मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

पूर्वसूत्र- “मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला “

” बोललाय तो मला”

” मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं. तरीही तुला वाईट वाटलं असेल तर…”

“नाही आई.ठीक आहे.”

” तोवर मग माहेरी जाऊन येतेस का चार दिवस?”

” नाही. नको. माहेरीही नंतरच जाईन सावकाशीने”

  हे ऐकून आईंना बरं वाटलं,..पण प्रभावहिनी…?)

               —————–

प्रभावहिनींनी मात्र चमकून नंदनाकडे पाहिलं.  ‘ही अशी कशी..?..’ अशा कांहीशा नजरेने..तिची किंव केल्यासारखं. त्यांचं हे असं बघणं नन्दनाच्या नजरेतून सुटलं नाही. प्रभावहिनी एखाद्या कोड्यासारख्या तिच्यासमोर उभ्या होत्या. हाताने पोळ्या लाटत  होत्या पण नजर मात्र नन्दनाकडे. नंदना मोकळेपणाने हसली.

 ” वहिनी तुम्ही लाटून द्या, मी भाजते.”

 ” नको..नको.. करते मी”

 “अहो, पटकन् होतील. खरंच” नन्दनाचा सहजपणा प्रभावहिनींना सहजासहजी झिडकारता येईना. खरं तर त्यांना तिला दुखवावसं वाटत नव्हतं. दोन्ही सूनांची ही जवळीक आईंच्या नजरेतून मात्र सुटली नव्हतीच. त्यांना आणखी वेगळीच काळजी. नन्दना आपली शांत, सरळ स्वभावाची आहे. पण या प्रभाने तिचे कान फुंकले आणि ती बिथरली तर..?

 “तिच्यापासून चार पावलं लांबच रहा गं बाई.” एक दिवस न रहावून आईंनी नन्दनाला सांगितलंच.

“एक नंबरची आक्रस्ताळी आहे ती.’सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत मी आपली गप्प बसते.पण शेजार्‍यांना तमाशा नको म्हणून जीव टांगणीला लागलेला असतो बघ माझा. दोन गोड नातवंडांकडं पाहून जीव तुटतो माझा. यांचं आणि राहुलचं त्यांना वेगळं काढायचं चाललंय. मीच आपली यांना म्हणते, जरा सबुरीने घ्या.घाई कशाला? जे काही व्हायचंय ते आपले डोळे मिटल्यावर होऊं दे. नंतरचं कुणी बघितलंय? दृष्टीआड सृष्टी.”

सगळं ऐकून नन्दनाच्या तोंडाची चवच निघून गेल्यासारखं झालं. तिला आपलं उगीचंच वाटत होतं ….’ आता या राहुलला कसं समजवायचं? त्यांना वेगळं करायचं तर ते नंतर बघू.आत्ता लगेच तर मुळीच नको. मी लग्न होऊन या घरात आले न् घर मोडून बसले असंच व्हायचं. नकोच ते.राहुलला एक वेळ समजावता येईल पण या  प्रभावहिनी? सगळं चांगलं असून अशा कां वागतायत या?..’ ती स्वतःलाच विचारत राहिली. पण या प्रश्नाचे नेमके उत्तर फक्त प्रभावहिनींच्या जवळच होते. ते उत्तर शोधत एक दिवस नन्दना प्रभावहिनींच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोचली. पण तो प्रवास आणि मिळालेले उत्तर दोन्ही सुखकर नव्हतेच…!

“मीही आधी तुझ्यासारखीच होते.शांत.समंजस.कधी ‘असं कां?’ म्हणून न विचारणारी. दोन मुलं होईपर्यंत गाफिलच राहिले मी. ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत दिवस ढकलले. पण माझा पदरच फाटका. पदरात पडणार तरी काय, किती आणि कसं..?” प्रभावहिनी अगदी मनाच्या आतलं मोकळेपणाने बोलत राहिल्या. स्वतःशीच बोलावं तसं.

“सासूबाईंचा बाकी कांही म्हणून त्रास नव्हता. पण त्यांचा कुणावरच वचक कसा तो नव्हताच. त्यामुळे घरचे हे तिन्ही पुरुष शेफारलेले होते. सतत आपली त्यांची नांगी डंख मारायला टपलेलीच. सासुबाईंचं त्यांच्यापुढे काही चालायचं नाही.म्हणून  मग सासूबाईंच्या तावडीत मी आपसूक सापडले. रागावणं,टाकून बोलणं हे फारसं काही नव्हतं, पण देव देव फार करायच्या. घरात सारखं पूजाअर्चा,सवाष्ण-ब्राह्मण, सोवळं ओवळं सारखं सुरुच असायचं. माझी पाळी असली की गोळ्या घेऊन पुढे ढकलायला लावायच्या. खूप त्रास व्हायचा त्या गोळ्यांचा. नको वाटायचं. पण सांगणार कुणाला? यांना काही बोलायची सोय नव्हती. लगेच आकांत-तांडव सुरू करायचे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत दिवस ढकलले. राबराब राबत राहिले. परवा सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळीही ‘गोळी घे’ म्हणाल्या. ‘मला त्रास होतो’ म्हटलं तरी ऐकेचनात. मग त्यांना ठणकावण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. तुला वाटलं असेल ना,ही बाई अशी कशी असं?”

“हो.वाटलं होतं. तुमचं आईना तोडून बोलणं मला आवडलं नव्हतंच.”

“पूर्वी बोलणं सोड वर मान करून बघायचीही नाही.आता नाही सहन होत. ताडताड बोलून मोकळी होते.त्याशिवाय बरंच वाटत नाही. राहुलभाऊजीनी आईंचं रूप घेतलंय आणि हे मामंजींवर गेलेत. सतत त्रागा.. आदळआपट..भसाभसा सिगरेटी ओढणं असं सगळं त्यांचं नको तेवढं उचललंय.

मध्यंतरी धंद्यात जबरदस्त खोट आली होती. आत्ता आत्ता कुठं डोकं वर काढतायत. तेव्हा शांतपणे एकत्र बसून चर्चा करून काही मार्ग काढतील असं वाटलं होतं. पण तिघेही ढेपाळून गेले. दोघींच्या अंगावरचे दागिने त्यांनी आधी उतरवून घेतले. आम्ही बिनबोभाट काढून दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हतं.मग आदळाआपट..चिडचिड सुरु. माझं माहेर पोटापुरतं मिळवून खाणारं पण स्वाभिमानाने जगणारं.पैशांची सोंगं ती माणसं कुठून घेणार? तरीही माझ्या माहेरच्या गरिबीचा मामंजीनी उद्धार केला आणि मी बिथरले. यांनी त्यांचीच री ओढली. सासुबाई घुम्यासारख्या गप्प. आणि राहूलभाऊजी त्या गावचेच नसल्यासारखे. त्या दिवशी सणकच गेली डोक्यात माझ्या.राग दाबून ठेवून घुसमट सुरु झाली न् मी फणाच काढला. मनात साचलेलं भडभडून बोलून टाकलं. ऐकून सगळेच चपापले… त्यांच तिरीमिरीत हे पुढे झेपावत माझ्या अंगावर धावून आले.. मुलं कावरीबावरी झाली होती… मुलांकडे पाहून मी गप्प बसेन असं त्यांना वाटलं होतं.. पण मी गप्प बसूच शकले नाही…यांनी संतापाने माझ्यावर हात उगारला  तेव्हा मात्र माझा तोल गेला..तो हात तसाच वरच्यावर घट्ट धरुन ठेवत यांना निक्षून बजावलं,’आज अंगावर हात उगारलात तो पहिला न् शेवटचा. पुन्हा हे धाडस करू नका. पस्तवाल. डोक्यात राख घालून घर सोडणार नाही मी.  जीवही देणार नाही. पण लक्षात ठेवा,..पुन्हा हात उगारलात तर मात्र तो मूळापासून उखडून टाकीन….!’

सगळं ऐकून नन्दनाच्या  अंगावर सरसरून काटाच आला.

त्या दिवसापासून नन्दना पूर्णपणे मिटूनच गेली. हे घर,ही माणसं, सगळं तिला परकंच वाटू लागलं. तिच्या माहेरी तरी उतू जाणारी श्रीमंती कुठं होती? पण.. आई-आण्णांच्या मनाची श्रीमंती या रखरखाटाच्या पार्श्वभूमीवर तिला अगदी असोशीने हवीशी वाटू लागली…माहेरच्या ओढीने तिचा जीव तळमळू लागला. पण तिने स्वतःचीच समजूत घातली.

आई-आण्णा किती दिवस पुरणार आहेत? आणि या वयात  त्यांच्या जीवाला माझा घोर कशाला..? घोर लावायचाच तर तो राहुलच्या जीवाला का नको? सगळंच दान उलटं पडूनसुद्धा प्रभावहिनी पदर खोचून एवढ्या ताठ उभ्या राहू शकल्या,त्यांना निदान आपली साथ तरी द्यायला हवीच. फक्त आपलीच नव्हे राहुलचीसुद्धा..! पण..तो ऐकेल?

नन्दनाचं असं मिटून जाणं राहुलच्या नजरेतून सुटलं नव्हतंच.

“प्रभावहिनीनी तुला काहीतरी सांगितलेलं दिसतंय”

“त्यांनी मला सांगू नये असं आहे कां काही?”

“त्यांनी काय सांगितलय तुला?”

“त्या या घरात समाधानी नाहीत हे सांगितलंय आणि त्या कां समाधानी नाहीत हेसुद्धा.”

” समाधानी नसायला काय झालंय? सुख दुखतंय त्यांचं. दुसरं काय?”

“असा एकदम टोकाचा निष्कर्ष काढायची घाई करू नकोस राहुल.”

“तुला नेमकं काय म्हणायचंय?” त्याचा आवाज नकळत चढलाच.

“राहुल प्लीज.आपण चर्चा करतोय का भांडतोय? प्लीज,आवाज चढवू नकोस”

“पण तू त्यांची तरफदारी का करतेयस? राग येणारच ना?”

“त्यांची नको तर मग कुणाची तरफदारी करू? मामंजीची, भाऊजींची, आईंची की तुझी..?”

“त्यांनी नेमकं काय सांगितलंय तुला तेवढं बोल”

“त्यांनी काय सांगितलंय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाहीच आहे राहुल.त्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.तू नीट आठवून अगदी प्रामाणिकपणानं सांग. त्या लग्न होऊन या घरी आल्या तेव्हापासून तू त्याला पहातोयस. पहिल्यापासून त्या अशाच त्रासिक,आक्रस्ताळी, आदळआपट करणाऱ्या होत्या का रे?”

राहुल निरुत्तर झाला. थोडा विचारात पडला.

“राहुल, तुला सांगू?आपलं लग्न ठरत होतं तेव्हा माझ्या आईचा या लग्नाला पूर्ण विरोध होता. इथे एकत्र-कुटुंबात रहावं लागेल आणि ते मला जमणार नाही असं तिला वाटत होतं. पण मी ठाम राहिले.’मला नक्की जमेल’ असं निक्षून सांगितलं. राहुल,पण तेव्हाचा माझा तो आत्मविश्वास आज थोडासा डळमळीत झालाय..”

“नंदना…?”

“होय राहुल. तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस तोवर मला बोलू दे सगळं. तुला सांगू? खूप लहानपणापासून मी अगदी नियमितपणे डायरी लिहायचे. अगदी रोज. लग्नानंतरही त्यात खंड पडणार नाही हे मी गृहितच धरलं होतं. पण….”

“पण काय..?”

“पण लग्नानंतर फक्त पहिल्या दिवशी एकच दिवस मी डायरी लिहू शकलेय. पुढची पानं कोरीच राहिलीत. रोज मनात यायचं, लिहावं.मन मोकळं करावं असं.खूप लिहायचं होतं.पण नाही लिहिलं.. का कुणास ठाऊक..पण भिती वाटायची.. तू कधी चुकून ती डायरी वाचलीस..वाचून बिथरलास…मला समजून घेऊ शकला नाहीस.. तर?.. या..या एका भितीपोटीच मनातलं सगळं मनातच दाबून टाकलंय मी. डायरीची पानं कोरीच राहिली…!पण मनातलं सगळं मनातच दाबून ठेवून आपल्या माणसाशीही वरवर चांगलं वागणं ही सुध्दा प्रतारणाच नव्हे का रे?निदान मला तरी ती तशी वाटते. त्यामुळेच डायरीतल्या त्या कोर्‍या पानांवर लिहायचं राहून गेलंलं सगळं मला मोकळेपणानं बोलायचंय.

राहुल,तुमचं हे ‘एकत्र कुटुंब’ खऱ्या अर्थाने एकत्र आहे असं मला कधीच वाटलं नाहीये. ते तसं असायला हवं ना सांग बघू.

लग्न ठरलं, तेव्हा आण्णांनी मला खूप छान समजावून सांगितलं होतं. ते म्हणाले होते,

‘नंदना, एका लग्नामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्या व्यक्तिशी बांधल्या जातात. त्यांना आपण ‘बांधिलकी’ मानतो की ‘बंधन’ समजतो यावर आपलं सहजीवन फुलणार कि विझणार हे अवलंबून असतं.’बांधिलकी’ मानली की आनंदाची फळं देणारं फुलणं अधिक सुगंधी असेल. ‘बंधन’ समजलं तर कालांतराने कां होईना ते जाचायलाच लागेल. आणि तसंही ‘बांधिलकी’ तरी फार अवघड कुठे असते?फक्त एक व्यक्ति म्हणून दुसऱ्याचं स्वतंत्र आस्तित्व मनापासून स्वीकारणं हेच फक्त लक्षात ठेवायचं की सगळं सोपं होऊन जातं.आणि ते सहजपणे स्वीकारलं की जीवनातली वाटचाल अधिकाधिक माणूसपणाकडे होऊ लागते…’ खूप छान वाटलं होतं ऐकताना! छान आणि सोपंसुध्दा. पण बांधिलकी मानणाऱ्यांनासुद्धा ती बांधिलकी एकतर्फीच असेल तर त्याची बंधनंही कशी जाचायला लागतात ते प्रभावहिनींकडे पाहून मला  समजलं. राहुल, तुला सांगू? पूर्वी बालविवाह व्हायचे तशा लग्नात लहान नसतो रे आम्ही मुली आता. पूर्वीचं वेगळं होतं. कच्ची माती सासरच्यांच्या हाती यायची. ते तिला दामटून हवा तसा आकार द्यायचे..ते आकार मग त्यांना जगवतील तसे जगायचे. ‘बाईच्या वागण्यावर सासरचा आनंद अवलंबून असतो’ असं म्हणणं किती सोपं आहे..! प्रभावहिनी त्रागा करतात म्हणून मग त्यांच्यावर वाईटपणाचा शिक्का मारून मोडीत काढणंही तितकंच सोपं आहे. त्यांना या घरात आल्यावर आनंद कसा मिळेल हे कुणी आवर्जून पाहिलंच नाही ही तू नाकारलीस तरी वस्तुस्थिती आहेच. उशिरा कां होईना ती स्विकारावीस एवढंच मला मनापासून सांगायचंय. पूर्ण वाढ झालेलं एक झाड माहेरच्या मातीतून मुळासकट उपटून सासरच्या मातीत लावण्यासारखं असतं रे आजकाल आमचं सासरी येणं. त्याची मूळं या नव्या मातीत रुजायला जाणीवपूर्वक मदत करणं, स्वच्छ हवा आणि मोकळा प्रकाश,पाणी त्या मूळांना द्यायची जबाबदारी स्वीकारणं हे काम सासरच्या माणसांनी करायला नको का रे? त्या चौघांना घरातून वेगळं काढणं म्हणजे नेमकं निदान न करता दुखरा अवयव कापून काढण्यासारखं होईल राहुल. या निर्णयाला तुझा आणि माझा विरोध असायला हवा,त्यात सहभाग नको.. तरच या घरी प्रभावहिनींवर झालेल्या अन्यायाचं थोडं तरी परिमार्जन होईल असं मला वाटतं…”

नन्दना कधी बोलायची थांबली  ते राहुलला समजलंच नाही.तिनं असंच बोलत रहावं म्हणून तो अधिरतेने तिच्याकडे पहात राहिला..!

नन्दना दिसायला चांगली होती. कुणालाही आवडावी अशीच‌.नंदनाचं रुप त्यालाही मनापासून आवडलं होतंच की.पण आजची नंदना त्याला नेहमीच्या नंदनापेक्षाही अधिक सुंदर वाटू लागली..! सुंदर आणि हवीहवीशी! …आणि..नंदना? ..डायरीतील कोरी पाने मनासारखी लिहून झाल्याच्या समाधानाने मनावरचं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तशी ती सुखावली होती…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र- “बघ..काय ठरवतेयस? माहेर हवंय कीं महाबळेश्वर?” नन्दनाकडे पहात राहुलने मिष्किलपणे हसत विचारले.

“तू म्हणशील तसं” नन्दना म्हणाली. ठरवूनसुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाहीच. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही.)

दोन दिवस उलटले तरी घरी पूजेची गडबड जाणवेचना. थोडा अंदाज घेत एक दिवस कामं आवरता आवरता नन्दनाने थेट आईंनाच विचारलं.जवळच प्रभावहिनी म्हणजे नन्दनाच्या मोठ्या जाऊबाईही  कांहीबाही करीत होत्या.

“पूजा रद्द केलीय.पुढे कधीतरी ठरवू..” आई दुखऱ्या स्वरांत म्हणाल्या.

“का..?” नन्दनानं आश्चर्यानं विचारलं.

“योग नव्हता म्हणायचं.. दुसरं काय?”

“योग आणा ना मग. मी ‘नको’ म्हंटलंय कां?” प्रभावहिनी एकदम उसळून अंगावर धावून यावं तसं बोलल्या.

नन्दना त्यांच्या या अवताराकडे पाहून दचकलीच.ती या घरात आल्यापासून प्रभावहिनी मोजकं कांहीसं बोलून गप्प गप्पच असायच्या.धाकट्या जावेला त्यांनी तोडलं नव्हतं तसं फारसं जवळही येऊ दिलं नव्हतं.

आजवरच्या त्यांच्या घुम्या वृत्तीला त्यांचं हे असं खेकसून बोलणं थेट छेद देणारंच होतं. प्रभावहिनींच्या अनपेक्षित हल्ल्याने आई एकदम बावचळूनच गेल्या.काय बोलावं तेच त्यांना समजेना.

“हे बघ,मी नन्दनाशी बोलतेय ना? तू कां मधे पडतेयस?”

“नन्दनाशी बोला, पण जे बोलायचं ते स्पष्ट बोला. मला सांगा, जाऊ कां मी माहेरी निघून? तुमची पूजा आवरली की परत येते..” प्रभावहिनी आईंना ठणकावतच राहिल्या. आई मग एकदम गप्पच झाल्या.

नन्दना बावचळली. प्रभावहिनींचा हा अवतार नन्दनाला अनोळखीच‌ होता. नेमका प्राॅब्लेम काय आहे तेच तिला समजेना.तिनं मग थेट विचारलंच.

“प्रॉब्लेम काय असणाराय..?या..या घरात मी..मीच एक प्रॉब्लेम आहे.”

“कांहीतरीच काय बोलताय वहिनी?”

“खोटं नाही बोलत.विचार बरं त्यांनाच.सांगू दे ना त्यांना.मूग गिळून गप्प नका बसू म्हणावं. काय हो? खोटं बोलत नाहीये ना मी?..सांगाs आहे ना मीच प्रॉब्लेम?”

आई काही न बोलता कपाळाला आठ्या घालून चटचट काम आवरत राहिल्या.नन्दनाला एकदम कानकोंडंच होऊन गेलं.

प्रभावहिनींना एवढं एकदम चिडायला काय झालं तिला समजेचना.

राहुलशिवाय तिच्या मनातल्या या प्रश्नाला नेमकं उत्तर कोण देणार होतं? पण राहुलकडेसुध्दा या प्रश्नाचं नन्दनाचं समाधान करणारं उत्तर नव्हतंच.

“तू त्यांच्या फंदात पडू नकोस”

“फंदात पडू नकोस काय? माझ्यासमोर एवढं रामायण घडलं.आईंचा त्यांनी एवढा अपमान केला..,मी तिकडे दुर्लक्ष करू?”

“मग जा.जा आणि जाऊन वहिनीच्या झिंज्या उपट तू सुद्धा” 

“तू असा त्रागा कां करतोयस?चिडून प्रश्न सुटणाराय कां?”

“प्रश्न आहेच कुठे पण..? असलाच तर तो दादा-वहिनींचा आणि आई-वहिनींचा असेल. आपल्याला काय त्याचं? आपण दुर्लक्ष करायचं आणि मस्त मजेत रहायचं.”

“तू रहा मजेत. मला नाही रहाता येणार.”

“का? अडचण काय आहे तुझी? मला समजू दे तरी.हे बघ, तुझं माझ्याशी लग्न झालंय की त्यांच्याशी? इतरांचा विचार करायची तुला गरजच काय?”

नंदना कांही न बोलता उठली. अंथरूणावर आडवी झाली. राहुलसारखा फक्त स्वतःपुरता विचार करणं तिच्या स्वभावात बसणारं नव्हतं. तिला पटणारं नव्हतं.आणि न पटणारं ती कधी स्वीकारूच शकत नव्हती.

नन्दनाला तिचं लग्न ठरल्यानंतरचं आण्णांचं बोलणं आठवलं.

‘सहजीवन’ कसं असावं हे किती छान समर्पक शब्दांत समजावून सांगितलं होतं त्यांनी. आणि हा राहूल…! कसं स्विकारु त्याला? आणि स्विकारताच आलं नाही तर समजावू तरी कशी?…

‘तिचं जेव्हा जळेल तेव्हाच तिला कळेल.पण तोवर फार उशीर झालेला असेल.’ या शब्दांचा नेमका अर्थ तिला या क्षणी अस्वस्थ करू लागला… लाईट आॅफ करुन राहुल जवळ कधी सरकला तिला समजलंच नव्हतं.त्याचा स्पर्श जाणवला.. आणि..ती एकदम आक्रसूनच गेली. अंग चोरुन पडून राहिली.

“नन्दना..”

“……..”

“गप्प का आहेस तू?” 

“काय बोलू..?”

“तुला एक सांगायचं होतं”

“सांग”

“तू रागावशील”

“नाही रागावणार. बोल”

“आपण महाबळेश्वरला पुन्हा कधीतरी गेलो तर चालेल?”

“कधीच नाही गेलो तरी चालेल”

“बघ चिडलीयस तू”

“………”

“का म्हणून नाही विचारणार?”

“तसंच कांहीतरी कारण असेलच ना‌. त्याशिवाय तू आधीपासून केलेलं बुकिंग रद्द कशाला करशील?”

“आपण पुन्हा नक्की जाऊ.प्रॉमिस.”

“माझी अजिबात गडबड नाही”

“असं का म्हणतेस?”

“महाबळेश्वरला जाऊन भांडत रहाण्यापेक्षा इथे आनंदाने रहाणं मला जास्त आवडेल.”

..हिचं आनंदानं रहाणं महाबळेश्वर-ट्रीपपेक्षा आपल्याला जास्त महागात पडणार आहे या गंमतीशीर विचाराने राहूल हसला. क्षणभर धास्तावलासुद्धा.

             ————

“हे काय गं नन्दना?महाबळेश्वरचं बुकिंग केलं होतं ना भाऊजीनी?”प्रभावहिनींनी  एकटीला बघून नन्दनाला टोकलंच.” त्या आज आपण होऊन आपल्याशी बोलल्या या गोष्टीचं नन्दनाला थोडं आश्चर्यच वाटलं.ती भांबावली.त्यांना काय उत्तर द्यावं तिला समजेचना. प्रश्न सरळ होता मग उत्तर तिरकं कां द्यायचं..?

“हो.बुकिंग केलं होतं”

“मग?”

“कॅन्सल केलं”

“अगं, कमाल आहे. कॅन्सल का केलंस? जाऊन यायचं ना चार दिवस..”

“मी नाही हो.. राहूलनं कॅन्सल केलंय”

“भाऊजींनी? कमालच आहे. पण कां ग? आणि ते सुद्धा तुला न विचारता? आणि तू गप्प बसलीस?”

“हो. गप्प बसले.” नन्दनाला हा विषय वाढू नये असं वाटत राहिलं,म्हणून ती सहज हसत म्हणाली.

“मूर्ख आहेस.” प्रभावहिनी कडवटपणे बोलून गेल्या.

“का मग दुसरं काय करायला हवं होतं मी?”

“गप्प बसायला नको होतंस. हिसकावून घेतलं नाहीस ना तर या घरात तुला कांहीही मिळणार नाही. सुख तर नाहीच,अधिकारसुध्दा नाही.”

प्रभावहिनींचे शापवाणी सारखे शब्द नंदनाच्या मनावर ओरखडे ओढून गेले. तरीही ती हसली.ते हसणं तिला स्वतःलाच कसनुसं वाटत राहिलं. तेवढ्यात आंघोळ करून आई लगबगीने स्वयंपाकघरात आल्या. त्यांच्याकडे पाहून कपाळाला आठ्या घालून प्रभावहिनी गप्प बसल्या.

“नन्दना..”

“काय आई..?”

“राहुल बोलला का गं तुझ्याशी?”

“कशाबद्दल?”

“मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला”

“हो. बोललाय तो मला.”

“मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं त्याला.तरीही तुला वाईट वाटलं असलं तर….”

“नाही आई. ठिकाय.”

“तोवर मग माहेरी जाऊन येतेस कां चार दिवस?”

“नाही. नको. माहेरीही नंतरच जाईन सावकाशीने”

आईना ऐकून बरं वाटलं.पण प्रभावहिनी….?

क्रमश:….

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

लहानपणापासून जोपासलेली डायरी लिहायची सवय म्हणजे नन्दनाचा विरंगुळा होता.आपण लग्नानंतरही नियमीतपणे डायरी लिहायची हे तिने मनोमन ठरवून ठेवलेलं होतं !

…’ माहेर सोडताना मळभ भरून आल्यासारखं आण्णांचं मन गच्च होतं.आतल्याआत गदगदत ते स्वतःला सावरत होते. शेवटच्या क्षणापर्यंत मला मात्र आतून असं भरून येतच नव्हतं. राहुल मला आवडला होता. मिळालाही. त्या आनंदाच्या उर्मीच एवढ्या तीव्र होत्या की आता माहेर अंतरणार असल्याचं दु:ख तेवढ्या तिव्रतेने मला जाणवलंच नव्हतं एवढं खरं. पण शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं कुणास ठाऊक..?..पण माझ्याही नकळत मी आईच्या मिठीत गेले..आणि  आतून उन्मळून पडले.पहिल्या श्वासापासून गृहीत धरलेल्या या वटवृक्षाचा आधार सोडताना माझ्यातली वेल जणू मुळापासून हलली होती.त्या वेलीला तसाच भक्कम आधार हवा होता.तो राहुलच्या रूपात मिळेल?…’

हे नन्दनाच्या डायरीतलं  लग्नानंतरचं पहिलं पान..! ते लिहून झालं आणि नन्दनालाच आश्चर्य वाटलं.’ राहुलच्या रूपात आपल्याला हवासा वाटणारा आधार मिळेल कां?’ हा प्रश्न आपल्याला पडलाच कसा? राहुलने हे वाचलं तर..?..या कल्पनेनेच ती शहारली.मग डायरी तिने मिटूनच टाकली. कायमची. लिहिण्यासाठीसुद्धा पुढे कितीतरी दिवस तिने ती उघडलीच नाही.

—————–

राहुलला तिने प्रथम पाहिलं तेव्हा ते ‘लग्न’ याच उद्देशाने ! पत्रिका देणं , त्या जमणं , एकमेकांना बघणं ,  पसंत पडणं , मग सविस्तर बोलणी आणि पुढचे सगळे सोपस्कार. सगळं कसं रीतसर , रूढीप्रमाणे झालेलं. आधीची दोन स्थळं मुलं चांगली असूनही नन्दनाने नाकारली होती. ‘कां’ ते तिला सांगता येत नव्हतं.

आई खनपटीलाच बसली तेव्हा नन्दना थोडी चिडली होती. तिच्या नकाराला आईचा आक्षेप नव्हता. पण तिला नन्दनाकडून समर्पक कारण हवं होतं.नन्दना ते नेमक्या शब्दात व्यक्त करू शकत नव्हती.मुलं देखणी होती. रुबाबदार होती.आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतली होती. पण कां कुणास ठाऊक त्यांच्याकडे पाहून हा आपला जन्माचा जोडीदार असावा असं तिला मनोमन वाटलेलं नव्हतं..!

राहुलकडे पहाताच मात्र..?  नंदनाला बघताना,तिला जुजबी प्रश्न विचारताना,राहुलचे  मिष्किल डोळे हसत होते. त्या डोळ्यांचं ते हसणं नन्दनाला सुखावून गेलं होतं. जाताना त्याची हसरी नजर चोरपावलानं नन्दनाच्या मनात सहवासाची ओढ पेरुन गेली होती..! राहुल बद्दलची प्रेमभावना त्यामुळेच नैसर्गिकपणे फुलणाऱ्या फुलासारखी नन्दनाच्या मनात उमलंत गेलेली होती..!

एरवी नन्दनाने दिलेल्या आधीच्या एक-दोन नकारांच्या वेळी चिडलेली नन्दनाची आई तिच्या या होकाराने मात्र दुखावली गेली होती. नन्दनाचा होकार तिच्यासाठी अनपेक्षितच होता.

” अजून हातात काही स्थळं आहेत नन्दना.ती पाहू या. उगाच होकाराची घाई कशाला?”

” पण या स्थळात वाईट काय आहे ?” आण्णा नंदनाच्या मदतीला धावले होते.

” ते तुम्हाला समजणार नाही. शेवटी तडजोडी बायकांनाच कराव्या लागतात.तिचं जेव्हा  जळेल ना,तेव्हा तिला कळेल,पण तोवर खूप उशीर झालेला असेल”

” तुला एवढी भिती कशाची वाटतेय?”

” चार माणसांचं कुटुंब आपलं.जे हवं ते फारसे हट्ट न करता मिळत आलंय तिला आजपर्यंत.तिथं एकत्र कुटुंबात रहावं लागणाराय.तिला जमणाराय कां सगळं?”

“मला जमेल” नंदना स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली.

अखेर आण्णांनीच आईची समजूत घातली.”अगं, घरचा धंदा व्यवसाय असणाऱ्यांची ‘एकत्र कुटुंब’ ही गरज असते.वेगळे संसार त्यांना सोईचे नसतात आणि परवडणारेही नसतात. नन्दना लाडात वाढलीय हे खरं, पण ती लाडावलेली नाहीय हे नक्की. ती जबाबदारीने सगळं नक्कीच निभावून नेईल.” आई निरुत्तर झाली होती. पण तिच्या कपाळावरच्या आठ्या मात्र लग्नाची तयारी सुरू झाली तरी विरलेल्या नव्हत्या.नन्दनाला राहुलची हसरी नजर खुणावत होती. राहुलची आठवण झाली की त्रासिक चेहऱ्याची आई तिला जास्तच कोरडी, व्यवहारी  वाटायला लागायची.एकदम कुणीतरी  अगदी परकीच..!

——————-

राहुलच्या घरातलं वातावरण नन्दनाला खूप मोकळं, प्रसन्न वाटलं. तिथे परकेपण नव्हतंच. सुगंधात भिजलेला मोकळा श्वास तिथं राहुलच्या रूपानं स्वागताला उत्सुक होता. राहुलच्या मिठीत तो सुगंध नन्दना भरभरून प्याली. तृप्त झाली. पण…? राहुलच्या सहवासातला आनंद, घरातली प्रसन्नता आणि मोकळेपण..ही सगळी तिच्या स्वतःच्या मनोवृत्तीची तिच्या मनात उमटलेली प्रतिबिंबंच होती हे तिच्या लगेच लक्षात आलंच नसलं तरी हळूहळू तिला ते उमगणार होतंच. म्हणूनच नव्या नवलाईचे सुरुवातीचे दिवस असे धुंदीत तरंगतच गेले.

त्या चार दिवसात माहेरची आठवण तिला आलीच नव्हती. त्या दिवशी आईचा फोन आला आणि नन्दनाला हे घरची आठवण न होणं प्रथमच तीव्रतेने जाणवलं. ‘ तिकडे आई अण्णा मात्र आपली आठवण काढत चार रात्री तळमळत राहिले असतील..’ नुसत्या कल्पनेनंच नन्दनाचे डोळे भरून आले. महत्प्रयासाने तिने दाबून धरलेला हुंदका तिच्याही नकळत फुटलाच.

“नन्दना, काय झालं गं..?”

“नाही..काही नाही..”

” कशी आहेस..?”

“मी..मी छान आहे.मजेत..”

” खरं सांगतेयस ना..?”   

“हो गं. तुझी शप्पथ.आई, तू..कशी..आहेस?”

“माझं काय गं..मी बरी आहे..” आईचा आवाजही थोडा      ओलावला होताच.”तू मजेत आहे म्हणालीस ना,आता बरं वाटलं बघ.जीवाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. माझ्याही आणि यांच्याही..”

” काहीतरीच काय गं?”

” बरं, ते राहू दे. हे बघ, राहुलच्या आई घरी आहेत कां? मी बोलते त्यांच्याशी. चार दिवस माहेरपणाला पाठवा म्हणून सांगते. चालेल ना?”

नन्दनाला काय बोलावं सुचेचना. जावंसं तर वाटत होतं. पाय मात्र निघणार नव्हता. तेवढ्यात राहुलच्या आईच आल्या.

“आईचा फोन आहे. तुमच्याशी बोलणाराय” तिने आपला मोबाईल त्यांच्या हातात दिला आणि त्याच क्षणी तिच्या मनातला ‘तो’ धागा तिला एकदम तटकन् तुटल्यासारखंच वाटलं. आपण जाऊ,मजेत राहूही.. पण राहुल?.. राहुलच्या आईंनी तिला मोबाईल परत दिला पण त्या दोघी काय बोलल्या हे या भांबावलेल्या अवस्थेत नन्दनाच्या लक्षातच आलं नव्हतं. जावं की जाऊ नये या दोलायमान अवस्थेत नन्दना दिवसभर अस्वस्थच राहिली..! पण… रात्री..?

“आईचा फोन आला होता ना ?” राहुलनं विचारलंच.

” हो आईंशीही बोलली ती. माहेरपणासाठी विचारत होती.”

“तू काय ठरवलंयस?तुला जायचंय?”

राहुलचा स्वर थोडा टोकदार झालेला होता.नन्दनालाही ते जाणवलं.तिने चमकून वर पाहिलं. त्याची नजर नेहमीसारखी हसत नव्हती.

“तू तुझ्या आईला काय बोललीयस? येते म्हणालीयस कां?”

राहुलचा चढलेला स्वर,त्याचं हे असं जाब विचारणं सगळंच नन्दनाला अनपेक्षित होतं. त्याच्या तीक्ष्ण नजरेला नजर देऊन ती फार वेळ पाहूच शकली नाही. तिने आपली नजर खाली वळवली. भरून येतायतसं वाटणाऱ्या डोळयांना तिने निर्धाराने गप्प बसवलं.

“मी येते म्हणालेली नाहीये.ती या विषयावर आईंशी बोललीय. त्या काय म्हणाल्या कुणास ठाऊक ” शक्यतो शांत राहायचा प्रयत्न करीत नन्दना म्हणाली. आणि मग राहूलचा स्वर आणि नजर दोन्ही क्षणात निवळली.

” तू विचारलं नाहीस आईला?” त्याने हसत विचारलं.

“अंहं”

“का ?”

“कां असं नाही..पण..”

” ती नको म्हणेल अशी भिती वाटली का?”

“अजिबात नाही”

“आता मी सांगतो ते शांतपणे ऐक.आईने त्यांना ‘मी राहुलशी बोलून घेते’असं सांगितलं होतं. रात्री त्यांना पुन्हा फोन करायलाही सुचवून ठेवलं होतं. हे बघ.रात्रीचे दहा वाजून गेलेत. कुठं आलाय त्यांचा फोन अजून? आला तर काय सांगायचं?”

… तिच्या मनातला तिचा हसरा राहुल तिची नजर चुकवून कुठेतरी दडून बसलाय असंच तिला वाटत राहिलं. लग्नानंतरचं या घरातलं मोकळं आणि प्रसन्न वातावरण तिला एकदम कोंदट वाटू लागलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलचा डायलटोन.

” बघ तुझ्या आईचाच असणार.”

नन्दनाने न बोलता मोबाईल उचलला.फोन आईचा नव्हता. आण्णांचा होता.

आण्णांचा आवाज ऐकला आणि नन्दनाला एकदम भरून आलं.

” कसे आहात? तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही ना?”आण्णांनी हसत विचारलं.

” नाही हो. काहीतरीच काय?”

” राहुल आहेत ना तिथे? मी बोलू त्यांच्याशी?”

“हो.. देते.”

” राहुल, अण्णा तुझ्याशी बोलतायत.”

” माझ्याशी? कशाला?” मनातली नाराजी लपवायचा प्रयत्न करीत छान प्रसन्न हसून तिने लटक्या रागाने राहुलकडे पाहिलं.

“असं काय करतोयस रे? घे ना..बोल पटकन्.”

“हां आण्णा. हो.आई बोलली मला. आम्हाला कांहीच हरकत नाहीये..पण.. पण एक मिनिट.” मोबाईल वर हात ठेवून राहुल क्षणभर थांबला.मग हलक्या आवाजात नन्दनाला म्हणाला,

” आई सत्यनारायणाची पूजा करायची म्हणतेय आणि मी त्यानंतरची आपली महाबळेश्वरची बुकिंग केलीयत. बघ काय ठरवतेस? माहेर हवंय की महाबळेश्वर?” नन्दनाकडे पहात तो मिष्किल हसत राहिला.

” तू म्हणशील तसं” ठरवून सुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाही. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही….!

क्रमश:….

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाखातील एक सून..भाग 2…अनामिक☆ संग्राहक – सौ. मेधा सहस्रबुद्धे

? जीवनरंग ❤️

☆ लाखातील एक सून..भाग 2…अनामिक☆ संग्राहक – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?  इथून पुढे —-

लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल.  जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला. वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं. तू दिलेला शी – सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला, तुला फ्रिडम दिलं,  उच्च शिक्षण, उत्तम करियर, परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?… असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझंही जरा स ऐकून घे.  

मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना. नविन नविन खूप रडायला यायचं. आईची आठवण त्रस्त करायची.

तू कामात बिझी असायचा, अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच. कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना.

आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले. अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं ? 

हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही. उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. 

पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं, जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते. मग अश्या वेळी  काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?    

अमितचे डोळे भरून आले. तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला, “मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का ? पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर.”

“अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची ? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने, 

आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते अमित.”

अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याचं चुकलंच होतं. नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला.

नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. “अरे अमित तू ? ये बाळा, झोपला नाहीस का अजून ? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही हं येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी.”

नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला. 

“नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो. उलट यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी.”

लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले. 

केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि.. चिमुकले घरही मग आनंदाने हसले….

समाप्त 

ले.: अनामिक

सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाखातील एक सून..भाग 1…अनामिक☆ संग्राहक – सौ. मेधा सहस्रबुद्धे

? जीवनरंग ❤️

☆ लाखातील एक सून..भाग 1…अनामिक☆ संग्राहक – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू  लागला.

“मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे. प्रतिक आणि प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे मग काय आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं. 

अनायसे रविवारच आहे उद्या धम्माल करूया सगळे मिळून. आणि हो, प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी काही तरी अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून. खाऊन खाऊन त्याच्या पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे, असं  म्हणून अमित खळखळून हसला. 

त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो. 

मैत्रीची जादूच खरं आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना ?

बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाची छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता. 

हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता. 

घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा, म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत. 

मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलदोडा व सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट, स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता.  

गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता. 

सगळेच जण हसण्या – बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला, “नाना अहो हे काय, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही. जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा पाहू.”   

भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले, तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. “असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर. काही काळजी करू नका.” असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली.  

थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले, तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला, “वा ! मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत गं. 

खरंच खूप छान वाटतंय आज मला. फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा, अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू. काही उमजत नाही गं आताशा त्यांना. उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग.”

अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. “हो रे, अगदी बरोबर आहे तुझं. कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायचं ? पडलेलं राहू देत जावूया एकटंच त्यांना त्यांच्या रूम मध्ये, नाही का ?

मला एक सांग अमित, तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ? तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील, मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?

क्रमशः….

ले.: अनामिक

सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक दिवस…. भाग १ व २☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ एक दिवस…. भाग १ व २☆ सौ राधिका भांडारकर ☆

भाग १

एखादा दिवस असा उजाडतो की,त्या दिवशीचा प्रत्येक क्षण दडपणाखाली असतो फार उदास निराश,चिंतातुर व्हायला होतं.स्वत:वरचा विश्वास उडून जातो.काहीतरी चूक करतोय् असं वाटत रहातं!

कारण नसताना आयुष्यात फार धोका तर नाही ना पत्करला? त्यापेक्षा एखादं सुरक्षित साचेबंद आयुष्य जगणं बरं… स्वत:बद्दलच्या कल्पना नको.निराळ्यावाटा नकोत. काहीतरी टिकवताना मनाची फसवणुक करतोय् का! कशासाठी? काय मिळवण्यासाठी?..

मोनानं रात्रभर झोपू दिलं नाही.सर्दी ,हलका ताप..

रात्रभर बेचैन होती..सकाळी सकाळी तिला झोप लागली.

पण माझा दिवस उगवला होता.त्यातून शेखरला लवकर जायचं होतं.त्याचा लाईन आउट होता.म्हणजे सबंध दिवस त्याचा साईटवर जाणार.मोनाला आज डे केअर मधे पाठवता येणार नाही. मलाही आज रजा घेणं शक्य नव्हतं.घरुनही काम करता येणार नाही.आमच्या कंपनीच नवीन प्राॅडक्ट  लाँच होणार होतं. प्रेझेंटेशन माझंच होतं…

शेखरला विचारलं, “तुला आज गेलच पाहिजे कां?”

“अर्थातच!”त्याचं उत्तर.

मनात येतं,कधीतरी याने त्याच्या मीटींग्ज, अपाॅईन्टमेन्ट्स जुळवून घ्याव्यात की..माझंही रजांचं वेळापत्रक बघावं लागतं.अजुन वर्ष संपायला वेळ आहे.

शेखरची तयारी भराभर करुन दिली.तो गेला.

क्षणभर वाटलं..’मी कमावते..खरं म्हणजे शेखरपेक्षा थोडं जास्तच..मला कंपनीत मान आहे.माझ्या शिक्षणाचं करीअरचं चीज होतंय या सर्वांचं  महत्व कोणाला आहे?

शेखर तर नेहमीच म्हणतो, “सोडुन दे नोकरी…”

माझ्या धडपडीचा .स्वत्व टिकवण्याचा संसाराला काहीच उपयोग नाही का?हे जे राहणीमान सांभाळलय त्यात माझ्या कर्तृत्वाचा काहीच वाटा नाही का? ही जाणीव त्याला आहे का? असेलही .पण कबुली नाही. ईगो..

प्रेस्टीज ईश्शु…मला मात्र सारखं अपराधी वाटत..प्रचंड गील्ट येतो कधीकधी….

निघताना साराला सगळ्या सुचना दिल्या.

“सारा  मोनाचं डे केअर नाहीय्..

तिला मऊ भात भरवायचा.त्यात थोडी पालेभाजी कालवायची.या बाटलीतले औषध दोनदा द्यायचे.

दुपारी चाॅकलेट मिल्क दे.संध्याकाळी केळं भरव..”

तीनचार वेळा हा पाढा घोकला.

साराला सवयीनं सगळं माहीत झालंय् .मोनाला घरी ठेवायचं असलं की मी तिला बोलावते.ती करतेही

व्यवस्थित..तरीही धाकधुक .साशंक मन…

आॅफीसमधे जायला निघताना सारा म्हणालीही..

“नका काळजी करा ताई .निवांत जावा..मि हाय ना…”

साराच्या या  बोलानं कितीतरी धीर मिळाला.

तसा मोनाचा त्रास नसतोच.खूप शहाणी गुणी आहे ती. पण तिचं शहाणपणच मला हळवं करत.माझ्या मागे तिच्या वाटेला येणारं हे काही तासांचं विलगीकरण…ती दिवसभर मजेत असते.खेळते बागडते कारण ती अजाण आहे…तिच्या भावनांना अजुन आकार नाही आलाय्…

आफीसमधे पोचेपर्यंत विचारांची साखळी तुटली नाही….

भाग २

पपांची मेल आली होती.आजीच्या तब्येती विषयी लिहीलं होतं.रजा मिळाली तर येउन जा एखादा अठवडा..तिलाही बरं वाटेल..वर्ष उलटलं तू आली नाहीस.. 

आधीचं दडपण या मेलनं आणखी वाढलं.  जाॅब नसता तर भुर्रकन् उडुन जाउन आजीला भेटुन आले असते…

ऊगीच मोठे झालो. बंधनं वाढली अन् माया दूर गेली.जवळची माणसं दूर गेली.त्यांचा सहवास मिळत नाही…त्यातून व्हीसाचे प्राॅब्लेम्स.वेळ मिळाल्यावर पपांना सविस्तर मेल लिहायचं ठरवलं..

“माझं छान चाललंय्..मोनाही रुटीनशी अॅड्जस्ट झाली आहे.मला लवकरच वरची पोस्ट मिळेल.मागच्या रविवारीच एका सोशल कँपच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली..इथल्या ईमीग्रन्ट्सच्या बर्‍याच समस्या आहेत.दिसतं तसं, वाटतं तसं, काहीच नाही…दुरून डोंगर साजरे..”पपा खूश होतील मेल वाचून.

प्रेझेंटेशन छान झालं. खूप अभिनंदन.खूप प्रशंसा.!!

थोडं रिकामपण मिळालं.

पुन्हा मनातला कोवळा कोंब हलकेच उघडला. वाटलं इतका वेळ यांत्रिकपणे काम केलं’जणू मी म्हणजे एकच व्यक्ती नव्हते.दोन वेगळ्या व्यक्ति एकाच ठिकाणी एकत्र आल्यासारख्या होत्या.त्यातली एक निरंतर चिंतातुर. सतत टेन्स्. विचारमग्न. आत्मविश्वास हरवलेली. काय चूक काय बरोबर काहीच न समजु शकणारी..

पण दुसर्‍या व्यक्तीने त्या व्यक्तीलवर वर्चस्व गाजवलं होतं. ती तेजस्वी होती, निराळी होती. स्वत:ची ओळख टिकवणारी..आत्मनिर्भर….

उठले. पटकन घरचा नंबर फिरवला.काही वेळ रिंग वाजली पण फोन ऊचलला गेला नाही. तोपर्यंत मनात हजार शंका…पण पलिकडुन फोन उचलला गेला आणि मी लगेच म्हणाले, “मी बोलतेय्..”

मोनाच्या रडण्याचा आवाज येत होता.पुन्हा कालवाकालव!!!

“मोना कां रडते?”

“आत्ता झोपेतुन उठली”

“भात खाल्ला?”

“हो”

“औषध दिलंस?”

“हो”

“आणि चाॅकलेट मिल्क?”

“सगळं नाही संपवलं…”

बरं. संध्याकाळी तिला वाॅश दे आणि कम्युनाटी पार्क मधे घेउन जा….”मला जरा उशीर होईल.

जरा टेन्शन दूर झाल्यासारखं वाटलं.पण तगमग होतीच.

कदाचित ही तगमग आयुष्यभर राहील. जणु माझा अतुट घटक असल्यासारखी.खरं म्हणजे शेखर जेव्हां म्हणतो “जाॅब सोड..”तेव्हां वाटतही द्यावा सोडून.लाईफ पीसफुल होईल.पण नाही..स्वत:लाच हरवुन बसल्याची एक भलीमोठी रूखरूख कायम राहून जाईल.म्हणजे कुठलीतरी एक शांती मिळवण्यासाठी दुसरीकडे अशांत रहायचं.साराच विरोधाभास.यातूनच सीझन्ड व्हायचं..

संध्याकाळच्या मीटींगला हजर राहण्याची मुळीच इच्छा नव्हती. वाटलं सांगून द्यावं, “माझी मुलगी आजारी आहे, मला नाही थांबता येणार…”पण सगळीकडे बरोबरी करायची.समान हक्कासाठी भांडायचं.आणि मग अपरिहार्य कारणाचं पांघरुण पसरुन सवलत मागायची हे बरोबर नाही….

ऊशीर झालाच होता.पटापट ड्राॅवर आवरले.किल्ल्या, पर्स उचलली..वाॅशरुमलाही गेले नाही.लिफ्टने तडक पार्कींग लाॅटमधेच आले…

क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना..

गाडीजवळ चक्क शेखर उभा!! सोबत मोनाही.. नवा ड्रेस.

हातात रंगीत बलुन्स..मस्त मजेत होती… 

“अग!लवकरच घरी आलो.काॅन्ट्रॅक्टरला गाईडलाईन्स दिल्या.. पुढचं बघेल तो.शिवाय मोनाला डाॅक्टरकडेही घेउन गेलो.तसं विशेष काहीच नाही.शी इज् व्हेरी  हेल्दी

चल, मोनाला घेउन मार्बल पार्कमधे जाऊ.जेऊनच घरी परतु…..

हो !आणि एक खुशखबर!! आपलं ई ए डी आलं. आता आपण भारतात जाउ शकतो..ठरवुया…”

मन कसं एकदम शांत झालं.! सकाळपासुन आलेली निराशा मरगळ  निगेटीव्हीटी ओसरुन गेली.किती छोट्या गोष्टी पण वादळं मात्र मोठी..

सकाळी शेखर खूपच अडमुठा, हेकेखोर आणि टीप्पीकल वाटला होता…

 पण आता मात्र  एक समंजस, सहाय्यक, मनातलं जाणणारा जोडीदार वाटला….

आयुष्याची वाट खूप मोठी आहे पण आता हातात हात घालुन चालू शकु असा विश्वास बळावला…..

समाप्त

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – पाच ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – पाच ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

वटव्रत आणि त्याची भयंकर सांगता चेरीला टाळायची आहे. त्यामुळे मदत मागायला मोठ्या विश्वासाने ती सीमाकडे आली आहे .आता पुढे ..

एवढं बोलून झाल्यावर, चेरी आपादमस्तक थरथर कापते आहे, तिचा चेहरा पांढरा फटक पडलाय, तोंड कोरडे पडल्याने ती बोलूच शकत नाहीय… हे सगळं सीमाच्या लक्षात आलं .फाशी लावून ‘सगळी आत्महत्या करणार? वडिलांना मोक्ष देऊन स्वतः दीर्घायुषी होण्यासाठी?  अतर्क्य!’….तरीही आपली उडालेले घाबरगुंडी लपवून सीमानं  चेरीला आधार दिला. तिच्या पाठीवर आपुलकीने हात फिरवत तिला विचारलं,            ” ह्या पाईप आणि भोकांच्या मागं काय तर्क आहे?”

“अगं फाशीला लोंबकाळल्यावर आमचे आत्मे शरीरातून पाइपद्वारे वरती जाणार. तिथल्या आत्म्यांना गती देऊन पुन्हा भोकामधून आमच्या शरीरात प्रवेश करणार. मृतात्मे स्वर्गात …तर आम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य उपभोगणार!…..”

सीमा उद्गारली,” ओ माय गॉड!…. नऊ जणांची अंधश्रद्धेमुळे…इतक्या टोकाला गेलेल्या अंधश्रध्देमुळे…  सामूहिक आत्महत्या…माझी  तर मतीच कुंठित झालीय…”

तरी सगळं धैर्य एकवटून…मोठी जबाबरीची भूमिका घेत ती चेरीला समजावू लागली की आम्ही तुझी सर्वतोपरी मदत करू.तू योग्य जागी आली आहेस.

खूप वेळ पसरलेल्या भयाण शांततेला चिरत, स्वतःच्या भावनांवर मिळवलेल्या ताब्यामुळे, आशावाद…अन् आत्मविश्वासाने भरून गेलेली चेरी ठामपणे बोलू लागली,

“पण हे सगळं मी होऊ देणार नाही. कारण तू मला मदत करणारच आहेस. बराचसा मुख्य  पुरावा आता तुझ्या मोबाईलमधे आहेच. मंगळवारी संध्याकाळपासून मदिरा प्राशन करून पूजा सुरू होईल….. पण मी तिथे नसेन…. बॅकयार्डच्या कुंपणाच्या तारा मी वाकवून ठेवल्यात. त्यामुळे मी आजच्या सारखीच मंगळवारी पण बाहेर पडेन.”

डायरी घेऊन जाता जाता ती पुन्हा थांबली. म्हणाली,” आता मी पूर्वीसारखी लेचीपेची राहिली नाहीय. त्यामुळे वड- व्रताचा विचार माझ्या मेंदूचा भुगा पण करू शकला नाही. आणि मला वेड पण लागलं नाही. माझं नशीब पण जोरावरच आहे त्यामुळे तू मला आज घरातच भेटलीस. नाही तर…. हो ,माझं आता ठरलंय… सगळ्यांना मी वाचवणारच आहे…. तुझ्या मदतीने ..आणि हो, यापुढे मी त्या घरात राहणार ही नाही.. जर हा जो सगळा बच्चूवाला विचित्रपणा आहे नां तो सोडून… मेडिकल सायन्सची मदत घेऊन… नॉर्मल जीवन जगायला माझा पती तयार असेल तर त्याच्या बरोबर ,नाहीतर त्याच्या शिवाय ,….पण मी आता आत्मसन्मानानं,माझ्या टर्म वर जगणार आहे. ती गेली…

अजय आल्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता सीमानं सगळा वृतांत त्याला सांगितला. दोघांनी मोबाईल मधले डायरीचे फोटो वाचले . हे सगळे खूप गंभीरपणे घ्यायची गरज होती आणि वेळ वाया न घालवता उपाय पण शोधायची गरज होती.अजयने अंनिसच्या पाटील काकांची मदत घेतली.. आणि सगळी चक्र जोरात फिरू लागली. अजय, पाटील काका, वकील, सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट,  पोलिस यंत्रणा सर्वांनी विचारविमर्श करुन , प्लॅन तयार केला…आणि मंगळवारचा भयंकर प्रसंग घडू न देण्यासाठी ते सज्ज झाले . कोण्या तांत्रिक-मांत्रिकाचा यात हात नसल्याची माहिती त्यांना प्रयत्न केल्यावर मिळाली. त्यामुळे हे कृत्य घरच्यांचे आहे हे उघड झाले .

मंगळवार उजाडला .सीमाचं घर कामात लक्षच लागत नव्हतं. नेमकं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. आज वटपौर्णिमा !वडावर पूजा करणाऱ्या बायकांची गर्दी दिसली… पण…जशी तिची पारंब्यावर नजर गेली… तसं तिच्या हातापायातलं त्राणच गेलं.

तिच्या मनःचक्षूला पारंब्यांच्याजागी , लोंबकळणारी…. वाऱ्याबरोबर हलणारी,….

जीभ बाहेर आलेली…नऊ प्रेतेच दिसत होती…खिडकी बंद केली तरी डोळ्यासमोरचं ते  दृश्य जाईना. मनातली तळमळ जाईना.चेरी येऊ शकेल ना ?….. सगळ्या गोष्टी प्लॅन प्रमाणं होतील ना?….. शंका..शंका….आणि फक्त शंकाच.. मनात थैमान घालत होत्या.

संध्याकाळी चेरी आली. तशी सीमाला हायसं वाटलं. दोघी गळ्यात गळे घालून रडल्या.पण नंतर एकमेकींना धीर देत राहिल्या.कानात- डोळ्यात प्राण आणून दोघी मोबाईलकडे आणि घड्याळाकडे पाहत राहिल्या.  घड्याळाचा काटा पुढे सरकतच नाहीय असं दोघींना वाटत राहिलं….. शेवटी एक मोठा मेसेज आला ‘खूप मोठी जीवितहानी टळलीय…. पण माताजी वाचू शकल्या नाहीत.आणि या सगळ्याचा सूत्रधार जीवन मेहता, व त्याला साथ देणारे सर्व – त्याची पत्नी ,भाऊ, आणि बहीण पोलीस कस्टडीत आहेत .या प्रसंगाने भयभीत झालेले इतर कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये अंडर- ऑब्झर्वेशन आहेत.

फोनवर झडप घालून दोघींनी मेसेज वाचला.सीमानं सुटकेचा निश्वास टाकला… प्लॅन तसा खूपसा सक्सेसफुल झाला याबद्दल… पण त्या न पाहिलेल्या माताजींबद्दल तिला हळहळ ही वाटत राहिली….आणि चेरी?…तिची फारच विचित्र अवस्था झाली होती.क्षणात ती देवाचे आभार मानत होती.. तर क्षणात जोर-जोरात रडत होती. तिच्या पाठीवरून हात फिरवत , तिला सांत्वना देता देता सीमा विचार करत होती,’ हे उभ्या घराला लागलेलं खग्रास चंद्रग्रहण  आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे लागण्यापूर्वीच सुटले. पण माताजींचा बळी गेलाच…चेरी पुन्हा पुन्हा मेसेज वाचतेय. तिचं दुःख आपण समजू शकतोय…. पण…. त्या बिचारीच्या संसाराला, आशा -आकांक्षांना, उत्साह, उमेदीला, सुखी दांपत्य  जीवनाच्या पाहिलेल्या स्वप्नांना.. सगळ्या सगळ्याला लागलेलं एक खग्रास, आजवर न सुटलेलं ग्रहण, कधी सुटेल का? त्यातून ती बाहेर पडेल का?’

एक मोठा सुस्कारा सोडून सीमा निशब्दपणे चेरीकडे पाहत राहिली.

  क्रमशः…

कथा समाप्त. पण ज्या सत्यघटनेवर ती  आधारित आहे, ती घटना सहाव्या आणि सातव्या भागात.

 

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – चार ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – चार ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

चेरीच्या पत्रावरून सीमाला तिचं अभागीपण जाणवलं आहे. आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही ,याचे तिला वाईट ही वाटत आहे .मे महिन्याची सुट्टी संपून गेल्यामुळे मुले पुण्याला परत गेलीत.आणि तिला फार एकाकीपण जाणवत आहे. आता पुढे…..

पावसाळ्यातील कुंद वातावरण… रोगट हवा…. पावसानं ओल्या झालेल्या गवताचा विचित्र उग्र वास…. त्यामुळे सीमाच्या मनातही मळभ साचलं होतं. विमनस्कपणे ती खिडकीजवळ उभी होती …रस्त्यावरची रहदारी न्याहाळत ! घरासमोरच्या सार्वजनिक पार्कमध्ये शुकशुकाट होता .सुट्टीतली गर्दी, वडा पिंपळाच्या पारावरची

धक्का- मुक्की, वडाच्या पारंब्यावर लोंबकाळत झोका घेण्याच्या लायनीत तर तिची मुलेही सामील असायची .तिला सगळं आठवलं आणि मन फारच हळवं होऊन गेलं.

अचानक कोणीतरी दारावर पुन्हा पुन्हा धक्के देतय  आणि बेलही जोरजोरात वाजवतय हे लक्षात आल्यावर पुढं होऊन सीमानं दरवाजा उघडला…..अन् तुफानी वाऱ्याच्या  वेगाने आत येऊन चेरी तिच्य्या गळ्यात पडली. “सेव्ह मी सीमा!”म्हणत रडू लागली.

सीमाला काय करावं सुचेना. आपल्या हातातली एक डायरी सीमाच्या हातात देऊन चेरी न थांबता बोलत राहिली,                ” सीमा तुझ्या मोबाईल कॅमेऱ्यामधून डायरीतल्या या पानापासून मागे- मागे जात जितके जास्तीत जास्त फोटो काढता येतील तेवढे काढ, प्लीज माझ्यासाठी !जास्त वेळ नाहीये माझ्याकडे…. अन् फोटो काढून झाल्यावर मी काय सांगेन ते ऐक…. प्रश्न न विचारता!

आधी धापा टाकणारी ती, दीर्घ श्वसन करत खुर्चीवर बसली. डायरी पुन्हा आपल्या हातात घेतल्यावर जरा सावरल्यासारखी झाली.. अन् बोलू लागली,”थँक गॉड !तू आता घरातच होतीस .आता सगळं चांगलंच होणाराय.माझं मन मला ग्वाही देतय….फक्त तुझी मदत हवीय आणि ती मिळणारच आहे .”

चेरी आश्वस्त होऊन बोलत होती. पण सीमाला तिच्या बोलण्यावरून काहीच बोध होत नव्हता.

“सीमा लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच मी घरात एकटी आहे.माझ्या सोबतीला ठेवलेल्या ‘मेड’ला मी पिक्चरला पाठवून दिलंय. पुरुष मंडळी कामावर, तर इतर सर्वजण बारशाला गेलेत. मी वांझ म्हणून घरीच! देवानं जणू मला ही संधीच दिलीय.”

एक दीर्घ श्वास सोडून ती पुढे म्हणाली,” अगं वड-आवसे पासून वडपौर्णिमेपर्यंत , एक विचित्र असं व्रत आमच्याकडे चालू झालंय. ते सांगताना सुद्धा अंगात कापरं भरतंय. मंगळवारी वटपौर्णिमेला व्रत संपेल…. आणि बहुतेक आम्ही घरची सर्व मंडळी सुध्दा!”

सीमाच्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे पाहून ती पुढे सांगू लागली,” माझ्या त्या मोठ्या पत्रात मी जे सांगितलं होतं तेच ते गं……मोठ्या दीरांना बाबूजी दिसतात, बोलतात हे सगळं….आणि आता नशीब पण अशी खेळी खेळतंय बघ, की ते डायरीत लिहिले गेलेले बरेच बोल खरे होताहेत. आमचे सगळे छोटे-मोठे उद्योग खूप भरभराट करत आहेत. ज्वेलरी, टेक्स्टाईल ,रिअल इस्टेटमध्ये तर बघायलाच नको…!त्यामुळे घरदार भारावून, झपाटून गेल्यागत वागतंय. दीरांना देवाचा दर्जा दिला जातोय. त्यांच्यामुळंच हे मिरॅकल  घडतंय असं सर्वांना वाटतंय.या भयंकर वडव्रताचं उद्यापन तर आणखीच भयानक आहे. घरातली मोठी माणसं तर सोडाच ,पण ‘टीन एजर्स कंपनी’ पण ब्रेन वॉश केल्यागत वागते आहे.

हेच सगळं तुला सांगून तुझी मदत घ्यायला मी आलेय. वीस दिवसांपूर्वी रात्री एक अतिभयंकर ,अकल्पनीय प्रकार घडलाय .बाबूजी म्हणे रात्री ओक्साबोक्शी रडत प्रकट झाले…अगं त्यांचं बोलणं’बच्चूनं’  डायरीत पण लिहून काढलंय.”

बाबूजी म्हणत होते,..असं दीर म्हणताहेत हं….” बेटा मला ही भूत योनी सहन होत नाहीये…. मला सद्गती, मोक्ष हवाय. माझ्याप्रमाणेच लाजो मावशी,बिट्टू राजेश,सोहनलाल ,तिवारीजी, निमा, कल्पना,हितेश असे आम्ही नऊ जण इथं घुटमळतोय. तुला शेवटचं मागणं मागतोय ….वडव्रत कर. आम्हाला मोक्ष मिळेल. आणि तुम्ही पण दीर्घायुषी व्हाल.”

” डायरी प्रमाणे सगळे विधी संपन्न करण्यासाठी ही मूर्ख माणसं कामाला लागलीत….अगं बाबूजींनी दीरांना सांगितलेल्या नावापैकी चार जणं अजून जिवंत आहेत. भूत योनीत कुठली घुटमळला?मला वाटतंय  बहुतेक माझे दीर सायको झालेत.त्यांना होणारे विचित्र भास अन् ऐकू येणारा बाबूजींचा आवाज ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात?.. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. पण माझं म्हणणं कोण ऐकणार ?” पुन्हा प्रत्येक शब्दावर जोर देत चेरी म्हणाली,

“पुढे ऐक ,न घाबरता…तुझ्या हिंंमतीवरच आता सगळं अवलंबून आहे… …. विधीप्रमाणे वरच्या मजल्यावरच्या गच्चीकडील भिंतीला नऊ आरपार भोकं पाडली गेलीत ..त्याला चांगला गिलावा ही केलाय.त्याच्या शेजारी अशाच आरपार नऊ पाईप फिट केल्यात. हॉलमध्येआठ बार आणि माता जींच्या खोलीत एक बार जरा कमी उंचीवर फिट केलाय.

वड आवसे पासून सर्वांचे रात्री पूजा प्रकरण,.. आणि तामसी खाणे पिणे चालू झालेय …उद्या पासून सगळ्या नोकर चाकरांना सुट्टी!….. परवा दोरखंड आणून त्याचे नऊ गळफास तयार करायचेत….इकडे नणंदबाई आणि जाऊ दोघी मोठ्या उत्साहाने पायाखाली घ्यायची नऊ स्टुलं घेऊन आल्यात…. आता फक्त पौर्णिमेची वाट बघायचं काम बाकी. पौर्णिमेला संध्याकाळी खग्रास चंद्रग्रहण लागेल… ग्रहण स्पर्श झाला की सगळ्यांनी स्टुलावर उभे राहायचं… गळ्यात फास अडकवून घ्यायचा….अन् दीरांची शिट्टी ऐकली की पायाखालची स्टुलं ढकलून देऊन सगळ्यांनी फाशीवर

लोंबकाळायचं…….”

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – तीन ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – तीन ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

*कथा न सुटलेलं ग्रहण  भाग 3 एका सत्य घटनेवर आधारित! ती सत्य घटना भाग 6 आणि 7 मध्ये..(चेरी पत्रात आपल्या  सासर बद्दलचे भयंकर अनुभव सांगत आहे. अस्तित्वातच नसलेले दाम्पत्य जीवन आणि तिचे वांझ हे विशेषण ती निमुटपणे सहन करत असते.) यापुढे…..

पाच वर्षापूर्वी बाबूजी वारले….खरं सांगू ,मला मनातनं  या गोष्टीसाठी आनंद झाला की आता तरी या घरातलं विचित्र कर्मकांड बंद होईल .पण कसलं काय!….एकदा अर्ध्या रात्रीतच दीरांचा जोरजोरात हसण्याचा आवाज बंगला भर पसरला… आणि जावेचा रडण्याचा आवाज पण…. आम्हा सगळ्यांना तिथं बघून खोलीच्या एका कोपर्‍यात कडे बोट करून त्यांनी नमस्कार केला.

पुन्हा जोरात हसून ते सांगू लागले,”माताजी, अहो बाबूजी तिथं बसलेत.ते मला काहीतरी सांगणार आहेत.”… आणि

मग ‘बच्चू’ला दीरांना वडिलांचे ऐकू जाणारे बोलणे ,जे दीर मोठ्या आवाजात रिपीट करत होते, ते सगळे एका डायरीत लिहून काढायचे काम लावले गेले.

माझा आत्मा भटकतोय…. मला सद् गती मिळाली नाहीय…. असं करा, प्रत्येक मंगळवारी माझ्या देवाची पूजा करा ….आणि अन्नदान, वस्त्रदान ,सुवर्णदान, शर्करादान  असं एका पाठोपाठ एक करत रहा .त्यानं मला मुक्ती मिळेल.”

त्याप्रमाणे सगळं सध्या केलं जात आहे .

आणखी सांगायचं तर ,तसं आमचं जीवन पण इतरांहून वेगळं आहे. आमच्या मेहता कुटुंबात स्त्रियांना एकटं बाहेर पडण्यास बंदी आहे .मोबाईल वापरण्यावर बंदी,….लँड लाईन,टीव्ही माताजींच्या खोलीत!…. सगळे नोकर चाकर त्यांचे हेर आहेत… आणि माझ्यावर तर घरातल्या लहानथोर सगळ्यांचंच बारकाईने लक्ष !

आम्हा बायकांचा टाइमपास म्हणजे- किट्टी पार्ट्यांना जाणं…मोठमोठ्या हॉटेलमध्ये आमच्या किट्टी क्लबांच्या पार्ट्या होतात. रमी, तंबोलाचे राऊंड ,सर्वांच्या पर्स   भरण्याचं आणि रिकामं  करण्याचं कामही करतात. शॅंपेनच्या बाटल्या रिकाम्या करणं, जेवताना तोंडी लावण्यासाठी गॉसिप , आपल्या किंमती वस्त्रांचं आणि ज्वेलरीचा प्रदर्शन करणं .हे सगळं ओघानं आलंच. आमचे शॉपिंग ,आमचे वाढदिवस… हे तेवढे सहपरिवार परदेशात साजरे होतात .सिंगापूर, दुबईला  जाणं म्हणजे आम्हा लोकांच्या दृष्टीनं ,घरातून अंगणात जाण्या पैकी प्रकार आहे. हे सगळं असलं बेगडी आयुष्य माझ्या मनाला आनंद देत नाही. तिळ- तिळ तुटत मी जगतेय.

पुढे पत्राचा समारोप करताना तिनं लिहिलं होतं,

“तुला शेजारच्या बंगल्यात पाहिल्यावर आपलं माणूस भेटल्याचा मला आनंद झाला. शेजारी उभ्या असलेल्या नणंदे समोर तुला ओळख दाखवून मला निराधार व्हायचं नव्हतं. खरंच हे पत्र लिहून… माझ्या आयुष्याचं दुःख …माझी कुचंबलेली स्थिती..माझी फरफट तुला सांगून मी बंधन मुक्त झालेय. खरं तर तू मला स्वार्थीच म्हणायला हवंस.आपली कथा- व्यथा सांगताना मी साधं तुझं क्षेमकुशल ही विचारलं नाहीय… पण तुला बागेत प्रसन्न चेहऱ्याने, रिलॅक्स मुडमधे काम करताना मी पाहते ना, तेव्हा माझी खात्री पटते की तुला मनपसंत जीवनसाथी मिळालाय.. आणि तू आपलं जीवन मनसोक्त जगतेस…..

‘अभागी चेरी ‘हा पत्राचा शेवट सीमाच्या अश्रूंनी पुसून टाकला होता,पहिल्या वाचनातच!

अजय दुसऱ्या दिवशी पत्र वाचून म्हणाला,” बाप रे, सुशिक्षित, उच्चभ्रू समाजातील लोकअसेहीअसतात ?….सगळंच भयंकर आणि अघोरी वाटतंय. पुन्हा विचार करून तो म्हणाला ,”सीमा ही तुझी मैत्रीण ऍबनॉर्मल बुद्धीची तर नाहीये ना? नाही तर आपलं म्हणणं लोकांना पटावं म्हणून, त्यांची सहानुभूती मिळावी म्हणून लोक कुठल्याही थराला जाऊन वक्तव्य करतात.

“नाही रे, शाळेत पण ती तशी नव्हती. आता तर तिचं माहेरही संपलय .तिच्या दुःखावर फुंकर घालायला आहे तरी कोण? तिचं आयुष्य कसं रखरखीत वाळवंट आहे बघ. मला तर तिच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही याचं फार वाईट वाटतंय .”

थोड्या दिवसाने चेरीचा विषय सीमाच्या मनातून उतरून गेला .कारण ती कधी भेटू शकणारही नव्हती त्यामुळे ..पण आपण पत्र वाचले आहे हे कळावे म्हणून चेरीने पत्रात लिहिल्याप्रमाणे एक पांढरा रुमाल जास्वंदीच्या झाडाला बांधून तिने चेरीची खात्री मात्र करून दिली होती.

नंतर मेच्या सुट्टीत मुले आली .त्यांच्या सहवासात दिवस हां हां  म्हणता पळाले. सुट्टी संपली. मुलं परत गेली अन् तिला घरात पूर्वीपेक्षा जास्त एकटेपणा जाणवू लागला.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – दोन ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)

(चेरीने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेली सीमा चेरीने पाठवलेले पत्र टेबलावर भिरकावून देते. ज्यात तिने आपला जीवनपट मांडला आहे. पण त्याचे आता दूसरे वाचन चालू आहे……आता पुढे)

एके दिवशी आईनं सांगितलं ,”चेरी बेटा तुझं लग्न ठरवतोय. मुलगा देखणा आहे. तुमची जोडी फार शोभून दिसेल. शिवाय तो सी.ए.आहे. त्या फॅमिलीचे खूप बिजनेस आहेत… वेगवेगळ्या क्षेत्रातले …त्या सर्वांची मॅनेजमेंट त्याच्याच हातात आहे. घराणं आपल्यापेक्षा धनाढ्य आहे. जॉइंट फॅमिली आहे. लोक फार चांगले आणि शिकले-सवरलेले पण आहेत. एकदा तुझं लग्न झालं की तुझ्या भैयाच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याबरोबर मलाही साउथ आफ्रिकेत शिफ्ट व्हावे लागेल .तुझं माहेरी येणं…. आपली पुन्हा भेट होणं…. कितपत शक्य होईल? काहीच माहित नाही. या सगळ्या  विचारांनीच माझा जीव तिळतिळ तुटतोय …माझी रात्रीची झोप पण उडून गेलीय. पण काय करणार?निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य मला कुठे आहे?…. पण आर्थिक बाबतीत म्हणशील तर तुझ्या नावावर दोन फ्लॅट, एक बंगला, बँकेत भरपूर पैसा- ज्वेलरी असं सगळं तुझ्या बाबांनीआधीच करून ठेवलंय.”

मोठ्या दणक्यात माझं लग्न झालं… आणि एका छोट्या कैदेतून मोठ्या कैदेत माझी विदाई झाली. इथे कशात काही कमी नाही, पण खूप काही कमी आहे, हे मला इथं राहिल्यावर कळलं.

लग्नाच्या दुसऱ्या दिवसा पासूनच माझ्या दुर्दैवाला सुरुवात झाली .माझी ‘मुँह दिखाईकी’ रस्म चालू होती. त्याच वेळी माझ्या नणदेचे पती चक्कर येऊन पडले…. अन् पाच मिनिटातच त्यांचं हार्टफेलनं देहावसान झालं. घरात दुःखाचा सागर उमडला. त्यातून बाहेर यायला दोन तीन महिने लागले. नंतर आमच्या नणंदबाई आपला बंगला भाड्याने देऊन मुलीसह आमच्याकडेच राहायला आल्या. त्यात गैर काहीच नव्हतं. पण तेव्हापासून माताजी आणि आणि वन्सबाई या दोघींनी मला तू पांढऱ्या पायाची आहेस .अवदसा आहेस .तुझी नजर फार वाईट आहे. तू सगळ्यांना खाऊन बसणार आहेस. अशा तऱ्हेचे व अर्थाचे टोमणे मारायला सुरुवात केली. हे सगळं कमी होतं म्हणून की काय …लग्नानंतर सहा महिन्यातच आई वारली. इथेच! साउथ आफ्रिकेत जायच्या आधीच.अन् मायेच्या सावलीला मी मुकले.आता जगात माझं असं कोणीच नाही .नवरा सुद्धा!

घरातल्या लोकांची वागणूक जरा विचित्र आहे हा माझा संशय हळूहळू दृढ होत गेला.अमावस्या,पौर्णिमा ,प्रदोष, शनिवार अशा दिवशी नेहमी नाही ,पण कधी कधी घरात रात्री बारा वाजल्यापासून विशेष पूजा चालायची. पूजा बाबूजी करायचे. ह्यांना कपाळभर गुलाल लावला जायचा .थोड्या वेळातच हे अंगात येऊन घुमू लागायचे .यांना पूजेच्या मधेच प्रश्न विचारले जायचे. आणखी सुबत्ता…. आणखी धन…. व्यापारात जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा पाडाव….. प्रश्न मुख्यतः या बाबतचेच असायचे. मला हे सगळे थोतांड वाटायचे.

“अलकनंदे, कपाळावर आठ्या नकोत. नीट लक्ष देऊन पूजा पहा.” माताजी माझ्यावर गुरगुरायच्या.

पण पूजा साहित्यातल्या लिंबं, गुलाल ,सुया, काळ्या बाहूल्या …यासारख्या वस्तू पाहून माझ्या अंगावर काटा यायचा. पशुबळी पण कधी कधी दिला जायचा. कधी कवट्या मांडून पूजा चालायची. मला पूजेच्या ठिकाणी बसावंच लागायचं .

सकाळी उठून पहावं तर सगळ्यांचं वागणं नार्मल! चहाच्या टेबलावर सगळ्यांच्या गप्पा ,थट्टामस्करी, हसणं सगळंअगदी नेहमीप्रमाणं! माताजी-बाबूजींच्या बोलण्यात मी यांचा उल्लेख कधीतरी एकदा’ बीच का बच्चू,असा ऐकला होता… म्हणजे लहानपणापासून ह्यांचा उपयोग ते माध्यम म्हणून करून घेत असावेत ….किंवा यांना हिप्नोटाईज करत असावेत… नाहीतर यांची दुभंगलेली पर्सनॅलिटी असावी…. असा माझा संशय होता. एकीकडे कुटुंबवत्सल, शांत, हुशार असा नॉर्मल माणूस ..आणि दुसरीकडे तो अंगात येऊन घुमणारा विचित्र ‘बीच का बच्चू’!

लग्नानंतरची दहा वर्षे मी हाच प्रकार झेलत आलेय. आत्तापर्यंत नणंदेची मुलगी, जावेची मुलगी, मुलगा सगळीच मोठी आणि कळती झालीत. पण लहानपणापासून ती या कर्मकांडात आनंदाने सामील होत आलीत .शिक्षणाने पण त्यांच्या विचारात काहीच फरक पडलेला नाही. कारण त्यांचा माईंड- सेटच तसा ॲबनार्मल  झाला आहे. हेच त्यांचे संस्कार आहेत. या घरात मी एकटीच मूर्ख आणि नास्तिक! तशी तर घरातली मोठी माणसे पण खूप शिकलेली आहेत. आपले उद्योग धंदे उत्तम प्रकारे चालवताहेत. अडाणी थोडीच आहेत !पण या विचित्र पूजांबाबत अबालवृद्ध सगळेच पूर्ण अंधश्रद्धा आहेत… आणि सगळ्यांचाच एक अलिखित नियम म्हणजे त्यातला कोणीही याबाबत घराबाहेर काही सांगत नाही.

मला मूलबाळ झालं नाही. होणार तरी कसं? पती-पत्नीला एकत्र येऊच दिलं नाही तर ! हे लहानपणापासूनच ‘बीच का बच्चू!..व्रत,उपास-तापास, अनुष्ठानं यामुळं त्यांना स्त्रीसंग बरेचदा वर्जच असतो. कधी कधी मला त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात माझ्या बद्दल प्रेम भाव दिसतो… पण अचानक ‘तो बच्चू’ त्यांच्यावर हावी होतो. अन् केविलवाणा चेहरा करून ते माझ्या जवळून दूर निघून जातात …पण माझ्या मनाला मी कसं समजावू? सासरी प्रवेश केल्यापासूनच दांपत्य जीवनाबद्दलची माझी सुंदर स्वप्नं, माझ्या सोनेरी आशा, माझी उमेद,अपार उत्साह… सगळ्याचा चुराडा चुराडा झालाय. माझं मन नेहमी ठणकत असतं. आतल्या आत रडत असतं आणि एकाकीपणा अनुभवत ‘वांझ ‘हे विशेषण खाली मान घालून ऐकत मी जगत राहते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print