सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ ‘लिव्ह – इन…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
सुमनमावशी बाहेर व्हरांड्यात मोबाईलवर बोलत होत्या. बेलचा आवाज आला, म्हणून त्या कुठल्या रूमची बेल वाजली हे बघायला वळल्या, तेवढ्यात ते काका त्यांच्याकडेच येताना दिसले.
“पॉट द्यायचा होता जरा पेशंटला “, ते म्हणाले आणि व्हरांड्यात थांबले.
“हो हो”, म्हणत मावशी लगबगीने तिकडे गेल्या. नंतर मावशी खोलीबाहेर आल्या आणि काकांना आत जायला त्यांनी खुणावलं. एवढ्यात बहुतेक त्यांचा मुलगा आणि नात आले. ” बाबा, आईचा नाश्ता झालाय ना? तुम्ही हा गरम गरम उपमा खाऊन घ्या. आज जरा उशीरच झाला मला. ही छकुली पण लवकर उठून बसली आज. मग तिच्यामुळे सविताला कामं आवरायला वेळ झाला थोडा.” तो म्हणाला.
“अरे, असू दे. तुमची धावपळ मला कळत नाही का?;शिवाय सविता सकाळी सहाला उठून इथून घरी जाते. त्यानंतर सगळं करणार ना?” काका म्हणाले.
आत्ताच ज्यांना पाॅट द्यायला त्या गेल्या होत्या, त्या सिंधुताईंचे हे मिस्टर आणि हा मुलगा असावा, असा सुमनताईंचा अंदाज ! सिंधुताईंना कंपवाताचा त्रास होता. मेंदूला रक्तपुरवठा नीट न झाल्याने, या आजारात स्नायू कडक, शिथील होतात. माणसाला शरीराचा तोल सांभाळता येत नाही. ‘डोपामाईन’, सारख्या गोळ्यांनी थोडा आजार नियंत्रित होतो. पण गोळीचा परिणाम पाच-सहा तासच टिकतो. आणि गोळीचा प्रभाव कमी होऊ लागला की पेशंटचे हाता-पायाचे स्नायू आपली लवचिकता घालवून बसतात.
पहाटे बाथरूमला जाताना सिंधूताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. त्या तोल जाऊन पडल्या. कमरेच्या डाव्या बाजूचं हाड मोडलं. डोक्याला खोक पडल्यामुळे पाच टाके घालावे लागले. हातालाही मुकामार लागला होता. पण त्यांची घरची माणसं अगदी प्रेमानं करत होती त्यांचं.
सुमनमावशी गेले चार – पाच दिवस हे सगळं ऐकत होत्या, पहात होत्या. ‘ म्हातारा – म्हातारी लई नशीबवान आहेत. नाहीतर एवढं प्रेमानं करणारी मुलं आता कुठं बघायला मिळतात. सविता म्हणजे सूनच असेल. पण मनापासून करतेय वाटतं सासूचं.’
मावशीची दिवसपाळी असल्याने त्यांनी सविताला पाहिलेलं नव्हतं. एक-दोनदा बाजूच्या दुसर्या पेशंटचं करत असताना त्यांची सहज नजर गेली, तेव्हा तो मुलगा आपल्या आईच्या अंगावरून हात फिरवत, तिला रात्री झोप नीट झाली का, विचारत होता. तीन-साडेतीन वर्षांची नात, तिच्या आजीजवळ काॅटवर बसण्याचा हट्ट करत होती.
दुसर्या दिवशी दुपारी काका त्यांना म्हणाले, ” मावशी जरा खाली जाऊन मी हिची औषधं घेऊन येतो. तोवर जरा हिच्याजवळ थांबता का?”
मग सुमनमावशींना आयती संधीच मिळाली सिंधुताईंशी गप्पा मारायची. सुमनमावशी न राहवून सिंधुताईंना म्हणाल्या, ” बाई, लय नशीबवान आहात तुम्ही ! घरची सगळी लय प्रेमानं करतात तुमचं. अवो या करोनानंतर तर माणसं येकदम दूर दूरच राहायला लागलीत आजाऱ्यापास्नं. रोज बघतोय न्हवं का आम्ही हिथं !”
“खरंय, तुमचं ! पण मावशी एक सांगू का? या करोनानंतरच मला हे कुटुंब मिळालंय सगळं !”
“आँ ! काय म्हन्तासा?”
“अहो खरंच सांगते. हे सुधीरराव आणि माझे मिस्टर सुधाकर लहानपणापासून घट्ट मित्र. मिस्टरांच्या पोर्ट ट्रस्टच्या नोकरीमुळे आम्ही मुंबईकर झालो आणि सुधीरराव प्रोफेसर होऊन नागपुरातच राहिले ! आम्ही ऑफिस क्वार्टर्समध्ये रहात होतो. आमची दोन्ही मुलं शिकून – सवरून संसारात स्थिरावली. त्यांना मुंबईत घर घ्यायला ह्यांनीच फंडातून पैसे काढून दिले. त्यामुळे रिटायर झाल्यावर आमच्याकडे फारशी पुंजी नव्हती आणि क्वार्टर सोडावं लागलं त्यामुळे घरही नाही. यांच्या पेंशनमध्ये आमचं दोघांचं भागलं असतं. पण मुलांना आता आमची अडगळ नको होती त्यांच्या संसारात !…. सुधीररावांना हे कळलं तसं त्यांनी यांना मनवून नागपुरात बोलावून घेतलं. त्यांचा मोठा बंगला होता सहा खोल्यांचा. शिवाय मागच्या बाजूला चाळटाईप वनरूम कीचन बांधून चार भाडेकरू ठेवले होते. त्यांनी स्वतःच्या बंगल्यातल्या दोन स्वतंत्र खोल्या आम्हाला वापरायला दिल्या. बाजूलाच त्यांच्याकडे चार खोल्या. मधला दरवाजा उघडला तर एकच मोठं घर. त्यांच्या बायकोशी माझी मैत्री आधीच झाली होती. त्यांना एकच मुलगा, तो अमेरिकेत स्थायिक झालाय. आई-वडिलांशी त्याचे चांगले संबंध ! पण इथलं राजकारण आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे त्याला इकडे परत यायचं नाहिये. तो यांनाच तिकडे बोलावत होता पण यांना जायचं नव्हतं.”
“आम्ही इकडे राहायला आलो आणि तीनच वर्षांंनंतर सुधीररावांची बायको वारली, ब्रेन हॅमरेजनं. त्यानंतर मग आम्ही तिघे एकत्रच राहात होतो म्हणाना ! फक्त झोपायला वेगळ्या रूममध्ये. सात-आठ वर्षांपूर्वी मला पार्किन्सनचा त्रास सुरू झाला. पण घरातलं स्वैपाकपाणी मी करू शकत होते. बाकी कामाला बाई ठेवली होतीच.”
“२०२० उजाडलं आणि फेब्रुवारी २०२० मध्ये माझ्या मिस्टरांना कोरोनानं गाठलं. खरंतर त्यांना नक्की काय झालंय हे डॉक्टरना कळण्याआधीच ते गेले. एकाच घरात राहणाऱ्या, मी आणि सुधीररावांची परिस्थिती फार विचित्र झाली होती… हा मुलगा दिनेश मागच्या चाळीत राहायला आला २०१८ मध्ये. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करून एकीकडे शिकत होता काॅमर्सला ! अडल्या वेळी सगळ्यांना मदतीला तयार असायचा. याचे आई-वडील आणि मोठा भाऊ, लांब गोंदियाजवळ होते राहायला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वडील गेले. तीनच महिन्यात भाऊही गेला. आणि त्या धक्क्याने आईचा हार्टफेल झाला. हा तर लाॅकडाऊनमुळे इकडेच अडकलेला. कामधंदाही बंद. अगदी वेडापिसा झाला होता. त्याचं सगळं कुटुंबच हरवलं ना ! त्याला माणसात आणायला आम्ही काय काय केलं ते आम्हालाच माहीत.”
“सविता, डी. एड. झालेली. सावत्र आईच्या जाचाला कंटाळून नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी शोधत होती. इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आमच्या चाळीत मैत्रिणीकडे नागपुरात आली आणि लाॅकडाऊनमुळे इकडेच अडकली. मैत्रिणीचा नवरा शिक्षक प्रायव्हेट स्कूलमध्ये. शाळा बंद झाल्या. पगार नाही, जागा लहान. ते तरी हिला किती दिवस ठेवून घेणार? पैसे तर हिच्याकडेही फारसे नव्हतेच. जेमतेम परतीच्या प्रवासाएवढे. ती दोघंही पाॅझिटिव म्हणून सरकारी केंद्रात भरती झाली. ही निगेटिव्ह पण होम क्वारंटाईन ! आम्हीच डबा देत होतो तिला. बंगल्यात वर्षभराचं धान्य भरलेलं होतं म्हणून निभावलं कसंतरी !
ही छोटी जुई, दीड वर्षांची आणि तिचे आई-वडील आणि आजी तिघेही कोरोनानं गिळले. तेही मागच्या चाळीतच राहणारे. तिला सवितानंच सांभाळलं. जुईचा एकच काका. तो दुबईत. मागच्या वर्षी तो भारतात आला. पैशाचा प्राॅब्लेम नसला तरी तो काही पुतणीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. “
“माझी तब्येतही खूप बिघडली. महिनाभर बिछान्यावरून उठता येत नव्हतं. त्यावेळी सविताच आमचं जेवणखाण सांभाळत होती. दिनेश बाकीची मदत करत होता. पडेल ते काम करत होता. आमचं एक कुटुंबच तयार झालं म्हणाना ! आपण कायम असंच एकत्र राहावं असं आम्हां सगळ्यांना वाटायला लागलं.
आम्ही खूप चर्चा करून निर्णय घेतला. मी आणि सुधीररावांनी सोय म्हणून रजिस्टर विवाह केला. अर्थात त्यांच्या मुलाला विश्वासात घेऊन. सविता आणि जुईला एकमेकींचा लळा लागला होताच. कोरोना काळात सविता आणि दिनेश एकमेकांना चांगले परिचित झाले होते. दिनेश बी. काॅम झाला आणि सुधीररावांच्या ओळखीनं त्याला एका सी. ए. कडे अकाउंट असिस्टंटची नोकरी पण मिळाली. त्या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी तो स्वीकारला. सविताने तिच्या वडिलांना लग्नाविषयी कळवलं होतं, परंतु त्यांनी काहीच दखल घेतली नाही. जुईला त्यांनी दत्तक घ्यायचं ठरवलं आणि मग तिच्या काकांकडून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून घेतल्या.”
“आता आम्ही सगळे एकत्र राहतो, एकमेकांसाठी जगतो. आजी-आजोबा, मुलगा-सून आणि नात, असं परिपूर्ण कुटुंब आहे आमचं ! अशी आहे आमची ‘लिव्ह-ईन फॅमिली”, सुधीरराव म्हणाले.
“अरेच्चा, तुम्ही कधी आलात, कळलंच नाही.” सिंधुताई म्हणाल्या.
… सुमनमावशी ही सगळी कहाणी ऐकून निःशब्दच झाल्या होत्या.
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈