सौ.अंजली दिलिप गोखले
☆ जीवनरंग ☆ विज्ञान कथा – बलिदान – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
“अरेच्या! काय विचित्र मनाचा माणूस आहे हा! हि परप्रांतातील मुलगी आपलं आयुष्य याच्यावर उधळायला तयार आहे आणि याची याला काहीही किंमत नाही आणि फक्त या विक्षिप्त बरोबर आयुष्य काढायचं? कोणाशीही संपर्क ठेवायचा नाही? काय आहे काय याच्या मनात?”
“निलेश, कशासाठी ही अट? काय प्रयोग करणार आहेस का तिच्यावर?” मी विचारले.
“एक्झॅक्टली !त्यासाठीच मी तिची निवड केली.हे बघ,तिने मला हॉटेलवर उद्या जेवायला बोलावले, त्यावेळी तू ही ये. तुझ्या साक्षीनेच मी तिलाही घालणार आहे. एका दृष्टीने उद्याच्या दिवस माझ्या आणि तिच्याही आयुष्यातला महत्त्वाचा ठरणार आहे”.
“अरे पण मला का मध्ये घालतोय? तुमचं तुम्हीच ठरवा ना. मी आलेले तिला आवडणार नाही.”
“ठीक आहे. तू येऊ नको माझं मी बघून घेईन.”या विक्षिप्त मित्राने विक्षिप्तपणा पुन्हा एकदा सिद्ध करत मला गप्प केलं.
दुसऱ्या दिवशी मीच रात्री आठ पासून त्याची चातकासारखी वाट पहात रूमवर बसलो होतो.साडेनऊ झाले तरी याचा पत्ता नाही.शेवटी दहा साडेदहाला निलेश आला. माझ्याशी काहीही न बोलता डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपला ही ! मला वाटले,चंदाने बहुदा नकार दिलेला दिसतो. कोण्याच्या विचित्र पणाला आनंदाने होकार देईल?
दुसऱ्यादिवशी लायब्ररीत चंदा भेटली. ती मात्र अगदी खूश दिसत होती. लांबूनच हाय करून तिने मला थांबण्याची खूण केली.मला वाटले आता हि पुन्हा निलेश संबंधी, त्याच्या त्या अटी संबंधी माझं डोकं खाणार. पण झालं भलतंच. लगबगीने माझ्यापाशी येऊन चंदा म्हणाली “चला एका चांगल्या न्यूज बद्दल मी तुम्हाला कॉफी देणार आहे.”
“चांगली न्यूज?” मी आश्चर्य करीत तिच्याकडे बघत राहिलो. “तुम्हाला निलेशने काहीच सांगितले नाही ना? अहो त्याच्या प्रपोजलला मी होकार दिलाय.” “काय?” मी केवढ्यांदा किंचाळलोच. ” खरच, मी त्याच्या शिवाय जगू शकत नाही. शिवाय त्याच्या संशोधनात मी मदत करू शकते ना! काय पाहिजे मला?”
आणि खरच, परीक्षा झाल्या झाल्या निलेश च्या बागेतच, अगदी साधेपणानं थोड्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी विवाह केला.
ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवसापासून आम्हा कोणालाच भेटली नाही. मी दोन-तीनदा बघितले त्यांच्या घरीही गेलो. पण चंदाचे नखही मला दिसले नाही. बरे निलेश ला विचारावे तर हा, “तुला काय करायचे? म्हणायलाही कमी करायचा नाही किंवा माझ्याकडे येऊ नको माझ्याशी बोलू नको असेही म्हणाय चा.” मी आपला गप्पच राहिलो.
त्यादिवशी त्यानेच आपण होऊन आपल्या धाडसी प्रयोगाची माहिती मला दिली. त्याच्यामते आपण मानव खाण्याच्या बाबतीत सर्वस्वी वनस्पतीवर अवलंबून आहोत. आपला मेंदू प्रगल्भ आहे. इतके नवनवीन शोध लावतो, पण आपले स्वतःचे अन्न आपण तयार करू शकत नाही, जे फक्त वनस्पती करतात. वनस्पतीमध्ये मुख्यत्वे क्लोरोफिल नावाचे हिरवे रंगद्रव्य असते. केवळ त्यामुळे ते आपले स्वतःचे अन्न,ग्लुकोज तयार करू शकतात.आपल्या शरीरात क्लोरोफिल नाही. मी काय करणार, क्लोरोफिल,, पाणी, झिंक, मॅग्नेशियम सलाईन मधून इंजेक्ट करणार आहे. त्यामुळे पेशींच्या रचनेत बदल घडवून वनस्पतींत प्रमाणे आपल्या ही पेशी अन्न तयार करू शकतील. हा माझा प्रयोग यशस्वी झाला तर या जगात पहिली मानव ठरेल कि जी खरीखुरी स्वयंसिद्ध असेल. तिच्यासाठी मी मुद्दाम काथ्यांनी विणलेली कॉट तयार करून घेतली आहे.चार-पाच च्या अंगणात झकास ऊन येते.तिथं ही कॉट ठेवणार आहे.एक मोठा काचेचा गोल डोम तयार करून घेणार, कॉटच्या भोवती ठेवणार. कारण हा प्रयोग यशस्वी व्हायला किती महिने लागतील कोण जाणे? तिला पावसाचा, थंडी चा,उन्हाचा त्रास नको व्हायला”.
एका दमात त्याने आपल्या प्रयोगाची रूपरेषा मला सांगितली. “अरे,तिला कायम झोपून ठेवणार तू? त्रास नाही का होणार?” मी काळजीने विचारले. “हे बघ, ती आपणहून तयार झाली आहे. मी काही मागे लागलो नव्हतो किंवा तिला फोर्स केला नाही. आता सगळं ठरलं आम्ही दोघं लवकरच प्रयोग सुरू करणार आहोत.”
“ठीक आहे. ऑल द बेस्ट! तुम्हा दोघांनाही. उद्या मी चाललोय बेंगलोरला. परत येईन तेव्हा भेटूच. गुड बाय!”
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈