मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाबा – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाबा – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर

मागे चार सिट बसले यांची बाबानं खात्री केली.. रिक्षात पुढच्या सीटवर तो बसला.. उजव्या बाजूला एकाला बसवलं.. डाव्या हाताने किकचा दांडा जोरात उचलला.. रिक्षाचं मशीन सुरू झालं.. थोडं सरकुन त्यानं जागा केली..

‌‌.. चल बस.. हा हात टाक मागुन.. म्हणत त्यानं डाव्या बाजूला अजुन एक सीट बसवलं.. आणि पहिला गीअर टाकुन एकदम धुराट निघाला.

बाबाच्या शालीमार ते नाशिकरोड स्टेशन अश्या रोज चार पाच चकरा व्हायच्या.. सकाळी सात वाजताच तो शालीमारला यायचा..

.. चले रोड ए का.. रोड ए का.. म्हणत सीट भरायचा. त्याच्या भाषेत शीटा. मी त्याला कॉलेजला असताना पासून ओळखतो. तो आमच्याच गल्लीत रहायचा. माझ्या पेक्षा चार पाच वर्षांनी मोठा.. पण त्याला ‘ए बाबा’ असंच म्हणायचो. आणि बाबाच्या मागे त्याचा उल्लेख बाबा रोड असं करायचो.. म्हणजे सगळेच जण तसं म्हणायचे. तो रोडच्या शीटा भरतो म्हणून हे नाव…. ‘ बाबा रोड. ’

रिक्षा बाबाची नव्हती.. मालक कुणी वेगळाच होता.. आणि हा मालक नेहमी बदलत जायचा.. कधी याची रिक्षा.. कधी त्याची. मालकाशी पटलं नाही की बाबा ती रिक्षा सोडुन द्यायचा.. आश्चर्य म्हणजे त्याला लगेचच दुसरी रिक्षा मिळायचीही.

स्वतःची रिक्षा घेण्याएवढी बाबाची परीस्थिती नव्हती. पण आहे त्यात बाबा सुखी होता. जेवढं‌ मिळायचं त्यात तो भागवायचा. त्याला बायको होती.. एक पोरगाही होता.. म्हातारे वडील होते. त्याच्या संसाराला लागेल तेवढं त्याला मिळायचं.. बाकी छानछौकी.. नशा पाणी करायला त्याच्या कडे पैसा नव्हताच…

त्याची चैन म्हणजे कधीतरी बाहेर गाडीवर अंडा भुर्जी पाव खाणं.. एवढंच.

बाबाच्या खिशात नेहमी चॉकलेट असायचे.. रिक्षात एखादं लहान मुलं बसलं की तो त्याला चॉकलेट द्यायचा.. एकदा त्यानं मलाही चॉकलेट दिलं.. मी काही लहान नव्हतो.. बाबाला म्हटलं..

‘अरे मला कशाला?’

‘घे रे.. तोंड गोड कर..’ 

तर असा हा बाबा रोड.. एकदा नेहमीप्रमाणे त्याचं रिक्षा मालकाशी भांडण झालं.. ते काम सुटलं.. पण महीना दोन महिने झाले.. दुसरी रीक्षा मिळेनाच.. जसे जसे दिवस जाऊ लागले.. तसा बाबा अस्वस्थ होऊ लागला.. पैसा तर लागतोच ना! आणि बाबाचं असं कितीसं सेव्हिंग असणार?दोन चार महिने पास केले.. मग पुढे?

मला हे समजलं.. आणि त्याच्या घरी जायचं ठरवलं. तसं मी जाऊन काहीच होणार नव्हतं, मी काही त्याला पैसे काढून देणार नव्हतो. पण तरी गेलो.

शालीमारवर ‘शिटा’ भरणारा बाबा आणि घरातला बाबा.. दोन्ही वेगळी रुपे होती. शालीमारवरचं वातावरणच वेगळं.. सगळे रिक्षावाले.. आजुबाजुला फेरीवाले.. त्यांची टपोरी भाषा.. बाबा जेव्हा त्यांच्यात असायचा तेव्हा त्यांच्यासारखाच असायचा.

बाबाच्या घरचं वातावरण एकदम वेगळं.. सोवळं ओवळं.. कर्मकांड.. सगळंच होतं. भद्रकाली मंदिराजवळ असणारं बाबाचं घर म्हणजे वाडाच होता.. वडिलोपार्जित. बाहेर छोटंसं अंगण.. आणि एक औदुंबराचं झाड. बाबाचे वडील दत्तभक्त.. आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो.

त्याच्या घरचं देवघर पण खुप मोठ्ठं होतं.

अण्णा रिटायर्ड होते.. एका दवाखान्यात औषधांच्या पुड्या बांधायचं काम करायचे ते.. आयुष्यभर त्यांनी तेच काम केलं. आता ते सत्तरीत होते.. त्यांनी पेन्शन बिन्शन नव्हती. त्यांना वाटायचं बाबानं शिकुन नोकरी करावी.. पण बाबाचं डोकं नव्हतं..

असाच कधीतरी वयाच्या विशीत मित्राच्या ओळखीने रीक्षा चालवायला लागला.. आणि मग तोच त्याचा व्यवसाय झाला.. पण दुसर्याची रिक्षा चालवण्यातच त्याचं आयुष्य चाललं होतं.. अजुन स्वत:ची रिक्षा त्यानं घेतली नव्हती.

मी बाबाच्या घरी गेलो तेव्हा अण्णांची आरती चालू होती.. माझ्या लक्षात आले.. आज गुरुवार.. दर गुरूवारी अण्णा संध्याकाळी दत्ताची आरती करायचे.. आणि आरती झाल्यावर हाक मारुन पेढ्याचा तुकडा सर्वांना द्यायचे.. सर्वांना म्हणजे जे काय दोन चार जण असतील त्यांना.. एका वाटीत मोजुन चार पेढे असत नैवेद्याचे. दत्ताचा चांगला मोठा फोटो होता त्यांच्या देवघरात. गुरुवारी त्याला चांगला मोठा हार घातलेला असायचा. अण्णा आपल्या हातांनी तो हार बनवायचे. बुधवारी संध्याकाळी फुल बाजारातुन ते फुलं आणत. कधी झेंडु, कधी शेवंती, उन्हाळ्यात मोगरा.. तुळशीचा वाटा.. रात्री जेवण व्हायच्या आधी ते हार करायला बसत. अख्खा पेपर पसरुन त्यावर फुलं ओतत.. बाजुला तुळशीचा वाटा. दोर्यात सुई ओवुन एक एक फुल ओवत. मध्ये वेगळ्या रंगाची फुले.. कधी तुळशीची डगळी.. हार झाल्यावर मग गोंडा.. तोही कधी तुळस गुंफलेला.. तो हार सकाळी पुजेच्या वेळीच घातला जायचा.. मोगर्याचा हार असला की दिवसभर घरात मंद दरवळ जाणवायचा. आत्ताही मी गेलो तर तोच परिचीत दरवळ जाणवला. आत गेलो.. ‘घालीन लोटांगण ‘ सुरु होतं.. थोड्या वेळात तेही झालं.. देवापुढे कापुरार्ती ठेवून अण्णा हात जोडून देवापुढे उभे राहिले.

“महाराज बघा.. तीन महिने झाले पोरगा काम शोधतोय.. काहीतरी करा.. त्याच्याकडे लक्ष असु द्या”.

ही त्यांची एक नेहमीची सवय.. देवाशी.. खासकरून दत्ताशी गप्पा मारायच्या.. तो समोर उभा आहे.. आपलं ऐकतो आहे हीच भावना असायची त्यांची..

अण्णांनी प्रसादाची वाटी उचलली.. पेढ्याचा अर्धा तुकडा करून माझ्या हातावर टेकवला..

“कुठे गेला बाबा?” मी विचारलं.

“असाच कुठेतरी गेलाय.. तिकडे कोणाची तरी रिक्षा आहे म्हणे. “

“खरंतर बाबानी आता स्वतः ची रिक्षा घ्यायला हवी.. “

मी असाच सहजच बोलून गेलो.. पण अण्णा त्याचीच वाट पहात होते जणु.. ते बोलतच सुटले. त्यांचंही हेच म्हणणं होतं.. आता बाबा चाळीशीत आला.. पोरगंही दोन वर्षांनी कॉलेजमध्ये जायला लागेल.. तो खर्च वाढेल. आत्ताच स्वतःची रिक्षा घेतली तरच होईल.

मलाही ते पटत होतं. दोन दिवसांनी मी बाबाला भेटलो.. त्याला समजावलं.. अण्णांनी त्यांचे साठवलेले थोडे पैसे दिले.. बाकी लोन केलं.. आणि एक दिवस बाबा स्वतःच्या रिक्षाचा मालक बनला.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाबानी रिक्षा घरी आणली‌. रिक्षा घ्यायची ठरलं.. आणि मग अण्णांनी मला सांगितलं..

“बाबासोबत रहा.. ते लोन वगैरे करायचं.. कुठल्या बॅंकेचं करायचं.. सुरुवातीला किती पैसे भरायचे ते सगळं तु बघ. मी फक्त पैसे देतो.. बाकी गोष्टीत लक्ष घाल. मला तर त्यातलं काही समजत नाही.. बाबावर पण अशी लोनबीन घेण्याची वेळ कधीच आली नाही. “

लोनचे सगळे सोपस्कार पार पडून आज रिक्षा बाबाच्या वाड्या बाहेर उभी होती. पेढ्याचा बॉक्स.. हार.. फुलं सगळं आणलं होतं. हेमा वहीनींनी.. म्हणजे बाबाच्या बायकोनं रिक्षाचं औक्षण केलं.. पेढे वाटले.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २  ☆ डॉ. शैलजा करोडे

अभिनंदन ! अभिनंदन !!

कलावंत विचार मंचकमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग तिसरा).

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – ३ ☆

(“मी नीताला माहेरपणासाठी घेऊन जाते. तिथे करीन मी तिची ट्रीटमेंट” नीताची आई मीनाक्षी बोलत होती. नीताच्या सासूला तर ते हवंच होतं. आजारी सुनेची सेवा करणं तिला त्रासदायक वाटत होतं. “घेऊन जा तिला आणि चांगली बरी झाल्यावरच पाठवा“.– इथून पुढे – 

नीता आईबाबांकडे आली सगळी स्वप्ने, सगळी आकांक्षा गमावून. ती शून्यात दृष्टी लावून बसायची. ” नीता, चहा घेतला नाहीस तू अजून+. बघ गार झालाय. नवीन चहा करून आणू तुझ्यासाठी ” नीताकडून प्रतिसाद मिळाला नाही तशी आईने तिला हलविले. ” हं, काय, काय झालं आई ” ” बेटा तू चहा प्यायली नाहीस ” ” कशी पिणार ? मला काही आवडतच नाही “. ” असं म्हणून कसं चालेल बेटा. जीवन का कोणासाठी थांबलंय, आणि होय, खेळातला पहिला डावही आपण देवाला अर्पण करतो. मग आयुष्यातला का नाही ? झाडावर अनेक फळे येतात, पण ती सगळी काय खाण्यासाठीच उपयोगी येतात ? काहींचं वार्‍या वादळात, ऊन पावसात नुकसान होतंच ना ? परमेश्वर इतका निष्ठुर नाही, पुन्हा तुझी ओटी भरली जाईल. पुन्हा आनंदाची पावले घरात उमटतील. पण त्यासाठी तू हिंमत धरली पाहिजेस बेटा. असं रडत बसू नकोस, तर तनाने व मनानेही खंबीर हो. मग यश तुझंच आहे “आईच्या शब्दांनी नीतावर जणू जादूच केली. तापल्याने सुवर्ण उजळते तशी नीता या दुःखातून तावून सुलाखून निघाली ती नव्या उमेदीने, नव्या आशेने “

नीता घरी परतली. आता तिचा आत्मविश्वास बराच वाढला होता. अशोकशी तिचे खटके उडत होते, पण ती ही धैर्याने सामोरी जात होती. नीताच्या संसारवेलीवर पुन्हा फुलं उमलण्याची चिन्हे दिसू लागली. नीता स्वतः सुविद्य होती. स्वतःची काळजी घेण्याइतपत आत्मनिर्भर होती. ती स्वतःच सुरूवातीपारून डाॅक्टरांच्या देखरेखीखाली इलाज करवून घेऊ लागली. सातव्या महिन्यात नीता रीतिप्रमाणे माहेरी बाळंतपणासाठी आली. एका सुंदर गोंडस कन्येला तिने जन्म दिला. आई बाबांच्या चेहर्‍यावर हास्य उमललं. नीताच्या सासरी ही बातमी कळविण्यात आली. ती सगळी मंडळी येऊन गेली. मुलगीच असल्याने फारसं कोडकौतुक कोणी केलं नाही.

दोन महिन्यांनी सोनालीला घेऊन नीता घरी परतली. सासूनं तेवढ्यापुरतं स्वागत केलं. नीताला सगळीच घरकामं लगेच सोपविण्यात आली. नीता काम करीत असतांना सासूबाई तेवढा वेळ सोनालीला सांभाळायच्या. आपल्या सोनुलीच्या हास्यात बाललीलांमध्ये नीता रमायची, नव्हे तिच्यासाठी तर ते स्वर्गसुखचं होतं पण अशोक मात्र या स्वर्ग सुखात फारसा सामील कधी झालाच नाही. दिवसेंदिवस त्याची नवरेशाही, हक्क गाजवणं, त्याची क्रूरता वाढतच होती. भरीतभर त्याच्याच आँफिसातील शीतलशी त्याचे सूत हळूहळू जुळू लागले. नीताच्या कानावरही ही बातमी पोहोचलीच. ” कोण आहे ही शीतल ? काय संबंध तिचा तुमच्याशी ? माझ्या संसाराला आग लावणारी ही बया कोण ? ” ” मैत्रीण आहे ती माझी. मी तिच्याशी बोलतो. आम्ही एकत्र काम करतो. एकमेकांची सुखदुःख वाटून घेतो. कधी कधी मी तिला काही भेटवस्तूही देतो. एवढंच. “

” एवढंच ? ही गोष्ट एवढीशी आहे ?तोंड वर करून सांगतात पुन्हा ” ” तूच तर विचारलं म्हणून सांगितलं. मी कुठे तुला सांगणार होतो. आणि कां म्हणून सांगाव ? माझी मर्जी. “

” माझी मर्जी ? देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं लग्न झालंय आमचं. पत्नी आहे मी, अर्धांगिनी तुमची. सुखदुःखात सोबत करण्याची वचने दिलीत आम्ही एकमेकांना. माझ्या अधिकारावर हक्क सांगणार्‍या, माझ्या जीवनात वादळ उठविणार्‍या या घटनेचा मी विचारही करू नये ?

” मग करीत बस ना विचार. तुला रोखलंय कोणी ? “

” ही गुर्मी ? ही मस्ती ? आतापर्यंत मी मुकाट्याने सगळं सहन केलं. आता नाही सहन करणार. तुम्हांला धडा शिकविल्याशिवाय मी गप्प राहणार नाही 

” तुझ्या पापाचा भरलाय घडा

तुला शिकवीन मी चांगलाच धडा “

जा. जा. तुला कोणी रोखणार नाही. जे. जे. करता येईल ते कर. गो नाऊ. गुडबाय. ” अशोकचे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे नीताच्या कानात शिरत होते.

नीता माहेरी परतली एखाद्या जखमी हरिणीप्रमाणे. आईवडिलही एकुलत्या एक मुलीची वेदना पाहून तळमळत होते.

नीताच्या बाबांनी शहरातील नामांकित वकीलाचा सल्ला घेतला. मानसिक व शारीरिक छळासाठी अशोकवर भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 498A खाली गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचे आईवडिलही त्यात सामील होते. तसेच कौटुंबिक हिंसाचार अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांची वरात पोलीस स्टेशनात पोहोचली. नाही म्हटलं तरी अशोकची बदनामी बरीच झाली. वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यानं स्वतःची सुटका करवून घेतली.

कोर्टात केस उभी राहिली, पण नीताकडे पुरेसे पुरावे नव्हते. आईवडिलांना तिने सगळ्या गोष्टी फोनवरूनच सांगितल्या होत्या. लेखी पुरावा कोणता नव्हता. शेजारी साक्ष देण्यास तयार नव्हते. अशोक निर्दोष सुटला. युद्धाला आता तोंड फुटले होते. नीताने पोटगीसाठी कोर्टात दावा दाखल केला. आणि अशोकने सहा महिने विभक्त राहिल्याने घटस्फोटासाठीचा दावा दाखल केला.

नीता अशोकची क्रूरता सिद्ध करू शकली नाही. त्याने तिचा भरपूर मानसिक व शारीरिक छळ केला होता, पण पुराव्याअभावी नीता काहीही सिद्ध करू शकली नाही. ” मला मारहाण होत होती. दरवाजे उघडे ठेवून किंवा शेजार्‍यांना बोलावून तर कोणी मारणार नाही ना ?”

“ठीक आहे मॅडम, ग्राह्य धरु तुमचं म्हणणं. घरात नोकर/चाकर तर होते. त्यांनी तर काही तुमच्या बाजूने साक्ष दिली नाही. ” ” ती माणसे अशोकची आहेत सर. त्यांच्या विरोधात ते साक्ष देतीलच कसे ?” ” साॅरी मॅडम, न्यायदेवता आंधळी आहे. पुरावे हवेत. आणि स्वतःचं म्हणणं केवळ तुम्हीच पटवून देणं कितपत योग्य ? वास्तविकतेसाठी, डोळसपणे विचार करण्यासाठी कायद्याला हवेत पुरावे. तुम्ही तुमची कैफियत मांडलीत पण सिद्ध करू शकल्या नाहीत म्हणून हे कोर्ट अशोकचा डिव्होर्सचा अर्ज मान्य करीत आहे. सोनालीवर हक्क नीताचाच राहिल. अशोकला मात्र पिता म्हणून भेटण्याची परवानगी हे कोर्ट देत आहे.

नीतावर तर हा वज्राघातच होता. पण यातूनही तिला सावरायचे होते ते सोनालीसाठी. कोर्ट कचेरी, भांडणतंटा यातच बारा वर्षाचा कालावधी निघून गेला होता. नीताने आता नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डिव्होर्सी असल्याकारणाने तिला वयोमर्यादेत जवळजवळ नऊ वर्षाची सूट मिळणार होती. नीताला याचा फायदा झाला व तिचे इंडियन ओवरसीज बँकेत सिलेक्शन झाले. नीता स्वतःच्या घट्ट पोलादी पायांवर भक्कमपणे उभी राहिली.

सोनालीचे हे दहावीचे वर्ष होते. आता ती सोळा वर्षाची होती. पित्याला भेटण्यास ती अनुत्सुक असायची. ” मम्मी मी अठरा वर्षांची पूर्ण झाल्यावर मी स्वतःच माझ्या जीवाची मालकीण होणार ना ? कसा काय सांगणार माझा बाप माझ्यावर हक्क् ? मी नाकारेन त्याला. ” नीताने सोनालीला ह्रदयाशी घट्ट कवटाळले. ” खूप मोठी झालीय माझी सोनू “.

लग्नाघरची वर्दळ वाढली होती. वरातीचा घोडा, सुगंधी द्रव्ये, अक्षता, नवीन कपड्यांची सळसळ वाढली होती. आज सोनाली लग्नाच्या बोहल्यावर चढली होती. लग्नघटिका भरली तशी वाजंत्रीने जोरदार दणक्यात वादन सुरू केले. फटाक्यांची आतिषबाजी सूरू झाली. देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं सोनालीनं प्रकाशला वरमाला घातली. कन्यादानासाठी मुलीच्या आईवडिलांनी यावे. ” थांबा गुरूजी, कन्यादान करीन माझी माता. आयुष्यभर तिनंच तर केलं सगळं माझं. मला वाढविलं, संस्कार दिले आणि आज लग्नही. माझी आईच माझा पिता आणि माता आहे. माझ्या पित्याचा काय यात सहभाग ? काय अधिकार त्यांना माझ्या कन्यादानाचा. नकोय मला त्यांचा सहभाग. ” पुढे सरसावलेला अशोक आपोआपच माघारी वळला. जीवनात काय गमावलं याची जाणीव आता त्याला झाली होती पण उशीर झाला होता. वेळ निघून गेली होती. प्रायश्चिप्त करायलाही वेळ नव्हता. आज सोनालीने त्याला चांगलाच धडा शिकविला होता. डोळ्यातील आसवे पापण्यांच्या गजाआड रोखत अशोक लग्नमंडपातून बाहेर पडला होता.

– समाप्त –

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २  ☆ डॉ. शैलजा करोडे

अभिनंदन ! अभिनंदन !!

कलावंत विचार मंचकमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग दुसरा).

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – २  ☆

(नीताचे फायनल इयर होते. परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता, अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता.) – इथून

” उगी उगी बाळ, रडू नकोस. काय झालंय ते मला व्यवस्थित सांग ” नीताने सगळी हकीकत सांगितली.

” बेटा, जीवन हे असेच असते. घर, कुटुंब आम्हां स्त्रियांनाचं सांभाळावं लागतं प्रसंगी नवर्‍याची नवरेशाही ही खपवून घ्यावी लागते. आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, माहेरच्या घराण्याचंही नाव उज्वल करण्यासाठी स्त्रियांना हे हलाहल प्राशन करावंच लागतं बाई. पण तू घाबरू नकोस. एखादं मूलबाळ होऊ दे. तुझा त्रास बराच कमी होईल कारण मूल हे आईवडिलांना जोडणारा एक भक्कम दुवा असतो. पोरी सर्व ठीक होईल. अशोक तर चांगला वागतो ना तुझ्याशी “

” नाही आई, खरं दुखणं तिथेच आहे. अशोकला दारूचं व्यसन आहे आई. कामानिमित्त मित्रांसोबत घ्यावं लागत हे त्याचं सांगणं, ” इट इज अ सोशल ड्रिंक, मी जर मित्रांसोबत प्यायलो नाही तर माझा त्यांच्याशी संपर्क तुटेल व पर्यायाने माझ्या कामावर, माझ्या बिझनेसवर परिणाम होईल. आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी मला हे करावंच लागणार हे तो ठासून सांगतो “. ” असेलही बाई तसं. पण तुला तर तो त्रास देत नाही ना ? ” आई कसं सांगू तुला. रात्री अपरात्री त्याचं येणं. दारूचा तो उग्र दर्प आणि अशा अवस्थेत त्याची पत्नीसुखाची अपेक्षा. किळस येते मला या सर्व गोष्टींची.

नीताची आईसुद्धा मुळापासून हादरली. नीताच्या वडिलांच्या कानावर तिने ही गोष्ट घातली. ” अहो फसवणूक झालीय आपली. आपण चौकशीही नीट केली नाही. मुलाचं शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली आपण, पण ही चौकशी नाही केली. फुलासारखी कोमल माझी नीता. कसं होणार हो तिचं ? ” शांत हो मीनाक्षी. जे घडतंय ते विपरीतच आहे. पण हा प्रसंग संयमानं हाताळायला हवा आम्हांला. नीताला मजबूत बनवा तुम्ही. सबुरीनं घेण्याचा सल्लाही द्या, आणि होय एखादं मूल झालं कि कमी होईल निश्चितपणे तिचा त्रास. “

नीताच्या बि. काॅम फायनल इयरचा निकाल लागला. नीता विद्यापीठात प्रथम आली होती. तिला सुवर्णपदक ही मिळाले आणि या आनंदात आणखी एक आनंदाची बातमीही तिच्या जीवनात आली. नीताला कडक डोहाळे लागले. पाणीही पचेनासे झाले.

” मीनाक्षी मी सांगितलं होतं ना सगळं चांगलं होईल. नीता अशोकमधला दुरावा आता नक्कीच कमी होईल. कुटुंबाची जवाबदारी वाढल्यानं त्याचंही व्यसन कमी होईल. घराची ओढ वाढेल. येणारं हे मूल त्यांच्यातील हा सेतुबंध नक्कीच घट्ट करील. आता तुम्ही आजीबाई होणार. सगळी तयारी आतापासून करायला हवी. ” ” होय आजोबा, मी तर करीनच सगळी तयारी, तुम्हीही हातभार लावा ” ” नक्कीच लावणार. प्रमोशन होणार आहे माझं. मी आजोबा होणार. इवलं इवलं नातवंडं घरात येणार. त्याच्या बोबड्या बोलांनी घरात मधुर वातावरण निर्माण होणार, त्यासाठी मी मदत केलीच पाहिजे. काय पाहिजे तुला, सगळी यादीच करून दे मला. आणून देतो सगळं.

” आतापासून नको काही आणायला. अपशकून असतो तो. बाळ जन्मल्यावरच करा तुम्ही सगळी धावपळ ” म्हणत मीनाक्षी खळखळून हसली.

नव्या जीवाच्या चाहुलीनं नीता मनोमन खूष झाली होती. अंगोपांगी बहरली होती. आपल्या शरीरात एक अंश जोपासत होती. ” खरंच सगळं चांगलं होईल, माझे दिवस बदलतील ” नीताचा आत्मविश्वास वाढला होता. पण स्वप्नरंजन आणि वास्तवस्थितीत फरक असतोच. अशोकची सुधारण्याची चिन्हे दिसेनात. आता तर तो नीताचा मानसिक छळ तर करीत होताच पण शारीरिक हिंसाचारावरही तो उतरला होता. ” काय चुकलं हो माझं ? कां म्हणून तुम्ही असे वागता माझ्याशी ? तुमची सेवा करते. तुमच्या आईवडिलांची सेवा करते ” ” मग उपकार करतेस कि काय आमच्यावर. सुनेचं कर्तव्यच असतं ते. ” ” मी तर माझं कर्तव्य करतेच हो. पण तुम्ही मात्र तुमचं कर्तव्य विसरत आहात. घरात नवीन पाहुणा येणार आहे. मला खूप शारीरिक थकवा वाटतो. काही खावसं वाटत नाही. अन्न पचत नाही. पण तुम्ही डाॅक्टरांकडे नेणं तर सोडाच साधी माझी मनधरणीही करीत नाहीत ” ” आम्ही तुझी काळजी घेत नाही हे कसं काय म्हणू शकते तू ?” ” कसं काय म्हणजे ? खरं तेच तर सांगितलंय. ” ” थोबाडं फोडून टाकीन पुन्हा वर तोंड करून बोलशील तर ” म्हणत अशोकने एक सणसणीत तिच्या गालावर ठेवूनच दिली. नीता कोलमडली. बाजूच्या सोफासेटचा तिनं आधार घेतला म्हणून बचावली, नाहीतर खालीच कोसळली असती. अशोक तडक खोलीतून निघून गेला. नीता मुसमुसत राहिली.

अशोकचं नीताचा छळ करणं चालूच होतं. त्याचे आईवडिलही त्याचीच री ओढायचे. अशा स्थितीत नीतानं करावं तरी काय ? आईवडिलांना किती टेन्शन देणार. याचा व्हायचा तोच परिणाम झालाच. शारीरिक आणि मानसिक छळापायी एक दिवस नीताच्या पोटात तीव्र वेदना उठल्या. नीता धाय मोकलून रडू लागली तेव्हा तिच्या सासूबाईनं तिला दवाखान्यात नेलं. नीताचा रक्तस्त्राव सुरू झाला होता आणि रक्ताच्या या प्रवाहात तो मांसल गोळाही केव्हाच निसटला होता.

” किती उशीर केलात तुम्ही ? आणि मुलगी गरोदर असतांना डाॅक्टरांचा सल्ला घेणं, नियमित गर्भाची तपासणी करणं, त्याची वाढ योग्य दिशेनं होतेय कि नाही हे पाहाणं, आईच्या शरीरात काही कमतरता असेल तर त्याची भरपाई करणं आणि जोडीला औषधांची मदत घेणं, हे तुम्हांला माहित नाही काय ?तुम्ही तर मोठ्या आहात ना घरातील, दोन मुलांच्या आई. मग सुनेकडे लक्ष देऊ नये ? आता नुकसान कोणाचं झालं ? तुमच्याच वंशाचा अंश होता ना तिच्या पोटात. जन्माला येणारा जीव जन्माआधीच गेला की निघून “.

नर्स पेशंटला आँपरेशन थिएटरमध्ये घ्या. अँनेस्थेशियासाठी डाॅ. विमलला फोन करा. गर्भाचं सॅक काढावं लागेल. पोटातील सफाई व्यवस्थित करावी लागेल. जा लवकर कर सगळं “. म्हणत डाॅ. शुभाने नर्स मीराला पाठविले.

नीताच्या दुःखाला पारावार नव्हता. जन्माआधीच तिच्या पोटातील नवांकुर निघून गेला होता. रिते पोट, रिते शरीर, रिते मन घेऊन नीता घरी परतली ती जणू दुखणं घेऊनच. तिला जेवण आवडत नव्हते. पोटात अन्न नसल्याने सारखे चक्कर येत असत.

” मी नीताला माहेरपणासाठी घेऊन जाते. तिथे करीन मी तिची ट्रीटमेंट ” नीताची आई मीनाक्षी बोलत होती. नीताच्या सासूला तर ते हवंच होतं. आजारी सुनेची सेवा करणं तिला त्रासदायक वाटत होतं. ” घेऊन जा तिला आणि चांगली बरी झाल्यावरच पाठवा “.

— क्रमशः भाग दुसरा

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

अभिनंदन ! अभिनंदन !!

कलावंत विचार मंचकमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग पहिला).

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – १  ☆

“काय करताय तुम्ही. पेपर काय वाचनासाठी घेतला. मी बसलेय इथे एकटी. सोडा तो पेपर आधी. चला गप्पा करूयात आपण ” ” घे बाई नीता, ठेवला पेपर. या क्लिअरींग हाऊसमध्ये विशेषतः दुपारच्या वेळी फार कंटाळा येतो. पेनड्राइव्ह आणि शीट मिळेपर्यंतचा वेटिंग पीरेड फारच कंटाळवाणा होतो. टाईमपास म्हणून वर्तमान पेपर आणलं होतं. सकाळी कामाच्या घाईगर्दीत संपादकीय किंवा इतर महत्वाच्या बातम्या बारकाईने वाचल्या जात नाहीत. म्हटलं चला तेवढा वेळ सत्कारणी लागेल. बोल काय म्हणतेस ” ” काही नाही ” इतक्यात नीताच्या Face book वर मेसेज आला. ” बघा मॅडम फेसबुक वर किती छान चित्र अपलोड केलंय. एक गाय तोंडाने बोअरवेलचा दांडा उंच करीत होती. , त्यातून जी पाण्याची धार मिळत होती, लगेच ग्रहण करीत होती.. पुन्हा दांडा वर करणे, नळातून पाणी येणे आणि तिने ते प्राशन करणे, हा तिचा संघर्ष व्यवस्थित चित्रीत केलेला होता. ” होय गं बाई, मुक्या जनावरांनाही पाण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो आणि ते ही कसे यातून मार्ग काढतात. सिंपली मार्व्हलस ” मी प्रतिक्रिया दिली. आणखी बघा किती नवीन नवीन, सामान्य ज्ञानावर आधारीत माहिती ही मिळते. या माध्यमातून अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतची माहिती तर मिळतेच पण या तंत्र ज्ञानाने जग जवळ करण्याची किमया ही साधलीय. आमच्या व्हाॅटस् अँप अँप्लिकेशनवर आम्हां मैत्रीणींचा बराच मोठा ग्रुप आहे. माझ्या वहिनी, मामे वहिनी, इतर नातेवाईक, फुरसतीच्या वेळी आमच्या मग गप्पा रंगतात या माध्यमातून. भाच्यांचे फोटो पाहाणे, लहान मुलांच्याही गप्पा सुरू होतात आणि एकमेकांना भेटल्याचा आनंद होतो. ” ” होय नीता, मोबाईल, फेसबुक, व्हाॅटस् अप मुळे जग खरंच जवळ आलंय. एकमेकांशी संपर्क वाढलाय. जनजागृती, विचारजागृती वाढलीय. आता बघ ना 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकांचंच उदाहरण घेऊ या. पाचही चरणातील मतदानात प्रत्येक राज्याची टक्केवारी वाढलेली दिसतेय. लोकांना मतदानाचं महत्व पटू लागलेलं दिसतंय. मतदान केल्यास आपल्याला पाहिजे ते सरकार निवडून देऊ शकतो याची जाणीव लोकांमध्ये झाली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या या माध्यमांनी हे काम चोखपणे केलं आहे. ” ” होय मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही ” इतक्यात नीताच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला. “होय आई, तू चहा ठेवून दे. मी येतेय दहा मिनिटात. चहा घेतला कि लगेच आँफिसात जाईन ” एव्हढ्यात प्रकाशने पेनड्राइव्ह व शीटचे वाटप केले. नीता व मी बोलत बोलत क्लिअरींग हाऊसच्या बाहेर पडलो ” चला ना तुम्हीही माझ्या घरी. चहा घेऊ आणि लगेच या तुम्ही ” ” अगं नीता मला स्टेट बँकेत टी. टी. घेऊन जायचीय. वेळ थोडासाच शिल्लक आहे. अगदी डाॅट साडेचार वाजता RTGS स्विकारणं बंद करतात ती माणसे. ओ के. बाय, भेटू पुन्हा ” मी माझ्या आँफीसकडे वळले.

नीता गौरवर्णी, मध्यम बांधा, भावपूर्ण बोलके डोळे, काळ्याभोर केसांचा पोनीटेल वळलेला, मॅचिंग ड्रेसवर तशीच टिकली, बांगडी, केसांचा बो सुद्धा त्याच कलरचा, परफेक्ट मॅचिंग सांभाळणारी, हसरी, बोलकी, कोणालाही आपलंस करून घेणारी, वयाची पस्तीशी ओलांडून चाळिशीकडे झुकलेली एक मध्यमवयीन यौवना होती. तिने समाशोधन गृहात ( क्लिअरींग हाऊस ) पाऊल ठेवलं कि चैतन्याला उधाण यायचं. क्लिअरींग हाऊसमध्ये इतर बँकांचे प्रतिनिधीही गप्पांमध्ये सामील होतं. त्यांच्या छेडछाडीला नीताही तेवढ्याच खेळकरपणे उत्तरे द्यायची. हास्याचे फवारे उडायचे. आणि बेरीज वजाबाकीच्या, आकडेमोडीच्या आमच्या कामातही एक चैतन्य, एक उभारी जाणवायची. “

” काय गं नीता, आज थकल्यासारखी दिसतेस. बरं नाही का तुला ?” ” नाही मॅडम, बरं आहे मला. प्रियंकाची परीक्षा सुरू आहे. रात्री थोडावेळ तिचा अभ्यास घेते. माझ्या मोलकरणीचा हात मोडलाय म्हणून सुटी घेतली आहे तिने. घरातील सगळी कामे करतांना दमछाक होते माझी त्यामुळे शारीरिक थकवा जाणवतोय. आई नासिकला भावाकडे गेली आहे, वहिनीचा पाय मोडलाय म्हणून. घरी मी आणि प्रियंकाच आहोत. परवा बाबा येतील आमच्या मदतीला. तोपर्यंत ओढाताण आहे ” ” अगं मग रजा टाकायची ना दोन दिवस. कशाला ताण करून घेतेस. ” मॅडम, वर्षभरात लग्न, सण, समारंभ, दुखणी खुपणी यातही बर्‍याच रजा जातात म्हणून या कामासाठी मी काही रजा घेतली नाही ” ” ओ. के. काळजी घे स्वतःची. नेहमी हसरी बोलकी तू आज एकदम गप्प वाटलीस म्हणून बोलले मी. खरच जीवनातील एवढे कटु अनुभव, कठीण समरप्रसंग झेलून तू हसत खेळत राहातेस ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. आपले दुःख कुरवाळत न बसता त्याला सामोरं जाणं हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. खरंच सर्व महिलांसाठी तू एक उत्तम उदाहरण आहेस. अभिमान वाटतो तुझा मला.

” काय करता मॅडम, जीवन मोठं क्षणभंगूर असतं आला क्षण आपला म्हणायचा आणि साजरा करायचा, हे तत्वज्ञान शिकवलंय आईने मला तिची सोबत नसती तर केव्हाच कोलमडून पडले असते मी ” ” खरंय, खरंय तुझं म्हणणं ” बोलत बोलत मी ही माझ्या आँफीसकडे वळले.

नीता इंडियन ओव्हरसीज बँकेची कर्मचारी तर मी पंजाब नॅशनल बंकेची कर्मचारी. शहरातील समाशोधन गृहात कामाच्या निमित्ताने आमच्या भेटी होत. या भेटीतूनच मैत्रीचे दृढ नाते निर्माण होत गेले.

नीताच्या घरी आई आणि तिची मुलगी प्रियंका. ः भाऊ व वहिनी नासिकला. त्यांना दोन मुले,. मुले सांभाळण्यासाठी तिचे बाबा नासिकला राहात. बाबा भावाकडे तर आई नीताकडे अशी वाटणी झालेली.

वयाच्या अठरा/एकोणीसाव्या वर्षीचं नीताचं लग्न झालेलं. मुलगा चांगला शिकलेला उच्चपदस्थ अधिकारी. सांगून स्थळ आलेलं. नीताचंही बि. काँम च शिक्षण चालू होतं. मुलाच्या घरी आईवडिल एक लहान बहीण. कुठे कमतरता भासावी असे स्थळ नव्हतेच मुळी. लग्नाची बोलणी झाली आणि एका शुभमुहूर्तावर नीताने अशोकच्या जीवनात प्रवेश केला. एकुलती एक कन्या असल्याने नीताच्या वडिलांनीही सढळ हस्ते खर्च केला होता.

नव्या नवलाईचे नऊ दिवस. नवीन सुनेचे कोडकौतुक धार्मिक सण, समारंभ, देवी देवतांना नवपरिणीत जोडप्याची हजेरी, यात महिना केव्हा गेला कळलेही नाही. नव जीवनाची सोनेरी स्वप्ने सजविण्यात रममाण नीतावर मात्र कुटुंबातून बरीच बंधने येऊ लागली. सुनेने घरातील सर्व कामे लवकर उठून करावीत, नवर्‍याला हवं नको ते पहावं, सासू सासर्‍यांची सेवा, जेवणासाठी नवर्‍याची वाट पाहात थांबणं, याबरोबरच तिने शेजारी पाजारी कोणाशी बोलू नये. घरी कोणी नवीन सुनेसाठी आले तर तेवढ्यापुरते बोलून तिने तेथून निघून जावे. असे दंडक तिला घालून देण्यात आले.

नवीन घर, नवीन माणसे, आता आपण माहेरी नव्हे तर सासरी आहोत. माहेरपणाचे स्वातंत्र्य इथे कसे मिळणार ?अशी मनाची समजूत घालून नीता जीवन व्यतित करीत राहिली.

नीताचे फायनल इयर होते. परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता, अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता.

क्रमशः भाग पहिला

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोकळा श्वास ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

अभिनंदन ! अभिनंदन !!

जेष्ठ लेखिका, कवयित्री, गझलकार आणि वक्ता अशी ओळख  असलेल्या आपल्या समूहातील प्रा. सुश्री सुनंदा पाटील यांच्या, ज्येष्ठ नागरिकांवर आधारित कथा असलेल्या “पाचवा कोपरा” या कथासंग्रहासाठी , विदर्भातील प्रतिष्ठित मानल्या जाण्याऱ्या  साहित्य विहार संस्थेच्या वतीने “ सर्वोत्कृष्ट कथासंग्रह ” हा  राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.. आपल्या सर्वांच्या वतीने सुश्री सुनंदा पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कथा –    “मोकळा श्वास”

“देवी आजवर मी तुला काहीच मागणं मागितलं नाही. तू जे आणि जसं दिलंस ते स्विकारलं मी. कधीच तक्रार केली नाही. पण आज एक मागणं मागते आहे. ते तू देशीलच. खरंतर तुला हे वेडगळपणाचं वाटेल, पण वाटू दे. हरकत नाही. यात माझा स्वार्थही वाटेल, तरीही हरकत नाही. पण माझी एवढी मागणी पूर्ण करच. “

एवढं बोलून आक्का देवीपुढे डोळे मिटून उभ्या राहिल्या. तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहिल्या. सोबत असलेल्या सुमनताईंना याचं खरंतर खूप आश्चर्य वाटलं. देवधर्म करणाऱ्या पण नवसा सायासांवर कधीही विश्वास न ठेवणाऱ्या आक्का आज काहीतरी मागत होत्या.

“आक्का काय मागितलं हो एवढं देवीकडे ? “

मंदिरातून बागेत येताच सुमनताईंनी आक्काला विचारलं. रोज इव्हिनिंग वॉकला त्या यायच्या दोघीही. मुलं, सुना सध्या लॉक डाऊन मुळे घरूनच काम करीत होती. सायंकाळी ६च्या सुमारास आक्कांना वॉकला जायची सध्या घरून परवानगी मिळाली होती. नातवंडांची ऑन लाईन शाळा. संध्याकाळी मुलंही घराबाहेर पडू लागली होती आताशा. मुलांच ऑफीस घरून जरी असलं तरी ७ पर्यंत असायचंच. आणि डॉट ७ ला किंवा त्याच्या आत म्हणजे सातच्या आत आक्कांना घरी परतावं लागायचं. कारण रात्रीचं जेवण आठ म्हणजे आठला तयार असावं लागायचं.

” आक्का काय विचारतेय मी? काय मागितलंत देवीकडे ? अर्थात आता तसं मागण्यासारखं काय आहे म्हणा ! हुशार कर्तबगार मुलगा, सून. पैशाची काहीच कमतरता नाही. तुम्हा दोघांची पेन्शन….

“हं “

“काहो ? “

” काही नाही. सगळीच सुखं पैशानं मिळाली असती तर आणखी काय हवं होतं ? “

आक्कांच्या बोलण्यातली व्यथा सुमनताईंना जाणवली. पण त्या गप्प राहिल्या. सांगावसं वाटलं की आक्का स्वतः सांगतील, हे त्यांना ठावूक होतं. दोघीही बागेतल्या एका बेंचवर टेकल्या.

नऊवार, आणि साडीतल्या निवृत्त स्त्रिया केंव्हाच मागे पडल्या होत्या. याही दोघी त्याला अपवाद नव्हत्या. छानपैकी सलवार सूट आणि दुपट्टा या वेषात त्या वॉकला येत असत. आधी सोसायटीच्या परिसरातच त्या फिरायच्या. पण दोन दिवसांपूर्वीच मंदिरं मोकळी झाली होती. म्हणून आज मंदिरातून त्या जवळच्याच बागेत आल्या होत्या.

त्या सुमनताईंशी बोलू लागल्या.

” सुमनताई, निवृत्ती नंतरचं जगणं म्हणजे प्रचंड तडजोड असते, नाही का ? “

” खरंय आक्का. “

” सुमनताई, आपणही तरूण होतो. तीस पस्तीस वर्ष नोकरी केली. त्यावेळी शिक्षणाचे दीर, नणंदा, त्यांची लग्न कार्य, सासू सासरे, आापली मुलं, घरचे कूळ कुळाचार, आला गेला सर्व सांभाळलंच ना आपण. “

” तर काय? केवढी तारेवरची कसरत होती. वरून सोवळं ओवळं ! आंघोळ करून नंतरच स्वैंपाक. साऱ्यांचे खाणे पिणे, डबे करून कसंबसं आपलं आटोपून बस गाठायची. तेही दुपारच्या जेवणासाठी कूकरची तयारी करूनच “

“होय ना ! मस्टर आत जायच्या आधी सही झाली की मिळवलं. ” 

” मग जरावेळ फ्रेश होणं, चहा आणि काम एके काम. “

“हो ना. काम लवकर आटोपून परत घर गाठायचं. मधला लंचब्रेक. शेअर करून खाल्लेल्या भाज्या. कसे गेले ते दिवस कळलंच नाही. “

” हो त्यातूनही ऑफिससाठी काहीतरी करायचंच ही इच्छा. शिवाय आपल्या कला जोपासल्या आपण. छंद, जपले. लेखन, वाचन, स्पर्धा सारंच केलं की.

 ” तरीही तोल जाऊ दिला नाही कुठे. भांड्याला भांडं लागलं असेलही, पण आवाज घरातच राहिले. लग्न कार्य, तीर्थयात्रा यासाठी सासू सासऱ्यांना पाठवलं. मी सुटी काढून घरी राहिले तेव्हा. कितीतरी वेळा. “

” तेच तर. पण आता बदललंय सारं. “

” आपलं घर, मुलं सासू सासरे सांभाळतात याचे उपकार मानणं नाहीच. तर ते त्यांचं कर्तव्यच आहे, ही भावना आलीय. “

”आपली मुलं म्हणून आपण करतोच. पण काळ बदललाय हे नक्की. सतत दुसऱ्यांशी तुलना केली जाते. अमुक आजी किती कामं करतात. कशा ठणठणीत आहेत वगैरे. दर सहा महिन्यात डॉक्टर व्हिजिट, चेक अप. जरा अप डाऊन झालं की सारखे खाण्यवर वागण्यावर निर्बंध. पण खरं सांगू, यात काळजीपेक्षा स्वार्थच अधिक दिसतो मुलांचा. चालत्या गाडीला वेळेवर तेल पाणी करतात ना, तसं वाटतं हे जपणं. अहो सकाळ पासून रात्रीपर्यंत हात रिकामा राहत नाही.

आजकाल तर काहीतरी नवीनच सुरू झालंय. दुपारी मुलं झोपली की, रात्री ती लवकर झोपत नाहीत. म्हणून आपण त्यांना जागवत ठेवायचं. शेवटची वामकुक्षी कधी घेतली हेही आठवत नाही आता.

आता काळा प्रमाणे चालत आहोत. तर मोबाईल, लॅपटॉप हातात जरी घेतला तरी सूनबाईचं डोकं ठणकतं. सतत हे काय म्हणून. आता त्यांना कसं पटवून देणार की, दोन पिढ्यांमधे फरक पडतोच म्हणून. नवीन पिढीच्या विश्वातलं आपाल्याला फारसं कळत नाही. मग समवयस्कांसोबत जरा गप्पा माराव्याशा वाटल्या, काही विचार शेअर केलेत तर काय बिघडलं ? आणि साऱ्यांचं सारं नीट करूनच आपण आपले छंद जोपासतो ना ? नोकरीत असताना या गोष्टींना वेळच नाही देता आला.

घरचं अर्थकारण, वेळ, मुलांच्या परीक्षा यात ना प्रवास केला, ना कधी चित्रपट बघता आले. ना भाषणं ऐकली ना संगीताचे कार्यक्रम. आता करू म्हटलं तर पुन्हा तेच. वेळ नाही.

खरंच कळत नाहीय, की वयाच्या साठ ते सत्तर मधे हे नाही करता आलं तर केव्हा करणार?

एकाच्या किवा फार तर दोघांच्या तुटपुंज्या कमाईत आठ दहा लोकांना सांभाळलं. आज चौघांच्या कमाईत एक बाळ सांभाळणं जड जातंय यांना “

“पण आज काय घडलं ? खूप अस्वस्थ वाटताय ! “

आक्का बोलत्या झाल्या.

काल रात्री आक्कांचा डोळा लागतो न लागतो, त्यांना बेड हलतोय असा भास झाला. पडल्या पडल्याच त्यांनी लाईट लावला. वसंतराव, त्यांचे मिस्टर, एका नामांकित कंपनीचे निवृत्त अधिकारी चक्क रडत होते. त्यांना बसतं करून आक्कांनी पाणी दिलं. विचारलं 

‘काय झालं ‘ ?

” मधू, आपण जाऊया दुसरीकडे. आपल्या गावी. ‘

” अहो हे काय मधेच ? “

‘हो. लगेच जाउया “.

” पण झालंय काय ? “

जरा सावरत वसंतराव बोलले.

” आज सूनबाई ओरडल्या माझ्यावर. “

” काय ? आणि कशासाठी ? “

” अगं तू सुमनताईंकडे गेली होतीस. गुरूवारच्या हळदी कुंकवाला. दुसऱ्या माळ्यावरचे विजयराव आले होते घरी. आणि आम्ही टी. व्ही. बघत बसलो. जुनं राजकपूरचं पिक्चर बघत. सहज तिला आवाज दिला, आणि चहा कर म्हटलं. तर खूप तोंडसुख घेतलं माझ्यावर. “

” म्हणजे ? “

” आधी रिकामटेकडे म्हणून भलावन झाली. टीव्ही चा मोठा आवाज, मुलं अभ्यास कशी करतील इथून घसरत गाडी आपल्या बचतीवर आली. आपण आयुष्यभर मजा केली. पैसा सांभाळून ठेवला नाही. घर नाही. एक ना दोन. दुसऱ्यांच्या समोर हा पाणउतारा नाही गं सहन झाला. “

‘ म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात. भूक नाही म्हणून. जेवला पण नाहीत. “

“हं. ‘

” हद्द झाली आता. आणि आपले चिरंजीव ? काही बोलला नाही तो ?”

” त्यानेही तिचीच री ओढली ! “

आक्कांना पण कळेना काय करावं ते? गावचं घर होतं. पगारातून चार पैसे मागे टाकून बांधलेलं. पण निवृत्ती नंतर या मुला जवळच रहायचंय. त्याला आपली मदत, आणि आपल्याला त्याची. या विचारात असताना, एका बेसावध क्षणी गावचं घर विकून तो पैसा मुलाला फ्लॅट घ्यायला दिला होता. “समोरचं ताट द्यावं पण, बसायचा पाट देऊ नये ‘ असं म्हणतात. पण तेच वसंतरावांनी केलं होतं.

आक्का रात्रभर अस्वस्थ होत्या. त्यांची मदत होत होती घरात, म्हणून सून फारसं बोलत नसे. अर्थात वय झाल्यावर त्यांच्याही बाबतीत हे घडणारच होतं. पण सध्या काळजी वाटत होती ती म्हाताऱ्या नवऱ्याची.

त्यांना किचनमधे प्रवेश नव्हता. साधा चहासुद्धा कुणी दिला तरच मिळायचा. फ्रीजला हात लावायचा नाही. घरातले डबे उघडून काही फराळ करायचा नाही. आणि बाहेर तर काहीच खायचं नाही.

सूनवासाची ही नवीन पद्धत आता रूढ होत चालली होती. बाईचं बरं असतं. म्हातारपण आलं तरी तिला किमान किचन मधे प्रवेश असतो. हळदी कुंकासारखे कार्यक्रम असतात. शिवाय एखाद्या घटनेचं खूप वाईट वाटलंच तर बाई रडून मोकळी होते. पुन्हा नवीन अश्रू जमा होण्यासाठी डोळ्यात नवी जागा तयार होते.

पण पुरुषांचं तसं नसतं. अश्रू आतल्याआत साठवून ते अधिक दुर्बल होतात. म्हातारपणी एकटी बाई जगू शकते, पण एकट्या पुरुषाला म्हातारपण काढणं खूप कठीण जातं.

आज आक्का म्हणूनच मंदिरात आल्या होत्या. देवीला त्यांनी मागणं मागितलं होतं.

” आई, प्रत्येक स्त्री अहेवपणी मृत्यू यावा म्हणून आयुष्यभर प्रार्थना करते. हा खरं तर तिचा स्वार्थच आहे. बायको शिवाय नवर्‍याची काळजी कुणीच घेऊ शकत नाही. मी असतानाच यांचे असे हाल होत आहेत, तर पुढे काय? त्यांच्या हाल अपेष्टांचं भविष्य मला स्पष्ट दिसतंय.

म्हणूनच माते माझ्यावर एवढी दया कर. “माझ्या आधीच यांना मृत्यू येऊ दे “. एवढंच माझं मागणं पूर्ण कर. ” सुमनताई हेच मागणं मागितलं मी देवीजवळ !”

“का ऽ ऽ य ? वेड्या झालात की काय आक्का ? अहो नोकरीत असताना केवढ्या तडफदार होतात ? आणि आजही आहात, हे विसरू नका ! बराच वेळ आपण इथे मंदिरात बसलोय. जरा फिरून येऊ. “

फिरता फिरता सुमनताई आणि आक्का बोलत होत्या त्यात एक प्लॅन आकार घेत होता. दोघीही फिरून घरी आल्या.

आककांनी बघितलं, दिवा न लावता वसंतराव हॉलमधे सोफ्यावर बसले होते. त्यांना कळत होतं की वसंतराव स्थीर नाहीत. आता फक्त बायको नाही तर त्यांची मैत्रीण व्हायची गरज होती. घरातली इतर मंडळी यायची होती, सायंकाळच्या जेवणासाठी त्यांनी कूकर लावला. भाजी कोशिंबिर केली. वरणाला फोडणी घातली. शिरस्त्या प्रमाणे आठला जेवण केलं आणि आपल्या रूममधे निघून गेले. काही वेळाने मुलगा, सून नातवंडं आल्याची चाहूल लागली. पण हे दोघंही शांतच होते. रात्री आक्का आणि सुमनताई यांचं बोलणं त्यांनी वसंतरावांना सांगितलं. त्यांनाही ते पटलं. पण प्रश्न पैशांचा होता. ” बघू ” म्हणून दोघेही झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी आक्का आणि सुमनताई बँकेत गेल्या. त्यांची एक मैत्रीण तिथे होती. गृह कर्जाची चौकशी केली. आक्का आणि वसंतरावच्या पेन्शन मधे वीस लाखांपर्यंत कर्ज बसत होतं. दोघींनाही समाधान वाटलं ! 

मुंबई, पुणे, ठाणे इथे एवढ्या पैशात काहीच होणार नव्हतं. सुमनताईंनी काही लोकांशी संपर्क साधला होता. आजकाल छोटया शहरातही फ्लॅट स्कीम होऊ लागली होती. तिथे यांच्या पैशात एका बेडरूमचा फ्लॅट मिळू शकणार होता. सुमनताई आणि आक्का वसंतराव यांनी निश्चय केला. दोन दिवसांनी “आम्ही जरा फिरून येतो “असं सांगून ते कोकणात आले. आणि तिथल्याच बँकेत संपर्क साधला. त्यांची पेन्शन, आय टी रिटर्न्स सर्व नियमित असल्याने काही प्रश्नच नव्हता. फक्त मेडिकल रिपोर्टस हवे होते. तेही नॉर्मल आले. त्यांना बावीस लाख कर्ज मिळू शकत होतं. फ्लॅटची किंमत चोवीस लाख होती. मात्र हिंमत करून त्यांनी फ्लॅट बुक केला.

सोन्याच्या चार बांगड्या, दोन पाटल्या यावर कर्ज घेऊन डाऊन पेमेंट केलं. सुमनताईंच्याच बहिणीकडे उतरल्याने त्यांचीही मदत होत होती. फ्लॅट रेडी पझेशनमधे होता. मात्र लोन साठी पंधरा दिवस लागले.

आणि तो दिवस उजाडला. आक्का आणि वसंतराव यांच्या हातात “स्वतःच्या घराची किल्ली होती. पेपर्स मात्र बँकेत होते. “

बॅगमध्ये जेमतेम दोघांचे कपडे होते. सामान काहीच नव्हतं. पण नुकतीच पेन्शन झाली होती आणि या महिन्यात EMI येणार नव्हता. जरा स्पेस होती म्हणून सर्वात आधी गॅस आणि काही जुजबी सामान त्यांनी घेतले. साधीशीच पूजा करून गृहप्रवेश केला.

काही सामान कागदपत्रे आणायला हवी होती. वसंतरावांची इच्छाच नव्हती मुंबईला जाण्याची. पण नाईलाजाने ते गेले शनिवार रविवार बघूनच. मुलगा आणि सुनबाईने ” प्रवास कसा झाला वगैरे जुजबी चौकशी केली. आक्कांनी लगेचच आपली बॅग भरायला घेतली. कागदपत्रे आणि काही फाईल्स, कपडे एवढेच ! आई बाबांकडे फारसे लक्ष द्यावे असं काही घडलंच नाही. नेहमीप्रमाणे रात्रीची जेवणे झाली. वसंतराव खोलीत निघून गेले. आक्कांनी लेका सुनेला हॉलमधे बोलावलं. म्हणाल्या,

” मुलांनो आज आम्ही दोघेही जेष्ठ नागरिक आहोत. वयस्क झालो आम्ही, पण जिवंत असल्यामुळे अजूनही भावभावना आहेत आम्हाला. आम्ही तुम्हाला जन्म दिला म्हणजे उपकार केले नाहीत हे कळलंय ! तुमच्या अभ्यासासाठी, आजारपणात आमच्या रात्री घालवल्या. ते आमचं कर्तव्यच होतं. तुमच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आमच्या इच्छांना मुरड घातली, तेसुद्धा आमची जबाबदारी म्हणूनच. तुम्हाला पैशाची गरज होती म्हणून पी. एफ. दिला. गावचं राहतं घर विकून पैसा दिला. आम्ही स्वत:हून मुलांची जबाबदारी घेतली. मला कळतं की, एका घरात भांड्याला भांडी लागतातच. पण तो आवाज उंबरठ्याच्या बाहेर गेला की, घरातली लक्तरं वेशीवर टांगली जातात. बाबा तर यापुढे तुमच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीतच म्हणून मीच बोलतेय. तुमच्या गरजा संपल्या आहेत. म्हणून आम्हीच आता इथून जात आहोत. कायमचे.

राहणार कुठे ? मुलाने विचारले !

रहायला घर लागतं ! सून बोलली.

ती चिंता तुम्ही करू नका. आम्ही कुठेही राहू. पण मोकळा श्वास घेऊ शकू ही खात्री आहे. आणि दोघांचं निभेल एवढी आम्हाला पेन्शन आहे. इथे राहून रोज मरण्यापेक्षा, बाहेर काही दिवस स्वातंत्र्याचे मिळाले तर जास्त छान आहेत. नाही का ? बाय द वे आता सांगतेच आम्हीही आमचा छोटासा फ्लॅट घेतलाय. स्वतःचा. गृहप्रवेश केलाय. काही महत्वाची कागदपत्रे, आणि कपडे घेऊन आम्ही निघतोय उद्या पहाटे. उद्या रविवार आणि तुम्ही उशिरा उठणार, म्हणून आत्ताच बोलले. सुनबाई तुझ्या मालकीचा सुतळीचा तोडाही मी नेत नाहीय. हवं तर तू चेक करू शकतेस सामान. आणि हो, आम्हाला सोडायला येण्याची गरज नाही. हे कॅब बुक करतील. झोपा आता.

कुठल्याही उत्तराची अपेक्षा न करता एका वेगळ्या निश्चयाने आक्का मोकळा श्वास घेत आपल्या खोलीत गेल्या. कितीतरी दिवसांनी वसंतरावांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं !!!

— समाप्त —

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फक्त लढ म्हणा… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ फक्त लढ म्हणा…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(माझी नोकरी गेली आहे, हे त्यांना बहुधा माझ्या तोंडून ऐकायचं असावं. एव्हाना सगळ्या मित्रमंडळीत माझी नोकरी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.) – इथून पुढे 

एके दिवशी माझा शाळकरी मित्र ओमप्रकाशचा फोन आला, “सुधा डियर, माझ्या मुलाचा अकौंटन्सी पेपर अडकलाय रे. परीक्षा एका महिन्यावर आलीय. त्याला जरा गाईड करशील का प्लीज. सध्या तू घरीच असतोस म्हणून….”

‘तू घरीच असतोस’ हे त्याचे तीन विखारी शब्द मला झोंबले. ‘अजिबात जमणार नाही.’ असं सांगून मी रागारागात फोन कट केला. संध्याकाळी सुलभा घरी आली. तिला मी हे सगळं सांगितलं.

ती शांतपणे म्हणाली, “सुधाकर, अहो तुम्ही अकौंट्समध्ये टॉपर होता हे तुमच्या सगळ्याच मित्रांना माहीत आहे. ओमप्रकाश भावजीनी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे मदत मागितली असणार. तुम्हाला खिजवण्यासाठी त्यांनी नक्कीच फोन केला नसणार. तुम्ही ऑफिसमध्ये बिझी असता तर ते अशी मदत मागू शकले नसते. आता तुम्ही घरी आहात म्हणून ते तुमची मदत मागताहेत. एवढाच त्याचा साधा सरळ अर्थ आहे. त्यांच्या मुलाच्या जागी आपली अनुजा असती तर तुम्ही शिकवलं नसतं का? त्याला महिनाभर शिकवा. विद्यादानाचं समाधान काय असतं त्याचा अनुभव तरी घ्या.” तिने माझ्या पाठीवर हलकेच थोपटले.

थोड्या उशीरा का होईना मला सुलभाचं म्हणणं त्या दिवशीही पटलं. ओमच्या मुलाला अकौंटन्सी शिकवू लागलो.

ओमच्या मुलाचा पेपर नुसता सुटलाच असं नव्हे तर त्याला चक्क ऐंशी मार्क मिळाले. रिझल्टच्या दिवशी ओमप्रकाश पेढे घेऊन आला. त्याने मला घट्ट मिठी मारली. ओमने माझ्या खिशात काही नोटा कोंबल्या. मी काढून पाहिले. दोन दोन हजाराच्या पांच नोटा होत्या. ओम व्यापारी माणूस. आपला फायदा झाला की तो दुसऱ्याला वाटा देणारच. पण मला तो अपमान वाटला. केवळ मी बेकार आहे म्हणून तो मला मदत करतोय असं वाटलं.

मी चेहरा वेडावाकडा करीत म्हटलं, “ओम, अरे यार, असा अपमान करू नकोस ना. अरे तुझा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखाच ना? त्याचे पैसे काय देतोस?” असं म्हणत मी ते पैसे परत त्याच्या हातात ठेवले.

सुलभाने चहा केला. चहा घेता घेता ओम चाचरतच म्हणाला, “सुधाकर, रागावणार नसशील तर माझं एक काम करशील का?”

मी न बोलता त्याच्याकडे पाहत राहिलो. तोच म्हणाला, “माझ्या फर्मचे अकाऊंट्स तेवढे फायनल करून देशील का? अकाऊंट्समध्ये तू एक्सपर्ट आहेस. सगळ्या नोंदी टॅलीत अपलोड केलेल्या आहेत. सीएकडे वेळ नाही रे. महिन्याखेरीला इन्कम रिटर्न्स भरायचं आहे. बघ, काही मदत करता आली तर!”

सुलभा पटकन बोलली. “भावजी खुशाल पाठवून द्या. त्यांच्या डोळ्यांसमोर आकडे नाचत राहिले ना,  की त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चांदणं आपोआप फुलत जातं.”

ओमला बोलायला हुरूप आला. तो म्हणाला, “वहिनी आजच पाठवतो. पण तुम्ही त्याला सांगा की मी देईन तो मोबदला त्यानं घेतलाच पाहिजे.  मी फुकटचे काम करवून घेणार नाही.”

मग मी म्हटलं, “ठीक आहे बाबा, दे पाठवून.”

ओमप्रकाशचे अकौंट्स मी दोन तीन दिवसात फायनल केलं. बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रकाचे प्रिंट त्याच्या हातात ठेवले. तो जाम खूश झाला. इतक्या लवकर काम होईल अशी त्याची अपेक्षा नव्हती. त्याने लगेच पंधरा हजार रूपयाचा चेक माझ्या हातात दिला. नोकरी सुटल्यानंतरची माझी ती पहिली कमाई होती. मी चेककडे पाहत राहिलो.

आम्ही ओमच्या कारने त्याच्या सीएकडे गेलो. बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रकाची फाईल त्यांच्यासमोर ठेवली. ते सगळं पाहून चार्टर्ड अकौंटंट मुरलीधर सरांनी मान डोलावली. ओमप्रकाशने मुरलीधर सरांशी माझी ओळख करून दिली. मी त्याचा जिवलग मित्र असल्याचे आणि मी अकौंट्समध्ये टॉपर असल्याचेही सांगायला तो विसरला नाही.

मुरलीधर सर म्हणाले, “सुधाकर माझ्याकडे प्रचंड काम आहे. अकौंट्स करवून घेण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतल्यानं मला ऑडिटींग आणि टॅक्सेशनकडे लक्ष देता येईनासे झाले आहे. माझ्याकडे स्टाफ आहे. पण त्यांना अजून ती मॅच्युरीटी आलेली नाही. तुम्ही तयार असाल तर फायनल स्टेजच्या आणखी वीस फाईल्स मी तुमच्याकडे सोपवू शकतो. सगळ्या नोंदी तपासून बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रक काढून दिलंत तर मी तुम्हाला एका अकाउंटचे दहा हजार रूपये देईन.” मी लगेच होकार दिला.

मुरलीधर सरांना ऑडिट आणि टॅक्सेशनवरच भर द्यायचे असल्याने त्यांनी चाळीस क्लाएंट्सचे सुरूवातीपासूनचे अकौंट्सच्या नोंदी करण्याचं कामही त्यांनी माझ्याकडे दिले. त्यामुळे मुरलीधर सरांकडचे चार कर्मचारीही माझ्याकडे आले.

आता मला एका ऑफिसच्या जागेची आवश्यकता होती. ती व्यवस्था ओमप्रकाशने पूर्ण केली. आता मला चोवीस तास पुरत नाहीत. प्रचंड काम आहे. वाईट दिवस संपले. आता छोट्याशा फर्मचा का होईना मी मालक झालो आहे.

आज बाबा असायला हवे होते, त्यांना नक्कीच आनंद झाला असता. ते म्हणायचे, ‘सुधाकर, कुठल्या तरी लहानसहान नोकरीचे स्वप्न पाहू नकोस. चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे स्वप्न बघ. गणितातील तुझी गती आणि तुझी चिकाटी तुला नक्कीच यश मिळवून देईल. माझा मुलगा नोकरी करणारा नव्हे तर चार लोकांना नोकरी देणारा व्यावसायिक म्हणून मला पाहायचे आहे. मी तुझ्या पाठीशी आहे.’

कदाचित नियतीला ते मान्य नसावे. वर्षभरातच बाबा गेले. मोठा मुलगा म्हणून नोकरी करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते, शहरातल्याच कंपनीत अकाऊंटंट म्हणून जॉईन झालो आणि बाबांचे स्वप्न विरून गेले. चार्टर्ड अकाउंटंट होता नाही आलं, पण आज आईबाबांचे एक स्वप्न तरी फळाला आले.

करवा चौथ ही तिथी माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. सुलभा माझ्यासाठी त्या दिवशी व्रत करत नसेल, परंतु तिचा प्रत्येक क्षण माझे योगक्षेम चिंतण्यातच जात असावा. त्यामुळेच तिच्या शब्दांत इतकं प्रचंड बळ येत असावे. जे अंत:करणातून येते तेच समोरच्या अंत:करणाला जाऊन भिडते. असो.

अचानक नोकरी गेल्यामुळे, कोणाही व्यक्तिचे मनोधैर्य कमकुवत होतंं, नाही असे नाही. परंतु त्याचा स्वाभिमान मात्र जिवंत असतो. किंबहुना तो अधिक प्रखर होतो. हे लक्षात असू द्या.

कुसुमाग्रजांच्या “कणा” ह्या कवितेतील उमेद देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी आठवून पाहा. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा ! तुम्ही फक्त लढ म्हणा !!…… एवढेच माझे सांगणे आहे.’

— समाप्त — 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फक्त लढ म्हणा… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ फक्त लढ म्हणा…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“सर आज करवा चौथ है. शामको घर जल्दी जाना है. ” सतिंदरने माझी परवानगी मागितली. मी त्याला होकार दिला. तो आनंदाने गेला. मला पटकन आठवलं, गेल्या वर्षीचा करवा चौथच माझ्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस होता. माझ्या डोळ्यांसमोर गेल्या संपूर्ण वर्षभराचा कालपट अलगद उलगडत गेला.

संध्याकाळचे सहा वाजले असतील. अकाऊंट्स हेड, गुप्ता सरांनी मला बोलावलं होतं. मला बसायला सांगितलं आणि हळूच म्हणाले. “सॉरी सुधाकर, तुम्हाला कंपनीचा राजीनामा द्यावा लागेल. नोटीस पिरीयडमध्ये तुमच्या जागी नेमलेल्या व्यक्तिला व्यवस्थित प्रशिक्षित करावं लागेल. ” हे ऐकून मला धक्काच बसला. मी आवंढा गिळत म्हणालो, “सर माझी काही चूक झालीय का?”

“सुधाकर, तसं काहीच नाही. यू आर अ जिनियस. आमचं बॅड-लक. आम्ही तुमच्यासारख्या सहकाऱ्याला मिस करतोय. यापेक्षा मी अधिक काही सांगू शकत नाही. आज करवा चौथ आहे. माझी पत्नी वाट पाहत असेल. मला घरी लवकर जायला हवं” असं म्हणून गुप्ताजी पटकन निघून गेले.

मी विमनस्क मन:स्थितीत घरात पाऊल ठेवलं. मला पाहताच सुलभाच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलत गेले. तिने काळजीभरल्या सुरात विचारलं, “सुधाकर, काय झालं? आज खूप थकल्यासारखे वाटताय. ऑफिसात काही प्रॉब्लेम झाला का? ट्रॅफिक जाम होतं का?” सुलभा चेहरा आणि आवाजावरून समोरच्या माणसाचा मूड अचूक ओळखते.

“सुलु माझा जॉब गेलाय. उद्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे. नोटीस पिरीयडमध्ये कामावर जावं लागणार आहे. ” मी धपकन सोफ्यावर कलंडलो. तिनं पाण्याचा ग्लास पुढे केला. घटाघटा पाणी प्यायलो.

ती लगेच म्हणाली, “जाऊ द्या हो. हा जॉब गेला तर दुसरा जॉब मिळेल. आता मी नोकरी करतेय ना? आतापर्यंत केलेल्या बचतीतून फ्लॅटचे हप्ते भरू या. काळजी कशाला करताय?”

सुलभाकडून मी इतक्या शांत प्रतिक्रियेची अपेक्षा केली नव्हती. मला खूप मोठा दिलासा मिळाला. थोड्याच वेळात चहाचा कप हातात देत ती म्हणाली, “अहो, राजे कसलंही टेन्शन घेऊ नका. एक दोन महिन्यात तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. ”

मी म्हटलं, “सुलु, अग नोकरी लवकर नाही मिळाली तर मी काय करायचं? दिवस कसे काढायचे?”

सुलु खोटं खोटं हसत म्हणाली, “अहो, नोकरी पहिल्यांदा गेलीय का? ही तुमची चौथी नोकरी होती. आता पाचवी मिळेल त्यात काय?”

“अगं, मी आता पन्नाशीला आलोय” मी अगतिकपणे म्हणालो.

माझ्या हातावर थोपटत म्हणाली, “बच्चमजी, पन्नाशीचे झालात म्हणून काय झालं? पंचवीस वर्षाचं अनुभव-धन तुमच्या पाठीशी आहे. घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे भगवंताची काहीतरी वेगळी योजना असते. ही नोकरी सुटण्यामागेदेखील काहीतरी चांगलं दडलं असेल.

अचानक नोकरी गेली की कमकुवत मनाचा माणूस ढेपाळतो. ध्येयवेडा माणूस मात्र फिनिक्स पक्ष्यासारखा राखेतून नव्याने जन्म घेऊन उंच भरारी घेतो. मध्यंतरी पिंपरीच्या आयटीएन्सची कंपनीतली नोकरी गेली होती. ते गप्प बसून राहिले होते का? त्यांनी मिळेल ती नोकरी धरली. काहीजण कॅब सर्व्हिस, काहीजण भाज्यांचे मार्केटिंग वगैरे व्यवसाय करायला लागले.

अनैतिक धंदे सोडले तर कुठलाही व्यवसाय करता येतो. इथे कोपऱ्यावर पाणीपुरीचा गाडा लावणारा भय्या माहीताय ना? अहो तो देखील दिवसाकाठी हजार, दोन हजार कमवतो म्हणे. सगळ्यांनीच नोकरी केली तर आपल्या जीभेचे चोचले तरी कोण पुरवणार? कुणाला तरी ते काम करावं लागेलच ना? अर्थात मी तुम्हाला पाणीपुरीचा गाडा लावायला सांगते असं समजू नका. ”

“मग मी काय करावं, अशी तुझी अपेक्षा आहे, ते तरी सांग. सुलु मी घरी बसू शकणार नाही. तुम्ही मायलेकी दोघी कामावर गेल्यावर मला घर खायला उठेल. ” मी काकुळतीने म्हणालो.

“सुधाकर, जीवन ही एक यात्रा आहे. गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचं ते स्वत:च ठरवायचं असतं. मार्गाचा शोध घ्यावा लागतो. दुसरा कुणीच त्याचा नकाशा देत नसतो. काय करायचं हे ठरलं की कसं करायचं हे आपोआप सुचतं. तुम्ही इतके हुशार. अकौंट्समध्ये चॅम्पियन आहात. त्याच क्षेत्रात काहीही करता येईल. एक तर तुम्ही. . . . . . . . ”

ती अखंडपणे बोलत होती. मला आत्मविश्वासाचे डोस पाजत होती. त्यावेळी मला माझ्या आईची आठवण आली.

माझी आई सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. बीकॉम च्या शेवटच्या वर्षात मला टायफॉईड झाला होता. बरेच दिवस पिरीयड्सना जाता आले नव्हते. अभ्यास कसा होईल म्हणून मी चिंताक्रांत झालो होतो. आई मला समजावत म्हणाली, “सुधाकर, तुला काही फरक पडणार नाही रे. मला खात्री आहे. मिळालेल्या वेळेत तू सगळा पोर्शन भरून काढशील. आणि तूच टॉपर होशील. ” अर्थात तिचं म्हणणं खरं ठरविण्यासाठी मलाही जिवाचा आटापिटा करावा लागला होता. तो भाग वेगळा.

करवा चौथचं व्रत उत्तर भारतातल्या स्त्रिया आपल्या पतीच्या योगक्षेमासाठी आणि पति-पत्नी यांच्यातील दृढ नात्याचे, प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून साजरे करतात. आज करवा चौथ असल्याचं सुलभाच्या ध्यानीमनीही नसावं. कसलेही व्रत न करता ती माझ्यावरचे प्रेम आणि दृढ विश्वास अगदी मनापासून प्रकट करत होती.

सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर माझी लेक अनु माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाली, “बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी जॉब करतेय ना? होईल हो सगळं व्यवस्थित. ” नकळत माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं. सुलभा आणि अनुजाच्या वागणुकीने मला पत्नी आणि कन्या या नात्यांचा खरा अर्थ त्या दिवशी गवसला.

कंपनीने माझ्या जागी एका डायरेक्टरच्या भाच्याला नियुक्त केलं होतं. मी मनात कसलाही आकस न ठेवता, हातचं काहीही राखून न ठेवता त्या तरुणाला अकाऊंट्सची संपूर्ण माहिती दिली. नोटीस पिरीयड संपताच घरी बसलो. अनुजा सकाळी सुलभाला तिच्या शाळेत ड्रॉप करून पुढे ऑफिसला निघून जायची. मी लॅपटॉपवर नोकरीच्या साईट्सवर रिझूमे अपलोड करत बसायचो. पण त्यानंतर काय? एकटं एकटं वाटायचं.

माझ्या पूर्वीच्या कंपनीतले अकाऊंट्स हेड मला रोज एखादी दुसरी जॉबची अ‍ॅड पाठवायचे. कधी नव्हे ते, बऱ्याच नातेवाईकांचे फोन यायला लागले. माझी नोकरी गेली आहे, हे त्यांना बहुधा माझ्या तोंडून ऐकायचं असावं. एव्हाना सगळ्या मित्रमंडळीत माझी नोकरी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुटलेली तार – –☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

☆ तुटलेली तार – – ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

नेहेमीप्रमाणे पहाटे पहाटेच जाग आली. तसे तडकच मियां अंथरूणातून उठून बसले. समोर कोपऱ्यात ठेवलेल्या सतारीस त्यांनी हात जोडून नमस्कार केला व एक दीर्घ उसासा सोडला. पहाटे पहाटे आन्हिकं उरकून रियाझाला बसायचं ही परंपरा वर्षभरापासून खंडित झालेली. एका सुबक कोरीव गोल लाडकी टेबलावर खोळ चढवून बसवलेल्या सतारीस केवळ फुलं वाहून, धूप दाखवून नमस्कार करणं एवढंच हाती उरलेलं.

पुरातन म्हणता येईल अशी ही सतार ही सुबक कोरीव देखणीच शिसवी. सहाव्या की सातव्या पिढीपासून घराण्यात असलेली ही सतार तशी सर्वांनाच पूजनीय. मियांसाठी तर ती जीव की प्राण! या सतारीने घराण्यास नावलौकिक मिळवून दिलेला. सहा सात पिढ्यांची पोटापाण्याची सोय सतारीने करून दिलेली. मंचावर सतार घेऊन बसलो व त्यावर बोटं फिरायला लागली की समोरचे रसिक मंत्रमुग्ध होणारच. ही हुनर पिढ्यानपिढ्या जोपासली गेलेली. इतर सतारीही घरी असलेल्या, परंतु या सतारीची गोष्टच वेगळी. लोकवायका आहे की कुणी सिद्ध साधुपुरूषाने प्रसन्न होऊन ही सतार प्रसाद म्हणून दिलेली. त्या सिध्ध पुरूषाला साक्षात सरस्वतीने ही सतार दिली होती अशीही वदंता आहे. मियांच्या घराण्यानेही मग सतार मानाने वागवलेली पिढ्यानपिढ्या.

लहान असल्यापासून मियांची बोटं सतारीवर फिरत आलेली. घराण्याचे कसब मियांनेही आत्मसात केलेले. पूर्वी राजघराण्यांकडून बोलावणे यायचे. बिदागी मिळायची. दोन घास सुटायचे. स्वातंत्र्यानंतर राजघराणी गेली. मग रसिकांनी संमेलने भरवायला सुरूवात केली. दिल्ली, ग्वाल्हेर, आग्रा, पुणे, कलकत्ता येथे जाहीर कार्यक्रम व्हायचे. क्वचित पूर्वाश्रमीचे राजे वा श्रीमंत घराणी खासगी बैठकीतून कलेला दाद द्यायची. तेवढाच मानसन्मान, पैका व मुख्य म्हणजे समाधान मिळायचे.

समाधान म्हटले की असमाधान ही येतंच आयुष्यात. पिढ्यानपिढ्या जपलेली सतारवादनाची परंपरा खंडित होते की काय ही परिस्थिती उद्भवलेली. एकुलता एक मुलगा इंजिनीयर झाला. सरकारी नोकरीतून रस्ते पूल बनवू लागला. सतारीला तर हातही लावला नाही. अब्बू अब जमाना बदल गया हैचा राग आळवत त्याने घराणेशाहीशी फारकत घेतली. तरीही होईल तितके कार्यक्रम करत नावलौकिक टिकवण्याचा आटापिटा मियां करत आलेले आता आतापर्यंत. नातूने वाद्ये हातात घेतली पण ती पाश्चात्य. इलेक्ट्रिक गिटार वाजवत असतो. बऱ्याच समूहांबरोबर कार्यक्रम ही करत असतो पण त्यात जान नाही हे मियांचं परखड मत. याने नावलौकिक मिळवता येत नाही. पोटापाण्याची सोय होते एवढंच. मंचावरची सजवलेली बैठक, समोर दर्दी रसिकांचा मेळा. ववादन होत असताना जाणकारांनी दिलेली उत्स्फूर्त दाद. खास जागांवर माना डोलावणं याची सर अन्य कोणत्याही कार्यक्रमाला नाही. बऱ्याच वेळा वाटायचं, बिदागीपेक्षा हे मोठं. कलेच्या परमोच्च सादरीकरणातला आनंद अमूल्यच. पण आता ते सगळं इतिहासजमा होतंय की काय याची धाकधूक वर्षभरापासून.

वर्षभरापूर्वीच एका कार्यक्रमात सतारीची तार तुटली. तार तुटण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बऱ्याचदा तारा तुटल्या, दुरूस्त करून झाल्या की सतारीतून सूर पूर्ववत उमटत असे. सतार दुरूस्त करणारे कारागीर ही पिढ्यानपिढ्या ठरलेले. वर्षातून एकदोनदा तरी त्यांची गरज पडे. सतार दुरूस्त होऊन आली की पुन्हा काही गवसल्याचं समाधान मिळे! वर्षभरापूर्वी तुटलेली तार दुरूस्त होऊन आलेली तरीही सतार पूर्वीसारखी सूर काढत नव्हती. माहित असलेले सर्व कसब पणाला लावूनही सतार रूसलेलीच. तारेवरचा ताण कमीजास्त करून पाहिला, खुंट्या पिरगाळून पाहिल्या, पण मनासारखे बोल उमटतच नव्हते. त्यातही डॉक्टरांनी मिंया तुम्हाला पार्किन्सन्स नावाचा आजार जडलाय. याची उद्घोषणाच करून टाकली. कंपवात. साठी जरी उलटलेली असली तरी ताठ बसणं अजूनही होत असलेलं. मांडी घालून एकाच जागी ही बसणं जमत असलेलं, पण रूसलेल्या सतारीस मनवणं जमत नसलेलं. मियां तुमच्या हातातील जादू आता संपलीय हे जेव्हा सतार दुरूस्त करणाऱ्या कारागिराने सांगितलं तेव्हा तर काळीज फाटून गेलं.

रोज सवयीप्रमाणे पहाटे उठायचं. सतारीस नमस्कार करायचा. गतवैभवाच्या आठवणी काढत दिवस ढकलायचा एवढंच हाती उरलेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटेस लवकर उठायचं म्हणत मिंया निजले ते पहाटे सतारीतून उमटणाऱ्या सुरावलीच्या धक्क्यानेच. सूर तेवढे पक्के नव्हते पण बऱ्याच दिवसांनी उमटलेले सतारीचे बोल कानांना सुखावून गेले. मियां डोळे चोळतच उठले, पाहिलं तर नातू सतारीतून सूर जमवण्याच्या खटपटीत. तुटलेली तार पुन्हा सांधली जातेय की काय?! या विचाराने मिंयांचे डोळे डबडबले.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीमय… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ दिवाळीमय…  ☆ श्री मंगेश मधुकर

नवरात्र संपता संपता जागोजागी दिसणाऱ्या आकाशकंदील, पणत्या, हिरवे, पिवळे, लाल रंग, रांगोळ्या, फुलांची तोरणं, फटाक्याची दुकानं यामुळे होणारं वातावरण डोळ्यांना सुखावतं. टीव्ही, पेपर, जिकडं पाहावं तिकडे जाहिराती आणि “मग यंदा काय खरेदी.. ”हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दिवाळीची आल्याची चाहूल.

सगळं काही बदललं मात्र दिवाळीचं आकर्षण अजूनही पूर्वीइतकंच आहे.

नवीन वर्षांचं कॅलेंडर हातात पडलं की, आधी आपला वाढदिवस कोणत्या वारी आणि दिवाळी कधी आहे हे अनेकजण पाहतात. लहान-थोर, गरिब-श्रीमंत सर्वांचाच आवडता सण म्हणजे दिवाळी.

… प्रकाशाचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी.

… मनोसक्त खरेदी म्हणजे दिवाळी.

… फराळाची मेजवानी म्हणजे दिवाळी.

… गप्पा, खाणं आणि मजा म्हणजे दिवाळी.

… एकूणच दिवाळी म्हणजे आनंद, आनंद आणि आनंदच.

त्यातही बालपणीची दिवाळी म्हणजे मनाचा हळवा कोपरा…. आयुष्यभर न विसरल्या जाणाऱ्या आठवणी

वाड्यातली दिवाळी…. अहाहा !! एकदम भन्नाट अनुभव……

दसरा संपला की सहामाही परीक्षेचं टेंशनमुळं दिवाळीच्या उत्साहाला आवर घालावा लागायचा.

आणि एकदा का परीक्षा संपून सुट्ट्या सुरू झाल्या की मग फक्त दिवाळी आणि दिवाळीच.

‘अभ्यास कर ’ असं कोणी म्हणू शकत नसल्यानं दिवसभर मोकाट. मनाला येईल ते करायचं. खेळायचं, खायचं- प्यायचं, भटकायचं. फराळाचे एकेक पदार्थ बनताना आईला मदत करायची.

हे फराळ दिवाळीलाच बनवले जात असल्यानं त्याविषयी प्रचंड अप्रूप. (आता सगळं काही वर्षभर मिळतं) भरपूर पदार्थ असल्यानं दिवाळी म्हणजे खाण्याची चंगळ. वाड्यातल्या प्रत्येक घरात फराळाची ताट फिरायची.

जसजशी ‘दिवाळी’जवळ यायची तसं नवीन कपड्यांविषयी चर्चा सुरू कारण तेव्हा नवीन कपडे वाढदिवस नाहीतर दिवाळीला घेतले जायचे. (आता वाट्टेल तेव्हा खरेदी केली जाते) कपडे झाले की फटाके (सध्या फटाक्यांविषयी शाळांमधूनच प्रबोधन केलं जातं त्यामुळे प्रमाण कमी झालंय)

आणि एक मुख्य आकर्षण म्हणजे किल्ला. माती कुठून आणायची. किल्ला कसा बनवायचा यावर चर्चा, वाद… वेगवेगळा असला तरी किल्ला बनवताना प्रत्येकाचा हातभार लागायचा. (आता सोसायटीत सर्वांचा मिळून एकच किल्ला बनवला जातो). किल्ल्यावरची सजावट. हळीव टाकणं, रंग देणं आणि मग सकाळ संध्याकाळ त्यावर चित्र मांडायची. मित्रांबरोबर चित्रांची देवघेव व्हायची. अशी नुसती धमाल असायची.

वसुबारस, धनत्रयोदशी यांच्यापासून दिवाळी सुरू होते. पण खऱ्या अर्थानं दिवाळी म्हणजे नरकचतुर्दशी.

‘उद्या पहाटे लवकर उठायचं नाहीतर नरकात जावं लागतं’.. आदल्या दिवशी दोस्तांबरोबर झालेलं बोलणं डोक्यात असल्यानं नरकचतुर्दशीला पहाटेच जाग यायची. संपूर्ण वर्षात पहाटे उठण्याचा हा एकमेव दिवस.

सगळीकडं दाट अंधार (आता मध्यरात्री सुद्धा गडद अंधार नसतो)

त्याचवेळी वाड्यात चाललेली लगबग. सगळीकडे सुगंधी तेलाचा, उटण्याचा, मोती साबणाचा दरवळणारा वास.. वाड्यात सार्वजनिक नळावर चाललेल्या आंघोळी,.. त्यासाठी लागलेले नंबर (आता फ्लॅटमध्ये सगळं स्वतंत्र).. आईकडून मालिश करून घेताना फार मस्त वाटायचं. बोचऱ्या थंडीत गरम पाण्यानं आंघोळ करण्याचा अनुभव फारच भन्नाट. (तेव्हा दिवाळीला खरंच थंडी असयाची, आता??) घराघरात चाललेली आवराआवर, चेष्टा, मस्करी, गप्पा आणि बाहेर फटाक्यांचे आवाज. कधी एकदा नवीन कपडे घालून फटाके वाजवतो असं व्हायचं.

बाहेर आलो की पहाटेच्या अंधारात दारासमोरचे झगमगते आकाशकंदील फार सुंदर दिसायचे.

मुलं फटके उडविण्यात तर मोठी माणसं गप्पात मश्गुल. (आजकाल जो तो मोबाईलमध्ये बिझी)

नजर आपल्या दोस्त मंडळीना शोधायची. मग सूरु व्हायचा फटाके वाजवायचा कार्यक्रम.

फटका पेटवताना होणारी घाई, वाटणारी भीती, थरथरणारा हात अशावेळी जोरात टाळी वाजवून घाबरविणारी मोठी माणसं, बाबांच्या सततच्या सूचना यामुळे वाढणारा गोंधळ… तरीही फटाके वाजवायचा उत्साह मात्र कमी व्हायचा नाही.

मग हळूहळू दिवस उजाडल्यावर भुकेची जाणीव व्हायची. मग लाडू, चकली, शेव, चिवडा, शंकरपाळी, अनारसा यांच्यावर तुटून पडायचं. मनसोक्त खाऊन झाल्यावर खेळायला जायचं.

संध्याकाळी अंगणात वेगवेगळे रंगांची रांगोळी, घर छान आवरलेलं. मित्र मंडळी आणि नातेवाईक यायचे. एकमेकांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जायच्या (आता मोबाईल असल्यानं घरी जाण्याचा त्रास कोणी घेत नाही. ) … फराळाच्या सोबतीनं गप्पांची मैफिल सहज जमत. आस्थेनं विचारपूस केली जायची.

पुढे लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असेच साजरे केले जायचे.

…आठवणीतल्या दिवाळी विषयी अजून खूप लिहिता येईल.

आणि एक गोष्ट नक्की,

… जगणं कितीही मॉडर्न झालं तरी दिवाळीच्या आनंदाला पर्याय नाही… वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा दिवाळीतले चार दिवस देतात. तो अनुभव फार आनंददायक असतो.

म्हणूनच प्रत्येकजण “ दिवाळीमय ” होतो.

तुमच्याही अनेक आठवणी जाग्या झाल्या असतील ना ? जे जुनं होतं ते चांगलं होतं आणि आतासुद्धा जे आहे तेसुद्धा चांगलेच आहे. हे सगळं लिहिलं ते उगीचच शिळ्या कढीला ऊत आणण्याचा किवा जुन्या आठवणी काढून डोळे गाळण्याचा प्रकार नाही तर एक प्रयत्न आहे… आठवणींतल्या दिवाळीच्या सहलीचा !!!!!

‼ शुभ दीपावली ‼

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघी — आई आणि ती… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

दोघी — आई आणि ती☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फोनची रिंग वाजली तशी तिच्या कपाळावर अठी पडली,.. एवढया घाईत कोण,.. ?नवरा फोन घेऊन स्वयंपाकाच्या ओट्याजवळ आला आणि म्हणाला, ” घ्या तुमच्या मातोश्री आहेत,.. “

ती एकदम कणकेने भरलेला हात हलवत म्हणाली, “आता नको उचलूस मला बोलायला पण वेळ नाही,.. स्वयंपाक, देवीची रांगोळी, नैवेद्य आणि आरती सगळं बाकी आहे,.. कट कर फोन उगाच सकाळच्या घाईत फोन करते ही,.. “.. त्याने नाईलाजाने खांदे उडविले आणि फोन कट केला,..

परत हार करताना वाजला,.. ही फोनकडे बघून नुसती बडबडली, ” आई अग खुप घाई आहे, ऑफिसमध्ये गेल्यावर करते ग माय तुला फोन,… ” तो हसून म्हणाला, “हे फोन उचलून सांग ना,.. ” 

ती म्हणाली, “तुला नाही कळणार फोन घेतला की दहा मिनिटं गेलीच समजायची. आज इथे मिनिटांचा हिशोब आहे रे बाबा,.. रोज अंगावर पंजाबी, जीन्स चढवली की निघता येतं. पण ऑफिसमध्ये साडीचा फतवा निघालाय,.. आणि आम्हालाही तेवढाच आंनद छान साड्या नेसण्याचा,.. पण त्यासाठी किमान रोजच्या धावपळीतला अर्धा तास बाजूला काढावा लागतो,.. हिच्याशी आता बोलत बसले तर सगळंच राहून जाईल,.. करेल मी तिला फोन नंतर “…. म्हणत तिने देवीपुढे रांगोळी काढली, तिच्यासाठी वेणी विणली, खमंग तुपावर खिरीचा नैवेद्य झाला,… तिची धावपळ बघून मग गॅलरीत जाऊन त्यानेच फोन घेतला, अगदी काही अर्जंट नाही ना हे जाणण्यासाठी,.. पण तस काही नाही म्हणून मग त्याने तिला सांगितलं देखील नाही पण तिला म्हणालाच, “फोन कर पण आईला नक्की,… “

मंद अगरबत्ती.. किणकिण टाळावर ऊर्जा देणारी आरती झाली,.. देवघरातील देवीला हात जोडताना तो सकाळपासून ऊर्जेने घरभर प्रसन्नता पसरवणाऱ्या आपल्या देवीला म्हणजे गृहलक्ष्मीला निरखत होता,.. साडीत अगदी गोड दिसत होती,.. ती निघणार तेवढ्यात परत आईचा फोन वाजलाच,.. ती पायऱ्या उतरत फोनवर बोलू लागली,.. “आई अग घाईत काय फोन करतेस,.. ? किती धावपळ आहे माझ्या मागे,.. कालपासून नवरात्रामुळे दोन स्वयंपाक सुरू आहेत.. उपवास आणि बिनउपवास.. त्यात सगळी तयारी पूजेची. तुझा जावई काय नुसता सोवळं घालून मिरवतो,.. हार, वेणी, नैवेद्य सगळं बघावं लागत आणि तू अश्या घाईत फोन करतेस,.. आज तर मी माझा उपवासाचा डबा देखील करू शकले नाही,.. अग आज ऑफिसमध्ये कामवाल्या मावशींच्या ओट्या भरायचं ठरलं, त्याच सामान पॅक करत बसले. मग राहिलं उपवासाच थालपीठ करायचं,.. जाऊ दे, आपण रात्री बोलायचं का,.. ? आई सॉरी पण तू समजू शकते तुझ्या लेकीला “.. म्हणत हिने फोन ठेवला देखील.

ऑफिसमध्ये सगळ्यांची एकच झुंबड फोटो काढण्यासाठी, त्या मावशींच्या ओट्या भरण्याची,.. काही चहापाणी पोटात ढकलून सगळ्या परत आपल्या टेबलवर कामाला लागल्या,.. जेवणाची वेळ झाली तसे पोटात कावळे ओरडायला लागले,.. हिने बेल दाबून चपराशी मामाला बोलावलं,.. ” मामा खालून दोन चिप्स आणून द्या ना.. आज डबा नाही आणला गडबडीत,.. ” 

मामा म्हणाले, “मॅडम तुमच्यासाठी मघाशीच डबा आला,.. कोण होत माहीत नाही पण तुमचा डबा आहे असं सांगितलं,.. तुमच्या जेवणाच्या टेबलावर नेऊन ठेवलाय मी,..”

हात धुवून ती टेबलाजवळ आली,.. तिने डबा सगळीकडून निरखून पहिला,.. ओळखीचा वाटत नव्हता,.. तो पर्यंत सगळ्या मैत्रिणी जमल्या ‘ चला भूक लागली ‘ म्हणत सगळ्यांनी डबे उघडले,.. तिनेही उघडला,.. राजगिऱ्याचा शिरा,.. थालपीठ चटणी,.. एकदम भरपूर दिलेलं होतं,.. तिने सगळ्यांना वाटलं,.. मनात प्रश्न मात्र कायम होता,.. कोणी पाठवलं असेल? ह्या विचारात तिने शिऱ्याचा पहिला घास घेतला,.. आणि तिच्या तोंडून शब्द आले,.. “आई.. “.. तिला सकाळचं फोनवर केलेलं दुर्लक्ष आठवलं आणि एकदम रडूच फुटलं,.. मैत्रिणींना सगळं सांगितलं,.. सगळ्यांनाच आपली आई आठवली,..

संध्याकाळी घरी येताच नवरोबाने हसून विचारलं, “कसा होता आज फराळ,.. ?”

ती म्हणाली, “तुला कसं कळलं?”

तो हसतच म्हणाला, “मीच तुझ्यापर्यंत पोहचवला तो डबा आणि आता आठ दिवस पोहचवायचा असं माझ्या सासूने कबूल करून घेतलंय माझ्याकडून,…. मग मी तयार झालो, म्हंटल तेवढीच आपल्या लक्षुमीची सेवा,..”

ती एकदम लाजली तो मात्र खळखळून हसला,.. तिने पटकन दिव्यामध्ये तेल घातलं,.. काजळी दूर सारली,.. रात्रीच्या आरतीची तयारी केली,.. आणि देवीला नमस्कार केला तेंव्हा तिला तिथे देवीच्या जागी आईचाच चेहरा दिसत होता,.. तिने आईच्या व्हाट्सअप वर लगेच एक चारोळी पाठवली,..

“तारेवरच्या कसरतीमध्ये

 हात दिला तू सावरण्यासाठी

 स्त्रीशक्ती ही ताकद आहे,..

 एकमेकींना उभारण्यासाठी…”

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print