सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ बिन आडनावाची पोर – भाग – 1 … श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
‘थोडी कळ काढ ! थोडी कळ काढ बाई !!.’… बाजूला बसलेली सुईण व दोनचार बायका तिला धीर देत होत्या…तिला प्रसूती वेदना अगदी असह्य झाल्या होत्या.. कारण बाळ फिरलं होतं ..डोक्याऐवजी पाय खाली आले होते…ती वेदनेने ओरडत होती. कळीने हात पाय मारत होती. शेवटी झाली एकदाची प्रसूती….पण तिला वेदना इतक्या असह्य झाल्या होत्या की.. प्रसूती होताच ती बेशुद्ध पडली..सुईणीने बाळ हातात घेतल्याबरोबर ती समजली…हे बाळ राक्षस आहे.. कारण बाळ दिसायला काळेकुट्ट व विचित्र होते.. त्याचं डोकं बरंच मोठं होत… आणि डोळेही ..बाळाला दातदेखील आले होते.. बाजूच्या बायकांना सुईणीने ती गोष्ट सांगितली व दात देखील दाखवले… बिचारी त्या बाळाची आई… ती तर बेशुद्ध होती.. सुईणीने ही बाब बाळाच्या बापाला व गावातील इतर लोकांना सांगितली… ते बाळ बघून सगळ्यांची खात्री झाली की, हे नक्की राक्षस आहे.. रूढी- परंपरेप्रमाणे गावातील लोकांनी लागलीच बाभळीच्या काटेरी फांद्या तोडून आणल्या.. व त्यावर ते नुकतंच जन्माला आलेलं बाळ पातळ कापडात गुंडाळून ठेवले…त्याचबरोबर त्या लहान गोळ्याचे अंग रक्तबंबाळ झाले… बाळ जोर- जोरात रडत होते… मन हेलावून टाकणारे भयंकर दृश्य होते ते.. मात्र त्या निर्दयी लोकांना कसलीही दया-माया नव्हती.. कारण आत्तापर्यंत असे कितीतरी राक्षस त्यांनी काटयावर नेवून जंगलात टाकले होते…गावकऱ्यांनी याही बाळाला तसंच त्या काटयावर ताणत ताणत न्यायला लावले.. तान्ह्या बाळाचा भयंकर रडण्याचा आवाज… …त्या भयानक दृश्याचे वर्णन तरी काय करावं ?… ..त्याची आई तर बेशुद्धच होती. तिला याविषयी काहीच कल्पना नव्हती… बाप समाजाच्या बंधनात जखडलेला होता. पण मग ती जर शुद्धीवर असती तर आई म्हणून तिने याला विरोध केला असता?.. की, समाजाच्या भीतीने तीदेखिल या क्रूर प्रथेला बळी पडली असती.?……
निर्दयी गावकऱ्यांनी ते जिवंत नवजात बाळ काटयावर ताणत दूर जंगलात नेऊन टाकले..आता बाळाचा रडण्याचा आवाज बंद झाला ..काम झालं ! असं बोलून त्यांनी नारळ फोडला… व…गावकरी परत निघाले….ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ते बाळ मेलेलेच जन्माला आले.. असं तिला नवऱ्याने सांगितलं …
… मध्यरात्र झाली ..या भयाण अंधाऱ्या रात्री एक सावली त्या बाळाजवळ येत होती..हळू हळू ती सावली त्या बाळाजवळ आली . ..काटयावरील बाळाला त्या सावलीने चाचपले.. बाळ जिवंत होतं .. त्या सावलीने बाळ उचलले व ती सावली बाळाला घेऊन गेली…
हळूच झोपडीचे दार उघडले. म्हातारीने आणलेले बाळ अंथरूण करुन त्यावर ठेवले.. सुरुवातीला म्हातारीने बाळ गुंडाळलेल्या फडक्यात काही मिळते का ते पाहिले…फडके उघडल्याबरोबर तिला दिसले की ते बाळ एक मुलगी आहे, ती मुलगी रक्ताने पूर्ण माखली होती… त्या असह्य वेदनेमुळे तिची रडण्याची शक्तीही संपली होती… त्या फडक्यात घरच्यांनी प्रथा म्हणून ठेवलेले पाच पन्नास रुपये म्हातारीला मिळाले.. ते पाहून आपली मेहनत वाया गेली नाही याचे समाधान तिला झाले.. ती उठली .. तिने ते पैसे तिच्या नेहमीच्या पेटीत ठेवले.. व सकाळी काढून माचीवर ठेवलेले बकरीचे दूध चमच्याने त्या मुलीला पाजायला सुरुवात केली… आणि काय चमत्कार…. त्या मुलीने ते दूध घोट घोट करत प्यायले….हे पाहून म्हातारीला मनोमन आनंद झाला….
—- शांता….. सासू-सासरे आणि नवऱ्याच्या त्रासाने ती अगदी हैराण झाली होती.. कारण काय तर तिला मूल नव्हते..आतापर्यंत तिला तीन मुलं झाली पण.. जन्माला आल्यावर लगेच ती मेली….ही भुताळी आहे… आपल्या मुलांना खाते ! असे टोमणे सासू नेहमीच तिला मारे.. त्यात सासरा व नवरा हे देखील सामील. ते तिला नेहमीच टोचून बोलत… या रोजच्या जाचाला शांता अगदी कंटाळून गेली होती.. नेहमी तोच तोच विचार करुन ती मनोरुग्ण झाली.. काही – बाही बडबडायला लागली.. त्यामुळे घरच्यांनी शांताच्या माहेरच्या लोकांना बोलावून पंचायत भरवली. ती भुताळी आहे असे ठरवले.. व अगदी दूर जंगलात हाकलून दिले….
क्रमशः…
लेखक : चंद्रकांत घाटाळ
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२