सौ. आरती अरविंद लिमये
जीवनरंग
☆ प्रवास – भाग 3 ☆ सौ. आरती अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – आदल्या रात्री बटाट्याच्या काचर्या, ब्रेकफास्टला बटाटेवडे आणि आता बटाट्याचा रस्सा. त्याचे सहकारी शांतपणे जेवण वाढण्याची तयारी करत होते. कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टूरिस्टही सगळा आनंद न् उत्साह हरवून बसले होते. वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता. जेवण संपताच एक वयस्कर प्रवासी बोलायला उठून उभे राहिले.)
“मंदार, आम्हा २४ जणांपैकी दहा जण जास्तीचे पैसे द्यायला तयार आहेत. तू हिशोब कर, आम्हाला एक आकडा सांग. पुण्याला परतल्यावर मात्र तू स्वतः दिलेला शब्द पाळ.” त्यांनी सांगितले. मंदारला हे सगळं अनपेक्षित होतं. त्याने दोन्ही हात जोडून त्यांना नम्रपणे नमस्कार केला. मळभ भरुन आलं तसं क्षणार्धात विरुनही गेलं. टूरिस्टसनी दाखवलेल्या समंजसपणामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे उरलेली टूर छान पार पडली.
पुण्यात रात्री उतरल्यावर त्याने त्या दहा प्रवाशांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आॅफिसमधे यायला सांगितलं.तो स्वत: नऊ वाजताच ऑफीसला पोचला. नानूभाई आजच परत आले होते. तो केबिनमध्ये गेला. तिथे नानूभाईंसमोर त्यांचे चिरंजीवही होते.
“मंदार..?” मंदारला पहाताच नानूभाईंनी सूचकपणे आपल्या चिरंजीवांकडे पाहिले. आधी ठरल्याप्रमाणे पैसे न आल्यामुळे झालेली गैरसोय आणि टूरिस्टना विश्वासात घेऊन आपण अडचणीतून कसा मार्ग काढला हे मंदारने सविस्तर सांगितलं. नानूभाई शांतपणे ऐकून घेत होते.
“ते दहा टूरिस्ट आत्ता दहा वाजता इथे येणार आहेत. तेव्हा त्यांचे पैसे परत द्यावे लागतील ” मंदार म्हणाला. हे ऐकताच चिरंजीव एकदम संतापलेच.
“त्या दहा जणांना आत्ताची वेळ दिलीयस? कुणाला विचारुन? आणि कशासाठी बोलावले आहेस?”
“कशासाठी म्हणजे? त्यांचे पैसे परत करायला नकोत का?”
“कुणाला विचारून त्यांच्याकडून पैसे घेतलेस होतेस तू?”
“हे तुम्ही विचारताय मला? तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार चार दिवसांनी तुम्ही पैसे पाठवायला हवे होतेत. पाठवलेत? मी फोन केला तेव्हा बंगल्यावर फोन करुन मॅडमशी बोलायला सांगितलंत. त्यानी मला रात्री उशीरा फोन करायला सांगितलं. मी तसा फोन केला तेव्हा तो त्यांनी उचललाही नव्हता. मी सरांना फोन केला, तो नो रिप्लाय लागला. अशा परिस्थितीत काय करायला हवं होतं मी ? कंपनीचं हित लक्षात घेऊन, कंपनीचं प्रेस्टीज सांभाळणं आणि टूरिस्टना योग्य सर्व्हिस देणं माझं कर्तव्य होतं. मी तेच केलं.”
“व्हाॅट नाॅन्सेस. कंपनीचं हित पहायला आम्ही मालक समर्थ आहोत. दिलेल्या पैशात काटकसर केली असतीस तर सात दिवस सहज निभावले असते.”
“पण का करायची काटकसर ? त्या सर्वांकडून पूर्ण रक्कम आपण आगाऊ वसूल केलीय ना आपण? त्या बदल्यात ज्या ज्या सोयी आणि सेवा आपण प्रॉमिस केल्यात त्या त्यांना द्यायला हव्यातच ना?”
“ते शहाणपण तू मला शिकवू नकोस. त्यांना द्यायच्या सेवेचं निमित्त सांगून त्यांच्याबरोबर तसंच चमचमीत आणि गोडधोड ओरपायला सोकावलायत तुम्ही सगळे. काटकसर कशी न् कुठे करायची शिकवायलाच हवंय तुम्हा सर्वाना..”
त्यांच्या बेजबाबदार शब्दांमधला शेवटचा घाव मात्र मंदारच्या वर्मी लागला.
“मी काय बोलू यावर?” त्याने हतबलपणे नानूभाईंकडे पाहिलं. नानूभाईंनी त्याची नजर चुकवली. चिरंजीव खुर्ची मागे ढकलून तणतणत उठून निघून गेले. आता फक्त नानूभाई काय बोलतात ते ऐकायला मंदारचे कान आतुर झालेले होते.
“ती मंडळी आली की आत पाठव. मी त्यांच्याशी बोलतो.” एवढेच बोलून नानूभाई खाली बघून कांही लिहू लागले.
मंदार घुटमळला. मग न बोलता बाहेर आला. नानूभाई कोणते खरे न् कोणते खोटे त्याला समजेचना. आता क्षणार्धात ते सर्वजण येतील. त्यांना नानूभाईंकडे घेऊन जाऊन त्यांची ओळख करुन देण्यापलिकडे आपल्या हातात कांहीच नाहीय या विचाराने तो हतबल झाला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. कांही झालं तरी त्यांना न्याय मिळायलाच हवा असं त्याला तिव्रतेने वाटलं तेवढ्यात..
“मंदाsर…”
नानूभाईंच्या चिरंजीवांच्या हाकेने तो भानावर आला. त्याला खरंतर आत्ता या क्षणी त्या माणसाचं तोंड बघायचीही इच्छा नव्हती. पण नाईलाजाने तो पुढे झाला.
“हे बघ मंदार,चार दिवसांनी शिमला-कुलू-मनाली टूर आहे. हा त्याचा फायनल प्लॅन. आज रेस्ट घे न् उद्या सकाळी नऊच्या मिटिंगला हजर रहा “
मंदारला आता इथे गुंतून पडावंसं वाटेचना.
“नाही सर, नको. इथे या पद्धतीने काम करण्यात मला आता अजिबात स्वारस्य नाहीय”
“तू हे असं अचानक कसं काय सांगू शकतोस?”
“इथे बऱ्याच गोष्टी अचानकच घडताहेत सर. त्यावरची माझी ही प्रतिक्रिया समजा”
”ठीक आहे. तुझी मर्जी. तू गेलास तर बाहेर शंभरजणं क्यू लावून उभे रहातील हे लक्षात ठेव.”
त्याला झिडकारुन चिरंजीव बाहेर निघून गेले. पण मंदार मात्र शांतपणे तिथंच बसून राहिला. आपण बोललो ते योग्य की अयोग्य या संभ्रमात तो अस्वस्थ असतानाच ते दहा प्रवासी आत आले. मंदारने कांहीच न घडल्यासारखं त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. त्यांना घेऊन तो नानूभाईंकडे गेला.
नानूभाईनी प्रथम त्या सर्वांना धन्यवाद देऊन मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांचे बँक अकाउंट नंबर्स लिहून घेतले. चार दिवसात त्यावर त्यांनी ज्यादा भरलेल्या पैशांचे चेक जमा होतील असे आश्वासन दिले. कंपनीसमोर अकस्मात आलेल्या काही तांत्रिक अडचणी सांगून त्यांचं समाधान करायचा प्रयत्न मंदारला खरंच खूप केविलवाणा वाटत राहिला.
सांगितल्याप्रमाणे रोख पैसे न मिळाल्याने कांहीशा नाराजीने ते दहा जण परत गेले. त्यांना निरोप देताना मंदारला स्वत:लाच अपराधी वाटत राहिलं. तो खूप अस्वस्थ झाला. देवधरांचे फोनवरचे बोल त्याच्या मनात घुमू लागले. नानूभाईंचे चिरंजीव त्याला वाटेल तसं घालून पाडून बोलत असताना नानूभाईंनी दाखवलेली उदासीनता त्याच्या हृदयाला चरे पाडू लागली. अपेक्षाभंगाची ही भळभळती जखम घेऊनच त्याने राजीनामा खरडला. तेवढ्यांत नानूभाई बाहेर आले. त्याला तिथेच थांबलेला पाहून नानूभाईना आश्चर्य वाटलं. मंदारच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी त्याला केबीनमधे बोलावलं. समोर बसायला सांगितलं
“मंदार, तू केलंस ते त्या परिस्थितीत योग्यच होतं. पण इथेही काही प्रॉब्लेम्स असतात. त्याचा डोक्याला ताप होतो. तुला त्याने इतकं संतापून बोलायला नको होतं. स्वभावाला औषध नाही हेच खरं. तो संतापाच्या भरात कांही उलटसुलट बोलला तर तू मनावर घेऊ नकोस.”
त्यांचा हतबल स्वर स्पष्ट न बोलताही बरंच कांही सांगू पहात होता असंच मंदारला वाटत राहिलं.
“सर, टूरवरचं आम्हा सर्व स्टाफचं जगणं किती जिकिरीचं असतं हे मी वेगळं सांगायला नकोय. आम्हाला कौतुक, प्रोत्साहन नाही पण उभारी देणारे दोन शब्द तरी हवेतच ना? आपला काहीही दोष नसताना यापुढे हे असं ऐकून घेणं मला फार अवघड वाटतंय. प्लीज मला माफ करा.” असं म्हणून त्याने आपलं राजीनामापत्र त्यांच्यापुढं ठेवलं. नानूभाईनी त्यावरुन नजर फिरवली. त्यांच्या नजरेतली अस्वस्थता मंदारला स्पष्ट जाणवली.
“हा निर्णय घ्यायला तू थोडी घाई करतोय असं नाही वाटत?”
तो काहीच बोलला नाही. गप्प उभा राहिला. नानूभाईनी क्षणभर वाट पाहिली. मग कसनुसं हसले.
“ठिकाय. पण एक कर. बाहेर काळेंकडे जाऊन तुझे राहिलेले सगळे पेमेंट घे आधी. मी त्यांना फोन करुन सांगतो”
मनातली अस्वस्थता मनातच थोपवून नानूभाई शांतपणे म्हणाले.
मंदार उठून जायला निघाला.
“आणखी एक. माझा निरोप घेतल्याशिवाय जाऊ नकोस”
तो परत आला तेव्हा नानूभाईनी एक बंद पाकीट त्याच्या हातात दिलं.
” हे काय?”
“जे तुला आत्ताच आणि मीच द्यायला हवं. मी दिलेली सदिच्छा भेट समज.घे.”
त्याने पाकीट घेऊन त्यांना नमस्कार केला.
“अरे, उघडून तरी बघ.” ते म्हणाले. त्याने उघडलं तर आत कंपनीच्या लेटरहेडवर नानूभाईंच्या सही-शिक्क्यासह मंदारचं कौतुक करणारं, त्यांनी दिलेलं ते ‘ एक्सपिरीयन्स- सर्टिफिकेट ‘ होतं..! तो अविश्वासाने त्यांच्याकडे पहातच राहिला. पुन्हा एकदा तो नमस्कारासाठी वाकला तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून नानुभाई म्हणाले, ‘शुभास्ते पंथानः संतु’ त्याला गलबलून आलं. त्यांची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती. निरोपाचा क्षण आला होता पण आता मनात खेद खंत यांना थारा नव्हता. दोघांनीही न बोलता एकमेकांना समजून घेतलं होतं..!
नानूभाईंचं प्रशस्तीपत्र आज या क्षेत्रात लाख-मोलाचं होतं. ही सदिच्छांची शिदोरी घेऊन तो ताठ मानेनं बाहेर पडला. या क्षेत्रातली सोनेरी भविष्याची स्वप्ने मनात तरळत असतानाच पुढील प्रवासास तो सिद्ध झाला .
– समाप्त –
©️ सौ. आरती अरविंद लिमये
सांगली
मोबाईल 8698906463
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈