मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सोलापुरी भाकरी, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. शेंगा चटणीचा बोलबाला खूप होतो, पण बिचाऱ्या भाकरीला कोणी विचारत नाही. जोंधळ्याची, म्हणजेच ज्वारीची भाकरी ही तब्येतीला खूप चांगली असते, असं काही डॉक्टर सांगतात. इथेही पुन्हा डाव्या विचारसरणीचे डॉक्टर्स ” ज्वारी हा पिष्टमय पदार्थ असल्याने त्या मुळे शुगर वाढते ! ” असं ठणकावून सांगतात.

भाकरी ही पौर्णिमेच्या चंद्रासारखी असावी, तिच्यावर चंद्रावर असलेली हरणांची जोडी असावी ( थोडी जास्त भाजल्यावर ती करपते ).

गोल भाकरी करणे ही सुद्धा एक कला आहे. भाकरी करताना एक प्रकारे तीनताल वाजतो, धा s धा s धा s धा, भाकरी फिरवली जाते पुन्हा धा s धा s धा s धा. धिं हे अक्षर जरी वाजत नसलं तरी, मात्रा मात्र बरोबर असतात. अशा तीनतालात ज्या बायका भाकरी करतात, त्यांच्या भाकऱ्या सुंदर होतात. माझी मोठी बहीण अश्विनी देशपांडे हिने केलेली भाकरी खरंच सुंदर असते.

आमचे जगन्मित्र गुरुसिद्धय्या स्वामी ह्यांची एक बहीण बाळीवेसेत राहते. तिच्याकडे आम्ही एकदा जेवायला ( खास भाकरी खायला ) गेलो होतो. भाकरीतली वाफ आणि त्याच्या पापुद्र्यातले हाताला बसणारे चटके खात, भाकरी खाणे, हा विलक्षण योग तिथे आला. बिचारीचा प्रेमळपणा पण इतका, की पहिली भाकरी खाता खाता ताटात थंड होते, म्हणून ” ती अर्धी बाजूला ठेवा, ही दुसरी खावा ” भावावर असणारी मृदू माया आणि हाताला चटके देणारा हा ‘भाकरी योग’ आयुष्यभर लक्षात राहिला.

तसं सोलापूरच्या लोकांना भाकरीचं फार कौतुक नाहीये, कारण बहुतेक सोलापूरच्या घराघरांतून अशा भाकरी करणाऱ्या खूप माऊली आहेत. भाकऱ्या बडवण्यासाठीच आपला जन्म आहे, अशी सुद्धा काहीजणींची भावना आहे.

दोन वेळची चटणी भाकरी मिळाली की माणूस खूश होतो. खारब्याळी, रोट्टी आणि शेंगा च्यटणी साधं सोप्पं जेवणाचं गणित. त्यामुळे प्रॉपर सोलापुरी माणूस बाहेर फारसा जातही नाही आणि रमत देखील नाही.

” भाकर तुकडा खाल्ला का न्है अजुक ?” म्हणजे ‘जेवण झालं की नाही ?’ असं विचारलं जातं. पोळी म्हणजे ती फक्त पुरणाची, साधी पोळी म्हणजे ” चपाती “

एकंदरीतच पोळी, भाकरी, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ हे पदार्थ, अस्सल तबलावादकाने वाजविलेल्या कायद्यासारखे असतात. एकही मात्रा इकडची तिकडे होत नाही. हळू हळू भाकऱ्या खाणारे ( आता दीड भाकरी सकाळी दीड संध्याकाळी ) कमी होत चालले, तशी बायकांची भाकरी करायची सवयदेखील मोडायला लागली.

पुरुष जे जे काही करू शकतात, ते ते बायका करू शकतात, पण बायका जशी भाकरी करतात तशी भाकरी, पुरुष कधीच करू शकत नाहीत. पोळ्या करणारे पुरुष आहेत. पण ते फक्त भाजण्याची क्रिया करू शकतात. बाकी पोळी लाटणे आणि भाकरी थापणे यावर बायकांची अजूनतरी मक्तेदारी आहे.

आता भारतातून अमेरिकेत गेलेली मुलं, यू ट्यूब बघून किंवा आयांना विचारून पोळ्या करतात, पण भाकरीच्या कुणी मागे लागत नाही. अगदी सांगायचं झालं तर अजून शहरातल्या पोरीसुद्धा भाकरीच्या नादी लागत नाहीत.

मावळात तांदळाची भाकरी करतात, डोसा किंवा दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, (निर डोसा, ज्याला खूप निऱ्या असतात) यांची महाराष्ट्रातील मावस बहीण म्हणजे, मावळातली तांदळाची भाकरी.

जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेला तयार होणारी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी. स्वभावाने खूपच तापट असते, म्हणून फक्त भोगीच्या दिवशीच फक्त तिला वापरतात. पुण्याच्या परिसरात भाकरी म्हणजे बाजरीचीच, ज्वारीची पाहिजे असल्यास सांगावं लागतं, जसं मराठवाड्यात स्टेट बँक म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँकेला इंडिया बँक असं म्हणतात तसं.

भाकरीची अनेक भावंडं आहेत, सगळ्यात लहान आणि खूप खोडकर भाऊ ज्याला आई पाठीत जास्त धपाटे घालते, तो ‘धपाटे’.

आता पुण्या मुंबईत ‘ लोणी धपाटे ‘ या नावाने काहीही विकलं जातं. नुसता तेलात डाळीचा बॅटर घालून तव्यावर भाजणे म्हणजे, धपाटे नसतात रे sss !

धपाटे का करावे ? पूर्वी सोलापूरहून पुण्याला यायचं म्हणजे प्रवासात किमान दोन जेवणं व्हायची ( हीच लाल परी आठ आठ तास घ्यायची पुण्यात पोचायला, विजापुर औरंगाबाद तर सकाळी सहा वाजता विजापुरहून निघाली की, संध्याकाळी सहा वाजता कशीबशी औरंगाबादला पोचायची. दोन ड्राइव्हरच्या झोपा व्हायच्या. त्यामुळे प्रवासात जेवण्यासाठी या धपाट्यांचा शोध लावलाय, आपल्या हुशार पूर्वजांनी. जास्त वेळ टिकावा आणि त्यासोबत शक्यतो तोंडी लावायला कशाची गरज पडू नये, ही त्यावेळची गरज होती.

थालीपीठ हा देखील भाकरीचा भाऊच. करणाऱ्या सुगरणीच्या बोटांचे ठसे आणि चार छिद्रमय थालीपीठ किती लोकांच्या नशिबात आहे काय माहीत ! मला तरी थालीपिठाचा पृष्ठभाग चंद्रावर असलेल्या जमिनीसारखा वाटतो. त्यात तेल आतपर्यंत मुरावं म्हणून केलेली छिद्रे ही चंद्रावरच्या फोटोत दिसलेल्या जमीनीसारखी वाटतात.

पुण्यात हॉटेलात मिळणारी थालीपीठ ही खाद्य वस्तू, म्हणजे मर्तुकडी आणि हडकुळ्या माणसासारखी भासतात. थालीपीठ कसं लुसलुशीत असायला हवं, आता कशाच्याही नावावर काहीही विकतात आणि आपण ते खातो ( घरी करायला नको, म्हणून त्यालाच चांगलं म्हणून मोकळेही होतो. )

आता काही ठिकाणी मल्टिग्रेन नावाचं एक आभूषण ह्या सगळ्या खाद्य पदार्थांवर आलंय. हेल्थ कॉन्शस लोक अशा नवनवीन कल्पना शोधून काढतात. तशी मल्टिग्रेन थालीपीठ मिळतील. गिरणीत सांडलेली सगळी पिठं एकत्र करून त्यांचं थालीपीठ म्हणजे मल्टिग्रेन थालीपीठ.

मक्याची पण भाकरी करतात. ती कधी फारशी खाण्यात आली नाही. ती थोडीफार पंजाबात लग्न होऊन गेलेल्या बहिणीसारखी गलेलठ्ठ आणि तिच्या सोबत ” बरसोंका साग ” बरसो से खाते हैं इसलिये, सरसोंका च्या ऐवजी बरसोंका !

रोठ हा देखील भाकरी सदृश पदार्थ. इकडे विदर्भात तर, एके दिवशी पोळ्याभाकरी करताना नवऱ्याशी भांडण झालं आणि बायको चिडली, ” मी नाही पोळ्याभाकरी करणार ” असं म्हणून, तिने पोळ्या करायला केलेले गोळे, रागारागाने दिले चुलीत फेकून आणि गेली निघून बाहेर. नवऱ्याला लागली होती कडक भूक, त्याने ते चुलीतले गोळे काढले बाहेर आणि त्यावरची राख फुंकून घातले वरणात, ते गोळे झाले कडक म्हणून त्यावर भरमसाठ तूप घातलं, त्याला ते इतकं आवडलं की तो एक नवीन पदार्थ तयार झाला. त्याचं नाव दाल भाटी. खरं तर तो तेव्हा पुटपुटला होता ” दाल भागी ” म्हणजे बायकोने गोळे दाल दिये चुल्हे में और भाग गयी. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि दाल भाटी तयार झाली असावी, असा माझा अंदाज आहे बरं का !

‘वरण फळं ‘, ‘चकोल्या ‘अशा नावाचा पण एक पदार्थ महाराष्ट्र आणि विदर्भात जास्ती दिसतो. ” रोज रोज काय मेलं त्या पोळ्या भाजायच्या, असं म्हणून एखाद्या गृहिणीने, शेजारच्या गॅसवर उकळत्या आमटीत लाटलेल्या पोळ्यांचे तुकडे टाकले आणि झाली वरण फळं तय्यार ! वरून लसणीची फोडणी, खोबरं वगैरे साज शृंगार नंतर केला गेला असावा.

अरेच्या ! भाकरीपासून झालेली सुरुवात बघा कुठे कुठे पोचली, सगळ्यात शेवटी काय ? तर असेल चाकरी तर मिळेल भाकरी, किंवा बहिणाबाईंच्या ओळी तर जगप्रसिद्ध आहेतच,

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.

लेखक : सतीश वैद्य

 फोन नं. : 9373109646

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकल है भाई ! इधरकेही है !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ लोकल हैं भाई ! इधरकेही हैं ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

लोकल हैं भाई ! इधरकेही हैं !

अंधेरी रातों में.. सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले… पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी ! (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर… ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार? 

लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो… पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने, विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.

श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल.. म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल…. रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो… दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.

कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी, हलकी वाहने(कार, रिक्षा इ. ) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.

कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत… आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे… आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात… कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार.. तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य… थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो… या स्तंभ शब्दावरून आठवले…. कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे.. साधन नव्हे! 

सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे… अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन. जी. सी. , डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे, प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली… (बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!) 

वाघ, सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत, हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं.. हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते… नाहीतर आपले सरकारी फलक… वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.

दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात, अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी, मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत… यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो… आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो.. शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.

आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत… आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी, कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात.. आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते… ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत.. उलट मागून येणा-या दुस-या वाहनांच्या मागावर… नव्हे वासावर राहतात… त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही! 

पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री… तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.

एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती, गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे… काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत….. अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत… दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत… लोकल ही भाई… इधर के ही हैं…. (आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत… !) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही… असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो.. पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो… शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम !

(या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

“ ए सोनू, तुमची जोडी अगदी स्वर्गातबनल्या सारखी आहे. अगदी इंग्रजी मध्ये म्हणतात त्याप्रमाणे “Made for each other ” … मिनू सोनूला सांगत होती…..

सोनू तिला म्हणाली की “ अग असे काही नसते…. जोड्या स्वर्गात जुळवल्या जातात आणि पृथ्वीवर त्या प्रत्यक्षात दिसतात असे म्हणतात ते खरे आहे… “ 

या दोघींचा संवाद ऐकून मी विचारमग्न झालो….

आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक जोड्या पाहिल्या,

काही जवळून तर काही दुरून….

काही चित्रपटात तर काही प्रत्यक्षात..

काही नात्यातील तर काही परक्या….

… स्वतःची जोडी ही अशीच एका सावध/बेसावध क्षणी जुळली गेली….

आयुष्याच्या मध्यान्ह होताना असे लक्षात आले की जोड्या स्वर्गात जुळतात हे कदाचित खरे असेल, पण त्या या पृथ्वीवर जुळण्यासाठी, नव्हे जुळवून घेण्यासाठी मात्र काहीतरी वेगळे कौशल्य जोडीतील दोघांकडे लागते.

महान लेखक व. पू. काळे एका ठिकाणी लिहितात,

लग्न पत्रिकेवर गणपतीचे चित्र छापून आणि लक्ष्मी प्रसन्न असे लिहून संसार घरी लक्ष्मी रूपाने येणारी गृहलक्ष्मी होऊ शकत नाही. तर तिच्यातील लक्ष्मीची जागृती करण्याचे काम ज्या पतीला जमते, त्याचा प्रपंच सुखाचा होण्याची शक्यता असते.

पतीसाठी घरदार सोडून आलेल्या, नवऱ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीला आपल्या नवऱ्याचे घर आपले वाटावे, किमान इतकं तरी त्या नवऱ्याने आणि सासरच्या माणसांनी तिच्याशी सौजन्याने वागले पाहिजे….

आधी संवाद, मग सहवास, पुढे त्यातून विश्वास आणि अकृत्रिम स्नेह…

आणि 

मुख्य म्हणजे प्रपंचात राहिलेल्या ‘गाळलेल्या’ जागा रिकाम्या न ठेवता ज्याला दिसतील त्याने मूक राहून भरणे…

हे यातील काही टप्पे असू शकतील….

एकेमकांना जाणून घेत, घरातील माणसांशी जुळवून घेत, दैनंदिन व्यवहारात प्रेम, माया, स्नेह जपत, वाढवत केलेला प्रमाणिक व्यवहार पती पत्नीचे नाते दृढ आणि उबदार करीत असतो आणि याला जर सम्यक सुखाची जोड मिळाली तर मग पती पत्नीच्या नात्याला बहार येते, मोगऱ्याचे ताटवे बहरू लागतात….

ज्या जोडप्यांनी, जोड्यांनी असे प्रयोग करून पाहिले असतील, अनुभवले असतील, लेख वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले असेल….

प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला समजून घेत आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करू….

आपल्याला नक्की जमेल…. शुभेच्छा!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर

वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यानं आपल्या पुस्तकांच्या विक्रीचा आढावा घेतला.. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या पुस्तकांच्या जवळपास चार कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

मानधनातुन अफाट पैसा कमावणारा हा अब्जाधिश लेखक..

सॉमरसेट मॉम..

आपल्या लेखणीच्या बळावर समाजातील उच्च समजली जाणारी मंडळी त्याच्या स्नेहात होती‌. त्याच वर्तुळात त्याचा वावर होता… भारतात जेव्हा तो आला होता.. तेव्हा तर व्हाईसरॉयचा खास पाहुणा म्हणूनच आला होता. आपल्या प्रचंड इस्टेटीतला काही भाग काढून त्यानं सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान सुरु केलं. अनेक होतकरु लेखकांना पैसा उपलब्ध करुन दिला..

त्याचं लेखन अतिशय शिस्तशीर.. सकाळी नऊ ते दुपारी एक ही त्याची लिहीण्याची वेळ.. अगदी रोजच्या रोज.. सुट्टी नाही.. सण नाही.. वार नाही.. रविवार पण नाही.. प्रवासात असलं तरीही खाडा नाही..

रोजच्या रोज काय सुचणार? पण नाही.. तो टेबलपाशी जाऊन बसायचाच.. ती एक शिस्तच लावून घेतली होती त्यानं.. काहीच सुचलं नाही तर कागदावर सही करून परत परत गिरवायचा.

मुळचा तो लघुकथा लिहिणारा.. पण त्याने अनेक कादंबऱ्या लिहिल्या.. नाटकं लिहिली.. चित्रपट लेखन केलं.. लेखक म्हणून त्याची प्रतिमा तेजस्वी होती.. पण..

.. पण त्याच्या आयुष्याला एक दुसरीही बाजू होती.

सॉमरसेट मॉम बोलताना अडखळत बोलायचा.. तोतरा.. त्यामुळे त्याच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता.. सगळ्यांपासून दुर दुर रहायचा.. खास करुन स्त्रियांपासून..

आणि यातूनच त्याच्यात लैंगिक विकृती निर्माण झाली होती.. त्यानं चार लग्न केली.. पण ती टिकली नाहीत.. सगळेजण आपल्या वाईटावर आहेत असंच त्याचं म्हणणं असायचं.. सगळ्यांबद्दल मनात संशय.. त्यामुळे भांडणं.. ‌मग अवहेलना..

त्याला एक मुलगीही होती. सायरा तिचं नाव.. तिच्याशी तर त्याचं अजिबात पटलं नाही.. तिच्यावर त्यानं नाही नाही ते आरोप केले. ती कशी लबाड आहे.. वाईट चालीची आहे हे तो वारंवार सांगु लागला. एका अमेरिकेन मासिकात त्यानं सायराचं चारित्र्यहनन करणारी लेखमालाच लिहिली.

पण लोकांना ते आवडलं नाही.. त्याच्या नेहमीच्या प्रकाशकांनी पण ते ग्रंथरूपात आणण्यास नकार दिला.

त्याची एक आजी होती.. ती पण थोडंफार लेखन करायची. लहान मुलांसाठी तिनं अनेक छोटी छोटी पुस्तकं तिनं लिहिली होती.. वाटायचं तिला आपल्या नातवानं पण ती वाचावी.

पण सॉमरसेटनं ती कधीच वाचली नाही.. तो तिला भेटतही नसे.. खुप दुस्वास करायचा. आपल्या अगोदर आपल्या घराण्यात कुणी लेखन केलंय याच गोष्टीचा राग त्याच्या मनात कायम होता.

वयोमानानुसार आजी म्हातारी झाली.. अनेक व्याधी तिला जडल्या.. पण मरतेसमयी तिच्या जवळ फुटकी कवडीही नव्हती. ‌पैशाच्या अभावी ती उपचार घेऊ शकली नाही. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेली ॲन आजी वाट पाहु लागली.. नातवाची..

.. पण मॉमने तिची घोर उपेक्षा केली. तो तिला भेटायला आलाच नाही.. बेवारस मरणच तिच्या नशिबी होतं.

सॉमरसेट मॉमची ही दोन रुपं. वयाच्या पंचाहत्तरीत त्यानं लेखन थांबवलं.. आणि वयाच्या नव्वदीत आल्यावर त्याला जाणवलं….

…. काय मिळवलं मी? माझं सगळंच चुकत गेलं.. माझं सगळं आयुष्य फुकट गेलं..

आत्महत्येचे विचार त्याच्या मनात चोळु लागले.. पण ती वेळच आली नाही.. ऐश्वर्यसंपन्न असलेला सॉमरसेट मॉम वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एकाकी अवस्थेत हे जग सोडून गेला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-२ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-२ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

(पिठोरीची पूजा होऊन  श्रावण संपायचा.) — इथून पुढे — 

तोपर्यंत गौरी गणपतीची चाहूल लागलेली असायची.

पार्वतीला जसा शंकर मिळाला तसा चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिकेचा उपवास मुलींना करायला त्यांच्या आया सांगायच्या. मुलींच्या उपवासाचे घरात कौतुक असायचं. खजूर, केळी, सफरचंद आणले जायचे. खास बदामाची खीर केली जायची.

गणपतीची  तयारी तर जोरदार असायची. गणपतीची आरास करायचं काम मुलांचं असायच. पुठ्ठे रंगवून, चित्रं काढून… दरवर्षी नविन काहीतरी करायचे.

गणपतीच्या नेवैध्याला उकडीचे मोदक असायचे. वडिलांना आवडतात म्हणून गुळाच्या सारणाचे तळलेले मोदक केले जायचे.

रोज संध्याकाळी आरतीला वेगवेगळा प्रसाद असायचा.

ऋषिपंचमीला बैलाच्या कष्टाचे काही खायचे नाही असा संकेत असायचा. गंमत म्हणजे ती स्पेशल भाजी त्या दिवशी विकायला यायची. महाग असली तरी ती आणली जायची. ऋषीपंचमीचं म्हणून असं खास काळं मीठ मिळायचं. ते आई, आजीसाठी आणलं जायचं.

गणपतीच्या मागोमाग  गौरी यायच्या. यायच्या दिवशी तिला मेथीची भाजी आणि भाकरी असा नेवैध असायचा. दुसऱ्या दिवशी गौरीचा थाट काय विचारता? पंचपक्वांन्न, सोळा भाज्या, पाच कोशिंबिरी, कढी, पंचामृत असा साग्रसंगीत बेत  असायचा.  डाळिंबाच्या दाण्यांची कोशिंबीर पाच फळं घालून   वर्षातून एकदा त्या दिवशी होत असे.

शिवाय गौरीपुढे ठेवायला करंजी, अनारसे, बेसनाचे लाडू केले जायचे. गौरी विर्सजनाला मुरडीचा कानवला आणि दहीभात  असायचा.

अनंत चतुर्दशीला कोरडी वाटली डाळं आणि दही पोहे केले जायचे. गणपती बरोबर शिदोरी म्हणून दही पोहे दिले जायचे. तेही पातेलेभर केले जायचे. त्या दिवशी रात्री जेवायची भूक नसायची.

गणपती झाल्यावर थोडे दिवस सुनेसुने जायचे. की नंतर नवरात्रीचा सण यायचा. नवरात्रात काही बायकांचे नऊ दिवस उपास असायचे. तिला “उपवासाची सवाष्ण ” म्हणून खास आमंत्रण देऊन बोलावले जायचे. तिच्यासाठी स्पेशल पदार्थ केले जायचे.

 भगरीचे धिरडे, शिंगाड्याच्या पुऱ्या, श्रीखंड असा बेत करायचा. बटाट्याची गोड, तिखट कचोरी व्हायची. एकीपेक्षा दुसरी काहीतरी वेगळं करायची. आईने एकदा उपवासाचे दहीवडे केले होते त्याचे खूप कौतुक झाले होते.

तेव्हा नवरात्रात  घरोघरी भोंडला व्हायचा. पाटावर  रांगोळीने हत्ती काढायचा. ऐलोमा पैलोमा  गणेश देवा, अक्कण माती चिक्कण माती, अतुल्यामतुल्या, कृष्णाचं अंगड बाई कृष्णाचं टोपडं, एक लिंबू झेलुबाई…. अशी गाणी म्हणत फेर धरायचा.

खिरापतीला काय केले? हे ओळखायला लागायचं. त्यासाठी आया वेगवेगळे पदार्थ करायच्या. बीट गाजराच्या वड्या, चुरम्याचे लाडू, तिखट दाणे, नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा असे आईचे  पदार्थ आजही आठवतात.

आपली खिरापत मुलींना ओळखता आली नाही की आयांना आनंद व्हायचा.

दसऱ्याला श्रीखंडासाठी आधी एक दिवस दूध घेऊन त्याचे दही लावले जायचे. पंचात बांधून ते टांगून ठेवायचे. सकाळी छान घट्ट चक्का तयार व्हायचा. वेलदोडे घालून चांगले पातेले भर श्रीखंड केले जायचे. वडील श्रीखंड नको म्हणाले तर बासुंदी केली जायची.

पण  खरा दुधाचा मान  कोजागिरी पौर्णिमेला असायचा. गच्चीवरच्या गार हवेत चारोळी घातलेलं गरम दूध प्यायला घरातले जमायचे. ते दूध गच्चीत उघड्यावर ठेवायचं. त्यात चंद्राचा प्रतिबिंब पडलं की त्याची चव बदलते अशी समजूत होती.

काही दिवस गेले की दिवाळीच्या तयारीला लागलं पाहिजे अस आई घोकायची… कारण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ लागायचे. चकली, कडबोळीची भाजणी भाजायची, अनारश्याच पीठ दळायचं, करंजीचं सारण करायचं, लाडूसाठी साखर दळून आणायची… एक ना दोन किती तरी कामं तिला दिसत असायची.

फराळाच्या जिन्नसांनी डबे  भरून झाले की मग तिला हुश्श वाटायचं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वडील सकाळी सायकल वरून निघायचे. आत्या, मावशी, काकू कडे डबे द्यायचे. त्यांच्याकडून येताना डबे भरून यायचे. प्रत्येकाची चव निराळी असायची. आवडीने, चवीने ते पदार्थ खाल्ले जायचे.

ते दिवस कसे रमणीय  होते. साध्या साध्या गोष्टीतही आनंद होता.

त्या आठवणीत विचारांच्या तंद्रीत  मी हरवून गेले…..

यांच्या एका प्रश्नाने मनाने थोडी मागे जाऊन भटकून आले.

आज हे सगळं करणं  शक्य होत नाही. तितकं खायला घरात माणसंही नाहीत. निवांत वेळ नाही. आयुष्य कसं बिझी बिझी, फास्ट होऊन गेले  आहे.

नवीन पदार्थ बाजारात आले आहेत. खायच्या सवयी पण वेगळ्या आहेत.

पण मध्येच कधीतरी घारगे, शिंगोळे, गुळपापडीचे लाडू करावेसे वाटतात. सोडायचं म्हटलं तरी जुनं सोडवत नाही. नव्याशी अजून आमचा तितकासा मेळ बसत नाही.

कधीतरी वाटतं ह्या प्रथा बंद होतील का ? हे पदार्थ  विस्मरणात जातील का?

 पण एक मन सांगत असं होणार नाही. चातुर्मास आम्ही पाळत नाही पण इतर जमेल तसं आम्ही अजूनही करतो.

कितीही आधुनिक पुढारलेले झालो असलो तरी आमच्या रक्तातून वाहणारा तो स्त्रोत बदललेला नाही. आमची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे.

… कारण हे नुसते खाण्याचे पदार्थ नाहीत तर त्यांच्या मागे आमची संस्कृती आहे परंपरा आहे. त्या त्या पदार्थाची आठवण त्याच्याशी  निगडित अनेक   नाती पण  आहेत. ती आयुष्यभर तशीच राहणार आहेत…

– समाप्त –

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पावसाळी अमावस्येचा थरार… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ पावसाळी अमावस्येचा थरार… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

जुलै /ऑगस्ट महिना आला की, आत्ताही अंगाचा थरकाप होतो. आठवते ती एक भयाण रात्र. ३८ वर्षांपूर्वीची ! त्यावेळी मी  गडचिरोली येथे बँकेत नोकरी करीत होते. माहेरी खेड्यात राहणं होतं ! माझी नोकरी शाळेची नव्हती, की उन्हाळा, दिवाळी आणि सणावारी सुट्ट्या मिळायला. त्यात नशिबाने ऐन तारूण्यात एकल पालकत्व आलेलं. पण हरायचं नाही. एक आई असून – बापाचंही कर्तव्य पार पाडायचंच हे मनाशी कायम कोरलेलं होतं.

आषाढ आपल्या पूर्ण ताकदीनिशी कोसळत होता. त्याच्याच बरोबरीने विजा चमकत होत्या. बँक तशी सहालाच सुटली होती. तेव्हा पासून मी बसस्टॉपवर उभी होते. स्टँड नव्हे. एकेक बस येत होती. प्रवासी घेऊन पुढे जात होती. माझ्या बसचा मात्र  पत्ताच नव्हता. त्यातच स्ट्रीट लाईटस गेले. काळोख दाटला होता. बाळ लहान होतं. त्यामुळे मला जरी भूक लागली होती, तरी बाळाची काळजी अधिक होती. ते भुकेजलं असेल. सकाळी आई त्याला खाऊ घालायची, किमान रात्री त्याला मी हवी असे. माझ्या स्पर्शासाठी बाळ कासाविस झालं असेल. या कल्पनेनंच सारखं रडू येत होतं. छत्रीचे केव्हाच बारा वाजले होते. ओली गच्च पर्स कवटाळून मी बसची वाट बघत होते. नाही म्हणायला दोन / तीन पुरुष आणि एक बाई स्टॉपवर सोबत होती. रात्री बंद झालेल्या किराणा दुकानाच्या वळचणीला आम्ही थांबलो होतो. तेवढ्यात माझ्या माहेरची बस आली एकदाची. त्या बसच्या हेड लाईटसने एक दिलासा दिला.

त्यावेळी खेड्यात विवाहीत, त्यातून विधवा स्त्रीने ड्रेस वगैरे घालणं म्हणजे महापाप होते. साडी परकर गच्च ओले असल्याने पायांना चिकटले होते. कशीबशी लालपरी बसमधे मी चढले. दोन वेळा घंटी वाजली आणि बस सुरू झाली.

बसमधे जास्त प्रवासी नव्हतेच. म्हणजे तेवढेच थांबे कमी. म्हणजे बस लवकर गावी पोचेल हा कयास होता. बस वेगात निघाली, म्हणजेच खेड्यातल्या रस्त्यांवरून ताशी २० किलोमिटरच्या स्पीडने ! तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. अकरापर्यंत बस पोहचेल (अंतर ३४ किलोमीटर) हा कयास होता. कारण मोबाईल / फोन वगैरे काहीच प्रकरण त्यावेळी नसल्याने एकमेकांची काळजी करणे, एवढेच हातात होते. बसमधे जास्त लोक नव्हते, हे एकापरी बरंच होतं. कारण गच्च भिजलेली मी ! स्वतःला सांभाळणं मला कठीण झालं असतं.

गाडी सुरू झाली. तिच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने मी मनाने घरी पोचले होते. बाळ कसं असेल हीच काळजी होती. तसं ते माझ्या आईपाशी सुरक्षित होतं. पण आई आणि आजीत एका अक्षराचा फरक होताच ना!

आम्ही शिवणीच्या नदीपाशी आलो. नदीचं पात्र भरू वाहत होतं. वेळ रात्री दहाची. पण किमान पूल दिसत होता आणि गाडी पैलतिराला पोचली एकदाची. पुढे रस्त्यावर पाणी साचलेलं / खड्डे यातून वाट काढत गोविंदपूरचा नाला, पोहर नदी पार केली.

रात्रीचे अकरा वाजले होते. बाहेरचा सूं सूं असा आवाज रात्रीच्या भयानकतेत अधिकच भर घालीत होता. त्यातून विजा कडाडत होत्या. तशातही

“सरोष घन वर्षती तरूलताशी वारा झुजे

विराम नच ठाऊका तडित नाचताना विजे “

या ओळी मला आठवत होत्या. कुरूळ गाव आलं. दोन माणसं  उतरली. बसमधे ड्रायव्हर, कंडक्टर, एक शेतकरीवजा माणूस आणि मी एवढे चारच जण होतो. बसचा खडखड आवाज, टपावर पावसाच्या थेंबांचा आवाज भयानकतेत भर घालीत होता. कुरूळचा नाला दुथडी पुलावरून भरून वाहत होता. पण त्या पुलाचं अंतर जास्त नव्हतं. तशातच आमच्या बसच्याच समोर एक ट्रॅक्टर चालत होता. ड्रायव्हरने ट्रॅक्टर पुलावर घातला आणि पलिकडे गेला. तीच हिंमत धरून आमच्याही ड्रायव्हरने बस नाल्याच्या पलिकडे नेली. खूप हायसं वाटलं. आता मधे कुठलीच नदी / नाले नव्हते. कंडक्टर कडून माहिती कळली की एव्हाना रात्रीचे पावणेबारा झाले होते. अजून तीन किलोमिटर रस्ता बाकी होता.

कसाबसा सव्वा बारापर्यंत हा तीन किलोमीटर चा रस्ता आमच्या लालपरीने पार केला. एव्हाना मी खूप थकले होते. पहाटे पाचला उठून माझा डबा, घरच्या सर्वांच्या पोळ्या, भाजी करून ७ची बस घेऊन निघाले होते मी.. अर्थात ती बस पावणे आठला मला मिळाली आणि कसंबसं मस्टर गाठलं. जवळ जवळ १९ तास. मी केवळ काम करीत होते आणि उभी होते. गेले तीन तास बसचा खडखडाट अनुभवत होते हाडं खिळखिळी झाली होती. तशातच बस थांबली. म्हणजे माझं गाव आलं होतं. अमावास्येची काळी कुट्ट रात्र होती ती. पाऊस, विजेचं तांडवं, आभाळाची गर्जना यांच्यात जणु पैज लागली होती. तशाच पावसात भिजत मी खाली उतरले. माझा एकमेव सहप्रवासी माझ्या नेमक्या विरुद्ध दिशेने झपाझप पावलं टाकत निघून गेला होता. आजु बाजुला कुणी दिसतंय का याचा मी अंदाज घेतलला. पण रात्री साडे बाराला खेड्यात कोण असणार होतं ? 

रस्ता नेहमीचा परिचयाचा होता. आठवडी बाजारातून जाणारा. पण आता त्याला तलावाचं रूप आलं होतं. आमच्या शाळेला वळसा घालून त्याच तलावातून मला रस्त्यावर यायचं होतं. तेवढयात वीज चमकली आणि त्या उजेडत  मी कुठे आहे याचा मला अंदाज आला आता नाकासमोर चालत मला रस्ता गाठायचा होता अधेमधे दोन तीन वेळा वीज चमकली. आणि त्याच उजेडात मी चिखल पाणी तुडवत निघाले होते. पाच सात मिनिटात पायाला कडकपणा जाणवला. म्हणजे मी रस्त्याला लागले होते. होय सांगायचं विसरलेच. ओल्या गच्च चपलेने मधेच माझी साथ सोडली होती.

रस्त्यावरून माझी पावलं बऱ्यापैकी वेगात पडत होती. पाऊस सुरूच होता. मी सावकाराच्या घरापर्यंत पोचले न पोचले तोच अतिशय जोरात वीज कडाडली. कारण माझ्या नजरेसमोरची सर्व घरं मला दिसली होती. बहुतेक ती जवळपास पडली असावी. पण गंमत म्हणजे ज्या विजांची नेहमी भिती वाटावी त्याच विजा मला हव्याशा वाटत होत्या. कारण त्याच उजेडात मी चालत होते. मात्र आत्ताच्या विजेने मलाही धडकी भरली. मी एक टर्न घेतला. तिथे कोपऱ्यावर राममंदीर आहे. त्याच्याच जवळ एका घरी एक महिला काही दिवसांपूर्वी जळून वारली होती. खेडं म्हणजे भुताटकी वगैरे विषय आलेच. तिथेही ती बाई रात्रीबेरात्री, अवसे / पुनवेला दिसते हेही ऐकलं होतं. मी सगळं उडवून लावायची नेहमी. पण त्या रात्री तेवढा पॅच पार करताना मनातल्या मनात रामाचा धावा करीत होते. राममंदिर आलं हे मी जाणलं. कारण अंधारालाही उजेडाची एक किनार असते. पुढे आमच्या घराच्या फाटकाशी आले. आगळ काढून पुढे आले. पुन्हा आगळं लावली. जाळीच्या दरवाजातून कंदिलाचा उजेड दिसला आणि एक मानवी आकृती. म्हणजे माझे बाबा ! कारण आई बाळाला घेऊन झोपली असणार आणि धाकटा भाऊ सोळा सतराचा. तोही  झोपला असणार !

अंधारामुळे बाबांना मी दिसले नाही.. पण दरवाजाशी आल्यावर मात्र त्यांनी दार उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दाराचा आवाज ऐकून आईही बाहेर आली. बाहेर म्हणजे पडवीत. मला सुखरूप बघून दोघांचाही जीव भांड्यात पडला. चौकाच्या घरात आतल्या चार ओसऱ्या. तिथे आमची झोपायची सोय होती. बाळ झोपलं होतं.

मी गच्च ओली होते. बाहेरच साडीचा पदर, काठ जरासे पिळले. आणि घर अधिक ओलं होऊ नये ही काळजी घेत आत आले. आधी हातपाय धुवून ओली साडी बदलली.. आजीलाच आई समजून तिच्याच कुशीत बाळ निजलं होतं. आता त्याला उशी लावून आई उठली होती. बाळाच्या जावळातून मी हात फिरवला. पापा घेण्याचं टाळलं. कारण तो झोपला होता. तोवर आईने माझं ताट वाढलं रात्री एक वाजता चार घास खाल्ले.

बाळाला कुशीत घेतलं. ते चिकटलंच मला. दिवसभरचा शीण कुठल्याकुठे पळाला.

इथे संपलं नाही.

सकाळ झाली. पाऊस जरासा ओसरला होता. बाबा सवयीने  पहाटेच उठले होते. माझा ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. कारण रात्री ज्या खडतर मार्गावरून मी आले, ते सर्व नदीचे नाल्याचे पूल पुराच्या पाण्याखाली गेले होते.

आणि – – – काल रात्री जी जोरदार वीज चमकली, ती आमच्या शाळेवर पडली होती. त्यामुळे शाळेची एक भिंत खचली होती. गावातले अनेक टी. व्ही. उडाले होते. मी पायी चालत होते त्याच रस्त्यावर बाजूच्या घरी त्याच वेळे दरम्यान हृदय विकाराने एक आकस्मिक मृत्यू झाला होता.

बाबांनी हे मला सांगितलं आणि तेवढया थंडीतही मला दरदरून घाम फुटला. केवळ काही क्षणांपूर्वीच रात्री मी त्याच शाळेपाशी होते.  थोडी आधी वीज पडली असती तर? कल्पनेतही भिती वाटली. आणि कालची अमावास्या होती.

आजही ही आठवण आली की, उरात धडकी भरते. शिवकालीन हिरकणी आणि आजची आई यात खरंच फारसा फरक नाही हे पुन्हा अधोरेखित होतं हेच खरं!!

 

© प्रा.सुनंदा पाटील

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मॅरेथॉन – एक सत्यकथा’ – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मॅरेथॉन – एक सत्यकथा’ – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

लता भगवान करे 

मॅरेथॉन – एक सत्य कथा

हॉस्पिटलातील कोपऱ्यातल्या बाकावर मिनमिनत्या दिव्याखाली विमनस्क अवस्थेत ती बसलेली असते.

वय वर्षे 65, नांव लता…

रात्र बरीच उलटलेली असते. वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरचुंडी ती पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते पण काही केल्या 2000 रूपयांच्या वर आकडा जात नाही. नकळत ती आपल्या गळ्यावरून हात फिरवते नंतर दोन्ही कान चाचपते व पुन्हा हिशोब करते आता रोख रक्कम, गळ्यातले मंगळसूत्र आणि कानातल्या बुगड्या धरून सगळी गोळा बेरीज साधारण 25000 रूपयां पर्यत जाते. तिची गरज आणि उपलब्ध रक्कम यात खूपच तफावत असते असते. हे अंतर कस मिटवायचं याचा विचार करून करून ती थकते आणि त्या ग्लानीतच कधीतरी तिचा डोळा लागतो.

अचानक अंब्युलन्सच्या सायरनचा आवाज होतो तशी ती दचकून जागी होते. कुणाचीतरी डेड बॉडी अंब्युलन्समध्ये घातली जाते आणि काळाकुट्ट धुुर ओकत ती अंब्युलन्स अंधाराच्या कुशीत हरवून जाते. कुठतरी गावठी कुत्र भेसूर रडतं तस तिच्या छातीत धस्स होत. धावतच ती ICU च्या दरवाजापाशी येते आणि त्यावर लावलेल्या काचेतून आत डोकावते. पांढऱ्याशुभ्र बेडवर तिचा नवरा जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर पहुडलेला असतो. क्षणभर ती पांडुरंगाला हात जोडते “देवा, माझं उरलंसुरलं सार आयुष्य माझ्या नवऱ्याला लाभू दे रे!” अशी आर्त प्रार्थना करत रिसेप्शन काऊंटरकडे धावते. समोरच्या नर्सला पुन्हा विचारते “मॅडम, नक्की किती खर्च येईल ह्यांच्या उपचाराला?”. तिच्या रोजच्या प्रश्नाला नर्स शांतपणे तेच उत्तर देते…

“हे बघा आजी, सरकारी योजनेतून त्यांच ऑपरेशन केलं तरी त्यासाठी किमान लाख ते सव्वा लाख रूपये खर्च येईल आणि डॉक्टर म्हणालेत की, हे ऑपरेशन पंधरा दिवसात झालं तर ठीक नाही तर… ” 

पुढचं काही ऐकण्यासाठी ती तिथ थांबतच नाही आणि इतकी मोठी रक्कम आणायची कुठून या विवंचनेत अडकून राहते.

खाजगी कंपनीतून रिटायर झालेल्या तिच्या नवऱ्याची आयुष्याची सारी पुंजी संसाराच्या रहाटगाडग्यात आणि त्यांच्या तीन मुलींच्या लग्नात केंव्हाच संपलेली असते आणि जावयांच्या पु़ढे हात पसरण तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नसतं.

सगळीकडून फाटलेल्या आकाशाला आयुष्यभर ठिगळं लावता लावता हतबल झालेली ती पुन्हा कोपऱ्यातल्या बाकावर मिनमिनत्या दिव्या खाली येऊन बसते वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरचुंडी पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते अचानक तिच लक्ष त्या वर्तमान पत्रातल्या जाहिरातीकडे जाते…

शरद मॅरेथॉन स्पर्धाः 

पहिले बक्षिसः रोख रूपये एक लाख…

सकाळ होताच ती तडक चालू लागते. पत्ता शोधत शोधत स्पर्धेच्या आयोजकाच ऑफीस गाठते आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेते.

स्पर्धा सुरू होते रोज सराव करणारे हौसे, गवसे, नवसे  स्पोर्ट शूज, कॅप, टी शर्ट आणि बरच काही घालून सज्ज असतात. त्यामध्ये नऊवारी लुगडे नेसलेली “ती”  अनवाणी पायाने उभी असते. सगळा जीव गोळा करून फडफडणाऱ्या झेंडयाकडे पहात असते. कुठेतरी शिट्टी वाजते, हिरवा झेंडा खाली पडतो तशी ती बेभान होऊन वाऱ्याच्या वेगाने धावत सुटते. आता तिच्यापुढे ICU मध्ये जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर शुन्यात नजर हरवून बसलेला तिचा नवरा आणि त्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम एव्हडचं दिसत असतं.

कुठेतरी फट्ट असा आवाज होऊन आडवी बांधलेली लाल रंगाची रिबन ताडकन तुटली जाते तशी ती भानावर येते इकडे-तिकडे पहाते तर तिच्या मागे-पुढे कोणीच नसते आणि समोरची विजयाची कमान फटाक्यांच्या आतषबाजीत तिच स्वागत करत असते…

शरद मॅरेथॉन स्पर्धा तिनं प्रथम क्रमांकान जिंकलेली असते.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील.. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या लता करे आणि भगवान करे या जोडप्याची ही प्रेरणादायी कथा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वभाव राशींचे आणि पदार्थांचे.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वभाव राशींचे आणि पदार्थांचे.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात.  तसेच पदार्थांचे असते.

इडली– ( जगन्मित्र कर्क)

ही मवाळ प्रवृत्तीची.  अगदी लहान बाळापासून वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. 

तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं. तुपाबरोबर नि दूध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते.

कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही.

_पण एक नंबरची लहरी बरं का ही!

कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल. 

मिसळ — (जहाल मेषरास)

मिसळीचं अगदी उलटं.  ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही.  फक्त तरुणांची सोबत हिला आवडते.  बालके नि वृद्ध  हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत.

रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना  केवळ दर्शनाने नि गंधाने  लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!

भेळ  (चटकदार मिथुन रास)

नटरंगी…. चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा, कांदा-कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपणा, मिरची ठसका लेवून पातेल्यात नाचली की पब्लिकने शिट्ट्या मारत भोवती पिंगा घातलाच पाहिजे.

उप्पीट नि पोहे (जगावेगळी कुंभरास)

हे दोघे “सामान्य जनता”  या वर्गाचे वाटणारे पण सर्वार्थाने असामान्य. कारण  यांच्या वाट्याला  कौतुक येते पण  टीका मात्र कधीही येत नाही. तसेच ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. महत्त्वाचे म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही.

पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.

गोडाचा शिरा  (नशीबवान वृषभ)

हे  मात्र जरा खास व्यक्तिमत्त्व… खास प्रसंगांना उपस्थित राहणारं!

सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी  नशीबवान.. आणि बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा “शिरा”.

महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ “कडा प्रशाद” नावाचं. तर कुठे “सुजी हलवा” नावानं मिरवणारं…

वडा, भजी— (व्यवहारचतुर तूळरास)

हे पदार्थांमधले हिरो व लोकप्रिय…

पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे.  हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल!

पावाशी  लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!

पावभाजी – ठसा आणि ठसका म्हणजे धनुरास)

सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव!  बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात गुण्या-गोविंदाने नांदवून आपल्या स्वत:च्या चवीचा ठसा उमटवणारी, खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!

गोड पदार्थांची स्वभाव विशेष दुनियाही अशीच रंगरसीली!  प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर!* ( सोज्वळ मीनरास)

अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी.

कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली!

शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच…

“मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी” म्हणत बालपणीच परिचित झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही….. पण नसली तर मात्र नाडवते.

लाडू– ( खानदानी सिंहरास)

हा चराचरातून तयार होणारा दिमाखदार. तूप आणि साखर हे खानदानी याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. 

▪︎बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा.

▪︎रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि  लक्षात येण्याआधी संपून जाणारा..

▪︎साध्या पोळीपासून ते  राजेशाही डिंकापर्यंत  कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे!

हा बच्चेकंपनीचा लाडका!

पुरणपोळी– (नाजुक-साजुक कन्यारास)

ही पक्वान्नांची राणी!

नाजुक-साजुक स्वभावाची..

महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!

जिलेबी — (कुर्रेबाज, गूढ वृश्चिक)

नटरंगी…. पण बिनभरवशाची… कधी आंबट तर कधी गोड..

आज कुऱ्यात असणारी कुरकुरीत,

पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस…

गुलाबजाम  (जिगरबाज मकर)

वर्ण विविधा असला तरी अंगी गुण असले की साऱ्यांचे आपण लाडके होतो… हे शिकवणारा! दैवायत्तं कुले जन्म:, मदायत्तं तु पौरुषं चा जिगरबाज महामंत्र देणारा.

असे स्वभाव राशींचे.

चला पटकन तुमची रास सांगा.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “ना मातीची माणसं… ना तिची माणसं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “ना मातीची माणसं… ना तिची माणसं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बया बया ! अगं इमले काय गं हि  इमारत म्हनायची.. . किती झकपक  लाईटीनी उजळलीया.. . दिवाळीच्या कंदीलावानी रंगीबेरंगी दिसतीया कि.. . अन उच तरी किती हाय म्हनतीस, आभाळालाच टेकली कि काय?.. . तिथनं म्होरं स्वरग दोनचं बोटं उरला असलं कि.. . बाई बाई!मानसानं  मान तरी वर कर करून बघायची म्हटली तर डोईवरचा पदर खाली जमिनीवर पडला कि गं.. . चारीबाजूनं खिडक्या नि खिडक्याच दिसत्यात काय दारं बिरं ह्याला हायती का न्हाई काय कळंना कि.. . कुठूनशान जातात नि येतात गं या इमारतीतनं.. .  कशी खुराड्यावानी घरं दिसत्यात.. . मानसंच राहत असत्याल नव्हं त्यात.. . का कोंबडा कोंबडीच.. . अन एव्हढ्या उचावर राहायचं भ्या कसं वाटंत नसंल.. . खाली बघून डोळं गरगरत नसत्याल त्याचं.. अन इमले मला सांग एकाच येळेला समंध सामान घरात आणत असतील का गं?.. . का आपल्यावानी  साखरं राहिली जा पटाकन दुकानाकडं, , दुध आणायला पळ, मोहरी राहीली जा धावत.. . असं धा धा येळा येडताकपट्टीनं माणूस नि  त्यो इजेचा पाळणा थकत नसंल.. आनि इतकी बिर्हाडांच्या ये जा नी बंद पडत नसलं.. अन कधी बंद पडलाच तर हाय का आली बैदा मगं.. . वरची माणसं वरचं लटकलेली आनि खालची खोळंबलेली.. . जिनं चढून जायच़ खायचं काम असेल का ते.. . एखादा धाप लागून फुकाफुकी मरायचा बी.. . इमले आपून नाय बा तुझ्या बरुर त्या परश्याच्या घराकडं जानार.. . त्याला म्हनावं आईला भेटायला तू खाली उतरून ये.. . माझ्या छातीत बगं हे समंध बघूनच लकलक व्हायला लागलयं.. . रातच्याला इतका उजेड पडलाय मगं सकाळी कसं दिसत असेल गं.. . अन खुळे त्या इमारतीच्या खालच्या अंगाला किती मोटारी उभ्या केल्या हायती बघ जरा.. . अगं मोटार इकायचं दुकानच काढल्यागत वाटाया लागलयं.. . काळी, पांढरी, लाल, निळी, मोरपिशी.. . रंगाची उधळण केल्यासारखी.. . बापय बी चालवितो नि बाई बी.. . सुसाट सुटतात मोटारी कानावर हाॅर्न जोराचा वाजवूनवाजवून बहिरं केलं बघ.. . या दिव्याच्या झगमगटानं डोळं दिपलं कि गं वेडे.. . इमले मला लै भ्या वाटाया लागलया.. आपून आपल्या गावाकडं माघारी जाऊया.. . परश्याला सांगावा धाडू अन त्येला तूच गावाकडं ये बाबा  भेटायला असं सांगू.. . माझ्या सारखीची हि दुनिया न्हाई.. . इथं जल्माची लगिन घाई.. . कोन कुनाची चवकशी बी करीत न्हाई.. गेटवरचा वाॅचमेन लै आगाऊ.. आम्हालाच इचारतू अंदर आया काय कू.. . माझ्याच लेकराला भेटाया त्याची परमिशन लागती.. आरं म्या त्याची आय हायं धा वेळा सांगून झालं तरी बी  मलाच गुरगुरतो हमे क्यू बताती.. . परश्याला द्यायचा व्हता आक्रिताचा धक्का.. आयेला अडानी समजू नकु एकलीच शेहरात येऊन सायेबालाच येडं करील बरं का.. . परं इथं आल्यावर कळल़ वाटलं तेव्हढं सोपं न्हाई.. . आपलीच माणसं आपल्याला भेटाण्याला झाली पराई.. . गावं ते गावचं असतया.. येशीपासून ते म्हसोबा पतूर समंध्यास्नी पिरमानं पुसतया.. . शेहरात कोन कुनाची फुकापरी करील सरबराई.. . इमले आपला गावचं बरा बाई.. स्वर्गच खाली उतरून इथं आला बाई.. . आपल्या मातीशी नगं गं बेईमानी.. .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-१ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-१ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

त्यादिवशी जेवायला थालपीठ, भरीत, कांद्याची चटणी असा बेत होता.

हे म्हणाले ” आज काय कांदेनवमी आहे का ?”

मी नुसतीच हसले. कांदेनवमी करायला हल्ली चातुर्मास कुठे पाळला जातो?  पूर्वी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाल्यावर जेवणात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य  असे.  त्याच्या आधी कांदेनवमी  साजरी केली जायची. भाकरी, भरलं वांग, कांदा भजी, लसणाची चटणी असा बेत केला जायचा.

आषाढी एकादशीचा उपवास घरातल्या सगळ्यांना असायचा. पंढरपूरच्या पांडुरंगाची आठवण असो – नसो पण उपवास  आवडीने केला जायचा.

सकाळच्या फराळाला भगर, दाण्याची आमटी, रताळ्याचे गोड काप, बटाटा भाजी आणि तळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या असायच्या. आई आधीच बटाटा चिवडा करून ठेवायची. रात्री खिचडी, दही,  थालपीठ, साबुदाण्याच्या पिठाचा लाडू असा बेत केला जायचा. अक्षरशः एकादशी आणि दुप्पट खाशी असं होत असे. आदल्या दिवशी एवढं खाऊनही उपवास सुटायचा म्हणून दुसऱ्या दिवशी गोडधोडं केलं जाई.

आषाढ महिन्यात एकदा तरी  “आखाड तळणे ” हा प्रकार व्हायचा.  पाण्यात गुळ  विरघळून घ्यायचा त्यात  कणीक भिजवून त्याच्या जरा मोठा आकाराच्या शंकरपाळ्या केल्या जायच्या. त्या वरून कडक पण आतून नरम असायच्या. तीळ, ओवा घालून कडबोळी तळली जायची. कणकेत गुळ घालून गोड धीरडी केली जायची.

आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा असायची. घरातले एकूण एक दिवे घासून पुसून लखलखीत केले जायचे. पितळी दिवे चिंच लावून घासायचं काम मुलींचे असायचं. मग ते दिवे  पाटावर मांडून त्यांची हळदी कुंकु वाहून, हार फुलं, घालून  पुजा केली जायची. त्या प्रकाशाकडे बघताना खूप प्रसन्न  वाटायचं.

आषाढ संपायच्या आधीच घरोघरी श्रावणाचे वेध लागलेले असायचे. नागपंचमीला नागाची पूजा होत असे. दुध लाह्याचा नेवैध असायचा. त्याला थोड्याशा लाह्या लागायच्या. पण आई चांगला मोठा डबा भरून लाह्या फोडायची. पुढे बरेच दिवस त्याचा चिवडा, दहीकाला, लाडू केले जायचे. खालचे  “गडंग “थालपीठाच्या भाजणीत घातले जायचे.

नागपंचमीच्या दिवशी काही तळायचे नाही, भाजायचे नाही असा संकेत असायचा. पुरण न वाटता नुसते घोटून घ्यायचे. ते कणकेच्या लाटीत  भरून त्याचे उंडे केले जायचे. वाफेवर ते उकडायचे आणि साजूक तुपाबरोबर गरम खायचे.

श्रावणात खायची प्यायची चंगळ असायची. आई आजीचे दर एक-दोन दिवसांनी उपवास असायचे. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ केले जायचे. रताळ्याचा कीस, शेंगदाण्याचे लाडू, शिंगाड्याची खीर असे प्रकार व्हायचे.  राजगिरा घरीच फोडायचा. त्याच्या वड्या, लाडू करायचे. साबुदाण्याची जायफळ वेलदोडे लावून मोठं पातेलं भरून खीर केली जायची. ती गरम गरम वाट्या वाट्या प्यायली जायची.

श्रावणातल्या सोमवारच्या जेवणाची तर फार गंमत वाटायची. तो उपवास  संध्याकाळी  सोडायचा असायचा.  त्यामुळे शाळा लवकर सुटायची. दुपारीच आई  स्वयंपाकाला लागायची. खीर, शिरा, सांज्याची पोळी असा एखादा गोडाचा पदार्थ केलेला असायचा.

शंकराचं मोठं देऊळ असेल तिथे जत्रा भरायची. जेवण झालं की तिथे जायचं. दर्शनाला खूप मोठी रांग असायची. दर्शन केव्हा होतंय असं वाटायचं. कारण खरी ओढ जत्रेची असायची. टिणंटिणं, प्लास्टिकची दुर्बिण, रिबिनी, शिट्टी, भिरभिरं असं काही काही विकायला आलेल असायच. ते बघायला गंमत वाटायची.

त्यातल एखाद आई घेऊन द्यायची.

श्रावणात नात्यात, ओळखीच्या कुणाची तरी मंगळागौर दरवर्षी असायची. आदल्या दिवशी फुलं, पत्री गोळा करत हिंडायचं. ती ओल्या फडक्यात घालून ठेवायची. दुसऱ्या दिवशी पूजा, आरती धामधूम.. . चालायची.

झिम्मा, खुर्ची का मिरची, आगोटं पागोटं, नाच ग घुमा असे खेळ खेळायचे. म्हाताऱ्या बायकाही त्यात उत्साहाने सामील व्हायच्या.

एकमेकींना नाव घ्यायचा आग्रह व्हायचा. प्रसंगला साजेसे, मनाने रचलेले उखाणे लाजत लाजत घेतले जायचे. तो दिवस खास बायकांचा असायचा.

रात्रीच्या जेवणात मटकीची उसळ, नारळाच्या करंज्या, मुगाची खिचडी केली जायची.

श्रावणातल्या शुक्रवारला फार महत्त्व. त्या दिवशी माहेरवाशीण सवाष्ण म्हणून बोलवायची. गजरा, फुलं माळून, जरीची साडी, एखादा दागिना घालून ती यायची.

वरण, भात, कटाची आमटी, कुरडई पापड तळले  जायचे. तव्यावरची पुरणाची पोळी पानात पडायची. वर तुपाची धार.. खणा नारळाने तिची ओटी भरली जायची. तिचं मन आनंदुन जायचं. ही प्रथा किती छान आहे  ना. त्यामुळे स्त्रीकडून स्त्रीचा सन्मान केला जातो.

सकाळीच “शुक्रवारचे गरम फुटाणे” असे ओरडत फुटाणेवाला यायचा. संध्याकाळी बायका हळदी कुंकवाला यायच्या. त्यांना गरम दूध, फुटाणे दिले जायचे. पावसाळी हवेत फुटाणे खाल्ले की सर्दी होत नाही अस आजी सांगायची.

रविवारी आईचं सूर्यनारायणाचं व्रत असायचं. पहाटे कुणाशी न बोलता मुक्याने ते व्रत करायचं असायचं. सूर्यनारायण यायच्या आधी आई उठून  पूजेला लागायची. पाटावर रक्त चंदनाने सूर्यनारायण काढलेले असायचे. पूजा झाली की आई कहाणी वाचायला बसायची. ती ऐकल्यावर आम्हाला दूध मिळायचे. तशी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर पाटावर बसून त्या त्या वाराची कहाणी वाचली जायची.

श्रावणातल्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा येते. नारळी भात वर्षातून एकदा म्हणजे त्यादिवशी व्हायचा. बदाम, काजू, लवंग, वेलदोडे, ओलं खोबरं   घातलेला तो सोनेरी भात आवडीने खाल्ला जायचा.  रक्षाबंधनात देण्या घेण्याची पद्धत त्याकाळी फार  नव्हती. भावाला राखी बांधायची याचं महत्त्व असायचं.

श्रावणात घरोघरी सत्यनारायण असायचे. त्याचा दुधातला, केळी घातलेला  प्रसादाच्या  शिऱ्याची चव अफलातुन असायची. त्यात एक वेगळा गोडवा असायचा.

त्या दिवसात नारळ स्वस्त असायचे. आई त्याच्या वड्या  करायची. खोबरं घालून दडपे पोहे व्हायचे. खोबऱ्यात खवा आणि रंग घालुन वड्या केल्या  की आई त्याला बर्फी म्हणायची.

बैलपोळ्याचा सण ठराविक लोक साजरा करायचे. दरवर्षी आईला तिच्या माहेरच्या बैलांची आठवण यायची. त्यांचं कौतुक ती आम्हाला सांगायची. मातीचे बैल आणून पाटावर मांडून ती त्यांची पूजा करायची. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायची. दिवसभर आईला शेत, विहीर, मोट, पीकं, पाणी यांची आठवण येत असायची.

पिठोरीची पूजा होऊन  श्रावण संपायचा.

– क्रमशः भाग पहिला.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares