☆ दोघी — आई आणि ती… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
फोनची रिंग वाजली तशी तिच्या कपाळावर अठी पडली,.. एवढया घाईत कोण,.. ?नवरा फोन घेऊन स्वयंपाकाच्या ओट्याजवळ आला आणि म्हणाला, ” घ्या तुमच्या मातोश्री आहेत,.. “
ती एकदम कणकेने भरलेला हात हलवत म्हणाली, “आता नको उचलूस मला बोलायला पण वेळ नाही,.. स्वयंपाक, देवीची रांगोळी, नैवेद्य आणि आरती सगळं बाकी आहे,.. कट कर फोन उगाच सकाळच्या घाईत फोन करते ही,.. “.. त्याने नाईलाजाने खांदे उडविले आणि फोन कट केला,..
परत हार करताना वाजला,.. ही फोनकडे बघून नुसती बडबडली, ” आई अग खुप घाई आहे, ऑफिसमध्ये गेल्यावर करते ग माय तुला फोन,… ” तो हसून म्हणाला, “हे फोन उचलून सांग ना,.. ”
ती म्हणाली, “तुला नाही कळणार फोन घेतला की दहा मिनिटं गेलीच समजायची. आज इथे मिनिटांचा हिशोब आहे रे बाबा,.. रोज अंगावर पंजाबी, जीन्स चढवली की निघता येतं. पण ऑफिसमध्ये साडीचा फतवा निघालाय,.. आणि आम्हालाही तेवढाच आंनद छान साड्या नेसण्याचा,.. पण त्यासाठी किमान रोजच्या धावपळीतला अर्धा तास बाजूला काढावा लागतो,.. हिच्याशी आता बोलत बसले तर सगळंच राहून जाईल,.. करेल मी तिला फोन नंतर “…. म्हणत तिने देवीपुढे रांगोळी काढली, तिच्यासाठी वेणी विणली, खमंग तुपावर खिरीचा नैवेद्य झाला,… तिची धावपळ बघून मग गॅलरीत जाऊन त्यानेच फोन घेतला, अगदी काही अर्जंट नाही ना हे जाणण्यासाठी,.. पण तस काही नाही म्हणून मग त्याने तिला सांगितलं देखील नाही पण तिला म्हणालाच, “फोन कर पण आईला नक्की,… “
मंद अगरबत्ती.. किणकिण टाळावर ऊर्जा देणारी आरती झाली,.. देवघरातील देवीला हात जोडताना तो सकाळपासून ऊर्जेने घरभर प्रसन्नता पसरवणाऱ्या आपल्या देवीला म्हणजे गृहलक्ष्मीला निरखत होता,.. साडीत अगदी गोड दिसत होती,.. ती निघणार तेवढ्यात परत आईचा फोन वाजलाच,.. ती पायऱ्या उतरत फोनवर बोलू लागली,.. “आई अग घाईत काय फोन करतेस,.. ? किती धावपळ आहे माझ्या मागे,.. कालपासून नवरात्रामुळे दोन स्वयंपाक सुरू आहेत.. उपवास आणि बिनउपवास.. त्यात सगळी तयारी पूजेची. तुझा जावई काय नुसता सोवळं घालून मिरवतो,.. हार, वेणी, नैवेद्य सगळं बघावं लागत आणि तू अश्या घाईत फोन करतेस,.. आज तर मी माझा उपवासाचा डबा देखील करू शकले नाही,.. अग आज ऑफिसमध्ये कामवाल्या मावशींच्या ओट्या भरायचं ठरलं, त्याच सामान पॅक करत बसले. मग राहिलं उपवासाच थालपीठ करायचं,.. जाऊ दे, आपण रात्री बोलायचं का,.. ? आई सॉरी पण तू समजू शकते तुझ्या लेकीला “.. म्हणत हिने फोन ठेवला देखील.
ऑफिसमध्ये सगळ्यांची एकच झुंबड फोटो काढण्यासाठी, त्या मावशींच्या ओट्या भरण्याची,.. काही चहापाणी पोटात ढकलून सगळ्या परत आपल्या टेबलवर कामाला लागल्या,.. जेवणाची वेळ झाली तसे पोटात कावळे ओरडायला लागले,.. हिने बेल दाबून चपराशी मामाला बोलावलं,.. ” मामा खालून दोन चिप्स आणून द्या ना.. आज डबा नाही आणला गडबडीत,.. ”
मामा म्हणाले, “मॅडम तुमच्यासाठी मघाशीच डबा आला,.. कोण होत माहीत नाही पण तुमचा डबा आहे असं सांगितलं,.. तुमच्या जेवणाच्या टेबलावर नेऊन ठेवलाय मी,..”
हात धुवून ती टेबलाजवळ आली,.. तिने डबा सगळीकडून निरखून पहिला,.. ओळखीचा वाटत नव्हता,.. तो पर्यंत सगळ्या मैत्रिणी जमल्या ‘ चला भूक लागली ‘ म्हणत सगळ्यांनी डबे उघडले,.. तिनेही उघडला,.. राजगिऱ्याचा शिरा,.. थालपीठ चटणी,.. एकदम भरपूर दिलेलं होतं,.. तिने सगळ्यांना वाटलं,.. मनात प्रश्न मात्र कायम होता,.. कोणी पाठवलं असेल? ह्या विचारात तिने शिऱ्याचा पहिला घास घेतला,.. आणि तिच्या तोंडून शब्द आले,.. “आई.. “.. तिला सकाळचं फोनवर केलेलं दुर्लक्ष आठवलं आणि एकदम रडूच फुटलं,.. मैत्रिणींना सगळं सांगितलं,.. सगळ्यांनाच आपली आई आठवली,..
संध्याकाळी घरी येताच नवरोबाने हसून विचारलं, “कसा होता आज फराळ,.. ?”
ती म्हणाली, “तुला कसं कळलं?”
तो हसतच म्हणाला, “मीच तुझ्यापर्यंत पोहचवला तो डबा आणि आता आठ दिवस पोहचवायचा असं माझ्या सासूने कबूल करून घेतलंय माझ्याकडून,…. मग मी तयार झालो, म्हंटल तेवढीच आपल्या लक्षुमीची सेवा,..”
ती एकदम लाजली तो मात्र खळखळून हसला,.. तिने पटकन दिव्यामध्ये तेल घातलं,.. काजळी दूर सारली,.. रात्रीच्या आरतीची तयारी केली,.. आणि देवीला नमस्कार केला तेंव्हा तिला तिथे देवीच्या जागी आईचाच चेहरा दिसत होता,.. तिने आईच्या व्हाट्सअप वर लगेच एक चारोळी पाठवली,..
मंदिराची पायरी उतरून ताई भयंकर चिडीने, त्राग्याने मुख्य दरवाजापाशी आल्या. स्वत:शीच पण मोठ्याने बडबडत होत्या. स्वत:शीच बडबडण्याच्या नादात शेजारी एक मोरपीस विकणारा दादा दिसला त्याच्याशी बोलू लागल्या :
“पुन्हा इथे दर्शनाला यायचं नाही. इतक्या लांबून माणसं येतात पण देवाला धड पाहूही देत नाहीत हे लोक. लांब रांगेतून देवासमोर पोचलो नाही तोच पुढे ढकलतात. ह्याह्.”
तो दादा : “पहिल्यांदा येताय का?”
ताई : “नाही हो. नेहमी हे असंच असतं. ”
तो : “अहो ताई, इथे असंच होतं याची कल्पना होती तरी आलात ना? मग आता जाऊ द्या की. नावं का ठेवताहात?
ताई : “अहो दादा, आशा वाटतेच नं की जरा नीट दर्शन होईल म्हणून? देवापुढे मागणे मागता येईल, तोपर्यंत देवासमोर उभे राहता येईल. मागच्या दर्शनानंतर मुलाला चांगला जॉब लागला. आता जावयाच्या घराचा व्यवहार पक्का होऊ घातला आहे, त्यामुळे देवाचे दर्शन घेऊन येऊ म्हणून आले. पण इथे साधे दहा सेकंदही देवासमोर नीट उभे राहता येत नाही. आजही जेमतेम पाहिले देवाला. ”
तो : “रांगेत किती वेळ गेला हो?”
ताई : “तब्बल पाऊण तास होते रांगेत. तरी बरे पुढच्या एक ताई छान गप्पा मारत होत्या म्हणून बरे झाले. ”
तो : “हाsss. हे बरे. एकट्या असता तर उगीच नामस्मरण वगैरे करत रांगेत उभे राहावे लागले असते. ”
ताई (त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून) : “म्हणजे?”
तो (विषय टाळत) : “म्हणजे काही नाही हो. पाऊण तास नामस्मरण करायचे आणि प्रत्यक्ष देवासमोर दहा सेकंदही उभे राहता आले नाही तर सामान्य माणसाला राग येणारंच ना. साहजिकच आहे. ”
ताई (एक भुवई वर करत) : “सामान्य माणूस म्हणजे?”
तो (विषय टाळत) : “काही नाही हो. जनरल बोललो. ”
ताई : “नाही. सांग नीट. ”
मनातली चीड जराशी व्यक्त झाली असल्याने एव्हाना ताई किंचित शांत होत होत्या.
तो : “ताई, समजा एक दिवस असे झाले की सबंध गाभारा… गाभाराच कशाला?… सबंध देऊळच लोकांसाठी बंद ठेवून फक्त तुम्हालाच आत प्रवेश दिला तर? अख्खाच्या अख्खा दिवस देव फक्त तुमच्यासाठी. मोबाईल फक्त बाहेर ठेवायचा. तो सोबत न्यायचा नाही. बाकी सगळे देऊळ तुम्हाला. तर काय कराल?”
ताई (तोंडाचा आ वासून, विचारांत गर्क) :….
तो : “आहेत की अशीही पुरातन देवळे अजून, जिथे माणसे फार नसतातंच. आणि ते राहू द्या बाजूला. पण समजा खरेच असे झाले तर?”
ताई विचारातच पडल्या होत्या.
तो : “सांगा.”
ताई : “अहो, थांबा हो. विचार करत्ये.”
तो : “जास्त ताण देऊ नका. मी सांगतो काय कराल ते. फक्त माझे म्हणणे बरोबर की चूक ते सांगा.”
“तुम्हाला देवाचे शांततेत दर्शन हवे आहे, देवाशी संवाद हवा आहे, त्याला मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, यासाठी सबंध देऊळ फक्त तुम्हाला देऊ केले… संपूर्ण देवळात फक्त देव आणि तुम्ही… तर तुम्ही आत जाल… नमस्कार कराल, देवाकडे मागण्या मागाल… हे असले सगळे कराल…. आणि मग पाच मिनिटांत पहिला प्रश्न मनात येईल… ‘आता काय करायचे दिवसभर? मोबाईल पण नाही सोबत. स्तोत्रे-बित्रे किती म्हणणार… जप तरी किती करणार… इतर वेळेस सगळे सांभाळून आपण तोंडी लावल्यासारखे देवाचे करतो ते वेगळे… पण अख्खा दिवस देवळात करायचे तरी काय? आणि देवाशी आपण बोलून बोलणार तरी किती?… तो तर काहीच बोलत नाही. बापरे. ’… होईल ना असे?”
हे बोलणे ताईंसाठी अनपेक्षित होते असे त्यांचा चेहराच सांगू लागला.
“अहो ताई, आपल्याला देव भेटायला हवा असतो तो आपल्या टर्म्स वर! आपल्याला हवा तसा! आपल्याला हवा तेव्हा! हो की नाही? आपल्याला नको असताना तर देवही नको असतो. हो नं?
‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ श्लोक शाळेत मराठी शिकवण्यासाठी शिकवलेला असतो आपल्याला, नाही?
आणि, आपण स्वत: ठरवून देवाच्या दर्शनाला जायचे म्हणजे सगळे कसे सुखावह, आरामात व्हायला हवे म्हणजे ‘देवदर्शन छान झाले’ असे वाटते. आपल्या अपेक्षा अगदी इथपासूनच सुरु होतात, नाही? ‘तुझे कारणीं देह माझा पडावा’ श्लोक तर केवळ चाल शिकवण्यासाठी शाळेत शिकवलेला असतो, नाही?
ताईंना आता धक्क्यावर धक्के बसत होते.
“ताई, तुम्ही देवदर्शन करता ना ते तुमच्या मागण्या मी पुरवीन या आशेने. संतांनी देवदर्शनाला महत्व दिले ते आत्मज्ञानानंतर. ते आत्मज्ञान-बित्मज्ञान राहू द्या बाजूला. पण काही त्रास झाला नाही, काही भीती नसेल, कुठली धास्ती नसेल तर मी आठवतो का तरी तुम्हाला? माझ्याकडे आल्यावर पहिले काय करायचे तर नमस्कार आणि लगेचच दुसरे काय करायचे तर आधीच मनात लिस्ट आउट करून आणलेल्या मागण्या मागायच्या… एकापुढे एक. हो की नाही?
खरे सांगा? तुम्ही देवळात मला भेटायला येता की तुमची स्वप्ने पूर्ण करवणाऱ्याला लाच द्यायला येता? पाव किलो पेढ्यांत मी ऐश्वर्य द्यायला तयार होतो ते केवळ ‘करुणा’ हा माझा स्थायीभाव आहे म्हणून. मी वेडा आहे म्हणून नव्हे. नाहीतर, कर्माचा सिद्धांत मला तुमच्यापेक्षा चांगला कळतो.
माझे अनुसंधान नित्य टिकवा; म्हणून नाम घ्या, असे संतांनी सांगितले. त्यांचे फोटो तुम्ही घरात टांगता. पण रांगेत पाऊण तास उभे राहावे लागले तर गप्पा मारायला तुम्हाला माणूस लागते, नाहीतर डोके खुपसायला मोबाईल लागतो. त्याऐवजी नाम घेणे होत नाही. खरे की नाही?
आणि काय हो, ‘जे होते ते त्याच्या इच्छेने’ यावर मुला-नातवंडांना मोठे लेक्चर देणारे तुम्ही – तुम्हाला इतकेही वाटत नाही का की माझ्या दर्शनाला येण्यासाठी समजा कधी कष्ट पडलेच तरी ते एक प्रकारचे तपच आहे? आपले तितके भोग सरले असा का नाही हो विचार करत तुम्ही?…. ”
आणि तो आणखी काही बोलून गेला आणि अचानक गर्दीत मिसळून दिसेनासा झाला.
ताई त्याच्या मधाळ पण डोळे उघडणाऱ्या शब्दांत इतक्या गुंगल्या होत्या की सुरुवातीला ‘देवाला’, ‘देवाचे’ असे देवाबद्दल बोलणारा तो मोरपीसवाला शेवटी शेवटी ‘मी’, ‘मला’, ‘माझ्या’ असे प्रथमवचनात बोलत होता हेच त्यांच्या वेळेवर लक्षात आले नाही.
आणि जेव्हा हे भान आले तेव्हा तो मोरपीसवाला समोर दिसत नव्हता. फक्त तो उभा होता त्या जागी एक मोरपीस मात्र पडलेले होते.
हे उमगले आणि ताईंच्या पायांतील त्राणच गेले. त्या तशाच खाली बसल्या. आजूबाजूची माणसे आणि आवाज त्यांच्या जाणिवेतच उरले नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो तोच सावळा मोरपीसवाला! आणि कानात गुंजत होता तो त्याचा मधाळ आवाज!
मग डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी ते मोरपीस उचलले आणि कपाळाला लावले. तो उभा होता तिथली धूळ कपाळी लावली. मग मंदिरातील गाभाऱ्याकडे वळून पाहू लागल्या. जणू त्यांची नजर मंदिराची भिंत भेदून भिंतीपल्याडच्या देवाला पाहात होती. तिथे पाहात दाटल्या गळ्याने त्या इतकेच म्हणाल्या :
“पुन्हा अशी तक्रार करणार नाही रे! पुन्हा तुला वेगळा मानणार नाही रे! आता अनुसंधान सोडून राहणार नाही रे! फक्त…
☆ “नारिकेलं समर्पयामि……” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
… पुगीफल तांबुलम समर्पयामि
“… अग मंदे! काही विचारू नकोस बाई! सध्याचे आमचे दिवस इतके प्रतिकुल आहेत कि काही बोलायची सोय राहिली नाही.. तुला तर सगळचं ठाऊक आहे कि गं !आमच्या कुटुंबातलं… आमचे हे भिक्षुकीचा त्यांच्या लहानपणापासून व्यवसाय करत आलेत!… आमच्या घराण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे तो!.. सत्यनारायण, लग्न मुंज, वास्तुशांती, ग्रहशांती, एकादशष्ण्या, गणपती, महालक्ष्मी, आभिषेक… एक का अनेक धार्मिक विधीसाठी या पंचक्रोशीत सारखे बोलावणं असतं यांना !.. एव्हढे मोठे प्रकांड पंडित, दशग्रंथी भटजी म्हणून यांची ख्याती आहे कि हे काय मी तुला आता नव्याने सांगायला नको!… पण सांगायचा मुद्दा हा कि हि भटगिरीच आमच्या मुळावरच आली कि गं!.. कालपरवापर्यंत या धार्मिक विधी करीता लागणारं सगळं पूजा साहित्य… नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड, हळद कुंकू, कापूर उदबत्ती, वगैरे साहित्य नेहमीच्या ओळखीच्या दुकानातून आणयाचे!… ते परवा त्या दुकानदाराने यांना आता हे साहित्य देण्यास नकार दिला कि गं!.. म्हणाला, ‘नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड याचं बाजारात अचानक शाॅर्टेज आलयं.. मलाच माल मिळाला नाही तर तुम्हाला कुठून देऊ?… आणि तसं होलसेलच्या दुकानातून माल आणला तरी मला आता तुम्हाला दिवसा ढवळ्या विकता येणार नाही!… पोलीसांची टेहळणी सुरू असते, अश्या समाजविघातक वस्तूंची विक्री कोण करतयं का ते पाहून ;तसा सापडला तर काहीही न विचारता मुद्देमालासकट पोलिस स्टेशनमध्ये नेउन डांबतात.. समाजकंटक या आरोपाखाली… ‘ आमच्या यांनी त्या दुकानदाराला म्हटलं, ‘अरे तुला तर ठाऊक आहे !या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड वगेरेचा मी पूजेसाठी, धार्मिक विधी करीता उपयोग किती वर्षे करत आलोय कि ते!.. आणि या वस्तूं शिवाय पूजाअर्चा विधी कसे होणार!… वस्तूंची टंचाई असेल तर मला चढ्या भावाने दर लावून विकत दे पण नाही म्हणू नकोस!… आता तो नेहमीचाच दुकानदार त्याला का ठाऊक नाही आमचे हे भटजी आहेत ते!.. अगं त्यांच्याच नेहमीच्या घाऊक नि मोठ्या खरेदीच्या जोरावरच तो दुकानाचा अर्धा नफा मिळवत होता… पण आता बाहेरची परिस्थितीच अशी आलीय म्हटली तर त्याला तरी तो काय करणार गं!… आणि आता या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तू अचानक बाजारातून गडप झाल्या तर आमचा पूजापाठाचा व्यवसाय कसा चालायचा?… आमच्या पोटावरच गदा आली कि गं!… तरी आमचे हे डगमगले नाहीत. मोठ्या मार्केट यार्डात जाऊन तिथून या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तूचीं अव्वाच्या सव्वा दराने पोतं पोतं भर खरेदी केली आणि मोटरसायकल वर ठेऊन घरी यायला निघाले… तर वाटेत चौकात सिग्नलला थांबले असता गस्त घालणाऱ्या पोलीस पथकानं यांना बाजूला घेतलं… कसून तपासणी केली आणि….
.. या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या बॅन असणाऱ्या वस्तू एव्हढ्या मोठ्या प्रमाणात घेऊन निघालेला माणूस मुद्देमालासह सापडलेला बघून त्यांना लाॅटरी लागली… त्या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांची भरललेली सगळी पोती जप्त तर केलीच!.. शिवाय यांच्या जाबजबानीचा सिलसिलाच सुरू केला… नुसता तोंडा तोंडी होत होता तोवर ठिक होतं गं!… यांनी सुरवातीस पासून त्या पोलीस पथकाला सांगत होते.. ‘ मी साधा पूजापाठ करणारा भटजी आहे.. या भटजी व्यवसायावर माझ्या कुटूबाचा उदरनिर्वाह चालवत असतो.. पण अचानक या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तू बाजारातून गडप होण्याचं कारण काही मला समजलं नाही… नेहमीचा दुकानदार देत नाही म्हणाला… पण या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तूं शिवाय पूजाअर्चा होणार नाहीत म्हणून मी या मार्केट यार्डातून खरेदी केले.. ‘. त्या पोलीसी डोक्याने विचारले पूजाअर्चेसाठी पाच च्या पटीत नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तूं लागतात हे आम्हाला चांगलचं ठाऊक आहे.. आमच्या घरीपण भटजी येऊन पूजाविधी करून जातात तेव्हा ते पाच पाचच नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड वगैरे आणतात तुमच्या सारखे पोत्यानं आणत नाहीत… तुम्ही पोत्या पोत्यानं या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांची खरेदी केलीय… ती पूजेसाठी तर नक्कीच दिसत नाही… तुम्ही ती आणखी कुणाला तरी सप्लाय करणार आहात असं दिसतयं… बऱ्या बोलानं सांगा एव्हढी पोतं पोतंभर घेणारे कोण कोणती आणि किती माणसं आहेत… त्यांची नावं, पत्ता मोबाईल चटचट सांगा.. नाहीतर पोलीसी इंगा दाखवावा लागेल… आमच्या यांनी त्या सगळ्या पोलिस पथकाचे पाय धरून गयावया करत सांगू लागले या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांची खरेदी फक्त माझ्या एकट्या साठीच केलीय… मी इतरांना विकत देण्यासाठी म्हणून घेतलेल्या नाहीत… प्रत्येकाला परोपरीने समजावून सांगून बघत होते.. पण पोलिसी खाक्याने ते डोक्यात घेतलेच नाही आणि मग तिथल्या तिथं पोलिसी इंगा दाखवायला सुरवात केली… दिसेल तिथे यांच्या अंगावर प्रत्येकानं आपला दंडूका पाजळून घेतला.. पाठीवर, कमरेवर, पायावर, हातावर.. इतके कळवळून ओरडून सांगत होते कि नाही हो मला यातलं काहीच माहिती नाही तर मी काय सांगू… मी फक्त भटगिरी करणारा साधा माणूस आहे… पण तिथं त्यांचं ऐकून घेणारं कुणीच नव्हतं… मार मारून जर्जर करून टाकलं.. तरीही त्या पोलिसी पथकाचं समाधान झालं नाही.. त्यांनी शेजारच्या आणखी दोन तीन पोलीस बीट मधील पथकाला बोलावून पकडलेल्या यांचा चेहरा दाखवत म्हणाले परवाच्या सुपारी गॅंग, नारळ गॅंग, बदाम गॅंग, खारीक गॅंग, हळकुंड गॅंग पैकी कुठल्या गॅंग चा हा दिसतोय जरा सिसीटिव्ही वरून चेक करा… आता त्या सगळ्या गॅंगच्या माणसांना पकडायला याची मदत घ्या तोपर्यत याला सोडू नका… तिथं जमलेलं तीस चाळीस पोलीसांचं पथकानं यांना पाहिलं.. एव्हाना यांचं सगळं अंग काळंनिळं पडलं गं.. हात नि पायाचं हाडच दुखावलं होतं, सुजलं होतं, तोंडं भोपळ्यासारखं सुजलं होतं.. एका जागी पडून हे मरणप्राय वेदनेचे इव्हळतं होते… त्यातही हात जोडून विनवत होते मला माफ करा मी त्यातला नाही मला घरी जाऊ द्या… आमच्याच भागातले एक बिट मधले पथक तिथं गेलं होतं.. त्यातल्या एकानं आमच्या यांना ओळखलं आणि म्हणाला, ‘आयला गुरुजी तुम्ही कसं काय गावलात या चौकात? यांनी त्याच्या आवाजावरून म्हणाले, ‘ अहो राणे !आता तुम्ही तरी यांना सांगा मी कोण आहे ते? मला मगापासून सुपारी गॅंग, नारळ गॅंग, बदाम गॅंग, खारीक गॅंग, हळकुंड गॅंग पैकी च आहे असं म्हणून माझा पार बुकाणा काढलाय… तेव्हा तुमचं तरी ऐकून मला जर घरी सोडतात का बघितलं तर गरीबावर फार उपकार होतील. ‘.. अगं मंदे! ते राणे अगदी देवासारखे धावून आले बघ त्यावेळी.. त्यांनी तिथल्या हेडसायबाला काहीतरी कानात सांगितलं आणि. सायेब म्हणाला, ‘बरं बरं जा त्यांना घेऊन घरी.. आधी दवाखान्यात नेऊन मलमपट्टी वगेरे करून घे मग घरी सोड… आणि त्यांना म्हणावं सध्याच्या परिस्थितीत संशयजन्य पुरावा सापडल्यामुळे संशयित आरोपी म्हणून पकडले गेले होते त्याची शहानिशा पोलिसी प्रणालीने करुन घेताना हा त्रास तुम्हाला झाला.. पण तुम्ही त्यातले नाहीत याची खातरजमा झाल्यावर तुम्हाला सोडून दिले आहे… झाल्या प्रकाराबद्दल प्रशासन दिलगिर आहे… ‘
त्या देवदूत राणेंनी त्यांना दवाखान्यात नेऊन हे हातापायाला प्लॅस्टर नि औषधोपचार करून घरी घेऊन आले… त्याना तसं पाहिलं सोबत राणे पोलीस बघून तर माझी भीतीची गाळण उडाली.. पण राणेंनी मला सर्व खुलासा केला.. आणि म्हणाले आज जर मी तिथे गेलो नसतो तर गुरूजींचं काय झालं असतं?… आम्ही दोघांनी त्यांचे फक्त पायच धुवायचे बाकी ठेवले होते!… खूप खूप आभार मानले. !.. अगं मंदे तुला सांगते यांच्या हातून आजवर ज्या काही पूजाअर्चा झाल्या देवाची सश्रद्ध सेवा केलीना त्याची आज प्रचिती आली बघं!… राणेंच्या रूपात येऊन देवानं आम्हाला दर्शन नि कृपाप्रसाद देऊन गेला… आता हात नि पाय सध्या प्लॅस्टर मधे बंद आहेत त्यामुळे पूजाअर्चा ही सध्या बंद आहे त्याचं यांना काहीच दुख वाटत नाही… दुख वाटतं ते या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांने सुध्दा दुसऱ्या वर मारायला शस्त्रासारखा कसा उपयोग होऊ शकतो… नारिकेलं समर्पयामि पुगीफलम समर्पयामि म्हणतो तेव्हा विधायक शुद्ध भावनेपोटी अर्पण करतो पण विघातक गोष्ट करताना ते संहारक कसे काय बनू शकतात याच प्रश्नात ते अडकून पडलेत…
(बाबांनी मायेने तिची समजूत घातली. तिला ते पटलंही होतं. ताईची माध्यमिक शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला, तेही गावापासून काहीशी दूर माळावर होती. तिची शाळा तर अगदी घराजवळ होती..) इथून पुढे —-
सातवीची परीक्षा झाली. . आता आठवीला ती ही ताईबरोबर सायकलवरून जाणार होती. ती खुशीत होती. . ‘ आता सुट्टी संपून शाळा सुरू झाली की बाबांना सायकल आणायची आठवण करून द्यायची. . ’ असं तिने मनोमन ठरवूनही टाकले होते… परीक्षा संपून दोनच दिवस झाले होते. हातात कागद, पेन घेऊन सुट्टीत काय काय करायचं… याचा ती विचार करत, कागदावर यादी करत बसली होती. बाबा आले की ती यादी ती बाबांना दाखवणार होती. बाबा आले तेच तिच्यासाठी नवी सायकल घेऊन. . बाबांनी सुट्टी लागताच आठवणीने आपल्यासाठी नवी कोरी सायकल आणली. . त्यांना आठवण ही करून द्यावी लागली नाही. . याचा तिला खूप आनंद झाला होता. तिने पळत बाहेर जाऊन आधी बाबांना मिठीच मारली होती. बाबांनी तिच्या केसांवरून मायेने हात फिरवत विचारले,
“ आवडली का सायकल. . ?“
“ हो. . ! “
“ पण पिलू आधी बघ तरी सायकल…”
बाबा हसत म्हणाले तसं ती सायकलकडे धावली.
“ दोन दिवसांनी ताईची परीक्षा झाली की दोघीही सकाळी लवकर उठून सायकलिंगला जायचं, बरं का ? “
अगदी बारकाईने सायकल पाहता पाहता तिने ‘ हो ‘ म्हणलं होतं.
ती आणि ताई दोघीही सोबतच सायकलवरून शाळेत जात-येत होत्या. ताईचं बारावीचं वर्ष आणि तिचं दहावीचं वर्ष असल्यामुळे शाळेत जादा तास असायचे. . त्यामुळे ती आणि ताई बरोबरच शाळेत जायच्या, कधी कधी शाळा सुटल्यावर ताईचा जादा तास असायचा, त्यावेळी ती ताईसाठी थांबायची. ताईची बारावी झाली. . तिचा दहावीचा निकाल लागला. . तिची अकरावीची शाळा सुरू झाली होती. ती एकटीचं सायकलवरून जाऊ लागली होती.
एकेदिवशी ती घरी आली तर घरातील वातावरण एकदम गंभीर झाले होते. ताई सकाळीच मैत्रिणीकडे जाते म्हणून आईला सांगून बाहेर पडली होती पण अजूनही परतली नव्हती. . आईने मैत्रिणीकडे चौकशी केली तर ताई मैत्रिणीकडे गेलीच नव्हती.
आईने बाबांना बोलावून घेतलं होतं. . ताईचा शोध चालू होता. ताईच्या सगळ्या वर्गमैत्रिणीकडे, इतर मैत्रिणीकडे शोधून झालं होतं. ताई कुठेच नव्हती. . बाबा अस्वस्थ होते, काळजीत होते. . आई रडवेली झाली होती. . तरीही उशिरा का होईना ताई येईल असे वाटत होते. .
“ तुला काही बोलली होती का ताई ? “
“ नाही. ”
“ आठवून बघ. . ”
“ काही बोलली असती तर सांगितलं असतं मी. . ”
ताई कुठेतरी गेलीय, हरवलीय या विचाराने ती आधीच रडवेली झाली होती. ‘ कुठे असेल? कशी असेल? कुणी अपहरण तर केलं नसेल ना ताईचं ? ‘ इतरांसारखेच तिलाही हे प्रश्न पडत होते. .
“ रात्रीत नाही आली, नाही सापडली तर सकाळी पोलिसात तक्रार देऊया. . ”
संध्याकाळी आलेला तिचा मामा म्हणाला होता. सकाळी समजलं, ताई पळून गेलीय. कुणाच्या तरी गाडीवरून जाताना एकाने तिला पाहिले होते. . हे समजताच आधी काळजीत असणाऱ्या बाबांनी एकदम जमदग्नीचा अवतार धारण केला होता. . तेआईवर ओरडले होते. तिच्यावर ओरडले होते. . दोन-चार मुस्काडीत मारून तिला विचारले होते,
“ तू सारखी बरोबर असायचीस. . तुला ठाऊक असणार. . सांग कुणाबरोबर पळून गेलीय ती ? “
तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. आईलाही अंदाज आला नव्हता. ताई पळून गेली होती. . जाताना कपाटातले पैसे, घरातले दागिने घेऊन गेली होती.
बाबा जास्तच चिडचिडे झाले होते. त्यांनी तिची शाळा बंद केली होती. शाळेत जाण्यासाठी ती रडली होती, आर्जवं केली होती. आई सांगत होती, मामाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता पण बाबा कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी तिची शाळा बंद केलीच, पण घरातून बाहेर पाऊलही ठेवायचे नाही म्हणूनही बजावले. . दोघींच्या सायकलीही विकून टाकल्या.
“ एक तोंड काळं करून गेलीय. . दुसरी जायला नको. . तिचं लग्न करून टाकणार आहे लवकर. . ”
बाबांनी कुणाचं काहीही ऐकून न घेता आईला निर्णय सांगून टाकला होता.
ती रडत होती, आई-बाबांना विनवत होती. . . ‘ मला शिकू द्या. . मी ताईसारखी वागणार नाही ’ असं म्हणत होती. आई आधी बाबांना सांगायचा प्रयत्न करत होती पण नंतर बाबांच्या निर्णयाला मूक संमती दिल्यासारखी गप्प झाली. काळाच्या औषधानेही जमदग्नी शांत झाला नव्हता. ‘एकीने घराण्याची अब्रू घालवलीच आहे, उरली सुरली नको जायला ‘ म्हणून पहिल्यांदा जे स्थळ मिळाले तिथे तिचे लग्न अक्षरशः उरकून टाकून ते मोकळे झाले होते. तिची इच्छा, आवड-निवड, तिची स्वप्ने या साऱ्याचा बळी देऊन घराण्याची ‘उरली-सुरली ‘ अब्रू वाचवली होती. .
“ आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? तुझं भलं-बुरं आम्ही पाहणार नाही काय ? काय वाईट आहे गं स्थळात. . एवढं चांगलं स्थळ आहे. . आणखी काय हवं असतं गं बाईच्या जातीला ? “ आईचे निर्वाणीचे शब्द होते. .
ती बळी द्यायला घेऊन निघालेल्या शेळी सारखी स्वतःच्या मनाला आणि स्वतःला फरफटत घेऊन पुढे पुढे जात राहिली होती.
मनातला प्रश्न तिने रडत-भेकत, कधी रागात आईला विचारला होता, एकदा नव्हे तर दोन-तीनदा बाबांना विचारला होता. . तिला उत्तर मिळाले नव्हतं. . अनेकदा स्वतःला विचारला पण तिलाही उत्तर मिळाले नव्हतं. . प्रश्न अनुत्तरीतच राहिला. .
आजही आयुष्याच्या या टप्प्यावर, अंथरुणावर खिळून असतानाही तिच्या मनात तोच अनुत्तरीत प्रश्न तिला घेरून राहिला होता.
‘ प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असेलही कदाचित. . पण माझे काय ? माझा काय गुन्हा होता ? माझी काहीच चूक नसताना, माझी स्वप्नं, आवडी- निवडी या साऱ्यांचा, माझा बळी दिला गेला. . का ? मी कोणताच गुन्हा केला नसतानाही मला ही शिक्षा का ?’
प्रश्नाचा सर्प आयुष्यभर तिला वेटाळून बसला होता. . ज्याचे उत्तर कुणीच दिलं नव्हतं. . आणि तिलाही सापडले नव्हते. त्याच निरुत्तर प्रश्नाचा सर्प तिच्या मनात तेंव्हाही फुत्कारत राहिला होता. . तसाच फुत्कारत बसला होता. . आयुष्यभर !
ती अंथरुणावर खिळुन होती त्याला चार-पाच महिन्याचा कालावधी लोटला होता. निमित्त झाले होते ते पाय घसरून पडण्याचे.. साठी ओलांडल्यावर सावधपणे वावरावे लागते हे तिलाही ठाऊक होतं. ती तशी वावरतही होती. तरीही पाय घसरून पडली आणि सक्तीची कंटाळवाणी विश्रांती घ्यावी लागली..
असे खिळून, बसून राहणे तिच्या स्वभावातच नव्हतं…पण आताशा तिला उठावं, काही करावं अशी इच्छाच राहिली नव्हती. तशी ती एकटीच राहत होती. मुलं मुलांच्या जागी, मुलगी तिच्या घरी होती. ती घरात एकटी होती पण तरीही कामाच्या रामरगाड्यात दिवस निघून जायचा. सायंकाळच्या वेळी प्रपंचातून निवृत्त झालेल्या गल्लीतील दोन -तीन सासवा पाय मोकळं करायला म्हणून आपापल्या घरातून बाहेर पडायच्या त्या तिच्या दारातल्या कट्ट्यावर येऊन विसावायच्या.. ती ही दारात कट्ट्यावर येऊन त्यांच्या सोबत विसावायची.. पाय मोकळे होताना मनंही मोकळी होऊन जायची. ती एक श्रोता म्हणूनच त्यात असायची. तिला कधी मोकळं व्हावंसं वाटलेच नाही. भरभरून बोलावे, मन मोकळे करावे हा तिचा स्वभावच नव्हता. काय बोलायचे आणि का बोलायचे ? वर्तमान काळात काही बोलण्यासारखं नव्हते आणि भूतकाळ ? भूतकाळातले बोलून काही उपयोग नव्हता.
उपयोग नव्हता म्हणजे खरंच काही उपयोग नव्हता. एकतर कितीही बोलले, सांगितले, कुणी ऐकले तरी भूतकाळ काही परतून येत नाही.. त्यामुळे बदलता येत नाही. आणि दुसरे म्हणजे ‘परदुःख शीतल’ न्यायाने तिची वेदना, तिची सल कुणाला उमजतच नाही.. तिला पडलेला प्रश्न हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे असे पूर्वीही कुणाला, अगदी तिच्या आई-वडिलांनाही वाटलं नव्हतं.. मग इतरांना वाटण्याचा प्रश्नच उरत नव्हता.
“काय वाईट आहे गं.. राहायला घर आहे, नोकरी आहे, पोटापुरती शेती आहे.. तू अशी सावळी तरीही गोरागोमटा, शिकलेला, राजबिंडा नवरा तुला मिळालाय.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं.. ? “
तिची आई तिचे लग्न ठरवताना आणि नंतरही कितीतरी दिवस हेच म्हणत होती.. नंतर त्यात एक दोन वाक्याची भर पडत गेली होती.
तिच्या वडिलांनी तर केव्हापासून कान झाकून घेतले होते. त्यांनी ते उघडलेच नाहीत. तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायचे सोडाच पण साधे ऐकून घ्यायची तसदी कुणी घेतली नव्हती.. लग्नाचे ठरवण्याआधीपासून तिच्या बाबांनी जमदग्नीचा अवतार धारण केला होता.. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती.. कुणाचे धाडस होत नव्हतं.. त्यांच्याजवळ नसले तरी एकदा ती आईजवळ म्हणाली होती..
“पण आई, मला खूप शिकायचंय…”
“शिकायचंय.. शिकायचंय काय चाललंय गं तुझे.. शिकून तरी काय करणार आहेस ? आणि तुझं भलं बुरं आम्हांला कळत नाही ? आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? … आणि हे बघ यांच्यासमोर एक शब्दही काढू नकोस यातला.. शिक्षणाचे नाव ही काढू नकोस.. आम्ही चार दिवस जगावं वाटत असलं तर गप्प बस.. ”
“पण आई.. “
“तुला गप्प बस म्हणून सांगितले ना एकदा.. “
चिडून आई म्हणाली.. ती गप्प झाली. ओठ घट्ट मिटून घेतले. पण मन ? मन तर स्वतःशी बोलतच होते.. या मनाचे ओठ कसे घट्ट मिटून घ्यायचे.. ? मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते.. एखादे मरणासन्न जनावर दिसल्यावर त्याच्या मरणाची आणि त्याच्यावर झडप घालण्याची वाट बघत गिधाडे जशी आकाशात घिरट्या घालत राहतात तसा तिच्या मनात एकच प्रश्न घिरट्या घालत होता.. तिच्यावर झडप घालून चोच मारत होता.. तेंव्हापासून.. आयुष्यभर.
काळ पुढं सरकत राहिला.. मुलगा झाला..
आई म्हणाली,
“भाग्यवान आहेस, घराण्याला कुलदीपक मिळाला.. जन्माचं सार्थक झालं. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं ? “
आईच्या मुखातून बोलल्यासारखे शेजारी-पाजारी, नातेवाईक ही तसंच काहीतरी म्हणाले.
मुलगी झाली. आई म्हणाली,
“घरात लक्ष्मी आली.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असतं गं.. ? “
जगाच्या दृष्टीनं सारं सुरळीत चालू असलं तरी ते तसं असतंच असं नाही. ‘दुरून डोंगर साजरे’ असं म्हणतात तसाच प्रकार असतो तो. तिची सारी स्वप्नं काचेसारखी तडकून, विखरून गेलेली, त्यांचा चुराडा झालेला.. जीवन म्हणजे स्वप्नांच्या चुराड्यावरची बोचरी शय्या. ती बोच दुसऱ्या कुणाला जाणवत नव्हती, दिसत नव्हती पण म्हणून तिला, तिच्या मनाला रक्तबंबाळ करत नव्हती असं नव्हतं.
नवऱ्याला बऱ्यापैकी नोकरी होती. पण त्याच्या मनमानी, लहरी स्वभावामुळे ती ही टिकली नव्हती. अतिशय स्वयंकेंद्रीत वृत्ती, बेजबाबदारपणामुळे त्याच्यावर कोणत्याच गोष्टीसाठी विसंबून राहण्यात, अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही हे तिला लग्नानंतर काही दिवसातच उमगलं होतं.
“मला पुढं शिकावं वाटतंय.. मी शिकू का ? “
तिनं भीत भीतीच नवऱ्याला विचारलं.
“कशाला ? गप्प घरात बसायचं.. माझ्यासमोर नखरे करायचे नाहीत.. स्वतःचं डोकं चालवायचं नाही.. एकदाच सांगतोय.. पुन्हा सांगणार नाही…समजलं का ? “
ती गप्प झाली. ‘पुढं शिकू का ? ‘ विचारलं त्यात नखरा काय होता ? ‘ हा मनात आलेला प्रश्न मनातच राहिला. असे कितीतरी प्रश्न मनातच राहिले होते. काही मनातून ओठांपर्यंत यायचे पण ओठांच्या दारातून बाहेर यायचे नाहीत.. दाराशी थबकायचे, दाराआडून बाहेर पहायचे.. पण बाहेर पडावे असे वातावरणच बाहेर नसायचे मग ते परत मनात जाऊन खळबळ माजवत बसायचे.. तिच्याबरोबर त्यांचीही चिडचिड व्हायची पण ती ही आतल्या आत..
“असे पूर्वी न्हवतं नाही.. ”
एखादा प्रश्न तिला म्हणायचा.
‘हूँ ! ‘ ती स्वतःशीच बोलल्यासारखी हुंकारायची. मग त्याच त्या एका अनुत्तरीय प्रश्नाचा सर्प तिच्या मनाला वेटाळून बसायचा. तिचं मन मात्र भूतकाळात गेलेलं असायचं.
“बाबा, मलाही ताईसारखी सायकल पाहिजे. “
ताई माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर बाबांनी तिच्यासाठी सायकल आणली तेंव्हा ती बाबांना म्हणाली होती..
ताईची शाळा दूर आहे की नाही.. म्हणून तिला आणलीय सायकल.. तुझी शाळा तर घराजवळच आहे. तू त्या शाळेत जायला लागलीस की तुलाही आणूया नवी सायकल..”
बाबांनी मायेने तिची समजूत घातली. तिला ते पटलंही होतं. ताईची माध्यमिक शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला, तेही गावापासून काहीशी दूर माळावर होती. तिची शाळा तर अगदी घराजवळ होती..
☆ विवाहाचा इतिहास आणि आजची विवाह स्थिती… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
विवाह विधी हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा विधी मानला जातो. हा विधी अतिप्राचीन काळापासून देवी-देवतांपासून चालत आलेला आहे. या विधीत अग्नीस साक्षी मानून वधू वरास आणि वर वधूस एकमेकांना अनेक वचनात बांधून घेतात. एका दृष्टीकोनातून पाहिले तर वचने पूर्ण करण्याचा हा एक करारनामाच असतो. तसे पहाता विवाह हा धर्म आणि समाज यांच्याशी अधिक संबंधित आहे. ‘ एका विशिष्ट हेतूने केलेले वहन म्हणजेच विवाह ‘
फार प्राचीन काळी लोक समूह करून एकत्र रहात होते. समूहातील पुरुष शिकारीस जात असे. आणि समूहातील स्त्रिया मांस भाजून देत असत. पण तेंव्हा समूहामध्ये एकत्र रहात असताना पुरूषाचे स्त्रीवर अथवा स्त्रीचे पुरूषावर वर्चस्व नक्कीच नव्हते. पण पुढे पुढे एकाकीपणा, तणाव दूर करण्यासाठी सोबतीची आवश्यकता भासू लागली. अतिप्राचीन काळात सुरूवातीस समाजाची निर्मिती नसावी. त्यामुळे कोणतीच बंधने नव्हती. पुढे स्त्री -पुरूषाच्या आकर्षणातून प्रेमाची निर्मिती झाली. नंतर दोघे एकमेकांसोबत आपला वेळ घालवू लागले. जन्मास येणाऱ्या संततीवर आणि संततीस जन्म देणाऱ्या स्त्रीवर षुरूष नितांत प्रेम करू लागला. त्यांच्याच सोबत राहू लागला. अशाप्रकारे कुटुंबाची निर्मिती झाली असावी. नंतर स्त्रीनेच शेतीचा शोध लावला. समूह-समूह एकाच ठिकाणी स्थानिक होऊ लागले. पुढे समाज निर्माण झाला असावा. सुरक्षेसाठी एका समुहाला दुसर्या समुहाची गरज भासत होतीच. अशाप्रकारे जुळत गेलेल्या नातेसंबंधातून विवाहाची निर्मिती झाली असावी.
पुढे जसजसा समाज प्रगत होत गेला तसे विवाहविधीचे स्वरूप बदलत गेले. वेगवेगळ्या चालीरूढी, समाजानुसार विवाहाचे अनेक प्रकार पडत गेले. विवाह हा पूर्वीपासूनच मुलगा आणि मुलींकडून अशा दोन्ही परिवारात विचारविनिमय होऊन पार पडत आला आहे. मग त्यामध्ये परिवारातील जेष्ठ सदस्य असतील, आजूबाजूचे समाजातील प्रतिष्ठित असतील अथवा कूणी इतर नातेवाईक असतील या सर्वांचा सहभाग सक्रीय होता. मुला-मुलीचे मत दोघांची विचारधारा अशा सर्व बाबींचा विचार होत असे. म्हणजे विवाहविधीची परंपरा जपत, जास्तीत जास्त विवाह पारंपारिक पद्धतीने जुळत होते.
विवाह निर्मिती पासून ते आजचे विवाहाचे स्वरूप पाहिले तर आजची वैवाहिक स्थिती तर खूपच बिकट आहे. एके काळी विवाह हा एक विधी माणसाची गरज म्हणून निर्माण झाला. आणि आज हाच विवाह म्हणजे तरुणांसाठी एक आव्हान ठरले आहे. खासकरून मुलांकरीता. आई-वडिलांसाठी देखिल चिंतेचा घनभारी विषय ठरला आहे. आज मुलांना लग्नाकरता मुलीच मिळत नाही ही विवाहासंदर्भाची फार मोठी समस्या आहे. याला बरीच कारणे देखील आहेतच. एक तर मुलींचे घटते प्रमाण. दुसरे आज मुलांच्या तुलनेत मुली जास्त प्रमाणात शिक्षित झाल्या आहेत. तिसरे कारण मुलींचा कल हा शहराकडे अधिक आहे. गावाकडील मुलांना सरासर मुली, मागचा पुढचा विचार न करता रिजेक्ट करत आहेत. मुली आज पुणे, मुंबई सारख्या शहरात नोकरीसाठी स्थायिक असणाऱ्या मुलांना जास्तीत जास्त पसंती दाखवत आहेत. त्यामुळे गावकडे शेती अथवा व्यवसायामध्ये उत्तमात उत्तम असणाऱ्या मुलांना विवाहाच्या बाबतीत खूपच अडचणी येत आहेत. लग्न हा त्यांच्यासाठी मोठा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकरी मुलांना तर मुलगी मिळणेच अवघड झाले आहे.
लग्न न जुळण्याचे अजून महत्त्वाचे कारण म्हणजे पुर्वी प्रथम मुलगा, मुलीच्या घरी आपल्या नातेवाईकांसोबत येत असे. तिथे मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम होत असे. एकमेकांची पसंती होत असे. नंतर पंचांग जुळते का पाहिले जायचे. मुला-मलीचे जात, कुळ, गाव, घरदार, शेतीवाडी रहाणीमान इत्यादीबद्दल सर्व बाबींवर दोन्ही परिवारात चर्चा, विचारविनिमय होत असे. आज या विवाह संदर्भातील चालीरूढी समाजातून तळागळाशी गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र वाटांवरून धावणाऱ्या आजच्या तरूणाईलाच हे सगळे मान्य नाही. तसेच आज गल्लीबोळातून वधूवर सुचक मंडळ आहेत. तेथे विवाह संदर्भातील नाव नोंदणी होते.
मुला-मुलींचा बायोडेटा आणि फोटो दिले- घेतले जातात. बायोडेटा वरती मुला-मुलींची अपेक्षा नमुद केलेल्या असतात. सरासरी मुलींच्या बायोडाटावरती टिप असते… मुलगा शहरात राहणारा असावा. सरकारी नोकरीत असावा. शहरात स्वतःचे घर असावे. खरोखर पहायला गेले तर मुलींच्या या अपेक्षा विहित आहेत का?
मुलांचा विचार केला तर आज समाजात तिसी ओलांडलेली कितीतरी मुले आहेत जी आपले लग्न जुळवण्यात अपयशी ठरत आहेत. आणि ही सगळी मुले शेती अथवा व्यवसाय संभाळणारी आहेत. शहरात जावून तुटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा मुलांनी शेती अथवा व्यवसाय करणे यामध्ये गैर काय आहे ?हा प्रश्न आज कित्येक पालकांच्या मनाला भेडसावत आहे. आज कित्येक तरुण लग्न ठरावे म्हणून गावाकडे बसलेला जम सोडून शहराकडे धावत आहेत. अशीच स्थिती राहिली तर शेतीला कोणी वाली रहाणार नाही.
‘ आज लग्न जुळत नाही. ‘हा प्रश्न परिवारासाठी मर्यादित राहिलेला नाही. तो एक समाजिक चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या ओळखी, मैत्री, प्रेम, विवाह याचा देखिल परिणाम आजच्या विवाहावर होत आहे. आज प्रेम विवाहाचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. काळानुरूप बदलत चाललेली ही विवाह स्थिती समाज आणि परिवारासाठी गंभीर विषय झाली आहे शोशल मिडियाच्या अधिन होऊन आपल्या स्वतंत्र मार्गावरून धावणारी आजची तरुणाई करियर सोबत, आपल्या भावी जीवनाचे इतर निर्णय स्वतःच घेत आहेत.
आजकाल आई-वडील आपल्या मुला -मुलींवर आपली मते लादू शकत नाहीत. इतकेच नाही तर आपले विचार आजच्या तरुण पिढीला समजून देण्यात पण कित्येक पालक असमर्थ ठरत आहेत. मुलांच्या आयुष्यातील आता आई-बाबांची जागा मोबाईलने, शोशल मिडीयाने घेतली आहे. घरातील नात्यात होणारे संवाद विस्कळीत झाले आहेत. लग्नासारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखिल चर्चा होत नाहीत. घरातून एकमत राहिले नाही. ऑनलाईनच मुले-मुली नको त्या व्यर्थ कारणासाठी एकमेकांस रिजेक्ट करत आहेत. लग्न हा जीवनाला वेगळे वळण देणारा एक महत्वपूर्ण विधी आहे. लग्नानंतर एका चांगल्या जीवनसाथी मुळे जगण्याच्या वाटा आनंददायक आणि सुखकर सोप्या होतात. प्रत्येकाच्या वाट्याला विवाहाचा महत्वपूर्ण क्षण येतोच. शहर काय आणि गाव काय जीवन म्हटले की, सुख-दुःख, संकटे आलीच. पण सोबतीत एखादा विश्वासू हात, भक्कम आधार असेल, परस्परांना सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याची दोघांतही क्षमता असेल तर खडतर वाटेवरचे सुध्दा मार्ग सोपे होत जातात. मुले असोत अथवा मुली त्यांना आपल्या परिस्थितीचे भान असले पाहिजे. आपल्या पालकांबद्दल मनात आदर पाहिजे. आपल्या आयुष्यात विवाह करून येणारा तो किंवा ती यामुळे जीवनात बराच बदलाव येतो. लग्नानंतर नवी नाती, नवा परिवार भेटतो. मग आपली निवड फक्त मुलगा किंवा फक्त मुलगी हा एकांगी विचार करून नक्कीच नसावी. त्यामध्ये आई-वडिलांबरोबर कुटुंब कल्याणाचा विचार असावा. शहर पाहिजे गाव नको या गोष्टींना काहीच अर्थ नाही.
विवाहासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर समाजातून गांभीर्याने विचारविनिमय व्हावा. वधूवर सुचकमंडळांनी सुध्दा आजची विवाहस्थिती पाहता या विषयाकडे आपला फक्त बिझनेस म्हणून न पाहता ‘एक गंभीर सामाजिक प्रश्न’ म्हणून पहावे. समाजसेवेचा भाग म्हणून शक्य त्यांनी मुलांचे विवाह जुळवून देण्यात सक्रिय सहभागी व्हावे. कारण मुलांची लग्ने वेळेत होत नाहीत म्हणून कितीतरी कुटुंब आज मानसिक तणावात आहेत. चला शक्य असेल तर आपण ही समस्या सोडविण्याचा जरूर प्रयत्न करूया.
पुणे शहराच्या वाचन संस्कृतीमधील एक मानबिंदू आणि तब्बल ११३ वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या “पुणे मराठी ग्रंथालय” यांच्यातर्फे वर्धापनदिन निमित्ताने दिला जाणारा ‘साहित्यसम्राट न.चिं.केळकर पुरस्कार‘ नुकताच आपल्या समूहातील ज्येष्ठ कथाकार श्री मंगेश मधुकर यांना प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक प्रकल्प, कथा, लघुकथा असे विविध साहित्य त्यांच्या “संडे डिश” या शीर्षकाच्या सातत्यपूर्ण लेखनाद्वारे वाचकांसाठी ते सादर करतात. त्यासाठी हा नामांकित पुरस्कार आणि मानपत्र एका नामांकित आणि शासनमान्य ‘ अ ‘ दर्जाच्या ग्रंथालयाकडून श्री. मंगेश मधुकर यांना प्रदान करण्यात आले आहे … या गौरवास्पद यशाबद्दल आपल्या समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा .
संपादक मंडळ,
ई – अभिव्यक्ती (मराठी विभाग)
आजच्या अंकात वाचूया त्यांची एक कथा ……
☆ हेमा मालिनी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
हिवाळ्याचे दिवस, संध्याकाळची साडेसहा वाजताच्या आल्हाददायक वातावरणात रोजच्याप्रमाणे काठीचा आधार घेत टेकडीच्या रस्त्यावर फिरायला बाहेर पडले. नेहमीचे चेहरे समोर आल्यावर ठराविक साच्याचं हसू उमटायचं. काही वेळानंतर घरी येताना अचानक पाठीमागून मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज यायला लागला. वळून पाहिलं तर पंजाबी ड्रेसमधली,बेताचीच ऊंची असलेली अंदाजे तिशीतली बाई मैलभर ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात फोनवर बोलत होती. येणारे-जाणारे थांबून पाहत होते.. पण आपल्याच नादात असलेल्या तिचं लक्ष नव्हतं.
“हे बघ.उगा डोकं फिरवू नकोस”
“xxxx xx xx”
“काई महत्वाचं काम बीम नाहीये. पैशे पाहिजे असतील. दिसभर काम करून दमलीये. थोबाड बंद ठेव”
“xx xx xxxx”
“त्यात काय कळायचं. खायचं असेल नायतर पैशे पायजे असतात तवाच बायको आठवते.”
“x xx”
“ जान बिन काय नाय. उगा लाडात यायचं नाही. एकदा सांगितलं ना.डोक्यात शिरत नाही का?डोकं हाय का घमेलं”
“x xx xx”
“नीट बोल काय नीट बोल. मला शिकवू नको. दोन रुपये कमवायची अक्कल नाही अन वर तोंड करून बोलतोय.”
“xx xx xxxx”
“ पैशे?? रुपयासुद्धा देणार नाही. हे लफडं तूच निस्तर. घेताना विचारलं नाहीस… आता द्यायच्या येळेस मी आठवली व्हय.”
“xx x xx,xx xx”
“आता सॉरी-बीरीचा काय बी उपयोग न्हाई. पैशे देणार नाई. फोन ठेव. डोकं फिरवू नकोस.”
हातवारे करत ‘ती’ चालत होती. चेहऱ्यावर दिवसभराच्या कामाचा थकवा स्पष्ट जाणवत होता. त्यात नवऱ्याचा फोन अन पैशाचा मामला यामुळे राग अनावर झाल्याने फोनवरच ती भांडायला लागली. मोठमोठ्याने बोलणं .. त्यात शिव्यांचा वापर .. यामुळे इतरांसाठी फुकट मनोरंजन झालं. बिन पैशाचा तमाशा बघायला गर्दी जमली. सगळे हसत होते पण आपल्याच तंद्रीमध्ये असलेल्या तिचं लक्षच नव्हतं. वैतागून तिनं फोन कट केला पण नवऱ्यानं पुन्हा फोन केला.
“एवढा काय जीव चाललाय .. घरीच येतेय ना. जरा दम धर की..”
“xxxx x xx xx x ”
“काय करायचं ते कर. आता तर घरीच येत नाही आणि हे डबडं बंद करते. बस बोंबलत.”
फोन स्वीच ऑफ करून ती बाजूच्या बाकड्यावर डोकं धरून बसली तेव्हा अंग थरथरत होतं. श्वासाचा वेग वाढलेला. ओढणीनं सारखं सारखं तोंड पुसत होती. मी मुद्दाम तिच्या बाजूला जाऊन बसले. तेव्हा जळजळीत नजरेनं पाहत तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि उठून जाऊ लागली. तेव्हा मी हात धरून थांबवल्यावर भडकली. काही बोलायच्या आत पाण्याची बाटली पुढं करत म्हटलं, “ थोडं पाणी पी म्हणजे बरं वाटेल. ” माझं वागणं तिला अनपेक्षित होतं. गडबडली. दोन घोट पिल्यावर थोडी शांत झाली. लगेच बिस्किटचा पुडा पुढे केल्यावर तिनं डोळे मोठे केले.“तुला गरज आहे.खाऊन घे. बरं वाटेल.प्लीज…”
नको नको म्हणत होती पण शेवटी आग्रहामुळे चार बिस्किटं घेतली आणि मान फिरवून पटकन खाल्ली. गटागटा पाणी पिल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेला बांध फुटला. हुंदके देत रडायला लागली तेव्हा तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. भावनांचा वेग ओसरल्यावर ती रोखून माझ्याकडं पहायला लागली.
“असं काय पाहतेस”
“आपली वळख ना पाळख.तरिबी..”
“तरीपण काय?” … माझ्या प्रश्नाला तिला उत्तर देता आलं नाही. कदाचित भावनांना शब्द सापडत नव्हते. तिनं हात जोडले. डोळ्यातली कृतज्ञता माझ्यापर्यंत पोचली.
“बाई,देवासारख्या धावून आल्या. लई उपकार झाले.”
“अगं,मी काहीही खास केलं नाही.”
“डोकं लई गरम झालं व्हतं. काहीच सुचत नव्हतं. संग थांबलात लई आधार वाटला.”
“इतकं चिडणं तब्येतीसाठी चांगलं नाही.”
“मग काय करू… घरीदारी समदं मलाच बघाव लागतं. रोज सहन करते मग एक दिवशी असा स्फोट व्हतो. बिनकामाचा नवरा अन टाकून बोलणारी सासू. दोगानी पार वैताग आणलायं.”
“माहितेय”
“तुमाला कसं माहिती”
“इतक्या मोठ्यानं बोलत होतीस.सगळ्यांनीच ऐकलं.”
“ऐकू देत. मला फरक पडत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं.”
“आता ठिक आहेस ना. डोकं शांत ठेव. स्वतःला त्रास करून काही उपयोग होणार का?”
“ते बी खरं हाय म्हना. रोजचं मढं त्याला कोण रडं. नवऱ्यानं लफडी,उसनवारी करायची अन बायकोनं निस्तरायची.त्याला बायकोचं मन समजतच नाई”
“सगळे नवरे असेच असतात” .. डोळे मिचकावीत मी म्हणाले तेव्हा ती खुदकन हसली.
“खरंय, माजा नवरा नमूनाय. एका जागी बुड टिकत नाही.आतापतूर शंभर नोकऱ्या बदलल्या.आठ दिस झाले घरीच हाय.अंगातून काम निघालयं. दिसभर बोंबलत हिंडायचं. पत्ते कुटायचे अन पैशाची सोय झाली की दारू ढोसायची. माज्या कामावर घर चाललयं तरी सासू माझ्याच नावानं ……” घरचा विषय निघाल्यावर रागाचा पारा पुन्हा चढायला लागला.
“अगं शांत हो. कशाला उगीच ब्लड प्रेशर वाढवतेस. जरा स्वतःकडे बघ. किती दमलीयेस”
मी असं म्हणताच एकदम ती भावुक झाली.
“काय झालं”
“ऐकून भारी वाटलं. आतापतूर मला असं कुणीच बोल्ल नाई.”
“म्हणजे”
“एका बाजूला माज्या घरचे.. ज्याना फक्त पैशाशी मतलब, मी किती मरमर करते त्याच्याशी काई देणघेणं नाही आणि दुसऱ्या तूमी माज्याशी बोल्ला,चांगलं वागला लई झ्याक वाटलं.” बोलताना ती प्रसन्न हसली.
“तुला हसताना पाहून मलाही मस्त वाटलं”
“येक इचरू”
“मी असं का वागले.हेच ना” … तिनं आश्चर्यानं होकारार्थी मान डोलावली.
“अगं,माझी मुलगी पण तुझ्याच वयाची आहे. परदेशी असते. टेंशनमुळे तिची सुद्धा सारखी चिडचिड सुरू असते. तेव्हा चिडलेल्यांना शांत करण्याची सवय आहे.”
“पण मी तर तुमची कोण बी नाय तरीही..”
“आपल्यात माणुसकीचं नातं आहे. त्याच अधिकारानं तुला थांबवलं”
“तुमची माया बघून आईची आठवण झाली. आता जाते. लई उशीर झाला. घरी गेल्यावर पुडचा पिच्चर बाकीये.”
डोक्यावर ओढणी घेत वाकून नमस्कार करून झपझप पावलं टाकत ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना मनात विचारचक्र सुरू झाले. ’जाऊ दे,ना मला काय करायचं’ म्हणून सहज टाळता आलं असतं पण स्वतःला रोखू शकले नाही. ती खूप चिडलेली,संतापलेली होती म्हणून फक्त काही वेळ सोबत घालवला. तिचा त्रागा समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्याक्षणी नेमकी त्याचीच गरज होती. प्रॉब्लेम्स चुकलेले नाहीत.अनेकदा मनाविरुद्ध वागताना खूप चिडचिड होते. अशावेळी समजून घेणारं कोणी नसेल तर खूप त्रास होतो. एकटं,असहाय्य वाटतं आणि राग वाढतो. अशातच तात्पुरता आधार जरी मिळाला तर बरं वाटतं…. विचारांच्या तंद्रीत असताना ती समोर येऊन उभी राहिली.
“काय गं” मी आश्चर्याने विचारलं.
“दुनियाभरचं बोल्ले पण ‘थँक्यु’ राहिलं म्हणून आले.”
“तुझं नाव काय ”
“हेमा. ”
“मी मालिनी”
“अय्यो!!!” म्हणत ती मोठ्यानं हसली. पुन्हा गप्पा सुरु.
“लय येळ झाला. नंतर फोन करते.”
“बोलण्याच्या नादात वेळेचं लक्षातचं आलं नाही.”
” घरी धर्मेंद्र वाट बघतोय.” ……… दोघीही खळखळून हसलो आणि आपापल्या दिशेनं चालायला लागलो.
वंदनाताई सकाळची कामे उरकून निवांतपणे टीव्ही लावून बसल्या होत्या. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही आयटी इंजिनियर. ते ऑफिसला गेल्यावर घरात काका आणि वंदनाताई दोघेच असायचे. काका कुठेतरी बाहेर सोसायटीच्या कामात, मित्रांमध्ये बिझी असायचे. खरं म्हणजे दोघेही रिटायर्ड लाईफ एन्जॉय करत होते. तरी पण का कोणास ठाऊक वंदनाताईना आपल्या आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले.. राहून गेले या भावनेने ग्रासले होते. असे हल्ली त्यांना बऱ्याचदा वाटत असे. अगदी अलीकडे तर त्यांना असुरक्षित ही वाटत होते.
खरं म्हणजे वंदनाताई अगदी साध्या सरळ, समाजकार्याची प्रचंड आवड असणाऱ्या. त्यांचा स्वभाव अतिशय मोकळा, त्यांच्या खूप मैत्रिणी, पण एकदा नोकरी संपून रिटायर झाल्यावर हे सगळे संपले. एक मोठी पोकळी निर्माण झाली होती त्यांच्या आयुष्यात. त्यांच्याशी बोलायला कोणालाच वेळ नव्हता.
सगळं काही यथासांग होतं तरी देखील अपूर्णत्वाची भावना मनाला सतत टोचत होती. वंदनाताई रोज एकट्याच बसून विचार करीत बसत. टीव्ही नुसताच कितीतरी वेळ चालू असायचा.
अशाच एका सकाळी त्यांची तंद्री भंगली ती दारावरच्या बेलमुळे. वंदनाताई लगबगीने दार उघडायला उठल्या. मुख्य दरवाजा उघडून सेफ्टी डोअर उघडणार इतक्यात बाहेरून आवाज आला
“ताई नका दार उघडू”.
समोर एक रुबाबदार, काळी सावळी बाई उभी होती. बाई कसली जेमतेम तिशीतली मुलगीच ती. छानशी पिवळसर रंगाची कलकत्ता साडी, गळ्यात एक छानशी ब्रँडेड बॅग आणि कपाळाला छोटीशी टिकली. अतिशय मोहक व्यक्तिमत्व होते ते.
म्हणाली, “ मला फक्त तुमची तीन मिनिटे हवी आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. तेवढीच अपेक्षा आहे माझी. मला तीन मिनिटे तुमच्याशी शांतपणे बोलायचे आहे. मी कुठलीही स्कीम घेऊन आले नाही की मी सेल्समन देखील नाही. फक्त आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचेत. मी बोलेन पण तुमची परवानगी असेल तरच…. “
वंदनाताईना काय बोलावे सुचेना. त्या दोन क्षण स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या, “ ठीक आहे हरकत नाही. मी दार न उघडता ऐकेन तुमचे. ”
“ हे बघा ताई, मी तुम्हाला बाहेरूनच नमस्कार करते. तुम्ही जर हिंदू असाल आणि थोड्याशा आस्तिक असाल तरच मी तुमचा वेळ घेईन. ”
वंदनाताईंनी होकारार्थी मान हलवली.
“आमची एक संस्था आहे “भान” नावाची. आम्ही सगळ्या हिंदू लोकांना फक्त एक जाणीव करून देतो आपल्या कर्तव्याची. आमची एक दिनचर्या आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने वागावे अशी माफक अपेक्षा आहे आमची. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी एका महिन्यात कमीत कमी 25 घरी जाऊन ही जाणीव करून द्यावी अशी अपेक्षा आहे आमच्या संस्थेची. दररोज नवीन नवीन कार्यकर्ते येत असल्याने हे टार्गेट काही फार अवघड नाही.
…. अख्या महाराष्ट्रात हा उपक्रम चालू आहे. गणेश चतुर्थीपासूनच सुरुवात केली आहे आम्ही. आमचे टार्गेट आहे निदान दहा लाख लोकांपर्यंत पोचण्याचे. अणि ते पूर्ण करता येईल आम्हाला याची खात्री आहे मला. आमच्या संस्थेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही धार्मिक संस्थेशी सुतराम संबंध नाही. आम्ही एक पैसादेखील कोणाकडून घेत नाही, कोणाला त्यांचा मोबाईल नंबर विचारत नाही. एवढेच काय कोणाच्याही घरात जाण्याची देखील आम्हाला परवानगी नाही. “
वंदनाताईंनी या मुलीला मध्येच थांबूवून सांगितले, “ अहो काही संकोच बाळगू नका. तीन मिनिटे काय तीस मिनिटेसुद्धा मी ऐकायला तयार आहे. करा सुरुवात….. “
ताईने सुरुवात केली……
“ आपल्यातील बरेच लोक कर्मकांडांच्या मागे असतात आणि काहीतरी अपेक्षेने देवाच्या मागे लागतात आणि येता जाता नमस्कार करत सुटतात. अगदी रस्त्यात कुठलेही देऊळ दिसले तरी यांचा हात अर्धवट छातीवर जातो व त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.
आमच्या अपेक्षा……
…. शक्यतो सूर्योदयाच्या वेळी सूर्याला किंवा पूर्वेकडे बघून नमस्कार करा.
…. सकाळी उठल्यावर घरातील तुमच्या आवडत्या ठिकाणी किंवा देवघरा जवळ बसून कुलदेवतेचे स्मरण करा.
…. मग तुमच्या आई-बाबांना नमस्कार करा मनातल्या मनात.
…. तुमचे पूर्वज मनातल्या मनात आठवा, चार पिढ्या मागे जा व त्यांचे स्मरण करा. हेच खरे श्राद्ध. रोजच पितृपक्ष म्हणा हवे तर.
…. पृथ्वी तेज आप वायू आकाश या आपल्या खऱ्या देवता.
सकाळी चहा करायला गॅस पेटवाल तेव्हा आधी त्या ज्योतीला नमस्कार करा कारण तोच अग्नी.
…. मग येतो पाण्याचा नंबर त्यालाही हात जोडा.
…. संध्याकाळी किंवा रात्री चंद्राकडे बघण्याचा प्रयत्न करा.. नमस्कार नाही केला तरी चालेल.
…. संध्याकाळी शक्यतो भीमसेनी कापुराची आरती घरात फिरवा.
…. महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बरोबर चंद्रोदयाच्या वेळी शक्यतो घरातील सगळ्यांनी एकत्रपणे चंद्राचे दर्शन घ्या.
….. आणि सगळ्यात महत्त्वाचे….. आपल्या घरात कोणी लहान मुले असतील तर त्यांना देखील या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. ते अतिशय महत्त्वाचे आहे.
…. आठवड्यातील एका ठराविक वारी नित्यनेमाने तुमच्या आवडत्या व स्वच्छ अशा देवळात जा. देवळात जर घंटा असेल तर शक्यतो हळू आवाजात घंटा वाजवून घंटेच्या खाली शांतपणे उभे राहा.
आणि हो, एक सांगायचे राहिले की देवळात जाताना किंवा येताना जर भिकारी दिसले तर त्यांना भिक्षा देऊ नका. भीक मागणे हा त्यांचा व्यवसाय आहे, ते गरजू नाहीत.
… आणि सगळयात शेवटचे…….
तुमची आवडती आरती, स्तोत्र, तेही नाही जमले तर अगदी एखादे क्लासिकल भारतीय गाणे म्हणा, तेही घरातील सर्व मंडळींनी, सामुदायिकपणे आणि रोज एका ठराविक वेळी……
… या सगळ्यात महत्त्वाचे आहे ते सातत्य आणि ठराविक वेळ.
बस, धन्यवाद काकू. माझी तीन मिनिटे संपली. आमची संस्था तुम्ही मानत असलेले देव, स्वामी, तुमचे गुरू, तुमची श्रद्धास्थाने यात ढवळाढवळ करणार नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
… हा होता आमचा बेसिक अभ्यासक्रम….. इतकं जरी केलं तरी खूप फरक पडेल तुमच्या आयुष्यात.
अशा आमच्या एकूण 7 levels आहेत.
बस, येते मी.
आमचा चौघींचा ग्रुप आहे बाकी तिघी खाली उभ्या आहेत. तीन मिनिटाच्या वर बोलले तर लगेच कॉल येईल मला. आमच्या संस्थेचे विचार पटले तरच मला कॉल करा. माझे नाव तन्वी.
मी येताना तुमच्या वॉचमनच्या कडील वहीत एन्ट्री केलीय, त्यात नंबर आहे माझा. आणि हो….. येण्यापूर्वी तुमच्या सेक्रेटरीची देखील मी परवानगी घेतली आहे काळजी नसावी.
योग आला तर परत भेटूच.
पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. ”
वंदनाताई कितीतरी वेळ सेफ्टी डोअरपाशी उभ्या होत्या, त्या पाठमोऱ्या तन्वीकडे बघत. आता त्यांना खूप सुरक्षित वाटत होते.
लोणंद येथील मुक्काम संपवून माउलींची पालखी गोल रिंगणासाठी क्षणभर चांदोबाच्या लिंबाखाली विसावली होती.
संध्याकाळचा मुक्काम अर्थातच तरडगाव येथे होता. आमचे गाव तरडगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर होते त्यामुळे माउली जणू आपल्या भेटीला येताहेत अशीच लगबग गावभर चालली होती. पालखीला जायचं म्हणून बायाबापडे, पोरे, पोक्त सगळेच हरखले होते. प्रत्येकासाठी वर्षाकाठी अनुभवायला मिळणारा तो एक अप्रतिम आनंदाचा सोहळा होता.
बायाबापडी माउलींच्या दर्शनासाठी आसुसलेली होती. पोलीस संरक्षणात तुफान गर्दित रांगेतून दर्शन घेणे ही एक वेगळी अनुभूती असायची.
पोरे जत्रेत मजा करायला म्हणून जायची. तंबूतला सिनेमा, छोटी सर्कस, मौत का कुआ, पाळणे, गोंदण, मिठाईची दुकाने हे सगळं तिथं असायचं. एवढंच नव्हे तर पोरींसाठी कर्णफुले, बांगड्या या वस्तू सुद्धा असायच्या. तिथले सगळे वातावरण भजन कीर्तनाने भारलेले असायचे. वारकऱ्यांची तुंबळ गर्दी असायची.
त्यादिवशी आई कामाला न जाता घरीच होती. पालखीला जाणार म्हणून ती घरी होती हे तर उघडच होते. पण त्यादिवशी तिचे काहीतरी वेगळेच चालले होते….
.. घरात तिने स्वयंपाकाचा बराच राडा घातलेला दिसला. आमची सकाळची जेवणे तर आधीच झाली होती. संध्याकाळी तर पालखीला जायचे होते. तिथे भंडाऱ्यात सगळेच खीर खातात. तर मग हा स्वयंपाक ती का ? कशासाठी? आणि कोणासाठी बनवत होती? असा प्रश्न माझ्या बाल मनाला पडला होता.
कोणी पाहुणे तर येणार नाहीत ना ? तर मग झाला सगळ्या पालखीचा बट्ट्याबोळ ! आजच या पाहुण्यांना घरी टपकायला काय झाले? मी मनाशीच पुटपुटत होतो. आपल्याला पालखीला जायला मिळणार नाही म्हणून मी थोडा उदास झालो होतो.
आई तव्यावर गरमागरम भाकरी टाकत होती, त्याचा खरपूस सुगंध घरभर दरवळत होता. टोपल्यात एकावर एक भाकरी पडत होत्या. बघताबघता टोपले भाकरींनी भरले होते…. टोपल्याच्यावर शीग लागत होती.
” आज भावकीत काही कार्यक्रम तर नाही ना? ” माझ्या मनाला पुन्हा आणखी एक प्रश्न पडला होता. कारण घरात आईवडील, चुलते, आजी आम्ही पाच भावंडे इतके सगळे असले तरी आमच्या घरातले भाकरीचे टोपले कधी इतके गच्च भरल्याचे मला तरी आठवत नव्हते…
भावकीत एखादा कार्यक्रम असला की मग प्रत्येकाच्या घरी पायली पायली पीठ दिलं जायचं… तेव्हा मात्र आमच्या घरातलं ते टोपलं शीग लागलेलं दिसायचं… !
बाजूच्या चुलीवर मोठ्या पातेल्यात झुणका रठरठ करत होता… ( पिठलं, झुणका, बेसन या सगळ्या संज्ञा आम्ही एकाच पदार्थासाठी तोंडात पटकन येईल तसे वापरतो ) आता तर घरी पाहुणे येणार याची मला पक्की खात्रीच वाटत होती. त्याशिवाय का आई इतका मन लावून स्वयंपाक करत असेल?
माझा पार मुड गेला होता…. कारण भाऊ आणि मोठ्या बहिणी, आई, शिवाही त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत पालखीला जाऊ शकत होते. कारण ते वयाने मोठे होते पण आमचं काय ? आम्हा लहान मुलांना कोण नेणार तिकडे? आई सोबत असेल तरच आम्हाला जायला मिळणार होतं… !
शेवटी न राहून मग मी आईच्या जवळ जाऊन घुटमळलो आणि दम खाऊन तिला विचारलेच,
” आई, मला पालखीला जायचं.. “
” व्हय जाऊ की ”
” तू खोटं बोलतेयं.. ”
” खरंच जायचंय बाळा… ”
आईने उजव्या हातातली भाकरी तव्यात टाकत उत्तर दिले.
” आपल्याकडं कोण येणार हाय ? ”
” कोण न्हाय, का? ” शेजारच्या चुलीवरच्या पातेल्यातलं पिठलं हालवत आई म्हणाली. आता तर भाकरीच्या सुगंधाची जागा खमंग पिठल्याने घेतली होती. त्या वासाने माझ्या तोंडाला चांगलेच पाणी सुटले होते… पण आधी पालखीचा प्रश्न सोडवणे महत्वाचे असल्याने मी स्वत:च्या भुकेवर नाईलाजानेच संयम ठेवला होता.
” मग तू एवढा सयपाक कुणासाठी करतीय? ”
” आरं आज पालखी हाय, देव भुक्यालं आसत्याल… ”
” देव? देवाला तर निवद लागतो ”
” आरं येड्या, देव म्हणजी वारकरी…. ”
” मग त्यानला आपून का जेवायला दयाचं ? ”
” ते घरदार सोडून पांडूरंगाच्या दर्शनाला पंढरीला जात्यात ना? म्हणून… ”
” मग आपूणच का दयाचं त्यानला जेवण ? ” पुन्हा माझा बालिश प्रश्न.
” आरं, आपुनच न्हाय सगळीच देत्यात माझ्या राजा… ”
” मग एवढ्या सगळ्या भाकरी खाऊन त्याचं पोट भरल की ?”
” वारकरी लय असत्यात… ” खळखळा हसत आई म्हणाली.
” किती ? ”
” लय असत्यात हजार, धा हजार… त्या पेक्षाबी जास्त… ”
असं म्हणत आईने शेवटची भाकरी टोपल्यात टाकली व पिठल्याच्या पातेल्यावर झाकण ठेवलं.
” आई, मला भूक लागलीय… ”
” का पोटात काळा केर न्हाय का? मघाशी खादाडलंस नव्हं? ”
पीठाच्या डब्याच्या झाकणात ठेवलेली अर्धी भाकरी आणि त्यावरचा मिरचीचा ठेचा माझ्या पुढे सरकावत ती म्हणाली, ” खा लवकर आपल्याला जायचयं पालकीला. ”
” हे नगं, ते गरम गरम दे की… ” दिलेलं ताट तिच्याकडं भिरकावत जिभल्या चाटत मी म्हटलं…
” ते वारकऱ्याचं हाय… ते न्हाय मिळायचं… ”
” मंग त्याला काय व्हतयं…. वाइच तरी दे की… ”
” न्हाय म्हणलं ना? गप खायाचं तर खा…. नाह्यतर आन हिकडं, उशीर झालाय मला आधीच, बाया निघाल्या असत्याल.. ”
मला भूक तर लागली होती पण जे खायला पाहिजे ते आई देत नव्हती. झुणका भाकरी म्हणजे फार अपृप नव्हते, पण त्यादिवशी माझ्यासाठी ते पक्वान होते. परंतु आई काही केल्या ते मला देत नव्हती… मोठ्या भक्तीभावाने तिने ते वारकऱ्यांसाठी चालवले होते… शेवटी माझा हिरमोड झाला ! जो होणारच होता… ती शिळी भाकरी घशाखाली उतरत नव्हती तरी सुद्धा ती खाऊनच अखेर मला माझे पोट भरावे लागले…. !
नटूनथटून सगळे पालखीला निघाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह त्यावेळी दिसत होता. जत्रेत जायला मिळणार म्हणून आम्ही धावतधावत रस्ता जवळ करत होतो. तर आई व तिच्या सोबतच्या काही महिला आपल्या डोईवर भाकरीचे गाठोडे घेऊन घाईघाईने रस्ता चालत होत्या. सगळ्यांच्या सोबत आनंदाच्या भरात दोन तीन मैलांचे ते अंतर कधी पार झाले तेच कळाले नाही.
तरडगावचा ओढा ओलांडून पुढे पालखीच्या तळाकडे आम्ही निघालो त्यावेळी सगळीकडे वारकरीच वारकरी दिसत होते… ! टाळ, मृदंगाच्या वातावरणात सगळे आसमंत न्हाऊन निघाले होते. सगळे वातावरण भक्तिमय झाले होते.
पण आमचे लक्ष मात्र खाऊची दुकाने, पाळणे याकडेच लागले होते. त्यामुळे आम्ही पुढे पुढे धावायला बघत होतो.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवणावळी चालल्या होत्या. मोठ मोठ्या दिंड्या ट्रक मधून स्वत:चे सामन आणून स्वत:च जेवण बनवत होत्या. गावातले सामाजिक कार्यकर्ते इतर वारकऱ्यांना मोफत जेवण वाटत होते.
जिलेबी, मसालेभात, बुंदी असे पदार्थ सगळी पत्रावळ्यांवर दिसत होते. आम्हालाही पळत जाऊन खायची घाई झाली होती परंतु आई आम्हाला हलू देत नव्हती. आधी पालखीचे दर्शन, मग वारकऱ्यांना जेवण आणि मग आपण खायचं असा तिने नियम घालून दिला होता.
दर्शनासाठी आम्ही पालखी तळावर पोहोचलो त्यावेळी तिथले दृश्य अद्भुत होते… !
… ” वैष्णवांचा मेळा वाळवंटी भरला होता… ”
पोलिस सगळ्यांना रांगेत उभे करत होते. काही ठिकाणी तर अक्षरश: चेंगराचेंगरी चालली होती… ! ते पाहून आम्ही चांगलेच भेदरलो होतो. इकडेतिकडे जाऊ नये म्हणून आई माझ्या हाताला घट्ट पकडत होती.
कसेबसे दर्शन घेऊन आम्ही तंबूच्या बाहेर आलो. आता वारकऱ्यांना जेवण देण्याचा मुख्य कार्यक्रम होता.
वारीतले स्वच्छ कपड्यामधले वारकरी, सगळीकडे पक्वानांची चाललेली रेलचेल पाहून आई व तिच्या सोबतच्या बायकांनी आणलेले जेवण खरेच कोणी खाईल का? असा प्रश्न मला पडला होता… कारण आई आणि तिच्या मैत्रिणींच्या अंगावर गोट घातलेली लुगडी होती. त्यांचा अवतार निटनेटका असला तरी तिथल्या वातावरणाला नक्कीच शोभणारा दिसत नव्हता… ! त्यांचे दारिद्र्य त्यांच्या अंगावर स्पष्ट दिसत होते…. ते काही केल्या लपत नव्हते.. ! त्यामुळे तिथे गेल्यावर त्या सगळ्याजणी गांगरलेल्या दिसल्या… त्यांचे अवघडलेपण चटकन लक्षात येत होते.
आता काय होईल? कसे होईल? माझ्या आईच्या डोईवरची झुणका भाकरीची गाठोडी खाली ठेवल्यावर खरंच कोणी वारकरी ते खायला मागेल का? नाही मागितले तर त्या बापड्यांची अवस्था काय होईल ? दिवसभर राबून आपल्या लेकरांच्या तोंडचा घास काढून मोठ्या भक्तीभावाने त्या वारकऱ्यांसाठी घेऊन आल्या होत्या ! आणि आता कोणी त्यांचे अन्न खाल्ले नाहीतर त्यांच्या भावनेचे काय होईल? ही धास्ती मला वाटत होती…
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी होते. जेवणासह इतर उपयोगी वस्तू दान करणारे अनेक श्रीमंत लोक दोन्ही हातांनी वारकऱ्यांना भरभरून देत होते… वारकऱ्यांची तिकडे वस्तू घेण्यासाठी नुसती झुंबड उसळली होती…. !
अशात आई व तिच्या मैत्रिणींनी रस्त्याच्या कडेला बसून आपल्या हातातले भाकरींचे गाठोडे सोडले…. ! आणि कुणी वारकरी मागायला यायची त्या वाट पाहू लागल्या… त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा पहायला नको म्हणून मी तर माझे डोळे मिटून घेतले होते…. कोणी नाहीच तिकडे फिरकले तर काय करायचे? आणि फिरकणारच नाही असे मला राहून राहून वाटत होते.
परंतु घडले ते वेगळेच … झुणका भाकरीचे ते जेवण दिसताच पक्वान हातातले टाकून सगळे वारकरी आमच्या दिशेने धावत होते… ! आई आणि तिच्या मैत्रिणी अर्धीभाकरी मोडून त्यावर पातेल्यातला झुणका वारकऱ्यांच्या हातावर ठेवत होत्या आणि वारकरी ते आनंदाने घेऊन जात होते. माझ्या माय माउलींचा उर आनंदाने भरुन येत होता. काही वेळातच आईसह त्या सगळ्यांची भांडी रिकामी झाली होती.
माझ्या माय माउलींच्या हातचे ते भोजन वारकऱ्यांना पंचपक्वानापेक्षा प्रिय वाटले होते का? ही काय जादू झाली होती ते मला कळत नव्हते आणि कळण्याचे ते वयही नव्हते.
रिकामी झालेली भाकरीची फडकी व भांडी हातात घेऊनच माउलींच्या पालखीच्या दिशेने हात जोडून आई बराच वेळ उभी होती…….
… ती माउलीला काय सांगत होती की त्यांचे आभार मानत होती ते आम्हाला काही कळलं नाही. पण त्यानंतर दरवर्षी ती पालखीला न चुकता झुणका भाकर डोईवर घेऊन जात होती.. !