मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

☆ (१) चूक… ? की बरोबर…?? – श्री कमल चोपडा (२) यात सौदा कसला ?… – सुश्री मीरा जैन  (३) चोरी म्हणजे ??… – श्री राम मूरत ‘राही’ ☆

 

☆ १. चूक… ? की बरोबर…?? (अनुवादित कथा) ☆ श्री कमल चोपडा  ☆

नितीनने एक जोरदार शॉट मारला, आणि बॉल जवळच्या एका उघड्या गटारात जाऊन पडला. आता त्या गटारातून बॉल काढणार कोण ? घाण आणि दुर्गंधीने भरलेलं खोल आणि अगदी घाणेरडं गटार होतं ते. 

चरणू नावाचा एक मुलगा मोठ्या आशेने त्या मुलांचा खेळ बघत बसला होता ….. ती मुलं त्यालाही त्यांच्यात खेळायला बोलावतील म्हणून वाट बघत होता. पण कोणीच त्याला बोलावत नव्हतं. पण आता मात्र नितीनने त्याला हाक मारली.. “ ए मुला, त्या गटारातून आमचा बॉल काढून दे जा … बघ .. त्यासाठी आम्ही तुला एक रुपया देऊ .. आणि आमच्यात खेळायलाही देऊ. “ 

चरणू लालचावला, आणि गटारात उतरण्यासाठी त्याच्या कडेला लटकला. पण अचानक त्याचा हात घसरला आणि तो धपकन आतल्या घाणीत जाऊन पडला. तो धडपडत हात-पाय मारायला लागला.. जणू प्राणांची बाजी लावल्यासारखा. 

बाकीची मुलं कडेला उभं राहून नुसती हसत होती … कधी एकदा तो बॉल काढून आणतोय याची वाट बघत होती. 

“ किती तुच्छ मुलगा आहे ना हा… एक रुपयासाठी या घाणीत उतरलाय ..” 

“ ही गरीब माणसं इतकी हपापलेली असतात ना … एक रुपयाच काय, एका पैशासाठी सुद्धा प्राणही देतील हे “ 

चरणू नेमका त्याचवेळी बाहेर आला होता. डोक्यापासून पायापर्यंत घाणीने बरबटला होता. तोंडालाही सगळी घाण आणि चिखल लागलेला होता. 

“ हा घे एक रुपया, आणि आमचा बॉल आम्हाला दे. “… 

चरणू त्याच्यापुढे अक्षरशः फेकलेल्या त्या एक रुपयाच्या नाण्यावर पाय ठेऊन उभा राहिला, आणि गंभीर होत म्हणाला, “ या एका रुपयासाठी मी इतका मोठा धोका पत्करला नव्हता .. “

 “ मग काय आता शंभर रुपये हवेत की काय तुला ? “ 

“ नाही. पैसे नकोच आहेत मला .. मला खेळायचंय तुमच्याबरोबर … “

त्याची ती काहीतरी जगावेगळी आणि विचित्र इच्छा ऐकून बाकीची मुलं खळखळून हसायला लागली. 

“ साल्या तू आमच्याबरोबर खेळणार ? .. आधी स्वतःची अवस्था बघ कशी झाली आहे ती. असं वाटतंय की एखादं डुक्कर चिखलात मस्त लोळून आलंय …” आणि सगळे आणखीच जोरजोरात हसायला लागले. 

“ हे बघा .. मला खेळायचंय … तुम्ही खेळा आणि मलाही खेळू द्या की … घ्याल ना मला खेळायला ..की  नाही ? “ … चरणूने जरा आवाज वाढवत विचारलं. 

“ तुला सांगितलं ना एकदा… आमचा बॉल आम्हाला दे आणि तू लगेच निघून जा इथून … नाहीतर ..” नितीन चिडून म्हणाला. 

“ नाहीतर काय ?.. “ आणि चरणूने जणू जीवाची बाजी लावून तो बॉल ज्या घाणेरड्या खोल गटारातून काढून आणला होता, त्याच गटारात सगळी ताकद एकवटून पुन्हा जोराने फेकून दिला. आणि … 

“ आता बघतोच तुम्ही तरी कसे खेळता ते … “ असं म्हणत एका वेगळ्याच निर्धाराने तो तिथून निघून गेला. 

……… 

मूळ हिंदी कथा : खेलने दो  

कथाकार : श्री कमल चोपडा, दिल्ली 

भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

२. यात सौदा कसला ?… (अनुवादित कथा) ☆ सुश्री मीरा जैन ☆

पाच वर्षांची मुक्ता आज सारखी आत-बाहेर आत-बाहेर करत होती. बहुतेक कुणी तरी येण्याची वाट पाहात होती. मध्येच वरच्या खोलीत जात होती – परत खाली येत होती. गॅलरीत जाऊन लांबवर बघून येणं तर सारखंच चाललं होतं. अचानक झोपाळ्यावर बसून मोठाले झोके घेत होती ….. पण असं सगळं करत असतांना तिचं सगळं लक्ष मात्र बाहेरच्या दाराकडे होतं. इतक्यात तिला तिच्या आजीची हाक ऐकू आली … 

“ मुक्ता .. पटकन ये बाळा, नाश्ता करून घे . आज तुझ्या आवडीचा शिरा केलाय बघ.. आज अजून भूक कशी लागली नाहीये माझ्या छकुलीला .. “ 

“ आजी थांब ना जरा. अजून भूक लागलीच नाही आहे गं मला “.. 

…. इतक्यात दारात टॅक्सी थांबल्याचा आवाज आला… आणि मुक्ता पळतच दाराकडे गेली. नीता – तिची आई एकदाची तिला दिसली आणि नीताने दारातून आत पाऊल टाकल्याक्षणी ती जाऊन नीताला बिलगली. नीतानेही तिला छातीशी घट्ट कवटाळलं आणि पटापट तिचे मुके घेतले. दोघींच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा वहात होत्या…. कितीतरी वेळ दोघी तशाच उभ्या होत्या. जराशाने रडतरडतच मुक्ता तिला म्हणाली .. 

“ आई आता मला सोडून तू कुठेही जायचं नाहीस हं .. “ नीताने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली, आणि जणू सगळा आत्मविश्वास एकवटून तिला अगदी ठामपणे सांगितलं … “ नाही बाळा.. नाहीच जाणार .. आता तुला सोडून नाही.. तर तुला माझ्याबरोबर घेऊनच जाणार आहे परत.. “ 

तिची आईही तोपर्यंत तिथे आली होती. तिचं बोलणं ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. न रहावून तिने विचारलं … “ नीता अगं हे काय करते आहेस तू ? ते लोक कधीच मुक्ताचा स्वीकार करणार नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे तुला .. तुझ्याकडून तसं आधीच कबूलही करून घेतलंय ना त्यांनी … तरीही … ? “

“ हो, ठरलं होतं तसं .. पण आई तूच सांग … एखाद्या पूर्णपणे परक्या मुलाची मी आई होऊ शकते … केवळ त्याच्या वडलांशी मी पुनर्विवाह केलाय म्हणून.. आणि अगदी मनापासून तसा प्रयत्नही करते आहे ना मी. पण म्हणून..  मी जिला जन्म दिलाय त्या माझ्या स्वतःच्या मुलीला मी माझ्यापासून दूर लोटावं … तिला कायमचं विसरून जावं अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे …. मला ते पटणारही नाही.. आणि जमणार तर मुळीच नाही … अगं मी पुन्हा लग्न केलं आहे… याचा अर्थ एखादा सौदा नाही केलाय… माझ्या ममतेचा… माझ्या पोटाच्या गोळ्याचा. …आणि आई, सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं हे.  चल मुक्ता.. “… 

मूळ हिंदी कथा : पतझड बसंत  

कथाकार : सुश्री मीरा जैन, उज्जैन

भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

☆ ३. चोरी म्हणजे ??… (अनुवादित कथा) श्री राम मूरत ‘राही’

मी आणि बायको दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडलो. पाहिलं तर बाहेर ठेवलेल्या बायकोच्या चपला कुठेच दिसत नव्हत्या. काल-परवाच घेतलेल्या नव्याकोऱ्या चपला होत्या त्या. साहजिकच आम्ही जरा जास्तच अस्वस्थपणे त्या शोधू लागलो. तेवढ्यात मला अगदी गरीब वाटणारा एक पाच -सहा वर्षांचा मुलगा हातात माझ्या बायकोच्या चपला घेऊन जातांना दिसला. 

मी पटापटा चालत त्याच्याजवळ गेलो आणि त्याला थांबवून विचारलं.. “ बाळा या चपला घेऊन कुठे चालला आहेस तू ?” — त्याचा कोवळा निरागस चेहेरा पाहून मी रागावू शकलोच नाही त्याच्यावर. 

“ घरी चाललोय. “ – तो म्हणाला. 

“ ही चप्पल कुठून आणलीस तू ? “

“ देवळाच्या बाहेर ठेवलेली होती – तिथून. “

“ बाळा पण ही चप्पल घेऊन काय करणार तू ? “

“ माझ्या आईला देणार … “

“ आईला देणार ? का ? “

“ कारण माझ्या आईकडे चपला नाही आहेत ना …. आम्ही खूप गरीब आहोत .. “

“ पण बाळा ही तर चोरी झाली ना ? “ 

“ चोरी ?.. चोरी म्हणजे काय असतं ? “

“ अरे एखाद्याला न विचारता त्याची एखादी वस्तू घेऊन टाकायची याला चोरी करणे म्हणतात.. आणि ही अगदी चुकीची आणि वाईट गोष्ट आहे. “ 

“ मला तर हे माहितीच नव्हतं “ … तो मुलगा विचार करायला लागला… आणि मग एकदम वळून देवळाकडे जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं .. . “ कुठे निघालास रे .. “

“ देवळात “.

“ का “. 

“ चपला ठेवायला “

“ राहू दे बाळा. आता या चपला तू तुझ्या आईला नेऊन दे … जा “. 

“ पण या तर चोरीच्या आहेत ना ? “

“ अरे आता या चोरीच्या नाहीयेत “. 

“ म्हणजे ? … ते कसं काय ? ‘

“ कारण या आमच्या चपला आहेत, आणि आम्ही तुला त्या घेऊन जाण्याची परवानगी देतोय. “

… हे ऐकून त्या मुलाला फार आनंद झाला होता हे त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं … तो धावतच तिथून निघून गेला. 

लगेचच माझी बायको माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि रागानेच म्हणाली .. “ अहो काय तुम्ही …. सरळ माझ्या चपला नेऊ कशा काय दिल्यात त्याला ? “

“ अगं तो त्याच्या आईसाठी घेऊन चालला होता.. म्हटलं ने. तुझ्यासाठी दुसऱ्या घेऊ ना आपण “… 

यावर बायकोने त्याच रागाने मान उडवली. 

मग मी तिला शांतपणे म्हटलं …. “ एक गोष्ट लक्षात आली नाही का तुझ्या … अगं त्या लहानग्याला आपण तिथल्या चपला उचलतोय म्हणजे “ चोरी “ करतोय…. काहीतरी वाईट काम करतोय .. हे सुद्धा कळत नव्हतं. “ चोरी म्हणजे काय “ हे इतक्या निरागसपणे विचारलं ना त्याने… आणि ते समजल्यावर चपला परत ठेवायला निघाला होता तो… पाहिलंस ना ?  आता पुन्हा कधी तो असा वागणार नाही बघ …. खात्री वाटतेय मला “ ….. 

मूळ हिंदी कथा : मां के लिये – कथाकार : श्री राम मूरत ‘राही’

भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे (2) मुलगी झाली हो 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे

‘अहो.. शुक… शुक … इकडे… इकडे … सुधाताई.. इकडे…’

‘ कोण तुम्ही? मी ओळखलं नाही….’

‘बरोबर आहे. मला कशाला तुम्ही ओळखाल? आम्ही साध्यासुध्या बायका… तुम्ही सुमन ताईंना ओळखाल. त्या स्टार लाईट नं! आम्ही एक पणती …. मिणमिणती….’

तसं नाही हो… मास्क आहे नं चेहर्‍यावर, म्हणून ओळखलं नाही….’

‘घ्या! हा काढला मास्क.’

‘अरे, सरलाताई होय. …खरंच मास्कमुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. काय म्हणताहात?’

‘मी कुठे काय म्हणतीय? तुमची ती सरली म्हणतीय  काही- बाही . पुरस्कार मिळालाय ना तिला!’

‘पुरस्कार…. कसला पुरस्कार?’

‘जसं काही माहीतच नाही तुम्हाला ?’

‘नाही… खरंच माहीत नाही.’

‘अहो, गावभर सांगत सुटलीय ती… आणि तुम्हाला कसं नाही सांगितलं ? एवढी खास मैत्रीण तुमची’

‘आहो, एवढी खास मैत्रीण तुमची…’

‘खरं सांगू का, गेल्या महिन्याभरात भेट नाही झाली आमची. पण पुरस्कार कसला मिळालाय तिला? ‘

‘आदर्श समाज सेविकेचा पुरस्कार मिळालाय तिला!’

‘कुठल्या संस्थेने वगैरे दिलाय?‘.

‘नाही हो…’

‘मग नगरपालिकेचा आहे?’

‘नाही… नाही…

‘मग जिल्हा परिषदेचा असेल?’

‘बघा एवढीच लायकी आहे नं तिची? पण तिला राज्य पुरस्कार मिळालाय. ’

‘अरे वा! आता घरी गेल्यावर पहिल्यांदा तिला फोन करते.’

‘असतील तिचे कुणी काके-मामे वर!’

‘वर?;

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते वर…’

‘अं…’

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते, तर मलाही हा पुरस्कार मिळाला असता, होय की नाही?’

‘पण तिचे कुणी काके-मामे वर नाहीत.’

‘या फक्त बोलायच्या गोष्टी!’

‘पण तिचा काम खरोखरच पुरस्कार मिळण्याइतकं आहे!’

‘पण माझा कामही तिच्याइतकंच आहे. किंबहुना जरा जास्तच आहे, होय की नाही? काय? ‘

‘हं!

‘आहे ना! मग सांग…. सांगच … मला पुरस्कार मिळण्यात काय अडचण होती?’

‘नाही… कहीच अडचण नव्हती. मिळेल ना… पुढल्या वर्षी मिळेल. ‘

‘तुम्ही मला आश्वासन का देताय?

‘मग काय खात्रीने सांगू? सांगते … पुढल्या वर्षी तुम्हाला पुरस्कार मिळेल.’

‘तुम्ही निवड समितीच्या सभासद आहात का?’

‘मग खात्रीने कशा सांगू शकता?’

‘‘मग काय करू?’

‘कामाला लागा!’

‘कसलं काम?’

‘मंत्रालायावर मोर्चा घेऊन जा.’

‘कोण मी?’

‘नाही तर दुसरं कोण?’ मला पुरस्कार मिळावा, म्हणून मीच मोर्चा घेऊन गेले, तर कसं दिसेल?’

‘हं! बरोबर बोललात तुम्ही…आणी?’

‘घोषणा द्या. आवाज उठवा…’’कोणत्या घोषणा?’

‘बंद करा. बंद करा. पुरस्कार निवडीची पद्धत बंद करा. पुरस्कार निवडीची ही पद्धत बंद करा. नवे निकष तयार करा. हाय!हाय!… निवड समिती हाय!हाय!… आपल्या नातेवाईकांना पुरस्कार देणारी निवड समिती तयार करणारे सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे झालय?’

‘असंच झालय. तुम्हाला काय माहिती?

‘तुम्हाला तरी काय माहिती?’

‘मला पुरस्कार मिळालानाही, याचाच अर्थ तो’

‘मला नाही तसं वाटत…’

‘’पण तुम्हाला घोषणा देण्यात काय अडचण आहे?’

‘अं… म्हणजे… अडाचण अशी नाही.पण…’

‘आता तुमचं पण…परंतु पुरे. घोषणा द्या. ‘बंद करा… बंद करा… पुरस्कारासाठी निवड करायची ही पद्धत बंद करा… ही पद्धत चुकीची आहे. नवीन निकष तयार करा. हाय… हाय… निवड समिती हाय… हाय… निवड समिती नियुक्त करणारं सरकार हाय… हाय…आपले लोक , नातेवाईक यांची निवड करून त्यांना पुरस्कार देणारं सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे घडले?’

‘पण तुला घोषणा द्यायला काय होतय? घोषणा खर्‍या असल्या पाहिजेत, असं थोडंच आहे? आणखीही घोषणा देता येतील’

‘आणखीही? त्या कोणत्या? ‘

 ‘ चालणार नाही. ‘चालणार नाही. शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ चालणार नाही. … चालणार नाही. घोषणाबाजी चालणार नाही.’

‘आहो, घोषणाबाजी नव्हे, शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ही घोषणाबाजी कुठे करायची आहे?’

‘कुठे म्हणजे…. मोर्चात’’

‘पण मोर्चा कुणाविरुद्ध काढायचाय ?’

‘घ्या! बारा वर्ष रामायण वाचलं, रामाची सीता कोण ?’

‘कोण होती?’

बहीण. रामाची नाही माझी.सीतेवर रामाने अन्याय केला आणि सरारणे माझ्यावर! म्हणजे सरकारच्या निवड समितीने माझ्यावर. यासाठीच तर मोर्चा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे. नाही चालणार… नाही चालणार… पुरस्कार घोषित करण्यात शिफारसबाजी नाही चालणार… रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘

‘मिळाला पाहिजे… मिळालाच पाहिजे…’

‘मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘  

‘…. रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…’

‘घोषित करा…. घोषित करा… नवीन पुरस्कार घोषित करा…’

‘पण हे सगळं कोण करणार?’

‘कोण म्हणजे?तुम्ही…’

‘मी?’

‘तुम्ही एकट्या नाही हो… तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी…ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे, त्या सगळ्यांनी.’

‘ मोर्चा काढायचा, घोषणा द्यायच्या, मला वाटतं, हे सगळं जरा जास्तच होईल.’

‘ जास्त नाही अन् कमी नाही. तुम्हाला मोर्चा काढायचाय. मंत्रालयात जाऊन पदाधिकार्‍यांना निवेदन द्यायचय. विरोधी पक्ष कदाचीत् याचा इशू करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त होईल.नवीन सरकार येळ. नवी निवड समीती बनेल. ‘

‘मग?’

‘त्यात माझे कुणी काके-मामे आतील.कुणी माझ्या ओळखीचा त्या निवड समितीत असेल. माझ्यावर श्रद्धा असलेले कुणी तरी त्यात असेल. ‘

‘नाही… नाही… असं काहीही होणार नाही. कुठली गोष्ट कुठे नेलीत आपण!’

‘का नाही होणार? तुम्ही स्वत:ला माझी मैत्रीण म्हणवता नं? मैत्रीणीसाथठी आपण एवढं करू शकत नाही? मग ही मैत्री काय कामाची?’

‘आमचं सगळ्यांचं आपल्याला मूक समर्थन असेल, पण मोर्चा वगैरे…. नाही बाबा नाही’

मशनात जाओ तुमचं मूक समर्थन! असल्या मैत्रीणी कसल्या कामाच्या? दगाबाज कुठल्या! तुम्ही सगळ्या तिची मिठाई खाऊन बसल्या असाल.  मिठाईशी ईमान ठेवायलाच हवं! मला असा पुरस्कार मिळाला असता, तर पार्टी दिली असती, अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. पार्टी घ्यायलासुद्धा नशीब लागतं!’

हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्याकडून पार्टी घ्यायला नशीब लागतं!’

(२)  मुलगी झाली हो –

अंसाक्काच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू झाली होती. तिच्या सुनेचे दिवस भरत आले होते. आज सकाळपासून तिला कळा सुरू झाल्या होत्या. अंसाक्काने लगबगीने कडकडीत पाणी केले. सुनेला न्हाऊ घातले. सदाशिव बायकोला घेऊन दवाखान्यात गेला.

अंसाक्का घरातली कामं अवरता आवरता दवाखान्यातून येणार्‍या निरोपाची वाट पाहू लागली. तिला खात्री होती, ‘आपल्याला नातूच होणार. आपल्या घराण्याची रीतच हाय तशी. आपल्या सासूला पैला मुलगा झाला. तोच आपला नवरा. आपल्याला बी पैला सदाशिव झालेला. दिराचा सोमू पैला. सोमूचा समीर पैला. आपली मुलगी सुरेखाला पैला मुलगाच. सदाशिवाला बी पैला मुलगाच व्हनार. सुमाचं पोट बी पुढे हुतं. डव्हाळे कडक. सारखी थकल्यावानी मलूल असायची. समदी मुलाचीच लक्षणं की.’

बारा वाजता सदाशिव सांगत आला. ‘सुमी बाळंत झाली. बाळ-बाळंतीण खुशाल हायती. आई, तुला नात झाली.’

‘काय?’ तिच्यावर जसा निराशेचा डोंगर कोसळला. तिला नातू हवा होता. नात नव्हे. डॉक्टरांनी संध्याकाळचं घरी सोडलं. अंसाक्का फुरंगटून बसलेली. तिने ना भाकर तुकडा घेतला. ना नव्या जिवावरून ओवाळून टाकला. शेवटी शेजारणीने भाकर तुकडा घेतला. ओवाळून बाळ-बाळंतिणीला घरात घेतले. अंसाक्का तशीच रुसून बसलेली. ‘अशी कशी मुलगी झाली? पैला मुलगा व्हायाची आपल्या घराण्याची रीत हाय. नातूच हवाय आपल्याला. ही रांड कशी तडफडली मधेच!’ असेच काही-बाही विचार अंसाक्काच्या मनात येऊ लागले.

आसपासच्या आया-बाया बाळाला पाहायला आल्या.

‘आजी, बघा तरी किती गोड, देखणी हाय तुमची नात. ‘ कुणीसं म्हंटलं. अंसाक्काचं हूं नाही की चूं नाही. ती आपली रूसलेली. जागची हललीसुद्धा नाही. अशी कशी मुलगी झाली, याच विचारात गुंतलेली. एवढ्यात कमळाबाईचं बोलणं तिला ऐकू आलं,

‘अगदी आजीसारखी दिसतीय नाही?’

‘व्हय! अगदी दुसरी अंसाक्काच!’

अंसाक्काचं कुतूहल चाळवलं. ती सुनेच्या दिशेने बघू लागली. अग, जवळ ये बघ. कशी तुज्यावाणी दिसतेय. नाक, डोळं, फुगरे गाल समदं तुझंच!’ आता अंसाक्काला राहवेना. ती उठून बाळाजवळ गेली. अगदी अंसाक्कासारखंच रंगरूप. ‘लहानपणी आपण अशाच दिसत असणार.’ अंसाक्काला वाटलं. तिने नातीला उचललं. छातीशी धरलं आणि तिचे पटापट मुके घेऊ लागली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऑनलाईन…  ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

अल्प परिचय :

सौ. प्रांजली हेमंत लाळे

राहणार मनमाड, जिल्हा-नाशिक, महाराष्ट्र

शिक्षण-एम.ए.बी.एड.(इंग्रजी)

  • दहा वर्षे शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी.
  • सध्या गृहिणी व व्यावसायिका दोन्ही भुमिकेत कार्यरत. सोशल मिडियावर विविध विषयांवर लेखन करण्याची आवड. १४ कथा लिहून पुर्ण.

? जीवनरंग ?

☆ ऑनलाईन…  ☆ सौ. प्रांजली लाळे

नयना आज जाम खुश होती.. ‘आजकल पाँव जमींपर नही रहते मेरे..’ असंच काहीतरी झालेले.. आरशात पाहतानाही ती गाणं गुणगुणत होती.. स्वतःचेच प्रतिबिंब न्याहाळतांनाही तिची गालावरची खळी अधिकच सुंदर दिसली तिला.. नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा झालेला तिचा. तिच्या दोन्ही मुलांनी छान प्लॅन करुन लाँग डिस्टिनेशनला ह्या दोघांना पाठवलेले.. 

सुभाष, तिचा नवरा मोठ्ठा बिझनेसमन.. रग्गड पैसा, ऐशोआराम असलेले कुटुंब.. सुभाष थोडा अहंकारी.. स्वयंकेंद्री.. ‘मी’ आणि ‘माझे’ हे शब्द जेव्हा बोलण्यात येतात.. तेव्हाच खरं तर अहंकाराचा दर्प यायला लागतो..

सुखात लोळत असलेली नयना.. काहीच कमी नव्हते तिला खरं तर.. स्मार्ट,राजबिंडा आणि श्रीमंत नवरा, दोन सोन्यासारखी मुलं.. मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला.. मुंबईच्या रेप्युटेड कॉलेजला.. मुलगी रिया ह्यावर्षी आर्किटेक्ट होणार होती.. दोघेही मित्र परिवारात रममाण..

नयना मुळातच सौंदर्यवती.. माहेरची परिस्थिती यथातथाच.. परिस्थितीशी तोंडमिळवणी करत मोठी झालेली.. सुभाषशी लग्न झाल्यानंतर तिचा उत्कर्ष झाला.. तसे सुभाषनेही शुन्यातनं जग निर्माण केलेले.. पण भरपूर कमावत होता.. यशशिखरे चढत होता..

लग्न झाले तसे नयनाला नोकरी न करण्याची सक्त ताकीदच देऊन टाकली त्यानं.. आता मी भरपूर कमावतोय.. तु फक्त घर आणि मुलं सांभाळ.. बस्स.. नयनानेही ठरवलं.. घरात रहायचे.. राजाची राणी होऊन राज्य करायचे.. रमली बिचारी संसारात..

लग्नानंतर अधिक सुंदर दिसायला लागली होती.. सुखाचे बाळसंही चढले होते तिच्यावर.. पण संसाराच्या रामरगाड्यात ती स्वतःला आरशात पहायलाही विसरली..

सुभाषही यशाच्या मागे धावत होता.. एक टिपिकल जोडपे झाले होते ते.. मुलं मोठी होत होती.. तसतशी नयनाला स्वतःसाठी वेळ मिळायला लागलेला.. समाजात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास आलेल्या सुभाषला बायको मेणाची बाहुली वाटायची.. पार्ट्या, मिटिंग्जमध्ये बिझी असलेला सुभाष नयनाला पार्टीपुरता बाहेर न्यायचा.. 

घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर.. फक्त घराकडे लक्ष द्यायचे काम नयनाकडे.. जेवण-खाणं उरकले की नयना वामकुक्षी घ्यायची.. संध्याकाळी किटी पार्टी, मैत्रीणींबरोबर शॉपिंग असा नित्यक्रम असे..

सुभाषचे हल्ली पिणंही वाढले होते.. पैसा भरपूर असला म्हणजे सुख असतेच असे नाही.. लक्ष्मीबरोबर अलक्ष्मी यायला कितीसा वेळ लागतो…

नयना आजकाल काहीशी विचारात गढली होती.. एकटेपण डाचत होते तिला.. जुने दिवस आठवत होते तिला.. जेव्हा नवीन लग्न झाले होते त्यांचे.. तेव्हाचे मोरपंखी दिवस.. हवेत उडत होती ती.. सुभाषचे कौतुकाने तिच्याकडे पहाणे.. मन बहरुन यायचे तिचे.. त्याच्या प्रेम भरल्या तुडुंब नजरेने तिचं आयुष्य सुखावून गेले होते..

मध्यंतरीचा एक प्रसंग तिला उध्वस्त करुन गेला.. रात्रीचे बारा वाजून गेले तरीही सुभाष घरी परतला नव्हता.. पहाटे चार वाजता गेटचा आवाज आल्याने ही ताड्कन उठली.. झिंगतच आला होता तो.. हिने विचारले का उशीर झाला तर श्रीमुखात भडकवली त्याने.. ‘तुला काय करायचे आहे..’ वगैरे वगैरे.. ‘तुला काय माहीत मला किती कामाचा ताण आहे ते… तु काय घरीच असतेस..’ हे असे पहिल्यांदा ऐकत होती ती.. तिला प्रकर्षांने तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली.. तिच्या मुलीनं हे पाहिले.. ‘सकाळी बोलू गं आई..’ म्हणून समजावलं.

सकाळी नयना दैनंदिन कामाला लागली.. पण मन उदासच होते.. तिचा भ्रमाचा भोपळा फुटला होता.. तिला आपण कमी शिकलो आहोत.. बाहेरचे काहीच व्यवहार ज्ञान नाही ह्याची जाणीव झाली होती.. 

मुलगी उठली तशी आईला येऊन बिलगली.. हिचाही केव्हाचा दाबून ठेवलेला अश्रुंचा बांध फुटला.. “आई रडू नकोस.. तुला मी आजपासून मोबाईल शिकवणार आहे.. शिकशील ना??” थोडे आढेवेढे घेत नयना तयार झाली.. 

मग काय, नयनाच्या अँड्रॉइड मोबाईल स्क्रीनवर फेसबुक, व्हाट्सअप विराजमान झाले.. छान रमली त्यात नयना.. फेसबुक तर तिचे फेवरेट झाले.. विविध माहिती, मित्र मैत्रीणी ह्यातच तिचा वेळ जाऊ लागला.. ते आभासी जग सत्यापेक्षाही छान होते तिच्यासाठी..

एक दिवस मेसेंजर किणकिणला.. आकाश काळे नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली.. आतापर्यंत नयना माहिर झाली होती फेसबुक हाताळण्यात.. आकाशचे प्रोफाइल चेक केले तिनं झटकन.. दिसायला हँडसम.. एम.बी.ए. झालेला तरुण.. एक दोन म्युच्युअल मित्र मैत्रिणी होते.. रिक्वेस्ट स्विकारली तिनं..

दहा मिनिटात मेसेंजर पुन्हा किणकिणला.. “हाय, मी आकाश.. कशा आहात??”

ही “मी मजेत.. तुला मी ओळखत नाही..”

“हो, पण मी तुम्हाला खुप दिवसांचे फॉलो करतोय..”

“अच्छा.. मग??”

“तुमच्याशी बोलायचे म्हणून…

तुम्ही खुप छान दिसता..”

“थँक्स..” इथपासून सुरू झालेला प्रवास पर्सनल गोष्ट शेअर करण्यापर्यंत कधी पोहचल्या हे समजलेच नाही.. 

आकाश तिचे जग बनला.. त्याचा मेसेज आला नाही तर ती अस्वस्थ व्हायची.. तिला एका कंप्यानिअनची गरज असताना आकाश तिच्या आयुष्यात आला आणि तिचे जग बदलले होते.. आरशात स्वतःला न्याहाळायला लागली होती.. एक नवी पालवी फुटली होती तिच्या आयुष्यवेलीवर.. 

आकाशच्या स्तुतीसुमनांनी ती आनंदी बनली होती.. सुभाषने दिलेल्या शब्दांच्या डागण्यांवर आकाश ने केलेली स्तुती मलमाचे काम करत होती.. पण तिला काय माहिती होते हे सर्व आभासी जग आहे.. हा पाण्याचा बुडबुडा आहे.. तो प्रवाहात नाहिसा होणारच..

त्यादिवशी सकाळीच तिनं नेट सुरु केले.. आकाशचा मेसेज होता.. ‘मला तुला भेटायचे आहे.. मला पैशाची गरज आहे खुप.. आई आजारी आहे खुप.. दहा हजार तरी हवेत..’

हिने विचार केला, मेसेज केला ‘मुलीला सांगून बघते..’ हे वाचताच.. आकाश offline झाला.. पुढचा मेसेज गायब झाला.. त्या दिवशीपासून रोज प्रेमकविता लिहिणारा आकाश इनबाँक्समधे फिरकलाच नाही.. नयना पुन्हा उदास झाली..

खरं तर कुठे गुंतायचे नाही हे ठरवले की अश्या समस्या उद्भवत नाहीत.. कुठे थांबायचे हे कळलं की मृगजळही कोसो दूर पळतय..

मुलीनं नयनाला असे दुःखी पाहिले तसे बाबाशी बोलायचे ठरवले.. “आई एकटी पडली आहे बाबा.. तिला आता तरी सावरा.. या फेजमधे तिला तुमची गरज आहे..”

सुभाषलाही त्याची चूक समजली.. नयनालाही तिची चूक समजली होती.. तिला चुकीचे प्रायश्चित्त हवं होतं.. सुभाषच्या साथीनं पुढे जायचे होते.. तिनं आता ठरवलं होते ऑनलाइन फ्रेंडशिप नॉट अलाऊडेड.. जे दिसते ते सोनेच असते असे नाही.. ऑनलाइनमधे सबकुछ दिखावा है हे तिला चांगलेच समजले होते..

संग्राहक :  सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नास्तिक — सुश्री गौरी हर्षल कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ नास्तिक — सुश्री गौरी हर्षल कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

“गाडी का थांबवलीस रतन?” लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याचं  जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं. पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे. 

त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत. आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत. 

स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं. वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते. 

काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्समधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्ट्रेचरवर घेत एम्ब्युलन्समध्ये ठेवलं. शरीर एम्ब्युलन्समध्ये ठेवताच कोरडेही तिकडे ओढले गेले, कदाचित अजून काही बंधन शिल्लक असावे. 

त्या दोघांकडे त्यांचा जीव वाचावा ह्या आशेने बघणाऱ्या वारकऱ्यांच्याकडे जाता जाता कोरडेंच लक्ष गेलं. आणि त्यांना तो प्रसंग आठवला….. 

‘भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,

वाट ही विरळा दिसे मजला,

लाखो राउळाशी टेकवीला माथा,

देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,

माझा देव कुणी पाहिला..

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,

माझा देव कुणी पाहिला..

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई’

गाण्याचे बोल आणि तो आवाज कोरडेंच्या मनात फेर धरून नाचू लागला. अन् ते सगळे चेहरे त्यांना आठवले. 

डॉक्टर कोरडे प्रचंड सुदैवी होते. त्यांच्या घरात एकाच वेळी चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. डॉक्टर सोडले तर सगळेजण रूढार्थाने देवभोळे असे होते. डॉक्टरांना मात्र ते सगळे अजिबात आवडत नव्हते.

आताही त्यांना तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना गाण्याच्या बोलावर हातात टाळ घेऊन वारकरी वेशात नाचणाऱ्या नातवाकडे कौतुकाने बघताना बघितले होते. कोरडेंचे आईवडील, बायको आणि  डॉक्टर मुलगा, सूनही नातवाला कौतुकाने बघत होते. हे बघून त्यांचं डोकं फिरलं होतं. सगळ्यांवर चिडत त्यांनी नातवाच्या हातात असलेली टाळ फेकून दिली होती. कुठल्याही देवावर त्यांना इतका राग का आहे हे खुद्द त्यांनाही कळत नव्हतं. 

डॉक्टर रूढार्थाने जरी स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असले तरी त्यांची त्यांच्या कामावर प्रचंड निष्ठा होती. अडल्या नडल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना वेळ काळ कशाचेही भान उरत नसे. आणि त्यांच्या ह्याच गुणाबद्दल घरात आणि आसपासही सगळ्यांना आदर होता. अन् त्यामुळेच त्यांचे आईवडीलही त्यांचा देवावरचा राग सहन करत असत. कारण त्यांना त्या रागाचं मूळ कळलं होतं. 

एखाद्या पेशंटला इच्छा असूनही वाचवता आलं नाही की डॉक्टर हतबल होऊन चिडत असत. प्रॅक्टीसला इतकी वर्ष होऊनही अजूनही त्या गोष्टींचा त्यांच्या मनाला त्रास होत असे. सगळ्यात आधी उपचारासाठी दवाखान्यात आणण्याऐवजी देवळात, मशिदीत किंवा इतर कुठेतरी खेटे घालत बसलेल्या नातेवाईकांमुळे पेशंटला योग्य वेळी उपचार न मिळून तो दगावला की डॉक्टरांचा राग देवावर निघत असे. ते म्हणत असत की ‘तुमचा देव ह्या लोकांना ‘दवाखान्यात जा’ अशी बुद्धी का नाही देत? मग लोक पेशंटला काही झालं की डॉक्टर वर का चिडतात? देवावर का नाही चिडत?

आताही हा प्रसंग आठवताना त्यांना राग येत होता. मनातून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. पण अचानकच त्यांना आपल्या जवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. त्यांनी मान वळवून बघितलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे प्रेमळ हसत बघत होती. 

आतापर्यंत कोरडेंना आपल्या अवस्थेची जाणीव झाली होती. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला कशी काय बघू शकतेय ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या व्यक्तीकडे बघितलं. 

त्या व्यक्तीने हसून अगदी मित्रत्वाने बोलायला सुरुवात केली. “काय मग डॉक्टर, कसं वाटतंय? खूप सगळे प्रश्न आहेत न मनात? कळत नाहीये हे सगळं असं अचानक कसं घडलं? मी कोण आहे? तुम्हाला कसा काय बघू शकतो? वगैरे वगैरे… अहं…. असं अजिबात समजू नका की मी तुमची खिल्ली उडवतोय. मी तर तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे. तसा मी सगळ्यांनाच मदत करण्यासाठी येतो पण तुम्ही जरा जास्तच स्पेशल आहात.” 

“कसं काय?”

“अहो तुम्ही प्रत्यक्ष देव आहात कित्येक लोकांसाठी. तुम्हाला कितीही चीड आली तरी तुम्ही स्वतः आमचं प्रतिरूप आहात पृथ्वीवर. हो बरोबर ऐकलत… मीच तो, ज्याचा तुम्हाला खूप राग येतो. पण मला तुमचा राग, त्यामागची भावना कळते, जशी ती तुमच्या आईवडिलांना पण कळली आहे. पण कसं आहे न डॉक्टर प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो. ते कसं घडवायचं हे त्यांचा हातात असतं. आमच्यासारखे तुम्हीही फक्त निमित्तमात्र ठरता.” 

डॉक्टर मन लावून ऐकत होते. 

“आता त्या दिवशीचच उदाहरण घ्या. त्या दिवशी तुमचे दोन पेशंट दगावले. पहिला पेशंट बऱ्याच उंचावरून पडून गेला आणि दुसरा सुद्धा एक्सिडेंट होता. पण त्या मागची गोष्ट तुम्हाला माहित नव्हती डॉक्टर.

पहिल्या पेशंटने आईवडिलांना, बायकोला जीव नकोसा केला होता. तो गेल्यावर तुम्हाला जे वाटलं ना  की ह्याचं घर उघड्यावर पडेल, तसं काही होणार नव्हतं. कारण त्याच्यामागे उरलेले ते तिघे आणि अजून दोन निष्पाप जीव रोज अक्षरशः जीव मुठीत धरून जगत होते. त्या जीवांनी भलेही कधीच त्याच्या मृत्यूची कामना केली नसेल पण त्या जीवांना होणारा त्रास नियतीला दिसत होता. त्यामुळेच त्या दिवशी तो दारू पिऊन इकडे तिकडे भरकटत असताना ही गोष्ट घडली आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला. पाच जीवांच्या पुढे त्याला मिळालेली शिक्षा तशी कमीच आहे. पटलं नं ?” 

डॉक्टरांनी होकारार्थी मान डोलावली. “आणि दुसरा? “

” त्याने स्वतःच्या आनंदासाठी बऱ्याच मुलींना फसवले होते. त्यापैकी दोघींनी ट्रकसमोर येऊन जीव दिला होता. त्या बिचाऱ्या अकाली गेल्या. आणि तुम्हाला वाटलं की त्याला नुकतीच नोकरी लागली होती, लग्न ठरलं होतं. पण डॉक्टर त्या मुलीचाही जीव वाचलाच. कारण ह्या मुलाच्या आईवडिलांना फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायची सवयच लागली होती. त्यांनाही शिक्षा होणं गरजेचं होतं. 

असे कित्येक आईवडील आहेत जे आपल्या अपत्याची मग तो मुलगा असो वा मुलगी, चूक लपवतात, त्यांना पाठीशी घालतात. पण त्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होतो आहे हे त्यांना समजूनही ते दुर्लक्ष करतात. एखाद्या जीवाला हेतुपुरस्सर त्रास देणे मग तो मानसिक असो किंवा शारीरिक हे सगळ्यात मोठं पापच आहे ना डॉक्टर?” 

इतका वेळ शांतपणे ऐकणारे डॉक्टर बोलू लागले, ” बरोबर आहे तुमचं… मला फक्त नाण्याची एकच बाजू माहीत असायची त्यामुळे मी कित्येकदा तुमच्यावर आगपाखड केली. पण आज कळतंय की जाणारा जाण्यामागे बरीच कारणं असू शकतात. मी चुकलो, रागाच्या भरात खूपच चुकीचा वागलो. आईवडिलांना देवाचं करताना त्रास दिला. तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता.” कोरडेंचे डोळे पाणावले होते. 

” हं, शिक्षा तर होणार आहेच तुम्हाला.”,  ते हसत हसत म्हणाले. तस कोरडेंना आश्चर्य वाटलं. 

” तुम्हाला परत पृथ्वीवर जायचं आहे, अजून बरंच काम शिल्लक आहे. आमची एक छोटी मैत्रीण तुम्ही वाचावं म्हणून आम्हाला साकडं घालत आहे.”, असं म्हणत त्यांनी कोरडेंना एक दृश्य दाखवलं. त्या दृश्यातले चेहरे ओळखू येताच कोरडेना आठवलं की त्या मुलीच्या आईला त्यांच्याकडे आणलं होतं आणि तिचं दोन महिन्यांनी ऑपरेशन ठरलं होतं. ती मुलगी देवांना पाण्यात ठेवून ‘ डॉक्टर वाचूदे म्हणजे ते माझ्या आईला वाचवतील ‘ असं सांगत होती. ते बघून कोरडेंना जाणीव झाली की घरातील लोकांपेक्षा जास्त बाहेर लोकांना त्यांची किती गरज आहे. 

आणि ते आठवताच कोरडेना घरच्यांची आठवण झाली. 

“आहेत आहेत. ते सगळे इथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत. पण एक वाईट बातमी आहे बुवा तुमच्यासाठी… तुम्हाला बरं वाटलं की बरेच नवस फेडावे लागणार आहेत.” असं म्हणत ते हसू लागले. 

“आता तर माझी कुठलेही नवस फेडायची तयारी आहे देवा, तुम्ही फक्त माझं काम माझ्याकडून नीट करून घ्या, एवढं एकच मागणं. आणि माझे पाय जमिनीवर राहूदे.” डॉक्टर म्हणाले. 

“तथास्तु” असं कानावर पडत असतांनाच कोरडेंना वेगाने खेचलं गेल्याची जाणीव झाली. मोठयाने श्वास घेत त्यांनी डोळे उघडले तसे आजूबाजूला असलेल्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बघून त्याना आपण परत आपल्या शरीरात आलो आहोत ह्याची जाणीव झाली. 

नर्सने बाहेर जाऊन सांगितलं तसं त्यांच्या कानावर आवाज आला, “देवा, पांडुरंगा, वाचवलंस रे बाबा.”, ते ऐकून डॉक्टर कोपऱ्यात उभं राहून त्यांच्याकडे बघत डोळे मिचकवणाऱ्या त्या व्यक्तीला बघून हसले. सगळे जण त्या दिशेने बघू लागले तर तिथे भिंतीवर असलेल्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. पण तो तिथेच होता सदैव. मनापासून आस्तिक असलेल्या नास्तिकासाठी. 

मंडळी पूजा, कर्मकांड करणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून ते करत असतेच असे नाही. तसेच आयुष्यभर मंदिराची पायरीही न चढलेली व्यक्ती नास्तिक असते असं ही नाही. माणसाचं कर्म आणि त्यांचे परिणाम, माणसाचं भविष्य घडवत असतात. मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. मनाने, विचाराने आणि कर्माने तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असतं. आणि त्यालाही. बाकी कर्मसिद्धांत स्पष्ट करतोच. Always and forever. 

लेखिका : सुश्री गौरी हर्षल कुलकर्णी

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिव्हाळा… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ जिव्हाळा… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.

आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं.

या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.

चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं.

तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन. “

‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली.

“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा.

“करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे. “

“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला !”

मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.

असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते.

आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं.

त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली.

सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं  प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.

विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”

“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर. “

“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच. ” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा ! 

‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.

कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.

सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.

विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही  जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥मनातला पाऊस॥ … श्री मयूरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ ॥मनातला पाऊस॥ … श्री मयूरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे

काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 

अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.

पहाटे साडेतीनच्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला) पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. 

वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे.

कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 

काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 

“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 

“मग?”

“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”

“मग आता?”

“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”

त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 

“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. 

मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 

ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”

“मग काय, पैसे कमवू नयेत का?”

“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”

“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 

“पण, ती फसवतीलच हे कशावरून?”

मी पुन्हा सपशेल आडवा. 

“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”

शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 

“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 

मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 

“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. “तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 

“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 

“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”

आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 

“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 

“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”

… त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !

— समाप्त — 

लेखक : श्री मयुरेश डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

प्रस्तुती : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ५ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ५ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पहिले – ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला. आता इथून पुढे) 

 सोमवार, ८ सप्टेंबर

आज बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार म्हणून हॉस्पिटलमध्ये पुन्हा सर्व तपासण्या झाल्या, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. औषधे, घ्यायची काळजी, आहार याबद्दल सर्व माहिती दिली गेली. सकाळ पासून बापटांचे नातेवाईक भेटून जात होते. शुभेच्छा देत होते. बाई पुन्हा पुन्हा या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्सना, नर्सेसना, वॉर्डबॉयना धन्यवाद देत होत्या. त्या सर्वांनी बाईंची खूपच काळजी घेतली होती. ऑपरेशन करणारे डॉक्टर पाच वाजता यायचे होते तेव्हा त्या त्यांचे आभार मानणार होत्या.

संध्याकाळचे पाच वाजले आणि हॉस्पिटलसमोर डॉक्टरांची गाडी उभी राहीली. डॉक्टरांची पत्नीपण समवेत होती. दोघ दुसर्‍या मजल्यावरील हार्ट डिपार्टमेंटमध्ये आली. डॉ. रानडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दोन मिनिटे बोलून डॉक्टर आणि त्यांची पत्नी डॉ. रानडेंसह बापट बाईंच्या रुममध्ये आली. रुममध्ये बापट साहेब, त्यांची बहिण, भाचा-भाची सर्वजण होते. डॉक्टर आत आले आणि त्यांनी हळूच खिशातून काहीतरी बाहेर काढले. सर्वजण डॉक्टरांकडे पाहत होते. एवढ्यात डॉक्टरांनी बासरी आडवी करत ओठाकडे नेली आणि बासरीतून मधुर सुर बाहेर पडू लागले. रुममधील सर्व मंडळी डॉ. रानडे, नर्स, वॉर्डबॉय सर्वजण हे काय नवीन डॉक्टरांचं बासरी वादन असं म्हणत असताना, बापट बाई डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी हात अर्धवट वर घेत असताना बासरी तोंडात घेतलेले डॉक्टर त्यांच्या समोर आले. बाईंच्या डोळ्यासमोर अचानक मालवण, फोकांड्याचा पिंपळ, बासरीसाठी हट्ट धरणारा कृष्णा आठवला आणि तीच बासरी, बासरी तोंडात धरण्याची तीच पध्दत, तसेच वाजवलेले ते सुर कानात पडताच बापट बाई ओरडल्या –

कृष्णा ! कृष्णा !!

रडत रडत डॉक्टर त्यांच्या पायावर कोसळत म्हणाले – होय बाई, मीच तुमचा कृष्णा.

गंगा-जमुना डोळ्यातून वाहणार्‍या बापट बाई त्यांचे तोंड हातात धरत म्हणाल्या, ‘‘कुठे होतास रे बाळा ? वेड्यासारखी आयुष्यभर शोधत राहिले रे कृष्णा ! काही न सांगता गेलास रे बाळा’’

गदगदलेल्या स्वरात डॉक्टर बोलू लागले – ‘‘होय बाई, तुमच्या कृष्णाला क्षमा करा किंवा तुम्ही क्षमा करावी म्हणूनच एवढ्या वर्षांनी तुम्ही याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलात. बाई सिनेमात असे योगायोग असतात, भाऊ-भाऊ अनेक वर्षांनी भेटतात, आई मुलाची ताटातुट होते, पुन्हा भेटतात आपण अशा सिनेमांची चेष्टा करतो, पण खरोखरच असा योगायोग माझ्या आयुष्यात येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, किती छान योगायोग हा !’’ डॉक्टर रडत रडत पुढे म्हणाले – डॉ. रानडे त्या दिवशी ऑपरेशन करताना पेशंटच्या चेहर्‍याकडे लक्ष गेले आणि मी दचकलोच. माझी आईच ऑपरेशन टेबलावर होती. ज्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम, वात्सल्य काठोकाठ भरलेलं आहे, तेच हृदय मला फाडायचं होतं. सुरुवातीला माझे हात थरथरु लागले. मी इमोशनल होत गेलो. पण डॉक्टर रानडे तुम्ही मला टोचलत आणि माझ्या लक्षात आलं समोर ऑपरेशन करायचं आहे ते माझ्या आईचं नव्हे पेशंटचं. पेशंट आपलं शरीर आम्हा डॉक्टरावर विसंबून स्वाधीन करतो, त्या पेशंटला मला बरं करायचयं, आणि मग मी सफाईने ऑपरेशन केलं.’’

      बापट बाई आणि त्यांच्या पायाकडे बसलेले शिंदे पाहून इतरांच्या काही लक्षात येत नव्हते. कोण आई ! कोण बाई ? एवढ्यात तिथे बसलेले बापट साहेब पुढे झाले. त्यांनी कृष्णाला ओळखले. ‘‘कृष्णा ! आम्ही किती शोधलं तुला. या तुझ्या बाईंना वेड लागायचं बाकी होतं, तू निदान एखादं कार्ड तरी पाठवायचं, कुठं होतास तू?’’

‘‘मी एक कार्ड पाठवलं होत काका, पण ते कार्ड पत्ता चुकीचा म्हणून परत आलं, मग मी बारावी पास होऊन मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळाली हे सांगायला मालवणला गेलो होतो तेव्हा तुम्ही मालवण सोडलं होतं.’’

बापट काकांनी बापट बाईंच्या पायाकडे बसलेल्या डॉ. शिंदेना वर उचलल आणि बाईंच्याच बाजूला बसवलं.

‘‘खूप आनंद झाला रे कृष्णा, अवि अमेरिकेला असतो. या पुण्यात हे आणि मी. गेली काही वर्षे मधुमेह आणि प्रेशरने मला त्रस्त केलं. मला कंटाळा येतो रे कृष्णा, एक सारखी मालवणची आठवण येते. आपली शाळा, ते मुख्याध्यापक सामंत, तो सहावीचा वर्ग आणि शेवटच्या बाकावर निश्चल डोळ्यांनी समोर पाहणारा कृष्णा.’’

डॉ. शिंदे बोलू लागले – ‘‘डॉ. रानडे, आज तुम्हाला हा प्रसिध्द हार्टसर्जन डॉ. शिंदे दिसतो तो या माऊलीमुळे. माझी आई मला लहानपणीच सोडून गेली तेव्हा मी सैरभैर झालो होतो. तेव्हा या माऊलीने आपल्या तोंडातला घास मला भरवला. आपल्या मुलासारखंच मला वाढवलं. पण मी एवढा कृतघ्न की यांना न सांगता बाबाबरोबर गावी गेलो. पण बाई, काका माझा नाईलाज झाला हो, मी होतो केवढा जेमतेम अकरा वर्षाचा॰ आमच्या गाववाल्यांनी माझ्या बापाच लग्न ठरवलं आणि माझा बाप हुळहुळला. काही विचार न करता मालवण सोडूया म्हणाला, मी नाही म्हटलं तेव्हा मला बेदम मारलं आणि चार पाच भांडी गोणत्यात घालून एसटी पकडली. या परिस्थितीत मी पोटाकडून दडवून ठेवली ती ही बासरी. फोकांड्याच्या पिंपळाकडे आलेल्या एका बासरी विक्याकडून माझ्या मनात भरलेली ही बासरी या मातेने मला घेऊन दिली. तशीच बासरी यांच्या मुलाला अवि ला पण हवी होती. पण त्या बासरी विक्याकडे अशी एकच बासरी होती, अवि हट्ट करु लागला तेव्हा स्वतःच्या मुलाला अविला दोन चापट्या देऊन ही बासरी मला देणारी ही माझी माता. मालवण सोडताना ती बासरी तेवढी मी बरोबर घेतली.

      आमच्या गावाकडे आल्यानंतर बाबाचे लग्न झाले आणि तो चेकाळलाच. माझ्या नवीन आईला मी नकोच होतो. पुन्हा एकदा दोन वेळच्या खाण्याची पंचाईत. पण बाबाने एक मोठी गोष्ट केली माझ्यासाठी॰ सातार्‍यात रयत शिक्षण संस्थेत नेऊन माझा दाखला दिला आणि आयुष्यात दुसर्‍यांदा मला आधार मिळाला. रयत संस्थेत वसतीगृहात राहिलो आणि शाळेत शिकलो. या संस्थेने मला घडवले. इथेही चांगला अभ्यास केला. शाळेत सतत पहिला येत राहिलो. या सातारा शाळेचे मुख्याध्यापक कदम साहेब यांनी प्रोत्साहन दिले. दहावी, बारावीत बोर्डात आलो आणि या कदम साहेबांमुळे मेडिकलला गेलो. या कदम साहेबांनी आपली मुलगी मला दिली आणि तीच माझी पत्नी डॉ. जयश्री. बाई ही तुमची सून जयश्री.

जयश्री येऊन बाईंच्या बाजूला बसली. बापट बाईंनी जयश्रीला जवळ घेतले. किती गोड सून माझी ! मी अविच्या मागे लागले आहे, लग्न कर लग्न कर, पण अजून तो मनावर घेत नाही. पण कृष्णा तू मला पहिली सून दिलीस.

बाई किती वर्षांनी तुम्ही दिसलात. आज खरं तर हवी तशी चांगली बासरी मी विकत घेऊ शकतो पण आजही रोज नियमितपणे हीच बासरी वाजवतो तुम्ही घेऊन दिलेली. ही बासरी माझ्यासाठी अमूल्य आहे आणि माझ्या आईने ती मला घेऊन दिली आहे.

डॉ. रानडे आणि हा हॉस्पिटल स्टाफ, तुम्हाला कदाचित हा फॅमिली ड्रामा वाटत असेल तर तसे नाही. माझ्या डोळ्यात आलेले हे अश्रू अस्सल आहेत. मोत्यासारखे.

‘‘होय रे कृष्णा, यात खोटेपणा कसा असेल. आणि कृष्णा मी तुझ्यासाठी फार केल असं समजू नकोस, मुख्याध्यापक सामंत म्हणाले होते, ‘‘बाई या पोरक्या पोराची आई होण्याचा प्रयत्न करा, तसा मी प्रयत्न केला.’’

‘‘प्रयत्न केला नाही, आईच झालात तुम्ही बाई.’’

‘‘होय रे कृष्णा, मी आईच तुझी.’’

‘‘तर मग बापट काका, आई तुम्ही आता माझ्या म्हणजे आपल्या घरी यायचं. तसं तुम्हाला या ऑपरेशननंतर डॉक्टरची गरज आहेच. आम्ही दोघंही तुमची काळजी घेऊ आणि आपल्या घरात मला आई बाबा हवेत. जयश्रीला पण सासू-सासरे हवेत. तेव्हा नाही म्हणू नका. आईबाबा आपल्या घरी चला.

‘‘कृष्णा आम्ही येतो तुझ्या बरोबर नाहीतरी आम्ही पुण्यात दोघंच राहून कंटाळलोय, आम्ही आपल्या घरी येऊ आणि कृष्णा, जयश्री माझी एक इच्छा आहे, आपण लवकरच मालवणला जाऊया. मला ती आपली शाळा, तो मालवणचा समुद्र, तो फोकांड्याचा पिंपळ, ते भरड आणि तू शाखेत जायचास ते नारायण मंदिर सर्व डोळे भरुन पहायचं आहे.’’

‘‘होय आई, मला पण मालवणला जायची केवढीतरी घाई झाली आहे. आणि आईबाबा नुसतं मालवणात जायचं नाही, मालवणात आपलं घर बांधायचं.’’

‘‘होय कृष्णा माझी पण इच्छा आहे, आयुष्याची अखेर त्या मालवणात व्हावी. त्या मालवणच्या मातीत माझ्या अस्थी विरघळाव्या.’’

‘‘होय आई, चला आपल्या घरी.’’ 

डॉ. शिंदेनी खूणा करताच बापट बाईंच्या बॅगा, औषधे वॉर्डबॉयने डॉक्टरांच्या गाडीत नेऊन ठेवले आणि डॉ. शिंदे आणि जयश्री शिंदे आई-बाबांना सांभाळत गाडीकडे घेऊन गेले. गाडी सुरु झाली आणि ड्रायव्हरने टेप चालू केली. बाबुजी सुधीर मोघेंचं गाण आळवत होते.  

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश….

दरी खोर्‍यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश….

एक प्रकाश प्रकाश…..

 –  समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

( मागील भागात आपण पहिले – बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या. आता इथून पुढे)

‘‘कांबळी, सातवीत कृष्णा शिंदे नावाचा मुलगा होता त्याचा दाखला कोणी नेला काय?’’‘‘हो बाई, कृष्णाचा बाबा आला होता स्वतः’’

‘‘कुठल्या शाळेत कृष्णाचे नाव घालणार, काही म्हणत होते ?’’

‘‘नाही, निश्चित सांगितले नाही. पण कराडच्या बाजूला त्यांच गाव आहे लहानस, तेथे तो शाळेत जाईल असं ते म्हणत होते.’’

‘‘हो का ? अहो मी नेमकी पुण्याला गेलेली दिड महिना पुण्यात होते. अविचे बाबा तिकडे असतात ना, बर मग येते मग, त्याच्याबद्दल काही कळलं, पत्र वगैरे काही आलं तर कळवा मला.’’

‘‘हो बाई’’ 

बाईंना कृष्णा नेमका कुठे गेला काही कळेना. त्यांनी नारायण मंदिराकडील शाखेच्या दादाकडे चौकशी केली. त्याला पण काहीच माहित नव्हत. कृष्णा त्यालापण न सांगता गेला होता.

मालवणात जोरदार पाऊस सुरु झाला आणि शाळा सुरु झाल्या. बापट बाई अविसमवेत शाळेत जाऊ लागल्या. रोज शाळा सुरु होण्यापूर्वी त्या अविसाठी नाश्ता आणत तशा अजून एक कृष्णासाठीपण. मग त्यांच्या लक्षात यायचं कृष्णा नाही येणार आता. शाळेत जाताना त्यांना नेहमी डाव्या उजव्या बाजूकडे पाहत जायची सवय. उजव्या बाजूला अवि असायचा डाव्या बाजूला कृष्णा. पण आता डाव्या बाजूला कोणीच नसायचं. फोकांड्याच्या पिंपळाकडे त्यांच लक्ष जायचं. येथेच तो बासरीवाला बासर्‍या विकायला आलेला आणि कृष्णाची नजर बासरीवर पडलेली. त्या आठवीच्या वर्गात जायच्या तेव्हा पुढील दुसर्‍या बेंचवर त्यांच लक्ष जायचं. तिथे दुसराच मुलगा बसलेला असायचा.

कृष्णा एखादं पोस्टकार्ड पाठवेल म्हणून बाई वाट पाहत असायच्या. पण कृष्णाचं कार्ड, पाकिट काही आलचं नाही. बाईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. मधुमेह कमी अधिक होणे, ब्लडप्रेशर सतत वर, चिडचीड सुरु झाली. शेवटी अविच्या बाबांनी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि दिवाळीच्या सुमारास बापट बाईंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अवि आणि त्या पुण्याला आल्या. पुण्यात आल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलमधून तपासणी करुन बाईंना थोड बरं वाटलं. आता बापट बाई सकाळीची योगासनं, हास्यक्लब, चालणं, दुपारचा आराम, संध्याकाळी नाटक, सिनेमा, गाण्याचा कार्यक्रम, महिला मंडळ यात रमू लागल्या.

वीस वर्षानंतर…. 

अविचे बाबा बँकेतून निवृत्त झाले. अविने अमेरिकेत एम.एस. केलं आणि आता तो तिकडेच नोकरी करतोय. अजून तो अविवाहित आहे. वर्षातून एकदा तो भारतात येतो. बापट बाई त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या पण तो हसण्यावरी नेतो. बापट बाईंची तब्येत मात्र फारशी चांगली नाही. तरुणपणी मधुमेह जडल्याने त्या एवढ्यात थकल्या. ब्लड प्रेशर सतत वर खाली होण, धाप लागणं, झोप न लागणं अशा सतत तक्रारी सुरु झाल्या. दिवसाला १५-१६ गोळ्या, श्वासासाठी इनहेलर सुरु होतं. त्यात त्यांना नैराश्याने पकडलं होतं. कशातही लक्ष लागत नव्हतं. अधून मधून त्यांना मालवण शाळेचे दिवस आठवत. आयुष्यात मनापासून रमेल ते मालवणातच असे त्यांना वाटे. असच एका संध्याकाळी बापट आणि बापट बाई बागेत फेर्‍या मारत होते. फेर्‍या मारता मारता बापट बाई खाली बसल्या आणि धापा घालू लागल्या. बापट बाईंना उठताच येईना. बापटांनी तिथल्या माळ्याला बोलावून बाईंना रिक्षात घातले आणि हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टरनी एन्जीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एन्जीओग्राफी नंतर लक्षात आले हृदयात नव्वद टक्के ब्लॉकेजीस आहेत त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.

बापट काळजीत पडले. मुलगा अमेरिकेत पण बापटांची बहिण पुण्यातच होती. भाचा भाची म्हणाले – मामा घाबरु नको. आम्ही येथेच आहोत, ऑपरेशन करुन घेऊया. हॉस्पिटलमधील डॉक्टरनी सर्व तयारी केली. ऑपरेशन करण्यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. त्या डॉक्टरना बाईंचे सर्व रिपोर्ट पाठवले गेले. एन्जीओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरनी ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली.

पंधरा ऑगस्ट हा ऑपरेशनचा दिवस ठरला. सकाळी सात वाजता ऑपरेशन सुरु होणार होते. आदल्या दिवशी पुन्हा एकदा बापट बाईंची सर्व तपासणी करुन रिपोर्ट ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरना पाठविले गेले. सकाळी सहा वाजता डॉक्टर आले. त्यांना या हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री रानडे मदत करणार होत्या. डॉक्टर आल्या आल्या डॉ. रानडे यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या बॅगमधून डॉक्टरनी एक लहानसा फोटो काढला आणि टेबलावर ठेवला. डॉ. रानडेंना माहित होते की, हे डॉक्टर जेव्हा जेव्हा ऑपरेशन करायला येतात तेव्हा हा फोटो नेहमी काढून टेबलावर ठेवतात, त्याला नमस्कार करता आणि मगच ऑपरेशन सुरु करतात.

सर्व तयारी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर, डॉ. रानडे आणि नर्स स्टाफ ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑपरेशन सुरु करण्याआधी डॉक्टरनी सहज बेशुध्द पेशन्टच्या चेहर्‍याकडे पाहिले आणि ते दचकले. त्यांनी पेशंटच्या रिपोर्टवरचे नाव पाहिले. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव भराभर बदलत गेले. डॉक्टरनी एक मिनिट डोळे मिटले. कसलेचे ध्यान केले आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. डॉ. रानडे सोबत होत्याच. त्यांनी पाहिले आज या डॉक्टरांचे हात थरथरत आहेत. डॉ. रानडेंनी या डॉक्टरांच्या हाताला हळूच टोचले. सावध केले. डॉ. रानडे विचार करायला लागल्या नेहमी सफाईने ऑपरेशनची सुरुवात करणारे हे डॉक्टर आज असे नर्व्हस का झाले ? पण लगेचच डॉक्टर सावरले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सफाईदार ऑपरेशन केले.

सुमारे पाच तासानंतर सर्व ऑपरेशन मनासारखे झाले. आणि अत्यंत समाधानाने सर्व डॉक्टर्स बाहेर आले. डॉ. रानडेंच्या केबिनमध्ये आल्यावर ऑपरेशन केलेल्या डॉक्टरनी छोटा फोटो बॅगेत ठेवला आणि ते पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला गेले. डॉ. रानडे पाहत होत्या. हे डॉक्टर स्वतः पेशन्टच्या नातेवाईकांना कधी भेटत नाहीत पण आज कसे काय? याचे आश्चर्य वाटत असताना डॉक्टर बापट काकांकडे गेले आणि त्यांच्या हातावर थोपटत थोपटत ऑपरेशन छान झाले कसलीच काळजी करु नका, पंधरा दिवस त्या फक्त हॉस्पिटलमध्ये राहतील असे सांगून त्यांची काळजी कमी केली.

आय.सी.यु.मधील उत्तम उपचार, फिजीओ उपचार, औषधे यांनी बापट बाईंना बरं वाटायला लागलं. आठ दिवसांनी आय.सी.यु. मधून बाहेर काढून त्यांना स्पेशल रुममध्ये घेतले. आता स्वतः बापट किंवा बापटांची बहिण, भाचरे सर्वजण बाईंना भेटू लागले. अमेरिकेहून अविचा रोज व्हिडीओ कॉल येत होता. ऑपरेशनला जवळ जवळ पंधरा दिवस झाले आणि बापट बाईंची तब्येत व्यवस्थित दिसू लागली. त्यांच्या छातीतील दुखणे कमी झाले. श्वासोश्वास व्यवस्थित चालू झाला. शुगर कंट्रोलमध्ये आली. ब्लडप्रेशर नॉर्मल झाले. बापट बाईंनी थोडा थोडा चालण्याचा व्यायाम सुरु केला आणि शेवटी बापट बाईंच्या डिस्चार्जचा दिवस उजाडला. सोमवार ८ सप्टेंबर रोजी बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार होता. ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला.

बासरी क्रमश: ४

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.)

कृष्णा घरी आला. शाळेची बॅग घरात टाकून नारायण मंदिराकडे आला. त्याठिकाणी दादाभोवती बरीच मुलं जमली होती. हात छातीजवळ घेऊन मुलं म्हणत होती –

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे 

कृष्णा पण त्या मुलांसमवेत छातीजवळ हात घेऊन प्रार्थना म्हणू लागला. त्या मुलांसमवेत कृष्णा तल्लीन होऊन दादाचे म्हणणे ऐकत होता. काळोख पडू लागला तशी मुलं आपआपल्या सायकली घेऊन घरी निघाली. दादापण आपली सायकल घेऊन घरी जाण्याच्या तयारीत असताना कृष्णा पुढे झाला. त्याने दादाला आज बाईंनी घेऊन दिलेली बासरी दाखवली.

‘‘दादा, ही बघ माझ्या बापट बाईंनी बासरी घेतली.’’

‘‘अरे व्वा कृष्णा ! छानच आहे.’’

‘‘पण दादा, मला बासरी वाजीवता येईना, तुला येत का ?’’

‘‘थोडी थोडी येते’’

‘‘मग मला शिकीव नां’’

दादाने बासरी हातात घेतली आणि बासरीचे सहा होल दाखवले. वरच्या तीन होलावर डाव्या हाताची बोट धरुन प्रत्येक होलावरील एक एक बोट कमी करत – सा रे ग म कसे वाजवावे हे त्याने दाखवले. बासरी फुंकावी कशी हे पण दाखवले आणि रोज बाकीची मंडळी घरी गेली की बासरी शिकवायचे मान्य केले. कृष्णा घरी गेला आणि दादाने दाखविल्या प्रमाणे बासरीवर सारेगम वाजवू लागला. बर्‍याच वेळा सराव केल्यानंतर त्याला थोडा थोडा सारेगम वाजवायला येऊ लागला. दुसर्‍या दिवशी दादाने खालचे तीन होल हळू हळू उघडून सारेगम उलट कसं वाजवाचं हे शिकवलं आणि कृष्णाचा हा रोजचा कार्यक्रम झाला. शाखेत जायचं, शाखा संपली की दादाकडून बासरी शिकायची.

एका महिन्यात कृष्णाने बापट बाईंना बासरी वाजवून दाखवली तेव्हा त्यांना कमाल वाटली. अविला काहीच वाजवता येत नव्हते. अविने बासरी आणली ती कपाटावर ठेवली ती परत हातातपण घेतली नाही. सहामाही परीक्षेत कृष्णा वर्गात तिसरा आला. बाईंना आनंद झाला. पाच महिन्यापूर्वी वर्गात तोंड न उघडणारा कृष्णा आता वर्गात सर्वांत मिसळू लागला.

दिवाळीत अवीचे बाबा पुण्याहून आले तेव्हा त्यांनी अविसाठी टीशर्ट, फुलपॅन्ट आणली तशीच कृष्णासाठी पण आणली. अर्थात बापट बाईंनी पत्राद्वारे आपल्या नवर्‍याला तसं कळवलं होत. बापट काकांनापण कृष्णा आवडला. त्याचा अभ्यास, त्याची बासरी याच्या ते प्रेमात पडले. शाळेच्या गॅदरींगमध्येपण कृष्णाने बासरी वाजवली. त्याची सर्वांनी प्रशंसा केली. वार्षिक परीक्षेत कृष्णा संपूर्ण वर्गात पहिला आला. रिझल्ट नंतर मुख्याध्यापक सामंत सरांनी बापट बाईंना बोलावून घेतले.

‘‘बापट बाई, तुम्ही कमाल केलीत, सात-आठ महिन्यापूर्वी ज्या मुलाची तुम्ही काळजी करत होतात तो मुलगा वर्गात पहिला आला.’’

‘‘हो सर, मी खूप आनंदात आहे. तुम्ही म्हणाला होतात – त्याच्या बाई नव्हे आई व्हा, मी आई होण्याचा प्रयत्न केला.’’

‘‘हो बाई, तुम्ही यशस्वी झालात, मी पाहतोय रोज शाळेत येताना जाताना तो तुमच्या बरोबर असतो. माझ्या माहिती प्रमाणे मधला डबा सुध्दा तुम्हीच देता, हे पुण्य आहे बाई.’’ 

थँक्यू सर म्हणत बापट बाई बाहेर पडल्या. आज सामंत सरांनी त्यांच कौतुक केलं याच त्यांना समाधान वाटलं. कृष्णा सातवीत गेला. अवि पाचवीत गेला. कृष्णाचे रोज लवकर बापटांकडे येणे, न्याहारी, मग बाई आणि अवि समवेत शाळेत जाणे, दुपारी बापट बाईंच्या घरचा डबा, सायंकाळी परत घरी गेल्यावर शाखेत जाणे आणि मग बासरीची प्रॅक्टीस. सातवीतपण कृष्णा पहिला आला. शाळाचा रिझल्ट लागला आणि बापट बाई अविसह पुण्याला गेल्या. पुण्यात अविच्या बाबांनी लहानसा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तूपूजा आणि बाईंची तब्येत तपासणीपण करायची होती. बाई कृष्णाला म्हणत होत्या – तू पण चल आमच्या बरोबर. पण कृष्णा म्हणाला – ‘‘बाबा येकटा आय इथं, मी इथं राहतो तुमी जावा’’

बापट बाईंना हल्ली लवकर थकवा येत होता. पुण्यात केलेल्या तपासणीत मधुमेह निघाला. बाईंच्या माहेरी आईलापण मधुमेह होता. डॉक्टरांनी खाण्यावर बंधने आणली आणि औषधे लिहून दिली. दिड महिना पुण्यात राहून बापट बाई आणि अवि पुणे मालवण एसटीने मालवणात आले. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. मालवणात थोडा थोडा पाऊस सुरु झाला होता. बापट बाई बसमधून उतरल्या, बाईंनी ब्रेड आणि दूध घेतले आणि दोघे भराडावर बिर्‍हाडी आले. दार उघडून आत आल्या आल्या बाई अविला म्हणाल्या – अवि आंघोळ कर आणि सायकल घेऊन कृष्णाकडे जा. कृष्णाला घेऊन ये. तो पर्यंत मी आंघोळ करते आणि तुमच्यासाठी खाणे करते. बाईंनी नळावरुन पाणी भरले आणि गॅसवर पाणी गरम करुन अविला दिले. अविने आंघोळ केली आणि सायकल घेऊन कृष्णाच्या घरी निघाला. बाहेर पावसाची भूरभूर सुरु होती. तसाच भिजत अवि गेला आणि सात-आठ मिनिटात परत आला. बाईंचे आत-बाहेर सुरु होते. कधी एकदा कृष्णाला पाहते असे झाले होते त्याला. अवि सायकल लावून घरात आला तो सांगत – ‘‘अगं आई त्या घरात दुसरेच कोणीतरी राहत आहेत. कृष्णा आणि त्याच्या बाबांनी हे घर सोडले आणि ते गावाला गेले.’’ बाई आश्चर्यचकित झाल्या.

‘‘काय ? पण कुठल्या गावाला ?’’

‘‘ते माहित नाही, पण त्या घरात आता माने म्हणून रहायला आलेत, ते म्हणाले शिंदेनी ही जागा सोडली आणि मग आम्ही इथे रहायला आलो.’’

बाईंना वाटले मालवणात दुसरीकडे रहायला गेले असतील किंवा आजूबाजूच्या गावात कुठेतरी गेले असतील. दोन वर्षापूर्वी देवबाग सोडून मालवणात कसे आले तसे. पण बाईंना चैन पडेना. थोडा पाऊस कमी झाला तसा त्या म्हणाल्या, ‘‘अवि चल मी येते तुझ्याबरोबर आपण परत एकदा कृष्णाच्या घरी जाऊया.’’ बाई आणि अवि छत्री घेऊन चालू लागले. नारायण मंदिराजवळ बाई आल्या. चाळीच्या खाली मालक भेटले. त्यांना विचारले – ‘‘ओ शिंदे कुठे गेले माहिती आहे का?’’

मालक म्हणाले – ‘‘शिंदे त्यांच्या गावाक गेले. शिंदे म्हणा होते तेंचा लगीन ठरला हा. त्यांच्या गावच्या लोकांनी हेंचा दुसर्‍यांदा लगीन ठरल्यानी. म्हणून ते झिलाक घेवन गेले. आता ते थयसरच रवतले. झिलाक थयल्याच शाळेत घालतले असा म्हणा होते.’’

‘‘क्काय ?’’ बापट बाई चित्कारल्या.

‘‘ पण कुठल्या शाळेत ?’’

‘‘ता म्हायत नाय ओ, कराड सातारा भागात आसा खयचा तरी खेडेगांव, आता येवचे नाय ते. हयला तेलयाकडचा कामपण सोडल्यानी तेनी’’

‘‘हो का, बरं बरं. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला कळवा हां ! मी येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे – बापट. बरे येते मी.’’ 

बापट बाई आणि अवि बाहेर पडल्या. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरु झाला. बाई नारायण मंदिरात येऊन बसल्या. अवि एकसारखा कृष्णा केव्हा येईल गं म्हणून विचारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत बापट बाई पावसाकडे पाहत विचार करत होत्या.

कुठं असेल हा पोरगा ? कुठल्या शाळेत, कुठल्या गावात ? शिंदेंनी परत लग्न केलयं तर ह्याला धड जेवणतरी मिळत असेल काय? शाळा सुरु असेल ना याची ? एवढा हुशार मुलगा वाया जायचा. विचार करता करता बाईंच्या छातीत थोड थोड दुखू लागलं. त्यांनी अविला एखादी रिक्षा मिळते का पहायला सांगितलं. रिक्षा मिळाली आणि बाई आणि अवि घरी आले. घरी आल्यावर सुध्दा बाईंना अस्वस्थ वाटायला लागले. त्या त्यांच्या घराजवळ असलेल्या झांटयेच्या दवाखान्याकडे गेल्या. डॉक्टरनी त्यांना तपासलं.

‘‘बाई ! ब्लडप्रेशर फार वाढलयं, बर झाल तुम्ही लगेच आलात. आता मी इंजेक्शन देतो आणि एका महिन्याच्या गोळ्या देतो. रोज सकाळी एक गोळी घ्यायची. कसला विचार करताय का?’’

‘‘तसं नाही, आज सकाळीच प्रवास करुन आले ना !’’

‘‘ठिक आहे, काळजी घ्या. दगदग करु नका. आठ दिवसांनी पुन्हा दाखवायला या.’’ 

बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या.

 क्रमश: भाग – ३

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – बाईंनी कृष्णाला दाखवले -‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’ आता इथून पुढे )

बापट बाईंनी पाहिलं कृष्णा जवळ पाण्याची बाटली नव्हती. बाईंनी आपली बाटली कृष्णाला दिली.

‘‘पी हे पाणी, भरपूर पाणी प्यायला हवं, आणि वर्गात नुसतं बसून रहायचं नाही. इतर मुलांबरोबर थोडं बाहेर जायचं, बाथरुमला जाऊन यायचं, कळलं का ?’’

अस म्हणत बाईंनी डबा आवरला आणि त्या अविच्या हाताला धरुन बाहेर गेल्या. कृष्णा विचार करु लागला.

‘‘माय व्हती तवा डबा दित होती, आज खूप दिसानी चांगलं चुंगलं खायाला मिळालं, सांच्याला बाबा दमून येतो नी भाकरी बडवतो. भाजी हाटेलातून आणतो. कवातरी भात शिजवतो. मग भात आणि भाजी खायची. अस जेवण मला रोज रोज कुट मिळाया ? पोटात अन्न गेलं तर मी शिक्षण घेईन. अभ्यास करेन. पण मला मायची लय आठवण येते. किनीची पण आठवण येते. मग काय करायचं फक्त रडायचं. माय कुठं नाहीशी झाली, किनी नाहीशी झाली.’’ कृष्णाला आईच्या आणि बहिणीच्या आठवणीने गदगदुन आलं.

पाच वाजता शाळा सुटली तसा कृष्णा वर्गाबाहेर पडला. गेटच्या बाहेर पडणार एवढ्यात बापट बाई अविचा हात धरुन जवळ आल्या.

‘‘कृष्णा थांब, सोबत जाऊ. कुठं राहतोस तू?’’

‘‘रामेश्वराच्या देवळापाशी, तिथं एक चाळ हाय, तिथं र्‍हातो आमी.’’

‘‘बरं बरं, आम्ही पण त्याच बाजूला रोज जातो. मी भरडावर राहते. तुला माझं घर दाखवते. शाळेत जाताना थोडा लवकर ये. मग आपण एकदमच शाळेत जाऊ.’’

‘‘व्हयं’’ असं कृष्णा म्हणाला. वाटेतील एका बेकरीकडे थांबून बाईंनी दोन बिस्किट पुडे विकत घेतले. कृष्णाच्या हातात ते पुडे ठेवत म्हणाल्या, ‘‘बाबा किती वाजता घरी येतात?’’

‘‘लई रात झाल्यावर येतो.’’

‘‘मग तोपर्यंत काय करतोस?’’

‘‘काय न्हाई, बसून र्‍हाहतो.’’

‘‘असं बसून राहू नये कृष्णा, या पुड्यातील बिस्किटे खा आणि तिथे मुलं खेळत असतील ना तेथे खेळायला जा. उद्या मी तुला सहावीची पुस्तके आणि वह्या घेऊन देणार. रोज शाळेत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पुरा करायचा आणि मला दाखवायचा.’’

भरडावर आल्यावर बाई एका चपलाच्या दुकानाकडे थांबून त्यांनी कृष्णासाठी चप्पल घेतले. कृष्णा मनात म्हणाला – वर्गातल्या सर्वांच्या पायत चप्पल हाई पण माझ्या पायात काही नाही. आता सहावीत गेल्यावर बाईंनी चप्पल घेतलं. आता शाळंत जाताना मजा येईल.’’

भरडावर गेल्यावर बाईंनी आपले घर दाखवले. बाई म्हणाल्या –

‘‘ही सरनाईकांची चाळ, पुढं त्यांच औषधं दुकान आहे. मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं मग आपण एकदम शाळेत जायचं, कळलं ?

‘‘व्हयं’’ म्हणत कृष्णा नवीन चप्पल घालून ऐटीत घरी गेला. घरी गेल्यावर कृष्णाने पिशवी खोलीत टाकली आणि बिस्किटाचा पुडा फोडला. बिस्किटे खात खात तो नारायणाच्या देवळाजवळ आला. तिथे एक झेंडा उभा करुन खाकी हाफ पॅन्ट घातलेली मुलं झेंड्याभोवती बसली होती. मोठा दादा त्यांना गोष्ट सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्यांनी वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हटलं. तो मोठा दादा कृष्णाकडे पाहत म्हणाला –

‘‘कुठ राहतोस रे तू ?’’

‘‘इथं देवळाच्या मागं’’

‘‘बरं, नाव काय तुझं?’’

‘‘कृष्णा, कृष्णा शिंदे’’

‘‘हा. तर कृष्णा उद्या शाळा सुटली की इथं देवळापाशी ये. आमची इथे शाखा असते. ही मुले आम्ही सर्व इथं जमतो. रोज इथं यायचं.’’

‘‘हूं, येतो साहेब’’

‘‘साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं….’’

‘‘हा दादा उद्या येतो.’’

कृष्णाला कोण आनंद झाला. आज दुपारी जेवण मिळालं, चप्पल मिळाली, बिस्किट पुडा मिळाला, आणि आता हे दादा आणि सवंगडी मिळाले. कृष्णाने घरी येऊन दिवा लागला. एकच बल्ब घरात होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आता आई गेली पण पांडुरंग आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत सांगितलेला अभ्यास तो वहीत उतरवू लागला.

सकाळी लवकर उठून विहीरीवर दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. कृष्णाच्या बाबाने काल येताना पाव आणला होता. चहात पाव बुडवून खाल्यावर बाबा कामावर गेला. आणि कृष्णा नवीन चपला घालून भरडाच्या दिशेने चालू लागला. बापट बाईंच्या घरी तो बाहेर उभा राहिला. अवि बाहेरच बसला होता. अभ्यास करत होता. त्याने आईला आत जाऊन कृष्णा आल्याचे सांगितले. बापट बाई बाहेर आल्या. कृष्णाला हात धरुन आत घेतलं. पटकन आत जाऊन दोन थाळीत दोन दोन चपात्या आणि दुधाचे दोन कप बाहेर आणले. आणि कृष्णासमोर चपाती दूध ठेवून खायला सुरुवात करा असं म्हणत आपली तयारी करायला आत गेल्या. कृष्णा भिरभिरत्या नजरेने बाईंचे घर पाहत होता. बाईंचा आणि बाईंच्या नवर्‍याचा एक फोटो दिसत होता. एक कपाट होतं. त्याच्यावर रेडिओ ठेवला होता. एक कॉट होती. त्यावर गादी गुंडाळलेली दिसत होती. दोन चटया गुंडाळलेल्या होत्या. कृष्णाने असं चटपटीत घर पाहिलं नव्हतं. कृष्णाने अविकडे पाहत चपाती दुधात बुडवून खाल्ली. अविप्रमाणेच अंगणात नळावर जाऊन ताटली कप धुतला आणि घरात नेऊन ठेवला. तो पर्यंत बाईंची शाळेत जायची तयारी झाली होती. बाई, अवि आणि कृष्णा तिघेही शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई नेवाळकरांच्या दुकानात गेल्या. दुकानातून कृष्णाच्या साईजच्या दोन पॅन्टी, बनियन, दोन शर्टस् दाखवायला सांगितले. कृष्णा भिरभिरत्या नजरेने एवढं मोठं कपड्याचं दुकान पाहत होता. बाईंनी कृष्णाला कपडे घेतले आणि पुढे खंडाळेकरांच्या दुकानातून सहावीची पुस्तके एक डझन वह्या, दोन पेन, पेन्सिल, कंपासबॉक्स आणि हे सर्व ठेवण्यासाठी स्कूलबॅग विकत घेतली. कृष्णाला खूपच आनंद झाला. आपल्या बाबाला एवढी वह्या पुस्तकं घ्यायला कधीच जमली नसती याची त्याला कल्पना होती.

आता कृष्णा सर्व तासांना व्यवस्थित लक्ष देऊ लागला. सर्व तासांचे शिक्षक त्याच्यावर खूश होते. त्याचा अभ्यास चांगलाच होता. शाळा सुटली की तो बापट बाई आणि अवि बरोबर घरी जात होता. कृष्णाचा बाबा कृष्णाला म्हणाला -‘‘आरं नव चप्पल, पुस्तकं, कापडं देतं तरी कोण ?’’

कृष्णाने शाळेत बापट बाई आहेत त्यांनीच हे सर्व दिलं असं सांगितलं.

तेव्हा कृष्णाचा बाप म्हणाला, – ‘‘आरं ही बाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी समज. ती सांगल तसं वागायचं, तिला कधी तरास द्यायचा न्हाई आणि अभ्यास करायचा.’’ 

असचं एकदा शाळेतून येताना फोकांड्याच्या पिंपळाजवळ एक बासरीवाला काखेतील पिशवीत भरपूर बासर्‍या घेऊन विकायला आला होता. एक बासरी ओठांत ठेवून मधुर वाजवत होता. पिंपळावर बसलेली माणसं, जाणारी येणारी माणसं, शाळेत जाणारी येणारी मुलं त्या बासरीवाल्याकडे पाहत होती. त्याचे ते मधुर बासरी वादन ऐकत होते. कृष्णाचे आणि अविचे लक्ष त्या बासरीवाल्याकडे गेलेच. बापट बाई बरोबर चालताना ते दोघं मान मागे मागे करत परत परत त्या बासरीवाल्याकडे पाहत होते. कृष्णाची पावलं रेंगाळत आहेत हे बापट बाईंच्या लक्षात आलं. बाईंच्या मनात आलं. पोराची आई असती तर त्याने हट्ट धरुन बासरी विकत घेतली असती. बाईंच्या काळजात कालवा कालव झाली. बाईंनी मागे येत त्या बासरीवाल्याला म्हटलं –

‘‘कशी दिलीस रे बासरी ?’’

तो बासरीवाला आपल्या पिशवीतील सर्व बासर्‍या दाखवू लागल्या. बाई कृष्णाला म्हणाल्या – ‘‘कृष्णा तुला बघ कुठली आवडते यातली?’’

कृष्णा पिशवीतल्या सर्व बासर्‍या चाळू लागला. एक अत्यंत आकर्षक बासरी त्याने निवडली. तसा बासरीवाला म्हणाला – अरे वाजीव की, कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मघा बासरीवाला वाजवत होता तसा वाजवू लागला. बाईंनी बासरीवाल्याला किंमत विचारली आणि त्यांनी त्याचे पैशे दिले. अवि पण तशीच बासरी मागू लागला. बाईंनी त्या बासरीवाल्याला आणखी एक तशीच बासरी द्यायला सांगितली. पण त्या बासरीवाल्याकडे त्या पध्दतीची एकच बासरी होती. बाईंनी वेगळ्या प्रकारची एक बासरी घेतली आणि अविला दिली. त्याने अवि हिरमुसला झाला. तो एक सारखा कृष्णाच्या हातातल्या बासरीकडे पाहत होता. बाईंनी अविला डोळे वटारले आणि त्याचा हात धरत, ओढत घराकडे निघाल्या. रडत रडत अवि आई बरोबर चालला होता. कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.

क्रमश: भाग – २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares