(सुश्री प्रभा सोनवणे जी हमारी पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं । हमें हमारे अस्तित्व से रूबरू कराती हुई वृत्ती -निवृत्ती जैसी लघुकथा सुश्री प्रभा सोनवणे जी जैसी संवेदनशील लेखिका ही लिख सकती हैं।)
आजही कामवाली आली नाही. निशा भांडी घासायच्या तयारीला लागली पण बराच वेळ भांडी घासायची मानसिकता होईना, नवरा म्हणाला “शेजा-यांच्या बाईला सांग ना आपलं काम करायला”!
“असं ऐनवेळी कोणी येणार नाही.” असं म्हणत ती भांडी घासायला लागली! कामवाली जे काम वीस मिनीटात करते त्याला पाऊण तास लागला!
हुश्श ऽऽ करत निशा आराम खुर्चीत बसली. मोबाईल हातात घेतला उगाचच दोन मैत्रिणीं मैत्रिणींना फोन केले, नंतर फेसबुक ओपन केलं…तर समोर नॅन्सी फर्नांडिस चा फोटो, “people you may know” मधे नॅन्सी फर्नांडिस! तिची कॉलेज मधली मैत्रीण! निशा ला अगदी युरेकाऽऽ युरेकाऽऽ चा आनंद! पन्नास वर्षांनी मैत्रीण फेसबुक वर दिसली! बी.एस.सी. च्या शेवटच्या वर्षी त्या दोघींचं कशावरून तरी बिनसलं होतं. सख्ख्या मैत्रिणी वैरीणी झाल्या!
पण त्या क्षणी निशाला नॅन्सी ची तीव्रतेने आठवण आली. कॉलेज च्या पहिल्या दिवशीच नॅन्सी भेटलीआणि मैत्री झाली. तीन वर्षे एकमेकींवाचून चैन पडत नव्हतं. पहाटे अभ्यासासाठी नॅन्सी चं दार ठोठावलं की, नॅन्सी ची आई म्हणे,
“नॅन्सी म्हणजे “लेझी मेरी” आहे, दहा वेळा उठवलं पण अजून बिछान्यातच आहे!”
नॅन्सी च्या आईच्या हातचा तो मस्त आल्याचा चहा… आणि अभ्यास! किती सुंदर होते ते दिवस….
कुठल्या शाळेत अगदी क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण…. एकमेकींपासून किती दूर नेऊन ठेवलं त्या भांडणाने….निशाचे डोळे भरून आले.
तिनं नॅन्सी ची फेसबुक प्रोफाईल पाहिली. ती वसई ला रहात असल्याचं समजलं….निशानं तिला रिक्वेस्ट पाठवली…
पाच सहा दिवस झाले तरी रिक्वेस्ट स्वीकारली गेली नव्हती. निशाचं आडनाव बदललेलं.. पन्नास वर्षात चेहरा मोहरा बराच बदललेला!
नॅन्सी ने ओळखलं नसेल का? की मनात राग आहे अजून? निशा खुपच बेचैन झाली!
आणि एक दिवस फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारल्या चा मेसेज आला. मेसेंजर वर नॅन्सी चे मेसेज ही होते, “कशी आहेस? खुप छान वाटलं तुला फेसबुक वर पाहून! आठ दिवस फेसबुक पाहिलंच नाही!”
मग महिनाभर चॅटींग, फोन होत राहिले! नॅन्सी चा वसई ला ये…हे आग्रहाचं आमत्रंण स्वीकारून निशा वसई ला पोचली! थांब्यावर नॅन्सी स्कूटर वर न्यायला आली होती. टिपीकल ख्रिश्चन बायका घालतात तसा फ्रॉक, पांढ-या केसांचा बॉयकट….दोघी ही सत्तरीच्या आत बाहेर!
नॅन्सी ची स्कूटर एका चर्च च्या आवारात येऊन थांबली. बाजूलाच तिचं बैठं घर….मस्त कौलारू …प्रशस्त!
“हे घर माझ्या आजी चं आहे, मला वारसा हक्काने मिळालेलं!”
नॅन्सी बरीच वर्षे अमेरिकेत राहिलेली, नवरा, मुलं, सूना, नातवंडं सगळे अमेरिकेत!
नॅन्सी ला मातृभूमी चे वेध लागले आणि ती भारतात आली. वसई तिचं आजोळ, दोन वर्षांपूर्वी नॅन्सी इथे आली, अगदी एकटी….
“तुला एकटीला करमतं इथे?” या निशा च्या प्रश्नावर नॅन्सी हसली,
“आपण एकटेच असतो गं आयुष्याभर, कुटुंबात राहून एकटं असण्यापेक्षा, हे एकटेपण आवडतं मला!”
“पण मग वेळ कसा जातो तुझा?”
“अगं दिवस कसा जातो कळत नाही. माझी सगळी कामं मीच करते. बाई फक्त डस्टींग आणि झाडूफरशी करायला येते! आधी मीच करत होते, पण ती बाई विचारायला आली,”
“काही काम आहे का?”
“ती सकाळी लवकर येऊन काम करून जाते, आम्ही सकाळ चा चहा आणि ब्रेकफास्ट बरोबर घेतो. खुप गप्पीष्ट आहे ती, लक्ष्मी नाव तिचं!”
मग दिवस भर मी एकटीच…स्वयंपाक, कपडे मशीन ला लावणं, भांडी घासणं, रेडिओ ऐकते, वाचन करते, मोबाईल आणि टीव्ही फारसा पहात नाही. आणि मुख्य म्हणजे मी लोकरीचं विणकाम भरपूर करते, दुपारी चार मुली येतात लोकरीचं वीणकाम शिकायला!
रविवारी चर्च, गरीबांना मदत करते, माझं एकटेपण मी छान एंजॉय करतेय….
थोडं फार सोशल वर्क…गरीब गरजूंना मदत करते…पैसे आहेत माझ्या कडे आणि माझे खर्च ही फार नाहीत.
विशीत दिसत होती त्यापेक्षा नॅन्सी आता खुप सुंदर दिसत होती. चेह-यावर, व्यक्तिमत्वात जबरदस्त आत्मविश्वास!
पूर्वी ची झोपाळू, हळूबाई असलेली नॅन्सी खुपच चटपटीत, स्मार्ट झाली होती. तिचा त्या घरातला वावर, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, कामातली तत्परता, कामवाली शी बोलण्याची पद्धत, पटकन केलेला रूचकर स्वयंपाक सारंच विलोभनीय होतं!
चार दिवसांत निशानं इकडचा चमचा तिकडे केला नाही..म्हणजे नॅन्सी ने तिला तो करू दिला नाही..” तू बस गं, ही माझी रोज ची कामं आहेत” असं म्हणत ती घरातली कामं फटाफट उरकत होती.
भरपूर गप्पा…जुनी गाणी ऐकणं…वसई च्या किल्ल्यातली आणि आसपासच्या परिसरातील भटकंती… सारं खुप सुखावह! पन्नास वर्षाचा भला मोठा कालखंड निघून गेला होता. पण या चार दिवसांत त्या कॉलेजमधल्या निशा – नॅन्सी होत्या.
“नॅन्सी किती छान योगायोग आहे आपल्या भेटीचा! आठवणींना वय नसतं, त्या सदा टवटवीत असतात…..जशी तू..मी मात्र आता म्हातारी झाले…आणि म्हणूनच निवृत्त ही!”
“निशा निवृत्ती ला वय नसतं, ते आपण ठरवायचं…जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम ….”
“खुप छान वाटतंय गं, का अशा दूर गेलो आपण? आपल्या भांडणाचं कारण ही किती फालतू……”
“जाऊ दे निशा….नको त्या आठवणी, जर तसं घडलं नसतं तर आज हा आनंद आपण घेऊ शकलो असतो का? सारी देवबापाची इच्छा!
नॅन्सी ला दोन मुलगे, निशाला दोन मुली सगळे आपापल्या करिअर मधे, संसारात मश्गुल……
नॅन्सी सारे पाश सोडून इतक्या लांब नव्या उमेदीने आलेली… वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी केलेली नवीन सुरूवात…तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल ती फारसं बोलत नव्हती! निशा चा संसार ही फारसा सुखाचा नव्हता, गेली पन्नास वर्षे टिकून होता इतकं च!
निशा जायला निघाली तेव्हा नॅन्सी नं तिला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यात अश्रू च्या धारा…बाहेर पाऊस….
नॅन्सी ने स्वतः विणलेला बिनबाह्यांचा शुभ्र पांढरा स्वेटर निशा च्या अंगावर चढवला आणि हातात हात गुंफून पाऊस थांबायची वाट पहात बसून राहिल्या…
आता त्या परत कधी परत भेटणार होत्या माहित नाही….
निशा घरी पोचली तेव्हा, नवरा टीव्ही वर रात्री च्या बातम्या पहात होता…तिला पाहून त्याच्या चेह-या वरची रेषा ही हलली नाही.
निशा च्या आळशी सुखवस्तूपणाची साक्षीदार असलेली आराम खुर्ची तिची वाटच पहात होती…….
खरंच निवृत्ती ला वय नसतं ती वृत्ती असते निशा स्वतःला च सांग त होती…..
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503