मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सुनेत्रा आपल्या स्वत:च्याच फोटो कडे उदास पणे बघत होती. अगदी अलिकडचा ३-४ महिन्यापूर्वीचा भावाच्या नातवाचा वाढदिवस  व आईचे सहस्रचंद्रदर्शन या निमित्ताने काढलेले  फोटो ! प्रत्येक फोटोत तिचा चेहरा हसरा होता.पण तिला तो निस्तेज वाटत होता. डावा डोळा थोडा बारीकच दिसतो अलिकडे. पाच सहा वर्षांपूर्वी डोळे आले होते तिचे. infection फारच  severe.बरे व्हायला महिन्या पेक्षा जास्त दिवस गेले. डोळे बरे  झाले. पण डाव्या डोळ्याची पापणी अर्धवट झुकलेलीच असे. Eye ptosis— असे निदान झाले. सुदैवानं कोणताही मोठा दोष  नव्हता.परंतु डोळा बारीकच राहिला.

सगळ्यांनी लहानपणापासून केलेले काैतुक आठवत ती फोटो बघत राहिली.मोठे टपोरे असूनही तिचे डोळे शांत होते. आश्वासक नजरेने ती सर्वांना आपलेसे करत असे.एव्हढंच कशाला लग्न ठरले तेंव्हादेखील तिचे डोळे बघुनच पसंती आली होती की ! आज मात्र बारीक झालेला डोळा चेहर्‍याला sick look देत होता.

हातातला फोटो बाजूला ठेऊन  ती उठली. बसून चालणार नव्हते.आज लेकाची पावभाजीची ऑर्डर होती.तो कॉलेज मधून येईपर्यंत सगळं तयार हवं.! पण ब्रेड व बटर दिसत नाहीय घरात. म्हणजे मार्केट मध्ये जायला हवे. जवळच्याच कॉलनीतल्या सुपर शॉपीत तर जायचे.तिने फक्त ओढणी व पर्स घेतली.पण जाताजाता वर पिनअप केलेले केस सोडून पॉनिटेलचा शेपटा मोकळा केला.मन पुन्हा भूतकाळात गेले.आपले केस कधी क्लचर मध्ये बांधता येतील असे तिला वाटत नसे. पूर्वी  जाडजूड लांब सडक शेपटा पाठीवर कंबरेच्या खालपर्यंत रुळत असे.तो इतकासा कसा व केंव्हा झाला ? ती पुन्हा उदास झाली.

मान झटकून तिने हातात कुलुप घेतले व चप्पल पायात अडकवले. ऊजव्या पायाच्या अंगठयाचे बोट गेल्या वर्षी मोडले होते.प्लॅस्टर वगैरे उपचार झाले पण ते वाकडेच राहिले. त्यामुळे तिला पायात चप्पलही काळजीपूर्वक सरकवावे लागे.

काय हे ?किती गबाळ्या,कुरुप,विचित्र दिसतोय आपण.आपल्या कॉलेजला जाणार्‍या लेकाला मित्रांच्या बरोबर आपली ओळख करून देताना लाज वाटत असेल. आणी ‘अहो’? त्यांना तरी अलिकडे आपण आवडत असू का ? तसे थोडे टाळतातच ते आपल्याला आताशा ! सुनेत्रा अगदी रडवेली झाली.

मरगळ घालण्यासाठी तिने घरात आल्यावर आशा भोसले ची गाणी ‘कारवा’ वर लावली. छानशी कॉफी करुन घेतली. आता तिचे हात सराईतपणे पावभाजी करण्यात गुंतले. सुगरणी चे हात व मन आनंदाने किचन मध्ये रमले. सर्व आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा  वाजले. दरवाजाची बेल वाजली. तिचा लेक दारात हसतमुखपणे ऊभा होता.सोबत दोन मित्र.तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने मित्रांची  ओळख करून दिली.” जाम भूक लागलीय मम्मीडे! आज मेक च्या लॅब मध्ये मेटल ब्लॉक करायचा होता. काय दमलोय यार.” असे म्हणत तो आत आला.”वाव!! काय मस्त वास सुटलाय. वासाने भूक आणखीनच खवळली  बघ “.पावभाजीवर तुटुन पडत सगळ्यांनी तिला दाद दिली. “आई तुझ्या हातात जादू आहे बघ.”

त्याचे मित्र गेल्या वर  ती हॉल मधला व ओट्यावरचा पसारा आवरत होती. तो ही मित्रांच्या व कॉलेज च्या गप्पा मारत तिला मदत करु लागला. तसे त्याच्या कॉलेज मध्ये न जाताही तिला सगळे ठाऊक होते. तोच सांगे सर्व. आला घरी की टकळी सुरुच.

आवराआवर होईपर्यंत ‘अहोंचे’आगमन झालेच. प्रथम चहा,गप्पा,TV, बातम्या,जेवण ———–जेवताना बापलेक पावभाजी ची स्तुती करत होते तोंडभरून.”अग आज ऑफिसधला तो जोश्या—- ” असे ऑफिस गप्पांचे तोंडीलावण होतेच.” तू दोन दिवस भिशी ग्रुप बरोबर जाणार आहेस ना ग महाबळेश्वरला ?दोन दिवस हॉटेल मधले बेचव खावे लागणार. क्या करे? बाबा आत्ताच पोटभर खाऊन घ्या “. अशा थट्टामस्करीत जेवणं झाली.

किचन मधील झाकापाकी करून ती बेडरुम मध्ये आली. नवरोबा केंव्हाच झोपी गेले होते. ते्व्हढ्यात तिला मोगऱ्याचा दरवळ आला. अहोंनी ऑफिस मधून येताना  मोगऱ्याचा गजरा आठवणीने आणला होता. तो ओंजळीत धरून तिने हुंगला. आणी मनावर दिवसभर आलेली मरगळ कुठच्या कुठे पळाली. विरळ झालेले लहान केस,वाकडे बोट किंवा अशक्त झालेला डोळा यांनी तिच्या प्रियजनांत काहीच फरक पडत नाही. ती सगळ्यांना अजूनही तितकीच आवडते.

बोट वाकडे झाले तरी त्यात चप्पल अडकवता येते. तिला कोणाच्याही मदतीशिवाय चालता येते.! डोळा बारीक झालाय पण दृष्टी चांगली आहे.!! विरळ केसातही गजरा चंद्रकोरी सारखा सजतोच ना!!!

छोट्या छोट्या कृतींमधून घरातल्यांच्या भावना तिच्या पर्यंत पोचल्या होत्या. शब्दांपलीकडले खूपसे तिला उमगले. दोघांचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिला सुखावून गेला. चेहरा आत्मविश्वासाने तेजाळला. ऊशीजवळ मोगऱ्याचा गजरा ठेऊन ती हलकेच निद्रादेवीच्या आधीन झाली.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

१२/५/२०२०

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुंदरा ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ विविधा☆ सौ ज्योती विलास जोशी

‘प्राजक्त’ या माझ्या बंगल्याच्या कोपऱ्यावर एक मुलगा  गजरे घेऊन नेहमीच उभा असतो. मी फुल वेडी,नित्य नेमाने त्याच्याकडून गजरा घेऊन माझ्या वेणीत माळते.

दररोज दुपारची साडेतीनची माझी भजनाची ची वेळ! आदले दिवशी घेतलेला गजरा मी वेणीत माळलेला असे. मी भजनाहून परत येताना निमिष पर गाडी थांबवून उद्यासाठी त्याच्याकडून गजरा घेत असे.

आज मी निघतानाच तो माझ्या गाडीच्या आडवा आला. मी त्याच्याकडून गजरा घेतला. मी परतीच्या वेळी त्याच्याकडून गजरा घेणारच असताना त्याने आत्ता गाडी आडवली असे मी ड्रायव्हरला विचारले. दिवाळीचे पणत्या आकाश कंदील करायला तो जाणार होता म्हणून त्याने गडबडीने गजरा दिला. असे काहीसे ड्रायव्हरने मला सांगितले.

ड्रायव्हर त्याच्याशी काहीच बोलताना मला दिसला नाही. मग हे मूक रहस्य काय होते? मला जाणून घ्यायचं होतं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.ते खरोखरच मूक रहस्य होतं तो मुका  आणि बहिरा होता. ड्रायव्हर आणि त्याच्यात फक्त  मौन संभाषण.

प्रत्यक्ष मी गाडीतून उतरून गजरा घेत नसल्यानं मला हे कधीच समजलं नव्हतं.

बऱ्याच दिवसानंतर कॉर्नरवर त्याच्यासोबत एक सावळी मुलगी हातात गजरे घेऊन उभी राहिलेली दिसली.”वहिनी,ही त्या गजरे वाल्याची बायको बघा” ड्रायव्हरने माहिती पुरवली.

मी आज गाडीतून खाली उतरले. सांकेतिक खुणांनी आपली बायको असल्याचे त्याने मला सांगितले. माझ्याकडे पाहून तिनं स्मितहास्य केलं .”नाव काय तुझं?” मी विचारलं. तिन हाताच्या बोटांनी हरिण केलं….. “सुंदरा” ?????

नाव ओळखल्याचाआनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसला.मूकपणे तिच्या मौनाचं भाषांतर झालं.तिनं लगेच बकुळीचा हार माझ्या हातात दिला आणि भर रस्त्यात ती माझ्या पाया पडली .मी तिला दोन्ही हातानी उचललं आणि अनाहूतपणे मिठी मारली.

तिचा हसरा चेहरा एक हसरा गंध देऊन गेला .त्या गंधाची झुळूक मला स्पर्शुन गेली . तिने दिलेल्या बकुळीचा वास माझ्या श्वासात भरला. सावळीशी ती किती काही बोलून गेली. तिचं मूकंपण मला बोलकं वाटलं. श्रुती आणि वाणी अबोल असलेली ती मला तिच्या मनातल्या तरंगांशी प्रामाणिक वाटली. देवाने तिच्या हातातच सुगंध पसरवायचे काम दिले असेल का ?असा विचार माझ्या मनात आला तिच्या मौनाचा अर्थ मी लावू लागले…….

निसर्गातील किती गोष्टी मौन बाळगून आहेत. जसे तारे ,आकाश, चंद्र ,नक्षत्र ,वृक्षवल्ली इत्यादी….. त्यांच्या मौनाचे रहस्य असे समजून घेता येईल का मला? वृक्षवल्लीशी आपला ‘शब्देविण संवाद’ होतोच ना ?मौन राखून ही निसर्ग निरंतर गतिशील आहेच ना ?स्पीक लिटिल डू मच असं काही सांगत असतील का ते? मूक प्राणी-पक्ष्यां च्या प्रेमा ची परिभाषा आपल्याला समजते ही मूक परिभाषा सारा आसमंत आपल्याला संक्रमित करत असेल का?

अनंतात विलीन झालेल्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली आपल्या भावना पोहोचवते ना? अशा अनेक प्रश्नांचं काहूर माझ्या मनात माजले. बकुळ गंधा सारखं चिरंतन सुवास देईल असं एक तत्त्वज्ञान आज ही अबोली मला देऊन गेली आणि मौनाचे एक मानसिक तप करायचा मी निर्धार केला!!……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

माधुरीताईचे लग्न झाल्यावर हे दोघे बाप लेकच घरांत. अण्णा सकाळी उठून पाणी भरुन, आंघोळ, पूजा, अर्चा आटपून मन्यादादा उठायच्या आंत एखाद्या गृहिणी ला लाजवेल असा स्वयंपाक करुन दोघांचे डबे भरायचे. मग ह्या महाशयांना उठवून त्यांची तयारी. करुन ऑफिस वेळेवर गाठायचे. वक्तशीर, एकदम  कडक शिस्तीचे.घर पण व्यवस्थित टापटीप. जिकडची वस्तू तिकडेच पाहिजे. अंधारात सुध्दा ती वस्तू सांपडली पाहिजे.संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर  मन्यासाठीं ताजी भाकरी करून द्यायचे.आईवेगळा पोर म्हणून लाड करायचे. आणि मन्या  फक्त अभ्यास कर. अवांतर वाचन कर.मित्रांना जमवून टाईमपास कर.कामाच्या बाबतीत इकडची काडी तिकडे करीत नसे.मन्या बोलघेवडा,बोलबच्चन.मित्रांबरोबर ह्याची मस्करी कर, त्याची टवाळी कर. कोणाच्या weak point वर हसून मित्रांचा आणि आपला time pass कर. तसा कोणाच्याही मदतीला साहेब तयार. पण त्याचाही हिशेब ठेवायला आणि वेळ प्रसंगी वसूल करायला विसरत नसे. एकदम calculative.

झालं. मन्यादादाचं लग्न झालं आम्हाला आग्रहाचे आमंत्रण होते. पुण्याला आम्ही  गेलो होतो. बायको पण छान त्याला साजेशीच होती. अण्णा खूष. आता त्यांची घरातल्या इतक्या वर्षाच्या रामरगाडयातून सुटका होणार होती. म्हणून तर त्यानी नोकरीवाली मुलगी सून न करता गृहकर्तव्यदक्ष  केली. अण्णा  फणसासारखे बाहेरुन शिस्तीचे कडक पण आतून प्रेमळ. सुनेला अगदी मुलीप्रमाणे त्यानी वागवले. पण आईची खास शिकवणी असलेली सुन त्यांच्या  वरचढ निघाली. वाटेल त्यावेळी माहेरची मंडळी येऊन रहायची. अण्णाच्या शिस्तीची आणि टापटीप पणाची वाट लावायची. आणि स्वतःच्या घरांत अण्णाच परके. त्याना वेळेवर चहापाणी नाही कि जेवण नाही. तेव्हा हा मन्या पण नंदीबैल तिचा. हळूहळू अण्णाचे वय व्हायला लागले त्यानी आयुष्यभर काटकसर करुन भरपूर सच्ची कमाई करुन ठेवलेली त्याच्यावर तिचा हक्क. माधुरीताईला काय देतील? यावर लक्ष.पण अण्णाचे करताना कर्तव्याला मागे. बाहेरगावी सगळे फिरुन यायचे आठ, आठ दिवस आणि अण्णा बिच्चारे एकटे घरी. आता त्याना स्वयंपाक करायचा पण कंटाळा यायचा.झेपत नव्हते. मग चहापाव, वडापाव, फळे खाऊन ते आठ दिवस काढायचे एकटे बिच्चारे. तेव्हा कधी मन्यादादाला आपल्या सारख्या आईवेगळ्या मुलाला आयुष्यभर आईबाप दोघांची भूमिका एकट्यानी बजावून मोठे केले याचा विसर पडला. अण्णांनी कधी तरुणपणात स्वतः चा विचार केला नाही. कधी मित्र नाही का सिनेमा, नाटक नाही. मी आणि माझी मुलं. आणि एकाच घरात राहून म्हातारपणी असं एकटेपणं.

पण आता मन्यादादा, आयुष्यभर हुशा-या करणारा लोकांना बोधामृत, पाजणारा, प्रवचन देणारा, मी शहाणा बायकोच्या नंतर मुलांना शिकवलं. त्यांची लग्न केली. जग जिंकले. पण आज तो एकटा पडला अगदी त्या वेळी भरल्या घरांत एकटे पडलेले अण्णा आठवले.

बिच्चारे.

! जैसी करणी वैसी भरणी!

समाप्त 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी नाडकर्णी-नाईक

 

 ☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मन्यादादा सांगू लागला “आपण पंधरा, सोळा वर्षानी भेटलो.त्यात माझ्या आयुष्यात बरेच चांगले, वाईट प्रसंग घडून गेले.दुसरासा माणूस खचला असता पण मी मुळातच हॅपी गो लक्की,हालमें खुशाल रहायची  वृत्ती म्हणून ठणठणीत आहे. मीरा, माझी बायको दोन वर्षे अंथरूणावर होती.ती गेली.तिच्या पाठोपाठ अण्णा वयोमानानुसार अल्पशा आजाराने गेले.मग काय मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. मला तर चहा पण करता येत नव्हता.कधी घरी स्वयंपाकीण ठेवून,कधी बाहेरुन डबा आणून दिवस काढले.हळूहळू मुलगी,मंजिरी काॅलेज करून थोडा स्वयंपाक विचारुन   विचारुन, पुस्तकात वाचून करु लागली.तेव्हा तुझ्या आईची इतकी आठवण यायची.कधी त्यानी जाणवू दिलं नाही आपण शेजारी असल्याचं.तुझ्या  दादाच्या सारखंच माझं करायच्या सणवारं

गोडधोडं,माझा वाढदिवस.इतकंच काय पण माझ्या आजारपणात पथ्यपाणी पण. अण्णांना ऑफिस मध्ये  अचानक काम निघाले आणि रात्री घरी यायला उशीर झाला तर मला तुमच्या बरोबर जेवू घालायच्याच आणि अण्णासाठीं घरी डबा द्यायच्या.  अशी  देवमाणसं आता मिळणं कठीणच.

आता लग्न करुन मंजिरी गेली नव-याबरोबर यु.के.ला आणि मनोज, माझा मुलगा गेला u.s.ला तिकडेच सेटल झाला.तसे फोन असतात.हा दोघांचे. बोलवतात मला तिकडे.पण योग नाही माझा तिकडे जाण्याचा.वर बोट दाखवून म्हणाला शेवटी त्याची इच्छा. तीन वेळा ह्वीसा रिजेक्ट झाला. ‘एकला चलो रे’. बायकोचंआणि ताईचं पटत नसल्यामुळे ताईशीही संबंध नाही. “ओघ घालवला आणि ओक्साबोक्सी रडला म्हटलं, “तुझ्या वयाला योग्य अशी जोडीदारीण बघ म्हणजे एकटेपणा जाणवणार नाही. मुलं तिकडे तू एकटा इकडे दुखलंखुपलं, अडीअडचणीला हक्काचं माणूस पाहिजेना.का मी शोधू तुझ्यासाठीं?”

तर म्हणाला,”चालेल बघ.चला निघतो भेटू परत “.म्हणून त्यानी आणि माझ्या लेकानी फोन नंबरची देवाणघेवाण करुन निरोप घेतला.आम्ही घरी आलो.

नाटक विसरुनच गेले.आणि अण्णा  मन्यादादा, माधुरीताई आणि गिरगावातले बालपणीचे दिवस,त्या आठवणी जाग्या झाल्या.

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

शिवाजी  मंदिर मधून नाटक बघून बाहेर पडलो. मूड छान होता. नेहमीप्रमाणे नाटकातील पात्रे मनांत, डोळ्यासमोर नाचत होती. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बालपणीच्या, काका, काकी आत्या बरोबर घालवलेले लाडाचे दिवस. आजोळचे सुट्टीतले दिवसआठवले. तेवढ्यात बबडी, बबडी हाक ऐकू आली.मला वाटलं हा पण भासच आहे.पण तो भास नव्हता. एक साधारण साठ, पासष्ट मधला माणूस आमच्या समोर उभा. अग बबडे,लहानपणीच माहेरचं लाडाचं नाव, मी आता विसरलेच होते.कारण आता मला भरपूर उपाध्या मिळाल्या होत्या. आई, काकी, मामी, अहो आई, आजी सुध्दा. ‘अग, बबडे तुला केव्हा पासून गाठण्याचा प्रयत्न करतोय. मध्यांतरात दिसलीस आणि नंतर नाहीशी झालीस.” माझ्याबरोबर माझा चिरंजीव होता. तो प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे आणि त्या गृहस्थाकडे पहात राहिला. मी पण गोंधळले. “अग, मी मन्या”आता माझी ट्यूब पेटली. “अरे, किती बदललास तू? तूच येऊन भेटलास म्हणून. नाहीतर मी ओळखलचं नसतं. चौदा पंधरा वर्षापूर्वी भेटलेलो. तुझं रुप साफ पालटलं”

मन्या म्हणजे माझ्या दादाचा बालमित्र. गिरगांवात आमच्या शेजारीच रहायचा.  माझे बाबा आणि त्याचे वडील, अण्णा म्हणत असू आम्ही त्यांना. दोघे मित्र. माधुरी ताई आणि मन्यादादा ही त्यांना दोन मुलें.  मन्यादादाच्या लहानपणीच त्यांची आई वारल्याने अण्णाच त्यांची आई आणि वडील.अण्णाना दुसरे जगच नव्हते. ऑफिस आणि घरं. मुलांचेजेवण खाणं, अभ्यास. रविवारी त्यांना बाहेर फिरवणे. त्याच्या आजारपणांत रात्री, रात्री जागरणे करणं. मन्यादादा आणि दादा एकाच वर्गात. मन्यादादा अख्खा दिवस आमच्याकडेच असायचा. माझी आई पण त्याचे दादाच्या बरोबरीनेच करीत असे. माधुरीताईला लहान वयांतच मागणी आली. मुलगा आणि घरदारं चांगले माहितीतले असल्यामुळे एफ्. वाय् ला असतानाच अण्णांनी तिचे लग्न करुन दिले. पुण्याला तिचे सासर. आमच्याशी तिचा पत्र व्यवहार होता. तेव्हा आता सारखे फोन फारच कमी. mobile तर नव्हतेच. अण्णांची नोकरी फिरतीची  त्यांच्या बदल्या नाशिकला, नंतर साता-याला अशा होत राहिल्या. सगळे आपापल्या उदयोगधंद्यात. आमचे संबंध हळूहळू कमी झाले.

“अरे मन्यादादा, किती खराब झालास, न ओळखण्या इतपत. अण्णा कसे आहेत वहिनी कश्या आहेत. मुलं काय करतात?” तेवढ्यात चिरंजीव म्हणाले, “आई, सगळ्या  गोष्टी रस्त्यावरच बोलणार का? आपण कुठेतरी चहा घेऊ या म्हणजे मनसोक्त गप्पा मारता येतील. “आम्हालाही घरी जायची घाई नव्हती. रात्रीचे जेवण बाहेरचं घ्यायचे होतं. हे ट्रीपला गेले होते. सूनबाई चार दिवस माहेरी गेली होती. मग आम्ही तृप्ती मध्ये गेलो.

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – वस्तूचे मूल्य ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वस्तूचे मूल्य ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १५ . वस्तूचे मूल्य

कृष्णानदीच्या तीरावर सावरीच्या झाडावर एक बगळा रहात होता. एकदा त्याने त्या मार्गाने जाणाऱ्या एका हंसाला पाहून त्याला बोलावले व विचारले की, “ तुझे शरीर माझ्या शरीराप्रमाणे शुभ्र रंगाचे आहे. फक्त पाय व चोच लाल रंगाची आहे. तुझ्यासारखा पक्षी मी आजपर्यंत पहिला नाही. तू कोण आहेस? कुठून आलास?”

हंस म्हणाला, “मी ब्रम्हदेवाचा हंस आहे. मी मानससरोवरात राहतो. तिथूनच आलो आहे.” बगळ्याने पुन्हा विचारले, “तिथे कोणत्या वस्तू आहेत? तुझा आहार कोणता?” हंस उत्तरला, “तिथे असलेल्या सगळ्या वस्तू देवांनी निर्मिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सौंदर्य वर्णन करणे शक्य नाही. तरी त्यापैकी काही मुख्य वस्तूंचे वर्णन करतो ते ऐक. तिथे सर्वत्र सुवर्णभूमी आहे. अमृतासारखे जल, सोनेरी कमळे, मोत्याची वाळवंटे, इच्छित वस्तू देणारा कल्पवृक्ष आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्तू आहेत. मी सुवर्णकमळांचे देठ खातो.”

ते ऐकून “तेथे गोगलगायी आहेत की नाहीत?” असे बगळ्याने वारंवार विचारले. “नाही” असे हंसाने प्रत्युत्तर दिल्यावर बगळा मोठ्याने हसला आणि त्याने “अरे हंसा, मानससरोवर म्हणजे सुंदर प्रदेश अशी तू खूप प्रशंसा केलीस. परंतु गोगलगायीशिवाय प्रदेशाचे काय सौंदर्य? तू अजाणतेने तिथल्या वस्तू श्रेष्ठ असे बडबडतो आहेस” असे म्हणून त्याची निंदा केली.

तात्पर्य – लोक स्वतःची इच्छित वस्तू कमी दर्जाची असली तरी मौल्यवान समजतात व स्वतःला न मिळणारी, उपयुक्त नसणारी वस्तू मौल्यवान असली तरी क्षुद्र समजतात.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र:- आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज मात्र तुला ते सांगणं मला गरजेचं वाटतंय. “कोणती गोष्ट आण्णा..?)

“तुझा विश्वास नाही बसणार सावू, पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वैपाक मला कधीच आवडायचा नाही. तुझ्या आईच्या हातच्या चवीनं मला लाडावून ठेवलं होतं.तुझ्या वहिनीनं स्वैपाक केला असेल, तेव्हा ती आसपास नसताना, तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं कांहीबाही रांधून मला खाऊ घालायची. आज ती नाहीय. पण कसं कुणास ठाऊक, आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वैपाकाची चव मला वेगळी पण चांगली वाटते. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. हीसुध्दा सगळं मनापासून आणि प्रेमाने करते हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे. फरक आपल्या दृष्टिकोनात असतो सावू. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात. आपण त्यांच्याकडे त्याच आपुलकीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने ती आपली होऊन जातात. नाहीतर मग नातेबंध तुटायला वेळ नाही लागत. एक सांगतो ते कायम लक्षात ठेव. नाती जवळची लांबची कशीही असोत, ती नाजूक असतात. त्यांना ‘हॅंडल वुईथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात. नात्यांचं खऱ महत्व तुझी आई गेली तेव्हा मला समजलं सावू. एकटा, केविलवाणा होऊन गेलो होतो गं मी. पण तुझ्या दादा-वहिनीने मला समजून घेतलं. सांभाळलं. म्हणूनच त्या दुःखातून इतक्या लवकर मी स्वतःला सावरु शकलो.

त्या दोघांवर अचानक टाॅर्चचा प्रकाशझोत पडला आणि दोघेही दचकले.

“गप्पा संपल्या की नाही अजून?” दादाने विचारलं. दादा वहिनी दोघंही त्यांना न्यायला आले होते. तोवर भोवताली  इतकं अंधारून आल्याचं त्याना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अंधारातच बुडून गेलं होतं. पण आण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता. सगळं कसं लख्ख दिसू लागलं होतं. सविता तटकन् उठली. पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारख़ रडत राहिली. ती असं का करतेय दोघांनाही समजत नव्हतं.

“अण्णा काय झालं हिला असं अचानक!” दादानं विचारलं.

तिला काय झालंय ते फक्त आण्णानाच माहीत होतं. पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले.

“काही नाही रे. तिला तिच्या आईची आठवण झाली असेल.  म्हणून तिला बिलगलीय.”

अण्णा बोलले ते अनेकार्थांनी खऱ होतं. निदान आज, या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती जशीए काही. सविता हा क्षण मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती…!!

समाप्त

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग – 3 ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग – 3 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

*तुझी माझी जोडी जमली रे*

‘भाई’वरच्या लेखाला

‘स्मृतीगंध’ फेसबुक पेजवर

३००+ लाईक
५०+ कमेंटस
६०+ शेअर

एवढी *Good news* तरी कुणाला *congratulations* करावस वाटलं नाही, छ्या .

अरे एवढा निराश होऊ नकोस

कोण?

मी तुझा ‘भाई ‘

भाई तुम्ही?   नमस्कार , नमस्कार

हो हो ! अरे तुझा तो लेख फिरत फिरत सुनीता पर्यत पोहोचला. तिने दाखवला म्हणून तुला भेटायला आलो.

भाई आज सिनेमा पण पाहिला ?

हो हो, ते आलंच लक्षात आमच्या तो वरचा ?डायलाॅग ऐकूनच

भाई, खुपच सुरेख सिनेमा. अगदी पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत

‘*आनंदाचे डोही आनंद तरंग’* अशी अवस्था.तुमचे बाबा म्हणायचे ना ‘ *पुरुषोत्तम केवळ आनंद देण्यासाठी आला आहे*’ याचा प्रत्यय प्रत्तेक प्रसंगात खास जाणवत होता आणि ठामपणे ते म्हणाले ‘ *माझं भविष्य चुकणार नाही* ‘ म्हणून

भाई , भविष्य/ पत्रिका हा पण एक आपला आवडता विषय. महाराष्ट्राचा कुंडली संग्रहात *पान नंबर १८० वर ३७९ नंबराची कुंडली आहे प्रसिध्द लेखक,  नाटककार, कवी, संगीतकार पु.ल. देशपांडे यांची*

असं का? वा, वा

भाई, फर्गुसन च्या सरांनी तुम्हाला ‘ *धनुर्धारीत* ‘ तुमच्या आलेल्या विनोदी लेखाचे कौतुक केले आणि मला खुप आनंद झाला

का हो तुम्हाला का?

अहो भाई, आमचा पण “धनूर्धारी ” म्हणून धनू राशीवाल्यांचा Whatsapp  ग्रुप आहे. काहीबाही लिहीत असतो मी त्यावर

उत्तमच म्हणायचे.

भाई, सिनेमात तुम्हाला तुमच्या बाबांनी ” नाथ हा माझा” हे बालगंधर्वाचे गाणे पेटीवर वाजवायला सांगितले. ते पाहून मी ही थेट आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात पोहोचलो.

कुठली शाळा?

ते बघा म्हणजे… सिनेमात तुम्ही विलिंग्डन काॅलेजचा उल्लेख केलाय ना, त्याच *सांगलीतील सिटी हायस्कूल शाळा*.  त्यावेळी आमच्या ‘निलांबरी’ ला ‘वद जाऊ कुणाला शरण ग’ या नाट्यसंगीताला पेटीवर साथ केली होती.

अरे वा, म्हणजे पेटी पण वाजवता का?

हो हो भाई

आणखी काय करता?

काही बाल नाट्यात जसे गाणारा मुलुख, गोपाळदादा, कामं केली आहेत आणि भाई, संस्कृत नाटकात आमच्या प्रसाद,  सुनील बरोबर सम्राट अशोक राजाच्या सेवकाचे काम केले होते.

काय वाक्य होती?

नाही फक्त संस्कृत मधे सम्राट अशोकाची ‘हं हं’  असं म्हणत बाजू घ्यायची

छान,  छान.

कविता, गाणी याबद्दल काही

भाई गाणं म्हणण्याचा एकदाच प्रयत्न केला मागच्यावर्षी कंपनीत कल्चरल कार्यक्रम झाला तेंव्हा.

“हीच आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही प्रार्थना म्हणली.  *पण जमलं नाही नीट*

अच्छा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला जमत पण नाहीत तर.

भाई, चारोळ्यांचा मात्र नुसता पाऊस पाडतो. तो सिनेमात तुम्ही रत्नागिरीला असताना पडतो तसा.

चांगलय की मग

भाई, बेळगावला असतानाचा तुमचा एक प्रसंग आहे सिनेमात. त्यात सुनिता बाईंशी बोलताना तुम्ही म्हणता, पुण्याची मजा नाही. भाई सेम फिलींग. २-३ महिन्यातून एकदा तरी पुण्याला गेल्या शिवाय चैनच पडत नाही बघा. *आता पण एक मित्र बोलावतोय. बघू कसं जंमतय ते*.

भाई, तुम्ही जसं सुनिताबाईंना घाबरायचा असं दाखवलंय ना तसा तो पण बायकोला घाबरतो.  मित्रांची मैफल जमली की चालला  बायको बोलवतीय, रागवेल इ इ कारणे देऊन

अरे वा, अगदी मैफलीत पर्यंतच्या ब-याच गोष्टी जुळत आहेत की आपल्यात.

भाई, गोविंदराव टेंबे, कवी  गोविंदग्रज तुमचे आदर्श
तसा माझा एक मित्र गोंद्या माझा आदर्श. ?

हो का?  गोविंद, गोविंद ??

भाई सिनेमातील वसंतराव देशपांडे, कुमारगंधर्व, भीमसेन जोशी यांची *जुगलबंदी* काय रंगलीय आणि साथीला साक्षात भाई. मैफल संपलेली नाही भाई आत्ता फक्त मध्यांतर  झालयं आणी मध्यांतरानंतर परत केंव्हा मैफल चालू होईल याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतोय भाई.

भाई, त्या आधी एक राहिलं सांगायचं   गदिमांच्या गाण्याच्या एका कडव्याला तुम्ही दिलेली चाल.

*पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे*

भाई, भाई ऐकतात ना?

अहो काय चाललय तुमचं, संध्याकाळ झाली उठा आता. आणि काय बडबडत आहात,  पावसाची रिमझिम. तोंडावर पाणी मारलयं ! उठत नव्हता म्हणून. आणि काय मेलं एक तो

‘भाई’ वरचा लेख व्हायरल झाला तर भाई, भाई करत सुटलेत.??‍♂

भाई, ८ तारखेनंतर भेटू आमची सुनिता हाक मारतीय बहुतेक

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 2☆ श्री अरविंद लिमये ☆

“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. म्हणून म्हटलं. फार अंधार करू नका.”

“आण्णा?” त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले.  आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली. देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.”

“मला आधी का कळवलं नाहीत? आॅपरेशनचं?”

“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय. डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं. तू उगाच काळजी करतेस.”

“आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.

“मी… मी काम असं नाही गं…”

” काहीच करत नाही?”

“तसं म्हणजे करतो आपलं मला जमेल ते… जमेल तसं…”

“का?” तिने तीव्र शब्दात विचारलं.

“का म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम. ते गप्प बसले.

“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला. वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला. तिने तुम्हाला कामं का लावायची?”

“तुला…सारंग बोललेत का हे सगळं?”

“त्याने कशाला सांगायला हवं? आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की. दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या? तेही या वयात? वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते. गॅरेजच्या कामासाठी एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकल वरून एखादातरी हेलपाटा असतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए.. वेडी आहेस का तू? तू..तू तिला यातलं कांहिही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं? दादाशी तरी मी बोलणारच. चांगली खडसावून विचारणाराय”

“सावू… हे बघ, तू रागाच्या भरात कांही बोलशील आणि दूधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल. ऐक माझं.तू लक्ष घालावंस असं खरंच कांही नाहीय..”

हे खरं की खोटं तिला समजेचना. ती अगदी हळवी होऊन गेली. आण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले.

“सावू, काय झालं?” ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून आण्णा विचारात पडले. तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या या हळव्या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही..

“सावू, हे बघ, शांत हो. मी जे सांगतो ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत.त्यांच्या मदतीने सगळी घरकामं तीच करते. सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट दादा बघतो. तुम्ही आज अमुक एक काम करा असं त्या दोघांपैकी कुणीच मला आज पर्यंत कधीच सांगितलेलं नाही. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरी मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर उठून ते काम करू लागला. अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मी माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो”

“आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?”

“ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा मी त्यांना ‘हवं तर मी आणतो’ असं म्हटलं तर तोच ‘साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही’असंच म्हणाला होता. आज शेवटची तारीख होती. मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो. मी जायला नको होतं हे त्या  पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं..”

सविता विचारात पडली हे सगळं असंच असेल? आण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती. ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता.

“सावू, तुला सांगू? तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक. माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची. पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरलीय. सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिनपगारी रजा घेऊन घरी थांबली होती. मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं ‘आपण सावूला बोलून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल’असं. पण तुझी वहिनी ‘इतक्यात नको’ म्हणाली होती. ‘सविताताई आपल्या हुकमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? होईल तितके दिवस मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच’ असं ती म्हणायची. याच बाबतीत नाही सावू, तिने एरवीही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते. त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी.”

सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं.  “माझ्यावरील प्रेमापोटी सावू, आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस. म्हणून तुला हे सगळे सांगावं लागलं. जसा मी तसेच सावू ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज तुला मात्र ते सांगणं गरजेचं वाटतंय.”

“कोणती गोष्ट आण्णा?”

क्रमश:….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 1☆ श्री अरविंद लिमये ☆

रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली. नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती.

“जपून जा. काळजी घे.उगीच त्रागा करू नको. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल” निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरुन आलं. सविता आज पुणे-मिरज बसमधे चढली ती ही अस्वस्थता सोबत घेऊनच.समक्ष जाऊन आण्णाना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. आण्णा म्हणजे तिथे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बर्‍यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरजस्टँडला उतरून सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे.एरवी ती माहेरी जायची ते कांही फक्त आई आणि आण्णांच्या ओढीनेच नव्हतं. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की.पण आजची गोष्ट वेगळी होती.ती निघाली होती  ते तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच.सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हता.

एखाद्या माणसाच्या जाण्यानं,नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन् बदलू शकतात?तिला प्रश्न पडला. आई अचानक गेली तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती. आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आण्णांच्याबद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते.आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता.म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनिअर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आयटी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.अण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.घरी पैशाचा ओघ जेमतेमच असे.तरी स्वतः काटकसरीत राहून आईआण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यांने गॅरेज सुरू केले होते. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही.त्यामुळेच त्याच्या लग्नाचं पहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.पण त्या खेड्यात राहायची त्यांची तयारी नसायची.मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली.ती लग्नाआधी बीएससी झाली होती. हुशार होती. आण्णानीच तिला बी.एड् करायला प्रवृत्त केलं. लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला.असं सगळं कसं छान, सुरळीत होतं. परवापरवापर्यंत तरी तसं वाटलं होतं,पण आई अचानक गेली …आणि ..?

वहिनीला नवीन नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला येई. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती.ती होती तोपर्यंत घरात कसले प्रश्नच नव्हते जसे कांही. तेव्हा घरात भांड्याला भांडं लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते.

आई गेली.तिचं दिवसकार्य सगळं आवरलं  तेव्हाच बदल म्हणून सविता-सारंगने आण्णाना थोडे दिवस बदल म्हणून पुण्याला चला असा आग्रह केला होता. पण ते पुन्हा पुढे बघू म्हणाले न् ते तसंच राहीलं.

आई गेल्यानंतर पुढे दोनतीन महिन्यांनीच दिवाळी होती.चार दिवस आधी फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर  व्हरांड्यातला केर काढू लागले होते.सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले.  थोडे थकल्यासारखेही.पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं.  हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला .आण्णा आणि घरकाम? शक्य तरी आहे का हे?

निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे.त्यांना वाचनाची आवड होती. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता. असं असताना ते न आवडणारी,न येणारी कामं या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का? हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं.तिचं जाऊ दे पण दादा? त्याला कळायला नको?सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते यासाठीच. आण्णांशीच नव्हे,दादावहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच सिटी बसस्टाॅपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक आण्णाच समोरून येताना दिसले.हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते. त्याना त्याअवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम. ती कासावीस झाली.तशीच पुढे झेपावली.

“आण्णा त्या पिशव्या द्या इकडे.मी घेते.” पाच पाच  किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या.सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली.

“सावू…तू..तू इथे कशी?”कपाळावरचा घाम रुमालाने  टिपत त्यांनी विचारले. त्यांच्या थकून गेलेल्या चेहऱ्यावरही आनंद  पसरला एकदम.

“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

“पण असं अचानक?”

“हो.भेटावं असं तिव्रतेने वाटलं.आले.कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू?खूप थकल्यासारखे वाटताय.” तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली. मग सविता काही बोललीच नाही. बसमध्ये सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.

“आण्णा, आपण लगेच घरी नको जायला..”

“का  गं?”

“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.”

“अगं बोल ना. घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”

“नाही…नको”

“लांबचा प्रवास करून आलीयस. ऐक माझं. आधी घरी चल. हात पाय धू. विश्रांती घे. मग बोल. घाई काय आहे एवढी?”

सविताला पुढे कांही बोलताच येईना.

तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.

“सवितताई, हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली. तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या. मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.

“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण  सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.

“मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय”वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली.

“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”

“बरं या”.

“चला आण्णा..”

“आण्णा..? ते कशाला..?”  वहिनी आश्चर्याने म्हणाली.

“का? त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं. तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली. कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.

“तसं नाही सविताताई..”

“मग कसं?” आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.

“तुम्ही जा त्याना घेऊन, पण अंधार व्हायच्या आत परत या ”

सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली. फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.

क्रमश:….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print