सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ शेवटची भेट…! सुश्री रूचा मायी ☆ भावानुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
शेखर परत ओरडा आरडा करत घराबाहेर पडला.रोजचंच झालं होतं हे.रेवा निमूटपणे त्याच्या रागीट स्वभावाला सहन करत दिवस रेटायची..’तो खूप प्रेमळ आहे पण … ‘हे ऐकवत ऐकवत सासूबाईंनी तिला नेहमीच समजावत, ‘संसार म्हणजे स्त्रीचं बलीदान’ वगैरे ऐकवत ऐकवत मुलगा- सुनेच्या मधे वाटाघाटी केल्या होत्या.. त्यांच्यापरीने त्यांनी उत्तराला उत्तर टाळून घरात शांतता नांदवायचा प्रयत्न केला होता.
मुलाला समजावण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे, हे कळल्यावर त्यांनी त्याला काही समजावणं टाळलेलंच होतं.
शेखर चे बाबा खूप तापट म्हणून नातेवाईकांमधे प्रसिद्ध होते. त्यामुळे,वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन वळणाचं पाणी वळणावरच जाणार, म्हणून सोडून दिलं होतं आईने.
सुनेसाठी मनापासून जीव तुटायचा ,पण मुळात बुजऱ्या स्वभावाची असल्याने विशेष करताही येत नव्हतं.
एक दिवस सकाळीच हृदय विकाराच्या झटक्याने शेखरची आई वारली. आणि मग रेवाला वाटलं आपलं सुख-दुःख समजून घेणारी एकुलती एक व्यक्तीपण गेली.तिचे आई वडील तर तिला कधीच पोरकं करून गेले होते.
आई गेल्यानंतर गरम डोक्याचा असला तरी मनाने हळवा असलेला शेखर अजूनच बिथरल्यासारखं वागायला लागला.
कालपर्यंत वडील म्हणजे आदर्श मानलेला असल्याने त्यांचंच वागणं बघून तंतोतंत तसंच वागत आयुष्याची ५५ वर्ष घालवली होती. ‘स्वभावो दुरतिक्रमः’ ह्या उक्तीनुसार त्याच्या आणि बाबांच्या वागण्यात काही फरक पडेल,अशी सर्व आशा रेवाने सोडूनच दिली होती.
रेवा आणि तिची दोन्ही मुलं आपापल्या परीने बाबा आणि आजोबांना शांत ठेवण्याच्या प्रयोगाला कंटाळत चालली होती.
रेवाला आजकाल बाबांच्या वागण्यात मात्र फरक जाणवत चालला होता. आई गेल्यापासून ते अचानक शांत राहायला लागले होते, रेवाला मदत करण्याकडे त्यांचा कल वाढत चालला होता.ते आजकाल तिचं मन सांभाळायचा प्रयत्न करायचे.
रेवाने आवर्जून मैत्रिणींना ही गोष्ट संगितली.तर त्या तिला म्हणाल्या सुद्धा, “आता त्यांना माहीत आहेना, त्यांना तुझ्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हा तात्पुरता बदल.सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को”
पण आजही बाबा स्वतःचं सर्वकाही स्वतः करायला सक्षम आहेत,हे रेवा जाणून होती. त्यामुळे बाबांमधला हा सुखद बदल तिला आवडला होता..
आईंना जाऊन जेमतेम तीन महिने उलटले असतील.अचानक एक दिवस शेखर ऑफीसमधून घरी आला आणि चहामधे साखर जास्त पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याने घर डोक्यावर घेतलं. तीन महिन्यापासून असलेली थोडीफार शांतता आज शेवटी भंग पावली.
रेवा चार-चारदा म्हणत होती, “मी दुसरा चहा देते”. पण एक कप चहा न पटल्यावरून थेट तिच्या शिक्षणापासून ते दिवंगत आई वडील.. सगळ्यांचा उद्धार झाला.
बाबा बाजूलाच बसले होते. ते अचानक म्हणाले, “रेवा, आज मी आणि शेखर डिनरला घरी नाही.”
चहात आज साखर जास्त झाली, म्हणून रागावून आज हे लोक घरी जेवणार नाहीत, असे समजून रेवा खूप वेळा ‘सॉरी’ पण म्हणाली.पण…
इकडे आज बाबांचा आपल्याला सपोर्ट आहे असे बघून शेखरला जरा जास्तच चेव आला होता.
तो म्हणाला, “हो, बाबा. आपण बाहेरच जाऊ.जेवणासाठी इतकी मरमर करायची आणि तेच अन्नपाणी चविष्ट मिळत नसेल तर काय उपयोग? आपण आत्ताच निघूया चला आठ तर वाजलेच आहेत. ह्या चहाने तोंडाची पार चव गेली आहे.”
बाबांनी रेवाकडे पाहून ‘गप्प राहा’,असे खुणेनेच सांगितले.
बाबांचा हा पवित्रा नवीन होता रेवासाठी.
पण ह्या दोघांपैकी एकालाही प्रश्न विचारायची तिला कधीच हिम्मत नव्हती.
शेखरने गाडी काढली आणि बाबांना घेऊन जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये दोघे पोहोचले.
शेखर आणि बाबा बरेचदा ड्रिंक पार्टी करायला इथेच यायचे.आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच आले होते.
पुरुषांनी कसा पुरुषार्थ बाळगावा,पुरुष जरा तडक फडकच शोभून दिसतो, शेमळट नाही वगैरे बाळकडू इथेच शेखरला मिळालं होतं.
पण आज बाबा चक्क ड्रिंक्स घ्यायला ‘नाही’ म्हणाले,शेखरसाठी हा धक्काच होता.
तो म्हणाला, “बाबा तुम्ही आणि व्हिस्कीला ‘नाही’ म्हणत आहात.काय झालं तुम्हाला ?आजकाल शांत शांतही असता?”
बाबा अचानक रडायला लागले.बराच वेळ कोंडलेल्या भावना उफाळून आल्या. आर्त स्वरात शेखरला म्हणाले, “स्वतःला शिक्षा कशी द्यायची हा विचार करतोय.माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी सोडून देईन,सगळं करेन पण तिची माफी कशी मागू ?तो एक मार्ग देवाने सुचवावा… तिचीच काय आजपर्यंत ज्यांना ज्यांना जिव्हारी लागणारं बोललो त्यांची माफी मागितली तर माफ करतील का मला ते ?
तिने शेवटचा श्वास घेतला त्या दिवशीसुद्धा मी तिला वाटेल तसं बोललो होतो.. आज त्या भांडणाचं कारण जरी आठवलं तरी लाज वाटते आहे स्वतःची. माणूस इतका कसा स्वार्थी होऊन जातो ?स्वतःच्या काही विक्षिप्त कल्पनांसाठी आपण दुसऱ्याला किती गृहीत धरतो ना?
पण एक दिवस असा येतो आयुष्यात की चूक झाली, आपण दुसऱ्याला दुखावलं हे समजल्यावरही काहीच करता येत नाही.
बेटा, हे कालचक्र आहे ना, ते गोल फिरत रे,पण पुढे …मागे नाही नेता येत.मला ह्याची जाणीव झाली आणि माझी सगळी नशा खाडकन उतरली.आता कुठलीही व्हिस्की मला कामाची नाही.
तुझ्या आईची मनापासून माफी मागायची आहे रे.पण कुठून आणू तिला ?आता एका क्षणासाठी तरी.तिला सांगायचं होतं तिच्यावर हक्क गाजवायचो,तिचा सतत पाणउतारा करायचो पण माझं खूप प्रेम होतं तिच्यावर.तिला माहीत असेल का ते ?की एक तामसी माणूस नवरा म्हणून नशिबी आल्याने ती आयुष्य संपल्याचा आनंद मानून ह्या जगातून गेली असेल ?
काय माहीत सगळेच प्रश्न आता अनुत्तरित राहतील…
एक धडा घेतला मात्र मी त्या दिवशीपासून..
बोलताना १०० वेळा विचार करून बोलायचं.आजनंतर तो माणूस आपल्याला आयुष्यात परत कधीच दिसला नाही तरी ‘आपण तेव्हा असं नको होतं बोलायला’ ही आपल्याला बोचणी राहता कामा नये.अत्यंत विचारपूर्वक बोलायचं.
आयुष्यं असं जगायचं जणू काही ही आपली शेवटची भेट…
कधी चुकून दुखावलंच कोणाला तर पटकन मनापासून ‘साॅरी’ म्हणून टाकायचं.काय माहीत पुन्हा संधी मिळेल का?
फार भयंकर असतं रे अपराधीपणाची भावना घेऊन जिवंत राहणं.खास करून जेव्हा ती माणसं आपल्याला सोडून जातात,जी आपल्या जगण्याचं कारण असण्याची जाणीव होते आपल्याला नंतर..
तेवढ्याकरता मी तुला आज इथे आणलं. मी ज्या यातना भोगतो आहे, त्या तुझ्या वाटेला येऊ नयेत म्हणून आज तुला माझा हा एक मोलाचा सल्ला समज…
कारण इथेच बसून नाही नाही त्या पुरुषार्थाच्या खुळचट कल्पना तुझ्या डोक्यात घुसवल्या मी.. बघ. आजच जागा हो…
आपल्या मृत्यूनंतर रडणारे नसले ना तरी चालतील.पण निदान कुणाला सुटकेची भावना वाटेल इतकं दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू नये माणसांनी.आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात तोपर्यंतच त्यांची किंमत कळलेली बरी.
किती क्षुल्लक कारणांनी आपण जिवाभावाची माणसं तोडतो.आणि मग झुरत बसतो त्यांच्यासाठी आयुष्यभर.. ”
बाबा असे हताश,केविलवाणे शेखरने ५५ वर्षात कधीच पहिले नव्हते.आईला कधीच खिसगणतीतही न पकडणारे बाबा आज आईच्या आठवणीने इतके कासावीस होताना पाहून शेखरही खूप भावुक झाला.
बाबांना समजावण्यासाठी तो म्हणाला, “बाबा, तसंच काहीतरी कारण घडल्याशिवाय तुम्ही भांडला नसणार आईशी,मला माहीत आहे.जाऊद्या. कुटुंबात होत असतात अशी भांडणं … ”
तसे बाबा म्हणाले, “हो रे. आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा आपल्याला असंच वाटत असतं की आपण योग्यच गोष्टीसाठी बोलतो आहोत.पण आपण नुसती चूक दाखवून गप्प नाही बसत ना ?आपण त्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो.नाहीच जाणवत हे सगळं जोपर्यंत डोळ्यासमोर निमूटपणे ऐकून घेणारी ती व्यक्ती दिसत असते.
पण आज मला जे आतून होत आहे ना ते शब्दात सांगणं कठीण आहे बाळा.. काही म्हणजे काहीच श्रेष्ठ नसतं जगात ज्यासाठी आपण आपल्या माणसाला इतकं दुखवावं,अगदी आपला अहंकार सुद्धा!
किती क्षुद्र भांडणाचं कारण होतं त्या दिवशी!मी सहज दुर्लक्ष करू शकलो असतो.पण कुठे माहीत होतं इतकं धडधाकट आरोग्य असलेली तुझी आई,तो तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल… आणि आमची शेवटचीच भेट.. तिच्यापेक्षा मोठं नक्कीच नव्हतं ते कारण”
शेखरने न राहवून विचारलं, “बाबा काय झालं होतं एवढं त्या दिवशी ज्यामुळे तुमचं मन तुम्हाला इतकं खात आहे ?”
बाबा हताशपणे म्हणाले, “सकाळी सकाळी माझ्या कितीतरी आधी उठून, तयार होऊन मला आवडतो म्हणून माझ्या बरोबर चहा घ्यायला, माझ्या आवडीचा चहा घेऊन तुझी आई खोलीत आली.माझं बेड टी प्रकरण तिला कधीच आवडायचं नाही.तरी ती माझ्याबरोबर चहा घ्यायची.मी पहिला घोट घेतला आणि रागात तो चहाचा कप फेकून दिला.”
शेखरने कुतूहलाने विचारलं “का ?”
तसे बाबा म्हणाले, “तुझाच बाप ना मी!तिने चुकून चहामधे साखर घालताना माझ्याच कपात दोन वेळा साखर घातली होती.
त्या गोडव्याला इतकं वाईट झिडकारलं मी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला गोडवा कायमचा संपला…तिच्याबरोबर.
हे सगळं ऐकून
शेखरचे डोळे खाडकन उघडले , “बाबा प्लीज, पटकन घरी चला.”असं म्हणून हॉटेलमधलं वाढलेलं ताट अर्धवट सोडून टेबलवर पाकिटातले सगळे पैसे ठेवून तातडीने शेखर बाबांना घेऊन घरी पोहोचला..
रेवाने दार उघडल्याबरोबर सुटकेचा निश्वास टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “ रेवा, मला माफ कर. मी परत कधीच तुझा अपमान करणार नाही.”
देव्हाऱ्याकडे बघून नकळत त्याच्या तोंडातून शब्द फुटले, “ थँक यू,देवा. मला आयुष्यात एक संधी दिल्याबद्दल .. !”
लेखिका :सुश्री ऋचा मायी
गौरी गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈