मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा…. (अलक)… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? जीवनरंग ❤️

☆ अति लघु कथा… (अलक)… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

लघु कथा  – – १

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

लघु कथा – -२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

लघु कथा  – -३.

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.

लघु कथा  – – ४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.

लघु कथा  – -५.

ऑफिसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.

लघु कथा  – -६.

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय.

लघु कथा  – -७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

लघु कथा  – -८.

खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनीला म्हणाली, “ वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे. “  तर वहिनी म्हणाल्या, “ अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की. सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते. “ 

— रिमोटने tv केव्हाच बंद केला होता.

लघु कथा  – -९.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये…. तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ५००० चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला “ लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.” …… त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फेल वाटली तिला.

लघु कथा  – -१०.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला. ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने. स्वैपाक खोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या. “ हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.”

लघु कथा  – -११.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय, मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

—  सकारात्मक रहा…सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक लघुकथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे. जगात सगळेच इतके वाईट नाहीयेत.

—चांगल्या माणसांची संख्या वाईटांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे —

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : शामसुंदर धोपटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ?

☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे

चार दिवसांपासून दुपारचे ढग येत. खूप अंधारी येई. पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे व पावसाचें सर्व अवसान कुठल्याकुठे निघून जाई. तिनें दोन दिवस वाट पाहिली. तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार. घरांतला दाणादुणा संपत आला. उद्यांला खायला कांही नव्हतें, म्हणून ती जिवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच.

झोंपडीच्या छपराच्या एका झरोक्यांतून मधून मधून उजेडाची एक तिरीप येई. तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात तिचा तान्हा कितीतरी वेळ पडून राही. नेहमीप्रमाणे तिनें त्याला टोपलीत घालून त्या ठिकाणी ठेवला. त्याच्या भोवती गुंडाळलेले फडके आणखी नीटनीटकें केलें व ती बाहेर पडली. तिनें झोंपडीला कडी घातली व एकवार घराच्या भोवताली नजर फेंकून ती झपाझप निघाली. तिनें पोराला एकटें टाकले, पण वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्याइतका तिचा पदर तरी कुठे धड होता ?

बाजार गच्च भरला होता. वादळाच्या भीतीनें सर्वांची एकच धडपड चालली होती. आपल्याजवळ छत्री आहे, आपण टांग्यांतून जाऊं – ही चार पैशाचा दाणा घेणारी दुष्काळांतली भुतें कशाच्या आसऱ्याला उभी राहतील, असा विचार कोणाच्या मनांत येणार ? एकच धांदल व एकच कोलाहल उडून गेला होता. तशांत रोजचा वारा सुटला. पण तो आज एकटाच आला नाहीं. पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड काळ्याकुट मेघांच्या बाजूने तो आला व त्याची साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडातड् मारणारे टपोरे थेंबही आले.

पांच मिनिटांत सर्व जलमय होऊन गेले. मग पहिले अवसान ओसरलें, पण उघाडीचा प्रश्नच नव्हता. पाऊस पडतच राहिला. दोन अडीच महिने जिवाचे रान करून धरणीने वाट पाहिली. पर्जन्यरायाने पहिलीच भेट इतक्या अलोट प्रेमाने दिली. त्यामुळे तिचें मुख प्रसन्नतेनें खुलून गेलें. झाडांना टवटवी आली घरें छपरें स्वच्छ धुवून निघाली. रस्त्याच्या बाजूंनी लहान लहान ओहळ धावूं लागले. मुले बाळे ‘पाऊस- पाऊस’ करीत आपल्या ओसऱ्यातून, खिडक्यांतून गंमत पहात उभी राहिली. मोठ्यांचीही कविहृदये पावसाच्या त्या प्रसन्न, उदात्त दृश्याने फुलून गेली; पाण्याच्या निनादांत तन्मय होऊन गेली.

पण ती ? ती कुठे होती? तिचा बाजार झाला का? वादळाचा पहिला थेंब अंगावर पडतात ती त्या सरी इतक्याच वेगाने धावत निघाली . तिचे छबडे त्या झरोक्याखाली होते ना? एवढ्या प्रचंड झंजावाताने एकादे कौल उडवून दिले तर ? कुठेतरी थोडेसे छिद्र सांपडले की तिथे भगदाड पाडणें हे या राक्षसी वादळाचे कामच . तिला वाटू लागले एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पडायचे. तो रडूं नये म्हणून केवडा मूर्खपणा केला मी ?

तिला घर किती दूर वाटू लागले! जातांना तिला वेळेची जाणीवही झाली नव्हती. आतां तिच्या पायाखालची वाट सरेना. त्यांतच रस्त्यावर पाणी साचलेले. ‘ माझा बाळ निजला असेल का ? झरोक्यांतून गळणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसें येईल त्याला. ‘

ती विचार करीत होती का चालत होती – रस्त्यावर होती का झोंपडीत बाळापाशी होती हे तिलाच कळत नव्हते. यंत्राप्रमाणे तिचे पाय रस्त्यावरचें पाणी तुडवीत धांवत होते. डोक्यावरचा पदर भिजून चिंब झाला. गालांवर केसावरचे ओघळ वाहू लागले. पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता. झपझप पावलांनी उडणाऱ्या चिखलांनी पोटऱ्या, पाठीकडले लुगडें भरून गेले.

दुरून तिला झोपडी दिसली. दार लागलेलेच होते. बाहेरून तर सर्व व्यवस्थित होतें. जवळपासचे वृक्ष डोलून डोलून थकले होते. पण एकदा गति मिळाल्यावर त्यांच्या लहान फांद्या व पानें अजून नाचतच होती. त्यांचा तो हिरवा नाच तिच्या बाळाला किती आवडे !

तिने दार उघडले. झोपडीत उजेड जास्त झाला होता. एक कौल पडलें होतें. पण तें पलीकडे. बाळापासून दूर चार हातावर त्याचे तुकडे तुकडे झाले होते. तिचा जीव खाली पडला. “निजलं आहे गुणाचं,” असें म्हणून ती चटदिशी जवळ गेली. झरोक्यांतून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली ओली चिंब झाली होती. गारठ्यानें मुठी घट्ट आवळून खूप रडल्यानंतर थकून तो पडला होता. तिनें त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व ती खाली बसली. किती उत्सुकतेनें तो तिच्या उबेत शिरला ! तिच्या डोळ्यांतूनही आनंदाच्या मृगधारा सुरू झाल्या.

जून १९३१

लेखिका – सुश्री कुसुमावती देशपांडे  

संग्राहिका – सुश्री  माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

‘होणार सून मी या घरची’ सीरियल संपली.साडेआठचा भोंगा झाला.दारावरची बेल वाजली.टी.व्ही.चे बटण बंद करून काठीचा आधार घेत विमलबाई उठल्या.सावकाश पावले टाकत दारापर्यंत गेल्या.दार  उघडले.जेवणाचा डबा डबेवाल्याकडून घेतला आणि पुन्हा सावकाश जेवणाच्या टेबलापर्यंत गेल्या.डबा ठेवला.काॅटवर झोपलेल्या श्रीधरपंतांना त्यांनी उठवून बसवले.थोडे पाणी प्यायला दिले.

” बरं वाटतं का आता? चार घास भरवू का?” हातानेच बरं वाटतंय.जेवण नको.अशी खूण केली.त्यांचे डोळे खोल गेले होते.औषधाने सारखी ग्लानी येत होती.शरीरापेक्षा मनाने ते जास्त खचले होते.

‘अहो! गोळ्या घ्यायच्या आहेत.चार घास खा ‘ असे म्हणत वरणभाताचे चार घास लहान बाळासारखे बळजबरीने भरवले.तोंड पुसले.पाणी प्यायला  दिले.

स्वत:ला जेवण्यासाठी ताट वाढून घेतले.डोळे भरून आले.समोरचे दिसेनासे झाले.मन भूतकाळात गेले.

सातवी पास झालेल्या विमलाबाई वयाच्या चौदाव्या वर्षी श्रीधरपंताशी लग्न करून सासरी आल्या.घरची श्रीमंती.येण्याऱ्या जाणाऱ्यांचे घर.सासू- सासरे थकलेले.नव्या सुनेच्या हातात घरच्या किल्ल्या देऊन सासूबाई मोकळ्या झाल्या.विमलाबाईचे जबाबदारी पेलण्याचे वय नव्हते.दिल्या घरी असेल तसे रहावे.पडेल ते काम करावे ही माहेरची शिकवण.दुसऱ्या पर्यायच नव्हता.पडेल ते काम आनंदाने करायचे.सासऱ्यांना कुकरमध्ये तयार केलेले जेवण आवडत नसे.चुलीवर किंवा शेगडीवर त्यांच्यासाठी जेवण करावे लागे.रोज घरात वीस-पंचवीस माणसांचे जेवण तयार करावे लागे.तेही सकाळी-संध्याकाळी ताजे. सणवार ,उत्सव,समारंभ, असेल तर शंभर माणसांचा स्वयंपाक विमलबाईनाच करावा लागे.साक्षात अन्नपूर्णा त्या.त्यांनी अनेक जीवांना तृप्त केले.

आपली चार मुले सांभाळत दोन नंदांची लग्ने केली.त्यांची बाळंतपणे झाली.मुले मोठी झाली.जावई आले.सून आली.नातवंडे झाली.

यात किती काळ लोटला हे कळलेच नाही.स्वंयपाकघर मात्र सुटले नाही.

घरचे काम आवरून झाले की त्या घरच्या दुकानदारीत लक्ष घालीत.झोपेचे सहा-सात सोडले तर बाकी सर्व वेळ या बाईचा कामात जाई.आपली मुले शहाणी व्हावीत, सुसंस्कृत व्हावीत, म्हणून त्याबाबत कुठेही तडजोड केली नाही.सगळे आनंदाने सहन केले.घर एकत्र राहावे.घरात सदैव सुख नांदावे म्हणून बऱ्याच गोष्टी निमुटपणे सहन केल्या.त्यांच्या लग्नाला ५६ वर्षं झाली.सून येऊन पंधरा- सोळा वर्ष लोटली. घरात सूप वाजू नये म्हणून बऱ्याच ठिकाणी समजूतदार दाखवला.सुनेला लेकीप्रमाणे वागवले. तिला काय हवे नको ते पाहिले.तिच्या आवडी- निवडी सांभाळल्या. तरी भांड्याला भांडे लागेच.टी.व्ही.बघण्यावरून, मुलांना वळण लावण्यावरून,विकतचे खाद्यपदार्थ मुलांना देण्यावरून,काम करण्यावरून कुरबुर सुरू झाली.विमलाबाईच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला.त्यात श्रीधरपंतांना  अर्धांगवायूचा झटका आला.सत्तरी पार केलेल्या गुडघ्याच्या दुखण्याने बेजार असलेल्या विमलबाईना नवऱ्याची उसाबर करणे शक्य नव्हते.रजा काढून चार दिवस मुलाने सेवा केली.पण आता कायमची सेवा आपल्या करावी लागणार हे जाणून सुनेने भांडण काढले.

दुनियेची रीत आहे.म्हतारपण तरुणपणाला नको असते.म्हतारपणाचा अनुभव हवा असतो,पैसा हवा असतो,मदत हवी असते,सोबत हवी असते.पण नको असते ते म्हाताऱ्यांचे आजारपण,त्यांची सेवा,त्यांचे बोलणे,त्यांचे शहाणपण,शिकवणे.

युज  अॅड थ्रो’ च्या जमाण्यात म्हातारपण म्हणजे केवळ कर्तव्य पूर्ती. सेवा विकत घेणे, आई-वडिलांसाठी केअरटेकर ठेवणे ,औषध-पाण्याचा खर्च करणे त्यांच्या राहण्याची,जेवणाची सोय करणे म्हणजे कर्तव्य संपले असे वाटते.आम्ही त्यांना काही कमी पडू देत नाही.ही त्यांची भावना.

खरं तर म्हातारपणी अन्नाच्या भुकेपेक्षा भुक असते चार प्रेमळ शब्दांची,हवा असतो माणसांचा सहवास, आपुलकीच्या चार शब्दांची हाक आणि आपण कुणाला तरी हवे आहोत ही जाणीव.याचा आज वणवा आहे.

जिथे केवळ कर्तव्य पूर्ती असते तिथे म्हातारपण फुलत नाही.तर जिवंतपणी मरते.

विमलबाई विचार करत होत्या,आपण कुठे चुकलो? इतक्या वर्षात आपण आपल्या आवडीची एक गोष्ट केली नाही,कधी हौसमौज केली नाही,कधी मला हे पाहिजे असा हट्ट केला नाही.सर्व घराचा विचार केला. प्रत्येक वेळी मन मारले.नवऱ्याला साथ दिली.संसार हेच आपले विश्व झाले. तरी मी कुठे कमी पडले?आज चार मुले असूनही मी अनाथ का झाले? मुलांनी वृध्दाश्रमात घातले असते तरी चालले असते.तिथल्या समदुःखी माणसांच्यात मन रमले असते.

सर्व सोयीनियुक्त असलेल्या या एका स्वतंत्र खोलीत आमचा जीव घुसमटतोय.एकटेपणा खायला उठतोय.इथे मरणप्राय यातना भोगतोय, हा कारावास असह्य होतय.कोणत्या न केलेल्या चूकीची शिक्षा भोगतोय? यात दोष कुणाचा?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(“आई, मी खूप शिकेन, मोठा होईन, मग बघ. तुला काही कमी नाही पडू देणार! “– नयनाच्या डोळ्यात पाणी आले.) — इथून पुढे —

त्या वर्षी नयना रोहितला आपल्या बरोबर घेऊन आली.

वसुधाने हळूच विचारले, “ नयना,रोहितला सांगितलंस का कारखानीस साहेबांबद्दल?”

“अजून नाही ग. पण मी साहेबांनाही,’ एक वर्ष  द्या मला,’असं म्हटलंय. मी हळूहळू सांगेन रोहितलाही .”

 त्या दिवशी संध्याकाळी  पेढे आणि फुले घेऊन कारखानीस नयनाच्या वाढदिवसाला आले. अचानक ते घरी आल्यामुळे नयना गोंधळून गेली. रोहित घरी होता. नयनाने रोहितशी त्यांची ओळख करून दिली.

“ हॅलो रोहित ! मी सुधीर कारखानीस ! तुझ्या बाबांच्या आणि आता आईच्याही बँकेत  आहे. कसा आहेस तू यंग मॅन? “– त्याच्याशी शेक हॅन्ड करत मोकळेपणाने साहेबांनी विचारले.–“ काय करतोस? पुढे काय करायची इच्छा आहे ? असेही त्यांनी त्याला विचारले.

रोहितने खुलून जाऊन मनमोकळेपणाने उत्तरे दिली— “ मला आर्मीत जायचंय.” तो ठामपणे म्हणाला.

नयना हे बघत होतीच., तिला साहेबांचे आश्चर्य वाटले. काहीही कल्पना न देता ते तिच्या घरी आले,आणि किती छान बोलले रोहितशी.– असे जर झाले,तर गोष्टी सहज आणि सुरळीत होतील,असे वाटले तिला.

 त्या दिवशी  शाळेतून येताना, अचानक कारखानीससाहेब भेटले रोहितला. “ चल रे रोहित,सोडू का तुला मी घरी?” 

” काका,पण हा माझा मित्र पण आहे बरोबर!” संकोचून रोहित म्हणाला,

“ अरे,मग  त्यालाही सोडूया की घरी. येरे… बस.” 

एवढ्या मोठ्या आलिशान कारमधून जाताना रोहितला मजाच वाटली.

“ काका,  थँक्स हं ! रोहित म्हणाला. “ काका,वर येता का, मला चहा मस्त येतो करता ! येता? “

कारखानीस अगदी सहजपणे,” हो, येतो की “ म्हणाले, आणि रोहित त्यांना  घेऊन वर आला. त्याने मस्त चहा केला, आणि आईसाठी थर्मासमध्ये ओतून ठेवला. कौतुक वाटले  कारखानीसांना ! 

ते गेल्यावर बऱ्याच वेळाने नयना घरी आली. तिला चहा ओतून देत रोहित म्हणाला, “आई’ आज  गंमतच झाली अगं.

आम्हाला काकांनी लिफ्ट दिली, आणि मग मी त्यांना चहा पण करून दिला.

नयनाला कौतुकच वाटले,कारखानीसांचे ! एका लहान मुलाच्या मनात शिरायचं कसब किती सुंदर जमत होतं त्यांना ! 

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वसुधाला हे सांगताना नयनाला अगदी भरून येत होते. 

वसुधा म्हणाली, “अग, साहेब आहेतच खूप चांगले ! त्यांची बायको माझी  मैत्रीणच होती. मूल नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटायचे ग ! म्हणून ते बिल्डिंगमधल्या  सगळ्या पोरांवर मायेचा अक्षरशः वर्षाव करायचे ! ते रोहितशी वागतात ते मुद्दाम नाही ग. अतिशय सहृदय आहेत ते. “

रोहित हळूहळू काकांकडे आकर्षित होऊ लागला .“आई,आज  मला काकांनी त्यांच्या घरी बोलावलेय, त्यांच्याकडे  मोठी टेलिस्कोप आहे ना, ती बघायला ! आम्ही चार मित्र जाणार आहोत,जाऊ? “

“ अरे जा की !चांगलेच दोस्त झालेत की काका तुझे ! “

“ हो ग आई!  कित्ती चांगले वागतात ते आमच्याशी. आपले बाबा असेच होते ना ग? “ रोहितचे डोळे गढूळले !

नयनाने रोहितला जवळ घेतले.

नयना आता,कारखानीससाहेबांना,सुधीर म्हणण्याइतपत जवळ आली होती.

“ सुधीर, किती छान वागता हो तुम्ही मुलांशी. रोहित हल्ली फार कौतुक करतो तुमचं. “

“ नाही ग नयना ! फार गुणी आहे तुझा मुलगा. तो ना,आपल्या वडिलांना फार मिस करतोय,म्हणून माझ्यात फादर फिगर बघतोय ग बिचारा. तू  निश्चिन्त रहा. मी रोहितला कधीही अंतर देणार नाही.”

त्या दिवशी रोहित शाळेतून आला, तो  तापाने फणफणूनच. नयना घाबरून गेली. तिने जवळच्या डॉक्टरांचे औषध आणले, पण ताप कमी होईना.

डॉक्टर म्हणाले, “आपण रोहितला ऍडमिट करूया.  हे पहा, तुम्ही घाबरू नका. पण फक्त सगळ्या तपासण्या एकदा करून घेऊ या. “ —- रोहितला ऍडमिट केले. नयनाने बँकेतून रजाच घेतली. तिने रोहितबद्दल फक्त वसूला सांगितले. कारखानीसना हे काहीच सांगितले नाही. ‘ उगीच किती त्रास द्यावा, ते अतिशय सज्जन आहेत म्हणून? आपले त्यांचे काय नाते आहे अजून तरी? ‘ 

– रोहितचा ताप टायफॉईडचा ठरला होता. हळूहळू त्याचा ताप खाली येऊ लागला. रोहित एक दिवस ग्लानीतच होता तापाच्या. त्याने डोळे उघडले तेव्हा समोर कारखानीस काका खुर्चीवर बसलेले दिसले.

“ रोहित,उठू नकोस. काय हवेय?”  त्यांनी त्याला हळूच उठवून बसवले. गरमगरम कॉफी पाजली.

 त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. रोहितच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले….. “ काका,काका ! “ त्याने  त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली !

“ अरे वेड्या, हे काय !आता बरा होशील तू पटकन ! साधा टायफॉईड तर आहे हा ! रडतोस काय? आर्मीत जायचंय ना तुला?” काकांनी रोहितचे डोळे पुसले.  

“ काका, एक विचारू?रागावणार नाही ना?” 

“ अरे वेड्या, मी कधीतरी रागावलोय का तुझ्यावर? विचार ना …” 

“ काका, माझी आई खूप एकटी पडलीय हो. कोणी नाही तिला. कित्ती वेळा एकटी रडताना बघतो मी तिला. माझे बाबा तर मी पाचच  वर्षाचा असताना देवाघरी गेले.– काका,तुम्ही माझे बाबा व्हाल? माझ्या आईशी लग्न कराल? मी लहान आहे, पण इतकाही लहान नाही, की तिचा विचार मी करू नये. मी उद्या आर्मीत गेलो, तर ती खूप एकटी पडेल.” एवढं बोलून रोहित खिन्न होऊन पडून राहिला. तेवढ्या श्रमाने त्याला दमायला झाले. काकांनी त्याला  थोपटले आणि पांघरूण घालून ते हळूच निघून गेले.

चार दिवसांनी रोहितचा ताप पूर्ण उतरला. रोहित घरी आला. घरी वसुधा मावशी आली होती.

“ काय रोहित?बरा आहेस ना राजा? “

मावशीने रोहितला जवळ घेतले. नयना,कारखानीस त्याच्या जवळच उभे होते.

“ रोहित, मी यांच्याशी लग्न केले तर तुला आवडेल? तुझी इच्छा असेल तरच हे होईल, नाहीतर  नको.”   

“ रोहित ! तुझ्या बाबांची जागा मी घेऊ नाही शकणार ! पण तुझा आवडता काका तर आहेच ना मी ?

तू तुझे आडनावही बदलू नकोस. मग तर झालं ना?” कारखानीस म्हणाले. 

“ मला तू एकटा बास आहेस रे जगायला. “ नयना कशीतरी स्वतःला सावरत म्हणाली. 

“ नाही ग आई. मला काका कायम आपल्या घरी राहायला हवेत ! फार आवडतात ते मला. पण काका, मी आवडतो का तुम्हाला? “

काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “ अरे वेड्या,हे काय विचारतोस?  माझ्या मित्राचा मुलगा तू ! आणि आता तर माझाच मुलगा आहेस.”

रोहितने काकांना मिठीच मारली. “ काका,  रत्नागिरीला होतो ना मी,आजीआजोबांकडे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे की आपल्याला बाबा नाहीत .सगळे कीव करून बघायचे माझ्याकडे. पण आता असे नाही होणार. मला बाबा म्हणून तुम्ही हवे आहात. “

— नयना, वसुधा आणि कारखानीस…. तिघांच्याही डोळ्यातून अविरत वाहणारे अश्रू त्या सगळ्यांच्या एकमेकांशी  घट्ट झालेल्या  नात्याचीच साक्ष देत होते.

 

— समाप्त —

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“ रोहित,अंगणात  खेळत बसू नकोस रे.,केवढे ऊन झालंय बाळा ! आत ये,आणि आत येऊन खेळ. चल आपण पत्ते खेळूया.” रोहितला आजीने हाक मारली. शेजारची मुलं केव्हाच घरी गेली होती. वैशाखातले ऊन नुसते भाजत होते.

रोहितला घरी जावेसे वाटेना. त्याला सारखी त्याच्या आईची आठवण येत होती आज.

नकळत्या वयाचा रोहित. जेमतेम आठ वर्षाचा ! आजीआजोबा,आई बाबांबरोबर  किती सुखात आयुष्य जात होते.

मजेत शाळेत जावे, आईबाबांबरोबर मजा करावी, शाळेतही खूप मित्र होते रोहितला. त्याचे बाबा बँकेत आणि आई मात्र घरीच होती. बाबांना तिने नोकरी केलेली आवडायची नाही. आई किती सुगरण होती रोहितची. त्याच्या मित्रांना रोहितचा मधल्या सुट्टीतला डबा फार आवडायचा—- आत्ता पायरीवर बसून रोहितला हे सगळे आठवले.

पुण्यात राहिलेल्या रोहितला हे रत्नागिरीसारखे गाव मुळीच आवडले नाही. हे गाव बाबांच्या आईवडिलांचे.

त्याचे आजी आजोबा इथेच रहात. किती मोठी वाडी, नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा,…. खूप मोठे घर होते आजोबांचे. आणि राघवमामा आणि मंजूमामी…  त्यांची मुलगी सई… सगळे खूप खूप प्रेम करत रोहितवर.

रोहित होताच शहाणा मुलगा. रत्नागिरीला रोहित आईबरोबर आला, तेव्हाचे दिवस आठवले त्याला. दर सुट्टीत रोहित आई बाबांबरोबर यायचा. आजीआजोबा खूप लाड करत. मामा, सई, समुद्रावर खेळायला घेऊन जात. सुट्टी संपली की पुन्हा पुण्याच्या घरी सगळे परतत… आजीने दिलेला खूप खूप खाऊ घेऊन.

रोहितच्या बिल्डिंगमध्येही खूप मित्र होते रोहितला.  त्या दिवशी रोहितचा वाढदिवस होता. ते सगळे मित्र आले होते मजा करायला. आईने कित्ती सुंदर पदार्थ केले होते. खूप छान साजरा झाला रोहितचा वाढदिवस.

दुसऱ्या दिवशी बाबा बँकेत गेले,आणि अचानकच खूप पोट दुखायला लागले त्यांचे. मित्रांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि आईला घरी  कळवले…..  त्या दिवसापासून रोहितच्या घरातले सुख जणू हरवून गेले.

बाबांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, आणि तो बरा न होणारा आतड्याचा कॅन्सर….. 

बाबांना नोकरीवर जाणेही अशक्य झाले आणि  बँकेतली सगळी पुंजी भराभर संपत आली. रोहितचे आजीआजोबा आले, आणि म्हणाले, “ नयना, आम्ही रोहितला घेऊन जातो काही दिवस. तिकडच्या शाळेत घालू त्याला. तू इकडे  एकटी काय काय काय बघणार? तू फक्त उमेशकडे लक्ष दे. तो  बरा होऊ दे. “

सगळ्या बाजूनी गोंधळून गेलेल्या रोहितच्या आईने उमेशला विचारले. तो आधीच इतका अशक्त आणि दुबळा झाला होता. हतबल झाल्यासारखा तो म्हणाला, “ नेत आहेत, तर नेऊ देत रोहितला आई बाबा.!.तू एकटी कुठेकुठे बघणार ग? मला माहित आहे,मी यातून बरा होणार नाहीये.पण निदान तुमचे हाल नकोत.” ……  आणि रोहित रत्नागिरीला आजी आजोबांबरोबर आला. तेव्हा तो फक्त पाच वर्षांचा होता !

दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. रोहितचे बाबा कालवश झाले आणि आईला बँकेत नोकरी मिळाली.

“ आई,मला कधी ग नेणार तू पुण्याला आपल्या घरी?”

“ रोहित, माझी नोकरी अजून नवीन आहे रे. अजून आपल्या फ्लॅटचे हप्ते भरायचे आहेत, आणि मला  बाबांच्या इतका पगार नाही रे राजा ! तुला तिकडे नेऊन तुझ्याकडे कोण लक्ष ठेवणार रोहित? थोडासा थांब ! मला तरी कुठे करमते रे तुझ्या शिवाय? “ आईने रोहितला जवळ घेतले आणि डोळे पुसत ती म्हणाली. 

रोहित समजुतीने म्हणाला “ बरं आई. पण लवकर ने हं मला ! नेहमी मला तुझी, बाबांची खूप आठवण येते.आणि माझ्या शाळेची, मित्रांची पण.”

त्या सुट्टीत आईने रोहितला पुण्याला नेले. रोहितला खूप आनंद झाला. तो सगळ्या मित्रांना भेटला, बिल्डिंगमध्ये जाऊन सगळ्यांना भेटला. काही दिवसांनी आईने मग भरल्या डोळ्यांनी रोहितला पुन्हा रत्नागिरीला पोचवले.

अशी चार वर्षे गेली.

नयनाच्या बँकेत कारखानीस म्हणून एक साहेब होते. त्यांची बायको नुकतीच कॅन्सरने वारली होती. त्यांना मूलबाळ  नव्हते. त्यांनी एक दिवस नयनाला विचारले, “ नयना,जरा वेळ आहे का तुम्हाला ? लंच ब्रेकमध्ये कॉफी घ्यायला याल  बाहेर?” 

“ हो ,येईन ना सर !”  नयना म्हणाली.

—  कारखानीस साहेब अतिशय  सभ्य, सुसंस्कृत होते. उमेशला ते ओळखत होते,आणि उमेश असताना काही कारणास्तव नयनाच्या घरी येऊनही गेलेले होते. नयना सहजपणे गेली कॉफी प्यायला.

कारखानीस म्हणाले,’,वेळ न घालवता मुद्द्याचेच बोलतो.माझ्याशी लग्न कराल का?—–

“ मी तुम्हाला परका नाही, आणि माझी बायको  कॅन्सरने गेलेली तुम्हाला माहित आहेच ! मी वयाने थोडा जास्त मोठा आहे तुमच्याहून, पण तुम्ही ठरवा काय ते “ त्यांनी थेट विषयाला हात घातला– “ मला माहित आहे तुम्हाला एक मुलगा आहे ते ! मला मुलांची खूप आवड आहे, पण दुर्दैवाने आम्हाला मूल झाले नाही. मी तुमच्या मुलाला नक्की  छान आपलेसे करीन. बघा, विचार करा.”

नयनाने शांतपणे हे ऐकून घेतले. “ मला विचार करायला वेळ हवाय सर. आता आपण नवथर तरुण उरलो नाही.

हे लग्न म्हणजे ऍडजस्टमेंटच असणार– हो ना? माझा मुलगा हे कसे घेईल मला माहीत नाही. मी विचार करून सांगते तुम्हाला.” 

नयना ऑफिसमध्ये परतली. तिच्या शेजारीच वसुधा– तिची बँकेतली जिवलग मैत्रिण बसली होती.

“ काय ग नयना, अशी चिंतेत का दिसतेस? काही झालंय का? मला सांगण्यासारखे नाही का? “

“ वसू, तसं काही नाही ग !” असं म्हणत हॉटेलमध्ये काय घडले ते नयनाने वसुधाला सविस्तर सांगितले.

“ नयना,उत्तम आहे खरंच ही संधी ! मी बघतेय ना,किती ओढाताण होतेय तुझी. कर्जाचे हप्ते, रोहितचा खर्च, सगळं काही तुला बघायला लागतं आहे. आणि ते अवघड जातेय तुला. साहेब फार सज्जन माणूस आहे. मला वाटतं तू 

याचा जरूर विचार करावास  आणि त्यांना ‘ हो ‘ म्हणावं. “ 

“ अग पण रोहितचं काय ? किती अडनिडं वय आहे गं त्याचं. आधीच आजी आजोबांकडे नाईलाजाने राहतोय तो.

पुढच्या शिक्षणासाठी मला तिकडे नाही ठेवायचंय त्याला.” 

यावर वसुधा म्हणाली, “ हे बघ नयना, असा किती दिवस तो तिकडे राहणार ग? आता त्याला तुझी खरी गरज आहे .

तू त्याला आता तुझ्या घरी आण यंदापासून… ऐक. हळूहळू मग होईल ग सगळं सुरळीत.” 

नयना  त्या मे महिन्यात रत्नागिरीला गेली. रोहितला म्हणाली, “ रोहित,तू आता माझ्याबरोबर पुण्याला चल.

आता तुझी सगळी महत्वाची  वर्षे सुरू होतील शिक्षणाची. तुला मी पूर्वीच्या शाळेत ऍडमिशन घेऊन देईन.

मी भेटून आलेय सरांना. मग काय म्हणतोस?” 

रोहितने आनंदाने उडयाच मारल्या. “आई खरंच? पण तुला सगळा खर्च झेपेल ना ग? इथे आजीआजोबा सारखे म्हणतात,‘ का राहिलीय तिकडे एकटी कोणास ठाऊक. यायचे की इथे. जळ्ळी मेली ती नोकरी, .! लेकरू इथे  ठेवलंय आणि राहिलीय तिकडे  एकटी.’ “ –रोहितने आजीची नक्कल केली.नयनाला हसू आले. “ रोहित,काळजी पोटी बोलते आजी तसे. पण तू नक्की आनंदाने येशील ना रे?” 

रोहितने आईला मिठी मारली. “आई, मी खूप शिकेन, मोठा होईन, मग बघ. तुला काही कमी नाही पडू देणार !”

नयनाच्या डोळ्यात पाणी आले.

— क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुक्त… लेखिका – सुश्री अनघा किल्लेदार ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मुक्त… लेखिका – सुश्री अनघा किल्लेदार ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

रविवार बागलांच्या घरी अंमळ उशिराच उगवला. वहिनी गेल्याच्या धक्क्यातून दोन महिन्यांनीसुद्धा त्यांचा एकुलता एक मुलगा पराग पुरता सावरला नव्हता. 

नऊ वाजल्याचे लक्षात येताच त्याने बेडरूमच्या खिडकीत मोबाईलमधे रममाण झालेल्या प्रितीला पाहिले आणि विचारले, ” कधी उठलीस तू? मला उठवायचस ना..बराच उशीर झाला आज.. आप्पांचा चहा झाला ना? “

“आप्पांचा चहा? मला नाही माहित..मी इथंच आहे, मी पण नुकतीच उठते आहे..”  प्रितीच्या या उत्तराने पटकन् उठून त्याने आवरले आणि बाहेर आला.

मस्त गरमागरम चहाचे तीन कप बाहेर आणत त्याने आप्पांना हाका मारली..पण त्यांनी ओ दिली नाही. 

दोन महिन्यांपूर्वी वहिनी म्हणजे त्याची लाडकी आई झोपेतच निघून गेली कायमची..नको नको त्या विचारांनी पराग धसकला. दोन हाकांनंतरही प्रत्युत्तर न आल्याने कासावीस होऊन त्याने आप्पांच्या खोलीकडे धाव घेतली. खोली रिकामी, स्वच्छ आवरलेली होती. मग आप्पा कुठे गेले? फिरायला? न सांगता कसे जातील? 

गोंधळून त्याने प्रितीला बोलावले, “अग आप्पा दिसत नाहीयेत घरात, तुला काही कल्पना आहे का? “

“छेः !! माझ्याशी धड बोलतात का कधी ते? मला नाही माहित..”

तिचे बोलणे पुरे होईपर्यंत परागला टेबलवर एक चिठ्ठी मिळाली. आप्पांचे अक्षर तर त्याच्या पूर्ण परिचयाचे..चिठ्ठीत लिहिले होते..

“प्रिय पराग आणि सुनबाई,

दोन महिन्यांपूर्वी ही गेली आणि मला विचित्र एकटेपणा येऊ लागला.  तुमच्या सुंदर घरट्यात मी एकटा पडलो…. कारण काय? कोण बरोबर कोण चूक याची शहानिशा मला करायचीच नाही. जिच्यासाठी मी अट्टाहास करायचो तिनेच दगा दिला रे. 

खूप विचारान्ति मी गावाला परत जातोय.  एकटा नाही, तिच्या सर्व आठवणींना सोबत घेऊन. तुमच्यात मी ‘ बसत नाही ‘ हे तुम्हालाही माहिती आहे..आणि मला ही. मला आधीच कळलं होतं, पण तुझी आई भाबडी होती. 

गावातली शेती वाडी , दुभती जनावरे सगळं सगळं वैभव सोडून ती तुमच्या महालात आली…. तुम्ही तिला हाकलले नाहीत, पण तोंडभर स्वागतही झाले नाही. लेकाची मुले -नातवंडे नाहीत, ती मोठी करत राहिली. ‘ माझी मुलं माझ्या पद्धतीने वाढू दे..’  असे सूनबाईने सुनावल्यावर घायाळ झालेल्या तिला मीच आधार दिलाय. घरच्या कामकरणींना, कामक-यांच्या सुनांना ज्या तुझ्या आईने बाळंतपणात पायली पायली तांदूळ स्वतःच्या हातानं काढून दिला, त्याच तिला ‘ सकाळी कशाला हवाय ताजा वरण भात ? उरतो तो गरम करून खा ना ‘ ..असे मुलाच्या भरल्या घरात ऐकावं लागलंय.

मी कमजोर आणि लाचार तेव्हाही नव्हतो आणि आजही नाही.. तेव्हाच बोलणार होतो पण फक्त तिच्याखातर गप्प बसलो. आता मोकळं केलंय तिने मला. 

माझे मोठ्याने देवाचे म्हणणे, पूजा करणे, सगळेच तुम्हाला नापसंत. इतकंच काय, बरे नाही दिसत पंचे वापरणे म्हणून तुम्ही ते जड टाॅवेल आणून दिलेत, सांगू का हळव्या त्वचेबरोबर मनही ओरबाडून टाकले त्यांनी. 

पण, राहू दे ते सगळं आता.. मी गावाकडच्या माझ्या घरी जातोय..मला भेटायला शोधायला येऊ नको. मीही फोन करणार नाही आणि तूही करू नकोस. माझा राग नाही तुमच्यावर, आशिर्वादच आहेत…. पण आपले मार्ग आता भिन्न आहेत. 

माझ्या माघारी शेतीवाडी , घरदार, दागदागिने सगळेच तुझ्या नावावर असेल. तुझा कोणताच हक्क मी डावलणार नाही…. मला मुक्त व्हायचंय आता.”

– आप्पा.

आप्पांची ही चिठ्ठी वाचताच पराग हमसाहमशी रडू लागला. त्याने रडत रडतच गावाला आप्पांच्या शेजारी रहाणा-या मुसळे काकांना फोन केला. 

त्याचा आवाज ऐकून अगदी कोरडेपणाने काका म्हणाले  ” पोचला हो तुझा बाप सुखरूप, कळली तुमची खुशाली.  आता तू फोन करूच नको ,आम्हीच करू तुला शेवटला फोन. तुला ऐकवायचं खूप मनात आहे, पण तुझ्या बापाला फार कळवळा तुझा..असो. आजपासून खूप कामात असेन मी ..  माझा मित्र आलाय परत.. ठेवतो फोन. ” 

मुसळे काकांनी फोन बंद केला. 

मुसळे काका वाड्यात आले तेव्हा आप्पांची नुकतीच आंघोळ झाली होती. खणखणीत आवाजात अथर्वशीर्ष म्हणत होते. आंघोळीनंतर,  हातासरशी पिळलेला पंचा त्यांनी दिमाखात दोरीवर वाळत टाकला होता, आणि वाडवडिलांनी पूजलेल्या देवांची पूजा करायला ते देवघराकडे वळले होते.

लेखिका – सुश्रीअनघा किल्लेदार, पुणे

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पुनर्जन्म…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “पुनर्जन्म…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

आज ?

बहुतेक नाही…

अजून बारा पंधरा दिवस आहेत.

तू जा आॅफीसला.

बिलकूल काळजी करू नकोस….

काही वाटलं तर मी लगेच फोन करीन.

शिवाय शेजारी अम्मा आहेतच.

ती म्हणाली.

तिच्या डोळ्यांनी डोंट वरी, जा तू म्हणलं.

गेला आठवडाभर हे असंच चाललंय.

रोज सकाळी आॅफीसला जाताना हाच विचार.

जावं की नको ?

अजून फक्त एक दिवस.

ऊद्या त्याचे आईबाबा पोचतील इथे.

मग काळजी नाही.

काळजावर दगड ठेवून त्यानं गाडीला किक मारली.

अन् तो आॅफीसला भुर्र ऊडाला.

आॅफीसला पोचला अन् सगळं विसरला…

हेडआॅफीसहून बाॅसलोक आलेत.

त्यांना घेऊन हायटेक सिटीला जायचं.

तिथल्या मिटींग्ज.

त्यांना जेवायला घालायचं.

परत अॅबीटस्ला यायचं.

दिवस मोडणार होता.

जग इकडचं तिकडं झालं तरी,

दुपारी तो तिला फोन करणार होताच.

तो कधीच विसरायचा नाही..

जिसे डरते थे, वही बात हो गई !

बाॅसलोकांची सरबराई.

हायटेक सिटीची वारी.

नेमका तो त्याचा फोन केबीनमधेच विसरला.

मिटींग्ज आवरल्या.

बंजारा हिल्सपासचं ठरलेलं हाॅटेल.

नेहमीचा मेनू.

एसीची थंडगार हवा…

त्याला घाम फुटला.

जाम अस्वस्थ वाटतंय.

का ते नाही सांगता येणारं.

अनसहणेबल.

बाॅसकडनं त्याचा फोन घेतला.

तिला फोन लावला.

उचल…उचल…उचल…

उचलला.

तिनं नाही शेचारच्या अम्मानं.

तो हलला.

भैया, कबसे फून लगाकू होना.

बॅग फट गया.

टॅक्सी मंगवाया मैने.

अबी अस्पताल मे जारी हमलोगा.

तुम फून नही ऊठाया.

फीक्र नाको.

अम्मा है इधरकू.

आठ बच्चे कू जनम दिया ये अम्मा.

तुम आरामसे आने को होना…

तो हादरला…

ती जाम घाबरायची..

तीची आई बिचारी बाळ॔तपणातच गेलेली.

आजीनं वाढवली तिला.

एका अटीवर….

ती तयार झाली.

हाॅस्पीटलमधे न्यायची वेळ येईल तेव्हा तू हवास तिथे.

अगदी ओटीचा दरवाजा बंद होईपर्यंत.

नाहीतर…

मी पण मरून….

तो निरागस हसला.

ऐ पागल !

असं काहीही होणार नाही .

मी तिथेच असेन.

त्यानं तिचा हात हातात घेऊन ‘आईशप्पथ’ प्राॅमीस केलेलं.

आणि आता तो नेमका..

बाॅस ईज बाॅस..

सांभाळून घेतलं.

तू जा..

कंपनीची ईनोव्हा…

तरीही काचीगुडापर्यंत पोचायचं होतं.

ड्रायव्हरनं गाडी अॅम्ब्युलन्स स्पीडनं ऊडवली ..

कसाबसा तो हाॅस्पीटलमधे पोचला..

खाली आम्मा भेटल्या..

सिझेरियन करने कू होना.

थिटेरमें लेके जारे…

लिफ्टच्या नादी लागण्यात अर्थ नव्हता.

जिन्याला टाचेखाली चिरडत तो वरच्या मजल्यावर.

ओटीचा दरवाजा तिला पोटात घेऊन बंद होणार… एवढ्यात…

पलट..

स्टेचरवर झोपलेली ती जीवाच्या आकांतानं बसती झाली.

वेदनेनं विव्हळणार्या चेहर्यावरचे ग्लानीडोळे ऊघडले…

एक क्षणभरच…

धापा टाकणारा तो तिच्या डोळ्यांना भरभरून दिसला..

तिच्या जीवात जीव..

त्यानं नुसत्या डोळ्यांनी बेस्ट लक म्हणलं.

ती फुल आॅफ काॅन्फीडन्स.

तिचं आधारकार्ड आलेलं.

आता तिनं यमालाही कोलला असता.

दरवाजा बंद.

तो डोकं धरून बाहेरच्या बाकावर.

अर्ध्या तासानं ट्याह्या आवाज.

नर्सनं बाहेर येऊन सांगितलं.

लक्स्मी आई है , मा बेटी दोनू टीक.

रडारड..

आत त्याची लेक.

बाहेर तो.

त्याची आजी नेहमी म्हणायची.

बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्म.

आत्ता पटलं.

पुनर्जन्म.

आईचा अन् बाबाचाही.

वेलकम लक्ष्मी…

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लेडीज फर्स्ट – लेखक- अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री रंजना नांगरे ☆

? जीवनरंग ?

☆ लेडीज फर्स्ट 🍀 लेखक- अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री रंजना नांगरे ☆

शोभना, विजय आणि त्यांचा मुलगा रोहित, असं हे त्रिकोणी, सुखी दिसणारं कुटूंब. विजय बँकेत मॅनेजर, शोभना एका नावाजलेल्या शाळेत मुख्यापध्यापिका.

शोभना म्हणजे शिस्तप्रिय, स्पष्टवक्ती आणि कामात अतिशय sincere अशी तिची ओळख होती. रोहित तिच्याच शाळेत आठवीत शिकत होता, पण कधीही त्याला शाळेत विशेष वागणूक मिळाली नाही, ना कुठेही शिस्तीत सवलत मिळाली.

शोभना रोज गाडीने शाळेत जात असे पण रोहित बाकीच्या मुलांबरोबर व्हॅन मधेच येत असे. शाळेत बऱ्याचशा मुलांना तर माहीत ही नव्हते की रोहित आपल्या मुख्याध्यापक मॅडम चा मुलगा आहे म्हणून.

शोभना ने तिच्या कामाच्या आणि शिस्तीच्या बळावर शाळेला खूप चांगले नाव मिळवून दिले होते.

शाळेचा कामाचा ताण सांभाळूनही शोभना ने घराकडे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते, विशेषतः रोहित चे खाणे, पिणे, त्याचा अभ्यास, कपडे अगदी कुठेही ती कमी पडली नव्हती.

विजय मात्र तिच्या अगदी विरुद्ध. बँकेचे काम आणि वेळ मिळाल्यास वाचन या मधेच त्याचा वेळ जात असे. घरातले काम करणे त्याला कधीच जमले नाही.

नाही म्हणायला तो कधीतरी कामात मदत करायचे ठरवायचा पण मदत होण्यापेक्षा गोंधळच जास्त होत असे. आणि ह्यावरून मात्र त्याला  शोभना खूप बोलत असे. रागाच्या भरात कधीकधी अपमान देखील करत असे. असे झाले की मग तो गच्चीवर जाऊन एकांतात विचार करत बसत असे आणि आपण खूप अपराधी असल्याची भावना त्याच्या मनात येत असे.

रोहित मात्र असे प्रसंग पाहून खूप खिन्न होत असे.

परवा तसाच प्रसंग घडला. घरी पाहुणे येणार म्हणून शोभनाने विजयला बँकेतून येताना आंबे आणायला  सांगितले. घरी आल्यावर शोभनाने ते आंबे पाहिले आणि खूप भडकली.”अहो तुम्हाला काही समजतं का? उद्या पाहुणे येणार आणि तुम्ही एवढे कडक आंबे घेऊन आलात?  एक काम धड करता येत नाही.”

विजय म्हटला ,”अगं, मागच्या वेळी मी तयार आंबे आणले तरी तू रागावली होती म्हणून आज कडक आणले.”    

“अरे देवा, काय करू या माणसाचं. अहो तेव्हा आपल्याकडे मुलं राहायला येणार होती, त्यांना पंधरा दिवस खाता यावे म्हणून कडक आंबे हवे होते. तुम्ही पुरुष ना, घरामध्ये शून्य कामाचे.”

आणि मग शोभनाची गाडी घसरली. “तुम्हा पुरुषांना तर काहीही करायला नको घरासाठी. घर आंम्हीच आवरायचं, सगळ्यांची खाण्या पिण्याची व्यवस्था करायची, मुलांची तर सगळी जबाबदारी स्त्री चीच. तुमचा काय  रोल असतो सांगा बरं, मुलांच्या जन्मात आणि संगोपनात ; ‘तो’ एक क्षण सोडला तर? मुलांना नऊ महिने पोटात वाढवायचं, आणि प्रसूती सारख्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जायचं.

बरं एवढ्यावरच सगळं थांबत नाही, जन्मानंतरही त्यांचं फीडिंग, त्यांचं सगळं आवरणं, मग थोडे मोठे झाल्यावर शाळा, अभ्यास, डबे सगळं सगळं स्त्री नेच बघायचं, पुरुष कोणती जबाबदारी घेतो सांगा?”

विजय निरुत्तर. तरी शोभनाचं संपलेलं नव्हतं.

“तुम्ही काय फक्त पैसे कमवून आणता, पण आता तर स्त्रिया सुद्धा काम करतात, त्यामुळे त्याचीही तुम्ही काही फुशारकी मारू शकत नाही.”

आज मात्र विजय खूपच दुखावला गेला, शोभना च्या  बोलण्यात  agresiveness   असला तरी तथ्य देखील होते. स्वतः अगदी useless असल्याची भावना त्याला येत होती.

तो आपल्या नेहमीच्या एकांताच्या जागी जाऊन बसला. तेवढ्यात रोहित खेळून आला व त्याने पाहिले, आपले बाबा एकटे गच्चीत बसले आहेत व त्याच्या लक्षात आले, काय घडले असेल ते.

असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रोहित त्याच्या बाबांना म्हटला, “बाबा, उद्या आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे, मी पण भाग घेतला आहे. माझी इच्छा आहे तुम्ही पण यावे. येणार ना?”

विजय ने होकार दिला. खरं म्हणजे त्याची कुठल्याही समारंभात जायची इच्छा नव्हती पण रोहितचं मन राखण्यासाठी त्याने जायचं ठरवलं.

वक्तृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि स्पर्धेला विद्यापीठाचे कुलगुरु प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. शाळेसाठी आणि विशेषतः शोभना साठी फार महत्वाची बाब होती. विषय होता ‘मला सर्वात प्रिय व्यक्ती.’

भाषणं सुरू झाली. विजय शेवटच्या रांगेत बसला होता. मुलांनी खूप तयारी केली होती.  जवळजवळ सगळ्या मुलांची सर्वात प्रिय व्यक्ती ‘आई’ च होती. खूप सुंदर भाषणं सुरू होती. बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती,

जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केलं होते, कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

“व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे.

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्रीचा सन्मान. पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे. बाबांनी जे शिकवले, स्वतः ही तसेच वागले. 

माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले. तिला कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व स्वतः बसने जात. ते म्हणत ‘तुला घरातली सर्व कामं करून कॉलेजला जावे लागते खूप दमछाक होते तुझी.’ आणि  अश्याप्रकारे, आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या.

एवढंच नाही तर तीन वर्षांपूवी बाबांना बँकेमार्फत फोर व्हिलर गाडी मिळाली, त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले ‘तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटर ने. हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं ऊर्जेने भरपूर जायला हवं, कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल.’ 

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कोणीही कष्टकरी असो त्याला प्रेमाने वागवायला सांगत. कधीही छोट्या छोट्या व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत.

अगदी रस्त्यावरून जातांना एखादा ढकलगाडी वाला जात असेल तर त्याला आधी जाऊ देत. ते म्हणतात ‘आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन न्यायचं असतं.’

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात भोंगा पसरवला. घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला.

मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजुला नेऊन म्हटले, ‘मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग ठरव पुढे, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही.

आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतःच जबाबदार असलं पाहिजे. असं असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव, जे झालं त्याला कोण जबाबदार?’

बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडणं कुठेच गेलं. दुसऱ्या दिवसापासून मी घड्याळामध्ये अपेक्षित वेळेचा गजर लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे.

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी मूल्ये शिकवली. आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं.

आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्याला पैलू पडणारे जवाहीर आहेत.

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आई तर प्रिय आहेच, परंतु आईपेक्षाही बाबा मला माझे हिरो आहेत. माझे बाबा इज द ग्रेट..!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !”

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराचवेळ टाळ्या सुरू होत्या.

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले.

कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते. शोभनाला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला.

विजयला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली, आणि रोहित, रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते.

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले, “विजयराव पुढे या .”

तेव्हा विजय ने म्हटलं, “नाही सर,  लेडीज फर्स्ट..!”

प्रस्तुती – सुश्री रंजना नांगरे  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरात राहणारी बाई – भाग 2 (भावानुवाद) – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग २ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

मागील भागात  आपण पाहीलं – महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय… आता इथून पुढे 

‘अनुरोध … नाही… श्रीमान अनुरोधजी,

मी जात आहे. आपल्याला काही संधी मिळावी आणि आपण मला बाहेर काढावं, त्यापूर्वी मी स्वत:च निघून जातेय. बस… इतक्याच दिवसाची माझी आणि आपला साथ होती.आता आणखीन मी आपल्या सोबत राहू शकत नाही. क्षणभरसुद्धा नाही.

मी कुठे गेलीय, जाणून घेऊ इच्छिता? घ्या. मीच सांगते. आईकडे जातेय मी. चिता करू नका. अंधेरी ते पनवेल मी जाऊ शकते. आईकडे अशासाठी की ती जागा सुरक्षित आहे. आपण तिथे येणार नाही. माझ्या बाबांचं ( आपले सासरे होते पण आपण नेहमीच त्यांच्याशी शत्रू असल्यासारखे वागलात. ) निधन झालं, तेव्हा वाटत होतं, कदाचित याल आपण पण आपण घरी नाही, थेट स्मशानभूमीत आलात. तिथे येऊन आपण आपला मूल्यवान वेळ का खर्च केलात कुणास ठाऊक? बिझनेस सुरू करण्यासाठी सासरे पाच लाख रुपये देऊ शकले, नाहीत, तर त्यांच्या इंजिनिअर जावयाने त्यांच्या दाह संस्काराला कशाला जावं?डिलिव्हरीसाठी मी माहेरी गेले होते.बंटीला घेऊन परत आले, तेव्हापासून आपण माझा माहेराशी असलेला संबंध नेहमीसाठी तोडून टाकलात. एक-दोनदा बाबा इथे आले होते, या फ्लॅटवर  पण आपण त्यांच्याशी असे वागलात, जसा कुणी एलियन घरात शिरलाय.

आज बंटी तीस वर्षाचा आहे. कुठे आहे बंटी? माझा मुलगा…

मला अजूनही बेड रूममधून आवाज येतो. ‘बाबा दरवाजा उघडा ना!’

‘बाबा, मी अर्ध्या तासासाठी बाहेर येऊ इच्छितो. प्लीज… मला गुदमारायला होतय इथे.’   ‘पंखा वाढव. अशाने इंजिनीअर कसा बनशील? टॉप करायचाय तुला. मी जे करू शकलो नाही, ते तुला करून दाखवायचय. आपल्या नातेवाईकात कुणीच केलं नाही. असं काही तरी तुला करून दाखवायचय.’

करून दाखवलं त्याने. बोर्डात अव्वल नंबरने पास झाला. पिळाणीतून इंजिनीअर केलं. पण आपण त्याला एका क्षणासाठीसुद्धा मोकळा श्वास घेऊ दिला नाहीत. परिणाम काय झाला? ‘

कुठे गेला बंटी?’

‘मला माहीत नाही.’

‘अशी नाही सांगणार तू!’

‘…..’

‘बोल. कधीपासून तिथे जात होता?आता काय सांगून गेलाय? असं कसं जाऊ दिलास तू त्याला?त्याच्या शिक्षणावर माझे किती तरी लाख खर्च झाले. माझी सगळी स्वप्नं चूर चूर झाली.

आपले पैसे… आपली स्वप्ने… मला पहिल्यापासून माहीत होतं, तो इस्कॉन मध्ये जाऊन तासण तास बसतो. तिथे त्याला शांती, समाधान मिळतं. त्याने आपल्यासाठी चिठ्ठी ठेवली होती ना?

‘बाबा मी जातोय. आत्तापर्यंत आपण जे सांगितलंत ते मी ऐकलं. इच्छेने, अनिच्छेने. आपण आता काही सांगू नका. कारण आता मी आपलं ऐकणार नाही. मी माझा रास्ता शोधलाय. आपण त्याला मारमारून ‘हिरा’ बनवू इच्छित होता.  आपल्याला मारणच तेवढं येतं॰ तासणं, कोरणं नाही. मी माझा मुलगा गमावला. पण बंटी वाचला. आपल्या पकडीतून सुटून स्वामी श्रीपाद बनला. कुणा नशेड्याची आई बनण्यापासून देवाच्या दयेने मी वाचले.

लकने आपल्या जीवनाचा जोडीदार स्वत:च निवडला. काय करणार? आपल्याकडे वेळ कुठे होता तिच्यासाठी? अमेयला घेऊन आपला आशीर्वाद मागण्यासाठी आली होती नं? आपण तिला आपल्या नजरेपासून दूर व्हायला सांगितलंत. काय कमी आहे अमेयत? एका बॅंकेत अधिकारी आहे. जात वेगळी आहे. एवढाच. पण इतकंच नाही.. यापेक्षाही काही जास्त आहे. आणिते आहे आपला अहंकार. आपल्या परवानगीशिवाय, या घरात दुसर्‍या कुणाला श्वास घेण्याची परवानगी नाही. सीझर झाल्यानंतर पुलक सिरीयस झाली होती. त्यासाठी अमेयचा फोन आला होता. माझं रक्त मॅच होत होतं, म्हणून दिलं. धावपळ करत आपण येण्यापूर्वी घरी आले. सगळी परिस्थिती मी आपल्याला सांगितली. पण काय म्हणालात आपण?

‘मरू द्यायचं होतं तिला. आता ती काही माझी मुलगी नाही. ती माझी कोणीच लागत नाही.’  

‘पण माझी मुलगी आहे. मुलाला गमावलं. कमीत कमी मुलगी तरी हिसकावून घेऊ नका. ‘

उत्तरादाखल कमरेचा बेल्ट साप बनून मला डसू लागला. पाठीवर, कमरेवर उमटलेल्या खुणा हळू हळू  अस्पष्ट होऊ लागल्या. पण काळजाला झालेली जखम दिवसेंदिवस खोल खोल चरतच गेली.

पुलकने पुनीतचा पाचवा वाढदिवस साजरा केला. किती आग्रहाने बोलावलं होतं त्यांनी आपल्याला. कुठल्या आजीला वाटणार नाही की एका शहरात असलेल्या आपल्या नातीला भेटावं? तेदेखील पाच वर्षांनंतर? पण आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही. …. अमेयचा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. हॉस्पितलमधून फोन आला होता. आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही.माझी आई  ब्याऐशी वर्षाची आहे.एकटी रहाते. जायचं तर दूरच आपण तिच्याशी फोनवर बोलण्यालासुद्धा नकार दिलात. भाऊ याच शहरात राहतो. त्याच्या मुलाचं बारसं, घराची वास्तुशांत… अनेक कार्यक्रम झाले त्याच्याकडे. त्याने प्रत्येक वेळी बोलावलं. आपण नाही म्हणालात, त्यामुळे गेल्या बाबीस वर्षात मी त्याच्या घरी गेले नाही. त्याबद्दलही फारसं काही नाही. पण परवा आपण जे केलंत, ते अगदी असह्य झालं मला.

भावाच्या मुलाचा विवाह होता. मी आपल्याला सांगितलं, ‘त्याच्या घरातलं हे शेवटचं कार्य आहे.सगळे लोक, नातेवाईक येतील. किती तरी वर्षांनंतर माझी सर्वांशी भेट होईल. संध्याकाळी परत येईन.’

आपण म्हणालात, ‘’खबरदार जर घराच्या बाहेर पडशील तर’

‘फक्त यावेळेला जाऊ दे. एकदा डोळ्यांनी सगळ्यांना बघीन. मग पुढे आयुष्यात कधीही…’

‘गेलीस, तर परत येऊ नकोस. या फ्लॅटचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद झालाय, असा समज. मी तीन दिवसांनी चायनाहून परत येईन. गेलीस, तर लॅच बंद करून चावी आत टाकून जा. चावी मिळाली नाही, तर मी तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट करीन.’[

माझी तडफड झाली. अश्रूंची जशी झडी लागली. आणि आपण रात्री घरी उशिरा परत आलात. का? मला ‘चेक’ करण्यासाठी. माझी उत्कट इच्छा पाहून आपल्याला वाटलं होतं की आपण किती का नाही म्हणा ना, मी लग्नाला जरूर जाईन. आपण चायनाला जाणार असल्याचा मी जरूर फायदा उठवीन आणि आपण माझी चोरी पकडाल. जर मी तसं केलं असतं, तर आपण काय केलं असतंत? मला घराबाहेर काढलं असतंत, हेच नं? पस्तीस वर्षांचा माझा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या काळजाच्या तुकड्यांची, माझ्या मुलांचीसुद्धा पर्वा केली नाही. त्याचं हे फळ मिळालं मला. अनुरोधजी, चोरी मी पकडलीय आपली. आपल्याला त्या दिवशी चायनाला जायचच नव्हतं. त्या दिवशी आपला कुठेही बाहेर जायचा कार्यक्रम नव्हता. मला छ्ळण्यासाठी आपण हा खोटा बहाणा केला होतात. दिवसभर इथेच आपली मीटिंग होती. आपल्या ऑफीसमधून आलेल्या एका फोनमुळे माझ्या सगळं लक्षात आलं. आपला विश्वास मिळवण्यासाठी आता डावावर लावायला माझ्याकडे काहीही नाही. एवढं मात्र जरूर सांगेन की जो स्वत:वरचाच विश्वास गमावून बसलाय, तो दुसर्‍यावर विश्वास कधीच ठेवत नाही.

आपल्या शब्दात- मी म्हणजे घरात रहाणारी एक नालायक, निरुपयोगी बाई

– o –

अनुरोधने पत्र वाचून ते सेंटर टेबलवर असं भिरकावलं, जसं काही पेपरबरोबर आलेला कागदाचा फालतु तुकडा आहे. आता ते ड्रॉइंगरूमची खिडकी उघडून बाहेर बघू लागले. बाहेर रस्त्यावरून अनेक वाहने वेगाने धावत होती. अनुरोधला वाटलं, त्याची कार या धावणार्‍या वाहनात पुढे आहे. सर्व वाहनात त्यांची कार सगळ्यात पुढे आहे. एवढ्यात त्यांची कार अचानक थांबली. कुणी तरी हवाच काढून घेतली, त्यांच्या कारच्या चारही चाकांमधली. क्षणभरासाठी रस्त्यात चक्का जाम झाला. पण दुसर्‍याच क्षणी त्यांच्या कारच्या बाजूने रास्ता काढत सगळ्या वाहनांनी आपापला वेग घेतला.

– समाप्त

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरात राहणारी बाई – भाग १ (भावानुवाद) – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग १ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

 गजर होताच अनुरोध रोजच्याप्रमाणे उठून बिछान्यावर बसला. सेल फोन काढून त्याने वेळ पहिली. साडे पाच. त्याने गजर बंद केला. पलंगावरून उतरून स्लीपर घातले आणि ड्रॉइंग रूमकडे वळला.जाता जाता त्याने एक नजर शेजारच्या बिछान्यावर टाकली. तो रिकामा होता. हं! ही उठलीय तर!. अनुमतीचा बिछाना नेहमीप्रमाणेच साफ-सुतरा होता. एक सुरुकुती नाही. ब्घणार्‍याला मुली वाटलंच नसतं की रात्री कुणी इथे झोपलय. कधी दोन्ही बिछाने एकमेकांना जोदोन असायचे व त्यावर एकच बेडशीट घातलेली असेल, तर दोन वेगळे पलंग आहेत, असं वाटणारच नाही कुणाला. चार-पाच वर्षं झाली, दोनहीची मध्ये एक सेंटर टेबल असं ठेवलं गेलाय, की जसं काही दोन रुळांच्या मध्ये फिश – प्लेट आहे.

त्यांनी फोन सेंटर टेबलच्या हवाली केला. किचनमध्ये जाऊन काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसून रोजच्याप्रमाणे जलपान करू लागले. पाणी पिता पिता किचन कट्ट्याकडे लक्ष गेलं. एकदम अस्पर्शीत. पाण्याचा एक थेंब नाही की  वापरलेलं भंड नाही. ‘आज काला चहा न पिताच मॅडम फिरायला गेलेल्या दिसताहेत. ब्रश करून ते ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसले. एरवी, बसताक्षणीच चहा हजार होतो. आज माडम्ला फिरून यायला उशीर झालेला दिसतोय. काय करावं? चहाविणा शरीराच्या घड्याळाचा काटा जसा काही पुढे सरकताच नाही. मग काय, स्वत: बनवून घ्यावा?हा प्रयोग केला, त्याला किती दिवस झाले! दिवस नव्हे, महाराजा, महीने…! थोडा वेळ वाट बघू या. बनवलेला तयार मिळाला, तर सोन्याला सुगंध. करायला लागलो, तर कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल, कुणास ठाऊक?डब्यात साखर किंवा चहा पावदरच नसायची. सेलफातील डबे शोधत बसावे लागेल. त्याला डिसूझा साहेबांचं बोलणं आठवलं. ‘यार, किचनमध्ये काही शोधायला जा. आपल्याला हव्या त्या गोष्टीचा दबा सगळ्यात शेव ती मिळणार. तोपर्यंत पन्नास डबे उघडावे आणि लावावे. आणि काय बिशद यावेळी जिथे मिळालाय, तिथेच पुढल्या वेळी मिळेल. अनुरोध व्साहेब, हे कैचा म्हणजे घराच्या आत बायकांनी आपला बनवलेला किल्ला असतो. तिथून त्या आपल्या सार्‍या लढाया लढतात. म्हणून आपल्या किल्ल्याचा भेद कुणी जाणावा, असं त्यांना वाटतच नाही.’  

एका मिनिटानंतर कुणी तरी पायर्‍या चढत असल्याचा आवाज आला. किती वेळा तिला सांगितलं, सकाळी घाई असते. वर येण्यासाठी लिफ्टचा वापर कर पण नाही… ती जिना चढूनच वर येईल. या बाईला बेल वाजवण्यात काय अडचण वाटते, कुणास ठाऊक? दरवाजा जरा खटखटला. सगळ्या अपार्टमेंटचा साऊंड पोल्युशन कमी करण्याचा ठेका जसा काही हिने एकटीने घेतलाय. मॅगॅसेसे अवॉर्डच मिळायला हवं हिला.कुणास ठाऊक, कुठून कुठून काय काय शिकते?. तरी बरं, सगळी मासिकं बंद करून टाकलीत. हा टी.व्ही तो मात्र घरात राहणार्‍या बायकांची डोकी फिरवून टाकतो. दरवाजा उघडला, तर तर समोर वर्तमानपत्र पडलेलं होतं. पेपर घेऊन आत येऊन ते बसले. पण देहाचा घड्याळ…. त्यांनी पेपर बाजूला ठेवला आणि आत येऊन चहा करायला लागले.

चहाच्या पाण्याबरोबरच मनातही काही उसळू लागलं…. आज सांगून टेकन, माझ्या चहापर्यंत परत येणं होणार नसेल, तर किचन कट्ट्यावर सगळं सामान काढून ठेव. चिमटा नाही. कुठला कापड नाही. आता या काय मायक्रोवेव्हवर ठेवायच्या गोष्टी आहेत? समोरच्या भिंतीवर स्टँड लावून दिलाय या सगळ्या गोष्टींसाठी. सगळ्या गोष्टी समोर दिसायला हव्यात. टाईल्समध्ये भोकं पाडताना किती त्रास झाला होतं. पण काय फाडा? घरात तिच्याशिवाय आणखी कोणी रहातं, याचा विचारच नाही. काय सांगायचं, पस्तीस वर्षाच्या संसारात, किमता, सूरी, किंवा किल्ल्या कुठे ठेवायच्या, याच्यावर काही एकमत होऊ शकलं नाही. स्सालं… हे काय जीवन आहे? 

चहा… चहा नाही, कसला तरी कडवट द्रव झाला होता. पण अनुरोधाने सगळा पिऊन टाकला कप खाली ठेवता ठेवता संडासला लागले. त्यांनी उठून दरवाजा आतून लॉक केला. आता या दरम्यान आली तर… लॅचची चावी घेऊन गेलीच असेल. ती कुठे विसरते? चावी आणि मोबाईल… मुलगा आणि मुलगीही इतके आत्मीय नसतील.

टॉयलेटला जाऊन आल्यावर त्यांनी पेपरमधल्या हेडलाईन्स बघितल्या. मग ऑफीस बॅग उघडून डायरी काढली आणि आजच्या एपॉइंटमेंटस् बघू लागले. साडे दहा वाजता सुप्रवायझर्स बरोबर मीटिंग होती. .भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे नजर गेली. ‘अरे, सात वाजले. हद्द झाली हिच्यापुढे. ही बाई वेडी-बिडी झालीय का? साडे आठची लोकल चुकली, तर वेळेवर पोचणार तरी कसे? ? ही खरोखर बेअक्कल आहे. खरंच एम. ए. झालीय ना? की वशिला लावून किंवा लाच देऊन सर्टिफिकेट मिळवलय?  हा… हा… मला तरी त्या वेळी काय सुचलं कुणास ठाऊक? चांगल्या इंडस्ट्रीअ‍ॅलिस्टच्या मुलीची ऑफर आली होती. शिकलेली, अगदी रियल सेन्सने. त्या काळात बी.ई. केलं होतं. म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी. आज असती तर आपलीसुद्धा ‘इन्फोसिस’ असती. ‘इन्फोसिस’ राहीलं. छोटी-मोठी कंपनी तर असतीच असती. पण बापाला आपल्या अ‍ॅग्रीकल्चर मित्राला उपकृत करण्याची पडली होती न!’

एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. त्याने पाहीलं, दरवाजाची वरची कडी आतून बंद केलीय. टॉयलेटला जाताना आतून कडी लावलेली असणार. थोडा वेळ बाहेरच उभं राहूदेत मॅडमना. तेव्हा कळेल, नवर्‍याला बॅग हातात घेऊन दरवाजाशी वेट करताना काय वाटतं?

– o –

  ‘ तू करतेस काय, एवढा वेळ दरवाजा उघडायला लागला ते?’

  ‘ मी ऑफीसला जात नाही, याचा अर्थ असा नाही की, दरवाजात उभी राहून आपली वाट बघत राहू? एक मिनीटसुद्धा झालं नाही बेल वाजून.’

   ‘तुम्हा घरात राहणार्‍या बायकांना कसं कळणार एका मिनिटाचं महत्व.

‘नोकरी करण्याची इच्छा कुणाला नव्हती? बोला ना! आपल्या बुटांना पॉलीश करण्यासाठी आणि आपण ऑफीसमधून परत आल्यावर बॅग हातात घेण्यासाठी बाई हवी होती घरात. कुणाला नोकरी करायची असेल, तर करणार तरी कशी?’

 बालकमंदिरातल्या दीड हजाराची नोकरी करण्यापेक्षा घरात राहून नवर्‍याच्या बुटांना पॉलीश करणं जास्त किफायतशीर आहे. ‘

– o –

दरवाजाची कडी काढताच एक विचित्र असा वास त्यांच्या नाकाला स्पर्श करत झापझाप करत पुढे निघून गेला. ‘ही भांडीवालीसुद्धा न …! थोडी दुरून जाऊ शकत होती ना! अनुमतीने डोक्यावर चढवून ठेवलय. नोकरांशी कसं वागावं, एवढही हिला कळत नाही. ’सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी त्यांनी ड्रॉइंग रूममधली खिडकी उघडली आणि खुर्ची पुढे ओढून पेपर उचलला. एका बातमीवर त्यांची नजर रेंगाळली. ‘सकाळची फिरत असताना टॅक्सीवाल्याने उडवलं.’ हे टॅक्सीवाले पण ना, खूप फास्ट चालवतात. सकाळी सकाळी ट्रॅफिक कमी असतो, म्हणून तर आणखीनच फास्ट. पोलीस नसतो, ना सिग्नल . असे जातात की जसा काही रास्ता त्यांना हुंड्यात आंदण मिळालाय. … अनुमतीलासुद्धा नीट रस्त्याने चलता येत नाही. पुढे कमी आणि मागे जास्त बघते. 

   ‘अठ्ठावनची झालीये. काही फरक पडणारच की चालण्यात!’

   ‘इथे मुंबईत ऐंशी वर्षाच्या बाया पळत सिग्नल पार करतात. पण तुला काय माहिती?’

‘ज्यांना रोज जावं लागतं, त्यांना सवय झालेली असते. मला तर कधी तरीच घराच्या बाहेर पडावं लगतं. तेही पूर्व परवानगीने. पूर्ण शोध घेऊन आणि पडताळणी करून ‘पोलीस इंन्क्वायरी’त समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच….. आईला भेटायला तर निघाली नाहीस ना… भावाने तर बोलावलं नाही ना… मुलगा तर भारतात आला नाही ना…. की मुलीने बोलावलय, नातीला आजीची आठवण आली म्हणून … सतराशे साठ प्रश्न.’

  ‘साहेब, आज मेंसाहेब नाही आहेत का?’

  ‘ का? बेसीनमध्ये भांडी तर आहेत ना?’

  ‘ होय, पण डिशवॉश लिक्विड संपलय. ‘

  ‘जेवढं असेल, तेवढ्याने आज काम चालव, नाही तर राहूदेत भांडी, तू जा. मला आंघोळीला जायचय.’

भांडीवाली निघून गेली, तशी ते उठून बेसीनशी आले. लिक्विड डिश वॉशचा पाऊच उचलून पहिला. खरोखरच संपला होता. ‘किती वेळेला सांगितलंय, मागायची वेळ यायला नको. बाथरूममध्ये संबण संपायला येत असतानाच दूसरा काढून ठेव. पण नाही…. या, घरात रहाणार्‍या बायका दिवसभर घरात काय करत असतात, कुणास ठाऊक? … अरे, पण हिला आज झालय काय? दुधाची पिशवी फ्रीजमध्ये पडलेली आहे. हां… भाजी. पार्कच्या जवळ सकाळी पालेभाज्या घेऊन भाजीवाले उभे असतात. जेव्हा बघावं, तेव्हा उचलून आणते आणि निवडत बसते दिवसभर. नोकरी करणार्‍या बायका हे काम हिंडत-फिरत किंवा येता-जाता करतात. कळतसुद्धा नाही, कधी भाजी निवडून टाकतात. पण यांच्यासाठी… हे एक मोठ्ठं काम असतं. काय करणार? कोणत्या कोणत्या गोष्टींवर म्हणून वाद घालायचा. जोडीदार वेगाने चालणारा असला, तर जीवन सुसह्य होतं. जाऊ दे झालं. सगळ्यांनाच, सगळं कुठलं मिळायला आणि लग्नं हा तर खरोखर नशिबाचा खेळ आहे. लॉटरी आहे लॉटरी! चला साहेब, आंघोळ करून घ्या.  आली तर उभी राहील बाहेर.

आंघोळ झाल्यावर येऊन घड्याळ पाहीलं. सात चाळीस. ‘ ओफ्हो! आता काय खाक ब्रेक फास्ट बनणार आणि काय खाणार? अजब बाई आहे. माझ्याच नशिबाला आली … पण इतका उशीर आजपर्यंत कधीच झाला नाही. चला महाराज, लोकांना मार्केटिंग शिकवता. थोडी मार्केटिंग घरातच करावी. इगो सोडा आणि मोबाईल लावून पहा. काही अ‍ॅक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल ना!’

‘…. …. …. ‘

अरे, तिचा फोन तर इथेच वाजतोय. हा इथे फ्रीजवर आहे. मग काय मोबाईल घेऊनच गेली नाही. कमाल आहे. महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय…

– o –

क्रमश: – भाग १

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares