फ आब्बाजींचा चौथा मुलगा होता. आब्बाजींचे पथ्य पाणी पाहणे, आम्माजी यांना हाताला धरून फिरवून आणणे हे संजूने स्वत:च सुरू केले. हे त्याला कुणी सांगितले नव्हते. घरच्या जबाबदाऱ्या कोणी दिल्या नव्हत्या, त्यान स्वत: घेतल्या होत्या.

संजूचे तबलाज्ञान हे सुद्धा इतकं वाढलं होतं की, मैफिलीला आब्बाजी त्याला सोबत घेऊन जात. आब्बाजींसोबत संगत करण्याचं अहोभाग्य संजूदादाला लहान वयातच लाभलं. अनेक मैफिलींना आब्बाजी संजूला एकटे पाठवत.

संजूचा तबला बघून झाकीरभाईंनी त्यांच्याच घरी शास्त्रोक्त पद्धतीने संजूचं ‘गंडाबंधन’ केले.

ब्राह्मणाची माऊली संजू घरी आनंदी

सांगलीच्या माझ्या आत्याला पोराची आठवण यायची. त्याकाळी सांगलीहून मुंबईला जायचे, लेकाला भेटायचे, पण रहायचे कुठे? हा प्रश्न असायचा. आत्या एकदा मुंबईला गेलीच, गॅरेजमध्ये लेकाला भेटल्यानंतर आम्माजींनी त्यांना वर बोलावून घरी राहायला सांगितले. आत्या झाकीर हुसेन यांच्या घरी एक दिवस नाहीतर चार दिवस राहून सांगलीला परतली. पुढे हा शिरस्ताच सुरू झाला. आत्या आठ आठ दिवस झाकीरभाईंच्या घरात राहायची.

संजूदादा झाकीरभाईंच्या घरातला अविभाज्य घटक होता. बाह्मणा घरचं पोरं मुसलमानाच्या घरात नांदत होतं. ठसठशीत पुंकू लावणारी आत्या आम्मीजींची अनेकदा सावली बनून राहत. गोट्याताई सुद्धा अनेकदा झाकीरभाईंच्या बहिणीसारखी त्यांच्या घरी राहत.

आम्हा घरी नाही धर्म आम्ही एकाची लेकरे

पुढे गोट्याताईचं लग्न झालं. भाऊजी सुनील आणि गोट्याताई गुजरातला निघाले होते. वाटेत संजूला भेटून जाऊन असं ठरवून ते संजूला भेटायला गेले. नेमके त्यादिवशी झाकीरभाई, आब्बाजी हे सारेच घरी होते. ताई-भाऊजी दोघांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची गडबड असताना आम्माजींनी ताईला थांबवलं. पाटावर बसवलं आणि हळद कुंकू, अक्षदा (कुंकूमिश्रीत तांदूळ) लावून खणानारळानं तिची ओटी भरली. लेक जावायांनी साऱ्यांच्या पाया पडून ‘अष्टपूत्र सौभाग्यवती भव’ हे आशीर्वाद घेतले.

मी ढगाळ फाडतोय, मला ताकद द्या

ताई, भाऊजी गुजरातला पोहोचले, इकडं संजूदादाचं तबला करिअर बहरत होतं. दुर्देवाने संजूदादाला जाऊन काही वर्षे झालीत.

काल भाई पण गेले.. ,

अस्वस्थपणे हा सारा घटनाक्रम पाहताना रक्ताचे अश्रू वाहत होत. धर्मांधतेचे किटण चढलेले आपण जीणं जगतोय, कुठूनं आलं हे सगळं मळभ.

हिंदुस्थानावर कोसळू पाहत असलेला धर्मांधतेचा ढग माझ्या इवलाश्या हाताने काढण्याचा प्रयत्न करतोय. माझी ताकद कमी पडतेय, का कोणाच्या लक्षात येत नाही की आज आपण रंग, प्राणी सुद्धा धर्मामध्ये वाटले आहेत. कला सुद्धा रंगामध्ये बांधण्याचे प्रयत्न होत आहेत.

मुसलमानाच्या घरात बाह्मणाचा पोरगा जणू श्रीकृष्णाप्रमाणे वाढला. आणि मुस्लीम घरामध्ये हळद कुंकू, अक्षदा आणि नारळही असायचा. या साऱ्या घटनेचा परीसस्पर्श होऊन सुद्धा होऊनही मी सोनं का झालो नाही किंवा या विलक्षण घटनेचं परीस घेऊन समाजात मी सोनं का घडवू शकत नाही.

धर्मांमध्ये विभागणी करणाऱ्या लोकांच्या हातात कला लागू नये, आणि जे क्षेत्रे हाती लागली आहेत, त्यांना बाजूला करण्याचे बळ झाकीरभाईंच्या आत्म्याने द्यावे, हीच तुमच्या आमच्या ईश्वर आणि अल्लाकडे मागणी.

लेखक : श्री दीपक प्रभावळकर 

 – 9325403232 / 9527403232

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अवयवांची गंमत.. पण खरं आहे… लेखक : रेडिओ मामा ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अवयवांची गंमत.. पण खरं आहेलेखक : रेडिओ मामा ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

 ०१. जिभेचे वजन खूप हलके असते.  तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.

०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.

०३. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.

०४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते, हे विसरु नये.

०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात; पण एकमेकांना न पाहता.

०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.

०७. एकदा हाताने पायांना विचारले: तुझ्यावर सगळे डोके ठेवतात. तो अधिकार मला का नाही?त्यावर पाय हसून म्हणाले:यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही.

०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात. आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची !

०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.

१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली: तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली :त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.

११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो.

१२. या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही. कारण एक हरवली की दुसरीचं जीवन तिथेच संपते.

लेखक :  रेडिओ मामा

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हेचि दान देगा देवा… कवी : संत तुकाराम ☆ रसग्रहण – सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? काव्यानंद ?

☆ हेचि दान देगा देवा… कवी : संत तुकाराम ☆ रसग्रहण – सौ. वृंदा गंभीर 

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..

गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी..

नलगे मुक्ति धन संपदा. संतसंग देई सदा..

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी..

हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा

जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात देवा एक दान दे किंवा वरदान दे तुझा विसर कधी पडू देऊ नको.

मानव जन्म आला कि व्याप हाल अपेष्टा आल्याचं संसार आलाच कष्ट आलेच… संसारात गुंतून न राहता तुझी आठवण कायम असू दे तुझे गोड नाम मुखात असू दे दुसरं काही नको…

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा

देवा तुझे नाम अमृताहून गोड आहे तुझ्या नामात शक्ती आहे तुझे नाम म्हणजे सत्य आहे. योग्य मार्ग आहे तेंव्हा देवा तुझा विसर पडू देऊ नको.

गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी

तुझे गुण मी आवडीने गाईन सत्कर्म करत राहील तुझे नाम अतिप्रिय आहे तुझं विस्मरण मी कधी होऊ देणार नाही देवा तू नेहमीच स्मरणात असावास म्हणून मी तुझे गोड गुणगान गात राहील.

घरादार मुलं बाळ धन संपदा जोडण्यापेक्षा मी पुण्य जोडत राहील धन जमा करण्याच्या नादात तुझा विसर पडतो तुझे कार्याचा विसर पडतो.

मानव जन्म मिळून पण जीवनाचे सार्थक करता येत नाही नाशिवंत सुखाच्या मागे धावून शाश्वत सुख विसरतो शाश्वत सुख तुझ्या नामात आहे म्हणून मी तुझ्या नामाशी जोडला जाणार आहे.

जीवनात अध्यात्मिक सुख पाहिजे कलियुगात भौतिक सुखाच्या मागे लागून दुःख प्राप्त होतं आणि तुझा विसर पडतो.

मला हे सुख नको आहे मला शाश्वत सुख जोडायचं आहे.

न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा

मला धन नकोय मुक्ती नकोय संतांची संगत हवी आहे.

मुक्ती मिळाली तर मी तुझ्या पासून लांब जाईल मला पुन्हा पुन्हा मानव जन्म दे मी तुझे गुणगान गाईल तुझी सेवा करत राहील.

तुझी सेवा घडावी म्हणून मला संतांची संगत दे संत सहवासात राहूदे * गुरु असावा महाज्ञानी गुरु महाज्ञानी असेलतर जीवनात मार्ग सापडतो म्हणून संत संगत दे… 

सुसंगतीने सुविचार प्राप्त होतात तर कुसंगतीने जीवन बरबाद होतं.

संगत जशी असेल तसं जीवन घडत असतं. जीवन सार्थकी लावायचे असेलतर संत संग आवश्यक आहे.

देवा, हे पांडुरंगा मला फक्त संत संग दे धन नको मुक्ती नको भक्ती दे.

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हीसी

तुकाराम महाराज म्हणतात आता सुखाने जाऊदे गर्भातून तुझी सेवा करण्यासाठी आलो होतो आता तुझी सेवा झाली माझे कार्य संपले आहे. तेंव्हा देवा मला आनंदात स्वर्गसूख मिळूदे जिथे फक्त तुझे चरण असतील.

“गर्भात असताना सोहंम सोहंम जप होतो, बाहेर आल्यावर कोहम कोहम सुरु होतं.

कोहम, म्हणजे का आणलंस तू इथे मला का दूर केल तुझ्यापासून ही आर्त हाक असते बाळाची.

म्हणून महाराज म्हणतात गर्भवासी होतो आता सुखाने स्वर्गवासी होऊ दे शेवटचा दिवस गोड व्हावा

जिथे नामस्मरण चालू असते तिथे देव नक्कीच भेटतो.

मुखी नाम हाती काम

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares