मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सिंधू … अज्ञात ☆ प्रस्तुति – सुश्री मीनल केळकर

?  जीवनरंग ?

☆ सिंधू … अज्ञात ☆ प्रस्तुति – सुश्री मीनल केळकर ☆ 

सिंधू…

माझी पत्नी आतून ओरडली, ” आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात…? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा…! “

मामला गंभीर वळण घेणार असं दिसलं..!

मी पेपर बाजूला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो…

सिंधू, माझी एकुलती एक लाडाची लेक रडवेली झालेली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. –तिच्या पुढे एक दही -भाताने पूर्ण भरलेला बाऊल होता. सिंधू, तिच्या वयाच्या मानाने शांत व समजुतदार, गोड आणि हुशार मुलगी होती.

मी बाऊल उचलला आणि म्हणालो, ” बाळ, तू चार घास खाशील का..? तुझ्या बाबासाठी…? ” सिंधू, माझी बाळी; थोड़ी नरमली; पालथ्या मुठीने डोळे पुसले आणि म्हणाली, ” चार घासच नाही, मी सगळ संपवीन—” थोडी घुटमळली आणि म्हणाली,

” बाबा, मी हे सगळं संपवलं  तर… तुम्ही मला मी मागीन ते द्याल..? “

” नक्की…!”

तिने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले.

पण आता मी थोडा गंभीर झालो. ” बाळ, पण तू कंप्यूटर किंवा दुसरं एखादं महागडं खेळणं मागशील, तर आत्ता बाबाकडे तेवढे पैसे नाहीयेत बेटा…! “

” नाही बाबा..! मला तसं काही नको आहे…! ” तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला…

मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढं खायला देतात…? ते पण तिला न आवडणारं…. पण मी गप्प बसलो. सगळं मोठ्या कष्टाने खाऊन संपविल्यावर हात धुऊन सिंधू माझ्यापाशी आली…डोळे अपेक्षेने मोठे करून–  

आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. ” बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार…! ” तिची ही मागणी होती…

” हा काय मूर्खपणा चाललाय…? काय वेड बीड लागलंय काय…? मुलीचे मुंडण…? अशक्य…! “

सौ. चा आवाज वाढत चालला होता…!

 ” आपल्या सगळ्या खानदानात असलं काही कुणी केलं  नाही…! ” आईने खडसावले.

“ती सारखी टिव्ही पहात असते… ! त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत…! “

” बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस…? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दु:खी होऊ…! आम्हाला तुझ्याकडे तसं बघवेल का सांग…? सिंधू, बेटा आमचाही विचार कर…! ” मी विनवणीच्या स्वरात म्हटले…

” बाबा, तुम्ही पाहिलंत ना, मला तो दहीभात संपवणं  किती जड जात होतं ते…! ” आता ती रडायच्या बेतात होती– ” आणि तुम्ही मला त्या बदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल केलं होतं… आता तुम्ही मागे हटता आहात… मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणा-या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना…आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत…! “

मला आता ठामपणा दाखवणे भाग होते…

” काय डोके- बिके फिरलेय काय..? ” आई आणि सौ. एकसुरात…

आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही, तर सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही—-

मी ठरविले, तिची मागणी पूरी केली जाईल…

—गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते…

सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडण केलेली सिंधू शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृष्य होते . ती मागे वळली आणि टाटा केला.  मीही हसून टाटा केला…

तितक्यात  एक मुलगा कारमधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली, ” सिंधू माझ्यासाठी थांब.” गंमत म्हणजे त्याचेही टक्कल केलेले होते.

‘ अच्छा, हे असं आहे तर ‘, मी मनात म्हणालो…

त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या..!  ” तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे. तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा, हरीष. त्याला ल्यूकेमिया (Blood cancer) झालाय.  येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, ” गेला पूर्ण महिना तो शाळेत आला नाही. केमोथेरपि चालू होती. त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता. कारण मुद्दाम नाही, तरी सहाजिकच मुले चिडवणार… सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणा-यांचे मी पाहून घेइन.  पण तू शाळा नको बुडवूस —-मी कल्पनाही केली नव्हती की, ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल…तुम्ही तिचे आईवडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे…”

ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी मनाशी म्हणत होतो…’ माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे– खरं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते…’

—–या पृथ्वीवर ते सुखी नव्हेत, जे स्वत:ची मनमानी करतात.  सुखी तेच की जे दुस-यावर जिवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला बदलायलाही तयार होतात. ….

आपल्यालाही आपलं आयुष्य सिंधूसारखं बदलता यायला पाहिजे. …….जमेल का ? 

लेखक: अज्ञात…

संग्राहक :- मीनल केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले

? जीवनरंग ❤️

☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले ☆

तर मंडळी, मौजेची घटना अशी घडली की ‘त्रिवेणी’ आश्रमाच्या कार्यालयापाशी पोहोचताच लक्षात आले की माझ्या उजव्या बुटाचा सोल (sole) पुढून निघून लोंबायला लागलाय. सकाळपासून आळंदी मंदिर, ‘ज्ञानेश्वरी’ मिसळ मध्ये ब्रेकफास्ट घेईपर्यंत व्यवस्थित वागणार्‍या सोलने ऐनवेळी समारंभाच्या सुरुवाती- सुरुवातीलाच मान टाकलेली पाहून माझ्या soul मध्ये धस्स! झाले.

पुढील दोन तास तरी सोलने तग धरावे, अशी मनोमन प्रार्थना करीत मी पुढे निघालो. आणखी दहा पावले पुढे  जातो न जातो तोच “घडू नये तेच घडले” आणि सोल बुटापासून तुटून चक्क बाजूला पडला. मी तळपाय तिरपा करून पाहिला असता माझा साॅक थेट दृष्टीस पडल्यावर तर मला ब्रह्मांडच आठवले. आली का आता पंचाईत!

मग अजयचा मित्रत्वाचा सल्ला मानून तो सोल तिथेच बाजूच्या एका वाफ्यामध्ये ठेवून दिला,  परत येताना घेऊयात ह्या विचाराने. तिथली एक सफाई कामगार स्त्री काम थांबवून माझ्या सर्व हालचाली टिपत उभी होती. माझी अवस्था पाहून तिने पदर डोळ्यांना लावण्याऐवजी नाकाला लावलेला माझ्या नजरेतून सुटले नाही. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा!

तिच्याकडे पाठ करून मी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या निर्धाराने, जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात चालत पुढे निघालो. माझ्या आजूबाजूने नवनवीन चपला आणि बूट घातलेली लोक घाईघाईने लग्नमंडपाकडे निघाली होती. मी मात्र साॅकला बोचणारे दगड, फरश्यांमधील फटींचा स्पर्श आदींचा ‘उजव्या’ पदोपदी अनुभव घेत हळूहळू मार्गक्रमणा करीत होतो. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी  चप्पल स्टँडवर बूट-चपला काढायच्या होत्या ते पाहून मात्र माझ्या बुटात नव्हे पण जिवात soul आला!

पुढे सर्वत्र मी ‘पांढर्‍या पायाने’ नव्हे पण ‘सावळ्या पायाने’ तसाच अनवाणी फिरत राहिलो…डायनिंग हाॅलच्या बाहेरील लाॅन, रेलिंग, पायर्‍या, पुन्हा लग्नाचा हाॅल असा सगळीकडेच. तशीही बूट घालायची सवय गेली दोन वर्षे मोडली होतीच. त्यामुळे बुटाचे लोढणे न घेता फिरणेच मला छान हलकेहलके, मौजेचे वाटू लागले होते.

‘त्रिवेणी’ आश्रमात अनवाणी फिरणार्‍या ह्या भक्ताला पाहून इतर भक्त मंडळींचा माझ्याबद्दल आदर वाढतोय, असे मला उगीचच भासू लागले. पण तसा काही चमित्कार घडला नाही. माझ्या पायाकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमात बुटाच्या sole ला नव्हे तर “जय गुरुदेव!” ह्या विश्वव्यापी soul च्या पूजनालाच महत्व होते, हे अधोरेखित झाले.

बूटात पाय अडकवून कारपर्यंत ‘वाकडी’ पावले टाकत आलो. तत्पूर्वी परतीच्या मार्गावर मालकाची वाट पाहत पडलेल्या माझ्या उजव्या सोलला वाफ्यामधून उचलून कारमध्ये आणून टाकले. पुढे एखाद्या चांभाराचे दुकान दिसले तर “बुटाला सोल शिवून घेऊयात” असा एक पोक्त पण कळकळीचा सल्ला ड्रायव्हर सतीशने दिला.

आश्रमातून बाहेर पडून आळंदीजवळील एका छोट्या चपलांच्या दुकानात कामचलाऊ पण बरोबर मापाच्या सँडल्सचे शाॅपिंग झाले. तळपायांना sole आणि solace मिळाला आणि त्यासरशी तिथेच माझ्या ‘बाटा’ना करायचे ठरवले कायमचा टाटा! ??

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध :कार्तिकचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे केतकीला जाणवलं .  आता पुढे….)

आणि आपण तरी कार्तिकशिवाय राहू शकतो का? नेहमी भांडत असलो, तरी प्रत्येक क्षणी कार्तिक मनात असतोच. त्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय आपण कसलाच विचार करू शकत नाही. अगदी डिव्होर्सची वेळ आली तरीही.

ही डिव्होर्सची वेळ तरी कशी आली? त्याची कुठे भानगड, व्यसन…..? काहीच नाही. मग कशावरून आपलं एवढं भांडण झालं? कशावरून बरं? कारण तर आठवतच नाहीय. म्हणजे तेवढं महत्त्वाचं नसणारच. पण उगीचच ताणलं गेलं आणि इगोच्या लढाया सुरू झाल्या. तसा कार्तिक टिपिकल पुरुषासारखा इगो वगैरे कुरवाळणारा नाहीय. आपणच……

कार्तिक म्हणतोय, ते खरं आहे. एकुलतं एकपण ही आपण नेहमीच स्ट्रेन्थ समजत आलो. आपल्या तोंडातून जे बाहेर पडायचं, ते लगेच आपल्यासमोर हजर व्हायचं. आईबाबा नेहमीच आपले लाड करायचे. त्यामुळे आपण तोच आपला हक्क समजत आलो.

कार्तिककडूनही तीच अपेक्षा केली. सुरुवातीला तोही आपल्या मनाप्रमाणे वागायचा.पण नंतरनंतर त्याने स्वतःच्या मनाला मुरड घालणं बंद केलं.

चुकलंच आपलं. खूप खूप चुकलं.

“कार्तिक, गाडी थांबव.मला बोलायचंय तुझ्याशी.”

“इथे मध्येच थांबवता येणार नाही. पुढे थांबवतो.”

गाडी थांबल्यावर केतकीने सगळं सगळं कन्फेशन दिलं. बोलता बोलता ती रडत होती. रडता रडता बोलत होती.

कार्तिकला ती पूर्वीसारखीच बालिश, निरागस वाटली. त्याच्या मनात तिच्याविषयीचं प्रेम उफाळून आलं. तिला मिठीत घेऊन ओठाने तिचे अश्रू पुसण्याचा मोह त्याला झाला. पण   खुंटा अजून घट्ट करणं आवश्यक आहे, असं त्याला वाटलं.

“तुला काय म्हणायचंय, ते कळलं मला. पण मी प्रयत्नपूर्वक तुला माझ्या मनातून, आयुष्यातून बाहेर काढलंय.”

“पण… आपला… डिव्होर्स…तर… झाला… नाहीय… ना… अजून…!” तिच्या वाक्यात शब्दांपेक्षा हुंदकेच जास्त होते.

“लिगली नाही. पण मनाने आपण एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत.”

“मलाही तसंच वाटायचं. पण आता विचार करताना वाटतं, की आपण अजूनही एकमेकांचे आहोत. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कार्तिक.”

“पण मला नाही ना वाटत तसं,” चेहऱ्यावर अतोनात गांभीर्य, आवाजात कठोरपणा आणत कार्तिक बोलला.

केतकीला धक्का बसला. आपल्याला वाटतं, त्यापेक्षा वेगळा विचार स्वीकारायची ही तिची पहिलीच वेळ होती. फुटू पाहणारे हुंदके प्रयासपूर्वक दाबत तिने तोंड घट्ट मिटून घेतलं.

कार्तिकला तिची दया आली.

“मी विचार करतो तुझ्या म्हणण्याचा. मला वेळ दे थोडा.”

केतकीने सुटकेचा निश्वास सोडला.”घरी पोहोचेपर्यंत सांगितलंस तरी चालेल.”

“दोन-तीन दिवस तरी लागतील मला.”

‘बापरे!’ केतकीच्या मनात आलं. पण तोंडाने मात्र तिने “बरं,”म्हटलं.

रात्री जेवणातही केतकीचं लक्ष नव्हतं.

“काय गं? जेवत का नाहीयेस?”आईने दोन-तीनदा विचारलं.

कार्तिक भराभरा जेवून उठला.

“बरं वाटत नाहीय का? तू झोप जा. आज मी आवरते मागचं,” असं आईने म्हणताच नेहमीप्रमाणे, “मी करते गं,”वगैरे न म्हणता केतकी सरळ बेडरूममध्ये गेली.

पाठोपाठ कार्तिक आलाच.

“हे बघ, हनी….” पुढे न बोलताच केतकीला सगळं कळलं.

किचनमधलं आवरून, बाबांना हवं -नको बघून आई झोपायला आली, तेव्हा दोघांना बघून ती म्हणाली, “आज मी झोपते हॉलमध्ये.”

गंमत म्हणजे आज या दोघांपैकी कोणीही तिला ‘नको’ म्हटलं नाही.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध : कार्तिकने केतकीला दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं . आता पुढे…..)

” मला पुन्हा त्या लग्नाच्या सापळ्यात अडकायचं नाहीय.”

“एकटीच राहणार?”

“आई -बाबा आहेत की सोबतीला.”

“आई-बाबा आहेतच म्हणा. पण मला वाटतं, आता त्यांचं वय झालंय. त्यात पुन्हा आपल्या डिव्होर्सचं ऐकल्यावर ते खचूनच जातील. त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला, तर तू एकटी कितपत पुरी पडशील?”

“पुष्करदादा, शीलूताई वगैरे आहेत की मदतीला.”

“त्यांनाही त्यांचे संसार आहेत ना. पुष्करदादांवर त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी आहे. शीलूताईंच्या घरी त्यांचे सासू-सासरे आहेत. कल्पना कर, तुझ्या गरजेच्या वेळी त्यांच्या घरच्या सिनियर सिटीझन्सचीही तब्येत ढासळली, तर इच्छा असूनही ते तुझ्या मदतीला येऊ शकणार नाहीत.”

केतकी विचारात पडली – बाबांना ऍडमिट करायचं कळल्यावर सगळीजणं धावत आली होती. पण आता डिस्चार्जनंतर ते तीन-चार दिवसांआड येऊन भेटून जायचे. म्हणजे त्या अर्थाने सगळी जबाबदारी आपल्यावरच होती.

“एक लक्षात घे, केतकी. एकुलतं एकपण ही आतापर्यन्त तुझी स्ट्रेन्थ होती. आताच्या परिस्थितीत तो विकनेस झालाय.”

‘खरंय, कार्तिक म्हणतोय ते. आपण या दृष्टीने विचारच नव्हता केला.’ केतकीला कार्तिकचं म्हणणं पटलं.

“म्हणूनच मला वाटतं, तू एकटी ही जबाबदारी निभावू शकणार नाहीस. तेव्हा या सगळ्यांत तुला साथ देणारा एखादा जोडीदार शोध.”

थोडा वेळ दोघंही खाण्यात गर्क झाले.

“तुला मी मागेच सांगितलं होतं -जोपर्यंत आपण वेगळं राहत नाही, तोपर्यंत डिव्होर्सच्या कारवाईला सुरुवात होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता माटुंग्याच्या घरी राहायला गेलं पाहिजे. तुम्हाला जाणं शक्य असेल, तर जा. मी तुम्हाला शिफ्टिंगसाठी मदत करीन. त्यानंतर मात्र मी तुमच्याशी कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. अजून थोडे दिवस आपल्या घरी राहणं, बाबांसाठी आवश्यक असेल, तर मी दादरच्या घरी राहायला जाईन.पण मी तिकडे फार दिवस नाही राहू शकणार. म्हणजे आई, बाबा, दादा समजून घेतील. पण वहिनीचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर माटुंग्याला शिफ्ट व्हायचं बघ.”

कार्तिकचं बोलून झाल्यावर तो उठला आणि चालायला लागला.

परिस्थितीचं गांभीर्य आता कुठे केतकीच्या लक्षात यायला लागलं.आतापर्यंत केतकी आईबाबांना, त्यांच्या घराला, एवढंच नव्हे, तर कार्तिकलाही गृहीतच धरून चालली होती. डिव्होर्सची व्याप्ती एवढी मोठी असेल, असं आतापर्यन्त तिच्या लक्षातही आलं नव्हतं.

परतीच्या प्रवासात कार्तिक एकही शब्द बोलला नाही.

केतकीही विचार करत होती, ‘आईला डिव्होर्सचं कळलं तर ती आणखीच खचून जाईल. बाबांच्या जोडीने तीही अंथरुण धरेल. मग पुढचं सगळं जमेल आपल्याला?

पुष्करदादा, शीलूताई येऊ शकतीलच, असं नाही. शिवाय कार्तिकविषयी सर्वांनाच आदर वाटतो. आपल्या वागण्याने नाराज झाले, तर ते फिरकायचेसुद्धा नाहीत.

म्हणजे कार्तिक म्हणतो, तसं जोडीदार हवाच.

कार्तिक नेहमी कौतुकाने म्हणायचा -आपण अजूनही सुंदर दिसतो, व्यवस्थित मेंटेन करून आहोत. वय म्हटलं, तर -हल्लीच्या काळात या वयात कितीतरी जणींची लग्नं व्हायची असतात. त्यामुळे आपल्याशी लग्न करायला कोणीही एका पायावर…….

पण आजारी आईबाबांची जबाबदारी स्वीकारायला कितीजण तयार होतील? आणि समजा, सुरुवातीला तयारी दाखवलीच, तरी पुढेपर्यंत ती निभावतीलच, याची काय गॅरंटी? कार्तिकसारखं मायेने, जिव्हाळ्याने तर कोणीच नाही करणार.

त्या दिवशी सकाळी रात्रीचा निळू गेला आणि ट्रेनच्या गोंधळामुळे काशिनाथला यायला उशीर झाला. बाबांना पॉटची अर्जन्सी होती, तेव्हा कार्तिकच पुढे आला.

“असू दे. मी देते, कार्तिक. तुला कंटाळा येईल.”

“हे बघ, केतकी. तू पॉट दिलंस, तर त्यांना ऑकवर्ड होईल. ही वेळ आपल्याला काय वाटतं, यापेक्षा त्यांना काय वाटतं, याचा विचार करायची आहे.”

आताही तो स्वतःपेक्षा आईबाबांच्या सोयीचाच जास्त विचार करतोय.

त्याचं आपल्यावरही किती प्रेम आहे! मागे ऍबॉर्शनच्या वेळी तो पहिल्यापासून आपल्याबरोबर होता. आपला हात हातात धरून आपल्याला धीर देत होता. नंतर आपण शुद्धीवर आलो, तेव्हा आईशी बोलताना किती रडला तो! अगदी आईच्या बरोबरीने. “बाळाला जावं लागलं, तरी दुसऱ्या रूपाने तो आमच्याकडे नक्की येईल. पण केतकीला काही झालं असतं तर?” त्या दोघांची समजूत घालता घालता बाबांच्या नाकी नऊ आले.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

पूर्वार्ध :हॉस्पिटलमधून बाबांना केतकीच्या घरी न्यायचं ठरलं. आता पुढे…..)

कार्तिक -केतकी कामापुरतंच बोलत होती. पण या आजारपणाच्या व्यापामुळे कोणाच्या ते लक्षातही आलं नाही.

गेस्टरूममध्ये बाबा आणि त्यांचा रात्रीचा अटेंडंट निळू झोपत असल्यामुळे आई केतकीबरोबर बेडरूममध्ये झोपत होती आणि कार्तिक हॉलमध्ये सोफा-कम-बेडवर.

आई मधूनमधून म्हणायची, “मी हॉलमध्ये झोपते ” म्हणून.पण कार्तिक -केतकी दोघंही घायकुतीला आल्यासारखे एकसुरात “नको, नको “म्हणून ओरडायचे.

वीकएंडला बराच वेळ तो घराबाहेरच असायचा. घरात असला, तर लॅपटॉप उघडून बसायचा.

आईचं चाललेलं असायचं,”अगं,जरा त्याच्याकडे बघ.थोडा वेळ त्याच्याबरोबर घालव.”

एकदा तर चक्क त्याच्यासमोरच म्हणाली, ” बाबा बरे आहेत. काशिनाथ आहे सोबतीला. तुम्ही दोघं बाहेर जा कुठेतरी. फिरायला, सिनेमाला.” केतकीला ‘नाही’ म्हणायला संधीच नाही मिळाली.

घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत दोघात चकार शब्दाची देवघेव झाली नाही.

केतकीला आठवलं, लग्नापूर्वी आणि नंतरही सुरुवातीच्या काळात केतकीची अखंड बडबड चालायची. कार्तिक कौतुकाने ऐकत असायचा. तिचा प्रत्येक शब्द झेलायचा तो तेव्हा.

मग शनिवारी-रविवारी दोघांनी बाहेर पडायचं, हा नियमच करून टाकला आईने.

यावेळी लॉन्ग ड्राइव्हला मुंबईबाहेर पडायचं, ठरवलं कार्तिकने. तसा ट्रॅफिक खूप होता, पण फारसं कुठे अडकायला झालं नाही.

एका छानशा रिझॉर्टच्या रेस्टॉरंटसमोर त्याने गाडी थांबवली.

‘अरेच्चा!बॅग गाडीत ठेवायची राहिली. आता वॉशरूममध्ये हूक असला म्हणजे मिळवली,’ केतकीच्या मनात आलं. पण कार्तिकने हात पुढे केला. तिने गुपचूप बॅग त्याच्याकडे दिली.

कोपऱ्यातल्या टेबलवर कार्तिक बसला होता. ती येताच तो उठून फ्रेश व्हायला गेला.

वेटर डिशेस घेऊन आला. तिच्या आवडीचा मेन्यू होता.

ही त्याची चाल नाहीय ना? ‘सावध, केतकी, सावध,’ तिने स्वतःला रेड ऍलर्ट दिला.

खायला सुरुवात केल्यावर तिच्या लक्षात आलं, की तिला खरोखरच खूप भूक लागली होती.

थोडंसं खाऊन झाल्यावर कार्तिकने अचानकच विचारलं,  “भेटला कोणी? “

“म्हणजे?” त्याला काय विचारायचंय, हेच तिला कळलं नाही.

“म्हणजे आपला डिव्होर्स झाल्यानंतर ज्याच्याशी तू लग्न करशील, असा कोणी भेटला का?”

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

केतकीचं काय बिनसलं होतं, कोणास ठाऊक. सारखी भांडत असायची, भांडतच असायची कार्तिकबरोबर. पार डिव्होर्सपर्यंत पोहोचली होती मजल.

आताही रात्री घरी पोहोचायला उशीर झाला, तेव्हा कार्तिक खूप दमला होता. जेवण्याचंही त्राण नव्हतं त्याच्यात. पण मग “तू बाहेरून खाऊन आला आहेस.घरात बनवलेलं वाया जातं…..”वगैरे म्हणत केतकी भांडायला सुरुवात करणार, म्हणून तो जेवायला बसला.

“तू जेवलीस?” तोंडातून शब्द निघाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण घोडचूक केलीय.

“मी तुझ्यासाठी थांबायचं सोडून दिलंय हल्ली. तू काय? मनात आलं, तर बाहेरूनच खाऊन येणार. बायको थांबली असेल जेवायची……”

केतकीची बडबड चालूच होती.

शेवटी असह्य झालं, तेव्हा कार्तिकचंही तोंड उघडलं, ” पुरे आता. गप्प बस. दमून घरी यावं, तर…… “

“मग यायचं ना वेळेवर. उशिरापर्यंत बाहेर वेळ काढत बसलं की…..”

” बाहेर वेळ कसला काढणार? ऑफिसमध्ये चिक्कार काम असतं. त्यामुळे थांबण्याशिवाय गत्यंतरच नसतं. “

“मी घरबशी गृहिणी असल्यासारखं बोलू नकोस हं. सांगून ठेवते. मीही नोकरी करते…..”

“माहीत आहे तुझी नोकरी.”

“नीट बोल हं माझ्याशी. असलं ऐकायची सवय नाहीय मला.”

” हो, हो. कशी असणार? लाडावलेली मुलगी तू. एकुलती एक म्हणून डोक्यावर बसवून ठेवलंय आईवडिलांनी. “

“मला अगदी कंटाळा आलाय, तुझी कुजकट बोलणी ऐकायचा. केव्हा एकदा त्या डिव्होर्सच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट होतायत, असं झालंय.”

“पण तू तुझ्या आईबाबांना सांगितलंस का हे?”

“तू मला विचारत असतोस सारखा, ते तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का?”

“माझ्या घरच्यांना काय, नंतर सांगितलं तरी चालेल. इन फॅक्ट, एवढ्यात मी सांगणारच नाहीय त्यांना. तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला माहेरी जाऊन राहायचं आहे. आणि तिथे राहायला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुझ्या आईबाबांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. पण तू तर टाळाटाळ करतेयस.”

“टाळाटाळ कशाला करणार?”

“मग का नाही सांगितलंस अजून? वरचेवर तर जात असतेस तिकडे.”

“या गोष्टी रागरंग बघून सांगायच्या असतात. कधी कोणी आलेलं असतं तिकडे, कधी बाबांची तब्येत बरी नसते, तर कधी आई नरमगरम असते.”

” हे तर चालूच राहणार ना. मला तर वाटतं, तुला रिकन्सिडर करायचं आहे. दॅट्स व्हाय यू आर बायिंग टाइम. “

“रिकन्सिडर माय फूट! उलट जेवढ्या लवकर तुझ्या कचाट्यातून सुटता येईल, तेवढं बरं. एक एक दिवस मोजतेय मी.”

“तेव्हा लग्नाच्या वेळीही मोजत होतीस एक एक दिवस.”

“माझ्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली होती तेव्हा.”

“मी मूर्ख होतो त्यावेळी.”

“होतो कशाला? अजूनही आहेस. अशा मूर्ख माणसाबरोबर आयुष्य नाही काढायचं मला. मध्ये ऍबॉर्शन झालं, तेव्हा खचून गेले होते मी. पण आता वाटतं, देव करतो, ते बऱ्यासाठी. उगीच त्या जिवाचीही परवड झाली असती.”

“…………..”

“उचकट ना आता तोंड. आता का गप्प बसलास?”

“मी क्रूर नाहीय तुझ्यासारखा, असल्या गोष्टीचा आनंद व्हायला.”

रोजच्यासारखं हे भांडण रात्री 2-2.30पर्यंत चाललं असतं. आणि मग कंटाळून कार्तिक गेस्टरूममध्ये झोपायला गेला असता. रोजच्यासारखाच.

पण आज अचानक केतकीच्या फोनची रिंग वाजली.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहीलं आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला. आता पुढे -)

`अरे, याला सोडायला जंगलात जाणार आहेस ना!’ आईनं जशी आठवण करून दिली.

`जातो ना आई! इथून दोन फर्लांगावर तर जंगल आहे.’

`ते आहे रे! पण बिचारा रात्रभर मडक्यात बंद आहे. जितकी लवकर त्याला मुक्ती मिळेल, तेवढं बरं!

`ठीक आहे. पण काय ग आई, सकाळची स्वप्न खरी ठरतात नं?’

`हं! मीसुद्धा ऐकलं आहे तसं! पण बेटा, मी काही आजपर्यंत कुठलं असं स्वप्न पाहिलं नाही, की जे खरं झालं. झोपडीत रहाणार्‍यांची स्वप्नसुद्धा झोपडीछापच असतात नं?’

`मी सकाळी सकाळी एक स्वप्न पाहीलं आई, पण ते झोपडीछाप नव्हतं!’

`मग काय महालाचं स्वप्न बघितलंस तू?’

`आता मी परत आलो, की तुला सगळं स्वप्नच सांगेन.’

केर काढता काढता, रेवती आई आणि रमलूचा संवाद ऐकत एका कोपर्‍यात उभी होती. रमलूच्या तोंडून स्वप्नाबद्दल ऐकल्यावर तिचं तोंड हवेच्या झुळुकीमुळे फटकन उघडणार्‍या या दरवाजासारखं उघडंच राहीलं.

रमलूने मडकं उचललं आणि तो बाहेर पडला. थोड्याच वेळात तो रस्त्यावर आला. पहाट फटफटायची होती. रस्ता रिकामा आणि निरव, शांत होता. हा रस्ता म्हणजे शहराच्या बाहेर पडणारा बाय-पास आहे. चालत चालत तो रस्त्यावर लावलेल्या दिशा-दर्शकाच्या फलकापाशी पोचला. आणि मटका खाली ठेवून मध्यम प्रकाशात फलक वाचू लागला. फलकावर एका बाजूला लिहिलं होतं, `गुलमोहर कॉलनी मार्ग’ आणिदुसर्‍या बाजूला लिहिलं होतं, `रिझर्व फॉरेस्ट मार्ग.’ त्याने समोर पाहिलं. गुलमोहर कॉलनीचे शानदार बंगले अर्धवट अंधारातही स्पष्ट दिसत होते. क्षणार्धात रात्री पाहिलेलं स्वप्न त्याच्या डोळ्यापुढे तरंगू लागलं. त्याने मडकं उचललं आणि गुलमोहर कॉलनीच्या दिशेने चालता चालता विचार करू लागला, `आज माझ्याजवळ दहा-वीस साप असते तर…’

समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 2

(नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. ) इथून पुढे —–

नानाजी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. एका आंदोलनात इंग्रजांनी त्यांना घोड्याने तुडविले होते. त्याच्या खुणा त्यांच्या पाठीवर होत्या. शंकरला वाटायचे नानाजींनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन मिळवावी.  पण नानाजींचा त्याला विरोध होता— “ मी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले ते माझे कर्तव्य होते.  त्याचे पैसे मी का म्हणून घ्यावे ? जर पैसे घेतले तर हा व्यवहार झाला. माझ्या कार्याचा मला अभिमान आहे. माझ्या पाठीवरील व्रण हेच माझे सर्टिफिकेट आहे, नि त्याचा आनंद मला मिळतो. मी कधीही माझ्या देशप्रेमाची किंमत घेणार नाही. “  हे त्यांचे ठाम मत होते. नेमके तेच शंकरला आवडत नव्हते. जर सरकार देण्यास तयार आहे तर का घेऊ नये, हे त्याचे मत होते. पण नानाजी आपल्या मतावर ठाम असायचे. दुकानात अनेकदा आमच्या वडलांसमोर हा शाब्दिक संघर्ष व्हायचा.  दोघेही आपली बाजू वडलांसमोर मांडायचे.  वडील शंकरला समजवायचे की,

‘त्यांच्या संमतीशिवाय काही होणार नाही. तेव्हा नानाजींना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शंकरने त्यांना त्याबद्दल आग्रह करू नये. ‘ शंकरला वाटायचे गुरुजींचे नानाजी ऐकतात.  तेव्हा गुरुजींनी त्यांना पेन्शनसाठी तयार करावे. पण आमचे वडील पक्के आदर्शवादी.  ते नानाजींना कधीच पेन्शनसाठी समजवायचे नाहीत. परिणाम असा झाला की शंकर नानाजीसोबत आमच्या वडलांचाही  विरोध करू लागला. आम्हाला मात्र शंकरचे पटायचे. पैशाची गरज काय असते ते आम्ही अनुभवले होते.  केवळ वडलांच्या तुटपुंज्या पगारावर आमचा मोठा परिवार चालवितांना आईची महिन्याच्या शेवटी होणारी ओढाताण आम्ही अनुभवत होतो. घरी शिकवणीला येणाऱ्या पोरांकडून फी घ्यावी असा तिचा आग्रह असायचा.  पण विद्यादानाचे पैसे घ्यायचे नाही हा आमच्या वडलांचा आदर्श. अनेकदा यावरून घरी झालेला संघर्ष आम्ही अनुभवला होता. त्यामुळे शंकर- नानाजींच्या संघर्षात आम्ही मनाने शंकरच्या बाजूला असायचो. तसे आमच्या विचारांना काहीच महत्व नव्हते, पण वाटायचे नानाजीनी पेंशन घ्यावी आणि घरचे,दुकानातील वातावरण आनंदी ठेवावे. पुढे पुढे नानाजीच्या दुकानातील वातावरण खूप तणावग्रस्त होत गेले. नानाजी आणि शंकर यांच्यात अबोला सुरू झाला. पुढे पुढे या तणावामुळे आमच्या वडलांचे नानाजींच्या  दुकानात जाणे कमी झाले. अचानक एक दिवस सकाळी शंकर आमच्या घरी येऊन धडकला.  त्याच्या हाती एक पोस्टाने आलेला लिफाफा होता, तो त्याने बाबांच्या हाती दिला. बाबांनी त्यातील पत्र काढून वाचायला सुरुवात केली.  कागदावरील अशोकस्तंभ खूण पाहून ते पत्र शासनाकडून आलेले आहे हे आम्हाला समजले. ते वर्ष महात्मा गांधीचे जन्मशताब्दीवर्ष होते, आणि शासनाने त्या निमित्ताने पेन्शन न घेणाऱ्या आदर्शवादी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.  त्या यादीत नानाजींचे नाव होते, त्याचेच पत्र नानाजींना आले होते. पण नानाजी सत्काराला नाही म्हणत होते, त्यामुळे त्यांना समजवावे म्हणून शंकर आला होता. बाबांनी चौकशी केली, नकाराचे कारण विचारले–शंकर म्हणाला ‘ सत्कारासोबत अकरा हजार मिळणार आहेत  म्हणून ते नाही म्हणतात.’ आता मात्र बाबा गंभीर झाले.  विचार करून शंकरला म्हणाले,” तू जा. स्वीकारतील ते सत्कार “. दुपारी बाबा एकटेच नानाजीना भेटले. काय चर्चा झाली माहीत नाही, नानाजी तयार झाले. ठरलेल्या दिवशी बाबा, नानाजी, त्यांची पत्नी, व शंकर नागपूरला गेले.  तिथे नानाजींचा सपत्निक  सत्कार झाला.  ताम्रपत्र, खादीचे धोतर, बंगाली शाल, श्रीफळ व अकरा हजाराचा चेक नानाजीना,  व त्यांच्या पत्नीला नऊवारी पातळ- खण देऊन मंत्रीमहोदयाहस्ते सन्मानित केलं गेलं. सोबतच कार्यक्रमाच्या संचालकाने घोषणा केली. नानाजींनी मिळालेले अकरा हजार रुपये अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकले होते. केवळ ताम्रपत्र, चंदनाचा  हार,व खादीचे कपडे, शाल स्वीकारली. शंकरचा चेहरा उतरला.  पण वडलांनी त्याला समजावले, आश्वस्त केले –’ तुझा फायदा होईल.’- सारे चंद्रपूरला परत आले. आता मात्र शंकरचे बाबांकडे येणे वाढले. नानाजींना  मिळालेल्या ताम्रपत्रामुळे शंकरच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू झाली. दोन्ही पोरांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या.  शंकर जाम खुश झाला.आता मात्र नानाजी- शंकर अबोला संपला. पुन्हा बाबांचा दुकानातील वावर वाढला.  संघर्ष संपून आनंदोत्सव नांदू लागला.  पुन्हा बाबा- नानाजीचे कविता वाचन रंगू लागले. काही वर्षानंतर कळले की सत्कार होण्यासाठी नानाजींचे नाव आमदारांना सांगून बाबांनीच  शासनाला कळविले होते. आज नानाजीचे दुकान काळाचे ओघात नष्ट झाले.  तिथे नवीन दुकानांची इमारत उभी आहे.  पण आजही त्या रस्त्याने गेलो की नानाजीचे ते दुकान, तो संघर्ष डोळ्यासमोर  चलचित्रपटासारखा सरकत जातो.

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

( मागील भगत आपण पहिलं – `तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’ आता इथून पुढे )

`नाही शेठजी! या कामाचं मी काही इनाम घेणार नाही. याएवजी मला पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स द्या. मी दहा महिन्यात आपले पैसे परत करीन.’

अ‍ॅडव्हान्सच हवा असेल, तर उद्या तुला पैसे मिळतील. मी मुनीमांना आत्ताच सांगतो. … पण हे तुझ्या बहादुरीचं इनाम आहे. मला माहीत आहे, हे काम या पूर्वी तू कधीच केलं नाहीस. तुझ्या वडलांच्या निधनानंतर साप पकडणार्‍या  लोकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलीय. या भागात हे काम करणारा आता कुणी राहिलाच नाही. हा आपला भाग म्हणजे जंगलचा हिस्साचआहे. इथे साप निघणरच. खरं तर आपण लोकच त्यांच्या क्षेत्रात येऊन वसलो आहोत. … आज मला या गोष्टीचा आनंद होतोय, की वेळा-काळासाठी एक पठ्ठा तयार झाला. ‘ शेठजींनी रमलूची पाठ थोपटत म्हंटलं.

`पण शेठजी या कामासाठी काही मेहेनताना घेतला जात नाही.’

`अरे बेटा, हा मेहेनताना नाही. लक्ष्मी आहे लक्ष्मी. ती स्वत: चालून तुझ्याकडे येतीय. तिचा अव्हेर करू नकोस. हीच गोष्ट तुम्हाला समजत नाही. लक्ष्मी याचकारणासाठी तुमच्यावर रुसून बसलेली असते. घे हे ठेवून दे.’ असं म्हणत शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्या.

यावेळी रमलू काही बोलला नाही. तो माठ घेऊन मुकादमाच्या मागे मोटरसायकलवर बसला.

झोपडीत पोचताच रमलूच्या आईने रमलूकडून साप-पकड-अभियानाची सगळी हकिकत ऐकली. ते सगळं ऐकून ती एकीकडे भयभीत झाली, तर दुसरीकडे रोमांचितही. रमलूच्या पत्नीच्या रेवतीच्या डोळ्यातून मात्र अखंड अश्रूधारा वाहत होत्या. तिने शेंदुराची डबी आणून रमलूच्या हातात दिली. रमलूचे वडील होते, तेव्हा हे सर्व रमलूची आई करायची.

`तुम्ही हे काम करावं, असं मला वाटतनाही. ‘ डबी परत घेत ती हळूच म्हणाली.

`का?’

`का म्हणजे काय? जिवाशी खेळ आहे, हे काम म्हणजे. साप कधी तरी उलटतोसुद्धा! थोडीशी नजर चूक झाली…’

`वेडी आहेस का तू? बाबा म्हणत,`आपल्या लोकांना नागदेवतेपासून अभय मिळालय. जोपर्यंत आपण त्यांना मारत नाही, तोपर्यंत तो आपल्याला दंश करणार नाही.’ कळलं? आणि हे काम करणारा दुसरा कोण आहे या इलाख्यात?’

`मग आम्ही लोकांनी ठेका घेतला आहे का?’

`……’

`आता बाकीचं बोलणं राहू दे. याला जंगलात सोडून ये. घरात दोन-दोन लहान मुलं आहेत. हे संकट घरात फार वेळ ठेवणं बरं नव्हे.’

`पण आता अंधार पडलाय. बाबा म्हणायचे, सापाला अंधार झाल्यावर सोडता कामा नये. माठ आणि वरचं कापड दोन्हीही मजबूत आहे. मी उद्या पहाट होता-होताच त्याला सोडून येईन.’

रमलू अतिशय थकला होता. त्याने झोपडीसमोरचा हात पंप चालवून थंड पाण्याने आंघोळ केली आणि जेवण करून झोपून गेला. अर्ध्या रात्रीनंतर लघवीकरायला उठला. पण नंतर खाटेवर झोपायला जाण्यापूर्वी कोपर्‍यात ठेवलेल्या मडक्याकडे जाऊन पाहिले. त्यावर कापड अगदी जसंच्या तसं बांधलेलं होतं. मडक्याला स्पर्श करून मनातल्या मनात म्हंटलं, `बस, नागदेवता, आणखी दोन तास धीर धरा.’ तो खाटेवर जाऊन पुन्हा झोपला. तो झोपला खरा, पण आता त्याला पहिल्यासारखी गाढ झोप लागली नाही. खूपवेळपर्यंत तो कुशा बदलत राहिला. मग त्याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं.

 स्वप्नात त्याला दिसलं, मुनीमजींच्या घरी साप निघालाय. रमलूला तिथेही साप पकडायला बोलावलं गेलय. मुनीमजींनीदेखील पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्याहेत. आता त्याने फार काही जोरात नको म्हंटलं नाही. मग शेजारच्या गुलमोहर कॉलनीत एकामागून एक साप निघू लागले. त्या कॉलनीत सगळे बंगले करोडपतींचेच. प्रत्येक ठिकाणी साप पकडायला त्यालाच बोलावलं जाऊ लागलं आणि प्रत्येक जण त्याला इनाम देऊ लागला. कुठे हजार. कुठे पाच हजार. मग तर त्याला शेजा-पाजारच्या गावातूनही बोलावणं येऊ लागलं. त्याने एक झकासपैकी जीप खरेदी केली. शेठजींच्या जीपपेक्षाही शानदार आणि तो जीप घेऊन साप पकडायला जाऊ लागला. दिवसेंदिवस त्याची ख्याती वाढू लागली. त्याने आपला कारभार संभाळण्यासाठी काही सहाय्यकही ठेवले. पुढे पुढे असं होऊ लागलं, की एखादा विशेष साप असेल, तरच तो धरायला जायचा. एरवी त्याने प्रशिक्षित केलेले सहाय्यकच सगळा कारभार संभाळायचे. त्याने बघितलं, त्याचा एक मोठा वाडा झालाय. त्यात त्याची आई शेठाणीसारखी बसलीय. रेवती नोकरा-चाकरांना हुकूम सोडतेय. त्याची दोनही मुले शिकण्यासाठी मोठ्या शहरात गेतील. त्यांना भेटण्यासाठी तो अधून मधून विमानातून जातो. आभाळात उडणारं विमान थोडं उलटं-पालटं होऊ लागलं, तेव्हा त्याची झोप उडाली. त्याची आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला.                       

क्रमश:….

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

वडिलांसोबत सायंकाळी आम्ही  जेव्हा बाजारात जात असू तेव्हा नानाजी टेलर यांचे दुकान हा थांबा निश्चित ठरलेला असायचा.

नानाजी टेलर अतिशय  जिव्हाळ्याने व आदराने आमच्या वडिलांचे स्वागत करायचा, विचाराने दोघेही आदर्शवादी असल्याने दोघांचेही खूप जमायचे. बाबा शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र वाचन हा त्यांचा दिनक्रम असायचा. वाचलेल्या बातम्या ते नानाजींना सांगायचे नी मग त्यावर चर्चा रंगायची. आम्हाला या चर्चेतील काही समजायचं नाही, पण नानाजीच्या दुकानात जाणे आम्हाला आवडायचे. नानाजी टेलरचे दुकान म्हणजे काही ऐसपैस नी सुशोभित शो रूम नव्हती. दहा बाय बाराची एक खोली.  तिला उत्तर दक्षिण असे दोन्हीकडे रस्ते. त्यामुळे दोन्हीकडे दरवाजे. त्यात दोन शिलाई मशीन, एक कापड कटाईचा लाकडी पाट, कपडे ठेवण्याची एक लाकडी अलमारी आणि बसण्यासाठी ऐक बेंच, असा या दुकानाचा पसारा होता. पण त्यात नानाजी खूश असायचे. आम्हालाही या दुकानात बदल व्हावा असे वाटत नसे. तसे या दुकानात बसणे आम्हाला आवडण्याची इतरही अनेक कारणे होती.  त्यातील प्रमुख कारण म्हणजे नानाजींच्या दुकानाला लागून प्रसिद्ध कोहपरे यांचे हॉटेल होते. त्यांचा भटारखाना दुकानातून दिसायचा. त्यांचे कारागीर पदार्थ बनवायचे ते पाहणे आनंददायी वाटायचे. पदार्थांचा सुवास दुकानापर्यंत जाणवायचा.

वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॉटेलात जाणे आमच्यासाठी निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळेही कदाचित बनणारे पदार्थ आनंद देऊन जायचे. एक किरकोळ शरीरयष्टीचा नोकर सतत खलबत्यात काहीतरी कुटत असायचा. बहुदा हॉटेलला लागणारे मसाले, अद्रक लसूण जिरे तो कुटत असावा. पण याव्यतिरिक्त काही इतर कामे करतांना मी त्याला पाहिले नाही. नानाजींच्या दुकानासमोर खाजांची सावकाराची पेढी होती. अनेक गरजू कर्जदार लोक तिथे बसून असायचे. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे आम्हाला तेव्हाही जाणवायचे. त्यांची अगतिकता ,लुबाडणूक होते याची जाणीव आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यामुळे कदाचित मला सावकार सिनेमातील कन्हय्यालाल किंवा जीवन या अभिनेत्यासारखा वाटायचा. समोर एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या दुकानासमोर असलेल्या नालीतील माती साफ करून त्यातून सोने मिळविण्याचा प्रयास करणाऱ्या विशिष्ट जमातीच्या महिला नेहमी दिसायच्या.  त्यांच्या कडेवर  लहान मुले असायची. दिवसभर आपल्या कोहपऱ्यासारख्या पात्रातून पाण्याच्या सहाय्याने त्या माती गाळून सोने काढायच्या. त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे हे आमचे आनंददायी कार्य होते.

नानाजीं च्या दुकानात आलमारीलगत एक मोठी पिशवी ठेवलेली असायची. त्यात कापडाच्या चिंध्या असायच्या.  त्यांचा उपयोग  कापडी बाहुल्या बनविण्यासाठी व्हायचा.  माझी बहीण सोबत असली की तिची नजर त्या पिशवीवर असायची.  ,नानाजींचा मूड चांगला असला की तिला परवानगी मिळायची, नि रंगबिरंगी कापडी चिंध्यांवर ती खजिना मिळाल्यागत तुटून पडायची. नानाजींना कविता ऐकण्याची आवड होती आणि बाबांना कविता करण्याची. दोघेही एकत्र आले की रंग जमायचा. बाबांचे कविता ऐकवणे आणि नानाजींचे त्यांना दाद देणे, यात किती वेळ जातो याचे दोघांनाही भान नसायचे. आम्ही मात्र कंटाळून जात असू, अनेकदा बाजार बंद व्हायचा तरी दोघांचे चर्चासत्र थांबत नसे. नानाजींच्या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा शंकर हा मुलगाही काम करायचा. शंकर विवाहित व दोन मुलांचा पिता होता. नानाजी आणि शंकर यांचे कधी फारसे पटत नसे. तो व्यवहारवादी होता. त्याचा कल अधिक पैसे मिळविण्याकडे असायचा. विनाकारण दुकानात येऊन बसणारे व नानाजींशी चर्चा करणारे त्याच्या नजरेत बिनकामाचे असायचे. तो तसे बोलत नसे, पण त्याच्या देहबोलीतून ते जाणवायचे. मात्र त्याने आमच्या वडिलांचा कधी अपमान केला नाही. नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. 

क्रमशः….

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print