मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-3 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-3 ☆ श्री आनंदहरी ☆

बिरोबाच्या शिवाराची वाट चालता चालताच तिला सासूची आठवण झाली तसे तिला सारे आठवले.. तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.. तिने डोळ्यांना पदर लावून डोळ्यातलं पाणी टिपलं. विचारांच्या नादात ती बिरोबाच्या देवळाजवळ येऊन पोहोचली होती. देवळाजवळ येताच ती विचारातून भानावर आली. तिने क्षणभर थांबून देवासन्मुख होऊन मनोभावे देवाला हात जोडले आणि आपल्या वावराकडं गेली. पेरा चांगलाच उगवून आला होता..  पण रानात तण पण बऱ्यापैकी होतं .. तिची आई म्हणायची, ‘ ईचारा बिगार मन आन तणाबिगर रान असतंय वी कवा ? ‘  आईची आलेली आठवण तिने मनाच्या आतल्या कप्प्यात सरकवली आणि  खुरपं घेऊन भांगलायला सुरवात केली. सगळ्यांचाच भांगलणीचा घायटा असायचा. गावंदरीच्या रानात भांगलायला कुणीतरी यायचं किंवा भांगलणीचा पैरा करायला तयार असायचं पण एवढ्या लांब बिरोबाच्या शिवारात कुणी भांगलायला यायलाही तयार नसायचं. सासू होती तेंव्हा दोघीच सगळे रान भांगलून काढत असत.

तिने भांगलायला सुरवात केली. तिच्या सासूचा कामाचा झपाटा दांडगाच होता.. भांगलताना इतर बायकांची एक पात भांगलून व्हायच्या आधीच सासूची दुसरी पात निम्म्यापेक्षा जास्त भांगलून झालेली असायची.. पण तिचे कामही सासूच्या तालमीत तयार झाल्यासारखंच, सासूच्या पावलावर पाऊल ठेवल्यासारखंच होतं. दिवस मावळतीला येस्तोवर ती एकटीच भांगलत राहिली आणि मग घरी परतली होती.

दारात आली तेंव्हा सोयाबीनचा पेरा चांगलाच उगवून आल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरुन पावसाच्या थेंबासारखं निथळत होतं. तिने दारातल्या बॅरलमधलं पाणी घेऊन हात-पाय धुतलं. तोंडावर पाणी मारून पदराने पुसलं. खाली ठेवलेल्या पाटीतील खुरपं घेतलं आणि ती गोठ्याकडे गेली. हातातलं खुरपं तिनं गोठ्यात असणाऱ्या आडमेढीच्यावर गवतात खुपसून ठेवलं. म्हशीसमोर वैरणीची  पेंडी सोडून टाकली आणि ती पाटी घेऊन सोप्यातनं मदघरात आली..हातातली पाटी भीतीकडंला असलेल्या कणगीवर ठेवली आणि सैपाकघरात जाऊन ती चुलीम्होरं बसली. चूल पेटवून त्यावर चहाचं भुगूनं ठेवलं. गुळाचा गुळमाट चहा प्याल्यावर तिला आणखीनच बरं वाटलं. चहाचे भुगूनं वैलावर सरकवून तिने चुलीवर कालवणाची डीचकी चढवली..

ती खुशीत होती पण दिवस जसजसे पुढं सरकू लागले तसतसे तिच्या मनातली खुशी फुलासारखी सुकू लागली. मनातली चिंता वाढू लागली.. उगवण चांगली झाली होती पण पावसाचा मागमूस नव्हता.. रानात चांगलं हिरवंगार दिसणारं सोयाबीन दिवसेंदिवस तिच्या मनातल्या स्वप्नांना सोबत घेऊन सुकत चालले होते. फुलोऱ्यात यायच्या आधीच पावसाच्या मायेविना उन्हानं सुकून,करपून जाणार असे वाटायला लागलं होतं. रानातल्या सोयाबीनकडे पाहिलं की तिच्या डोळ्यांत पाणी दाटून येत होतं.     ‘ उगा रानात जायाचं तरी कशापायी ?’ असे मनात येत होतं पण त्याच मनाला राहवतही नव्हते.. वारकऱ्यांच्या पावलांनी आपसूक पंढरीची वाट चालावी, तशी तिची पावलं रानची वाट चालत होती पण मनात वारकऱ्यांची ओढ, असोशी, आनंद नव्हता.

जीव जाईल आता असे वाटत असतानाच अचानक जीवाने उभारी धरावी तसे झाले. सोयाबीन पार वाळून जाईल असे वाटत असतानाच अचानक पावसाची रिमझिम आली आणि तिच्या करपलेल्या मनाने आणि रानात करपू लागलेल्या सोयाबीनने पुन्हा उभारी घेतली. पाऊस आला. अधून मधून येत राहिला. पुन्हा साऱ्या शिवरानं आणि तिच्या मनाने हिरवाई ल्याली  होती.

क्रमशः ——–  भाग 4

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-2 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-2 ☆ श्री आनंदहरी ☆

तिने चुलीवर चहाचं आदण ठेवलं होतं. सासू आल्यावर संगं संगं चहा घ्यायचा आणि स्वैपाकाच्या तयारीला लागायचं असा विचार तिने केला होता.. पण तिच्या आदमासापेक्षा सासूला यायला जास्तच उशीर झाला तशी मनात दाटू लागलेली काळजी.. ‘भेटलं असेल कुणीतरी..बसल्या असतील पारभर..’ असा विचार करत तिने चुलीतील राख बाजूला सारावी तशी बाजूला सारत चहाचे भुगुनं चुलीवरून उचलून वैलावर ठेवलं आणि चुलीवर तवा ठेवत, बसल्या जागेवरूनच फडताळाजवळचा भाकरीच्या पिठाचा डबा आणि परात जवळ ओढली..परातीत पीठ घेऊन तवलीतले पाणी घेऊन पीठ मळायला सुरवात केली.. चुलीतील जाळ कमी झालेला पाहताच फुंकणीने जाळ केला आणि भाकरी थापायला घेतली..

पहिली भाकरी तव्यात टाकून दुसरी मळायला घेतली. तेवढ्यात बाहेर कसलातरी गलका ऐकू आला.. कसला गलका झाला ते  सुरू असलेल्या पावसामुळे नीट ऐकू येईना.. नकळत तिचं काळीज हरणीवानी झाले तशी परात बाजूला सारून ती उठली.  सोप्यावर आली.. पण नेमका कशाचाच अंदाज येईना. उगा काळजी मनाला पोखरू लागली. जीव काही राहिना.. ती मागे परतली तोवर तव्यातली भाकरी करपली होती.. तिने तवा खाली उतरून ठेवला..चुलीतील लाकडं इस्तू झाडून बाजूला सारली आणि कसेबसे दार लोटून घेत पळतच गलक्याच्या दिशेने धावतच सुटली.  मारुतीच्या देवळाकडनं गलका ऐकू येत होता. तिचं घर गावाच्या एका टोकाला तर मारुतीचे देऊळ दुसऱ्या टोकाला होतं. ती जसजशी देवळाजवळ जात होती तसे गलका जास्तच ऐकू येऊ लागला होता पण पावसानं नीटसं ऐकू येत नव्हतं. पळता पळता मध्येच कुठून तरी  ‘ पान लागलं..’ असे शब्द तिच्या कानावर आले.. तिचं काळीज लख् कन हाललं… गावंदरीच्या रानात नाग-सापाचा वावर होता हे तिला ठाऊक होतं.. मनातल्या शंका-कुशंकांनी तिच्या पायातले त्राणच गेले होते… पण तरीही ती जिवाच्या करारावर पळत राहिली होती.

मारुतीच्या देवळाजवळ सारा गाव गोळा झाल्यागत दिसत होता. ती पावसात चिंब निथळतच देवळाजवळ आली.. तिला पाहताच दोघी तिघी बायका तिच्या जवळ आल्या तिला थोपवलं. तिला जवळ धरतच हळूहळू देवळाच्या मंडपाकडे सरकू लागल्या.. तिला नेमकं काय होतंय तेच समजेना.. तेवढयात एकीने विचारलं..

“रामा कुनीकडे गेलाय ?”

ही बाई नवऱ्याची चौकशी का करतेय ? आपल्या हातांना असे का धरलंय ? तिला काहीच समजत नव्हतं.. पण त्यामुळे तिच्या मनाला पुन्हा आशंकांनी घेरलं. तिला पुढं जायचे होते..पण तिला थांबवत एक म्हातारी  पाणावल्या डोळ्यानं म्हणाली,

“आगं, रखमीला पान लागलं..”

आपल्या सासूला पान लागलंय हे ऐकून तिच्या पायातील त्राणच गेले. ती मटकन तिथंच खाली बसली.

तोवर मंडपाच्या दाराशी असणारी गर्दी हटवण्यासाठी पाटील ओरडले,

“ये चला रं, सरका बाजूला.. आन कुणीतरी रामा कुठाय ती बघून त्येला म्होरं घालून तेच्या घरला घेऊन या जावा..”

गर्दी मागं सरली.. रखमा गेली ते जाणत्या बाया माणसांनी ओळखले होते. त्यातली एक तिच्या भोवतीच्या बायकांना म्हणाली,

“हिला घरला जावा घिऊन..”

बायका तिला घरी घेऊन निघाल्या..पण एवढ्या सगळ्या बायकांत तिला तिची सासू दिसली नव्हती.. तिला रडावं, ओरडावं, आक्रोश करावा असे वाटत होतं पण ती स्तब्ध होती.. दगडाच्या मूर्ती सारखी, भान हरपल्यासारखी.. बायका तिला घेऊन घराकडे निघाल्या होत्या.  त्यांच्या डोळ्यात पाणी होतं… पण तिचे डोळे ठक्क कोरडे होते. नाही म्हणायला पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे थेंब तिच्या चेहयावरून ओघळत होते…कुणीतरी छत्री धरली होती तरीही..

तिची सासू, रखमा पान लागून गेली होती तेंव्हापासून रात्रभर पाऊस नुसता कोसळत होता.

क्रमशः ——–  भाग 3

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-1 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-1 ☆ श्री आनंदहरी ☆ 

गावाच्या खालतीकडे बिरोबाचे माळ.. बिरोबाच्या देवळाभोवतीचे शिवार त्याच्याच नावाने ओळखले जायचं.. माळ म्हणजे तसे माळरान नव्हतं.. बऱ्यापैकी सुपीक जमीन होती पण गाव लवणात वसलेलं होते. गावालगतच्या जमिनी काळ्याभोर , जास्तच सुपीक त्यामानाने बिरोबाच्या शिवाराची सुपीकता कमी इतकंच. ज्याला गावाजवळ जास्त जमीन होती तो गावापासून लांब असणारं बिरोबाच्या देवळाजवळचे रान कसायचाच नाही. त्यामुळे बिरोबाच्या शिवारात असे पडीक रान जास्त होतं म्हणून त्याला माळ म्हणायची सवय गावाला लागली होती. बिरोबाजवळचे तिचं रानही आधी पडीकच होतं म्हणे.. पण ती लग्न होऊन यायच्या आधीच तिच्या सासऱ्याने, घरात त्यांच्या भावाभावात वाटण्या झाल्यावर गावंदरीच्या रानात भागायचं नाही म्हणून बिरोबाच्या माळाचा आपल्या वाटणीचा एकराचा डाग कसायला सुरवात केली होती . आपला एकुलता एक पोरगा चांगला पैलवान व्हावा ही सासऱ्याची इच्छा होती पण सासऱ्यांच्या अचानक जाण्याने पोराची तालीम सुटली, आणि घराची , रानाची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती..सासरे गेल्यानंतर तीन वर्षांनी ती लग्न होऊन घरात आली होती.

तिला सासू तशी मायाळूच भेटली होती. कधी कधी रानात भांगलायला सोबत जाताना , कधी असेच दुपारच्या वेळी सोप्यात काहीतरी काम करत असताना सासू काही बाही जुनं सांगत राहायची.. जुन्या आठवणी काढत राहायची.त्यामुळे तिला तिच्या आज्जेसासुपासूनच्या अनेक गोष्टी माहीत झाल्या होत्या. तिची सासु जितकी बोलकी तितकाच तिचा नवरा अबोल होता.. पण सासुमुळे तिला नवऱ्याचं अबोलपण फारसं डाचत नव्हतं. तरीही एकदा तिने सासुजवळ नवऱ्याच्या अबोलपणाचा विषय काढला तेंव्हा सासू हसली होती . सासू का हसली ? यात हसण्यासारखं काय होतं हे काही तिला कळले नव्हते.. ती त्यामुळे खट्टू झाली होती..  तिचे खट्टू होणे तिच्या चेहऱ्यावरून पावसाच्या थेंबांसारखं निथळत होते.. सासूला ते जाणवलं तसे सासूने तिला लेकीसारखं जवळ घेतलं आणि म्हणाली,

“आगं, तुझ्यासंगं आत्तापातूर त्यो बोलला आसल त्येवडं त्येचा बा समद्या आयुष्यात माझ्यासंगं बोललेला न्हाय.. त्ये बी जाऊंदेल .. आगं, मी  माज्या मामांजीस्नी माझ्या सासूसंगं बोलताना येक डाव बी बघितलं न्हवतं.. मी नवरी हून आले तवा मला वाटायचं ह्येचं कायतरी बिनासल्यालं दिसतंय.. एकडाव मी सासूला ईचारल तर ती म्हणाली, ‘ ही ब्येनंच तसलं हाय.. कुनीबी बायकांसंगती बोलत न्हाय… ती घरात असली की निसतं मळभ दाटल्यावानी वाटतं बग ..”

सासूच्या शेवटच्या वाक्याने तिलाही हसू आले होते.

बिरोबाच्या शिवाराकडे जाता जाता तिला हे आठवले तसे तिच्याही चेहऱ्यावर क्षणभर हसू फुललं होतं.. पुढच्याच क्षणी सासूची आठवण झाली आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं..दोन वर्षांपूर्वी गावंदरीच्या रानातनं भांगलून माघारी येताना.. सासूनं तिला गवताचे वजं उचलून दिलं अन् म्हणाली,

“तू हो म्होरं . मी येती द्वारकामावशी संगं.. वाईच दमा दमानं .. ”

शेजारची द्वारकामावशी  आधीच म्हातारी  त्यात तिचे गुडघे दुखत होते.. तरी ती भांगलायला येत होती.. सासू जाता येता तिच्या गतीने तिला संगती घेऊनच जात येत असे. भांगलताना ही द्वारकामावशीला सांभाळून घेत होती. मावशीची मागं पडलेली पात पुढनं भांगलत येऊन पूरी करत होती..  तिला हे नित्याचच होतं. ती गवताचं वजं घेऊन वळत असतानाच द्वारकामावशींनी मिश्रीची डबी काढली तसे तिच्या मनात आलं , ‘ आता काय दोघीबी लवकर याच्या न्हाईत घरला.. मिश्री लावून झाल्याबिगर उठायच्याच न्हायती..,’  काहीसे स्वतःशीच हसून ती झपाझप घराकडे निघाली. ती निम्म्या वाटेत असतानाच पावसाला सुरवात झाली.. पण निवाऱ्याला कुठेही न  थांबता ती तशीच पावसात भिजत घरी आली होती….

पावसाची चळक थांबूनसुद्धा बराच वेळ झाला होता पण सासू घरी आली नाही.. तसे तिला काळजी वाटू लागली होती.. वेळ जात होता तशी तिच्या मनातली सासूची काळजी वाढतच चालली होती .

क्रमशः

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

श्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मॉर्निंग वॉकहून परततांना, वाटेवरच्या एका हॉलकडे आपोआपच लक्ष जात असे. वेगवेगळ्या प्रदर्शनांसाठी आणि सेल्ससाठीच तो हॉल बांधलायया विचाराने रोजच हसू यायचं. आज तो हॉल आठ वाजताच उघडलेला होता, आणि तिथे माणसांची रांग लागलेली होती. उत्सुकतेपोटी तिथे जरा रेंगाळले. दारावर एक पाटी टांगलेली दिसली ….” फ्री एक्सचेंज ऑफर “…. कुणातर्फे  ते काही लिहिलेलं नव्हतं. रविवार असल्याने तिथे थोडा वेळ घालवायला हरकत नव्हती. म्हणून जाऊन त्या रांगेत उभी राहिले. सगळ्यांच्याच हातात काही जुनाट वस्तू होत्या. चेहेऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. हॉलच्या दारात एक दणकट माणूस उभा होता. संयोजक असावा. थोड्याच वेळात त्याने पहिल्या २५-३० माणसांना आत बोलावलं. त्यात शेवटचा नंबर माझा होता.

” हातातलं सामान त्या शेल्फात ठेवा, आणि तिथे मध्यभागी ठेवलेल्या मोठ्या टेबलभोवती उभे रहा “…. त्याने जणू हुकूमच सोडला. हॉलमध्ये इतर एकही वस्तू नसल्याने आधीच्या उत्सुकतेच्या जागी फसवल्याचा संशय दिसायलालागला होता…. दार बंद करून संयोजक तिथे आला. त्याने प्रत्येकाला एकेक थाळी दिली. डोळे बंद करायला सांगितले. मग जादूची छडी फिरवावी तशी हातातली काठी सगळ्यां-भोवती फिरवली. त्याचा डोळा चुकवून मी हातातली थाळी टेबलखाली सरकवली, आणि गुपचुप त्याच्याचमागे  लपले.

…..” आता प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात अजिबात नकोशी आणि असह्य वाटणारी फक्त एक गोष्ट डोळ्यासमोर आणा आणि थाळीत हात ठेवा. आणि आता थाळी टेबलवर ठेवा..हां, आता ऐका. तुम्ही स्वतःची थाळी सोडून बाकीच्या पैकी तुम्हाला जी थाळी आवडेल ती एक थाळी उचलायची आहे. आणि कोणालाही रिकाम्या हाताने परत जाता येणार नाही. वेळ मर्यादित आहे. कळलय? आता उघडा डोळे “… आता प्रत्येकाच्या थाळीत काही ना काही दिसायला लागलं ….. प्रचंड गोंधळून सगळे नुसतेच टेबलभोवती फिरायला लागले… दचकत होते …. माना नकारार्थी हलत होत्या. मी नीट निरखून त्या टेबलकडे पाहिलं, आणि प्रचंड दचकले…..बाप रे …..नकोशा गोष्टी? त्रास, चिंता आणि दुःख यांची केवढी व्हरायटी होती त्यावर …. विद्ध झालेली मने…. पोखरलेले मेंदू…. मनावरचे खोलवर घाव आणि मनाच्या भळाभळा वहात असणाऱ्या जखमा, काळवंडलेल्या विझलेल्या असहाय्य नजरा…असाध्य रोगांच्या वेदनांनी तडफडणारे अवयव …. कुठे घरावरचे छप्पर टिकवतान्ना त्राण संपलेले हात पाय….. भुकेने तडफडणारे पोटाचे हताश खड्डे आणि त्यांना धरून लोंबकळणाऱ्या काही आशाळभूत नजरा…. तर कुठे स्वतःची संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून तगमगणारी अधाशी मने…. बाप रे बाप…. ते सगळं बघतांना असह्यतेखेरीज कुठली भावना जाणवतच नव्हती. डोळे विस्फारून सगळे नुसतेच टेबल भोवती फिरत होते. तिथून निसटण्याची संधी शोधत होते. … तेवढ्यात संयोजक हातातली काठी उगारत ओरडला…..”चला घ्या पटापट कुणाला काय चालणार आहे ते. बाहेर रांग वाढते आहे.”

सगळेच एव्हाना रडकुंडीला आले होते. तो आणखी मोठ्याने ओरडला.. “आवरा …. आणखी पाच मिनिटं देतो. उचला पटकन हवी ती थाळी. एवढी चांगली एक्सचेंज ऑफर पुन्हा कधीही मिळणार नाही तुम्हाला. ” आता सगळ्यांचा नाईलाज झाला. त्याची पाठ वळताच प्रत्येकजणच घाई -घाईने टेबलजवळ गेला, आणि गुपचुप स्वतःचीच थाळी शोधून उचलून निघू लागला. सगळ्यांची ती धावपळ तिरक्या नजरेने पहात, खट्याळपणे गालातल्या गालात हसत असलेला तो, त्याच्यामागेच लपलेल्या मला स्पष्ट दिसत होता. टेबलवरच्या सगळ्या वस्तू संपल्या, तशी खालच्या रिकाम्या थाळी कडे तीक्ष्ण नजर टाकत त्याने गर्रकन वळून माझ्याकडे पाहिलं. भीतीने मी थरथरायला लागले, तसा गडगडाटी हसत तो म्हणाला, ” लबाडी केलीस नामाझ्याशी? पण चल, माफ करतो तुला. कारण या सगळ्यांमध्ये तू एकटीच विवेकी आणि विचारी दिसतेआहेस…” आणि कौतुकाने त्याने माझ्या पाठीत धपाटा घातला …….

……….. आणि मी दचकून खाडदिशी जागी झाले. बाप रे ….. म्हणजे हे सगळं स्वप्न होतंतर. पण मग प्रकर्षाने जाणवलं की, त्या स्वप्नाइतकं विदारक वास्तव दुसरं कुठलंच नसावं.

‘परदुःख शीतल’ असं मला तरी यापुढे कधीच वाटू शकणार नाही हे मात्र नक्की. कारण मनापासून पटले होते की……. दगड मातीचे असोत, की दुःख वेदनांचे असोत, डोंगर दुरूनच साजरे असतात.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले

☆ जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले  ☆

बघता बघता लिली दिड वर्षाची झाली. ती सहा महिन्यांची झाली आणि आईचे ऑफिस सुरु झाले. त्यामुळे लिलीचा ताबा आजी कडेच. आताही आजीनं तिला छानसा फ्रॉक घातला, पावडर तीट लावली आणि दोघी देवा समोर आल्या. “हं’ म्हण, देवा, मला चांगली बुद्धी दे. “लिलीन आपले इवलेसे हात जोडले आणि म्हणाली, “देवा, आजीला च्यांग्ली बुदी दे.” आजीला हसू आवरल नाही. “सोनुली ग माझी म्हणत आजीनं तिच्या गालावरून हात फिरवला. हा रोजचाच कार्यक्रम झाला होता .

आज आजीनी एका ताटलीत पंधरा पणत्या लावल्या. लिलीला तो चमचमता प्रकाश दाखवत म्हणाल्या, “लिली, ही बघ गंमत ” लुटूलुटू चालत लिली आली. ताटलीतले ते दिवे बघून डोळे मोठ्ठाले करून पहायला लागली. आपले इटुकले हात गालावर धरून आजीकडे आणि त्या पणत्यांकडे पहायला लागली.

भिंतीवरील आजोबांच्या हार घातलेल्या फोटोकडे पहात आज देवाकडे बुद्धी मागायची विसरून गेल्या. त्या ज्योतींच्या प्रकाशात त्यांना आजोबां बरोबरच्या सहवासाच्या आठवणी आठवायला लागल्या . आजचा हा दिवस खास त्या आठवणींसाठीच होता. लिलीला मांडीवर घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत त्या तिथेच बसल्या. आजोबांना छकुल्या नातीची ओळख करून दिली. आजोबा फोटोमधून समाधानानं हसले.

 

©️ सौ अंजली गोखले 

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडि

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ३. कृतघ्न वाघ

एका अरण्यात एक वाघ रहात होता. अरण्यातील प्राण्यांना मारून तो आपली उपजीविका करीत असे. एकदा त्याने रानातील रेड्याला मारून त्याचे भक्षण केले. तेव्हा रेड्याचे एक हाड वाघाच्या दातात अडकले व चिकटून बसले. त्याने ते काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! ते हाड काही केल्या निघेना. दातातून पू व रक्त वाहू लागले. तो वेदनेने तळमळू लागला.शेवटी तो वाघ झाडाच्या बुंध्यापाशी जबडा पसरून बसला. हे हाड कसे निघेल? मी जिवंत राहीन की नाही? काय करावे? या विचारांनी वाघ चिंताग्रस्त झाला.

अचानक त्याचे लक्ष झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेले. अंधःकारात जणू दीपदर्शनच!  त्याने कावळ्याला आपली व्यथा कथन केली. पुढे तो कावळ्याला म्हणाला, “जर तू माझ्या मुखातून हाड काढून मला जीवदान दिलेस, तर मी तुला दररोज मी शिकार केलेल्या प्राण्याचे मांस तुझ्या अपेक्षेप्रमाणे देईन. माझ्यावर एवढे उपकार कर.” वाघाने वारंवार प्रार्थना केल्याने व त्या पशुश्रेष्ठाचे दुःख पाहून कावळ्याला दया आली. वाघाच्या मुखात प्रवेश करून त्याने ते हाड काढले, व वाघाला वेदनामुक्त केले.

नंतर वचन दिल्याप्रमाणे, ”आता तू मला मांस दे” अशी कावळ्याने वाघाला विनंती केली. तेव्हा, “माझ्या मुखात प्रवेश करून तू मला त्रास दिलास, त्यामुळे मी असंतुष्ट आहे. तू वर माझ्याकडे मांस मागतोस? तू क्षणभरही इथे थांबू नकोस. दूर जा!” असे वाघाने कावळ्याला सुनावले.

तात्पर्य – संकटकाळात ज्याने मदत केली आहे अशा व्यक्तीचे लोकांना सुखकारक काळात विस्मरण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंधलहरी ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ गंधलहरी ☆ श्री आनंदहरी ☆ 

ऊन चांगलंच रणरणत होतं.. तो पाय ओढत चालत होता. पायात अंगठा तुटलेली जुनाट चप्पल.. तळ झिजलेला,अगदी आहे म्हणायला असणारा.. रस्ता म्हणजे मातीचा नुसता फुफाटा.. डोक्यावर मुंडासं आणि त्यावर घातलेली त्याच्यासारखीच म्हातारपणाच्या सुरकुत्या ल्यालेली मोरपिसांची टोपी..दोन्ही खांद्याला अडकवलेल्या दोन झोळ्या. एका  हातात आधारासाठी घेतलेली त्याच्या कानापेक्षा थोडीशी उंच अशी चिव्याची काठी. तिला वरच्या टोकाला बांधलेली घुंगरं कधी वाजायची तर कधी नाही. दुसऱ्या हातात शरीराचा जणू अवयवच असावा असं वाटाव्यात अशा दोन बोटांत अडकवलेल्या चिपळ्या. आधीच मंद झालेली चाल उन्हाच्या तकाट्यानं आणखी मंद झाली असली तरी त्याच्या मनाच्या चालण्याचा वेग मात्र तरुणाईलाही लाजवेल असा होता.. मनाने तो कधीच शिवेवरच्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत पोहोचला होता..

फोंडया माळावर असणारं ते एकमेव झाड.. बाकी नजरेच्या टप्प्यात चिटपाखरूही न दिसणारा तो माळ..

घशाला कोरड पडली होती पण तरीही घोटभर पाणी पिण्यासाठी तो थांबला नाही..रस्त्यावरुन वळून पायवाटेने तो माळावर निघाला आणि शेवटी आंब्याचं झाड दिसलं तसा सावलीत आल्यासारखा तो मनोमन सुखावला आणि त्याच्याही नकळत त्याच्या चालण्याचा वेग वाढला.

आंब्याच्या सावलीत तो पोहोचला. त्याने हातातल्या चिपळ्या, काठी ,खांद्याच्या दोन्ही झोळ्या खाली ठेवल्या आणि खाली बसता बसता घाम पुसत त्यानं झाडाच्या जरासे पलीकडे असणाऱ्या खोपटाकडे नजर टाकली..

“किस्ना ss !”

एका झोळीतून पाण्याची बाटली काढत त्यानं हाळी मारली. त्याच्या आवाजानं चित्तवृत्ती फुललेला किस्ना खुरडत खुरडत खोपटातनं बाहेर आला.  किस्नाला पाहताच त्याचा चेहरा खुलला. किस्ना तसाच त्याच्याजवळ आला. दोन घोट पाणी पिऊन त्यानं ती बाटली किस्नाकडे दिली. किस्नानं बोटं झडलेल्या हातात कशीबशी बाटली धरली आणि दोन-चार घोट पाणी पिऊन, त्याच्या येण्याने आधीच थंडावलेल्या जीवाला आणखी थंड केलं. त्यानं झोळीतून कुणी कुणी कागदात गुंडाळून दिलेला भाकरतुकडा बाहेर काढला.  त्यातील दोन गुंडाळ्या उलगडून पाहिल्या. एकात अर्धी भाकरी-चटणी होती, दुसऱ्यात झुणका भाकरी होती.. त्याने त्या किस्नापुढं ठेवल्या.

“खा..”

“देवा, तू ?”

भुकेली नजर भाकरीवरून त्याच्याकडं वळवत किस्नानं विचारलं.

त्यानं त्या झोळीतून कागदाच्या  आणखी काही गुंडाळ्या, पुड्या बाहेर काढल्या. त्यातली चटणी- भाकरी एका कागदावर घेतली. दोन तीन कागदातली भाकरी,चपाती,चटणी,भाजी काही शिळं काही ताजं.. जणू गोपाळ काला करावा तसं सारे एकत्र केले आणि एका पुडीत बांधून बाजूला ठेवत म्हणाला,

“सांच्याला खा. “

उरलेल्या पुड्या, गुंडाळ्या परत झोळीत टाकल्या.

“घ्ये देवाचं नाव. “

असे किस्नाला म्हणून त्यानं भाकरीचा तुकडा मोडला.

भाकरी खाऊन झाल्यावर तो किस्नासाठीची भाकरी आणि झोळीतून चारपाच पाण्याच्या बाटल्या काढून घेऊन खोपटात गेला. तिथं भाकरी ठेवून, पाण्याच्या बाटल्या तिथल्या  मटक्यात रिकाम्या करून परत आला. पारभर सावलीत किस्नासंगं बोलत बसला. काही वेळ गप्पांत गेल्यावर लेक,सून,नातवंडं असणाऱ्या गोकुळात परतायला पाहिजे..आधीच रोजच्या पेक्षा जरा जास्तच उशीर झालाय हे जाणवून निघण्यासाठी उठता उठता तो किस्नाला म्हणाला,

“भाकरी हाय खोपटात…सांच्याला खा बरं का ? घरला जाया पायजेल आता.”

त्यानं रिकाम्या बाटल्या झोळीत टाकल्या, मोरपिसांची टोपी मुंडाशावर ठेवली, दोन्ही झोळ्या खांद्याला अडकवून काठी हातात घेत ‘येतो रं किस्ना ‘ म्हणत तो काहीशा धीम्या गतीनं चालू लागला.

त्याला जाताना पाहून किस्नानं त्याच्याशी नकळत पाणावलेले डोळे आपल्या थोट्या हाताने पुसता पुसता किस्नाला आठवलं.

हाता-पायाची बोटं झडायला लागल्यावर पोटच्या पोरांनी, बायकोनं घराबाहेर हाकललं.. आणि कोण कुठला तो.. एकदा सावलीला म्हणून झाडाखाली आला.. आणि या शापित आयुष्याची सावली झाला.. त्यानंच नाव दिलं..’ किस्ना ‘

पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहत असणाऱ्या किस्नाला ते सारे आठवलं आणि त्यानं ‘ देवाs !’ म्हणून आपले थोटे हात जोडून नमस्कार केला.

आपल्या मोहराला त्याच्या मनाचा गंध ल्यावा, यावा असे आंब्याच्या झाडालाही वाटू लागलं.

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आनंदाचे गुपीत ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आनंदाचे गुपीत ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

बायकोच्या किटी-पार्टीवर नेहेमीच नाराज असणारी आई, आज इतक्या आनंदात असलेली पाहून, ‘आज काही जादू वगैरे झाली आहे की काय?‘ असा चेहेऱ्यावर दिसणारा प्रश्न सौरभने शेवटी आपल्या बायकोला विचारलाच

…” प्रेरणा, आज हे असं नेहमीपेक्षा उलटच कसं झालंय? तुझी किटी पार्टी, आणि आईच्या चेहेऱ्यावरची नाराजी, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय असल्या-सारख्या आहेत खरं तर. पण आज तर आई फारच खुशीत दिसते आहे. बोलण्यातही एक वेगळाच नवा उत्साह जाणवतो आहे. याआधी अनेक वेळा आणि अनेक प्रकारे मी तिला समजावून पाहिलं. पण अशा पार्टी वगैरेच्या विरोधातच तिने पूर्वीपासून जोपासलेल्या मानसिकतेतून ती कधीच बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे आज हा खरोखरच एक चमत्कार वाटतो आहे मला. आज तू अशी कोणती जादू केली आहेस तिच्यावर? ”

यावर प्रेरणाने हसतच उत्तर दिलं…” सौरभ, ही माझ्या मैत्रिणींची कमाल आहे. आज त्यांनी आईंना अगदी आर्जव केल्यासारख सांगितलं की….. “काकू तुम्ही एकट्या आतल्या खोलीत बसून रहाता, ते आम्हाला चांगलं वाटत नाही. तुम्हीही आमच्याबरोबर बाहेर येऊन बसा ना”…..आणि त्यांना हाताला धरून त्या बाहेर घेऊन आल्या. सगळ्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. इतकंच नाही, तर ती लव्हली आहे ना, ती आधी पाया तर पडलीच, पण नंतर त्यांना मिठी मारत सगळ्यांना उद्देशून म्हणाली की,

“मी जेव्हा जेव्हा इथे येते ना, तेव्हा काकू माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. मला काय काय छान गोष्टी सांगतात. म्हणूनच आजपासून काकू म्हणजे माझी सगळ्यात ‘बेस्टफ्रेंड‘ असणार आहे”…..आणि जेव्हापासून ती हे बोलली आहे, तेव्हापासून…….”.

 

मूळ हिंदी कथा : सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खारीचा वाटा ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ जीवनरंग ☆ खारीचा वाटा ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

अनघा , तिच्या सासूबाई आणि सासरेतिघं चहा-ब्रेकफास्ट घेत होते, तेवढ्यात नवरा आणि मुलगा पण आले. लॉक डाउन मूळे हे एक बरे झाले होतेकी सगळेएकत्र जमून चहा-ब्रेकफास्ट घेत होते.” अनघा , आज सकाळी लवकर उठून तु भराभर सगळे आवरलेस, एकदम खुश दिसते आहेस ! ” इति सासरे. हो बाबा आज पासून माझी शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे तेव्हा मला बरेच दिवसाने विद्यार्थ्यांचे यस मॅम, थेंक्यु मॅम, सॉरी मॅम असे शब्द कानावर पडणार आहे.” अनधा उत्तरली.

“पण अनु तुला ते ऑनलाईन वगैरे जमणार आहे का?” नवरा गुरगुरला.

“हो न जमायला काय झालं मी एक होउ घातलेल्या आइ-टी इंजिनियर ची आई आहे. अमेय ने मला सगळे निट समजावले आहे.”

“ऑनलाईन शिक्षण म्हणे …! नसते टाईम पास उद्योग … !” नवरा पुटपुटला.

“नाही हो बाबा मी तर म्हणेन जसे सध्याचा काळात आपण डॉक्टर, नर्स, पोलिस ह्याचे कौतुक करतो तसे शिक्षकांचे पण करायला हवे ते सगळे सुद्धा नुसते अभ्यास घेण्याचे काम नाही करत, ते आपल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या निगेटीव्ह वातावरणातून पॉझिटीव्ह एक्टिवीटत बिझी ठेवतात. मला तर अभिमान वाटतो माझ्या आईचा त्यात खारीचा वाटा आहे.” लेकाने केलेले कौतुक एकून अनधा सुखावली. “अनघा तु तुझे कामाचे बघ,मी पोळ्या करेन.” सासूबाई म्हणाल्या.

“हो मी पण भाजी निवडून देतो तेवढाच आमचा सुद्धाखारीच्या घरच्यां चा वाटा….” सासरे हसत म्हणाले.

 

© सौ. स्मिता माहुलीकर

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुसाट वेग ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆ सुसाट वेग ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

एका दुपारी मी बागेतल्या झोपाळ्यावर बसून व.पुं. ची ” वहिदा” वाचत गुंग झाले होते. व. पु. वाचायचे म्हणजे रम्य तेवढेच गंभीर, खुसखुशीत अन् टचकन डोळ्यात पाणी आणणारे , खिळवून ठेवणारे. थोडक्यात काय भान हरपून जायचे. मी त्या दुनियेत पूर्णपणे हरवून गेले होते अन् तेवढ्यात कर्णकर्कश्य आवाज करत सुसाट मोटर सायकल वरून एक तरुण मुलगा आला. हा रस्ता बहुदा त्याला नवखा होता.कारण स्पीड ब्रेकर चा अंदाज न आल्याने तो आमच्या गेट समोर गाडी सकट सपशेल आडवा झाला. बापरे!पुस्तक बाजूला ठेवून मी पटकन गेटपाशी आले. खरंतर मी मी ती मोटर सायकल उचलू शकणार नव्हते की त्याला उठवू शकणार नव्हते. पण म्हणतात ना, ॲक्शन ला रियाक्शन! तशी माझी झटकन रिएक्शन झाली. तेवढ्यात समोर चे काका आले आणि त्यांनी त्या मुलाला उठायला मदत केली. उठल्या उठल्या झटकन त्याने गाडी उभी केली आणि त्या काकांचे आभारही न मानता सुसाट निघूनही गेला. काका माझ्याकडे पाहून हसले आणि आपल्या घरी निघून गेले. आमच्या दारासमोर काचांचा चुरा पडला होता. बहुदा त्याच्या गाडीचा दिवा आरसा जोरदार आपटल्याने आकार बदलून विखुरले होते.

शाळेतून आल्यावर मुलं आत येताना त्यांच्या बुटान बरोबर त्या काळाचा आत यायला नकोत म्हणून मी झाडू आणि केराची सुपली आणून गोळा केल्या. सहज माझे लक्ष त्या सु पली कडे गेले.  त्या आरशांच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये माझा चेहरा मला दिसायला लागला. मला ‘मुगले आझम’ ची आठवण झाली आणि त्या सुटली मध्ये मला ‘प्यार किया तो डरना क्या?’ हे गाणे दिसायला लागले. कदाचित वपुंची वहिदा वाचत असण्याचा तो परिणाम असावा.त्या काचा मी केराच्या बादलीत टाकून आले, पण ते गाणं काही डोक्यातून जाईना.’ प्यार किया तो डरना क्या’ माझं मलाच हसू आलं.मी आता प्यार का करणार होते? मन म्हणाले का नाही? प्रेम काय फक्त प्रियकर-प्रेयसी मध्येच असते? माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे, बागेतल्या या झाडांवर प्रेम आहे, झाडाला इवलीशी कळी आली तरी अत्यानंद होतो मला.मग ती रोज थोडी थोडी मोठी होत उमलायला लागेपर्यंत माझी घालमेल सुरू असते.तिचे पूर्ण फूल उमलले की इतका आनंद होतो म्हणून सांगू. मग, आहेच माझ्या झाडांवर खूप खूप प्रेम.

क्षणात त्या सुसाट मुलाची मला आठवण झाली. त्याच्या आईचे हीत्याच्यावर खूप प्रेम असणारच ना. बाबांची मायाअसणारच ना? त्याला काही झाले असते तर? मीच कासावीस झाले. इतकी कशी बेछूट बेदरकार वागतात ही मुलं? काही विचारच करत नाहीत. एवढी महागडी गाडी घेऊन देणे सहजासहजी का जमले असणार त्याच्या पालकांना? पण मुलावरील प्रेमाखातरच  आपल्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून मुलाची आकांक्षा इच्छापूर्ण केली असेल त्यांनी. पण त्याला त्याची काही जाणीव नको का? आता माझे मन सुसाट धावायला लागले.

शांतपणे मी पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसले. माझ्या मनात आलं, त्या मुलाला नाव ठेवायचा मला काय अधिकार आहे? माझ्या विचारांची मोटर सायकल अशीच बेफाम सुटली होती. काही कारण नसताना त्या मुलाचा मी राग राग करत होते. कदाचित काहीतरी तसेच महत्त्वाचे कारण असेल, कोणी दवाखान्यात असेल, कोणाला शाळेतून आणायचे असेल किंवा कोणाला तरी भेटायचे असेल त्याला. मी माझ्या विचारांच्या मोटर सायकलला करकचून ब्रेक लावला, एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा व. पुं.च्या ‘ वहिदा ‘मध्ये समरस झाले.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print