मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-2 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-2 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

(सुशांत आतल्या खोलीत बसून शांतपणे लिहीत होता. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.) – इथून पुढे 

सुरेशला यायला उशीर झाला.

‘‘अहो, मी तुम्हाला फोन केला होता. निरोप ठेवला होता. ”

‘‘मी बाहेरच्या बाहेरच आलो; पण कशाला केला होतास फोन?”

‘‘अहो, सुशांतची प्रयोगाची वही हरवली. उद्या… ”

पुढचं ऐकूनही न घेता त्याने ओरडायला सुरवात केली.

याला आधी आपल्या वस्तू सांभाळायला नको. दप्तर एकीकडे, कंपास एकीकडे, घरभर पसारा पडलेला असतो. व्यवस्थितपणा म्हणून नाहीच अंगात. तू आणखी लाड कर त्याचे… ”

‘‘अहो, ऐका तरी. त्याने नाही हरवली वही. त्याने बाईंना दिली होती गेल्या आठवड्यात. त्यांच्याकडून हरवली. ”

‘‘काय? बाईंकडून हरवली? कोण बाई आहेत त्या? प्रिन्सिपलकडे कम्प्लेन्ट केली पाहिजे. मुलांच्या वह्या हरवतात म्हणजे काय? हेच संस्कार करणार मुलांवर? एक्सप्लेनेशन मागा म्हणावं त्यांच्याकडून. आज वही हरवली, उद्या पेपर हरवतील. आणि सांगतील गठ्ठ्यात पेपर नव्हता त्याअर्थी बसलाच नसणार परीक्षेला. ”

बाबांचा आवाज ऐकून धावत आलेला सुशांत रडवेला झाला होता. सुधानं त्याला खुणेनंच आत जाऊन लिहायला सांगितलं.

‘‘अरे बापरे, प्रयोगाची वही नसेल तर प्रयोगाची परीक्षाही जाणार? म्हणजे वही आणि प्रयोग – दोन्हींचे मार्क गेले. शास्त्रात कमी मार्क म्हणजे पुढच्या वर्षीही त्याची ‘अ’ तुकडी गेली. म्हणजे पुढच्या वर्षीही तो मार खाणार. त्याचा परिणाम पुढे एसएससीलाही कमी मार्क मिळणार म्हणजे चांगल्या कॉलेजात ऍडमिशन नाही. चांगलं कॉलेज नाही म्हणजे बारावीलाही बोंबला. मग काय? व्हा कसंबसं बीएससी! पुढे नोकरी मिळतानाही मारामार… ”

जेवणं झाली तरी सुरेशची बडबड चालूच होती.

‘‘अहो, उद्या लवकर निघणार ना तुम्ही?”

‘‘कोणी सांगितलं?”

‘‘सुशांतच्या शाळेत जाणार आहात ना?”

‘‘कशाला?”

‘‘प्रिन्सिपलना भेटायला. ”

‘‘असल्या हजामती करायला मला अजिबात वेळ नाही. तूच जा आणि चांगली सालटी काढ त्यांची. ”

मागचं आवरून बिछाने घालून सुधा सुशांतच्या शेजारी येऊन बसली.

‘‘आई, तू मॅडमना तुंगारेबाईंचं नाव नको सांगूस. तुंगारेबाई खूप चांगल्या आहेत. मॅडम त्यांना रागावतील. शिवाय तू तक्रार केल्याचं बाकीच्या बाईंना कळलं तर त्या माझ्यावरच वैतागतील आणि मला मुद्दामहून कमी मार्क देतील.

‘‘मी मॅडमना भेटायला नाही येणार, ” सुधा सुशांतच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ‘‘फक्त सगळं व्यवस्थित होतं की नाही ते बघायला येणार. शाळेच्या बाहेरच थांबीन मी. तुंगारेबाईंनी वहीवर सह्या केल्या, की माझं समाधान होईल. नाहीतर दुपारी तू घरी येईपर्यंत माझा जीव टांगणीला लागणार. ”

सुशांतचं समाधान झालं.

‘‘किती राह्यलंय रे बाळा?”

‘‘दोनच पानं आहेत आता. ”

‘‘मग झालं?”

‘‘हो. ”

‘‘आणि आकृत्या?”

‘‘मघाशी लिहून लिहून कंटाळा येत होता ना. तेव्हा आकृत्या काढून घेतल्या. त्यामुळे आकृत्याही संपल्या आणि झोपही गेली. ”

‘‘माझं सोनुलं ग ते. ” सुधाने त्याचा पापा घेतला.

सुशांतने लिहायला सुरवात केली.

‘‘आई, झालं पुरं. ”

‘‘अरे वा रे माझ्या छाव्या! बघ, अर्ध्या दिवसात अख्खी वही लिहून काढलीस रे सोन्या. ”

‘‘कव्हर घालशील तू? आणि उद्या लवकर उठव हं नक्की. ’’

सुधानं सुशांतच्या हाताला तेल लावून मालिश केले. गाढ झोपलेल्या बाळाचा पापा घेतला.

वहीला कव्हर घालून त्यावर नाव घालून ती त्याच्या दप्तरात ठेवली.

‘तसा त्रास पडला माझ्या बाळाला, पण उद्या परीक्षेला जाताना टेन्शन नसणार. ’

सकाळी शाळेच्या दारातच तुंगारेबाई भेटल्या. धावत जाऊन सुशांतनं त्याची प्रयोगाची वही आणि झेरॉक्स त्यांच्या हातात दिली.

‘‘अरे वा! अख्खी वही लिहून काढलीस तू?”

‘‘होय बाई. ”

पाठीवर मिळालेल्या बाईंच्या शाबासकीने आदल्या दिवशीचा सगळा शीण पळून गेला.

बाई स्टाफरूममध्ये गेल्या. पाच मिनिटात मार्क आणि सह्या आटपून त्यांनी वही सुशांतच्या हातात दिली. त्यापूर्वी बाहेर उभ्या असलेल्या सुधाला वही उंचावून खूण करायला विसरल्या नाहीत त्या.

सुधा शांत मनानं घरी आली.

‘‘भेटलीस प्रिन्सिपलला? चांगला दणका दाखवला पाहिजे त्या बाईला. ”

सुरेशकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुठे होता तिला? ती घाईघाईत त्याच्या नाश्त्याच्या, डब्याच्या तयारीला लागली. सुरेश ऑफिसात गेल्यावर तिनं मस्तपैकी चहा केला. एक एक गरमगरम घोट घेत कालच्या दिवसाचा समाचार घ्यायला सुरवात केली. काल हे संकट येऊन कोसळल्यावर ती कशी भेदरून गेली, ‘त्यां’ना फोन करण्याचा किती प्रयत्न केला, ‘ते’ येऊन संकटातून सोडवणार म्हणून…

पण ‘ते’ आल्यावर तर त्यांनी ओरडायला सुरवात केली. परीक्षेला बसायला मिळणार नाही म्हटल्यावर तर दादाच्या भाषेत सांगायचं तर ‘पॅनिकी’च झाले. बडबडत बडबडत पार त्याच्या नोकरीपर्यंत पोचले.

एवढं करून काय? तर उपाय सांगितलाच नाही. उलट प्रिन्सिपलशी भांडून परिस्थिती आणखीच बिकट झाली असती. बिचा-या सुशांतची तर वाटच लागली असती. त्याउलट आपण किती शांतपणे, न चिडता; पण तातडीनं योग्य निर्णय घेतले आणि त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी केली.

मग तिनं मागच्या गोष्टीही तपासल्या.

लहानपणी सुशांतला ताप आल्यावर तिनं मिठाच्या पाण्याच्या घड्या घातल्या होत्या. सुरेश मात्र ताप कसा आला, याचीच कारणमीमांसा करत बसला होता.

मागे सुधा मावसबहिणीच्या लग्नाला निघाली होती. नेहमीप्रमाणे सुरेश बाहेरगावी गेला होता. चार – पाच वर्षांच्या सुशांतला घेऊन सुधा जाणार होती. तसा तीन तासांचाच प्रवास होता. बसचं रिझर्व्हेशनही केलं होतं.

पहाटे लवकर उठून सगळं आटोपून सुधा निघाली. दाराला कुलूप लावलं आणि सुशांतला ‘शी’ झाली. मग पुन्हा घर उघडून सुशांतचं सगळं झाल्यावर बस स्टेशनवर पोचेपर्यंत बस निघून गेली होती.

सुधा रडवेली झाली. याच्या नंतरची बस अडीच तासांनी म्हणजे लग्न चुकणार.

ती कंट्रोलरकडे गेली – ‘‘सर, आता सुटलेली बस मला पुढच्या स्टॉपवर मिळू शकेल का?”

‘‘का? काय झालं?”

मग तिने थोडक्यात सगळं सांगितलं.

‘‘ही समोरची बस आत्ता सुटतेय. ही मधल्या रस्त्याने जाते. त्यामुळे त्या बसच्या आधी पोचेल. तुम्ही तुमचे सीट नंबर सांगा. मी त्या डेपोमध्ये फोन करून तुम्ही येइपर्यंत ती बस थांबवून ठेवायला सांगतो. ”

आणि खरंच, ती बस पुढच्या स्टॉपला गाठून सुधा लग्नाआधी व्यवस्थित पोचली.

उगीच चेष्टेचा विषय व्हायला नको म्हणून हॉलमध्ये ती कोणालाही – अगदी आईलाही काही बोलली नाही.

दोन दिवसांनी राहवलं नाही म्हणून सुरेशला सांगितलं.

‘‘एवढं काय अडलं होतं नसते उपद्-व्याप करायचं? तू गेली नसतीस तर काय लग्न लागायचं राहणार होतं?”

तेव्हा सुधा हिरमुसली होती; पण आज तिला स्वत:च्या समयसूचकतेचं कौतुक वाटलं. खरंच किती पटापट निर्णय घेतले आपण!

सुधानं आपल्या जागी आई, सासूबाई, दादा… एकेकाला उभं केलं, पण कोणीच एवढं शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेऊ शकलं नसतं. सुरेशचं पितळ तर उघडं पडलंच होतं. समोरच्या आरशात सुधाला दिसली तेजस्वी, ‘स्व’ ची ओळख पटलेली सुधा.

ती उठली. आरशाच्या जवळ गेली. ‘त्या’ सुधाच्या डोळ्याला डोळा भिडवून चक्क इंग्रजीत म्हणाली – ‘I am a confident lady. I can take my own decisions. ’

– समाप्त – 

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-1 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-1 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सुशांत घरी आला तो रडतच. आधीच त्याला उशीर झाला म्हणून सुधा काळजीत होती. त्यात आणखी हा अवतार.

‘‘अरे, काय झालं? पडलाबिडलास का कुठे?’’

सुशांतनं मानेनंच ‘नाही’ म्हटलं.

मग सुधाने खाली बसून एका हातानं त्याला जवळ घेतलं आणि दुस-या हातानं त्याचे बूट काढले.

‘‘भूक लागली असेन ना? हातपाय धू आणि कपडे बदलून ये पटकन. मी वाढते तोपर्यंत जेवता जेवता सांग काय झालं ते.’’

सुशांत जराही न हलता तसाच रडत उभा राहिला.

मग सुधाच त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली.

‘‘सांग ना बाळा, काय झालं ते.’’

‘‘आई, आज ना बाईंनी वर्गात प्रयोगाच्या वह्या वाटल्या. त्यात माझी वहीच नव्हती.”

‘‘असं कसं? गेल्याच आठवड्यात तू दिली होतीस ना?”

‘‘हो, पण आज बघितलं तर त्या गठ्ठ्यात माझी वही नव्हतीच. आज तुंगारेबाईंनी सगळ्या वह्या तपासल्या आणि घरी न्यायला दिल्या, त्यांचे रिमार्क बघून काही राहिलं असेल तर पुरं करायचं, कव्हर फाटलं असेल तर नवीन घालायचं आणि उद्या वही शाळेत न्यायची. उद्या दुस-या आणि तिस-या तासाला प्रयोगाची परीक्षा आहे. तेव्हा कोल्हटकरबाई आहेत ना त्या वह्या तपासणार. त्या एवढ्या कडक आहेत नां आई, माझी वही नसली तर वहीचे शून्य मार्क मिळणारच शिवाय प्रयोगाच्या परीक्षेलाही घेणार नाहीत. तुंगारेबाईंनी सगळीकडे शोधलं, पण वही मिळालीच नाही.” सुशांत पुन्हा रडायला लागला.

‘‘आता रे काय करायचं?” सुधाला काही सुचेचना – ‘‘थांब मी बाबांनाच विचारते.”

सुरेशच्या ऑफिसात फोन लागेचना.

‘‘तू अजिबात काळजी करू नकोस, राजा. बाबा नक्की काहीतरी मार्ग काढतील. आपण जेवून घेऊया. मग मी पुन्हा फोन लावते.”

जेवता जेवता मध्येच उठूनही सुधानं दोन-तीनदा फोन लावला; पण प्रत्येक वेळी एंजेगच येत होता.

‘‘बरं झालं बाबा इकडेच आहेत ते,” सुधा परत परत सुशांतला समजावत सांगत होती- ‘‘त्यांना लगेच सुचेल काय करायचं ते. तू गडबडून जाऊ नकोस. बाबा सांगतील तसं करुया आपण.”

लहानपणापासून सुधा तिच्या आज्ञाधारकपणाबद्दल सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होती. बारीक सारीक गोष्टीसुध्दा मोठ्यांना विचारल्याशिवाय करत नसे ती. आताही ती सगळं सुरेशला विचारुनच करत असे.

पण एकदोनदा पंचाईतच झाली. सुरेश बाहेरगावी गेला होता. आणि अडीच वर्षांचा सुशांत तापानं फणफणला. सुधा घाबरुनच गेली. एवढ्या रात्री काय करायचं? सुरेशही घरात नाही. मग सुधा त्याच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या घालत बसली. थोड्या वेळानं ताप उतरला. दुस-या दिवशी सकाळी ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली.

दोन दिवसांनी सुरेश घरी आल्यावर तिनं सांगितलं, तर तो चिडलाच. ‘‘ताप आलाच कसा? तो भिजला असणार नाहीतर फ्रीजमधलं पाणी प्याला असेल. तुझं लक्ष कुठे असतं? जरा दोन दिवस मी घरात नसलो तर-”

सुधाला खूपच अपराधी वाटलं. त्यानंतर तर ती त्याला डोळ्यात तेल घालून जपू लागली.

नंतर एकदा…

जेवण झाल्यावर पुन्हा सुशांतनं रडायला सुरवात केली. सुधानं पुन्हा एकदा फोन फिरवून पाहिला.

‘‘हे बघ सुशांत, बाबांचा फोन लागत नाहीय. मला काय सुचतं ते सांगू?’’

‘‘सांग.”

‘‘तू आणि जय प्रयोगाचे पार्टनर आहात ना?”

‘‘हो.”

‘‘मग त्याची आणि तुझी रीडिंग सारखीच असणार.”

‘‘हो.”

‘‘तू समोरच्या दुकानातून नवीन वही घेऊन ये. येताना जयची वही आण. त्याचं बघून सगळं परत उतरवून काढ.”

‘पण जयला वही लागेल ना उद्याच्या परीक्षेचा अभ्यास करायला.”

‘‘मग आपण झेरॉक्स काढू या. तू असं कर. सुरवातीची थोडी पानं येतानाच झेरॉक्स करून आण आणि लिहायला सुरवात कर. उरलेल्या वहीची झेरॉक्स मी करून आणते. येताना जयची वही देऊन टाकीन. अर्ध्या तासात वही परत करु म्हणून सांग जयला.”

‘‘अख्खी वही पुन्हा लिहून काढू?”

‘‘तू लिहायला सुरवात तर कर. काय रे? तुंगारेबाई म्हणजे आपल्याला सोमवार बाजाराकडे भेटलेल्या त्याच ना? तिकडेच कुठेतरी राहतात म्हणाल्या होत्या. मी त्यांना जाऊन भेटते.”

‘‘पण त्यांचं घर नक्की कुठंय ते…”

‘‘ते मी शोधून काढीन. पण तू लिहायला सुरवात कर. त्यांनी ‘नाहीच जमणार’ म्हणून सांगितलं तर आपली दुसरी वही तयार पाहिजे. हो की नाही?”

‘‘पण एवढं सगळं कसं लिहून होणार? शिवाय आकृत्यापण आहेत.”

‘‘तू आज खेळायला जाऊ नकोस. आत्ताच वह्या घेऊन ये आणि लिहायला सुरवात कर. एक प्रयोग लिहून झाला, की पेन बाजूला ठेवून हाताचा आणि बोटांचा व्यायाम कर. मागे मी शिकवला होता ना तसा. सहा तासांत नक्की लिहून होईल. लक्षपूर्वक आणि शांतपने लिही. म्हणजे खाडाखोड होणार नाही. शिवाय उद्याच्या परीक्षेसाठी उजळणीही होईल. सुरवात करायच्या आधी डोळे मिटून स्तोत्र म्हण हं.”

झेरॉक्स काढून झाल्यावर जयची वही परत करुन सुधा घरी आली.

‘‘ही बघ उरलेल्या वहीची झेरॉक्स. तू उतरवून काढ. मी तुंगारेबाईंना भेटून येते. जाताना बाहेरून कुलुपच लावते म्हणजे मध्येमध्ये व्यत्यय नको यायला.”

‘‘आई, प्रयोगाचे मार्क आणि बाईंच्या सह्या.”

‘‘मी बोलते त्यांच्याशी.”

पंधरावीस मिनिटं विचारपूस करत फिरल्यावर तुंगारेबाईंचं घर एकदाचं सापडलं; पण बाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. अर्धा तास तरी लागणार होता परत यायला.

मग सुधाने इकडे तिकडे फिरून वेळ काढायचं ठरवलं. वाटेत पीसीओवरुन सुरेशला फोन केला. लगेच फोन लागला; पण सुरेश ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. परत केव्हा येणार माहीत नव्हतं.

‘ठीक आहे. परत आले, की लगेचच त्यांना घरी फोन करायला सांगा.”

थोडीफार खरेदी करत असतानाच तुंगारेबाई येताना दिसल्या. सुधा धावतच गेली.

‘‘तुम्ही तुंगारेबाई ना? मी सुशांतची आई.”

‘‘सुशांत म्हणजे प्रयोगाची वही…”

‘‘हो, हो, बाई, सुशांतने त्याची वही तुमच्याकडे दिली होती.”

‘‘अहो, पण आज मिळाली नाही ना.”

‘‘पण त्याने दिली होती ते तुम्हाला आठवतंय ना?”

‘‘तसं दिल्याचं आठवत नाही; पण ज्या दिवशी मी वह्या गोळा केल्या त्या दिवशी सुशांत शाळेत आला होता आणि वह्या न दिलेल्या मुलांच्या यादीत त्याचं नाव नाही. म्हणजे त्याने वही दिली असणार. पण मला मिळालीच नाही ना आज. त्याला शाळा सुटल्यानंतर थांबवून मी माझे ड्रॉवरपण तपासले. उद्या मीच वह्या तपासणार असते तर गोष्ट वेगळी होती.”

‘‘तुम्ही हे कोल्हटकरबाईंना सांगू शकत नाही का?”

‘‘मी सांगून बघीन. पण त्या ऐकतील की नाही ते मी कसं सांगू?”

‘‘मी आता जाऊन भेटू का त्यांना?”

‘‘नको नको. त्या आणखी वैतागतील.”

‘‘बरं, मी एक विनंती करते तुम्हाला. जय त्याचा पार्टनर आहे प्रयोगातला. मी त्याची वही बघून सुशांतला नवीन वही बनवायला सांगितलंय.”

‘‘एवढं सगळं एका दिवसात लिहून काढायला जमेल त्याला?”

‘‘ते माझ्याकडे लागलं. तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रत्येक प्रयोगाला सही आणि मार्क…”

‘‘चालेल. उद्या त्याला दहा मिनिटं लवकरच पाठवा शाळेत.”

‘चला. ‘हे’ येऊन या संकटातून मार्ग काढेपर्यंत तात्पुरती व्यवस्था तर छान झाली…’ सुधाचा जीव भांड्यात पडला.

सुशांत आतल्या खोलीत बसून शांतपणे लिहीत होता. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

— क्रमशः भाग पहिला 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अबोला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ अबोला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एकाच क्षेत्रात काम करणारे ते••• ती दिसायला सुरेख••• तो राजबिंडा••• तो लहान वयातच मोठ्या हुद्द्यावर ••• ती त्याची असिस्टंट असली तरी सहकारीच जास्त••• कामा निमित्ताने सारखे बरोबर••• मग निखार्‍याला बघून लोणी वितळले नाही तरच नवल•••

एकमेकां बरोबर काम करताना जीवनही एकमेकां सोबत जगावे असे त्या दोघांनाही वाटले•••

पण••• दोन्ही घरातून जातीय विरोध••• उच्च नीच भेदभाव••• दोघेही अगदी एकमेकांना पूरक आहेत, लक्ष्मीनारायणाचा जोडाच आहेत असे वाटले तरी दोघांच्याही घरातून याला कडाडून विरोध झाला•••

परिणाम म्हणून दोघांनीही मित्र मैत्रिणींच्या साथीने, साक्षीने कोर्ट मॅरेज केले. अगदी साधेपणाने लग्न झाले तरी दोघेही I.T.मधे असल्याने मोठा फ्लॅट भाड्याने घेऊन नव्या नवलाईसह नव्या संसाराला सुरुवात केली. 

नव्याचे नऊ दिवस सरले. आणि दोघांनाही एकाच ऑफिसमधे काम करणे अशक्य वाटू लागले. त्याला आता ती आपल्या कामात ढवळाढवळ करत आहे वाटू लागले••• 

तिला आता तो नवरा आहे म्हणून आपल्यावर जास्तच ‘ बॉसिंग’ करतो आहे वाटत होते.

झाले••• ऑफिसमधे सगळ्यांसमोर रागावता येत नाही म्हणून घरी येऊन तो राग एकमेकांवर निघू लागला••• छोट्या छोट्या कुरबुरींचे भांडण वाढू लागले••• लोकांसमोर दाखवायला प्रेम आणि घरी भांडण रुसवे फुगवे असे दुहेरी जीवन नकळत सुरू झाले•••

तिला तर रडूच येत होते. घरच्यांचा विरोध स्विकारून आपण प्रेमासाठी सगळे सोडून आलो आहोत पण त्याच्या गावी ती गोष्टच पोहोचली नाही असे वाटले तर तो सुद्धा आपल्या आई वडिलांच्या मर्जीविरुद्धच आपल्याशी विवाहबद्ध झाला आहे याबद्दल तिला आपल्या प्रेमाचा अभिमानच वाटायचा. पण सध्याचे त्याचे वागणे बघता आपण काही चूक तर नाही ना केली असे वारंवार वाटू लागले•••

एक दिवस छोट्या भांडणाने मोठ्या भांडणाचे रूप घेतले••• कडाक्याच्या भांडणात मी तुझ्याशी बोलणारच नाही म्हणाली••• नको बोलूस जा•• तो पण रागाने म्हटला••• मी जातेच घर सोडून, पुन्हा येणार नाही म्हणाली.

जातेस तर जा••• मी काही अडवणार नाही तुला••• असे त्याने पण म्हणताच खरोखर ती घर सोडून निघाली••• घराबाहेर पडलीसुद्धा•••

आपल्याच तंद्रीत कितीतरी अंतर चालून झाले आणि ती भानावर आली••• मग ती विचार करू लागली आता माहेरी तोंड दाखवायला जागा नाही••• सासरच्या माणसांनी तर अजून तिला स्विकारलेच नव्हते ••• आता जायचे कोठे? विमनस्क अवस्थेत ती समुद्रकिनार्‍यावर पोहोचली. 

संध्याकाळची वेळ होती. पक्षी घरट्याकडे परतत होते आणि हे वेडे पाखरू नवर्‍याशी अबोला धरून घराबाहेर पडले होते.•••

सूर्य सगळ्या चराचराला सोनेरी मिठी मारून या सृष्टीचा निरोप घेत होता. आणि हिच्या मनातील सूर्य रागाला मिठी मारून सगळे संबंध त्या रागात जाळत होता•••

आता सगळे संपले••• आता सगळीकडे काळोख येणार••• माझ्या मनात, जीवनातही काळोख येणार हा विचार तिच्या मनात आला•••

सूर्यास्ताचे सौंदर्य बघायला किनार्‍यावर तिच्यापासून लांब कितीतरी जण होते. ते सगळे मनाच्या कॅमॅर्‍यात मोबाईलमधे ते सौंदर्य कैद करत होते आणि हिच्या मनात मात्र आता काळोख होणार पुढे काय? सगळे गेले की आपल्या जीवनाच्या सूर्याचाही आपण अस्त करायचा अशा विचारांच्या ढगांनी मनाच्या सूर्यावर सावट आणायला सुरूवात केली•••

तेव्हाच कोणा एका रसिकाने मोबाईलमधे जुने एक गाणे लावलेले तिला स्पष्टपणे ऐकू आले•••

नच सुंदरी करू कोपा

मजवरी धरी अनुकंपा

तिने कानांवर हात ठेवले आणि थोड्यावेळाने खाली घेतले तर दुसरे नाट्यपद ऐकू आले•••

रागिणी मुखचंद्रमा

कोपता खुलतो कसा 

वदन शशीचा लालिमा

रूप बघूनी लज्जिता

होती पूर्वा पश्चिमा•••

त्या पूर्वा पश्चिमेच्या शब्दांनी जणू तिच्यावर जादू केली. मावळतीचा सूर्य जणू तिला सांगत होता, मी जाणार आहे, थोडावेळ काळोख असणार आहे, पण उद्या सकाळी मी पुन्हा नव्याने येणार आहे•••

त्या सूर्याने तिचा अबोला हा थोड्यावेळासाठीच असावा असा संदेश दिला होता. जरी भांडणाची काळी रात्र आली तरी उद्या सकाळी आशेच्या किरणांसह नवा चांगला दिवस आणणे आपल्याच हातात आहे हे तिला पटले•••

घर म्हटले तर भांडणे होणारच, पण राग आला तर मनात १ ते १० मोजायचे म्हणजे थोडावेळ अबोला धरायचा. बोलण्याला अबोल्याची साथ मिळाली तर शब्दाने शब्द वाढणार नाहीत याची जाणिव झाली••• 

आता राग निवळला होता. ती उठून घरी जायला निघाली तर तिच्या मागे तो पण उभा असलेला दिसला••• 

ती तशीच अबोला धरून उभी••• पण त्याने पण काही न बोलता तिला आपल्या मिठीत घेतले•••

आता मात्र दोघांचा अबोलाच बोलत होता.••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवपंगत – भाग – २ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆

🌸 जीवनरंग 🌸

☆ देवपंगत – भाग – २ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆

(मागील भागात आपण पहिले,- पहिली पंगत बसण्याआधी एका बाजूला अंगण सारवून तिथे छान बैठक मांडून, सजवून चौघा देवांसाठी चार पानं मांडली जात. तो नैवेद्य मात्र गायीला अर्पण केला जाई. पंगत संपवून माणसं घरोघरी जाताना सोबत प्रसादाचे लाडू दिले जात. हरिभाऊंच्या वेळी द्रोणातून प्रसाद वाटला जाई आता झीपलॉकच्या पिशवीतून… इतकाच काय तो फरक.  )

विराज आणि मालिनी या भावाबहिणींचा एकमेकांवर प्रचंड जीव. मालिनी आता लग्न होऊन जोगळेकरांकडून करमरकरांची सून झाली असली तरी तिच्यावर संस्कार सगळेच सुरेख होते. जगावर प्रेम करायची ती. कोणालाही खायला देणं, आवडीचं काही करुन देणं तिच्या खास आवडीचा विषय होता….देवपंगत दोन महिन्यावर आली तशी विराजने गावाकडे एक चक्कर टाकली. जुन्या वाड्याची साफसफाई करुन झाली. ग्रामपंचायतीचं पटांगण देवपंगतीसाठी नक्की झाले. भावकीतील मंडळींशी भेटीगाठी झाल्या. यंदा तब्बल आठशे पानांचा अंदाज होता. कॅटरर्सशी बोलणं झालं. तारखा ॲडवान्स…दोन दिवसाच्या विधीसाठी नेहमीप्रमाणे रत्नागिरीहून आठल्ये गुरुजी, फडके गुरुजी येणार होते…आणि ….

कोरोनाची साथ आली…. विराज हादरला.. आजवर कधीही म्हणजे अक्षरशः कधीही न आलेली अडचण समोर ठाकली. आजवर आलेल्या प्रत्येक अडथळ्यांवर आणि विघ्नांवर त्याचा आजापणजांनी मात केली होती. गांधींच्या हत्येनंतर आसपासच्या गावात जाळपोळी झाल्या तेव्हा यांच्या गावकऱ्यांनी मानवी साखळी करुन जोगळेकर वाडा वाचवला होता. “बामणाच्या नखाला पण हात लागू देणार नाई” अशा निर्धाराने शेंबडं पोरही छाती पुढे काढून आलं होतं. वाडा जाळपोळीपासून सुरक्षित राहिला होता. अशा कठीण परिस्थितीतही देवपंगत उठली होती पण आजचा प्रसंग अवघड होता. इंटरनॅशनल फ्लाईट्स तातडीने बंद करण्यात आल्यामुळे मालिनीचं येणं अशक्य होतं. देवपंगत झाली असती पण नियमानुसार पंगतीला घरातल्या बायकांसोबत बहिणीने वाढणं आवश्यक होतं… आता काय करायचं? मोठाच यक्षप्रश्न होता…

“दादा… मला व्हिडिओ कॉल कर. परिस्थितीच अशी आहे की आपला नाईलाज आहे.” विराज हो म्हणाला. यंदाच्या देवपंगतीला मालिनी नाही म्हणून राधिकाकाकू पण थोडी नाराज होती. विराजची बायको म्हणजे अनिताही थोडी बावरली होती. मालिनी असली की तिला जरा आधार वाटे यंदा सगळंच तिच्यावर आलं होतं. नाही म्हणायला भावकीतील स्नेहाकाकू, दस्तुरखुद्द राधिकाकाकू म्हणजे तिच्या सासूबाई, गोखल्यांची नमिता, पावसकरांची सून या सगळ्या असल्या तरी मालिनी असली की तिला बरं वाटे. दोघी नणंदाभावजयींचं रिलेशन छान होतं. तू अजिबात काळजी करु नकोस….देव काय ते बघून घेईल असं मालिनीने अनेकदा सांगितले…

सगळी तयारी जय्यत झाली. आसपासच्या परिसरात आमंत्रणे गेली आणि दोन दिवस आधी मालिनीचा फोन आला “अरे दादा, मी नेमकी देवपंगतीच्या दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी एकेठिकाणी जातेय. निनादचं एक काम आहे रे. तो एरिया लो नेटवर्कचा आहे. मीच कॉल करेन जमेल तसं”  देवपंगतीच्या आधीचे दोन दिवस सतत विधी सुरु होते… विराजला श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती… आज पदोपदी मालिनीचं नसणं खटकत होतं… पहिली पंगत घेण्याची वेळ आली. लोकं स्थानापन्न झाले. आपटे गुरुजींनी खड्या आवाजात त्रिसुपर्ण म्हणायला सुरुवात केली. भावकीतील नातेवाईक आणि स्त्रीया पंगत वाढायला सज्ज होत्या. विराज तूपाचं भांडं आणि अनिता मसालेभात घेऊन तयार होते….आज मालिनीची पुरणपोळी वाढण्याची जबाबदारी राधिकाकाकूंनी घेतली होती… आणि अचानक एका कार मैदानात येऊन थांबली आणि त्यातून लगबगीने मालिनीच उतरली… हे दृश्य बघून सगळेच थक्कं झाले…

“मालिनी? हे कसं शक्य आहे?” सगळेच म्हणाले. “दादा तुला नंतर सांगते डिटेल…” त्रिसुपर्ण संपलं आणि आईकडचं पुरणपोळ्यांचं ताट घेऊन मालिनी नेहमीप्रमाणे पदर खोचून वाढू लागली. इतक्या मोठ्या लांबच्या प्रवासाहून आली असली तरी तिच्या चेहर्‍यावर थकवा नव्हता. लख्खं गोऱ्यापान वर्णाची, सुंदर चेहऱ्याची एक लक्ष्मीकन्याच जणू काही पंगतीत वाढते आहे असं विराजला वाटलं… आज नेहमीप्रमाणे वरणभात, तूप, लिंबू, बटाट्याची भाजी, पुऱ्या, आम्रखंड, पुरणपोळी, चटणी, कोशिंबीर, कोथिंबीर वडी, पापड, मसालेभात, कुरडया, पंचामृत आणि अळूवडी हा बेत होता…. फक्कड बेत झाला. आठेकशे लोक तृप्त झाले. ओळखदेख नसणारे मोठमोठे तालेवार जसे जेवत होते तसेच आसपासच्या गावचे गोरगरीब जेवत होते. आपल्या शेजारी कोण बसलंय? याची खंत कोणाला नव्हती. कराडच्या नगराध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून एक गरीब शेतकरी बसला होता तर आमदारांच्या शेजारी पानाची टपरी असलेला विठोबा माने जेवत होता…. मोठी छान मैफिल जमली होती. दक्षिणा घेऊन शुभेच्छा देऊन आणि प्रसाद घेऊन जो तो आपापल्या घरी गेला… मंडपात मालिनी, विराज, राधिकाकाकू, अनिता आणि थोडी इतर नातेवाईक मित्रमंडळी असताना मालिनीने जे सांगितले ते ऐकून सगळेच थक्क झाले…

इंटरनॅशनल फ्लाईट्स ताबडतोब बंद झाल्यावर मालिनीचे इथे भारतात येण्याचे मार्ग बंद झाले. तिने आणि निनादने अक्षरशः आकाशपाताळ एक केलं पण जाणं इंपॉसिबल होतं. इतक्यात चार दिवस आधी निनादच्या मित्राचा फोन आला. त्याचा एक इंडस्ट्रीएलिस्ट मित्र जो बिगशॉट होता तो दोन दिवसात स्पेशल परमिशन घेऊन स्वतःच्या चार्टर्ड विमानाने भारतात, मुंबईत चालला होता. मालिनीने स्वतः त्या मित्राला फोन केला… मला नेऊ शकता का? असं विचारलं… त्याने सांगितले “ताई, अशा प्रसंगी मी उपयोगी पडलो नाही तर देव मला क्षमा कशी करेल” तडकाफडकी सर्व अत्यावश्यक टेस्ट्स केल्या आणि स्पेशल परमिशन्स काढली गेली. आणि देवपंगतीच्या एक दिवस आधी मालिनी संध्याकाळी मुंबई एअरपोर्टला उतरली. तिला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं… आणि पंगतीच्या अगदी वेळेवर ती पोहोचली… आणि पंगतीत तिला नियमानुसार वाढता आलं…

तिला ज्यानं सुखरुप भारतात आणलं तो इंडस्ट्रीएलिस्ट म्हणजे कैवल्य…कैवल्य भोसले. त्याला दुसरीकडे जायचं असल्याने देवपंगत अटेंड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला प्रसादाचे लाडू ताबडतोब कुरियर केले गेले. आणि पुढच्या वर्षीपासून तोही आवर्जून येणार होता असं त्याने मालिनीला वचन दिले होते. ही सगळी स्टोरी ऐकून उपस्थित सगळेच गहिवरून गेले. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते उगाच नाही…

विराज शांतपणे उठून शेजारच्या वाड्यातील माजघरात गेला. हरिभाऊ, कावेरी, विष्णुआजोबा, गंगाआजी, भाऊकाका आणि मंदाआत्या सगळ्यांच्या फोटोला हात जोडले. मनोमन प्रार्थना केली…. परंपरा म्हणजे काय नेमकं? एक आनंदप्रवाह. देवी पार्वतीची आज्ञा हो… पंगतीत वाढायला बहीण हवीच… विषयच संपला. नियती काय ठरवायचं ते ठरवू दे… पंगतीला माझी बहीण येणारच. जगाच्या पाठीवर कुठेही असो…

विराजच्या खांद्यावर मालिनीचा हात विसावला… “देवाची इच्छा देव कशीही पूर्ण करतो ना दादा? आज मला एक गोष्ट पटली. प्रवाहाचा प्रवास असाच सोपा सुरु असतो… आपण फक्त विश्वस्त. तो प्रवाह पुढच्या पिढीला सुपूर्द करणारे त्रयस्थ…” दोघा बहिणभावांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

 – समाप्त –

© श्री सचिन मधुकर परांजपे 

(पालघर)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवपंगत – भाग – १ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆

🌸 जीवनरंग 🌸

☆ देवपंगत – भाग – १ ☆ श्री सचिन मधुकर परांजपे ☆

….जोगळेकरांकडची ती पूर्वापार चालत आलेली देवपंगत मला वाटतं आसपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. देवपंगत या नावामागचा इतिहास मोठाच रंजक आहे. भाऊकाकांचे आजोबा म्हणजे हरिभाऊंपासून ही परंपरा सुरु आहे. एकदा जेव्हा हरिभाऊ अगदी तरुण होते तेव्हा त्यांच्या अंगणात दुपारच्या वेळी जेवणाआधी कसलेसे शेतीवाडीचे हिशोब करत असताना एकदम दोन जोडपी दारात आली… एकूण चार जणं… दोन पुरुष, दोन बायका…त्यातला एकजण पडक्या आवाजात अजिजीने म्हणाला,  

“हरिभाऊ… लई लांबून आलोय बगा. पार उदगीर पासून… खूप मोटा दुष्काळ घडलाय वं आमच्याइथं… घरदार तसंच टाकून वणवण फिरतोय… काय पडंल ते काम करतो बघा. हरिभाऊ, तुमच्याविषयी खूप आईकलं… यायला उशीर झाला. पण दोन घास द्याल तर बरं हुईल हो… उद्यापासून आमी चौगं बी श्येतावर येतु तुमच्या… काय द्याल ते काम करु. आज भाकरतुकडा देता का पोटाला?” 

त्या चौघांची अवस्था खरंच वाईट दिसत होती. अठरा विश्वे दारिद्र्याच्या खाणाखुणा सबंध देहावर मिरवत होत्या. हरिभाऊंचं नुकतंच लग्न झाले होतं. कोकणातलं एक छोटंसं गाव त्यातले हरिभाऊ जोगळेकर एक सधन शेतकरी…“इंदिरा…” त्यांनी बायकोला हाक मारली…चौघांना ओटीवर बसायला सांगून ताबडतोब जेवणाची व्यवस्था झाली. हरिभाऊ तेव्हाच्या काळी जातपात शिवाशिव मानत नसत. चौघे ओटीवरच बसले. पानं मांडली गेली… आणि एखाद्या तालेवार पाहुण्याचं आगतस्वागत करावं तसं जेवण वाढलं गेलं…हरिभाऊंची लग्न व्हायचं होतं अशी बहिण म्हणजे कावेरीही वहिनीच्या मदतीला लागली…हरिभाऊंकडे अन्नपूर्णेच्या कृपेने नेहमीच पेशवाई बेत असे.  

केळीच्या पानावर शुभ्र पांढरा भात, पिवळंधम्मक वरण, घरचं साजूक तूप, अळूवडी, नारळाची चटणी, कोशिंबीर, रायतं, रोजच्या जेवणात एक गोड पदार्थ असायचा म्हणून आज केशरी जिलबी, कुरडया, एक रानभाजी, गरमागरम पोळ्या असा फक्कड बेत होता.

आलेले चौघेजण अक्षरशः अन्नावर तुटून पडले हो. अनेक दिवसांची भूक आज भागली होती. हरिभाऊ, इंदिराबाई आणि कावेरी तिघेही कौतुकभरल्या नजरांनी ती कृतज्ञ तृप्तता न्याहाळत होते. जेवणं झाली आणि चौघंही परसदारी जाऊन हातपाय धुवून ओटीबाहेर अंगणात आले. टळटळीत दुपारी आज आपल्या हातून चौघांना अनायासे अन्नदान झालं याचा मनस्वी आनंद सगळ्यांना होता. जेवणानंतर जशी ब्राह्मणाला दक्षिणा देण्याचा रिवाज असतो तसं हरिभाऊंकडे आलेल्या अतिथीला आणा द्यायची पद्धत होती. त्यामुळे रिवाजाप्रमाणे हरिभाऊंनी एकेक आणा चौघांना दिला… आणि अचानक…

त्या चौघांपैकी एकाची बायको बोलली, “हरी…” एकेरी उल्लेख ऐकून सगळेच दचकले. चौघांचंही रुपडं आता पालटलं होतं… “हरी… अरे मी पार्वती. हे माझे नाथ शिवशंभो. ते विष्णु नारायण आणि ती त्यांची सौभाग्यवती लक्ष्मीनारायणी… आज अगदी सहज तुझं अगत्याचं जेवण.. तुझा पंगत अनुभवायला आम्ही आलो रे. तू कोणाला उपाशी, विन्मुख पाठवत नाहीस. जे तुम्ही स्वतः खाता तेच अतिथीला देता असं ऐकून होतो.. आज अनुभव घेतला… आता आमची चौघांचीही कृपा तुझ्या सर्वच पिढ्यांवर अशीच राहील… पण आता मात्र एक करायचं…. दरवर्षी देवपंगत भरवायची. गावात आमंत्रणं धाडायची… येईल त्याचा आदरसत्कार करायचा… पंचपक्वान्नाचं जेवण ठेवायचं… त्यात पुरणपोळी आणि अळूवडी हवीच बरं का… कोणी काही जिन्नस पंगतीसाठी दिला तर आनंदाने स्विकारायचा… हरकत नाही. जो देवभंडाऱ्यात देतो त्याला कधी काही कमी पडत नाही. पण अट एक आहे… त्या पंक्तीला वाढायला आज जशी कावेरी होती तशी माहेरवाशीण हवीच… तुझ्या आणि तुझ्या सगळ्या पिढ्यांचं कोटकल्याण होईल…. तथास्तु” आणि हरिभाऊंना फक्त त्यांचे सस्मित चेहरे मात्र लक्षात राहीले. पुढच्या क्षणी अंगणात कोणीही नव्हते. तिघेही थक्क झाले… 

चारही केळीची उष्टी पानं नुसती पुसून हरिभाऊंनी तिजोरीत जपून ठेवली. ज्यावर प्रत्यक्ष परमेश्वर उष्टावलाय ती पानं… त्या दिवसापासून हरिभाऊंची भरभराट सुरु झाली…दरवर्षी मग देवपंगतीचा घाट घालणं सुरु झालं. लोकांना हरिभाऊंवर नितांत विश्वास… दरवर्षी लांबलांबहून लोकं यायची. दरवर्षी गावातली आणि बाहेरची तालेवार माणसं साजूक तूप, पीठ, तांदुळ, भाज्या असं खूप काही दान करत. ज्यांना जमेल ते पैसे देत…देवपंगत शक्यतो वैशाख पौर्णिमेला भरायची. आणि मग आधी त्रयोदशीपासून दोन दिवस रुद्र, विष्णुयाग, सप्तशतीचे पाठ आणि श्रीसूक्ताची पुरश्चरणं केली जात. कावेरी नियमानुसार दरवर्षी त्याच वेळी सहकुटुंब सपरिवार येई. देवपंगत झाली की दोन दिवसांनी सासरी जाई… हा क्रम पुढे कायम सुरु राहीला… 

हरिभाऊंनंतर पुढे पिढीत दरवर्षी एक मुलगा आणि एकच मुलगी जन्माला यायचे त्यामुळे फाटे फुटले नाही आणि परंपरा अबाधित राहीली. पिढी वंशसातत्य राहीलं… हरिभाऊनंतर विष्णुपंत आणि बहीण गंगा… त्यानंतर भाऊकाका आणि मंदाकिनी… आणि आता भाऊकाकांनंतर त्यांचा मुलगा विराज आणि बहीण मालिनी… परंपरा सुरू होती… विराज पुण्यात आणि मालिनी लग्नानंतर युके ला असली तरी ती दरवर्षी यायची आणि पंगतीचा उत्सव झाला की काही दिवस दादासोबत पुण्यात आणि सासरी साताऱ्याला जाऊन मगच परत जायची….विराजचा बिझनेस आता पुण्यात बऱ्यापैकी सेट झालेला होता. हरिभाऊंनी जपून ठेवलेली देवांची उष्टी पानं नंतर कधीच सुकली नाही हे विशेष. प्रत्येक देवपंगतीच्या आधी ती काढून त्याचं खाजगीत पूजन केलं जाई.  

हरिभाऊंपासून आजतागायत ही परंपरा अबाधितपणे सुरु होती. सुरुवातीला शे दोनशे पानं उठायची ती आता पाचशे सातशे पानापर्यंत पंगत होत होती. पंगतीचा बेतही अगदी तसाच असायचा. कालमानानुसार थोडे बदल केले तरी मुख्य बेत तोच…आता कधीतरी आपटे मिठाईवाल्यांकडून खास बनवून आणलेले साजूक तूपातले मोतीचूर लाडू, कधी भोपळ्याची भाजी, कधी छान सुरेख बटाट्याची भाजी, कधी नव्या सुनेच्या आग्रहाखातर पंचामृताची आमटी, कधीतरी पालक बटाटा भजी असे आलटून पालटून बेत असायचे पण नियमानुसार पुरणपोळी आणि अळूवडी कंपलसरी होती. खास पुण्याहून श्रेयसचं केटरिंग असायचं. काळ बदलला आणि आधुनिकता आली तरी पंगत तशीच राहिली. त्याचा ना बुफे झाला, ना केळीच्या पानाऐवजी स्टेनलेस स्टीलची ताटं आली… मेन्यूतला बदल हा प्रथेत झाला नाही. देव जसे अंगतपंगत बसून जेवले तस्संच सगळ्यांनी जेवायचं हा अलिखित नियम होता… जेवणाआधी हातपाय धुणे, जितक्या पंगती उठतील त्यातील पहिल्या पंगतीअगोदर उपस्थित ब्रह्मवृंदांनी अन्नसूक्त आणि त्रिसुपर्ण म्हणणे, जेवणानंतर आलेल्या प्रत्येकाला आजही एकेक रुपया दक्षिणा दिली जाते. आज एक रुपयाला तितकंसं महत्त्व नसलं तरी देवपंगतीनंतर मिळालेली दक्षिणा लोकांना मौल्यवान वाटे…. सातारचे एक इंडस्ट्रीएलिस्ट त्या एक रुपया दक्षिणेसाठी येत. सगळ्यांसोबत बसून जेवत. त्यांच्यासाठी ते नाणं म्हणे अतिशय लकी होतं. दरवर्षी मिळणारं नाणं ते तिजोरीत जपून ठेवत…पहिली पंगत बसण्याआधी एका बाजूला अंगण सारवून तिथे छान बैठक मांडून, सजवून चौघा देवांसाठी चार पानं मांडली जात. तो नैवेद्य मात्र गायीला अर्पण केला जाई. पंगत संपवून माणसं घरोघरी जाताना सोबत प्रसादाचे लाडू दिले जात. हरिभाऊंच्या वेळी द्रोणातून प्रसाद वाटला जाई आता झीपलॉकच्या पिशवीतून… इतकाच काय तो फरक. 

क्रमशः 

© श्री सचिन मधुकर परांजपे 

(पालघर)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ My life…. my decision…. – लेखिका : संध्या बेडेकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

🌸 जीवनरंग 🌸

☆ MY LIFE, MY DECISIONS – लेखिका : सुश्री संध्या बेडेकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

*I am the boss of myself from beginning till final destination ••• DEATH. * 

काल भाऊंजींचा सत्तरावा वाढदिवस झाला. •••

ताईकडे जायला आम्हाला बोलविणे लागतच नाही. आम्ही येणार आहोत, असाच निरोप आम्ही देतो. ताईला पण मदत होते. आणि मुख्य म्हणजे आम्हाला भाऊजींशी गप्पा मारायला खूप आवडतं. •••

भाऊजी म्हणजे खूप disciplined व्यक्तिमत्त्व. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लान करून करणारं. •••

भाऊजी घरचे आधारस्तंभ, advisor. फक्त घरचेच नाही तर किती तरी जण त्यांच्या संपर्कात असतात. •••

त्यांच्या बरोबर बोलून प्रश्न सुटतात, समस्येवर समाधान मिळत. विचारांची रेंज वाढते. बऱ्याच विंडो ओपन होतात. समस्येचे If आणि but clear होतात. प्रश्न ‘शेअर्स ‘ बद्दल असो नाहीतर ‘ घर घेणे फायद्याचे आहे की भाड्याने राहणे. ‘ याबद्दल डिस्कस करायलाही त्यांचे मत लोक विचारात घेतात. एकंदर त्यांची फॅन फोलोंइंग बरीच आहे. •••

एकतर ते शांतपणे ऐकतात, व्यवस्थित विचार करून सल्ला देतात. परिस्थिती चे विश्लेषण लॉजिकल असते. निर्णय calculated risk चा विचार करून घेतलेला असतो. आणि ते सांगायची पध्दत नेहमीच छान असते. बरे असो ••••

येथे आल्यावर कळले की आज सर्वांना वाढदिवसाचे खास निमंत्रण पाठवले आहे. तसे ते आपला वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी करत नाहीत. मग आज असे विशेष काय आहे ?? काही कारण असल्याशिवाय ते ताई ला सर्वांना •••म्हणजे आमचा दादा, ताईची मुलगी जावई यांना बोलवायला सांगणार नाहीत. मुलगा अजय तर बंगलोरहून येणार आहे. •••

काही तरी खास नक्कीच असणार. कळेलच.

संध्याकाळी सर्व जमले. गप्पा गोष्टी झाल्या. खाणे पिणे झाले. वाढदिवस साजरा झाला. •••

भाऊजी म्हणाले, •••

खरं तर वाढदिवस म्हणजे आपल्या PAST आणि FUTURE चे audit करायचा दिवस. आपण आपल्याच आयुष्याकडे auditor च्या भूमिकेत बघायचे. Examine करायचे. Past चे तर विशेष काही करता येत नाही. फक्त आपल्या आणि दुसऱ्यांच्या अनुभवांवरून पूढचे निर्णय घेणं सोपं होतं. Future plans मात्र नक्कीच असावेत. •••

* Now after 70, We can say my last phase आता सुरू झाला आहे. •••

I am moving towards final destination that is Death. * ••••

ताई लगेच म्हणाली, •••

अहो!! हे काय आज ?? आज हा विषय नको. आज आपली मुलं घरी आली आहेत ना. छान गप्पा मारूया. •••

भाऊजी म्हणाले, •••

अग!! मृत्यू अटळ आहे. तो येणारच आहे. कसा ? केंव्हा? हे मात्र माहीत नसतं. आपण याविषयी बोलणं टाळतो. पण हा महत्वाचा विषय आहे, त्यावर बोलणं आणि ते पण सर्व व्यवस्थित असताना म्हणजे आपलं डोकं जागेवर असताना, ते ही घरच्या सर्व मेंबर्स समोर, गरजेचं आहे. •••

आपले आपल्या डेथ विषयी, म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये होऊ शकणाऱ्या आजारांबद्दल आपले विचार स्पष्ट असावेत. •••

याला * Living will * असं म्हणतात. •••

प्रत्येकाचीच इच्छा असते की माझा अंत सुखांत व्हावा. झोपेतच मरण यावे. पण ते काय आपल्या हातात आहे का ?••• 

रोजचे नवीन आजार आणि त्या आजाराने होणारे त्रास, treatment बद्दल, treatment च्या साईड इफेक्ट बद्दल आपण ऐकतो, वाचतो. बरं एवढं करून तो आजार बरा होणार का ?. किती दिवस नाका तोंडात नळ्या घालून आपण जिवंत राहणार ?? किंवा आपल्याला जिवंत ठेवले जाणार?? हे आपल्याला माहीत नसतं. व्हेंटिलेटरवर ठेवायचे की नाही ?? हा तर खूप मोठा प्रश्न असतो. •••

खरं तर हे सर्व प्रश्न डॉक्टर ला विचारायचा आपल्याला अधिकार आहे. आपण या अधिकारांचा उपयोग करतो का ?? आणि त्यावेळी पेशंटची इच्छा लक्षात घेतो का ??

या फायनल स्टेज मध्ये आपण पॅनिक होतो. आपण बरोबर विचार करू शकत नाही. दुसऱ्यांच्या म्हणण्यात सहज येतो. •••

 “भावना, वस्तूस्थिती आणि पेशंटला होणारा त्रास, त्याची इच्छा ” यांचे समीकरण योग्य रित्या समजणे आणि त्यानुसार त्यावेळी निर्णय घेणे जमले पाहिजे. याचा पण विचार करायला हवा. •••

आता माझ्या मित्राच्या वेळेस व्हेंटिलेटर लावणे म्हणजे ब्रेन डेड झालेल्या पेशंटला जिवंत ठेवणे होते. लोक काय म्हणतील ?? या विचाराने त्याच्या मुलांना••

*व्हेंटिलेटर वर ठेवू नका*, हे डॉक्टरला म्हणता आले नाही. •••

माझे माझ्या मित्रांबरोबर याच विषयावर एकदा डिस्कशन झाले होते, तेंव्हा तो मला म्हणाला होता, •••

“मला ICU मध्ये मरायचे नाही. माझा आजार जर बरा होणारा नसेल तर मला दवाखान्यात नाही, घरी सर्वांबरोबर रहायला आवडेल. घरी च काय ती सोय व्हावी. अशी माझी इच्छा आहे. ” ••••

मलाही त्याच म्हणण पटलं होतं. •••

पण हे त्यांने मुलांना सांगितले नाही, कुठे लिहून ठेवले नाही. त्यामुळे शेवटी डिसिजन घेता आले नाही. जवळ जवळ दोन महिने तो vegetative stage मध्ये व्हेंटिलेटर वर होता. हा काळ किती मोठा असेल, ते सांगता येत नाही. या वेळी पैसा तर पाण्यासारखा खर्च होतो. तो पण एक मोठा प्रश्न समोर असतोच. ••••

आपल्या देशात * ब्रेन डेड * म्हणजे मृत्यु झाला. असं समजत नाही. शरीराचे बाकी सर्व organs replace करता येतात पण ब्रेन implant चां शोध आजपर्यंत तरी लागलेला नाही. ••••

मला आज तुम्हाला माझ्या याच फेजबददल सांगायचे आहे. मला माझी * Living Will * तुम्हाला सांगायची आहे. •••

आज तुमच्या सर्वांबरोबर याच विषयावर बोलायचे आहे. म्हणजे आजारांबददल. to avoid last minute confusion. मला तुम्हाला माझ्या याच इच्छेबद्दल सांगायचे आहे. कारण, •••

*Last minute decisions should be firm. It should not be under influence or under social pressure.

It is my life, my decision. •••

You never know what is stored in your life. आजारी पडलोच नाही तर उत्तमच. आजार, औषध उपचार करून बरा होणार असेल तर ठीकच. परंतु जर आजार बरा होण्याच्या पलीकडचा असेल तर काय करायचे ? •••

हेच सर्व मी Living will मध्ये लिहिणार आहे.

मला वाटतं You should plan your death considering difficult situations. आणि माझ्या family members ने हे सर्व माहीत असावं.

म्हणून आज सर्वांना आमंत्रण दिले आहे. •••

सर्वांच्या चेहऱ्यावर चे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. पटत ही होत. आणि विषय थोडा सिरियसही होता. आजूबाजूची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आली. पेशंट्सचे झालेले हाल आठवले. •••

आपल्या मृत्यूपूर्वी *मृत्यू पत्र * तयार करतात हे ऐकलं होतं, पण आपल्या स्वतः च्या मृत्यू बद्दल प्लान करणं, हे ऐकलं नव्हतं. •••

भाऊजी म्हणाले, ••• 

Living will तयार केली की पूढे येऊ शकणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. उगीच आढून ताणून आयुष्य जगायचे का ? दवाखान्यात एक पलंग अडवून ठेवायचा का ? त्यापेक्षा गरजू व्यक्तीला दवाखान्यातील सोई उपलब्ध झाल्या तर त्याचा जीव वाचू शकतो. जाता जाता ते तरी पुण्य मिळेल. •••

आपण आयुष्यात अनेक लहान सहान गोष्टींचा विचार करतो त्या त्या प्रमाणे सोई करून ठेवतो. मृत्यू तर निश्चितच आहे. तो सुखाचा, सोपा व्हावा, यांचा विचार आणि सोयही करायलाच हवी. नाही का ?? •••

भाऊजी म्हणाले, ••••

बरोबर बोलतोय ना मी ??•••

भाऊजींनी दिलेली सविस्तर माहिती पटण्यासारखीच होती. •••

माझ्या मनात हे विचार होतेच. इतक्यातच मी डॉ. पूर्णिमा गौरी यांचे भाषण ऐकले आणि आता ते विचार ठाम झालेत. •••

भाऊजी म्हणाले, •••

अशी *Living Will * registered ही करता येते.

डॉ. पूर्णिमा गौरी यांची संस्था ••• NICHE ADVOCACY FOUNDATION याबाबत कार्यरत आहे. ••••

लेखिका : सुश्री संध्या बेडेकर 

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बृहन्नडा… भाग-२ – लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ बृहन्नडा… भाग-२ – लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

शेजारच्याच गावी सुगंधाला दिली होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच सगळं वऱ्हाड ट्रक टेंपोमधून नवरदेवाच्या गावी पोहोचलं. लग्नासाठी गोरज मुहूर्त धरला होता. मोठं तालेवार घराणं होतं नवरदेवाचं. १०० एकर जमिन, गाई गुरं, शेती बागायती .. लक्ष्मी पाणी भरत होती म्हणा ना. नशीब काढलं होतं अगदी सुगंधानं. घरच्या जमिनीवरच बंगल्याजवळच्या भल्या थोरल्या आवारात लग्नाचा मांडव घातला होता. बाजूलाच गाईगुरांचे गोठे, कोंडवाडे होते. सुगंधा  पिवळी साडी नेसून मंडपात आली.. नवरदेव घोड्यावर बसून मंडपात येत होते. स्वागताला खंडू नटून थटून नऊवारी साडी नेसून, केसांना गंगावन लावून अंबाडा आणि त्यावर गजरा माळून तो सुगंधाच्या आई वडिलांबरोबर  मंडपाच्या दरवाजात पंचारती घेऊन ओवाळायला उभा होता. आणि इतक्यात काही कळायच्या आतच वरातीचं घोडं उधळलं !!!! रोषणाईसाठी घासलेटचे दिवे डोक्यावर घेऊन चालणाऱ्या माणसांना धडक देऊन घोडं मंडपात घुसलं. नवरदेव खाली पडले. ते घासलेटचे दिवेही खाली पडले आणि क्षणार्धात मांडवाला आग लागली. मांडवाचं सेटिनच कापड भराभर पेटलं. रुखवताच्या टेबलाला धडक देऊन आजूबाजूच्या खुर्च्या आणि माणसेही घोड्याच्या सैरावैरा धावण्याने वेड्यावाकड्या होत खाली पडल्या. कडेच्या रांगेतल्या प्लास्टिकच्या खुर्च्याही पेटू लागल्या. सगळीकडे धूर पसरू लागला होता. आगीला पाहून ते घोडं आणखीनच बिथरलं. लग्नाला आलेले पैपाहुणे सैरावैरा धावू लागले. चेंगराचेंगरी होत होती. लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांच्या किंकाळ्यांनी आसमंत दणाणून गेला होता. खंडूने धावत जाऊन सर्वप्रथम इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून टाकला. इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडे हरकाम्या म्हणून केलेल्या कामाचा अनुभव इथे उपयोगी पडला होता. मांडवात एकच हलकल्लोळ माजला होता. खंडू पदर खोचून जीवाच्या आकांताने सुगंधाकडे धावला. ती घाबरून रडू लागली होती. त्याने तिला धीर दिला आणि तिला खांद्यावर टाकून मांडवाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली. नंतर त्याने मामा मामी ला वाचवले. नवरदेव बिचारा आधीच बाहेर जाऊन उभा राहिला होता. आता खंडू झपाट्याने आग विझवायच्या मागे लागला. कितीतरी लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना त्याने आपल्या खांद्यावर घेऊन मांडवाबाहेर सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले. त्याचा झपाटा पाहून लोक आणि तातडीने तिथे पोहोचलेले पोलीस आश्चर्यचकित झाले होते. आगीचा बंब येईपर्यंत गावकऱ्यांनीही आग आटोक्यात आणण्यास हातभार लावला. आगीचा बंब येईपर्यंत अगदी न थांबता खंडू लोकांना वाचवण्याचं काम करत होता. आगीत त्याचे हातपाय होरपळून निघाले होते नुसते. साडीही थोडीफार जळली होती. गंगावन सुटून खाली आलं होतं. तो प्रचंड थकलाही होता. प्रसंगावधान राखत त्याने मांडवाचा गुरांच्या कोंडवाड्याकडे जाणारा दोर वेळीच  कापून टाकला म्हणून त्या मुक्या जिवांचे प्राण वाचले होते, अन्यथा काय घडलं असतं याची कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. अंब्युलन्सही येऊन पोहोचली. सरतेशेवटी आग आटोक्यात आली. जीवित हानी झाली नाही. काही जणांना आगीचा तडाखा बसला होता पण तो जखमी होण्यापुरताच. दोन चार जण धुरामुळे आणि घाबरल्यामुळे बेशुद्ध पडले होते.. त्यांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात येत होतं. काही जणांचे हात पाय चांगलेच दुखावले होते चेंगराचेंगरीत..परंतु बरेचसे लोक सुरक्षितरित्या मांडवाबाहेर पडले होते. आणि हे सगळं कुणामुळे घडू शकलं होतं तर अख्ख गाव ज्याची खिल्ली उडवतं होतं.. ज्याची कुचेष्टा करत होतं.. ज्याच्यातल्या न्यूनत्वाला हिडीसफिडीस करत होतं त्या खंडूमुळेsss !!!! आज अनेकांच्या माना शरमेनं खाली गेल्या होत्या. स्वतःला  पुरुष म्हणवणारे लोक खंडूच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. ज्याला हिजडा म्हणून साडी चोळी देऊन हिणवत होते तो तीच साडी चोळी नेसून, हातात बांगड्या घालून निधड्या छातीने, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धावपळ करत होता. आगीचं तांडव विझवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढत होता. दुसऱ्या दिवशी खंडूचा पेपरमध्ये बातमीसकट फोटो छापून आला. “ एका तृतीयपंथीयाने वाचवले शेकडो लोकांचे प्राण !!!” वा रे वा!!! देवा तुझी लीला अगाध आहे हेच खरं !!! खंडू रातोरात हिरो झाला होता. त्या दिवशी लग्न रहित झालं हे सांगायलाच नको. नवऱ्यामुलाकडची लोकं समजूतदार होती म्हणून कुठचाही शुभअशुभाचा संबंध न जोडता एक महिन्यानंतरचा पुढचा मुहूर्त धरला गेला.. आणि लग्न सुरळीत पार पडलं सुद्धा. खंडू सुगंधाच्या घरी पाठराखीण म्हणून महिनाभरासाठी रहायला गेला. तिच्या सासरीही त्याची मोठ्या मानाने उठबस केली गेली. आता गावात कुठलंही शुभकार्य असो खंडूला फार आग्रहाचं निमंत्रण असे. त्याचा यथोचीत मानही ठेवला जाई.  त्या दिवसापासून खंडू; मामामामीच्या आणि अख्ख्या गावाच्या गळ्यातला ताईत झाला.. सारं गाव आता खंडूला मान देऊ लागलं होतं. खंडूच्या नशिबाने त्याला हेही दिवस दाखवले होते.

त्या दिवशी पोलिसांनी, आणि  जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती अर्जुनशौर्य पुरस्कारासाठी खंडूची शिफारस दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं. बऱ्याच कालावधीनंतर काही महिन्यांनी दिल्लीहून उत्तर आलं की खंडूला तो मानाचा ”अर्जुन शौर्य पुरस्कार” देण्यात येणार आहे म्हणून. बातमी ऐकताच खंडूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईच्या आठवणीने त्याला उमाळे आवरत नव्हते. सबंध गावभर उत्साहाचं वातावरण पसरलं.

बातमी समजतांच शाळेतले त्याचे लाडके गुरुजी त्याला भेटायला आले. त्याने शाळा सोडली तेव्हा त्याला परत शाळेकडे वळवण्यासाठी त्याची समजूत काढायला ते घरी आले होते त्यानंतर आज तो त्यांना भेटत होता. ‘ खंडू फार मोठा झालास बाबा ‘ .. गुरुजी म्हणाले.  ‘ कसलं काय गुर्जी  .. मी हा असा….  कसला मोठा न कसलं काय? आगीचा वणवा इझवला हो फकस्त.. ‘ ‘ असं नको म्हणूस. खंड्या तू आज जे करून दाखवलस; जे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवलस ते सामान्य माणसाचं काम नाही रे.’  गुरुजी म्हणाले; ‘ आणि आज ज्या अर्जुन शौर्य पुरस्काराचा तू मानकरी ठरला आहेस त्या अर्जुनाला देखील काही वर्ष किन्नर बनून राहावं लागलं होतं पोरा.; ‘बृहन्नडा’ या नावानं. ‘बृहन्नडा’ या शब्दाचा अर्थ माहीत आहे तुला? बृहन्नडा म्हणजे श्रेष्ठ, मोठा, महान मानव. आज तू श्रेष्ठच ठरला आहेस ना !!! आणि योगायोग बघ कसा तो .. जो पुरस्कार तुला मिळाला आहे त्याचं नावही “अर्जुन शौर्य पुरस्कार” च आहे. बृहन्नडेचं, किन्नराचं रूप घेतलेला अर्जुन…!! ‘  खंडू भावनातिरेकाने रडू लागला होता. त्याच्या डोळ्यातला अश्रूपात थांबतच नव्हता. तो गुरुजींच्या पाया पडला.. गुरुजींनी त्याला उठवला आणि छातीशी धरून घट्ट मिठी मारली.. ‘ मोठा हो पोरा ..  असाच मोठा हो..!!!!! ‘  बाहेर त्याची मिरवणूक काढण्यासाठी बैलगाडी सजून तयार होती. आणि त्या गाडीचं सारथ्य करायला सुगंधाचा नवरा आणि सुगंधा पदर खोचून बैलगाडीवर उभी होती. ढोलताश्याच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत एका बृहन्नडेची मिरवणूक निघाली होती!!!!!!!

— समाप्त —

लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बृहन्नडा… भाग-१ – लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ बृहन्नडा… भाग-१ – लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

आज सुगंधाच्या मनात संमिश्र भावना होत्या. लग्न होऊन उद्या सासरी जाणार होती ती. आज तिची हळद होती. सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक गोळा झाले होते. त्यात ‘तो’ पण होता. त्याला ‘तो’ म्हणायचं खरं पssssण !!!!! त्याची सारी लक्षणं ‘तो’ च्या ऐवजी ‘ती‘ ची होती. त्याचं नाव होतं खंडू. खंडोबाच्या नवसानं झालेलं पोर म्हणून त्याचं नाव खंडोबा च ठेवलं होतं. लवकरच खंडोबाचं खंडू झालं आणि आता त्याला सगळे खंडू, खंड्या असं म्हणत. सुगंधाच्या बाबांना तो त्यांच्या घरी आलेला अज्जिबात आवडत नसे. पण त्याच्यापुढे सगळ्यांनी हात टेकले होते. त्याला कितीही ओरडा, बंदी घाला तो कशाकशाला म्हणून जुमानत नसे. तात्पुरता बाजुला होई आणि दहा मिनिटांनी बघावं तर स्वारी परत हजर. सणसमारंभात बायका काय काम करतील असं काम करत असे हा!! बायकी चालायचा, बायकी बोलायचा. सगळ्या आवडीनिवडी सुद्धा बायकीचं होत्या. सुगंधाच्या बाबांच्या सख्ख्या बहीणीचा मुलगा होता तो. म्हणजे सुगंधाचा आत्तेभाऊ. सुगंधा जन्माला आली तेव्हा हा आठदहा वर्षांचा होता. एकाच गावात दोघांची घरं होती. सुट्टीत आईच्या मागे लागून तो सुगंधाच्या म्हणजे त्याच्या मामाच्या घरी रहायला येई, लहानग्या सुगंधाला तो मांडीवर घेई आणि अतिशय छान सांभाळे. तिला अगदी छान खेळवत असे तो. रडली तर कडेवर घेऊन फेऱ्या मारून शांत करत असे. वेळ पडली तर अंगडी टोपडी बदले.. छान पावडर लावून एखादया बाईला लाजवेल असं तयार करीत असे. सगळे जण आश्चर्य करत. आणि चेष्टाही !! पण त्याला त्याचं काहीच वाटत नसे. त्याच्या मनाला येईल, वाटेल तसंच तो वागे. शाळेत  एक दिवस वरच्या यत्तेतील मुलांनी नको त्या जागी हात लावून तो मुलगा आहे की नाही याची खात्री करण्याचा प्रसंग शाळेत घडल्यानंतर त्याने शाळेला कायमचा रामराम ठोकला. ती मुलं अचकट विचकट इशारे करून एकमेकात खिदळत होती, त्याला चिडवत होती.. परत परत त्याच्या मागे लागत होती. अतिशय सालस, मनस्वी आणि कोमल मनाचा खंडू रडवेला होऊन जीव घेऊन त्या दिवशी जो शाळेतून पळत सुटला तो थेट आईच्या कुशीत येऊन कोसळला. घडला प्रसंग आईला सांगताच ती सुद्धा धाय मोकलून रडली होती. हबकून गेली होती बिचारी. तिला तिच्या लेकराची होणारी कुचंबणा कळूनही त्याला जवळ घेण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. खंडूचा बाप खंडूच्या बायकी असण्याचा वागण्याचा राग राग करू लागला होता. खंडोबाला नवस करून पोटाला आलेलं पोर असं निपजलं म्हणून त्यानं आजकाल खंडेराया चं नाव सुद्धा टाकलं होतं. आणि अश्या पोराला जन्म दिला म्हणून बायकोला सुद्धा. खंडूला सुगंधाचा भारी लळा होता. मामाची नजर चुकवून सुगंधाशी खेळायला हमखास येत असे तो. सुगंधाची आई आपल्या गरीब गायीसारख्या नणंदेकडे बघून खंडूला घरात घेई. तिलाही त्याची दया येई पण सुगंधाच्या वडिलांपुढे तिचंही काही चालत नसे. जमेल तसं खंडूला आणि त्याच्या आईला मानसिक आधार द्यायची ती. हसताना खंडूच्या  गालाला पडणाऱ्या खळीने त्याचं हसू निर्व्याज परंतु चेहरा आणखीनच बायकी भासे. बापानं नाकारलेलं अन् गावानं चेष्टेचा विषय बनवलेलं लेकरू बिचारं जमेल ते पडेल ते काम करून जगायला शिकलं होतं. कुणी पैसे हातावर ठेवत तर कुणी फक्त पोटाला काही बाही देत.. तर कुणी असंच राबवून घेत.. वर कुचेष्टेने हास्यविनोद करत. पहाटेच उठून तो कुणाच्या शेतावर राबायला जाई तर कुणा घरच्या समारंभात पडेल ते काम करी. कधी रंगाऱ्याकडे तर कधी इलेक्ट्रिकल  कंत्राटदाराकडे.. अगदी तालूक्यापर्यंत जाई कारण तिथे कामाच्या संधी जास्त मिळत. रात्र झाली की पडवीत थकून भागून झोपी जाई. ते निरागस आणि बाप असूनही पोरकं झालेलं लेकरू पाहून आईचा जीव तीळतीळ तुटत असे. ती रात्री त्याच्या डोक्यावर तेल घाली जणू इतक्या लहान वयात त्याच्या डोक्याला झालेला ताप तिच्या परिने ती शांत करू पाही. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवून त्याचा मुका घेई. ती रोज त्याच्या बापाची नजर चुकवून त्याला भाजी भाकरी, ठेचा, कधी कालवण अन् भात, कधी सणावारी खीर पुरी असं काही बाही शिदोरीत बांधून देई. तेवढचं तिच्या हाती होतं. असं करत करत खंडू आता मोठा झाला होता.. तरणाबांड झाला होता. पण बोलणं चालणं वागणं बायकीच. आणि आता तर ते जास्तच ठळकपणे जाणवत असे. काबाडकष्ट करून तयार झालेलं राकट दणकट शरीर आणि आतं मन मात्र एका स्त्रीचं!! अशी विचित्र सांगड दैवानं घातली होती. एका लग्नात काम पूर्ण झाल्यावर यजमानांनी खंडूला पैश्यांबरोबरच साडी चोळी आणि बांगड्याही दिल्या. पाहुण्यांच्यात खसखस पिकली. वर यजमान मिशीला पीळ देत मर्दुमकी गाजवल्यासारखे हसले !!!! खंडूच्या जिव्हारी हा अपमान लागला परंतू गरजवंताला अक्कल नसते या नियमाने त्याने तो अपमान चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकला. परंतू ती हिरव्या रंगाची जरिकिनार असलेली साडी बघून त्याचं मन हरखून गेलं. त्या दिवशी लगोलग शेतांत जाऊन त्याने ती साडी नेसली, बांगड्या घातल्या. दाढी मिशी काढून घोटून घोटून चेहेरा गुळगुळीत केला. त्याने हात हलवून बांगड्यांचा किणकिणाट करून पाहिला. पदराशी चाळा करत स्वतःभोवती आनंदातिशयाने गिरकी घेतली. आज त्याच्या काळजांत त्याला सुख सुख जाणवत होतं. त्या साडी चोळीत त्याच्यातलं स्त्रीपण त्याला दृश्य स्वरूपात सापडलं होतं. त्याची मनीषा पूर्ण झाल्यासारखी त्याला वाटत होती. स्त्रीसुलभ भावना अधिकचं जागृत झाल्या होत्या. काय करेल बिचारा.. खंडोबाने त्याच्या आयुष्याचा पुरता खेळखंडोबा करून ठेवला होता. निसर्गानं केलेली चूक आयुष्यभर भोगायची होती त्याला. हा जो काय वणवा दैवानं त्याच्याभोवती आणि त्याच्या आतं पेटवला होता तो कसा विझवणार होता तो? चापून चोपून साडी नेसल्यावर आरश्याच्या फुटक्या तुकड्यांत स्वतःला पाहून तो अपरिमित खूश झाला. पण त्याला माहीत नव्हतं की त्या आरशाच्या फुटक्या तुकड्यासारखंच त्याचं नशीबही फुटकंच आहे ते. काही गोष्टी वगळल्या तर तो त्याच्या जगात खूश होता. काळोख झाल्यावर; नेसलेली साडी आईला दाखवायला तो मोठ्या कौतुकानं मागच्या दाराने घरी गेला. आईने त्याला ओळखलच नाही. त्याने बोलायला तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडून आई म्हणून हाक ऐकताच ती माऊली त्याचं ते रूप बघून जी बेशुद्ध पडली ती परत उठलीच नाही. साडी चोळी आणि बांगड्यांनी डाव साधला होता!! खंडू उर फुटेस्तोवर रडला त्या दिवशी आणि त्या दिवसापासून तो वेशीवरच्या खंडोबाच्या देवळात कायमचा वस्तीला गेला. ज्याच्या नवसाने जन्माला आलो त्यांनाच आता माझी काळजी घ्यावी असंच जणू त्याला म्हणायचं होतं.

इकडे सुगंधाही मोठीं झाली होती. सुगंधा त्याला अहो खंडूदादा म्हणायची. मान द्यायची, मोठेपणा द्यायची जो त्याला कुठेही मिळत नव्हता. दोघांच्या हृदयात एकमेकांबद्दल अपार प्रेम होतं. त्याच्या आईनंतर जर कुणी त्याला प्रेम दिलं असेल तर ती फक्त सुगंधाचं होती. लहान लेकराला लिंगभेद समजत नसतो. त्याला कळतो तो फक्त स्पर्श.. प्रेमाचा स्पर्श.. आवाजातला ओलावा.. मग तो हात किंवा आवाज कुणाचाही असो स्त्री, पुरुष, किंवा किंवा खंडूसारखं कुणी !!! खंडू ज्या प्रेमाने तिला लहानपणी सांभाळी ते प्रेम अन् ती मायाचं त्या दोघातला घट्ट दुवा बनली होती. त्याचा अतिशय लळा होता तिला. अगदी तिच्या बाबांना तो आवडत नसला तरीही. आणि आज तिच्या हळदीच्या प्रसंगाला म्हणूनच तो तिच्या घरी आला होता. तिने लग्न होईपर्यंत तिथेच रहाण्यास त्याला बजावले होते आणि बाबांच्याही गळी उतरवले होते. खंडूने आल्या आल्या सांगून टाकले होते की तो सुगंधाची पाठराखीण म्हणून लग्न झाल्यावर तिच्या सासरी जाऊन महिनाभर तरी रहाणार आहे म्हणून. सुगंधाच्या बाबांना हे ऐकून चक्करच यायची बाकी होती. पण सुगंधाच्या आईने खाणाखुणा करून त्यांना म्हंटल असू दे हो. हो म्हणा आत्तापुरतं. नंतर सुगंधानी समजावल की ऐकेल तो. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर त्यानेही मोठ्या प्रेमाने सुगंधाला हळद लावली. तिच्याकडे पाहून त्याचे डोळे झरू लागले. बाकीच्या बायका हळद लावायला रांगेत उभ्या होत्या म्हणून रडणं आवरत तो बाजूला झाला.

– क्रमश: भाग पहिला 

लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ४ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ४ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले – महामूद आणखी जोर लावत म्हणाला, ‘वकील साहेब टेबल –खुर्चीवर बसतील. तुझा चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार?‘

या तर्काने सम्मी आणि नूरेच्या जसा जीवात जीव आला. किती योग्य बोललाय पठ्ठ्या! चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘ आता इथून पुढे )

हमीदला यावर पटकन उत्तर सुचलं नाही. त्याने गडबबड गोंधळ करत म्हंटलं’ माझा चिमटा स्वयंपाकघरात नाही पडून रहाणार. तो वकीलसाहेबांच्या खुर्चीवर बसेल. जाऊन त्यांना जमिनीवर पाडेल. आणि त्यांचा कायदा त्यांच्याच पोटात घालेल. ‘

इतरांना पुढे बोलणं काही जमलं नाही. चांगली शिवीगाळ झाली.पण कायदा पोटात घालण्याची गोष्ट भाव खाऊन गेली. अशी भाव खाऊन गेली की तिघेही योद्धे तोंड बघू लागलेज्सन काही आठ आण्याचा मोठा पतंग एखाद्या साध्याशा पाटांगाला काटून गेलाय. कायदा ही तोंडातून बाहेर येणारी गोष्ट आहे. ती पोटात घालण्यात विसंगती असली तरी त्यात काही तरी नावीन्य होतं. हमीदने मैदान मारलं. त्याचा चिमटा रुस्तुमे – हिंद आहे, याबद्दल सम्मी, नूरे मोहसीन, महामूद यांची खात्रीच झाली. विजेत्याला हरणार्‍यांकडून जो सन्मान मिळणं अपेक्षित असतं, तो हमीदला मिळाला॰ इतरांनी तीन तीन –चार चार आणे खर्च केले, पण कोणती कामाची गोष्ट आणू शकले नाहीत. हमीदने तीन पैशात रंग जमवला. खरच आहे! खेळणी तुटून फुटून जातील. त्यांचा काय भरवसा? हमीदचा चिमटा वर्षानुवर्षे टिकून राहील.

तडजोडीच्या अटी तयार होऊ लागल्या. मोहसीन म्हणाला, जरा तुझा चिमटा दे. आम्ही पण बघतो. तू माझा पाणक्या घेऊन बघ.‘

महामूद आणि नूरेनेही आपापली  खेळणी दिली.

हमीदला ही अट स्वीकारण्यात काही अडचण वाटली नाही. चिमटा आळीपाळीने सगळ्यांच्या हातात गेला. त्यांची खेळणी आळीपाळीने हमीदकडे आली. किती सुरेख खेळणी आहेत!

हमीदने हरणार्‍यांचे अश्रू पुसले. ‘मी तुम्हाला चिडवत होतो. खरं म्हणजे लोखंडाचा चिमटा काय या खेळण्यांची बरोबरी करणार. मला वाटत होतं, आता म्हणाल…. मग म्हणाल ….’

पण मोहसीनच्या पार्टीला या दिलाशाने संतोष झाला नाही. चिमाट्याचा शिक्का पक्का बसला. चिकटलेलं तिकीट आता पाण्याने निघणार नाही.

मोहसीन म्हणाला, ‘पण या खेळण्यांसाठी कोणी आम्हाला दुआ ( आशीर्वाद) देणार नाही.

महामूद म्हणाला, ‘दुआ जाऊ देत, उलटा मार पडला नाही, म्हणजे मिळवलं. अम्मा म्हणेल, ‘जत्रेत तुला मातीचीच खेळणी मिळाली का?

हमीदला ही गोष्ट मान्य करावीच लागली. चिमटा पाहून त्याची दादी जितकी खूश होईल, तितकी या मुलांची खेळणी बघून कोणीच खूश होणार नाही. तीन पैशातच त्याला सगळं काही करायचं होतं आणि त्याने पैशाचा जो उपयोग केला, त्यात पश्चात्तापाची मुळीच गरज नव्हती. आता तो चिमटा रुस्तुमे-हिंद होता आणि सगळ्या खेळण्यांचा बादशहा होता.

रस्त्यात महमूदला भूक लागली.त्याच्या बापाने केळ खायला दिलं. महमूदने केवळ हमीदला भागीदार बनवलं. त्याचे बाकीचे मित्र तोंड बघत बसले. हा त्या चिमाट्याचा परिणाम होता.

अकरा वाजले. सगळ्या गावात गडबड सुरू झाली. मेळेवाले आले. …. मेळेवाले आले… मोहसींच्या छोट्या बहिणीने पळत येऊन पाणक्या त्याच्या हातातून ओढून घेतला. खुशीने टी उद्या मारू आगळी. , तर तो पाणक्या हाली कोसळला आणि स्वर्गलोकात पोहोचला. यावर भावा-बहिणीच्यात खूप मारामारी झाली. दोघेही खूप रडली. त्यांची अम्मा हा आरडाओरडा ऐकून खूप चिडली आणीदोघांनाही दोन दोन थपड्या लगावल्या.

नूरेच्या वकिलाचा अंत त्याला साजेशा प्रतिष्ठेने अधीक गौरवपूर्ण रीतीने झाला. वकील जमिनीवर किंवा कोनाड्यात बसू शकत नाही. त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा. भिंतीत दोन खुंटया मारल्या गेल्या. त्यावर एक लाकडी फळी ठेवली गेली. त्यावर कागदाचा गालीचा  घातला गेला. वकीलसाहेब राजा भोजाप्रमाणे सिंहासनावर विराजमान झाले. नूरे त्यांना पंख्याने वारा घालू लागला. न्यायालयात वाळ्याचे पडदे आणि विजेचे पंखे असतात. इथे साधा पंखा तरी नको? कायद्याची गर्मी डोक्यावर चढेल की नाही?  नूरे त्यांना वारा घालू लागला. पंख्याच्या वार्‍याने की, त्याच्या स्पर्शाने वकीलसाहेब स्वर्गलोकातून मृत्यूलोकात आले आणि त्यांचा मातीचा अंगरखा मातीत मिळाला.मग जोरजोरात मृत्यूशोक झाला आणि वकीलसाहेबांच्या अस्थी उकिरड्यावर टाकल्या गेल्या.

आता राहिला महमूदचा शिपाई. त्याला लगेचच गावाचा पहारा देण्याचा चार्ज मिळाला, पण पोलीस शिपाई ही काही साधारण व्यक्ती नाही. ती आपल्या पायांनी काशी चालणार?तो पालखीतून जाणार. एक टोपली आणण्यात आली. त्यात फाटक्या-तुटक्या चिंध्या घालण्यात आल्या. त्यात शिपाईसाहेब आरामात पहुडले. नूरेने ही टोपली उचलली आणि आपल्या दाराशी चकरा मारू लागला. त्याचे दोन्ही छोटे भाऊ ‘छोनेवाले जागते लहो’ पुकारत दोन्ही बाजूने चालले. पण पहारा द्यायचा म्हणजे रात्रीचा अंधार पाहिजे. महमूदला ठोकर लागते. टोपली त्याच्या हातातून सुटते आणि खाली पडते. मियाँ शिपाई आपली बंदूक घेऊन जमिनीवर येतात. त्यांचा एक पाय तुटतो. महमूदला आठवलं की, तो चांगला डॉक्टर आहे. त्याला मलम मिळालं. आता तो तुटलेली टांग लगेचच जोडून टाकेल. केवळ उंबराचं दूध हवं. उंबराचं दूध येतं. पाय जोडण्यात येतो, पण शिपायाला उभं करताच पाय डोलू लागतो. शल्यक्रिया असफल झाली. मग त्याचा दुसरा पायही मोडण्यात येतो. आता निदान एका जागीतो आरामात बसू तरी शकेल. एका पायाने तो बसू शकत नव्हता, चालूही शकत नव्हता. आता तो शिपाई संन्याशी झालाय. आपल्या जागी बसल्या बसल्या पहारा देतोय. कधी कधी तो देवता बनतो. त्याच्या डोक्यावरचा झालरदार साफा आता खरवडून काढून टाकलाय. आता त्याचं हव्या त्या प्रकारे रूपांतर करणं शक्य होतं. कधी कधी त्याच्याकडून वरवंट्याचंसुद्धा काम करून घेतलं जातं.

आता मीयाँ हमीदची परिस्थिती काय झाली, ते ऐका. अमीना त्याचा आवाज ऐकताच पळत पळत बाहेर आली आणि त्याला कडेवर ऊचलून त्याच्यावर प्रेम करू लागली. सहजच त्याच्या हातात चिमटा तिने पाहिला आणि ती चकित झाली.

‘हा चिमटा कुठे होता?’

‘मी तो विकत आणलाय.’

‘किती पैशाला?’

‘तीन पैसे दिले.’

अमीनाने छाती बडावून घेतली. हा कसला मुलगा आहे. असमंजस. दोन प्रहार होत आले. काही खाल्लं नाही प्याला नाही.आणलं काय , तर हा चिमटा. सगळ्या जत्रेत तुला आणखी काही मिळालं नाही, हा लोखंडाचा चिमटा उचलून आणलास ते?

हमीदने अपराधी स्वरात म्हंटलं, ‘तुझी बोटं तव्यामुळे भाजत होती ना, म्हणून मी हा चिमटा आणला.

म्हातारीचा राग लगेच मायेत बदलला. आणि स्नेहदेखील असा तसा नाही, जो प्रगल्भ असतो आणि आपली सारी तीव्रता शब्दातून विखरून टाकतो. हा मूक स्नेह होता. खूप ठोस, रस आणि स्वादाने भरलेला. मुलामध्ये किती त्याग, किती सद्भाव आणि किती विवेक आहे. इतरांना खेळणी घेताना आणि मिठाई खताना बघून त्याचं मन किती लालचावलं असेल! इतका संयम, इतकी सहनशीलता त्याच्याकडे आली कुठून? तिथेदेखील त्याला आपल्या म्हातार्‍या आजीची आठवण झाली. अमीनाचं मन गदगदून गेलं.

आणि आता एक अगदी विचत्र गोष्ट घडली. हमीदच्या या चिमाट्यापेक्षाही विचत्र. छोट्या हमीदने म्हातार्‍या हमीदचा पार्ट खेळला होता आणि म्हातारी अमिना बालिका अमीना झाली होती. ती रडू लागली. पदर पसरून हमीदसाठी आशीर्वाद मागत होती आणि अश्रूंचे मोठे मोठे थेंब बरसू लागली होती.  हमीदला याचे रहस्य काय कळणार?

 – समाप्त –  

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले – चिमटा किती कामाचा आहे. रोटया तव्यावरून काढा. चुलीत शेका . कुणी विस्तव मागायला आलं, तर झटपट निखारा चुलीतून काढूनं त्याला द्या. अम्माला कुठे फुरसत आहे की बाजारात जाऊन चिमटा आणावा आणि इतके पैसे तरी मिळतात कुठे? रोज बिचारी हात भाजून घेते. आता इथून पुढे )

हमीदचे मित्र पुढे गेले. पाणपोईवर सगळे जण सरबत पिताहेत.  हमीदच्या मनात येतय , किती लालची आहेत सगळेजण. इतकी मिठाई खाल्ली, मला एवढीसुद्धा कुणी दिली नाही. त्यावर आणि म्हणतात, माझ्याबरोबर खेळ. माझं हे काम कर. आता कुणी काही काम सांगितलं तर म्हणेन, मिठाई खा. आपलं तोंड सडवून घ्या. फोड येतील. जीभ चटोर बनेल. मग ते घरातले पैसे चोरतील. आणी सापडले की मार खातील. पुस्तकात खोट्या गोष्टी थोड्याच लिहिल्या आहेत. माझी जीभ का खाराब होईल? चिमटा बघताच आम्मा पळत पळत येऊन माझ्या हातातून चिमटा काढून घेईल, म्हणेल, माझं बाळ ते. आम्मासाठी चिमटा घेऊन आलाय.‘ हजारो आशीर्वाद देईल. शेजारच्या बायकांना  दाखवेल. सगळ्या गावात चर्चा होईल. ‘हमीदने चिमटा आणला. किती चांगला मुलगा आहे. या लोकांच्या खेळण्याचं कोण कौतुक करणार? मोठ्यां लोकांच्या प्रार्थना थेट अल्लाहच्या दरबारात पोचतात॰ आणि त्या लगेच ऐकल्या जातात. माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणूम, मोहसीन आणि महमूद मिजास दाखवतात. खेळू देत खेळण्यांशी. आणि खाऊ देत मिठाई. मी खेळण्यांशी नाही खेळत. मग कुणाची मिजास का सहन करू? मी गरीब आहे पण कुणाकडे काही मागायला तर जात नाही ना! कधी ना कधी तरी आब्बाजान येतीलच. अम्मासुद्धा येईल. मग त्या लोकांना विचारेन, किती खेळणी घ्याल? एकेकाला एकेक टोपलीभर खेळणी देईन आणि दाखवेन, मित्रांबरोबर कसं वागायचं असतं. असं नाही की एक पैशाची रेवडी घेतली, तर दुसर्‍याला चिडवून  चिडवून एकट्याने खावी. सगळेच्या सगळे खूप हसतील. की हमीदने चिमटा घेतलाय. हसूदेत बापडे. त्याने दुकानदाराला विचारलं, ’हा चिमटा केवढ्याला आहे? ‘ 

 दुकानदाराने त्याच्याकडे पाहीलं. त्याच्याबारोबर दुसरं कुणी मोठं माणूस नाही, असं पाहून तो म्हणाला, ‘ही गोष्ट तुझ्या कामाची नाही.’

‘विकायचा आहे की नाही?’

‘विकायचे का नाहीत? मग हे आणलेत कशला?’

‘मग सांगत का नाही, केवढ्याला आहे?’

‘सहा पैसे लागतील.’

हमीद हिरमुसला. ‘नक्की सांग. ‘

‘‘नक्की पाच पैसे पडतील. हवा तर घे. नाही तर चालू लाग.’

हमीदने काळीज घट्ट कारत विचारलं,’ तीन पैशाला देणार?’

असं बोलता बोलता तो पुढे निघाला. उगीच दुकानदाराच्या शिव्या ऐकायला नकोत. पण दुकानदाराने शिव्या दिल्या नाहीत. बोलावून चिमटा दिला. हमीदने तो खांद्यावर अशा तर्‍हेनेने ठेवला, जशी काही बंदूकच आहे. आणि मोठ्या ऐटीत तो मित्रांजवळ आला. जरा ऐकूयात तरी सगळे कशी टीका करताहेत.

मोहसीन म्हणाला, ‘हा चिमटा का आणलास ? वेड्या. याचं काय करणार? ‘

हमीदने आपला चिमटा जमिनीवर आपटत म्हंटलं, जरा आळ पाणक्या जमिनीवर पाड. सगळा चुराडा  होऊन जाईल. बच्चू .’

महमूदनं म्हंटलं, ‘ हा चिमटा काय खेळणं आहे?’

त्यावर हमीदचं म्हणणं, ‘खेळणं का नाही? आता खांद्यावर ठेवला बंदूक झाली. हातात घेतला, फकिरांचा चिमटा झाला. मनात आलं, तर चिपळ्यांचं काम करू शकतो. एक चिमटा घेतला, तर तुमच्या सगळ्या खेळण्यांचा जीव जाईल.तुमच्या खेळण्यांनी कितीही जोर केला, तरी ते माझ्या चिमाट्याचा केसही वाकडा करू शकत नाहीत. माझा चिमटा बहादूर आहे. वाघा आहे वाघ! ‘

सम्मीने खंजिरी घेतली होती. तो प्रभावित होऊन म्हणाला, ‘माझ्या खंजिरीबरोबर बदलशील. दोन आण्याची आहे.’

हमीदने खंजिरीकडे उपेक्षेच्या भावाने पाहिले. ‘माझा चिमटा मनात आलं, तर तुझ्या खंजिरीचं पोट फोडू शकेल. एक चामड्याचा पडदा काय लावला, ढबढब बोलायला लागली. जरासं पाणी लागलं की संपून जाणार. माझा बहादूर चिमटा आगीत, पाण्यात, वादळात डळमळीत होत नाही. स्थिरपणे उभा रहातो.

चिमाट्याने सगळ्यांना मोहित केलं,पण आता पैसे कुणाकडे होते? आणि आता सगळे जत्रेपासून दूर आले होते. नऊ कधीच वाजून गेले होते. ऊन कडक होऊ लागलं होतं.घरी पोहोचायची गडबड झाली होती. बापापाशी हट्ट धरला, तरी चिमटा मिळणं शक्य नव्हतं. हमीद मोठा चालाह आहे. यासाठी त्याने पैसे वाचवून ठेवले होते.

मुलांच्यात दोन गत झाले. सममी, नूरे, मोहसीन, म्हमूद एका बाजूला. आणि हमीद एकटा एका बाजूला. शास्त्रार्थ चालू होता. सम्मी विधर्मी झाला. तो दुसर्‍या पक्षाला जाऊन मिळाला. पण मोहसीन , महमूद आणि नूरे हमीदपेक्षा एक – एक, दोन –दोन वर्षांनी मोते असूनही हमीदच्या आघातांनी आतंकीत होऊन उठत होते. त्याच्याजवळ न्यायाचं बाल आहे आणि नीतीची शक्ती . एका बाजूला माती आहे. दुसर्‍या बाजूला आया बलवा म्हणवणारं लोखंड. ते अजेय आहे. घटक आहे. एखादा वाघ आला, तर पाणक्याचा धीर सुटेल. मियाँ शिपाई मातीचे बंदूक टाकून पळून जाईल. वकीलसाहेबांची घाबरगुंडी उडेल. तो आपल्या कोतात तोंड लपवून जमिनीवर पडेल. पण हा चीयता हा  बहादूर, हा रुस्तुमे-हिंद झटकन वाघाच्या  मानेवर स्वर होऊन, त्याचे डोळे फोडेल.

मोहसीनने सारा जोर पणाला लावू म्हंटलं, ‘पण पानी टीआर नाही न भरू शकणार?

हमीदने चिमटा सरल उभा धरत म्हंटलं, ‘ पाणक्यावर जर जोरात ओरडलं, तर तो पळत जाऊन पाणी आणेल, आणि त्याच्या दारात शिंपडेल.

मोहसीन परास्त झाला, पण महामूद त्याच्या मदतीला आला, ‘ जर मळगा पकडला गेला आणि कोर्टात हात बांधून फिरायला लागला, तर वकिलसाहेबांच्याच पायाशी लोळण घेणार ना!’ या प्रबळ तर्काचं उत्तर हमीद देऊ शकला नाही. त्याने विचारले, ‘पण आम्हाला पकडायला कोण येणार? नूरे ऐटीत म्हणाला, ‘हा शिपाई बंदूकवाला॰

हमीदने चिडवत म्हंटलं, ‘हा बिचारा आमच्या रुस्तुमे – हिंदला पकडणार? बरं आण. दोघांच्यात कुस्ती होऊ दे. याचा चेहरा बघून दूर पळून जाईल. पकडणार काय बिचारा.’

मोहसीनला एक नवा मुद्दा सुचला. ‘तूहया चिमाट्याचा तोंड रोज आगीत जळेल. ‘

त्याला वाटलं होतं, हमीद निरुतर होई. पण तसं झालं नाही. हमीद ताबडतोब म्हणाला, ‘जे बहादूर असतात, तेच आगीत उडी घेतात. तुमचा तो वकील, शिपाई, आणि पाणक्या बायकांप्रमाणे घरात घुसतील. आगीत उडी घेणं म्हणजे असं काम आहे, जे रुस्तुमे- हिंदच करू

महामूद आणखी जोर लावत म्हणाला, ‘वकील साहेब टेबल –खुर्चीवर बसतील. तुझा चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘

या तर्काने सम्मी आणि नूरेच्या जसा जीवात जीव आला. किती योग्य बोललाय पठ्ठ्या! चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘

  ईदगाह  क्रमश: भाग ३ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print