मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात कठीण वा परीक्षा बघणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वाट बघणं,प्रतिक्षा. कुठलीही आनंदाची गोष्ट अगदी अचानक मिळाली तर आपण ह्या “वाट बघणं”वा “प्रतिक्षा”फेजला सरळसरळ मुकतो. पण एखाद्या आनंदाच्या गोष्टीची मिळण्याची खात्री असेल तर ह्या फेजमधून आपल्या प्रत्येकाला हे जावंच लागतं. ह्या फेजला आपल्याआपल्या गमतीच्या भाषेत “धाकधूक वा पाकपुक होणं” असं म्हंटतो. पण खर सांगायच़ तर ह्या फेजमधून जाणं तसं अवघड असतं बघा. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे असं वाटतं ही फेज मेली संपता संपत नाही लवकर. असं वाटतं हा कालावधी खूप प्रदीर्घ आहे. असो

ही फेज आत्ता आठवायचं कारण म्हणजे आता नुकताच पावसाळा सुरू होतोय. तमाम शेतकरी वर्ग चांगल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असतो.पावसाळा सुरू झाला म्हणजे पाऊस हा येणारच नक्की. त्यामुळे तमाम शेतकरी वर्ग घरातील,स्वतः जवळील असेल नसेल ते पणाला लावून पेरणी,मशागत करायला लागतो. त्याचे डोळे मात्र आभाळाकडे लागलेले असतात आणि मन चित्त सगळं वाट बघण्यात,पावसाच्या प्रतिक्षेत,अगदी चातक पक्षासारखं.

हल्लीची पिढी सुदैवी म्हणावी की नाही ह्या बाबतीत संभ्रमच आहे. कारण नशीबाने ह्या पिढीवर कुठल्याही बाबतीत वाट बघण्याची वेळ फार कमी येते,नशीबाने त्यांनी तोंडातून काढताक्षणी हवे ते मिळण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी असतं. पण त्यामुळेच का होईना त्यांना वाट बघणं माहित नसल्याने कदाचित त्या मिळणाऱ्या गोष्टीची खरी किंमत ही कळतच नाही हे खरं. आणि ती गोष्ट मिळवितांना देणा-याला आणि घेणाऱ्या ला काय काय कष्ट पडतात हे त्यांचं त्यांनाच माहित.

प्रतिक्षा,सहनशक्ती,धीर संयम ही सगळी सख्खी भावंडच.कुठलिही गोष्ट मिळवितांना जरा प्रतिक्षा करावी लागली तर तिची किंमतही कळते आणि गोडीही जाणवते.ती गोष्ट मिळेपर्यंत धीर धरला,संयम बाळगला,तर आपल्याला पुढील वाटचालीत खूप लाभ हा होतोच.गोष्ट सहजासहजी मिळाली नाही तरी नाउमेद न होण्यासाठी सहनशक्ती कामी येते.

आताही पेरणी झालेल्या शिवारात आभाळाकडे डोळे लावून बसणा-या बळीराजाला बघितले की खरंच पोटात कालवाकालव होते.म्हणूनच त्याला एकाअर्थी बळीराजा हे नाव सार्थ ही वाटतं. असं वाटतं त्याची ही प्रतिक्षा लौकर संपावी व सगळी भुमी सुजलाम सुफलाम व्हावी.

आताही विदर्भात खास करून अमरावती जिल्ह्यात कडक उन्हाचा सामना करतांना अक्षरशः नाकी नऊ येणं म्हणजे नेमके काय हे समजले. परंतू आता कालपासून असं वाटतंय आता एक दोन दिवसांत प्रतीक्षा संपून पावसाच्या जलधारा नक्कीच बरसणार. त्याप्रमाणेच गुरुवारी पहाटे पहाटे थोडा का होईना पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळाला.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जोशी काकांबरोबर कोकणातली  ट्रिप सुरू होती. संध्याकाळ झाली होती. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अजून लांब होत. 

अचानक एका देवळासमोर गाडी थांबली. आम्हाला काही कळेना.इथे का थांबलो?…. 

खाली उतरलो.काका म्हणाले

“गणपतीचे दर्शन घेऊया “

एक साधेच  नेहमी असते तसे देऊळ होते. दर्शन घेतले. 

काका म्हणाले “आता सगळेजण आपण इथे बसून अथर्वशीर्ष म्हणुया”

काकांच हे काय चालल आहे आम्हाला कळेना..

तेवढ्यात काकांनी खणखणीत आवाजात सुरुवातही  केली. 

“ओम भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:..”

आम्ही पण सगळे म्हणायला लागलो..

“हरि ओम् नमस्ते गणपतये…”

अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर बाहेर आलो.

देवळाच्या आवारात छोटे छोटे असंख्य दगड टाकलेले होते आणि त्याच्या मधून छान  रस्ता केलेला होता.

काका म्हणाले

“या देवळाच्या आसपासचे हे दगड बघितलेत का?”

“दगड.”

“हो ..दगडच “

त्यात काय बघायचं ?..आम्हाला समजेना..

“तुम्हाला या देवळाची एक विशेष गोष्ट सांगायची आहे.

तुम्ही देवळाची प्रदक्षिणा करा आणि कुठलाही एक दगड उचला..

तो गणपतीच आहे…

अट एकच आहे फक्त एकदाच दगड उचलायचा…”

“म्हणजे?”

काका काय म्हणत आहेत हेच आम्हाला कळेना …त्यांनी परत सगळे सांगितले.

असं कसं असेल?

आम्हाला वाटल काका आमची मजा करत आहेत.

पण काका अगदी गंभीरपणे सांगत होते.

“स्वतः करून बघा तुम्हीच…”ते म्हणाले..

आम्ही प्रदक्षिणा करून आलो..

आता गंमत सुरू झाली.

कुठला दगड उचलावा हे कळेचना… आम्ही सर्वजण उभे होतो.

काका एकदम म्हणाले

“गणपती बाप्पा मोरया…”

आणि आम्ही प्रत्येकाने खाली वाकुन एक एक दगड उचलला.

प्रचंड उत्सुकता…. कुतूहल ….अपेक्षा….

दगडाच निरीक्षण  सुरू झालं…

आणि मग काय मजाच सुरू झाली….

प्रत्येकाला त्याच्या दगडात बाप्पा दिसायला लागला. तुझा बघु …. माझा बघ… प्रत्येकाने निरीक्षण केलं…

कोणाला डोळा दिसत होता ..कोणाला सोंड दिसत होती ..

काहीजण हिरमुसले… त्यांना बाप्पा दिसला नाही .मग कुणीतरी म्हटलं पालीचा आणि लेण्याद्रीच्या गणपतीचा  भास होतो आहे…..

कितीतरी वेळ आम्ही त्याच नादात होतो.

काकांनी परत एकदा गणपती बाप्पाचा गजर केला.आणि  म्हणाले 

“चला बसा गाडीत “पुढच्या प्रवासाला निघालो.. 

काही जणांना ती गंमत वाटली त्यामुळे त्यांनी तो दगड टाकून  दिला. तर काही जणांनी तो  दगड श्रद्धेनी बरोबर घेतला..

गाडी सुरू झाली आणि लक्षात आलं की मगाशी हळूहळू  गचके खात चालणारी   गाडी आता सुसाट चालली होती…

गाडी दुरुस्त झाली होती.

अरेच्चा अस होत तर….

तेवढा वेळ काकांनी आम्हाला गुंगवून ठेवले होते .आणि नकळतपणे आम्ही पण त्या खेळात रंगून गेलो होतो…

गाडी बिघडली… असे सांगितले असते तर आमचा हिरमोड झाला असता. आम्ही कंटाळलो असतो… त्यासाठी काकांनी ही युक्ती केली होती.

काकांना किती छान सुचलं नाही का?

विघ्न आलं…  संकट आलं की घाबरायचं नाही .आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या चांगल्या सकारात्मक  गोष्टीकडे लावायचं. त्यात मन रमवायचं ….काही वेळ जाऊ द्यायचा कदाचित प्रश्न सुटतातही….

पण एक मात्र सांगू का?

त्या दिवशी आम्हाला खरंच प्रत्येकाच्या दगडात थोडा का होईना देव दिसला…..

बस मधून उतरताना काका म्हणाले…..

“आज दगडातला देव बघितलात. आता माणसातला देवही बघत जा बरं का….. देवाशी वागता तस माणसाशीही वागुन बघा …”

आम्ही सगळे स्तब्ध झालो …

त्या छोट्याशा वाक्यातून काकांनी आम्हाला खूप काही सांगितले शिकवले….

हळूहळू आम्ही शिकत आहोत.

त्या गणपतीकडे बघितले की मला हे सर्व आठवते.

माझा तो दगड अहं …गणपती आता माझ्याकडे आहे.

मला त्यात बाप्पा दिसतो…

आज काका नाहीत ..

पण त्यांनी सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान तुम्ही पण लक्षात ठेवा हं..ते आयुष्यभर पुरणारे आहे…

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दुःखद सुख… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ दुःखद सुख… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच  बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या. 

अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.

रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.  

शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी. 

‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.   

फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.       

या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो. 

ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट. 

प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे. 

आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.  

लेखक : श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

मुलींनो,

तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडा-कोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हांला वाटतं, तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.

लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो.

आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं, ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही, हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.

तुमची पाळी आल्यावर लगाबगीने तो तुमच्या उशा-पायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल, अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो, हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित्) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.

नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिकमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.

तुम्ही जसं उंची, अनुरूपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता, तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी ‘हो’ म्हणावं, असं होत नसतं.

तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.

सासूसासरे नक्कोच असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावं !

तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिटं बोलला की तुमचा जळफळाट होणार, हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.

आईबरोबरच मित्र, मैत्रिणीही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.

दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला- गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.

आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल, ते समोरून सांगावं. मुलांना आईने ‘मनातलं ओळखून दाखव बरं‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

खरे तर जनमानसात हा बदल होणे गरजेचे आहे.तेव्हाच मुलामुलींचे संसार खुशहाल  होतील व ते आनंदात राहतील.

लेखिका :श्रीमती प्राजक्ता गांधी

प्रस्तुती : श्रीमती उषा नाईक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

नाव वाचून कुणाला तर वाटेल की हा भेंडीच्या भाजीचा गोड प्रकार असावा पण ग्रामीण भागातील लोक चटकन ओळखतील की हे झाड आहे. होय! पिंपळासारखी पण तळहाता एवढी रुंद, साधारण हृदयाच्या आकाराची पाने असणारे, रंगीबेरंगी फुलांचे आणि पिंपळासारखी घनदाट सावली देणारे गुळभेंडीचे झाड. लहानपणीचा आमचा सवंगडी.

उत्तर दक्षिण दरवाजे असणाऱ्या आमच्या कौलारू घराच्या प्रवेशद्वाराजवळ आत येताना उजवीकडे गुळभेंडीचे झाड आणि डावीकडे विलायती चिंचेचे झाड होते. घरात प्रवेश करण्या अगोदर भल्या मोठ्या अंगणातून  पायवाट होती अगदी अंगणाच्या मधोमध. अंगण या पायवाटेने दुभागले होते. दोन्ही बाजूला हिरवाई आणि मध्ये पाऊल वाट जी कट्टयाशी येऊन थांबायची. घराच्या समोर जवळ जवळ बारा बाय बाराचा दगड, माती मुरूम टाकून ठोकून ठाकून गुळगुळीत केलेला, सडा सारवण केलेला सुरेख कट्टा अन मग घर अशी रचना होती. अंगणातून घराकडे येताना दगडी पायऱ्या, नंतर कट्टा आणि मग घरासमोर एक पायरी व मग प्रवेश असे स्वरूप होते. हिरवाईत लपलेल्या एखाद्या चित्रातल्या कौलारू घरासारखेच आमचे घर होते त्यामुळं रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याऱ्या लोकांना ते आकर्षित करायचे. भलं मोठं अंगण, त्याला काट्यांचे कुंपण, भली मोठी वेगवेगळी झाडं, फुले, वेली, भाज्या, गवत आणि भिरभिरणारी विविध रंगी फुलपाखरे!पावसाच्या पाण्यावर आमचं अंगण असं हिरवंगार दिसायचं. तर असंच एकदा आईने कुठूनतरी, मला वाटते मामाच्या गल्लीतून गुळभेंडीचे एक मजबूत दोन हात लांबीचे खोड आणले. एक छोटासा खड्डा खणून त्यात ते खोड लावलं आणि वर शेणाचा गोळा ठेवला. दररोज थोडं थोडं पाणी घालत राहिलो आणि एक दिवस इवलासा एक अंकुर बाहेर दिसला. लवकरच त्याचे रूपांतर पोपटी छोट्या पानात झाले. मग दुसरा तिसरा असे करत पाठोपाठ अंकूर फुटत राहिले. पावसाळ्यात मग छोट्या छोट्या फांद्या फुटत गेल्या आणि बघता बघता त्याचे उंच रोप झाले. त्या रोपाचं पुढं डेरेदार झाड झालं, बुंधा भक्कम झाला आणि भक्कम दाट सावली पडू लागली. शेतातून लांबून येणारे जाणारे वाटसरू बरेचदा झाडाखाली क्षणभर बसून पुढं जात. पावसात झाडाचा आडोसा घेत. उन्हातान्हाचे भारे घेऊन येणाऱ्या बायका चवळी, उडीद, मुगाच्या वेलींचे, गवताचे भारे झाडाखाली टाकून विश्रांती घेत. चेहऱ्यावर साचलेला घाम पदराने पुसत. तांब्याभर पाणी पीत, थकवा गेल्यावर मग भारा उचलून वाटेला लागत. अशी आईची न रस्त्यावरून येणाजाणाऱ्या बायकांची ओळख झाली. मग त्यातल्याच एकजणीला युक्ती सुचली. आमच्या शेळ्या बघून गावातील परटीन मावशी म्हणाल्या, “ही वज इतक्या लांब डोक्यावरन नेस्तोवर हितच झाडाखाली बसून आम्ही शेंगा तोडून घरी नेतो आणि वेल खातील तुमच्या शेळ्या. ” आईने पण होकार दिला. मग दरवर्षी त्या मावशी अशीच युक्ती करून डोक्यावरील भारा झाडाखाली टाकत. सावलीला बसून शेंगा तोडून भार हलका करून जात. अशा प्रकारे गुळभेंडीने अनोळखी माणसे जवळ आणली. भिकारी आकारी आला तर तिथंच सावलीत बसून आणलेलं सगळं शिळं पाकं मन लावून खायचा, त्याचे जेवून होईतोवर आम्ही त्याचे निरीक्षण करत असू. जेवल्यावर आम्हाला तो पाणी मागायचा पाणी पिऊन वाटेला लागायचा.

गुळभेंडीचा  हिरवा आणि पिकला पाला, फुले जनावरे खात. पावसाळ्यात दावणीला चिकचिक झाली की ती जागा वारसांडेपर्यंत म्हस गुळभेंडीला बांधत असू. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढला की थंडगार सावली म्हणून सावलीत म्हस बांधायची. म्हस बोडून घ्यायची असल्यावर पण तिथेच बांधत असू कारण दावणी जवळ म्हस बोडली की थोडे तरी केस तिथंच राहणार आणि परत जनावरांच्या पोटात जाणार.

कावळ्या- चिमण्यांचे तर हक्काचे झाड होते गुळभेंडीचे. पर्णसंभार जास्त असल्याने पानात लपणे त्यांना सोपे असायचे. बरेचदा कावळे तिथं घरटे बांधायचे. बरेचदा इकडून तिकडून चोचीत काहीतरी घेऊन तिथं फांदीवर बसून निवांत खात राहायचे. त्यावेळी हमखास कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवायची. गुळभेंडीचे किती प्रकार आहेत?मला माहित नाही पण  दोन प्रकारची गुळभेंडी मी पाहिली आहे. एक रुंद पानांची आणि एक लांबट हृदयाच्या आकाराच्या पानांची. याचे खोड खरबरीत असते. लाकूड टणक आणि टिकाऊ असते त्यामुळं छपराला मेडकी करायला एकदम उपयोगी.

गुळभेंडीची फुले एकदम पिवळीजर्द आकर्षक असतात. सुकली की ती तांबूस होतात. गुळभेंडीच्या लंबगोल कळ्या आम्ही खेळायला घेत असू. कळीचा लांब देठ तोडून छोट्याश्या देठाला गर्रकन फिरवून गोल गोल भोवऱ्यासारखे फिरवायचो. दुसरी एक मज्जा करायचो. भोवऱ्याचा पाठीमागील देठ हळूच काढून मधला दांडा अलगद उपसायचो, तो ओलसर पिवळा असायचा, त्या रंगांच्या टिकल्या कपाळावर लावायचो. गंधाची बाटली म्हणून त्या भोवऱ्याचा  उपयोग करायचो. फुलं गळून गेली की त्यातून फळे येत त्याला टेंभर म्हणतात. ती टेंभरं सुकली की वाऱ्याने खाली पडायची. जनावरानी तुडवून किंवा गाडीखाली येऊन ती चिरडायची आणि त्यातून अंगावर मलमल असलेले चॉकलेटी बी बाहेर निघायचे. ते आकर्षक बी उगीचच वेचत बसायचो. बरेचदा त्या पानांची पिपाणी करून वाजवायचो. असं हे गुळभेंडीचे सर्वांगाने उपयुक्त आणि बहुगुणी झाड आमच्या सवंगड्यासारखंच होतं. त्याच्या घनदाट सावलीत तासनतास मातीत खेळत बसायचो.

परवा वाचनात आलं की गुळभेंडीची पानं, फळं औषधी आहेत. तसेच ते पंचप्लक्ष पैकी एक आहे. (१. वड, २. पिंपळ, ३. पिंपरी, ४. औदुंबर५. पारोसा पिंपळ अर्थात गुळभेंडी. )आणि मला गुळभेंडीने थेट आमच्या अंगणात सोडले. तिथून थेट मामांच्या परड्यात सोडलं. मामांच्या परड्यात तरी गुळभेंडीचा केवढा मोठा विस्तार होता!मामांच्या परड्यात चिंचेची न गुळभेंडीची सावली दिवसभर हटायची नाही त्यामुळं सगळ्यांची जनावरं रात्रंदिवस तिथंच बांधलेली असायची. आजीसुद्धा कायम त्या सावलीत बसलेली असायची. अजूनपर्यंत ते डेरेदार झाड परड्यात होतं. आता मात्र  प्रत्येकाचे वेगवेगळे संसार आणि गुराढोरासाठी अडचण वाटायला लागल्याने ते तोडले.

आमच्याही अंगणातले कधीच तोडले, हेच की आकर्षक घर बांधायला!

आमच्या आई-वडिलांना शेतीची हौस होती म्हणून त्यांनी रोजगार करत आपलं अंगण शेतासारखं जपलं. अंगणात उगवलेल्या प्रत्येक झाडाला आपलंसं केलं, त्याला हवं तसं मुक्त वाढू दिलं, ते बाभळीचे असो की लिंबाचे, भेदभाव नाही केला की त्यांचा द्वेष सुद्धा. म्हणूनच की काय झाडांचे ते प्रेम माझ्या मनाच्या तळात झिरपत झिरपत गेलं. प्रत्येक झाडाचं ऋण आज मोठं झाल्यावर कळत आहे. ती झाडं तिथं नाहीत पण आठवणी जिथं तिथं सांडलेल्या, त्या मात्र कितीही गोळा केल्या तरी ओंजळ भरत नाही.

रस्त्यावर एखादे गुळभेंडीचे झाड दिसले की  म्हणूनच मला किती आनंद होतो म्हणून सांगू!(तुम्ही म्हणणार त्यात काय आनंद होण्यासारख?)पण तुम्हाला कळणार नाहीच माझ्यातलं आणि झाडातलं ते गूढ हळवं नातं!!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– ‘‘माझा व्यायाम शाळेतील पहिला (आणि बहुधा शेवटचा) दिवस !!’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘माझा व्यायाम शाळेतील पहिला (आणि बहुधा शेवटचा) दिवस !!’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

(…नुकताच जागतिक योग दिन साजरा झाला ..  त्यानिमित्त….एक सुरम्य आठवण …) 

आधीच मला व्यायामाचे वेड! (?) त्यात वेळ न मिळाल्याचे कौतुक! त्यामुळे गेली कित्येक वर्षं सर्वांनी सांगून, समजावूनही, मला व्यायाम किंवा ‘योग’ नावाची गोष्ट, मुद्दामहून कधीच करायचा योग आला नव्हता! शिवाजी पार्कला राहत असताना, घरासमोरच्या समर्थ व्यायामशाळेत रोज सकाळ-संध्याकाळ, शेकडो मुलं झरझर मल्लखांब करताना, व्यायाम करताना पाहून मला खूप कौतुक वाटे. आपणही असेच सुटसुटीत असावं, असं वाटे!

अलीकडेच मी व्यायामशाळेचे प्रमुख, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित असलेल्या श्री. उदय देशपांडे सरांनी केलेल्या विनंतीमुळे , व्यायामशाळेची विश्वस्त आणि आजीव सभासदही झाले. मी विचार केला, ‘चला, आपणही हातपाय हलवून पाहूया’, आणि मला कोण स्फूर्ती आली!!

तो सुदिन म्हणजे ७ जुलै…. माझा वाढदिवस! प्रत्येक वाढदिवसाचा निश्चय, हा नव्या वर्षातल्या पहिल्याच दिवशी करतात, तशा संकल्पासारखा – मोडणाऱ्या मनोऱ्यांसारखाच असतो, हे मला ठाऊक असूनही, मी पहाटे ६ वाजता व्यायाम शाळेत हजर झाले. तिथली उत्साही मंडळी उशा, चादरी  घेऊन आली होती , तसे मी काहीच नेले नव्हते. प्रशिक्षक मॅडमनी ‘शवासना’पासून सुरुवात केली….. आणि इथेच तर खरा गोंधळ झाला…!

सर्वांनी शरीरे जमिनीवर झोपून सैल सोडली. मॅडमच्या सांगण्यानुसार, पायाच्या बोटापासून प्रत्येक जण डोळे मिटून, लक्ष केंद्रित करत होता. नंतर बराच वेळ काय चालले होते, हे मला कळलंच नाही. काही वेळाने मी दचकून डोळे उघडले, आणि पाहते तो काय?…. आजूबाजूला रंगीबेरंगी कपड्यातले बरेच पाय….. हवेत लटकताना दिसले!! मी तर पुढच्या कुठल्याही सूचना ऐकण्यापूर्वीच कुंभकर्णासारखी ठार झोपले होते तर!! नेहमीप्रमाणे ताबडतोब स्वप्नही सुरू झाले होते… कुठे दगडावरही मेली छाऽऽन झोप लागण्याची ही माझी जुनीच सवय! माझा हा अवतार पाहून, प्रशिक्षक मॅडम मला शेवटी म्हणाल्या, “अहो, सॉरी हं.. तुम्ही इतक्या छान झोपी गेलात ते पाहून आणि सेलेब्रिटी म्हणून तुम्हाला कसं उठवू? असं झालं मला!” हे ऐकून तर मला वरमल्यासारखंच झालं. पण गालातल्या गालात हसूही फुटलं! 

त्यामुळे ‘शवासन’, हा माझ्यासाठी एकमेव सर्वांगसुंदर व्यायामाचा आणि परमेश्वरी कृपाप्रसादाचा प्रकार आहे, असं मी आजवर मानत आलेय!!!

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काय आहे सावित्री ? ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ काय आहे सावित्री ? ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सावित्री आहे भारतीय स्त्रीच्या प्रखर आत्मभानाचे,भारतीय युवतीच्या अपार संघर्षशील वृत्तीचे प्रतीक.

सावित्री आहे आपल्या इतिहासातील एक लखलखती तेजस्विनी,जी स्वतःच्या ईप्सितापासून तसूभरही ढळली नाही.सावित्री माणसाच्या मनातली ती तीव्र अभीप्सा आहे जी आपले उच्च ध्येय प्राप्त करण्याकरता मृत्यूवरही मात करते.

मानवजातीच्या कल्याणाकरता पित्याने केलेली तपश्चर्या, त्याचे तेजस्वी फलित असलेल्या कन्येचे डोळस संगोपन, तिच्या मनात त्याच उदात्त ध्येयाची रुजवण आणि तिच्याकडून त्याला मिळालेला उत्कट प्रतिसाद म्हणजे सावित्री.

सावित्री दैवी गुणसंपदेचा अविष्कार.

सावित्री स्वयंनिर्णयाचा अधिकार.

सावित्री स्वातंत्र्याचा उद्गार.

 

सावित्री ईश्वरदत्त प्रेमाचा स्वीकार.

सावित्री क्रूर नियतीचा अस्वीकार.

सावित्री तडजोडीला नकार.

 

सावित्री कठोर कर्माचा आचार.

सावित्री अतूट निष्ठेचा व्यवहार.

सावित्री योगाचा ओंकार.

 

सावित्री मानवी प्रगतीचा विचार.

सावित्री साहचर्याचा उच्चार.

सावित्री निसर्गस्नेहाचा प्रचार.

 

सावित्री मानवी पूर्णतेला होकार.

सावित्री आदिमायेचा अवतार.

सावित्री उत्क्रांतीचा आधार.

भारतातील प्रगत विचारांचा पुरावा आहे सावित्री.कन्येला पुत्राप्रमाणेच सुशिक्षित करून,तिला वर निवडीचे स्वातंत्र्य देऊन एकटीला वर संशोधनाला पाठवणारे मातापिता..

तिच्या निवडीचे आयुष्य केवळ एक वर्ष आहे हे कळल्यावरही तिच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहणारे..

तिच्या वनात रहाण्याला आक्षेप न घेता,ढवळाढवळ न करता तिच्या संघर्षाला दुरून पाठबळ देणारे.

सावित्रीच्या मनातही काही केवळ सुस्वरूप तरुणाशी विवाह करून सुखाने राहण्याची मर्यादित इच्छा नव्हती.तिच्या मनात होते एक भव्य,अमर्याद स्वप्न. ते साकार करण्यात तिला साह्य करेल असा जोडीदार तिने डोळसपणे निवडला. त्याचे भविष्य समजल्यानंतरही तिने प्रत्यक्ष नियतीशी लढायचे ठरवले

आणि ती जिंकली !

काय केलं तिनं त्यासाठी? 

तिनं जे केलं ते पतिसेवा,व्रतवैकल्ये, उपासतापास, वडाखालचा ऑक्सिजन याच्यापार पलीकडचं आहे.

Women empowerment,

liberal thoughts,

manifestation,

law of attraction,

goal setting,

parenting…… अशा अनेक आधुनिक संकल्पनांच्या पार पुढे गेली आहे सावित्री.

मानवाकरता तिनं दीर्घायुष्याचं वरदान मिळवलं यमाकडून.आणि त्याकरता यमाकडून मानवजातीकरता आणला योग..महायोगी श्रीअरविंद यांना या कथेतील दिव्यत्व जाणवले आणि त्यांनी या कथेला एका उच्च आध्यात्मिक दृष्टीने आपल्या सावित्री या इंग्रजी महाकाव्यातून मांडले.

ही नवी दृष्टी स्त्रियांनाच नव्हे समस्त मानवजातीला आत्मभान देणारी आहे. 

लेखिका : विनिता तेलंग 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवकालीन चमत्कार, ‘ विषपरीक्षा दीप ‘! — लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ शिवकालीन चमत्कार, ‘ विषपरीक्षा दीप ‘! — लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

तीनशे वर्षे महाराष्ट्र आणि पूर्ण हिंदुस्तान, सर्व प्रकारचे जुलूम,अत्याचार,अन्याय सहन करीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या राष्ट्राला एक मोठाच आधार लाभला. शत्रूच्या अत्याचाराविरुद्ध त्याच्याच भाषेत,सज्जड उत्तर देऊ शकणारा एक महान अवतार जन्माला आला. शिवाजी महाराजांचा एकेक पराक्रम म्हणजे शत्रूला धडकी भरवणारा, शत्रूच्या कुटीलपणाच्या चिंध्या उडवणारा आणि इथल्या माणसांना न्याय देणारा होता.

अशा या महापराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाला येत्या ६ जून २०२४ ( २० जूनला शिवशक ) रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आलेला हा एक सुवर्णामृत योगच म्हणायचा ! माझा यानिमित्ताने शिवराज्यमहोत्सव@३५० या विशेष लेखमालिकेमध्ये, शिवचरित्र आणि कर्तृत्व, किल्ले, वस्तू, वास्तू इत्यादींसंबंधी काही विशेष, वेगळे लेख देण्याचा प्रयत्न आहे. त्यातील हे पहिले पुष्प !

महाराजांच्या कित्येक मोहिमा, लढाया, शिष्टाई, योजना, त्यांची विचारातील अद्भुतता, अभिनवता यावर खरे तर अनेक प्रबंध लिहिला येतील. त्यांची तलवार, शिरस्त्राण, वाघनखे, आग्र्याहून निसटताना वापरलेले पेटारे, अनेक वेगळी शस्त्रे हे सारेच अद्भुत होते. अनेक गोष्टी कालौघामध्ये नष्ट झाल्या, काही फक्त कागदोपत्री उरल्या.तर कांही देशविदेशातील संग्रहालयात आढळतात.

असाच एक आजही अस्तित्वात असलेला आणि कल्पनेत सुद्धा खरा वाटणार नाही असा एक शिवकालीन दिवा म्हणजे विषपरीक्षा दीप ! पूर्वी कुठल्याही राजाला अन्नातून विषप्रयोग करून मारण्याचा सतत धोका असे. असे म्हणतात की मुगल राजे आपले अन्न खाण्याआधी ते एखाद्या नोकराला खायला लावीत असत. नोकराला काही झाले नाही तर मगच तो राजा ते अन्न खात असे. पण हा विषपरीक्षा दीप किंवा जहर मोहरा, हा दिवा खासच आहे. राजाला द्यायच्या अन्नाचा थोडा भाग आधी या दिव्यावर धरला जात असे. अन्नात जर विष असेल तर दिव्याचा आणि ज्योतीचा रंग पालटत असे. ज्योतीच्या बदललेल्या रंगावरून अन्नात  कुठले विष मिसळले आहे हे देखील कळत असे.

माझ्या मते हा दिवा जेड या दगडापासून बनलेला असावा. जेडचा दगड काही प्रमाणात विष शोषून घेतो. काही रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा रंग पालटतो. पूर्वी युरोपातील सम्राट याच जेडच्या पेल्यामधून मद्यपान करीत असत. त्यांचे हे पेले विविध वस्तू संग्रहालयातून जपून ठेवलेले आढळतात. मद्यात दगाफ़टक्याने विष मिसळले गेले असले तर ते जेड मध्ये शोषले जात असे.

एखाद्या रसायनाची परीक्षा करण्यासाठी हल्ली प्लॅटिनम वायर फ्लेम टेस्ट केली जाते. रसायनात बुडविलेली प्लॅटिनमची तार, ज्योतीवर धरल्यास ज्योतीचा रंग पालटतो. पालटलेल्या रंगावरून ते रसायन ओळखता येते. विषपरीक्षा दीपाची ज्योत हा याचाच पूर्वीचा अवतार असावा. दिव्याच्या जेड या दगडाचा बदललेला रंगही, अन्नातील विषाचे अस्तित्व सिद्ध करते. माझा असाही कयास आहे की मीराबाईला दिले गेलेले विष हे एखाद्या इमानदार आणि माहितगार सेवकाने या जेडच्या पेल्यातून दिले असावे. जेडच्या गुणधर्मामुळे विष, पेल्यामध्ये शोषले गेले आणि श्रीकृष्णाचे नाव घेत घेत मीराबाई वाचली असावी.

छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत पेशवे यांच्यापाशी असा विषपरीक्षा दीप होता असे म्हटले जाते. मी इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांना या दिव्याबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की हा दिवा शिवकालीन आहे हे खरे आहे. पण हा दिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कुठेही उल्लेख किंवा पुरावा नाही. याचे कारण महाराजांचे सेवक हे इतके विश्वासू होते की महाराजांवर दगाफटक्याने विषप्रयोग केला जाण्याची शक्यताच नव्हती. राजासाठी इमानदार सैनिक एक वेळ आपला जीव देईल पण महाराजांच्या जीवाला काही होऊ देणार नाही. 

आपले सुदैव असे की दंतकथा वाटावी असा हा दीप आजही पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात मूळ अस्सल स्वरूपात पाहायला मिळतो. या मूळ दिव्याचा मधला खांब अनेक ठिकाणी तुटल्यामुळे तो तारेने एकत्र बांधलेला दिसतो. मी या अस्सल दिव्यापुढे अनेकदा बसून या दिव्याचे चित्र तयार केले. यासाठी अनेकदा मुंबई – पुणे – मुंबई केले. त्याची मापे मोजली. नंतर या चित्रानुरूप हुबेहूब तसाच दिवा बनवून घेतला. ( सोबतचे छायाचित्र पाहावे ). ही एक दुर्मीळ वस्तू माझ्या संग्रहात समाविष्ट झाली.

लेखक : मकरंद करंदीकर.

(महत्वाची सूचना – यातील दिव्याचा फोटो खूपच दुर्मीळ आहे. फोटो पाहण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. म्हणून कृपया आपण हा लेख फॉरवर्ड केल्यास यातील फोटोही जरूर फॉरवर्ड करावा. फोटो व्हॉट्स ॲपवर पाठविताना प्रथम आपल्या फोनवर डाऊनलोड किंवा सेव्ह केल्याशिवाय फॉरवर्ड होत नाहीत.) 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

अन्नपूर्णेमध्ये पहिली देवी  आपली आई!

आज जेव्हा आपण वयस्कर व्हायला लागलो, तेव्हा कळतं की आईने आपल्याला बिनतक्रार, किती कष्ट करून, रांधून खाऊ घातलं! घरात माणसं भरपूर. एकत्र कुटुंबपद्धती. येणारा पैसा तुटपुंजा. पण त्याही परिस्थितीत तिने सगळ्याची सांगड घालून आपल्याला चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, भाकरी- पोळी असे रोजचे सुग्रास जेवण दिले. त्याकाळी इडली- वडे नव्हते. पण त्यातल्या त्यात जे नवनवीन करता येईल ,—-कधी सांजा, कधी उपीट, कधी गोडाचा शिरा, कधी थालीपीठ, धपाटी, डाळफळ, उपवासाची खिचडी भात, तांदळाची खिचडी, पोह्याचे पापड, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, भरली मिरची, लोणच्याचे अनेक प्रकार, चिवडा, लाडू, साध्या पिठाचे लाडू….. किती सुंदर करत होती ते!

कोणतीही गोष्ट  तिने वाया घालविली नाही. दुधाचे साईचे पातेले स्वच्छ धुऊन ते कणकेत मिसळले. बेरी काढून, त्यातच कणीक भाजून, साखर घालून त्याचे लाडू केले. भाकरीच्या उरलेल्या छोट्याशा पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून शेवटचे धिरडे म्हणजे पर्वणी असायची. त्याशिवाय सणावाराला होणारे वेगवेगळे पदार्थ, चारीठाव स्वयंपाक, गरमागरम पुरणपोळ्या, आटीव बासुंदी, श्रीखंड– घरच्या चक्क्याचे–, खरवसाच्या वड्या–, कणसाची उसळ, वाटल्या डाळीची उसळ…. आपण केलेल्या भोंडल्यासाठी केलेले दहा दिवसाचे विविध प्रसादाचे पदार्थ… हे सगळं करताना तिच्याजवळ श्रीमंती नव्हती. पण कोंड्याचा मांडा करण्याची युक्ती मात्र होती आणि मनामध्ये इच्छाशक्ती होती. कोणताही पदार्थ बाहेरून मागवल्याचे कधी आठवत नाही. कारळ, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या सदैव डबा भरून घरात असत.भरली मिरची, कांद्याचे सांडगे, कोंड्याच्या पापड्या… किती पदार्थाने घरातले डबे भरलेले असायचे!

खरंच या सर्व माउलींनी आपलं सगळं आयुष्य घराला जपण्यात घालवलं. त्या सगळ्या अन्नपूर्णांना आज साष्टांग दंडवत ! त्यामुळे आपण सुदृढ, उत्तम विचारांचे, बळकट मनाचे झालो. अगदी टोपलीभर भांडी आणि बादलीभर धुणं पडलं तरी चिंता न करता खसाखसा घासून मोकळे होणारी, कधीही कुठेही न अडू  देणारी सुदृढ पिढी झालो, ही त्या माऊलींची पुण्याई आहे!

अन्नपूर्णांनो, तुम्ही होतात, म्हणून आम्ही अंतर्बाह्य सुदृढ झालो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत!

लेखिका :अज्ञात

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग –  लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग –  लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा पेपरमध्ये ( संदर्भ – महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ‘ पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ‘ आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ‘ फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ‘ ऑरेंज’  विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ‘ लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ‘ ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. )

आता मला सांगा लॉरेन्स बाईंचे हे चुकले नाही का ? कंपनीने काम नाही दिले म्हणून काय झाले ? पूर्ण पगार तर दिला ना ! त्यातही या बाई दिव्यांग ! तरी त्यांनी असे म्हणावे ? आपल्याकडे तर काही मंडळी काम नको म्हणून दिव्यांग असल्याचा दाखला मिळवतात असेही ऐकिवात आहे. खरं म्हणजे ‘ असा दिव्यांग दाखला ‘ मिळवताना त्यांना केवढा त्रास होत असेल, संबंधितांना कदाचित काही पैसेही द्यावेही लागत असतील.  पण त्या बिचाऱ्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही.

आपल्याकडील नोकरी करणाऱ्या महिलांना जर लॉरेन्सबाई भेटल्या तर काही महिला त्यांचा हेवा करतील. त्यांना म्हणतील, ‘ तुमचे मागील जन्मातील काहीतरी मोठे पुण्य असावे हो. नाहीतरी अशी नोकरी ( काम न करता पूर्ण पगार देणारी ) कोणाला मिळते का ?

योगायोगाने याच मी महिन्यात युरोप ट्रीपसाठी गेलो होतो. त्या दौऱ्यात फ्रान्सचा समावेश होता. पण मला या लॉरेन्सबाईंची ही बातमी आताच इथे आल्यावर कळली. तिथे कळली असती तर या बाईंचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला गेलो असतो. त्यांना तुम्ही चुकता आहात अशी जाणीव करून दिली असती आणि त्या कंपनीविरुद्धचा खटला मागे घ्यायला लावला असता. पण एवढे महान कार्य आमच्या हातून होणे नव्हते. मला तर या काम न देता पगार देणाऱ्या कंपनीचा जाहीर सत्कार करावा असे वाटते. अशा कंपन्या भारतात येतील तर आमची केवढी सोय होईल ! बेकारी दूर व्हायला मदत तर होईलच पण आमच्याकडील सज्जन आणि प्रामाणिक माणसे अशा कंपनीला कोर्टात अजिबात खेचणार नाहीत. उलट आमच्याकडील माणसांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल.

अरे कंपनीत काम नसले म्हणून काय झाले ? त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मनाने पुष्कळ काही करता येईल. पूर्वी महिला देवळात कीर्तन प्रवचन वगैरे ऐकायला जायच्या. त्यावेळी त्या ते प्रवचन ऐकता ऐकता वाती वळत असत असे ऐकले आहे. आता आजच्या जमान्यात वाती वगैरे वळण्याचे काम राहिलेले नाही. पण ऑफिसमध्ये बसून विणकाम करणे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शिकणे, मैत्रिणींशी फोनवर गप्पा किंवा चॅट करणे आम्ही सहज करू शकतो. त्या काळात आम्ही नवीन काही शिकू शकतो. अर्थात नवीन काही शिकलंच पाहिजे असं काही कंपनीचं बंधन असणार नाही. फक्त वेळेत येणं आणि वेळेत जाणं एवढंच आम्हाला करावं लागेल. ते आम्ही आनंदानं करू. अर्थात या सगळ्यांना गोष्टींना काही मोजके अपवाद असतीलही. त्यांना असं काम न करता पगार घेतलेला आवडणार नाही. पण आपण त्यांचा विचार कशाला करायचा ! लोकशाहीत बहुमत फार महत्वाचे !

तेव्हा तुम्हाला म्हणून सांगतोकी ही लॉरेंसबाई जर यदाकदाचित भारतात आलीच तर ते आम्हाला मुळीच आवडणार नाही. अरे, पूर्ण पगार देऊनही तक्रार करते म्हणजे काय ? शिवाय कोणतेही काम न करता. स्वातंत्र्यपूर्व काळात वसाहतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. त्यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी ‘ सायमन गो बॅक ‘ अशा घोषणा दिल्या. तसेच काहीसे या लॉरेन्सबाई भारतात आल्या तर होऊ शकेल. ‘ लॉरेन्स गो बॅक ‘ असे फलक चौकाचौकात लागतील.

मागे अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. जपानचा राजा वृद्ध झाल्याने  त्याने निवृत्तीची घोषणा केली. जपानमध्ये आता राजेशाही नसली तरी राजघराण्यातील व्यक्तींना मान दिला जातो. अगदी इंग्लंडप्रमाणेच. तर त्या जपानच्या राजाने निवृत्तीची घोषणा केली. आता मला सांगा वय झाले तरी हाती असलेली सत्ता सहजासहजी सोडून कोणी असे निवृत्त होतो का ? आपल्याकडे तर निवृत्तीच्या वयात जरा जास्तच उत्साहाने कार्यरत राहणारी मंडळी पाहिली की मन कसे अभिमानाने भरून येते. त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारांना ते वेड्यात काढतात. संगीत शारदा नाटकातल्या प्रमाणे ‘ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..’ त्या काळात पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर वर्षे वय असले तरी ती व्यक्ती नवरदेव म्हणून लग्नासाठी तयार असायची. आता लग्नाचं जाऊ द्या हो पण राजकारणात तरी वयाचं ऐशीवं दशक ओलांडलं तरी सत्ता सोडण्याची आमची इच्छा नसते. तेव्हा त्या जपानच्या राजाला काय म्हणावं ? बरं, खरी गंमत पुढेच आहे. त्या राजाचा मुलगा त्याचा वारस म्हणून त्याच्या गादीवर बसला. या आनंदाप्रीत्यर्थ जपान सरकारने लोकांना चक्क दहा दिवसांची सुटी जाहीर केली होती.

आपल्याकडे तर अशा निर्णयाचं मधुकर तोरडमलांच्या भाषेत सांगायचं तर मोठं हे केलं असतं, मोठा हा केला असती आणि मोठी ही केली असती. मोठं स्वागत केलं असतं, मोठा आनंद साजरा केला असता, मोठी मजा केली असती. फटाके फोडून स्वागत झाले असते. पर्यटनस्थळे फुल्ल झाली असती. त्याला जोडून लोकांनी अजून एकदोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेतल्या असत्या. पण हे जपानी लोक सुद्धा त्या फ्रान्समधल्या लॉरेन्सबाईसारखे. त्यांना जपान सरकारचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. या दहा दिवसात करायचे काय असा वेडगळ प्रश्न त्यांना पडला. या काळात उद्योग ठप्प होतील, उत्पादन बंद पडेल, देशाचे आर्थिक नुकसान होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्या सुटीऐवजी त्यांना ज्यादा काम करून तो आनंद साजरा करायला आवडले असते असेही काही जण म्हणाले. आपल्याकडे अशा लोकांना आपण मुर्खांच्या गणतीत काढू. चांगली दहा दिवस सुटी मिळाली. मस्त फिरायला जायचे किंवा आराम करायचा. मनसोक्त खायचे प्यायचे आणि एन्जॉय करायचे. काम तर नेहमी असतेच ना !काही लोकांना असे वाटते की फ्रान्स, जपान यासारख्या देशांची प्रगती लोकांच्या अशा दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच झाली आहे. पण केवळ सुधारणा, प्रगती, देशहित यांचा सततच विचार किती करीत राहायचा ? आम्हाला आमचे काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही ? आम्ही हौसमौज तरी केव्हा आणि कशी करायची ? छे ! छे ! लॉरेन्सबाई तुमचे आणि जपानी नागरिकांचे  हे चुकलेच !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares