मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘अरे यार, या सुमेशला काय म्हणावं तरी काय? इकडे डायबेटीस आहे, पण आपल्या हिश्श्याची मिठाई काही सोडत नाही. बघ .. बघ… तिकडे बघ… रसगुल्ला आणि बर्फीचे दोन पीस उचलून गुपचुप आपल्या पिशवीत ठेवलेत.’ विनोदाची नजर सुमेशकडे लागली होती.

‘मुलांसाठी घेतली असेल. आपल्याला काय करायचय.’ मी म्हंटलं, ’तू आपला खा. पी. आणि पार्टीची मजा घे.’

‘याला कुठे लहान मुले आहेत? म्हणजे एक-दोन पीसमध्ये खूश होऊन जातील.’ विनोद म्हणाला. ‘बघ .. बघ… आता समोसा पिशवीत ठेवतोय. मोठा कंजूष माणूस आहे. जे खाल्लं जात नाही, ते लोक प्लेटमधे तसंच ठेवतात. पण हा कधी टाकत नाही. कुणास ठाऊक, घरी जाऊन काय करतो त्याचं?’

‘काय वाटेल ते करेल. त्याची मर्जी. त्याच्या वाटणीचं आहे ते सगळं. तुझंसुद्धा लक्ष ना, या असल्याच गोष्टींकडे असतं.’

‘ते बघ! तो सगळं सामान घेऊन चाललाय. बघूयात काय करतोय!’ विनोद हेरगिरी करण्याच्या मागे लागला.

‘जाऊ दे ना रे बाबा,’ मी टाळाटाळा करत म्हंटलं.

‘चल रे बाबा,’ म्हणत त्याने मला जवळ जवळ ओढतच बाहेर नेलं।

बाहेर आल्यावर आम्हाला दिसलं, रसगुल्ला, बर्फी, सामोसे वगैरे घातलेली पिशवी, गेटपाशी उभ्या असेलया दोन मुलांकडे देत होता. ती मुले जवळच्याच झोपडीत रहात होती आणि आस-पास खेळत होती.

मी म्हंटलं, ‘ बघ! आपल्या हिश्श्याचा उपयोग याही तर्‍हेने करता येतो. ‘ विनोद काही न बोलता नुसता उभा होता.

 

मूळ कथा – ‘अपना हिस्सा’ –   मूळ  लेखक – श्री विजय कुमार,

सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 ☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

यंदा दिपक दहावीला होता. एकुलता एक लाडका हुशार मुलगा. त्यामुळे घरात तसेच शाळेतही त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा खूप होत्या. तो शाळेच्या निवडक मुलांच्या बँचमध्येही होता. ह्या बँचचा खुपसा पोर्शन शाळेत व क्लासमध्येही शिकवून झाला होता. जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि दोन महीने झाल्यावर शाळेत दिपकची पहिली चाचणी परिक्षा झाली. ह्या परिक्षेचे पेपर निवडक मुलांसाठी वेगळे होते. त्यांना आतापर्यंत शिकवून झालेल्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित होती. त्या परिक्षेत दिपकला नेहमीपेक्षा खूप कमी मार्क पडले. हल्ली त्याची सारखं डोकं दुखत असल्याची तक्रार सुरू होती. पण ते सर्दीमुळे किंवा अभ्यासाच्या ताणामुळे असेल असे वाटून थोडे दुर्लक्ष केले गेले. मार्क कमी पडल्याने त्याला आईबाबांचा व शाळेत शिक्षकांचाही फार ओरडा खावा लागला. पण दिपकच्या आजीआजोबांच्या मनाला मात्र ही गोष्ट फार खटकली. कारण दिपक हा फार सिन्सिअर मुलगा, उगीचच नाटकं करणारा नव्हता. आणि ते दोघेही जास्त वेळ घरात असल्याने त्यांनी त्याच्या डोकेदुखीचे निरिक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही डोकेदुखी थोडी वेगळी आहे. दिपकचं जेव्हा डोक दुखत असे तेव्हा तो फार बेचैन व अस्वस्थ होत असे. डोकं तो जोराने दाबुन धरत असे, आणि चेहराही फार विचित्र करत असे. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असे. थोड्या वेळानं वेदना कमी झाल्यावर मग तो ठिक असे. त्याला केव्हातरी किरकोळ तापही येई. तापावरच औषध घेतले की तो उतरे. पण नंतर तो शांत असे. शाळेचा व क्लासचा अभ्यास तो कसातरी पुर्ण करत असे. जास्त खेळतही नसे.ही लक्षणं काही बरोबर नव्हती. काहीतरी योग्य पावलं उचलायला हवी होती. नाहीतर काही खर नाही, असे त्यांना वाटत होते. म्हणून ही गोष्ट त्यांनी विश्वासच्या म्हणजे दिपकच्या वडीलांच्या लक्षात आणून देण्याचे ठरवले. मग त्याच दिवशी दुपारी विश्वास जेवायला घरी आल्यावर विश्वासला जवळ बोलावून ते म्हणाले, “विश्वास मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे दिपकच्या बाबतीत. माझी एक गोष्ट ऐकशील का?”

“हो बाबा बोला. “विश्वास म्हणाला.

“अरे, दिपकचं हल्ली वरचेवर दुखतं. किरकोळ तापही असतो. त्याला, काही वेळा त्या वेदना सहन होत नाहीत. बाकी इतरवेळी तो ठिक असतो. पण मला काही ही लक्षण बरोबर दिसत नाहीत. त्याची लवकरच नीट तपासणी करायला हवी.” आजोबा म्हणाले.

“होय. ते माझ्याही लक्षात आलंय बाबा. पण या कामांमुळे वेळच मिळत नाही.” विश्वास म्हणाला.

“अरे, मग वेळ काढ. जरा बाजूला ठेव तुझी कामं. त्यांना विलंब झाला तरी चालेल. पण हे काम महत्त्वाचे आहे ते आधी कर.दिपकला एखाद्या चांगल्या डॉक्टराला दाखवून नीट इलाज लवकर व्हायला हवेत.” आजोबा म्हणाले.

“हो मी वे काढतो लवकरच.” असं म्हणून विश्वास परत कामावर गेला.

              क्रमशः

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ज्योतिष ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ ज्योतिष ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की निव्वळ योगायोग? कोणास ठाऊक!

माधवराव आपल्या एका मित्राबरोबर भावेंकडे गेले  होते. भावे एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. मित्राचं काम  झालं आणि ते निघत  होते. तेवढ्यात भावेंनी  त्यांना थांबवलं आणि माधवरावांना सांगितलं, “काळजी घ्या. येत्या पाच दिवसांत तुम्हांला अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनापासून धोका आहे.”

“माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही. आताही मी यांच्याबरोबर आलोय.”

“हे एक शास्त्र आहे. माझा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. मी बोललो त्यात तथ्य आहे. तुमच्या जिवाला धोका नाही ;पण दीड-दोन महिने तुम्ही अंथरुणाला खिळून राहणार.”

“मी पैज लावतो पाच हजार रुपयांची. तुमचं हे भविष्य खोटं पाडून दाखवतो. मी पाच दिवस घरातच बसून राहीन. मग कसा होईल अपघात?”

“मी हरलो आणि तुम्ही सुखरूप राहिलात, तर मला आनंदच होईल. ठीक आहे. आजपासून पाच दिवसांनी रात्री साडेअकरा वाजता मी तुमच्या घरी येईन  आणि हार स्वीकारून तुम्हाला पाच हजार रुपये देईन.”

चार दिवस कसेबसे गेले. पाचवा दिवस जाता जाईना. तिन्हीसांजेला तर माधवरावांचा धीरच सुटला.

“मी काय म्हणतो, मालू.मी अपघात टाळण्यासाठी  घरातच बसून राहिलो, तर ते चीटिंग होईल. त्यापेक्षा  मी खाली थोडं फिरून येतो. तरी अपघात झाला नाही, तरच ते भाकीत खोटं ठरेल, ना!”

“आणि काही झालं तर? विषाची परीक्षा कशाला घ्या.”

“कसलं विष आणि कसली परीक्षा! माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही. मी  जातो.”

मग मालूने मनिषला फोन लावला.

“बाबा, तुमचा विश्वास नाही, तसा माझाही विश्वास नाही या गोष्टींवर. पण चुकून बोलाफुलाला गाठ पडली आणि काही झालं तर? घरात तुम्ही दोघंच. मी यायचं म्हटलं तरी सात-आठ तास जाणारच आणि आता तर माझी परीक्षा चालू आहे. तुम्ही घरीच थांबा ना. थोडेच तास राहिलेत आता.”

शेजारचा छोटा अनय खेळायला आला होता. तो गोंधळूनच गेला. एकदा काकांकडे, एकदा काकूंकडे, एकदा फोनकडे बघता बघता खेळायचंही विसरला.

माधवरावांनी टीव्हीवर न्यूज लावल्या. आरडाओरडा, हाणामारी, लाठीमार…..

“अहो, त्या न्यूज बंद करा बघू. अनय बसलाय ना इथे.”

“अरे!काय कटकट लावलीय! माझ्याच घरात मला न्यूज ऐकायचीही चोरी?” माधवरावांचा चढलेला आवाज ऐकून अनय भेदरला.

“जा बाळा, तू आपल्या घरी,” मालूचे शब्द ऐकले मात्र, तो पळतच सुटला.

“घड्याळ बंद नाही ना पडलं? मघाशीपण अकराच वाजले होते.”

“अहो, तेव्हा अकरा वाजायला आले होते आणि आता अकरा वाजून गेलेत. असं मिनिटामिनिटाला घड्याळाकडे बघितलं तर हेच होणार ना! झोपा बघू तुम्ही. नसेल झोप येत, तर नुसते पडून राहा डोळे मिटून.”

बरोबर साडेअकरा वाजता बेल वाजली. माधवरावांची सगळी अस्वस्थता पळून गेली. एखाद्या लहान मुलासारखे ते टुणकन उठून बसले.

“भावे आले असणार पाच हजार रुपये घेऊन. ठरवलं की नाही त्यांचं ज्योतिष खोटं!”

आनंदाच्या भरात ते बेडवरून उतरले आणि दरवाजा उघडायला धावले.

अचानक त्यांचा पाय कशावर तरी पडला. ते घसरले आणि उताणे पडले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला ;पण त्यांना हलताही येईना.

मालूने दरवाजा उघडला. भावे आत आले. बघितलं तर माधवराव अनयच्या खेळातल्या मोटारीवरून  घसरून पडले होते.

अर्थात ही वेळ हार -जीत वगैरे विचार करायची नव्हती. भावेंनी डॉक्टरना फोन लावला. त्यांच्या सांगण्यावरून ऍम्ब्युलन्स मागवली आणि माधवरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

डॉक्टरांनी प्लास्टर लावलं. ‘दीड -दोन महिनेतरी ठेवायला लागेल’ म्हणाले.

माधवरावांना भावेंची क्षमा मागावीशी वाटत होती. पण त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.

आणि भावे? त्यांना जिंकल्याचा आनंद झाला नव्हता. उलट आधी ठाऊक असूनही आपण भविष्य बदलू शकलो नाही, याच्या कितव्यांदा तरी आलेल्या प्रत्ययाने ते सुन्न झाले होते.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

आमचा प्रवास सुरू होता. बाहेर घाटातून वळण घेत आमची टॅक्सी धावत होती. माझे मन सुद्धा कासावीस होऊन हेलकावे खात होते. या चिमुरड्याला काय वाटत असेल? “गोपी, भूक लागली का? बिस्किट खाणार की कुरमुरे खाणार?” संभाषण कसं वाढवायचं तेच मला समजत नव्हतं.

“नाही ग आत्या, भूक नाहीये.  मला ना, आमच्या तिथल्या छोट्या मांजराच्या पिला ची आठवण येते ग. तिकडे ना, दुपारी मी आणि तेच असायचो. त्याची आई त्याला सोडून गेली होती. मीच त्याला बशीतून दूध पाजत होतो. आता मी तर इकडे आलो. त्याला आता कोण दूध देणार?” माझा हात घट्ट दाबत गोपी मला विचारत होता.

त्याचे ते निरागस, प्रेमाचे बोल ऐकून मला भडभडून आलं. त्या पिल्लाची आणि गोपी ची अवस्था एकच होती.पण त्या पिलाची काळजी त्याला पोखरून टाकत होती. पिल्ला च्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. आपल्या पप्पां वरच्या गाढ विश्वासाने गोपी माझ्याबरोबर आला होता. त्याला खात्री होती, आपण आता सुखरूप आहोत. आजी-आजोबा आपली वाट पाहत आहेत. त्यांना भेटायला त्याचे मन अतुर झाले होते. तेवढेच पिल्लाच्या आठवणीने त्याचे मन  कातर ही होत होते.

खरच, ही साधी जाणीव मोठ्यांमध्ये का बरे नसावी? तू तू, मै मै च्या जमान्यात प्रेम, आपुलकी, ओढ, मायेचा ओलावा  कसा मिळवायचा या फांदीवरून कोसळणार्‍या नाजूक फुलांनी?

क्रमशः —-

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोपी – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गोपी – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

छोट्या निरागस गोपी बरोबर माझा मुंबई-पुणे टॅक्सीतून प्रवास सुरू होता. वयानं लहान असला तरी अनुभवानं तो खूप मोठ्या झाल्याचा मला जाणवत होतं. आपली छोटीशी बॅग अगदी पोटाशी कवटाळून मला चिकटून बसला होता.. “आत्या, तू तरी मला आता सोडून जाऊ नको हं.” अशी विनवणी मला त्याच्या स्पर्शामध्ये जाणवत होती.

त्याच्या आई-बाबांच्या भांडणाची,वादावादी ची झळ गोपीला बसली होती. त्याला आपल्यापाशी आणण्याची त्याच्या पप्पांची धडप ड त्यांनी जवळून पाहिली होती. त्यालाही पप्पांचा आधार हवा होता.त्यांच्या मायेची उब त्याला लपेटुन घ्यायची होती. पप्पां कडेच तो राहणार होता. त्याला खात्री होती, तो पप्पांकडे आला की आजी आजोबा तिकडेच येणार. त्यांच्या बरोबर राहायला मिळणार म्हणून तो मनोमन खुश होता, आनंदात होता.

कोर्टा मधल्या त्या विचित्र, नकोशा वाटणाऱ्या वातावरणात, काळ्या कोट वा ल्या वकिलांना, मोठ्या खुर्चीत बसलेल्या जज्ज अंकल ना त्यांनी निक्षून सांगितले होते, “मी माझ्या पप्पांकडे जाणार”. कोवळ्या वयातल्या त्या चिमुरड्या बोलांनी कोर्टातल्या सगळ्यांचे डोळे पाणावले, मन हेलावलं आणि गोपी चा ताबा रीतसर त्याच्या पप्पांकडे आला.

कोर्टाचा निकाल इतका पटकन लागेल अशी गोपीच्या पप्पांना खात्री नव्हती. त्यांना आनंद झाला, पण वेगळाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. गोपी कडे आता घरी कोण लक्ष देणार? आजी-आजोबांना यायला तर हवं! म्हणून त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं.

क्रमशः —-

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

दुस-या दिवशी सकाळी माधुरीच्या प्रतिकचा फोन, “मावशी तुझी  कल्पना काय भारी आहे ग मला आणि हिला खूपच आवडली. एक्झॅक्टली वृध्दाश्रम नाही. पण तुमच्या मित्रमैत्रिणीचा वयस्कर  आनंदाश्रम म्हणू हवं तर आईबाबा पण खूष. आम्हाला पण त्यांची काळजी रहाणार नाही. बाबा नियमितपणे घरी व्यायाम करत नाहीत. पथ्य पाळत नाहीत. आम्ही सांगायला गेलो तर वाद होतात. दिवसभर घरात दोघंच असतात भांडत बसतात. तुमच्याकडे सगळ्या बरोबर नियमित व्यायाम, पथ्य पण होईल. आम्हाला पण काळजी नाही. आनंदात रहातील दोघं. बरं तसं अंधेरी सांताक्रुझ म्हणजे अंतर पण फार नाही. वाटलं तर कधीही भेटू शकतात.

लगेच प्रकाशच्या जान्हवीचा फोन आला “आत्या, दी ग्रेट! तुझी आयडिया भन्नाट आहे. मला आणि ह्यांना एकदम पसंद” “अग, पण प्रकाश म्हणत होता तुझ्या शुभ्राला आजी आजोबांचा लळा आहे. तू नाही म्हणशील.” “अग आत्या ते बरोबर आहे, पण शुभ्रासाठी का त्यांना अडवून ठेवायचे. त्यांना करू दे ना आता उतारवयात तरी आपल्या मनासारखं. आयुष्यभर कुटुंबासाठीं, नंतर आम्हा मुलांसाठीं नोकरी सांभाळून घर. खूप कष्ट केले. आता बस झालं let them enjoy with you people.”

सुनिताच्या मुलीचा तर us वरुन फोन “मावशी तुझी आयडिया 101% आवडली. असं तर आई बाबा इकडे माझ्याकडे कायमचे यायला तयार नाही की दादाकडे बॅगलोरला पण जात नाहीत. तुमच्या सगळ्या बरोबर मज्जेत रहातील इकडे मला पण काळजी नाही.

विद्याचा मुलगा नितीश तर संध्याकाळी माझ्या घरी हजर,”मावशी तू माझं सगळं tension च दूर केलेस. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही”. “अरे आभार मानण्यासारखं मी काय केले? ते तरी सांग”. “अग मावशी, माझ्या बायकोचं आणि आईचं पटत नाही. आईला समजवावं तर ‘बायकोचा नंदीबैल, आणि बायकोला सांगायला जावं तर मम्माज् बाॅय’ही विशेषणं बर॔ दोघीही वाईट नाहीत दोघींची मते त्यांच्या परीने बरोबरच आहेत. पण कुठे माशी शिंकते कळत नाही. आणि घरांतले मनःशांती बिघडते. एवढे मात्र खरं. तू मात्र ह्या संकटातून माझी सुटका केलीस. परत जवळच्या जवळ कधीही जा ये करु शकतो.”

विजू बायको गेल्यापासून एकटाच रहात होता म्हणून ऑस्ट्रेलियात असणा-या मुलांने मला  फोनवर सांगितले, ‘आत्या, तुम्ही बाबांना तुमच्या कडे घेऊन जा. मला चालेल काय विचारतात ते. त्याना म्हणावं धावेल त्यांनाच काय तुमच्या आनंदाश्रमाला लागेल ती मदत मी करेन. एक जोडपं care taker बरोबर अजून एखाद दोन मुली वरच्या छोट्या, मोठ्या कामाला पार्ट टाईम ठेवा. आता फक्त तुम्ही सर्वानी मज्जा, आराम करायचा. आणि आपापल्या  तब्येती सांभाळच्या. माझी खात्री आहे माझे बाबा तुमच्या सगळ्यांबरोबर जेवढे आनंदात रहातील तेवढे कुठेच राहू शकणार नाही. त्यानी आमच्यासाठीं खूप खस्ता काढल्या. आईच्या आजारपणात पण त्यांची खूप ओढाताण झाली. माझी पण नोकरी इकडे नवीन असल्यामुळे माझी पण मदत नव्हती. तुमच्या सगळ्यांची मदत होती म्हणून आईचे आजारपण ते निभावू शकले. आता तिचे आयुष्य तेवढेच होतं. शेवटी ईश्वरी इच्छा.आता बाबांचे तरी आयुष्य तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आनंदात जाऊ दे.

मला कल्पनाच नव्हती. सहज मनांत विचार येतो काय मी सगळ्यांना बोलावून, सांगते काय ते आपल्या मुलांच्या कानांवर घालतात काय आणि त्यांचा इतका छान आणि त्वरीत प्रतिसाद मिळतो काय?

आमचे पतिराज मला दोन दिवसापूर्वीच म्हणाले होते तुझी कल्पना चांगली आहे. पण त्याला प्रतिसाद फारसा मिळेल असं वाटतं नाही. तुला वाईट वाटेल. पण झालं उलटचं. पण छान. चला कामाला लागू या. मज्जा पुन्हा एकदा 40 वर्षा पूर्वीचे आयुष्य जगू या. कोणाचे बंधन नाही.

कोणाला नातंवंडाना शाळेच्या स्कूल बसचं tension नाही कि सुनेचे, मुलाचे डब्बे भरायला नको. कुणाच्या मुलांना आईबाबा इकडे उतारवयात कसे रहात असतील? ह्याचे साता समुद्रापार टेन्शन नको.

ते पण मजेत, आम्ही पण मजेत, आनंदात आणि याच आनंदात कधी तरी exit घेऊ या.

≡ समाप्त ≡

© सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १७ . विचारपूर्वक निर्णय

नासिकापुरात चार कापूस विक्रेते होते. त्यांनी एक घर भाड्याने घेऊन तिथे खरेदी केलेला कापूस ठेऊन कापसाचा व्यापार सुरु केला. परंतु त्या घरात उंदरांनी धुमाकूळ घातला व ते कापूस कुरतडू लागले. उंदरांचा त्रास कमी व्हावा म्हणून सर्वांनी मिळून एक मांजर खरेदी केली व त्या घरात ठेवली. हळूहळू त्या मांजरीचा त्यांना लळा लागला. मांजरीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या प्रत्येकाने मांजरीच्या पायांमध्ये आभूषणे चढवली.

काही काळानंतर त्या अलंकारांच्या घर्षणाने मांजरीच्या एका पायाला जखम झाली. म्हणून त्या पायात अलंकार घालणाऱ्या व्यापाऱ्याने  अलंकार काढून प्रेमाने जखमेवर कापडी पट्टी बांधली. एकदा रात्री मांजरीने दिव्याच्या मागे लपून समोर उड्या मारणाऱ्या एका उंदरावर एकदम झेप घेऊन त्याला खाल्ले. या झटापटीत मांजरीच्या पायाला बांधलेली कापडाची चिंधी दिव्याला लागून तिने पेट घेतला. मांजर ती चिंधी फाडू शकत नव्हती. जसजसा अग्निदाह वाढू लागला, मांजर सर्वत्र उड्या मारू लागली. उड्या मारता मारता ओरडत ओरडत ती कापूस ठेवलेल्या ठिकाणी आली. कापसाच्या ढिगाऱ्यावर येताच त्या ज्वालेमुळे कापसाने पेट घेऊन सगळा कापूस भस्मीभूत झाला.

दुसऱ्या दिवशी ते दृश्य बघून बाकीचे तिघेही व्यापारी त्या चिंधी बांधणाऱ्या व्यापाऱ्याला “आमचे नष्ट झालेले धन परत कर” असे म्हणू लागले. त्या व्यापाऱ्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला. तो स्तब्धच झाला. नंतर त्या तिघा व्यापाऱ्यांनी राजाकडे जाऊन तक्रार केली की, “या व्यापाऱ्याने नष्ट झालेले धन परत दिले पाहिजे. हेच व्यवहारायोग्य ठरेल.”

राजाने सर्व वृत्तांत सविस्तर ऐकला व विचार करून तिघांना म्हणाला, “या व्यापाऱ्याने पट्टी बांधलेला पाय जखमी होता. त्या जखमी पायाने मांजर कशी बरे उड्या मारू शकेल? म्हणून कापसाच्या ढिगावर उड्या मारण्याने निर्माण झालेला आगीचा डोंब मांजरीच्या इतर तीन पायांमुळे निर्माण झाला यात काही संशय नाही. त्यामुळे तुम्ही तिघांनीच ते घर पूर्वीप्रमाणे बांधून मालकाला द्यावे व तुम्हीच तिघांनी मिळून चौथ्या व्यापाऱ्याला त्याचे नष्ट झालेले धन परत करावे.”

तात्पर्य – विचारपूर्वक निर्णयामुळे निर्दोष व्यक्तीचे रक्षण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का!’  पुष्पा घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन.’

आण्णांनी `ठीक आहे.’ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय,  तो बाप-लेकीतला,किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो,  गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने,  इतकेच नव्हे,  तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या  उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले.  स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही,  अशा असहाय्य,  परित्यक्ता,  विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली,  तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम,  पाठ्यपुस्तके,  प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या  आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार,  उमेद,  उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

—- क्रमश:

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

तुम्ही सगळ्यानी आमच्याकडे आणि निलीमाकडे येऊन रहायचे. आपण एक ठराविक रक्कम एकत्र काढायची. एक तरुण सुशिक्षित जोडपं आपलं care taker म्हणून ठेवायचं म्हणजे ती बाई आपलं चहापाणी, नाश्ता, जेवण,  खाण्या पिण्याचे बघेल. नशिबाने आमच्यात पिणारे कोणी नव्हते म्हणा. आणि त्या जोडप्यांतला पुरुष सगळी बाहेरची कामं करेल. आपण फक्त खाना पिना, मज्जा करना. आणि आपले छंद जोपासणे. बरं त्यातून कधी कोणाला मुलांकडे जावेसे वाटले तर जाऊन यायचं. स्वतःच्या घरी दोन दिवस वाटलं तर जायचं. इतकंच काय पण स्वतःचं घर भाड्याने द्यायचे असेल तरी नंतर देऊ शकता. पण एक महिना बघू या. आपण सगळे कसे adjust होतो का? बरं वैद्यकीय मदत हवी तर एक बिल्डींग सोडून आमचे जुने जाणते डाॅक्टर आणि त्यांचा त्याच्याच सारखा हुशार डाॅक्टर मुलगा आणि क्लिनीक पण आहे. आपापल्या मुलांना विचारा. विचारपूर्वक निर्णय घ्या. आणि आठ दिवसाने सांगा.

रश्मीने शुभारंभाचा नारळ फोडला. ती म्हणाली “आपल्याला ही कल्पना एकदम 100% पटली.” दोन दिवस ती पेन्शनच्या कामासाठीं नाशिकहून दिरांकडून मुंबईला आली होती. माझ्याकडेच मी ठेवून घेतली होती. 2 दिवसासाठीं या स्वतःच्या घराची झाडझूड करा. रहा. चहापाणी सगळंच. त्यापेक्षा म्हटलं माझ्याकडेच रहा. आणि तुझी बाकीची बॅकेची सोसायटीची कामं कर. तिला मुलं बाळं नसल्यामुळे पती निधनानंतर “एकटी कशी रहाणार? आम्ही सगळे नाशिकला. वेळी अवेळी काही दुखलंखुपलं तर आमच्या चार नातेवाईकांत असलेली बरी” म्हणून नणंदेनी आणि जावेनी तिला तिच्या मनाविरुद्ध नाशिकला नेली. भक्कम पेन्शन, बॅंक जमा मजबूत, मुंबईत स्वतःचा फ्लॅट. ह्या वयात कामाला पण वाघ स्वभावाने पण शांत, निरुपद्रवी. अशा माणसाला ठेवायला कोण तयार होणार नाही? पण तिच्या मनाचा विचार कोण करणार? त्यामुळे माझी ही कल्पना तिला पटली. आणि मागचा पुढचा विचार न करता तिने होकार दिला.

माधुरी म्हणते कशी “माझा प्रतिक हो म्हणेल की नाही शंकाच आहे. सूनबाई तर तयार होणारच नाही.” प्रकाश म्हणाला, “आमची जान्हवी नाहीच म्हणणार तिच्या शुभ्राला आजी आजोबाच पाहिजे”. बाकीचे मुलांना विचारुन सांगतो असे गुळमुळीत उत्तर देऊन गेले.

क्रमशः …

© सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा – बाळा जो जो रे ☆ श्री बिपीन कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆ अति लघु कथा – बाळा जो जो रे ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆

कानावर अंगाईचे सूर पडताच मी जागा झालो आणि उठून बाहेर आलो. हातात पाळण्याची दोरी आणि चेहऱ्यावर पसरलेलं विलक्षण लोभस मातृत्व लेऊन वहिनी अंगाई गाण्यात गुंग झाली होती. डोळे विस्फारून मी आणि दादा पहात राहिलो…

समोर कुरळ्या सोनेरी केसांच्या आणि निळ्याशार डोळ्यांच्या आमच्या चिऊचा फोटो होता. आणि वहिनी… रिकामा पाळणा झुलवत होती…

 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares