मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’आई ही आई असते‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ’आई ही आई असते‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

– जराशी गंमत. 

  • आयझॅक-न्यूटनची आई : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??
  • आर्किमिडीजची आई : गाढवा ! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
  • एडिसनची आई : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं !
  • जेम्स वॅटची आई : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
  • ग्रॅहम बेलची आई : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
  • मोनालीसाची आई : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
  • गॅलेलियोची आई : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??
  • कोलंबसची आई : कुठेही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
  • मायकल अँजेलोची आई : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
  • बिल गेट्सची आई : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते !
  • फॅरेनहाइटची आई : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!
  • अलबर्ट आईनस्टाइनची आई : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!

~~~~~●●○○■■○○●●~~~~~

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.)….

आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.

१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते

२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.

३.’पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.

४. मी आजपासून दृढनिश्चय  केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.

५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल.  प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.

समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि  शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.

१. अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.

आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.

एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.” हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी ‘अमक्याची आई’ अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे, म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे.’ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’

संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे. महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो.  याची  सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.

“ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”

— संत तुकाराम महाराज

हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,

“बरे जाले देवा निघाले दिवाळे , बरी या दुष्काळे पीडा केली ॥

अनुतापे तुझे राहिले चिंतन , जाला हा वमन संसार ॥

बरे जाले जगी पावलो अपमान , बरे गेले धन ढोरे गुरे ॥

बरे जाले नाही धरिली लोकलाज , बरा जालो तुज शरण देवा ॥

बरे जाले तुझे केले देवाईल , लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरें व्रत एकादशी , केले उपवासी जागरण ॥”

*

त्याच्याही पुढे  जाऊन ते म्हणतात,

*

“बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे  माया सोडविली ॥

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

पोर मेले बरे  जाले । देवे  मायाविरहित केले।

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।।

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”

इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,

संत मीराबाई , अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!

आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.

बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला गर्भात असल्यापासून शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.

अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.

‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.

म्हणोन आळस सोडावा ।

येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा ।

थारा बळें ।।

दा. १२.९.८।।

समर्थ रामदास

आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.

“नजरे बदली तो नजारे बदले।

नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”

एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे , विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे  बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे.  कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.

आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.

अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत , त्या खालीलप्रमाणे असू शकतील.

१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म.

२. ‘हवेनको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.

३. कुटुंबाची, समाजाची,  देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.

४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.

५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.

६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.

७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.

जीवन जगण्याची कला- अध्यात्म‘ साठी ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.

*

आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।

*

घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।

बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।

मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध ।।१।।

*

दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।

दोस्त होऊनी हातचं माझा आपुल्या हाती घेते।

जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।

*

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।

साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।

सर्वत्रच तो बघत धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।

*

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार।

हात होतसे वाद्य सुरांचे  पाझरती झंकार।

प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा चंद ।।४।।

*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एकोहं बहुस्याम ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

एकोहं बहुस्याम ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

लडिवाळ उन्हा,

कधी आणि केव्हा आपले ऋणानुबंध जुळले ते सांगता येत नाहीये मला. कदाचित पूर्वजन्मीचंच आपलं काही देणंघेणं असावं. कारण या सुंदर जगात पहिला श्वास मी घेतला, तो तुझ्या वैशाखातल्या दमदार तडाख्यातच… त्यामुळे माझ्या जन्मापासून तुझ्या आणि माझ्या नात्याची नाळ गुंफली गेली. पुढे कळत्या वयात तुझ्याशी अधिकाधिक सलगी होत गेली. प्रकाशाची विलक्षण ओढ तुझ्यापासून क्षणभराचा दुरावासुद्धा सहन होऊ देत नाही. तुझी सगळी रूपं नजरेत, स्मृतित गोंदली गेली आहेत.

पावसाळ्यातल्या ढगाआडून हळूच डोकवणारे तुझे हळदुले किरणं… ओलेत्या मातीला, हिरव्यागार वनराईला  हळूच सोनेरी वर्ख लावून जातात. कधी कधी तर मुलांच्याच भवितव्यासाठी त्यांच्यापासून दुरावा सहावा लागणाऱ्या, सटीसामाशी येणाऱ्या वडिलांसारखाच बिलगतोस तू धरतीला. पण पुन्हा कर्तव्यदक्ष वडिलांसारखा ओलेतेपण टिपून लगेच निघूनही जातोस आपल्या कामाला.

हिवाळ्यात, थंडीच्या अंतरंगात शिरून तिच्याशी गुफ्तगू करत अलगद बाहेर पडणारी तुझी उबदार मऊसुत सोनेरी किरणं… जणू गोधडीची हवीहवीशी वाटणारी उबच… ठराविक वेळी अंगभर लपेटता येणारी. स्वप्नांना रंग देणारी. माध्यान्हीच्यावेळी तुझा हलकासा आश्वासक स्पर्श रेंगाळणाऱ्या रजनीलाही तोंड द्यायला पुरेसा असतो.

आम्हा माणसांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रुपांत सावरत राहतोस तू…

आणि उन्हाळ्यात तर धरतीवर तुझंच साम्राज्य असतं… त्याचा थाट तो काय वर्णावा…

त्यावेळी प्रत्येक क्षणाक्षणाला दिसणारी तुझी रूपं किती मोहक…. रसांनी, गंधानी, रंगांनी भारलेली.

एखाद्या गायकानं बेभान होऊन कधी तीव्र… कधी मध्यम…  कधी मंद्र वेगवेगळ्या सप्तकांत, स्वरात अविरत गुणगुणत राहावं तसा असतोस तू…

तुला तमाही नसते रे तुझं हे गुणगुणणं आम्ही कुणी ऐकतोय की नाही याची.

एखाद्या चित्रकाराने एकाच रंगाच्या कुंचल्याचे वेगवेगळे फटकारे, वेगवेगळे आकार, वेगवेगळे पोत कॅन्व्हासवर दाखवावेत आणि आपल्या नितळ अन् तजेलदारपणाने तो सबंध कॅन्ह्वास व्यापून उरावास तसाच आहेस. तू…

एकाच रंगात बुडूनही अनेक रंगछटा दाखवणारा…

तू म्हणजे एकोहं बहुस्याम!

मला ना त्यामुळे तू एखादा जोगी वाटतोस. आपण जे काही रसरसून जगलो आहोत ते सगळं… अगदी सगळं काही अर्पण करण्याचा तुझा हा सोहळा असतो. खरं सांगू, विरक्तीची आसक्ती आहे तुला… का विरक्तीच्या आसक्तीचं रूप आहेस तू! असो.

आणि ती याची देही याची डोळा पाहायला मिळते ना तेव्हा सहन होत नाही… इतकं नितळ तजेलदार असणं…

अन् लडिवाळा, तू काय देतोयस , त्यापेक्षा तू काय देत नाहीस हे बघण्यातच सामान्य ऊर्जा खर्च होत राहते रे…

तेव्हा वाटतं अगदी आतून वाटतं वर्षानुवर्षं आपलं काम निरसलपणे करणारा एखाद्या ऋतूला समजण्यासाठी

एक सामान्य जन्म पुरेसा नसतोच रे!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्दांची वादळं… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ शब्दांची वादळं… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

सुमारे चाळीस एक वर्षांपूर्वीची घटना आहे ही. आता मी जनसामान्यांबरोबरच साहित्यिकांमध्ये देखील प्रथितयश कवी म्हणून ओळखला जाऊ लागलो होतो. तरीही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे थोरच नाही का!

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात कवी संमेलनात मी माझी ‘शब्दांची वादळं’ ही कविता सादर करायला व्यासपिठावर उभा होतो. मी पहिलाच चरण म्हटला,

‘शब्दांची अनेक वादळं आली, कधी तसा डगमगलो नाही’.

आणि अचानक माझ्या मागून, व्यासपिठाच्या मागील भागातून ‘वाः! सुंदर’ अशी दाद मिळाली.  मी चमकून, तरीही कृतज्ञतेने मागे वळून पाहिले; आणि काय सांगू तुम्हाला,  ही दाद मिळाली होती विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांकडून! माझ्या अंगावर शहारे आले आणि मोठ्या उत्साहात मी ती संपूर्ण कविता सादर केली.  कवितेला टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय मेनका प्रकाशनच्या पु. वि. बेहेरे यांनी माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट केली.  साहजिकच या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘शब्दांची वादळं’!

ही शब्दांची वादळं कविता: —-

शब्दांची अनेक वादळं आली कधी तसा डगमगलो नाही 

नजरांचे कुत्सित झेलले बाण विचलित असा झालोच नाही

आपण बरे आपले बरे ही वृत्ती कधी सोडली नाही

मार्ग आपला शोधत राहिलो कानावरचं मनावर घेतलंच नाही

नजर माझी वाईट म्हणत त्यांच्या वाटे गेलोच नाही 

नजरेसमोर आले त्यांना मात्र कधी टाळले नाही 

बोलणाराची वृत्तीच वाईट त्याचा बाऊ केलाच नाही

अनुभवाचे बसले चटके दुर्लक्ष करता आलं नाही 

*

अपयशाचा धनी झालो माझ्या,  त्यांच्या खोटं नाही

सावली माझी वैरीण झाली, शुभ तिला ठाऊक नाही 

नजर माझी अशुभ म्हणता सत्याला या पडदा नाही

दृष्टी माझी टाळून जाता मांगल्याला अडचण नाही 

भीती आता माझी मलाच अपयशाला वाण नाही 

नको आरसा म्हणून मला असली दृष्ट सोसवत नाही

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर… – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर… – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.

या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…

‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो,’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.

‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे,’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.

मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.

आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.

गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता.

आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!

इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.

‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.

याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.

आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.

‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.

‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?

परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.

‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.

प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.

यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.

‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.

एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.

‘एआय’ मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.

या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.

या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.

लेखक : अच्युत गोडबोले

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

वपुंसोबत शेअर केलेलं असंख्य अविस्मरणीय क्षण मी मनाच्या गाभाऱ्यांत जपून ठेवले आहेत. मधूनच कुणीतरी भेटतं, वपुंचा विषय निघतो, नवीन काही आठवणी बाहेर येतात, अलगद मी भूतकाळांत शिरतो. ‘ज्या चहेत्यांमुळे आज आपण एका विशिष्ट उंचीला पोहोचलोय, ते चहेते म्हणजे आपलं सर्वस्व’ हे ब्रीदवाक्य असणारा आणि माणुसकी जपत आभाळाची ऊंची गाठणारा असा एक ‘कालजयी’ माणूस त्याच्या निर्वाणापर्यंत आपल्या मित्रपरिवारांत होता याकरता स्वत:चाच हेवा वाटू लागतो.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमांत, मंगला गोडबोल्यांची मुलाखत घ्यायला आलेली लेखिका नीलिमा बोरवणकर भेटली. कार्यक्रमानंतर एकत्र बसून जेवताना मी वपुंचं नाव घेतलं आणि नीलिमा रोमांचित झाली. खांदे उडवत म्हणाली ,

‘वपुंच्या ऐन उमेदीतील हा किस्सा तुला ठाऊक नसणार’. प्रीमियर ऑटोमोटिव्ह कंपनीचे उपाध्यक्ष होते केशव पोळ. पुण्यात कोथरूडला रहायचे. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर किडनी बिघडल्या आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’

‘बाप रे, वय वाढत गेलं की डायलिसीस कठीण होत जातं.’ मी ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळलं.

‘हो ना. त्यातून तीस वर्षांपूर्वीचं  डायलिसिस आजसारखं सोपं नव्हतं. पेशंटचे हाल व्हायचे. दोन दिवस दवाखान्यात रहावं लागायचं. घरी आलं की पुढल्या डायलिसिसची मानसिक तयारी करावी लागायची.

दवाखान्यातील त्रासाच्या धसक्यानं रात्र रात्र झोप लागायची नाही. पोळांची पत्नी मग वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचे पाय चेपत बसायची, वपुंनी सांगितलेली कथा डोक्यात घोळवीत, पोळ झोपी जायचे.’

माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. वपुंच्या कॅसेट्ची किमया मी स्वत: कितीदातरी अनुभवली आहे. एकबोटे, भदे, दामले, नळात जाऊन बसलेली भुताची पोरं वगैरे पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद मला अक्षरश: तोंडपाठ होते. कॅसेटच्या रूपाने वपु आमच्या घरांत शिरले आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. मी नीलिमाला हे सारं सांगणारच होतो, तर मला हाताने थांबवत ती म्हणली,

‘थांब, रे, ही नुसती प्रस्तावना होती, खरा किस्सा तर पुढे आहे. पोळांची दगदग कमी व्हावी म्हणून प्रीमियर कंपनीनं त्यांना घरीच डायलिसीसचं मशिन बसवून दिलं. ओळखीचे एक डॉक्टर, बरोबरीला एक सहाय्यक, एक नर्स अशी टीम यायची, पोळांना घरीच डायलिसिस लावलं जायचं. गंमत म्हणजे, या दरम्यानही वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचं दुखणं हलकं करण्याचा प्रयत्न केला जायचा.’

मी ऐकतच राहिलो. तीस वर्षापूर्वी घरच्या घरी घरी डायलिसीस करता यायचं ही बातमी माझ्यासाठी आजही थक्क करणारी होती. मी माझं आश्चर्य नीलिमाला बोलून दाखवलं आणि तिनं समोरच्या टेबलवर हलकीशी थाप मारली.

‘बरोबर हेच वपुंना वाटलं. म्हणजे झालं काय की पोळांच्या पत्नीने वपुंना फोन केला एकदा. नवऱ्याचा आजार, घरी लावलेली मशीन, डायलिसीसचे निश्चित दिवस. हे सगळं बोलून झाल्यावर त्यांनी वपुंचे मनःपुर्वक आभार मानले. तुमच्या कथांचा आणि त्या रंगवून सागणाऱ्या तुमच्या आवाजाचा खूप आधार वाटतो माझ्या नवऱ्याला, डायलिसीस होत असतां मी त्यांचे पाय चेपते पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येतं ते तुमच्या आवाजाने. तुमचे ऋण फेडणं कठीण आहे वगैरे बोलल्या. वपुंनीही अगत्याने पोळांच्या प्रकृतीची माहिती करून घेतली, बाईंना धीर दिला. डोळे पुसतच, अतीव समाधानाने बाईंनी फोन ठेवला.’

निलीमा बोलत होती आणि मला वपुंबरोबर माझे टेलिफोनवर घडणारे संवाद आठवत होते. आपल्या चहेत्यांचे फोन घेताना एक नैसर्गिक आनंद त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवायचा. वाचकाने केलेली त्यांच्या लेखनाची तारीफ, समीक्षा, आलोचना, त्याचे व्यक्तिगत प्रश्न, सल्ले, वपु श्रद्धेनं ऐकायचे. एखाद्या वाचकाशी बोलताना त्यांनी वेळेचा विचार केलेला माझ्या ऐकिवात नाही. वपुंच्या मधाळ आवाजाने, आणि आपण त्यांचे ‘खास’ आहोत या जाणीवेनं तृप्त होऊन वाचक फोन ठेवायचा. आठवून माझ्या चेहऱ्यावर आगळी चमक आली असावी, कारण आणि नीलिमा हसली. माझ्या मनातले विचार तिने नेमके ओळखले. माझी उत्कंठा पुरेशी ताणली गेलीय याची खात्री करून घेत तिने पुन्हा सुरुवात केली,

‘तर, या टेलिफोन संवादानंतर दोनेक आठवडे उलटले आणि एके दिवशी अचानक, वपुंचा फोन आला पोळांकडे. कथाकथनाच्या कार्यक्रमा निमित्त पुण्यांत येतोय, कार्यक्रम रात्री आहे, पण पोळसाहेबांच्या डायलिसीसचा दिवस असल्याने डायलिसीस मशीन ऑपरेट होताना बघण्याची इच्छा आहे अश्या अर्थाचा तो फोन होता. वपु आपल्या घरी येणार या नुसत्या कल्पनेनं पोळांकडे उत्साहाला उधाण आलं. त्याकाळी मोबाईल हातात आले नव्हते पण मुंबईहून ते येणार म्हणजे मुंबईहून कितीही लवकर निघाले तरी सकाळी दहा साडे दहाच्या आधी त्यांचं येणं शक्य नाही असा अंदाज पोळ कुटुंबीयांनी बांधला. आपला आवडता लेखक, कथाकथनसम्राट प्रत्यक्ष आपल्या घरी येणार म्हणून शक्तिहीन पोळही वेगळ्याच विश्वात वावरत होते. आणि तुला गंमत सांगते श्रीकांत, सकाळी आठ वाजताच पोळांच्या दारांत वपु हजर होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी मुंबई सोडलं आणि सकाळी लवकर डायलिसीस करायचं असतं हे ठाऊक असल्यामुळे स्पेशल टॅक्सी करून वपुंनी पोळांची ही वेळ गाठली.’

‘माय गॉड. व्हेरी इंटरेस्टिंग.’

‘हो ना. पोळांकडे हीsSSS धांदल. डॉक्टर येऊन बसलेले, सहायक कामाला लागले आणि वपु घरात. एका खुर्चीवर शरीराचा डॉक्टर बसलेला तर दुसरीवर मनाचा. श्री व सौ पोळ यांना तर काय करावं सुचेना,डायलिसीस नित्याचं असलं तरी आज उडालेली त्यांची तारांबळ काही वेगळीच होती.’

निलिमाच्या कथेत मी गुंगत चाललो. पोळ कुटुंब, वपु आणि डॉक्टर यांचे सोबत एका खुर्चीवर मीही जाऊन बसलो. पोळांकडील गड्याने वपुंसोबत मलाही चहा दिला, घड्याळाकडे बघत असलेल्या डॉक्टरांना आग्रहाने मी चहा दिला, वातावरण अधिकाधिक खेळकर करणाऱ्या मस्त गप्पा मारत वपुंनी चहा संपवला, आपला आजार विसरून पोळ, वपुंच्या बोलण्याला, कोट्यांना खळखळून दाद देताहेत, टाळी घेण्यासाठी पुढे केलेला हात माझा आहे कि वपुंचा याकडे लक्ष न देता उत्साहाने टाळी देताहेत हे सारं मला स्पष्ट दिसत होतं. वपु माझ्या घरी आल्यावर होणारी धावपळ आठवत, काही वेळासाठी मी पोळांच्या घरचा एक सदस्य झालो. निलिमाचंही असचं काहीसं झालं होतं. या क्षणी माझ्याबरोबर बहुधा तीही पोळांकडे पोहोचली असावी. तिचा स्वर गंभीर झाला. रणांगणावरील देखावा धृतराष्ट्राला सांगताना संजयचा झाला असेल तसा.

‘तर डायलिसीसची तयारी झाली, पोळांना पलंगावर झोपवलं, सौ पोळांनी कपाटातून कथाकथनाची कॅसेट काढली आणि टेपरेकॉर्डरच्या खटक्याचा आवाज ऐकून, आतापर्यंत डायलिसीस मशीनचं सूक्ष्म निरीक्षण करत असलेले वपु अचानक पलंगापाशी आले. सौ पोळांना थांबवत म्हणाले, आज कॅसेट नाही, वपु आज स्वत: पोळांजवळ बसून नवीन कथा त्यांना सांगतील. सौ पोळ ह्बकल्याच हे ऐकून, मग भानावर येत त्यांनी गड्याला खुर्ची लावायला सांगितली, पोळांच्या डोक्याशी खुर्ची ठेवली गेली, आणि वपुंनी नम्रपणे ती खुर्ची नाकारली. सौ पोळांसाठी राखीव खुर्चीवर पोळांच्या पायाशी बसू द्यायची त्यांनी विनंती केली आणि सौ पोळ गहिवरल्या. डोळे पुसतच त्यांनी पायथ्याची खुर्ची रिकामी केली. वपुंची कथा प्रत्यक्ष त्यांचेकडून फक्त आपल्याला ऐकायला मिळणार या अवर्णनीय आनंदानं डॉक्टर, त्यांचे सहकारी, सौ पोळ प्रचंड भारावले. पोळांचं डायलिसीस सुरु झालं, त्यांच्या पायाशी वपु बसले, आपलं चिरपरिचित स्मित चेहऱ्यावर खेळवीत, धीरगंभीर आवाजांत त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.’

किस्सा सांगता सांगता नीलिमा थबकली. शब्दांची जुळवाजुळव तिला करावी लागत असावी. ‘श्रीकांत, आणि….आणि कथा सांगता सांगता वपु चक्क पोळांचे पाय चेपू लागले. चारच श्रोते, पण सारेच अंतर्बाह्य थरारले, स्वप्नातही कल्पना न करू शकणारं दृश्य आपण आज बघतोय याची जाणीव तिथल्या साऱ्यांनाच होत होती. वपुंची कथा विनोदी असूनही श्री व सौ पोळांच्या डोळ्याला धार लागली.’

किस्सा संपवताना निलिमाच्या अंगावरील रोमांच मला स्पष्ट दिसत होता. माझ्या तर संवेदनाच खुंटल्या होत्या. मागे कधीतरी वपुंशी बोलत असतां, ’माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कथाकथनाच्या प्रयोगाला फक्त चारच श्रोते हजर होते’ असं त्यांनी म्हटलेलं मला नेमकं तेव्हाच आठवलं, कधीच सुटणार नाही म्हणून मनाच्या कोपऱ्यांत दडवून ठेवलेलं कोडं अचानक उलगडलं.

माणसं समजून घेत त्यांना आनंदात ठेवण्याची सातत्याने धडपड करीत जगलेल्या या ग्रेट लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

लेखक : प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!!  चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.

अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक  छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.

आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो.

दिवसभरातील प्रेम, माया , मोह,  जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!

कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविक त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे  मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.

देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं ? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु  आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ  करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही ? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का  नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.

हा जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा.  मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !!  आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.

यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखे सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत.  जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.

समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”

किंवा

“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।

‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!

म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध  करुन दिले आहेत.  मुळात मन प्रसन्न का करायचे ? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार.? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा,भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि

“पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.

आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.

क्रमशः…

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते हरवलेले जादुई शब्द — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ते हरवलेले जादुई शब्द —  लेखक – अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे

“अल्ला मंतर कोल्हा मंतर

कोल्ह्याची आई कांदा खाई

बाळाचा बाऊ बरा होई”

तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे “काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!” आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे “हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” आणि असं म्हटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो की ते त्यावर ‘फूsss’ असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे “काही नाही. . . आता फू  केलंय ना , मग बरं होईल हं ते.”

पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते. 

जखम ‘फू’ नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार ‘फू’ मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची

खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो. 

जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड ‘ओपन वर्ल्ड’ मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी, उच्शृंखलता, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी “काही झाला नाही, उंदीर पळाला!”, “हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” अस करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, “फू  केलंय ना , मग बरं होईल हा ते” असं  म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

कितीही मोठे झालो तरी त्या ‘बालिश’ वाटणा-या शब्दांचं खरं मूल्य आता कळायला लागलं. . .

ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपलं दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा  खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम, माया आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी “. . . . उंदीर पळाला!”, “हाट रे. . . . ”  “फू. . .” हे शब्द उच्चIरले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . . 

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या ‘फु sss’ ची गरज पडतेच. अगदी  आई बाबांना सुद्धा . . . . . 

त्याला/ त्यांना त्याच्या/ त्यांच्या किमान एका विश्वासू माणसाकडून मिळालेली एक ‘फू sss’ नवसंजीवनी देऊन जाते.

जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . “

माझ्याकडून एक फूsssss सर्वांच्या संकट निवारण्यासाठी !!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा वक्तृत्वाची… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “कथा वक्तृत्वाची” ☆ श्री सुनील शिरवाडकर

श्री. विश्वास नांगरे पाटील आणि प्रा. शिवाजीराव भोसले 

आपलं पहिलं वहीलं भाषण अनेकांना आठवत असतं. ते बहुतेक वेळा फसलेलं असतं. विश्वास नांगरे पाटील यांचं असंच एक पहिलं भाषण. प्राथमिक शाळेत होते ते.आणि प्रसंग होता टिळक जयंतीचा. व्यवस्थित पाठ केलेलं भाषण ऐनवेळी ते विसरून गेले. सुरुवात तर केली होती..पण पुढे आठवेना.

‘एवढं बोलुन मी माझे भाषण संपवतो’ असं म्हणुन त्यांनी जयहिंद केलं.नंतर त्यांना असं स्टेजवर उभं राहून बोलण्याची संधी मिळाली ती थेट कॉलेज मध्ये.

‘मला पडलेलं स्वप्न ‘ असा विषय दिला होता.सोमवारी ती स्पर्धा होती.आदल्या दिवशी त्यांनी एक चित्रपट बघितला होता..लालपरी नावाचा.एका गरीब मुलाला एक लालपरी भेटते.. त्याच्या आयुष्यातील अडचणी ती दुर करते..त्याची स्वप्न ती पुर्ण करते असं काही तरी ते कथानक होतं.

विश्वास नांगरे पाटलांनी कोणतीही तयारी न करता ते कथानकच अगदी समरसून सांगितलं. भाषणाला टाळ्या मिळवल्या.. पहिला नंबरही मिळाला.

अँकरींग करणे, किंवा आरजे यासाठी पण वक्तृत्व आवश्यक असतेच.कोणाला त्यात करीअर करायचे असते कोणी केवळ हौस म्हणून याकडे बघतात.पण एक उत्तम वक्ताच उत्तम ॲंकर होऊ शकतो.मग उत्तम वक्ता होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?

” युवकांनी वक्ता होण्याची इच्छा जरूर बाळगावी.. पण त्यात अनिवार अधिरता नसावी.वक्तृत्व हे जोपासलेल्या व्यक्तीमत्वाला आलेले फळ असते.साधनेची सुदिर्घ वाट..आणि त्यानंतर शेवटी शेवटी येणारी प्रसिध्दीची पहाट ” —- हे विचार आहेत प्रा.शिवाजीराव भोसले यांचे. वक्तृत्व म्हणजे काय.. त्यासाठी नेमके काय करावे लागते.. मनाची,विचारांची मशागत कशी करावी,यांचं मार्गदर्शन शिवाजीराव भोसले करत असत.

वक्तृत्व आणि शिवाजीराव यांना आपण वेगळे करुच शकत नाही. ही कला त्यांनी कशी प्राप्त केली? त्यांनी विद्यार्थी दशेत असताना खूप भाषणे ऐकली.. त्यात श्री. म.माटे..बाळशास्त्री हरदास.. ना.सी.फडके..साने गुरुजी.. नंतरच्या काळात बाबासाहेब पुरंदरे.. इंदिरा गांधी.. वाजपेयी असे अनेक वक्ते होते. उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे. 

शिवाजीराव म्हणतात…. 

“एखादा वक्ता बोलण्यामुळे प्रसिध्दिस येतो.. पण तो ऐकण्यामुळे घडतो.. वाढतो हे आपण विसरून जातो. गायनात आणि वक्तृत्वात श्रवणाचे महत्त्व मानावेच लागेल. संगीत श्रवणाने कान तयार होतो, तर व्याख्यान ऐकून मन तयार होते. इतरांना काहीही ऐकवू पाहणाऱ्यांनी आरंभी खूप ऐकले पाहिजे. श्रवणाशिवाय आकलनाचे क्षितिज विस्तारत नाही.. बहुश्रुतपणा प्राप्त होत नाही.”

उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे हे जसे शिवाजीराव सांगतात.. तसे काय करु नये याचेही ते मार्गदर्शन करतात.दाद किंवा प्रतिसाद वक्त्याला हवाच असतो.. पण सुरुवातीला तो मिळण्याची शक्यता कमीच. शिवाजीराव सांगतात.. श्रोत्यांचे लक्ष विचारांकडे कमी आणि शब्दांकडे अधिक असते .त्यामुळे नवखा वक्ता चमकदार शब्दांचाच आश्रय घेतो.पण नंतर त्याला ती चटकच लागते. सुमार शब्दयोजना करून टाळ्या मिळवण्यात तो धन्यता मानतो आणि नंतर या पाशातून बाहेर पडणे त्याला अशक्य होते.

ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना शिवाजीराव सांगतात..

“ वक्तृत्व ही मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची आणि विचारांची पेरणी असते.. रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक आणि मनोभावे बोलत रहातात.. त्यांच्यावर वक्तृत्व लक्ष्मी प्रसन्न होते.” 

आपल्या पहिल्या..खरंतर दुसऱ्या भाषणात यश मिळाल्यावर  विश्वास नांगरे पाटलांचा आत्मविश्वास वाढला.त्यांनी ठरवलं..आता झाकली मूठ ठेवायची नाही. कोणत्याही स्पर्धेत उतरायचं .. .. भिडायचं  …लढायचं.. जिंकलो तर उत्तम, हरलो तर विचार मांडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.

आणि हा आत्मविश्वास त्यांना मिळाला तो आपल्या बोलण्यातून….  आपल्या वक्तृत्वातून.

(१ जून – विश्वास नांगरे पाटील यांचा जन्मदिवस… .. त्या निमित्ताने…)

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’

थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

 गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘गेला असेल कुठेतरी… येईल परत’ 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… 

अनेक दिवस उलटले …

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… 

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

‘या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?’ 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

– ‘तुला राग नाही आला माझा?’

– का यावा? 

– मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

– छे छे ! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्हीही गोष्टी ‘अतिक्रमणासारख्याच’ घडल्या असत्या नाही का?

. ..  आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करणे चूकच नाही का?

.. ..  म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

– मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

– चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट ..  आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात’… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

— चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.

चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

– म्हणजे ?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

…’थांब मला जरा  करिअर करु दे…. थांब जरा मला आता घर घ्यायचय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे … थांब मला विश्रांती घ्यायची आहे … थांब जरा मला आता ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

.. .. आपण फार एकटे झालेले असतो…. !!

– आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगू नका 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

वेळ प्रत्येकाची येते।।.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares