मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मात… भाग – 1 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मात… भाग – 1 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

काचेचा भारी दरवाजा एका हाताने ढकलून मी आतल्या या दुसऱ्या जगात आलोय. गाड्यांचा गजबजाट, लोकांची धक्काबुक्की आणि घामाघूम करणारी गरमी यातून आल्यावर तर याला दुसरं जगच म्हणावं लागेल. या जगात एअरकंडिशनरचा सुखद गारवा आहे, धूसर उजेड आहे, मंद सुरातली कुठलीतरी विदेशी धून आहे. आणि नाजूकपणा व भलाई साकार झाल्यासारखे वाटणारे लोक आहेत. तुम्हालाही माहीत असेल,’वेंगर्स’ तर या शहरातलं पॉश रेस्टॉरंट आहे ना!सगळं काही माझ्या चांगलंच परिचयाचं आहे. बाजूची आरसेवाली भिंत, बिलोरी काचेचं झुंबर, पितळेच्या नक्षीदार फ्रेममध्ये लावलेलं लँडस्केपचं पेंटिंग, एवढंच नाही, तर उजवीकडचा तो खांबही. त्याच्यापाठी चार वेगवेगळी टेबलं आहेत.

त्यातल्याच एका टेबलावर मी शालिनीबरोबर बसत असे. बरेचदा आलोय इथे. शालिनीबरोबरच नाही, तर त्यापूर्वीही दुसऱ्या मुलींबरोबर. कितीजणी झाल्या, ते आता आठवतही नाही.

हं. तेव्हा आणि आतामध्ये एक फरक आहे. खूप मोठा फरक. आज मी बेपर्वाईने पैसे उधळणारा ‘बडे बाप का बेटा’ राहिलेलो नाही.

डॅम इट! मला त्याची अजिबात पर्वा नाही.

काही बाबतीत मी बऱ्यापैकी बेशरम आहे.

मी ठामपणे पुढे जातोय. मला जाणवतायत लोकांच्या नजरा.चौकस, प्रश्नार्थक.’मी इथे काय करतोय?’असं विचारणाऱ्या. मी बघून न बघितल्यासारखं करतो.

मला माहीत आहे, साबण, क्रीम न लावल्यामुळे माझा चेहरा कळाहीन दिसतोय. बुटांवर पॉलिश नाहीय. कपडेही मळके, चुरगळलेले आहेत.

सो व्हॉट? हे पब्लिक प्लेस आहे. खिशात पैसे असतील, तर कोणीही इथे येऊ शकतो. ठीक आहे. जास्त पैसे नाहीयेत जवळ. पण कपभर कॉफी तर नक्कीच घेऊ शकेन.

इतके पैसे इकडे फुंकलेयत आतापर्यंत, की आजही मला इकडचे सगळे ओळखतात.

आजच्यासारख्या अवस्थेतही मी इथे आलेलो आहे. असं नजरेनेच तोललं -मापलं जाण्याचाही अनुभव घेतलाय. हे लोक आधी कुतूहलाने, मग तुच्छतेने बघतात. आणि मी शरमत नाही, असं दिसलं, की चिडतात -‘ हा एवढा घाणेरडा माणूस बड्या लोकांची बरोबरी करायचं धारिष्ट्य करू पाहतोय ‘.

खरी मजा तर मला नंतरच वाटते. मी ऐटीत बसल्यावर लोक विचार करू लागतात – मळलेले असले, तरी माझे कपडे महाग आणि नव्या डिझाईनचे आहेत. बूट जुने असले तरी किमती आहेत. आणि यावर ताण म्हणजे माझ्या चेहऱ्यावर खेळणारी बेपर्वाई आणि हेकेखोरपणा. मी मनातल्या मनात हसतो.

लोकांनी माझ्याकडे बघावं आणि माझ्याविषयीच बोलत राहावं, असं मला नेहमीच वाटतं. ही इच्छा अपुरी राहिलीय, असंही नाही. शेवटी सुप्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉ. प्रेमदत्त आहुजांचा मी एकुलता एक मुलगा आहे.खरं तर, ‘आहे’  नाही, ‘होतो’ म्हटलं पाहिजे. कारण ना आता ते वडील राहिले, ना मला जे व्हायचं होतं, ते मी बनू शकलो. फर्गेट इट.

मी अजून आशा सोडलेली नाही. खरं तर, माझा सर्वात मोठा प्लॅन उद्ध्वस्त झालाय आणि मला नैराश्य आलंय. फालतू लोकांसमोर हात पसरावे लागतायत. ‘अपडाऊन तर चालूच असतं,’ वगैरे वाक्यं आता तोंडपाठ झालीयत.

खांबाकडून थोडं आत जाताच मी बघितलं – जवळजवळ सगळ्याच खुर्च्या भरल्यायत. फक्त एक रिकामी आहे. तिच्यावर एक पर्स ठेवलीय. नवरा आणि मुलाबरोबर तिथे बसलेल्या  त्या बाईची असणार ती पर्स.

मी जवळ जाऊन खुर्ची ओढली आणि पर्स टेबलावर ठेवत ‘एक्स्क्युज मी,’ म्हटलं. गोरापान रंग, स्लीव्हलेस ब्लाउझ, कापलेले केस. त्या बाईने आधी कुरकुरत आणि मग कपाळाला आठ्या घालून माझ्याकडे बघितलं. पर्स मांडीवर ठेवून तक्रारीच्या सुरात तिने नवऱ्याकडे पाहिलं. सोंगटी मारणाऱ्या स्ट्राईकरसारखी नजर होती तिची. नवऱ्याने फक्त माझ्याकडे रागाने बघितलं. अगदी डोळे वटारून. काही बोलला मात्र नाही.

मी आरामात मागे टेकून बसलो. खिशातून सिगरेट आणि लाईटर काढला. नाटकी मुद्रा करून त्या बाईच्या बाजूला झुकलो आणि विचारलं, “तुमची हरकत नाही ना, मॅडम?” त्या बाईने नजरेनेच नवऱ्याला डिवचलं.तरीही तो काहीच बोलत नाही, म्हटल्यावर ती चिडक्या आवाजात बोलली, ” माझी हरकत आहे.”

मी सिगरेट आणि लाईटर खिशात टाकला. ती आणखीनच कडक आवाजात म्हणाली, ” मिस्टर, तुम्ही दुसरीकडे बसला असतात, तर बरं झालं असतं.”

“नाईलाज आहे, मॅडम. तुम्ही बघताच आहात ना?दुसरी कोणतीच खुर्ची रिकामी नाही,” मी जरासं हसतच म्हटलं. त्या बाईने जळजळीत नजरेने माझ्याकडे पाहिलं. मीही तिच्याकडे टक लावून बघत राहिलो. तिच्या चेहऱ्यावर अशी घृणा होती, की जणू काय मी पाल होतो आणि डायरेक्ट तिच्या प्लेटमध्ये जाऊन पडलो होतो.

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – सुश्री भावना  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अ.ल.क. – सुहास रघुनाथ पंडित ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ अ.ल.क. – सुहास रघुनाथ पंडित ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

अ ल क… समानार्थी

तो एक लेखक होता.शब्दांच्या अर्थांचा शोध घेणारा.

तो शोधत होता समानार्थी शब्द,

‘पशू’ या शब्दासाठी.

वारंवार बातम्या वाचल्या अमानुषतेच्या आणि सापडला समानार्थी शब्द,’पशू’ या शब्दासाठी…….. तो शब्द म्हणजे’माणूस’ !

 

अ.ल.क… ठेचा

आजोबा दवाखान्यात अॅडमीट.सूनबाईंनी आवश्यक ते खाद्यपदार्थ आणले आणि दवाखान्यातील टेबलावर व्यवस्थित लाऊन ठेवले.त्यात एक बाटली होती मिरचीच्या ठेच्याची.सासूबाईंनी ती पाहिली आणि त्या चांगल्याच भडकल्या.दवाखान्यात ठेचा

आणला म्हणून त्यांनी सूनबाईंवर चांगलेच तोंडसुख घेतले.

सूनबाई शांतपणे म्हणाली,”अहो आई,ती नुसती बाटली आहे ठेचाची.त्यातून मेतकूट आणलंय मी दादांसाठी.”आणि तिची बोटे मोबाईलवर गुंतली.

ठेच्याच्या बाटलीमुळे सासुबाईंचे नाक मात्र चांगलेच झोंबले.

 

अ ल क ….साभार

पहिलाच लेख अंकात छापून येणार म्हणून तो खुश होता.एकच लेख त्याने दोन अंकाना पाठवला होता.

जवळ जवळ पंधरा दिवसांनी त्याचे दोन्ही लेख साभार परत आले.तो हिरमुसला.पण क्षणभरच .त्याने वही,पेन काढले आणि नव्या दमाने सुरूवात केली.

 

अ ल क  ….सार्वजनिक

सार्वजनिक उकिरड्यावरचा कचरा वा-याने उडून सगळीकडे पसरत होता.माॅर्निंग वाॅकला जाणारे आजोबा आपल्या हातातील काठीने तो कचराकुंडीकडे ढकलत होते.पण एक खोके मात्र त्यांच्या काठीने हलेना.क्लासवरून परतणारे दोन काॅलेजकुमार हे सर्व पहात होते.जवळ आल्यावर ते म्हणाले,”

जाऊ द्या आजोबा,कचराकचराकुंडी

कुंडी सार्वजनिक,रस्ताही सार्वजनिक.कशाला उगा ताप करून घेताय ?”

आजोबांनी आभाळकडे हात जोडले,खिन्नसे हसले आणि पुढे चालू लागले.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जमेल तसं जगाला देत रहावं…” – तीन लघुकथा – लेखक-अनामिक ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “जमेल तसं जगाला देत रहावं…” – तीन लघुकथा – लेखक -अनामिक ☆ सुश्री हेमा फाटक☆ 

(अगदी लहान तीन कथा. वाचा, नक्की आवडतिल)

१.

दरवर्षी सर्व तुकड्यांमधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शाळा पुढील वर्षाच्या सातही विषयांची पाठ्यपुस्तके, सात २०० पानी, सात १०० पानी वह्या बक्षीस म्हणून देत असे. तिच्या छोट्या हातात ते बक्षीस मावायचंही नाही. वर्ष बदलायचं पण हिचा पहिला नंबर चुकायचा नाही. 

तिच्या बाबांनी सांगून ठेवल्याप्रमाणे शिंदे सर एक मुलगी हेरून ठेवायचे, जिला शाळेचा खर्च परवडणारा नसायचा. पहिला क्रमांकाचा गौरव मोजून पाच मिनिटे मिरवला की ते बक्षीस, सर म्हणतील त्या आपल्या वर्गमैत्रिणीला देऊन ही बाबांचे बोट धरून घरी यायची.

एकेवर्षी दुपारी लेक निजल्यावर कौतुकाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून आई म्हणाली, “एकदाही पोरीला बक्षीस घरी आणू देत नाहीत.”

बाबा म्हणाले, “अगं हिचा शाळा खर्च मी करू शकतो. देवाने तेवढं दिलंय आपल्याला. तू एकदा नव्या कोऱ्या पुस्तकांना हातात धरणारी मुलं बघायला हवीस. त्यांचा फुललेला चेहरा पहायला हवास. शिवाय आपल्या लेकीला आतापासून कळायला हवं. गरजेपेक्षा अधिक मिळालं की त्याची हाव नाही धरायची. ते सत्पात्री दान करायचं.”

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं.

☆☆☆☆☆

२.

तो इंजिनिअर झाला. रग्गड कमावू लागला. त्याच्या हातात कला होती. कागदाला पेन्सिल टेकवली की उत्तमातून उत्तम चित्रे काढी. प्रमाणबद्धता, रंग, सौंदर्य, अव्वल उतरे.

तो कधीही चित्रकला शिकला नव्हता. पण त्याची चित्रे भल्याभल्यांना आवडून जात. लोकांना वाटे, जादू आहे बोटांत. कुणीही त्याच्या घरी आले, की भारंभार चित्रातले एखादे बेधडक उचलून “हे मी नेऊ?” विचारून घेऊनही जात.

त्याचे प्रदर्शन खच्चून भरे. दोन वर्षाकाठी एखादे प्रदर्शन, पण लोक कौतुकाने येऊन चित्रे विकत घेत. आलेला सगळा पैसा त्याने कधी कुणाला, कधी कुणाला वाटून टाकला. कारण विचारल्यावर सांगायचा, “आई म्हणायची, तू जन्मताना इंजिनिअरिंग शिकून नव्हता आलेलास. खपलास, जागलास, मेहनत केलीस तेव्हा कुठे ती पदवी मिळाली. पदवीने पुरेसा पैसा दिला. चित्रकला मात्र देवाच्या घरून घेऊन आलास. ते तुझं मिळकतीचं नाही, ते तुझ्या आनंदाचं साधन. त्यातून मिळालेलं, ठेऊन काय करशील?

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं

☆☆☆☆☆

३.

ती लहान भावावर जवळजवळ खेकसत म्हणाली, “तू पहिले तुझ्या अभ्यासाचं बघ! दरवर्षी कमी मार्क्स. परिक्षेच्या काळात रायटर म्हणून जातोस. आधी स्वतः उत्तम मार्क मिळव मग दुसऱ्यांचा रायटर हो.”

त्याने गुमान मान खाली घातली. अभ्यास करत बसला. ताई निजल्यावर अलार्म बदलून ५ चा केला.

पेपरच्या आधी अर्धातास हा सेंटरवर पोचला नाही की, तो याची वाट पहात सैरभैर होतो. ब्रेललिपीवरची त्याची बोटे टेन्शनने थरथरतात. ‘ऐनवेळी रायटर आलाच नाही तर?’ या विचाराने केलेला अभ्यास विसरायला होतो. हे आता ह्याला ठाऊक झालं होतं.

दरवर्षी कुणा नव्या अंध विद्यार्थ्याचा हा रायटर म्हणून जायचा. याला स्वतःला ४ मार्क कमी आले तरी समाधान खूप मिळायचं.

त्याने ताईला एक दोन वेळेस सांगून पाहिलं, “तू ही करून पहा. आपले डोळे फक्त ३ तास कुणासाठी वापरल्याने त्याचा विषय निघतो, तो वरच्या वर्गात जातो, तेव्हा काय भारी वाटतं एकदा अनुभवून पहा..”

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं.

“देणाऱ्याने घेणाऱ्याच्या झोळीकडे न पाहता देत जावे.“…

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खेळण्याचे दिवस (भावानुवाद) – डॉ. कमल चोपड़ा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ खेळण्याचे दिवस (भावानुवाद) – डॉ. कमल चोपड़ा ☆ सौ. उज्ज्वला केळकर

घरातलं कपाट खेळण्यांनी भरून गेलं होतं. पत्नीचा विचार होता, कुठल्या तरी भांगारवाल्याला खेळणी विकून टाकावीत. मुले मोठी झाली होती. ती आता खेळण्यांकडे बघतही नव्हती. ती वैतागाने  पुटपुटली, त्यातली काही खेळणी सोडली, तर बाकीची अगदी नवीच्या नवी आहेत. ‘दर वर्षी वाढदिवस साजरा करायचो. खूप खेळणी यायची. त्यावेळी, इतर मुलांच्या वाढदिवसाला त्यातलीच काही खेळणी दिली असती, तर खेळण्यांचा असा ढीग लागला नसता. दर वेळी इतर मुलांच्या वाढदिवसाला बाजातून आणून नवीन नवीन खेळणी देत राहिलो. आता भांगारवाला काय देणार? शे-पन्नास.’

भाऊसाहेब म्हणाले, ‘जे झालं ते झालं. आपल्या मुलांचं लहानपण खेळण्यांशी खेळण्यात गेलं, ही आनंदाची गोष्ट आहे. आता तू म्हणालीस तर मी ही खेळणी गरीब मुलांच्यामध्ये वाटून येतो. बाकी काही नाही, तरी एक चांगलं काम केल्याचं समाधान’ 

पत्नी काहीच बोलली नाही, तेव्हा तिचा होकार गृहीत धरून त्यांनी एका मोठ्या पिशवीत खेळणी भरली आणि ते इंडस्ट्रीयल एरियाच्या मागे बनलेल्या झोपडपट्टीकडे गेले. त्यांच्या मनात येत होतं, मुलं किती खूश होतील ही खेळणी पाहून. भाजी-भाकरी काय, मुलं कशीही खातातच. शरीर झाकण्यासाठी कापडे कुठून कुठून, मागून मागून मुलं मिळवतात. पण खेळणी त्यांच्या नशिबात कुठून असणार? ही खेळणी पाहून त्यांचे डोळे चमकतील. चेहरे हसरे होतील. त्यांना असं प्रसन्न पाहून मलाही खूप आनंद वाटेल. यापेक्षा दुसरं मोठं काम असूच शकत नाही.              

झोपडपट्टीजवळ पोचताच त्यांना दिसलं की मळके, फटाके कपडे घातलेली दोन मुले समोरून येत आहेत. त्यांना आपल्याजवळ बोलावून ते त्यांना म्हणाले, ‘मुलांनो, ही खेळणी मी तुम्हा मुलांना देऊ इच्छितो.  यापैकी तुम्हाला पसंत असेल, ते एक एक खेळणं तुम्ही घ्या….अगदी फुकट.’

मुलांनी हैराण होऊन त्यांच्याकडे पाहिलं. मग एक दुसर्याखकडे पाहीलं. मग खूश होत त्यांनी खेळणी उलटी-पालटी करून पाहिली. त्यांना खुश झालेलं बघता बघता भाऊसाहेबांनाही आनंद झाला. काही क्षणात त्यांना दिसलं, मुलं विचारात पडली आहेत. त्यांचा चेहरा विझत विझत चाललाय. 

‘काय झालं?’

एका मुलाने खेळणं परत त्यांच्या पिशवीत टाकत म्हंटलं, ‘मी नाही हे घेऊ शकत. जर मी हे खेळणं घरी नेलं, तर आई-बाबांना वाटेल की मी मालकांकडून ओव्हरटाईमचे पैसे घेतले आणि त्यांना न विचारता त्याचं खेळणं घेऊन आलो. कुणी फुकटात खेळणं दिलय, हे त्यांना खरं वाटणार नाही. संशयावरूनच मला मार बसेल.’

दूसरा मुलगा खेळण्यापासून हात बाजूला घेत म्हणाला, ‘बाबूजी, खेळणं घेऊन करणार काय? मी फॅक्टरीत काम करतो. तिथेच रहातो. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री अंधार पडेपर्यंत काम करतो. केव्हा खेळणार? आपण ही खेळणी कुणा लहान मुलांना द्या.’

मूळ हिंदी  कथा – ‘खेलने के दिन’  मूळ लेखक – डॉ. कमल चोपड़ा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा उणा आनंद… लेखक : श्री प्रसाद कुळकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ?

☆ कथा उणा आनंद… लेखक : श्री प्रसाद कुळकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

 टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली,

” आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….”

 संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं.  उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता.  प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला.  ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती.  गेली तीन वर्ष , पहिल्या तीन क्रमांकात येण्यापासून या स्पर्धेने मानसला हुलकावणी दिली होती.  आजवर अनेक काव्यस्पर्धांवर त्याने आपल्या काव्यरचनेची मोहोर उमटवून यश प्राप्त केलं होतं.  आजही घरून निघताना, मानसने प्रत्येकाची चाचपणी करून पाहिली, आपल्यासोबत येण्यासाठी.  काही ना काही कारण सांगून, प्रत्येकानेच नकार दिला होता.  आणि तसंही  आजवर त्याला मिळालेल्या प्रत्येक पारितोषकासोबत तो एकटाच घरी आला होता.  सवय झाली होती, तरीही प्रत्येक वेळी घरच्या कुणी सोबत यावं, असं मनोमन वाटायचं त्याला.  उत्तर माहीत असूनही तो प्रत्येकाला विचारायचा, आणि अखेर एकटा चालता पडायचा.  आजही तो एकटाच उपस्थित होता त्या भरलेल्या सभागृहात.

रंगमंचावर, प्रमुख पाहुण्यांसोबत पहिल्या तीन क्रमांकात आलेल्या स्पर्धकांसाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या.  मानसची खुर्ची पाहुण्यांच्या अगदी बाजूला होती.  खुर्चीत बसून समोरच्या प्रेक्षकांकडे पाहताना त्याच्या मनात एक उर्मी आणि आनंद दाटून येत होता.  फोटोग्राफरची क्लिक क्लिक सतत सुरू होती.  आज बक्षीस समारंभाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांकडून पारितोषिक स्वीकारण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली होती.  स्पर्धेचे परीक्षक त्याच्या बक्षीसपात्र कवितेमधली सौंदर्यस्थळं उलगडून सांगू  लागले आणि विचारातून मानस भानावर आला.  त्याची नजर प्रेक्षकांत भिरभिरत फिरत होती, कुणीतरी आपलं शोधायला, होत असलेल्या आपल्या कौतुकात त्याला सामील करून घ्यायला.  पण सगळे अनोळखी चेहरे दृष्टीला पडत होते. 

कार्यक्रम संपला, विजेत्या स्पर्धकांचा पाहुण्यांसोबत चहा फराळ झाला, आणि मिळालेल्या स्मृती पारितोषिकासह तो घरी निघाला.  पुन्हा एकदा तास दीड तासाचा प्रवास करायचा होता.  जसजसा मानस घराच्या जवळ येऊ लागला, तसतशी त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.  हे ही नेहमीचच.  विजेता होण्याची ही काही त्याची पहिलीच वेळ नव्हती, आजवर मानसने अनेक नामांकित काव्यस्पर्धांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली होती.  अनेक काव्य संमेलनांमधून रसिकांच्या भरघोस टाळ्या घेतल्या होत्या.  तरीही  प्रत्येकवेळी त्याचं असच व्हायचं.  आज मिळालेल्या पारितोषिकावर घरातली प्रतिक्रिया कशी असेल? मुळात प्रतिक्रिया असेल का ? सगळ्यांना किती आनंद होईल ? प्रत्येकजण काय विचारेल ? आपण कुठून करायची सुरवात सांगायला ? अशा अनेक प्रश्नांसोबत मानसने दारावरची बेल हलकेच दाबली.  मधुवंतीने डाव्या हातातल्या मोबाईलसह दरवाजा उघडला आणि मानसच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फेकत आणि मोबाईलचा volume जराही कमी न करता, ती त्यात शिरली,

“अरे, सीरियलचा शेवटचा भाग सुरू होता, कसा झाला तुझा कार्यक्रम ?”

मधुवंतीने विचारलेल्या प्रश्नावर, मानसने उत्साहाने उत्तर देण्यासाठी तोंड उघडण्याआधी तीच पुढे म्हणाली,

“जेवणार आहेस ना ? म्हणजे, अरे खाऊन वगैरे आलेला नाहीस ना ?”

मानसने उघडलेलं तोंड मिटून नकारार्थी मान हलवली.

“बरं, मग तू चटकन फ्रेश होऊन ये, मी वाढते तोपर्यंत.  आता बोलत बसू नकोस उगाच, आधी जेवून घे.  मलाही मग आटपायला उशीर होतो.”

मधुवंती किचनकडे वळली, आणि या दोघांचा आवाज ऐकून भैरवी आपल्या बेडरूममधून बाहेर आली,

“किती उशीर बाबा ! बराच लांबला वाटतं तुझा कार्यक्रम?”

लेकीच्या प्रश्नाने पुन्हा एकदा उत्साहित होत मानस काही बोलणार……इतक्यात भैरवी पुढे बोलती झाली,

“बाबा, आज अरे kbc चा पाहिला एपिसोड मस्तच झाला.  अमितजीना हॉट सीटवर बसलेलं पाहाणं म्हणजे तुला सांगते काय आनंद असतो.  त्यांना बघत राहण्यासाठी तिथे मी अगदी नेहमी, एका पायावर जायला तयार आहे.”

इतक्यात तिचा मोबाईल वाजला आणि,

“बाय बाबा !”

म्हणत, आणि फोनवरच्या त्या कुणाला “हाय” ! करत ती आपल्या बेडरूममध्ये अंतर्धान पावली.

इतक्यात पुन्हा एकदा दरवाजाची बेल वाजली, आणि मधुवंती किचनमधून ओरडली,

“मानस, बघ रे कोण आहे, केदराच असणार बहुतेक.  जेवायचा असेल तर दोघांना एकदमच वाढते.”

दारात केदारच उभा होता ,

“हाय बाबा, अरे आज खूप दिवसांनी एका jazz concert ला गेलो होतो आम्ही फ्रेंड्स्.  खूप धमाल आली.”

“आई, मी जेवणार नाहीय ग, भरपूर झालंय खाणं, बाबा, तू कधी आलास ?”

प्रश्न विचारून, आणि उत्तराची फारशी अपेक्षा न करता, चिरंजीव आपल्या बेडरूममध्ये शिरले सुद्धा.

 मानसने मिळालेल्या पारितोषिकाची पिशवी एका बाजूला ठेवली, आणि कपडे बदलून, फ्रेश होऊन तो जेवणाच्या टेबलावर आला, तर मधुवंतीने ताट वाढून ठेवलेलं होतं.

 मानसला वाटलं, ती आपल्यासोबत बसेल, तेव्हा सांगू सगळा वृत्तांत.  पण मानसला बसलेला पहाताच मधुवंती म्हणाली,

 “तुला अजुन काही लागणारय का ? नाहीतर बाकीचं अन्न मी फ्रीजमध्ये ठेवून देते.  खूप दमायला झालंय आज, मी जाते झोपायला.”

तशीही मानसला फारशी भूक नव्हती.  पण चार घास खाऊन, उरलेलं अन्न फ्रीजमध्ये सरकवून दिलं आणि हात तोंड धुवून रिलॅक्स होत त्याने पिशवीतलं पारितोषिक बाहेर काढलं.  त्याच्याकडे पहाताना, का कोण जाणे, पण ते आपल्याकडे पहात खिजवून हसतय, असं मानसला उगीचच वाटू लागलं.  सोबतचा, आता पार कोमेजून गेलेला लहानसा पुष्पगुच्छ , केराच्या टोपलीत टाकून, मिळालेली पहिल्या क्रमांकाची ती ट्रॉफी, समोरच्या काचेच्या शेल्फवर, आधीपासून लागलेल्या पारितोषिकांसमवेत ठेवून, तो ही बाहेरचा लाईट मालवून झोपायला आपल्या बेडरूमकडे वळला.  मुलांच्या खोलीच्या दरवाजाखालून त्यांच्या मोबाईलचा प्रकाश काळोखात लख्ख पडत होता.  मधुवंती कधीच गाढ झोपी गेली होती.  मानसने बेडवर अंग टाकलं.  बराच वेळ त्याला झोपच येत नव्हती. 

सकाळी केदारची कॉलेजला जाण्याची तयारी सुरू होती.  आपलं आवरता आवरता केदार मानसला विचारता झाला,

“बाबा, पण तू काल कुठे गेला होतास, सांगितलं नाहीस ?”

आणि मानसने नव्या उत्साहाने सांगायला सुरवात केली,

“अरे, काल मी भाग घेतलेल्या एका काव्यस्पर्धेचा…”

काव्य हा शब्द ऐकताच केदार गडबडीने उत्तरला,

“ओके ओके, आपल्याला काय कळतंय त्यात.  चला मी निघतो.  आई येतो ग.”

मानसचं सगळं सांगायला उघडलेलं तोंड तसच उघडं राहिलं.

 राधाबाई डस्टिंग, झाडूपोछा करायला आल्या, तेव्हा मानस बाहेरच वर्तमानपत्र वाचत बसला होता.  अचानक त्याच्या कानावर शब्द पडले,

 “सायेब, कालपर्यंत हितं नऊच भावल्या होत्या, ही धावी कदी आली म्हनायची ? कालच्याला मी येऊन गेले तेव्हा तर न्हवती हिकडं.  सायेब, तुमच्या या वाढत जानाऱ्या भावल्या माजं सफाईचं काम वाढवत नेतायत बगा.”

 कुणाचं काय तर कुणाचं काय.  पण, आपल्या पारितोषिकात, अजून एका बक्षिसाची झालेली वाढ, कुणाच्यातरी लक्षात आली, इतक्यावरच समाधान मानून, मानसने समोरचा चहाचा कप तोंडाला लावला.

प्रासादिक म्हणे – प्रसाद कुळकर्णी

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆‘स्वप्न…’ – लेखक – श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆

?जीवनरंग ?

 ☆ ‘स्वप्न…’ – लेखक – श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – सुश्री श्रेया साने ☆ 

त्याला शाळा सुटल्या वर एकट्यानेच

घरी जावं लागायचं

कोणाची आई न्यायला यायची तर कोणी आपल्या बाबां सोबत उड्या मारत घरी जायचं

स्कूल बस वाल्यांचा तर वेगळाच रुबाब असायचा

पण याला मात्र आपली इवलीशी पावलं झपाझप टाकत घराकडे धाव घ्यावी लागायची

मग गावाची वेस ओलांडे पर्यंत अंधारून यायचं

त्यात रानातला रस्ता सुरु व्हायचा

मग एक मोठी उतरण यायची

आणि मग जरा खाचखळग्यातून चाचपडत  चालल्यावर

 त्याचं एका बाजूला असलेलं घर एकदाचं यायचं

इवल्याशा मुठीत  धरलेला इवलासा  जीव त्याच्या आधी घरात पळायचा

आई ला बघितली की त्याला घरी आल्या सारखं वाटायचं

आणि आई ला ही जिवात जीव आल्या सारखं वाटायचं

मग दोघं माय लेकरं नशिबी आलेला अंधार अर्धा अर्धा वाटून घ्यायचे

चुलीत ज्वाले पेक्षा धूर जास्त असायचा

आणि ताटात घासा पेक्षा मोकळी जागा जास्त उरायची

तरी घासा सोबत दोघं भोवतीचा अंधार गिळून टाकायचे

त्या मुळे च असेल

नदी काठच्या त्यांच्या घरची रात्र लवकर सरायची

भल्या पहाटे घरात अंधूक अंधूक  दिसायला लागायचं

भल्या पहाटे आई दारातल्या दोन शेळ्या ना चरण्या साठी घेऊन जायची आणि येताना जमेल तेव्हढा लाकूड फाटा घेऊन यायची

आली की पाहिलं काम शेळ्यांच दूध काढून शेळ्या ना मोकळं करायची

आहे त्यात दोन दशम्या थापायची

आणि उठल्या पासून पुस्तकांत डोकं खुपसून बसलेल्या आपल्या मुलाला शेळीच्या दुधा सोबत गरम गरम खरपूस भाजलेली दशमी खायला लावायची

मग जस जसा दिवस वर यायचा तसं त्यां मायलेकरांच नदी काठचं घर आंगण प्रकाशानी भरून जायचं

अंधार गिळून गिळून त्यांच्या आयुष्याला अंधार असाच संपून गेला

एकदा त्यांच्या घरी असं उजाडलं की पसरलेला उजेड परतलाच नाही

उगवलेला दिवस मावळला च नाही

आई च्या श्रद्धा सबुरी ला फळ आलं

मुलाच्या कष्टा वरच्या निष्ठेला फळ आलं आणि

गावा बाहेर नदी काठी पर्ण कुटीत राहणारी ही माय लेकरं

महानगर्यातल्या उच्चभ्रू वस्तीत पोहोचली

चौसोपी चिरेबंदी घर तर मिळालच त्या सोबत दिमतीला नोकर चाकर ही आले

त्या शिवाय त्या मुलाने मिळवलेल्या सरकारी हुद्द्या मुळे  दिवस रात्र त्यांच्या भोवती सिक्युरीटी गार्ड्स तैनात होते

पण तरी कामाच्या व्यापातून कसाही वेळ काढून

आपल्या मुलांना शाळेत पोहोचवायला आणायला तो स्वतः च जायचा

त्याचा हा अट्टाहास बघून त्याची शहरात वाढलेली बायको  विचारायची इतका आटा पिटा करायची काय गरज आहे?

तो हसून म्हणायचा बाकीचे व्याप मी आटा पिटा करून पूर्ण करतो

पण मुलांना आणायला जाणं आणि सोडायला जाणं हे मी जपलेलं स्वप्न आहे

जी सुरक्षितता मुलांना आई बापाच्या सोबत जाणवते

ती नेमलेल्या चाकरांच्या सान्निध्यात मिळत नाही.

लेखक – श्री चंद्रशेखर गोखले

प्रस्तुती – सुश्री श्रेया साने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सांज…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सांज…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी  

वरकरणी कितीही काहीही म्हणले तरी अनेक वर्षे मुले आलेली नाहीत ही मनाची दुखरी बाजू होती आणि प्रत्येक आईबापांच्या मनात असतेच. ती असतील तिथे सुखात असावीत असे प्रत्येक आई-बापाला वाटत असतेच पण  कधीतरी त्यांनी यावे, चार दिवस सोबत राहावे असेही वाटतेच. पाखरे आकाशी झेप घेतात आणि घरट्याकडे परततही नाहीत. घरटी व्याकुळ होऊन त्यांची वाट पाहत सुकत चाललीत, विरु लागलीत..  तेच घरट्याचे व्याकुळपण तिच्या पापण्यात थबकून राहते.. माझ्या मनात साठून राहते.. पण तो साठपा दिसत नाही, मी दाखवतही नाही..

पूर्वी कुणी ना कुणी कधी काही कामासाठी, कधी सहज गप्पा मारायला येत होते.. नाही म्हणलं तरी दिवसभर राबता होता. इतर काही विचार मनात यायला मनाची दारे मोकळी नसायचीच..  हळूहळू हे सारे कमी झाले.. काही समवयस्क गेले.. ,काहींची अवस्था माझ्यासारखीच झालेली. हळूहळू छान एकांत देणारे घर एकाकी होऊ लागले.. कुणाचे येणे- जाणे नाही तर कुणाकडे येणे -जाणे नाही. थकलेल्या गात्रांचे जगच नव्हे तर अंगणही क्षणाक्षणांगणिक पावला-पावलाने आकुंचन पावत असते.. लहान होत असते. 

‘साखर संपत आलीय’ ची आठवण झाली. ‘काय करावे ?’ मनात प्रश्न. आपले परावलंबित्व वाढत चाललंय याची जाणीव नाही म्हणलं तरी मनाला कुरतडत असतेच.. साधे रस्ता ओलांडून जायचे म्हणले तरी जमत नाही.. गतीने वाहणाऱ्या वाहतुकीची भीती सांज ढळताना अंधार दाटून येतो तशी दाटून राहिलेली आहे. त्यात खूप दिवस झाले ऐकायलाही कमी येऊ लागलेय..  आपल्याला ऐकायला येत नाही  हे आपल्याला ठाऊक असले तरी समोरच्या व्यक्तीला ठाऊक नसते.. चालताना मध्येच पाय लटपटायला लागतात..आधाराला काठी असूनही पडतोय की काय अशी भीती वाटू लागते. भीती मरणाची वाटत नाही, वेदनेचीही नाही.. पण पडून हाड-बीड मोडले तर येणाऱ्या परावलंबित्वाची वाटते.   

काही दिवसांपूर्वी तिचे एक औषध संपले म्हणून निघालो होतो.. जाणाऱ्या रिक्षाला हात केला.. ती शंभर फुटावर जाऊन थांबली. रस्त्यावरून अगदी कडेने सावकाश चालत जात असताना एक दुचाकी अगदी कर्कश हॉर्न वाजवत जवळ आली..  पाय लटपटले, तोल गेला सुदैवाने बाजूलाच विजेचा खांब होता.त्याचा आधार मिळाला म्हणून पडलो नाही..

“धड चालायला येत नाहीत तर म्हातारे घरात बसायचे सोडून रस्त्यावर कशाला येतात मरायला.. कुणास ठाऊक ? ” अंगावर खेकसत दुचाकीवाला निघून गेला..  खांबाच्या आधाराने थरथरत उभा राहून सावरण्याचा प्रयत्न करत काही क्षण उभा राहिलो तर रिक्षावाला  मागे वळून पाहत काहीतरी पुटपुटत निघून गेला..  ती काळजी करत राहते म्हणून तिला काही सांगितले नाही.

दोन-तीन वेळा रस्त्यापर्यंत जाऊन आलो.. जाणाऱ्या – येणाऱ्या मध्ये चुकून कुणी ओळखीचे दिसतंय का पहात होतो.. पण अडचणीच्या वेळी मदतीला ओळखीचे कुणी सहसा भेटत नाही हेच खरं !.  गेली अनेक वर्षे ज्या दुकानातून सामान घेत होतो तिथे फोन केला. दुकानदाराबरोबर व्यवहार – व्यापारापलीकडचे तसे  जिव्हाळ्याचे, काहीसे घरोब्याचे संबंध.. पण तिथेही आता केवळ व्यावसायिक दृष्टिकोण ठेवणारी पुढची पिढी असते.

“साहेब, फक्त एक-दोन किलो साखर एवढया लांब घरपोच करणे परवडत नाही. त्यात आज कामगारही कमी आहेत.  “

एवढेच बोलून तिकडून फोन ठेवला देखील. कामगारही कमी आहेत हे इच्छेचा अभाव लपवण्याचे व्यवहारी कारण. महिन्याचे सारे सामान त्याच दुकानातून घेत असूनही असे.. आताशा सारी गणिते पैसा आणि वेळेची असतात..

खरंतर असे इथं एकाकी राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात जाऊन राहणे खूप चांगले.. निदान अवती भवती माणसे असतात, सोबत ही असते असे खुपदा वाटते. एकदा तिला तसे म्हणालो देखील.. पण तिने मानेनेच नकार दिला.. तिचे तिने उभारलेल्या घरावर नितांत प्रेम आहे.. तसे माझेही आहेच.. पण तिला वाटते तिने तिचा अखेरचा श्वास याच घरात घ्यावा.. खरंतर सोडावा.

कोण आधी जाणार, कोण नंतर,.कुणाचा अखेरचा श्वास कधी असणार हे कुणालाच ठाऊक नसतं..  आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तिची संगत- सोबत असावी असे आजवर वाटत होते. पण आताशा माझ्यामघारी तिचे काय होईल याची काळजी वाटू लागलीय. माझ्यासमोर,माझ्याआधी तिने अनंताच्या प्रवासाला निघून जावे असे वाटू लागलंय..  तिच्या डोळ्यांतही माझ्यावरच्या प्रेमाबरोबर माझ्यासाठीची हीच काळजी दाटून आलेली आहे.. माझ्याबाबतीत तिच्या मनात तोच विचार येत असतो हे ही मला ठाऊक आहे…

सांज सरून गडद काळोख दाटून यायला सुरुवात झाली होती.

ती स्वयंपाकघरातून भाताचा कुकर लावत म्हणाली,

“बाहेरची खिडकी लावा. सोप्यातला, बाहेरचा लाईट लावा. “

मी लाईट लावून सोप्यातील खिडकी बंद केली पण मला मनाची खिडकी बंद करताच आली नाही..  सांज ढळून तिच्या काळजीचा गडद काळोख माझ्या मनभर दाटतच राहिला होता.

◆◆◆

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सांज…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सांज…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी  

आठवणींच्या गाठी कधी अवचित सुटतात, कधी ती सोडत बसते.  त्या कधी सुखावतात कधी मनाला विद्ध करतात . मग आठवणींची दुखरी नस ठसठसत राहते.. बराच काळ. अलीकडे तिचे असेच होते. मग ती कधी त्यातच रमून जाते, कधी एखाद्या आठवणीच्या पोळ्यावरील मधमाशा तिच्या मनाला डसत राहतात. म्हणून मला आठवणींच्या गाठी आपोआप उकलणे आणि सोडवत बसणे नकोच वाटते.. मग मी तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी विषय बदलतो तसाच विषय बदलण्यासाठी मी तिला ते विचारले होते

मी विषय बदलण्यासाठी  ‘आणखी काय आणायचं आहे ‘ हे विचारतोय हे तिच्या लक्षात आले तशी ती हसली. मी पटकन चहा पिऊन कप खाली ठेवला.  तिने चहाचे भांडे, कप पाटीत ठेवले. मी ती पाटी उचलू लागलो तशी ती म्हणाली,

“असू दे उठून मी न्हेते बाहेर आणि धुवून टाकते.”

तिला उठायचाही त्रास होतो. गुडघे तर दुखतातच पण अलीकडे सायटीकाचा त्रास ही होतो म्हणते.. पण तरीही खाली बसून काम करणे सोडत नाही. किती वेळा म्हणले उंच ओटा बांधून घेऊया.. सिंक बसवून घेऊया.. तुलाच बरे होईल… तिचा स्पष्ट नकार. तिला स्वयंपाकगृहाच्याजवळ बाहेरच असणाऱ्या  कर्दळी आणि आळु जवळ असणाऱ्या दगडावर भांडी घासायला- धुवायला आवडतं. तरी बरे त्या दारातून बाहेर पडायला एकच छोटीशी पायरी आहे.

परसदारातून परसात उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत..पण तिला त्या उतरून परसात जाणे नकोसे वाटते.  ती सांगत नसली तरी तिला त्याचा त्रास होतो, पायऱ्या चढता-उतरताना असह्य वेदना होतात हे मी जाणून असतो..

“आता आराम खुर्चीतून उठायला जमत नाही पटकन.. जरा त्रासाचेच वाटायला लागलंय मला. “

मी तिला एकदा म्हणालो, ती काहीही न बोलता नुसतीच हसली, सारे काही समजल्यासारखी.  आणि तेंव्हापासून संध्याकाळचा चहा मी परसदारातच पायरीवर बसून घेतो. ती दाराजवळ खुर्ची घेऊन चहा पिता पिता, माझ्याशी बोलता बोलता परस न्याहाळत बसते.. डोळ्यांत साठवून ठेवत असल्यासारखी. अलीकडे बऱ्याचदा सांजेचा चहा ही घरातच होतो. परसातली गुलाबी खुर्ची आताशा रिकामीच असते.

ती चहाचे पातेले, कप धुवून आत आली. ते जास्थानी ठेवेपर्यंत मी ते दार लावून सोप्यात आलो. ती ही पाठोपाठ सोप्यात आली. सोप्यात बसले तरी खिडकीतून दूरवरचे दिसतेच. ती कुंपणभिंतीबाहेरचा रस्ता न्याहाळत बसते. पूर्वी  त्या रस्त्यावरून कधीतरी एखादी सायकल, एखादे वाहन जात- येत असायची पण आता सायकल क्वचित एखादीच दिसते पण दुचाकी, चार चाकीं, माल वाहतूकीची विविध वाहने आणि आणि अधून-मधून जाणाऱ्या-येणाऱ्या बसनी रस्ता तुडुंब भरून वाहत होता..प्रवास हेच जीवन झालंय की काय असे वाटू लागलंय.. वाहनांचे आवाज, हॉर्न चे आवाज.. यामुळे सारा परिसर अगदी पहाटेपासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत फक्त ‘आवाज की दुनिया ‘ होऊन जातो. चिमण्या-पाखरांची मनभावक किलबिल ऐकूही येत नाही.

दिवस मावळू लागला तसे घरट्याकडे परतणारे तुरळक पक्षी आकाशात दिसू लागले. पूर्वीसारखे थवे  आता फारसे दिसत नाहीत…. पूर्वी असे थवे पाहिले की तिला तिचे गाणे आठवायचे आणि ती गुणगुणत राहायची..  ‘ बागळ्यांची माळफुले अजुनी अंबरात…’

आताशा तिला परदेशी झालेल्या, अनेक वर्षे घरी न आलेल्या मुलांची आठवण येते.. तिने ते कधी बोलून दाखवले नसले तरी तिच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा बोलून जातात. मग मी तिला,  ‘ गार वारा सुटलाय नाही ? चल आत जाऊ. ‘ असे म्हणून आत  तिला घेऊन आत जातो..

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सांज…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सांज…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी  

तिचे असे लटक्या रागाने पाहणे मला खूप सुखावते… तिचा लटका राग आमच्या नात्यातली ओढ तर वाढवतोच पण खरे म्हणजे ती’च व्यापून राहिलेल्या मनात तिच्यासाठी आणखी जागा निर्माण करण्यासाठी माझे मन आणखी मोठे होते.. आणखी व्यापक होते..   मी तिच्याकडे रोखून पाहतोय हे पाहून ती पुन्हा म्हणाली,

” कुठे हरवलास ? मी काही तरी म्हणाले तुला “

तिच्या लटक्या रागात हरवलेल्या स्वतःला सावरत, भानावर आणत मी हसून म्हणालो,

“बायकांच्या मनातील ता म्हणजे ताकभात की ता वरून ताट-वाटी हे ब्रह्मदेवलाही कळणार नाही तिथे ह्या पामराचा काय पाड लागणार ,राणीसाहेब ? आतातरी सांगाल का ?”

ती हसून डोळे मिचकावत म्हणाली,

“सांजवेळचा नभातला प्रणयी गुलाबी रंग हळूहळू अंधारताना आपल्या परसात उतरून राहावा म्हणून तिथं… आत्ता तुला नकोच असेल तर मी आणते मी  काळे कापड..” 

“कापड तर बदलून आणयलाच हवे तुला.. मला तिन्ही आरामखुर्च्यांसाठी गुलाबीच हवं. “

मी हसत म्हणालो. तेंव्हा ती मस्त लाजली..

” चावट आहेस तू. सारे ध्यानात येऊनही माझ्याकडूनच वदवून घेतोयस हे लक्षातच येत नाही माझ्या. जात्ये बाई आत, अजून स्वयंपाक व्हायचाय.”

ती स्वयंपाकघराकडे जाण्यासाठी वळत म्हणाली.

” ए, राहू दे स्वयंपाक.. आज बाहेरच जाऊ जेवायला.. आणि तसेच एखादा चित्रपटही पाहून येऊ. “

” नाही हं.. आजिबात नाही. जोवर आपले घर होत नाही, तोवर नाही.”

ठामपणाने नकार देऊन ती आत गेली होती.

तिच्या मनाजोगं घर झाले. गावापासून दोन किमी अंतरावर रस्त्यालगतची चांगली दहा गुंठ्यांची तिला हवी तशी जागा मिळाली.. सभोवती फक्त शेती.. समोर दूरवर दिसणारा डोंगर. सभोवतीच्या शेतांच्या बांधावरची आंब्या-लिंबांची भरपूर झाडे.. कडक उन्हांतही डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी हिरवाई ल्यालेले, मनाला उल्हसित करणारे करणारे भवताल. तिने तिच्या मनाप्रमाणे आंतर्बाह्य आखणी केलेले. तिने नानाविध फुलझाडे, तिला हव्याशा झाडांची रोपे आणून लावली. जोपासली. चिमण्या-पाखरांच्या किलबिलीने दिवस उगवू लागला, मावळू लागला.  तिची निवडणे-पाखडणे कामे त्यांच्या सोबतीत परसात होत होतीच पण दुपारचा बहुतेक सारा निवांत विसाव्याचा वेळ ही परसातच आंब्याच्या गार सावलीत जात असे.

” अहो, कुठं हरवलात ? चहा निवला असेल. द्या इकडे, गरम करून देते. “

तिच्या आवाजाने भानावर येऊन मी माझ्या हातातील चहाच्या कपाकडे पाहिले..  चहा घेता घेता मी विचारात हरवून गेलो होतो.. कपात बराचसा चहा तसाच होता.. गार ही झाला होता.

” नको, राहू दे. घोटभर तर उरलाय. पिऊन टाकतो. “

”  द्या इकडे. तुम्हांला अगदी गरम गरम चहा लागतो..  हा गार चहा घशाखाली तरी उतरेल का तुमच्या.  आणा इकडं. गरम करून देते. “

” नको ग राहू दे.. आता गरम काय आणि गार काय ? “

ती हसली. स्वतःशीच हसल्यासारखी.

” का गं ? हसायला काय झालं? खरंच राहू दे. “

” काही नाही.. ‘संगम’ आठवला..”

” आत्ता ? आगं, किती काळ लोटला संगम पाहून..”

आठवतं तुला ? “

” हो तर, जयहिंद ला पाहिला होता. “

” हं ! संगम म्हणजे त्यातले गाणे आठवले…”

” आत्ता ? बोल राधा बोल…? “

” ते नाही रे, ‘ क्या करू माँ मुझको बुढ्ढा मिल गया..’ अलीकडे तू तसाच व्हायला लागलायस ? “

मी हसलो, पंचाहत्तरी ओलांडलेल्या तिला ऐंशीतील मी बुढ्ढा व्हायला लागलोय असे वाटू लागले होते.

” असे का वाटते तुला ? चहा तसाच पितो म्हणले म्हणून ? “

” नाही रे, गंम्मत केली. असेच गाणे आठवले.

त्यावेळी नुकतीच आपण स्कुटर घेतली होती. तिच्यावरून खूप फिरायचो आपण. “

”  हो ना.. स्कुटर घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण ‘संगम’ पाहायला गेलो होतो ‘जयहिंद’ ला. “

” दुसऱ्या दिवशी नाही रे. आपण स्कुटर आणली तो गुरुवार होता आणि संगम पाहिला रविवारी. “

” वार ही आठवतो तुला ?”

” काही क्षण, काही गोष्टी विसरु म्हणले तरी विसरल्या जात नाहीत. “

नकळत तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

मी विषय बदलण्यासाठी  विचारले,

” साखरेबरोबर आणखी काय आणायचं आहे ते ही सांग. “

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सांज…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सांज…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी  

3     जीवनरंग:

सांज….2

आनंदहरी.

 

कथा :- सांज

आनंदहरी

भाग : दुसरा

लग्नाआधी तिने एकदा स्वतःच्या घराचे स्वप्न सांगितले होते. लग्नानंतर घर बांधायचा विषय निघाला तेंव्हा तिने ते पुन्हा सांगितले होते.. नुसतेच सांगितले होते असे नाही तर त्याबरहुकूम बांधूनही घेतले होते. परंपरा आणि नवता यांचा सुंदर संगम तिने घर बांधताना साधला होता.

“मी केवळ स्वयंपाक घराची नव्हे तर संपूर्ण घराची स्वामीनी आहे.. सारे माझ्या मनाजोगतं करून घेणार आहे.. चालेल ना रे तुला ? ” 

घर बांधायचा विषय निघाला तेंव्हा ती हसत हसत म्हणाली होती. 

इतरवेळी ‘अहो- जाहो ‘ असे आदरार्थी संबोधणारी ती , जेंव्हा तिला तिच्या मनासारखे करून घ्यायचंच असते तेंव्हा ‘ चालेल ना रे तुला ? ‘ असे हमखास म्हणते.. ते ही हसत हसत.

“अगं, तुझ्या मनाचे अवघे घरच मला देऊन टाकलंयस.. तिथे या घराचे काय घेऊन बसलीयस ? “

“म्हणजे ? तुझ्या मनाचे घर मला नाहीस का दिलेले ? आणखी कुणी आहे वाटते “

“तुम्ही बायका म्हणजे..  कोणत्या बोलण्यातून कोणता अर्थ काढाल काही सांगता येत नाही.”

“तुम्ही पुरुष म्हणजे कधी काय कसे आणि नेमक्या कोणत्या अर्थाने बोलाल .. काही सांगता येत नाही ? स्पष्ट असे कधी बोलायचंच नाही. बरे, त्यातून काही बोलायला, विचारायला गेलं की आहेच ‘ तो मी नव्हेच ‘ चा प्रयोग. “

मी हसलो होतो. तिचं हे शेवटचे वाक्य म्हणजे तिच्या बोलण्यात अनेकवेळी हमखास येणारे वाक्य. सुरवातीला मी त्यावरही बोलायचा प्रयत्न करायचो पण काही दिवसातच लक्षात आले ते वाक्य म्हणजे त्याविषयावरील संवादाला तिने दिलेला पूर्णविराम आहे.

“ए, आपण घरात काहीच फर्निचर आणायचे नाही हं..  घर कसे मोकळे -ढाकळे हवे.. उगा फर्निचर ची गर्दी नको. हां..फक्त तुझ्यासाठी मी दोन आरामखुर्च्या तेवढ्या आणणार आहे हं ! तुला आरामखुर्चीत बसून वाचायला आणि वाचता वाचता चहा ढोसायला आवडतो ना म्हणून.. “

सारे जग चहा पिते, मी मात्र चहा ढोसतो हे तिचे माझ्या चहाच्या आवडीबद्दलचे प्रामाणिक मत.

“आगं, एक आहे ना आरामखुर्ची ? आणखी दोन कशाला ? “

” एक व्हरांड्यात आणि दुसरी परसात ठेवणार..”

” आगं, घडीची आरामखुर्ची सोप्यातून हवी तिथे घेऊन जाता येईल की..”

” राजे स्वतःचं सिंहासन घेऊन इकडे तिकडे फिरतायत… कसे वाटेल ते बघताना ? मला नाही हं आवडणार ते..”

ती खट्याळपणे हसत म्हणाली होती.

“आगं, पण म्हणून आणखी दोन..? हवेतर तू ठेवत जा इकडे तिकडे. “

” गृह राज्याची स्वामींनी कोण आहे ? “

” तू .”

” हो ना ? मग ‘हुकूम की तामिल हो!”

शेवटी तिने दोन आरामखुर्च्या आणल्याचं त्याही वेगवेगळ्या रंगाच्या कापडाच्या..”

” आगं, काय हे गुलाबी कापड ?  व्हरांड्यातल्या खुर्चीला हिरवं.. सोप्यातल्या खुर्चीला निळं.. आणि  परसातील खुर्चीला गुलाबी ? “

” हं ! तुझी सकाळ हिरवीगार प्रसन्न व्हावी..  दुपार शांत निळाई लेवून यावी असे वाटते रे मला आणि..”

ती ‘ आणि ‘ म्हणून थांबली. तिची ही नेहमीचीच सवय. एखाद्यावेळी लक्ष पूर्णपणे वेधून घ्यायचे असेल आणि उत्सुकता वाढवायची असेल तर ती ‘ आणि..’म्हणून थांबते.

” आणि काय..? “

” आणि काही नाही. “

माझी उत्सुकता आणखी वाढली.

” सांग ना .. आणि काय ? “

” असा कसा रे तू ठोंब्या..  तुला काहीच कसे कळत नाही. ता वरून ताकभात सुद्धा कळत नाही तुला…”

ती काहीशी लटक्या रागाने पहात म्हणाली.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print