मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 5 ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 5 ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’ आता  इथून पुढे -)

आशा गप्प होती. आपला नवरा या आजारपणात पुरता खचला आहे. त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुध्द वागायचे नाही हे तिने ओळखले. मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली.

वसंता नलिनीचा मुलगा शंतनु बारावी पास करुन कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉ च्या दोन्ही वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून जाऊन येऊन करत होता. पण आता अभ्यास वाढला म्हणून आणि नाडकर्णी वकिलांकडे अनुभवासाठी काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला. मोहन-वसंताची आई सुमतीबाई अधून मधून आजारी असायची. तिलापण कणकवलीत अधून मधून डॉक्टरांकडे न्यायला लागत होते. शंतनु आता बाईबाबांना म्हणत होता. आपण सर्व कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहूया.

मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळ जवळ तीन वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आली. काका घरी येणार आहेत हे कळताच शंतनु पण गावी आला. बहिण यशोदा पण माहेरी आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंता पण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. वसंताच्या पाठीवरुन हात फिरवला. आशाने बॅगेतून सासुबाईंसाठी साडी बाहेर काढली. वसंतासाठी पॅन्टशर्ट बाहेर काढले, नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनुसाठी मोबाईल बाहेर काढला. बहिणीसाठी साडी, बहिणीच्या मुलीला मोबाईल हे सर्व टेबलावर ठेवून मोहनराव बोलू लागला.

‘‘आई, वसंता, यशोदे माझा चुकलाच. मी तुमका नको नकोता बोल्लयं, यशोदा मागच्यावेळी बोलली ता खरा आसा. खरंतर मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली जबाबदारी घेवक होई होती. आईबाबांनी माका मोठो केलो, शिकवलो. पण तेची जाण ठेवलयं नाय मी. मी मुंबईक गेलय आणि सगळ्यांका विसारलयं. लग्नानंतर माका सासुरवाडीची लोका मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासुरवाडच्यासाठी खुप केलय पण माझ्या आईवडिलांका, भावाक, बहिणीक विसारलयं. माझी चुक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्युपत्र करुन माका जमिन देवक नाय म्हणून मी रागान बेभान झालयं. त्यामागचो वडिलांचो हेतू माझ्या लक्षात ईलो नाय. वडिलांका या जमिनीचो तुकडो पाडूचो नाय व्हतो. माझी एकुलती एक बहिण यशोदा – तिच्या घराकडे कधी गेलयं नाय. तिची कधी विचारपुस केली नाय. तिच्या चेडवाक कधी जवळ घेतलय नाय. माझी चुक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होतय. पण एक फटको बसलो. आजारपणात मरणातून वाचलयं. कारण आईबाबांचे आशिर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये एक महिनो बिछान्यावर पडलयं आणि सगळा डोळ्यासमोर इला. मी खूप चुक केलयं. आई, वसंता, यशोदे माझा चुकला. मोठ्या मनान सगळा इसरा.’’ मोहनराव गदगदून रडत रडत बोलत होता. बाजूला आशापण गप्प राहून ऐकत होती. त्यांच्या आईचेपण डोळे ओले झाले होते. वसंता, नलिनी, यशोदापण भावूक झाली होती. एवढ्यात वीस-एकवीस वर्षाचा वसंताचा मुलगा शंतनु बोलू लागला.

‘‘मोहनकाका तुम्ही म्हणालात सगळा विसरा, पण आम्ही कसे विसरतलवं, आजोबा वारले तेव्हा मी बारावीत होतय. सतरा वर्षाचो. मृत्युपत्रात तुमच्या नावावर जमीन ठेवक नाय म्हणून तुम्ही आजी, बाबा, यशोदे आते हेंका काय काय बोल्लात. माझ्या आई-बाबांनी मुद्दाम तसा मृत्युपत्र आजोबांका करुक सांगल्यानी असो आरोप केलात. यशोदा आतेन जाब विचारल्यान तेव्हा तिचा थोबाड फोडूक निघालात. मी लहान होतय म्हणून गप्प रवलंय आणि माझी आई माका काही बोलूक देईना. ही आशा काकी म्हणाली आंब्याच्या बागेचे लाखो रुपये घेतास – सव्वीस कलमांचे लाखो रुपये येतत ? कलमा आधी एक वर्षाआड येतत. तेंका मोठा करुन काय करुचा लागता त्या शेतकर्‍याक माहित. बागेची साफसफाई, खत, किटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली. आणि हल्ली माकडांचो त्रास किती सुरु आसा. माकडा लहान लहान फळा अर्धी खाऊन नासधुस करतत. बागवाल्याक कसला उत्पन्न मिळतला ? माझे आजोबा आणि बाबा वर्षभर तेच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे. ही आशा काकी मागे म्हणाली, तुम्ही सगळे आयत्या घरात रवतात. ह्या जुन्या घरांका सांभाळना म्हणजे काय दुसर्‍याक कळाचा नाय. किती कौला फुटतत, माकडा उडी मारुन फोडतत, लाकूड खराब होता, वाळवी लागता, पावसात कौला फुटून गळता. गावात रवल्याशिवाय ह्या कळाचा नाय. ह्या असल्या घराक कंटाळून लोकांनी स्लॅबची घरा बांधल्यानी. आमच्याकडे पैशे नाय म्हणून – आणि तुम्ही जर पैशाची मदत केला असतास तर आम्ही स्लॅबचा घर बांधला असता पण तुमका तशी बुध्दी होना नाय. गणपतीक दुसर्‍या दिवशी येतास आणि पुजेक बसतास. गणपतीची तयारी आधी पंधरा दिवस असता. गणपतीक येवक होया तर त्या तयारीक येवक होया. गावात आळशी माणसा रवतत अशी ही काकी म्हणाली, असू दे आम्ही आळशी. आता या पुढे या घरातलो मोठो मुलगो म्हणून ह्या घर, आंब्याची झाडा, शेती, सण, देवपूजा सगळा तुम्ही सांभाळा. मी, आईबाबांका आणि आजीक घेवन कणकवलीक जातय. ती तिकडे भाड्याची जागा बघलय. माझे बाबा गवंडी आसत तेंका थय काम मिळतला. आम्ही बिर्‍हाड केला तर माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन इल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहिती नाही. आजीक पण मी घेवन जातय. कारण तिका वारंवार कणकवलीचो डॉक्टर लागता. आमची गुरा आसत तेंका मी माझ्या मामाकडे पाठवलयं. कारण तुमच्याकडून तेंची देखभाल होवची नाय. माझे बाबाही अशी कामा करत करत पन्नासाव्या वर्षी म्हातारे झाले, आई पंचेचाळीसाव्या वर्षी म्हातारी झाली. तेनी आयुष्यात कधी विश्रांती घेवक नाय. या दोघांचा आयुष्य वाढवचा आसात तर या घर सोडूक व्हया आणि आम्ही कणकवलीक बिर्‍हाड करुक व्हया. तेवा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुमी आता रिटायर्ड आसात, तुमचो मुलगो अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईक रवलास काय आणि हय रवलास काय फरक पडना नाय. आजच संध्याकाळी मी आई बाबा आणि आजीक घेवन जातय. आता एकदम गणपतीक येव. तुम्ही कसे तिसर्‍या दिवशी गणपतीक येवास. तुम्ही मोठे भाऊ वडिलानंतर या घरची जबाबदारी तुमची. या घरातले देव, त्यांची पूजा, सण सगळे मोठ्या भावानच करुचे आसतत. आजपासून ह्या घर तुमचाच, शेती फक्त तुमचीच, आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच.’’ एवढे भडाभडा बोलून शंतनु थांबला. मोहनराव आणि आशा आ वासुन ऐकत राहिली. एवढासा शंतनु मोठा केव्हा झाला हे कळलेच नाही. वसंता आणि नलिनी सुध्दा आपल्या मुलाकडे पाहत राहिली. या शंतनुला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आम्ही बोलू शकणार नव्हतो ते हा मुलगा बोलला. वसंताला वाटले आयुष्यभर मी या घरासाठी झटलो, एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसारखे ना नाटक, ना सिनेमा. पण किंमत कोणाला आहे ? ही आशा वहिनी गावातले सगळे लोक आळशी असे म्हणून मोकळी झाली. खरचं शंतनु म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. मी गवंडी काम करेन. नलिनीला विश्रांती मिळेल. नलिनी मनात विचार करत होती. कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकांना मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमले नसते. घर सोडून कणकवलीला बिर्‍हाड करायचं म्हणतोय सोप आहे का ते ? एवढी वर्षे या घरात राहिले. चला आता बिर्‍हाड करुया. तो म्हणतोय तर जाऊ कणकवलीला. शंतनुचे बोलणे मोहनराव आणि आशा ऐकत होती. शंतनु एवढा मोठा झाला हे त्यांना माहितच नव्हते. तो खरच घर सोडून आईवडिलांना, आजीला घेऊन कणकवलीला जाईल असे त्यांना वाटत नव्हते. मोहनरावांना वाटत होते. आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राबराब राबत असते. आशाला थोडेच जमणार ? आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे. पण करणार काय ? मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो. आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल.

मोहनराव आणि आशा पाहत होती. खरेच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मध्येच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवले आहे असे सांगून गेली. नलिनी वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली.

‘‘वसंत भावोजी, आमचं चुकलंच, आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. मी तुम्हाला आळशी म्हणाले, ऐतखाऊ म्हणाले, आंब्याचे एवढे पैसे खाता म्हणाली, चुकच झाली. आम्ही तुमच्या सगळ्यांवर दावा दाखल केला. त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली. मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण, रितीरीवाज मला जमणार नाहीत. मी सासुबाईंना उलट-सुलट बोलले. सासुबाई मला क्षमा करा.’’ असे काहीबाही आशा मोहन बोलत होते. हात जोडत होते. डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले एवढ्यात शंतनु टेम्पो घेऊन आला. त्यात शंतनुने आणि वसंताने मिळून सर्व सामान भरले. एक रिक्षा आली त्यात शंतनुची आजी, आईबाबा आणि आते बसली. टेम्पोबरोबर शंतनु बसला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. घराकडे एकदा डोळे भरुन पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाली.

बाहेर लोट्यावर बसून मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्टपॅन्टपीस, मोबाईल्स त्यांचेकडे पाहत होते……

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 4 ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 4 ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – ‘‘मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.’’ ‘निश्चित॰ कसलीच काळजी करु नका.’’ आता यापुढे – )

मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने पत्नीकडे पाहिले. आशापण खुश झाली. तिला सासुबाईला, दिराला, जावेला, नणंदेला धडा शिकवायचा होता.

दुसर्‍या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सुचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केले आणि त्यांच्या नोटीसा मोहनरावांची आई, भाऊ वसंता, बहिण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्पेâ अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवर्‍याने कोणत्या हेतूने मृत्युपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पना नव्हती. उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. वसंताला नोटीस मिळताक्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकिलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहिण यशोदा तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुध्द त्यांच्या मृत्युपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुध्द उभे रहायचे एवढेच नव्हे तर कुणालातरी वकिलपत्र देण्याचा तिने निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिने आणि तिच्या नवर्‍याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकिल पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्युपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकिल प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते दोन-तीन महिन्यात केसचा निकाला लागेल. पण केस लांबत गेली आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला.

नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्यालापण असाच निर्णय मिळणार कारण दोघांचे वकिल एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. दोघेही आनंदात मग्न झाले. आता सासुचे, नणंदेचे आणि दिराचे नाक कापायला उशिर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळविली आणि लवकरच आपणास कोकणातली प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली. या आनंदाच्या बातमी निमित्त मोहनराव, आशा तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्रौ ११ च्या सुमारास घरी पोहोचले.

मोहनराव कपडे बदलत असताना अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळविली – ‘‘संध्याकाळी सातवाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात समोरुन येणार्‍या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघही नवरा बायको ठार झाली.’’

ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले, थरथरले. त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी चारच्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करुन केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले आणि आता सहा तासात दुसरी बातमी अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनीपण आपल्या सारखेच वडिलांच्या मृत्युपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते आणि…. मोहनराव मनात म्हणत होते – आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्युपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरु आहे. आपण आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहिण यांना नोटीस पाठविली. आपली सख्खी माणसे त्यांना नोटीस पाठविली….. एक सारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम सुटला. डाव्या पाठीत ठणके बसू लागले. छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुध्द झाले.

बाथरुममधून बाहेर आलेल्या आशाने नवर्‍याकडे पाहिले, तिच्या लक्षात आले – नवर्‍याची तब्बेत बरोबर नाही. तिने एसी चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले. पण शुध्द येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना अ‍ॅम्ब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने तिला घरात सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी काढली आणि मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. दोन मिनिटानंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. पंधरा मिनिटात उमेश अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले.

हिंदूजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शने दिली गेली. दोन दिवसांनी मोहनरावांची एन्जीओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. दोन दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती. गेल्या दहा दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नाईकच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशिब म्हणून आपला नवरा वाचला.

बायपास नंतर मोहनरावांना आयसीयु मधून जनरलमध्ये आणले. पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर, भावंडांवर केस केली. त्यांना नोटीसा पाठविल्या ही आयुष्यातली फार मोठी चुक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडिल येत होते. गावातील महाजनांच्या बागेत अळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे, झाडावर चढून आंबे, रतांबे काढणे अशी कामे करुन त्या मजूरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे. रोज कष्टाची कामे, बागेतली नारळ सुपारी घेऊन दहा मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके-वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला ठेवले. तेव्हा त्यांची आणि आईच्या जीवाची किती घालमेल झालेली. आईफक्त रडत होती पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही. उलट शिक्षण घेऊ दिले. मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वर खाली व्हायचा. भाऊ वसंता आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा एवढासा होता. मी गावी गेलो की मागून मागून असायचा. अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणायचा. कधी शहाळी, चांगले मासे, आंबे. बहिण यशोदा तर सर्वांची लाडकी. नेहमी दादा दादा करत मागे मागे. सर्व माझीच माणसे. रक्ताची माणसे. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला. पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकले नाहीच. एवढ्याशा जमिनीत दोन भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार ? वसंताला काय राहणार ? त्याची तिन माणसे आणि आई जगणार कसे ? आपण आई-वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठविले नाही. आपण पत्नी आशा, मुलगा आणि सासुरवाडीच्या माणसांचा विचार करत राहिलो. आपली बुध्दी भ्रष्ट झाली होती. छे छे… आपले चुकलेच. आता बरे वाटले की गावी जायचे. आईच्या पायावर डोके ठेवायचे. वसंताच्या पाठीवर थाप द्यायची. बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय आपल्याला चैन नाही की सुख नाही. आशा समोर येऊन बसली. म्हणाली – ‘‘कसाला विचार करताय?’’

‘‘मी फार मोठी चुक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुध्दीवर चाललो. माझ्या सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. खरतर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून जगले असते. पण मला तशी बुध्दी झाली नाही. त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीने केले. तोंड मिटून केले. माझ्या वडिलांचे आजारपण त्या दोघांनी काढले म्हणून खरतर मी त्यांचे आभार मानायला हवे होते. त्या ऐवजी मी वाट्टेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमिन. नको हिस्सा. मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’

क्रमश: भाग ४

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 3 ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 3 ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – ‘‘वा रे ! एक लक्षात ठेव माझो पण ह्या प्रॉपर्टीत हक्क आसा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचो पण हक्क असतत.’’ तेवढ्यात आशा नवर्‍याला म्हणाली – चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवला पाहिजे यांना.)

आशा आत जाऊन कपड्याची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला – ‘‘दादा, जाऊ नको आज बाबांचा तेराव्या घातला, तेंका काय वाटात ? तू आणि मी उद्या तहसिलदारांकडे जाऊया. मी लिहून देतय ह्यो माझो मोठो भावस आसा ह्या प्रॉपर्टीत हेचो पण अर्धो हक्क आसा.

आशा कडाडली.

‘आम्हाला कोणाची भिक नको. आम्ही हक्काने येऊ या घरात. चला हो. आमचे मोठे मोठे वकिल ओळखीचे आहेत. आता येऊ तो हक्काने येऊ.’

असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली. रस्त्यापलिकडे त्यांची गाडी उभी होती. त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेली. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनु आता बाहेर आले.

‘‘काय ह्या ? रागान चलते झाले. सकाळी बापाचा तेराव्या आणि दुपारी भांडण करुन गेले’’ नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा येऊन तिच्या शेजारी बसली. सासुबाई पण तिथेच खुर्चीवर बसलेली. त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. वसंता स्फुंदून स्फुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, ‘वसंता भिया नको ही बहीन तुझ्या पाठी आसा. आपण दोघांनी मिळून या मोहनाक आणि त्याच्या बायकोक धडो शिकवया.’

मोहन आणि आशा कणकवलीला पोहोचली. लॉजवर गेल्यानंतर आशाने मामांना फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकिल. त्यांना सर्व हकिगत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली. आशाच्या मामांनी कणकवलीत त्यांचे मित्र भोसले वकिल यांची भेट घ्यायला सांगितले. आपण भोसलेंशी बोलतो असे सांगितले. दुसर्‍या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले.

‘‘नमस्ते, वकिल साहेब ! मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी’’

‘‘या या मोहनराव. पुण्याहून साळुंखे साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले मला आपले जावई तुम्हाला भेटणार म्हणून. बोला, काय झालं ?’’

‘‘माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीत मृत्युपत्र करुन सगळी प्रॉपर्टी माझा दोन नंबरचा भाऊ वसंता याचे नावे केली. मी त्याचा मोठा भाऊ असताना सुध्दा त्यांनी मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मला मिळवून द्या.’’

‘‘ठिक आहे, तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल वगैरे द्या. आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे?’’

‘‘तीन. एक लग्न झालेली बहिण आहे आणि आईपण आहे.’’

‘‘म्हणजे या प्रॉपर्टीत चार वारस आहेत बरोबर ? म्हणजे तुम्हाला या तिघांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावे, पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे सातबार, आठ-अ ही कागदपत्रं लागतील.’’

‘‘पण या मृत्युपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण ?’’

‘‘हो, का नाही ? पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा.’’

मध्येच आशा म्हणाली – ‘‘खर्च होऊंदे पण या वसंताला, यशोदेला आणि त्यांच्या आईला धडा शिकवायचा आहे मला.’’

‘‘मग ठिक आहे, सुरुवातीला पन्नास हजार जमा करा.’’

‘‘पण मिळेल का मला हिस्सा?’’ मोहनराव उद्गारला.

‘हो मिळणारच, कारण ही इस्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही की विकत घेतलेली नाही. ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडिलांकडे आली आहे. म्हणजेच वंशपरंपरेने आलेली आहे. त्यामुळे त्यांना मृत्युपत्र करुन कुणाला देताच येणार नाही असा युक्तिवाद करू आपण. तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून त्या इस्टेटीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा.’’

‘‘पण यात यश मिळेल ना ?’’ मोहनरावांचा प्रश्न.

‘‘प्रयत्न करायचाच. ही अशीच एक केस मी लढतो आहे. कसालचे एक गृहस्थ आहेत. तुम्हाला नाव सांगतो – प्रमोद नाईक. हे कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंशपंरपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली. कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं. प्रमोदरावांच्या वतीने मी चॅलेंज केलय. तुम्हाला या प्रमोद नाईकांचा नंबर देतो. त्यांना विचारा.’’ वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा कोल्हापूरचा पत्ता आणि फोन नंबर दिला.

‘‘बर मी करतो फोन यांना. मग आम्ही निघू ?’’

‘‘हो. सर्व भावंडांचे पत्ते द्या, बहिणीचा पण द्या.’’

पण हा, गावातील सातबारा वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही. मला मुंबईला तातडीने जायचंय.’’

‘‘ठिक आहे. मग अजून पाच हजार द्या. म्हणजे एकूण पंचावन्न हजार. मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल.’’

मोहनरावाने पंचावन्न हजाराचा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. सेक्रेटरी म्हणाली – ‘‘ठिक आहे साहेब, सर्व कागदपत्रे तयार झाली की, तुम्हाला स्वतः एकदा येऊन कोर्टात दावा दाखल करायला लागेल. तेव्हा एकदा या.’’

वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन लावला.

‘‘हॅलो, प्रमोद नाईक बोलतात का ?’’

‘‘होय, मी प्रमोद नाईक, तुम्ही कोण ?’’

‘‘मी मोहन मुंज. मुळ गांव आंबेरी सध्या मुंबईत राहतो.’’

‘‘बोला काय काम होतं, आणि माझा नंबर कोणी दिला ?’’

‘‘तुमचा नंबर कणकवली भोसले वकिलांनी दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्युपत्राला चॅलेंज केलंय ना कोर्टात त्या संबंधी बोलायचं होतं.’’

‘‘तुमचा काय संबंध?’’

‘‘माझ्या वडिलांनी पण असचं केलयं. वडिलोपार्जित जमिन मृत्युपत्राने माझ्या एकट्या भावाच्या नावाने केली. मला एक गुंठापण ठेवला नाही. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय. भोसले वकिल म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांचेकडे आहे. त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता दिला.’’

‘‘होय, होय. मी त्या मृत्युपत्राला चॅलेंज केलयं. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकिल म्हणाले कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल. फक्त पैसे सोडायला लागतील.’’

‘‘मला पण तसेच सांगितले. पण खरोखर तसे होईल काय ?’’

‘‘निश्चित होईल. भोसले वकिल सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो कशी मांडवली करतो बघा. तुम्ही निश्चिंत रहा. माझी केस चालू आहे त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच.’’

‘‘मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.’’

‘‘निश्चित॰ कसलीच काळजी करु नका.’’

मृत्युपत्र – क्रमश: भाग  ३ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 2 ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 2 ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – वसंता घाबरुन म्हणाला, ‘‘दादा, खराच माका काय म्हायती नाय रे ! बाबांनी माका कायएक सांगूक नाय, नायतर मी असा करुक दिलय नसतयं, व्हया तर आईक विचार.’’  आता इथून पुढे -)

मोठ्या मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई एव्हाना आपल्या खोलीतून बाहेर आली. थोरल्याचे आणि सूनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली.

‘‘मोहना, या वसंताक खराच काय म्हायती नव्हता. तुझ्या वडिलांनी फक्त माका सगळा सांगितलेल्यानी, नायतर ह्यो वसंतापण तयार झालो नसतो.’’

‘‘मग असं का केल? मी त्यांचाच मुलगा आहे ना ? थोरला मुलगा. मग माझा हक्क का डावलला ?’’

आई बोलू लागली – ‘‘मोहना, चिडा नको, तुझ्या बाबांचा म्हणणा होता पाच-सहा वर्षापूर्वी ते सतत विचार करत रवत तेव्हा मी त्यांका विचारलय इतकी कसली विवंचना आसा?’’

पाच वर्षापूर्वी…..

केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटे. या दोन मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून एक दोन नंबराने पास होत गेला. आपणास त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. सातवी स्कॉलरशीपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनीपण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. बारावीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तेथे तो बी.कॉम. झाला सी.ए. झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामांच्या मुलीशी आशाशी त्याने लग्न केले. सासर्‍याने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक दिला. त्याचा एकच मुलगा त्यांच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यातपण घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही. पण त्याच्या मित्रांकडून कळले. त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलच त्याला. दोन वर्षातून केव्हातरी गणपतीत येतो. येतो पण तो तिसर्‍या दिवशी. तिसर्‍या दिवशी येऊन गणपतीच्या पुजेला बसतो आणि दोघजन जातात कणकवलीत लॉजवर. परत पाचव्या दिवशी गणपती पोहोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई. वर्षातून चुकून कधी फोन केला तर. तो आपल्यापासून लांब गेला पण धाकटा वसंता तसा हुशार होता पण बारावीनंतर आपण त्याला पुढे पाठवल नाही. त्यालाही तशी अभ्यासाची आवड नव्हतीच. म्हटले, आपल्या सोबत म्हातारपणी कोणीतरी हव. तो पण प्रामाणिकपणे शेतीत, बागायतीत लक्ष घालतो. कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे देव, सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायकोपण आहे गुणी. आम्हा दोघांचे तीच मान खाली घालून करते. तिच्या माहेरीपण तशी गरीबीच. वसंताचा मुलगापण आहे लाघवी. आम्हाला दोघांना त्याने लळाच लावला. गेली दहा-पंधरा वर्षे आंब्याचे पिक व्यवस्थित येत नाही शिवाय माकडे फार वाढली आहेत. खूप नासधुस करतात. गाईच्या दूधांना आता मागणी नाही. शहरात दूध पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घरखर्च भागविणे कठीण. आपली थोडीशी बागाईत, थोडी शेती यात जर दोन मुलांचे दोन भाग केले तर वसंताला काय राहणार ? त्याने आयुष्यभर बागायतीत, शेतीत कष्ट केले त्याला काय मिळणार ? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत. पण तो हक्क मागणार म्हणून वकिलांचा सल्ला घेतला. आपल्या मागे आपली थोडी जमिन वसंताकडे राहील हे पाहणे योग्य. तो जमिन विकायचा नाही पण या शहरातल्या मुलाचा काय भरवसा ? तो बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि शहरात बसेल. कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा. असा विचार करुन केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोहोचले. वकिलांना सांगून त्यांनी मृत्युपत्र करुन घेतले आणि गावातील जमिन वसंताच्या नावे केली.

सुमतीबाईंनी आपल्या नवर्‍याने असा का निर्णय घेतला हे सांगितले. आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आशा खवळली.

‘‘काहीच सांगू नका, याला माहित नाही आणि त्याला माहित नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या विरुध्द कट रचलाय कट. हा इथे भावासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी एक नंबरची लबाड बाई आहे. तरी बरं बाबा नुसता भिकारी म्हणून आवाज कमी नाहीतर कुणाला ऐकली नसती.’’ नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होती.

गावचे लोक तुम्ही सगळे आळशी, काम करायला नको. मग तुमचं भागणार कसं ? बापाला मुलाची एवढी काळजी वाटते तर त्याला मजूरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याच्या एवढे लाखो रुपये येतात त्याचे करता काय? आम्हाला फक्त दोन पेट्या पाठवतात. बाकी सर्व तुम्ही खाता ना ? मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली ही तर कैकयी. रामाला विसरली.

ही तणतण ऐकून वसंता रडू लागला. आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनु आईशेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरु केले. हे ऐकून कंटाळलेली बहिण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली.

‘‘तुका फक्त हक्क व्हयो, जमिनीत वाटो व्हयो पण कसले जबाबदारे उचलतस ते सांग? एवढो मोठो ऑफिसर तू आणि श्रीमंताचो जावय कधी आईक यॅक लुगडा तरी पाठवलसं ? बापाशीक कधी लेंगो पाठवलस, या भावाशीक काय व्हया नको इचारलस ? आणि तुझी एकुलती एक बहिण मरे मी माझ्या लग्नानंतर कधी माका बघुक इलस ? बहिणीक साडी कधी धाडलसं ? नाय ना ? पण ह्यो वसंता दोन तीन महिन्यांनी बहिणीकडे येता. माझी चौकशी करता, सुट्टी पडली की माझ्या चेडवाक आजोळाक घेवन जाता. माका दरवर्षी दोन साडये घेवन येता. हेका भावस म्हणतत. तुका कसली जबाबदारी नको. फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हया. ही तुझी बायल आशा सासर्‍याक कधी बघुक इल्ली ? तु एवढो बापूस शिक तर बघुक तरी इलस? आता बापूस मेलो तर हक्कासाठी भांडतस. बाबांनी केला ता बरा केल्यानी. ह्या वसंतान आणि नलिनीन तेंका बघल्यानी आणि म्हातार्‍या आईक पण तोच बघतलो.’’

तिचे हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला.

‘‘यशोदे, तुझा तोंड फोडीन पुढे बोल्लस तर. तु लग्न करुन दिलेली मुलगी, ह्या प्रॉपर्टी बद्दल बोलू नकोस.’’

‘‘वा रे ! एक लक्षात ठेव माझो पण ह्या प्रॉपर्टीत हक्क आसा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचो पण हक्क असतत.’’

तेवढ्यात आशा नवर्‍याला म्हणाली – चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवला पाहिजे यांना.

मृत्युपत्र – क्रमश: भाग २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 1 ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

अल्प परिचय

  • प्रदीप रामदास केळुस्कर
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ‘पाट’ (Pat) गावात राहतात.
  • कुडाळ येथे प्रिंटिंग स्टेशनरी चा व्यवसाय आहें.
  • दोन वर्षी पासून लेखनाला सुरवात केली. दोन वर्षात 22 कथा लिहिल्या.
  • अनेक स्पर्धा मध्ये क्रमांक मिळाला.
  • डिसेंबर 22 मध्ये “एका पेक्षा एक ‘नावाने कथा संग्रह प्रसिद्ध झाला

?जीवनरंग ?

☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 1 ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

केशव काकांच्या तेराव्याचे जेवण जेवून शेजारी, नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता हे केशवरावांचे दोन मुलगे, यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई. मोहन आणि मोहनची बायको आशा उद्याच मुंबईला जायची आणि बहिण यशोदापण उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासनू भटजींची गडबड. जेवण, येणारे नातेवाईक. गडबड नुसती. वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता लोट्यावर आणि मोहनची बायको आशा, बहिण यशोदा आत वाणशीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी. त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती. गळून झाली की स्टॅण्डवर ठेवत होती. ती मनात म्हणत होती. उद्या मोहन भावोजी आणि आशा वहिनी मुंबईला जाणार म्हणून त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत. एकीकडे तिला तिचा मुलगा शंतनु याची बारावीचा अभ्यास चुकतो आहे याचे वाईट वाटत होते. पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असेही वाटत होते. गेले पाच महिने सासरे आजारी त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासुबाई असतात पण त्यांचे गुढगे संधीवाताने सतत दुखत असतात. त्यामुळे सासर्‍यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज तेरा दिवस झाले. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून बागेत जाईल, शंतनुची शाळा त्यामुळे उरलो आपण आणि सासुबाई. सकाळपासून भाकरी, चहा मग पेज, दुपारी जेवण पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण यामध्ये विहिरीवरुन पाणी आणायचे, गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचे, गवत काढायचे. दुपारी बाजारात जाऊन घर सामान आणायचे. दुपार उतरली की, बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा. तो भातशेतीच्या जमिनीवर टाकायचा. तिन्हीसांज झाली की गाईचे दूध काढायचे. गुरांना गवतकाडी घालायचे. नवरा वसंता घरी असला तर मदत करायचा. पण तो गवंडीकाम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा. शंतनुचा आतल्या खोलीत अभ्यास. मध्येच उठून तो आजीची औषधे देतो. त्याचे आजोबा त्याच खोलीत बाकावर पडलेले असत. त्यांना स्वच्छ करायचा. तोंडात औषधे घालायचा. झाले ! उद्यापासनू रोजचेच काम… असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. गोबरगॅस तिने चालू केला पण लक्षात आले गॅस येत नाही. कारण घरच्या गडबडीत गोबरगॅसमध्ये शेण घालायचे राहिले. तिने माडाच्या चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधण ठेवले. घरातल्या भांड्यांचा आवाज ऐकताच बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागी झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली. नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक-एक कप प्रत्येकाच्या हातात दिला. एक कप नेऊन आत सासुबाईंना दिला. चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजेच मोहनला विचारु लागला.

‘‘दादा ! मग विवेक केव्हा चललो अमेरिकेक ?’’

‘‘बहुतेक पुढच्या महिन्यात. काय आसता अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित अ‍ॅडमिशनचा कळला की मग तिकिटासाठी धडपड करुक व्हयी.’’

‘‘मग विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनिअर झालो, मग पुढचा शिक्षण आपल्या देशात मिळणा नाय काय ?’’

‘‘काय आसता, अमेरिकन विद्यापीठांका जगात मोठो मान आसता. तिकडे अ‍ॅडमिशन मिळणा कठीण आणि खर्च भरपूर. पण एकदा का तो एमएस झालो की मग खोर्‍यांनी पैसे कमवतलो.’’

‘‘पण खर्चपण खूप येता ना रे ?’’

मध्येच आशा बोलली – ‘‘हो येणारच, शिक्षण आहे ना स्टॅण्डर्ड, मग खर्च करायलाच हवा आणि आम्ही कर्ज घेतलयं बँकेकडून. त्यात इकडे तातडीने याव लागलं तो खर्च वाढला नाहीतर आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हत. खर्च खूप होतो.’’ आशा बडबडत सुटली.

आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती. मोहनरावांची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येतय म्हणून वसंता आणि त्याचा मुलगा शंतनु खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकिल नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकिल कसे काय ? अशा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दाखवली. समोरच्या बाकावर मोहनराव बसले. बाजूला येऊन वसंता बसला. आत बॅग भरायला गेलेली आशा मोहन वसंताची लग्न झालेली बहिण यशोदा उंबर्‍यावर येऊन उभ्या राहिल्या. आत चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वाणशीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंताचा बारावीतील मुलगा शंतनु तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला.

नाकडर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले.

‘‘मंडळी, मला तुम्ही ओळखत असालच. मी अ‍ॅड. ज्ञानेश नाडकर्णी, कणकवलीत गेली पंचवीस वर्षे वकिली करतो. आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचा आश्चर्य वाटले असेल. पण त्याचे कारण वैâ. केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्तेपुरुष हे चार वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना त्यांची या गावात असलेल्या मालमत्तेचे मृत्युपत्र करायचे होते. त्यांच्या इच्छेन्ाुसार मी रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांचे मृत्युपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंज यांचे निधन होऊन आज तेरा दिवस झाले. त्यामुळे त्यांचे हे मृत्युपत्र मी तुमच्या समोर ठेवतो. सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्युपत्र केल्याचे माहित नव्हते. असे मृत्युपत्र का केले असेल याचा प्रत्येकजन विचार करत होता.

तेवढ्यात वकिल साहेब पुढे म्हणाले – ‘‘केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे दोन मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे. आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील ३२ गुंठे जमिन त्यावरील २६ आंब्याची कलमे, २० काजूची झाडे आणि १० गुंठे भातशेती जमिन फक्त वसंत केशव मुंज याच्याकरिता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहिण सौ. यशोदा हिचे माहेरपण करावे अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नाही. एवढेच मला सांगायचे होते. आता हे मृत्युपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे. नाडकर्णी वकिल निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला – ‘‘नाडकर्णी साहेब मृत्युपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंता आला होता ? कारण वडीलांनी माझ्यासाठी काहीच जमिन ठेवली नाही याचे मला आश्चर्य वाटते.’’

‘‘मोहनराव माझ्या आठवणीनुसार मृत्युपत्र करण्यासाठी एकटे तुमचे वडीलच आले होते.’’

‘‘वकिल साहेब निश्चित आठवा हा वसंता त्यांना घेऊन आला असणार. नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते.’’ मोहनराव चिडून बोलत होता.

‘‘नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्युपत्र तिनही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड करतो आहे.’’

मोहनराव आणि त्याची पत्नी आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवर्‍याला एकाबाजूला बोलावून काही सांगत होती. वसंता मान खाली घालून ऐकत होता. आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनु काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरेबावरे झाले होते. नाडकर्णी वकिल गाडीत बसून निघून गेले.

मोहनराव वसंताकडे पाहून कडाडले.

‘‘तू जाणूनबुजून हे केलस. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतील एक इंच जमिन दिली नाही. सगळी जमिन तुझ्या नावावर. एवढा कारस्थानी असशील असे वाटले नव्हते.’’ आशा आता चिडून बोलू लागली.

‘‘खाली मुंडी पाताळ धुंडी, आम्ही आलो की दादा दादा म्हणत मागे येतो. मग दादाला साफ फसवलं कसं?”

 वसंता घाबरुन म्हणाला,

‘‘दादा, खराच माका काय म्हायती नाय रे ! बाबांनी माका काय एक सांगूक नाय, नायतर मी असा करुक दिलय नसतयं, व्हया तर आईक विचार.’’

मृत्युपत्र – क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रणी जो सहकारी माझा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

रणी जो सहकारी माझा…. तो प्राणांहूनी प्रिय मजला ! अर्थात Leave nobody behind… Leave no buddy behind! 

भारतीय सेना…. नाईक अमोल तानाजी गोरे या पॅरा कमांडो ची दृढ हिम्मत व बलिदानाची सत्यकथा.

“साहेब, मी जाऊ का?… माझा जोडीदार तिथे जखमी होऊन पडलाय… मी त्याला इथं सुरक्षित घेऊन येतो !” जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आग्रहाच्या स्वरात परवानगी मागितली… आणि परवानगी नाही मिळाली तरी तो जाणारच होता असं स्पष्ट दिसत होतं. 

साहेब म्हणाले, “ तू जाऊ शकतोस तुला हवं असेल तर. पण तू तर पाहतोयस… तुफान गोळीबार सुरू आहे. आपल्या सैनिकांचे मृतदेह चहूबाजूला विखुरलेले दिसताहेत. आणि तुझा तो जोडीदार तर इतका जखमी आहे की तो जिवंत असेल अशी शक्यता नाही. कशाला जीव धोक्यात घालतोयस ? ” 

साहेबांनी उच्चारलेलं “ तू जाऊ शकतोस….!” हे एवढंच वाक्य प्रमाण मानून तो जवान मोकळ्या मैदानात धावत निघाला… 

चहु बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मोकळ्या मैदानातलं लक्ष्य टिपणं शत्रूच्या बंदुकांना काही फार अवघड नव्हतं. पण याच वायुवेगानं धावणं आणि धावता धावता फैरी झाडणं यामुळे शत्रूलाही थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले होते. पण गडी जबर जखमी व्हायचा तो झालाच…आगीत उडी घेतल्यावर दुसरं होणार तरी काय म्हणा?”

यानेही जमेल त्या दिशेला फायरिंग सुरू ठेवलं आणि पळणंही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकारी सैनिकाला त्याने पटकन खांद्यावर उचलून घेतलं आणि जीवाच्या आकांताने तो खंदकात परत आला ! 

“ मी तुला म्हटलं होतं ना बेटा… तू सुद्धा जखमी होशील… तसंच झालं ना? अरे हा तर केंव्हाच खलास झालाय आणि तूही जगणार नाहीस….! ” साहेबांनी कापऱ्या आवाजात म्हटलं ! 

“ साहेब, मी पोहोचलो… तेव्हा याचे श्वास सुरू होते ! ‘ मला माहित होतं… तू  माझ्यासाठी जरूर येशील ! ‘ हे त्याचे शब्द होते साहेब… शेवटचे ! माझ्या खांद्यावरच प्राण सोडला त्याने… ‘ येतो मित्रा !’ म्हणत ! मी मित्राप्रती असलेलं माझं कर्तव्य निभावलं साहेब ! त्याच्या जागी मी असतो ना तर त्यानेही माझ्यासारखंच केलं असतं साहेब ! हेच तर शिकवलं आहे ना फौजेनं आपल्याला ! ” असं म्हणून या जवानानेही डोळे मिटले… कायमचे ! त्याचा मित्र मरणाच्या वाटेवर फार पुढं नसेल गेला… तोवर हाही निघालाच त्याच्या मागे. 

युद्धात कुणाचं तरी मरण अपरिहार्यच असते. सगळा शिल्लक श्वासांचा खेळ. किती श्वास शिल्लक आहेत हे देहाला ठाऊक नाही आणि मनालाही. असे अनेक देह झुंजत असतात देश नावाच्या देवाच्या रक्षणार्थ. या देवाचे भक्त एकमेकांच्या विश्वासावरच तर चालून जातात मरणावर… मारता मारता झुंजतात.

…  क्षणभरापूर्वी सोबत असलेला आपलाच सहकारी सैनिक देहाच्या ठिकऱ्या उडालेल्या अवस्थेत पाहताना फार वेळ त्याच्याकडे पहात बसायला, शोक व्यक्त करायला शत्रू उसंत देत नाही ! जखमी झालेल्या, वेदनेने विव्हल झालेल्या आणि प्रियजनांच्या आठवाने व्याकूळ झालेल्या जोडीदाराला आपल्या बाहूंच्या बिछान्यावर घडीभर तरी निजवावे अशी इच्छा असते त्याच्या जोडीदाराची… त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा हात सोडू नये अशी अनिवार इच्छा असते… तो जाणारच आहे हे दिसत असतानाही ‘ सगळं ठीक होईल !’ असं सांगत राहण्याची हिंमतही असावी लागते म्हणा !

पण हेच जातिवंत सैनिकांचं वैशिष्टय. खांद्याला खांदा लावून लढायचं… जोडीदाराच्या दिशेने येणाऱ्या मृत्यूला आपल्या जीवाचा पत्ता सांगायचा… कुणी पडला तर त्याला खांद्यावर वाहून आणायचं… नाहीच तो श्वासांचा पैलतीर गाठू शकला तर ओल्या डोळ्यांनी त्याची शवपेटी खांद्यावर घेऊन चालायचंही ! डोळ्यांतील दु:खाची आसवं आटताच त्याच डोळ्यांत प्रतिशोधाचा अंगार पेटवायचा आणि शत्रूवर दुप्पट वेगाने तुटून पडायचं… हेच सैनिकी कर्तव्य आणि सैनिकी जीवनाचं अविभाज्य अंग ! नाम-नमक-निशान  लढायचं आणि प्रसंगी मरायचं ते पलटणीच्या नावासाठी… देशानं भरवलेल्या घासातल्या चिमुटभर मिठाला जागण्यासाठी रक्ताचं शिंपण करायचं आणि पलटणीचा झेंडा गगनात अखंड फडकावत ठेवायचा… ही आपली भारतीय सेना ! 

अनेक सहकाऱ्यांचा जीव वाचत असेल तर आपल्या एकट्याच्या जीवाचं काय एवढं मोल? म्हणत मरणाला सामोरं जाणाऱ्या सैनिकांच्या कथांनी तर आपल्या भारतीय सेनेचा इतिहास ओतप्रोत भरलाय. 

१४ एप्रिल २०२३ रोजीचा प्रसंग. शत्रू सतत आपल्या सीमेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असतो म्हणून सीमेवर गस्त घालत राहणं अत्यावश्यकच. राजकीय करारामुळे शत्रू सीमेपलीकडून गोळ्या नाही झाडत सध्या, पण हवामान नावाचा छुपा शत्रूही सतत डोळे वटारून असतो चीन सीमेवर. बर्फाच्या कड्यांना,नद्यांच्या जीवघेण्या वेगाला देशांच्या सीमा ठाऊक नाहीत.

… त्यादिवशी नाईक अमोल तान्हाजी गोरे आपल्या सहकारी जवानांसोबत बर्फातून वाट काढत काढत अत्यंत सावधानतेने गस्त घालीत होते. आणि… अचानक भयावह वेगाने वारा वाहू लागला, आभाळातल्या काळ्या ढगांनी उरात साठवून ठेवलेला जलसागर एकदमच ओतून दिला. नद्यांमध्ये हे पाणी मावणार तरी कसे? आधीच बर्फ, त्यातून हा वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. उधाणाच्या भरतीला समुद्रात उसळते तशी एक मोठी लाट उसळली नदीत… आता नदी आणि तिचा काठ यात काहीही फरक उरला नव्हता… पाण्यासोबत दगड-गोटे वेगाने वाहात येत होते. 

नाईक अमोल साहेबांचे दोन मित्र कधी नदीच्या प्रवाहात ओढले गेले ते समजले सुद्धा नाही क्षणभर. नाईक अमोल साहेब पट्टीचे पोहणारे. पॅरा कमांडो आणि पोहण्यात विशेष प्रशिक्षण घेतलेले. अंगापिंडानं एखाद्या खडकासारखा मजबूत.  त्याने दुसऱ्याच क्षणाला त्या प्रपातामध्ये झेप घेतली. शरीरातली सर्व शक्ती आणि अत्यंत कठोर परिस्थितीत घेतलेलं कमांडो प्रशिक्षण पणाला लावलं! दोन्ही दोस्त हाती लागले…  Leave no man behind ! अर्थात जोडीदाराला सोडून जायचं नाही.. प्रसंगी प्राणांवर बेतलं तरी बेहत्तर ! हे शिकले होते अमोलसाहेब. आणि सैन्यात शिकलेलं आता अंमलात नाही आणायचं तर कधी? उद्या ही वेळ आपल्यावरही येऊच शकते की ! 

सैन्यात सहकाऱ्यास ‘बडी’ म्हणजे सवंगडी-मित्र-दोस्त म्हणतात.. एकमेकांनी एकमेकांचा जीव वाचवायचा… त्यासाठी जीव द्यायचा किंवा घ्यायचाही ! कर्तव्यापुढे स्वत:च्या ‘अमोल’ जीवाचं मूल्य शून्य ! 

…. हाडं गोठवणारं थंड, वेगवान पाणी अमोल साहेबांना रोखू शकत नव्हतं. पण नदीच्या वरच्या उंचावरून गडगडत आलेला एक मोठा पत्थर… मानवी शिराचा त्याच्या प्रहारापुढे काय निभाव लागणार? त्या दोघा जीवाभावाच्या बांधवांना काठावर आणताना अमोल साहेबांना आपल्या डोक्यावरचा हा प्राणांतिक आघात लक्षातही आला नसावा… वाहत्या पाण्यासवे त्यांचं रुधिरही वेगानं वहात गेलं… त्या लाल रक्तानं त्या पाण्यालाही आपल्या लाल रंगात रंगवून टाकलं… पण रक्ताशिवाय प्राण कसा श्वास घेत राहणार? 

नाईक अमोल तान्हाजी गोरे साहेब दोन जीव वाचवून हुतात्मा झाले ! भारतीय सैन्याची उच्चतम परंपरा त्यांनीही पाळलीच. 

 

        २४ एप्रिल २०२३ रोजी, म्हणजे अवघ्या दहा दिवसांनी ते घरी सुट्टीवर येणारच होते… आपल्या चार वर्षांच्या मुलाला, पत्नीला, आई-वडीलांना आणि सवंगड्यांना भेटायला…..  आणखी बरीच वर्षे देशसेवा करायची होती. पण अरूणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग मधल्या त्या नदीच्या पाण्याला अमोल साहेबांना आपल्या सोबत घेऊन जायचं होतं… कायमचं ! —  

— एक देखणं, तरूण, शूर, शरीरानं आणि मनानं कणखर परोपकारी आयुष्य असं थांबलं !  पण दोन जीव वाचवून आणि आपला जीव गमावून… एकाच्या बदल्यात दोन आयुष्यांची कमाई करून दिली अमोल साहेबांनी ! 

नियतीचा असा हा तोट्याचा सौदा सैनिक हसत हसत मान्य करतात… हीच तर आपली सैनिकी परंपरा. अशाच सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे…

जयहिंद! 🇮🇳

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सोनखस या गावातील सैनिक १४ एप्रिल,२०२३ रोजी चीन सीमेवर गस्त घालताना झालेल्या दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या चितेच्या ज्वाळा अजून पुरत्या विझल्याही नसतील. आपण आपल्या या वीरासाठी आपल्या आराध्य देवतेकडे प्रार्थना करूयात… त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा प्रचंड आघात सहन करण्याची शक्ती मिळो ! त्यांच्या चार वर्षांच्या बाळासाठी आशीर्वाद मागूयात. 

हुतात्मा नाईक अमोल तान्हाजी गोरे…..अमर राहोत !

🇮🇳 जयहिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

(मला जमलं तसं लिहिलं ! अशा बातम्या वृत्तपत्रे, वाहिन्या आठ-दहा वाक्यांत उरकतात. एखाद्या रस्ते अपघाताची बातमी द्यावी तसं सांगतात.. लिहितात. त्यामुळे बरेचदा सैनिकांचे शौर्य जनमानसापर्यंत पोहोचू शकत नाही, असं मला वाटतं, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिले. तांत्रिक बाबींमध्ये काही तफावत असूही शकते. उद्देश फक्त एकच… हौतात्म्याचं स्मरण व्हावं, त्यांच्या नावाचं उच्चारण व्हावं !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलू लागला होता. पश्चिम क्षितिजावर रंगांची उधळण होऊ लागली होती. त्या रंगात प्रियम् चालली होती. गेल्या सहा महिन्यांपासून जवळ जवळ रोजच या नागमोडी रस्त्यावरून चालत जाण्याचा तिचा शिरस्ता होता. हा रस्ता तिला भयंकर आवडायचा! कुठेतरी जगाच्या पल्याड, स्वप्नांच्या गावाला घेऊन जाणारा!

तिच्या खोलीच्या टेरेसवरून हा रस्ता तिला दिसत राहायचा. एका अनामिक ओढीनं, ती त्याकडं बघत राहायची. भान विसरून! अभ्यासाचं टेबलच तिनं असं ठेवलं होतं की, मान वर करताच तिला हा रस्ता दिसायचा. शांत, निर्मनुष्य, थोडासा गूढ, पण रमणीय! डाव्या बाजूला एक छोटीशी टेकडी, उजव्या बाजूला हिरवंगार शेत. मधून नागमोडी वळणं घेत जाणारा हा शांत रस्ता. खूप लांबपर्यंत दिसायचा. जिथं दिसेनासा व्हायचा, तिथं पुन्हा दाट झाडी. त्यामुळं त्याची गूढता अधिकच वाढत होती. टेकडीच्या जवळून एक छोटासा ओढाही वहात होता. त्यामुळं त्याची रमणीयता वाढत होती. पुढं गेल्यावर एका वळणावर एक छोटासा कट्टा होता. मनातल्या मनात त्या कट्ट्यावर ती कितीदा तरी येऊन बसत होती. लहानपणापासून या रस्त्यानं थेट चालत जावं, असं तिला वाटायचं. आईजवळ तिनं तसा हट्टही केला अनेकदा, पण कधी मनावर घेतलं नाही.

शेवटी एकदा तिने पप्पांनाच विचारलं. तेव्हा पप्पांनी तिला समजावून सांगितलं, ‘‘पियू बेटा, तिथं जायला बंदी आहे. हा रस्ता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो ना?’’

‘‘मग तिथं जायला बंदी का बरं?’’

‘‘अगं तिथं संशोधन चालतं! अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ तिथे काम करत असतात, संशोधन करत असतात. संशोधनाबद्दल फार गुप्तता पाळली जाते. तिथं अनावधानानं छोटीशी जरी चूक झाली, तरी दुर्घटना घडू शकते. सामान्य नागरिकाला यातलं काहीही माहीत नसतं. काही शोधही फार महत्त्वाचे असतात. त्याबद्दल गुप्तता पाळणं अपरिहार्य असतं. ’’

‘‘पण मग पप्पा तुम्ही कसे तिथं जाता? कधी कधी तर रात्र-रात्र?’’

ते ऐकल्यावर पप्पांना तिच्या निष्पाप, निरागसपणाची गंमत वाटली. ते मोठमोठ्यानं हसू लागले. त्यांच्या हसण्याने छोटी पियू मात्र गोंधळून गेली. आपलं काय चुकलं तिला कळेना. तिचा चेहरा उतरला. डोळे पाण्यानं भरून आले.

ते पहाताच पप्पांनी तिला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसत म्हटले, ‘‘अगं वेडे, तुझा पप्पा शास्त्रज्ञ आहे ना! तुला माहीत नाही का?’’

‘‘अय्या खरंच? मग तुम्ही न्या ना मला तिकडे. ’’

‘‘हो हो जरुर जरुर, पण तू थोडी मोठी झाल्यावर’’

हे सगळं बोलणं प्रियमने आपल्या मेंदूत पक्क नोंद करून ठेवलं. खरंचच ग्रॅज्युएट झाल्यावर तिनं पप्पांना आठवण करून दिली. पप्पांनीही लगेच स्पेशल परवानगी काढून तिला इन्स्टिट्यूटमध्ये नेण्याचं ठरवलं.

इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याच्या कल्पनेनेच प्रियमच्या काळजात अनामिक धडधड होऊ लागली. अपार उत्सुकता वाढू लागली. ‘‘उद्या मी तुला घेऊन जाणार बरं का इन्स्टिट्यूटमध्ये’’ असं पप्पांनी सांगितल्यावर रात्रभर तिला झोपच आली नव्हती. सकाळी 10 वा. जायचं होतं तर ही 9 वाजल्यापासून तयार होऊन बसली होती.

10 वाजता पप्पांची कार आली. आवडत्या रस्त्यावरून गाडी धावू लागली. प्रियम् हरखून गेली. आता या जगापल्याड वेगळ्या जगात आपण जाणार, असं तिला सारखं वाटत होतं. नेहमीच जिथं रस्ता संपल्यासारखा वाटायचा, त्याच्याहीपुढं लांबच लांब रस्ता होता. तोही तेवढाच सुंदर, शांत, निर्मनुष्य! गंमत म्हणजे संपूर्ण रस्त्यावर अनेक छोट्या, छोट्या टेकड्या होत्या. दुतर्फा सुंदर, सुंदर वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. कधी न पाहिलेली. बघता बघता इन्स्टिट्यूटच्या गेटपाशी गाडी उभी राहिली. भक्कम दगडी कंपाऊंड आणि त्यावर काटेरी तारा होत्या. बंदूकधारी सुरक्षारक्षक गेटपाशी उभा होता. त्यानं कारपाशी येऊन पाहिलं. पप्पांना सॅल्यूट ठोकला. पप्पांचं एंट्रीकार्ड गेटवर स्वाईप करताच गेट उघडलं. गाडी आत शिरली. आतमध्येही पुन्हा मोठा रस्ता होता. आकर्षक फुलझाडांचा कलात्मक बगीचा होता. या आकर्षक दुनियेत विरघळून जावं असं प्रियमला वाटत होतं.

पुढं जाऊन एका भव्य इमारतीपाशी कार थांबली. ड्रायव्हरने तत्परतेने उतरून पप्पांचा न् तिचा दरवाजा उघडला. सारी निरीक्षणं करीत पप्पांच्या मागे ती चालत राहिली. प्रचंड मोठमोठी यंत्र, असंख्य वायर्स, स्तब्ध शांतता, अन् स्वतःला विसरून काम करणारी माणसे. कमालीची स्वच्छता अन् टापटीप.

या वातावरणाची नकळत प्रियमला भीती वाटू लागली. पण पप्पा बरोबर होते. पप्पांवर तिचा गाढ विश्वास होता, त्यामुळे आश्वस्त होऊन त्यांच्यामागून ती चालू लागली.

चालता चालता एका ठिकाणी पप्पा थांबले. ज्या ठिकाणी पप्पा थांबले तिथे डेंटीस्टकडे असते, तशी खुर्ची होती. त्या खुर्चीला असंख्य वायर्स अन् बटणं होती. त्या खुर्चीवर एक माणूस झोपला होता. त्याच्या डोक्याला असंख्य वायर्स अन् इलेक्ट्रोड्स लावलेले होते. त्याच्या हातात एक रिमोट होता. त्यावर अनेक बटणं होती. ती तो मधून मधून दाबत होता. समोरच्या स्क्रीनवर काही आलेख, आकडे दिसत होते.

तिथंच बिपीन उभा होता. पप्पांना पाहताच त्याने कमरेत वाकून ‘सर’ म्हणून आदराने नमस्कार केला. त्याला पाहताच प्रियमच्या मनात असंख्य सतारीच्या तारा झंकारू लागल्या. बिपीनने हॅलो म्हटले. प्रियमने फक्त हसून मानेनं नमस्कार केला.

‘‘येस बिपीन काय रिझल्टस्’’

‘‘येस सर! सकाळपासून मी बरीच ऑब्झर्वेशन्स घेतोय पण अजून तरी म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही. ’’

‘‘तो माणूस पूर्णपणे तयार आहे ना प्रयोगासाठी?’’

‘‘येस सर त्याने तसं रिटनमध्ये दिलं आहे. शिवाय त्याला पैशांची फार गरज आहे. त्यामुळे त्याची काही तक्रार नाही. ’’

‘‘ओ. के. कॅरी ऑन. मला अपडेट्स देत रहा. त्याच्या टेस्टस्चे काय?’’

‘‘झाल्यात! पण काही निगेटिव्ह आहेत. ’’

‘‘अच्छा. देन ट्राय अनदर पर्सन’’

‘येस सर हा रिटर्न आला की बघतो. ’’

त्यानंतर संपूर्ण इस्टिट्यूट पप्पांनी तिला दाखवली. पण बिपीन आणि त्याचा प्रयोग यातच ती अडकून पडली. पुढे फारसं काही तिला लक्षात राहिलं नाही. त्या प्रयोगाबद्दल अनेक प्रश्न तिला पप्पांना विचारायचे होते. पण त्यानंतर दोनच दिवसांनी आईला हार्टअ‍ॅटॅक न् तिचा मृत्यू. यामुळे सारंच बदलून गेलं. हसतं खेळतं घर गप्प-गप्प झालं. पप्पाही गप्प गप्प झाले.

प्रियमसाठी हा धक्का फार मोठा होता. सारं घर अनोळखी वाटत होतं. तो एक रस्ता तेवढा आपलासा वाटत होता. का कुणास ठाऊक खुणावत होता.

पौर्णिमेची रात्र होती. चंद्रप्रकाशात न्हालेली. पप्पा अजून आले नव्हते. एकटीला घरात बसणं असह्य झाले. पायात चपला सरकवून प्रियम निघाली. कट्ट्यावर जाऊन बसली. पहिल्यांदाच एकटी या रस्त्यावर आली होती प्रियम! पुढे त्या दिवशापासून बहुतेक रोजच येत होती. येऊन कट्ट्यावर बसत होती.

कट्ट्यावर बसल्यावरही आईची आठवण येत होती. आईचा मृत्यू, बिपीनचा प्रयोग न् हा रस्ता यात काहीतरी कनेक्शन आहे असं तिला वाटत होतं.

अचानक एक मोटारसायकल तिच्यासमोर थांबली. मोटारसायकलवर बिपीन होता. खाली उतरून तो तिच्याजवळ आला.

‘‘मिस रंगराजन? तुम्ही? आत्ता? इथं एकट्या’’

प्रियम काहीच बोलली नाही.

‘‘येस मिस रंगराजन’’

‘‘प्रियम नाव आहे माझं’’

‘‘हो! प्रियम्! तुम्ही काय करताय इथं’’

प्रियमच्या मनात दुःख दाटलेलं होतं. त्याचवेळेस बिपीन तिची चौकशी करत होता. तिचा बांध फुटला. डोळ्यांना धारा लागल्या. हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदू लागलं.

बिपीनला कळेना काय करावं. त्यानं हातरुमाल तिच्यापुढं केला. ती आणखीनंच स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तो थोडा पुढे झाला तर ती त्याच्या गळ्यातच पडली. कोसळली. बिपीनने निःशब्दपणे तिला आधार दिला. त्या क्षणापासून त्यांच्यातलं मानसिक अंतर मिटलं. मनाने ते खूप जवळ आले.

नंतर ते रोजच त्या कट्ट्यावर भेटू लागले. बघता बघता 6 महिने झाले असतील. बिपीनच्या सहवासानं तिचं दुःख थोडं हलकं झालं. एक दिवस बिपीनला तिने विचारलं, ‘‘त्या दिवशी तुझा काय प्रयोग चालू होता?’’

अचानक तो सावध झाला. त्यांच्यात कितीही जवळीक असली तरी तिला ते सांगणं नैतिकदृष्ट्या संमत नव्हतं. गुप्तता पाळणं भाग होतं. त्यानं ते कसंबसं टाळलं. पण रोजच प्रियम खोदून खोदून विचारत होती. रोज तो उद्यावर ढकलत होता.

पण आज! आज तिला ते नक्की विचारायचंच होतं. कोणत्याही परिस्थितीत. त्यासाठीच आज प्रियम चालली होती बिपीनला भेटायला. त्याच्या भेटीची ओढ होती. तेवढीच प्रयोगाबद्दल उत्सुकता. त्याच विचारात ती कट्ट्यापर्यंत येऊन पोहोचली होती. अत्यंत आतुरतेने त्याची वाट पाहत होती. थोड्याच वेळात तो तिच्या शेजारी येऊन बसला. काही क्षण तसेच गेले. एकमेकांचे अस्तित्व आणि जवळीक अनुभवण्यात.

‘‘सांगणार आहेस ना आज?’’ अचानक प्रियमनं विचारलं. नाही म्हटले तरी बिपीन सटपटलाच.

‘‘कसं सांगू प्रियम? अगं तुझ्या पप्पांचाच हा प्रयोग आहे. मी सांगितले तर तो मोठा गुन्हा ठरेल. ’’

‘‘तुझी शपथ! मी कुणालाही सांगणार नाही. तुझा विश्वास नाही का माझ्यावर?’’

‘‘तसं काही नाही गं, पण खरंच आम्ही तसं बाँडपेपरवर लिहून दिलेलं असतं. ’’ माझ्या मनाला ते पटत नाही.

‘‘ठीक आहे तर मग आता आपली ही शेवटची भेट. येते मी. ’’ असं म्हणून खरंच प्रियम उठली. तिचा हात धरून बिपीननं तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा ठामपणा तिच्या चेहर्‍यावर दिसत होता. शेवटी बिपीननं मनातल्या मनात माफी मागून तिला सांगायला तयार झाला नाईलाजास्तव! तोही गुंतला होता प्रियममध्ये.

क्रमश: – भाग १

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हे शूरा….निश्चिंतपणे जा तुझ्या प्रवासाला !” — ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “हे शूरा… निश्चिंतपणे जा तुझ्या प्रवासाला ! —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

(The Last Post story ! – यावर आधारित ) 

वातावरणात शोक भरून उरलेला असतो…..कुठे पापण्यांचा बांध धुडकावून लावून आसवांच्या धारा अधोदिशेला धावत असतात, तर कुठे आसवांचा झरा मनातल्या मनात.. आतल्या आत झिरपत झिरपत अधिक खोलवर जात असतो. कितीही सुकुमार देह असला तरी त्यातील चैतन्याने निरोप घेतलेला असला की देहालाही निरोप देणे भाग पडते. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देऊन आपल्या जन्माचं सार्थक करून तृप्त झालेल्या त्या सैनिकाचा देह आता अंतिम निरोपाच्या प्रतिक्षेत असतो. तो क्षण आता समीप आलाय…..त्याचे सहकारी सज्ज उभे आहेत…..आणि दुस-याच क्षणाला आसमंतात बिगुलचे सूर अलगदपणे अवतरतात. या सूरांना शब्दांची सोबत नाही….पण तरीही ते काहीतरी निश्चित असे सुचवू पाहतात……निरोप देऊ पाहतात !

दी लास्ट पोस्ट….ही सुरावट वातावरण अधिकच गंभीर बनवून टाकते…..ती संपल्यानंतर काही क्षणांचा सागराच्या धीरगंभीर शांततेचा प्रत्यय देणारे क्षण अवतरतात आणि संपता संपत नाहीत…..पण क्षणांनाही थांबता येत नाही मर्यादेपलीकडे….त्या संपणा-या क्षणांना बाजूला सारून आणखी एक काहीशी उच्च स्वरातील धून कानी पडते….’ रिवाली ‘ म्हणतात तिला सैनिकांच्या जबानीत……ही सुरावट जन्मापासून सुरू झालेलं आवर्तन पूर्ण करूनच विसावते…नंतर इतर भावना पुढे सरसावतात !

१७९० या वर्षापासून विलायतेतील सैनिकांच्या आयुष्यात ‘ दी लास्ट पोस्ट ‘ नावाच्या एका ध्वनिकल्लोळाचा प्रवेश झाला आणि आजच्या घडीला जगातल्या सर्वच सैनिकांच्या जीवनाचा आणि मृत्यूचाही एक भाग बनली आहे ही…लास्ट पोस्ट !

खरं तर पहा-यावर उभ्या असलेल्या सैनिकांच्या चौक्या व्यवस्थित आहेत ना? हे तपासून पाहण्याचं काम एखाद्या वरिष्ठ अधिका-याकडे सोपवलेलं असायचं. हे काम दिवसभर सुरू असायचं. जुन्या काळी निरोप देण्याचं काम करायला यंत्रं नसत, सैनिकांच्या मनगटांवर घड्याळं नसत. मग हे काम वाद्यं करत असत. प्राण्यांची लांब शिंगे आतून पोखरून पोकळ केली, आणि त्या शिंगाच्या निमुळत्या शेवटच्या टोकास छिद्र पाडले आणि त्याला ओठ लावून जोरात हवा फुंकली की एक विशिष्ट तार स्वर निर्माण होतो, हे माणसाने बसल्या बसल्या शोधून काढले होतेच. त्यातूनच शिंग फुंकणे हा शब्दप्रयोग रूढ झाला. ही शिंगं नंतर विविध आकार आणि प्रकार घेऊन वाद्यवृंदांत सामील झाली.

तपासणी करणा-या सैन्याधिका-याने त्या सैन्यशिबिरातली शेवटची पहारा-चौकी तपासली आहे…सर्व काही ठीक आहे…सुरक्षित आहे….आता सैनिकांनी दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आराम करायला हरकत नाही असं सांगणारी बिगुलची किंवा अन्य वाद्याची धून म्हणजेच दी लास्ट पोस्ट. इथे पोस्ट म्हणजे सैन्य चौकी असा अर्थ अभिप्रेत आहे. आणि सूर्योदय झाला आहे…आता सैनिकहो, उठून कर्तव्यावर रुजू व्हा…..अशी साद देणारी सुरावट म्हणजे ‘ दी रिवाली ‘ !

सैनिकांच्या मृत्यूंचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे. मानवी वर्चस्ववाद, मतभेद इत्यादी कारणांमुळे झालेल्या युद्धांत बलिदान देणा-या सैनिकांची संख्या अर्थातच अपरिमेय आहे. या सैनिकांना अखेरची मानवंदना देण्याची पद्धत देशपरत्वे वेगळी असेलच. पण दुस-या महायुद्धात सैनिकांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी दी लास्ट पोस्ट ही धून वाजवण्याची परंपरा सुरू झाली. या स्वरांचा मूळ उद्देश आधी अर्थातच वेगळा होता आणि आता हीच धून आपल्या वेगळ्या स्वरूपात रूढ झाली आहे, हे सहज ध्यानात येते.

ही धून रचणारा तसा स्मृतींच्या पडद्याआड निघून गेला आहे. ऑर्थर लेन नावाच्या एका बिगुलरने ही धून जास्त उपयोगात आणली. पण या धुनेचे शब्द मात्र अज्ञातच आहेत. सैनिकांच्या अंत्यसंस्कारांप्रसंगी वाजवली जाणारी ही धून नंतर काही राजकीय नेत्यांच्या अंत्यसंस्कारांतही वाजवण्याची प्रथा सुरू होऊन बरीच वर्षे झालीत. विंस्टन चर्चिल यांनाही दी लास्ट पोस्टने निरोप दिला आहे. देशांच्या सीमा ओलांडून दी लास्ट पोस्ट सध्या तरी अमर झाली आहे…..भावना व्यक्त करण्याचं सुरांचं सामर्थ्य दी लास्ट पोस्ट ने अधोरेखित केले आहे…हेच खरे !

इथं सारं काही ठीक आहे…सैनिका…मित्रा…तू  तुझे कर्तव्य पूर्ण केले आहेस…आता तू शांतपणे तुझ्या वाटेवर चालू लाग…असा भावनेने ओथंबलेला निरोपच देतात हे सूर. पण त्यानंतरच्या काही क्षणांनंतर लगेच रिवाली ही धून वाजवली जाते. दी लास्ट पोस्ट हे मृत्यूचं प्रतीक …  तर दी रिवाली ही मृत्यूनंतर पुन्हा जन्माला येण्याचं प्रतीक. म्हणूनच रिवाली चे सूर म्हणतात…..चल,उठ गड्या….आपल्याला देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी पुन्हा सज्ज व्हायचं आहे…..हे आपणच तर करू शकतो !

(दी लास्ट पोस्ट या विषयावर लिहिलेली ही ‘ दी लास्ट पोस्ट ‘ ! काहीजणांना पोस्ट म्हणजे पत्रं वगैरे किंवा हल्ली पोस्ट म्हणजे फेसबुकवरचा लेख एवढं ठाऊक असतं. काही जणांना युद्धचित्रपटांमुळे पोस्ट म्हणजे सैन्यचौकी हेही माहीत झालेलं आहे. दी लास्ट पोस्टबद्दल मी इंटरनेटवर वाचलेलं मराठीत आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. तपशील तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहता येतील. इथे तांत्रिक बाबी मी थोड्या बाजूला ठेवल्या आहेत. कॉपीराईट नाही. छायाचित्र इंटरनेटवरून साभार. धन्यवाद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तीन हजार शेवटचे निरोप !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “तीन हजार शेवटचे निरोप !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

(The Last Post story ! – यावर आधारित ) 

मी ऑर्थर लेन…वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ब्रिटीश सैन्यात मॅंचेस्टर रेजिमेंटमध्ये ड्रम-वादक म्हणून भरती झालो होतो…विविध वाद्ये खुबीने वाजवायचो..त्यात बिगुल वाजवायला मला खूप आवडायचं…! पण आवडीनं पत्करलेलं हे काम मला मनाविरुद्ध करावं लागेल कधीकाळी याची मला पुसटशी शंकाही आली नाही कधी…पण नियतीच्या मनातलं कोणी ओळखू शकलंय का आजवर? 

दुस-या जागतिक महायुद्धाचा काळ. आम्हा ब्रिटीश दोस्तसैनिकांचा सामना जपान्यांशी सुरू होता….आणि युद्धभूमी होती सिंगापूर. जपानी अधिक आक्रमक आणि तितकेच क्रूर…त्यात आमच्या वरीष्ठांच्या काही निर्णयांमुळे आमची बाजू पडती होती….अगदीच नाईलाज झाला म्हणून आमच्या सेनापतींनी सपशेल शरणागती पत्करली ! आम्ही आमच्या रायफल्स जमिनीवर ठेवल्या आणि दोन्ही हात उंचावून आमच्या खंदकांतून बाहेर आलो. समोर शत्रूने आमच्यावर त्यांच्या रायफल्स ताणलेल्या. थोडीशी जरी वेडावाकडी हालचाल केली तर एकाच वेळी अनेक रायफल्स धडधडतील हे निश्चित. माझ्या शेकडो साथीदारांसोबत मी ही रांगेत उभा होतो…खाली मान घालून. सैनिकाला खरं तर मृत्यूपेक्षा पराभव जास्त झोंबतो. पण कमांडर साहेबांची आज्ञाच झाली शरणागती पत्करण्याची. कदाचित ‘ बचेंगे तो और लढेंगे ‘  असा विचार असावा त्यांचा. 

लालबुंद झालेले डोळे गरागरा फिरवीत शत्रूसैन्याचा एक अधिकारी प्रत्येक रांगेतून फिरत होता. तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कमरेकडे निरखून पाहू लागला तेव्हा कुठे माझ्या ध्यानात आलं की रायफल तर मी टाकून दिली आहे, पण कमरेचा बिगुल तसाच राहिलाय ! आता माझी शंभरी भरली अशी माझी खात्री झाली. खरं तर एक निरूपद्रवी संगीत वाद्य ते. त्यापासून कुणाला मिळाला तर आनंदच मिळणार ! पण शत्रूच्या ते लक्षात तर आले पाहिजे ना? तो अधिकारी जवळ आला…त्याच्यासोबतच्या एकाने माझ्या डोक्याच्या दिशेने आपल्या रायफलची नळी केलेली होतीच. अधिका-याने विचारले,” बिगुल वाजवतोस?” ‘ हो ‘  म्हणण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. रायफल हाती घेण्याआधी मी तारूण्याच्या अगदी उंबरठ्यावर असताना हे बराच दमसास लागणारं वाद्य शिकलो होतो. काय असेल ते असो…मला ही धून वाजवताना एक वेगळीच अनुभूती यायची. पराक्रम गाजवून हे जग सोडून जाणा-या मृत सैनिकाच्या अंतिम प्रवासाची सुरूवात आपल्या सुरांनी होते….हे अंगावर शहारे आणणारे असायचे. खरं तर लास्ट पोस्टची फक्त धून मी वाजवायचो, शब्द मला सुद्धा निश्चित ठाऊक नव्हते. हात अगदी काटकोनात आडवा ठेवून, सावधान स्थितीत उभे राहून, बिगुलच्या माऊथ पीसला ओठ चिकटवून त्यात हवा फुंकून सुरूवात करताना मनावर नेहमीच एक अनामिक तणाव असायचा….सूर नीट लागला पाहिजे. ती दहा वीस सेकंद कधी एकदा संपून जातील असं व्हायचं…  आणि कधी एकदा ‘ रिवाली ‘ धून वाजवतोय असं व्हायचं. ‘ रिवाली धून ‘ म्हणजे मृत सैनिकाचा दुस-या दुनियेतील पुनर्जन्म……उठ सैनिका, तुला आता नव्या आयुष्यातल्या नव्या कर्तव्यावर रुजू व्हायचंय..तुझा पुनर्जन्म झालाय मर्दा ! 

मी सैन्यात रायफल चालवायलाही शिकलो…आणि लढाईत ती वापरायचोही. पण रायफलसोबत मी बिगुलही जवळ बाळगायचो. पण युद्धात कामी आलेल्या सैनिक मित्रांच्या दफन प्रसंगी लास्ट पोस्ट वाजवताना जीव कासावीस व्हायचा…वाटायचं एखादे दिवशी आपल्यासाठीही असंच कुणी बिगुल फुंकेल…दी लास्ट पोस्ट चा ! 

शरणागतीनंतर शत्रूने आम्हा सर्वांची रवानगी श्रम-शिबिरांमध्ये केली. त्यांना त्यांच्या सोईसाठी रेल्वे लाईन टाकायची होती. कामास नकार म्हणजे मृत्यू. आणि अपुरे अन्न शरीर खंगवत चाललेले होते. डोंगर फोडून जीव मेटाकुटीला यायचा. काम सुरू असताना झालेले अपघात, रोगराई, दगाफटका होईल या संशयातून केलेल्या हत्या, कुपोषण, यामुळे थोडे-थोडके नव्हे ….सुमारे बारा-तेरा हजार युद्धकैदी प्राणांस मुकले या रेल्वेच्या कामादरम्यान. तोडकामाची जुनी हत्यारं, जुनाट यंत्रं वापरावी लागल्याने मजुरांचे मरणहाल झाले ते मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. युद्धकैद्यांचे मृत्यू तर झालेच झाले…आणि सर्वसामान्य मजूर किती मेले म्हणता…..नव्वद हजारांपेक्षा अधिक. असं म्हणतात की जपान्यांनी बर्मा ते थायलंड पर्यंत रेल्वेचे जितके लाकडी स्लीपर्स युद्धकैद्यांकडून आणि मजूरांकडून जबरदस्तीने टाकून घेतले त्या स्लीपर्सच्या संख्येएवढी माणसं मारली गेली या कामात….म्हणूनच हिला ‘ डेथ रेल्वे ‘ म्हणतात ! आणि ह्या स्लीपर्सची संख्या लाखापेक्षा अधिक भरते ! 

एकाच दिवशी शेकडो अंत्यसंस्कार व्हायचे. मृतदेह जाळण्यासाठीची सर्व तयारी करण्याची जबाबदारी जपान्यांनी युद्धकैद्यांवरच टाकलेली होती. चिता रचण्याचं काम दिवसभर चालायचं…त्यावर कित्येक मृतदेह रचून ती चिता व्यवस्थित पेटेल आणि ते दुर्दैवी देह या जगातून कायमचे नष्ट होतील अशी तजवीज करावीच लागायची. काळ्या धुराने आकाश सतत काळवंडलेले असायचे…युद्ध असेच असते…जीवघेणे ! देश लढतात…सैनिक जळत राहतात ! 

या अंत्यसंस्कारांच्या वेळी कशी कुणास ठाऊक, जपान्यांनी मृत सैनिकांच्या सन्मानार्थ ‘ दी लास्ट पोस्ट ‘ धून बिगुलवर वाजवण्यास अनुमती प्रदान केली होती. आणि मला बिगुल वाजवता यायचा…..माझी कामं करून हे जादाचं काम करण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता ! पण माझ्या देशवासियांसाठी, माझ्या प्राणप्रिय सैनिक-मित्रांसाठी मला निदान एवढं तरी करायला मिळतं याचं समाधान होतं मला. मी कधीही कंटाळा केला नाही. डोळ्यांत आसवे आणि ओठांत प्राण गोळा करून मी बिगुल फुंकायचो….जा मित्रांनो….जा तुमच्या अंतिम प्रवासाला…तुम्ही तुमच्या मातृभूमीप्रति असलेलं कर्तव्य जिद्दीने पूर्ण केले आहे….जा … स्वर्ग तुमची प्रतिक्षा करतोय…सायंकाळचा सूर्य अस्तास जात असताना शेकडो देह अग्निच्या स्वाधीन होत राहायचे….ज्वाळा आणि धूर….आणि मानवी देहांचा उग्र दर्प आसमंतात भरून रहायचा ! तीन वर्षांत मी दोनशे वेळा दी लास्ट पोस्ट वाजवली ! सैनिकांना दिल्या जाणाऱ्या टॉयलेट पेपरमधील काही तुकडे मी चोरून लपवून ठेवायचो..आणि त्या तुकड्यांवर कोळशानं मी निरोप दिलेल्या सैनिकांची नावे लिहून ठेवायचो…….असे तीन हजार निरोप झाले होते माझे देऊन…शेवटचे निरोप ! आपल्या माणसांपासून दूर, यमयातना सोसत मृत्यूच्या दाढेत गेलेले ते हजारो तरूण देह माझ्या स्वप्नात यायचे पुढे कित्येक वर्षे….माझी सुटका झाल्यानंतरही !   

(ऑर्थर लेन तब्बल ९४ वर्षे जगले. कित्येक रात्री त्यांनी दी लास्ट पोस्टच्या आठवणींच्या दु:स्वप्नांच्या भीतीने जागून काढल्या असतील. जपान्यांच्या छळाला बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतींना योग्य तो मानसन्मान मिळावा, यासाठी लेन आग्रही राहिले. ब्रिटीश सैन्याने ह्या ‘मृत्यूच्या संगीतकारा’च्या अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ खास ‘दी लास्ट पोस्ट ‘ बिगुल धून वाजवली…!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

(इंटरनेटवर विविध लेख, बातम्या, विडीओ पाहून मी हे लिहितो. इंग्रजीत असलेलं हे साहित्य मराठी वाचकांना वाचायला लाभावं अशी साधी सरळ भावना आहे. तपशील, संदर्भ अचूक असतीलच असे नाही…मात्र खरे असण्याची दाट शक्यता असल्याशिवाय मी लिहीत नाही हे मात्र नक्की. )

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 6 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 6 ☆ श्री आनंदहरी 

“ दिगंत, खूपच थकलास ना? हॉस्पिटल म्हणले कि खूपच थकायला होतं. खूप केलंस तू माझ्यासाठी.”

“ मॅडम, आभार प्रदर्शन करून मला निरोप द्यायचा, घालवायचा विचार आहे का काय?”

दिगंत चेष्टेच्या सूरात हसत हसत म्हणाला.

“ काहीतरीच काय बोलतोयस ? पण मी काय म्हणत होते, निर्मलाताईच्या सारखीच एखादी बाई रात्रीसाठी मिळतेय का पाहूयात का? “

“ कशाला मी आहे ना..”

“ तू तर आहेसच रे.. पण तू ऑफिसला जाणार. तुझी किती दमणूक होईल. जागरण होईल. आजारी पडशील रे अशाने .. तू आजारी पडून  कसं चालेल? म्हणून म्हणते. शिवाय तुझं स्वतःचं आयुष्य आहेच ना ? त्याचाही विचार नको का करायला ?”

“ म्हणजे मला घालवायचा विचार करताय . ”

काहीसं मनोमन ‘ हर्ट ‘ होऊनही तसं न दाखवता दिगंतने हसतच विचारलं.

“ नाही रे..तुला कशाला घालवीन? तुच्यावाचून दुसरं कोण आहे मला? “

“ मग ? तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतंय का?”

“ मलाच काय, प्रत्येक स्त्रीला पुरुषाकडून सेवा करून घ्यायची म्हणलं कि अवघडल्यासारखं होतंच.. “

“ नवरा असला तरी?”

“ अरे, नवऱ्याच्या बाबतीत कसे वाटेल? थोडं फार त्याच्याबाबतीतही  वाटणारच पण तितकंसं नाही.”

“ मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय…”

” अरे, मघापासून तू तेच करतोयस , बोलतोयस, सांगतोयस, विचारतोयस.”

मॅडम हसत हसत म्हणाल्या.

“ मॅडम, प्लिज. मी सिरियसली बोलतोय.”

“ काय झालं दिगंत ? काही प्रॉब्लेम किंवा अडचण आहे का ? अरे, माझ्याशी बोलताना एवढी प्रस्तावना न् परवानगी कशाला? “

“ मॅडम, खूप दिवस तुम्हाला सांगायचा विचार करीत होतो. मॅडम,  मला तुमच्याशी लग्न करायचंय.”

त्याच्या वाक्यानं मॅडम दचकल्या.

“ काssय ? काय बोलतोयस तू दिगंत ? तू वेडा आहेस काय?” 

“ लग्न करणारे वेडे असतात काय? मॅडम, रागावू नका. गेले काही दिवस मी खूप विचार केला आणि माझा निर्णय पक्का आहे.”

“ अरे पण? माझी ही अवस्था पाहून  दयेपोटी म्हणतोयस ना असं? मला दया नकोय कुणाची.. आणि आत्ता तुला वाटत असले तरी चार दिवसांनी तुला पश्चाताप वाटायला लागेल.. असा भावनेच्या भरात वेड्यासारखा विचार नको करुस.”

“ नाही मॅडम, मी भावनेच्या भरातही म्हणत नाही आणि तुमची दया वगैरे वाटूनही म्हणत नाही. मला मनापासून जे वाटतंय ते आणि खूप सारासार विचार करून म्हणतोय.”

“ नाही दिगंत. अरे, मी तुझ्यापेक्षा नाही म्हणलं तरी नऊ- दहा वर्षांनी मोठी आहे.”

“ ते ठाऊक आहे मला .”

“ तरीही? अरे कसं करता येईल लग्न ?”

“ का ? अशी लग्नं  यापूर्वी कधीच केली नाहीत काय कुणी?”

“ केली असतीलही पण ती सगळी प्रेमातून.”

“ प्रेम म्हणजे काय असतं , मॅडम? एखादी व्यक्ती आवडू लागते, आपलीशी वाटू लागते .तिची ओढ वाटू लागते, तिचा सहवास हवाहवासा वाटू लागतो यालाच प्रेम म्हणतात ना ? “

“ व्वा ! प्रेमावर पीएचडी केल्यासारखा बोलतोयस .”

“ तुम्ही विषय बदलताय मॅडम. कधीतरी तुमच्याशी बोलणार, तुम्हाला सांगणार होतोच. मॅडम,मी पीएचडी केलीय का नाही ते ठाऊक नाही पण मी प्रेम केलंय, अगदी मनापासून.अजूनही करतोय. एक क्षणही विसरू शकलेलो नाही. त्यामुळेच तर सगळं सोडून इकडं आलो.”

“ अरे मग तिच्याशीच लग्न कर . सुखी होशील. काही अडचण असेल तर सांग मला, मी करीन मदत.”

“ नाही मॅडम,  हवाहवासा वाटणारा मी नकोनकोसा वाटू लागलो आणि तिथंच विषय संपला. प्रेमात स्वतःला लादता येत नाही . नकोय म्हणल्यावर समोर तरी कशाला ऱ्हावा ? झालं. आलो इकडे. पण मॅडम, मला तेव्हापासून  वाटायला लागलं की  जगात कोणीही कोणाचं नसतं किंबहुना अजूनही तसंच वाटतं. इथं आल्यावर, काळाने म्हणा किंवा परिस्थितीनं म्हणा, मला एक गोष्ट शिकवली, सांगितली ती म्हणजे जगण्यासाठी आपल्या वाटणाऱ्या व्यक्तीची सोबत हवी असते जीवनात. तुम्ही भेटलात आणि ते पटू लागलं. माझे तुमच्यावर प्रेम आहे का नाही ते नाही सांगता येणार मला.. पण  तुम्ही, मला आपल्या वाटलात, मला तुमचा सहवास आवडू लागला. हे जीवन जगताना मला तुमची सोबत हवी आहे.. वय काय ? कुठल्याच गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत त्यापुढे.. महत्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हालाही माझी सोबत हवी असणे, हवीशी वाटणे. “

दिगंत खुर्चीतून ऊठला. मॅडमांच्या बेडजवळ गेला.मॅडमांचे डोळे भरून आले होते. त्यानं त्यांचे डोळे पुसले. त्यांना बसतं केलं. त्यांच्या समोरच बेडवर बसून त्यांचे हात हातात घेत म्हणाला,

“ मॅडम, तुमचा निर्णय काहीही असला तरी हा दिगंत आत्तासारखा तुमच्या आयुष्यात असणार आहेच… पण तरीही मला जीवनात साथ- सोबत हवी आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही कराल माझ्याशी लग्न?”

दिगंत बोलत होता, विचारत होता .मॅडमांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा ओघळू लागले होते.. त्याला आपण मॅडमना दुखावलं ,असं वाटून वाईट वाटू लागलं. तो उठून त्यांच्याजवळ गेला. त्यांचे अश्रू पुसता पुसता त्यांना म्हणाला,

“ तुमचं मन मी दुखावलं असलं तर माफ करा मला ,मॅडम.”

“ तसं नाही रे, तू वेडाच आहेस.. अरे अशा वेळी विचारतोयस कि  होकार देताना तुझ्या कुशीत तोंड ही लपवता येत नाही मला.”

दिगंतने पुढं सरकून जवळ बसत त्यांना त्रास होणार नाही , वेदना होणार नाही अशा बेताने त्यांना कुशीत घेत विचारलं,

“ अस्सं काय?”

दिगंतला  त्यांचं, ‘ होss !‘  हे उत्तर त्यांच्या स्पर्शातून जाणवत राहिलं ,कितीतरी वेळ.

 – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print