मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मदर्स डे – ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मदर्स डे – ☆ डॉ. शैलजा करोडे

मे महिना, उन्हाची काहिली, अंगाची नुसती लाही लाही होत होती. वीजेचे पंखेही नुसती गरम हवा फेकत होते. या गरमीने जीवही खूप घाबरा होत होता. थोडा आराम वाटावा म्हणून मी लिंबू सरबत बनविले, त्यात बर्फाच्या दोन कूब्ज टाकल्या, छान गारेगार वाटले. हुssssश करत मी सुस्कारा सोडला. मनावरची मरगळ गेली. थोडं फ्रेश वाटलं.

शुभम, तुला काही बनवून देऊ काय ? काही हवंय काय बाळ ? ” ” नको, काही नको ” ” अरे दुपारचे चार वाजलेत. भूक लागली असेल, काही तरी खा बेटा “” नको म्हटलं ना, समजत नाही काय तुला ?” ” अरे, असं बोलतात काय आईशी ” ” मग, तूच शिकव कसं बोलायचं ते ” ” शुभम ” माझा आवाज चढला, तसा तो गप्प झाला, पण मी चुकलो, साॅरी मम्मी, असे शब्द जणू त्याच्या डिक्शनरीतच नव्हते.

काय करावं या पोराचं, कसं समजवावं, काय चुकतंय माझं. कोठे कमी पडतेय मी. काहीच कळत नाही. मी जितकं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते तितका त्याच्यातील आणि माझ्यातील दुरावा वाढतोय.

शुभमच्या बाबांशी बोलले तर म्हणाले, अजून लहान आहे तो, त्याचं भावविश्व निराळं, निरागस असतात लहान मुलं, एखादी गोष्ट मनात बसली कि तीच धरुन ठेवतात. त्याच्या कलेनं घे. कोणत्या गोष्टीची जबरदस्ती करू नकोस त्याचेवर, त्याच्याशी गोड बोलून त्याच्या मनाची निरगाठ सोडव. ” अहो, तेच तर करते मी. त्याच्याशी बोलायला जाते. तर तोच तुटकपणे वागतो, होय, ठीक आहे, करतो मी, अशी उत्तरे याच्याकडून मिळतात, संवाद वाढवू तरी कसा. ?” हे बघ, मीनाक्षी थोडं सबुरीने घे, होईल सगळं ठीक, काळजी करू नकोस, पुढील आठवड्यात आपण तुझ्या मामेभावाच्या लग्नासाठी गावी जाणार आहोत, लग्न समारंभ, व तेथील वातावरणात, समवयस्क मुलात रमेल तो, आणि होईल सगळं नीट.

विचारांच्या तंद्रीतून मी बाहेर आले, पाहिले तर घड्याळ्यात साडेपाच वाजलेले, ऊन कललं होतं. चला लग्नासाठी खरेदी करायचीय, मामा मामीसाठी आहेर, नवरदेवासाठी भेटवस्तू, शुभमसाठी एखादा नवीन ड्रेस खरेदी. मी तयारी केली. ” शुभम चलतोस काय रे माझ्यासोबत, चल काही खरेदी करायचीय ” ” नको मम्मी, तूच जा ” ” अरे चल रे, दिवसभराचा घरात आहेत, सायंकाळचं थोडं मोकळ्या हवेत फिरणंही होईल. घरात नुसतं कोंदटल्यासारखं नाही वाटत तुला ” ” नाही मी नाही येत, मी घरीच बुद्धीबळाची मॅच खेळतो लॅपटाॅपवर, तू जा ” ” अरे बाळा, मॅच नंतरही खेळशील, चल थोडं बाहेर ” ” नाही नको ” मग मी काही बोलले नाही, शुभमचे बाबा प्रकाशचे शब्द मला आठवले, ” थोडं सबूरीने घे, त्याच्या कलेनं घे, जबरदस्ती करू नकोस

मी एकटीच निघाले. मामीसाठी छान साडी, मामासाठी शर्ट पँटचं कापड, घेऊन झाले. आता राहिली होती भेटवस्तूंची खरेदी. नवीन नवीन अनेक प्रकारच्या भेटवस्तूंच्या व्हरायटीज होत्या. काय घ्यावे, मीच थोडे गोंधळले, निर्णय होईना.

“हॅलो काकी ” ” हॅलो रितेश, काय रे कसा आहेस, कोण आहे सोबत ” ” बाबांसोबत आलोय, परवा मदर्स डे आहे ना काकी, मम्मीसाठी भेटवस्तू व ग्रीटींग घेण्यासाठी आलोय. तिला सरप्राइज द्यायचंय. ” ” नमस्कार ताई, रितेशचे बाबा बोलत होते, मुलांचा हट्ट पुरवावाच लागतो, आणि आई प्रती चांगलं करताहेत मुलं तर प्रोत्साहन द्यायलाचं हवं ना ” ” होय भाऊ, बरोबर म्हणताय तुम्ही, कशा आहेत निताताई, बरेच दिवसात तुम्ही आला नाहीत आमचेकडे, या एकदिवस. ” होय, येऊ जरूर, चला निघतो “

शुभमने मदर्स डे ला मला कधीच ग्रीटिंग, भेटवस्तू तर दिलीच नाही पण ” Happy mother’s day, mamma ” अशा शुभेच्छाही दिल्या नाहीत.

कशानुळे इतका आकस असेल याच्या मनात. ” नाही, आकस कसला मीना, तुझाच मुलगा आहे तो, नसतो कोणाचा स्वभाव बोलका, ग्रीटींग, भेटवस्तू, शुभेच्छा दिल्या तरच तू त्याची आई असणार आहे काय ? नाही ना, ” माझे मी मलाच समजावले, विचारांच्या गर्तेत कोठल्या कोठे भरकटलो आपण.

आज रविवार, आठवडाभराची सगळी साचलेली कामे तर होतीच, सुटीचा दिवस म्हणून स्वयंपाकाचा मेनूही मोठा राहातो, ” मीनाक्षी, आज रविवार, गोड बनवतेय तर थोडा शिराही बनव, मदर्स डे आहे आज, आईला भेटून येतो वृद्धाश्रमात, तिच्या आवडीचा शिरा घेऊन जातो. ” ” बाबा मी पण येईन आजीला भेटायला, बघा तिच्यासाठी ग्रीटींगही बनवलयं मी स्वतः, कसं झालंय ? ” एक वृद्ध आजी, व तिच्यासमोर बसलेला तिचा नातू, छान चित्र रेखाटलं होत. पोरानं “

” होय बेटा, जाऊ आपण आजीकडे “

अच्छा, तर ही अढी आहे याच्या मनात. पण शुभम मी नाही पाठवलं रे तुझ्या आजीला वृद्धाश्रमात. “

लग्न होऊन मी गृहप्रवेश केला आणि सासूबाईंना वाटलं कि घराची सत्ता आता हिच्या हाती जाणार, माझा मुलगा हिचा होणार. मग कशावरुन ना कशावरून रोज घरात कुरबुरी होऊ लागल्या, मी काही मेनू बनवला तर सासूबाई त्यात त्रुटीचं काढायच्या. मी भेंडी मसाला केला तर मला हे नको, भरली वांगी हवीत. बरं रोजचा मेनू तुम्ही ठरवून द्या, मी तेच बनवीन, तर ते ही नको, ” आयुष्यभर केलं मी, आताही विश्रांती नको ” सणवार यांना अगदी साग्रसंगीत हवीत. पण माझी नोकरी व टाईमाचं गणित जमेना. चंपाषष्ठी अगदी दांपत्य भोजनासह झाली पाहिजे, माझी जवाबदारीची पोस्ट, मला आॅफीसमधून रजा घेणंही शक्य होईना. ” सासूबाई आपण चंपाषष्ठी रविवारी साजरी करूया, अगदी दांपत्य भोजनासह ” ” वाह म्हणजे आता तू सणावारांची तिथीही बदलणार तर, ” आणि वादाला सुरूवात. प्रकाशने माझ्यासाठी साडी आणली आणि आईसाठी नाही आणली असे कधी घडले नाही, पण सासूबाईंना ते ही सहन होईना. ” एक दिवस मी तापाने फणफणले. यांच्या पूजेची मी तयारी करू शकले नाही, नाही स्वयंपाक घरात काही काम ” ” नाटकं आहेत नुसती, काय धाड भरलीय, “. प्रकाशनेच चहा केला, आईला दिला, मला दिला, ” करा, करा सेवा, काय दिवस आलेत. नवर्‍यानेच बायकोची सेवा करायची “

प्रकाश काही बोलले तर, ” वाह छान, तू बायकोचीच बाजू घेणार, चूक माझीच असणार ना. माझंच नशीब खोटं ग बाई, म्हणत यांचं रडणं सुरू व्हायचं.

आणि एकदिवस तर कहरच झाला, मला नाही राहायचं या घरात माझ्या दोघी मैत्रिणी सुमा आणि उमा आहेतच वृद्धाश्रमात. घरच्या कटकटींपासून दूर, आनंदात जगत आहेत. मी जाईन तिथे.

उद्याच्या उद्या वृद्धाश्रम प्रवेशाची सगळी प्रक्रिया पूर्ण कर. ”  ” आई, ऐक माझं, नको असं करूस. मला पोरकं नको करूस. या घरावर तुझी माया राहू दे. “

” सासूबाई, नका असं करू. काही चुकलं माझं तर मुलगी समजून माफ करा ” ”  हं, पुरे झाला हा मानभावीपणा, तू  आलीस, आणि माझा मुलगा दुरावला ” ” माझे थोडे दिवस राहिलेत आता, आनंदाने जगू दे मला “

आणि माझ्या सासूबाई देविकाबाईंनी वृद्धाश्रमाची वाट चोखाळली.

विचाराच्या भोवर्‍यातून मी बाहेर आले.

” होय प्रकाश, मी बनवते शिरा, चांगला दूध, केळी, सुकामेवा घालून अगदी सत्य नारायणाच्या प्रसादासारखा. आणि ऐकलं काय, मी पण येईन तुमच्यासोबत वृद्धाश्रमात “

वृद्धाश्रमात सासूबाईंचे मैत्रिणीसोबत काही दिवस चांगले गेले, पण तेथील उपरेपण, एक प्रकारचं शिस्तबद्ध वातावरण, इतर वृद्धांच्या समस्या, त्यांची दुरावलेली मुले, त्यांचा समाचारही कधी न घेणारी, तर वृद्ध मंडळीच्या अंत्यसंस्कारही वृद्धाश्रमच करीत होतं. हे सगळं पाहून देविकाबाई हतबल होत. “त्यामानाने प्रकाश आणि मीनाक्षी ने तर नेहमी त्यांचा सन्मानच केलेला, काळजी घेतलेली, आणि येथे आपण स्वतःहून दाखल झालो, मुले नको म्हणत असतांना, पण हे उशीरा सुचलेलं शहाणपण. “देविकाबाई विचार करून सुन्नं होतं.

” देविकाबाई, बघा कोण आलंय तुम्हांला भेटायला, आश्रमातील सेवेकरी मधुकर माझा नातू शुभमला घेऊन आला. ” आजी ” म्हणत तो देविकाबाईंना बिलगला. तू एकटा आलास बाळ, ? ” नाही आजी, पप्पा आणि मम्मीसुद्धा आलीय ” ” काय सांगतोस पप्पा मम्मी आलेत ” ” होय आई, आम्ही आलोत ” आणि सासूबाई, तुमच्या आवडीचा शिरा आणलाय, खाऊन घ्या आणि आपलं सामान पॅक करा, आपल्याला घरी जायचंय. तोपर्यंत प्रकाश वृद्धाश्रमाच्या कागदपत्रांची पूर्तता करतील.

” गुणी गं, माझी बाळ ” म्हणत सासुबाईंनी मला आज जवळ घेतलं. त्यांचे भरलेले डोळे मी अलगद पुसले.

शुभम हे सगळं पाहात होता, मला व आजीला त्याने मिठीत घेतले. My mummy is best mummy in the world.. Happy mothers day mamma ” म्हणतांना त्याचा चेहरा अत्यानंदाने खुलला होता.

आज शुभमच्या मनाची निरगाठ सोडवण्यात मी यशस्वी झाले होते.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा नऊवारी साडीची… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ कथा नऊवारी साडीची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

“अगं स्वानंदी आजच आत्याचा फोन आलाय.आपल्याकडे मुक्काम आहे बरं का तिचा “असं म्हणतच मी  घरात  शिरलो.मला वाटलं  आश्चर्याने आणि आनंदाने टाळ्या वाजवील स्वानंदी.

.इतकी तिला माझी आत्या आवडायची.पण बाईसाहेब आपल्याच नादामध्ये होत्या. हातात साडीची घडी आणि डोळ्यातून वहाणाऱ्या अश्रूंच्या सरी.. हुंदका दाबतच त्या नऊवारी साडीवर तिने डोक टेकवलं.मी निरखून बघितलं तर ती माझ्या सासूबाईंसाठी आणलेली नऊवारी साडीची घडी होती.

सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहीला…हो देवयानीच्या आमच्या लेकीच्या लग्नातली गोष्ट. सिमंत पूजन झालं.. मानपान यथोचित,  यथास्थित पार पडले.  सगळे खुश होते.  कुजबूज ऐकायला आली. सकाळी लवकर चा मुहूर्त म्हणून अंथरूणावर अंग टाकणार, एवढ्यात स्वानंदी धावत पळत आली,आणि म्हणाली, “अहो ऐका ना,आत्ताच वर पक्षाकडे चाललेली कुजबूज कानावर आली. युगंधरच्या आजी म्हणे हट्टाला पेटल्या  आहेतआणि  म्हणताहेत , माझ्या बहिणीचा मानपान कां नाही केला मुलीकडच्यांनी.?आत्ताच्या आत्ता तिला नऊवारी साडी नेसवा.नाहीतर मी चालले घरी.उद्या अक्षता टाकायला पण येणार नाही म्हणावं मी. हंसून मी हीला म्हणालो, ” अग त्यात काय एवढं ? मग दे की आपल्या जवळची एखादी चांगली भारी  साडी. पण हे बघ आजींना दुखवायला नको हं!, हो व्याह्यांनी बजावून सांगितल आहे, ‘आमच्या घरात आईचा शब्द प्रमाण असतो. आम्ही सगळे तिला जपतो.शब्दानेही कधी दुखवत नाही. आनंदी म्हणाली, ” अहो हे सगळं मला माहित का नाहीय्ये,अहो पण  आपल्याआहेराच्या बॅगेत   नऊवारी साडीच नाही. आणि आणू म्हटलं तर ती आणायची कशी ? आणि कुठून? आत्ता रात्रीचे बारा वाजलेत. आणि सकाळी लवकरचा साडेसहाचा मुहूर्त आहे लग्नाचा. आत्ता रात्रीचे बारा वाजलेतआणि सकाळी सातला दुकानं तर उघडी हवीत ना ? ऐन वेळेला नऊवारी कुठून आणायची ? स्वानंदी रडकुंडीला येऊन मला सांगत होती.एक तर हे लग्न युगंधर कडे कुणालाच पसंत नव्हतं, कारण त्यांनी पसंत केलेली मुलगी नाकारून युगन्धरचा आमच्या देवयानी शीच लग्न करण्याचा हट्ट  होता.तो मला म्हणाला होता,” बाबा आमच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तुम्ही माझ्या माणसांना सांभाळा. ते म्हणतील तस्स करा प्लीज. पुढचं मी बघतो पण ती वेळ फक्त माझ्यासाठी.. फ़क्तमाझ्या साठी निभाऊन न्या. “आणि मग मीही शब्द दिला होता जावयाला. मनात आलं नऊवारी साडी देणं म्हणजे कित्ती साधी गोष्ट आहे. पण ती आणणं किती अवघड आहे. याची कल्पना मला बायकोने दिल्यावर मी हादरलो. देवयानीचा माझ्या मुलीचा रडवेला चेहरा, स्वानंदीची उलघाल, आणि माझी हतबलता,माझ्या सासूबाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्या म्हणाल्या, ” जावई बापू , स्वानंदी,अगं काय झालंय ? मला सांगाल का ? किती अस्वस्थ  आहात तुम्ही! मुलाकडच्यांनी  गाडी , स्कूटर, मागितली आहे का ?”..” अगं आई गाडी काय!  अगदी विमान मागितल असत तरी कॅश दिली असती आपण.” असं म्हणून आमच्या अर्धागिनीने सारी कथा कथन केली. ती ऐकल्यावर सासूबाई जरा विचारत पडल्या.कारण परिस्थितीच तशी होती बहिणीला नऊवारी नेसवल्याशिवाय आजी मांडवात येणारच नव्हत्या . आणि आजी शिवाय लग्न होणारच नव्हतं.आत्ता यावेळी सगळे दुकानदार दुकानं बंद करून घरी घोरत असतील. आणि थंडीच्या साखर झोपेतून ते लवकर दुकानात येणं म्हणजे अशक्य बाब होती. आता काय करायचं ? युगंधरचा अगदी कळवळून हात जोडून सांगितलेला अगदी केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मागणी साधी होती, पण गहन विचारात टाकणारी होती.सासूबाई लगबगीने  उठल्या. आणि उजळत्या चेहऱ्याने परतल्या.त्यांच्या हातात साडीची पिशवी होती. ती स्वानंदीच्या हातात देत त्या म्हणाल्या,” घ्या काखेत कळसा आणि गावाला वळसा,’ स्वानंदी  अगं ही नऊवारी साडी दे देवयानीच्या मावस आजे सासूबाईंना. ” माझा चेहरा उजळला. केवढं मोठ्ठ कोडं सोडवलं होतं सासुबाईंनी. पण देवयानीच्या, माझ्या मुलीच्या बोलण्याने मी भानावर आलो. नात आजीला म्हणत होती, “अगं काय हे आजी? अगदी खूप दिवसापासून ची तुझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून  आईने खास तुझ्यासाठी  ही  हिरव्या रंगाची साडी मुद्दाम येवल्याहून तयार करून आणलीय.आई सांगत होती, घरची गरिबी, आत्या काकांचं आजी-आजोबांचं व इतर गोतावळ्यांच्  करण्यातच तुझं सारं आयुष्य त्या धबड्ग्यातच गेलं म्हणे. आजोबांच्या कमी पगारात तु नेहमी स्वतःच्या मनाला मुरड घालायचीस. सोनं काय साधी भारी साडी पण तुझ्या अंगाला कधी लागली नाही. नंतर आजोबांच् आजारपण, . औषध पाणी, ऑपरेशनचा खर्च. आईने सगळं लक्षात ठेवलय आणि मुद्दाम तुझ्यासाठी नऊवारीचा खास वाण येवल्यावरून आणला आहे.” नातीचा धबधबा थांबवत आजी म्हणाली, देवयानी बाळा खरंय तुझं म्हणणं, राणी तुमच्या भावना कळतात गं मला, पण आता वेळ साजरी करणं महत्वाचं आहे . लग्नात झालेल्या कुरबुरी आयुष्यभर सुनेला ऐकाव्या लागतात आणि तुझ्या सासरच्यांना दुखावून कसे चालेल ?तरीपण देवयानी आपलं घोडं पुढे दामटतच म्हणाली, ” आजी तुमच्याकडे हिरवं घ्यायचं नाही ना म्हणून ही नऊवारी खास कारागिराकडून आणलीय. तुझ्या हौसेला मुरड घालावी लागलेली आम्हांला नाही आवडणार. आयुष्यभर मन मारूनच राहणार आहेस का तू ? ठेव ती साडी बॅगेत. उद्या नेसायचीय ती तुला माझ्या लग्नात. या संभाषणात मी आणि स्वानंदी गोंधळून गेलो होतो.

काय करावं ? काही कळतच नव्हतं. सासूबाईंनी अखेर हीच्या हातात साडी ठेवली आणि म्हणाल्या, “स्वानंदी चल लवकर ओटीची तयारी कर. आपण आत्ताच त्यांना मानाची साडी देऊया.उद्या त्यांना नेसता येईल. आणि चिडलेल्या देवयानीला त्यांनी समजावलं,. “पोरी सासरच्यांवर रागावू नकोस . हीच वेळ आहे भावी संसार  सांवरण्याची . आपल्या माणसांची मन जिंकण्याची. मनाचा तळ कधीही गढूळ नाही होऊ द्यायचा. नितळ मनाने केलेला संसारही नितळच होतो.” आणि मग सासूबाई मानाचे पान घेऊन निघाल्या, विहीण बाईंकडे. इतका वेळ आता काय करायचं? हे विचारायला प्रश्नचिन्ह घेऊन दाराआड उभा राहिलेला युगंधर पुढे झाला. स्वानंदी कडे वळून तो म्हणाला,” भाग्यवान आहात तुम्ही. अशा आभाळा एवढ्या स्वच्छ मनाच्या आई तुम्हाला मिळाल्यात.असं म्हणून तो पुढे होऊन आजीच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या पायाशी वाकला.सारे संवाद त्यांनी ऐकले होते.भारावून तो म्हणाला, ” आजी ग्रेट आहात तुम्ही. दोन घरं सलोख्यांनी जोडण्याचं तुमचं कसब अजब आहे. माझ्या माणसांना न दुखवता मला हे लग्न करायचं होतं.

माझ्या भावना जाणल्यात तुम्ही. माझी आजी तशी चांगली आहे हो! पण  कुणीतरी कानाशी लागलं असावं म्हणून तिच्या मनांत हे असं आल, आणि तिचं मन भरकटल.

तर मित्र-मैत्रिणींनो इतकं सगळं रामायण सांगण्याचं कारण  महाभारत न घडता लग्न खेळीमेळीत पार पडलं. मावस आजी कमालीच्या खुश झाल्या .  नऊवारी नेसून हरखल्या आणि आनंदाने बहिणी बहिणी लग्नात मिरवल्या. युगंधर च्या आजी म्हणाल्या, “वय झालं म्हणून काय झालं ? म्हातारपणीही हौस, ही  असतेच की.शिवाय व्याह्यांनी  मानाने दिलेली साडी मिरवण्यात आनंद असतो. “.माझ्या मनांत आलं,एखाद्याचं आयुष्य मनाला मुरड घालण्यातच सरतं. परिस्थितीमुळे अगदी साध्या गोष्टीही त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत.  सासूबाईंच्या बाबतीत तेच झालं आणि अजूनही होतंय. पण सासूबाई समाधानी होत्या . घेण्यापेक्षा देण्यातच त्यांना आनंद वाटायचा. तर  अशा या गोडव्यात शुभमंगल मंगलमय रितीने पार पडलं. मंडळी खरी कथा आणि  व्यथा पुढेच आहे. नंतर आम्ही छान नऊवारी घेण्यासाठी दोन वेळा  बाहेर पडलो. पण कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते.कारण पहिल्यावेळी सासुबाई आजारी पडल्या.आणि आणि दुसऱ्या वेळी तर….तर…त्या स्वर्गवासी झाल्या. एखाद्याचं नशीबच असं असतं.  कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते ते अगदी खरंय …काळ सरला… पण राहून गेलेल्या दुःखाची बोच  स्वानंदीच्या मनात बोचतच राहयली.तिच्या दुःखावर मलमपट्टी करायलाच हवीय नाही का! मी तिला समजावलं “अंथरुणावर  पडून वेदनेने त्रासलेल्या सासूबाईची दया येऊन देवाने त्यांचं सोनंचं केलं . हे बघ  कुणी कुणाचं दुखणं आणि दुःख नाही वाटून घेऊ शकत. तुमचे मुलांचे सुखाचे संसार बघून तृप्त मनाने त्या गेल्या .दैवगती आहे ही. स्वतःला सांवर.” रडवेली माझी बायको अगतिक होऊन म्हणाली ,”सगळं कळतय हो मला , पण अधिक महिना आलाय. ही साडीची घडी कुणाला देऊ मी ? माझी अपुरी इच्छा आईची ओटी भरायची कशी पुरी होईल   हॊ ? स्वानंदीचे डोळे पुन्हा भरून आले.

” अगं त्यात काय ! मी आहे ना.!.मी होईन तुझी आई .” डोळे पुसत स्वानंदी म्हणाली, “कोण ?आत्या ! तुम्ही.?..

तुम्ही..कधी आलात?” , “पोरी अगं सारं बोलणं ऐकलय मी . तुझ्या नवऱ्याने तुझी खंत मला सांगितली.आणि आम्ही एक प्लॅन आखला. अधिक मासात दुर्देवाने आई नसली तर मावशी, जाऊबाई कुठलीही मायेची माय 

चालते. आपण नवीन पद्धत पाडू . आज पासून तू माझी मुलगी झालीस .चल !  पूस ते डोळे , उठ पटकन् ! ओटी ची तयारी कर …..पण काही म्हण स्वानंदी , हिरव्या नऊवारीची मला  खूप हौस होती  हं.लगेच घडी मोडीन मी.

मग काय ! उत्साहाने  उठत  डोळे पुसत, विजेच्या चपळाईने आमच्या बायकोने ओटी सोहळा पार पाडला.साडीची घडी आत्त्याच्या हातात दिली.

गोऱ्या पान आत्त्या च्या अंगावर हिरवीगार साडी खूपच छान दिसत होती. आणि मग नऊवारीत  खुलून दिसणारी आई आणि अपुरे स्वप्न पुर्ण झाल्याच्या तृप्तीने , आईकडे बघणाऱ्या लेकीच्या भारावलेल्या डोळयांत आनंदाश्रू चमकले. वातावरण हंसर व्हायला हव,  म्हणून मी म्हणालो,” ऐक  नां आत्त्या 

ही तुझी लेक नां ? मग मी जावई झालो तुझा. पण मग जांवयाला चांदीच्या ताटात अनारशाच वाण दे ना मलालवकर , “

मला चापट मारून आत्या म्हणाली,”अरे लबाडा ! सरळ सांग ना मला अनारसे आवडतात म्हणून.”  आणि मग स्वानंदी पण खुदकन् हंसली.

मित्र मैत्रिणींनो आता यापुढे कितीतरी अधिक मास येतील आणि जातीलही .पण हा अधिक मास आमच्या कायम लक्षात राहील. सण साजरे करायचे ते आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी.मग हा  बदल तुम्हाला आवडला तर सांगाल कां मला ?

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उद्या पालकांना घेऊन ये… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

उद्या पालकांना घेऊन ये…☆ श्री मयुरेश देशपांडे

उद्या बाहेरगावी जायची त्याची लगबग त्याच्या आत्ताच्या घाईत स्पष्ट जाणवत होती. जेवणं लवकर उरकली, माझा बिछाना लवकर घातला आणि आपल्या खोलीकडे लवकर गेला. दाराच्या फटीतून बाहेर येणारा प्रकाश अद्याप तो जागा असल्याचे सांगत होता, उद्या प्रवासात न्यायचे सामान भरत असेल बहुधा. पूर्वी हे सामान त्याच्यासाठी दुसर कोणी भरत होतं. त्यामुळे लक्षात ठेवून सगळे सामान, रोजची औषधे आणि हो ज्या कामासाठी जायचे आहे त्या संदर्भातील कागदपत्रे असे खूप काही. मला त्याला उद्याबद्दल सांगायचं होतं, विचारायचं होतं, थांबवायचं होतं, पण तो आज माझ्याशी नीट बोललाच नाही, आज त्याने मला काही विचारलेही नाही.

मला माझ्या वर्गशिक्षकांनी उद्या पालकांना घेऊन ये, असे सांगितले होते आणि नेमके तेच मला त्याला सांगायचे होते. पालकांमध्ये आई आणि बाबा दोघे आले ना? पण माझी आई कुठे आहे? कुठे आहे म्हणजे खरेच कुठे आहे मला माहित नाही. रडायला लागले की चित्रपटातला बाबा सांगतो, तसा माझा बाबा मला आकाशातला एखादा तारा दाखवतो आणि माझ्या आईचा पत्ता सांगतो. शाळेतल्या बाईंना पण तो हेच सांगेल काय? हो, पण त्यासाठी आधी तो शाळेत तर आला पाहिजे, तो तर उद्या बाहेरगावी चालला आहे, निदान त्याची धावपळ तरी हेच सांगतीये. आता काय करायचे?

वर्गशिक्षिकांनी “पालकांना घेऊन या”, असे नक्की का सांगितले असावे? प्रश्नांचे जाळे शाळेतून निघाल्यापासून मला गुंत्यात अडकवत होते. अगदी रात्री बिछान्यात अंग टाकल्यावरसुद्धा. म्हणजे एरवी बाबाने अंगावर दुलई घातली की अंगाई गीताची गरज नाही की काऊ माऊच्या गोष्टीची गरज नाही. पण आज तसे झाले नाही. बाबाने त्याच्या खोलीत जावे म्हणून मी काहीवेळ डोळे मिटलेही, पण त्याने दार ओढून घेताच ते उघडलेही. आता तो त्याच्या आणि मी माझ्या खोलीत जागे होतो. समजा उद्या बाबा शाळेत आलाच, तर बाई त्याला काय सांगतील? तुमची मुलगी खिडकीतून बाहेर बघत असते, वर आकाशात कोणाला तरी शोधत असते, अभ्यासात ठीक आहे पण वर्गात अजिबात लक्ष नसते, आताशी मित्र मैत्रिणींपासूनही लांब राहु लागली आहे वगैरे सगळे तर नाही ना सांगणार? आणि हे ऐकून बाबाला काय वाटेल? तो खरेच माझ्यासाठी खूप काही करत आहे. अगदी त्याचा व्याप पूर्वी इतकाच सांभाळत. मग त्याला अपयशी तर वाटले तर? तो माझ्यावर रागावला तर? नाही नाही मी यातले काहीच होऊन देणार नाही. उद्या सकाळीच वर्गशिक्षिकांना जाऊन भेटीन, त्यांची माफी मागेन आणि त्यांना हवे तसे वागण्याचे आश्वासन देईन. फक्त माझ्या पालकांना, म्हणजे फक्त माझ्या बाबाला शाळेत बोलवू नका. आता मात्र विचारांनी थकलेले माझे डोके कधी शांत झोपेत गेले कळालेच नाही.

सकाळी बाबा लवकर उठला असावा बहुधा. आज त्याला बाहेरगावी जायचे असावे. मग आजी तरी इकडे येईल किंवा मला तरी आजीकडे पाठवेल, म्हणजे धम्मालच धम्माल. इतक्यात कालची शाळा आठवली, बाईंचे पालकांना बोलावणे आठवले. बाबाला सांगू का? तो बिचारा बाहेरगावी चालला आहे. सगळेच रद्द करावे लागेल त्याला. नको कालरात्री ठरवल्याप्रमाणे मीच जाऊन भेटीन बाईंना.

एखाद्या शहाण्या मुलीसारखे माझे सगळे आवरूनच मी खोली बाहेर आले. दिवाणखान्यात शाळेचे दप्तर ठेवले. स्वयंपाकघरात जाऊन बाबाला काही मदत हवी आहे का विचारले. “अरे वा! आज माझे पिल्लू स्वतःहून उठले आणि तुझे आवरूनही झाले.”, बाबा खूप खूश झाला. मग मी पटकन दुध प्यायले, दोघांनी नाष्टा उरकला आणि शाळेत खेळांची तयारी आहे असे सांगून मी सायकल काढत लवकर घरातून बाहेर पडले. शाळा सुरू व्हायच्या आधी वर्गशिक्षिकांना भेटायचे होते.

मी सायकल घाईने दामटत शाळेत पोहचले. सायकल लावली आणि समोरच्याच झाडाखाली जाऊन बसले. बाईंशी बोलायची हिंमत होत नव्हती. काय आणि कसे बोलायचे याची वाक्ये मनात जुळवत होते, पुन्हा पुन्हा उजळणी करत होते. मी हे सगळे बोलल्यावर बाई काय म्हणतील? रागावतील, घरी पाठवतील की प्रेमाने जवळ घेत पाठ थोपटतील.

ते काही नाही जाऊच आत्ता असे म्हणत दप्तर पाठीवर घेत मुख्य इमारतीकडे चालू लागले. बाहेरच प्रवेशद्वाराजवळ बाबाची भली मोठी गाडी दिसली आणि छातीत धडधडायला लागले. बाबा इथे कसा आला, बाबाला हे सगळे कसे कळाले, तो तर बाहेरगावी चालला होता, मग इथे कसा आला, पुन्हा प्रश्नांचा गोंधळ. मी शिक्षकांच्या खोलीकडे वळाले. अर्ध्या वाटेतच बाबा परत येताना भेटला.

“अग वेडे कालच नाही का सांगायचस? यात घाबरण्यासारखे काय? बरे, मी वर्गशिक्षिकांशी बोललो आहे. तू थेट वर्गाकडेच जा आता आणि हो, त्या तुझे खूप सारे कौतुक करत होत्या. तेव्हा मी बाहेर गावावरून येताना तुझ्यासाठी मोठे बक्षिस आणणार आहे.”

मला नक्की काय बोलावे हेच कळत नव्हते. त्याच्या भल्या मोठ्या गाडीत बसताना बाबा मला गाडीपेक्षाही मोठा भासत होता, माझे आभाळजणू. मी वर्गात पोहचून बाकावर दप्तर ठेवले आणि वर्गाबाहेरच वर्गशिक्षिकांची वाट बघत उभे राहिले. त्या आल्या तशी त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि आईजवळ रडावे तसे हमसून हमसून रडायला लागले.

“हं चला आता वर्गात, प्रार्थनेची वेळ झाली आहे”, बाई मात्र हसून इतकेच म्हणाल्या.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा — डायबिटीस प्रेम / नव्या वळणावर ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन लघुकथा — डायबिटीस प्रेम / नव्या वळणावर ☆ श्री मंगेश मधुकर 

[१]  डायबेटीस प्रेम

बराच वेळ डॉक्टर रिपोर्ट पहात होते त्यामुळं अनंतची अस्वस्थता वाढली.

“अनंतराव,तपासण्या करून घेण्याची सुबुद्धी कशी काय झाली.त्यातही दोघांनीही तपासण्या केल्या हे चांगलं केलंत”डॉक्टर हसत म्हणाले. 

“काही सीरियस?”

“खास नाही.अभिनंदन!!आयुष्यभर सोबत करणारा नवीन नातेवाईक आलायं”

“डायबेटीस”

“हो,काळजी घ्यावी लागेल.शुगर जास्त आहे.औषधं देतो पण सवयी बदलून पथ्य काटेकोरपणे पाळावी लागतील.” डॉक्टरांचा निरोप घेऊन विचारांच्या तंद्रीतच अनंत घरी आला.

“रिपोर्ट आले.काय म्हणाले डॉक्टर.सगळं व्यवस्थित ना.”अनीतानं एकापाठोपाठ प्रश्नांचा भडिमार केला.

“काही विशेष नाही”

“म्हणजे काहीतरी आहे.तुम्हांला चांगलं ओळखते”

“शुगर खूप वाढलीय”

“अरे बाप रे!! मग”

“औषध दिलीत आणि पथ्य सांगितलीयेत.”

“काळजी करू नका.तसंही आपण जास्त गोड कुठं खातो”

“आपल्याला वाटतं पण रिपोर्ट काही वेगळंच सांगतायेत.आजपासून चहा बंद”अट्टल चहाबाज अनंतचा गळा दाटून आला.

“पथ्य म्हणजे अवघड आहे.तुम्हांला गोड तर अतिप्रिय.”

“फक्त मलाच???तू पण गोड खाण्यात तोडीस तोड आहेस”

“मग असं करू आपण दोघंही मिळून पथ्य पाळू.दोघात तिसरा आता गोड विसरा.”अनीतानं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. 

“मग काय काय खाणं बंद करायचं.”

“जे जे आवडतं ते सगळं..”

“इतक्या वर्षांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी एकदम कशा बदलायच्या.तुम्हांला जमेल”

“जमवावं लागेल.नाहीतर.. ” 

“काय होईल”

“औषधाबरोबरच इन्सुलिन सुरू करावं लागेल.” 

“बाप रे.त्यापेक्षा नव्या नातेवाईकाचा पाहुणचार जोडीनं करू या.एक से भले दो.”

“नको.माझ्यासाठी इच्छा मारू नकोस.बिनसाखरेचा चहा,कारल्याची भाजी यागोष्टी झेपणार नाहीत.खूप त्रास होईल.”

“चॅलेंज देऊ नका.मी ठरवलं तर काहीही करू शकते.”

“रोज किमान अर्धा-पाऊण तास चालायला सांगितलेय.मला चालण्याचा जाम कंटाळा.तू बरोबर येशील.” 

“हे बरंयं.बोट दिलं तर तुम्ही हात पकडताय.असं वाटतयं की डायबेटीस मलाच झालाय”

“शुभ बोल.”

“त्रास होतो म्हणून तपसण्या केल्या अन भलतंच झालं.माझे रिपोर्ट नॉर्मल आले आणि तुम्हांला….”

“शंका असेल तर चेक कर”

“अहो,तसं नाही तुमच्यावर विश्वास आहे.या साखर बंदीचा फार त्रास होणार.”

“तो कसा काय?”

“मनाला आणि शरीराला बदल झेपायला पाहिजे ना.”

“आता यावर नंतर बोलू.चल आवर फिरायला जाऊ.”

“आजपासूनच..”अनीता 

“कल करे सो आज कर म्हणूनच आता डायबेटीस लाईफचा श्रीगणेशा आजच..”

“हे किती दिवस”

“सध्या तरी तीन महीने नंतर पुन्हा तपासण्या करू आणि मग डॉक्टर सांगितल तसं..”अनंत-अनीताचं नवीन रुटीन सुरू झालं.गोड खायची खूप इच्छा व्हायची पण मोह आवरला.बिनसाखरेचा चहा घशाखाली उतरायचा नाही म्हणून दिवसातून चार-पाच वेळा होणारा चहा दोनवर आला.जेवणात कारल्याचं प्रमाण वाढलं.सकाळी व्यायाम आणि संध्याकाळी चालणं सुरू झालं.तीन महिन्यांनी तपासण्या करून डॉक्टरांकडे गेले. अनीता रिसेप्शनिस्टशी बोलत असताना अनंत लगबगीनं आत गेले.

“डॉक्टर,एक महत्वाचं सांगायचंय”  

“बोला”

“हिला डायबेटीस विषयी..”तितक्यात अनीता आल्यामुळे अनंत गप्प बसले. 

“डायबेटीस विषयी काय म्हणत होता”डॉक्टरांनी विचारलं. 

“काही विशेष नाही.तुम्ही सांगीतल्याप्रमाणे पथ्य पाळीलीत.अजून काही काळजी घ्यायची का?’

“सांगतो.”

“वा,वा!!वहिनी,रिपोर्ट एकदम नॉर्मल.काळजीचं कारण नाही”डॉक्टर. 

“थॅंकयू डॉक्टर!!यांचा डायबेटीस काय म्हणतोय”

“मला शुगरचा त्रासच नाहीये”गडबडलेले अनंत पटकन म्हणाले. 

“तेच तर …डायबेटीस तुम्हांला आहे.त्यांना नाही.”डॉक्टरांचं बोलणं ऐकून अनीताला धक्का बसला. 

“डायबेटीस आहे म्हणून यांनी तीन महीने कडक पथ्य पाळलीयेत”

“चांगलयं की मग!!अनंतराव ठणठणीत आहेत.बिनधास्त गोड खाऊ शकतात.तुम्ही मात्र पथ्य आणि व्यायाम असाच चालू ठेवा.काहीही प्रॉब्लेम होणार नाही.”रिक्षातून येताना अनीता एकही शब्द बोलली नाही.त्यामुळं आता काय होणार या विचारांनं अनंताला टेंशन आलं.

“खोटं का बोललात”घरात पाऊल टाकताक्षणीच अनीताचा प्रश्न. 

“खोटं बिटं काही नाही उलट डायबेटीस होऊ नये म्हणून मी सुद्धा काळजी घेतली”

“मन मारून..”

“इतकी वर्षे गोड खातोय.काही दिवस बंद केलं तर काही बिघडत नाही. ”

“माझ्यासाठी केलंत ना” भरल्या डोळ्यांनी अनितानं विचारलं. 

“आपल्यासाठी..”

“डायबेटीसचं कळल्यावर घाबरले असते आणि माझं गोडावरचं प्रेम बघून कोणतीच पथ्य पाळली गेली नसती म्हणूनच हा खेळ केलात ना”

“यामुळे फायदाच झाला ना.तुझी शुगर कंट्रोल मध्ये आली आणि माझंही थोडं वजन कमी झालं.”

“चहा चालेल”

“पळेल”अनीतानं चहाचा कप दिला.पहीला घोट घेतल्यावर अनंतानं विचारलं “हे काय”

“अडीच चमचे साखर घातलीये.गोड चहा आवडतो ना.बिनधास्त प्या”

“अगं पण तुला..”

“तुमच्या प्रेमामुळे माझाही चहा एकदम गोड आहे.” अनीता अशी काही लाजली की अनंतच्या काळजाचं पाणी पाणी झालं.त्याच वेळी रेडिओवर सुरु असलेलं “बहोत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो….. ” हे गाणं अनुराधा पौडवाल आपल्यावतीनं गात आहेत असचं दोघांना वाटलं.

[२] “नव्या वळणावर…

सकाळची गडबडीची वेळ, किचनमध्ये आवराआवर सुरू होती.नवरा मित्राला भेटायला निघाला. 

“अहो,बाहेर जाताय तर एक काम करणार”जरा भीत भीतच विचारलं. 

“बोला”

“टोमॅटो अन बटाटे आणता”काही बोलले नाहीत पण चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसला. 

“आणतो”

“आधी बटाटे घ्या आणि नंतर ..”पिशवी देताना म्हटलं तर नवरोबा प्रचंड चिडले. 

“विनाकारण अक्कल शिकवू नकोस”

“धांदरटपणा माहितीये म्हणून सांगितलं”

“तुझा बावळटपणा काढू का?” झालं!! रोजच्याप्रमाणं ‘तू तू .. मै मै..’ सुरू झालं.शेवटी हातातली पिशवी फेकून दार आपटून नवरा बाहेर गेला. संतापानं लाही लाही झाली. सणसण डोकं दुखायला लागलं.कामं बाजूला ठेवून बसून राहिले.डोकं शांत झाल्यावर ताईला फोन केला “आहेस का घरी”

“हो.आहे की”

“दहा मिनिटात येते”

“काही विशेष”

“सहजच”आवरून ताईच्या घरी गेले.चहासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या असताना एकदम ताईनं विचारलं “सगळं काही ठिक ना.”

“हो,असं का विचारतेस”

“बोलतेस वेगळे पण चेहरा निराळचं सांगतोय अन डोळे तर..”

“काही नाही.यांच्याशी वाद झाला”

“संसारात असल्या गोष्टी चालयच्याच”

“तसं नाही गं.आजकाल आम्ही बोलतो कमी आणि भांडतो जास्त.मग त्यासाठी कोणतही निमित्त पुरतं.रोजच कटकट.कुठंतरी निघून जावंसं वाटतं पण जायला जागा नाहीये.”

“लग्नाची पंचवीशी उलटल्यावर हे असं होतच”ताईनं अनुभवाचे बोल सांगितले. 

“हो,पण सहन करायला पण काही मर्यादा असते.किती अडजेस्ट केलं,मन मारलं ते माझं मलाच माहिती.”

“हे सगळं तुझ्याच संसारासाठी केलं ना’

“पण संसार माझ्या एकटीचा नाहीये.”

“पण तुझा नवरा तर चांगलायं ना”

“जगासाठी.खरं काय ते मला विचार.फक्त पैसे कमावले म्हणजे झालं का?घरात बाकीच्याही जबाबदाऱ्या असतात.दुखणी-खुपणी असतात ते सगळं मीच बघते.”

“म्हणजे नवरा बिनकामाचा आहे.”ताईनं हसत हसत विचारलं. 

“अगदीच तसं नाही.चांगलं वागत नसले तरी वाईटही वागत नाही फक्त नीट बोलत नाही.इतरांशी किवा फोनवर मात्र गुलूगुलू बोलतात.त्याचाच जास्त राग येतो.”

“असं का वागता म्हणून विचारलं नाही का?”

“तुला काय वाटतं.विचारलं नसेल.दहादा विचारलं पण उत्तर दिलं नाही उलट मीच खूप चिडकी आणि विसराळू झालीय असं म्हणाले.नाही नाही ते सुनावलं मग मी पण आख्ख खानदान खाली आणलं.”

“एवढं करून काय मिळवलं”ताई. 

“मनस्ताप,चिडचिड आणि अबोला,घरातली शांतता घालवली.”

“सगळं कळतय ना मग वाद का घालतेस”

“मुद्दाम करत नाही.चाळीशी नंतरच्या बदलांचा परिणाम होणारच ना.अशावेळी हक्काच्या माणसानं समजून घेतलं पाहिजे ना पण यांना काही कळतच नाही.सतत आपलं ‘तू बदललीस, बदललीस’ हा धोशा चालू.मुलीसुद्धा वडिलांची री ओढतात.कोणाला माझी किंमतच नाही.”एकदम भरून आलं अन ओक्साबोक्सी रडायला लागले. ताई पाठीवरून हात फिरवत होती.मायेच्या,वडीलकीच्या स्पर्शनं जास्तच रडायला आलं. 

“शांत हो,”

“आजकाल मूड सारखे बदलतात.सारखी चिडचिड होतेय हे मला समजतं.त्यामुळं वाद,कुरबुरी होतात हे मान्ययं. बाईच्या आयुष्यात ही फेज येतेच.सांभाळून घ्यावं एवढी साधी अपेक्षा पूर्ण होत नाही. गेल्या काही वर्षांपासून आमचं अजिबात पटत नाहीये.धड बोलणं तर दूरच पण सारखी भाडणं नाहीतर अबोला.खूप वैताग आलाय.एकमेकांची तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही पण नाईलाज.”

“तुला असं का वाटते की भाऊजीनी समजून घेतलं नसेल”ताई. 

“१०० टक्के खात्री आहे.”

“शांतपणे विचार केला तर अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील.”ताई बोलण्यानं विचारचक्र सुरू झालं.एकेक गोष्टी आठवल्या.नवरा घर कामात करत असलेली मदत,अनेकदा क्षुल्लक कारणावरून मी चिडले तरी त्यांचं शांत राहणं.चूक नसताना माघार घेऊन टाळलेले वाद अशा अनेक गोष्टी आठवल्यावर रागाची धार बोथट झाली.

“नवरा अगदीच वाईट नाहीयं” सहजच बोलून गेले.

“चला,तुझं तुलाच समजलं यातच सगळं आलं.”

“आता निघते.त्यांच्या आवडीची कांद्याचं थालपीठ करते.खूष होतील.”

“काळजी घे ”

“येस,नक्की,काळजी घेईन ”

“मी भाऊजींविषयी बोलतेय.”

“म्हणजे”

“बायकांच्या आयुष्यात जसे हार्मोन्समुळे वागण्या-बोलण्यात बदल होतात.मूड स्विंग होतात. इमोशनल उलथापालथ होते.चाळीशीनंतर पुरुषांच्या आयुष्यात देखील तशाच घडामोडी होतात.मिडलाईफ क्रायसिस.मन सैरभैर होतं.अस्वस्थता वाढते. शारीरिक तक्रारी सुरू होतात.पुरुषांनाही त्रास होतो. फरक एवढाच की आपण बायका निदान बोलतो तरी ….पण पुरुष यावर व्यक्तच होत नाहीत.एकदम गप्प राहतात नाहीतर चिडचिड करतात.अनेकांना तर होणारा बदल समजतच नाही तर बरेचजण स्वीकारत नाही.”

“फक्त स्वतःला कुरवाळत बसले.त्यांच्या बाजूनं  कधी विचारच केला नाही..”

“जगण्याचा मार्ग बदलणाऱ्या ‘नव्या वळणावर’ एकमेकांना सांभाळलं ना मग पुढचा प्रवास सोप्पा होतो.”ताईनं जगण्याचं मर्म सोप्या शब्दात सांगितलं. इतक्यात नवरोबांचा फोन “हे बघ,टोमॅटो घेतलेत आता बटाटे किती घ्यायचेत” त्यांचं बोलणं ऐकून मला हसायला आलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“अग पुष्पा,काय ग सुंदर हापूस हा ! असला अस्सल हापूस कित्ती वर्षांनी खाल्ला मी .. वा वा.”)  – इथून पुढे 

त्या मे महिन्यात दोघीनी खूप मजा केली.सारसबागेत फिरल्या  मंडईत गेल्या, पर्वती  चढल्या. दमून हाश हुश करून उसाचा रस प्यायल्या. .   त्या रात्री बोलता बोलता मीना म्हणाली, “ पुष्पा, एक कल्पना येतेय मनात ..  सांगू का?बघ आवडते का. पटली तर हो म्हण नाही तर नको.आपण असं दोघीनी एकेकट्या रहाण्यापेक्षा  एकत्र राहून बघूया का?काही महिने माझ्या मुंबईच्या घरात तर काही महिने तुझ्या पुण्याच्या घरात.म्हणजे दोन्ही घरं चालू रहातील आणि आपल्याला आपली कंपनीही मिळेल.तुझी मुलगी आली की तू पुण्याला जा,मुलगी नातवंडं यांच्या बरोबर रहा, मग ती मुंबईला येईल मुलं घेऊन.आणि माझ्याकडेही रहातील ते.चालेल का? एक पथ्य पाळायचं. कोणीही कितीही गॉसिप केलं,काड्या घालायचे प्रयत्न केले तरी अजिबात  लक्ष द्यायचं नाही. सर्व खर्च आपण निम्मे निम्मे वाटून घेऊ.  दोन्ही घरांचे.काही वाद झाले तर लगेच सोडवून टाकायचे.चालेल का? “ मीना म्हणाली. नाहीतरी त्या दोघीत मीना हुशार, व्यवहारी जग बघितलेली होती, हे पुष्पाला चांगलंच माहीत होतं. हा प्रयोग दोघीनी करायचं ठरवलं. इतक्यात कलिका प्रशांतला काहीच नको सांगायला असं ठरवलं दोघीनी. सहा महिने खूप मजेत सुरळीत गेले आणि मग मीनाने ही ऐडजस्टमेंट मुलांना सांगून टाकली.  कित्ती आनंद झाला त्या दोघांना . प्रशांत सरळ म्हणाला “सासूबाई,तुमची मला खात्री आहे हो पण आमच्या आईसाहेब जरा विचित्र आहेत. तुम्हाला त्रास नाही ना होत तिचा?नाहीतर नका असले  प्रयोग करू हं. तुम्ही खूप समजूतदार आहात.” 

मीना हसून म्हणाली, “ नाही रे. खूप बदलली आहे पुष्पा. आता.तशी ती भाबडी आहे.मस्त जमतंय आमचं. तुम्हाला सांगू? पुढच्या महिन्यात  बँकॉक ट्रिप करतोय आम्ही केसरीबरोबर. आहे ना मजा?कुठं गेले नाहीये रे मी कित्ती वर्षात.कलिकाचे बाबा गेल्यानंतर नाही जमलं कुठं जायला पण आता पुष्पाची मस्त कंपनी मिळालीय तर जाऊ अशा  ट्रिपाना. नशिबाने दोघींकडे चांगला पैसा आहे तर येतो जाऊन “ . 

प्रशांत म्हणाला “ क्या बात है. जरूर जा सासूबाई मजा करा.”   

त्या दोघी नंतर अशा छोट्या ट्रिप्स करू लागल्या.दोघीनी एक पथ्य पाळले .तुझी मुलगी माझा मुलगा हे विषय अजिबात बोलायचे नाहीत. वादाचे मुद्दे बंद.पुष्पाने स्वयंपाकघराचा ताबा घेतला तर मीना बँक हिशेब बिले हे सगळं चोख बघायची.बिल्डिंगमधल्या भोचक बायकांना सुगावा लागलाच,की विहिणी विहिणी एकत्र रहातात. त्यांना आश्चर्यच वाटले आणि कधी भांडणं होतात याकडे लक्ष ठेवून होत्या बायका. प्रयत्नही करून झाले भांडणे लावायचे पण या दोघी भक्कम होत्या. कधीही त्यांनी या लोकांना थारा दिला नाही. मुलांना अतिशय आनंद झाला आणि हायसं वाटलं की आपल्या आया एकेकट्या पडल्या नाहीत आता.एकमेकींना धरून रहात आहेत आणि आयुष्य छान जगत आहेत. त्या दिवशी कलिकाचा फोन आला पुष्पाला. “ अहो आई गम्मत सांगायची आहे तुम्हाला.माझ्या ऑफिसमध्ये मी सहज लंच ब्रेकमध्ये सांगितलं ना की माझी आई आणि सासूबाई खूप महिने हल्ली एकत्र रहातात तर मला भेटायला आमच्या ऑफिसमधली  केटी घरी आली. म्हणाली कलिका,खरंच का तुझ्या सासूबाई आणि आई एकत्र रहातात? पटतं का ग त्यांचं?कशी करतात  ऐडजस्टमेंट त्या?” सगळं सीरिअसली विचारत होती हो.मी म्हटलं “ का ग केटी?का विचारते आहेस तू?” तर म्हणाली “अग माझी आणि माझी विहीण जेनीचीही सेम आहे परिस्थिति. कंटाळलो आहोत एकेकट्या राहून. मी जेनीला तुझ्या सासू आणि आईचं सांगितलं तर म्हणाली आपण बघूया का असं राहून?आम्ही सध्यातरी चार महिने बघणार आहोत कसं जमतं ते .जमलं तर बघू.’बघा सासूबाई,किती मस्त होईल ना त्यांचं ही जमलं तर.” कलिका सांगत होती. “ इकडे खूप कंटाळतात हो माणसं अशी एकेकटी राहून.थँक्स तुम्हा दोघीना हं. “ मीना आणि पुष्पाला हे ऐकून फार आनंद झाला.,एकटेपणाचे दुःख त्यांनीही नव्हते का सोसलं? 

त्या दिवशी दोघी बागेत फिरून आल्या आणि सहज सोसायटीतल्या बाकावर बसल्या.शेजारच्या विंग मधले जोग काका त्यांच्या जवळ आले.” जरा बसू का मी इथं पाच मिनिटं?” जोग काकांनी विचारलं.”अहो बसा की त्यात काय विचारायचं?” पुष्पा म्हणाली.

जोग म्हणाले, “ तुम्ही प्रशांतच्या आई ना?आणि या सूनबाईंच्या आई, हो ना?” “ हो हो आम्ही विहिणी आहोत दोघी. का हो?” जोग म्हणाले “ गेले चार वर्षे तुम्हाला आम्ही एकत्र रहाताना बघतोय.मोकळेपणाने विचारतो,जमतं का हो असं राहून?मला फार कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.रागवू नका हं.”   

“ अहो त्यात काय रागवायचंय?आम्ही चार नाही हं पण सहा वर्षे झाली अशा मजेत रहातोय.मस्त पटतं आमचं. आता या वयात कसली हो भांडणं आणि मानपान?आम्ही आता विहिणी आहोत हेच विसरून गेलोय “.जोग म्हणाले “ आणि नोकर, घरखर्च, हॉटेल असे खर्च कसे करता?” “ते आम्ही निम्मे निम्मे करतो. डॉक्टरचे खर्च मात्र ज्याचे त्याने करायचे असं ठरवून घेतलंय आम्ही.”

जोग म्हणाले “ कौतुक वाटतं आम्हाला तुमचं दोघींचं हो.पहिल्यांदा मीही  साशंक होतो की या दोन बाया कशा काय राहणार कायम एकत्र.त्यातून  हे नातं किती नाजूक. पण  तुम्ही ते  खोटं ठरवलंत.शाब्बास.  आता एक गम्मत सांगतो.आम्ही दोघे मित्र मी आणि शेजारचे  भाटे असेच शेजारच्याच फ्लॅट्स मध्ये राहतोय कित्ती वर्ष दोघेही एकेकटेच. दोघांचीही मुलं परदेशी आणि आमच्या बायकाही लवकर गेल्या म्हणून समदुःखीही आहोत.तुमच्या उदाहरणावरून वाटलं आपणही मित्रांनी एकत्र राहून बघावं का?म्हणून तुम्हाला विचारायला आलो .,भाटे  म्हणाला जा रे त्या दोघीना विचारून ये.आपण पण राहूया असे.”  जोग हसत म्हणाले. मीना हसून म्हणाली “ अहो मस्त घेतलात निर्णय.खूप फायदेही आहेत या सहजीवनात.खर्च कमी होतो,हाकेला कोणीतरी आहे याचा आधार वाटतो आणि एकटेपण जाणवत नाही.जरूर रहा तुम्हीही.अहो या उतार वयात ,मुलं परदेशी असताना आपण असं एकाकी का रहायचं हो?पुष्पा सांग ना याना आपला निर्णय किती योग्य ठरला ते.” पुष्पा म्हणाली “ खरंच रहा तुम्ही आणि भाटे एकत्र.मस्त ट्रिप ना जा, हॉटेलात जा फार्म हाऊस ला जा. ही लास्ट इनिंग मस्त जगा आमच्या सारखीच.’

“ मीनाताई,पुढच्या महिन्यात  आपल्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये या विषयावर एक टॉक द्याल का? मी सुचवलंय तुमचं नाव.” “ देईन की त्यात काय. नाहीतरी हाडाची  प्रोफेसर आहेच मी आणि हे सहजीवन आम्ही यशस्वी करून दाखवलंय असं आता इतक्या वर्षांनी म्हणायला हरकत नाही  हो ना? “ मीना हसत हसत म्हणाली. जोग म्हणाले “ चला मग.त्या टपरीवर मस्त चहा पिऊ या.  तो बघा भाटे आलाच.” 

हसत हसत सगळे मजेत चहा प्यायला टपरीवर गेले.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आधी प्रशांतनं लग्न ठरवलं तेव्हा पुष्पाचा जरा विरोधच होता या लग्नाला.प्रशांत म्हणाला, “ आई,अग शोधून सापडणार नाही अशी मुलगी तुझ्यासमोर आणून उभी करतोय तर का नको म्हणते आहेस ग?काय कमी आहे कलिकामध्ये ? का उगीच नकार द्यायचा म्हणून द्यायचा?एवढी शिकलेली सुंदर हुशार माझ्याइतकाच पगार मिळणारी मुलगी मी अजिबात सोडणार नाही. ठोस कारण सांग मला नको म्हणायचं.”  

पुष्पा जरा घुटमळत म्हणाली, “ तसं नाही रे! कलिका सुंदरच आहे, सगळं छान आहे, पण एकुलती एक आहे ना.” 

“ बरं मग?उलट तुला बरंच वाटायला हवं. भाव्यांची सगळी इस्टेट आयतीच पडेल आपल्या खिशात’! “ उपरोधाने प्रशांत म्हणाला.आपल्या आईचा स्वार्थी,थोडा ,मतलबी स्वभाव जाणून होता प्रशांत. पुष्पा म्हणाली ,” तसं नाही रे बाबा ! पण हिच्यावर एकटीवर आईची जबाबदारी येऊन पडेल ना.  वडील तर नाहीयेत म्हणतोस ना? दोन भावंडं असली की बरं असतं. आईवडील शेअर नाही का होत? “ 

प्रशांत म्हणाला “ हो का?मग मी नाहीये का तुमचा एकुलता एक मुलगा? करणार आहे ना मीच तुमचं?तशीच कलिकाही करील. तिने करायलाच हवं आपल्या आईचं. हा कुठला ग न्याय तुझा?मी कलिकाशी लग्न करणार आणि तिच्या आईची  जबाबदारीही घेणार .नको असेल तर सांग आत्ताच. मी लगेच वेगळा फ्लॅट घेतो.” पुष्पा हादरलीच हे ऐकून. “ तसं नव्हे रे ,पण वाटलं ते सांगितलं. “ 

“ आई,कृपा करून हे कलिका समोर नको बोलू हं, तिला काय वाटेल?किती छान मुलगी आहे ती. तुझं काहीतरीच तिरपागडं असतं बघ.” प्रशांत म्हणाला आणि निघून गेला. वसंतराव ही झकाझकी ऐकत होतेच. पुष्पा फणफणत म्हणाली, “ तुम्ही गप्प बसून रहा बर का .. .कद्धी नका घेऊ बायकोची बाजू. काय हो चूक आहे मी म्हणते त्यात? “ वसंतराव हसत म्हणाले “ मला नका ओढू तुमच्या वादात. मी जातो जरा  बाहेर.” काढता पाय घेत वसंतराव म्हणाले. 

प्रशांतने चार वेळा  कलिकाला घरी आणलं.  खरोखरच छान होती मुलगी.  कलिका मुंबईची होती आणि जॉबसाठी पुण्याला आली होती.  तिच्या आईने या सगळ्याना आपलं घर बघायला बोलावलं. केवढा सुंदर होता  त्यांचा फ्लॅट. मुंबईला चांगल्या एरियामध्ये. प्रशांत कधी बोलला नव्हता हे लोक इतके श्रीमंत असतील असं. कलिकाही कधी असं बोलली नव्हती  .पुष्पाला अगदी कानकोंडं झालं. या सुंदर श्रीमंत मुलीनं काय पाहिलं एवढं आपल्या मुलात हेच तिला समजेना. सहा महिन्यांनी प्रशांत कलिकाचंअगदी थाटामाटात लग्न झालं आणि कलिका सोन पावलांनी घरी आली. पुष्पाला दडपणच होतं की ही श्रीमंतांची मुलगी कशी काय नांदणार आपल्या घरी. पण ती सहज सामावून गेली त्यांच्या घरात. वाटलं तितकी गर्विष्ठ अजिबात नव्हती कलिका. तिच्या आई तर फार चांगल्या होत्या स्वभावाने .आणि कित्ती काय काय करायच्या उद्योग. पुष्पाला उत्तम स्वयंपाक करायची, वाचनाची, भरतकाम  ड्रॉइंगची फार आवड होती. कलिकाच्या आई  मीनाताई एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या आणि आता निवृत्त झाल्या होत्या. मोठ्या फ्लॅटमध्ये एकट्याच रहात होत्या मुंबईला.

त्या दिवशी वसंतराव फिरायला गेले आणि  चक्कर येते म्हणून मधूनच घरी आले. ‘ जरा झोपतो ग,’ असं म्हणून झोपले. बराच वेळ झाला तरी अजून कसे उठले नाहीत.  पुष्पा उठवायला गेली, तर झोपेतच  वसंतराव गेलेले होते. काहीही होत नसताना, कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानकच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेलेच ! सगळ्यांना फार मोठा धक्का होता हा. पुष्पा तर कोलमडूनच गेली. कधीही वसंतरावांशिवाय रहायची सवय नव्हती तिला. हळूहळू एकटं रहाण्याची सवय करावी लागली तिला. यावेळी कलिकाने तिला खूप आधार दिला आणि जपलेही. आपल्या आईचे उदाहरण दिले आणि म्हणाली, “ तुम्हीही आता खंबीर  व्हायला हवं हो आई. माझ्या आईकडे बघा.खूप लवकर गेले माझे बाबा, पण  माझी आई  खंबीर राहिली आणि तिने मला एकटीने वाढवले.आणि स्वतःला खूप व्यस्त ठेवले तिने आणि म्हणूनच मी इतकी शिकले, मोठी झाले.”  

पुष्पाने हळूहळू स्वतःला सावरले आणि आपले आयुष्य सुरू केले. लग्नाला पाच वर्षे झाली.  कलिकाला दोन मुलंही झाली आणि अचानक प्रशांतला आणि कलिकाला अमेरिकेची ऑफर आली. दोघांच्याही आया म्हणाल्या, “अरे मिळतेय संधी तर जा. आम्ही अजून तरी चांगल्या आहोत तब्बेतीने. नंतरचं बघू नंतर. जा तुम्ही.”  कलिका आणि प्रशांत सध्या दोन वर्षासाठी म्हणून अमेरिकेला गेले. 

प्रथम प्रथम पुष्पाला अतिशय बेचैन वाटले, पण नंतर तिने स्वतःला गुंतवून घेतले कितीतरी गोष्टीत. तिने आता दुपारी ड्रॉइंगचे  क्लास  घ्यायला सुरुवात केली आणि तिला छान रिस्पॉन्स मिळायला लागला. छान वेळ जायला लागला तिचा.  एक दिवस सकाळी कलिकाचा फोन आला पुष्पाला. “ आई तुम्हाला एक विनंती होती .माझी आई काल बाथरूम मध्ये पडली आणि फार काही नाहीये पण हाताला फ्रॅक्चर झालंय. तुम्ही प्लीज चार दिवस जाऊ शकाल का?डावा हात आहे तिचा पण जरा थोडी मदत लागेल.नोकर आहेत पण मला फार काळजी वाटतेय हो.मी तर इतक्या लांबून येऊ शकत नाही ना.” कलिका तर रडायलाच लागली फोनवर.” पुष्पा म्हणाली ,” कलिका डोळे पूस बघू. हे बघ काळजी नको करू. मी आत्ताच सकाळी निघते मुंबईला. मी त्यांच्या घरी राहीन आणि तसं वाटलं तर  त्याना आपल्या घरी पुण्याला घेऊन येईन की.तू मुळीच नको काळजी करू ग. ” कलिकाला धीर आला आणि ती म्हणाली आई, “ कळवत रहा हं. किती रिलॅक्स वाटलं तुम्ही जाताय म्हणून ! थँक्स आई “ . 

पुष्पा लगेचच मुंबईला टॅक्सीने  गेली. मीनाताईंना  खूप आनंद झाला त्यांना बघून. “ अग बाई ! कलिकाने दिसतोय फोन केलेला लगेच. काय मुलगी हो. म्हणाले होते मी नको कळवू तुम्हाला. काळजी वाटते हो . नशिबाने डावाच हात आहे म्हणून त्यातल्या त्यात बरं म्हणायचं.” मीनाताई  म्हणाल्या. 

पुष्पा म्हणाली, “ आता आलेय ना मी,मग करा मस्त आराम.” पुष्पाने घर ताब्यात घेतले. स्वयंपाकाच्या बाईना सूचना  दिल्या. मीनाच्या लगेच लक्षात आले,पुष्पा सुगृहिणी आहे आणि उरकही खूप आहे तिला .बाई यायच्या आत सुंदरसा नाश्ता तयार असायचा तिचा. दोघी विहिणी मजेत बाल्कनीत बसून चहा नाश्ता घ्यायच्या. मीनाला खूप आराम मिळाला पुष्पामुळे. “ पुष्पा,आपण मैत्रिणीच जास्त झालो नाही,विहिणी पेक्षा?मग आता मला ए मीना म्हण बघू.आणि मी तुला ए पुष्पा.  चालेल ना? “ हसत हसत दोघीही  तयार झाल्या.

मीनाचे प्लास्टर निघाल्यावर मीनाने खूप फिरवले पुष्पाला मुंबईत.  दोघी चांगली नाटके बघून आल्या,बागेत गेल्या भेळ खाल्ली.मीना म्हणाली, “ खरं सांगू पुष्पा, मला अशी जवळची मैत्रिणच नव्हती ग.कित्ती छान मैत्रीण मिळाली तुझ्यामुळे. आता ही मैत्री कायम ठेवायची आपण.विहिणी नंतर. मैत्रिणी आधी.!” 

“ हो ग मीना,मलाही फार आवडलीस तू.असेच मस्त रहात जाऊया आपण. आता जाऊ ना मी पुण्याला? रहाशील ना नीट? “ मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. “ कित्ती छान काळजी घेतलीस पुष्पा . खूप खूप आभार ग बाई तुझे. असेच प्रेम ठेव. दुनिया काही का म्हणेना.आपण हे मैत्रीचं नातं कायम जपूया.” 

पुष्पा पुण्याला परत आली. कलिकाला अतिशय आनंद झाला. तिने सासूचे शंभर वेळा तरी आभार मानले.

“ अग त्यात काय कलिका? अडचणीला नको का जायला आपल्या माणसाकडे? तीही आली असतीच की माझ्या अडचणीला.आम्ही आता चांगल्या मैत्रिणी झालोय बरं का. विहिणी नाही काही.” पुष्पा हसून म्हणाली. 

नंतर आला मे महिना.

“ मीना,कोकणातून आमच्या घरी आंबे येतात घरचे.आमच्या चुलतसासूबाई पाठवतात ..येतेस ना? मुकाट बॅग भर.” मीना  आढेवेढे न घेता आली. “ अग पुष्पा,काय ग सुंदर हापूस हा ! असला अस्सल हापूस कित्ती वर्षांनी खाल्ला मी .. वा वा.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं.  पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.) – इथून पुढे 

त्यादिवशी बाकावर पागेबाई एकट्याच बसल्या होत्या. नानीनं दुरूनच त्यांना पाहिलं. जरा उदासच वाटत होत्या. मग नानी त्यांच्या शेजारी जाऊन बसली. पागेबाईंनी लगेच त्यांचा हात धरला.

” काय झालं मायाताई ?”

“काही नाही हो! नेहमीचच.”

नानीने थोडा वेळ जाऊ दिला.  फारसे काही प्रश्न विचारले नाहीत. मग त्याच सांगू लागल्या,

” किती वर्ष मी या दोघांना सांगत होते मला नातवाची पावलं दाखवा रे! आठ वर्षे झाली यांच्या लग्नाला. विषयच काढू द्यायचे नाहीत.  मुल जन्माला घालण्यापूर्वीचं यांचं बजेट ठरलेलं असतं म्हणे! ते गाठेपर्यंत थांबायचं.  अरे पण तुमच्या वयाचं काय रे? ते थांबणार आहे का? मूल जन्माला येणं महत्त्वाचं नाही का? ते वाढेलच की आपोआप.  त्यासाठी बजेट कशाला हवं? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याची किंमत आता मोजावी लागते.  तारुण्य सरलं  आता ivf च्या पाठी लागलेत.  काय म्हणाव यांना? मोठ्यांचे सल्ले यांना पटत नाहीत. त्यांच्या अनुभवांशी यांचं काही देणंघेणं नसतं.  यांचा  विश्वास प्रगत विज्ञानावरच. फक्त विज्ञान हाच त्यांचा आधार हो! बाकी निसर्ग तत्वांशी यांचं नातच नाही. मान्य आहे रे बाबांनो तुम्ही सारे खूप प्रगत आहात, खूप पुढे  गेली आहेत तुमची तंत्र.  पण तंत्र, यंत्र आणि निसर्ग यांचा काही ताळमेळ आहे की नाही? सगळी नैसर्गिक मजाच हरवून बसतात जीवनातली.  नाही का हो?”

नानी एकदम भानावर आली मायाताईंच्या  प्रश्नाने. मायाताईंच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर नैराश्य होतं. सगळे पेशन्स संपले होते.

नानी मात्र एवढेच म्हणाली, “नका इतके गुंतून घेऊ स्वतःला.  काळ बदलतो, जीवन बदलतं. त्यांचं आयुष्य त्यांचे निर्णय.  जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. आपण फक्त प्रार्थना करायची.  ठेच लागली तर आधार द्यायचा.  तोही त्यांना हवा असेल तर?”

” काय बोलताय तुम्ही?  असं कुठे असतं का?”

असं म्हणत पागेबाई उठून गेल्या. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे नानी पहात बसली.  क्षणभर तिला वाटलं “हे कालचक्र फिरताना प्रत्येक मागच्या पिढीचं या पागे बाई सारखंच होतं का?” 

नानीचीही पंच्याहत्तरी  उलटली होती. नाना जाऊन वीसेक वर्ष झाली असतील.नानी निवृत्त झाल्यावर राघव म्हणाला, “नानी तू आता एकटी राहू नकोस.”

तसा हा निर्णय खूप मोठाच होता आणि नानीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला पलटी देणारा होता.  नानीला एकटं राहण्याची सवयी झाली होती.  शिवाय दोघात तिसरा नकोच हाही  एक विचार होताच. तशी नानी आर्थिक दृष्ट्या अवलंबूनही नव्हती.  तिचे भरभक्कम पेन्शन होते. स्वतःची सेविंग्ज होती.  नानांची थोडीफार पुंजी होती.  पण त्याला तिने कधीही हात लावला नाही. फक्त नियोजन केलं आणि राघव साठीच राखून ठेवलं.

अनेक कडू गोड आठवणींना मागे ठेवून घराचा उंबरठा कायमचा ओलांडणं नानीला जड गेलं होतं.  पण राघव बरोबर राहताना दोघांच्याही आयुष्यात होणाऱ्या बदलांचं काय करायचं याचं एक निश्चित धोरण तिनं आखलेलं होतं आणि म्हणूनच असेल राघव, राघवची बायको आणि रिमा यांच्या आयुष्यातलं तिचं  होणार आगमन त्या वेळेपासून कुणालाही त्रासदायक वाटलंच नाही. 

नानी खूप वेळा विचार करते की कुठलाही बदल ही समस्या कशी होऊ शकते?  बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खरी समस्या असते.  नानी सतत एक सकारात्मक दृष्टिकोन जपत आली. तिचं एकच उत्तर असतं सगळ्यांवर,

” बरं.” 

या “बरं” मध्ये खूप काही व्यक्त, अव्यक्त साठलेलं असतं. पण याचा अर्थ ती नव्या पिढीच्या ताब्यात गेली आहे असं मुळीच नाही.  तिच्या अस्तित्वावर फक्त तिचाच हक्क आहे.  त्यावर कुणीही कुरघोडी करू शकलेलं नाही.  फक्त दोन वेगळ्या विश्वातली एक अस्पष्ट रेषा तिने जाणीवपूर्वक सांभाळलेली आहे.  ती सांभाळताना होणारी उरातली धडधड, उदासीनता, चीड, तुलना या साऱ्या भावनांवर तिने मात नसेल केली पण त्यांना नीट हाताळले आहे. हे नक्की.

या साऱ्यांसोबत नानीबरोबर  तिची आई, आजी यांच्या आयुष्याची ही आठवण असते.  त्यांच्या आयुष्यातल्या अनेक रिकाम्या जागा नानी  भरून काढण्याचा प्रयत्न करत असते.

रात्र खूप झाली आहे.  राघव दिल्लीला गेलाय.  अवंती काही दिवसांसाठी ऑफिसच्या प्रोजेक्ट निमित्त सिंगापूरला गेली आहे.  रिमा अजूनही घरी आलेली नाही.  तिचाही कोणी मित्र आहेच. सकाळी निघताना तिने आजीला सांगितले होते की, ती त्याच्याबरोबर आज एका लाईव्ह कन्सर्टला जाणार आहे.  मालतीबाईंचीही  सुट्टी होती. नानीच्या मनात पुष्कळदा येतं रिमाला एकदा विचारावं,” तुझं आणि त्याचं नक्की नातं काय आहे?”

पण  नानीला खात्री आहे ती म्हणेल “अग आज्जी आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आत्ता तरी.”

” आत्ता तरी” याचा नक्की अर्थ काय? अवंती जवळ सहजच बोलता बोलता नानीने विचारलं होतं,

” त्यांच्यात काही ठरतंय का?”

तेव्हां ती म्हणाली होती,

“नानी आज-काल मुलं काय मुली काय पटकन लग्नाच्या बंधनात पडत नाहीत. त्यांना सहवासातून एकमेकांची खरी ओळख करून घ्यायची असते. लग्न हा त्यांच्यासाठी फार पुढचा विचार असतो. नानीला प्रश्न तर पडलेच होते पण न विचारण्याचं धोरण तिने याही वेळेला राखलंच. फक्त अवंतीला म्हटलं मात्र, “तुम्हाला चालतय का  हे सारं?म्हणजे तुला आणि  राघवला?”

अवंती नुसतीच हसली.

” अहो नानी आमच्या चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आजकाल मुलांना फारसं विचारलेलंही आवडत नाही.  विचारत राहिलं की संवाद तुटायला लागतो आणि त्यांच्या जीवनाचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहेत. 

नानीला एवढंच जाणवलं हळूहळू सूनही मागच्या बाकावर येत चालली आहे. नानीला गंमत वाटली.

आकाशात भुरकट ढगांच्या पदरातून चंद्र संथपणे सरकत होता.  कुणाच्याही सुखदुःखाची त्याला जाणीव नव्हती.अथांग आभाळात तो मुक्तपणे भटकत होता. आजचा चंद्र ही नानीला वेगळाच भासला.  तिच्या अंतरातून जणू काही नकळतच स्वर आले,” अरे बाबा! या मानवाने तुला तरी कुठे सोडले? विश्वाच्या मनातल्या तुझा गोजिरवाण्या रूपाची चिरफाडच झाली ना?”

मग नानी बेडरूम मध्ये आली.  थोडा वेळ तिने टीव्हीवरची एक मालिका लावली.  तिथेही हेच सारं होतं. ती कुणी एक इशा, अरुंधतीला म्हणजे तिच्या आईला जोरजोरात तिचं म्हणणं पटवत होती.  ताड ताड तिच्या बाबतीत घडलेल्या सगळ्या गोष्टींबाबत तिला दोष देत होती.  बिनदिकतपणे ती बोलतच होती.  शेवटी नानीने टीव्ही बंद केला.

मोबाईलवर मेसेजची ट्युन वाजली. मेसेज रिमाचा होता.

” आज्जी प्रोग्रॅम नंतर आम्ही सगळे विक्रमच्या फार्मवर जाणार आहोत. खूप जण आहोत आम्ही. काळजी करू नकोस. सकाळी ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघू. गुड नाईट! टेक केअर!

नानीने मेसेजला उत्तर दिलं.

” बरं.”

त्याही वेळेला तिच्या मनात एकच विचार आला निदान रिमाने कळवले तरी.

– समाप्त – 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले.) – इथून पुढे –  

” हे बघ राघव! तू तुझ्या मतांवर इतका ठाम असशील ना तर माझे काही म्हणॉणे नाही.  तू तुझा स्वतंत्र, मी माझी. मला तुझी ही अरेरावी मुळीच चालणार नाही. लक्षात ठेव या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर माझा शंभर टक्के अधिकार आहे. मला माझी मतं आहेत आणि मी तुझ्यावर एक कपर्दीकही अवलंबून नाही.रिमाचा सांभाळ करायलाही मी तुझ्यापेक्षा जास्त समर्थ आहे.”

नानी आतल्या आत प्रचंड हादरली होती. आर्थिक स्वातंत्र्यांमधून मिळालेली ही आवाजाची धार तिला जाणवत होती. पण मग नानीने असा आवाज कधीच का नाही वापरला?

अशा पार्श्वभूमीवर तिला तिची आणि नानांची ही भांडणे आठवत. जेव्हां ती खोदून खोदून आठवायची तेव्हा तिच्या मनात आलं सारं काही सोडून जाण्याचा विचार तिच्याही मनात नव्हता का कधी आला? पण राघव साठी ती मिटूनच राहिली.  मनातलं ओठावरही आलं नाही. एक घाव दोन तुकडे हा विचार तर फारच दूर राहिला. 

राघवचं आणि सुनेचं  नक्की काय बिनसलं होतं याचा खोलवर जाऊन मागोवा घेण्याचा नानी प्रयत्न सुद्धा करत नाही.  कोण चूक? कोण बरोबर ?कसं ठरवायचं आणि का ठरवायचं? मुलगा म्हणून राघवच बरोबर असही तिला वाटत नाही आणि सुनेने थोडं पडतं घ्यावं असंही वाटत नाही.  पण यांचं नातं मात्र तुटू नये असं नक्कीच वाटतं. रिमाच्या भविष्याचं काय असंही वाटतं. 

नानी गप्प बसली तरी नानीला दुःख होतं.  कळून चुकतं इथेच सारं बदललंय. नाती कचकड्याची होत आहेत. संसाराच्या व्याख्या बदलत आहेत.  जो तो आत्मकेंद्रित झालाय.  ही आपली संस्कृती आहे का? हे लोण पलीकडचं आहे. 

पण तरीही नानीच्या मनात गोंधळ असतो. नाते टिकवणे म्हणजे नक्की काय?  रडत खडत निभावणं याला नातं टिकवणं म्हणायचं का? की” मेरी झाँसी नही दूंगी” या प्रकारातला आवेश दाखवून दणादण कापाकापी करायची?

राघवच्यात  नानांचे काही गुण असणारच. तसं पाहिलं तर नानीचं अवंतीशी— सुनेशी— नातं चांगलं आहे. मोकळेपणाचे आहे.  ती तिच्या ऑफिसमधल्या घटना सांगते.  तिच्या मैत्रिणींबद्दलही  बोलते. ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या नात्यांबद्दल बोलते आणि बिनदिक्कतपणे राघवच्याही तक्रारी करते.कधी कधी संगणक,मोबाईल बाबतीत नानीची शिकवणीही घेते.   नानी तिचं हरवलेलं रूप अवंतीत  पाहते आणि त्यावेळी नानीला एक स्त्री म्हणून सुनेची कणव येते आणि खूप बदललंय असं वाटत असतानाच नानीला वाटतं छे! सारं काही तसंच आहे अजून.  समाज बदलतो, पण तो फक्त वरवर. त्याचा वेश बदलतो, खाद्य बदलते, जगण्याची तंत्रं बदलतात, पद्धत बदलते, वागणं बदलतं, प्रगतीच्या भुलभुलय्यात सारेच भरकटतात.  पण या ऑर्बिट च्या फेऱ्यात सापडलेलं मन काही बदललेलं नाही. माणसातल्या माणूसपणातली प्रगती काही माणसाला या तंत्रज्ञानाने अजूनही साधता आलेली नाहीच. 

रिमाचं आणि नानीचही एक सुंदर नातं आहे.  आजी आणि नातीचं नातं! पण या नात्यातही खूप बदललेले कंगोरे आहेत. रिमाच्या हुशारीने, दिसण्याने, चातुर्याने नानीचा उर एकीकडे मायेने भरून जातो तर कधी तिच्यातला फटकळपणा, ताडताडपणा,भाषा, बदललेला पेहराव बघताना नानी मनातल्या मनात धास्तावते.  तिसऱ्या नव्या पिढीचं प्रातिनिधिक स्वरूप तसं नानीच्या पचनी नाही अजून पडलेलं. 

एक दिवस नानी  रिमाला चुचकारत म्हणाली होती,” रिमा बेटा! अंधार पडायच्या आत घरी येत  जा ग! काळजी वाटते आणि हे बघ तू छानच दिसतेस पण इतका उघडेपणा कशाला हवा? झाकण्यातही अधिक सौंदर्य असतं.”

तेव्हां ती म्हणाली होती,

“आज्जी आजकालची फॅशन आहे ही! नाहीतर काकूबाईचं लेबल लागेल मला. आणि तुझी “सातच्या आत घरात” ही व्याख्या बदल बरं.  खूप मोठी स्वप्नं आहेत माझी आणि ती पुरी करण्यासाठी मला या वेळा कशा सांभाळता येतील? आज्जी यु आर द बेस्ट आज्जी इन द वर्ल्ड.  मी माझ्या मित्रांना, मैत्रिणींना नेहमी सांगते माझ्या आजीचे विचार खूप मॉड आहेत.  सो प्लीज नाऊ डोन्ट बी आउट डेटेड हं!”

“आउटडेटेड” नक्की काय असतं याचा कधीकधी नानी विचार करते, पेपरात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या, आजूबाजूला चर्चेत असणाऱ्या अनेक अत्याचाराच्या, बलात्काराच्या, आत्महत्येच्या, नैराश्याच्या, एकतर्फी हिंसक प्रेमाच्या, अपहरणाच्या,जिहादच्या, खुनाच्या बातम्या नानीला नक्कीच अस्वस्थ करतात.  कळीचं फुल बनत असलेल्या रिमाला बघताना उर धडकतोच. सोशल मीडियाचा वाढलेला राक्षस समाजाचा गळा दाबत आहे असंही नानीला वाटतं. या राक्षसाने चुकून आपल्या घराचं दार कधी ठोकलं तर?  नानी घाबरते. विलक्षण थरकाप होतो तिचा.  पण त्याचवेळी तिला हेही जाणवतं आपल्या आवाकाच्या बाहेर आहे हे सगळं आता. मग तिला धीर मिळतो तो घरातल्या देव्हाऱ्याचा.  निदान तो तरी आहे अजून, तिला माहित आहे, ना नमस्कार करायला कुणाला वेळ ना दिवा लावायला सवड. कधीतरी आठवण आल्यासारखे हात जोडायचे.  पण नानी मात्र त्या देवांशीच बोलते.  दिवा उजळवून त्यांची आरती करते. त्याच्याशी तिचा मूक ,अश्वासक संवाद घडतो.सुखाय,रक्षणाय.सर्वांच्याच.

अनेक चर्चा घडतात.  घटनांचं मंथन होतं. मतांची देवाण-घेवाण होते आणि शेवटी एकच निष्कर्ष असतो “कालाय तस्मै नमः”

सकाळी फिरताना नानीला डी बिल्डिंग मधले सरदेसाई ठराविक वेळेला भेटायचे. गेल्या कित्येक दिवसात ते दिसले नाहीत. बऱ्याच दिवसांनी नानीला त्यांची अनुपस्थिती जाणवली.  नानींना त्यांच्याविषयी एवढेच माहीत होतं की त्यांचं स्वतःचं वाकडेवाडीत घर होतं. एकटेच राहत होते.  पत्नीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेले  होते.  पण एक दिवस उंबरठ्यावर पाय अडखळून ते पडले आणि मग त्यांच्या जीवनाचं तंत्रच बदललं. शेवटी मुलीने त्यांना तिच्या घरी आणले.  तेव्हापासून सरदेसाई या कॉम्प्लेक्सचे सदस्य होते.  पण काही दिवसापूर्वीच कळलं की आता ते कामशेतला वृद्धाश्रमात असतात. त्यावरूनही पोडियमवर चर्चा झाली.कारणमीमांसा झाली,बदलत्या कुटुंब संस्थेवर ओरखडे उमटले, आजकाल म्हाताऱ्या माणसांची जबाबदारी कोण घेतोय? वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं.  पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धाही त्यांच्यासारखीच पूर्णत: निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच रुजू न देणं ही आमच्या आईबाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच होती!)

जवळजवळ साठ एक वर्षांनंतरही या सगळ्याच आठवणी आजही माझ्या मनात अतिशय ताज्या आहेत. आमच्या अंगणातलं ते छोटं बैठं देऊळ, त्या प्रसादपादुका, तरारून वर झेपावलेला औदुंबर, बाबांना प्राप्त झालेली वाचासिध्दी हे सगळं कुणालाही चमत्कार वाटेल असंच असलं तरी माझ्या बाबांपुरतं सांगायचं तर ती फक्त त्यांनाच उमजलेली अशी अंतर्ज्ञानाची एक खूण होती फक्त!

बाबांना प्राप्त झालेली वाचासिद्धी त्या पोरवयात माझ्यासाठीही अतिशय औत्सुक्याचा विषय होती. पण बाबांनी मात्र ते अगदी सहजपणे स्वीकारलेलं होतं.अतिशय खडतर आणि प्रतिकूल वाटाव्या अशा आपल्या संपूर्ण आयुष्यांतही त्यांच्यातलं हे वेगळेपण त्यांनी स्वतःचे पाय जमिनीवरच घट्ट ठेवून आतल्याआत जपलं होतं.त्यांना प्राप्त झालेला हा परमेश्वराचा आशीर्वाद कुठल्याही प्रकारचं अवडंबर न माजवता, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच त्याचा वापर न करता, इतक्या निगुतीने त्यांनी कसा जपला  असेल याचे आज आश्चर्य वाटते एवढे खरे!

त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मनातले प्रश्न घेऊन आजूबाजूची परिचितांपैकी अनेकजणं बाबांना सहज म्हणून भेटायला यायची आणि मनातली रुखरुख व्यक्त करून त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करायची.बाबा मोजक्या शब्दात त्यांची समजूत घालून त्यांना मार्गदर्शन करायचे.’सगळं व्यवस्थित होईल,काळजी नका करू’ हे त्यांचे शब्द आधारासारखे सोबत घेऊन आलेली माणसं परत जायची. एकदा तिथे जवळच बसलेल्या मी मनातल्या औत्सुक्यापोटी बाबा एकटे आहेत असं पाहून ‘तुम्हाला हे सगळं कसं समजतं?’ असं त्यांना विचारलं तेव्हा माझी चेष्टा केल्यासारखे ते खळखळून हसले.म्हणाले,”अरे मला सगळं कुठून काही समजायला?इथं माझं मला झालंय पुरे. पण ही माणसं येतात,मन मोकळं करतात. परिस्थितीने कातावलेली असतात बिचारी. त्यांना झिडकारून नाही ना चालणार? त्यांचं दडपण कमी करावं, त्यांनी स्वस्थचित्तानं विचार करून स्वतःच त्यातून मार्ग शोधण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना बरं वाटेल अशा चार अनुभवाच्या गोष्टी सांगतो झालं. बाकी कांही नाही अरे.खरं सांगू का? मी बोलेन,सांगेन ते, ही सगळी माणसं म्हणतात तसं खरंच खरं ठरत असेल तर त्याचा कर्ताकरवता ‘तो’!..’मी’ नाही..” बाबा गंभीर होत म्हणाले होते. असं असलं तरी बाबांनी त्या माणसांना सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती प्रत्येकाला यायचीच आणि नंतर ते कृतज्ञता व्यक्त करायला बाबांना आवर्जून भेटायलाही यायचे. या सगळ्या मागचं रहस्य शोधायचा प्रयत्न बाबांनी कधीच केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या मनातली श्रद्धा, वेळोवेळी त्यांना आलेले अनुभव यांनी भारावून न जाता प्रतिकूल परिस्थितीतही ते शांत,हसतमुख रहायचे.या पार्श्वभूमीवर याच संदर्भात एक दिवस अचानक आश्चर्य वाटावं असा एक थरारक प्रसंग घडला!

किर्लोस्करवाडी हे वरिष्ठांचे बंगले सोडले तर फारफार तर दीड दोनशे उंबऱ्यांचं एक काॅलनीत वसलेलं गाव.बॅंक आणि पोस्ट या कंपनीसाठी अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही काॅलनीतली घरे राखून ठेवलेली असायची. त्यामुळेच अतिशय शांत,आनंदी, संस्कारपूर्ण अशा वातावरणातलं समृध्द बालपण मला अनुभवता आलं.

प्रत्येक घराच्या पुढेमागे असणारी फळाफुलांची भरपूर झाडं आणि प्रशस्त अंगण हे तिथल्या जवळजवळ दशकभराच्या वास्तव्यात आम्ही अनुभवलेलं खरं ऐश्वर्य ! अंगणातला जांभळाचा मोठा वृक्ष हे इतर घरांच्या तुलनेतलं आमच्या घराचं एक खास वेगळं वैशिष्ट्य होतं. त्या प्रशस्त वृक्षाच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या प्रत्येक फांदीला पिकलेल्या टपोऱ्या जांभळांचे घोसच्याघोस लगडलेले असायचे. ते पाहूनच आम्हा मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं. पण आम्हाला झाडावर चढून जांभळं काढायची बाबांनी मनाई केलेली होती. जांभळाचं लाकूड अतिशय ठिसूळ असतं, आम्ही पडू, आम्हाला इजा होईल या काळजीपोटी ते स्वतः रोज एकदा झाडावर चढून स्वत:चार जीव धोक्यात घालून आम्हाला भरपूर जांभळं काढून द्यायचे. ते ऑफिसला गेले की आम्ही गुपचूप झाडावर चढून आपापली जांभळं काढून खायचा बालसुलभ आनंद मिळवायचो पण तेही आईला नकळतच.

काॅलनी छोटी असल्यामुळे कॉलनीतील सर्वांचाच घरोबा असे. कुणाच्याच मनात आपपर भाव नसे.

तोच हक्क गृहित धरून, पलीकडच्या गल्लीत रहाणारे श्री. रामभाऊ सुतार एक दिवस हातात  रिकामी पिशवी घेऊन आमच्या घरी आले. बरोबर त्यांची बायकोही होती. तो रविवार असल्याने बाबा घरीच होते.

“दादा,थोडी जांभळं काढावी म्हणतो.”रामभाऊ म्हणाले.

बाबांनी क्षणभर विचार केला. त्यांना ‘आत या,बसा’ म्हणाले.बाबांनी स्वतःच झाडावर चढून सकाळी मोठ्ठं पातेलं भरून पिकलेली टपोरी जांभळं काढून आत ठेवली होती.ते पातेलं त्यांनी बाहेर आणलं.

“ही जांभळं नुकतीच काढलीत.ती पिशवीत भरुन घेऊन जा” ते म्हणाले.

“नको दादा.यात स्वत: झाडावर चढून जांभळं काढायची मजा कुठून येणार? ती

तुमची तुम्ही ठेवा आत. माझी मी काढून घेतो.” रामभाऊ म्हणाले आणि उठून बाहेर गेले.

बाबांना काय करावं सुचेना. ते एकाएकी गंभीर झाले. झपकन् उठून बाहेर आले.

“रामभाऊ, ऐका माझं. जांभळाचं लाकूड खूप नाजूक असतं. या झाडाखाली मोठे दगड आहेत. फांदी तुटून पडलात तर जीवावर बेतेल. झाडावर चढू नकाss”

रामभाऊ खिल्ली उडवल्यासारखे मजेत हसले.

“दादा, अहो मला असा तसा समजलात की काय? असली छप्पन झाडं मी    बघितलीत. नका काळजी करू.”

“काळजी मी नाही, तुम्ही स्वतःची घ्यायला हवी. सांगतोय ते  ऐका. तुम्ही अशी छप्पन्न झाडं पाहिली असतील, पण हे सत्तावनावं झाड कायम लक्षात रहाणारं ठरणाराय लक्षात ठेवाs ऐका माझं. झाडावर.. चढू .. नकाss”

बाबांचं न ऐकता, त्यांच्याकडं पहात रामभाऊ चिडवल्यासारखं हसले आणि हातातली पिशवी सावरत झाडावर चढू लागले.

त्या क्षणीचा बाबांचा चिंताग्रस्त चेहरा मला आजही आठवतोय. काय करावं ते न सुचून बाबा आत आले. अस्वस्थपणे येरझारा घालत राहिले. पाच एक मिनिटे त्याच अस्वस्थतेत गेली. तोवर टपोऱ्या जांभळांच्या घोसांनी भरत आलेली पिशवी जवळच्याच एका फांदीला अडकवून, त्याच फांदीवर सायकलवर बसतात तशी टांग टाकून रामभाऊ बसले होते. ते खाली उतरायचा विचार करीत असतानाच,समोर दिसणाऱ्या जांभळांच्या भलामोठ्या घोसाच्या ते मोहात पडले.पण थोडं पुढं वाकून हात लांब करुनही तो घोस हाताला लागेना,तसं जिद्द (कि हव्यास?)न सोडता रामभाऊ आणखी थोडं पुढं वाकले न् त्याच क्षणी……?

फांदी मोडत असल्याचा कडकड आवाज ऐकू आला आणि आत अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा धास्तावून थिजल्यासारखे उभे राहिले. स्वतःला सावरत कसेबसे ते बाहेर धावले तोवरच्या क्षणार्धात रामभाऊ मोडकी फांदी आणि जांभळांनी भरलेली पिशवी यांच्यासकट खाली कोसळले. बाबा झरकन् पुढं धावले तसं अंगणात उभे असलेले इतरही एकदोघे मदतीला पुढे आले.रामभाऊंची बायको तर भेदरुन थरथरत उभी होती!

खालच्या दगडांचा मार लागून झालेल्या पायाच्या रक्ताळलेल्या जखमा आणि मुक्या माराच्या वेदना आतल्याआत सहन करत कसनुसं हसत रामभाऊ उठायचा प्रयत्न करत होते त्यांना सर्वांनी कसंबसं सावरलं.

रामभाऊ न जुमानता झाडावर चढलेले पाहून घाबरलेले,अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा मला आठवतात तेव्हा घडलेली घटना कावळा बसताच फांदी मोडायला निमित्त होणाऱ्या योगायोगासारखी निश्चितच नव्हती याची मनोमन खात्री पटते. बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिद्धीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय..!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

नानीचे एक बरं आहे ती कुणाच्या मध्ये बोलतच नाही. अद्यात मद्यात राहतच नाही.  तिला पटलं नाही, खूप खटकलं तरी सुद्धा ती कसला विरोध दर्शवत नाही.  “आमच्या वेळी हे असं काही नव्हतं बाबा! आम्ही असे वागलो असतो तर..” वगैरे अशी वयस्कर, परंपरा छाप वाक्यं ती कधीच मुखातून काढत नाही. अगदीच असह्य झालं तर ती तिच्या रूम मधल्या फ्रेंच विंडोपाशी जाऊन बसते आणि खिडकीतून दिसणाऱ्या मोकळ्या आभाळाकडे पहात राहते किंवा पोडियम वर जाऊन बागेतल्या एखाद्या बाकावर एकटीच बसते.  तिथे मुली असतात, मुलगे असतात मुला-मुलींचे घोळके असतात, त्यांचं जरा जास्तच मोकळं वागणं, हसणं बागडणं असतं.  ज्येष्ठ नागरिकही असतात. बागेचा एखादा कोपरा पुरुषांचा तर दुसरा बायकांचा.  नानी मात्र एकटीच बाकावर बसून राहते.  जगदाळे, पागे, येवलेकर झाल्यास तर त्या चंद्रपूरच्या तन्नीवार नानीला बोलावतात.  जाते कधी कधी नानी त्यांच्यात. पण मग त्यांच्या गॉसीप्स ऐकून तिचे कान किटतात.

कोणाची सून माहेरीच गेलेली असते, तर कुणाला बाईच्या हातच्या पोळ्याच आवडत नाहीत, कोणाचा मुलगा लग्नानंतर फारच बदललेला असतो, कोणी उशिरा उठतो, कुणी रात्रीचा लाईटच काढत नाही वेळेवर, एक ना अनेक.  पण थोडक्यात सगळ्याच तक्रारी. खाण्यावरून, कपड्यांवरून, खर्चावरून, रितीभातींवरून, सण साजरे करण्यावरुन,बोलण्यावरून, हसण्यावरून. नाराजी —नाराजी— फक्त नाराजी.

नानीला हे सारं नको असतं.  तिला अशा माणसांच्या घोळक्यातून कुठेतरी दूर जाऊन फक्त हे बदललेलं जग जरा बघायचं असतं.  अनुभवायचं असतं. कुठलंही मत तिला द्यायचं नसतं. तिची भूमिका एकच. फक्त वॉचमनची.

पण म्हणूनच नानीचा कुणाला त्रास नाही. सुनेला, मुलाला, नातीला— कुणालाच नाही. म्हणजे ती त्यांच्यातच असते. नानी खरंतर त्यांच्या जगात पूर्ण सामावलेली असते.पण तरीही अलीप्त असते.

“नानी आज मला ऑफिसातून यायला उशीर होईल.  माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर आम्हाला डिनर आहे. आणि रिमा मधुराकडे बर्थडे पार्टीला जाणार आहे. तिचं टीनेज संपल्याचं सेलिब्रेशन आहे बहुतेक आज.  राघवचं माहित नाही. तो येईल कदाचित घरी. पण तुम्ही त्याच्यासाठी जेवायला थांबू नका. तुम्हाला जे आवडेल ते मालतीबाईंकडून करून घ्या.”

सुनेच्या या लांबलचक ‘आजच्या अहवालावर’ नानी अगदी मनापासून म्हणते,

” बरं!”

हे “बरं” म्हणणं किती छान. वादच नाही. प्रत्येकाकडे घराच्या चाव्या असतातच. त्यामुळे दार उघडण्यासाठी वाट पाहत राहण्याची गरजही नसते. सारं किती सोप्पं! कुणाचा पाय कुणात अडकलेला नाही.  नानींना चुकारपणे वाटूनही गेलेलं असतं,” मग आज राघवच्या आवडीची गरमागरम कांद्याची छान तेल लावून खरपूस भाजलेली थालीपीठ आपणच का करू नये?”

पण नकोच. सुनेचं शासन बिघडायला नको.  तशी ती काही वाकड्यात नाहीच.  नानीलाच उगा या वयात त्रास होऊ नये हीच तिची भावना असते.  नानीला सगळं समजतं.  नानी उगीच फाटे फोडत नाही.

जग बदललं आहे हे खरंच आहे. खूपच बदललं. कुठच्या कुठे गेलं. वास्तविक नानी ही एका मध्यरेषेवर होती.जुन्या नव्याच्या,बदलत्या काळाच्या केंद्रबिंदुवर होती. जरी तिची जडणघडण एका मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबात झाली होती तरी त्याही वेळेला तिच्या भोवतालचं वातावरण खूप बंधनकारक होतं असं नाहीच.  स्वतंत्र, स्वैर जरी नव्हतं तरी स्वतःची ओळख, अस्तित्व उमलणं यासाठी तेव्हाही ते पोषक होतं. मात्र फारसे जाचक नसले तरी काही शिस्तीचे नियम हे आपोआपच मनावर रुजलेले होते.  एक वेळापत्रक नक्कीच होतं. भिंतीवरच्या कॅलेंडरवर परंपरेची वर्तुळही आखलेली होती.  मग त्यात शुभंकरोती होतं, परवचा होत्या, नित्य नेमाचा अभ्यास होता, खेळणं किती, फिरणं किती, भटकणं किती, घरातलं वास्तव्य, भावंडांच्या कामाच्या वाटण्या आणि आयुष्य म्हणजे चांगलं भविष्य आणि भविष्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मेहनत या सर्वांचा एक अदृश्य आराखडा मनाशी बाळगलेलाच होता. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात इतकं काही जबरदस्त त्यावेळी बदललेलं नव्हतं.  म्हणजे त्याही वेळेस वेगळे, वेगळ्या पातळीवरचे सामाजिक स्तर   त्या त्या प्रमाणात होतेच पण नानीचं जीवन एका मधल्या धारेतलं होतं आणि याच आखलेल्या मार्गाने तिने तिच्या आयुष्याची इतकी मोठी वाटचाल केली होती.  आणि आताही मागेपुढे पाहताना त्यावेळच्या काही नसण्यावर, नाहींवर, त्रुटींवर तिला अजिबात खेद नव्हता.  नो रिग्रेट्स.

त्याही वेळेला ती एका नामांकित संस्थेत मोठ्या हुद्द्यावर स्वतःची प्रतिष्ठा सांभाळत होतीच की.  एकाच वेळी दोन्ही पद संतुलित पणे तिने सांभाळली. गृहिणी पद आणि संस्थेतलं जबाबदार पद.  तसे दोन्ही आघाड्यांवरती यशस्वी होती ती. पण कुठेच तिने मर्यादा सोडल्या नाहीत.अतिरेक,अवाजवीपणाच्या वाटेला ती गेली नाही. सासुबाईंसाठी सणावारी डोक्यावर पदर घेतला, वडाची पूजा केली, श्रावणी शनिवार, सोमवार पाळले. पितरांना जेवू घातलं. परंपरेच्या गर्भातले वैज्ञानिक अर्थ समजूनही तिने सारे काही बिन बोभाट पार पाडून सर्वांची मने राखली.  निदान तसा प्रयत्न नक्कीच केला.  उगीच किडूक मिडुक वादात ती पडलीच नाही.

ऐकूनही घेतलं. सासूबाई तरीही म्हणायच्या,” तुला वेळच कुठे असतो? तू तुझ्या ऑफिसच्या कामात? घर तुला नंतरच.”

नानीला काय वाईट नसेल वाटलं? पण उगीच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत ती तेव्हाही पडलीच नाही. नानांनी सुद्धा  सगळं काही  स्वीकारलं नव्हतं. विरोध नव्हता म्हणजे संपूर्ण संमती असा अर्थ नसतो. नानांच्या कन्व्हेनशनल मनाला नानीच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. ज्या ज्या वेळी नानी काळाप्रमाणे बदलायचं ठरवत असे त्या त्या वेळी नानांना त्यांचा गतकाळ आठवायचा आणि त्या पुन्हा पुन्हा नानीची पावलं मागे खेचायचे. गैरसोयीच्या आयुष्याला उदात्तपणा आणण्याचा प्रयत्न करायचे. प्रेम होतच पण घर्षणंही खूप कचकचणारी  होती. नानीने केलं सहन. स्थैर्यासाठी. शेवटी काय? पिढीतले अंतर, संस्कृतीतील बदल हे काळाच्या पावला बरोबर अव्याहत सरकतच असतात, नाही का? आज आणि काल यातलं अंतर कधी मिटूच शकत नाही.  मग आज या मिडलाईन वर उभे असताना, बदललेलं जग बघताना इतकं भांबावून, बिथरून कां जायचं? कदाचित काल आणि आज मधलं अंतर जास्तच वाढलंय म्हणूनही असेल.

नक्की काय बदललं याचा विचार करताना नानीला गंमतच वाटते. त्यादिवशी राघवचं आणि सुनेचं काहीतरी बिनसलं होतं.  धुसफुस चालूच होती. कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले. 

– क्रमशः भाग पहिला  

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print