मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – बाईंनी कृष्णाला दाखवले -‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’ आता इथून पुढे )

बापट बाईंनी पाहिलं कृष्णा जवळ पाण्याची बाटली नव्हती. बाईंनी आपली बाटली कृष्णाला दिली.

‘‘पी हे पाणी, भरपूर पाणी प्यायला हवं, आणि वर्गात नुसतं बसून रहायचं नाही. इतर मुलांबरोबर थोडं बाहेर जायचं, बाथरुमला जाऊन यायचं, कळलं का ?’’

अस म्हणत बाईंनी डबा आवरला आणि त्या अविच्या हाताला धरुन बाहेर गेल्या. कृष्णा विचार करु लागला.

‘‘माय व्हती तवा डबा दित होती, आज खूप दिसानी चांगलं चुंगलं खायाला मिळालं, सांच्याला बाबा दमून येतो नी भाकरी बडवतो. भाजी हाटेलातून आणतो. कवातरी भात शिजवतो. मग भात आणि भाजी खायची. अस जेवण मला रोज रोज कुट मिळाया ? पोटात अन्न गेलं तर मी शिक्षण घेईन. अभ्यास करेन. पण मला मायची लय आठवण येते. किनीची पण आठवण येते. मग काय करायचं फक्त रडायचं. माय कुठं नाहीशी झाली, किनी नाहीशी झाली.’’ कृष्णाला आईच्या आणि बहिणीच्या आठवणीने गदगदुन आलं.

पाच वाजता शाळा सुटली तसा कृष्णा वर्गाबाहेर पडला. गेटच्या बाहेर पडणार एवढ्यात बापट बाई अविचा हात धरुन जवळ आल्या.

‘‘कृष्णा थांब, सोबत जाऊ. कुठं राहतोस तू?’’

‘‘रामेश्वराच्या देवळापाशी, तिथं एक चाळ हाय, तिथं र्‍हातो आमी.’’

‘‘बरं बरं, आम्ही पण त्याच बाजूला रोज जातो. मी भरडावर राहते. तुला माझं घर दाखवते. शाळेत जाताना थोडा लवकर ये. मग आपण एकदमच शाळेत जाऊ.’’

‘‘व्हयं’’ असं कृष्णा म्हणाला. वाटेतील एका बेकरीकडे थांबून बाईंनी दोन बिस्किट पुडे विकत घेतले. कृष्णाच्या हातात ते पुडे ठेवत म्हणाल्या, ‘‘बाबा किती वाजता घरी येतात?’’

‘‘लई रात झाल्यावर येतो.’’

‘‘मग तोपर्यंत काय करतोस?’’

‘‘काय न्हाई, बसून र्‍हाहतो.’’

‘‘असं बसून राहू नये कृष्णा, या पुड्यातील बिस्किटे खा आणि तिथे मुलं खेळत असतील ना तेथे खेळायला जा. उद्या मी तुला सहावीची पुस्तके आणि वह्या घेऊन देणार. रोज शाळेत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पुरा करायचा आणि मला दाखवायचा.’’

भरडावर आल्यावर बाई एका चपलाच्या दुकानाकडे थांबून त्यांनी कृष्णासाठी चप्पल घेतले. कृष्णा मनात म्हणाला – वर्गातल्या सर्वांच्या पायत चप्पल हाई पण माझ्या पायात काही नाही. आता सहावीत गेल्यावर बाईंनी चप्पल घेतलं. आता शाळंत जाताना मजा येईल.’’

भरडावर गेल्यावर बाईंनी आपले घर दाखवले. बाई म्हणाल्या –

‘‘ही सरनाईकांची चाळ, पुढं त्यांच औषधं दुकान आहे. मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं मग आपण एकदम शाळेत जायचं, कळलं ?

‘‘व्हयं’’ म्हणत कृष्णा नवीन चप्पल घालून ऐटीत घरी गेला. घरी गेल्यावर कृष्णाने पिशवी खोलीत टाकली आणि बिस्किटाचा पुडा फोडला. बिस्किटे खात खात तो नारायणाच्या देवळाजवळ आला. तिथे एक झेंडा उभा करुन खाकी हाफ पॅन्ट घातलेली मुलं झेंड्याभोवती बसली होती. मोठा दादा त्यांना गोष्ट सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्यांनी वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हटलं. तो मोठा दादा कृष्णाकडे पाहत म्हणाला –

‘‘कुठ राहतोस रे तू ?’’

‘‘इथं देवळाच्या मागं’’

‘‘बरं, नाव काय तुझं?’’

‘‘कृष्णा, कृष्णा शिंदे’’

‘‘हा. तर कृष्णा उद्या शाळा सुटली की इथं देवळापाशी ये. आमची इथे शाखा असते. ही मुले आम्ही सर्व इथं जमतो. रोज इथं यायचं.’’

‘‘हूं, येतो साहेब’’

‘‘साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं….’’

‘‘हा दादा उद्या येतो.’’

कृष्णाला कोण आनंद झाला. आज दुपारी जेवण मिळालं, चप्पल मिळाली, बिस्किट पुडा मिळाला, आणि आता हे दादा आणि सवंगडी मिळाले. कृष्णाने घरी येऊन दिवा लागला. एकच बल्ब घरात होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आता आई गेली पण पांडुरंग आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत सांगितलेला अभ्यास तो वहीत उतरवू लागला.

सकाळी लवकर उठून विहीरीवर दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. कृष्णाच्या बाबाने काल येताना पाव आणला होता. चहात पाव बुडवून खाल्यावर बाबा कामावर गेला. आणि कृष्णा नवीन चपला घालून भरडाच्या दिशेने चालू लागला. बापट बाईंच्या घरी तो बाहेर उभा राहिला. अवि बाहेरच बसला होता. अभ्यास करत होता. त्याने आईला आत जाऊन कृष्णा आल्याचे सांगितले. बापट बाई बाहेर आल्या. कृष्णाला हात धरुन आत घेतलं. पटकन आत जाऊन दोन थाळीत दोन दोन चपात्या आणि दुधाचे दोन कप बाहेर आणले. आणि कृष्णासमोर चपाती दूध ठेवून खायला सुरुवात करा असं म्हणत आपली तयारी करायला आत गेल्या. कृष्णा भिरभिरत्या नजरेने बाईंचे घर पाहत होता. बाईंचा आणि बाईंच्या नवर्‍याचा एक फोटो दिसत होता. एक कपाट होतं. त्याच्यावर रेडिओ ठेवला होता. एक कॉट होती. त्यावर गादी गुंडाळलेली दिसत होती. दोन चटया गुंडाळलेल्या होत्या. कृष्णाने असं चटपटीत घर पाहिलं नव्हतं. कृष्णाने अविकडे पाहत चपाती दुधात बुडवून खाल्ली. अविप्रमाणेच अंगणात नळावर जाऊन ताटली कप धुतला आणि घरात नेऊन ठेवला. तो पर्यंत बाईंची शाळेत जायची तयारी झाली होती. बाई, अवि आणि कृष्णा तिघेही शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई नेवाळकरांच्या दुकानात गेल्या. दुकानातून कृष्णाच्या साईजच्या दोन पॅन्टी, बनियन, दोन शर्टस् दाखवायला सांगितले. कृष्णा भिरभिरत्या नजरेने एवढं मोठं कपड्याचं दुकान पाहत होता. बाईंनी कृष्णाला कपडे घेतले आणि पुढे खंडाळेकरांच्या दुकानातून सहावीची पुस्तके एक डझन वह्या, दोन पेन, पेन्सिल, कंपासबॉक्स आणि हे सर्व ठेवण्यासाठी स्कूलबॅग विकत घेतली. कृष्णाला खूपच आनंद झाला. आपल्या बाबाला एवढी वह्या पुस्तकं घ्यायला कधीच जमली नसती याची त्याला कल्पना होती.

आता कृष्णा सर्व तासांना व्यवस्थित लक्ष देऊ लागला. सर्व तासांचे शिक्षक त्याच्यावर खूश होते. त्याचा अभ्यास चांगलाच होता. शाळा सुटली की तो बापट बाई आणि अवि बरोबर घरी जात होता. कृष्णाचा बाबा कृष्णाला म्हणाला -‘‘आरं नव चप्पल, पुस्तकं, कापडं देतं तरी कोण ?’’

कृष्णाने शाळेत बापट बाई आहेत त्यांनीच हे सर्व दिलं असं सांगितलं.

तेव्हा कृष्णाचा बाप म्हणाला, – ‘‘आरं ही बाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी समज. ती सांगल तसं वागायचं, तिला कधी तरास द्यायचा न्हाई आणि अभ्यास करायचा.’’ 

असचं एकदा शाळेतून येताना फोकांड्याच्या पिंपळाजवळ एक बासरीवाला काखेतील पिशवीत भरपूर बासर्‍या घेऊन विकायला आला होता. एक बासरी ओठांत ठेवून मधुर वाजवत होता. पिंपळावर बसलेली माणसं, जाणारी येणारी माणसं, शाळेत जाणारी येणारी मुलं त्या बासरीवाल्याकडे पाहत होती. त्याचे ते मधुर बासरी वादन ऐकत होते. कृष्णाचे आणि अविचे लक्ष त्या बासरीवाल्याकडे गेलेच. बापट बाई बरोबर चालताना ते दोघं मान मागे मागे करत परत परत त्या बासरीवाल्याकडे पाहत होते. कृष्णाची पावलं रेंगाळत आहेत हे बापट बाईंच्या लक्षात आलं. बाईंच्या मनात आलं. पोराची आई असती तर त्याने हट्ट धरुन बासरी विकत घेतली असती. बाईंच्या काळजात कालवा कालव झाली. बाईंनी मागे येत त्या बासरीवाल्याला म्हटलं –

‘‘कशी दिलीस रे बासरी ?’’

तो बासरीवाला आपल्या पिशवीतील सर्व बासर्‍या दाखवू लागल्या. बाई कृष्णाला म्हणाल्या – ‘‘कृष्णा तुला बघ कुठली आवडते यातली?’’

कृष्णा पिशवीतल्या सर्व बासर्‍या चाळू लागला. एक अत्यंत आकर्षक बासरी त्याने निवडली. तसा बासरीवाला म्हणाला – अरे वाजीव की, कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मघा बासरीवाला वाजवत होता तसा वाजवू लागला. बाईंनी बासरीवाल्याला किंमत विचारली आणि त्यांनी त्याचे पैशे दिले. अवि पण तशीच बासरी मागू लागला. बाईंनी त्या बासरीवाल्याला आणखी एक तशीच बासरी द्यायला सांगितली. पण त्या बासरीवाल्याकडे त्या पध्दतीची एकच बासरी होती. बाईंनी वेगळ्या प्रकारची एक बासरी घेतली आणि अविला दिली. त्याने अवि हिरमुसला झाला. तो एक सारखा कृष्णाच्या हातातल्या बासरीकडे पाहत होता. बाईंनी अविला डोळे वटारले आणि त्याचा हात धरत, ओढत घराकडे निघाल्या. रडत रडत अवि आई बरोबर चालला होता. कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.

क्रमश: भाग – २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

झपझप चालत बापट बाई सहावीच्या वर्गात आल्या. मुलांनी गुड मॉर्निंग मॅडम म्हणत बाईंचे स्वागत केले. बाईंनी पण गुड मॉर्निंग म्हणत मुलांना बसायला सांगितले. बाईंनी डस्टर, खडू टेबलावर ठेवले आणि मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. हा वर्ग त्यांच्या विशेष आवडीचा. गेल्यावर्षी पण पाचवीत बापट बाईच या वर्गाच्या क्लास टीचर होत्या. तोच वर्ग पाचवी पास करत सहावीत आला. सर्व मुले त्यांच्या ओळखीची. फक्त एक सोडून….

बाईंच्या कपाळावर आठी आली. या मुलाचे काय करायचे ? यंदाच दुसर्‍या शाळेतून आलेला हा मुलगा इतर मुलांमध्ये मिसळत नव्हता. अभ्यास करत नव्हता. बोलत नव्हता. गप्प राहून फक्त बघत रहायचा. बापट बाईंना कळेना या मुलाला हसता खेळता कसे करावे ? आज बापट बाई डेस्कवरुन उतरुन खाली आल्या. त्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलाला म्हणाल्या,

‘‘अरे मुला, बोल काहीतरी, नाव काय तुझे ?’’

‘‘कृष्णा, कृष्णा सदाशिव शिंदे’’

‘‘ गेल्यावर्षी कुठल्या शाळेत होतास तू?’’

‘‘देवबाग हायस्कूल’’

‘‘मग यंदा मालवणला कसा काय आलास ?’’

‘‘वडलानी तिकडंच काम सोडलं, आत्ता हिथ काम धरलयां’’

‘‘कुठ काम करतात तुझे वडिल?’’

‘‘तेलींच्या गोडावूनमध्ये हमाल हाय.’’

‘‘बरं! तू आता पुढे बसशील का ?’’

आणि कृष्णा पुढून दुसर्‍या बेंचवर बसू लागला. बाईंनी गणित शिकवायला सुरुवात केली. अधून मधुन त्यांचं कृष्णाकडे लक्ष जात होतं. कृष्णा स्थिर नजरेने पाहत होता. बाकीची मुलं वहित लिहून घेत होती कृष्णाने वही उघडली नव्हती. मध्येच बाई थांबल्या. कृष्णाला म्हणाल्या –

      ‘‘कृष्णा ! बोर्डवरचं लिहून घेत नाहीस?’’

      हु नाही की चु नाही. बाईंनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. कृष्णा तसाच बघत राहिला. बापट बाईंचा वर्ग संपला तसा कृष्णा पुन्हा शेवटच्या बाकावर बसायला गेला. मधल्या सुट्टीत बापट बाई मुख्याध्यापक सामंत सरांना भेटायला गेल्या.

‘‘सर, सहावीतील एका मुलाबद्दल बोलायचं होतं.’’

‘‘हा, कुठला मुलगा ?’’

‘‘कृष्णा शिंदे, देवबाग हायस्कूलला पाचवीत होता. यंदा सहावीत आपल्या शाळेत आला. तो काही वेगळाच आहे. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत असतो. वही उघडत नाही की पुस्तक उघडत नाही. बोर्डावरचे काही लिहून घेत नाही. इतर मुलांमध्ये मिसळत नाही. खेळायला जात नाही. काय करायचं या मुलाचं ?’’

‘‘देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी वहिनी त्याच शाळेत नोकरी करते. एक दोन दिवसात मी वहिनीची भेट घेतो आणि कृष्णाची चौकशी करतो.’’

बापट बाई गेल्या. शाळा संपवून घरी गेल्या. बाई आणि बाईंचा मुलगा अवि दोघेच मालवणात रहायचे. बाईंचे मिस्टर पुण्याला बँकेत होते. रोज सारखी बाईंची घरकामे सुरु झाली. त्यांनी देवाला निरांजन लावले. चौथीत असलेल्या अवीचा स्कॉलरशीपचा अभ्यास घेतला. बाई सर्वकाही करत होत्या पण डोळ्यासमोर होता शेवटच्या बाकावर बसलेला आणि निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा.

दोन दिवसानंतर बाई शाळेत पोहोचल्या. तेवढ्यात प्युनने सामंत सर बोलवल्याचा बाईंना निरोप दिला. बाईंनी आपली पर्स लॉकर्समध्ये ठेवली आणि त्या मुख्याध्यापकांच्या रुममध्ये गेल्या.

‘‘या बापट बाई ! तुम्ही त्या कृष्णा शिंदेची चौकशी करायला सांगितलेली ना ? माझी वहिनी देवबाग हायस्कूलमध्ये शिकवते. तिच्याकडे चौकशी केली या कृष्णा बद्दल.’’

‘‘हो का ? मग ?’’

‘‘अहो, हा कृष्णा दोन वर्ष सतत पहिल्या नंबरावर होता. अत्यंत हुशार मुलगा पण…’’

‘‘पण काय ? ’’

‘‘फार वाईट वाटते सांगायला. हे शिंदे तिकडे सातारकडचे. मासे पकडायला समुद्रात बोटी जातात ना तशा बोटीवर शिंदे कामाला होता. या बोटीवरील खलाशांचे जेवण या शिंदेची बायको म्हणजे कृष्णाची आई करायची. जेव्हा बोट किनार्‍यावर असेल तेव्हा खलाशी घरी जेवायला येत किंवा बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एका मलबारी खलाशाबरोबर कृष्णाची आई पळून गेली.’’

‘‘काय?’’ बापट बाई किंचाळत बोलल्या.

‘‘होय बाई आणि या कृष्णाला एक लहान बहिण आहे चार वर्षाची. तिला ती बरोबर घेऊन गेली. याचा बाप बिचारा रडला, भेकला पण यांना कुठे शोधणार तो ? ती दोघ केरळच्या बाजूला गेल्याची बातमी होती. त्याने ७-८ दिवस वाट पाहिली आणि बोटीवरची नोकरी सोडली आणि इथे मालवणात तेलींच्या गोडाऊनमध्ये नोकरी पकडली. या कृष्णाला घेऊन तो मालवणात आला आणि आपल्या शाळेत त्याचं नाव घातलं.’’

‘‘अरे बाप रे ! काय सोसतोय हा पोरगा.’’ बाई कळवळून म्हणाल्या.

‘‘होय बाई, कोवळ्या वयात मोठा आघात बसलाय या कृष्णावर म्हणून तो निश्चल झालाय. रोज डोळ्यासमोर असणारी आई आणि छोटी बहिण नाहीशी होणे हे किती भयानक आहे ? बाई आपण या मुलाला पुन्हा हसता खेळता करायला हवा. आणि त्याकरिता तुम्हाला त्याच्या बाई नव्हे आई व्हायला लागेल.’’

‘‘हो सर, माझ्या लक्षात आलय ते, मी प्रयत्न करणारच. येते सर !’’

बापट बाई स्टाफरुममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीत बसल्या. त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा येत राहिला. काय निष्पाप पोर हे, या वयात काय काय सोसावं लागतयं या मुलाला. बाईंना आपला चौथीतला आपला मुलगा अवी आठवला. अवी पेक्षा हा फक्त दोन वर्षांनी मोठा. या मुलाला मायेची गरज आहे. आईची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बाईंनी रुमालाने तोंड पुसले आणि इतक्यात बेल झाली तशा त्या सहावीच्या वर्गात गेल्या. नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर त्यांचे कृष्णाकडे लक्ष गेले. गेले दोन दिवस कृष्णा त्यांच्या तासाला दोन नंबरच्या बेंचवर बसत होता. बाई कृष्णा जवळ आल्या. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. बाई म्हणाल्या –

‘‘कृष्णा दाखव तुझं दप्तर, पुस्तक, वही वगैरे काही आणलेस का?’’

कृष्णा खाली मान घालून गप्प बसून होता. बाईंनी त्याचे दप्तर पाहिले. दप्तरात पाचवीची एक वही होती आणि एक जुनं पेन होतं.

‘‘अरे आता तू सहावीत आहेस बाळा ! सहावीची पुस्तकं-वह्या घेतली नाहीस का ?’’

‘‘नाही.’’

‘‘ठिक आहे, तो पर्यंत या राहूलच्या पुस्तकात बघ, उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करुया.’’ अस म्हणत बाई पटकन स्टाफरुममध्ये गेल्या आणि एक वही आणि एक पेन घेऊन आल्या.

‘‘कृष्णा, ही वही घे आणि पेन. आता मी बोर्डवर लिहीते ते वहीमध्ये लिही मग मी तुझी वही तपासणार’’असं म्हणत बाई गणित शिकवू लागल्या. त्यांच लक्ष होतं. कृष्णा बोर्डावरचे लिहून घेत होता. शिकवता शिकवता बाई डायसवरुन खाली आल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीत लिहित होता. बाईंनी पाहिले कृष्णाचे अक्षर मोत्यासारखे होते. लिहिण्यात टापटिपी होती. भूमितीची पदे व्यवस्थित एकाखाली एक लिहिली होती. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सर्व मुलांना कौतुकाने दाखवली.

‘‘बघा मुलांनो, या कृष्णाची वही पहा. काय टापटिप आहे. अक्षर मोत्यासारखं आहे. बघा !’’

मुलं पाहू लागली. एवढ्या दिवसात हा बावळट वाटणार्‍या मुलाबद्दल त्यांनाही कौतुक वाटू लागलं. मुलांची कृष्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कृष्णापण खुश झाला. या नवीन शाळेत त्याच्या कोणी ओळखीचे नव्हते. वर्ग संपला तशा बापट बाई वर्गाबाहेर गेल्या. पण नवीन तास घेणार्‍या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत होत्या. अस करता करता सर्वच शिक्षकांमध्ये कृष्णाबद्दल चर्चा होत गेली आणि सर्वजण त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले.

मधल्या सुट्टीत वर्गातील सर्व मुले आपआपले डबे घेऊन बाहेर पडले. एकटा कृष्णा वर्गात बसून होता. एवढ्यात बापट बाई डबा आणि त्यांचा चौथीत शिकणारा मुलगा अवि याचा हात धरुन वर्गात आल्या. आणि एकट्या बसलेल्या कृष्णाकडे पाहून म्हणाल्या –

‘‘कृष्णा ! डब्यातून काही आणलसं का रे ?’’

कृष्णाने मान हलवली. बापट बाईंनी पाहिले कृष्णाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

‘‘हरकत नाही. हा बघ माझा मुलगा अवि. हा चौथीत आहे. चला आपण डबा खाऊ. कृष्णा या अविसोबत बाहेर जा. हातपाय धुवून या तो पर्यंत मी डबा उघडते. अविने कृष्णाचा हात पकडला आणि ते दोघे बाथरुममध्ये गेले. तो पर्यंत बाईंनी आपला आणि अविचा डबा उघडला आणि दोन डब्याचे तीन डबे केले. कृष्णाला जास्त जेवण ठेवलं. दोघेही येताच त्यांच्या हातात एक-एक डबा दिला आणि आपल्या हातात एक डबा घेतला. कृष्णा डब्यातले अन्न खायला संकोचू लागला तेव्हा बाई ओरडल्या.

‘‘कृष्णा आता मी रागवेन. झटपट डबा संपवायचा. मला पुन्हा पुढल्या तासाला जायचयं.’’तसा कृष्णा डब्यातली चपाती भाजी खाऊ लागला. अविला नेहमीची सवय होतीच. त्यामुळे त्याने झटपट डबा संपवला. बाईंनी कृष्णाला दाखवले –

‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’

क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… – भाग -२ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पाणी… – भाग -२ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहिले – त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं. – आता इथून पुढे)

“आबा पाणी” नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला

” दादू आता घोट घोट पाणी पी रे भाऊ.नंतर कुठंबी पाणी मिळायचं नाही”

नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली.घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली.त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली.देवबाने कपाळावर हात मारुन घेतला.खरं म्हणजे त्यांना पाणी पितांना पाहून त्यालासुध्दा पाणी प्यायची तिव्र इच्छा होत होती.पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.

शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला.”गरमागरम  कचोरी,दसमें तीन,दसमे तीन” त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला.पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चुप बसला.

” आबा मले कचोरी “नात म्हणाली.आता नातू चुप थोडीच बसणार होता.

“आबा मलेबी कचोरी”

कचोरीवाला आला तसं देवबाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या .तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या.तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.

“आबा कचोरी” तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं.त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.

” दादूला देजो बेटा.नाहीतर तुमी दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा” कचोरी परत करत देवबा म्हणाला.पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं.नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतांना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.

गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला.खुमगांव बुर्ती गेलं तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली.एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता.त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.

“देरे दादा थोडं पाणी,पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं.देरे दादा,देवं माय.लई पुण्य मिळेल दादा”

भिकारीण गयावया करत होती.लोकांसमोर हात पसरत होती.

देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं,कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना.उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते.आणि तेही चुकीचं नव्हतं.या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतांना कोणं त्या भिकारणीला पाणी देणार होतं?

” बाबा दे रे पाणी पोऱ्याले” ती भिकारीण देवबाकडे पहात म्हणाली.देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना.न रहावून त्याने पिशवीतली बाटली काढली.पण हाय रे दैवा.बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती.ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात “पानी बोतल”चा आवाज डब्यात घुमला.आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.

“कित्येकी है बोतल?”देवबाने विचारलं

” पच्चीसकी”

“बाहर तो बीस की मिलती”

” स्टेशनपे मिलती होगी,गाडीमें पच्चीसकी है.दू?”

देवबा अडखळला.पंचवीस रुपये जास्तच होते.लोकांना लुटणाऱ्या पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला.भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं.तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं.भिकारणीच्या उजव्या बाजुला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती.तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता.त्याने निर्णय घेतला.

” दो.एक दो”खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली.पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली.तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली.तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं.देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.

” आबा आपल्यालेबी बाटली घेजो” नात म्हणाली तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला

“और एक बोतल दे दो”

भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं.मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.

” अजून एक बोटल दे रे बाबा.मलेबी लई तहान लागलीये”

देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली

” बाबा कहाँ जा रहे हो”पाणीवाल्याने देवबाला विचारलं

“भुसावल”

“तो और एक ले लो ना.भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी.साथमे बच्चे है,एक बोतलसे थोडेही काम चलेगा!”

तो बरोबर म्हणतोय हे देवबाच्या लक्षात आलं पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं.पण पुढे पाणी नाही मिळालं तर?

“दे दू बाबा?”

देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.

” हां देऊन टाका”नात मध्येच म्हणाली तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला.देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले.फक्त नव्वद रुपये उरले होते.पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना.पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन त्रुप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली. 

मलकापूर गेलं.गाडीतली गर्दी आता कमी झाली होती.सहा वाजत आले होते.जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता.देवबा विचार करत होता.आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं.जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते.जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता.’ ठिक आहे मनाला पटत नसलं तरी मागू.आजपर्यंत कधी मागितले नव्हते आता मागू.पोरीला शरमल्यासारखं होईल.तिला समजावून सांगता येईल.आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत.घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे.पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं?’

“बाबा हे घे तुह्ये पैसे”

त्याने चमकून वर पाहिलं.मघाची भिकारीण समोर उभी होती.तिच्या समोर पसरलेल्या हातात एक,दोन,पाच रुपयाची नाणी होती.देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला.भिकाऱ्याने दिलेली भिक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.

” नको नको.राहू दे”

” बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये.घे.भीक मागून जमा केलेत”

देवबाला काय करावं सुचेना.पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते.पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते.त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला

” राहू दे बेटा.नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का?”

” लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू.देव भलं करो तुह्यं”

ती निघून गेली तसा देवबा हसला.भिकाऱ्याच्या आशिर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहित होतं.पण त्या आशिर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.

रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला.स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं.तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली.रिक्षावाल्याला पत्ता सांगितला

” चाळीस रुपये”रिक्षावाला म्हणाला.

देवबा हसला.थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता. पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञतेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरुन गेलं होतं.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… – भाग -१ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पाणी… – भाग – ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा तीन वाजून गेले होते.मे महिन्याची ती दुपार.हवेत भयंकर उष्मा होता.अंगाची लाहीलाही होत होती.प्लँटफाँर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं.गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते.पँसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच.चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

“दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी”

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा?”

नातवाने निरागसपणे मान डोलावली.त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले.आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली.देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला.त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता.ही तर लहान मुलं होती.बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता.त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता.देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो  प्लँटफाँर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला.पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं.त्याने समोरच्या प्लँटफाँर्मवर नजर टाकली.तिथल्या नळांना ही पाणी दिसत नव्हतं.स्टेशनमास्तरच्या आँफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

“बाबूजी पाणी हाये का कुठं?लेकरांसाठी पाहिजे हुतं”

कर्मचाऱ्याने त्याला वरुन खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का?”

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी?आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू?आमीबी बाहेरुन मागवतो.जाय त्या कँन्टीनमधी पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला.देवबा तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का?”

कँन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये?नाय.मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी…”

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी.बाहर जाओ,हाँटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला.रोडावरच्या हाँटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो.पानी नही मिलेगा.बोतल दे दू?बीस रुपयेकी है”

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाँटेलवर गेला.तिथून तिसऱ्या.चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत.पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला.पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं.देवबा म्हणजे शेतकरी माणूस.दोन एकरची कोरडवाहू शेती.शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा.मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले,नद्यानाल्यातलं,जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. अर्थात देवबाला हे नवीन नव्हतं.असं झालं की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा.त्यातून पदरी दोन मुली ,मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती.मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच.पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती.शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं.शहरात रहाणाऱ्या मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता.खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं.पाण्याचा प्रश्न बिकट झालेला.दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची.दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा.तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं.त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची.मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून पाणी आणायचा.पण आता त्याचं वय झालं होतं.तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला.तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता.नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाही मिळालं?दादू परत पाणीपाणी करतोय.मला पण तहान लागलीये”

नातवाचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला.तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली.साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला.पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला कळलं.कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत.त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना.ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं.सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस.समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं.त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता.आता हिंमत दाखवावीच लागणार होती.त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला.ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती.देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं.तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला.पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं.काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे?”कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं.लेकरं लय तहानलीयेत”

तो एका माणसाला म्हणाला.तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले.त्यांचंही बरोबरच होतं.अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात.तिथून घ्या ना” एक बाई म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे.उकळून थंड केलेलं.ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार?”

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा”

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता.देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का?आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं दुसरं पुण्य नाही. बाबा किती जण आहात तुम्ही?”

“तीन जण”तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला.त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा.बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला.मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने आणि आनंदाने हसला. देवबा नातवांकडे आला.थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली.त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली.देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

पँसेंजर आली.प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली.खिडकीतून उतरतीचं ऊन आता अंगावर येत होतं.त्यासोबत गरम हवेचे झोतही आत येत होते.छताचा पंखाही आवाज करत गरम हवा फेकत होता.

दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं.या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं.आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती.त्याने मनाला आवर घातला.असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं.आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता.त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

 क्रमश: भाग १

 © श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले –  सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?- आता इथूंपुढे )

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन कॉपने त्याला घरी आणले.  पण कॉपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लॉबद्दल खणखणीत सुनावलं. दंडाची रक्कम वसुल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षल च्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.   तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली,” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसीव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया ,तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो”

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम!”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला,”नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लॉ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली. आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो  अमिताच्या पायात घुटमळत होता.  अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनो बरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.  पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

येईल का ती कधी भरून? 

 – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गराजचं शटर रिमोटने  अलगद उघडलं.  आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं.  आयलँड वर बराच पसारा पडला होता.  सिंक मध्ये भांडी साचली होती.  काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे.  सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स  पडले होते.  ते तिने पाहिले आणि  क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला.  तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊच वर जाऊन ती बसली.  एसीचं  तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती.  खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं.  एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं.  काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.

मोबाईल व्हायब्रेटर वर होता.  तिने पाहिलं तर जॉर्ज चा फोन होता.

” हॅलो! जॉर्ज मी आज येत नाही.  ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”

” ओके. टेक केअर”  इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

अमिता डेक वर आली.  कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्स बर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता.  मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले  होते.  पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती.  पण अजून काही दिवसच.  नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे.  कोपऱ्यात साचून राहील.  वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील.  आणि संपूर्ण विंटर मध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील.  सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील.  अमिताला सहज वाटलं,” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.”

या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या  प्रवाहात जाणवते आहे.

हर्षल ला फोन करावा का? नको.  तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता,” बी ब्रेव्ह अमिता! खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं.  पण आज शक्य नाही.  आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”

पण अमिता  जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही.  त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. 

अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.”

आणि तिने छातीवर दगड ठेऊन  सारं काही पार पडलं होतं.

विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.  पण तो विचार तिने झटकला.  विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं.  तिला एकटीलाच राहायचं होतं.  निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता.  निदान आता तरी. 

संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन.  तान्या, रिया.  “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती.  सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर.

अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी  तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा.  एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा.  त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.  इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची. 

ब्रुनोची  आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं.  क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या  काय कमी झाल्या का?  झाल्याच की.  कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली.  काही दूर गेली.  काही तुटली.  त्या त्या वेळी खूप दुःख झाले पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच  होऊ शकत नाही.

घरात तसा कुठे कुठे ब्रूनो चा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेक वर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटर मध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर  घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला!  या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.

कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही.  मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा.  नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता.  तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं  की नेबर ने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू  का?”

नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा.  त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे.  उठ सुट  असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे  जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही.  पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशी चे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.

तसे  ब्रूनोचे  आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते?  अवघे दहा वर्षाचे असेल.  असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. 

शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची.  एकटीच असायची.  तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता.  पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं  हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं.  गंमत म्हणजे रिया,तान्या  येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे  फारच लाड करायच्या.  परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती.  हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला अॅडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.

रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स.  त्यांची तर मज्जाच झाली.  आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो  घरी आला आणि घरचाच झाला आणि सारे जीवन रंगच बदलले. 

चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले.  त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोस च्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग  या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली.  शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती  दिली. अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी  जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही.  पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. 

सुरुवातीला तो थोडा बिचकला.  गोल गोल फिरत राहायचा.  कदाचित होमसिक  झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला.  परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला.  त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.

‘ ब्रूनो जेवला का?”

“ब्रुनोला फिरवून आणलं का?”

“आज त्याला  आंघोळ घालायची का?”

” आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत का याचं?”

असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे.   हाच त्यांचा दिनक्रम बनला. 

सुरुवातीला चिनी बाईच्या  विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या.  तिलाही ब्रुनोची  ची आठवण यायची.  करमायचं नाही. रिया,तान्याला  तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?

पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला. सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?

क्रमश: भाग १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

(— म्हणून ‘एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते.) इथून पुढे —-

पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो. हृदय, फुफ्फुसानाही अधिक प्राणवायू मिळतो, व्यायाम होतो. असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं, बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. त्याच धर्तीवर हसणाऱ्याचं नशीबही हसतं, रडणाऱ्याचं नशीबही रडतं असं म्हणायला हरकत नाही. हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. 

नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता. तो एका दुर्धर आजाराने बिछान्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरु होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधें घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला. त्याला असे आढळून आले की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्याने विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसू लागला आणि काय आश्चर्य ! काही दिवसांनी तो पूर्ववत बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधे थांबली. तो पूर्ववत सगळी कामे करू लागला. आपल्या अनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. त्याला असे आढळून आले की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचा एक स्त्राव स्त्रवतो. हे एन्डॉर्फिन वेदना शांत करण्याचे कार्य करते. मनाची मरगळ दूर करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. खळखळून हसण्याने रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ सिगमंड फ्राईड यांनीही हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळे मनातील राग, द्वेष, ताण तणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असे म्हटले आहे. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, ‘ हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेटप्रूफ जाकीट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. ‘ 

विनोदी चित्रपट, विनोदी नाटके यांना लोकांची कायमच पसंती असते ती यामुळेच. तास दोन तास खळखळून हसल्याने मनातली मरगळ निघून जाते, नकारात्मक भावनांचा निचरा होतॊ आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचे विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ या नाटकातील ‘ ह हा हि ही ‘ ची बाराखडी कमालीची मजा आणते. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला या ‘ ह ‘ च्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आले पाहिजे. अशी माणसे मनाने निर्मळ असतात. 

पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो ‘ दूध घ्या ‘ म्हणायच्या ऐवजी त्याच्या खर्जातल्या आवाजात  ‘ चला, भांडं घ्या ‘ असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांड्याधुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ‘ ताईsss ‘ असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडीधुणी करायची आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी कोणी एखादा हलकाफुलका विनोद केला तर वातावरणातील तणाव लगेच निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला एक किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरु असताना झालेल्या पेपर्सचे गट्ठे तपासण्यासाठी शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्याने एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या. तेथे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे दोन दोन शब्द झाले. वातावरण तापले. त्या शिक्षिका रागाने त्या अधिकाऱ्याला विचारू लागल्या, एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? ‘ एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथे हजर होते. ते म्हणाले, ‘ लाल पेनने तपासा…’ आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळले आणि गंमत म्हणजे त्या शिक्षिकाही हास्यात सामील झाल्या. 

हसण्याची क्रिया ही अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळी काम करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येते. अशा रीतीने शरीराचे सर्व अवयव जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते काम उत्तम होते. व्यायाम, हसणे, चालणे यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्वाचा तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्वाचा. 

सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारणीला उद्देशून म्हटले असले तरी ते आपल्या सगळ्यांसाठी पण आहे असे समजायला हरकत नाही. ‘ प्रकाशातले तारे तुम्ही ‘ या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, ‘ रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. ‘ पुढे ते म्हणतात, ‘ सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता…’ खरंच मागचा सगळा गुंता, समस्या टाकून देऊन हसता आले पाहिजे म्हणजे ‘ आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा ‘ अशी स्थिती प्राप्त होईल. 

– समाप्त – 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नातं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ नातं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“हे बघ दहा पोळ्या झाल्या की गॅस, ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा… तो खरकटा ओटा आवडत नाही मला… आणि आता इकडे ये हॉलमध्ये… हे बघ हे सगळं फर्निचर स्वच्छ पुसायचं, झाडू, फारशी ठरल्याप्रमाणे करायची आहेच…” काकु तिला सगळं तावतावाने सांगत होत्या. ती मात्र हरखली होती. एवढं सुंदर घर असतं.. किती प्रसन्न वाटतंय इथे, अगदी आपल्या घरी आजी विठ्ठलाची पूजा करायची तेंव्हा वाटायचं तसंच…. गावाकडून येऊन पहिल्यांदाच कामाला लागणार होती ती….”

गावी आजी वारली, मग आजोबांनी त्यांच्या बहिणीकडे पोर आणून सोडली. काहीतरी शिवणकाम शिकवू म्हणाले, पण उरलेल्या वेळात माझ्या ओळखीच्या घरी काम आहे असं बहिणीने सांगितल्यावर आधी आजोबांनी विचारलं, “चिऊ कामं करशील का बेटा..? तशी पोळ्या फार छान करते चिऊ” म्हणत आजोबांनी डोक्यावर हात फिरवला.

चिऊ म्हणाली, “आवडलं तर करेल.”

आत्याआजी हसून म्हटली होती, “काय आवडलं तर? काम की माणसं..?”

चिऊ म्हणाली होती, “घर.. घर आवडायला पाहिजे मला..”

आताही चिऊला ते आठवलं.. घर खरंच छान आहे. एक वेगळाच विश्वास वाटतोय आपल्याला, एक वेगळी प्रसन्नता… नेमकी कशाने?.. चिऊने मनाला विचारलं आणि परत त्या ईशान्य कोपऱ्यात बघितलं… तो आताही मस्त हसत होता… ‘मी आहे’ असं डोळ्यांनी विश्वासाने सांगत होता… 

चिऊचे त्याच्याकडे बघून आताही डोळे भरून आले… तेवढ्यात त्या काकु म्हणाल्या, “बघ तुला नक्की जमतील ना ही कामं? मला उद्यापर्यंत सांग. मी सध्या दुसरी बाई बघत नाही….”

त्याच्याकडे बघतच आणि त्याला हात लावायचा प्रयत्न करत चिऊ काकूंना “हो, जमतील” असं म्हणाली.

तेवढ्यात काकु एकदम ओरडल्या, “ए, त्या विठ्ठलमूर्तीला कशाला हात लावतेस… आमच्या सासूबाईंना नाही आवडत त्याला कोणी हात लावलेलं…. “

काकूंच्या आवाजाने चिऊ एकदम घाबरली. पटकन विठ्ठल मूर्तीजवळून तिने हात बाजूला केला… अजूनही तिला वाटत होतं, ही मूर्ती आपण खुप बघितलेली….

तेवढयात काकूंच्या सासुबाई आल्या परडीत फुलं घेऊन… काकु म्हणाल्या, “आई ही आपली नवी मोलकरीण… अजून नक्की ठरवायची बाकी आहे, पण तिला घर आवडलं तर येईल म्हणाली. तिची आत्याआजी….”

सासुबाई हसत म्हणाल्या, “अगबाई, हो का?.. घर आवडलं म्हणजे नेमकं काय गं? घराचा रंग, घराचं रूप, घराचा दिखावा, घरातली माणसं, घरातला पैसा…. नेमकं काय आवडायचं आहे गं तुला.?”

आजीच्या प्रश्नावर चिऊ हसत म्हणाली, “आजी, ते असं दिसणाऱ्या वस्तूत नसतं…. ते असं जाणवतं…. असं छान, प्रसन्न वाटतं… ते मला आवडायला हवं..”

आजी हसून म्हणाली, “अगंबाई बरीच हुशार आहेस गं,.. चैतन्य म्हणायचं आहे तुला….?”

चिऊला आवडला तो शब्द. ‘चैतन्य’. चिऊ लगेच म्हणाली, “हो, अगदी बरोबर आजी, चैतन्य.. जे आपल्या भक्तीभावाने त्या घरात निर्माण झालेलं असतं… माझ्या आजीकडे होतं ते. आजी गेली आणि सगळं हरवलं” म्हणत चिऊने डोळे पुसले.

“उद्या येते” सांगून चिऊ निघाली…. निघताना चिऊ परत त्याच्याकडे पाहात होती‌‌. ही मूर्ती का आपल्याला आपलीशी वाटते..? मनातलं चैतन्य का वाढवत आहे ही… अगदी मंदिरातला विठोबा आठवतोय. अगदी असाच हुबेहूब, ज्याच्या समोर आपण लहानाचं मोठं झालो… ज्याच्या नक्षी खांबाला एका हाताने धरत गोलगोल फिरत आपण खुप खुप खेळलो, तो विठ्ठल असायचा आपल्यावर लक्ष ठेवून… अगदी तसाच हा इथेही आला की काय आपली काळजी घ्यायला…? चिऊच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले… निघताना ती आजीला म्हणालीच, “आजी मी विठ्ठलाच्या पाया पडू…”

आजीने मानेनेच होकार दिला… आजी त्या विठुरायला हार करण्यात दंग झालेली होती….

आज चिऊ आली कामावर… घरात जरा गडबड जाणवली… काकु येऊन म्हणाल्या, “आजी पडल्या गं काल… आता बऱ्या आहेत. तू तुझ्या पोळ्या करून मग झाडू फारशी कर…”

चिऊने मानेनेच हो म्हंटल. पटापट पोळ्या आटोपल्यावर तिने झाडून घेतलं. हॉलमध्ये ती सारखी त्याच्याकडे बघत होती. डोळ्यातले भाव खुप ओळखीचे… पण गळ्यातला हार सुकलेला… 

चिऊ पटकन आजीच्या खोलीत गेली. आजीने तिला बघितलं आणि म्हणाली, “अरे चिऊ, आलीस का? बघ माझ्या मेलीचं काय झालं…. आषाढी एवढी जवळ आली… वारीला निघायचं होतं तर इथेच पाडलं मला विठोबाने‌… आणि आता तर घरातल्या विठूची सेवा करता यायची नाही… डॉक्टरांनी चालायला नाही सांगितलं…”

चिऊने नेमका विषय पकडला. म्हणाली… “आजी, तुमची हरकत नसेल तर मी करू का सेवा… मला नाहीतरी माझ्या गावाची, म्हणजे पंढरीची आठवण येतच आहे…”

आजी म्हणाल्या, “अगबाई, तू तर ह्याच्याच गावची… बघ तुला वेळ असेल तर कर हो सेवा… तेवढाच माझ्या विठुला आनंद होईल. नाहीतर तसं कोणी त्याला हातही जोडत नाही या घरात.”

चिऊचं काम आता वाढलं होतं… सगळं आवरून झालं की चिऊ बागेतील फुलं तोडून आणायची, त्याचा सुंदर हार करायची. नाजूक जाई, जुईच्या कळ्या आणि मध्ये एक पिवळा सोनचाफा असा सुंदर हार असायचा त्याच्या सेवेत… त्याला उगाळून चंदन टिळा लावायची… तुळशीच्या मंजुळांचा हार असायचा गळाभरून… स्वच्छ घसलेली चांदीची समई तेवत असायची, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तेजस्वी करत…

चिऊ अगदी रमून जायची ह्या सगळ्यात. पण रोज पूजा करताना…. त्याला स्नान घालताना ती मूर्ती तिला खुप आपलीशी वाटायची…. त्याची बोटं, त्याचं नाक, डोळे… ती परत परत त्यावरून हात फिरवायची. त्याचा तो मुकुट… त्यातली एकेक लयदार रेष…. तिला वाटायचं, ही आपल्या अगदी परिचयाची…. ती तल्लीन होऊन पूजा करायची विठ्ठलाची… 

आजी सुखावून जायची रोजची पूजा बघून…. कधीकधी आजी गमतीत म्हणायची, “अगं मी बरी झाल्यावर हा विठ्ठल माझी पुजा आवडून घेतो की नाही काय माहित? चिऊ तू इतकी सुंदर पूजा करतेस… जणू काही तो तुझा हक्काचा विठ्ठल आहे….”

चिऊ म्हणाली, “आजी खरं सांगु, खऱ्या पांडुरंगाला बघत मी लहानाची मोठी झाले… पण ह्या मूर्तीला बघून खुप समाधान मिळतं, मला ही मूर्ती अगदी माझी वाटते. का कुणास ठाऊक, हिच्याशी माझं नातं आहे असं वाटतं…”

चिऊ बोलत होती तेवढयात काकूंनी हाक मारली, “अग चिऊ, तुझी आत्याआजी आलीये बोलवायला तुला…. आज पूजा राहू दे. तुझे गावाकडचे आजोबा आलेत भेटायला… जा तू घरी, आज मी बघेल पूजेचं….”

आजीला जरा वाईटच वाटलं, कारण आजीला सूनबाईची पूजा माहीत होती. निव्वळ उरकण्याचा कार्यक्रम असायचा. चिऊ मात्र अगदी मनलावून पूजा करायची त्यामुळे आजी खुश होती पण नेमकं आज एकादशीला चिऊच्या हातची पूजा नाही. आजी अस्वस्थ झाली….

चिऊ पण जरा हिरमुसली, आज एकादशी आणि नेमकी आजच आपण ह्याची पूजा करायची नाही…. चिऊ म्हणाली, “आत्याआजीला सांगून येते मी मला थोडावेळ लागेल, तुम्ही पुढे व्हा असं….”

चिऊ बाहेर आली तर चिऊचे आजोबा काकूच्या सासऱ्यांशी बागेत बोलत उभे होते…. चिऊ म्हणाली, “आजोबा तुम्ही ह्यांना ओळखता?”

चिऊचे आजोबा म्हणाले, “अगं फार जून नातं आहे ह्यांच्याशी विठ्ठलाने जोडलेलं.”

काकूंनी ते ऐकून सगळ्यांना घरात बोलवलं…. आजोबा चिऊच्या आजोबांना घेऊन घरात आले आणि आजीला म्हणाले, “अहो,ओळखलं का कोण आहेत हे.”

आजीने नीट निरखत एकदम आश्चर्य व्यक्त केलं, “अगबाई तुम्ही..?”

चिऊला कळेचना नेमकं काय सुरू आहे. ह्यांची ओळख काय ? 

आजोबा म्हणाले, “ताई आमचा पांडुरंग कसा आहे हो….?

आजी हसत म्हणाली, “तुमचा पांडुरंग तुमच्याच नातीच्या हाताने सगळं करून घेतो आणि प्रसन्न हसत उभा राहतो…. तो बघा.”

आजीच्या खोलीतून ती प्रसन्न विठ्ठलमुर्ती बघून आजोबांचे डोळे पाण्याने डबडबले… त्यांनी आपले थरथरते हात जोडले. 

चिऊला शेवटी राहवेचना. ती म्हणाली, “मला कळतच नाही ए आजोबा, हा आपला विठ्ठल म्हणजे?मला सांगा ह्या मूर्तीसोबत आपलं नातं काय आजोबा.”

तेवढ्यात काकूने चहा आणला… चहाचा एकेक घोट घेत आजोबा भूतकाळात हरवत बोलू लागले…. “तुझ्या बापाला मूर्ती घडवायचं वेड लागलं. कर्ज काढून मूर्ती बनवायचा कारखाना सुरू केला… कधी गणपती, मारुती, देवी.. अश्या अनेक मूर्ती त्याच्या हातून त्या घडायला लागल्या… पण विठ्ठल मूर्ती काही त्याने घडवली नाही… लग्न झालं आणि तुझी आई निस्सीम विठ्ठल भक्त… तू पोटात असताना तिने तीन महिन्यात तुझ्या बापाच्या मदतीने हा विठ्ठल हट्टाने घडवला… मूर्ती बघून जो तो भारावून जायचा… कितीतरी जणांनी मूर्ती मागितली पण आम्ही दिली नाही… 

तुझ्या जन्माच्या वेळी तुझी आई गेली. माझा लेक सैरभैर झाला… ह्या विठ्ठलावर खुप रागावला… मूर्ती चंद्रभागेत टाकतो म्हणाला…. रागारागात घराबाहेर पडला… काळ आला होता… तो ही अपघाताने गेला…” एवढं बोलून आजोबा रडायला लागले… “परिस्थिती हलाखीची झाली. कर्जासाठी बँकेची लोकं चकरा मारायला लागले…. तू लहान. तुला पोसण्यासाठी मी आणि आजी हतबल झालो… ह्या विठुरायाला घेऊन भजन म्हणत पैसे गोळा करायला लागलो… पोटाची भाकरी तर हरवली होती आणि आता छप्पर जायची वेळ आली….

हे साहेब धावून आले ग तेंव्हा…. जप्तीला ह्यांना बँकेने पाठवलं. ह्यांनी सगळं बघितलं आणि विठुरायावर सौदा करून सगळं मोकळं करून टाकलं…. विठुला निरोप देताना आजी आणि मी तर रडलोच, पण त्याहीपेक्षा तू आकांत केला होता…. कारण बिन मायबापाचं लेकरू त्या माऊलीच्या अंगाखांद्यावर मोठं व्हायला लागलं…. ज्या मायबापाने तू पोटात असताना ही मूर्ती घडवली त्या मूर्तीने जणू तुला प्रेम द्यायला स्वतःला निर्माण केलं असं वाटत होतं.. विठू गेला पण घर वाचलं… खरंतर हे साहेब काहीच देऊ नका म्हणत होते, पण तुझ्या आजीनेच मूर्ती समोर ठेवली….”

काकूंचे सासरे म्हणाले, “हो, तशीही माझी बायको विठ्ठल भक्त. मग मला वाटलं, तिला आवडेल ही मूर्ती. आणि मुख्य म्हणजे तुमचं छत माझ्याकडून ह्या विठ्ठलाला वाचवायचं असेल… मी बँकेत पैसे भरून टाकले.. त्या बदल्यात तुमच्या चेहऱ्यावरचा आंनद आणि हा हसरा विठू मला मिळाला…..”

चिऊ उठून विठूच्या पायाशी जाऊन ओक्साबोक्शी रडायला लागली…. “माऊली तुझं माझं नातं खरंच जन्मापासूनचं ग म्हणूनच मला इथे भेटलीस….”

आजीने चिऊला जवळ बोलवलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला…. “रडू नकोस चिऊ, अगं मी आयुष्यात एवढया वाऱ्या केल्या… यावेळी विठूची वारी चुकली असं वाटलं, पण आता वाटतं, त्याने ती मुद्दाम चुकवली…. ह्या नात्याला पुनर्जन्म मिळायचा होता…. आता हा विठुराया तुझाच… तूच त्याची पूजा करायला रोज ये, आणि तुझ्या लग्नात हीच तुला भेट…. कारण तुझं आणि त्याचं नातं पाठीराख्याचं आहे… ते असंच टिकव….”

कालचीच पूजा असलेली विठाई आताच्या या घडवून आणलेल्या सोहळ्याने अधिकच हसरी दिसत होती…. जणू पाठीराख्याचं नातं टिकवायला पुन्हा नव्याने सज्ज झालेली…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – ३ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – ३  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(सुधा म्हणाली,’तुमचं बरोबरच आहे,पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले.तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली )  इथून पुढे —

पुढच्या महिन्यात पुन्हा मंदार आणि फॅमिली विश्वासकडे रहायला आले. त्याचा छोटा,सात वर्षाचा मुलगा, विश्वासशी खेळताना म्हणाला, “माझे  खरे आजोबा देवाघरी गेलेत. तुम्ही नाही काही माझे खरे आजोबा ! तुम्ही तर काका आजोबा आहात.  बाबा म्हणत होते, वाडा विकला की तुम्ही दोघेहीआश्रमात राहाल. आश्रम म्हणजे काय हो आजोबा? ” …  त्या निरागस मुलाच्या तोंडून हे ऐकताना विश्वासच्या मनात चर्रर्र झाले. आपल्या मागे हे लोक काय बोलतात आणि  काय ठरवतात हे त्याला एक क्षणात समजले. सुधा कळवळून सांगत होती, ते त्याला आठवले. ती म्हणत होती, “अहो, आपलं ताट द्यावं पण आपला बसायचा पाट देऊ नये माणसाने ! हल्ली कोणाचा भरवसा देता येतो का ? आत्ताच नका देऊन टाकू मंदारला सगळं. आपण गेल्यावर मग करतील त्यांना हवं ते. असलं कसलं मृत्युपत्र करताय? म्हणे ‘ मी गेलो तर सुधाला मंदारने सांभाळावे. किंवा ती गेली तर मला मंदारने शेवटपर्यंत संभाळावे. म्हणजे मी सर्व माझे जे आहे ते त्यालाच आत्ताच देऊन टाकतो. नशीबच, मी जॉईंट विलवर सही केली नाहीये म्हणून ते अजून तरी तसंच राहिलंय.” …. 

…. विश्वासला हे सगळं आठवलं. वडील गेल्यावर या मुलावर आपण जिवापलीकडे प्रेम केलं, त्याला अडी अडचणीला पैसे दिले, आधार दिला. पण तो मात्र  लांब लांबच राहिला कायम. आत्ता तो लहान मुलगा बोलला म्हणून  निदान आपल्याला समजलं तरी की हे लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत ते. कोणी  कुणाचं नाही हेच खरं.  विश्वासला अतिशय वाईट वाटलं. असा कसा आंधळा विश्वास टाकला 

आपण ?  पण देवानेच डोळे उघडले म्हणायचे, आणि नियतीच बोलली त्या लहान मुलाच्या तोंडून ! याही गोष्टीला  सात आठ वर्षं होऊन गेली. विश्वास सुधा.. दोघांची सत्तरी उलटली.  वाडा अजूनही विकला नव्हताच विश्वासने. मंदार येईनासाच झाला होता आताशा या वाडा प्रकरणामुळे. आता मात्र सत्याचा आरसा लखलखीत समोर आला विश्वासच्या ! सुधा सांगत होती ते बरोबर होते, हे लक्षात आले त्याच्या. दोघेही थकत चालले आता. साधं डॉक्टरकडं जायचं म्हटलं तरी त्यांना आता बळ उरलं नाही. सुधा जास्त थकत चालली. गेल्या वर्षभरात मंदार, त्याची आई कोणीच फिरकले नव्हते.

सुधाला हळूहळू पार्किन्सनने घेरले. तिचा तिच्या हालचालींवर  ताबा उरला नाही.जरा जरी कसलाही ताण आला की तिचे हातपाय अनैच्छिकरीत्या हलू लागत, हातातून भांडी पडत. चालताना तिचा तोल जाई, हातपाय थरथर कापत. मान लटलटा हलू लागे. तिला रोजचे व्यवहार करणे जड जाऊ लागले… आणि तिची देखभाल करणे विश्वासला झेपेनासे झाले. आता मात्र त्याने कोणालाही न विचारता एका सज्जन बिल्डरला आपला अर्धा भाग विकून टाकला.  बिल्डर म्हणाला, “ काका, तुम्ही आता त्या पुतण्याच्या अर्ध्या भागाचा विचार करू नका. तुमचे आयुष्य नीट सुखात जाईल हे बघायचं आता. तुमच्या मित्राचाच मुलगा आहे मी, कोणतीही अडचण आली तर मला हाक मारा. मी नक्की येईन. “ जगात माणुसकी आहे याचा विश्वासला पुन्हा एकदा प्रत्ययआला, आणि आपलीच  माणसं आपली नसतात, याचा अनुभवही ! त्या बिल्डरनेच विश्वासला ‘अथश्री ‘ मध्ये चांगला फ्लॅट घेऊन दिला, वर भरपूर पैसे दिले.या दोघांना स्वतःच्या गाडीतून बँकेत नेले आणि ती रक्कम गुंतवून टाकली. त्याचे  दरमहा व्याज यांच्या खात्यात जमा होईल, अशीही व्यवस्था केली. विश्वास आणि सुधा दोघेही अथश्रीत रहायला आले. सुधाची मैत्रीणही अथश्रीत आधीच आली होती. दोघींचा वेळ अगदी छान जायला लागला. रोज उठून  नाश्ता काय करू, स्वयंपाक काय करायचा  ही सगळीच कटकट संपली. विश्वासला समवयस्क नवीन मित्र मिळाले. गप्पा, टेनिस ,ब्रिज खेळणे, हे त्याला आता मनासारखे शक्य होऊ लागले.  सुधाची तब्येतही जरा सुधारू लागली. दर आठ दिवसांनी डॉक्टर येत, औषधं देत. 

दरम्यान एक दिवस, मंदार, त्याची आई, आणि बायको अचानक विश्वास-सुधाला भेटायला आले. सुधा विश्वासने  शांतपणे त्यांचे स्वागत केले. मंदार आणि सविता तणतणत म्हणाले, “छानच केलात हो भावजी व्यवहार ! आम्हाला पत्ता सुद्धा लागू दिला नाहीत. आता त्या बिल्डरने सगळा एफ एस आय वापरल्यावर आम्हाला कमीच येणार किंमत. विचारायचं तरी मंदारला.” विश्वास काहीही बोलला नाही. सुधाही गप्पच होती. सविता म्हणाली, ” इकडे येऊन रहाण्यापेक्षा, मंदारजवळ फ्लॅट घ्या म्हणत होतो ना आम्ही? नसते का मंदारने बघितले तुम्हाला म्हातारपणी? एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारावेसे नाही का वाटले हो? आम्ही काय टाकून देणार होतो का  तुम्हाला.. ” 

आता मात्र विश्वास उसळून म्हणाला , “ हे सगळं कशाला बोलतेस सविता? सगळं समजलंय आम्हाला.  सगळे पैसे स्वतः हयात असतानाच तुझ्या मुलाला देण्याचा मूर्खपणा करणार होतो मी…  आंधळ्या माये पोटी .. माझा भाऊ अकाली गेला म्हणून बापाची माया देऊ केली मी तुझ्या मुलाला, पण किंमत नाही तुम्हा कोणालाच ! देवानेच शहाणपण दिलं मला. तुम्ही माझेच पैसे घेऊन आम्हालाच वृद्धाश्रमाची वाट दाखवण्याआधीच आम्ही सन्मानाने इकडे आलो ते उत्तमच..  नाही का? आपोआप गोष्टी कानावर पडल्या, म्हणून निदान हा निर्णय तरी घेता आला आम्हाला. आता मला कशाचीच खंत खेद वाटत नाही. इथले लोक चांगले आहेत. कोणाच्या दयेवर,आभार उपकारावर आम्ही जगत नाही, हे किती छान आहे. राहता राहिला वाड्याचा प्रश्न ! तुम्ही त्याचे काहीही करा. मला योग्य वाटले ते मी केले.” विश्वास पाठ  फिरवून आत निघून गेला. आणखी बोलण्यासारखे काहीच राहिले नव्हते आता. 

आठ दिवसांनी सुधा विश्वासने वकिलांना बोलावले. सर्व कॅश पैसे ,त्यांनी विचारपूर्वक, ब्लाइंड स्कूल, अनाथाश्रम,  मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, अशा ठिकाणी  आपल्या मृत्यूपश्चात दान देऊन टाकावे असे लिहिले.  मायेपोटी, सुधाने  दागिने मात्र मंदारला द्यायचे लिहून ठेवले, तेवढेच.

वकिलांनाच त्यांनी कुलमुखत्यार नेमले आणि आपल्या पश्चात ते दिलेला शब्द पाळतील, आपल्या इच्छा पूर्ण करतील याची  खात्री होती विश्वासला. आपल्या आई वडिलांच्या नावे, विश्वासने वाचनालये, गरीब विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ठेवी, अशीही तरतूद केली.

आता मात्र, त्याला कसलीही हळहळ,अपेक्षा, आणि कसल्याच इच्छा उरल्या नव्हत्या. शांतपणे उरलेले आयुष्य आनंदात जगायचे ठरवल्यावर मागचे पाश त्यांनी सोडवून टाकले. ‘ आता हे विसाव्याचे क्षण, आपण निवांत उपभोगूया ‘ असे म्हणत विश्वास सुधा उरलेले आयुष्य शांत आणि निवांतपणे घालवू लागले.

– समाप्त –

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच.त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.)  इथून पुढे —–

मंदार या काकाला जास्त attached होता त्यातल्या त्यात. त्याची आई सविताही बऱ्यापैकी संबंध ठेवून होती सुधाशी. सुधाचं त्यातल्या त्यात सविताशी पटायचं. माहेरची माणसं, बहिणी, अशा सगळ्यांशी सुधाचं नाहीच पटायचं. त्यामुळे घरी सतत ‘ तू तिथे मी ! ‘ तिला  नवऱ्याशिवाय दुसरं  विश्वच नव्हतं. तिने कधी आपला ग्रुप,  पुस्तक कट्टा असं काही कधी निर्माणच नाही केलं. विश्वासने कितीतरी  प्रयत्न केले, पण ही सतत दुर्मुखलेलीच राहिली. 

त्यादिवशी  मंदार आणि त्याचे कुटुंब सुधाकडे राहायला आले. त्यांच्या लहान मुलाने विश्वासला खूप दमवले, आजोबा मला स्कूटरवरून राईड मारून आणा,  बॉल  खेळा, आपण शिवाशिवी खेळूया, म्हणत, मुलगा पळत सुटे आणि त्याच्या मागे धावून,  विश्वास अगदी दमून गेला . कितीही उसने अवसान आणले तरी वय बोलतेच ना.  मंदारही मुलाला रागावला नाही की “ अरे, किती त्रास देतोस आजोबांना. किती चढ उतार करायला लावतोस जिन्यावरून रे !”

शेवटी सुधाच म्हणाली, “ अहो, शांत बसा बघू. आता अजिबात धावू नका त्या पोराबरोबर. काय चाललंय तुमचं?आजारी का पडायचंय?”  लाडावलेली ती मुलं बघून सुधाला अतिशय राग यायचा.पण विश्वाससमोर तिचं काही चालायचं नाही.  विश्वासचं आंधळं  प्रेम होतं या लोकांवर. आपल्याला काही झालं तर हे लोक नक्की धावून येतील याची खात्रीच होती त्याला. पण सुधा ओळखून होती यांना. विश्वासने मृत्युपत्र केले आणि त्यात आपली सर्व मालमत्ता मंदारच्या नावे केली.  पण अजून सुधाने सही नव्हती केली म्हणून ते तसेच रखडले होते..दुसरं होतंच कोण त्याला?  त्या दिवशी असंच झालं. सुधा पाय घसरून अंगणात पडली.  विश्वासने मंदारला फोन केला. मंदार लगेच आला, डॉक्टरला बोलावलं. नशिबाने सुधाला कुठे फ्रॅक्चर झाले नव्हते. 

 मंदारने जुजबीऔषधपाण्याची सोय केली आणि तो निघून गेला. पुन्हा घरी हे दोघेच  म्हातारे उरले. विश्वासला फार वाटले, मंदार आपल्याला घरी रहायला बोलावेल, चार दिवस या म्हणेल. पण तसे झाले नाही. सुधाच आडवी झाल्याने घरची उठबस करून विश्वास थकून गेला. ही तर नुसती झलक होती. पुढे काय?  यांच्या घरी असं कायम रहायला येणारं कोणीही शक्यच नव्हतं आणि मंदारचीच आई त्याच्या घरी असल्याने याना तो बोलावणेही अशक्य होतं. सुधा बरी झाली आणि हळूहळू घरातल्या घरात हिंडूफिरु लागली, कामं करू लागली. विश्वासच्या मानाने सुधा प्रॅक्टिकल होती. तिला कोण कसे आहे हे बरोबर समजत होते. पण लग्न झाल्या दिवसापासून तिला समजून चुकले होते, विश्वास अतिशय हेकट आहे. तो दुसऱ्याच्या मताला अजिबात किंमत देत नाही. मी म्हणेन तेच खरे. सुधाला याचा त्रास होई पण इलाजच नव्हता. रोज उठून वाद घालण्यापेक्षा ती गप्प बसणे पसंत करी. कितीही अवसान आणले, तरी आता संध्याछाया भेडसावू लागल्या होत्याच.  एकेक करत सगळी म्हातारी माणसे कालवश झाली आणि आपणसुद्धा उताराला लागलो, हे सत्य कटू तर होतेच, आणि पचवायला तर फार अवघड होतेच.

सुधाची  मैत्रीण एकदा सुधाकडे आली होती तेव्हा म्हणाली, ” सुधा, कशाला वाईट वाटून घेतेस मूल नाही म्हणून. मला आहेत दोन मुलं ! उपयोग आहे का काही? दोघेही गेलेत अमेरिकेला निघून. मीही एकटीच नाही का रहात घरात? होईल ते होईल. नशिबानं भरपूर पैसा आहे, म्हणून निदान त्यांच्यावर अवलंबून तरी नाही मी ! येते जाऊन वर्षातून एकदा तिकडे, पण मला तिकडे मुळीच आवडत नाही ग कायम रहायला. आपला भारत खरंच महान ! मला तरी कोण आहे ग इथं? मी तर ‘अथश्री’मध्ये फ्लॅट घेऊन ठेवलाय. सध्या दिलाय भाड्याने. मला होईनासं झालं की मी तिकडे जाऊन रहाणार. छान आहे सगळं तिथे.  कसलीही काळजी नाही. पैसे द्या, की सगळ्या सुखसोयी आहेतच. कोणाचे आभार उपकार नकोत.” सुधाच्या मनात हाही विचार घर करून राहिला. कोण कोणाचे नसते हल्ली. पुतण्यावर फार भरवसा आहे विश्वासचा, पण एवढी मी आजारी होते, तर म्हणाला का,या विश्रांतीला? आपल्यालाही ही सोय हळूहळू बघावी लागणार. अगदी घरी बायका ठेवल्या तरी आपल्याला दिवसेंदिवस घर सांभाळणे अवघडच जाणार हे कळून चुकले होते सुधाला ! आता फक्त विश्वासला हे कधी समजणार, याची वाट बघणे तिच्या हातात उरले होते.

त्या दिवशी मंदार असाच विश्वासकडे आला. इकडचं  तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाला, ” काका, आपण वाडा विकून टाकूया. मला आता पैशाची गरज आहे फार. तुम्ही तरी अशा जुनाट वाड्यात का राहाताय? वाड्याचे दोन्ही भाग एकदम विकले तर किंमत चांगली येतेय ! आपल्याला फ्लॅट्स आणि वर पैसेही मिळतील. किती दिवस असे भावनिक गुंतवणूक करून, माझ्या आईवडिलांची वास्तू आहे ही, असं म्हणत रहाणार? मनावर घ्या आता. जुनी झाली ती वास्तू आणि त्या भावनाही !  मला  आत्ता खरंच गरज आहे पैशाची. बाबा अकाली अचानक गेले,आणि काहीच शिल्लक नव्हती त्यांची. मला आता खूप खर्च आहेत पुढे. मुलांच्या फियाच लाखाच्या घरात असतात हल्ली. तुम्हाला काय कल्पना येणार? बघा विचार करा.” मंदार निघून गेला. विश्वासला हा पहिला झटका होता. सुधा शांतपणे हे ऐकत होती.

नंतर पुढच्या आठवड्यात सविता आली. “वहिनी, काय ठरलं भावजींचं? विकायला आहेत का तयार? बस झालं आता इमोशनली  गुंतून पडणे हो ! किती दुरुस्त्या निघत आहेत वाड्याच्या. नका राहू भुतासारखे इथं दोघेच्या दोघे. मंदार म्हणतो तसं आपण वाडा विकून टाकू आणि तुम्ही आमच्याजवळच एखादा फ्लॅट घ्या. म्हणजे  मंदारलाही बरे पडेल तुमची देखभाल करायला. सारखा कसा येणार तो तरी इतक्या लांबून !”  सुधा म्हणाली, ‘तुमचं बरोबरच आहे, पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले. तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली.. 

– क्रमशः भाग दुसरा. 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print