मराठी साहित्य – विविधा ☆ नाती आणि विश्वास… भाग-१ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

नाती आणि विश्वास… भाग-१ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आयुष्यात शिक्षण, संस्कार, प्राथमिक मुलभूत गरजा यांच्या सोबतीने आवश्यक असते ती म्हणजे आपण जोडलेली, निभावलेली नाती. ही नातीच आपला समाज असतो. या समाजाचं आपण काही ना काही देणं लागतो. 

पैसा आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे तितकीच नाती आणि जिवाभिवाची माणसं देखील महत्वाची आहेत. माणसाचं माणूस पण, माणुसकी जपणारी ही नातीच त्याचं समाजातील अस्तित्व ठरवतात. 

अमली पदार्थ सेवन, व्याभिचार या वैयक्तिक बाबी आहेत. त्याचा अतिरेक किंवा लपवा छपवी नात्यात अत्यंत घातक असते. “जसा बाप तसा बेटा” ही म्हण कायमच चांगल्या अर्थाने वापरात यायला हवी. 

आपल्या मुलानं तरी आपण केलेल्या चुका करून इतरांची मने दुखावू नयेत या करिता आपण आपली वागणूक, वर्तन, व्यवहार आदर्श वत असावा.

आपण कुणाचा  आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा?  आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर  आपण  आपल्या  आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला  अतिशय कठीण जाईल. 

आपण  आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत  ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेनं या समाज व्यवस्थेला ,  कुटुंब व्यवस्थेला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही. 

विश्वास हा दोघांचा दोघांवर, दोन्ही कडून तितकाच दृढ असायला हवा. नात्यात हा विश्वास पटवून देण्यासाठी कींवा संशयास्पद वातावरण निर्मिती साठी,‌नात्यात‌ कटूता, संशय, सामंजस्य निर्माण होण्यासाठी,तिसऱ्या व्यक्तीची गरज लागावी यांसारखे दुर्दैव नाही. नात्यात पारदर्शकता असेल संशय, अविश्वास निर्माण होत नाही आणि जर झालाच तर तो वेळीच निराकरण होणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा नाते संपुष्टात येते.  नात्यात बदली माणूस येऊ शकतो पण तो आपल्या माणसाची जागा घेईलच असं नाही. आपण आपल्या कुटुंबास जसे वागवतो तसेच आपली पुढची पिढी त्याच्या कुटुंबाशी, समाजाशी वागणार आहे याचा विचार करून आपण आपले वागणे ठेवायला हवे.

“मी‌ माझ्या माणसांचा  आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी, आद्यकर्तव्य आहे…”  हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती  मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं ..? घरातल्या स्री ला आधार द्यायचा की , आपल्या संशयास्पद वागणुकीचा भार व्हायचं हे  आता ज्याचं त्यानचं ठरवायचं. ..!

पुरूषाला मैत्रीणी आणि स्त्रियांना विवाहोत्तर मित्र जरूर असावेत..पण त्यात दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असावी..! “मी सांगतो आहे तेच खरं आहे.. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव” असं सांगून जर आपण असत्याचा आधार घेतला तर आपण इतरांना नाही पण स्वतः ची मात्र अवश्य फसवणूक करतो.

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकावर खोटं बोलण्याची वेळ येते.. काही वेळा इतरांचे मन जपण्यासाठी ते आवश्यक देखील असते..पण या खोट्या ची बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सवय होऊ नये हे पथ्य पाळायला हवे. 

पती पत्नीच्या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेमापोटी नात्यातील एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सर्व चुका माफ करत असेल,त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा विश्वासघात होऊ नये याची काळजी दुसऱ्या व्यक्तीने घ्यायला हवी. आपले गृहस्थ जीवन जितके सुखी, आनंदी, समाधानी असेल,तितके आपण जीवनात यशस्वी होतो. आपल्या मनात येईल तसे वागणे, भरपूर पैसा कमावणे,आपली व्यसने जोपासणे, उच्च शिक्षण घेऊन विशिष्ट समाजात नाव लौकीक निर्माण करणे म्हणजे यशस्वी जीवन नव्हे.. “आपल्या मनातली माणूसकी इतरांच्या मनात अबाधित रहाणं”  हे यशस्वी जगण्याचं खरं सूत्र आहे.

आई वडील जन्म भर पुरत नाहीत पण आईवडिलांनी केलेले संस्कार आपण आपल्या पुढील पिढीला समर्पित करणे आपले आद्य कर्तव्य आहे.

आपल्या वडिलांच्या दुर्गुणांचा त्याग करून त्यांच्या मधील सद्गुणी वारसा उचलणे जास्त हितकारक असते.

“आपलं ठेवायचं झाकून.. अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून” ही‌ मानसिकता  बदलायला हवी. मैत्री च्या नात्यात तर (पारदर्शकता,) प्रेम आणि विश्वास हेच त्या नात्यांचे श्वाच्छोश्वास ठरतात. मैत्री त अशी काही गुपिते जिवापाड जपली जातात जी, जीव गेला तरी एकमेकांच्या ओठांवर येतं नाहीत.वेळप्रसंगी असे मित्र  आपल्या कठीण काळात आपले आधार ठरतात. अशा मित्रांना कधीही विसरू नये. असा मित्र रागावला तरी तोच आपला खरा, सच्चा नातेवाईक असतो.कारण त्याचा राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतः ला करून घेतलेली शिक्षा असते. जिथे जिवापाड प्रेम असते.. नात्यात तिथेच राग ही असतोच.

मी मध्यंतरी वाचले होते,

“मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच*

परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर,कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून निव्वळ यासाठी तरी नाती जोडा नाती जपा….!!!”

माणसाच्या माघारी कोण त्यांच्या साठी किती रडला,कसा रडला यापेक्षा तो कसा जगला..कसा होता याच्या आठवणी माणसाला जास्त रडवतात.माणसाचं‌ माणूसपण ‌त्याच्या खरे पणाने सिद्ध होत.त्यानं नात्यात केलेल्या आर्थिक उलाढाली वर नाही. हिशोब कागदावर रहातो.पण नाती मनात कायम जिवंत रहातात.. अगदी कोणी कितीही दूर गेला तरी मनात जोडलेली नाती मनात कायम रहातात. कारण त्या व्यक्तीनं दिलेलं प्रेम, विश्वास, आपलेपणा आणि निभावलेलं नातं यांवर त्याच, तिचं नातं अबाधित रहातं.

अतिशय सुंदर असा संदेश यातून दिला गेला. कुटुंबातील व्यक्ती हाच आपला एकमेव आधार आहे . “आपल्या कुटुंबातील माणसांना आपण आपला वेळ द्यायला हवा” आपण हा सल्ला इतरांना देताना आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी विश्वास पात्र आहोत का..? “आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किती विश्वासात घेतो, किती वेळ देतो..?” तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?”  याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.

– क्रमशः भाग पहिला 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘नागपंचमी…’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

‘नागपंचमी…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

सनातन वैदिक हिंदू धर्म हा एकमेवाद्वितीय आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सर्व सण/उत्सव हे विज्ञानावर तरी आधारित आहे किंवा कर्तव्यावर. ‘कृतज्ञता’ हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे. निव्वळ ‘सोहळा’ (इव्हेंट) साजरा करणे हा कोणत्याही सणांचा किंवा उत्सवाचा हेतू खचितच नाही. नागपंचमी सुद्धा त्यास अपवाद नाही. एकच चैतन्य सर्व प्राणीमात्रांत भरून राहिले आहे, यावर हिंदू धर्माचा नुसता विश्वास नाही तर तशी पक्की धारणा आहे. हिंदू धर्मियांनी ‘तसे’ आचरण करून दाखविले आहे, असे आपल्या लक्षात येईल. ही परंपरा खूप प्राचीन आहे. त्याकाळात दळणवळणाची, संपर्काची अल्पसाधने असतानाही तत्कालीन समाज व्यवस्थेने ही परंपरा रुजवली, सांभाळली आणि वृद्धिंगत केली. याबद्दल आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज मात्र ही हजारो / लाखो वर्षांची परंपरा कुठेतरी शीण होते की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ब्रिटिशांना जे त्यांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या राजवटीत जमले नाही ते मात्र त्यांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीने सत्तर वर्षात करून दाखविले आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे. एका अर्थाने आज हिंदू धर्म हा अप्रागतिक, बुरसटलेल्या विचारांचा आणि एकूणच मागासलेला आहे असा जो प्रचार सर्वच माध्यमांतून चालू आहे त्यास प्रत्युत्तर देणे हा या लेखनाचा हेतू निश्चित आहे, पण तो गौण आहे. या लेखाचा मूळ हेतू हा आहे की आपला हिंदू धर्म हा विश्वातील सर्व धर्मांमध्ये वैज्ञानिकता आणि कृतज्ञता याबाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि तसे आपण साभिमानाने जगास सांगितले पाहिजे. आज त्याची नितांत गरज आहे.

हिंदू धर्मात पशुपक्षांचीही कृतज्ञभावाने पूजा करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. गायीवासरांसाठी ‘वसुबारस’, शेतीच्या कामास उपयुक्त ठरणाऱ्या बैलांसाठी ‘बैलपोळा’, मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कोकिळेसाठी ‘कोकिळाव्रत’ तर शेतीचे उंदरांपासून आणि इतर किटकांपासून संरक्षण करणाऱ्या नागांसाठी ‘नागपंचमी’, वनरक्षणासाठी ‘वटपौर्णिमा’, अशा प्रमुख सणांचा उल्लेख करता येईल. नागांचा इतिहास मनुष्याइतकाच पुरातन आहे असे म्हणता येईल. साक्षात देवाधिदेव महादेव यांनी नागाला आपल्या कंठी धारण केलेले आहे. कृष्णलीलांमध्ये कालिया मर्दन प्रसिद्ध आहे. त्यानंतर मंगलमूर्ती गणपतीच्या कमरेत नाग आहे, तर सर्व सृष्टीचे पालक भगवान विष्णू हे स्वतः शेषशायी निवास करतात. रामावतार आणि कृष्णवतारात स्वतः शेषनाग भगवंताचे एकदा ज्येष्ठ बंधू झाले तर एकदा कनिष्ठ बंधू झाले. नागास शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हणतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे राजे हे  ‘नागराज’ असावेत. राजाचा मान केला की स्वाभाविकपणे तो आपसूकच प्रजाजनांचाही होतो. या दृष्टीने विचार करता नाग हा आपल्या संस्कृतीचा तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.

नाग देवता आणि त्यांची प्रजा यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वडाच्या फांद्या तोडून पूजा करणे आणि नागोबाला पकडून त्याची पूजा करणे हे दोन्ही एकाच प्रकारचे आहे आणि दोन्हीही त्याज्यच आहे. भले साप दूध पीत नसेल, नागाणे खात नसेल, पण त्यामागील मुख्य हेतू अथवा मर्म लक्षात न घेता मी त्यावर टीका करणार नाही, आपल्याच परंपरांची खिल्ली उडवणार नाही, असे आज प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. हा सण श्रावणात येतो. या महिन्यात हवा सारखी बदलत असते, पोटातील वैश्वानर थोडा मंद असतो, म्हणून भाजलेले कडधान्य, दूध, लाह्या इ. पदार्थ पचावयास हलके आणि पौष्टिक असतात. म्हणून ते नागाला वाहण्याची पद्धत असावी. दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. ती सुद्धा नागास वाहिली जाते. त्यानिमित्ताने दुर्वा दारी राहतील असाही प्रयत्न असावा. कृषिप्रधान देशात कृषिला उपयुक्त ठरणाऱ्या सर्व भूतमात्रांचे मनुष्याने ऋणी असणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते. 

नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा’ अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना केवढा आनंद होतो ! मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. पर्यावरण संतुलन करण्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा अर्थात नागदेवतेचा मोठा वाटा आहे. निसर्गात प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. ही एक जीवनसाखळी आहे. यातील एक दुवा जरी निस्टला तरी पूर्ण साखळी तुटते. आज पर्यावरणाची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामागे या ‘साखळी’चा कमकुवतपणा कारणीभूत आहे. याबाबतीत आज ‘सर्पमित्र’ अतिशय जबाबदारीने कार्य करीत आहेत. आजच्या मंगलदिनी त्यांचेही कौतुक करायला हवे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करायला हवी. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर करण्यासाठी घरांमधून कापणे, चिरणे आदी आजच्या दिनी वर्ज्य केले जाते. शेतकरी आजच्या दिवशी जमीन नांगरत नाहीत, एकूणच शेतीच्या कामांना सुट्टी असते. 

याबाबत काही पौराणिक कथाही सांगितल्या जातात. विस्तार भयास्तव त्या इथे देत नाही. आपण सर्वांनी नागपंचमीचे महत्व समजून घेऊ आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या सरपटणाऱ्या प्राण्यांची हत्या न करण्याचा संकल्प करू आणि खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी करू.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय।

जय नागराज।

 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

ज्यांचे जीवनच सारे..‘गमप’मय झाले होते, त्या आदरणीय लोकशाहीर  विठ्ठल उमपांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या बरोबरच्या काही सुंदर आठवणी भराभरा जाग्या झाल्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे. 

काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनलसाठी उमपांचं आणि माझं गाण्याचं शूटिंग होतं. माझं गाणं झाल्यावर मी उमपांना ऐकण्यासाठी थांबले आणि इतका ‘पांडुरंगमय झालेला विठ्ठल’ मी प्रथमच पहिला! परमेश्वराला अत्यानंदानं आळवीत, ते ‘स्वरचित’ काव्य गात होते… 

गोरोबाच्या हाती, मातीचा चिखल

बोलतो विठ्ठल पांडुरंग… ||१||

*

सावतामाळी तो मळ्यात राबता

मळा होई बोलता, पांडुरंग… ||२||

*

नामदेव शिंपी शिवताना कपडे,

शिलाई ओरडे पांडुरंग… ||३||

*

विठ्ठल अभंग – गातो रे विठ्ठल

ऐकतो विठ्ठल – पांडुरंग… ||४||

एखादा चित्रपट पहावा, त्याप्रमाणे त्यांच्या ओठून शब्द सहजपणे ‘जिवंत’ होऊन येत होते. स्टुडिओची ‘पंढरी’ झाली होती! साक्षात् विठ्ठलाचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं.  परमेश्वराशी तद्रुप होणं म्हणजे काय, याचा सुंदर आविष्कार होता तो! प्रत्येक अंतऱ्यागणिक डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येत होता! 

त्यानंतर एकदा उमपांनी मला ‘जांभूळ आख्यान’चं निमंत्रण दिलं. मुलाच्या परीक्षेमुळे लवकर परतायचं ठरवूनही, संपूर्ण आख्यान पाहूनच घरी आले. खुर्चीला खिळवणारं हे संगीत आणि नृत्यही भारावून टाकणारं होतं. परमेश्वरानं दिलेल्या पुरुषी रूपातही ७८ वर्षांच्या (त्यावेळी) उमपांनी साक्षात् सुंदर कोवळी द्रौपदी ‘जिवंत’ उभी केली. पांडवांच्या अनुपस्थितीत कर्ण आल्यावेळी, तिचं कर्णाला पाहून लाजणं, मिलनोत्सुक होणं, अधीर होणं आणि पांडवांसमोर, कृष्णाने सत्य उघड केल्यावर बिथरणं, सारं इतकं थरारक, की प्रत्येक श्रोता ‘स्वतःतच’ द्रौपदीला अनुभवत असावा! या वयात त्यांचा स्टेजवरील वावर, खड्या आवाजातील भावस्पर्शी गाणं, अभिनयाच्या बादशहालाही लाजवेल असा अलौकिक आविष्कार पाहून वाटलं, देहभान विसरून कलेचा ‘परमोच्च आनंद’ घेणं म्हणजेच  ‘अध्यात्म’!

मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माझं अध्यात्म’ या सदरात त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ मधील मला अत्यंत अध्यात्माविषयी लिहिलेलं वाचून उमपांचा मला फोन आला. ते म्हणाल, “पद्मजा ताई, तुम्हाला संतांचं संचित मिळालं आहे. एखाद्या पोक्त माणसानं इतरांबद्दल मनमोकळेपणे, मुक्तपणे लिहावं, तसं स्वानुभवाचं गांठोडं तुमच्या आत्म्याच्या कप्प्यातून आलंय. ती दृष्टी तुम्हाला इतक्या लहान वयात मिळाली आहे, ही परमेश्वरी कृपाच!” असं सांगून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. 

आजही जांभूळ आख्यानातील ‘अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…’

या ओळी कानी घुमू लागल्या, तरी उमपांचा चतुरस्र अभिनय डोळ्यांसमोरून हलत नाही!

याच आदरणीय शाहीर विठ्ठल उमपांच्या नावे मला २४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘वत्सला प्रतिष्ठान’ तर्फे ‘मृद्गंध’ हा मानाचा पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारताना विठ्ठल उमपांच्या ‘आठवणींचा गंध’ मला पहिल्या पावसानंतरच्या मृद्गंधासारखाच उत्साहित करून गेला! काव्य, गायन, वादन, लेखन, नृत्य, सर्वच क्षेत्रांत अशी ‘अलौकिक’ मुशाफिरी करणारा असा कलावंत, पुन्हा होणे नाही!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अवयवांची गंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆ ☆

? वाचताना वेचलेले ?

अवयवांची गंमत लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.

२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.

३. पाठ मजबूत ठेवा कारण शाबासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.

४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये की एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.

५. सगळ्यात सुंदर नातं हे        डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात, पण एकमेकांना न पाहता.

६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे पण असावं, कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.

७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही?”त्यावर पाय हसून म्हणाले, “यासाठी जमिनीवर असाव लागतं, हवेत नाही.”

८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात. आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!

९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.

१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात?” त्यावर हारातील फुले म्हणाली,  “त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.”

११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लागतो.

१२. या जगात चप्पल शिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपतं..

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पाऊस –गद्य जलचित्रं…” ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पाऊस –गद्य जलचित्रं…” ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सगळ्यांना एकाच रंगात रंगवणारा हा पाऊस आपला ‘ओला रंग’ किती तऱ्हेने उधळतो ते बघण्यासाठी शहरांमधला पाऊसही बघायला हवा. या ओल्या रंगाची एक गंमत म्हणजे हा ओला रंग प्रत्येकाचा निराळा असतो. ज्याच्या त्याच्या कोरडेपणाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा. त्या ओल्या रंगाची मी पाहिलेली ही दृश्यं… एका अर्थाने माझ्यासाठी जलचित्रं !

जलचित्र १

एक तरुणी, छत्री घेऊन बसस्टॉपवरती उभी असते. तिच्या लाल भडक छत्रीवर पावसाचे पारदर्शी थेंब टपटप असा हलकासा गहिवरलेला आवाज करत पडत असतात. छत्रीवर पडल्यावर क्षण दोन क्षण ते थेंब तिच्याशी हितगुज करण्यात ‘रंगून’ जातात. आणि पुन्हा अलवारपणे तिला निरोप देतात, ते आपली ओलसर खूण तिच्यावर उमटवूनच. काहीसं लालसर रंगाचं बिंब सामावलेलं त्यांचं क्षणभराचं रूपडं गळून पडताना एखाद्या नाजूक फुलाची पाकळी गळून पडावी तसं मोहक दिसतं. त्या मोहक दृश्याकडे पहात असतानाच पुन्हा माझं लक्ष त्या तरुणीकडे जातं. 

जलचित्र २

भिजू नये म्हणून अंग चोरून उभ्या असलेल्या तिच्या मनात मात्र पावसाच्या धारा बरसत असाव्यात, असं ती ज्या मायेने ओल्या केसांवरून हात फिरवते ना त्यावरून वाटतं. ती वारंवार बस स्टॉपकडे कधी बस येईल या आशेने बघत असते. ही तिची आशा छत्रीच्या आत बाहेर चुळबुळ करणाऱ्या तिच्या पावलांवरून दिसते. तिच्या सॅंडलच्या आत पावसाचे थेंब काळ्या रंगाच्या पट्ट्यांशी हितगुज करत बसलेले दिसतात. पावलांच्या मागेपुढे होण्याने त्यातले काही थेंब घरंगळत जाऊन अंगठ्यावरती बसतात. तिथल्या नेलपॉलिशचा लाल रंग त्यांना  जास्त जवळचा वाटत असावा का…  का छत्री बद्दलचा जिव्हाळा असावा? कोण जाणे. 

निराशेने ती मनगटावरच्या घड्याळात डोकावते. त्यालाही पावसाची थोडीशी लागण झालेली असते. त्यावर दोन चार शिंतोडे उडालेले असतात. ते पाहून खांदा आणि मान यांच्या पकडीत छत्री तोलून धरून ते पावसाचे शिंतोडे ती आपल्या दुपट्ट्यानं हळुवारपणे पुसते. आणि हे करताना नकळत तिची छत्री थोडीशी कलते आणि ती तरूणी भिजते. मग पुन्हा एका हातात छत्री धरून दुसऱ्या हाताने आपलं डोकं पुसण्याची तिची केविलवाणी धडपड फसते. पावसाची धार तिला संधी मिळताच बिलगते. शेवटी अपरिहार्यतेने ती स्वतःला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न सोडून देते. आणि आपली नजर पुन्हा बसस्टॉपवर वळवते. 

जलचित्र ३

आपसूकच माझं लक्षही मग पुन्हा बस स्टॉपकडे जातं. तोही तिच्यासारखाच शरणागत असतो. आपला स्थिर कोरडेपणा विरघळू देणारा… इतक्यात बस येते. ती देखील निथळतच असते. तिच्या टपावरून गळणारं पाणी जणू कुणीतरी अभिषेक करत असल्यासारखं एका धारेत, एका ओळीत पडत असतं. बंद खिडक्या स्वच्छ झालेल्या असतात. त्यावरून ओघळणारे पावसाचे थेंब स्वतःच स्वतःचं एक चित्र रेखाटत असतात‌. एरवी ज्यांच्याकडे बघितलं की धूर आणि काळोख याशिवाय काहीही दिसत नाही असे बसचे जाडजुड टायरसुद्धा न्हाऊमाखू घातलेल्या गुटगुटीत बाळासारखे स्वच्छ दिसतात. इतके की वाकून किंचित डोळे मोठे करून बघितलं तर त्यांचं नावसुद्धा दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पायऱ्या मात्र मळकटलेल्या असतात. नितळतेचा असा हळवा स्पर्श त्यांना फारसा लाभत नाही. जरा स्वच्छता झाली की कोणीतरी आपला ठसा उमटवून जातंच. 

जलचित्र ४ 

बस थांबताच इतक्या वेळ आपला घेर फुलवून पावसात मनसोक्त भिजणाऱ्या, वेळप्रसंगी एकमेकींवर कुरघोड्या करणाऱ्या या रंगीबेरंगी छत्र्या आपल्या मर्जी विरुद्ध का होईना मिटून जातात. त्यांना आपल्या एका हातात धरून सगळेजण घाईघाईत बसमध्ये शिरतात. कोरडेपणा शोधू लागतात. पण एव्हाना या ओल्या रंगाने आतमध्येही प्रवेश केलेला असतोच. खिडकी जवळच्या सीटवर बसण्याची एरवी कोण अहममिहिका लागलेली असते. पण आता मात्र त्यांच्या या आरसपानी रूपाचं कौतुक करायचा कुणाचाही मूड नसतोच, उलट त्यांच्याकडे काहीशा नाराजीने बघतच अंतर राखून बसलं जातं. 

जरा बऱ्यापैकी कोरडी सीट बघून मी बसते.‌ माझ्या  निथळणाऱ्या छत्रीला प्रथेप्रमाणे पायापाशी ठेवते. तिकीट काढण्यासाठी पैसे देताना मला जाणवतं कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघंही जवळपास अर्ध्याहून अधिक भिजलेले आहेत… पण जणू हा ओलावा त्यांच्या अंगाला जन्मजात चिकटल्यासारखे ते सरावाने वावरत आहेत. हळूहळू लोक जसे येऊ लागतात तसं मला जाणवू लागतं की सारं काही या पावसानं व्यापलंय. प्रत्येकजण थोडा तरी ओला आहेच. हे ‘ओलं दुःख’ म्हणावं का ‘ओलं सुख’ म्हणावं ?? काहीही असेल, पण ते सगळ्यांना एकाचवेळी बिलगतंय हे नक्की. 

आणि मग मला जलरंगात न्हायलेली अशी निरनिराळी चित्रं दिसू लागली. एखादं झाड, पावसात मनमुराद भिजणारी लहान मुलं, मोठ्या घेरदार आजोबा छत्रीत दाटीवाटीने उभं राहिलेलं एखादं कामगाराचं कुटुंब, बस स्टॉपवरची मोबाईल वर बोलणारी माणसं, एका कोपऱ्यात थोडीशी कोरडी जागा भरून खाणे दाणे विकणारा, एवढ्या भर पावसात रेनकोट घालून पाणी पुरीच्या ठेलाला प्लास्टिकने झाकून उभा असणारा पाणीपुरीवाला इ.इ. 

एखाद्या भलंमोठं चित्र त्याच्या इतर बारीकसारीक तपशीलासह प्रत्येक चौकोनात विशिष्ट पद्धतीने चित्रकाराने चित्रीत करावं… नजाकतीने त्याच्या आवश्यकतेनुसार काढून रंगवावं आणि मग हळूहळू एक अखंड चित्र पुर्ण व्हावं…. तसं हे दृश्य मला दिसू लागतं. आता पुढचे अनेक दिवस पाऊस नावाचा चित्रकार अशी अनेक चित्रं काढण्यासाठी सरसावलेला असणार आहे आणि त्यातली काही दृश्यं मला पुन्हा मोह घालणार आहेत.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

७ ) प्रतिमेच्या पलीकडले —

              “ पाऊस – गद्य जलचित्रं “ 

               लेखिका : तृप्ती कुलकर्णी

पाऊस –गद्य जलचित्रं ….. 

सगळ्यांना एकाच रंगात रंगवणारा हा पाऊस आपला ‘ओला रंग’ किती तऱ्हेने उधळतो ते बघण्यासाठी शहरांमधला पाऊसही बघायला हवा. या ओल्या रंगाची एक गंमत म्हणजे हा ओला रंग प्रत्येकाचा निराळा असतो. ज्याच्या त्याच्या कोरडेपणाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा. त्या ओल्या रंगाची मी पाहिलेली ही दृश्यं… एका अर्थाने माझ्यासाठी जलचित्रं !

जलचित्र १

एक तरुणी, छत्री घेऊन बसस्टॉपवरती उभी असते. तिच्या लाल भडक छत्रीवर पावसाचे पारदर्शी थेंब टपटप असा हलकासा गहिवरलेला आवाज करत पडत असतात. छत्रीवर पडल्यावर क्षण दोन क्षण ते थेंब तिच्याशी हितगुज करण्यात ‘रंगून’ जातात. आणि पुन्हा अलवारपणे तिला निरोप देतात, ते आपली ओलसर खूण तिच्यावर उमटवूनच. काहीसं लालसर रंगाचं बिंब सामावलेलं त्यांचं क्षणभराचं रूपडं गळून पडताना एखाद्या नाजूक फुलाची पाकळी गळून पडावी तसं मोहक दिसतं. त्या मोहक दृश्याकडे पहात असतानाच पुन्हा माझं लक्ष त्या तरुणीकडे जातं.

जलचित्र २

भिजू नये म्हणून अंग चोरून उभ्या असलेल्या तिच्या मनात मात्र पावसाच्या धारा बरसत असाव्यात, असं ती ज्या मायेने ओल्या केसांवरून हात फिरवते ना त्यावरून वाटतं. ती वारंवार बस स्टॉपकडे कधी बस येईल या आशेने बघत असते. ही तिची आशा छत्रीच्या आत बाहेर चुळबुळ करणाऱ्या तिच्या पावलांवरून दिसते. तिच्या सॅंडलच्या आत पावसाचे थेंब काळ्या रंगाच्या पट्ट्यांशी हितगुज करत बसलेले दिसतात. पावलांच्या मागेपुढे होण्याने त्यातले काही थेंब घरंगळत जाऊन अंगठ्यावरती बसतात. तिथल्या नेलपॉलिशचा लाल रंग त्यांना  जास्त जवळचा वाटत असावा का…  का छत्री बद्दलचा जिव्हाळा असावा? कोण जाणे.

निराशेने ती मनगटावरच्या घड्याळात डोकावते. त्यालाही पावसाची थोडीशी लागण झालेली असते. त्यावर दोन चार शिंतोडे उडालेले असतात. ते पाहून खांदा आणि मान यांच्या पकडीत छत्री तोलून धरून ते पावसाचे शिंतोडे ती आपल्या दुपट्ट्यानं हळुवारपणे पुसते. आणि हे करताना नकळत तिची छत्री थोडीशी कलते आणि ती तरूणी भिजते. मग पुन्हा एका हातात छत्री धरून दुसऱ्या हाताने आपलं डोकं पुसण्याची तिची केविलवाणी धडपड फसते. पावसाची धार तिला संधी मिळताच बिलगते. शेवटी अपरिहार्यतेने ती स्वतःला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न सोडून देते. आणि आपली नजर पुन्हा बसस्टॉपवर वळवते.

जलचित्र ३

आपसूकच माझं लक्षही मग पुन्हा बस स्टॉपकडे जातं. तोही तिच्यासारखाच शरणागत असतो. आपला स्थिर कोरडेपणा विरघळू देणारा… इतक्यात बस येते. ती देखील निथळतच असते. तिच्या टपावरून गळणारं पाणी जणू कुणीतरी अभिषेक करत असल्यासारखं एका धारेत, एका ओळीत पडत असतं. बंद खिडक्या स्वच्छ झालेल्या असतात. त्यावरून ओघळणारे पावसाचे थेंब स्वतःच स्वतःचं एक चित्र रेखाटत असतात‌. एरवी ज्यांच्याकडे बघितलं की धूर आणि काळोख याशिवाय काहीही दिसत नाही असे बसचे जाडजुड टायरसुद्धा न्हाऊमाखू घातलेल्या गुटगुटीत बाळासारखे स्वच्छ दिसतात. इतके की वाकून किंचित डोळे मोठे करून बघितलं तर त्यांचं नावसुद्धा दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पायऱ्या मात्र मळकटलेल्या असतात. नितळतेचा असा हळवा स्पर्श त्यांना फारसा लाभत नाही. जरा स्वच्छता झाली की कोणीतरी आपला ठसा उमटवून जातंच.

जलचित्र ४ 

बस थांबताच इतक्या वेळ आपला घेर फुलवून पावसात मनसोक्त भिजणाऱ्या, वेळप्रसंगी एकमेकींवर कुरघोड्या करणाऱ्या या रंगीबेरंगी छत्र्या आपल्या मर्जी विरुद्ध का होईना मिटून जातात. त्यांना आपल्या एका हातात धरून सगळेजण घाईघाईत बसमध्ये शिरतात. कोरडेपणा शोधू लागतात. पण एव्हाना या ओल्या रंगाने आतमध्येही प्रवेश केलेला असतोच. खिडकी जवळच्या सीटवर बसण्याची एरवी कोण अहममिहिका लागलेली असते. पण आता मात्र त्यांच्या या आरसपानी रूपाचं कौतुक करायचा कुणाचाही मूड नसतोच, उलट त्यांच्याकडे काहीशा नाराजीने बघतच अंतर राखून बसलं जातं.

जरा बऱ्यापैकी कोरडी सीट बघून मी बसते.‌ माझ्या  निथळणाऱ्या छत्रीला प्रथेप्रमाणे पायापाशी ठेवते. तिकीट काढण्यासाठी पैसे देताना मला जाणवतं कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघंही जवळपास अर्ध्याहून अधिक भिजलेले आहेत… पण जणू हा ओलावा त्यांच्या अंगाला जन्मजात चिकटल्यासारखे ते सरावाने वावरत आहेत. हळूहळू लोक जसे येऊ लागतात तसं मला जाणवू लागतं की सारं काही या पावसानं व्यापलंय. प्रत्येकजण थोडा तरी ओला आहेच. हे ‘ओलं दुःख’ म्हणावं का ‘ओलं सुख’ म्हणावं ?? काहीही असेल, पण ते सगळ्यांना एकाचवेळी बिलगतंय हे नक्की.

आणि मग मला जलरंगात न्हायलेली अशी निरनिराळी चित्रं दिसू लागली. एखादं झाड, पावसात मनमुराद भिजणारी लहान मुलं, मोठ्या घेरदार आजोबा छत्रीत दाटीवाटीने उभं राहिलेलं एखादं कामगाराचं कुटुंब, बस स्टॉपवरची मोबाईल वर बोलणारी माणसं, एका कोपऱ्यात थोडीशी कोरडी जागा भरून खाणे दाणे विकणारा, एवढ्या भर पावसात रेनकोट घालून पाणी पुरीच्या ठेलाला प्लास्टिकने झाकून उभा असणारा पाणीपुरीवाला इ.इ.

एखाद्या भलंमोठं चित्र त्याच्या इतर बारीकसारीक तपशीलासह प्रत्येक चौकोनात विशिष्ट पद्धतीने चित्रकाराने चित्रीत करावं… नजाकतीने त्याच्या आवश्यकतेनुसार काढून रंगवावं आणि मग हळूहळू एक अखंड चित्र पुर्ण व्हावं…. तसं हे दृश्य मला दिसू लागतं. आता पुढचे अनेक दिवस पाऊस नावाचा चित्रकार अशी अनेक चित्रं काढण्यासाठी सरसावलेला असणार आहे आणि त्यातली काही दृश्यं मला पुन्हा मोह घालणार आहेत.

© सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल, तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘ते निर्विघ्नपणे पार पडेल ना?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला. मग पूर्ण प्रवासात ते कसं साध्य करायचं याच्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅण्ड कधी आलं ते समजलंच नाही. सगळं सामान एका हातात कसंबसं घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी धरलेली छत्री सावरत मी बसच्या पायऱ्या उतरु लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो. कारण समोर माझ्या स्वागताला विकट हास्य केल्यागत प्रपातासारखा कोसळणारा अखंड पाऊस माझी वाट अडवून ओसंडत होता! माझ्याइतकीच हतबल झालेली हातातली छत्री न् सामान जमेल तसं सावरत मी त्या भयावह, धुवांधार प्रपाताला सामोरं गेलो ते मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरूनच!)

बसमधून उतरून धावत स्टॅंडवर  आत आडोशाला जाऊन थांबेपर्यंतच मी चिंब भिजून गेलो होतो.त्याच अवस्थेत हात करुन टॅक्सी बोलावली.आधी मेन रोडवरचं जवळचं लाॅज गाठलं आणि मग पुढचे सगळे सोपस्कार!

आयुष्यातलं माझं हे पहिलंच ‘महाबळेश्वरदर्शन’! पण ते स्वप्नवत वगैरे नव्हे तर असं भयावह होतं!!तिथं बऱ्यापैकी सावरण्यातच पहिले दहा दिवस सरले ते पावलोपावली येणाऱ्या नित्यनव्या तडजोडी नाईलाजाने जमेल तितक्या अंगी मुरवतच. त्याही परिस्थितीत मी बऱ्यापैकी सावरु शकलो ते ब्रॅंचजवळच पाहिलेली दोन रुम्सची तात्पुरती छोटीशी भाड्याची जागा,घरगुती जेवणाची सोय आणि ब्रॅंचमधले माझे चांगले सहकारी यामुळेच!

रिपोर्टींगच्या पहिल्याच दिवशी श्री.रांजणे,आमचे हेडकॅशिअर यांनी आपुलकीने मला दिलेल्या आग्रहपूर्वक सल्ल्यामुळे त्यांनाच सोबत घेऊन मी आधी जवळच्याच दुकानातून रेनकोट,फुल स्वेटर आणि गमबूट यांची तातडीने खरेदी केली.या वस्तू ही तिथली दोन वेळच्या जेवणाइतकीच जीवनावश्यक गरज होती याबाबत तोवर मी अनभिज्ञच होतो.त्या नव्या पेहरावात मी प्रथम आरशात पाहिलं तेव्हा मी स्वत:लाच ओळखता न येण्याइतका  कुणीतरी ति-हाईतच वाटलो होतो!

या जीवननाट्यातल्या माझ्या या नव्या भूमिकेचा सराव माझ्यासाठी खूप त्रासदायकच नाही तर आव्हानात्मकही  होता.प्रतिकूल परिस्थितीतल्या अखंड व्यवधानांमुळे माझा होम सिकनेस मलूल होऊन मनातल्या एका कोपऱ्यात मान वर न करता पडून असायचा.घरगुती जेवणाची सोय घरापासून एरवी पाच मिनिटं चालत जाता येईल एवढ्याच अंतरावर.त्या काकूही स्वैपाक सुग्रास करायच्या,आग्रहानं वाढायच्या, पण कडकडीत भूक लागलेली असूनही घराबाहेर पडायलाच नको असं वाटायचं. कारण गमबूटाचं ओझं घेऊन छत्री सावरत चालताना भर दिवसाही पावसाच्या प्रचंड संततधारेत समोरचं कणभरही दिसायचं नाही.दोन वेळचं जेवण हे या अर्थानेही यज्ञकर्मच वाटायचं.थकून भागून रात्री अंथरुणावर पाठ टेकली की पहिला विचार यायचा तो जुलै महिन्याची पौर्णिमा जवळ येत असल्याचाच.अर्थात बदलीनंतर तिथं रिपोर्ट केल्यानंतर आम्हाला आठवडाभराची ट्रान्झिटलिव्ह मिळायची. कोल्हापूर रिजनल आॅफिसकडून पौर्णिमेच्या दरम्यानची आठ दिवसांची ती रजा मी नुकतीच मंजूरही करुन घेतली होती. त्यामुळे चारसहा दिवसांच्या घरपणाबरोबरच या पौर्णिमेचं नृ.वाडीचं दत्तदर्शनही विनाविघ्न होणार होतं हे खरं,पण त्यानंतरचं काय हा प्रश्न होताच. सगळंच अस्थिर, अशुध्द न् अवघडच वाटत राहिलं. महाबळेश्वरपासून  नृ.वाडीपर्यंत जातायेता पंधरा तास जर लागणार असतील तर पौर्णिमेला जायचा अट्टाहास चालणार कसा? प्रत्येक पोर्णिमा काही रविवारीच नसणाराय.नसू दे. कांही झालं तरी यात खंड पडू द्यायचा नाही हे पक्कं ठरवूनच टाकलं. मग ते कसं जमवायचं याचे विचार सुरू झाले. त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं हा निर्धार पक्का झाला. त्यासाठी वर्षातल्या बारा कॅज्युअल लिव्हज् दर पौर्णिमेसाठीच राखून ठेवायच्या हे ठरलं.पण इथला हा धुवांधार पाऊस आणि नंतर लगेचच येणाऱ्या हिवाळ्यातली कडक थंडी यांचं काय ? तब्येत बिघडली,आजारपण आलं,ते रेंगाळलं तर? हा विचार मनात येताक्षणीच झटकून टाकला.’आपण कांहीही झालं तरी आजारी पडून रजा फुकट घालवायची नाही’ हे मनाला बजावून सांगितलं. प्रश्न मलाच पडत होते आणि त्याची अशी ठाम उत्तरंही मीच मला देत होतो.पण तरीही  ‘दत्तमहाराज आपल्या श्रद्धेची कसोटी पहातात’ असं आईबाबा नेहमी म्हणायचे ती ‘कसोटी’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय मलाही येणार होताच. त्याला खऱ्या अर्थाने निमित्त ठरलं ते माझं हे महाबळेश्वरचं पोस्टींगच. कारण महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटतं रहायचं.कारण छत्री, रेनकोट, गमबूट हे सगळं असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅन्ड गाठेपर्यंतही मी चिंब भिजृन जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले  तरी नृ.वाडीला पोचल्यानंतरही त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचाच.

या सगळ्या कसोट्या पार करीत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरु राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्यावेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ’ वासून उभे राहायचे…!!

क्रमश:.. (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार.” एक 27-28 वर्षाची नवविवाहित तरुणी मला स्पष्टपणे म्हणाली. तशी ती कूल होती, नम्रही होती पण ठाम होती.

मी म्हंटल, “नको करू.तुझी इच्छा.पण सगळे हौशीने करायला तयार आहेत, तर तुला का नाही करायची मंगळागौर??”

त्यावर ती उस्फुर्तपणे म्हणाली, “मला ना हे सगळं Illogical आणि Wastage of time वाटतं.”

“तू करूच नको मंगळागौर.पण मंगळागौर म्हणजे नक्की काय, त्यात काय-काय करतात, माहिती आहे का तुला ?” मी तिला विचारलं.

“नाही हो.मंगळागौर म्हणजे दिवसभर पुजा करतात एवढंच माहीत आहे.”

“अगं, दिवसभर कसं कोणी ‘फक्त पुजा’ करेल? ” मी तिला हसतहसत विचारलं.

ऐक, मी सांगते तुला,

“मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची पुजा.नवीन लग्न झालेल्या मुली, श्रावणतल्या मंगळवारी ही पुजा करतात.तसा हा सोहळा संपूर्ण दिवसभर असतो. पण पुजा फक्त एकदीड तास.फार फार तर दोन तास.

पुढे दिवसभर गप्पा-गोष्टी, खाणेपिणे, नाचगाणे आणि खेळही असतात.मंगळागौरीसाठी माहेरची माणसं येतात, तसेच तुझ्या सासरचे नातेवाईक पण येतात .सगळे दिवसभर एकत्र राहिले की आपोआप नवीन ओळखी होतात, सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. आणि नकळत आपल्यातलं बॉण्डिंग वाढत.

तुझ्यासोबत पुजा करायला आणखीन 5 मुली येतात. त्यांचं लग्न सुद्धा अलीकडेच झालेलं असतं. त्या निमित्याने तुझ्याच वयाचं एक friend circle आपसूकच तुला मिळतं . सगळ्यांचे वय सारखे म्हणजे तुमचे बोलायचे विषय सारखे आणि प्रश्नही सारखेच. तेव्हा मैत्री व्हायलाही सोप्प जातं आणि Wave length पण पटकन जुळते.नाही का?

नवी नवरी दुसऱ्या गावावरून आलेली असते, तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी मिळाव्यात, सुख दुःखाच्या चार गोष्टी बोलायला कोणी असावं, ह्यासाठीच तर ह्या मुली बोलावतात..

संध्याकाळी हळदीकुंकू करतात , त्यात शेजारीपाजारी, इतर ओळखीचे लोक आपण बोलावतो. आपले स्नेही,शेजारी ह्या सगळ्यांची तुला माहिती व्हावी. ह्यासाठी हा सगळा खटाटोप…

थोडक्यात सांगू का, मंगळागौर म्हणजे नव्या नवरीसाठी एक Induction Program च असतो बघ.. 

आणखीन एक गम्मत आहे.मंगळगौरीच्या जेवणाच्या मेनूची.सकाळी पुरणपोळी, कटाची आमटी,चटणी, कोशिंबीर. Full protein rich आणि फायबरयुक्त जेवण.

रात्रीच जेवण तर आणखीन भारी..

भाजणीचे वडे.जे बाजरीचे आणि ज्वारीचे असतात.अगं, Gluten free.ते सगळं भाजलेले असतं म्हणजे पून्हा पंचायला हलकं. सोबत मटकीची उसळ.ऊसळी, कडधान्य म्हणजे प्रोटीन आलंच की.

आणखीन जेवणात असतं ते टोमॅटो सार. श्रावण महिना म्हणजे पावसाळाच.त्या थंड वातावरणात गरमागरम,आंबटगोड टोमॅटो सॉस.. 

आणखीन एक शेवटचं, पण महत्वाचं.. कोणीतरी खूपच Health Conscious, Calorie मोजून जेवणारे किंवा daily gym hit करणारे असतील तर त्यांना सुद्धा Workout आहे..संध्याकाळी जे मंगळागौर खेळ असतात ना ते मस्त Physical Exercise आहेत. सोबत मजबूत Calories burn करणारे आहेत.”

“उत्तम आरोग्य हाच खरा दागिना.” असं म्हणणाऱ्या आपल्या जुन्या लोकांना, “मनातल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आपलं हक्काचं माणूस लागतं ” हेही चांगलं माहिती होतं.

केवळ Mental piece, stress buster, healthy lifestyle अशा चकचकित टर्म त्यांनी वापरल्या नाहीत म्हणून ते direct Illogical होतात का ?”

सगळं ऐकून झाल्यावर तिला मंगळागौर चांगलीच समजली होती,उमजली पण होती..

तिने मंगळागौर बुक केली.

जाता जाता मला म्हणाली, ” तुम्ही management चा अभ्यास केला का हो? “

छानसं हसून मी तिला उत्तर दिलं,”मी आपल्या पारंपरिक सणांचा अभ्यास केला.. “

लेखिका : सुश्री  दीपा देशपांडे कस्तुरे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

 

 ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

मांडी घालून जेवतांना अजब टेकू –…!!

भारतात पूर्वींपासून चालत आलेल्या भोजन पद्धती आणि जेवणासाठी वापरली जाणारी  वैशिष्ट्यपूर्ण भांडी, स्वयंपाकघरातील वेगळ्या वस्तू आणि अनेक प्रथा, आताशा लुप्त होत चालल्या आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार ..!! म्हणूनच आपण तिला ‘भारतीय बैठक’ म्हणतो ..!! 

मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे, दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी,गुडघ्यातील वेदना, ‘नी रिप्लेसमेंट’ असल्या  गोष्टी लांब राहत असत. कांही अपवाद वगळता भोजनासाठी, न्याहारीसाठी जमिनीवर, पाटावर,आसनावर बसण्याची पद्धत होती ..!! 

खरेतर, माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते ..!! 

मांडी घालून बसल्यावर,अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या  अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ‘ढिंचणिया’ म्हणजे ढोपर टेकू ..!! 

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्ही गुढघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्त वेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. अशा अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ‘ढिंचणिया’ ..!! हा एक ढिंचणिया साधारणत: डमरूसारखा, ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे ..!! मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे पितळ आणि कांशापासून बनविले जात असत. तत्कालीन कारागिर त्यावर खूप चांगली नक्षी कोरत असत. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे  ढिंचणिया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले  ढिंचणिया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात (विशेषतः सौराष्ट्र) आणि राजस्थान ह्या भागांमध्ये हे ढिंचणिया वापरले जात असत ..!! अगदी खेडेगावात जेथे ढिंचणिया उपलब्ध नसतील तेथे, एखादा धातूचा डबा, लाकडी ठोकळा, कापडाचा बोळा अशा वस्तूही वापरल्या जात असत ..!!  

आपण एक हस्तटेकूही पहिला असेल. आसनावर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. ह्याच्या आत स्व-संरक्षणासाठी शस्त्रही लपविले जात असे ..!! 

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही ‘मॉडर्न’ होत चालली आहेत. आता या ढिंचणियांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही होत आहेत ..!!  अजून निदान त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या ‘अज्ञात वस्तू’ म्हणून तेथे शिल्लक राहतील ..!! 

लेखक : मकरंद करंदीकर 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? इंद्रधनुष्य ?

☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

श्रावण जवळ येत आहे , शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते, अनेकांना माहितीही नाही हे काय असते, त्यासाठी हा प्रपंच। 

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगततेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती.

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा…

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

म्हणजेच…

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच…

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका –

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती –

बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …म्हणजेच जिवती पुजन.  

तुम्हाला पूजण्याची ईच्छा असेल पण बाजारात जीवतीचा कागद मिळत नसेल तर याचाच प्रिंटआउट घ्या पूजन करा, गंध-पुष्प-धूप-दीप- दुधसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दुधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा (श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे, श्रावणा नंतर मुलांना दिसता कामा नये).

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधी माणूस म्हणून जगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

आधी माणूस म्हणून जगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटू अबेल मुताई ऑलम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंडमध्ये धावताना अंतिम रेषेपासून फक्त काही मीटर दूर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते.सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते.सर्व प्रेक्षक त्याच्या नावाचा जल्लोष करीत होते.एवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मीटर आधीच थांबला.

त्याच्या मागून येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्यामुळे तो थांबला आहे.त्याने ओरडून अबेलला पुढे जाण्यास सांगितले. पण अबेलला स्पॅनिश समजलं नसल्याने तो जागचा हलला नाही. शेवटी इव्हानने त्याला ढकलून अंतिम रेषेपर्यंत पोहचविले.त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.

पत्रकारांनी इव्हानला विचारले, ” तू असे का केलेस? तुला संधी असताना तू पहिला क्रमांक का घालवलास?”

“इव्हानने सांगितले- माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू,जी एकमेकांना मदत करेल आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.”

रिपोर्टर पुन्हा म्हणाला, “पण तु केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलेस?”

यावर इव्हान म्हणाला,”तो पहिला आलेलाच होता. ही रेस त्याचीच होती!”

रिपोर्टर पुन्हा म्हणाला,”तरी पण….”

 “त्या जिंकण्याला काय अर्थ होता?माझ्या मेडलला मान मिळाला नसता!माझी आई काय म्हणाली असती? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे जात असतात.मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते?दुसऱ्याच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईने दिली आहे.”

धन्य ती माऊली आणि धन्य ते लेकरु!

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares