मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिले – ‘ठीक आहे. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन! उद्या प्लॅनिंग मिटिंगच्या वेळी भेट होईलच.‘ आता इथून पुढे )

प्लॅनिंग मिटिंग दहा वाजता आयोजित केलेली होती. मी जरा लवकरच तयार होऊन बाहेर पडलो. विचार असा केला की हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये काही लोकांच्या भेटी-गाठी होतील. खोलीला कुलूप लावून लिफ्टच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकली, इतक्यात मागून आवाज आला, ‘बलदेवजी, एक मिनिट…..मी थांबलो. हातात टॉवेल, आणखी काही कपडे, साबण वगैरे घेऊन मल्लिका जवळ जवळ पळतच माझ्यापाशी येऊन पोचली. ‘आमच्या मजल्यावर पाण्याचा काही प्रॉब्लेम झालाय. आपल्या शेजारच्या रूममध्ये ३०७मध्ये, सूरतची माझी एक परिचित ब्रॅंच मॅनेजर उतरलीय. विचार केला की तिच्या खोलीत आंघोळ आवरून घेईन. पण बहुतेक ती बाथरूममध्ये असावी कारण ती दार उघडत नाहीये. आपलं आवरलं असेल, तर मी आपल्या बाथरूमचा वापर करू का? अर्थात आपली काही हरकत नसेल तर… मी किल्ली कौंटरवर देऊन जाईन.’ 

क्षणमात्र  मी किंकर्तव्यमूढ होऊन गेलो. मग, कुठल्या संमोहनात मी खोलीची किल्ली तिचाकडे सोपवली, कुणास ठाऊक?

प्लॅनिंग मिटिंगच्या नंतर लंच आयोजित केलेला होता. मल्लिका पुन्हा एकदा सौंदर्यप्रेमींच्या गराड्यात घेरली गेली. पण यावेळी ती माझ्याकडे लगेचच आली.

‘आपण खूपच उशीर केलात. आपल्या जागी दुसरा कुणी असता, तर झोनल मॅनेजरने दहा गोष्टी ऐकवल्या असत्या. पण सौंदर्यापुढे भले भले हत्यार टाकतात, हेच खरे. पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध झाली.‘ मी सुरुवात केली. ‘आपल्याला स्तुती करण्यासाठी काही तरी बहाणा हवा होता. बस्स! वर-खाली करता करता उशीर झाला. आंघोळ करून वर माझ्या रूमवर गेले, तर लक्षात आलं, माझ्या रूमची चावी मी खोलीतच विसरून आले. मग पुन्हा पळाले.  हॉटेलपासून या डिव्हिजन ओफीसला रिक्षाने दहा-पंध्रा मिनिटे लागतातच.’ मल्लिका बोलत होती आणि मी तिच्या नजरेतून झरणारे मोती आपल्या पापण्यांनी टिपत होतो.

‘ संध्याकाळी काय प्रोग्रॅम आहे?’ मी विचारलं.

‘खास असा काही नाही. आज शनिवार आहे. मेहुणे आज बहुतेक लवकर घरी येतील. इथून सरळ त्यांच्याकडेच जाईन. पाचच्या सुमाराला हॉटेलमध्ये परत येईन. जमलं तर थोडा आराम करेन. संध्याकाळी मार्केटमधून मुलीसाठी छोटी-मोठी काही खरेदी करेन.’

‘काय वय आहे मुलीचं?’

‘चार वर्षाची आहे. केजी-वनमध्ये आहे.

‘काय योगायोग आहे? माझी मुलगीदेखील केजी-वनमध्ये आहे.’

‘अच्छा! आणि मिसेस बलदेव पण कुठे नोकरी करतात का?’

‘करत होती. एका प्रायव्हेट बँकेत….  पण ती आता या जगामध्ये नाही. दोन वर्षांपूर्वी एका कार-अॅतक्सीडेंटमध्ये गेली.’

‘ओह… आय अॅेम सॉरी. मी विचारायला नको होतं!’

‘नाही. तसं काही नाही. जीवनातील सत्याकडे पाठ फिरवून किती दिवस जगता येईल? कार मी स्वत:च चालवत होतो. आम्ही सगळेच जखमी झालो, म्हणजे मी, आई, विथी वगैरे… पण वास्तवीच्या मेंदूला मोठी जखम झाली. ऑन द स्पॉट ती गेली. त्या दुर्घटनेनंतर मी कार चालवणं सोडून दिलं. ….’

‘असं ऐकलय, इथे सूटिंग्ज, शर्टिंग्ज चांगलं मिळतं.’

‘ होय! मिळतं! पण कुणासाठी घेणार? ज्यांच्यासाठी घेत होते, त्यांच्या-माझ्यामध्ये इतकं अंतर पडलय, की कोणत्याही गोष्टीमुळे ते अंतर पार करता येणार नाही. ठीक आहे. संध्याकाळी भेट होईलच. ही आपल्या खोलीची चावी. सकाळी घाईघाईत कौंटरवर द्यायची विसरले.

हॉटेलची खोली उघडताच त्यातून येणार्या- अलौकिक गंधाने मी रोमांचित झालो.  खोलीतील काना-कोपरा चुगली करत होता की कुणी अप्सरा इथे येऊन आपलं प्रतिबिंब सोडून गेलीय. खोलीतून येत असलेला सुगंध खूप वेळपर्यंत टिकून राहावा, म्हणून मी तत्काळ फॅन बंद केला.

सहा वाजता मल्लिकाने दरवाजावर टकटक केली. मी पडलो होतो. उठून दार उघडताच  ती बेधडक आत शिरली. मी दहा मिनिटात तयार झालो, तोपर्यंत ती खोलीतील पेपर, मासिके चाळत राह्यली. दोघांनी रेस्टॉरंटमध्ये एकेक कप चहा घेतला आणि खरेदीसाठी बाहेर पडलो.

एका दुकानात मी विथीसाठी एक डझनभर फ्रॉक उलटे-पालटे केले, पण मला एकही पसंत पडला नाही. दुसरीकडे मल्लिकाने चार फ्रॉक आणि एक साडीही सिलेक्ट केली. ‘ यापैकी आपण कोणतेही दोन फ्रॉक विथीसाठी ठेवून घ्या उरलेले दोन मी निधीसाठी ठेवते.’

‘आच्छा! म्हणजे आपल्या मुलीचं नाव निधी आहे तर!’

‘हो.’

‘आणि ही साडी काय आपण आपल्यासाठी घेतलीत?’

‘नाही… नाही… ही साडी आपण खरेदी करायची आहे. आपल्या आईसाठी.. त्यांना सांगा, बडोद्यात कुणी भेटली होती. तिच्या पसंतीची आहे. मला आशा आहे, त्यांना जरूर पसंत पडेल.’

एकदम मला वाटलं, मी काही तरी विसरलोय आणि मल्लिकाने मला त्याची आठवण करून दिलीय.

‘आपण फ्रॉकशिवाय काहीच घेतलं नाहीत?’

‘घरी निधीशिवाय फक्त माझी आई आहे. प्रथम भावाजवळ रहात होती. मी निधीला घेऊन वेगळी राहू लागले, तेव्हापासून ती माझ्यासोबत रहाते. किंवा असं म्हणा, की मला तिची सोबत आहे.’

‘मग त्यांच्यासाठी साडी किंवा आणखी काही…’

‘मागच्या आठवड्यातच आम्ही इथे येऊन राहून गेलो होतो. बहिणीच्या घराची वास्तुशांत होती. त्यावेळी आईसाठी दोन साड्या घेतल्या होत्या. आज बहिणीने आणखी एक दिली.’

‘आपण आपल्यासाठी काहीच घेतलं नाहीत.

‘त्यात मजा नाही.’

‘म्हणजे?’

‘म्हणजे…’ असं म्हणून तिने आपली जीभ चावली. मग पुढच्या काही क्षणात स्वत:ला सावरत बोलू लागली, ‘एक गोष्ट अशी की घरात साड्यांचा ढीग लागलाय. दुसरी गोष्ट अशी की स्वत:च खरेदी करायचं आणि स्वत:च वापरायचं यासाठी मन अजून पूर्णपणे तयार झालं नाही.’

तिचं बोलणं ऐकून मनात अनेक रंगांचे पक्षी फडफडले. मग मनात आलं, कशात काय अन् फटक्यात पाय….

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – ‘रिसायकल-बिन में मल्लिका’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

माझा बडोद्याला जाण्याचा कार्यक्रम काही पूर्वनियोजित नव्हता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसात पोचलो, एवढ्यात विभाग प्रबंधकांनी मला बोलावलं आणि सांगितलं, की एका व्हिजिलन्स- केसचे कागदपत्र आणण्यासाठी मला तत्काल बडोद्याला जायला हवं. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर आतल्या आत गुदगुल्याही होऊ लागल्या. गुदगुल्या अशासाठी की मल्लिकाची अनायासेच भेट होईल आणि चकित अशासाठी झालो की तिची भेट एवढ्या अवकर होऊ शकेल, ही गोष्ट माझ्या स्वप्नातदेखील आली नव्हती. हे म्हणजे, एखाद्या तृषार्त झाडावर अनपेक्षितपणे पाऊस पडावा, तसं घडलं होतं. मल्लिकेची आठवण तर खूप होत होती, पण कशा तर्हे्ने पुढे बोलणं करावं, हे काही कळत नव्हतं. कदाचित मल्लिकेचीही इच्छा असेल की पुढाकार माझ्याकडून घेतला जावा. असं अर्थात् माझं अनुमान. तिने सहजपणे, ‘डायव्हर्स मंजूर झाला’, एवढंच बोलून इतिश्री केली होती.

आई तर जशी काही संधीच्या शोधात होती. तिने सगळं ऐकताच, माझ्या मागेच लागली. मी बडोद्याला जाऊन मल्लिकाशी स्वत:च बोलायला पाहिजे. म्हणाली, ‘अरे, तिने जर घटस्फोटाची बातमी आपणहून तुला सांगितली, तर त्याचा अर्थ असा की तिने चेंडू तुझ्या पारड्यात टाकलाय. आता पुढाकार तू घेतला पाहिजेस.’

‘अग आई, पण तू समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीयेस? ती घटस्फोटीत जरूर आहे, पण दिसायला इतकी सुंदर आहे की तिच्याशी लग्न करायला कुणी करोडपतीही सहज तयार होईल.’

‘पण असं जर असतं, तर ती तुझ्याशी वारंवार का बोलत राहिली असती? तुला माहीत आहे, अनेकदा ती लॅंडलाईनवरून विथीशीही बोलली आहे.’

मल्लिकाची आणि माझी ओळख सुमारे पाच वर्षांपूर्वी बडोद्यातच झाली. तिथे आमची झोनल लेव्हलवरची कॉन्फरन्स होती. जेवणाच्या सुट्टीत किती तरी अधिकारी मल्लिकाला गराडा घालून उभे होते. कुणी कुणी तर मधे घुसून तिचं अभिनंदन करत होते. चालू वर्षाच्या दुसर्या  तिमाहीत मल्लिकाचा परफॉर्मन्स आमच्या वेस्टर्न झोनमधे सर्वात उत्कृष्ट झाला होता. त्यामुळे तिला प्रथम पुरस्कार देऊन तिचे कौतुक केले गेले होते. मला तिसरा पुरस्कार होता, त्यामुळे कॉन्फरन्समधे मीही निमंत्रित होतो. या तिमाहीत बर्यातचशा शाखा मायनस राहिल्या होत्या. आशा परिस्थितीत मल्लिकाने चाळीस टक्के वाढ केली होती. मी साधारणपणे बारा टक्के वाढ केली होती. त्यासाठी मला दिवस–रात्र एक करावा लागला होता.

‘कमेंडेबल परफॉरमन्स इनडीड’ झोनल मॅनेजरने पुरस्कार प्रदान करताना मल्लिकाला म्हंटलं होतं. मल्लिका याच वर्षी सेंट्रल झोनमधून ट्रान्सफर होऊन आली होती आणि मी तिला आज प्रथमच पहात होतो. नुसताच पहात नव्हतो, तर चांगलाच प्रभावितही झालो होतो. अतिशय सुरेख होती मल्लिका. इतकी सुंदर की जो बघेल, तो बाकी सगळं विसरून बघतच राहील तिच्याकडे. मनात विचार आला, इतकी सुंदर स्त्री ज्या क्षेत्रात जाईल, त्या क्षेत्रात यशस्वी होणारच. मल्लिका स्वत: हात पुढे करत करत इतरांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होती. हे सगळं पहात असताना माझ्या मनात सहजच विचार येऊन गेला की काही लोक केवळ स्पर्शसुख मिळवण्यासाठी मल्लिकाशी हस्तांदोलन करत आहेत. अर्थात तसं असलं, तरी मला काय त्याचं? ते तर तिला स्वत:लाच समजायला हवं. बायका तर असल्या गोष्टींच्या बाबतीत अधीकच संवेदनाशील असतात. आता ती स्वत:च आपला स्लीव्ह-लेस हात पुढे करते आहे, तर मला का जळफळायला व्हावं? मी स्वत:च स्वत:ला समजावलं आणि मल्लिकापासून थोडी दूरची जागा घेतली. थोड्याच वेळात मला जाणवलं की मल्लिकाची नजर माझाच वेध घेत माझ्यापर्यंत पोचली आहे. गुळाभोवती माशा गुणगुणायला वेळ लागला नाही. आता मल्लिका माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे. मी काही करणार, इतक्यात मल्लिका स्वत:च माझ्यापाशी पोचली आणि हात पुढे करत म्हणाली, ‘आपण बलदेवजी आहात नं?’

‘हो. आपण चाळीस टक्के व्यवसाय वाढवलात, त्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्याभोवती इतकी गर्दी होती की मी विचार केला, सगळ्यांचं भेटून झाल्यावर आपण नंबर लावावा.’ मी एक अनावश्यक खोटं जोडून दिलं.

‘आपल्याला नंबर लावायची काही गरज नाही. मी स्वत:च आपल्याला भेटू इच्छित होते. मी या झोनमध्ये नवी आहे. आल्यानंतर गेल्या दोन वर्षातली बिझनेस स्टेटमेंटस बघितली. गेली दोन वर्षे आपण आपल्या झोनमध्ये नंबर वन आहात. मी स्वत: आपल्याकडून जाणून घेऊ इच्छित होते की हा चमत्कार आपण कसा केलात? माझी परिस्थिती तर दुसर्याप क्वार्टरमधेच पातळ झालीय.’

‘आपल्याला पाहून काही तसं वाटत नाही आणि जर खरोखरच तसं असेल, तर मी म्हणेन, देव करो आणि अशी स्थिती प्रत्येकाच्या नशिबी येवो.’

‘स्तुती करणं ही एक कला आहे आणि महाशय आपल्याला ती चांगलीच अवगत आहे. ठीक आहे. आपण कुठे उतरला आहात?

‘हॉटेल ग्रीन-व्हॅली. ३०४ नंबर. आणि आपण?

‘मी पण तिथेच उतरले आहे. ४०७ मध्ये. खरं तर माझी धाकटी बहीण इथे बडोद्यातच रहाते. मेहुणे एस.बी.आय. मधे आहेत. पण मी त्यांच्या घरी जाण्यापेक्षा हॉटेलमध्ये रहाणं प्रीफर केलं. बडोद्यात ट्रान्सफर मिळावी, अशी इच्छा होती पण त्यांनी मला भाडोच दिलं. भोपाळमध्ये तशीही चार वर्षं झाली होती. बदली होणारच होती.’

‘ठीक आहे. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन! उद्या प्लॅनिंग मिटिंगच्या वेळी भेट होईलच. ‘  

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – ‘रिसायकल-बिन में मल्लिका’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || मालक ||…भाग 2 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ || मालक ||…भाग 2 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

(११ नोव्हेंबर : वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, सोमवार दिनांक २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! मा. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं !) ……   

श्री मंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणात मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळाने ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे “तताबाबा” म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.

आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, ” इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा “. मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली. त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्याबरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, ” पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील का ?”  काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी दुस-याला देऊन टाकल्या.

मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.

मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही. त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हा केव्हा गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.

नाटक नसलं की, रिकाम्या वेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. वऱ्हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पदाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने  डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !

मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. ” हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ,” असं सारखे मला म्हणायचे. आपली पाचही मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !

मालकांनी पुण्याला श्रीनाथ थिएटरसमोर असलेल्या रस्त्यावरील रेवडीवाला बोळात शुक्रवार पेठेत घर घेतलं, तेव्हा गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेऊन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !

मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, ” ते आमचे कुलदैवत आहे,” असे ते म्हणायचे !

मालकांनी “बलवंत सिनेटोन” ही चित्रपट कंपनी काढून, ” कृष्णार्जुन युद्ध ” हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप… फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !

मंगळवार दिनांक १६ डिसेंबर १९४१ चा तो दिवस. लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हा मालकांनी आपल्या लताचं गाणं घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, ” माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही “. मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, “म्हारा मुजरा”. मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !

मालकांनी लताचं गाणं ऐकलं, पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं…… 

— समाप्त —

— माई मंगेशकर 

शब्दांकन : श्री उपेंद्र चिंचोरे

ईमेल – [email protected] 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 2 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 2 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

(अप्पासाहेबांनी अगदी हौसेने त्याला लागून पार बांधला होता. आम्ही हळूहळू चालत त्या पारावर जाऊन बसलो.)  इथून पुढे —

‘‘ तुझ्या वहिनीने दीपकला पैशांची जमवाजमव करायला सांगितली होती. तुला कदाचित्  माहिती नसेल, पण रिटायर झाल्यावर मिळालेल्या सात लाखांपैकी दोन लाख रुपये मी घरावर खर्च केले होते… अर्धा प्लॉट रिकामाच होता, त्यावर बांधकाम करून घर आणखी वाढवलं होतं, आणि चार लाख रुपये दीपकला दिले होते.”

‘‘ चार लाख? इतकी मोठी रक्कम त्याला देऊन टाकलीत तुम्ही?”

“ हो ना. काय झालं… एम्.ई. झाल्यानंतर सूरजला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे त्याच्याबद्दलची काळजी मिटली. पण बी.ई. झाल्यावर दीपकला नोकरी मिळत नव्हती. तो तर एम्.बी.ए. पण झालेला आहे. पण तरीही कितीतरी दिवस त्याला नोकरी मिळाली नाही. मग आता त्याने एम्.आय्.डी.सी. मध्ये स्वत:चं एक प्रॉडक्शन युनिट सुरू केलंय. बँकेकडून त्याने थोडं कर्ज घेतलं, आणि चार लाख मी दिले.”

‘‘ बरं. पण मग आता पैसे देण्याबद्दल काय म्हणाला तो?”

‘ म्हणाला… की आत्ता दोन लाख रुपयांची सोय करणं त्याला शक्य नाहीये… ‘ अजून माझा व्यवसाय नवा आहे. आणि दरमहा बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठीच खूप आटापिटा करावा लागतोय् अजून मला.’ ”

‘‘ अरे बापरे… मग सूरज…?”

‘‘ सूरजने तर आधीच सांगून टाकलं होतं, की त्याने त्याच्या सोसायटीकडून आणि प्रॉव्हिडंड फंडातूनही कर्ज काढलं, तरी पन्नास हजार रुपये मिळणंही कठीण आहे.”

‘‘ पण अप्पासाहेब, मी तर तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय ना, की पैशांचा काही प्रश्न असेल तर मला सांगा म्हणून. नोकरीत असतांना तुम्ही इतक्या संस्थांना मदत केली आहेत, की तुमचं नुसतं नाव सांगितलं तर तीन लाख रुपये सहज गोळा होतील. फक्त सांगायचाच अवकाश…”

‘‘ ही गोष्ट तुझ्या वहिनीने जेव्हा सुचवली, तेव्हा दोन्ही मुलं आणि सुना केवढे संतापले… म्हणाले की, तुमच्या उपचारांसाठी तुम्ही अशा प्रकारे वर्गणी गोळा करुन या शहरात, समाजात आमची बदनामी करू बघताहात.”

‘‘ त्यांचं बोलणं सोडून द्या अप्पासाहेब. मी आजच काही सोसायट्यांच्या प्रमुख अधिका-यांची मिटिंग बोलावतो, आणि त्यांच्याशी चर्चा करून आठवड्याभरात तीन लाख रुपये उभे करून दाखवतो.”

‘‘ अरे अजून माझं बोलणं संपलं नाहीये रवी. हे बघ, मी एका दिवसात फक्त तीनच नाही, तर तीस लाख रुपये उभे करु शकतो. फक्त सांगायचाच् अवकाश… कुणीही या घराचे एका तासात तीस लाख रूपये देऊन जाईल… पण…”

‘‘ माफ करा अप्पासाहेब, पण खरं सांगतो, तुमची मुलं इतकी अविचारी असतील यावर माझा विश्वासच बसत नाहीये.”

‘‘ नाही रवी, ते अविचारी नाहीयेत्. पण ते जेवढा विचार करतात, तेवढा विचार आपण आयुष्यात कधीही केला नाही. रात्री तुझ्या वहिनीने दोन्ही मुलांना समोर उभं करून इतकं कठोरपणे काय काय सुनावलं, आणि घर विकून माझ्यावर उपचार करण्याबाबत सांगितलं, तेव्हा सूरज काय म्हणाला माहिती आहे?”

‘‘ काय म्हणाला?”

‘‘ म्हणाला, ‘ येऊन-जाऊन एवढं एक घर तर आहे आपल्याकडे. आता त्याच्यावरही डोळा आहे का तुमचा? बाबांच्या हाताखाली काम करणा-यांकडे लाखोंची संपत्ती आहे आज. पण बाबा?… आयुष्यभर फक्त प्रामाणिकपणा आणि ईमानदारी, यांचेच गोडवे गात राहिले… बाकी काहीच केलं नाही. आज जर बँकेत त्यांचे पाच-दहा लाख रूपये शिल्लक असते, तर उपयोगी नसते पडले का अशावेळी? डॉ. अख्तर यांचं वीस दिवसांचं बील पन्नास हजार झालं होतं… तिथेच आमची पास-बुकं रिकामी झाली. आता घर विकलं तर आपण सगळेच उघड्यावर येऊ.’– हे ऐकून तुझी वहिनी गप्पच झाली. सूरज आणखी असंही म्हणत होता की, ‘ मम्मी तू तुझ्या स्वत:चाही विचार करायला हवास. माझा पगार इतका कमी आहे, की मी माझ्या कुटुंबाचाच खर्च कसा तरी भागवतो आहे. आभाची नोकरी तर पार्टटाईमच आहे… आणि आज आहे… उद्या असेल की नाही सांगता येत नाही. तुम्हा दोघांनाही बहुतेक माहिती नसावं की, या नोकरीसाठी मला कॉलेजच्या मॅनेजमेंटला रोख चाळीस हजार रुपये द्यावे लागले होते…’ सूरजचं समर्थन करणं चालूच होतं, इतक्यात दीपकही बोलायला लागला. ‘ मम्मी, मी बाबांच्या ऑपरेशनबद्दल माझ्या डॉक्टर मित्रांचंही मत घेतलंय. त्यांचं मत असं पडलं की, बाय-पास् जरी केली, तरी ते ऑपरेशन नक्की यशस्वी होईल, असं खात्रीने सांगता येणार नाही. उपचार पद्धती आता खूपच प्रगत झाल्या आहेत असं आपण कितीही ठामपणे म्हणत असलो, तरी आजही ५०% ऑपरेशन्स अयशस्वी ठरताहेत. असं असतांना, हे ऑपरेशन अयशस्वी ठरलं, तर बाबांच्या नशिबात जे घडायचं असेल, ते घडेलच… पण तीन लाख रुपये मात्र उगीचच वाया जातील.’  सूरजने पण दीपकच्या म्हणण्याला दुजोरा दिला. वर असंही म्हणाला की, ‘ जरी ऑपरेशन यशस्वी झालं, तरी बाबा अजून किती वर्षं जगतील?… दोन वर्षं, चार वर्षं… फार फार तर दहा वर्षं. त्यामुळे आता असा विचार करायला पाहिजे की ज्या माणसाने त्रेसष्ठ वर्षं हे जग पाहिलंय्, तो आणखी दहा वर्षं जगला, म्हणून असा काय मोठा फरक पडणार आहे त्याच्या आयुष्यात? मुख्य म्हणजे ऑपरेशननंतर बाबा काही कामही करू शकणार नाहीत. कुठली धावपळ सुद्धा करू शकणार नाहीत. उलट तुलाच एखाद्या लहान मुलासारखी त्यांची सतत काळजी घेत बसावं लागेल. अशा व्यक्ती साठी आज तीन लाख रुपयांवर पाणी सोडणं, हा कोणता शहाणपणा आहे? आमचं तर अजून सगळं आयुष्य बाकी आहे. तेच पैसे आम्हालाच कशासाठी तरी उपयोगी पडतील मम्मी. विचार कर जरा.’… हे सगळं बोलणं मी ऐकलं होतं. म्हणूनच तुझी वहिनी जेव्हा नंतर माझ्या खोलीत आली, तेव्हा तिने काही सांगायच्या आधीच, मी माझा निर्णय तिला सांगून टाकला… ‘ हे बघ… ऑपरेशनचं नुसतं नाव ऐकूनच प्रचंड भीती वाटायला लागली आहे मला. त्यामुळे, मी अजिबात ऑपरेशन करून घेणार नाही… आणि हा माझा ठाम निर्णय आहे. देवाची जशी मर्जी असेल, तसं जाईल माझं पुढचं आयुष्य.’ “

… हे सगळं बोलताना कितीतरी वेळा अप्पासाहेबांच्या पापण्या फडफडत होत्या… आणि तितके वेळा डोळ्यातलं पाणी तिथेच थोपवलं गेलं होतं हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. विषय बदलायचा म्हणून मी विचारलं…

‘‘ मग वहिनी काय म्हणाल्या? ”

‘‘ काय म्हणणार?… काहीच बोलली नाही. रात्रभर तिची उशी मात्र ओली होत राहिली होती. सकाळी उठून पाहिलं तर काय… तिचा सगळा दिनक्रमच बदलून गेलेला दिसला. तिने किचन आपल्या ताब्यात घेतलं…. देवघरही आधीच स्वच्छ करून ठेवलं होतं. मी दिसताच मला बजावून सांगितलं… “ आजपासून अंघोळ झाली की आधी पूजा करत जा तुम्ही .” तिचं ऐकावं लागलं… आणि आत्ता देवघरात देवासमोर बसून, जीवनाचं हे गणित त्याच्याकडून समजावून घेत होतो… तू मला माफ करशील, अशी आशा करतो मी रवी.”

—अप्पासाहेब दोन्ही हात जोडून माझ्यासमोर उभे आहेत. त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी एक शब्दही सापडणं अशक्य वाटतंय् मला. गळा इतका दाटून आलाय्… काहीच बोलूही शकत नाहीये मी. उठून त्यांना नमस्कार करत मी माझ्या घरी परत चाललो आहे… विचारात पडलो आहे की नात्यांना आकडे समजून, त्यानुसार मांडलेली फायद्या-तोट्याची गणितं, कुठल्याही पाटीवर मांडली, तरी उत्तरं एकसारखीच तर असणार ना….  

— समाप्त —

मूळ हिंदी  कथा – ‘स्लेट पर उतरते रिश्ते’ –  कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 1 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 1 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

‘‘ वहिनी, ऑपरेशनचा निर्णय असा अचानक का बदलला गेला, हे जाणून घेण्यासाठी मी फार अधीर झालो आहे. सगळंच तर ठरलं होतं… अपोलो हॉस्पिटलने तारीखही दिली होती, आणि आज रेल्वेचं रिझर्वेशनसुद्धा करायचं होतं… मग अचानक असं झालं तरी काय?”

“ हे सगळं तुम्ही तुमच्या भावालाच विचारा… तेच तुम्हाला सगळं सांगतील. तुम्ही बसा. मी आत गॅसवर दूध ठेवलंय्…” आणि एवढं बोलून वहिनी, म्हणजे सौ.आगरकर आत निघून गेल्या.

मी फार अस्वस्थ झालो होतो… वैतागलो होतो. सकाळी मस्त चहा पीत बसलो होतो, तेवढ्यात फोन आला होता…

‘‘रवी, मी अप्पा बोलतोय्.”

‘‘ बोला अप्पासाहेब.”

‘‘ तू अजून रिझर्वेशन केलं नाहीयेस ना?”

‘‘ नाही. पण आता अंघोळ करून, पंधरा मिनिटातच निघणार आहे स्टेशनवर जाण्यासाठी.”

‘‘आज नको जाऊ मग.”

‘‘ का?”

‘‘ काही नाही रे. जरा विचार करतो आहे, की ऑपरेशन नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. अजून दोन-चार वर्षं ढकलली गेली तरी पुरे. वर्षं काय… दोन…चार महिने गेले तरी पुरे. तसंही आता पुढचं आयुष्य म्हणजे बोनस मिळाल्यासारखंच आहे ना !”

‘‘ अप्पा, हे असं काय काहीतरी बोलताय् तुम्ही? मी आधी रिझर्वेशन करून टाकतो, आणि तिथून तसाच थेट तुमच्या घरी येतो. वाटलं तर नंतर रद्द करता येईल.”

‘‘ नाही रवी, आता ऑपरेशन वगैरे काही करून घ्यायचं नाही, असा निर्णय घेतलाय् मी…” असं म्हणून त्यांनी फोन कट केला. मी पुन्हा त्यांना फोन लावला. पण फोन उचललाच गेला नाही. माझ्या उत्सुकतेची जागा आता अस्वस्थपणाने घेतली होती.

दोन मुलं, दोन सुना, एक नातू, अप्पासाहेब, त्यांची बायको, आणि अन्वर… इतकी सगळी माणसं रहातात या घरात. पण इथे हे सगळं घर किती सुनंसुनं वाटतयं.. तेही इतक्या सकाळी-सकाळी. जशी काही रात्रभर वादळाशी झुंज देत होतं हे घर… इथे रहाणारे सगळे… हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येते आहे… अरेच्चा, हे घड्याळ तर अगदी तस्संच आहे… डॉ.अख्तर यांच्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं तसं. आणि त्यादिवशी अप्पासाहेबांना नेमक्या त्याच हॉस्पिटलमध्ये तर घेऊन गेलो होतो आम्ही… काय करावं हे तर थोडावेळ सुचलंच नव्हतं आम्हाला. फार तर सकाळचे सात वाजले असावेत तेव्हा… मालटेकडीवरून उतरून, स्टेशनच्या रस्त्याने आम्ही घरीच परतत होतो. सकाळी फिरायला जातानाचा आमच्या सगळ्यांचा हा ठरलेला रस्ता आहे. रेल्वेचा पूल क्रॉस करून राजकमल चौकात यायचं, आणि तिथे एकेक कप चहा प्यायचा, हेही ठरलेलंच होतं. चहाचे पैसे कुणी द्यायचे, यावरून आम्ही एकमेकांना कंजुष ठरवून टाकायचो. मग सगळ्यांनी मिळून पैसे द्यायचे असं ठरवलं जायचं. असा मजेत, गप्पा मारत वेळ घालवत असतांना, कुणीतरी स्वत:ला आवडणारं वर्तमानपत्र विकत घ्यायचा. आणि मग तिथून आम्ही आपापल्या घरची वाट धरायचो… पण एक दिवस, याच सगळ्या गोष्टी सुरू असतांना अचानक लक्षात आलं की अप्पासाहेब मागेच राहिले होते.

माझी आणि अप्पासाहेबांची ओळख खूप जुनी आहे. पण सकाळी फिरायला जाण्याच्या आमच्या या ग्रुपमध्ये ते गेल्या वर्षीपासूनच यायला लागले आहेत. पण या वर्षभरात, मालटेकडी चढतांना ते मागे पडलेत, किंवा रस्त्यावरून चालतांना ते मागे राहिलेत, असं कधीच झालेलं नव्हतं. त्रेसष्ठ वर्षांच्या अप्पासाहेबांना आम्ही कधी कधी चेष्टेच्या सुरात म्हणायचो सुद्धा, की, ‘‘अप्पासाहेब, ‘रजिस्ट्रार ऑफ को.ऑप.सोसायटीज्’ या पदावरून तुम्ही निवृत्त झाल्यापासून, तुमचं वय वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमीच व्हायला लागलंय् असं वाटतंय्”… पण त्या दिवशी मात्र छातीत प्रचंड दुखायला लागल्यामुळे कळवळणा-या अप्पासाहेबांना पाहून, आमच्या या ग्रुपमधल्या आम्हा सहाही जणांना अक्षरश: घाम फुटला होता…

‘‘नमस्कार  साहेब. वहिनीसाहेबांनी तुमच्यासाठी चहा पाठवलाय्. साहेब पूजा करून यायलाच लागलेत.”

‘‘अरे अन्वर, इतका वेळ कुठे होतास तू? दिसला नाहीस.”

‘‘ मी मागच्या बाजूच्या कुंड्यांना पाणी घालत होतो.”

‘‘ आणि इतर कुणी दिसत नाहीयेत्. अंकितही नाही दिसला.”

‘‘ हो अंकितबाबा शाळेत गेलाय्. सूरजदादा सकाळीच कॉलेजला गेलेत. जातांना वहिनीसाहेबांना सांगितलं त्यांनी की त्यांचे एक ज्येष्ठ सहकारी रजेवर आहेत, त्यामुळे त्यांचे तासही दादांनाच घ्यावे लागत आहेत. मोठ्या वहिनीपण विदर्भ महाविद्यालयात पार्ट-टाईम काम करतात, त्यांची जायची वेळ होत आली आहे, म्हणून त्या आवरताहेत.”

‘‘आणि दीपकदादा? ”

‘‘ ते धाकट्या वहिनींना स्टेशनवर पोहोचवायला गेले होते ना पहाटेच. मग आता आल्यावर झोपलेत. ते उशिरानेच जातात फॅक्टरीत.”

… अन्वरने घरातल्या सगळ्या माणसांची अगदी पूर्ण माहिती दिली खरी मला, पण का कोण जाणे, मला असं वाटत होतं, की त्याने खूप काही लपवलंही होतं माझ्यापासून. घरातल्या मोजक्या सगळ्या व्यक्तींबद्दल आत्ता मला माहिती देणारा अन्वर, हा तो अन्वर नाहीये, जो डॉ.अख्तर यांच्या हॉस्पिटलमध्ये वीस दिवस अप्पासाहेबांची चोवीस तास सेवाशुश्रुषा करत होता. ते वीस दिवस अनेक जणांना अन्वर एकच एक प्रश्न वारंवार विचारत होता… ‘‘अप्पासाहेब पूर्ण बरे होतील ना साहेब?” अप्पासाहेब आणि अन्वर, दोघे एकाच ऑफिसमध्ये होते. आणि एकाच दिवशी निवृत्त झाले होते, हा जरी एक निव्वळ योगायोग असला, तरी दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नव्हती. निवृत्त झाल्याच्या लगेच दुस-या दिवशी, अप्पासाहेबांचा हा ऑफिसमधला चपराशी, त्यांचा मदतनीस म्हणून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आता त्यांच्या घरी ड्यूटी करायला लागला होता…

‘‘अच्छा, तू आला आहेस तर… तुला रहावलं नाही ना? मी ऑपरेशनचा विचार का सोडून दिला, याच्यावर भांडणार आहेस का आता माझ्याशी? ”

‘‘नाही अप्पासाहेब. अहो वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे मी… तुमच्याशी कसला भांडणार? पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये… डॉक्टरांनी जर अगदी स्पष्ट सांगितलंय् की ‘ बायपास करणं अत्यावश्यक आहे, आणि तेही जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर…’ मग तुम्ही…”

‘‘ हे बघ रवी. मी डॉक्टरांना त्यांचा सल्ला विचारला होता. म्हणून त्यांनी तो दिला. कोणत्याही गोष्टीवर सल्ला द्यायचा असेल तर सरकार सल्लागार-समिती स्थापन करते. पण त्या समितीचा सल्ला ऐकणं हे सरकारसाठी अनिवार्य तर नसतं ना?”

‘‘आप्पासाहेब, पण आत्ता आपण सरकारी कामाबद्दल बोलत नाही आहोत. तुम्ही चेष्टा करणं बंद करा आणि मुद्द्यावर या.”

‘‘ तू वैतागशील हे मला माहितीच होतं. चल बाहेर अंगणात जाऊन बसू… हो… अगदी हळूहळू चालत येतो मी. तिथेच बसून बोलू या. खूप दिवस झाले, तुझ्याबरोबर पायी चालणं झालंच नाहीये माझं…”

अंगणात एक जरासं छोटेखानी आंब्याचं झाड होतं. अप्पासाहेबांनी अगदी हौसेने त्याला लागून पार बांधला होता. आम्ही हळूहळू चालत त्या पारावर जाऊन बसलो.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी  कथा – ‘स्लेटपर उतरते रिश्ते’ –  कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशिबाने थट्टा मांडली…भाग – 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ नशिबाने थट्टा मांडली…भाग – 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध : मागील भागात आपण पाहिले –  दलालाने म्हटल्याप्रमाणे पहिलवानाच्या पुतळ्याचे भरघोस पैसे मिळाले. आता इथून पुढे )

झाले एवढे खून बस्स झाले….  खून? हो. खूनच नाहीतर काय? तर एवढे पैसे भरपूर झाले. हे घेऊन इथून निघायचं. दलालाच्या नकळत. दलाल सोन्याचं अंडं देणारी कोंबडी हातची जाऊ देणार नाही. आपल्या गावी परतायचं. पैसेवाला म्हटल्यावर काय? काहीच कमी नाही पडायचं. मोठं घर बांधायचं. एखादी विधवा बघून लग्न करायचं. तिला आधीच थोडीफार कल्पना द्यायची. शारीरिक सुख सोडलं, तर घर,पैसे, प्रतिष्ठा ,सुरक्षितता …तक्रार करायची गरजच पडणार नाही तिला. पण तिला तसं वाटेल का? की ती दुस-या कोणाशी संबंध….

तरीही गावी परतायचंच,हे त्याने नक्की केलं आणि दलाल एका बाईला घेऊन आला. बाई कसली, तरुणीच होती ती.

दलाल गेल्यावर तो म्हणाला,”अंगावर एकही कपडा नको.”

“काsय?”

“घाबरू नका. मी कलावंत आहे. माझ्यासाठी तुम्ही निव्वळ एक नमुनाकृती आहात. एक पुरुष म्हणून माझ्यापासून तुम्हाला कोणताही धोका होणार नाही, याचं मी आश्वासन देतो.” 

तिने कपडे उतरवले. 

” तुम्हाला नृत्यमुद्रेत निश्चल उभं राहावं लागेल. पाय मुरली वाजवणा-या कृष्णासारखे. एक पाय सरळ. दुसरा त्याच्यावर वळवून त्याची फक्त बोटं जमिनीला टेकलेली. वरचं शरीर नृत्यमुद्रेत . मान उजवीकडे वळलेली.”

मग ती त्या मुद्रेत उभी राहिली. खूप आकर्षक मुद्रा होती ती.

“ठीक आहे. याच स्थितीत तुम्हाला रोज आठ-दहा तास उभं राहावं लागेल. अजिबात हलता येणार नाही.”

“बाप रे! आठ-दहा तास?”

“कठीण आहे. मला माहीत आहे, खूप कठीण आहे ते. पण ते सोयीचं व्हावं, म्हणून मी एक द्रव तयार केला आहे. तो अंगावर शिंपडला, की त्या अवस्थेत राहणं ,फारसं अवघड जात नाही.”

  त्याने तिच्या पायावर अरिष्ट शिंपडायला सुरुवात केली.

  “काय आहे यात? वनस्पतींपासून सिद्ध केलंय, असं वाटतं.”

  “मी सांगू शकत नाही. गुरूंची अनुमती नाही,”त्याने उगीचच सांगितलं.

  “हेच. माझे वडील वनौषधितज्ज्ञ होते. वेगवेगळ्या वनस्पतींपासून वेगवेगळी रसायनं, लेप, काढे, आसवं, अरिष्टं बनवायचे आणि लोकांना खडखडीत बरं करायचे. पण त्या औषधी कशा सिद्ध करायच्या, ते कोणाला  सांगणं तर सोडाच, त्याची कुठे नोंदही केली नाही त्यांनी. कारण हेच. गुरूंची अनुमती नाही. शेवटी रानात वनस्पती गोळा करायला गेले असताना त्यांना विषारी नाग चावला. त्यांनी स्वतः कितीतरी लोकांचं विष उतरवलं होतं. पण नक्की काय करायचं, ते दुस-या कोणालाच माहीत नव्हतं. ते स्वतः बोलूही शकत नव्हते. त्यातच ते गेले.”

  “अरेरे!” तिच्या पोटावर अरिष्ट शिंपडत असताना तो क्षणभर थांबला आणि पुन्हा त्याने आपलं काम सुरू केलं.

  “मी त्यांना मदत करायला तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. शिष्या म्हणून मला…” थोडं थांबून तिने घाबरत घाबरत विचारलं,” तुमची हरकत नसेल तर एक विचारू?”

  तो काहीच बोलला नाही. फक्त अरिष्ट शिंपडत राहिला.

मग तिनेच धीर करून विचारलं,” तुमच्यात काही कमी आहे का?”

निर्विकारपणे तिच्या छातीवर अरिष्ट शिंपडता शिंपडता तो थांबला. क्षणभरासाठी त्याने रोखून तिच्याकडे पाहिले, पण बोलला काहीच नाही. त्याने पुन्हा अरिष्ट शिंपडायला सुरुवात केली.

“मी वडिलांबरोबर जायचे ना, त्यामुळे काही वनस्पतींची नीट माहिती झाली. काही औषधे कशी सिद्ध करायची, तेही शिकले. त्या औषधांच्या मात्रा वगैरे सगळं माहीत झालं. नपुंसक पुरुषाचं  पुरुषत्व कसं जागृत करायचं, ते कळलं. तेवढ्या एकाच व्याधीवर उपचार करू शकते मी. वडील गेल्यानंतर मी दोघांना पुरुषत्व मिळवून दिलं. दोघेही सुखाने संसार करताहेत. एकाची बायको गरोदर आहे.  वडिलांनी केलेली चूक मी करणार नाही. मी सगळं तपशीलवार लिहून ठेवणार आहे.”

तो काहीही न बोलता अरिष्ट शिंपडत होता.

“मघाशी मी विव…. म्हणजे कपडे नसतानाही तुम्ही ज्या निर्विकारपणे माझ्याकडे बघत होता, त्यावरून मला वाटलं. हे ..जर.. खरं.. असेल.. तर ..मी .. ब..रं.. क..री..न….तु….म्हा…….” बोलताबोलता मूर्च्छा आल्यासारखी ती निःशब्द झाली. म्हणजे डोळे उघडे होते; पण तिचा पुतळा झाला होता.

नियती आपल्याशी भयंकर खेळ खेळलीय, हे मेंदूपर्यंत पोचल्यावर तो सुन्न झाला. कितीतरी वेळ तो तसाच बसून होता.

अचानक साक्षात्कार झाल्यासारखा तो उठला. कदाचित संशोधकाने त्या अरिष्टाचा प्रभाव उतरवणारा उतारा शोधूनही काढला असेल.

मनात धुगधुगती आशा घेऊन तो संशोधकाकडे निघाला. कितीतरी काळ गेला होता, त्याला संशोधकाला भेटून. तो जंगलात राहत असेल अजून, की पूर्वायुष्यात परतला असेल?

संशोधक त्याच्या पूर्वीच्या जगात सुखी होईल कदाचित. पण आपलं काय?

आपण पूर्वायुष्यात परतायचं म्हणतोय, पण दलाल आपल्याला सोडेल काय? त्याचे हात लांबवर पोचले आहेत. त्याची हाव आपल्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही.

झोपडी तशीच होती. बाहेरचा कुत्राही तसाच होता. पण अंगणात पालापाचोळा पसरला होता. वातावरणात दुर्गंध भरून राहिला होता. संशोधक सगळं स्वच्छ ठेवायचा. कदाचित निघून गेला असेल तो.

तो झोपडीत शिरला. आतलं भयंकर दृश्य बघून त्याच्या अंगावर काटा आला. संशोधकाच्या  पोटापासून खालचा भाग आणि मनगटापासूनचे हात निश्चल झाले होते. बहुधा अपघाताने त्यावर अरिष्ट सांडलं असावं. पंचा चिंब भिजल्यामुळे ते आतपर्यंत पोचलं असावं. बरेच दिवस झाले असावेत या घटनेला. कारण संशोधकाचा वरचा भाग कुजून गेला होता. झोपडी त्याच दर्पाने भरून गेली होती.

त्याचं डोकं गरगरू लागलं. संशोधक, लोभी दलाल, त्याने पुतळे करून मारून टाकलेली सगळी माणसं, विशेषतः ती परोपकारी, निरागस तरुणी….. सगळे आपल्याभोवती गरगर फिरताहेत, असं त्याला वाटू लागलं. एकंदर प्रकाराने तो एवढा खचून गेला की……

त्याने स्वतःचे कपडे काढून टाकले. अरिष्टाचा रांजण भरलेला होता. ओट्यावर एक भांडं होतं. ते रांजणात बुडवून आतलं अरिष्ट तो स्वतःच्या अंगावर ओतत राहिला. आयुष्यात स्वकर्तृत्वावर उभं राहण्यासाठी त्याला ठाम टेकू दिल्याचा आभास निर्माण करणा-या पायांवर, मग त्या नाकर्त्या अवयवावर, दाही दिशा फिरायला लावणा-या पोटावर, निधडी-भरदार या सर्व विशेषणांच्या विरुद्ध असलेल्या छातीवर, मध्यंतरीच्या काळात ताठ होऊ पाहणा-या मानेवर, जगापासून लपवाव्याशा वाटणा-या चेह-यावर आणि शेवटी निरपराध माणसांच्या आयुष्याशी खेळ करण्याचं दुष्कृत्य करणा-या त्या हातांवर.

– संपूर्ण –

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आव्हान ! — (एक सत्यकथा)… भाग – 1 — श्री प्रमोद टेमघरे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ आव्हान ! — (एक सत्यकथा)… भाग – 1 — श्री प्रमोद टेमघरे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

मॅनेजर साहेब केबिनमध्ये, डोके गच्च धरून बसले होते. त्यांच्या अविर्भावाकडे पाहून माझ्या लक्षात आले की, नुकताच वरिष्ठ कार्यालयातून फोन येऊन गेलेला दिसतोय. एक बरे असते, डोके हातात धरले की स्वतःला डोके आहे याची खात्री पटते. 

मी बावळट चेहरा करून आत शिरलो. चिंता जास्त असली की साहेबांच्या कपाळावरचे आठ्यांचे आडवे जाळे अधिक विस्तारते. मी त्यांना दुःखी सूर काढून विचारले, ” काय झाले साहेब? “

डबल दुःखी स्वरात साहेब उत्तरले, ” नेहमीसारखे- वरचे साहेब झापत होते. आपल्या शाखेत अजून सहाशे लोन डॉक्युमेंट, ‘टाइमबार’ आहेत म्हणून. ताबडतोब रिन्यू करा म्हणाले.”

ही गोष्ट १९८२ सालची. मी नुकताच बँकेच्या या पेण शाखेत अधिकारी म्हणून बदली होऊन आलो होतो. बँकेने कर्ज दिल्यानंतर, कर्जाच्या कागदपत्रांचे दर तीन वर्षांनी, ‘नूतनीकरण’ करावे लागते. म्हणजे कर्जदाराला प्रत्यक्ष भेटून या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घ्याव्या लागतात. अशी सहाशे कर्जदारांची कागदपत्रे ‘मुदतबाह्य’ झाली होती.

तांत्रिक दृष्ट्या हा प्रश्न नक्कीच गंभीर होता. पण वस्तुस्थिती अशी होती की, ही सर्व ‘खावटी’ कर्जे आदिवासी, कातकरी आणि ठाकर जमातीला पूर्वी दिली गेली होती. एका राजकीय समारंभाची ही देणगी होती. 

हे सारे कर्जदार, पेणला लागून असलेल्या सह्याद्रीच्या उपरांगातून दुर्गम जंगलात राहत होते. तिथे जायला फक्त डोंगरात चढत जाणारी पायवाट आणि सोबत जाणकार असेल तरच ती पायवाट सापडेल अशी स्थिती. सगळ्या कर्जदारांना भेटायचे तर पन्नास साठ किलोमीटर जंगलात चालत, भटकावे लागणार. कर्जदाराऐवजी वाघाची गळाभेट होण्याची शक्यता जास्त ! त्यामुळे कोणाचीही या कामासाठी जाण्याची हिम्मत नव्हती. 

प्रत्येक कर्जदाराच्या कर्जबाकीची रक्कम काही फार मोठी नव्हती. अगदी रुपये तीस पासून दोनशे पर्यंत फक्त. व्याजदर ४%. पण एकूण कर्जदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे मुदतबाह्य कागदपत्रेही खूप. कागदपत्रांवर पत्ता शोधला तर विराणी कातकरी पाडा, ठाकरपाडा, वाघमारे पाडा, पड्यार पाडा, अशी अनेक पाड्यांची नावे होती.

मी मामलेदार ऑफिसमध्ये जाऊन, गाववार इलेक्शन यादी शोधण्याचा प्रयत्न केला. पण हे पाडे आणि माणसांची नावे काही आढळली नाहीत. (त्यावेळच्या इलेक्शन यादीत हे आदिम मानव भारताचे नागरिकच नव्हते). थोडक्यात, प्रत्यक्ष जाऊन शोध घेणे हाच मार्ग बाकी होता.

पेण परिसरात कातकरी आणि ठाकरं या आदिवासी जमाती जंगलात राहात आहेत. पूर्वी या महाल मिऱ्या डोंगरात, खैराची झाडी विपुल होती. कातकरी आदिवासी या खैराच्या झाडांना बुंध्यावर कोयत्याने खाचा पाडायचे. यातून जो चीक/काथ (खायच्या पानात वापरताच तो), गोळा होईल तो, जवळच्या गावात जाऊन विकायचा. काथ विकणारे हे ‘काथोडी’ म्हणजेच कातकरी.

यांच्यासारखीच आदीम जमात ठाकरांची. ठाकरं डोंगरात अजून दुर्गम भागात वीस- पंचवीस कुटुंबांचे पाडे करून वस्ती करतात. दिवसभर कष्ट करून झाडावरची सुकी लाकडे गोळा करायची, त्याची मोळी बांधायची आणि पेणला येऊन विकायची. मध गोळा करायचा, हरडा, बेहडा, वाघनखी, नरक्या, रानहळद, काळी मुसळी, यासारख्या औषधी वनस्पती गोळा करायच्या आणि गावात येऊन मुकादमाला विकायच्या. हे मुकादम आदिवासींकडून अत्यंत कमी किमतीत या औषधी वनस्पतींची खरेदी करून, औषध कंपन्यांना जास्त किमतीत विकून गब्बर झालेले होते. 

ठाकरं डोंगर उतारावर नाचणी पिकवायचे. जंगलातून कंद, फळे, रानभाज्या मिळवायचे. ओहळात बांबूच्या सापळ्यात, नाहीतर लुगड्यात, मासे पकडायचे. अधून मधून घोरपड, रानडुक्कर, भेकर, ससे यांची शिकार करायचे. पेणमध्ये दर मंगळवारी बाजाराच्या दिवशी, ओले काजूगर, बोंडू, जांभळे, तोरण, करवंदे,मध, रानभाज्या आजही ही ठाकरं आणि कातकरी विकतात.

माझे मूळ गाव पेण, त्यामुळे या परिसराची मला माहिती होती. त्यातच, कॉलेजच्या वयात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जवळजवळ तीनशे किल्ले भटकलो होतो. जंगलात मुक्काम केला होता. अरण्य वेद, वनस्पतिशास्त्र, याचा थोडाफार अभ्यास होता. पेण परिसरातील, पेणपासून सात-आठ किलोमीटर अंतरावरचा सांकशीचा किल्ला, महाल मिऱ्या डोंगर परिसर, जवळचे सुधागड, धनगड, सरसगड, अवचित गड, तळगड, कर्नाळा, प्रबळगड, माणिक गड, असे सारे किल्ले भटकलो होतो. त्यामुळे नोकरीतले, कागदपत्रे नूतनीकरणाचे आव्हान मी स्वीकारले. सोबतीला कोणीतरी असणे आवश्यक होते. 

आमच्या शाखेत भावे म्हणून क्लार्क होता. यूथ होस्टेलमार्फत हिमालयात भटकून आलेला. तो लगेच माझ्यासोबत यायला तयार झाला. पेणमध्ये सहकार खात्यात, वडगावचे ठाकुर पाटील कर्जवसुली अधिकारी होते. माझी त्यांची ओळख होती. तेही सोबत यायला तयार झाले. त्यांनी त्यांच्या शेतावर काम करणार्‍या, ‘मंगळ्या’ नावाच्या ठाकर जमातीतल्या तरुणाला, पायवाटा शोधणारा माहितगार म्हणून बरोबर घेतले.

मग ठरले. मी साहेबांना सांगितले, “आता तीन-चार दिवस आम्ही या कागदपत्रे नूतनीकरण मोहिमेवर जंगलात जातोय. आमचा संपर्क नसेल. पण मोहीम फत्ते करूनच येऊ.” घरच्यांना कल्पना दिली. चार दिवस पुरेल असा शिधा सोबत घेतला. बँकेत बसून, सहाशे नूतनीकरणाचे सेट, स्टॅम्प पॅड, पावती पुस्तक, कर्जदारांची यादी, सोबत घेतली. सर्वात महत्वाचे म्हणजे, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून, पाटील यांनी त्यांची परवाना असलेली ‘ठासणीची बंदूक’ सोबत घेतली. सर्व तयारी होईपर्यंत दुपार झाली. बँक मॅनेजर साहेबांच्या आशेने भरलेल्या डोळ्यांकडे पाहत, आम्ही पेणचा निरोप घेतला.

वडगावमार्गे सह्याद्रीच्या डोंगरावर पायवाटेने चढायला सुरुवात केली. जंगल सुरु झाले. आजूबाजूला ताम्हण, कुंभा, पळस, पांगारा, उंबर, बहावा, आंबा, जांभूळ, चिंच, काजू, यासारखी वेगवेगळी झाडे, झुडपे आणि रानवेली लागत होत्या. सारा चढ होता, पण हातापायात तरुणाईच बळ होतं, निसर्गाचं वेड होतं, आणि भटक्यांची सोबत होती. 

मंगळ्याच्या तीव्र दृष्टीला दूरवर एका उंच झाडावर चढलेले कातकरी दिसले. चला, पंधरा-वीस कातकरी भेटणार म्हणून झपाट्याने त्या दिशेने निघालो. जवळ गेलो तर ते सारे तिथून पळून जाताना दिसले. हाका मारल्या तरी सर्व गायब झाले. अस्वलाच्या अंगावर केस असावे तशी आजूबाजूला गर्द झाडी होती. त्या झाडीत ते गुडूप झाले. 

कातकरी आणि ठाकरांना भेटण्याची आमची कामगिरी किती कठीण आहे ते लक्षात आले. आमचे शहरी कपडे, सोबत बंदूक पाहिल्यावर, आम्ही वनखात्याची माणसे आहोत असे समजून ते पसार झाले होते. 

उंच कुंभ्याच्या झाडाजवळ पोहोचल्यावर लक्षात आले की, ते घोरपड पकडत होते. कातकरी घोरपडीच्या मागे धावत आले, की ती झाडावर चढते. ती आजूबाजूच्या फांद्यांवर न जाता मधल्या भागातील सरळ शेंड्याकडे चढत जाते. घोरपडीचे हे वैशिष्ट्य आदिवासींना माहीत असते. ते सरळ चढत झाडाच्या शेंड्यापर्यंत जातात आणि तिची शेपटी पकडतात. या शेपटीची गाठ मारली की, घोरपडीला वाटते की, तिला बांधून ठेवले आहे. ती एकाच जागी थांबते. कातकरी मग तिला पकडून तिचे मांस खातात. चरबीचे तेल औषध म्हणून विकतात. 

आधाराला एक काठी आणि अपयश हातात घेऊन आम्ही जंगलातून पुढे निघालो. वाटेत मध्येच पळणारा एखादा कोल्हा, ससा आढळत होता. काळोख पडायला सुरुवात झाली. आता आम्ही जंगलातल्या व्याघ्रेश्वराच्या देवळाजवळ येऊन पोहोचलो होतो.

— क्रमशः भाग पहिला

लेखक : श्री प्रमोद टेमघरे, पुणे

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निवडुंग… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? जीवनरंग ?

☆ निवडुंग… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

परवाचीच गोष्ट…सुट्टीचा दिवस होता. नवऱ्याच्या, मुलाच्या आँफिसची गडबड नव्हती म्हणून बाहेरच्या बाल्कनीत कॉफीचा मग घेऊन कुंडीत लावलेली झाडे बघत निवांत कॉफी पीत होते. एवढ्यात अचानक एका कोपऱ्यातल्या कुंडीतून डोकावणाऱ्या नाजूक लालबुंद फुलांनी माझं लक्ष वेधलं. मी जवळ जाऊन पाहिलं तर त्यात लावलेल्या निवडुंगाला फुलं आली होती. मी जाम खूश झाले.

मला आठवलं, एक-दीड वर्षांपूर्वी माझ्या भाच्यानं तीन, चार कॅक्टसच्या कुंड्या आणल्या होत्या. मला झाडांची आवड आहे. पण त्या कुंड्या आतील बाल्कन्यांमध्ये ठेवायला सासूबाईंनी कडाडून विरोध केला.– ” हे बघ ती काटेरी झाडं बाहेर ठेव हं.” – खरं तर मला रागच आला होता आणि पतिदेव व माझा मुलगा, जे आधीच झाडांवरुन मला डिवचायची संधी सोडत नाहीत, त्यांनी सासूबाईंचीच “री” ओढली. मी मग वाद न घालता बाहेर शोची झाडं आहेत तिथं त्या कुंड्या नेऊन ठेवल्या.

आज त्यातील दोघांना फुलं आली होती. एकाला टोमॅटो रेड, दुसऱ्याला गर्द गुलाबी. ती फुले जणू मला सांगत होती, ‘ अगं, आम्हीही  फुलतो कधी तरी… कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी…’

माझं मन विचारात मग्न झालं. निवडुंग.. अगदी काटेरी. नुसती पाने.. खूप काटे, कधीतरी आली तर फुले. त्याला ना रूप ना रंग असंही काहीजण म्हणतात. पण हाच निवडुंग वाळवंटात तीव्र उन्हाचा दाह सोसत ताठ मानेने उभा असतो.. हसत हसत.. भवताली वाळूचा महासागर… पाण्याचा अभाव, उन्हाचा पेटता वणवा…. .म्हणूनच आपल्या गरजा कमी करण्यासाठी फांद्या, उपफांद्या नाहीत, विस्तार नाही— जशी आर्थिक कमतरता असणारे  लोक आपल्या गरजा कमी करतात ना, अगदी तसंच !

…तेवढ्यात मला आमच्या भांडी घासणाऱ्या सीताताईंची हाक आली. त्यांची म्हैस व्यायली म्हणून त्या आमच्यासाठी दुधाचा चीक घेऊन आल्या होत्या. मी किटलीत म्हशीसाठी गहू घालून दिले तर किती हसल्या. म्हैस व्यायली तर किती आनंदल्या होत्या. त्यांचे आयुष्य कष्टाचं… वयाच्या दहाव्या वर्षी आईबापाने लग्न लावून दिले. नवरा पंचवीस वर्षांचा, बीजवर… तशी सीता काळीसावळी पण ठसठशीत, नाकीडोळी नीटस. जरा थोराड बांध्याची. पण आईबापाकडं अठरा विश्व दारिद्रय. हा जावई जरा बराच..गवंडी काम करायचा. घरचं पाच-सहा एकर रान होतं. सीताला सवतीचा दोन वर्षांचा मुलगा असल्याचं लग्नाच्या दिवशी समजलं. आता काय ..सांभाळावं  तर लागणारच. चार- पाच वर्ष बरी गेली.  सीता तीन महिन्यांची गरोदर होती, आणि तो काळा  दिवस उजाडला. साप चावल्याचं निमित्त होऊन नवरा तडफडून जागीच गेला. पाठोपाठ सासूही गेली आणि तिचा आधार गेला.   

धाकट्या  दीर-जावेनं तिला घराबाहेर काढलं. आधीच गरोदर, पदरी सावत्र मुलगा. नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडली. माहेरी आली. आईबरोबर बाहेर चार घरी धुणी भांडी  करू लागली. तिलाही मुलगा झाला. चार वर्ष आईच्या आसऱ्याला बरी गेली. पण भावांची लग्न झाल्यावर त्या दोन भावजया तिच्याशी पटवून घेईनात. दरम्यान तिचे आईवडिलही गेले आणि शेवटी तिला माहेर  सोडावं लागलं.

ती तशी जिद्दीची. एका बांधकामाच्या कामावर वॉचमनची नोकरी मिळाली.  सामानाची चोवीस तास राखण करण्यासाठी रहाण्याचीही सोय झाली होती. डोक्यावर छप्पर आलं. दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. धुणी-भांडी, केर-फरशीबरोबर कुठं स्वयंपाकाची कामेही मिळाली. आता चार पैसे हातात राहू लागले. दोन्ही मुलगे ग्रँज्युएट  झाले. कारखान्यांमध्ये कामाला लागले.  

यथावकाश दोन्ही मुलांची लग्न झाली.आता सीताचा जीव भांड्यात पडला. आता सुखाचे, विसाव्याचे दिवस आले असे तिला वाटले. पण दोन्ही सुनांना सासू घरात नकोशी झाली होती. तिला मुले म्हणाली, ‘ आमचा नाईलाज आहे. काय करावं समजत नाही.’  सीता काय ते समजली.  पुन्हा एकदा ती आपल्या लोकांच्याकडून नाकारली गेली होती.  

सुदैवाने, ती अजून चार घरी काम करीत होती. ती दोन-तीन साड्या आणि तिच्या विठुरायाचा फोटो घेऊन घराबाहेर पडली. त्यावेळी आमच्याकडेच आली. चार दिवस राहिली. सासूबाई,आम्ही सर्वजण तिला आमच्याकडेच रहायचा आग्रह करत होतो, पण सीता म्हणाली,  “आदुगरच लई उपकार हायती तुमचं. हात पाय  हलत्यात तवर भाईरच रहावं म्हनते.. अन, अडीनडीला तुमी हायसाच की…”

मी  तर अवाक् झाले. तिचा आत्मविश्वास पाहून आश्चर्य वाटले. त्या परिस्थितीतही ती समाधानी होती 

..माझ्या एका मैत्रिणीचं शेत आमच्या घरापासून जवळच होते.  तसे दीड दोन एकरभरच, पण पडीकच जागा. मी मैत्रिणीला शब्द टाकला. तिनं सीताला तिथं रहायची आनंदानं परवानगी दिली. सीताचं नवीन जीवन सुरू झालं. शेतात एक जुनाट झोपडी होती. सीताचा एकटीचा संसार नव्याने  सुरू झाला. मी तिला गरजेपुरती भांडी दिली. स्टोव्ह दिला. ती पुन्हा जोमानं कामं करू लागली. सदा हसतमुख, कामाचा कंटाळा असा नाहीच . मला नवल वाटायचे .     

सीताचा हात फिरला आणि झोपडीचा जणू उबदार महालच झाला. शेणानं सारवलेलं अंगण, अंगणात रेखीव रांगोळी. दारात तुळस फुलली. सीतानं फावल्या वेळात भोवतीचा परिसर स्वच्छ केला. तिथं वाफे करून भाज्या लावल्या. मेथी, कोथिंबीर, मुळा, वांगी, लाल भोपळा, माठ. आम्ही तर थक्क झालो. माझी मैत्रिण तर जागेचा कायापालट बघून जाम खूश झाली. तिने भाजी विकून मिळेणारे  पैसे स्वतः सीतानेच घ्यायचे अशी अट घातली. 

 — ” वैनी, म्या टाइम भेटला म्हून केलं समदं. आवं, आता हीच माजी लेकरं, .पैशे नकोत मला. ते तुमीच घ्या. “

मग मात्र मैत्रीण हट्टाला पेटली. मग सीताचा नाईलाज झाला. आता आमच्या सोसायटीत तिचीच भाजी सर्वांकडे असते. आम्ही दोन, तीन  मैत्रिणींनी मिळून तिला एक म्हैस विकत घेऊन दिली. तीच ‘ चंद्रा ‘ व्यायली. तोच दुधाचा चीक घेऊन सीता आली.

सदा चेहऱ्यावर हास्य.. परिस्थिती कशीही आली तरी  जिद्दीनं  सामना करायचा, हे कुणी शिकवलं या सीताला. आनंदाचं हे दान देवानेच तिला दिलं असावे. म्हणूनच मला तिच्यात आणि निवडुंगात साम्य आढळलं..।—-

– हा काटेरी , काहीसा वेडावाकडा,  सर्वांनी नाकारलेला निवडुंगही  जगतो, वाढतो… परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी पण नेटानं जगायचे त्याने ठरविलेले असते. मग  कधीतरी तो फुलतो. सर्वांना आनंदगाणे सांगतो.

जीवनात अशी काही सीतासारखी माणसं असंतात. त्यांच्या गालावरचे हास्याचे गुलाब सदा फुललेले असतात.. मग हास्याचे,आनंदाचे कारंजे त्यांना का नाही न्हाऊ घालणार ?

***

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ढासळत चाललय काळीज (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ढासळत चाललय काळीज (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

सामानाचा शेवटचा कंटेनर ट्रकवार चढला होता. मुलांना आपल्या सामानाने भरलेल्या ट्रकसोबत निघण्याची घाई होती. आपल्या गाडीत बसून ते हात न हलवताच निघून गेले होते. मी रिकाम्या रस्त्याकडे बघत, हात हलवत तशीच काही क्षण उभी राहिले. मग आपलं असलं वागणं आसपासच्या शेजार्‍यांनी बघितलं तर नसेल ना, या विचाराने मी खजील झाले.

उदास होऊन मी घरात पाऊल ठेवलं, तेव्हा तिथल्या निस्तब्ध शांततेनं मला जसं काही खेचून घेतलं. माझं जुनं घर सोडताना अशी निस्तब्ध शांतता मी माझ्यात कैद केली होती. मी ते जुनं घर सोडून या नव्या घरात आले, त्यावेळचे ते क्षण मी पुन्हा अनुभवू लागले. त्या घरात मी चांगली बारा वर्षे राहिले होते आणि ते माझ्या जीवनातले सगळ्यात चांगले दिवस होते. आई म्हणायची, ‘बारा वर्षांनंतर तर घराभोवतालच्या उकिरड्याचे दिवसही फिरतात.’ न जाणे, कुणाचे दिवस फिरले? माझे? की घराचे? माझे दिवस तर त्या घरात चांगले गेले. कदाचित मी यासाठी ते घर सोडून आले की माझ्यानंतर त्या ठिकाणी येणार्‍या परिवाराला ते घर माझ्यापेक्षाही जवळिकीचं, अधीक आत्मीय वाटावं.

ते घर लावण्यात, सजवण्यात मी माझा जीव ओतला होता, ही गोष्ट वेगळी. अगदी मनापासून मी ते सजवलं होतं. खोलीतील प्रत्येक भिंतीवर माझ्या हाताची चित्रकारी होती. प्रत्येक बल्ब आणि झुंबराचा प्रकाश माझ्या डोळ्यांनी पसंत केलेला होता. माझी खुर्ची, माझं टेबल, आणि माझा पलंग हे सगळं मिळून मला पंचतारांकित हॉटेलचा अनुभव द्यायचे. मी त्या घरट्यावर खूप खूप प्रेम केलं होतं आणि त्या बदल्यात त्यानेही मला काही दिलं होतं. तिथे राहून मी नाव, पैसा, यश सगळं काही मिळवलं. इतकं सगळं असूनही मग काय झालं की ते घर सोडायचा निर्णय मी घेतला?  कदाचित माझ्या घरातल्या लोकांचे विचार त्या घराला मागास मानू लागले. खरं तर त्याचं मन खूप मोठं होतं , इतकं की आम्ही सगळे त्यात मावत होतो. एक एक करत गरजांची यादी वाढली आणि घराच्या भिंती लहान होऊ लागल्या. इतक्या लहान की माझी तीव्र इच्छाशक्ती माझ्या मन-बुद्धीतून वाळूसारखी घसरत गेली.

डॉ. हंसा दीप

मला आठवलं, जेव्हा आम्ही त्या घरात नव्याने राहायला गेलो, तेव्हा मी अतिशय आनंदाने, उत्साहाने घरी आलेल्या पाहुण्यांना तिथल्या खास गोष्टींचं वर्णन करून सांगायची.   ‘ हे बघा ना, इथून सीएन टॉवर दिसतो. पानगळीच्या दिवसातल्या पानांच्या आगळ्या- वेगळ्या रंगछटांबद्दल काय बोलावं? रंगी-बेरंगी पानांनी लगडलेली ती झाडी इथून इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते की बस्स! किती वर्णन करावं! आणि इथला सूर्योदय कुठल्याही हिल स्टेशनच्या सूर्योदयावर मात करेल, असा अप्रतीम . ढगातून बाहेर येणारी सूर्यकिरणे , समोरच्या खिडकीच्या काचेवर पडून परावर्तीत होतात, तेव्हा ही सारी इमारत सोनेरी होऊन जाते. सोन्यासारखी झळझळते.‘

बिच्चारे पाहुणे. त्यांना नक्कीच वाटत असणार, की एखाद्या गाईडप्रमाणे मी माझं म्युझियम दाखवते आहे. खरं सांगायचं, तर ते घर माझ्या जीवनातील आठवणींचं एक संग्रहालायच बनलेलं होतं. सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात आरामदायी घर. त्याने मला लेखनासाठी ऊर्जा देण्यात कसलाही कंजुषपणा केला नाही. समोर दिसणार्‍या झिळमिळत्या प्रकाशाच्या पुरात बुडून मी अनेक कथा लिहिल्या. कादंबर्‍या लिहिल्या. किती वर्गांना शिकवलं. कोवीदमध्येसुद्धा प्रकाशात नाहून निघालेलं हे शहर इथून बघताना मला कधी उदास नाही दिसलं.

बघता बघता, मी त्या घराची प्रत्येक वीट, प्रत्येक अडचण ओळखू लागले. एखादी गोष्ट तुटून खाली निखळण्यापूर्वीच माझं तिकडे लक्ष जायचं आणि मी ती दुरुस्त करून टाकी. घरही कदाचित माझा शिणवठा समजून घेत असेल. कुठेच काही अस्वच्छ नाही, असं दिसलं की मी तृप्तीचा श्वास घेऊन आराम करायची. इतके आम्ही एक दुसर्‍याला परिचित होतो. तरीही, मी त्याला सोडून या नवीन घरात आले. सकाळी उठून बाहेरची दुनिया बघायची माझी सवय, या नव्या घरात दाबून राहिली. हे घर आहे खूप मोठं, पण जमिनीवर त्या जुन्या छोट्या घराप्रमाणे छाती उंचावत उभं नाहीये. छोटे पण मोठ्या मनाचे लोक मला नेहमीच भावतात. हीच तर त्या छोट्या घराची विशेषता होती. त्याचं हृदय. त्याचं मन. 

दररोज सकाळी उगवत्या सूर्याचा लालिमा न्याहाळत, मी ते क्षण माझ्या अंतरंगात कैद केले आहेत. मी घरातील नस न नस शब्दात चित्रित करते, तेव्हा घरचे म्हणतात, ‘तू विटांवर प्रेम करतेस, ज्या निर्जीव आहेत. तू जमिनीशी बोलतेस, जी गप्प आहे.’ पण खरंच सांगते, मी त्या सगळ्यांना ऐकलं आहे. घरातील कण न कण माझ्या हातांचा स्पर्श ओळखत असे. मी झाडून-पुसून सगळं स्वच्छ करत असे, तेव्हा वाटायचं ते घर हसून बोलतय माझ्याशी.

ते घर सोडताना, सामान नीट ट्रकवर चढवण्याच्या नादात मी इतकी गुंतले होते की मी त्या घराचा निरोपही नीटपणे घेतला नाही. माझ्या त्याच घराची चावी दुसर्‍या कुणाकडे सोपवताना माझं मन जराही द्रवलं नाही. उलट अगदी हलकं हलकं वाटू लागलं होतं. जशी काही कुठल्या कैदेतूनं माझी सुटका झालीय. न बोलताच त्या घरातून मी बाहेर पडले. घर उदास होतं. मला जाताना बघत होतं. अशा उमेदीने बघत होतं होतं की बाहेर पडताना माझ्या डोळ्यात येणारे अश्रू मी थांबवू शकणार नाही. पण त्यावेळी मला कुलूप लावणे, कागदपत्र सांभाळणे, आणि अशा अनेक चिंतांनी घेरलं होतं. माझ्या नव्या घराकडे जाण्याच्या ओढीत मी सगळं काही विसरून गेले. माझ्या सगळ्या भावना या घराच्या भिंतीत सामावल्या गेल्या. मला आशा तर्‍हेने जाताना बघून ते उदास झालं. घराचा कोपरा न् कोपरा माझं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. हे कोपरे मी कधी फुलांनी, कधी वेगवेगळ्या रंगी-बेरंगी शो-पीसने सजवले होते. बाहेर पडताच माझ्या हातात सिमेंटचा एक तुकडा पडला. मी त्या घराचं ते आलिंगन समजू शकले नाही. मनात आलं, ‘बरं झालं इथून बाहेर पडतोय. या घराचं सांगाडा आता ढिला होत चाललाय. जुनं तंत्र. आऊट डेटेड… ‘ मी तो तुकडा कचर्‍याच्या डब्यात टाकला आणि घाईने ट्रकबरोबर निघाले.

आज मुलांचे तटस्थ डोळे माझ्या ओलसर झालेल्या पापण्यांना स्पर्श न करताच दृष्टिआड झाले, तेव्हा मला वाटलं, माझं शरीर सिमेंटसारखं मजबूत आणि विटांसारखं पक्कं झालय. भट्टीच्या आचेत भाजलेल्या विटा, सगळं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन हयातभर गप्प बसतात. माझं अंग-प्रत्यांग त्या स्तब्ध शांततेत जखडल्यासारखं झालय जसं. दिवसभर खिदळणारी मुले माझ्या अवती-भवती भिरभिरत असायची. गरज असेल तेव्हा ती मला आपल्या वडलांच्या रूपात बघायची. आणि आई … प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पंदनात त्यांच्या सोबतच असायची. आजचं मुलांचं हे रूप त्यांच्या लहानपणाच्या रूपापेक्षा आगदीच वेगळं. शाळेत जाताना आईला सोडून रहावं लागण्याच दु:खं ती आपल्या डोळ्यांनी दाखवत. वारंवार वळून हात हलवायचे. माझ्या मनाची अवस्था माझ्या आधी ओळखायचे. काही वाचायला बसले आणि चश्मा मिळत नसेल, तर पटकन आणून माझ्या हातात ठेवत होते. आज त्याच दोन्ही मुलांनी आपापल्या घरी जाताना आपल्या ममाकडे वळून बघितलंसुद्धा नाही.

मी मुलांच्या सोयी-सुविधेसाठी ते घर सोडलं होतं. आता मुलांनी आपल्या सोयी-सुविधेसाठी मला सोडलं. अचानक इतकं ‘मोठं’ घर ‘छोटं’ वाटू लागलं किंवा मग मीच छोटी झाले आणि मुलांचा बांधा मोठा होत चालला. घराच्या इतर किल्ल्या मला देऊन जशी काही मुक्ती मिळवली. जुनाटपणा आणि छोटेपणा यापासून मुक्तीची जाणीव. मला सोडताना त्यांनाही घाईच झालेली असणार. माझं अस्तित्व त्यांच्यासाठी घरासारखच भरभक्कम, पोलादी होतं. भावहीन. त्यांना माझा अस्थिपंजर ढिला झालेला दिसत असणार. सुकलेल्या आसवांच्या पलीकडे मला माझं शरीर पाहिल्यापेक्षा अधीक मजबूत वाटू लागलं. मला कुठल्याही प्रकारच्या भावुक वातावरणापासून दूर ठेवणारं. मजबूत भिंतींनी बांधलेलं. सीमेंट आणि कॉँक्रीट या किंवा त्या घरात नाही, माझ्या हाडा-माणसाच्या आत खोलवर सामावले गेले आहे. माझ्या मुलांसाठी मीदेखील एखाद्या घरापेक्षा जास्त नाही. या अबोल भिंती, ओरडून ओरडून माझेच शब्द मला पुन्हा ऐकवताहेत. ‘जुनं तंत्र… आउट डेटेड!’ मीदेखील हे सत्य स्वीकारलय की नवीन तंत्रात घरं बोलतात. माणूस नाही.

कान नक्कीच काही तरी ऐकताहेत. कदाचित हे नवीन घर खदाखदा हसतय किंवा मग यात जुन्या घराचा आवाजदेखील मिसळतोय. वर्षानुवर्ष ममतेच्या अस्तरांच्या आवरणाने झाकलेलं माझं काळीज निर्जीव तुकड्याप्रमाणे ढासळत चाललय.  

********

मूळ हिंदी  कथा 👉 टूक-टूक कलेजा– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अङ्ग्रेज़ी भावानुवाद 👉 Broken Heart – Translated by – Mrs. Rajni Mishra

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती साडी… – भाग-३ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ ती साडी… – भाग- ३ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(रेणू भूतकाळात डोकावून पाहत होती . मनासारखा जीवनसाथी आणि मनासारखे आयुष्य ती जगू शकत होती. याचा तिला थोडासा गर्वच वाटू लागला होता.) आता पुढे….

तिच्या चित्र प्रदर्शनाच्या तयारीनं जोर पकडला होता. सकाळी सकाळीच “आशा मावशी ,खूप भूक लागलीय… ब्रेकफास्ट…” तिनं जोरात आवाज दिला. शेवटी खाली येऊन पाहिलं तर सगळं सामसूम!तिनं खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिलं, तर तिला घराच्या उंबऱ्यापर्यंत सगळीकडे पाणीच पाणी दिसलं.

‘म्हणजे पूर आलेला दिसतोय….पण नो टेन्शन.’–ती नको नको म्हणत असतानाही आशा मावशीनं वरच्या स्टुडिओ शेजारच्या खोलीतला फ्रीज  खाण्यापिण्याच्या पदार्थांनी गच्च भरून ठेवला होता. शेजारीच एक गॅसची शेगडी आणि सिलेंडर तसेच थोडी भांडीकुंडी, पाणी अशी सगळी इमर्जन्सीच्या काळातली तयारी पण केली होती.ती वर आली. सँडविच व कॉफी घेऊन ती आरामात सोफ्यावर बसली. तिचं मन आशा मावशीला धन्यवाद देत होतं.लाईट पण गेलेत हे तिला गिझर ऑन केल्यावर कळलं. ‘काही हरकत नाही …आज  नो अंघोळ’… ती पुटपुटली. खिडकीतून पुन्हा ती  खाली पाहू लागली तेव्हा तिला दिसले की घरात पाणी शिरलेय. दुपारी खाली जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली तेव्हा खालच्या सात आठ पायऱ्या पाण्यात बुडाल्यात,… आणि तिची ड्रॉइंग हॉलमधील पेंटिंग्स पण पाण्यात बुडालीत हे दिसलं. बेचैन झाली खरी,… पण विचलित न होता वाढलेलं पाणी, बुडणारी झाडं ,घरं निर्धास्तपणे ती बाल्कनीतून बघत राहिली. रात्री खाऊन पिऊन काळ्या कुट्ट अंधारात बिछान्यावर  आडवी झाली.’ हेऽऽ एवढ्याशा संकटानं घाबरण्याइतकी लेचीपेची  मी थोडीच आहे!’ आपल्या मनाचा अंदाज घेऊन स्वतःवरच खुष होत ती झोपली.

सकाळी पाणी आणखी  वाढलेलं दिसलं. तशी ती गच्चीत आली.  बाय चान्स तिला एक नाव दिसली. “हेल्प मी, हेल्प मी” ओरडत हातातला रंगीत रुमाल तिनं हवेत फडकवला.  त्या नावेतल्या डिझास्टर मॅनेजमेंट टीमने खूप प्रयत्न करून तिला  नावेत उतरवून घेतले. खरा प्रश्न पुढे उभा राहिला… आपला ओव्हर- कॉन्फिडन्स दाखवायचा नादात गच्चीतून आत खोलीत जाऊन मोबाईल बरोबर घ्यायलाही ती विसरली होती…कपडे वगैरे तर दूरची गोष्ट !…..ते लोक विचारू लागले कुठे जाणार? तेव्हा कोणाचाही फोन नंबर, घरचा पत्ता ती सांगू शकली नाही. “इतक्या पूरग्रस्त लोकांना तुम्ही कुठे ठेवलेय तिथेच मला सोडा… अशा  रहाण्यातलं थ्रिल मला अनुभवायचंय”..ती  बेफिक्रीनं उद्गारली…तिथे पोहोचल्यावर,” थँक्स गाईज! मी पुढचं सगळं छान मॅनेज करेन.” ती म्हणाली.

छान पैकी जेवली. खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची धावपळ एन्जॉय करत राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव निरखत मनातच त्यांची स्केचेस बनवत राहिली.पण रात्री एका चटईवर.. बिना उशीचं झोपताना तिला अवघड वाटू लागलं….आणि रात्री अंधारात डासांचं नृत्य, संगीत आणि कडाडून चावणं दोन-तीन दिवस तिनं सहन केलं पण हळूहळू  तिचा ताठा, स्वतःबद्दलच्या वल्गना… सगळं लुळं पांगळं झालं. एका अनामिक भीतीने मनाचा कब्जा घेतला.जोरजोरात थंडी वाजू लागली… आणि सपाटून ताप चढला. केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी औषध दिलं. ब्लड टेस्ट झाली. पण ताप उतरायची चिन्हे दिसेनात.तिची झोप उडाली….मनात नाही नाही ते विचार घोंगावू लागले… आपल्या भिजलेल्या पेंटिंग्जची दुरावस्था आठवून ती व्याकूळ झाली.

“अगोबाई मॅडम तुम्ही इथं?” ओळखीचा आवाज ऐकून तिने डोळे किलकिले केले. समोर आशामावशी उभ्या! रेणू एकदम हरकून गेली. त्या शेजारणी बरोबर त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आल्या होत्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे पुढाकार घेत त्या तिला म्हणाल्या ,”तुम्ही आत्ताच्या आत्ता चला माझ्या घरला.  काय अवस्था झाली तुमची. आमच्याकडे पूर बीर नाहीये… रिक्षात घालून नेतो… वाटेत डॉक्टरला पण दाखवतो… तुमचं चांगल पथ्य पाणी पण करतो. तिथल्या व्यवस्थापकांची परवानगी घेऊन त्या रेणुला आपल्या घरी घेऊन  आल्या. घरी तिची योग्य सेवा सुश्रुषा झाली. हळूहळू तिचा ताप उतरला. त्यापूर्वीचे एक दोन दिवस आशा मावशीने स्पंजींग करून तिला आपले जुने गाऊन घालायला देऊन तिचे अंगावरचे कपडे धुऊन टाकले होते.

“मॅडम पाणी गरम आहे. चार-पाच दिवसात तुमची अंघोळ झालेली नाहीये.आज तुम्ही अंघोळ करून घ्या.” आशा मावशीने सांगितले.,” मॅडम तुमची कापडं, गाऊन काहीच वाळलं नाहीय हो… बाहेर धो धो पाऊस आहे…. माझ्या साड्याही आंबट ओल्या आहेत… तर असं करा माझं तिथं ठेवलेलं परकर झंपर घाला. आणि हेही सांगतोय की दार पावसानं फुगलंय .आतनं कडी नाही बसणार …मी राहतो बाहेर उभी, तुमच्यासाठी साडी घेऊन. काळजी करू नका. अंघोळ करून घ्या तुम्ही. हातात एक कॅरीबॅग घेऊन आशा मावशी बाहेर पडल्या. त्या स्वयंपाक- घरातल्या छोट्याशा मोरीत रेणूनं कशीबशी आंघोळ आटोपली . ढगळा ब्लाऊज व परकर घातलाआणि दरवाजा खडखडवला.आशामावशी आत आल्या घडी मोडून निऱ्या केलेली  एक साडी त्यांनी तिच्या खांद्यावर टाकली. आणि दरवाजा बंद करून बाहेर उभ्या राहिल्या. साडी बघून रेणूच्या  मनात चर् र्  झालं. ती,….’ती’ साडी होती. सासूचा बेदरकारपणे अपमान करत आशा मावशीच्या खांद्यावर टाकलेली साडी….आज ती साडी नेसणं भाग होतं.नियतीने तिला समझौता करायला… चलता है… म्हणायला भाग पाडलं होतं. तिच्या बेछूट, उर्मटपणे वागायच्या सगळ्या फंड्यांना जणू ती साडी वाकुल्या दाखवून हसत होती. आयुष्यातला हा असा पराभव पचवणं तिला शक्य नव्हतं. त्या स्ट्रॉंग, ओव्हर कॉन्फिडंट, आयुष्यात कधीही न रडलेल्या स्त्रीला त्या साडीनं ओक्साबोक्शी रडायला भाग पाडलं होतं. पण हे अश्रू खरंच पश्चातापाचे होते का?

** समाप्त**

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares