☆ हिंदू वर्षातील पहिला सण.. गुढीपाडवा☆ सौ शालिनी जोशी ☆
चैत्र प्रतिपदेपासून वसंत ऋतू सुरू होतो. त्यामुळे धार्मिक सण आणि वसंताच्या आगमनाचा आनंद म्हणजे गुढीपाडवा. वसंतही भगवंतांची विभूती, ते म्हणतात, ‘अहमृतूनां कुसुमाकरः।’ वसंतऋतूला कुसुमाकर किती सुंदर शब्द आहे नाही ? चैतन्याची अनुभूती देणाऱ्या वसंताचा हा पहिला दिवस. होळीला दुष्ट प्रवृत्तीचा नाश शिकवल्यावर सुष्ट प्रवृत्तीचे वर्धन आणि जयजयकार सांगणारा हा दिवस. रूढीच्या निमित्त्याने निसर्गाचे रक्षण आणि सत्प्रवृत्तीचे वर्धन यातून आपल्या पूर्वजांनी शिकवले.
गुढीच्या काठीवर पालथा घालतात तो धातुचा गडू हे विजयश्रीचे व सामर्थ्याचे प्रतिक. जसे राजाच्या डोक्यावर किरीट असते. या दिवशी कडुलिंबाचे विशेष महत्व. तो गुढीला बांधतात तसेच जेवणात त्याची चटणी खातात. त्याच्या अंगच्या औषधी गुणधर्मामुळे उष्णता कमी होते, पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचेचे आरोग्य सुधारते. याच्या सर्वच भागांचा औषधात उपयोग. म्हणून कडुलिंबाचे सेवन एका दिवसापुरते नसून वर्षभर व्हावे हे सुचवायचे आहे. आंब्याची डहाळी म्हणजे मांगल्य आणि चैतन्य, तर फुले म्हणते कोमलता हे गुण आपण अखंड जोपासावे. साखरेच्या गाठीची मधुरता वाणीत असावी. कोणत्याही कर्मा मागील संकल्प (विचार )म्हणजे सुपारी आणि मग सिद्धी रुपी श्रीफळाचा लाभ होतो. हळदी कुंकवासारखे सौभाग्य आणि रांगोळीचे मांगल्य प्राप्त होते. त्यासाठी मुख्य गरज पाठासारख्या स्थैर्याची आणि काठीच्या काटकपणाची. हे सर्व साधले तर विजयश्री नक्कीच प्राप्त होते. पण येथे नम्रता महत्त्वाची, जी गुडी तिरपी करून व्यक्त केली जाते. अशा प्रकारे यशासाठी आवश्यक सगळ्या गुणांचे हे प्रतीक. यशा बरोबर वैभवाची गरज सुचवितो जरीचा खण आणि गुडीची उंची म्हणजे श्रेष्ठ यशाची अपेक्षा. अशी ही गुढी वर्षारंभी पुजायची, गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे घेणाऱ्या वसंतोत्सवाचा आनंद निसर्ग रक्षणांनी घ्यायचा. हाच गुढीपाडवा.
गुढीची पूजा केल्यावर प्रार्थना म्हटली जाते ‘ ओम् ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेsस्मिन् संवत्सरे नित्यमं मंगलमं कुरु।
नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे नव्या पंचांगाची पूजा या दिवशी करतात. पुढे येणाऱ्या रामनवमी चे नवरात्र याच दिवशी सुरू होते.
आता पाडव्याला मिरवणुका, संगीताचे कार्यक्रम असे सार्वजनिक कार्यक्रमही होतात. एकंदरीत वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी व तो आनंद वर्षभर टिकवा ही इच्छा.
☆ सुखद सफर अंदमानची… भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
सेल्युलर जेल
विहार ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर पाऊल ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाम ज्या भूमीवर गळला त्या भूमीवर आपण उभे आहोत ही भावना आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय असल्याचा अभिमान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. समोर होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा. त्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहिलं की समोर दिसतात
देवनागरी लिपीतील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा ही अक्षरं. हे नाव वाचताना मान आणि खांदे दोन्ही अभिमानानं ताठ होतात. भारतभूमीचा हा हिस्सा कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं असावा ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण आता बदल होतोय. इथली सगळी बेटं कात टाकलीय जणू. भारतीय नावांनी ओळखली जाऊ लागली आहेत. एक फोटो इथं घेतला जातोच.
इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुपारी आम्ही समुद्रिका मरिन म्युझियम बघितलं. या ठिकाणी अंदमानच्या समुद्रात मिळणारे अनेक सागरी प्राणी ठेवले आहेत. काचेच्या पेटीतील, नैसर्गिक वातावरणात ठेवलेले हे सजीव छोटीशी समुद्र सफर करवून आणतात. निळ्या समुद्राखालच्या अनोख्या रंगीबेरंगी दुनियेत हरवून न जाल तरच नवल. शार्क माशाच्या हाडांचा मोठा सांगाडा आपलं स्वागत करतो. सावरकरांच्या भेटीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे मस्य दुनियेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवावेच लागते. पुढील भेट जास्त महत्त्वाची असते.
आज राष्ट्रीय स्मारक असलेले सेल्युलर जेल, खरंतर ब्रिटिशांनी बांधलेला तुरुंग आहे. या तुरुंगाची रचना सायकलच्या चाकासारखी आहे. (ओक्टोपस या प्राण्यासारखी) या रचनेला पॅनोप्टिकॉन म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान तत्त्वज्ञ बेंथमन यानं ही रचना सुचवली होती. इमारतीच्या मध्यभागी एक उंच टॉवर आहे ज्यावर चोवीस तास एक पहारेकरी असतो. या टॉवर वर एक घंटा आहे. ही घंटा वाजताच उठण्याची सक्ती होती. घंटा सुर्योदय होण्यापूर्वीही वाजे. दमलेल्या कैद्यांची झोप पूर्ण होण्यापूर्वीच. या टॉवरभोवती सायकलच्या स्पोक्सच्या आकारात सात इमारती. प्रत्येक विंगला तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या. जणूकाही सजीवांच्या शरीरातील पेशी. या खोल्यांची संख्या सातशे. पण रचना अशी की इतर खोल्यांमधील कैदी बिल्कुल दिसत नाहीत. आपण समाजप्रिय आहोत. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणारे इतर कैदी दृष्टीस न पडणं हे सुद्धा खूप त्रासदायक ठरत असेल. आपल्या शरीरातील पेशींमध्ये देवाणघेवाण होत असते. या जेल मधील सेल्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. कैद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी कठोर शिक्षा होत असे.
या जेल मधील प्रत्येक सेलची, लांबीरुंदी ४. ५मीटर×२. ७मीटर(१४. ८फूट×८. ९फूट) एवढीच आहे. तीन मीटरवर (९. ८फूटावर) फक्त एक खिडकी आहे. जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट. एका पसरट लोखंडसदृश्य धातूच्या भांड्यात कसलं तरी हिरवट पाणी मिळत असे. त्यात किडे अळ्या पडलेल्या असत. पिण्याचं पाणी शारीरिक स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकणार नाही इतकं घाण, गटारगंगेसारखं. वास सहन न होणारं. कैद्यांना कोलू ओढून तेल काढावं लागत असे. नारळ सोलावे लागत. साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ही कामं विश्रांती न घेता करणं फारच कठीण होतं. त्यांना जर कोणी कामचुकारपणा करतोय असं वाटलं किंवा दिवसभरात दिलेल्या प्रमाणात तेल गाळलं गेलं नाही अथवा नारळ सोलले गेले नाहीत तर कोडे मारले जात. हात वर केलेल्या अवस्थेत पाठीवर, पायावर हे कोडे पडत. तरीही काम न झाल्यास, बंडखोरी केल्यास दोन पायांत आडवी काठी ठेवली जाई. मार तर खावाच लागे पण पाय जवळ घेता येत नसत.
शिक्षा जीवघेणी तर होतीच. निकृष्ट अन्न, पाणी, यांनी आजारपण ठरलेलंच होतं. अन्नत्याग केला किंवा उपोषण केलं तर जरबीनं नाकातून नळीनं दूध घातलं जाई. या धडपडीत फुफ्फुसात दूध जाऊन काही स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टी लपवल्या जात. काहींना वेडं ठरवलं गेलं तर काही खरंच स्वतःचं भान विसरून मानसिक स्वास्थ्य हरपून बसले.
याच परिसरात फाशीघर आहे. एक म्युझियम आहे जिथं, कोलू, साखळदंड, आसूड इ. ठेवले आहे. हे बघताना मानसिक यातना न झाल्या तर नवलच. इथं भेट देणारी एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, मन भरून आलं नाही, देशाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अभिमानानं उर भरून आला नाही. या इतिहासाची साक्ष देत उभा असणारा पिंपळ सुद्धा आपल्या सगळ्यांचं दैवत बनतो. इथल्या हुतात्मा स्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. गुडघे टेकून इथली माती कपाळाला लावतो. जड पावलांनी, जड ह्रदयानं आणि त्याहून जड मनानं तिथून बाहेर पडतो…कदाचित एक मन तिथंच ठेवून…
सकाळी उठल्याबरोबर सौ ने ऑर्डर दिली “अहो ऐकलत का?…”
मी म्हणालो “हो तुझाच तर ऐकतोय बोल.”
“ काही नाही खाली वाण्याच्या दुकानातून दोन नारळ घेऊन या आणि ते सोलून आणा.. तुम्हाला सोलता येत नाहीत.”
मी.. “कशासाठी?” नको तो प्रश्न मी विचारलाच..
ती म्हणाली.. “ एक.. संध्याकाळी मारुतीला फोडा आणि एक सकाळी फोडून मी गणपती बाप्पाला नैवेद्याचे मोदक करणार आहे “ ती म्हणाली. “ सुनीता विल्यम्स परत आली. मी देवाला बोलले होते ती सुखरूप परत येऊ दे तुला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवेन.. !”
“ तिच्यासाठी एवढा नवस बोलण्याचा काय काम?… “
“ अहो जरा काहीतरी वाटू द्या नवीन नवीन संशोधनासाठी ती बाई नऊ महिने अडकून पडली तिथे… बाई म्हणून परत आली.. हो ओढ असते ना आम्हा बायकांना घराची. तिच्याबरोबर तो बाप्या एकटा असता ना तर कधीच मरून गेला असता.. बाई होती म्हणून सगळ धीराने निभावलं.. !”
“ एवढं काही नाही हं.. ” मी म्हटलं !..
“ गप्प बसा.. बाथरूम मध्ये एकदा अडकून पडला होता तर केवढा गोंधळ केला. चार धक्के बाहेरून लागवले तेव्हा ती बाथरूमची कडी निघाली.. पंधरा मिनिटात पॅनिक झाला होता तुम्ही… नऊ महिने तिने बिचारीने एकटीनं घीराने काढले कारण तिला दिसत होत.. आपलं घर ! आठ दिवस माहेरी गेले आणि दोन दिवसात परत आले तर तुम्ही म्हणता का एवढ्या लवकर आलीस? अहो ओढ असते बाईला घरची.. माहेर वगैरे पहिले काही वर्ष.. तुम्हाला कळायची नाही आम्हा बायकांची ओढ…. ”
“ पण मग त्याच्यासाठी गणपतीला कशाला नैवेद्य दाखवायचा अरे विज्ञानवादी तरी हो नाहीतर अध्यात्मवादी तरी हो.. ! “
“ मी कुठलाही वाद घालत नाही लक्षात ठेवा. विज्ञान हवंच ते आपल्याला प्रगतीपथावर नेणार आहे पण मनस्वास्थ.. त्याला अध्यात्मही हवं ! आम्हा बायकांची भाबडी श्रद्धा असते आणि तीच तुम्हाला कितीतरी वेळा तरुन नेते.. पहा सुनीताबाईसुद्धा आपल्याबरोबर भगवद्गीता, वेद, गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या म्हणून सुखरूप परत आल्या. मनोधैर्य वाढवणाऱ्या त्या गोष्टी होत्या त्यांना खात्री होती. आपल्याबरोबर देव आहे आणि आम्हा बायकांची श्रद्धा बरोबर काम करत असते बरं !. तुम्हाला ठाऊक आहे का त्या यानात एक तरी बाई का पाठवतात?.. ”
“ का का? “ मी माझा अज्ञान प्रकट करत आजीजीने म्हणालो..
ती.. ” कारण बाईच्या जातीला ओढ असते घराची. अंतराळात गेलेली पहिली लायका कुत्री होती.. कुत्री.. मादी जातीची आणि बायका चिवट असतात बरं का.. कठीणातल्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन विजय मिळवण्याचं कसब परमेश्वराने बाईला दिले बाई.. अशी सहजासहजी मरत सुद्धा नाही… ती लढते निकरानं शेवटपर्यंत.. ”.. आणि अजून बरच काही ती बोलत होती…
… मी मनात म्हणालो ‘ कुठून हिला विचारलं.. मुकाट्याने नारळ आणले असते तर झालं असत ना.. खाल्ल्या की नाही शिव्या ‘.. शेवटी मी तिला शरण गेलो आणि म्हणालो “ बाई पिशवी दे आणि पैसे दे. नारळ आणतो.. अगदी सोलून आणतो पण तू मला बोलून घेऊ नकोस.. सखे तू आहेस म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालले बरं..”
अशी शरणागतीची चार वाक्य टाकून मी मोकळा झालो आणि आज जेवायला मोदक मिळणार या आनंदात सुनीता विल्यम्सचे आभार मानून दुकानाकडे चालू लागलो…!
☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ?…. तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.
छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.
महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या. स्वराज्यनिष्ठेला तोड नाही. अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.
अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.
१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ? मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.
लेखक : श्री अभय देवरे
सातारा
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” – लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित☆
☆
आनंद न देणाऱ्या नात्यांची ओझी घेऊन जगण्यात काय अर्थ आहे ?
त्यापेक्षा तीच नाती जपावीत जी आपल्याला सुख देतात, वेळ देतात आणि आपली काळजी करतात !
जे आपल्या मनाचा विचार करतात आपणही त्यांच्या मनाचा विचार करावा !
आपलं सुखदुःख त्यालाच सांगावं ज्याला त्याची किंमत असते !
तुम्ही रडत आहात आणि समोरचा हसतोय किंवा तुम्ही हसताय आणि समोरचा रडतोय अशा व्यक्तीला काही सांगून, वेळ देऊन काय उपयोग ?
ज्याचा फोन यावा वाटतो त्याच्या जवळच मन मोकळं बोलावं,
ज्याचा मेसेज यावा वाटतो त्याच्याशीच जास्त connect रहावं !
जे आपला मेसेज वाचून साधा दोन शब्दांचा सुद्धा रिप्लाय देत नाहीत, त्यांना आपली खुशाली कळवायची तरी कशाला ?
जीव लावावा आणि लाऊन घ्यावा !
कुणीतरी माझं आहे आणि मी कुणाचा तरी आहे असं वाटणं म्हणजेच प्रेम, आदर आणि मैत्री !
अहो छोट्या छोट्या गोष्टीतही खूप मोठा आनंद असतो तो देताही आला पाहिजे आणि घेताही आला पाहिजे !
तुझा डी. पी. छान आहे, तू आज सुंदर दिसतेस, मला तुझा ड्रेस आवडला, तुझ्या हाताला खरंच खूप मस्त चव आहे… अशा साध्या प्रतिक्रिया देण्याने सुद्धा समोरच्या व्यक्तीचं मन आनंदून जातं, सुखावतं, प्रसन्न होतं !
मनाची ही प्रसन्नताच तुमचा-आमचा बी. पी., शुगर नार्मल ठेवत असते !
खरं सांगा, असं एकमेकांशी का बोलू नये ? असं बोलायला काही पैसे लागतात का ? खूप कष्ट पडतात का ?
मुळीच नाही, तरीही माणसं या गोष्टी का करत नाहीत तेच कळत नाही ?
कुढत राहण्यापेक्षा फुलपाखरा सारखं उडत रहावं आणि जीवन गाणं मजेत गावं !
ज्या व्यक्तीशी बोलून तुम्ही सुखावता त्याच्याशी अधिक बोला !
मन मोकळं बोलल्यामुळे निसर्गतःच आपलं फेशियल होईल आणि तुम्ही खूप सुंदर, टवटवीत दिसायला लागाल !
गालावरची खळी आणि चेहऱ्यावरची लाली, हे मनाच्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब असतं, म्हणून जी माणसं जवळची वाटतात त्यांच्याशी भरभरून बोला !
प्रेम करताही आलं पाहिजे आणि प्रेम मिळवताही आलं पाहिजे !
आवडीच्या व्यक्ती सोबत तुम्ही जितकं जास्त Open होऊ शकता, शेअरिंग करू शकता, तितके तुम्ही जास्त आनंदी राहू शकता, सुखी राहू शकता !
या आनंदी मना मुळेच आपण सुंदर, प्रसन्न आणि हसतमुख दिसतो आणि सर्वांना हवेहवेसे वाटतो !
दुःख असलं तरी दुःखी राहू नये आणि पुन्हा पुन्हा तेच ते रडगाणं गाऊ नये !
आहे ते स्वीकारायचं आणि मजेत पुढे जायचं !
हिंडायचं, फिरायचं, चांगलं रहायचं, फोटो काढायचे, डी. पी. बदलायचा, समोरच्याला छान म्हणायचं आणि आपल्याला कुणी छान म्हणलं की त्याला हसून thank you म्हणायचं !
जगणं सोप्पं आहे
त्याला अवघड करू नका
आणि मन नावाच्या C. D. मध्ये
Sad music भरू नका !
थोडं तरी मना सारखं जगा
आयुष्यभर दुसऱ्याच्या मनासारखं जगलात म्हणून कुणीही तुमचा पुतळा उभारणार नाही !
☆
लेखक : प्रा. विजय पोहनेरकर, छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद )
94 20 92 93 89
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत जनाबाई… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆
‘नामयाची दासी’ म्हणून बिरुद मिरवणारी जनाबाई मुक्ताबाईंचे समकालीन. जन्म अंदाजे इ. स. १२६० ते १२७०. गोदावरी तीरावरील गंगाखेडच्या दमा (वडील) आणि करुंड (आई )या भगवत् भक्त दांपत्याचे मुलगी. जातीने शूद्र पण आई-वडील पंढरीची वारी करणारे होते. लहानपणीच आई-वडील दुरावले. पाच वर्षाची अनाथ पोर जना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे राहिली. देवाची आवड आणि लाघवी स्वभाव यामुळे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाली.
नामदेवांच्या घरातील अंगण, तुळशी वृंदावन, शेणगोवऱ्या वेचण्याची जागा, कोठार, माजकर हेच त्यांचे विश्व बनले. तिथेच त्यांना परमेश्वर दिसला. त्यांचे मन एवढे विशाल झाले की दळणकांडण, धुणीभांडी सडासारवण ही त्यांची कष्टाची कामे देवाचीच झाली. काम करताना विठ्ठलाच्या नामात त्या इतक्या तल्लीन होत की देवच काम करतो हा भाव निर्माण होई. त्यामुळे त्या म्हणत,
झाडालोट करी जनी l केर भरी चक्रपाणी l
पाटी घेऊनिया शिरी l नेऊनिया टाकी दूरी l
ऐसा भक्तिसी भुलला l नीच कामे करू लागला l
जनी म्हणे विठोबाला l काय उतराई होऊ तुला l
दासीपणा आणि अलौकिकता यांचा समतोल त्यांनी साधला.
द्वैतातील काम करताना अद्वैताचा आनंद त्यांनी अनुभवला आणि अद्वैताचा आनंद द्वैतात भोगला. त्यामुळे वास्तव जीवनातले श्रम हे त्यांच्यासाठी क्रीडा झाले. म्हणून त्या म्हणतात,
दळू कांडू खेळू l सर्व पाप ताप जाळू l
सर्व जीवांमध्ये पाहू l आम्ही एक होऊनि राहू l
जनी म्हणे ब्रह्म होऊ l सर्वाघटी ब्रह्म पाहू l
कर्माला क्रीडेचे रूप मिळाले की त्यातील पाप, ताप, दाह सर्व लोपतात. सर्वत्र ब्रह्मच दिसते.
संत नामदेवामुळे ज्ञानेश्वर, विठोबा खेचर, सोपान, चोखोबा, गोरा कुंभार, अशा संत मंडळींचा सहवास जनाबाईंना लाभला. ज्ञानेश्वरांविषयी जनाबाईंना विशेष आदर होता. ‘परलोकीचे तारूl म्हणे माझा ज्ञानेश्वरु’ असे त्या म्हणत असत. नामदेवांसारख्या गुरूचा अखंड सहवास त्यांना लाभला. त्यामुळे गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची गरज भासली नाही. संत नामदेव उत्तर, दक्षिण भारतात तीर्थयात्रेसाठी गेल्यावर वारकरी संप्रदायाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. साधारण ३५० अभंग त्यांनी लिहिले. कविता, आरत्या, ओव्या, पाळणे, पौराणिक कथा यांचा समावेश त्यांच्या काव्यात आहे. चरित्रे, उपदेश, भारुडे अशा रचनाही केल्या. अध्यात्मातील योगसाधना आत्मसात करून ज्ञानोत्तर भक्तीचा स्विकार केला.
‘स्त्री जन म्हणूनि न व्हावे उदास’ असे सांगून स्त्रियांना नवीन वाट दाखवली. स्वतः अविवाहित राहिली. विठ्ठलाचे मानुषीकरण करून त्याला माय, बाप, सखा, सांगाती असे संबोधले. नि:संग, त्यागी वृत्ती, निर्भयता, सहनशिलता, वात्सल्य, समर्पण हे भाव त्यांचे ठिकाणी होते. तरीही समाजकंटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. एकदा विठोबारायाचा कंठा चोरल्याचा आळ बडव्यानी जनाबाईंवर घेतला. त्यांना सुळी देण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. सुळच विरघळला. जनी परीक्षेत उतरली.
नामदेवाच्या कुटुंबातील अन्य कुणालाही संत संबोधले गेले नाही. पण दासी असणाऱ्या जनाबाईला तो मान मिळाला. नामदेवांच्या घरी सर्वच विठ्ठल भक्त. त्यांच्याविषयी सांगताना जनाबाई म्हणतात,
नामदेवाचे घरी l चौदाजणे स्मरती हरी l
चौघे पुत्र चौघे सुना l नित्य स्मरती नारायणा l
आणिक मायबाप पाही l नामदेव राजाबाई l
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी lपंधरावी ती दासी जनी l
विरोधी भक्तीने कधी विठ्ठलाला जनाबाईंनी शिव्याही घातल्या. उद्वेगाने त्यांनी म्हटले ‘अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या l’ तशाच त्यांनी विराण्याही रचल्या. अशा ह्या जनाबाई लोकांच्या स्तुतीनिंदेच्या पलीकडे जाऊन भक्तीचा प्रसार करणाऱ्या होत्या. दीर्घायुष्य भोगून नामदेवांच्या बरोबर विठ्ठलाच्या पायरीत अंतर्धान पावल्या. (शके १३५०).
तरीही ‘विठू माझा लेकुरवाळा’ अशी जनाबाईंची मायाळू व प्रेमळ साद आणि मातृका विठाबाईचे व तिच्या संत लेकरांचे जनाबाईने रेखाटलेले भावविश्व जनाबाईंना अमर करते.
तेव्हा वेळ पुरत नसे आता जाता जात नाही.. तेव्हा कामं संपत नव्हती.. आता हाती कामच नाही —
या खोलीतून त्या खोलीत बिनकामाच्या येरझार्या.. गादीवर झोपू का खुर्चीत बसू.. कां व्हरांड्यात मारू फेऱ्या….
खायला काळ झालोय् का.. भुईला भार होतोय् का.. जगायला कारण उरलं का नाही.. काय करावं ते कळतंच नाही —
😣
वर्हाडकल्डा मित्तर बोलला.. नाय् ता इच्च्यार नको रे बाप्पा.. नन्नाचा पाढा काहून गायला.. देव तुजेवर व्हईल नं खप्पा —
तुये अशे रे उफराट बोलने माया त बिल्कुल नायच पटले.. तुयासारक्या टग्या बाप्यांनी होयाचे नाय् कदी केराचे टोपले —
👍
मालवणी दोस्त ऐकुन धावला.. मिठी मारून प्रेमानं बोलला.. वसाड्या तुजा म्हनना तरी काय.. शाळ्याचो पानी पी, ग्वाड किती हाय… !
नारल सोलुक झापा इणुक येळ माका पुरूचा नाय.. घरात बसून आंबट तोंडान् डोक्याचा खोबरा करूचा नाय्…
👍
तेवढ्यात आमची ही कण्हत आली.. कमरेत तिच्या उसण भरली.. झंडू बाम देत म्हणाली.. ” थोडसं चोळून द्याल का ?” तेवढ्यात मुलगा घाईत आला.. हातात कागद ठेवित म्हणाला “दहा कॉपीज् प्रिंटर वरून पटकन् काढून द्याल कां?”
आपण साधं कोपऱ्यावर जायचं तर घरी सांगून, कधी परत येणार त्याप्रमाणे किल्ल्या, कामाच्या बायका सगळ्या सोयी लावून निघतो… परगावी जाणार असलो आणि घरच्यांचा स्वैपाक येण्याचा उजेड असेल तर दोन दिवस असतील तर दोन भाज्या extra करून, श्रीखंड आणून ठेवून जातो.. जरा जास्त दिवस जाणार असू तर चिवडे लाडू चकल्या असे डबे भरून, स्वयंपाकाच्या बाई नसतील तर रोजच्या जेवणाचा सरळ डबा लावून, मुलांना १७६० गुणिले काही सहस्र सूचना देऊन, कामवाल्या बायकांना दांड्या मारू नका म्हणून धमकावून मग आपण जिथे जाणार असू त्याप्रमाणे आपल्या bag मध्ये अनंत गोष्टी भरून, शेजारी पाजारी, मैत्रिणी, घरातले छोटे, मोठे सगळ्यांचा निरोप घेऊन एकदाच्या बाहेर पडतो… परत येणार असू त्या तारखेनंतरचेही अनंत कार्यक्रम ठरवूनच आपण एकदाचे बाहेर पडतो…
ही अशीच बाहेर पडली असेल का? जरा तिथली देखरेख आणि थोडं पुढचं संशोधन करते आणि येतेच असं म्हणून ?? घरी दारी काय काय व्यवस्था लावून गेली असेल? तिला निघताना जाणवलं असेल का ती कधी परत येणार हे तिच्या हातात नाही ? तिची तयारी वेगळी, तिची प्रवासाची गाडी नव्हे तर यान, तिचं जाणं लग्न, मुंज, ट्रीप किंवा सेमिनार conference ला नव्हे… तिचं जाणं.. थेट अंतराळात… येणं… सगळं नीट असेल तर नियोजनानुसार.. नाहीतर… काहीच माहीत नाही…
काय असेल तिची मानसिक अवस्था… धडाडी आणि बुद्धिमत्ता आहेच हो तिच्याकडे पण स्त्रीच ना ती.. हुरहुर, भीती, भविष्याच्या अनिश्चिततेचे सावट, वाढणारे वय, तिथे अडकल्यावर झालेली घालमेल… काय काय सुरू असेल तिच्या मनात…
पण अशी अंतरिक्षात झेंडे लावणारी सुनिता आज सुखरूप परत आली.. तिनं धाडसाने ठेवलेलं प्रस्थान शास्त्र, तंत्रज्ञान आणि परमेश्वराची इच्छा यांच्यामुळे सुफळ संपूर्ण झाले..
कधीही न पाहिलेली ती सुनीता… पण ती परत आल्याचा आनंद आज प्रत्येकाला आहे.. ९ महिन्याने परत आली… जणु नवा जन्म घेऊन… तुझे पृथ्वीवर खूप खूप स्वागत सुनिता!!!
एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी… या गाण्याचा आज वेगळाच अर्थ समजला मला..
लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे
संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
होय. हे तीर्थस्थळ भारतात महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात “हिवाळी” नावाच्या गावात. ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.
ही जिल्हापरिषदेची बारा तास भरणारी बारमाही शाळा आहे. अगदी ३६५ दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात. रविवार नाही, दिवाळी नाही की कसलीही स्थानिक सुट्टी बिट्टी कुछ नही !
असं काय असतं या शाळेत ?
यु ट्यूबवर या शाळेचा एक व्हीडीओ पाहण्यात आला. ३६५ दिवस बारा तास भरणारी शाळा या thumbnail ने मला थांबवलं. मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हीडीओ समोर आले, आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावरा उत्सुकता निर्माण झाली. याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली.
या शाळेचे कर्ता करविता आहेत, श्री केशव गावित गुरूजी. २००९ मध्ये DEd होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना येथे ‘टाकलं’ गेलं. बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं तसे गुरूजी स्वतः तर तिथे रूजलेच पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपे फुलवली आहेत; नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे.
या शाळेत बालवाडीपासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत. शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृति कार्यक्रम आहे. सकाळी साडेनऊ वाजता शाळा भरते ती रात्री साडेनऊला संपते. शाळेचं बांधकाम पर्यावरण पूरक आहे. या इमारतीत एकही खिडकी नाही पण दहा दिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो, भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात.
या शाळेत अॕम्फी थिएटर आहे. अद्ययावत वाचनालय आहे, संगणक कक्ष आहे. बोलक्या भिंती आहेत, गोशाळा आहे. परसबाग आहे. — – या सा-यांशी जीवप्राण जोडलेले केशव गुरुजी आहेत, गावकरी आहेत आणि पासष्ट विद्यार्थी आहेत. नेमलेला अभ्यासक्रम जून ते आॕक्टोबर पर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्यविकास !
– – डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचे – तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचे कौशल्य !
या शाळेतले विद्यार्थी दोन्ही हातांनी दोन वेगवेगळी कामं एकाच वेळी करतात.
.. दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात. म्हणजे डावा हात एक ते दहा लिहीत असेल तर त्याच वेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो.
.. डावा हात मराठी शब्द लिहीत असतो त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो.
.. डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा (mirror image) उजवा हात लिहितो.
.. डाव्या उजव्या हाताने कामं चाललेली असतांना तोंडाने संविधानाची कुठलीही कलमे अचूक सांगता येतात. ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते. विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात. (विचारून पाहा, तुमची स्वतःची पाठ असली तर संविधानातली कुठलीही कलमे नि पोटकलमे !
.. रंगांची सुसंगत रचना करणारे ठोकळे (क्यूब साॕल्व्हर) काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात.
.. मुलं प्रश्न विचारतात.
.. यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात, गाणी शिकतात, विविध भाषा शिकतात.
.. पाचवी सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात. त्यांची काळजी घेतात.
ही कौशल्ये माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरूजी मोकळेपणाने मुलांसमोरच कबूल करतात. कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग ते दाखवतात आणि वर्षे तीन ते दहा बाराची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात.
गो पालन ! यात गायीची काळजी घेणं, गोठा साफ करणं, शेणखत तयार करणं, गायीवर माया करणं याच शाळेतला अभ्यासक्रम आहे.
परसबाग फुलवणं, झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे. शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात. मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलाग गोमातेच्या मुखी घातला गेला.
केशव गुरूजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरुवातीचा प्रवास खडतरच होता.
या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे. अनेक दानशुरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे.
श्री रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे.
विशेष म्हणजे नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते.
शासनाने गुरूजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही.
या विद्यार्थ्यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदीजींनी दिले आहे.
या शाळेतले माजी विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहेत. इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ, शेतकरी, चित्रकार, भाषा अभ्यासक, शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत. त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरूजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे. आॕनलाईन आणि आॕफलाईन शिक्षण पद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे.
त्यांची एकुलती मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांबरोबरच शिकते आहे. तिनेही सगळी कौशल्ये आत्मसात करायला सुरूवात केली आहे.
गुरूजींनी आजवर नाटक सिनेमा यांची चैन केलेली नाही. घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरी पुरताच सहभाग घेतात. पत्नी सविता आणि आईवडील भावंडं यांचा पूर्ण पाठिंबा गुरूजींना आहे.
बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासा दोन तासांच्या भेटीत राजकारण, जातीधर्मकारण, या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणा-या, व्यावहारिक प्रलोभनांपासून आश्चर्यकारक रीतीने लांब राहाणा-या या ऋषितुल्य श्री. केशव गावित या गुरूजींची स्तोत्रे किती गावित ?
नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकाने जाऊन पाहायला हवेच असे !
(फोटो आणि चित्रीकरण सहाय्यक श्री. अजय सिंह.)
लेखिका : सुश्री वैशाली पंडित
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “असाही एक आंतरराष्ट्रीय स्मरणदिन…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन ::: 25 मार्च हा दिवस“आंतरराष्ट्रीय स्मरण दिन” म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस प्रथम 2008 साली साजरा करण्यात आला, 400 वर्षांहून अधिक काळ अमानुषपणे छळ झालेल्या जवळ-जवळ 15 दशलक्षाहून अधिक गुलामांना ज्यात पुरुष, महिला आणि मुले यांचेही बळी गेले होते त्यांना हा दिवस स्मरण आणि सन्मानित करतो.
“मानवाधिकारांचे इतिहासातील सर्वात वाईट उल्लंघन” गुलामांच्या व्यापारामुळे केले गेले असे आपल्याला इतिहासच सांगतो. गुलामांचा व्यापार हा जगातील सर्वात मोठा सक्तीचा क्रूर व्यापार होता. 400 वर्षांहून अधिक काळ, आफ्रिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर निर्गमन जगभरात अशा प्रकारे पसरले जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते किंवा मानवी इतिहासात नोंदवले गेले नव्हते.
सन 1501 आणि 1830 च्या दरम्यान अमेरिकन लोकसंख्येत युरोपियन लोकांपेक्षा आफ्रिकन लोकांची वाढ जास्त झाली.
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈