श्री नितीन सुभाष चंदनशिवे
जीवनरंग
☆ आणि… कविता जिवंत राहिली…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो, आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून आठ दिवस झाले होते. स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती. टीव्ही चा रिचार्ज संपला होता. त्यामुळे टीव्ही ही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.
तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे. दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती आणि माझ्यासोबत लढत होती.
परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं. कारण त्यांना माहीत होतं, हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला “नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना, ” मी काहीच उत्तर दिलं नाही, फोन कट केला आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.
तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे” हे गाणं गुणगुणत असायचो. मी गाणं गायला सुरवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही. माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा, तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही हे कळलं.
आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. सात महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.
ती स्वत:ला सावरत हळूहळू उठली आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला. कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता. पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.
मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती पेपरची पाने चाळू लागली. आणि अचानक ती जोरात ओरडली. “ओ चंदनशिवे, हे बघा काय आलंय पेपरला. “
मी म्हणलं “काय दिपाली”?
तर तिने मला विचारलं “काय ओ चंदनशिवे, तुम्ही कवी आहात ना?”
मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं, “हो आहे, पण काय करणार कवी असून, आणि कविता तरी काय करणार आहे माझी”
तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय. !! ‘अंशुल क्रियेशन प्रस्तुत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा. !! रोख रकमेची तीन बक्षिसे. ‘ खाली पत्ता होता चिंचवड, पुणे, आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.
मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नावनोंदणी केली आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली, “चंदनशिवे, घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत. ते मी तुम्हाला देतेय. या स्पर्धेत जा. आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या. पण एक सांगते, आज जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. ” तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.
ती पुढे म्हणाली, “जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. ” सात महिन्याची गरोदर असणारी, सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आवाहन स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला. मी अंगात कपडे घातले. तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.
मी चिंचवडला आलो. बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार. परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. मला खावंसं वाटलं नाही, कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा पण, आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती, आणि हरलो तर, फक्त शरीर घेऊन मेलेल्या मढ्यागत जगणं समोर दिसत होतं.
स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या, कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती, आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली “ओ चंदनशिवे” ही हाक ऐकू येत होती.
माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो. तेव्हा मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना, स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.
– क्रमशः भाग पहिला
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈