मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि मी… एक आठवण—’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि मी… एक आठवण — ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आषाढ सरला श्रावण आला. कॅलेंडरचं पान उलटलं, आज नागपंचमीचा सण– लक्षात आल आजच्या दिवशी तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आहे. त्यांची शुभ प्रभात शुभेच्छामय करावी म्हणून मी फोनकडे धावले. पलीकडून खणखणीत आवाज आला, “‘ गुरुकन्या? सिंहगड रोड ना हो? “

“हो बाबासाहेब, मी तुमच्या माजगावकर सरांची कन्या. ” मी होकार भरला.

बरं का मंडळी ! बाबासाहेब नेहमी याच नावाने माझा आवाज ओळखायचे मी नवलाईने विचारल, ” बाबासाहेब  तुम्ही कसं ओळखलंत माझा फोन आहे ते?” इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की आपण वयानी कितीही लहान असलो तरी बाबासाहेबांच्यातला विनय, प्रत्येकाला “अहो जाहोच” म्हणायचा. ते म्हणाले, “अहो अस्मादिकांचा आज जन्मदिवसआहे ना ! पेपरवाले  इतर काहीजण तारखेने माझा वाढदिवस साजरा करतात, पण नागपंचमी  तिथी साधून  तुमच्यासारखे हितचिंतक याच दिवशी मला भेटायला येतात. पण खरं सांगू, तुमच्या वडिलांनी, माझ्या गुरूंनी, म्हणजे माननीय   माजगावकर सरांनी शाळेत साजरा केलेला तो वाढदिवस कायम माझ्या मनांत कोरला गेला आहे. आत्ता मी तोच प्रसंग मनामध्ये आठवत होतो, आणि काय योगायोग बघा गुरूंच्या मुलीचा म्हणजे लगेच तुमचा फोन आला. मी तर म्हणेन तुमच्या आवाजात माझ्या सन्माननीय सरांनी हा शुभ संदेश माझ्यासाठी पाठवला असावा. “असं म्हणून श्री बाबासाहेब प्रसन्न- प्रसन्न हंसले. मलाही माझ्या वडिलांची आठवण झाली. आणि हो इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की शिवशाहीर, पद्मभूषण, प्रसिद्ध इतिहासकार, श्री बाबासाहेब पुरंदरे हे माझ्या वडिलांचे म्हणजे श्री. माजगावकर सरांचे अतिशय आवडते पट्ट शिष्य होते.

माझ्याशी बोलतांना बाबासाहेब मागे मागे अगदी बालपणात, भूतकाळात, शालेय जीवनात शिरले, आणि मला म्हणाले, ” काय सांगू तुम्हाला ! माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि बालमनांत कायम ठसलेला असा तो वाढदिवस श्री. माजगावकर सरांनी आणि माझ्या वर्ग मित्रांनी दणक्यात साजरा केला होता.

” तो प्रसंग जणू काही आत्ताच डोळ्यासमोर घडतोय. अशा तन्मयतेने  बाबासाहेब बोलत होते. इकडे माझीही उत्सुकता  वाढली.  आणि मी म्हणाले, ” बाबासाहेब मलाही सांगा ना तो किस्सा, माझ्या वडिलांची आठवण ऐकायला मलाही आवडेल “. खुशीची पावती मिळाली आणि ते पुढे सांगायला लागले,

” माझ्या वर्गमित्रांकडून सरांना माझ्या वाढदिवसाबद्दल कळले होते. त्यावेळी आत्तासारखा वाढदिवसाचा धुमधडाका नव्हता. औक्षवण हाच उत्सव होता. नव्या पोषाखात कपाळाला कुंकूम तिलक लावून मी वर्गात शिरलो, आणि सरांनी टाळी वाजवली. त्यांच्यात आधी ठरल्याप्रमाणे कदाचित तो वर्गाला इशारा असावा, कारण एका क्षणात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सारा वर्ग त्या कडकडाटाने दुमदुमला, अक्षरशः दणाणला. अनपेक्षित झालेल्या या प्रकाराने मी गोंधळलो, हा काय प्रकार आहे म्हणून बावचळलो. सर हंसून पुढे झाले. त्यांनी मला जवळ घेतल, आणि म्हणाले, ” पुरंदरे आज वाढदिवस आहे ना तुझा? वर्ग मित्रांकडून तुला शुभेच्छा आणि माझ्याकडून तुला, हा घे खाऊ. “असं म्हणून श्रीखंडाच्या गोळ्या त्यांनी माझ्या हातावर ठेवल्या. “बाबासाहेब पुढे सांगू लागले, “अहो काय सांगू तुम्हाला, सरांनी दिलेल्या त्या श्रीखंडाच्या गोळीत अख्ख भूखंड सामावलं होत.  वर्ग मित्रांच्या टाळ्या, मनापासून दिलेली ती दाद, शंभर हातांकडून  मला शतशत शुभेच्छा मिळाल्या होत्या अजूनही तो आवाज माझ्या कानात घुमतो, आतापर्यंत छत्रपतीशिवाजी महाराजांबद्दल भाषण करून खूप टाळ्यांचा वर्षाव मी मिळवला. पण खरं सांगू! त्या वर्ग मित्रांच्या टाळ्यांची सर नाही येणार कशाला आणि सरांच्या त्या छोट्या एक इंचाच्या  गोळीपुढे ताटभर आकाराचा डेकोरेशन केलेला केकही  फिक्का पडेल. ” शिवशाहीर  त्या आठवणीत रमले होते, त्यांच्या आवाजात खंत जाणवली. ते म्हणाले “दुर्दैवाने आज ते सर, तो वर्ग, ते वर्गमित्र, आता आपल्यात नाहीत, पण ती आठवण दर वाढदिवसाला नागपंचमीला मी मनात  आठवतो. ” 

… हे सगळं मला सांगताना श्री बाबासाहेब गहीवरले, माझाही कंठ दाटून आला. आणि आम्ही फोन खाली ठेवला.

… धन्य ते माझे वडील, आणि धन्य ते गुरु शिष्याचं नातं जपणारे  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ही अचानक मिळालेली एवढी रक्कम फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचे वर्षभर माझी जमाखर्चातली तूट भरून काढायला पुरेशी ठरणार होती. नेमक्या गरजेच्या क्षणी जादूची कांडी फिरावी तसा घडलेला हा योगायोग श्रद्धेबरोबरच ‘त्या’च्याबद्दलची कृतज्ञता दृढ करणारा जसा होता तसाच यापुढे दर पौर्णिमेला

दत्तदर्शनाच्या बाबतीत कधीच कसलीच अडचण येणार नाही असा विश्वास निर्माण करणाराही! पण पुढच्याच पौर्णिमेच्यावेळी एक वेगळंच आक्रित माझी खऱ्या अर्थाने कसोटी पहायला समोर उभं ठाकणाराय याची मला या क्षणी कल्पना कुठून असायला?)

पुढची पौर्णिमा मंगळवारी होती. यावेळी ब्रॅंचमधील कांही महत्त्वाच्या कमिटमेंट्समुळे रजा न घेता मला नृ. वाडीला देवदर्शन घेऊन परस्पर महाबळेश्वरला परत यावं लागणार होतं. कोल्हापूरला घरी आधीच तशी कल्पना देऊन ठेवली तेव्हा ‘ रात्री उशीर झाला तर सांगलीला मुक्काम करून सकाळच्या पहिल्या बसने महाबळेश्वरला जा’ असं मिसेसने मला आवर्जून सुचवलं. सांगलीला म्हणजे तिच्या माहेरघरी. ‘तुम्ही पौर्णिमेला नृ. वाडीहून उशीरा तिथे घरी पोचाल असं मी आईबाबांना कळवून ठेवतेय’ असंही ती म्हणाली होती. पुरेशा विश्रांतीसाठी मलाही तेच सोयीचं होणार होतं.

एरवी निघायच्या दिवशी नेहमी या ना त्या कारणाने शेवटच्या क्षणापर्यंत माझी खूप धावपळ होत असे. प्रत्येकवेळी घाईघाईत बस पकडायची म्हणजे एक दिव्यच असायचं. पण यावेळी कसं कुणास ठाऊक पण बाहेरचा धुवांधार पाऊस सोडला तर बाकी सगळं रुटीन अनपेक्षितरित्या खूपच सुरळीत सुरु होतं. त्या दिवशी ब्रॅंचमधेही कामाची फारशी दडपणं नव्हती. दिवसभरातली माझी सगळी कामं व्यवस्थित आवरून, कॅश क्लोज करुन दुपारच्या सव्वातीनच्या सांगली बससाठी मी स्टॅण्डवर पोचलो तेव्हा बस नुकतीच लागत होती. घाईगडबड न करताही बसायला चांगली जागा मिळाली. इथवर सगळं सुरळीत झालं तरी घाटरस्त्यातून मात्र प्रचंड पावसामुळे बस मुंगीच्या गतीनेच पुढे जात होती. त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा बस सातारा स्टॅंडला थोडी उशीराच पोचली. सांगलीला बस बदलून नृ. वाडीला पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजून गेले होते. बसमधून उतरलो तेव्हा नृ. वाडी स्टॅण्डवर शुकशुकाट होता. पौर्णिमेच्या रात्री एरवी स्टॅण्डवर बऱ्यापैकी गर्दी असे. त्यामुळे आजची ही सामसूम अनाकलनीयच वाटत राहिली. मंदिरात पोहोचेपर्यंत पालखी संपून शेजारतीची तयारीही सुरु झालेली होती. तरीही देवासमोर फारशी गर्दीच नव्हती. खूप वर्षांनंतर इतकं छान, व्यवस्थित दर्शन झाल्याचं समाधान मिळालं खरं पण पौर्णिमा असूनही देवासमोर भाविकांची कांहीच गर्दी नसण्यामागचं कारण मात्र उमगलं नव्हतं. सांगलीला सासुरवाडीच्या घरी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. तोवर सकाळपासून क्षणभरही विश्रांती नसल्याने आणि सलगच्या दीर्घ प्रवासामुळे कांहीसा थकवाही जाणवत होताच. आतले लाईट बंद असल्याचे जाणवले. कदाचित मी येणार असल्याचा निरोप त्यांना मिळालेल्या नसायची शक्यता पुसटशी जाणवताच मला संकोचल्यसारखं वाटत राहिलं. त्याच अनिश्चिततेत दारावरची बेल वाजवली. पण अपेक्षित असणारा तात्काळ प्रतिसाद मिळालाच नाही. क्षणभर वाट पाहून मी पुन्हा बेल वाजवली. एकदा. दोनदा. आत कुजबूज झाल्याचं न् मग लाईट लागल्याचं अंधुक जाणवलं. दार उघडण्याआधी सासऱ्यांचा ‘कोण आहे?’ हा प्रश्न आणि पाठोपाठ त्यांनी दाराऐवजी जवळची खिडकी उघडल्याचा आवाज या दोन्ही गोष्टी मला बुचकळ्यात टाकून गेल्या. खिडकीतून मला पहाताच सासऱ्यांनी घाईघाईनी दार उघडलं. ते कांहीसे ओशाळवाणे झाले. तरीही “या.. या.. ” म्हणत त्यांनी हसतमुखाने स्वागत केले

“फार उशीर झाला ना मला?” मी विचारलं.

“छे छे… उशीर कसला?पण रात्री दहापर्यंत सगळं आवरतं ना, मग उगीच जागरण करत करायला बसायचं, म्हणून रोज लवकर झोपतो एवढंच. पौर्णिमा उद्या आहे, म्हणून तुम्ही उद्या रात्री येणार असंच आम्ही गृहीत धरलं होतं. पण हरकत नाही. या”

त्यांचं बोलणं ऐकून मी विचारात पडलो. हे असं कां म्हणाले कळेनाच. पौर्णिमा आजच तर आहे. उद्या कशी?’ मला प्रश्न पडला. तोवर सासुबाईही बाहेर आल्या. “हातपाय धुऊन धुवून कपडे बदला न् या लगेच. तोवर मी पान वाढते” त्या अगत्याने म्हणाल्या.

मी जेवायला बसलो पण मन मात्र कांहीतरी चुकल्यासारखं अस्वस्थच होतं. शिळोप्याच्या गप्पात जेवण आवरलं. हात धुवून समोरचा नॅपकीन घेत असतानाच भिंतीवर लटकणाऱ्या ‘कालनिर्णय’नं माझं लक्ष वेधून घेतलं. जवळ जाऊन मी कॅलेंडरचं पान लक्षपूर्वक पाहिलं. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला गाढ झोपेतून कुणीतरी हलवून जागं करावं तसा मी भानावर आलो. नृ. वाडी स्टॅंडवर आणि देवळात देवासमोरही भाविकांची गर्दी नसण्यामागचं कारण आज पौर्णिमा नसणं हेच होतं हे ‘कालनिर्णय’ मला स्पष्टपणे सांगत होतंच. पण… असं होईलच कसं? आमच्याकडे घरी कालनिर्णयच तर होतं. आपण नेहमीसारखं व्यवस्थित कॅलेंडर बघूनच सगळं प्लॅनिंग केलं होतं मग असं कसं शक्य आहे हे क्षणभर मला समजेचना. मी सहज म्हणून पुढचं पान पाहिलं न् मनातली साशंकता नाहिशी झाली.

का, कसं माहित नाही पण तिकडं घरी कॅलेंडर बघताना माझीच चूक झाली होती!यावेळची पौर्णिमा आज नव्हतीच. उद्याच होती!! सकाळपासूनची माझी धावपळ आठवून मला स्वतःचाच राग आला आणि कींवही वाटत राहिली. वरवर शांत रहात मी स्वत:ला सावरलं.

“खरंच. कॅलेंडर बघताना माझीच गफलत झालीय. तुमची मात्र विनाकारण झोपमोड”

“अहो असू दे. झोपमोड कसली?आज काय न् उद्या काय तुम्ही आलात याचाच आनंद आहे” सासरे मनापासून म्हणाले.

“तर काय?वाईटातून चांगलं शोधायचं बघा” सासुबाई म्हणाल्या. “या महिन्यात तुम्हाला दोनदा दत्तदर्शनाचा योग आलाय. चांगलंच आहे की. “

“म्हणजे.. ?” मी न समजून विचारलं.

 ” आता आलात तसं उद्याचा दिवस रहा सकाळी आंघोळ, नाश्ता सगळं आवरुन मग वाडीला पौर्णिमेचं दर्शन घेऊन या. जेवण करुन दिवसभर आराम करा. मग दुसऱ्या दिवशी पहाटे जा हवंतर. एरवी तुमचं येणं रहाणं होतंय कुठं?” त्या आग्रहाने म्हणाल्या.

मी कसनुसा हसलो. रहाणं तर मला शक्य नव्हतंच. कारण कॅशची दुसरी किल्ली माझ्याजवळ होती. आणि तसंही इतर महत्त्वाच्या कमिटमेंटस् होत्याच. त्यात तडजोड करणं मला शक्यही नव्हतंच आणि योग्यही. कोणत्याही परिस्थितीत कॅशअवर्स सुरू होण्यापूर्वी ब्रॅंचला पोचण्यासाठी मला उद्या पहाटेच्या बसने महाबळेश्वरसाठी निघणं आवश्यकच होतं. हे सगळं त्या दोघांना मी मोकळेपणानं समजून सांगितलं आणि तेवढ्यापुरता विषय तिथंच थांबवला.

या महिन्यात आपला पौर्णिमेचा नेम आपल्याच चुकीमुळे अंतरणार असल्याची खंत मनात घेऊन मी अंथरुणाला पाठ टेकवली. दिवसभराची धावपळ, दगदग, थकवा सगळं क्षणात विरुन जात मनातली ती खंतच मला त्रास देत राहिली. शांत झोप लागलीच नाही. पहाटे उठून सगळं आवरलं. निघताना दोघांना वाकून नमस्कार केला. बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात सासऱ्यांनी थांबवलं.

“जपून जा. तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देताय हेच योग्य आहे. देवधर्म, सेवा, श्रद्धा हेही महत्त्वाचं आहेच. पण त्यासाठी विनाकारण ओढ करुन घेऊ नका. तब्येत सांभाळून रहा. “

ते बोलले त्यात वावगं काहीच नव्हतं. त्या बोलण्या-सांगण्यात वयाच्या अधिकाराचा तर लवलेशही नव्हता. माझ्यावरील प्रेमापोटीच ते मायेने, आपुलकीनेच हे सगळं सांगत होते. मी मनापासून ‘हो’ म्हणालो.

“आणखी एक. मनात आलंय ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांना पोचल्यात आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन, दिवसभर काम करुन, तुम्ही पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. उगीच दगदग नका करु. “

मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत घडलेल्या का होईना पण आपल्याच चुकीमुळे आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. अशा मन:स्थितीत सासऱ्यांच्या मार्फत दत्त महाराजांनीच मला दिलेला माझ्या संकल्पपूर्तीस पूरक ठरणारा संकेत मात्र मला त्याक्षणी जाणवलाच नव्हता.. !हातातून कांहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झालं होतं. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरु झाला !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिवस आपल्यासाठी उगवतोच…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “दिवस आपल्यासाठी उगवतोच…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता. आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो. तो आमच्याच गल्लीत राहायला होता. आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा. मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या. आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. जणू पैलवानच. म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं. आणि पोरं त्याच्या गुडघ्याला. अंगाने दणकट असणारा नाना. पण अभ्यासात पार दरिंद्री. नानाला काहीच येत नव्हतं. आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.

त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची. त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे. आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची. पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा. आणि पोरं पण नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची. नाना डोळे गच्च मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा. पोरांनी कधीच नानावर दया माया दाखवली नाही. मला मात्र नानाची फार कीव यायची. कारण नानाला कशाचंच उत्तर यायचं नाही.

तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा. उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा. सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा. आणि शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लालभडक सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे. एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारलं, म्हणलं “नाना कशाला शाळेत येतो?तुला काही येत नाही. रोज पोरं मारतात तुला. तू कुणाला काहीच बोलत नाहीस. मला कळत नाही एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवत नाहीस. कशासाठी हे तू करतोस. ?” त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळुवार बोटे फिरवली. माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले. डोक्यावरचा हात काढून घेतला आणि नाना तसाच पाठमोरा होऊन झपझप पावले टाकत निघून गेला. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नानाने दिलं नाही.

रोज शाळा भरत राहिली. आणि रोज नाना न चुकता मार खात राहिला. तोंड सुजवून घेत राहिला. मास्तरने प्रश्न विचारला की आपोआप नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटून. आणि मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानाजवळ जायचं आणि खाडकन नानाच्या जोरात मुस्काडीत द्यायचं. पाचही बोटे नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची. एवढ्या धिप्पाड नानाला मारलेल्या आनंदाने ते पोरगं लै उड्या मारायचं. आणि सगळी पोरं नानावर खी…खी…खीं.. दात इच्कुन माकडासारखी हसायची. आणि मी हे सगळं केविलपणे बघत बसायचो.

पण एक दिवस घडलं असं, मास्तरने एक प्रश्न विचारला, तो प्रश्न असा होता.

“गावाबाहेर बायका जिथं धुणं धुवायला जातात, त्या जागेला काय म्हणतात. ?”

आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली, कुणी सांगितलं, ओढा म्हणतात, नदी म्हणतात, वगळ, आड, विहीर, तलाव, तळं, डबकं, पोहरा म्हणतात तर कुणी कुणी खूप डोकं खाजवून काहीही उत्तरे दिली. पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते. नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता. सगळ्यांची उत्तरे चुकलेली होती. गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला. जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरं एकसाथ मान वळवून नानाकडे बघायला लागली. मास्तर ही नानाकडे एकटक बघतच राहिले. कारण आज पहिल्यांदाच नानाने बोट वर केलेलं होतं.

 त्याच शांततेत नाना उभा राहिला. आणि हाताची घडी घालून नानाने मान ताठ करून उत्तर दिलं,

“गुरुजी गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुणं धुतात त्या जागेला पाणवठा म्हणतात. “

आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले, ”नाना लेका तुझं उत्तर बरोबर आहे”. मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला. गेल्या सहा वर्षांनंतर आज आज नानाचं उत्तर बरोबर आलेलं होतं. आणि नियमानुसार आज नाना सगळ्यांच्या मुस्काडीत मारणार होता. नानाचा एक हात किमान बारा किलो वजनाचा तरी नक्की असावा. त्याचं ते रूप बघून वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली. पळून जाण्यासाठी दफ्तर आवरायला लागली. नानाच्या लक्षात आलं. आणि पटकन दाराकडे धाव घेत वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली. त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली. कारण नानाचा दणका बसल्यानंतर आयुष्यातून उठणार याची जाणीव प्रत्येकाला झालेली होती.

मी शांतपणे नानाकडे पाहत होतो. मलाही एक त्याची मुस्काडीत बसणार होतीच. पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो. नानाचा चेहरा लालबुंध झाला होता. त्याचा हात सळसळत होता. डोळे मोठे झाले होते, आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता. मास्तरानीच नियम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवूच शकत नव्हते. तरीही नानाचा तो राग पाहून मास्तर दबकतच हळूच नानाला म्हणाले, “नाना जाऊ दे सोड लेकरं लहान….. ” मास्तरचं वाक्य पूर्ण झालंच नाही. तोच नानाने अक्षरशः मास्तरला लहान मुलासारखं दोन्ही हाताने उचलून घेतलं आणि अलगद खुर्चीवर नेऊन ठेवलं. मास्तर घाबरून शांत बसले.

त्यानंतर गेल्या जवळजवळ सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला. नानाने वर्गावर नजर फिरवली. त्याला आठवू लागलं. कुणी कुणी कसं हानलेलं आहे. कुणी किती छळेलेल आहे हे सगळं नानाने डोक्यात फिट्ट केलेलं होतं. नाना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आग फेकून पाहू लागलेला होता. पोरं हात जोडून ओरडत होती. नव्हे बोंबलत होती. मास्तरला विनवण्या करत होती. पण मास्तरचा नाईलाज होता.

नानाने सुरवात केली. एक एक पोरगं कॉलरला धरून नानाने उभं केलं नाही तर एका हाताने उचलून धरलं. आणि दुसऱ्या हाताने नानाने असं झोडपून काढायला सुरवात केली की बस्स. एका मुस्काडीत पोरगं भिंतीवर जाऊन आदळत होतं. आणि आडवं होऊन पडत होतं. ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलत होते. नाना पेटलेलाच होता. सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला. त्याच्या एका रट्याने पोरं चड्डीत मुतून मुतून बोंबलत होती. काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करत होती. मास्तर हात जोडून वर बघून काहीतरी डोळे झाकून बडबडत होते. नाना कुणाला सुट्टी देत नव्हता.

मी कधी नानाला मारलं नव्हतं. म्हणून नानाने माझ्या फक्त गालावर हात फिरवला. सगळ्यांना झोडपून झाल्यावर नाना त्याच्या जागेवर जाऊन बसला. सगळा वर्ग हमसून हमसून रडत होता. आणि नाना त्याच्या फुटलेल्या मिशिवर ताव मारत सगळीकडे बघत बसला होता. पोरं एकमेकांना सावरत होती. मास्तर टेबलावर मान टाकून गप्प पडून बसलेलं होतं.

मी हळूच नानाला चोरून पाहत होतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याचा असा हसरा आणि सुंदर चेहरा आज मी पहिल्यांदा बघत होतो.

शाळा सुटली. रोज दंगा करत धावत पळत जाणारी पोरं जागेवरच बसून राहिली. फक्त नाना उठला आणि माझ्याजवळ आला. माझ्या हाताला धरून त्याने मला उठवलं. मी त्याच्यासोबत बाहेर आलो. त्याने त्याचं दफ्तर मला दिलं. आणि म्हणाला, “ राहू दे आता तुलाच दफ्तर, मी शाळा सोडली आजपासून. उद्यापासून येणार नाही. तू मला विचारलं होतं ना की शाळा का सोडून देत नाहीस? तर यासाठी सोडत नव्हतो. कारण मला माहित होतं. एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. एक ना एक दिवस तरी माझ्यासाठी दिवस उगवल. त्या दिवसाची वाट बघत होतो. आणि आज तो दिवस आला. ” माझ्या नाजूक गालावर त्याने हात फिरवला. आणि नाना शाळेच्या मैदानातून शांतपणे निघून गेला.

दोस्त हो, गोष्ट संपली. पण फार मोठी शिकवण नानाने दिली. जोपर्यंत सहन करायचा काळ असतो तोपर्यंत सहन करत रहा. कारण आपला दिवस येणारच असतो त्या दिवसाची वाट पहात रहा.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “याला म्हणतात नशीब ”… लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “याला म्हणतात नशीब ”… लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन.

नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल, तर ती घडून राहते. राजाच्या घरात जन्माला येऊनही, एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते. पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एक अनाथ मुल ही मोठं इतिहास घडवून जातं. जेव्हा आपल्याला हे समजतं, तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात येते.

पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई-वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं. पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं. आज या मुलीला जन्म देणारे आई-वडील आतल्या आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत.

ही गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू (Lisa Sthalekar) लीजा स्टालगरची.

१३ ऑगस्ट १९७९ रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लीजाचा जन्म झाला. लीजाचा स्वीकार करणं, तिच्या आई-वडिलांना शक्य नव्हतं, ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवास्तव अनाथालयात या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं.

त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देश भ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला पहिल्या पासून एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी ‘सू’ ची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सू ला तिच्या प्रेमात पाडलं.

कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. ‘सू’ ने लैलाच नाव बदलून ‘लीज’ केलं. ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं.

हरेनने लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजने क्रिकेट सुरु केलं. नंतर पुढ जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजला क्रिकेटचा प्रचंड वेड होतं. पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकच महत्त्व दिलं. लीजने अभ्यासा बरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरु ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीजपेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती.

पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं, अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. आई-वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली.

हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली. आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते.

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वयंपाकातील शब्द आटले…” – लेखक : श्री संजीव साबडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वयंपाकातील शब्द आटले…” – लेखक : श्रीसंजीव साबडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये असताना रेणुका खोत माझी सहकारी होती. फेसबुकवर तिच्या अनेक पोस्ट असतात. एका पोस्टमध्ये तिने गमतीने ‘विसळुनी डोळे’ असा शब्दप्रयोग केला. ते वाचताना आपण हल्ली विसळणे हा स्वयंपाक घरातील शब्द वापरेनासे झाल्याचं जाणवलं.

पूर्वी जी भांडी घासायची नसत ती विसळत. म्हणजे चहाचा कप व बशी वगैरे. भांडी घासली जात. आता अनेक जण ‘भांडी धुतली’ असं म्हणतात. खरं तर ती घासून मग धुवायची असतात. कपडे धुवायचे असतात, लादी पुसायची असते. भाजी चिरायची असते. आता ती कापली असं म्हणतात. चिरण्यासाठी विळी लागते, काही विळींना नारळ खवण्याची सोय असे. सुरी कापण्यासाठी. फळं कापली जातात. तिचाही उल्लेख चाकू होतो बऱ्याचदा.

पालेभाज्या ‘निवडून’ ठेवत, आता त्या ‘साफ करतात’. शेंगा, मटार, कणीस सोललं असंही ऐकू येत नाही फारसं. पूर्वी चिरलेली वा निवडलेली भाजी ‘निथळत’ ठेवत. देठ हा शब्द आता फक्त ‘पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा’ या गाण्यातच राहिलाय.

‘चहाचं आधण’ हाही शब्दही गायब झाला. पूर्वी ‘दूध उतू येत’ असे, आता ते ‘वर’ येतं. तेव्हा ते पातेलं खाली उतरवलं नाही तर दूध आटतं, पातेल्याला लागतं आणि काही वेळा करपतं. ताकासाठी दही रवीने घुसळत, आता दह्याचं ताक केलं म्हटलं जातं आणि दह्याची बरणी नसते. चहात साखर, आमटी वा भाजीत मीठ मिसळू दे, असं फार कोणी म्हणत नाही. ‘परतताना’ भाजी ‘हलवतात’, आमटी किंवा पातळ भाजी डावाने ‘ढवळतात’.

चिनी मातीची बरणी खूप कमी घरात असते. पूर्वी लोणी कढवून तूप केलं जात असे. दही लावण्यासाठी विरजण नसेल, तर ते शेजारून आणलं जाई. कढवणे, कढ येऊ देणे, विरजण, केर या शब्दांचा वापर शहरात खूपच कमी झाला आहे.

मसाल्यांच्या डब्याला ‘मिसळणीचा’ किंवा ‘मिसळणाचा डबा’च म्हटलं जाई. चमचे, पळी, डाव, झारा, उलथणं याला आता ‘चमचाच’ म्हणतात. पातेले ऐकू येत नाही. त्यालाच ‘भांडं’ म्हटलं जातं. पेला शब्द तर जणू हद्दपारच झाला. काही घरात वाटीला ‘बाउल’ म्हणतात. पूर्वी घरात खल-बत्ता, पाटा-वरवंटा व काही घरात रगडा असे. आता तो नसतो आणि ते स्वाभाविक आहे आणि असले तर ते अडगळीत पडलेले असतात. पाखडण्यासाठी लागणारं सूपही नसतं शक्यतो. पीठ चाळण्यासाठीची चाळणी नसते.

हे सारं ‘विसळुनी डोळे’ मुळे झालं. तरी हे फक्त स्वयंपाक घरातील. त्याखेरीज विंचरणे, भांग पाडणे असे वेगळेच. अडगळीत गेलेले असे अनेक शब्द तुम्हालाही आठवत असतील. ते तुमच्या घरी वापरात असतील, तर उत्तमच! हे शब्द आटता कामा नयेत.

लेखक: श्री संजीव साबडे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘निसर्ग‘ वादळ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘निसर्ग‘ वादळ…  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कोकणाने आजपर्यंत अनेक नैसर्गिक आणि अनैसर्गिक वादळे बघीतली, कधी ती खरीखुरी नैसर्गिक होती तर कधी अनैसर्गिक, कधी ती राजकीय होती तर कधी अराजकीय…. ! या सर्वांचा जनजीवनावर कमीअधिक प्रमाणात प्रभाव देखील पडला, परंतु चार दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग वादळ मात्र ‘न भूतो….. ‘ असेच होते हे कबूल करावे लागेल.

निसर्ग वादळ येणार अशी सूचना आधी एकदोन दिवस विविध पातळ्यांवर मिळतं होती. शासन, प्रशासन, प्रसारमाध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुरेशी खबरदारी घेतली होती. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उत्तम नियोजन आणि कार्यवाही केली होती, यासाठी ते सर्वअभिनंदनास पात्र आहेत. स्थानिक पातळीवर मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. सरपंच, मा. तलाठी आणि इतर कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यांच्या कार्यास माझ्या सादर प्रणाम!!

खास करून अलिबाग, थळ, नागाव, रेवदंडा आदी भागात दरवर्षी वृक्ष उन्मळून पडतात, नारळ-सुपाऱ्या पडतात, पण हे वादळ मात्र अफाट असेच होते, वाऱ्याचा वेग बेफाट होता, असे वादळ या आधी बघितलेला एकही मनुष्य गावात सापडला नाही. रायगड जिल्ह्यात १९८९, २००५ साली मोठे पूर येऊन गेले, परंतु त्यावेळेसही इतके वृक्ष पडले नव्हते. यावेळची हानी प्रचंड आहे, काही भागात तर ५०% लागवड जमीनदोस्त झाली आहे, ‘पुनश्च हरी ओम… ‘ करण्याची वेळ आली आहे…. !

ही भगवान परशुरामाची भूमी असल्याने हार न।मानणं हा इथला स्थायी भाव आहे. परमेश्वराच्या कृपेने ‘निसर्गा’ने इतके थैमान घातले असतानाही जीवित हानी बिल्कुल झाली नाही. याबद्दल परमेश्वराचे आभार मानावेच लागतील.

साधारण सकाळी ११ वाजता ‘वादळ’ घोंघावू लागले…. ! सुरुवातीला वेग कमी होता, मनात सारखे येत होते की हे चक्रीवादळ आहे, त्यामुळे काहीतरी चमत्कार होईल आणि हे वादळ उलट फिरून परत समुद्रात जाईल, परंतु विधात्याची इच्छा रायगड किनारपट्टीची स्वच्छता करावी अशी होती. त्यामुळे पुढचे पाच तास ते वादळं आमच्या भागात सातत्याने आदळत राहिल….. घोंघावणारा वाऱ्याचे वर्णन पुस्तकातील वर्णन आणि प्रत्यक्ष अनुभूती यात जमीन अस्मानाचा फरक आढळला. ‘कवी’ला कितीही विशाल दृष्टि असली तरी निसर्ग चे वर्णन करण्यात ते कमीच पडला, असे म्हणावे लागेल. नारळाची झाडे बाहुबली चित्रपटातील ताडांप्रमाणे खाली व वाकत होती आणि पुन्हा वरती जात होती. वारे चहुबाजूंनी फिरत होते, झाडे, पाने, फुले, वारा एका विशिष्ट लयीत नर्तन करीत होता, ‘निसर्गा’चे आणि निसर्गाचे ‘भेसूर’ (बेसूर नव्हे!) संगीत ऐकायला मिळत होते.

वादळाच्या आदल्या रात्री झोपताना नेहमीप्रमाणे सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना केली. त्यादिवशी ची प्रार्थना थोडी वेगळी होती. त्यांना म्हटलं, ‘इथे तुमच्या घरात रहातो, तिथेही तुमच्या घरी रहायचं आहे, तुम्हाला योग्य वाटतं त्या घरात ठेवा. ‘ मग निश्चिन्त मनाने झोपी गेलो. त्या प्रार्थनेने मात्र मला खूप बळ दिले. सद्गुरुंची कृपा झाली त्यामुळेच मी या ‘निसर्गा’चा आनंद घेऊ शकलो. सोसाट्याचा वारा कसा असतो ते बघता आले, मोठमोठाले वृक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पडू शकतात, याचे प्रात्यक्षिक बघता आले, हे सर्व अनुभवत असताना सद्गुरुंच्या कृपेने मनात भितीचा लवलेश ही नव्हता. अनेकांचे फोन येत होते, त्यांची काळजी स्वाभाविक होती, परंतु संकट काळात नामासारखे सोबती नाही याची प्रचिती वादळाच्या दिवशी पुन्हा एकदा आली. सद्गुरुंना शरण गेले की ते सांभाळतात हेच खरे!!!

वादळाने केलेलं नुकसान भरून काढायला अनेक वर्षे जातील, पण आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा लागवड करू आणि पुन्हा लोकांना आंबा, फणस, नारळ सुपारीचा पुरवठा करू. सरकारी मदत मिळेल, ती किती असेल याचा अंदाज सर्वांना असेलच. पण या संकटाच्या काळात ज्यांनी ज्यांनी अकृत्रिम स्नेहाने, अतीव आपुलकीने चौकशी केली, काळजी घेतली, यथाशक्ती मदत केली, आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, या सर्वांच्या जोरावर आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि परत उभारी घेऊ असा विश्वास आहे.

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

*

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

*

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

*

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

*

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

*

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,

*

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !

– कुसुमाग्रज

वादळाचा फटका जसा झाडांना बसला, घरांना बसला तसा तो ‘जनमानसा’ला ही बसला आहे. यावर ‘काळ’ हेच उत्तम औषध आहे.

वादळाने एक गोष्ट नक्की शिकवली ती म्हणजे * ‘ यह कभी भी बदलेगा ‘ !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असंही अनोखं बक्षीस… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

☆ असंही अनोखं बक्षीस… ☆ श्री मनोज मेहता 

माझी फोटोग्राफी १९७२ ला सुरु झाली, डोंबिवलीतील फारसं कोणीच माझ्या ओळखीचे नव्हतं. पण दोन नावं कायमच लक्षात राहिली ती म्हणजे, श्री. मधुकर चक्रदेव व श्री. बापूसाहेब मोकाशी. कारण डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या उद्घाटनानंतर, ते आमच्या घरी आले होते. घरी येताच मला पाहून म्हणाले, काल तूच आला होतास ना फोटो काढायला ? माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच क्रांतीला सांगत होते, एकदम तयार आहे हं तुझा भाऊ! रिबीन कापताना म्हणाला, माझ्याकडे बघू नका, रिबिनीकडे बघा, आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि पाहुणेही खूष झाले.

नंतर – नंतर डोंबिवली लायन्स क्लब मध्ये पण हेच दोघं, त्यामुळे माझी ओळख घट्ट झाली. बँक व लायन्स क्लब यांचे डोंबिवलीत भरपूर कार्यक्रम असत, यामुळे मला त्यांच्या कार्याची थोडी – थोडी ओळख होऊ लागली. असे करता करता लायन्स क्लबने एक हटके कार्यक्रम १९८० ला सुरु केला होता. डोंबिवलीत शालांत परीक्षेत ७५% व त्यापेक्षा जास्त मार्क ज्यांना मिळालेत त्या सगळ्यांचा आणि बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा. हा उपक्रम खूप गाजू लागला, पुढे जाऊन ७८%, ८०%, ८५%, मला आठवतंय लायन्स क्लबला ९२% पर्यंत जावं लागलं ही डोंबिवलीच्या मुलांची हुशारी सर्व महाराष्ट्रात गाजली होती.

अहो, मी १९७६ ला झालेल्या ssc परिक्षेत गचकलो की, आणी मग त्वेशाने ऑक्टोबर मध्ये सॉलिड अभ्यास करून माझ्या शाळेत पहिला आलो होतो ना राव ! मी शाळेत पहिला आलो कारण सर्व विषय घेऊन मी एकटाच परीक्षेला बसलो होतो म्हणून हं ! तेव्हापासूनच मी धैर्यवान आहे. आणि वार्षिक स्नेहसंमेलनात मला बोलावून शाळेनी २५१/- रुपयांचं पाकीट दिलेलं स्मरणात होतं. हाच धागा पकडून मी ठरवलं किती मार्क मिळवतात ही मुलं, आपणही यांना छान बक्षीस देऊया.

१९८९ ला मी डोंबिवलीतील आद्य गुरुजी व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. सुरेंद्र बाजपेई सरांना भेटून माझी कल्पना सांगितली. लगेच म्हणाले, व्वा मनोज व्वा, बढिया बक्षीस आहे. मी तुला रिझल्ट लागल्यावर डोंबिवलीतील सर्व बोर्डात आलेल्या मुलांची नावं, पत्ता व दूरध्वनी क्र. पाठवतो. इतके व्याप असताना लक्षात ठेवून रिझल्ट आल्यावर, केवळ तीन तासात शिपायाबरोबर सर्व माहितीचं पाकीट माझ्या घरी हजर असायचं. सर सर, मानाचा मुजरा तुम्हाला 🙏  हे मी इथं लिहितोय, तेही तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या हयातीत असं लिहिलं असतं तर, ‘पुढच्या वर्षी माहिती पाहिजे की नको’, अशी जोरदार धमकीच मिळाली असती मला.🙏🏻

मग एक एक मुलांच्या घरी दूरध्वनी करून, मग त्यांच्या वेळेनुसार एक गुलाबाचं फुल व कॅडबरी घेऊन मला एकट्यालाच जणू आनंद झाल्यासारखा मी त्याला / तिला अभिनंदन असं ओरडून शुभेच्छा द्यायचो. मी मनोज मेहता, तुमचा फोटो काढायला आलोय हं ! काय सांगू तुम्हाला, बोर्डात पहिला येवो किंवा विसावा, अहो मला त्यांना हसवता हसवता वाट लागायची. आणि तेव्हा रोलकॅमेरा, ३-४ मस्त हसवून हसवून फोटो काढायचे आणि डेव्हलप करून त्यातील एक छान ८ X १० आकाराचा फोटो लॅमिनेशन करून ठेवायचो. त्यावर फक्त पुढे “शुभेच्छा” इतकंच लिहायचो. माझं नांव कुठेही नाही हं ! मग लायन्स क्लबचा कार्यक्रम असला की मी हे फोटो घेऊन त्यांनी बोलावलेल्या पाहुण्यांच्या हस्ते त्या मुलांना द्यायचो. हळूहळू माझी ही कीर्ती साऱ्या डोंबिवलीभर पसरली आणि चक्क मुलं अभ्यासाला लागली की! मला नक्की आठवत नाही साल, पण ९४/९५ असावं, डोंबिवलीतून ५२ मुलं बोर्डात ! पार्ल्याचा विक्रम मोडीत काढून इथेही डोंबिवलीकर मुलांनी बाजी मारली. मग मी ही घाबरलो नाही, बाजपेई सरांच्या कृपेने सर्वांच्या घरी जाऊन, तितक्याच उत्साहात मी फोटो काढले. आणि त्यावर्षी पाहुणे म्हणून श्री. विश्वास मेहेंदळे व श्री. अविनाश धर्माधिकारी हे होते. भाषणात मेहेंदळे म्हणाले मेहतांचं बरंय ‘आवळा देऊन कोहळा’ काढायचा. Microsoft - Fluent Emoji (Color)अन् त्यांच्या पाठोपाठ श्री. धर्माधिकारी बोलले, ‘ मेहेंदळे मी मुलांना भेट म्हणून दिलेला फोटो नीट पाहिला आहे, तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढला. मेहतांचं हे मोठेपण आहे की त्यांनी कुठेही त्यांचं नांव लिहिलेलं नाही, अश्या प्रकारचं बक्षीस आजपर्यंत कोणीही दिलेलं माझ्या स्मरणात नाही, अशी माणसं सध्याच्या जमान्यात मिळणार नाहीत. मी काय व किती केलं, हे ओरडून सांगणाऱ्यांचीच संख्या वाढत आहे. म्हणून मेहताजी मी तुम्हाला नमस्कार करतो. ४०० मुलं व त्यांचे पालक व लायन्स मंडळी मिळून ७०० संख्येने भरलेल्या भरगच्च सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतरची काही वर्ष लायन्स क्लब बंद होता. मग मी स्वतः माझ्या घरी बोर्डात आलेल्या मुलांना बोलावून बक्षीस द्यायचो. पुढे पुढे माझ्या घराचा हॉलही कमी पडू लागला. मग मी श्री. व सौ. पाठक यांना विनंती केली आणि त्यांनी सर्वेश सभागृह, नाश्ता व चहा विनामूल्य तर दिलाच, शिवाय मुलांना टायटन घड्याळं पण दिली. मंडळी त्यावर्षी माझे ज्येष्ठ पितृतुल्य मित्र, श्री. शं. ना. नवरे यांना पाहुणे म्हणून बोलावलं होतं. १८ विद्यार्थी व त्यांचे पालक व माझ्या घरची मंडळी व केवळ ४ मित्र असे आम्ही ५०/६० जणंच होतो. कार्यक्रम सुरु झाला आणि नवरे काकांनी एकेक मुलाला/मुलीला माझं बक्षीस द्यायला सुरुवात केली. बक्षीस देताना ते मुलांशी संभाषण करायला लागले. म्हणाले, आमच्या मनोजकडून तुमचं कौतुक खूप ऐकलं म्हणून मी आलो हं ! मी तुम्हांला बक्षीस देताना तुमचा चेहरा व फोटोतील चेहरा निरखून पाहात होतो. इतका सुंदर फोटो मनोजने काढून तुम्हाला दिला, कारण तुम्ही हुशार व छान आहात. आता गंमत अशी आहे, आमच्या मनोजनं दिलेलं असं बक्षीस तुम्हाला कोणीच देणार नाही, अन त्यानं दिलेलं हे बक्षीस कायम स्वरूपात राहिल. तर नीट ऐका हं, तुम्हाला दिलेल्या सुंदर फोटोतील चेहऱ्यापेक्षा, तुमचं जीवन तुम्ही अधिक सुंदर बनवून दाखवाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो.

मी कधीही मुलांच्या सत्काराचे फोटो व प्रसिद्धीच्या मागे पडलो नाही. बऱ्याच वर्षांनी हीच मुलं मला रस्त्यात भेटतात व पाया पडतात, आता तर त्यांनाही मुलं झालीत. पण मला व माझ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम म्हणजे टॉनिक होतं, ते नेमकं महाराष्ट्र शासनाने हिरावलं. आपला शालांत परीक्षेचा निकाल शाळेत बघण्याची आणि आवडत्या शिक्षकांना, मित्र मैत्रिणींना भेटायची इच्छा, आनंद, सगळं काही या ऑनलाईनने हिरावून घेतलं.

पण तो १७/१८ वर्षांचा माझ्या कुटुंबासाठी सुवर्णकाळच होता, बस्स त्या स्मृतीतच रमायचं आता !

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांची मावशी… अनुराधाताई – लेखक – श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

सैनिकांची मावशी… अनुराधाताई – लेखक – श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

अनुराधाताई 

“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक ‘ मावशी ‘ नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा हा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.

सीमेवर एक जवान चुकून भूसुरुंगवार पाय पडल्यामुळे जखमी होतो. अनुराधाताईंना ते कळते. त्या काळजीपोटी त्याला फोन करतात. तो फोन उचलून म्हणतो, ” जय हिंद मावशी. मी अगदी फिट आहे. सुरुंगवार पाय पडल्यावर स्फोट झाला आणि माझा एक पाय माझ्या डोळ्यांसमोर आकाशात तुटून उडाला. आणखी काही जखमा झाल्या आहेत, पण मी फिट आहे!” एक पाय गमावलेला जखमी जवान स्वतःला फिट म्हणवतो. ही कथा अनुराधाताई आपल्याला सांगतात आणि आपले डोळे अभिमानाने चमकतात आणि पाणवतातही. भारतीय सैन्य म्हणजे धैर्य आणि शौर्याचं प्रतीक. पण सिनेस्टारच्या कथा जशा आपल्यापर्यंत पोहोचतात तशा ह्या सैनिकांच्या कथा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आपण फक्त १५ ऑगस्टला त्यांची आठवण काढतो आणि नंतर विसरून जातो.

अनुराधाताई बँकेत नोकरीला होत्या तेव्हा त्याही फक्त १५ ऑगस्टला सैन्याची आठवण काढायच्या. एकदा त्या कारगिलला पर्यटक म्हणून गेल्या आणि त्या भेटीने त्यांचं जीवन बदललं. तिथे सैनिकांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आणि अनुराधाताईंनी मनात ठरवून टाकलं की समाज आणि सैनिक ह्यांच्यात जे अंतर आहे ते मी कमी करेन. त्यातून त्यांनी लक्ष्य फाऊंडेशनची स्थापना केली आणि आज त्या भारतीय सैनिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम करतात. त्या स्वतः एकेका सैनिकांबद्दल बोलतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून त्या बोलतात. तसेच सैनिकांना भेटण्यासाठी, सैनिकांशी बोलण्यासाठी त्या पर्यटकांना लद्दाख, कारगिल इत्यादी ठिकाणी घेऊन जातात. सैनिकांच्या विधवा पत्नीला समाजातून पाठबळ मिळवून देतात. महत्वाचं म्हणजे सामान्य भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत हे सैनिकाला जाणवू देतात.

आपल्या भाषणातून त्या म्हणतात, ” आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. कारण तिथे बॉम्ब हल्ले होत नाहीत, शत्रूने माईन्स पेरलेले नसतात आणि कोणीही आपल्यावर स्नाइपरमधून गोळी घालत नाही. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत ते सैनिकांमुळे. आपल्याला freedom मिळालं आहे, पण ते free नाही. त्यासाठी मायनस 56 डिग्री तापमानात, रात्रीच्या मिट्ट काळोखात सैनिक पहारा देत आहेत. “

अनुराधाताई बोलू लागल्या की सैन्यातील अनेक किस्से सांगू लागतात. आधी आपल्याला लेफ्टनंट कर्नल गोयलचा फोटो दाखवतात. तो नाच करताना दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये तो बुलेटवर दिसतो. पण ह्या फोटोमागचं सत्य काही निराळं असतं. ह्या २५ वर्षाच्या सैनिकाला श्रीनगरच्या भागात जाऊन अतिरेक्यांचा खात्मा करायचं काम दिलेलं असतं. तो तिथे जातो, पण अतिरेक्यांनी पेरलेल्या माईनवर त्याचा पाय पडतो आणि स्फोट होऊन त्याच्या पायाचे तुकडे होतात. त्याला वाचवायला दुसरा शीख सैनिक पुढे येतो तेव्हा हा आज्ञा देतो ” आगे मत आना. नही तो मै कोर्ट मार्शल कर दूंगा”. ही आज्ञा तो देतो कारण आणखी माईन्स दडवलेले असू शकतात आणि त्यात त्या शीख सैनिकाचा जीव जाऊ शकतो. पण तो शीख सैनिकही काही कमी नसतो. तो स्वतःचा फेटा काढतो आणि लेफ्टनंट कर्नल गोयलचा पाय बांधून त्याला दवाखान्यात नेतो. लक्षात ठेवा, शीख माणूस कधीही आपला फेटा उतरवत नाहीत. पण इथे त्याने तो उतरवला, आपल्या साथीदारांचा, एका निडर बहाद्दराचा जीव वाचवण्यासाठी!

लेफ्टनंट कर्नल गोयलच स्वप्न होतं मुलाला फुटबॉल शिकवणं. पाय तुटल्यावर तो मुलाला फुटबॉल कसा शिकवणार? पण परिस्थितीला शरण जाईल तो सैनिक कसला ? गोयलने कृत्रिम पाय लावला आणि तो सैन्यात प्रशिक्षक बनला. धावू लागला, खेळू लागला. पोहू लागला आणि पॅराग्लाईडींगही केलं.

त्याने म्हटलं आहे, “When people doubted my ability to walk, I decided to fly.”

नागालँड हा भारताचा भाग आहे. पण तिथे भारतीय सैन्याचा इतका दुस्वास करत असत की इंडियन आर्मी हे नाव जरी काढलं तरी ठार मारायचे. सामान्य नागालँडकर भारताचा अविभाज्य भाग आहे हे मानायला तयार नव्हते. तरीही एक तरुण भारतीय सैन्यात भरती झाला. सोबत आणखी काही नागालँडच्या तरुणांना आणले. पुढे हा मुलगा लद्दाखमधे युद्धात शहीद झाला. त्याला महावीर चक्र मिळालं. त्याचं हे सीमा नसलेलं काम अनुराधाताई अभिमानाने सांगतात तेव्हा आपला उर भरून आल्याशिवाय राहत नाही. पुढची कथा असते कॅप्टन मनोज पांडेची. कॅप्टन पांडे शहीद झाला. देशासाठी बलिदान देण्याआधी त्याने म्हटलं-एखादं ध्येय इतकं उत्तुंग असतं की त्यात मिळालेलं अपयशही तितकंच उत्तुंग असतं. मनोज पांडे वयाच्या २३ व्या वर्षी धारातीर्थी पडला.

भारतीय सैनिकांच्या लढवय्या वृत्तीचं दर्शन घडवताना त्या १९७१ च्या संघर्षाचा आवर्जून उल्लेख करतात. अनेक सैनिकांनी आपलं बलिदान देऊन बांग्लादेशाची निर्मिती केली. सैनिकांनी एका देशाची निर्मिती केली अशी उदाहरणे फार दुर्मिळ आहेत. हे धैर्य आपल्या सैनिकांनी दाखवलं आहे आणि ही माहिती अनुराधाताईंमुळे आपल्याला कळते. त्यांच्या तोंडून कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला ह्यांचा किस्सा ऐकताना सैनिकांचं मनोबल काय असतं त्याची प्रचिती येते. १९७१ च्या युद्धात आयएनएस खुकरी ह्या बोटीवर महेंद्रनाथ हे कॅप्टन होते. पाकिस्तानच्या पाणबुडीने ह्या बोटीवर हल्ला केला. त्यामुळे बोटीचं नुकसान झालं. बोट बुडायला आली होती. म्हणून कॅप्टन महेंद्रनाथ ह्यांनी बोटीमधील सेलरला दुसऱ्या बोटीवर नेलं. शेवटचा सेलर उरला, त्याला स्वतःच लाईफ जॅकेट दिलं. सगळी बोट रिकामी झाल्यावर ते स्वतः डेकवर सिगारेट पीत शांत बसले आणि बुडणाऱ्या बोटीसोबत समुद्रात विलीन झाले. काही झालं तरी कॅप्टन बोट सोडत नाही ह्या सैनिकी परंपरेला ते जागले. भारतीय सैनिक आपलं कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजतात.

कारगिलमध्ये युद्ध झालं तेव्हा पर्वतावर चढाई करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला माहित होतं की आपला वर जायचा मार्ग आहे, पण आपण पुन्हा खाली कधीही येणार नाही. तरीही ते वीर न डगमगता शत्रूवर तुटून पडले. ह्यात कर्नल थापर ह्यांचा मुलगाही होता. एकदा एका २६ जुलैला अनुराधाताई कारगिल येथे वीर जवानांच्या स्मृतीसाठी बनवलेल्या विजय स्तंभाजवळ उभ्या होत्या. तेव्हा तिथे कर्नल थापरही आले. आपल्या शहीद झालेल्या मुलाला सलामी द्यायला हा पिता तिथे आला होता आणि ताठपणे उभा राहून अनुराधाताईंना म्हणाला, ” बेटा, डोळ्यात अश्रू नाही आणायचे. माझ्या मुलाचं कौतुक करायचं. ” कॅप्टन थापर ह्यांचं धैर्य पाहून आपणही नतमस्तक होतो. त्या धैर्यासमोर कारगिलचा हिमालयही थिटा वाटू लागतो. आज कॅप्टन थापर आपल्या शहीद मुलाने लिहिलेलं शेवटचं पत्र अभिमानाने वाचून दाखवतात. ज्या वयात मुलाला आशीर्वाद द्यायचे त्या वयात ते मुलाला सलामी देत आहेत.

इथे पदमा गोळेंची एक कविता अनुराधाताई म्हणून दाखवतात:

” बाळ, चाललासे रणा घरा बांधिते तोरण,

पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण.

नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार,

मीच लावुनी ठेविली तुझ्या तलवारीस धार”

सैनिकाचे पालक असे खंबीर असतात. मुलाच्या तलवारीला धार लावून देतात. तो रणातून कदाचित जिवंत येणार नाही हे माहित असूनही!

अनुराधाताईंचं काम पाहून नेव्हीमधील सैनिकांनी त्यांना पाणबुडीमध्ये आमंत्रण दिलं होतं. ती पाणबुडी पाहून त्या थक्क झाल्या. कारण पाणबुडीत हलता येणार नाही अशी जागा होती. तरीही जिथे फक्त १० जण उभे राहू शकतात, तिथे ४२ जण जातात. एकदा ५६ जण गेले आणि तेही तीन महिने. पाणबुडी पाण्यात जाते तेव्हा त्यांचा जगाशी काहीही संपर्क राहत नाही. आपण २४ तास मोबाईल वापरतो आणि हे सैनिक अनेक महिने पाण्याखाली कोणत्याही संपर्काशिवाय कर्तव्य करत असतात. काम करून हे सामान्य माणसांना संदेश देत असतात की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आजचा दिवस देत आहोत. हे सैनिक लढाई होते तेव्हा फक्त प्राण पणाला लावून नव्हे तर प्राण देऊन लढतात. ते रोज स्वतःचा स्वयंपाक करतात. त्यांच्यातील काही डॉक्टर असतात जे आसपासच्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात, बांधकाम तज्ज्ञ असतात ते डोंगराळ भागात रस्ता-पूल उभारतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते Locवर उभे असतात. तरीही म्हणतात-Romancing Loc…

सैनिकांचं हे कठोर जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनुराधाताई ‘लक्ष्य’ फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी त्यांनी “सैनिक” हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचा इंग्लिशमध्ये “soldier ” नावाने अनुवादही झाला आहे. हे पुस्तक त्यांनी सैनिकांच्याच हस्ते प्रकाशित केलं. सैनिक समाजाला समजला पाहिजे त्यासाठी ही धडपड आहे. गेली 15 वर्ष अनुराधाताई ही धडपड करत आहे. शिवाजी महाराजांची कवने गाणारे जसे भाट आहेत, तशा त्या सैनिकांच्या भाट बनून काम करत आहेत.

पण त्यांची इच्छा वेगळीच आहे. त्यांना असं वाटतं की समाजाला, सामान्य माणसाला सैनिक इतका समजावा की लक्ष्य फाऊंडेशनच काम बंद व्हावं.

चला, सैनिक समजावून घेऊ आणि अनुराधाताईंचं काम लवकर पूर्ण करू!!

सैनिक आणि त्यांची ही मावशी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा लेख पुढे पाठवू शकता.

लेखक : श्री निरेन आपटे

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झाडाझडती… – लेखिका: सौ. नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ झाडाझडती…– लेखिका: सौ. नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

घरात आम्ही दोघंच रहातो. दोघंही ज्येष्ठ नागरिक. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे वादाचे तसे विषय आमच्या दोघात आताशा फारसे उदभवत नाहीत. पण एक रंजक प्रसंग मात्र आमच्या घरी आठवड्यातून एकदा अगदी न चुकता घडतो.

आमचा दोघांचाही आहार पहिल्यापासूनच बेताचा. त्यात वयपरत्वे ताव मारून जेवण्यात फारसा रस नाही उरलाय.

पण स्वयंपाक करण्यातला माझा रस मात्र अजूनही टिकून आहे.

चारी ठाव स्वयंपाक करून असं डावी उजवी बाजू भरलेलं ताट बघितलं की माझी भूक चाळवते. त्या उलट माझ्या नवऱ्याचं मत… त्याची भूक म्हणे मरते. एवढे पदार्थ बघून.

“पण स्वयंपाक माझा प्रांत आहे तेव्हा खाण्यापुरतं तू ‘तोंड’ उघड”, असं सांगून मी पदार्थ बनवतेच.

कोकणस्थी बाण्याने कितीही मोजून मापून स्वयंपाक केला ना, तरी अगदी थोडं काहीतरी उरतंच.

ते धड कामवाल्या बाईंना देण्याएवढंही नसतं.

मग ‘खाऊ संध्याकाळी’ म्हणून फ्रीजमध्ये दडपलं जातं.

मग आठवड्यातून एक दिवस फ्रीजची झाडाझडती घेण्याचं काम माझा नवरा आवर्जून करतो. त्यायोगे माझ्यावर टोमणे मारायला त्याला संधी मिळते बहुधा.

एक मोठ्ठी पिशवी घेऊन तो झाडाझडतीत सापडलेलं टाकून देण्यासाठी सज्ज होतो.

खरंतर मला खूप वाईट वाटतं, अन्न वाया गेलेलं पाहताना. पण नाईलाज असतो हो. दोन चार चमचेच उरलेलं असलं तरी पोटात ढकलून संपवायची क्षमता संपलीय हो.

पण ही झाडाझडती तो खूप रंजकतेने करतो, म्हणून बोच थोडी बोथट होते.

एक एक वाटी रिकामी करताना तो पुटपुटत असतो.

“सोमवारची कोबीची भाजी!

या या बाहेर. सुकलात कशाने हो.. आमच्या गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं का? तुमची बदली करीन पराठ्यात म्हणून..

जाऊ दे हो.. मंत्र्याचं आश्वासन ते.. पाळतात थोडे…

ओहो… मंगळवारची आमटी का? तुमची बदली नक्कीच ! गडचिरोलीला होते ना तश्शीच.. !!. फ्रीजमधून कचऱ्याच्या डब्यात.

 मागनं कोण डोकावतंय?

मुगाच्या डाळीची खिचडी वाटतं.. ?. काय हो तुम्ही बुधवारच्या ना.. ?. या या… बिरबलाच्या खिचडीसारखीच गत झालीय हो तुमची. ती पकली नाही. ही संपली नाही… शेवट कचऱ्याच्या डब्यात!

अरे वा… गुरुवारचं काहीच उरलं नाहीये… दत्ताची कृपाच म्हणायची… आत्ता आठवलं… बाहेर गेलो होतो जेवायला.. “

“एक खण झाला गं. ” हे माझ्याकडे बघत खिजवल्यासारखं हसत.

“ऊतच आलाय बाबा!… अगं, तुला नाही म्हटलं.. या शुक्रवारच्या कढीला ऊत आलाय… टाकू ना गं?

हे शेवटचं भांडं दिसतंय.. शनिवारची अळूची भाजी… फारच चविष्ट झाला होतात हो तुम्ही. पण.. फदफदं की हो झालं तुमचं !

रविवारच्या स्वयंपाकाचं भाग्य थोर.. जरा हटके मेनू असल्यामुळे आम्ही संपवतो. किंवा एखादा पाहुणा असतो शेअर करायला. “

थोडसं ओशाळत मी ही हसण्यावारी नेते त्याचा हा उपक्रम.

त्या निमित्ताने पुढच्या आठवड्यासाठी फ्रीजमधे जागेची सोय होते ना..

यातला गमतीचा भाग सोडा… थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाच्या घरातली ही कहाणी आहे. यात बरीचशी अपरिहार्यताही आहे.

पण यावरून स्फूर्ती घेत मी मनाशी ठरवते, या आठवड्यात सगळ्या कपाटांची आवराआवर करायची. पण लक्षात येतं की फ्रीज साफ करण्याएवढं हे काम सोपं नाहीये.

प्रत्येक वस्तूला एक एक आठवण बिलगून बसलीय. तिच्यातून अलगद निर्लेप राहत सुटका करून घेणं जमतच नाही मला.

काश्मीरहून पंचवीस वर्षांपूर्वी आणलेल्या शालीतल्या ऊबदार आठवणी परत शालीची घडी घालून कपाटाच्या कोपऱ्यात जातात.

तीच गत म्हैसूरहून आणलेल्या रेशमी साडीची होते.. विरत चाललीय तरी हळूवार स्पर्शाची आठवण तिलाही कपाटात माघारी धाडते.

मुलाचा एखादाच इवलासा कपडा मनाच्या तळाशी इतका सुखद पहुडलेला असतो की त्याला दूर करणं जमतच नाही…

आईची आठवण म्हणून ठेवलेली तिची साडी असूदे.. किंवा निरोप समारंभाला मिळालेली साडी असू दे.. आजीने विणलेला जीर्ण झालेला स्वेटर असू दे किंवा पहिल्या पगारातून घेतलेली पर्स…. कपाटातल्या आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न होतात. आणि चिडून मी कपाट आवरण्याचा माझा उपक्रम गुंडाळून टाकते.

भांड्याकुंड्यांचं कपाट आवरायचंय. मिळालेल्या भेटवस्तूंना मार्ग दाखवायचाय. माळा आवरायचाय.. केलेल्या आर्थिक व्यवहाराची तपशीलवार नोंद करायचीय….. यादी तर न संपणारी असते…

स्वतःचा राग यायला लागतो… सुरुवातच इतकी डळमळीत करतो आपण की शेवटापर्यंत पोहोचतच नाही आपण.

म्हणून स्वत:चा उद्धार करायला लागते मी. आणि माझा फ्रीज साफ करणारा नवराच धावून येतो माझ्या मदतीला.

वातावरण हलकं करत सांगतो.. “अगं outsourcing चा जमाना आहे हा.. मला out source कर हे काम… बघ. बघता बघता तुझी कपाटं रिकामी करतो की नाही ते.

एकाने पसरायचं. दुसऱ्याने आवरायचं…

लेखिका: सौ. नीलिमा जोशी

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढस्य प्रथम दिवसे… – लेखक – कै. आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ आषाढस्य प्रथम दिवसे… – लेखक – कै. आचार्य अत्रे ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. त्याची आठवण झाली की कविकुलगुरू कालिदासाच्या ‘मेघदूता’मधल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्र्लिष्टसानु। वप्रक्रिडापरिणतगज: प्रेक्षणीयं ददर्श’ या अमर पंक्ती ओठावर खेळू लागतात आणि आकाशातल्या मेघाकडे सहज डोळे वळून कारण नसतानाही मेघदूतातल्या यक्षाप्रमाणे आपले हृदय एकदम व्याकूळ होते. (‘आनंदी ही विकल हृदयी पाहता मेघ दूर, तो कैसा हो प्रियजन मिठी ज्यास देण्या अधीर?’) भारतीय मनावर कालिदासाचे इतके सूक्ष्म संस्कार उमटलेले आहेत की, मानवी जीवनात अशी कोणतीही भावना किंवा अनुभव नसेल की, जिच्या उत्कट अवस्थेत रसिक आणि सुसंस्कृत माणसाच्या मुखातून कालिदासाची एखादी अन्वर्थक ओळ आपोआप उचंबळणार नाही. सौंदर्याच्या दर्शनाने आणि संगीताच्या श्रवणाने चांगला सुखी माणूससुद्धा अस्वस्थ होतो. त्याच्या मनाला एकदम कसली तरी हुरहुर वाटू लागते. त्याबरोबर ‘रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्। प्र्युत्सुकी भवति यत्सुखिनोऽपि जन्तु:।।’  या ओळीचे एकदम स्मरण होते. अगदी फाटक्यातुटक्या कपडय़ांत एखादी सुंदर तरुणी चाललेली बघून ‘सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यम्। मलिनपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति। इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी। किमिवहि मधुराणां मण्डन नाकृतीनाम्?’ (‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते!’) या पंक्ती कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाहीत? लाखात एक अशी एखादी लावण्यवती बालिका पाहिली म्हणजे ‘हे न हुंगलेले फूल, हे न हात लावलेले कोवळे पान आणि हा न आस्वाद घेतलेला मधु, परमेश्वरानं कोणासाठी निर्माण केला आहे?’  ‘न जाने भोक्तारं कमिह समुपस्थास्यति विधि: !’ हाच विचार कालिदासाप्रमाणे आपल्या मनात येत नाही काय? मनुष्याच्या भोवती ऋतुचक्राचे भ्रमण तर एकसारखे चाललेले असते. पण त्यामुळे निसर्गाच्या आणि भावनेच्या सृष्टीत जे आंदोलन होते, त्याचे मनोज्ञ स्पंदन कालिदासाच्या काव्याखेरीज इतरत्र कुठे प्रतीत होणार?

सांसारिकांच्या मन्मथाला उपशांत करणारा ‘प्रचंडसूर्य: स्पृहणीयचंद्रमा:’ असा तो निदाघकाल, कामीजनांना प्रिय असणारा ध्यानगम, ‘प्रकामकामं, प्रमदाजनप्रियं’ असा शिशिर आणि हातात भ्रमराचे धनुष्य नि आम्रमंजिरीचे बाण घेऊन प्रेमीजनांची शिकार करण्यास येणारा वसंत योद्धा यांचे अद्भुतरम्य वर्णन कालिदासाखेरीज जगात दुसऱ्या कोणत्या कवीने केले आहे? कालिदास हा श्रृंगाराचा तर सम्राट आहेच. स्त्री-पुरुषांच्या अंत:करणाचे सूक्ष्म व्यापार कोमल कौशल्याने चित्रित करण्याची त्याने कमाल केली आहे! तथापि पुरुषांपेक्षाही स्त्रीहृदयातील प्रणयाच्या लपंडावाचे त्याला जेवढे आकलन आहे, तेवढे शेक्सपिअरलादेखील नसेल. स्त्रिया प्रेम कशा करतात? कालिदास सांगतो, ‘स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु’ (स्त्रीची कांताजवळी पहिली प्रेमभाषा विलास।) आपल्या प्रियकराला बघण्याची त्यांची इच्छा असते. पण लाजेने वर डोळे उचलवत नाहीत. ‘कुतूहलवानपि निसर्गशालिन: स्त्रीजन:’; तथापि, विनय आणि लज्जामुग्ध अशा भारतीय स्त्रीच्या कोमल श्रृंगाराचे जे अपूर्व सुंदर चित्र ‘शाकुंतल’मध्ये कालिदासाने रेखाटले आहे, त्याला जागतिक वाङ्मयात तुलना नाही. पाहा. ‘वाचं न मिश्रयति यद्यपि मद्ववोभि:। र्कण ददात्यभिमुखं मयि भाषमाणे’- पण मराठीतच त्याचा भावार्थ सांगितलेला बरा. तो राजा दुष्यंत म्हणतो, ‘मी बोलत असताना ती मधेच बोलत नाही. मी काय बोलतो ते ती एकते. ती माझ्याकडे बघत नाही. पण माझ्याखेरीज दुसरीकडेही बघत नाही. ती आपले प्रेम प्रकटही करीत नाही किंवा लपवीतही नाही. पायाला दर्भाकुर रुतला म्हणून ती थांबते आणि हळूच चोरून माझ्याकडे पाहते. काटय़ाला पदर अडकला म्हणून तो सोडवण्याचे निमित्त करून ती थांबते. अन् पुन्हा मला नीट न्याहाळून बघते!’ वाहवा! जगातले सारे प्रेमाचे वाङ्मय एवढय़ा वर्णनावरून ओवाळून टाकावे असे वाटते. आणि गंमत ही की, श्रृंगाराच्या गगनात एवढय़ा उत्तुंग भराऱ्या मारूनही कालिदासाने भारतीय संस्कृतीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत! किंबहुना कन्या, पत्नी आणि माता या तीन उदात्त अवस्थेतच स्त्री-जीवनाचे साफल्य आहे हे दाखविण्यासाठी त्याने ‘अभिज्ञानशाकुंतल’ हे अमर नाटय़ लिहिले. कन्या ही आपली नव्हे. ‘अर्थोहि कन्या परकीय एव।’ पत्नीचे कर्तव्य काय? तर- ‘गृहिणी सचिव: सखीमिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ।’ विवाहित स्त्रीचे एवढे वास्तववादी आणि काव्यमय वर्णन जगात कोणत्या कवीने केले आहे? एवढेच नव्हे तर पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रीने आपल्या पतीबरोबर सतीच गेले पाहिजे. कारण अचेतन निसर्गाचा तोच कायदा आहे. ‘शशिना सह याति कौमुदी। सहमेघेन तडित्प्रलीयते’( चंद्राच्या मागे कौमुदी जाते, मेघाच्या मागे वीज जाते. ) असा ‘सतीचा उदात्त आदर्श’ त्याने ‘कुमारसंभवा’त चितारलेला आहे. सारांश- राजाच्या अंत:पुरापासून तो पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून तो अरण्यातील ऋषींच्या आश्रमापर्यंत कालिदासाच्या प्रतिभेने मोठय़ा विश्वासाने आणि विलासाने संचार केलेला आहे. संस्कृत भाषा ही तर देवांची भाषा आहे! इतकी समृद्ध आणि सुंदर भाषा जगात दुसरी कोणतीही नसेल. पण या देवभाषेचे ‘नंदनवन’ या पृथ्वीतलावर जर साक्षात कोणी निर्माण केले असेल तर ते कालिदासाने! कालिदास हा भारताचा एकमेव सर्वश्रेष्ठ महाकवी समजला जातो. त्याच्यानंतर म्हणूनच नाव घेण्यासारखा दुसरा कवीच सापडत नाही.

‘पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव।।’

एकदा कवींची गणना करताना कालिदासाच्या नावाने करांगुली मोडल्यानंतर अंगठीच्या बोटासाठी त्याच्या तोडीच्या दुसऱ्या कवीचे नाव काही सापडेना. म्हणून  ‘अनामिका’ हे त्याचे नाव सार्थ ठरले. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नाही, की जिच्या वाङ्मयाला कालिदासाच्या शेकडो सुभाषितांनी भूषविले नाही. ‘मरणं प्रकृति: शरीराणाम्।  विकृतिर्जीवितमुच्यते बुधै:’, ‘भिन्नरुचीर्हि लोका:’, ‘एकोहि दोषो गुणसंनिपाते’, ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’, ‘विषमप्यमृतं क्वचित् भवेत्’, ‘निसर्ग फलानुमेय: प्रारंभा:’, ‘शरीरनिपुणा: स्त्रिय:’, ‘परदु:खं शीतलं’, ‘कामी स्वतां पश्यति’, ‘अति स्नेह: पापशंकी’, ‘भवितव्यता खलु बलवती’, ‘नीचैर्गच्छत्युपरि च दशां चक्रनेमिकमेण’.. अशी किती म्हणून सांगायची?

जवळजवळ दोन हजार वर्षे झाली तरी महाकवी कालिदासाचे काव्य आणि नाटय़ काश्मीरातल्या एखाद्या रमणीय सरोवरात उमललेल्या मनोहर कमलाप्रमाणे उन्मादक आणि आल्हाददायक वाटते. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे, त्या त्या सर्वाचा अद्भुतरम्य समन्वय कालिदासाच्या वाङ्मयात झाला आहे. म्हणून वाल्मीकी आणि व्यास यांच्या बरोबरीने कालिदासाचे नाव घेतले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीची तीन विविध स्वरूपे या तीन महाकवींनी प्रकट केली आहेत. भारताचे नैतिक सामर्थ्य ‘रामायणा’त आढळते, तर ‘महाभारता’त भारताच्या बौद्धिक बलाचा परमोत्कर्ष दृष्टीस पडतो. अन् कालिदासाच्या वाङ्मयात भारतीय जीवनातील सौंदर्याच्या विविध विलासांचा देदीप्यमान साक्षात्कार घडतो. म्हणून श्री अरविंद म्हणतात की, वाल्मीकी, व्यास आणि कालिदास यांच्या व्यतिरिक्त भारतामधले सारे वाङ्मय नष्ट झाले तरी भारतीय संस्कृतीची काहीही हानी होणार नाही. हिमालय, गंगा, काश्मीर किंवा अजिंठा यांचे दर्शन ज्यांनी घेतले नाही, त्यांचे भारतीयत्व ज्याप्रमाणे अपूर्ण मानले जाते, त्याप्रमाणे कालिदासाचे ‘मेघदूत’ किंवा ‘शाकुंतल’ ज्याने वाचले नसेल, त्याच्या भारतीयत्वात फार मोठा उणेपणा राहिला आहे असे समजावयाला हरकत नाही. भारतीय जीवनात कालिदासाचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. कारण वाङ्मयाचा अमर सिद्धांत त्याने सांगून ठेवला आहे की, ‘भाषेची पार्वती नि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्यावाचून चिरंतन साहित्य मुळी निर्माणच होत नाही!’  म्हणून त्या पार्वती-परमेश्वरालय कालिदासाच्या काव्यात वंदन करून हे त्याचे स्मरण संपवू.

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।

जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ॥

लेखक : कै. आचार्य अत्रे 

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares