मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अस्तित्व…” लेखिका : सुश्री माधुरी काबरे ☆ प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆

सुश्री माधुरी काबरे

☆ “अस्तित्व…लेखिका : सुश्री माधुरी काबरे ☆ प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆

तो दारात उभा होता! बाहेर कदाचित पाऊस रिपरिपत असावा. तो आवाज ऐकत खोलीतल्या गूढ पिवळट प्रकाशात ती सुंदपणे बसून होती आणि अचानक तो दारात दिसला. क्षणभर तिला कळलंच नाही. कळलं तेव्हा प्रथम खरंच वाटलं नाही आणि जेव्हा खरं वाटलं तेव्हा ती दचकली! उडणारा मेंदू ताळ्यावर ठेवत तिने डोळे विस्फारून पाहिलं. तिला दिसणारा तो ‘तो’च होता. त्याच्या चेहऱ्याभोवती विक्षिप्तपणाचं वलय नेहमीसारखं फिरत होतं. नवीन म्हणजे त्याच्या खांद्यावर एक हडकुळं मूल झोपलं होतं. पण त्याला ओळखायला तिला त्याची पुसटशी सावलीही पुरली असती.

त्याची आकृती डोळ्यात साठवत असताना तिच्या मनात बरंच काही खळबळू लागलं. रुक्ष संसारात थिजलेली सात-आठ वर्षे भराभर वितळून गेली आणि तिला एकदम अल्लड झाल्यासारखं वाटलं. त्याचवेळी मनात सतत झिरपणारी त्याच्याविषयीची ओढ पुन्हा जागी झाली. त्यावेळी त्याला समर्पित होण्यासाठी उत्सुक भरलेलं तिचं कोवळं हृदय पुन्हा अस्वस्थ आशेनं फुलारून आलं. त्यावेळी त्याला पाहिल्यावर होणारी धडधड ऐकत असताना तिचे डोळे आनंदाने चमकू लागले. बाहेरचा पाऊस सतारीचे सूर वर्षावू लागला आणि स्वतःला त्या आनंदातून खेचून काढत ती हलक्या मृदू स्वरात गुणगुणली, “ये ना, बैस!”

तो येऊन समोरच्या खुर्चीवर बसला. त्या सोनेरी गुढ प्रकाशात तो थोडा थकल्यासारखा दिसत होता. त्याचे केसही बरेच पांढूरके झाले होते. पण त्याचा सोनेरी फ्रेमचा चष्मा मात्र आहे तसाच होता. ती वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. तो बोलत होता खरा, पण तिला काही एक कळत नव्हतं. पण तो घोगरा आवाज मात्र तिला वेढून टाकत होता. ती अधिकच गुंगत होती… तिच्या शरीराला यौवनाची जाग आली तेव्हा तिच्या भावविश्वात केवढा तरी बगीचा फुलवला होता त्याने… स्वप्नांचे सरच्या सरच्या सर गुंफत तिने तासच्या तास घालवले होते त्याच्याबरोबर… त्याने कधीतरी फेकलेल्या हास्याची फुले गोळा करण्यात ती सारे हृदय ओतत होती त्याच्यासमोर… आपण निर्माण केलेल्या त्या स्वप्नात ती मुग्धापणे रमली होती… त्यावेळचा तो उत्कटपणा हा तिच्या मनात फुटून फुटून वाहत होता! तो सारा आनंद तिला शब्दातून फुलवायचा होता. पण त्यावेळेप्रमाणेच तिच्या ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते… तोच बोलत होता… आणि तो काय बोलत आहे हे तिला मुळीच समजत नव्हतं…

असा किती वेळ गेला कोणास ठाऊक! मध्येच त्याच्या खांद्यावरचं ते मूल जागं झालं आणि त्यानं आपलं तोंड फिरवलं. ते मूल तिला आत्ताच दिसत होतं. तिला घाबरून किंकाळी फोडावीशी वाटली. कमालीचं घाणेरडं, चमत्कारिक आणि विद्रुप होतं ते! तिच्या अंगावर शहारा आला. इतकं घाणेरडं मूल याला कसं झालं? तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हुरहुरलं! आपलं मूल कसं झालं असतं?… तिचं मन क्षणभर सैरभैर झालं. त्या मुलाची विझलेली भयाण नजर तिच्यावरची चिकटली होती. त्या मुलानं तिचा आनंद खाऊन टाकला होता. ती त्या मुलाकडे पहात राहिली.

तो म्हणाला, “घे ना. हा माझा धाकटा मुलगा. ” 

त्याला घेण्याच्या कल्पनेनं तिचं डोकं गरगरू लागलं आणि डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली… कसल्या तरी गुंगीनं तिला झपाटलं… क्षणभर प्रकाश आणि अंधार यांच्या सीमारेषेवर ती हिंदकळली आणि नंतर अंधाराच्या खोल गर्तेत बुडून जाऊ लागली… सगळीकडे अंधार, फक्त अंधार आणि अंधारच होता…

तिनं भानावर येऊन डोळे चोळले. खरंच भोवती नुसता अंधार होता. दिवा कोणी मालवला? आणि ‘तो’ कुठे गेला? तिला काही कळेना… त्याच वेळी घड्याळात चार-पाच टोले पडत होते. त्या आवाजानं ती शुद्धीवर आली. उशीवरनं मान वळवली आणि त्या खोल दाट अंधाराला तिचं खिन्न हसणं जाणवलं! तिच्या नीट लक्षात आलं– ते सारं स्वप्न होतं! स्वप्न, खोटं!!… खोटं? खोटं कसं असेल? तो आला होता… बोलला होता… त्याचा गहिरा आवाज – त्याचा सोनेरी फ्रेमचा चष्मा – तिच्या मनात आनंदाच्या लाटा उसळल्या! काही काळ ती त्या लाटांवर तरंगली आणि परत अंधारात बुडू लागली! 

तिची झोप केव्हाच दूर गेली होती आणि त्या स्वप्नानं तिच्या मनात थैमान घातलं होतं. दुसऱ्या कशाचाही विचार न करता तिनं नुकत्याच पडलेल्या त्या स्वप्नात डोकावून पाहिलं! साऱ्या गोष्टी नीट न्याहाळल्या आणि तिच्या सुगंधित अंत:करणाला काहीसं जाणवलं! तो आला होता!… खरंच आला होता!

आला होता? मग आता कुठे आहे? मला माहित नाही. पण तो आला होता… बोलला होता. नक्कीच!… ती उदासली! खरंच हे स्वप्न रात्री का नाही पडलं? तो रात्रभर का नाही राहिला? पण पहाटेची स्वप्न खरी होतात ना? छे! वेडगळ कल्पना आहे ती! निदान हे स्वप्न तरी नक्की खरं होणार नाही. सात वर्षांपूर्वी कदाचित खरही झालं असतं!…

सात वर्षांपूर्वी! त्यावेळी तिच्या कोवळ्या मनात जे जे उगवलं होतं ते ते अबोलपणाच्या भिंतीत करपून गेलं होतं. तिची सारी तडफड मनातच बंदिस्त राहिली होती. त्याला साधी गंधवार्ताही लागली नव्हती. फक्त शेवटी… शेवटी तरी काय? तो कायमसाठी दूर निघाला तेव्हा व्याकुळ होऊन तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी निखळलं आणि चमकून त्यानं तिच्याकडे पाहिलं. बस्स! इतकंच! त्याला कळलं असेल? कदाचित नसेलही. पण तेव्हा कशाचाच उपयोग नव्हता. कोसळलेल्या क्षितिजाखाली चांदणं फुलायची मुळी शक्यताच नव्हती! तिच्याच मुग्धतेने तिच्या पहिल्यावहिल्या प्रेमाचा बळी घेतला होता. ती आताही खिन्न खिन्न झाली. त्यावेळी एक-दोन वर्ष हृदयात व्यापून राहिलेली कासावीस करणारी उदासी पुन्हा मनात खळाळू लागली आणि जखमेवरल्या रक्तासारखे तिच्या डोळ्यातून अश्रू भळभळू लागले! तिच्या डोळ्यासमोर ते स्वप्न नाचत होतं…

विचार करता करता तिच्या अंगावर शहरा आला… त्याने ते चमत्कारिक मूल कशाला आणलं होतं? त्या घाणेरड्या सोंगानंच तिचं स्वप्न हिरावून घेतलं होतं. कोण होतं ते? त्यांच्या दोघातील नियती? त्या पोराची ती भयाण नजर पुन्हा तिला गिळू लागली! मनातला सारा जोर लावून ती त्या विकृत सावलीला दूर दूर लोटू लागली… त्या ठिकाणी ‘त्या’चा चेहरा आठवू लागली… खरंच फारसा बदलला नाही. परत ती त्याच्याच भोवती फिरू लागली. त्याचे केस थोडे पांढरे झाले आणि तब्येतही खालावली होती. छे! आपण काहीच कसं विचारलं नाही? तिचं मन फाटलं… पूर्वीही तो गेल्यावर असंच काही काही आठवत रहायची आणि हळहळायला व्हायचं! आजही तसंच. इतक्या वर्षांनी तो एवढा आला. पण त्याची कसलीच चौकशी करायचं सुचलं नाही. तसं बोलताही आलं नाही. तो काय काय बोलला हेही लक्षात नाही. आता पुढच्या खेपेला नक्की…

पुढली खेप? केव्हा? कुठं? की परत स्वप्नातच? स्वप्न कोण आणतं? का आणतं?कुठून आणतं? कसं आणतं? तिच्या मनात प्रश्न गरगरू लागले. खरंच त्या स्वप्नांनं तिला वेडंखुळं केलं होतं! ते स्वप्न निरर्थक मानायला तिचं मन तयार नव्हतं. स्वप्न खोटं मानायच्या कल्पनेने ती व्याकुळ होत होती. खोटं कसं? त्याचं बोलणं ऐकलं! त्याची आकृती डोळ्याने पाहिली… पण कुठले डोळे? आणि कुठले कान? आता तर डोळ्यांना दिसतोय हा भयाण खोल अंधार आणि कानाला ऐकू येतेय त्या अंधारात ठिबकणारी घड्याळाची रुक्ष टकटक!… मग ते स्वप्न कोणी पाहिलं? त्याचा प्रभावी आवाज कोणी ऐकला? झोपेत सारं शरीर थंड पडून निष्क्रिय झालं असताना कोण जागं होतं?

… पण स्वप्न खोटीच असतात!

… कशावरून?

… त्यातलं काही नंतर शिल्लक नसतं…

कोण म्हणतं सारं शिल्लक आहे! जसंच्या तसं ते स्वप्न मनात उभं आहे! ते स्वप्न त्या सोनेरी प्रकाशाबरोबर विझलं… त्याचा आवाज अंधारानं गिळला… अवेळी आलेल्या जागेनं त्या स्वप्नाच्या साऱ्या पाकळ्या कुस्करल्या… पण त्या स्वप्नाची जाणीव शिल्लक आहेच! स्वप्न खोटं मग ही जाणीव खरी कशी? हातातून भुर्रकन सुटून गेलेल्या त्या रुपेरी पक्षाची पिसं हातात आहेत. मग तो पक्षी आलाच नव्हता असं कसं म्हणायचं? मग ही पिसं कुठली? ‘तो’ इथे येऊन गेल्याखेरीज त्याच्या भेटीचा आनंद मनात कसा थरथरत राहील? तिच्या मनाची खात्री झाली. तो आला होता! खरंच तो आला होता…

तिचं हृदय भरून आलं. पापण्या भिजल्या! त्या दोघात पसरलेली एका जन्माची दरी किती विलक्षणपणे भरून आली होती! सगळं गिळून संसार करताना तिच्या मनात कुठेतरी गळत राहिलेलं दुःख कसं अचानक फुंकलं गेलं होतं! त्याचा आवाज ऐकायला मिळणार नाही म्हणून तडफडणाऱ्या तिला तो आवाज ऐकायला मिळाला होता! ती ज्यावर बेहद्द खुश होती तो सोनेरी फ्रेमचा चष्मा पुन्हा तिला दिसला होता! खोलीतच असलेल्या नवऱ्याच्या नकळत ती तिच्या प्रियकराला भेटली होती!… किती गंमत…

हळव्या झालेल्या मनाने ती गोड हसली. तिला केवढा दिलासा मिळाला होता. पुन्हा तिच्या मनात काहीतरी उगवत होतं. यौवनाच्या पहिल्या पायरीवर त्याच्यासाठी अर्पण केलेलं हृदय आज तिनं तितक्यात उत्कंठेनं त्याच्यासाठी सिद्ध केलं होतं. खरंच तो नेहमी येईल स्वप्नात? रोज रात्री? छे! रोज रात्री नाही जमायचं त्याला! पण कधीतरी नक्कीच… तिच्या मनात प्रतीक्षा उमलू लागली. किती का दिवस लागेनात पण या जन्मात तरी नक्की! ती उत्साहाने बेत करू लागली. पुढच्या खेपेला त्याच्या तब्येतीची चौकशी करायची. मग पुढे हळूहळू मनातलं सारं त्याच्याजवळ ओतून टाकायचं आणि त्यानंतर आणखीही काही…

तिला आज कितीतरी दिवसांनी शांत शांत वाटलं. मग ती हलकेच मघाच्या स्वप्नात शिरली. त्याचा आवाज… तो चष्मा… तो बेफिकीर आवाज… ती खूप खूप खुश झाली. खुशीची ग्लानी हळूहळू तिच्या डोळ्यावर पाझरू लागली… डोळे जड होऊन मिटत गेले… मिटत गेलेल्या रात्रीसारखे! आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलू लागला फुलत गेलेल्या स्वप्नासारखा! 

त्याचवेळी तिचा नवरा जागा होत होता आणि ते कुरूप मूल सूर्य होऊन तिच्या घरावर आपले असंख्य हात पसरत होतं.

लेखिका: सुश्री माधुरी काबरे

प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ग्रुप मेंबर… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ग्रुप मेम्बर. – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(कारण बॅचलर मुलांच्या घोळक्यातला मी एकमेव त्या सगळ्या वेगळ्या पठाडीतल्या सिनियर्समध्ये सहजी सामावून गेलो होतो. आणि त्यांनीही मला कधी सापेक्ष वागणूक दिली नव्हती. आपल्यापासून कधीही वेगळे समजले नव्हते.) — इथून पुढे  

त्यांनी माझ्या चांगल्या गुणांची नेहमीच कदर केली. वेळप्रसंगी  मला चार गोष्टी समजावूनही सांगितल्या.  रिकाम्या वेळात ग्रंथालय जाऊन वाचन करणे,  नेट-सेट परीक्षेचा अभ्यास करणे,  विद्यार्थ्यांसाठी चांगल्या नोट्स काढणे त्यासाठी चांगल्या प्रतीचे रेफरन्स बुक्स जास्तीतजास्त वापरणे,  संध्याकाळी शास्त्रीय गायन, तबला, हार्मोनियम इत्यादींचे क्लास लावणे, कविता करणे इत्यादी सर्व सवयी मला त्यांच्यामुळे लागल्या.  मी कॉलेजला असल्यापासून अरुण दातेंची भावगीते गायचो. इथे वैद्य मॅडमला तर माझी गाणी खूप आवडायला लागली होती. मुळे मॅडम आणि त्या दोघी रिकाम्या वेळेस चक्क स्टाफ रूम  मध्ये मला गायला लावायच्या आणि माझ्या आवाजाचे भरभरून कौतुक करायच्या. आता लवकरात लवकर संगीत विशारद होण्याचा व्हा असा सल्ला मला त्या द्यायच्या. त्या सगळ्यांच्या सहवासामुळे सगळे मित्र मला चिडवायचे. पण मला त्यांचे चिडवणे काही  समजत नव्हते त्यामुळे मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो.

अरे माझा स्वभाव त्यांना आवडतो म्हणून आमचे जास्त जमते. तुम्ही का माझ्यावर जळता? असे मी सगळ्यांना आटोकाट सांगण्याचा प्रयत्न करायचो. पण सगळे व्यर्थ…! ‘अरे एक दिवस तुला ते कचऱ्यासारखे टाकून देतील ‘ असे ते मला म्हणायचे पण मला त्यांची परवा नव्हती. 

आता समा सुधारलाय,जात-पाच धर्म, लिंग या पलीकडे जाऊन माणूस म्हणून सगळे लोक एक होत आहेत आणि दुसरीकडे आपण लोक मात्र संकुचित कोत्या मनोवृत्तीचे आहोत की जुनं अजून काहीकेल्या आपल्या डोक्यातून जातच नाही.  बुरसटलेले संकुचित विचार आपल्या मनातून नष्ट होत नाहीत. आपला मेंदू सुद्धा लहान म्हणून आपण भव्य दिव्य असा विचार करूच शकत नाही. असे माझे विचार झाले होते. परंतू माझ्या मित्रांना माझे हे विचार पटत नव्हते.का? ते मला पटत नव्हते. 

एके दिवशी कॉलेजच्या गेटवर वैद्य मॅडमनी सुषमा नावाच्या एका सुंदर मुलीशी माझी ओळख करून दिली. मुलगी छान होती. उच्चशिक्षित होती. 

दुसऱ्यादिवशी चहाला गेल्यावर त्या म्हणाल्या, ” मग कशी वाटली सुषमा? ” 

” मी समजलो नाही, मॅडम.

 “अहो सर वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. आम्ही विलास सरांना इथे जॉब दिला.  त्यांना इथलीच मुलगी दिली.  लग्नही झालं. आता छान संसार चाललाय त्यांचा.ते आता इथेच स्थायिक झालेत कायमचे. 

आता तुमचा नंबर. तुमचेही छान करून देवू. सुषमा छान आहे. सोन्यासारखा संसार करेल तुमचा. कसे?” 

” हो ते ठिक आहे पण मॅडम अजून माझ्यावर खूप जबाबदारी आहे माझ्या कुटुंबाची. एवढ्यात नाही मला लग्न करायचे. अगोदर सेटल व्हायचेय मला. ” 

“अहो, मग नाही कोण म्हणतंय.” चहाचा कप खाली ठेवत मुळे मॅडम मध्येच म्हणाल्या.

“अहो, लग्न झाल्यावरच मनुष्य खऱ्या अर्थाने सेटल होतो. तुम्ही आधी लग्न करा मग सगळेकाही ठिक होईल. तुमच्या सेटलमेंटसाठीच आमचा सगळा खटाटोप चाललाय ना? आता द्या पाहू होकार पटकन.” वैद्य मॅडमने असे म्हणतात सगळेजण मला द्या होकार म्हणू लागले. मी केवळ मनातल्या मनात हासून, “नंतर सांगतो.”  असे म्हणालो. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे छान चर्चा रंगल्या.

अशातच एक प्रकरण कॉलेजमध्ये जोर धरू लागले. 

गणिताच्या एका आमच्या बहुजन प्राध्यापकावर खूप अन्याय झाला होता. त्याचे शासन नियमानुसार विद्यापीठ सिलेक्शन होते परंतू संस्थेला दुसराच एक ओपन कॅटेगिरी चा प्राध्यापक या विषयासाठी  घ्यायचा होता. त्यामुळे गायकवाड  याला नीट शिकवता येत नाही या कारणामुळे त्याचं कंटिन्युएशन डावललं गेलं होतं. त्यामुळे त्यांने उपोषणाला बसण्याची धमकी मॅनेजमेंटला दिली होती पण मॅनेजमेंट त्याला काढण्यावर ठाम होते. सरतेशेवटी बहुजन संघटना आक्रमक झाली. उपोषणाचा दिवस जवळ आला तरी मॅनेजमेंट दखल घेत नसल्याने संघटनेने आपला मोर्चा विद्यापीठात नेण्याची धमकी दिली. पण त्यालाही मॅनेजमेंट भीक घालेना. मग जुनेजाणते पाच ते दहा मागासवर्गीय प्राध्यापक व वीस ते पंचवीस नवीन तरुण तडफदार प्राध्यापक संघटनेच्यावतीने  विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी भव्य मोर्चा काढला.  संघटनेचे शिष्ट मंडळ कुलगुरूंना भेटले. परंतू कुलगुरूंनी आंदोलकांची केवळ बोळवण केली. ठोस असे काहीच आश्वासन दिले नाही.  तेव्हा परत आल्यावर पुन्हा उपोषणाची जोरदार तयारी झाली. 

कॉलेजच्या बाहेरच उजव्या बाजूला छोटेखानी कापडी मंडप टाकला होता. खाली सतरंजी टाकली होती. उपोषणाचा फलक मागच्या बाजूला ठळक दिसेल अशा पद्धतीने लावला होता.  जवळपास सगळेच बहुजन प्राध्यापक त्या संपात सहभागी झाली होते. माझ्या हातात ‘बहुजनांवरील अन्याय सहन करणार नाही ‘ असा फुलक होता. ‘ न्याय मिळालाच पाहिजे ‘  ‘ विद्रोह करावाच लागेल ‘ ‘ शिका संघटित व्हा संघर्ष करा ‘ इत्यादी फलक इतरांच्या हातात होते.

एक जण पुढे घोषणा देत होता आणि आम्ही सगळे मागे आवाज देत होतो. 

सकाळी दहा वाजता मंडपातून मोर्चा कॉलेजच्या गेटमधून थेट आत शिरला एका ओळीत प्राचार्यांच्या ऑफिसकडे निघाला त्यावेळी मोर्चाने विराट स्वरूप धारण केले होते. आम्ही सगळे खूप भारावून गेलो होतो. जेव्हा मोर्चा स्टाफरुमच्या समोर आला तेव्हा नकळत माझे लक्ष तिकडे गेले तर काय? स्टाफरुमच्या खिडकीतून आमचा ग्रुप वैद्य मॅडम, मुळे मॅडम, देशपांडे सर व इतर सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. ते पाहून मला थोडे आश्चर्य वाटले! मी किती ॲक्टिव्ह आहे. किती मोठे सामाजिक काम करतो आहे हे त्यांना दाखवण्यासाठी मी उत्सुक होतो. 

ते स्टाफरूमच्या बाहेर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी का येत नाहीत ते मला समजेना. 

मग न राहून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेवटी मीच हातातला एक फलक जोरदार उंचावत त्यांच्या दिशेने पाहत होतो व मोठ्याने घोषणा देत होतो. त्या सगळ्यांना माझा खूप अभिमान वाटत असेल असे वाटत होते म्हणून मला अधिकच शेव आला होता पण त्यानंतर तर त्यांनी स्टाफरूमचे दार धाडकन लावून घेतले! 

आमच्या आंदोलनाच्या त्या दिवसानंतर एकाही ग्रुप मेंबरने माझ्याशी संवाद केला नाही की जवळीक सुद्धा दाखवली नाही. त्यांच्या त्या तशा वागण्याने मी खूप उदास झालो होतो.

मी सगळ्यांना नेहमीप्रमाणे भेटण्याचा, बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सगळे मला टाळत असल्याचेच मला जाणवले. असे का झाले? यावर चर्चा करत असताना गज्या म्हणाला, ” अरे हे होणारच होते आम्हाला ते माहित होते पण तुला सांगून काय उपयोग?

” अरे पण असे झालेच कसे? तसे असते तर मग सुरुवातीलाच मला त्यांनी जवळ का केले असते? ” 

” आता तूच विचार कर शांत बसून… बघ काय कळतंय का?” 

ते कळायला आणि स्वीकारायला बरेच दिवस लागले परंतू जेव्हा कळले तेव्हा माणूस आधी की जात आधी? याचा हिशोब मात्र लागत नव्हता….. 

– समाप्त –

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डोळस दसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ डोळस दसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि डोळेझाक करता न येणार्‍या प्रसव वेदना तिला सुरू झाल्या.

डोळयाला डोळा लागत नव्हता. वेदनेने सुलोचना डोळे घट्ट मिटत होती. अचानक तिच्या डोळ्यांपुढे काजवे पसरले, डोळ्यात पाणी तरळले ज्या क्षणाकडे ती डोळे लावून बसली होती तो क्षण आला आणि एका मोठ्या वेदनेच्या क्षणी ती प्रसूत झाली. वेदनेने तीचे डोळे बंद झाले. पण क्षणात टॅहॅ टॅहॅच्या आवाजाने तिने झटकन डोळे उघडले. जडावलेल्या डोळ्यातही मातृत्वाची वेगळी चमक दिसली आणि सुलोचनाने दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मलेल्या आपल्या परीला कुशीत घेत डोळे भरून पाहिले.

जणू शैलपुत्रीचे दर्शन तिला झाले होते. दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मली म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले.

डोळ्यात तेल घालून ती तिला जपत होती. जरासुद्धा डोळ्याआड तिला होऊ देत नव्हती. जणू काळजीचा तिसरा डोळाच तिला लागला होता. असे ब्रह्मचारिणीचे रूप तिचे १० वर्षाचे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच संपले होते.

दुर्गा सगळ्य़ात हुषार होती. तिची हुषारी सगळ्यांच्या डोळ्यात येत होती. असे करता करता जणू ही चंद्रघंटा दहावीत प्रथम क्रमांकाने पास झाली होती. तेव्हा तिचे टपोरे डोळे अधिकच पाणीदार भासले होते. काहींच्या डोळ्यावर हे येत होते डोळ्यात खुपत होते हे न कळायला तिने डोळ्यावर कातडे नव्हते ओढले. पण ती त्याकडे काणा डोळा करायची.

दुर्गाची दहावी झाली आणि तिने मिल्ट्रीमधे जायचा हट्ट धरला. हे ऐकून सुलोचनाच्या डोळ्यांपुढे अंधेरीच आली. तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. पण मिल्ट्रीत जायचा निर्धार दुर्गेच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. ती दुसर्‍या गावी जाणार म्हणजे दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशी अवस्था होणार होती. तरी तेव्हा कुष्मांडासारखी ती धैर्यशील भासत होती.

ट्रेनिंग घेत असतानाच एक मुलगा एका मुलीची छेड काढत असलेला तिच्या डोळ्यांनी पाहिले. डोळ्यात अंगार भरला तिने त्याला पकडला. डोळे वटारून तिने त्याला अपादमस्तक न्याहाळले. खाडकन त्याच्या मुस्कटात लगावून डोळे फडफडवून तिने त्याला समज दिली पुन्हा जर वाईट नजरेने मुलींकडे बघशील तर डोळे काढून गोट्या खेळीन मग तुझ्या डोळ्याच्या खाचा होतील. त्याच्या डोळ्यात मूर्तीमंत भिती दाटली. डोळे पांढरे झाले. माफी मागून त्याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. तिचे ते रूप स्कंदमातेप्रमाणे करारी तरीही क्षमाशील भासले.

हे तिचे रूप शिवाच्या डोळ्यात भरले. ज्या डोळ्यात धाक होता त्याच डोळ्यांना डोळा भिडवला. तिने डोळे आले आहेत या बहाण्याचेही काही चालले नाही. वेगळा भाव त्यामधे दाटताच तिला डोळा मारला. तिच्या पाणीदार डोळ्यांकडे तो डोळे रोखून पाहू लागला. तिला डोळे फिरवणे शक्यच नाही झाले. क्षणात तिने डोळे झुकवले. हे तिचे रूप त्याला कांत्यायनी सारखे भासले.

अर्थातच डोळ्यात धूळ फेकणे कोणाला शक्यच नव्हते. डोळ्यात डोळे घालणे चालूच होते. ती मिल्ट्रीमधे रुजू झाली. तो पण कॅप्टन पदावर होता. तरीही दुर्गा त्याला पहाताच नकळत डोळे मोडीत चालायची. दुर्गाला चांगली नोकरी लागावी हे स्वप्न असतानाच चांगला जोडीदार मिळाला पाहून आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे याचा प्रत्यय आला होता. घरच्यांनी त्यांचा शानदार विवाह लावून दिला. असा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले. कौतूक आनंद कोणाच्याच डोळ्यात मावत नव्हते. हे रूप सगळ्यांनाच महागौरीचे वाटले.

लग्नानंतर तिने तिचे काम चालूच ठेवले होते. अनेक नराधमांचे लागलेले डोळे उखडले होते. त्यांना समज देऊन डोळे उघडले होते. उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवून डोळे असून आंधळ्यासारखे राहू नये शिकवताना डोळ्यात अंजन घातले होते. हे तिचे रूप कालरात्रीचे भासले.

नंतर मात्र अचानक तिच्या जीवनात एक दुर्घटना घडली. तिच्या सासर्‍यांच्या डोळ्यात फुल पडले. डॉक्टरही कधी कधी डोळ्यात कचरा कानात फुंकर सारखी ट्रिटमेंट देतात याचा अनुभव आला. त्या नादात सासर्‍यांचे डोळे फुटले होते. त्यांचे डोळे निर्विकार झाले होते. तिचे प्रथम कर्तव्य सासर्‍यांची सेवा करणे असल्याने तिने राजीनामा दिला होता. तिच्या डोळ्यांचा पहारा कायम ती देत होती.

अशातच तिच्या पण तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आणि चाचणीअंती समजले की तिला आतड्याचा कॅन्सर आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. ती दिसायला चांगली होती पण आतून तब्येत बिघडली हे पाहून डोळे व कान यात चार बोटांचे अंतर असते हे पटले होते. सासर्‍यांच्या डोळ्यात पडलेल्या फूलाचे कुसळ तिला दिसले होते पण स्वत:च्या डोळ्यात म्ह्मणजे तब्येतीत घुसलेले मुसळ तिला दिसले नव्हते.

सगळ्यांच्याच डोळ्यांपुढे आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह उभे होते. तर दुर्गेला तिच्या सासर्‍यांबद्दल डोळा हेकणा किधर भी देखणा असे कोणी म्हणू नये असे वाटल्याने डॉक्टर आणि शिवाला सांगून नेत्रदान करण्याचा व डोळे सासर्‍यांना बसवण्याचा निर्धार सांगितला. ती खूप थकली होती. तिचे डोळे किलकिले होत होते. ती मुश्किलीने डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला ते जमत नव्हते. तिचा डोळा लागला आहे असे वाटत असतानाच तिचे डोळे निवले आहेत आणि तिने कायमचे डोळे मिटले असल्याचे डॉक्टरने सांगितले.

लगबगीने डोळ्यांच्या डॉक्टरांनी तिचे डोळे काढून एक तिच्या सासर्‍यांना आणि एक गरजूला बसवला होता. दोन्ही ऑपरेशनस् यशस्वी झाली होती. आता ती डोळ्यांच्या रुपाने या दुनीयेत शिल्लक होती. तशातही तिचे रूप सिद्धीदात्रीचे भासले

शिवाला तिच्या कार्याचा फार अभिमान होता. आज दसरा होता आणि दुर्गेचा वाढदिवस, प्रथम स्मृतीदिन होता. त्याने दवाखान्यात जाऊन नेत्रदानच नाही तर देहदानाचा फॉर्म भरला होता. खर्‍या अर्थाने एक डोळस दसरा आज साजरा केल्याचे समाधान त्याच्या डोळ्यातून ओसंडत होते.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ग्रुप मेंबर… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ग्रुप मेम्बर. – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

” नमस्कार सर ” मी विलास सरांना नमस्कार केला.

आपल्या केबिनमध्ये काहीतरी वाचत बसलेल्या विलास सरांनी आपलं पुस्तकातलं डोकं अलगद वर करून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ” या सर, बोला काय म्हणताय ? ” सर, तुम्ही ही कमिट्यांची यादी पाहिली काय? ” मी माझ्या हातातला कागद त्यांच्यापुढे टेबलावर ठेवत म्हणालो.

” होय पहिली आहे. “

” सर, तिथे सांस्कृतिक कमिटीचा चेअरमन म्हणून माझं नाव दिसतंय… ” 

” गुड, व्हेरी गुड, अभिनंदन! हार्दिक अभिनंदन सर! अहो, बसा ना तुम्ही असे उभे का? “

” सर, मला वाटतेय ते माझं नाव नाही. तिथे तुमचं नाव असावं… ” 

 ” पाहूया, अहो कसं शक्य आहे ते? हे पहा, इथे अगदी स्पष्ट तुमचं नाव लिहिलंय कोणीही सांगेल. ” माझ्या नावासमोर आपल्या पेनचे टोक लावून मला दाखवत ते म्हणाले.

परंतू लगेच स्वतःला सावरत मी म्हणालो, ” हो सर, पण मला असं वाटतंय ती टायपिंग मिस्टेक असावी ऑफिसची. ” 

 ” छे, छे अशी कशी होईल टायपिंग मिस्टेक? शक्य नाही ते… ” 

” शक्य आहे सर ते कारण आपल्या दोघांच्या नावाच्या इनिशियलमध्ये अगदी थोडा बदल आहे आणि आडनाव तर सारखेच आहे ना? त्यामुळे एखाद्या क्लार्ककडून टाईप करताना व्ही. सीच्या ऐवजी व्ही. जे झालं असावं… बरोबर ना?” मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणालो.

 ” मला नाही वाटत तसं… ” 

” सर, मला तर नक्की तसेच वाटतेय. ” 

” कशावरून? “

” सर तुमचा अनुभव केवढा मोठा. कमीतकमी दहा-बारा वर्षांचा तरी असेल. आणि मी? अहो, आत्ता कुठे जॉईन झालोय नुकताच. अजून मला कॉलेज सुद्धा नीट कळलेलं नाही. “

” अहो, इथे अनुभवाचा काय संबंध आहे? ” 

” संबंध आहे सर, म्हणजे इथे बघा ना. सर्व कमिट्यावर चेअरमन म्हणून अनुभवी आणि जुन्या लोकांचीच नावे आहेत. मी एकटाच नवखा दिसतोय. मला तर तिथे नाव पाहून जाम टेन्शन आले म्हणून मी धावत तुमच्याकडे आलो. म्हटलं सगळ्यांनी पाहण्याअगोदर घ्यावी लगेच दुरुस्ती करून. ” 

” पण, प्राचार्यांना कदाचित वाटलं असेल एखादं नाव नवीन घ्यावा म्हणून… ? काय? “

” पण सर…. ” 

 ” आता पण… पण वगैरे काही करू नका. तुम्हाला अभिनय करता येतो? ” 

” हो सर, शाळा कॉलेजात असताना एक दोन नाटकात छोटे रोल केले आहेत. “

” गाणं येतं? ” 

” हो, थोडं फार येतं म्हणजे मला आवड आहे गाण्याची लहानपणापासून. ” 

” झालं मग, अजून काय हवंय? अहो, तुम्ही सांस्कृतिक समितीचे चेअरमन म्हणून माझ्यापेक्षा चांगलं काम करू शकता. मला तर यातलं काही जमत नाही बुवा. ” 

” सर, पण… ” 

” बसा इथे आता पण वगैरे काही नाही. तुम्ही बसा इथे. सगळं काही ठीक होईल. अहो, आम्ही थकलो आता असली कामे करून. आमची खूप हौस भागली आता. आता कॉलेजला तुमच्यासारख्या यंग जनरेशनची गरज आहे शिवाय तुम्ही आहात ही तसे सुंदर, देखणे अन रुबाबदार… ” विलाससरांनी मला हरभऱ्याच्या झाडावर इतकं उंच चढवलं की आता खाली येणं अशक्य वाटू लागलं. ” 

” घ्या जबाबदारी, आता नाही म्हणू नका. चांगली संधी चालून आलीय तुम्हाला. ” पुढे असा सबुरीचा सल्लाही दिला. मग काय? 

” थँक्यू सर तुम्ही खूपच धीर दिलात मला. ” 

” अहो का नाही देणार? तुम्ही आपली माणसं ना? आपल्या माणसांना प्रमोट करायचं नाही तर मग कोणाला प्रमोट करायचं?”

‘आपली?’ मी संभ्रमात पडल्याचे लक्षात येताच ते पटकन म्हणाले, “अहो, आपण गाववाले नाही का? तुमचं आणि माझं गाव शेजारी-शेजारीच आहे बहुतेक. आपण एका तालुक्यातलेच ना?” 

” हो सर, मला माहितीय ते. ” 

” अहो, आज आम्ही शहरात राहत असलो म्हणून काय झालं? आम्ही गावाला थोडेच विसरणार? ” 

” थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ” 

” लागेल ती मदत करतो. गॅदरिंग जबरदस्त व्हायला पाहिजे. ” माझ्या हातात हात देत विलास सर म्हणाले.

” हो सर नक्की. आपलं मार्गदर्शन असुद्यात. ” 

” आणि हो, बाकी इतरांपासून थोडे फटकून राहा. आपले वेगळेपण दिसले पाहिजे म्हणजे रेक्टर हाऊसला सगळ्यांसोबत राहतात ना? म्हणून म्हटलं… ” 

ते असे का म्हणाले ते नीट कळले नाही परंतू मोघमपणेच मी उत्तर दिले, ” अहो सर, तसलं काही नाही आवडत आपल्याला. आपण अलिप्त असतोच सगळ्या गोष्टीपासून.” 

” छान, खूप छान. असेच रहा अगदी. ” 

” येतो सर “

” या. गुडलक टू यु. ” असे म्हणत त्यांनी माझ्याशी हस्तोंदलन केले. ते करत असताना त्यांच्या नाजूक हाताचा स्पर्श मला माझ्या रांगड्या, रापलेल्या हाताला झाला. एवढ्या मोठ्या सीनियर माणसाने आपल्याला सहकार्याचा हात पुढे केला याचे मला आश्चर्य वाटले! खरेतर मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा जाम टेन्शनमध्ये होतो. रेक्टरहाऊसला सगळ्यांनी मला त्यांच्याबद्दल कल्पना दिली होती. म्हणजे माझ्या मनात विलास सरांच्याबद्दल खूपच गैरसमज पसरवला होता. त्यामुळे विलाससरांची खूपच वाईट प्रतिमा माझ्या मनात तयार झाली होती.

” अरे खूप टिपिकल… अगदीच ‘ हा ‘ आहे तो… असे सगळे मित्र म्हणाले होते मला. ” 

“अरे, उडवून लावेल तुला तो असा फोलकटासारखा. ” असे एकजण म्हणत होता. ” 

“ काल आला आहेस तू इथे ? अजून तुझे दुधाचे दात पडले नाहीत आणि चेअरमन व्हायला निघालास सांस्कृतिक समितीचा? अरे चुकून पडले असेल ते तुझं नाव… ! ते तुझेच आहे असे वाटलेच कसे तुला? हल्लीच्या नव्या पोरांना ना लायकीच समजत नाही आपली?दुसरे काय? असे म्हणेल”.. असं बिंबवलं होतं माझ्या मनात त्या सगळ्यांनी… पण बापरे! घडले ते वेगळेच! विलाससर तर माझ्याशी खूपच चांगले वागले.

संध्याकाळी रेक्टर हाऊसवर जिथे आम्ही सर्व नवोदित प्राध्यापक राहत होतो तिथे सगळ्यांना ही हकीकत सांगितली त्यावेळी माझ्या सांगण्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.

“अरे, भूलू नकोस त्याच्या गोड-गोड बोलण्याला. पुंगी वाजवेल रे तो तुझी…. ! अरे त्याने गोड बोलून अनेकांना आसमान दाखवले आहे. ती स्ट्रॅटर्जी असते त्यांची. तू काही विश्वास ठेवू नकोस त्यांच्या बोलण्यावर… “ 

पण मी मात्र शांत होतो. मला विलाससरांच्या डोळ्यात विश्वास दिसला. आणि सहकार्याची भावना सुद्धा दिसली. शिवाय गाववाला म्हणून त्यांनी माझ्याशी सलगी सुद्धा दाखवली.

पुढे गॅदरिंगच्या नियोजनासाठी मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा तेव्हा सरांनी मला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच वैद्य मॅडम, मुळे मॅडम, बर्वेसर, देशपांडेसर या सगळ्यांशी माझी ओळख झाली. एकंदरच कॉलेजमध्ये आमचा सगळ्यांचा एक छान असा ग्रुप जमला होता. सकाळी दहा वाजता सगळे स्टाफ रूममध्ये एकत्र जमायचो, मग तिथे छान गप्पा व्हायच्या आणि मग कॅन्टीनमध्ये जाऊन चहा कॉफी घ्यायची आणि त्यानंतर मग आपापल्या डिपार्टमेंटला जायचे. हे सगळे असे घडत असताना इतर सगळे लोक माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायचे कारण बॅचलर मुलांच्या घोळक्यातला मी एकमेव त्या सगळ्या वेगळ्या पठाडीतल्या सिनियर्समध्ये सहजी सामावून गेलो होतो. आणि त्यांनीही मला कधी सापेक्ष वागणूक दिली नव्हती. आपल्यापासून कधीही वेगळे समजले नव्हते.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ससा आणि कासव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ससा आणि कासव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(कोकणच्या खेडेगावच्या सुरवंटाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू झालं.. संजूची नोकरी सुरू झाली. पहिला पगार होताच तिने काका मावशी आणि कुमारला हॉल मध्ये बोलावलं..) – इथून पुढे —- 

मावशीला सुंदर सोन्याचं कानातलं, काकांना छान शर्ट पॅन्टचं कापड आणि कुमारदादाला छान टी शर्ट. तिने मावशीच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाली, ” काका, मावशी तुमचे उपकार या जन्मी फिटणार नाहीत हो.. मावशी, तू मला आणली नसतीस ना तर मी अशीच त्या खेड्यात राहिले असते ग. मला काहीही भविष्य नव्हतं तिकडे. ”

संजू रडायला लागली.. मावशीलाही गहिवरून आलं. ”संजू, तुझेही खूप कष्ट आहेत बेटा या सगळ्या मागे.. छान झालं हो सगळं.. यश दिलंस आम्हाला.. अशीच मोठी हो बाळा” 

सुबोध त्या वेळी बोटीवर गेला आणि चार महिन्यांनी पुन्हा काकूंकडे आला. संजूच्या गालावर गुलाब फुलले त्याला बघून..

त्या दिवशी घरी कोणी नसताना सुबोध म्हणाला, ” मला फार आवडतेस तू संजू. पण कसं विचारू? मी जवळजवळ दहा वर्षांनी मोठा आहे तुझ्यापेक्षा.. तुला तुझ्या वयाच्या योग्य मुलगा नक्की मिळेल “

संजू म्हणाली ” सुबोध, विचारून तर बघा ना एकदा. ” “ संजू, लग्न करशील माझ्याशी? आवडतो का मी तुला?” 

संजूने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ” तुम्हाला मी आवडत असेन तर मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला. ते वयातलं अंतर मला नका सांगू.. मला आवडता तुम्ही.. ” सुबोध हसला आणि तिला म्हणाला “ सुबोध म्हण.. अहो जाहो नको.. ”

संध्याकाळी काका काकू आल्यावर सुबोध म्हणाला, ” काका मला संजू आवडते. मी लग्न करणार आहे तिच्याशी. तिलाही हे पसंत आहे”.

काकू म्हणाली “ अरे बाबा, ती किती लहान आहे तुझ्यापेक्षा.. संजू, अग उषा काय म्हणेल मला? “

मावशी, आत्तापर्यंत माझं सगळं भलंच झालं ग तुझ्यामुळे.. मी तुझ्यावर कोणताही ठपका येऊ देणार नाही.. मी सुबोधशी लग्न करणार.. ”

.. अगदी घरगुती पध्दतीने सुबोध संजूचं लग्न झालं. तिचे आईबाबा भावंडं सगळे आले आणि लग्न झाल्यावर परत गेले. जाताना उषाने संजूला पोटाशी धरलं.

“मला माफ कर हं संजू. पण या प्रपंचाच्या रगाड्यात तुझी होरपळच झाली ग बाळा. ललिता, , किती आभार मानू ग तुझे? माझ्या एका लेकीचं आयुष्य सोन्याचं केलंस ग” डोळे पुसून उषा गावी निघून गेली.

सुबोध आणि संजू लग्नानंतर फिरायला म्हणून बँकॉकला जाणार होते..

आयुष्यात प्रथमच संजू विमानात बसणार होती. एअरपोर्ट वर बसलेली असताना तिच्या मनात आलं, देवाने किती दारं उघडली आपल्याला. “ किती रे बाबा तुझे आभार मानू मी?” 

संजू आणि सुबोध त्यानंतर अनेक वेळा परदेशात जाऊन आले. हौशी सुबोधने संजूला सगळं जग दाखवून आणलं.

…….

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. सुबोध संजूला दोन मुलगे झाले आणि सुबोधने मुंबईतच काकू जवळच छानसा फ्लॅट घेतला. जमेल तशी, सुट्टी असेल तेव्हा, संजू मुलांना घेऊन बोटीवर जाऊन येई. सुबोधने किती सुखात ठेवले होते संजूला. काही वेळा तर संजूला आपल्याच भाग्याचा हेवा वाटे. काय मागच्या जन्मी पुण्य केलं म्हणून मावशी काका आणि सुबोध सारखी देव माणसं आपल्या आयुष्यात आली याचं आश्चर्य वाटे तिला. जवळच असणाऱ्या ललिता मावशीवर अत्यंत प्रेम होतं संजूचं. मावशीचे उपकार ती कधीही विसरली नाही.

एक गोष्ट मात्र तिला दुःख देऊन जाई. तिने कितीतरी वेळा म्हटलं तरीही तिच्या बहिणी कधीही मुंबईला यायला, तिच्याकडे रहायला पुढे शिकायला तयार झाल्या नाहीत. तिने विनवण्या केल्या तरी त्या कोणीही कोकण सोडून तिकडे यायला, पुढे शिकायला तयारच झाल्या नाहीत..

ललिता तिची समजूत घालायची आणि म्हणायची, “जाऊ दे संजू. अग सगळे नसतात तुझ्यासारखे कष्टाळू, जिद्दी. तू फार वेगळी आहेस. नाही त्यांना यायचे तर नको जास्त आग्रह करू. त्यांना आपलं हितच जर समजत नाहीये तर तू काय करणार? मग अशाच त्या तिकडेच सामान्य आयुष्य ढकलत बसतील. तू हुशार म्हणून आलीस हो माझ्याबरोबर”. मावशी म्हणायची.

त्यादिवशी सुबोध मलेशियाहून येणार होता. संजू त्याला न्यायला म्हणून गाडी घेऊन एअरपोर्टवर गेली होती. त्याची फ्लाईट यायला अजून अवकाश होता म्हणून संजू बाहेरच कट्ट्यावर बसली होती.

सहज लक्ष गेलं तर तिला ओळखीचा चेहरा दिसला. जवळ जाऊन संजूने विचारलं ” माफ करा पण तुम्ही पूर्वीच्या कुमुद करकरे का?”

ती बाई म्हणाली “ हो.. पण तुम्ही कोण? सॉरी मी नाही ओळखलं तुम्हाला. “

संजू हसली आणि म्हणाली, ”आठवते का शाळेतली संजीवनी पाध्ये? तीच उभी आहे बरं समोर. ”

कुमुद उठून उभीच राहिली. “ अग काय सांगतेस? किती सुंदर आणि मस्त दिसतेस तू संजू. केवढा ग बदल हा. ”कुमुदने तिला प्रेमाने मिठीच मारली.

“संजू, इतकी सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसायला लागलीस ग. सांग बघू सगळी हकीकत तुझी. ” संजूने सगळं सांगितलं. म्हणाली, “ किती ग मला इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स होता तेव्हा. सगळे फासे उलटे पडले होते ग माझ्या आयुष्यात. पण मावशी आली देवासारखी. मला तिने मुंबईला नेलं आणि माझं आयुष्यच बदलून गेलं कुमुद. शाळेत मठ्ठ, , डोक्यात काही न शिरणारी संजू मायक्रोबायॉलॉजिस्ट झाली. आज ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगली नोकरी करते. “ कुमुदला फार आनंद झाला संजूला बघून.

“माझं जाऊ दे कुमुद. तू तर केवढी हुशार, स्टार स्टुडन्ट होतीस शाळेची. मग तुझ्या ध्येयाप्रमाणे झालीस ना डॉक्टर? कुठे असतेस?”

कुमुदने सुस्कारा सोडला. ”छे ग संजू. कुठली आलीय डॉक्टर? नशीबच वाईट ग माझं. माझे वडील नेमके मी बारावीला असतानाच अचानकच गेले. भाऊबंदकीत सगळं होत्याचं नव्हतं झालं.

मग मला मार्क्स पण कमी पडले आणि मी नाईलाजाने बीएस्सीला ऍडमिशन घेतली. नंतरही मी बीएड केलं. माझा सगळा इंटरेस्टच गेला ग शिक्षणातला. आता मी शाळेत मुख्याध्यापक आहे. पण माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. काही का कारणे असेनात पण ते झालं नाही हे खरं संजू. “ कुमुदच्या डोळ्यात पाणी आलं. ” अर्थात मी या नोकरीतही सुखी आहे ग पण मला लायकीपेक्षा सगळं मग कमीच मिळत गेलं. असो. आता त्याची मला खंत नाही ग. आत्ता मी एअरपोर्टवर माझ्या भावाला आणायला आलीय. तो येतोय अमेरिकेहून. कधीकधी वाटतं मला, माझी बुद्धी हुशारी वाया गेली. मी होऊ शकले असते कोणीतरी मोठी. आणि गेलेही असते परदेशात. पण हे घडायचं नव्हतं.

पण संजू, तुझं मात्र मनापासून अभिनंदन करते हं मी. शाळेत वाईट वागलो ग आम्ही तुझ्याशी. पण लहानच होतो ग आपण तेव्हा. कुठे ती गबाळी, सदा दबलेली हडकुळी बिचारीशी संजीवनी आणि कुठे माझ्या समोर उभी असलेली ही आत्मनिर्भर सुंदर स्त्री. संजू, आपल्याला शाळेत शिकवलेली गोष्ट आठवते मला.. ससा आणि कासवाच्या शर्यतीची… आमचे ससे तेव्हा भरधाव धावायचे. तुझं बिचारं गरीब कासव आपलं हळूहळू रखडत यायचं मागून. बिचारसं, गरीब केविलवाणे..

ससे आपल्याच नादात गर्वात धावत असायचे. जेत्याच्या आवेशात. पण मग काळ बदलला आणि शहाण्या कासवाने आयुष्याचे निर्णय मात्र योग्य घेतले आणि ही महत्त्वाची आयुष्याची शर्यत सगळ्या सशांना मागे टाकून जिंकली. शाबास ग सखे. ”

पुन्हा संजूच्या पाठीवर थोपटून कुमुद निघून गेली.

तिला तिचा पत्ता फोनही न विचारता आणि आपलाही न देता.

 – समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन्नदाता (सुग्गी) ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ अन्नदाता (सुग्गी) ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

आज शिरपा लै खुशीत होता. नेहमीपेक्षा जरा लवकरच हातरुन सोडलं. अन खालच्या अंगाला दोन पायऱ्या उतरून आंगणात आला, रांजण भरलेलं हुत, त्यामधलं गार पाणी घेतलं, अन सपासप तोंडावर मारून घेतलं. डोळे तोंड आपल्या धोतराच्या सोग्यांनी पुसत सोप्यात आला. डोक्याला मुंडास गुंडाळून परत पडवीत गेला. त्याला आल्याल बघून गायी म्हसरानी हंबरडा फोडला. तस त्यानी त्यांना वैरण टाकून, शेण मुत घाण काढली. त्याचा वास चवकड दरवळत पसरला हुता. परत त्यांनी कडवळ टाकली.

तस शेवंता बी उठली जरा कारदावून नाराजीच्या सुरात म्हणाली – 

“धनी आज येदुळा का उठलासा ” ? तस शिरपा म्हणाला आज जुंदळा कपायचा हाय. पोटरीतल दान भरल्यात बी अन वाळल्यात बी. बर बर म्हनत शेवंतां चुलीकड गेली,

चूल पेटवली. चहाच भोगान चुलीवर चढवत, साखर पत्ती टाकली. अन परसात जाऊन तंबाखुची मिश्री हातात घेऊन कुडाच्या भिंतीला टेकून दातावर घासत राहिली. तस तिला जरा झिंग बी चढली होतीच. मागच्या वर्षी एवढं राबून म्हणावं तस जुंधळ हाती लागला नव्हता ! आता ह्यावर्षी काय होईल कुणाला दक्कल ! असा इचार चालू असता शिरपान हाळी दिली, वाईच चहा जरा ज्यास्त टाक. तंद्रीत असलेली शेवंता गडबडली ! अन बेगिबेगीन तोंड खलबळत पदरांन त्वांड पुसत आली.

कुडातली असलेलं जळण व गोवऱ्या गोळा केली अन चुली म्होर ठेवून दिली. तेवढ्यात शिरपानी म्हसराम्होर पेंड, पीठ ठेवल कसंडी घेऊन धारा काढायला चालू केल. म्हशीच दोन दोन थान धरून कसंडी मांडीत धरून, दूध पिळत होता. म्हसबी गपगुमान रवंथ करीत डोळे झाकून उभी व्हतीचं. तिला बी लै झ्याक वाटत हुत, कारण तिची भरलेली कास रिकामी हुत व्हती ! कसंडी भरली तस शिरपान एक थान वासरासाठी सोडलं हुत. वासराला सोडताच ते पळत पळत आलं अन ढुसण्या देत थान चोखु लागलं.

अंगणातून शिरपा स्वयंपाक घरात वर आला. त्यानं एका वाटीत दूध घेतलं अन विठ्ठलाच्या चरणी रुजू केलं ! उरल्याल समद दूध बायको कड सुपूर्द केलं.

शेवंतान ताज फेसाळ दूध चहात टाकलं, अन फडक्यांनी गाळून एक लोटा शिरपाला अन एक लोटा आपण घेतला. तस उरलेल्या चाहाकड बघत शेवंता म्हनली – 

“किटलीत घालून देऊ का “? 

तस म्हणत असताच, गल्लीतील चार गडी जे सिरपानी सांगितले व्हते, ते सगळे आंगणात आले ; अन शिरपा अशी हाळी मारली, तस सिरपानी समद्याना चहासाठी वर बोलवलं. समदी जण सोपा माजघर ओलांडून परसात आली.

तस समद्याना चहा देण्यात आला. सगळयांनी चहा घेतल्यावर, गडीमानस सोप्यात आली. बदामाच्या खिश्यात हात घालून चंची उघडली गेली. कोण सुपारीचे खांड तोंडात टाकलं, कोणी हातात तंबाखू धरून चुना लावू लागले. तस गण्यानं आपल्या मुंडास्यात खोवलेली “रायल छाप सिन्नर बिडी अन कडीपेटी काढली. ” 

अन एक बिडी तोंडात धरत, काडी पेटवून आल्हाद बिडी पेटवली. डोळे किलकिले करत, नाकातून अन तोंडातून धूर सोडला. सगळी जण घराबाहेर पडली.

खोताच्या गल्लीतून बाहेर येत, पानंदीच्या बाजूनं शेताचा रस्ता धरला. बाहेर अजून तस अंधार व्हताच. पांनदीच्या दोन्ही अंगाला शेंड वाढलेली, त्यात वेली अडकलेल्या. चांदण टिपूर पडल हुत, आकाशात चांदण्या, त्यात पुरवला शुक्राची चांदणी, विरगळत व्हती. वरल्या आंगन गार वारा झोम्बत हुता. धुक्यात वाट हरवली व्हती. पाणंद सम्पली तस ओढ्याच्या पाण्याचा खळखळाट आवाज आला.

तस उगवतीला तांबडं फुटत हुत, नीरव शांतता हुती, दव दहीवरान वाट ओली झाल्याली मळकटलेली. माघ महिना सरत आल्याला. चिमण्यांची किलबिलाट चालू झाल्याली. हवेत एकप्रकारे येगळाच वास येत हुताच.

समदी जण शिरपाच्या शेतात पोहचली. शेतात खालच्या अंगाला खोप हुती तस कामाची आखणी झाली. चौघेजन दोन दोन वाकुऱ्या धरून सपासप जुंधळा कापाय लागली. पेट्टाला आठ आठ वाकुऱ्या, जुंधळयाची धाट कपित गडी म्होरच्या अंगाला सरत हुत.

सुरव्या हातभार वर आलेला तस सोनकीरणात धाट चकाकत हुतीच. जुंधळा कणसात गच्च बसलेला, टपोरी मोती चमकावेत तस चमकत हुता. एक एकर जुंधला कापून झाल्यावर, समदी घाम्याघुम झाल्याली. दिवस कासराभर वर सरकला, समदी जण आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली. डोक्याची मुंडास सोडून घाम पुसू लागली. तस शिरपा उठला अन हिरीकड जाऊन, मातीच्या मंडक्यातून गार पाणी घेऊन आला. समदीजन गेळ्यातल पाणी मातीच्या मोग्यातून पिऊ लागली. तस गण्यानं बिडी शिलगावली, तेच पाहून इतरांनी चंची सोडली.

तंबाखुचा बार ओठात धरला 

” शिरपाला म्हणाली मळणी च कस करणार ” अस म्हणताच शिरपा – “हणम्याची बैल सांगून ठेवलीत की, ” अन तुम्हीबी हैसाच की. तस गण्या धूर सोडत म्हणाला हे लै बाकी झ्याक झालं बघ.

व्हय माझ्याकडन हे काय समद व्हतय्या व्हय, तुम्ही हैस म्हणून चाललंय. तस समदी जण उठली, उरलेला दुसऱ्या एकरातील जुंधळा सपासप कापून काढला असलं नसलं, तस शेवंता डोईवर दुपारची शिदोरी घेऊन आली.

समदी जण परत, आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली. प्रत्येकांनी तोंडावरून पाणी फिरवलं, तस भुकेच डोंब कावळे वरडू लागल हुत. शेवंतांनी दोन दोन भाकऱ्यावर हिरव्या मिरच्यांचा खर्डा, एक कांदा, त्यावरच आंबड्याची भाजी ठेवून चौघांना वाटली.

समद्यांची जेवण झाल्यावर, नागलीची आंबील पण पेल्यातून दिली. सगळ्यांनी तृप्त मनाने ढेकर दिली, तस

समदी परत उठली अन कणसांच्या कापणीला लागली दोघ कणसं कपित हुत, तर दोघेजण कडबा बांधीत हुत. अस करता करता समद कणसांची खुडणी झाली. कडब्याच्या पेंढ्या रानंतच सुकण्यासाठी टाकून दिल्या. कणसं मात्र गोळा करून खोपित टाकली, तस खोप भरून गेली. त्यावर परत पेंढ्या टाकून, कणसं झाकण्यात आली. सांज होत आल्याली

समदी जण परत, घराकडे फिरली. गण्या म्हणाला रातच्याला कुणीतरी इथं झोपाय हुव ! नाहीतर चोर चिलटाची भीती हाईच ! तस शिरपा म्हणाला तू आणी मी परत येऊच की वस्तीला तस गण्या एका पायावर तयार झाला. चाललं की.

कारण बी तसच हुत गाण्याला माग पुढं कोण नव्हतंच एकटा जीव सदाशिव व्हता ! त्यानं लगीन च करून घेतलेलं नव्हतं ! ब्रह्मचारी बिचारा, त्याला पगार अन दोन वेळच जेवण मिळणार व्हतंच !

दुसऱ्या दिवशी हणम्या बैलजोडी सकट हजर झाला. त्यानं खळ्याची तयारी केली. गोल रिंगण तयार करून, त्यावर पाणी मारू लागला. पाणी सुकल्यावर, त्यावर पाचट टाकून बैल, गोल भल्या मोठ्या दगडी लाल गुंडाला (कुरण )जोडली. अन रिंगण मारू लागला, नंतर काही जुंधल्याची कणसं टाकून रोळगुंड फिरवला. तस तस गोल रिंगणाला रुपेरी झालर आली. तसच रिंगण जरा सुकविण्यासाठी रातभर सोडून दिलं. इकडे शेवंता पण रोज दुरडीतून भाकर भाजी आणून देऊ लागली.

समदीकडच अश्या मळण्या सुग्गी चालू झालेल्या हुतीच. तस बारा बलुतेदारी आपल्या वार्षिक बैत्यासाठी फिरू लागली. निंगअप्पा बेरड रामोश्यान तर शिरपाकडे मुक्कामच ठोकला. त्याची पण त्यात वाटणी हुतीच. त्यो वरीसभर शेताची देखरेख करत हुता. खुद्द बेरडाची नजर हुती ! त्यामुळं चोरा चिलटांची भीती नव्हतीच ! त्यात त्यो शिरपाचा दोस्त ! बाल मैतर.

बघता बघता मळणी झाली, वाऱ्यावर रास सुरू झाली. वाऱ्याने दान व धुस येगळी होत, मोत्याच स्वच्छ दाण 

रिंगणात पडू लागल. खाली बसलेल्या गण्यानं एक हातात बिडी अन एका हातात तुरीच्या खरट्यांन जुंधळ्यातील गोंड बाजूला केले. रास रिंगणात तयार झाली तस एकेक बलुतेदार आपआपला वाटा नेण्यासाठी येऊ लागले. सुतार, लोहार महार, कुंभार, अशी मांदियाळी येऊन गेल्यावर, मग गावच्या देवीचे पुजारी,

अस प्रत्येकाला त्यांच्या मानाप्रमाणे दोन चार सूप मोत्याचे दाणे दिले गेले. शेवटी किराणा दुकानाचा वाणी आला, वाण सामानाचा हिशोब करून त्यानं पण तब्बल दोन पोती दान नेलं !

उरल्याल दान त्यांनी रास करणाऱ्या गड्यांन दिल. तस त्याचा दोस्त निंगअप्पा बेरडास पण अर्धा पोत जुंधळ दिल तस, शिरपाचे अवसान गळून पडल ! त्यानं खळ्यातच बसकण मारली व धोतराचा सोगा डोळ्यांना लावला व ढसाढसा रडू लागला. मुंडास गळून पडलं !

खळ्यात फकस्त अर्धा पोत धान्य शिल्लक राहिले हुते ! त्याच्या म्होर पुढल एक वरीस कस ढकलायचा हा प्रश्न आ वासून उभा हुता. लक्ष्मी हाय म्हणून त्याने सगळं धान्य गोळा केलं अन घरचा रस्ता धरला ! 

घरी आल्यावर, शेवंतान तर रास बघून आवंढा गिळला ! धन्याला वाईट वाटू नये म्हणून म्हणाली ” लक्ष्मी घरी आली ” बेस झालं. हे बी दिस जातीलच की ! शेवंतान शिरपास अन निंगअप्पा बेरडास चहा करून दिला.

चहा त्यानं कसाबसा पिला ! अन दोघबी न बोलता न खतापिता झोपी गेले ! दोघांच्याबी मनात एकच प्रश्न आयुष्य कस काढायचं ! हे वरीस कस घालवायच ! 

गडबडीत त्यानं दारला कडी पण लावली नव्हती ! राती बाराच्या म्होर निंगअप्पा हळूच शिरपाचा घरी आला. बघतो तर काय दरवाजा अर्धवट उघडा हुता ! त्यानं हळूच दरवाजा उघडला. अन आंगणात असलेल्या, उंच धुणे बडवायच्या कट्ट्यावर, त्यांनी आणलेल् जुंधळ्याच आख्क एक पोत अब्दार ठेवून दिल !

अन गुपचूप आपल्या घरी निघून गेला ! 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उधारी… भाग-३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ उधारी… भाग- ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(त्याच्याभोवती बसलेलं त्याचं कुटुंब सुबोधला पहाताच उठून उभे राहिले.शामरावच्या वडिलांनी हात जोडले तर धाकटा भाऊ पाया पडायला लागला.सुबोधने त्याला उठवलं तर तो रडायला लागला.) — इथून पुढे —

” डाॅक्टर साहेब तुमचे खुप उपकार आहेत.तुमच्यामुळे माझा भाऊ आज आम्हांला डोळ्यासमोर दिसतोय”

” अरे बाबा मी निमित्त आहे.त्या देवानेच हे घडवून आणलं “

“दादा तुमीच आमचे देव” शामरावचे वडील म्हणाले.त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते ” दादा दादा समद्या नातेवाईकाकडे भीक मागत फिरलो.एकानेबी एक रुपया काढून देला न्हाई.आणि तुमी ना आमच्या जातीचे ना पातीचे,ना नात्यातले ना गोत्यातले.आम्हांले ओळखतबी न्हाई तरी तुम्ही दिड लाख काढून दिले.मंग सांगा तुमी देव नाही तर काय आमचे.सुनबाई पाया पड या दादांच्या.त्यांच्यामुळे तुह्यं कुकू साबुत हाये”

शामरावाची बायको पाया पडायला लागली तसा सुबोध एकदम बाजुला होत म्हणाला “अहो नको नको.शामरावांची काळजी घ्या.नवीन जन्म मिळालाय त्यांना”

“डाॅक्टरसाहेब तुमचे पैसे व्याजासहीत आम्ही लवकरच परत करु “शामरावचा भाऊ म्हणाला

“अरे व्याज कमावण्यासाठी थोडीच मी तुम्हांला पैसे दिले.आणि मला काही घाई नाही. तुमच्या फुरसतीने पैसे परत करा.शामरावांना चांगलं ठणठणीत बरं होऊ द्या मग परत करा.ओके?बरं मी निघू?काळजी घ्या” 

त्या सर्वांना नमस्कार करुन सुबोध बाहेर पडला.मगाशी ” पैसे परत केले नाही तरी हरकत नाही” हे ओठावर आलेलं वाक्य बोलू दिलं नाही याबद्दल त्याने देवाचे आभार मानले.

सहा सात महिने झाले तरी शामरावच्या भावाचा फोन आला नाही तेव्हा सुबोधच्या लक्षात आलं की ही उधारीही आपली बुडाली आहे.त्याच्याकडे शामरावच्या भावाचा फोन नंबर होता पण का कुणास ठाऊक त्याला फोन लावून पैसे मागायला त्याचं मन धजावेना.शामराव शेतकरी होता.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या तो वर्तमानपत्रात वाचत होताच.आपण पैशासाठी तगादा लावावा आणि शामरावाने त्या काळजीपोटी आत्महत्या केली तर?त्या विचाराने तो शहारायचा.’जाऊ दे.देतील तेव्हा देतील.नाही दिले तर नेहमीप्रमाणे बुडाले असं समजून घेऊ’ या विचाराने तो चुप बसला.

एक दिवस तो सकाळी क्लिनीकमध्ये येऊन बसला.नेहमीप्रमाणेच पेशंटनी दवाखाना तुडूंब भरला होता.देवाच्या फोटोची पुजा करुन पहिल्या पेशंटला तो आत बोलावणार तेवढ्यात रिसेप्शनिस्ट दरवाजा ढकलून आत आली.

” सर ते सोयगांव बुद्रुकची माणसं आलीहेत.तुम्हांला फक्त भेटायचं म्हणताहेत”

“सोयगांव बुद्रूक?”त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडेना

” काय नाव त्यांचं?”

” शामराव पाटील “

एकदम त्याच्या लक्षात आलं

“ओके ओके पाठव त्यांना”

शामराव आणि त्याचे वडील आत आले

” नमस्कार डाॅक्टर साहेब”शामराव हात जोडून म्हणाला

” या या नमस्कार. अरे वा ठणठणीत बरे झालेले दिसताय”

” साहेब सगळी तुमची कृपा आहे “सुबोधचे हात हातात घेत शामराव म्हणाला.सुबोध हसला.न बोलता त्याने देवाचे फोटोकडे हात केला आणि हात जोडले

“कर्ता करविता तो आहे” त्याने असं म्हंटल्यावर त्या दोघांनीही देवाला हात जोडले

” बोला.सगळं ठिक आहे ना?”

“दादा तुमचे पैसे द्यायला आलतो” म्हातारा म्हणाला आणि त्याने शामरावाला इशारा केला.तसं शामरावाने खिशातून पैसे काढून टेबलवर ठेवले.सुबोध डोळे विस्फारुन त्या पैशांकडे बघत राहिला.आजपर्यंत त्याने अनेक जणांना त्यांच्या संकटसमयी पैशाची मदत केली होती.पण कुणीही त्याला अनेक वेळा मागुनही इमानदारीने पैसे आणून दिले नव्हते.किंबहूना परतच केले नव्हते.काम झालं की लोक उपकार विसरतात हेच तो आजपर्यंत पहात आला होता.” याला म्हणतात उपकाराची खरी जाण” त्या पैशांकडे बघत त्याच्या मनात विचारलं.

” मोजून घ्या डाॅक्टरसाहेब.पुर्ण दिड लाख आहेत.”

” राहू द्या.तुमच्यावर विश्वास आहे माझा.खुप खुप धन्यवाद” असं म्हणत सुबोधने ते पैसे ड्राॅवरमध्ये टाकले.

“चला येऊ दादा?”म्हातारा हात जोडत म्हणाला

“अहो थांबा.चहा घेऊन जा”

सुबोधने रिसेप्शनिस्टला बोलावून तीन चहा पाठवायला सांगितलं.

” काय म्हणतं यंदाच पीक पाणी?चांगलं उत्पादन झालेलं दिसतंय”

सुबोधने असं म्हणताच दोघांचे चेहरे काळवंडले.

” साहेब शेतकऱ्याचं नशीब इतकं कुठं चांगलं आहे?तीन वर्षात झालं नाही असं जोरदार पीक यंदा झालं होतं.पण कापणीला आलेलं सगळं पीक अवकाळी पावसानं खराब करुन टाकलं”

शामराव म्हणाला.सुबोधने पाहीलं म्हातारा उपरण्याने भरुन आलेले डोळे पुसत होता

“अरे बापरे!बरोबर. पंधरा दिवसापूर्वी तीन चार दिवस पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.आता हे काय पावसाचे दिवस आहेत?” 

मग अचानक काहीतरी सुचून त्याने विचारलं “हंगाम पुर्ण वाया गेला म्हणताय मग हे पैसे कुठून आणलेत?सावकाराकडून?”

दोघा बापलेकांनी एकमेकांकडे पाहिलं.काहीतरी नजरांनी इशारे केले.

” नाही साहेब.तुम्ही …तुम्ही काही बोलू नका.मी काही सांगणार नाही”

शामराव गडबडीने म्हणाला

“अहो सांगा ना!मी तुमच्या घरचाच आहे असं समजा.सांगा,सांगा”

शामराव चुप बसला.पण म्हातारा बोलू लागला.

” दादा नातीच्या लग्नासाठी पैपै करुन साठवले होते पैसे.शाम्याचा ॲक्सीडंट झाला.लई पैसे त्यात खर्च झाले.आधीच बँकेचं कर्ज.सावकारही समोर उभा करेना.शेतीचा तुकडा विकला तवा दवाखान्याचे पैसे भरता आले.पण काई घोर नव्हता.पीक पाणी उत्तम होतं.त्याचा पैसा आला की नातीचं लग्न उरकवून टाकू असं ठरवलं होतं.पण पावसाने समदं शेत उजाडून टाकलं.तुमचे पैसे तर द्यायचे होते.म्या म्हनलं नातीचं लग्न पुढे ढकलू पण डाॅक्टर साहेबांचे पैसे द्यावेच लागतीन…”

सुबोधला धक्का बसला.त्याचे वडिलही शेतकरीच होते.त्यांचे शेतीसाठी झालेले हाल त्याला आठवले.

” मग आता कधी होईल तिचं लग्न?आणि त्यासाठी कुठून आणणार पैसे?”

दोघा बापलेकांनी परत एकदा एकमेकांकडे पाहिलं.मग शामराव म्हणाला

“बघू साहेब.पुढच्या वर्षी करु तिचं लग्न”

” मुलाकडचे तयार आहेत का?”

” नाही तयार झाले तर सोडून देऊ हे स्थळ.दुसरा मुलगा पाहू” शामराव हे म्हंटला खरा पण त्याचे भरुन आलेले डोळे सुबोधच्या नजरेतून सुटले नाहीत.त्याने क्षणभर विचार केला आणि ड्राॅवरमधून दिड लाख काढून शामरावसमोर ठेवले

” हे घ्या शामराव.मुलीचं लग्न पुढे ढकलू नका”

दोघंही एकदम गडबडले.शामराव उठून उभा राहीला.त्याने ते पैसे उचलून सुबोधच्या हातात कोंबले

” नाही साहेब.याकरीताच मी तुम्हांला काही सांगत नव्हतो.पण आमच्या बाबांना काही रहावलं गेलं नाही. हे पैसे तुम्हांला घ्यावेच लागतील.शपथ आहे तुम्हांला.आणि आम्ही आता निघतो”

दोघंही जायला लागले तसं सुबोधने शामरावचा हात धरुन त्याला खाली बसवलं

” शामराव ऐका माझं.तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी.माझ्या मुलीचं लग्न असं लांबणीवर टाकलेलं मला आवडणार नाही. हे पैसे ठेवा.मला पुढच्या वर्षी द्या.दोन वर्षांनी द्या.मी कुठे आताच मागतोय पैसे”

” नाही दादा.शेतीचा काय भरंवसा.दोनतीन वर्ष तुमचे पैसे देणं जमलं नाही तर आमाले घास गिळवणार नाही.तुम्हाले हे पैसे ठेवणंच पडीन”म्हातारा म्हणाला

” ठिक आहे.नका देऊ मला पैसे” सुबोध एकदम बोलून गेला “मला गरज नाही या पैशाची.देवकृपेने माझ्याकडे भरपूर आहे.”

दोघा बापलेकांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.मग दोघांचे चेहरे नाराजीने भरुन गेले.

” डाॅक्टर साहेब तुम्ही मला जीवन दिलं.तुमच्याकडूनच पैसे घ्यायचं पाप मी कसं करु?”

” शामराव हे पैसे मी तुम्हांला देतच नाहिये.माझ्या मुलीला देतोय “त्याच्या हातात पैसे कोंबत सुबोध म्हणाला.हातातले पैसे शामराव बघत राहिला आणि मग एकदम बांध फुटल्यासारखा ढसाढसा रडू लागला.सुबोध खुर्चीतून उठून पुढे आला.शामरावला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर थोपटत राहिला.

चहा आला.तो पिऊन दोघांनी

त्याला नमस्कार केला आणि निघाले

” साहेब मुलीच्या लग्नाला या बरं.मी लवकरच पत्रिका घेऊन येतो.आणि तुम्ही आशिर्वाद दिल्याशिवाय मी तिला सासरी पाठवणार नाही. तेव्हा जरुर जरुर या “

दोघं गेले.सुबोध परत आपल्या खुर्चीत बसून विचार करु लागला.ज्योतिषी म्हंटला होता ते परत एकदा खरं ठरलं होतं.त्याची उधारी परत एकदा बुडीत खात्यात गेली होती.पण यावेळी ती बुडायला तो स्वतःच जबाबदार होता.पण गंमत अशी होती की यावेळी त्याची त्याला ना खंत होती ना राग.उलट समाधानाने त्याचं मन भरुन आलं होतं.

— समाप्त —

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उधारी… भाग-२ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ उधारी… भाग- २ ☆ श्री दीपक तांबोळी

(एक्सरेतून कमरेचं, खांद्याचं, उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती..) इथून पुढे –

शेखर दिलेल्या शब्दाला जागला. त्याने खरोखरच सगळी तयारी करुन ठेवली होती. त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला ऑपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला. रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या. सुदैवाने ब्लड बँंकेत ओ पाॅझिटिव्हचा भरपूर साठा होता. एक्सरेतून कमरेचं, खांद्याचं, उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती.

तातडीने हालचाल केल्यामुळे पेशंट धोक्याबाहेर असल्याचं थोड्यावेळाने सुबोधला शेखरने सांगितलं तेव्हा सुबोधला एकदम हायसं वाटलं. त्याने बाहेर येऊन म्हाताऱ्याला सांगितलं तेव्हा म्हातारा त्याच्या पाया पडू लागला. सुबोधने लगेच त्याचे हात धरले.

” देवाचे आभार माना काका, त्यानेच तुमच्या मुलाला वाचवलं. बरं घरी कळवलं की नाही?”

” दादा पोराकडेच मोबाईल व्हता तोबी तुटी गेला. कसं कळवू?”

“अरे बापरे!मग आता?”

म्हाताऱ्याने खिशातून एक छोटी मळकट डायरी काढली. त्याच्यातून छोटू या नावाचा नंबर त्याने सुबोधला दाखवला.

” याले फोन करा”

“हे कोण?”

“धाकला पोरगा हाये”

“ओके” सुबोधने स्वतःच्या मोबाईलवरुन तो फोन डायल केला. अपघाताची तीव्रता त्याने सौम्य भाषेत सांगितली. ‘काळजी करु नका’ असं तीनतीनवेळा सांगितलं.

” दादा किती दिवस लागतीन आणि किती पैसे लागतीन हो?”

म्हाताऱ्याने विचारलं. त्याच्या प्रश्नातल्या काळजीने सुबोधचं काळीज हललं. म्हाताऱ्याची काळजी खरंच समजण्यासारखी होती. आजकाल डाॅक्टरकडे पेशंटला ॲडमिट करणं म्हणजे कसायाच्या हातात बकरी सोपवण्यासारखं होतं. आपण डाॅक्टर असल्यामुळे शेखरने अजून पैशाची मागणी केलेली नाही नाहीतर रक्ताची बाटली लावण्यापुर्वीच शेखरने पन्नाससाठ हजार जमा करायला लावले असते हे काय तो जाणत नव्हता?

“काका डाॅक्टरांनी अजून तरी काही सांगितलं नाहिये पण महिनाभर तरी तुमच्या मुलाला इथं रहावं लागेल हे नक्की. पैशाचं मी विचारुन सांगतो. डाॅक्टरसाहेब माझे मित्र आहेत. तुमच्या घरची मंडळी येईस्तोवर तुम्हांला कुणी पैसे मागणार नाहीत. पण घरच्यांना पन्नाससाठ हजार तरी आणायला सांगा”

म्हाताऱ्याचा चेहरा काळवंडला. त्याने सुबोधला परत फोन लावायला सांगितला. मग तो बाहेर जाऊन आपल्या मुलाशी बोलत बसला. सुबोधचं एकदम आपल्या बायकोकडे लक्ष गेलं. ती रागाने त्याच्याचकडे पहात होती.

” अजून संपलंच नाही का?अहो संध्याकाळ झालीये. पोरं आपली वाट पहाताहेत. झालं ना?. पार पाडलं ना तुम्ही तुमचं कर्तव्य? आता तरी चला” ती वैतागून म्हणाली. तिचंही म्हणणं योग्यच होतं. ती स्वतः फिजीओथेरपिस्ट होती. सुबोध इतकी तिची प्रॅक्टिस नसली तरी तिलाही फुरसत रविवारीच मिळायची.

” साॅरी साॅरी. बस एकच मिनिट हं शमा. शेखरला मी सांगून येतो”

तो आत गेला. शेखरकडून अपडेट्स घेऊन आणि गरज भासल्यास बोलवायचं सांगून तो बाहेर आला. म्हाताऱ्याला आपलं कार्ड देऊन म्हणाला” काका मला आता अर्जंटली घरी जायचंय. हे माझं कार्ड असू द्या. काही गरज लागली तर मला फोन करा. तुमची मंडळी येतीलच थोड्या वेळात”

म्हाताऱ्याने हात जोडले. सुबोध बायकोला घेऊन निघाला.

“गाडी बघितली का?मागचं सीट आणि दारं रक्ताने भरलीत. तुम्हालाच काहो इतकी उठाठेव असते?जणू माणुसकी फक्त तुमच्यातच उरलीये”

ती नाराजीच्या सुरात म्हणाली. तो फक्त हसला. तिच्याशी वाद घालायची त्याची इच्छा नव्हती

” आणि काहो या शेखरलाच तुम्ही पाच लाख दिले होते ना?दिले का त्याने ते परत?”

” दोन लाख दिलेत. तीन बाकी आहेत. देईल लवकरच बाकीचे ”

” आता तुमचं येणं होईलच. मागून घ्या सगळे. काय बाई लोक असतात. सात आठ वर्षांपूर्वी घेतलेले पैसे अजून परत करत नाही माणूस”

‘तुझ्या भावानेही तर सात लाख नेलेत. एक रुपया तरी परत केला का?’असं विचारायचं त्याच्या अगदी ओठावर आलं होतं पण तो चुप बसला. शेवटी भाऊ आणि मित्रात फरक असतोच ना?

या घटनेनंतर सुबोध परत आपल्या दवाखान्यात व्यस्त होऊन गेला. दहाबारा दिवसांनी त्याला शेखरचा फोन आला

” सुबोध तू आणलेला तो ॲक्सीडंट झालेला पेशंट, शामराव पाटील, अरे त्याचं ऑपरेशन करायचंय पण त्याचे नातेवाईक पैसे संपले असं म्हणताहेत. काय करु?”

” त्यांनी काहीच पैसे दिले नाहीत का?”

“एक लाख दिलेत पण एक लाखात काय होतंय?तीन ऑपरेशन्स होती त्याची त्यातलं कमरेच्या हाडाचं केलं मी. हाताचं आणि पायाचं बाकी आहे. मेडिकल इंश्युरंसदेखील नाहीये त्यांचा”

एक क्षण सुबोधला वाटलं, झटकून टाकावी जबाबदारी. माणुसकीखातर आपण त्या माणसाला दवाखान्यात पोहचवलं. पैशाचं मॅटर शेखरने पहावं, आपला काय संबंध?’नसेल देत पैसे तर हाकलून दे दवाखान्याबाहेर’ असं त्याला सांगावं. पण तो असं करु शकणार नव्हता. नव्हे त्याचा तो स्वभावच नव्हता म्हणूनच तर लोकं त्याला आजपर्यंत फसवत आले होते.

” साधारण किती पैसे लागतील शेखर पुर्ण ट्रिटमेंट, रुमचं भाडं, मेडिसीन्स वगैरेला?”

“अडिच लाखाच्या आसपास”

“ठिक आहे तू कर ऑपरेशन. बाकीच्या दिड लाखाचं काय करायचं ते बघतो मी ” तो मनाविरुद्ध बोलून गेला. मग त्याने रिसेप्शनिस्टला बोलावून सांगितलं

” ज्या ज्या पेशंटकडे पैसे बाकी असतील त्यांना फोन कर आणि बाकी लवकरात लवकर पे करायला सांग”

रात्री तो दवाखाना बंद करुन घरी गेला. ज्या ज्या लोकांना त्यानं पैसे उधार दिले होते त्यांची लिस्ट केली. मग बायकोच्या नातेवाईकांना सोडून सगळ्यांना फोन लावायला सुरुवात केली. मृत्युच्या दाढेत असलेल्या एका मित्राच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं सांगून ताबडतोब पैसे देण्याची विनंती केली. पण कुणालाच त्याच्या मित्राच्या जीवाशी देणंघेणं नव्हतं. सगळेच पैसे न देण्याचे बहाणे सांगत होते. त्याच्याच पैशासाठी त्याला भीक मागावी लागत होती आणि घेणारे त्याला खेळवत होते. थकून त्याने फोन ठेवला. ज्या लोकांना दुसऱ्याच्या प्राणांचीही पर्वा नाही त्यांच्या अनावश्यक गरजांसाठी आपण उसने पैसे द्यावेत याचा त्याला भयंकर संताप आला. स्वतःला शिव्या देतच तो झोपायला गेला.

दुसऱ्या दिवशी परत शेखरचा फोन आला. त्याला काय उत्तर द्यावं या विचारात असतांनाच त्याला एक कल्पना सुचली. फोन उचलून तो म्हणाला

“शेखर असं कर ना, तुझ्याकडे माझे तीन लाख बाकी आहेत. त्यातले दिड लाख तू वापरुन घे. दिड लाख तू मला पुढच्या वर्षी दिले तरी चालतील”

पलीकडे एकदम शांतता पसरली. मग क्षणभराने शेखर म्हणाला

” ते पैसे नंतर दिले असते मी सुबोध. तुला तर माहितच आहे माझ्या आसपास बरेच ॲक्सीडंट हाॅस्पिटल्स आहेत त्यामुळे माझी कमाई काही तुझ्याइतकी नाही आणि ओळखपाळख नसलेल्या लोकांसाठी तू तरी का स्वतःचे पैसे वाया घालवतोय?करतील ते त्यांचं कसंही. तुला वाटतं का ते तुला पैसे परत करतील म्हणून?”

” मग तू मला फोनच का केला?हाकलून द्यायचं असतं त्यांना. झक मारुन आणले असते त्यांनी पैसे”

सुबोध चिडून म्हंटला तशी शेखरची बोलती बंद झाली. मग सुबोधच नरमाईच्या सुरात म्हणाला

” हे बघ शेखर सात आठ वर्ष झालीत तुला पैसे देऊन. मी कधी तुला बोललो?कधी तुला पैसे मागितले?आताही मी तुला तीन लाख मागत नाहीये. शामरावसाठी जे वरचे दिड लाख अजून लागताहेत तेच फक्त मी तुला मागतोय”

शेखरने लवकर उत्तर दिलं नाही. मग म्हणाला

“ठिक आहे करतो मी ॲडजस्ट. पण मला दोन वर्षतरी पैसे मागू नकोस”

“ओके. डन. आणि तुला सांगू का शेखर, मला हा परोपकाराचा आणि मदतीचा किडा चावलाय म्हणून मी उठसुठ कुणालाही मदत करत असतो. काय करु स्वभावच आहे माझा. कुणाचं दुःख पहावल्या जात नाही माझ्याकडून. नाही तर तुला एका फटक्यात पाच लाख कशाला काढून दिले असते मी?”

ही मात्रा बरोबर लागू होणार होती. शेखर शब्दही काढू शकला नाही.

एक महिन्यानंतर सुबोधला शेखरचा फोन आला. शामराव पाटीलला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. शामराव आणि त्याच्या कुटूंबाची सुबोधची भेट घेण्याची इच्छा होती. ‘त्यांना तुझ्या घरी पाठवू की क्लिनिकमध्ये’असं विचारत होता. सुबोधने त्याला तो स्वतः शेखरच्या हाॅस्पिटलमध्ये येत असल्याचं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच सुबोध शेखरच्या हाॅस्पिटलमध्ये पोहचला. शामरावच्या हाताला आणि पायाला अजूनही प्लास्टर होतं. त्याच्याभोवती बसलेलं त्याचं कुटुंब सुबोधला पहाताच उठून उभे राहिले. शामरावच्या वडिलांनी हात जोडले तर धाकटा भाऊ पाया पडायला लागला. सुबोधने त्याला उठवलं तर तो रडायला लागला.

— क्रमशः भाग दुसरा  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उधारी… भाग-१ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ उधारी… भाग- १ ☆ श्री दीपक तांबोळी

 एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं.त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतांनाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली.

” सर ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना,ते म्हणताहेत की आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत.बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत”

सुबोधला याच गोष्टीची चिड होती.कपड्यांवरुन तर पेशंट चांगला सधन दिसत होता.शिवाय तो नेहमी कारने येतो हेही त्यानं पाहिलं होतं.बरं त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती.तरी सुध्दा त्यांनी पैसे आणू नयेत याचा त्याला संताप आला.प्राॅब्लेम हा होता की तिथं जमलेल्या पेशंटच्या गर्दीसमोर असं त्यांना संतापून बोलणंही त्याच्याबद्दल पेशंटच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला छेद देणारं होतं.त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं.

“ठिक आहे.त्यांचा मोबाईल नंबर लिहून घे आणि त्यांना सांग पुढच्या आठवड्यात नक्की आणून द्या”

रिसेप्शनिस्ट गेली.तो आपल्या कामाला लागला पण मनातली ती खदखद काही कमी होईना.

खरं पहाता तो शहरातला सगळ्यात यशस्वी दंतवैद्य होता.गरीबीची जाण असल्यामुळे त्याने आपली फी माफक ठेवली होती.कामात तर तो निष्णात होताच.वर मिठास बोलणं.त्यामुळे तो सर्वांना डाॅक्टरपेक्षा आपला मित्रच वाटायचा.अर्थातच त्याचा दवाखाना कायम पेशंटने तुडूंब भरलेला असायचा.सकाळी नऊ पासून ते रात्री दहापर्यंत त्याचं काम चालायचं.महिन्याला दहा लाखाच्या आसपास त्याची कमाई होती.लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर हीच कमाई अकरा बारा लाखापर्यंत गेली असती.

दुपारी दोन वाजता त्याने काम थांबवलं.त्याला आणि स्टाफलाही भुक लागली होती.पंधरा मिनिटात त्याने जेवण संपवलं कारण बाहेर पेशंट ताटकळत बसले होते.बेसिनमध्ये हात धुत असतांनाच मोबाईल वाजला.हात कोरडे करुन त्याने तो घेतला.

“हॅलो सुबोध मी चंदन बोलतोय.फ्री आहेस ना? जरा बोलायचं होतं”पलीकडून आवाज आला

” आताच जेवून हात पुसतोय बघ.बोल काय म्हणतोस?”

” अरे जरा घराचं काम सुरु केलंय.दोनतीन लाखाची मदत केलीस तर बरं होईल”

” चंदन यार,मी तुझ्या पाया पडतो.तू दुसरं काहीही माग.माझ्या घरी सहकुटुंब रहायला ये.खाणंपिणं सगळं मी करीन.पण प्लीज यार मला पैसे मागू नकोस.तुला सांगतो ज्यांनीज्यांनी माझ्याकडून उधार पैसे नेलेत त्यांनी ते मला कधीच परत केले नाहीत.तीसचाळीस लाख माझे लोकांकडे अडकलेत.पैसे द्यायचं कुणी नावच काढत नाही “सुबोध उसळून म्हणाला

“अरे पण मी तुझा मित्र आहे.तुझे पैसे बुडवेन असं तुला वाटलंच कसं?”

” मित्र?अरे बाबा मित्र तर मित्र माझे भाऊ,बहिणी,मेव्हणे,काका,मामा ,सासरे सगळ्यांना पैसे देऊन बसलोय.एक रुपयाही  मला परत मिळालेला नाही. मिळालं ते फक्त टेंशन,मनस्ताप आणि शिव्या.पैसे मागितले तर म्हणतात ‘ तुम्हांला काय कमी आहे ,पैसा धो धो वाहतोय.पैसे देणारच आहोत ,बुडवणार थोडीच आहे! ‘. तुला जर वाटत असेल की आपली मैत्री कायम रहावी तर प्लीज मला पैसे मागू नकोस.हा पैसा सगळे संबंध खराब करतो बघ”

समोरुन फोन कट झाला. तो रागानेच कट केला असणार हे त्याच्या लक्षात आलं.त्याने परत आपलं काम सुरु केलं पण त्याच्या मनातून तो विषय जाईना.

उधारीचे पैसे परत का मिळत नाही हे विचारायला मागे तो एका ज्योतिष्याकडे गेला होता.ज्योतिषाने त्यांची कुंडली पहाताच त्याला सांगितलं

” दुसरं काही सांगण्याच्या आत एक गोष्ट सांगतो.तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका.उधारीचे पैसे तुम्हांला कधीही परत मिळणार नाहीत. तुमचे भाऊबहिण, साले,मेव्हणे,जवळचे नातेवाईक,मित्र सगळेच तुमचे पैसे बुडवतील.तसंच कुणालाही जामीन राहू नका त्यातही तुम्हीच फसाल.तुमच्या कुंडलीतले योगच तसे आहेत”

” याला काही उपाय?”त्याने विचारलं होतं.ज्योतिषाने नकारार्थी मान हलवली.

“उपायापेक्षा बचाव केव्हाही चांगला.कोणी कितीही कळकळीने पैसे मागितले तरी द्यायचे नाहीत.संबंध खराब झाले तरी चालतील कारण पैसे देऊनही संबंध खराबच होणार आहेत.किंवा मग पैसे द्यायचे आणि ते दिले आहेत हेच विसरुन जायचं म्हणजे टेंशनचं कामच नाही.तुमच्या नशिबात पैसा भरपूर आहे.तेव्हा पैसा बुडाल्यामुळे तुम्हांला फारसं जाणवणार नाही.”

ही गोष्ट खरी होती.त्याच्याकडे पैसा येतांना दिसत होता म्हणून तर लोक मागत होते आणि तो बुडवल्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही म्हणून निर्लज्जपणे बुडवत होते.तेव्हापासून त्याने पैसे उधार देणं बंद केलं होतं.पण दवाखान्यातली उधारी त्याला काही बंद करता आली नाही.

रविवार उजाडला.खरं तर रविवारीही त्याचा दवाखाना बंद नसायचा.असिस्टंट डाॅक्टर्स काम करत असायचे.सुबोधही एखाद दुसरी चक्कर टाकायचा.आज मात्र त्याला साठ किलोमीटरवरच्या एका खेड्यातल्या लग्नाला जायचं होतं म्हणून तो दवाखान्यात जाणार नव्हता.खेड्यातली लग्नं विशेष म्हणजे त्यातलं जमीनीवर बसून केलेलं जेवण त्याला फार आवडायचं.लहानपणीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या व्हायच्या.देशविदेशात अनेक महागड्या हाॅटेल्समध्ये तो जेवला होता पण या गावातल्या जेवणातली तृप्ती त्याला कधीही तिथं मिळाली नव्हती.

लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून तो आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला.त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी.अंतरावर असतांना त्याला दुरुनच एक माणूस येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी हात देतांना दिसला.पण वाहनं न थांबता त्याला वळसा घालून जात होती.जसा सुबोध त्याच्याजवळ आला त्याला दिसलं की रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे.सुबोधला रहावलं नाही त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली.

“काय झालं?” खिडकीची काच खाली करुन त्याने विचारलं

” दादा ॲक्सीडंट झालाय.पोराला दवाखान्यात न्यावं लागीन “

वयाची सत्तरी उलटलेला तो म्हातारा सांगू लागला

“एक मिनीट थांबा” त्याने गाडी साईडला घेतली

“अहो कशाला या भानगडीत पडता.आठवड्यातून एक  रविवार मिळतो तर घरी चलून आराम करा ना” बायको त्राग्याने म्हणाली.

तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो खाली उतरला आणि म्हाताऱ्याकडे गेला.

“कसं आणि केव्हा झालं हे?”

“दादा म्या आणि पोरगा गावाकडे जात होतो.ट्रकवाल्याने मागून धडक मारली आणि पळून गेला.म्या झाडीत फेकल्या गेलो म्हुन मले काही झालं नाई पण पोराच्या अंगावरुन ट्रक गेला” म्हातारा आता रडू लागला.सुबोधने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली.बापरे!प्रकरण गंभीर दिसत होतं.तो पटकन खाली वाकला.आणि त्याची नाडी तपासली.नाडी सुरु होती.पटकन ॲक्शन घेतली तर वाचूही शकला असता.त्याने उठून म्हाताऱ्याकडे पाहिलं.तो हात जोडून उभा होता.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

“दादा अर्ध्या तासापासून गाड्यांना हात देऊ लागलो.कुणीबी थांबत नाही.पोराला दवाखान्यात घेऊन चला दादा तुमचे लई उपकार होतीन “

सुबोधने क्षणभर विचार केला.मग त्याने झटकन चेंदामेंदा झालेल्या खटारा बाईकला रस्त्याच्या बाजुला टाकलं.मग म्हाताऱ्याच्या मदतीने त्याने त्याच्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर टाकलं.त्याच्या शेजारीच म्हाताऱ्याला बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी सुसाट सोडली.गाडी चालवतच त्याने मोबाईल काढला.शहरात ॲक्सीडंट हाॅस्पिटल असलेल्या डाॅक्टर मित्राला त्याने फोन लावला.

“शेखर सुबोध बोलतोय.इमर्जन्सी केस आहे.दवाखान्याबाहेर स्ट्रेचर तयार ठेव.ओ.टी. तयार ठेव.मी ब्लडबँकेला रक्त तयार ठेवायला सांगतो.पंधरावीस बाटल्या रक्त लागणार आहे.मी वीस पंचवीस मिनिटात पेशंटला घेऊन पोहोचतोय”

” सुबोध अरे आज रविवार आहे आणि ॲक्सिडंटची केस असेल तर पोलिसांना…”

” मी करतो सगळं मॅनेज.तू फक्त तयार रहा.आणि तुझ्यासारखाच माझाही रविवार आहे.सो प्लीज बी फास्ट.माझ्या जवळच्या नातेवाईकाची केस आहे असं समज”

याच शेखरला सुबोधने हाॅस्पिटलच्या उभारणीसाठी पाच लाख उधार दिले होते.शेखरने त्याला फक्त दोन लाख परत केले होते.पण या उधारीवर बोलण्याची ही वेळ नाही याची जाणीव सुबोधला होती.

शेखर दिलेल्या शब्दाला जागला.त्याने खरोखरच सगळी तयारी करुन ठेवली होती.त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला ऑपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला.रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या.सुदैवाने ब्लड बँंकेत ओ पाॅझिटिव्हचा भरपूर साठा होता. एक्सरेतून कमरेचं ,खांद्याचं,उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं.तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कावळ्यांचा सण… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ कावळ्यांचा सण… ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारी सगळं कसं आस्ते कदम चाललेलं. रोज घड्याळाच्या तालावर नाचणारं आयुष्य गोगलगाय असतं. आमच्या घरात सुद्धा असंच आळसावलेलं वातावरण. आई किचन तर हॉलमध्ये बाबा पेपर वाचत होते. मी आणि दीदी मोबाईलमध्ये गुंग.

“परवा सकाळी सगळ्यांनी ऑफीसला तासभर उशीरा जा” किचनमधून आई म्हणाली.

“बरं” कारण न विचारता बाबांनी होकार दिला.

“आई, काही विशेष”दीदी 

“जमणार नाही” मी म्हणताच आई तडक हॉलमध्ये आली.

“जमवावं लागेल. घरात महत्वाचं कार्य आहे म्हणून थांबायला सांगितलं. कळलं”

“तुझं प्रत्येक कार्य महत्वाचं असतं. परवा नेमकं काय आहे. ते किती महत्वाचं आहे. ते आम्हांला ठरवू दे. ”

“येस, आय टोटली अॅग्री”कधी नव्हे दीदीनं माझी बाजू घेतली. बाबांकडून मात्र काहीच प्रतिक्रिया नाही.

“पितृ पंधरवडा चालूयं”

“ओ! म्हणजे कावळ्यांचा सण”मी चेष्टेच्या सुरात म्हणाल्यावर आई चिडली पण काही बोलली नाही.

“गप रे, काहीही बोलू नकोस. ”दीदी.

“सण म्हण किवा अजून नावं ठेवा. तुम्हांला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून गुरुजींना सकाळी लवकर बोलावलंय. ”

“बाबा थांबणारेत तेव्हा आम्ही ऑफिस गेलो तर काहीच प्रॉब्लेम नाही. उगीच कशाला उशिरा जायचं”दीदी.

“तसंही फार काही महत्वाचं नाहीये”मी दिदीला दुजोरा दिला.

“ते मला माहित नाही. नमस्कार केल्याशिवाय कोणीही घराबाहेर जायचं नाही. हे फायनल”आईनं जाहीर केलं.

“आई, हट्ट करू नकोस. ”

“हट्ट मी करते की तुम्ही!! आणि हे काही माझ्या एकटीसाठी करत नाहीये. ”

“मग कोणासाठी?”

“आपल्यासाठी”

“कुणी सांगितलं करायला”

“सांगायला कशाला पाहिजे. पिढ्यानपिढ्या चालत आलयं”

“म्हणून आपण तेच करायला पाहिजे असं नाही”

“हे बघ उगीच वाद घालू नकोस”

“मला हे पटत नाही आणि तसंही या सगळ्या प्रकाराला काहीही लॉजिक नाहीये. ”

“प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायचं नसतं. काही गोष्टी मनाच्या समाधानासाठी करायच्या असतात”

“तुला जे करायचं ते कर ना. आम्हांला आग्रह का करतेस. ”

“आपल्या माणसांसाठी तासभर वेळ काढू शकत नाहीस. इतका बिझी झालास”.

“प्रश्न तो नाही. बुद्धीला पटत नाही. ”

“म्हणजे माणूस गेला की आपल्या आयुष्यातून कायमचा वजा करायचं का?गेला तो संपला. असंच ना. ” 

“आई, इमोशनल होऊ नकोस. मी असं काही म्हटलेलं नाही. फक्त पित्रकार्य. मृत व्यक्तींच्या नावानं कावळ्यांना घास ठेवणं या गोष्टी डज नॉट हँव सेन्स.. ”माझं बोलणं आईला आवडलं नाही.

“ईट हॅज सेन्स, ”पेपर बाजूला ठेवत बाबा म्हणाले.

“म्हणजे, बाबा, तुम्ही पण.. ”

“येस, आईचं बरोबर आहे. तू साध्या गोष्टीचा इश्यू करतोयेस”

“गोष्ट साधीच आहे मग एवढा आग्रह का?”

“तेच मी म्हणतोय. एक नमस्कारासाठी एवढा आग्रह का करावा लागतोय. ”

“मला हे प्रकार आवडत नाही आणि मान्यही नाहीत”

“तू एकांगी विचार करतोयेस. यासगळ्याकडं दुसऱ्या बाजूने बघ. ”

“म्हणजे”

“एकाच घरात राहूनही कामाच्या व्यापामुळे एकमेकांशी निवांत बोलायला वेळ मिळत नाही आणि इथं तर विषय दिवंगत व्यक्तींविषयी आहे. काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं हळूहळू विस्मरणात जातात. महिनोमहीने त्यांची आठवणसुद्धा येत नाही. यानिमित्तानं त्यांचं स्मरण करून काही धार्मिक कार्य केली तर त्यात बिघडलं काय?”

“आठवणच काढायची तर मग कावळ्यांना घास देणं असले प्रकार कशासाठी?इतरवेळी कावळ्यांकडे बघायचं नाही आणि या पंधरा दिवसात मात्र कावळा हा मोस्ट फेवरेट!!. ” 

“पुन्हा तेच!!तू फक्त क्रिया कर्माविषयीच बोलतोयेस. ”

“ज्यांचा वारसा आपण चालवतो त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हाच प्रमुख उद्देश आहे. ”

“तरी पण बाबा.. ”

“मॉडर्न विचारांच्या नावाखाली प्रत्येक जुन्या गोष्टी, रीती, परांपरांना नावं ठेवणं, त्यांची चेष्टा करणं योग्य नाही. इतकी वर्षे यागोष्टी चालूयेत त्याच्यामागे काही कारण असेलच ना. ”

“प्रॉब्लेम हा आहे की तुमच्यासारख्यांचा सांताक्लोज चालतो पण कावळ्याला घास ठेवला की लगेच ऑर्थोडॉक्स, जुनाट विचारांचे वगैरे वगैरे अशी लेबल लावता. ”आई. “मला सांग. गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात का लावतात”बाबांचा अनपेक्षित प्रश्न.

“नक्की सांगता येणार नाही” 

“भिंतीवर फोटो लावणे. हार घालणं हे सगळं पूर्वी व्हायचं. आजकाल हॉलमध्ये निवडुंग चालतो पण फोटोची अडचण होते. कपाटातला फोटोसुद्धा कधीतरी बाहेर निघतो. ”आई.

“फोटोच्या रूपानं ती व्यक्ती आपल्यात आहे या विश्वासानं काही चांगलं घडलं की नमस्कार करून गोडधोड ठेवलं जातं. आशीर्वाद घेतला जातो. फोटोतली व्यक्ती निर्जीव असते पण असं केल्यानं समाधान मिळतं. त्यांचा आशीर्वाद आहे या जाणिवेनं बरं वाटतं. ”बाबांचा मुद्दा आवडला. विचारचक्र सुरु झालं. काही गोष्टींकडे आतापर्यंत एकाच चष्म्यातून पाहत होतो. नावं ठेवत होतो. चूक लक्षात आली.

“बाबा, थॅंक्स. मी एकांगी विचार करत होतो. ”

“तुझ्यासारखाच विचार करणारे बरेच आहेत. सरसकट टीका करण्यापेक्षा दुसरी बाजू पहावी एवढंच सांगायचं होतं. जे बोललो त्यावर विचार कर. जर तुला वाटलं तर थांब. बळजबरी नाही. पालक म्हणून आपल्या परांपरांविषयी सांगू शकतो पण त्या स्वीकारायच्या की झिडकारायच्या तुम्ही ठरवा. अजून एक, काही गोष्टी मान्य नसतील तर तटस्थ रहा पण मनाला लागेल असं बोलू नका. प्लीज.. ”बाबांच्या बोलण्यात एक वेगळाच सूर जाणवला.

“जुन्या गोष्टींना नावं ठेवायची फॅशन झालीय”आईचा राग अजूनही शांत झाला नव्हता.

“आई, सॉरी!!परवा नमस्कार करून जाईन”

“असा बळजबरीचा नमस्कार नको. मनापासून वाटत असेल तरच थांब. ”एवढं बोलून आई किचनमध्ये गेली. दिदीकडं पाहिल्यावर ती लगेच म्हणाली “मी थांबणार आहे”तितक्यात बाल्कनीच्या बाजूनं ओरडण्याचा आवाज यायला लागला. पाहिलं तर झाडावर दोन कावळे ‘काव काव’ ओरडत होते. कदाचित ते माझे……..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares