मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृदेवो नम: – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पितृदेवो नम: – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(त्यानी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले पण आईला आणि मला वाटतं असे त्याने हे अप्पाना सांगायला हवे होते.. एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते.. ) इथून पुढे —

म्हणता म्हणता मी बारावी झाले आणि रत्नागिरीस डी एड ची ऍडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले तेंव्हा माझ्या लक्षात आले, रत्नागिरीस सुद्धा अप्पांच्या किती ओळखी? अगदी st स्टॅन्ड वर सुद्धा लोक अप्पांशी बोलायला येत होती, आम्ही ज्या लॉजवर राहिलो एक रात्र, तेथे पण अप्पाना मोठं मान.. कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी पोहोचलो तेथील क्लार्क अप्पाना ओळखत होते, त्यानी भरभर आमची कामे केली. अप्पांच्या नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने अप्पानी माणसे जोडली होती.

अप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम जोरात होते, त्यानी पंचक्रोशीतील धडपडया तरुणांना एकत्र करून नाटकें सुरु ठेवली, आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या दोन बाई पण नाटकात भाग घेऊ लागल्या आणि आप्पा बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन कालेलकरांची नाटकें बसवू लागले आणि सावंतवाडी, वेगुले, मालवण ते रत्नागिरी पर्यत नाटकें नेऊ लागले.

दादा नोकरीला लागला आणि मामानी त्याचे लग्न जमवले. त्याच्याच ऑफिस मधील मुलगी. दादाने पत्र लिहून आईला कळविले आणि आईला आणि मला लग्नाला बोलावले. अप्पाना दादाचे लग्न ठरत आहे, हे कळले तेंव्हा 

आप्पा – आनंदाची बातमी आहे, जोशी च्या घरात नवीन सून येते आहे, तुम्हाला दोघीना बोलवले आहे, मी st चे बुकिंग करून ठेवतो, तुम्ही दोघी जा लग्नाला, रविला आणि तूझ्या भावाला पण आनंद होईल.

आई – पण त्याने आपल्या पित्याला बोलावलेले नाही, हे मला आवडलेले नाही. मी लग्नाला जायची नाही.

आप्पा – असे करू नका, त्याला वाईट वाटेल, माझी काळजी करू नका. तुम्ही दोघी जाच.

आई – मी नाही जाणारं, येथूनच अक्षता टाकेन, नंदेला जाऊदे.

शेवटी आई लग्नाला गेली नाही आणि मी पण नाही.

माझ्या अप्पाना लग्नाला बोलावले नाही म्हणजे काय?

—रवी —

माझ्या लग्नाला आई, नंदा आली नाहीत, कदाचित अप्पाना लग्नाला बोलवले नाही, हे त्याना खटकले असेल. पण अप्पानाबद्दल माझ्या मनात अढी बसलीच आहे, ती कशी निघणार. शिवाय ती मंडळी आली तर मामाकडेच उतरणार आणि मामा आणि अप्पांचे बोलणे किती वर्षांपासून नाही. म्हणजे मामाची पण आप्पा लग्नाला येऊ नये अशी इच्छा असणार.

लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मामांच्या आणि ऑफिस च्या कृपेनें मी जागा घेतली आणि आता तरी आईने माझे घर पहावे, असे मला वाटू लागले. मी तिला पत्र लिहिले पण तिचे उत्तर आले नाही.

माझ्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले असतील, एक दिवस नंदेचा ऑफिसमध्ये फोन आला आणि मी सटपटलोच “आईला अर्धांग वायूचा मोठा झटका आला असून अप्पानी तिला रत्नागिरीत परकार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे ‘.

मी घाबरलो, आई म्हणजे माझा कलीजा होता, मी त्याच दिवशी रात्रीची रत्नागिरी st पकडली आणि पहाटे रत्नागिरीत पोहोचलो.

आईची परिस्थिती गंभीर होती, सलाईन्स लावलेली होती. तिचा फक्त एक डोळा उघडा होता आणि एक हात हलत होता. ती कुणालाच ओळखत नव्हती. आप्पा आणि नंदा बाजूलाच होती.

मला पहाताच आप्पा रडू लागले, नंदा रडू लागली, माझ्याही डोळ्यातून अश्रू गलत होते.

संध्याकाळी मी डॉ ना भेटलो, त्त्यांचे म्हणणे आता पेशन्टला घरी घेऊन जा, हॉस्पिटलमधील उपचार केले आहेत, यापुढे उपचार नाहीत. घरी नेऊन मालिश करा, व्यायाम करून घ्या.

 त्याच दिवशी आम्ही आईला घरी आणले.

आईला घरी आणल्यापासून अप्पानी आईचा चार्ज घेतला. रोज तेलाने मालिश करण्यापासून हात वरखाली करणे, पाय वर करणे, गरम पाण्याने शेकणे सुरु केले. शिवाय आम्हा सर्वांचे जेवणं करणे सुद्धा.

अप्पानी आईला हॉस्पिटल मधून घरी आणले हे कळले मात्र, दुसऱ्या दिवशी पासून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक भेटायला येऊ लागले, कित्येक लोक मदत करण्यासाठी आले. काही बायकांनी रोज भांडी घासून दयायचा, जमिनीला शेण सरवून द्यायच्या.

कोणी आईसाठी तेल आणली, डुकराचे तेल आणले.

एव्हडी माणसे आमच्या घरी कशी काय येतात हा मला प्रश्न पडत होता. गावचे सरपंच, पोलीस पाटील अगदी जिल्ह्याचे आमदार पण येऊन चौकशी करून गेले, सारे जणं येऊन अप्पाना भेटत होते. काही लागलं तर कळवा, असे सांगत होते.

मी नंदेला विचारलं “नंदे, एव्हडी माणसे चौकशीला, मदतीला कशी काय येत आहेत?

नंदी म्हणाली “दादा, हे अप्पामुळे, आप्पा सर्व समाजात मिसळतात, कोण कुठल्या जातीचा हे पहात नाहीत. त्याना घेऊन भजन करतात, कोणालाही पेटी तबला विना मोबदला शिकवतात, गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन नाटकें बसवतात त्यामुळे ही लोक अप्पांच्या मदतीसाठी धावून आलीत ‘.

 मला शरम वाटली. मी असे काहीच केले नाही, अशी माणसे जोडली नाहीत.

रत्नागिरीच्या डॉ नी एक दिवसाड एक इंजेकशन घायला लिहून दिले होते. या खेडेगावात कोण इंजेकशन देणार असा मला प्रश्न पडला, अप्पानी दहा km वरील डॉ ना निरोप पाठविला मात्र, ते डॉ घरी येऊन इंजेकशन देऊ लागले, आईचे ब्लड प्रेशर पाहू लागले. अप्पानी एव्हडी माणसे जोडली होती, हे खरे.

आईच्या आजारपणामुळे आप्पा सर्वच आघाडी्यावर लढत होते. पहाटे उठून गोठ्यात जाणे, शेण काढणे, दूध काढणे मग आईची स्वछता.. कपडे बदलणे.. आंघोळ घालणे.. आमच्यासाठी चहा, नाश्ता करणे.

मग गावात भिक्षुकीला जाणे. नंदी मदतीला होती थोडीफ़ार पण तिला पण कॉलेजला जायची घाई होती. मग माझ्या आईची काळजी कोण घेणार?

माझी रजा पण संपत आलेली, नंदी रतनगिरीला जायची, मग घर आणि अंथरुणाला खिललेली आईकडे लक्ष द्यायला कोण? एकटे आप्पा, आणि त्यानी गोळा केलेली माणसं.

आणि मी अप्पाना दोष दयायचो?गेल्या कित्येक वर्षात त्याचेशी भाषण केलेले नाही, माझ्या लग्नात त्याना बोलावले नाही? त्याना सून दाखवली नाही अजून? नवीन घर घेतल मुंबईत, तर बघायला या म्हंटले नाही?

किती चुकीचा वागलो मी. आई आणि नंदू सारखी सांगायची, अप्पांशी निदान दोन शब्द बोल… ते पण केल नाही मी.

माझा जायचा दिवस आला, दुपारी जेऊन निघणार होतो मी.. अप्पानी वरण भात मेतकूट तयार ठेवले होते. अप्पानी आईला सूप भरविले आणि नंदीने ताटे घेतली.

मी कसाबसा दोन घास घशाखाली घातले. मी उठलो हे पाहून आप्पा आणि नंदी पण ताटावरून उठली. मी आईकडे जाऊन तिच्या डोकयावरून हात फिरवीला, माझ्या पाठीच आप्पा आणि नंदी उभी होती.

घशात कढ येत होते, डोळ्यात अश्रू जमा होत होते. काहीकळायचंय आत मी अप्पांच्या गळ्यात पडलो, “क्षमा करा आप्पा, तुमच्या कोकराला क्षमा करा, तुम्हांला ओळखल नाही मी आप्पा ‘.

आप्पा मला थोपटत होते.

“असुदे, असुदे बाळा, अरे बाप मुलावर कधी रागवेल काय? बाप मुलावर फक्त प्रेम करतो, तो रागवेल कसा?

“आप्पा, माझ्यासारखा मुलगा असता तर कुठलाई बाप रागावला असताच, पण आपा, तुम्ही खरच महान आहात.. तुम्ही गावातील लोकांना जमवून भजने करता, नाटकें करता, जातीपतीचा विचार करत नाही म्हणून मी दोष देत होतो, पण तुम्ही समाजात मिसळून किती माणसे जमवलीत हे आईच्या या आजारपणात समजले. आपण समाजात मिसळलो तर समाज तुमच्या मदतीला धावतो, हे मला समजलं क्षमा करा आप्पा, क्षमा करा ‘.

आप्पा रडत रडत मला थोपटत होते, शेजारी नंदी पण मला मिठी मारून रडत होती.

मी बाहेर पडताना आईकडे पाहिले, आई पण हसत होती असा मला भास होत होता.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृदेवो नम: – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पितृदेवो नम: – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून, पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पा सोबत देवळात जायचे होते. आमच्या घराच्या पानंदी जवळ अप्पाचं दिसलें. काठीने आमच्या काळू आणि सैना या गाईना हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पहाताच आप्पा म्हणाले 

“नंदा, धावतेस कशाला? कोण पाठी लागलाय?

मी म्हंटल “अहो आप्पा, तुमच्या बरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी ‘.

आप्पा हसून म्हणाले “होय बाई, मला माहित होते पण गमतीने विचारले ‘.

मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवले. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवले होते. चुलच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने मी गरम पातेल्यातील दूध माझ्या ग्लासात ओतले आणि फुन्कर मारीत मारीत दूध पिऊन टाकले.

मग खोलीत जाऊन फ्रॉक बदलला आणि अप्पांची वाट पहात राहिले.

गोठ्यात आई काळूचे दूध काढत होती आणि आप्पा छोटया वासराला पकडून होते. दोन तांब्ये भरून आईने दूध काढले आणि अप्पानी वासराला लुचायला सोडले. दोन हातात दोन दुधाने भरलेले तांब्ये घेऊन आई मागील दाराने आत आली आणि मला पहाताच म्हणाली 

“दूध घेतलंस का? आणि रात्री घरी आल्यावर अभ्यास पुरा करायचा गुरुजींचा. सकाळी उशिरा उठतेस तू, सकाळसाठी ठेऊ नकोस. दादा आला का शाळेतून “?

मी म्हंटल “नाही बहुतेक, आला तर मला दिसला असता ‘.

तेव्हड्यात आप्पा त्यान्च्या पंच्यावर अंगात बंडी घालून आणि मोठी बॅटरी आणि काठी घेऊन लोट्यावर हजर झाले, मला पहाताच म्हणाले 

“चला, नंदू बेटा.. ते खोरणात पुस्तक असेल ते घे आणि चप्पल घाल, चला..

एव्हड्यात आई पदराला हात पुशीत बाहेर आली आणि मला म्हणाली 

“अप्पांचा हात सोडू नकोस जाताना येताना.. वाटेल फुर्शी, दिवडे येतात पायाखाली, बघूनचाल ‘.

मी हो.. हो म्हंटले आणि अप्पांचा हात पकडला, आम्ही अंगणातून बाहेर पडणार एव्हड्यात दादा शाळेतून आला. मी अप्पांचा हात पकडून निघणार, एव्हड्यात तो माझ्यावर खेकसला “नंदे, काय चाललंय तुझं? कसली फालतू नाटकें करता? गावातील फालतू माणसामध्ये वावरता? निदान तू तरी..

मी त्याच्या बाजूने धावत बाहेर गेले आणि अप्पांच्या पुढे चालू लागले.

आप्पा – नंदे, तूझ्या दादाला आवडत नाही तू माझ्याबरोबर येतेस ते, मग तू कशाला येतेस, तू जा बरे घरी 

मी – आप्पा, मला आवडते नाटक, तुम्ही इतरांना नाटक शिकवता ते आवडत, मला आता नाटक पाठ पण झाले आहे.

आप्पा – खरे की काय आणि नाटकातल्या पार्ट्याना पाठ होत नाही.

बोलत बोलत मी आणि आप्पा देवळाकडे पोहोचलो.

मी आप्पाचा हात पकडून देवळात पोहोचलो तोपर्यत गावातील इतर झिलगे आले होते, मी काही लोकांना ओळखत होते, कुंभारांचा नामू, मोन्या जळवी, संतू मडवल, कृष्णा जगताप आणि इतर काही. अप्पानी माझ्याकडून पुस्तक मागून घेतले आणि आप्पा म्हणाले -अंक दुसरा -प्रवेश पहिला.. औरंगजेब आणि दिलेरखान… म्हणताच दिलेरखनाची भूमिका करणारा नामू कुंभार उभा राहिला, औरंगजेबाची भूमिका आप्पा स्वतः करत होते. अप्पानी नामूला दरबारात प्रवेश कसा करायचा, नजर कुठे ठेवायची.. बादशहाला मुजरा कसा करायचा हे दाखवले आणि नामूकडून तीन वेळा करून घेतले. मग आप्पा बादशहाच्या भूमिकेत बाकावर बसले आणि बादशहाचे सवांद म्हणू लागले. माझ्या मनात आले, माझे आप्पा पहिली की दुसरी शिकलेले, गावात भिक्षुकी करणारे, कधी शिवाजी, कधी सोयराबाई, कधी दिलेरखान तर कधी औरंगजेब बादशहा कसे बनतात? त्यान्च्या भूमिकेत कसे काय शिरतात? या गावाच्या पलीकडे ते फारसे जात नाहीत.. कधी मधी रत्नागिरी पर्यत.. मग एव्हडे नाटक बसवणे कसे काय जमते? याचा अर्थ माझे अप्प्पा खुप खुप हुशार असणार. मग माझा दादा आप्पावर का चिडून असतो? तो त्याच्याशी एक शब्द पण बोलत नाही.. सारे आईकडे.

नाटकाची तालीम संपवून आम्ही घरी आलो. आई बिचारी आमची वाट पहात होती. मग जेवणं करून झोपलो.

सकाळी मला जाग आली, तेंव्हा माझ्या लक्षात आले आप्पा सकाळीच भिक्षुकीला गेले असणार, त्याआधी त्यानी गोठ्यात गाईचे शेण काढले असणार आणि शेण डोकयावरून टोपलीतून बागेत फोफलीना टाकले असणार, मग आप्पा किती वाजता उठले असतील? रात्री उशिरा झोपतात आणि भल्या पहाटे उठतात आप्पा.

 मी खोलीतून बाहेर आले एव्हडयात आतील खोलीतून आई आणि रविदादा यांचे मोठमोठ्याने बोलणे ऐकू आले, मी कान टवकारले 

दादा – मला हे पसंत नाही, रोज नाटकें करतात.. गावातल्या कसल्या कसल्या लोकांना जमवतात.. तो कोण न्हावी, कुंभार, मडवल, हरिजन सुद्धा असतो म्हणतात नाटकात.. सकाळी गावात भिक्षुकी करतात आणि रात्री नाटकाची तालीम, आणि नंदेला घेऊन जातात बरोबर, तू सांगत कसे नाहीस त्यांना?

आई – रवी, त्त्यांची आवड आहे ती. नाटक, भजन हा त्त्यांचा श्वास आहे. त्त्यांचे रोजचे काम ते व्यवस्थित करतात ना, रोज गावातील भिक्षुकीला जातात शिवाय कुठे एकादशणी, सत्यनारायण असेल ती पण चुकवतत नाहीत. आपण दोन वेळ जेवतो, कपडे घालतो तो त्याचेंचमुळे. शिवाय गुरांना चरायला नेणे, गवतकाडी घालणे कोण करत? तू करतोस काही?

रवी – पण खालच्या जातीच्या लोकांमध्ये वावरणे बरे काय? आपले मामा बघ.. म्हणजे तुझे भाऊ.. कसे अलिप्त राहतात गावापासून, तूझ्या भावाकडे असे वातावरण असताना, तू तूझ्या नवऱ्याला का सांगत नाहीस?

आई – लग्नाच्या आधी मी माहेरची होते, त्यावेळी ते संस्कार होते.. लग्न करून या घरात आले, आता माहेरचे विसरले आणि या घराचे झाले.

रवी – पण नंदेला तरी या लोकात नेऊ नको म्हणावं.

आई – तिला आवडते नाटक, जाऊदे तिला.. नाहीतरी या गावात कसली करमणूक आहे.. जाते आवडीने.. जाऊदे.

दादा रागारागाने त्याच्या खोलीत गेल्याचे मी पाहिले. मी आईजवळ जाताच आई म्हणाली “नंदे, दोघांचे एक मिनिट पटत नाही.. हा रवी बोलत पण नाही आप्पशी. कसला राग घेऊन बसला आहे?

रवी – आईला किती सांगितले तरी ती अप्पांचीच बाजू घेते, खरे तर तिने तिचे भाऊ.. म्हणजे माझे मामा कसे वागतात हे तिला माहित आहे.. गावचे मामा पण गावातील इतर समाजापासून अलिप्त असतांत, मुंबईचे मामा पण, कामावर जाताना आपला डबा आणि पाण्याच्या बाटलीला कोणाला हात लावू देत नाहीत, एव्हडे सोवळे पाळतात आणि माझे वडील आप्पा सर्व जातीतील लोकांमध्ये मिसळतात. त्याचेंसोबत जेवत पण असतील, भजनाच्या वेळी कुणाच्याही घरी चहा पितात, मला हे अजिबात आवडत नाही. सोबत नंदेला घेऊन जातात हे पण पटलेले नाही. नंदेला काय.. आपल्या अप्पांचा पुळका असतो.

मी दोन वेळा वाद घातला अप्पांशी, पण त्यान्च्यात काही बदल नाही. या घरात रहाण्याचा पण मला कंटाळा आला आहे, पण आई म्हणजे माझा वीक पॉईंट आहे, तिच्यावर माझे फार प्रेम आहे. मी जन्मत. अशक्त होतो म्हणे, आईने निगुतीने मला मोठं केल, तिला वाईट वाटतं मी अप्पांशी बोलत नाही ते.. पण त्यानी आपले वागण बदलावं.. मग मी बोलेन.

नंदा – दादा मॅट्रिक झाला आणि मोठया मामाकडे शिक्षणासाठी मुंबईला गेला. दादा माझ्या मामाचा खुप लाडका. दोघांचे विचार सारखेच…. अप्पांच्या विरुद्ध.. म्हणून दोघेही अप्पाना दुषणे देत असतांत… पण मी आप्पाच्या विचाराची.. अप्पांची नाटकें आवडीने पहाणारी.. भजने ऐकणारी.

कॉलेजात असताना दादा चार दिवसासाठी यायचा, आई आणि तो तासंतास गप्पा मारायचे पण तो अप्पांशी कधी बोलला नाही. दादा आला म्हणजे आप्पा खुश असायचे, त्याच्यासाठी शहाळी आणायचे, ओले काजू आणायचे, आंबे आणायचे पण दादाला त्त्यांचे हे प्रेम कसे दिसायचे नाही कोण जाणे?

दादा ग्रॅज्युएट झाला आणि नोकरीला लागला. त्याने पत्र लिहून आईला कळविले. आईने अप्पाना सांगितले, तेंव्हा त्याना किती आनंद झाला. ते जेथे जेथे भिक्षुकीला जात तेथे त्या लोकांना आपल्या मुलाबद्दल सांगत. त्यानी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले पण आईला आणि मला वाटतं असे त्याने हे अप्पाना सांगायला हवे होते.. एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आया… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ आया…  ☆ सौ. वृंदा गंभीर

माझं बालपण खेड्यात गेलं… एकत्र कुटुंब होतं मोठं होतं त्यामुळे प्रेमाला काही कमी नव्हती सगळे लाड करायचे.

खेड्यात असूनही सगळे सुशिक्षित होते… त्यामुळे शिक्षण हेच ध्येय होतं. माझं आणि भांवडांचं दहावी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला शहरात पाठवलं काकू होती आमच्याबरोबर एक स्वतःच घर घेऊन दिल सगळ्या सुखसोई करून दिल्या आणि आमचं कॉलेज जीवन सुरु झालं… 

मी सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आणि चांगल्या कंपनीत जॉब लागला, पॅकेज मिळालं दहा लाखाचं खूप आनंदी झाले सगळे एव्हणा खेड्याच रूप बदलून शहरी झाले होते. बोलणं राहणीमान थोडासा गर्व आलाच होता.

माझे भांवड पण जॉब ला लागले कोणी तर परदेशीं गेले… 

आता वेळ आली होती लग्नाची अर्थात अपेक्षा खूप होत्या माझ्यापेक्षा पॅकेज जास्त असावं त्याचा स्वतःचा बंगला गाडी एनव्हेसमेंट पुन्हा दोघंच असावे घरचे कोणीही नको… 

आई पप्पा कंटाळले स्थळ बघून कुठे मुलगा आवडत होता तर त्याची परिस्थिती नव्हती आणि असलीतर मुलगा आवडायचा नाही माझं वय 30 झालं मी प्रगती खूप केली होती. अशातच माझ्या कपंनीत एक अमेरिकेतून आलेला आपला भारतीय मुलगा आला दिसायला हँडसम होता बघताक्षणी तो आवडला हळू हळू ओळख झाली, , , , , मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

घरी सांगितलं सगळे खुश झाले लग्न करून दिल खूप थाटामाटात लग्न केल, , , , कशाची कमी नव्हती लग्न करून गावी गेलो पूजा झाली आणि हनिमून साठी स्विझरलँड ला गेलो एक महिन्याची रजा होती दोघांची खूप समाधान आणि आनंद ओसंडून वहात होता. दोघांचे विचार जुळत होते मन एकरूप झालं होतं जणूकाही एक आत्मा आणि दोन शरीर असेच एकरूप झालो होतो………

सुट्टी संपली आणि आम्ही घरी आलो दोघंच घरी रोज जॉब आणि घर सुट्टीच्या दिवशी एकमेकांना वेळ देणं बस, , , , , , , , एक दिवस खूप मळमळ व्हायला लागली थोडीशी चक्कर आली डोळ्यांना अंधारी आली काहीच सुचेना 

मी घरी आले व अभि ला म्हणजे माझ्या नवऱ्याला कॉल केला तो लगेच आला व मला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला DR म्हणाले घाबरण्यासारखं काही नाही तुम्ही “आई “होणार आहे…

मला व अभी ला खूप आनंद झाला.

घरी कळवलं सगळे भेटायला आले खायला पौस्टिक लाडू करून आणले काळीज घ्यायला सांगितली व ते पुन्हा गावी गेले.

नऊ महिने पूर्ण झाले होते कधीही डिलेव्हरी होईल असं सांगितलं रात्री अचानक पोटात कळा यायला लागल्या व मला हॉस्पिटल मध्ये नेलं सिझर झालं आणि गोड गोंडस गोरीपान मुलगी झाली…

बस आता एकच मुलगी वाढवायची असा निर्णय घेतला ती एक वर्षाची होईपर्यंत मी घरी राहिले तरीही एक आया होती तिला सांभाळायला नाहूमाखू घालायला तिचा बाळाला लळा लागला होता म्हणून मी बिधास्त होते. कामाचा व्याप वाढला होता दोघांनाही वेळ मिळतं नव्हता बाळाला वेळ देता येत नव्हता….

“अशू” म्हणजे माझी मुलगी पाच वर्षाची झाली सगळं काही आया करत होती. पण अशू एकटी पडत चालली होती हट्टी झाली होती कुणाचही ऐकत नव्हती. मीं एकदा सुट्टी काढून गावी गेले तिला थोडा बदल हवा म्हणून तिथे माझ्या जावेचे मुलं खूप शांत समजदार नाती जपणारी सर्वांचे आदर सन्मान करणारी सुसंकृत मुलं दिसली मला वाईट वाटलं कदाचित माझी मुलगी आज्जी आजोबांबरोबर राहिली असती तर अशीच घडली असती कुटुंबात जे वळण लागतं ते चार भिंतीच्या आत आया कडून कसं लागेल. मी अभी ला म्हणाले अशू करता मी गावी रहाते जॉब सोडते पण अशू ऐकायला तयार नव्हती आज्जी आजोबांना घेऊन जाऊ म्हणाले तर घरी एक आज्जी आहे मला तिचा हवी असं म्हणाली वेळ निघून गेली होती फक्त पच्छाताप उरला होता…….

पैसा तर आया ला गेला होता पण मुलगी हाताबाहेर गेली होती आता अशू कॉलेज मध्ये जात होती मित्र मैत्रिणी होत्या पण सगळे बिघडलेले बघवत नव्हतं पण चूक आमचीच होती पैसा आणि प्रतिष्ठा कमवायच्या नादात संस्कृती हरवली होती.

अशू एक दिवस लग्न करून घरी आली मुलगा ड्रग्ज घेत होता बघून खूप त्रास झाला आता पैसा उपयोगी येणार नाही आज माणूस आपलं माणूस हवं होतं असं मनाला वाटून गेलं… 

अभी ला सहन झालं नाही तो अटॅक येऊन जागीच गेला माझ्या डोळ्यापुढे अंधार होता….. आज पैसा प्रतिष्ठा सगळं होतं पण इज्जत राहिली नाही हेच खरं होतं…..

 मी ठरवलं हे सगळं दान करायचं आणि आपण आश्रमात जाऊन रहायचं आणि तिथे सेवा करायची कारण गावी जाऊ शकत नव्हते, , , , , , आज मी घातलेल्या अटीची मला लाज वाटत होती आज जर माझे सासू सासरे माझ्या सोबत असते तर आज्जीआजोबांच्या संस्कारात मुलगी वाढली असती आणि हे दिवस बघायला मिळाले नसते.

आया पैसा घेऊन कामं करणाऱ्या असतात त्या काय मुलांना वळण, संस्कार लावणार…

मला हेच सांगायचं नाती जपा मुलांना पाळणा घर किंवा आया नकोय आज्जी आजोबांची छत्रछाया हवी संस्काराची शिदोरी फक्त आज्जीआजोबा देऊ शकतात आयुष्यभर पुरेल एवढी तेंव्हा पैसा प्रतिष्ठा तर हवी त्याचं बरोबर नाती आणि संस्कार हवेत तेंव्हाच “संस्कृती टिकेल” हे लक्षात असुद्या… 

मी चुकले तुम्ही चुकू नका आई वडिलांनी शिकवलं म्हणून आपण प्रतिष्ठा मिळवली प्रगती केली जसे आपल्या आई वडिलांनी कष्ट केले तसेच सासू सासऱ्यांनी पण केलेले असतात म्हणून नवरा क्लासवन अधिकारी होतो म्हणून त्यांना मान द्या सन्मान करा आणि पुढची पिढी सुसंस्कारी घडवा तर शेवट छान होईल नाहीतर आहेच माझ्यासारखं वृद्धाश्रम

आणि हो अशू कुठे आहे, काय करते माहित नाही. ती जिवंत आहे की नाही तेही माहित नाही.

मी गेलेल्या वेळेचा आणि पैशाच्या नादात मुलीला वेळ न दिल्याचा फक्त पच्छाताप करत बसते दुसरं माझ्या हाती काही नाही.

शिक्षण घ्या पण गर्व करू नका 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जातीची चौकट… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

जातीची चौकट. – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(प्रत्येकवेळी, आता पुढच्या वेळी मी नक्की येईन असे आश्वासन मात्र त्यांना मी देत होतो. त्याअर्थाने तिकडे जाण्याची हिच योग्य वेळ होती.) – इथून पुढे —-

आज मात्र तिकडे जाण्याचा योग चांगलाच जुळून आला होता. त्यांच्याकडेच मुक्कामाला जाण्याचे मी पक्के ठरवले होते त्याला कारणही तसेच होते. एक म्हणजे मला मुक्कामाचे ठिकाण हवे होते आणि दुसरे म्हणजे अनुचे घर त्याच एरियात होते. अशोकने जो अनुचा पत्ता दिला होता तो त्याच भागातला होता. ज्या भागात माझे काका राहत होते.

मी घरी गेलो तेव्हा काका कामावर गेले होते. काकू घरीच होत्या त्यांनी माझे स्वागत केले. चहा झाला. मग त्यांनी येण्याचे कारण मला विचारले तेव्हा मी अनुचा पत्ता त्यांना दाखविला. तो वाचल्यावर ते ठिकाण इथूनच अगदीच जवळ असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना सोबत येण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी तो टाळला नाही. त्या माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाल्या. आम्ही ताबडतोब तिकडे जाण्यासाठी निघालो. आता अनुची आणि माझी भेट अगदी काही मिनिटांवर येऊन ठेपली होती होती. मी तिला भेटण्यासाठी खूप आतुर झालो होतो. माझ्या हालचालीवरून काकूंनी ते बरोबर ओळखले. ” का रे? मुलगी तुझ्या ओळखीची आहे? “

” नाही. ” 

” प्रेम वगैरे असेल तर तसे सांग. “

” तसं काही नाही काकू, माझ्या मित्राने सुचवलंय, आणि त्याने खूप आग्रह केलाय म्हणून आलोय. बहुतेक मुलगी सुद्धा चांगली आणि माझ्या इतकीच शिकलेली आहे आणि नोकरीला सुद्धा आहे. ” 

” आपल्या जातीतली आहे? ” 

” हो, म्हणजे काय? ” म्हणून तर पहायला आलोय ना. ” 

माझ्या हातातला पत्ता आणि अशोकने सांगितलेल्या खाणा-खुणा यावरून तिच्या वडिलांचे नाव विचारत -विचारत आम्ही अखेर अनुच्या घरी पोहोचलो. माझ्या काळजाची धडधड त्यावेळी दृतगतीने धावत होती.

आम्हाला समोर पाहताच तिच्या वडिलांनी आमचे हासून स्वागत केले. ते गृहस्थ बहुतेक माझ्या काकूंना ओळखत असावे असे प्रथमदर्शनी वाटले. माझे डोळे मात्र अनुला शोधात होते. तिला पाहण्यासाठी ते आतूर झाले होते. आता काही क्षणांचीच प्रतीक्षा केवळ उरली होती.

काकूंनी लागलीच माझी ओळख करून दिली. मग थोड्या इकडच्या तिकडच्या म्हणजे एकमेकांच्या ओळखीच्या, त्या एरियातल्या गप्पा झाल्या. थोडे स्थिरस्थावर झालेय असे लक्षात येताच काकूंनी विषयाला हात घालत त्या गृहस्थांना म्हणाल्या, ” मुली घरात दिसत नाहीत?” 

” हो, तशा बाहेर म्हणजे गेल्यात म्हणजे ?मोठ्या मुलीचं लग्न झालेय ना मागच्या वर्षी आणि छोटी मुलगी बाहेर गेलीय मैत्रिणीकडे. येईलच ती एवढ्यात. ” अनुच्या वडिलांनी एका दमात सगळे सांगितले. अनु बाहेर गेलीय म्हटल्यावर माझी थोडी थोडी निराशा होणे स्वाभाविक होते. अरे यार इतकं पण नशीब खोटं असू नये म्हणून मला स्वतःचीच कीव येत होती. परंतू ती लवकरच येणार आहे म्हटल्यावर मला थोडे हायसे वाटले.

अनुचे वडील चांगले सुशिक्षित गृहस्थ दिसत होते. बोलायला एकदम फर्डा वाटत होते.

वातावरण अनुकूल झाल्याचे लक्षात येताच काकूंनी लगेच मूळ मुद्दा पुढे केला, ” हो, आम्ही तिला पाहण्यासाठीच आलोय. तिचं काही कुठे ठरलं वगैरे तर नाही ना?…. ” 

“छे, छे अजूनतरी नाही. पण शोध मोहीम म्हणाल तर ती सुरु केली आहे. ” त्यांचे ते उत्तर ऐकून माझे कान जणू तृप्त झाले होते. सगळेकाही अनुकूल घडत होते. मला छान वाटत होते. अनु लवकर ये बाई असे माझे मन आतून म्हणत होते.

” ताई, आपल्याला माहित नसेल तर एक गोष्ट आधीच क्लिअर करतो ते म्हणजे आमच्या मोठ्या मुलीने इंटरकास्ट मॅरेज केले आहे. तुम्हालाही ते मंजूर आहे काय? व तुमचाही तसाच विचार आहे काय?म्हणजे तसे जमेल काय? तसे असेल तर ठिक. आपण बोलणी सुरु करू शकतो. ” 

जमेल काय?अशा त्या गृहस्थांच्या गुगलीने मी संभ्रमात पडलो होतो. त्याची उकल मला होत नव्हती.

 परंतू ती गुगली न कळल्यामुळे काकू लगेच, ” हो ” म्हणाल्या.

“अहो हल्ली चालते सगळीकडेच आणि तुम्हाला चालते म्हटल्यावर आम्हाला काही हरकत नाही. त्या तुमच्या मोठया मुलीच्या इंटरकास्ट मॅरेजशी आम्हाला काही देणेघेणे नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. “

” नाही नाही ताई, जे सत्य आहे ते तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. ” ते गृहस्थ अतिशय नम्रपणे म्हणाले.

 मी मान डोलवत ” हो ” असे म्हणत त्यांच्या हो त हो मिसळला. कारण मला लग्न अनुशी करायची होते.

” तुम्हाला आंतरजातीय विवाह चालेल का? ” असा थेट सवाल त्यांनी आम्हाला केला. तेव्हा मग मी पटकन म्हणालो, ” ते कसं शक्य आहे?आणि आम्हाला इंटरकास्ट मॅरेज करायची गरजच काय? ” 

” अहो, आमच्या मुलाचे काही लव्हमॅरेज नाही. तुमच्या मुलीची आणि त्याची अजून ओळख सुद्धा नाही. आम्ही तुमच्या मुलीला रितसर मागणी घालायला आलो आहोत.

” काकू पटकन पुढे म्हणाल्या.

 ” म्हणजे ताई, तुम्ही आम्हाला ओळखलेले दिसत नाही? ” अनुचे वडील पटकन म्हणाले. “

” अहो, ओळखते ना आपण किती वर्षे झाले एकाच एरियात राहतोय. माझे मिस्टर ओळखतही असतील तुम्हाला. ” 

” अहो तेच सांगतोय तुम्हाला, तुमच्या मिस्टरांना ओळखतो मी, म्हणूनच तर म्हणतोय की आपली कॅटेगरी एक आहे पण आपली जात एक नाही… ” 

” काय सांगता?” 

” हो ना, माझ्या ते आधीच लक्षात आले परंतू तुमच्या लक्षात येत नसल्याने मला हे सगळं सांगावं लागलं. ताई, आपली जात वेग वेगळी आहे. परंतू तुम्हाला चालत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही. तुमचा मुलगा छान आहे. आमची काही हरकत नाही. ” त्यांचे ते शब्द ऐकताच माझा चेहरा एकदम खरखर उतरला…

अशोकच्या सांगण्यावरून मला अनु खूप आवडली होती. कदाचित आमचे आपोआप प्रेम संबंध जुळले असते तर मी जातीचा विचार न करता बिनधास्तपणे अनुशी आंतरजातीय विवाह केला असता. तिथे जातीचा प्रश्न आलाच नसता. परंतू एका अनोळखी मुलीशी ऍरेंज मॅरेज आणि तेही इंटरकास्ट? ते कदापि शक्य नव्हते. खरे सांगायचं तर काही केल्या जातीची चौकट मोडायला माझेही मन त्यावेळी तयार होत नव्हते….

अजून कशातच काही नाही. अनुची भेट अजून व्हायची आहे तेव्हा ती येण्याअगोदर इथून आपण निघालेले बरे. असे ठरवून आम्ही उठलो आणि त्या तिच्या घराच्या चौकटीतून जातीची चौकट अबाधित ठेवून आम्ही तिच्या वडिलांना हात जोडून बाहेर पडलो…! 

— समाप्त — 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जातीची चौकट… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

जातीची चौकट. – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी मी पुण्याला जात होतो. यावेळी अनुला नक्की भेटायचंच असं ठरवूनच मी निघालो होतो कारण यावेळी अशोकने मला शेवटची वॉर्निंग दिली होती अन्यथा ती मला मिळण्याची शक्यता फार कमी आहे असे सांगितले होते. मी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत अनुला गमावण्याच्या मनस्थितीत नव्हतो.

खरे पाहता मी आणि अनु एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो. आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष कधी पहिले सुद्धा नव्हते. परंतू आमच्या दोघांमधला दुवा म्हणजे अशोक आम्हाला लग्न बंधनाच्या धाग्याने एकत्र बांधू इच्छित होताआणि त्यामुळेच तर एकमेकांना भेटण्यासाठी आम्ही (म्हणजे मी तरी तिचे माहित नाही परंतू अशोकच्या सांगण्यावरून असे वाटत होते की बहुधा तीही माझ्या इतकीच उत्सुक असावी) उत्सुक होतो.

तिची माझी भेट होणार काय? आमचे लग्न जुळणार काय? या मध्ये एकच गोष्ट उभी होती आणि ती म्हणजे नियती! तिच्या हातात खरे तर ती दोरी होती. नाहीतरी तीच सगळे ठरवीत असते.

आपण काय फक्त मोठामोठी स्वप्ने रंगवीत असतो. पुढे काय घडणार आहे ते आपल्याला कुठे माहित असते?नियतीच तर सारेकाही ठरवत असते ना…

“अनु दिसायला खूप सुंदर आहे, देखणी आहे, आपल्या इतकीच शिकलेली सुद्धा आहे आणि  एका महाविद्यालयामध्ये लेक्चरर आहे. शिवाय आपल्या जातीतली आहे. तेव्हा तू लवकर येऊन तिला पाहून घे. अन्यथा चांगले स्थळ हातचे जाईल, “असे अशोकने मला वारंवार फोनवरून सांगितले होते. मी हो म्हणायचो परंतू प्रत्येकवेळी काहीतरी अडचण यायची आणि मला जाणे शक्य व्हायचे नाही.

ज्या ज्या वेळी आमची म्हणजे अशोकची आणि माझी प्रत्यक्ष भेट व्हायची त्या प्रत्येकवेळी तो अनुच्याच विषयावर माझ्याशी भरपूर चर्चा करायचा. मी बरेचदा दुर्लक्ष करायचो कारण मला एवढ्यात लग्न करायचे नव्हते. कारण माझी घरची परिस्थिती त्यावेळी नाजूक होती. गावाकडे अजून बरीच कामे मला करायची होती. त्यानंतरच मग लग्नाचा विचार मला करता येणार होता.

तसे पहिले तर अनु आणि अशोक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये नोकरीला होते पण ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते त्यामुळे एकमेकांना ते दोघे चांगले  परिचित होते.

अशोक मला नेहमी अनुविषयी पुष्कळ गोष्टी सांगायचा. अनुची आणि तुझी जोडी छान जमेल असं म्हणायचा. त्याच्या अशा सततच्या सांगण्यामुळे माझ्या नजरेसमोर त्याने तिची एक वेगळीच मूर्ती उभी केली होती. ज्यामुळे अनुविषयी माझे आकर्षण दिवसांगाणिक वाढत चालले होते.

मी नेहमी अशोकला म्हणायचो, ” अरे, मी खेड्यातला, ती शहरातली, आमच्या दोघांचे सूत जमेल काय?नाहीतर बघ बाबा? काहीतरी गडबड व्हायची! त्यापेक्षा त्या नादाला न लागलेले बरे… “असे मी विचारल्यावर तो सांगायचा, ” अरे, असं काहीही होणार नाही, मित्रा. तू बिल्कुल चिंता करू नकोस. तुझ्याबद्दल मी सगळं काही अनुला सांगून ठेवलयं…. ती तुझ्याशी लग्न करायला नक्की तयार होईल. आणि हो, तुझ्यात काय कमी आहे रे? मी तिला तुझं घर, तुझं गाव, तुझी शेती, अगदी सगळं- सगळं तुझ्याबद्दल तिला सांगून झालंय आणि तिनेही ते सगळं मान्य करून तुझा स्वीकार करायचा ठरवलयं. आता फक्त तिने तुला पाहणे एवढेच बाकी आहे. तिला तुझ्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे. मगच सगळं फायनल होईल. तेव्हा आता तू लवकर  पुण्याला ये आणि तिची भेट घे, आता उशीर करू नकोस. तुम्हा दोघांची भेट घालून दिली की माझे काम संपले! ” त्याच्या अशा सांगण्याने माझ्याही मनात लग्नाचे विचार घोळायला लागले. अनुच्या सौंदर्य स्वप्नात मग मीही  गुंग व्हायला लागलो.

आत्ता चला एकदा अनुला भेटून प्रकरण निकाली काढूया असे ठरवून एकेदिवशी मी तिला भेटायचंच असं ठरवून खास पुण्याला रजा काढून गेलो. तिथे गेल्यावर तिचे कॉलेजही बरोबर शोधून काढलं. पण गंमतच झाली की माझे दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा त्या दिवशी ती नेमकी रजेवर होती… ! त्यामुळे माझी निराशा झाली… ! तिचे दोघेतिघे सहकारी तेवढे तिथे भेटले. त्यांच्याशी ओळख झाली. मग थोडया गप्पा झाल्या. त्यातल्या एकाजवळ हळूच अनूचा विषय काढला तर त्याने तिच्याबद्दल भरपूर माहिती मला दिली. तिच्याबद्दल सगळे छानच सांगितले, त्यावरून तर तिला भेटण्याची ओढ मला आणखीनच लागली.

ती तिथे कॉलेजवर भेटली नसल्याने काहीही करून त्याच दिवशी तिच्या घरी जाऊन तिला तात्काळ भेटून काय तो सोक्षमोक्ष लावण्याचा माझा विचार पक्का झाला परंतु त्यांची पूर्ण फॅमिलीच गावाला गेल्याचे अशोककडून मला समजले. संकटे अशी एकटीदूकटी येत नसतात म्हणजे काय असतं हे मला त्यादिवशी समजलं. एखादी गोष्ट नसेल होणार तर तुम्ही लाख प्रयत्न करा नकार घंटाच वाजणार! हे मला अनुभवास येत होते. परंतू मी हार मानणाऱ्यापैकी थोडाच होतो. बचेंगे तो और भी लडेंगे हे लहानपानापासून चांगले अंगात मुरले होते. नाहीतरी माणूस आशेवरच जगत असतो ना? ती एक भाबडी आशा प्रयत्न करायला भाग पाडत होती.

त्यानंतर असेच दोन-तीन महिने निघून गेले आणि मग तो शुभ दिवस उगवला!  त्या दिवशी मी विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी पुण्याला जात होतो. यावेळी मी पुण्यात एक दिवस मुक्कामीच जाणार असल्याने अनुला भेटण्याचे नक्की केले होते. अशोकलाही फोन करून मी येत असल्याचे कळवले होते. उत्सुकता शिगेला पोहोचली होती… दिवसभर मी खुशीत होतो. संमेलनात माझे मन काही केल्या लागत नव्हते. तिथे मी केवळ शरीरानेच उपस्थित होतो. मन मात्र अनुशी हितगुज करण्यात गुंतले होते. तिच्या समोर गेल्यावर ती कशी रिऍक्ट करेल? मग तिच्याशी बोलायला कुठून व कशी सुरुवात करायची? लग्नाचा विषय कसा काढायचा? असे सगळे विचार माझ्या मनात एकसारखे धुमाकूळ घालत होते.

मधूनच कधीतरी जेव्हा मी भानावर येत होतो तेव्हा संमेलनाच्या पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र कधी संपेल याचीच वाट पाहत होतो.

अखेरीस सायंकाळचे पाच वाजले. संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्राचा समारोप झाला आणि मी मुक्कामाच्या ठिकाणाच्या दिशेने निघालो.

त्या दिवशीचा मुक्काम मी माझ्या काकांकडे विश्रांतवाडीला करणार होतो. त्यांना मी तिथे येत असल्याची कसलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. परंतू तिथेच मुक्कामाला जायचे हे आधीपासून ठरवले होते. अगदी अचानकच जाणार होतो कारण घर आपलंच होतं. शिवाय माझे काका  काकू अनेक दिवस मला तिकडे येण्यासाठी आग्रह करत होते परंतु मलाच या ना त्या कारणाने त्यांच्याकडे जाणे जमत नव्हते. प्रत्येकवेळी, आता पुढच्या वेळी मी नक्की येईन असे आश्वासन मात्र त्यांना मी देत होतो. त्या अर्थाने तिकडे जाण्याची हीच योग्य वेळ होती.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवा तू आहेस ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ देवा तू आहेस ? – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

आज आई खूप रडत होती… बाबांनी घरातले सगळे देव पिशवीत भरले होते आणि नदीत विसर्जन करायला निघाले होते.. आईचा देवावरचा प्रचंड विश्वास बाबांना खपायचाच नाही. माणसाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास हवा हे त्यांचं ठाम मत.. कमकुवत माणसं देवाच्या नादी लागतात आणि स्वतः कष्ट करत नाहीत आणि आईचं तेच होत चाललं आहे ही त्यांची तक्रार होती. आता हे देव नकोच..

घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य ‘देवाची कृपा’.. !आता बाबांनी विडाच उचलला बघू हिचे देव स्वतःचं तरी रक्षण करू शकतात का?नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का?

रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले.. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने…

इकडे रडून रडून आईचे डोळे अक्षरशः सुजले होते.. आज आईचं अजिबात ऐकत नव्हते बाबा आणि म्हणाले, “याद राख एकजरी देव विकत आणलास तर.. ”

आईला तर सुचतच नव्हते काय करावं ?तिला वाटतं होतं निदान घरात राहूद द्यावे देव, हवं तर पुजा करणार नाही मी.. पण असे देव्हारा रिकामा करू नये शेवटी तिची शक्ती होती ती.

एरवी बाबा एकदम प्रेमळ माणूस.. पण देवावर अजिबात विश्वास नाही आणि त्यामुळे आईच आणि त्यांचं नेहमीच खटकायचं त्यावरून…

इतके दिवस निदान पूजा तरी करू द्यायचे पण कालपासून आई गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करत होती आज अर्ध्या दिवसांनी बाजारातून सजावटीच्या, पूजेच्या तयारीसाठी सगळं घेऊन घरी आली. किती हा टाईमपास आहे असं वाटून तेवढ्या वेळात बाबांच्या रागाचा पारा चढलेला होता…

आईला फारच मोठा धक्का बसला…. आईला माहित होते काही दिवसांनी राग उतरल्यावर बाबांना त्यांची चूक समजेलही पण गणेशउत्सव संपल्यावर उपरती होऊन काय उपयोग? खूप चलबिचल वाढली होती मनाची तिच्या..

देव असतो की नसतो ?ह्या विषयावर तिला बोलायचंच नव्हतं.. देवाची पूजा केल्यावर मनाला प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो हा साधा सरळ हिशोब होता तिचा. परत बाबांनी देवाचं काहीही करावं अशी अपेक्षा कधीच केली नाही तिने. तिला साधी मनोभावे पूजा करायची असायची, काही चांगलं झालं की देवाच्या कृपेने होते आहे ही भाबडी असेल, पण श्रद्धा होती तिची..

बाबांना हे पातक करण्यापासून कसे थांबवायचे सुचतच नव्हते तिला… देवाचा सन्मान बाबांनी कधीच केला नव्हता, आईची हरकत नव्हतीच त्याला. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असे मानून ती पुढे चालायची..

…. देवावर विश्वास ठेवावा की नाही हे ज्याने त्याने आपापल्या अनुभवावरून ठरवावे पण दुसऱ्यांनी काय विचार करावा ?मग ती हक्काची बायको का असेना ठरवायचं अधिकार कोणालाच नसावा.

बाबांची गाडी आलिशान बंगल्यातून बाहेर पडत होतीच तेवढ्यात आस्थाची शाळेची बस आली. पाचवीतली आस्था रडत रडत बसमधून खाली उतरली. बाबांना गेटवर पाहून तर अजून हुंदके देऊन देऊन रडायला लागली…. आस्था म्हणजे जीव की प्राण होती बाबांचा.. ! तिला रडताना पाहून गाडी गेटमधेच ठेऊन बाबा धावत गेले तिच्यापाशी…. तिला कडेवर घेतलं आणि विचारलं, “काय झालं का रडते आहेस बाळा?काही लागलं का ?कोणी बोललं का ?सांग.. बाबा आहेना बघून घेईन कोणी माझ्या छकुलीला त्रास दिला?”

रडता रडताच तिने तिच्या दोन्ही मुठी उघडल्या तर हातात मातीचा गोळा होता. ती बोलायला लागली, “बाबा तो मयंक फार फार वाईट आहे, आमच्या शाळेत आज मातीचा गणपतीबाप्पा बनवायचं वर्कशॉप होते.. मी इतका सुंदर गणपती बनवला! मॅमनी पूर्ण क्लासला दाखवला आणि मला शाबासकी दिली.. शाळा सुटल्यावर मयंकनी माझा बाप्पा हिसकावला आणि शाळेतल्या माठात टाकून दिला सगळा बाप्पा विरघळला… एवढीच माती मी हात घालून मिळवली. बाबा इतका वाईट आहे मयंक, मी कधीच बोलणार नाही आता त्याच्याशी. असं कधी बाप्पाला पाण्यात फेकतात का?पण मला ड्राइवर काका म्हणले तू ह्या मातीपासून परत बनव देवबाप्पा, बाप्पाला कोणीच मोडू शकत नाही. बाबा मला बाप्पा बनवायला कोण मदत करेल आता? ही माती पण उरली नाही.. ”

बाबांना एकदम भरून आले होते.. अश्रूंनी डोळे भरले होते, लाडक्या लेकीच्या डोळ्यातली हतबलता पाहून..

“मला बाप्पा बनवायचा आहे बाबा, त्या मयंकला रागवा तुम्ही खूप !”असे म्हणून आस्था परत जोरजोरात रडायला लागली..

खिशातल्या रूमालानी बाबांनी तिचे डोळे पुसले…. आणि म्हणाले “चल आपण बनवू बाप्पा.. पण त्या आधी मला एक काम करायचे आहे,”  असे म्हणून बाबांनी गाडी परत जागेवर लावली आणि सांभाळून पिशवी बाहेर काढली. आस्था म्हणाली, “ हे काय आहे बाबा आपले देव का ठेवलेत पिशवीत ?”

तसे बाबा आईकडे बघून म्हणाले, ”आईने ठरवलंय की ह्या वर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा तू, तुझी आई आणि तुझे बाबा बनवून देव्हाऱ्यात ठेवणार.. हा गणपती कधीच पाण्यात जाणार नाही आपण विसर्जन सुपारीच्या गणपतीचं करायचं… आज आपल्याला सगळे देव स्वच्छ करायचे आहेत. बाकी सगळी तयारी आईने केलीये म्हणून ह्यावर्षी देव मी स्वतः चमकावणार आणि स्थापित करणार…. आस्थाने बनवलेल्या गणपती बाप्पाला आता अढळस्थान मिळणार ह्या देव्हाऱ्यात. आस्था जा पटकन हातपाय धुवून ये आपण नविन माती आणायला जाऊ आपल्या बागेतून. ”

आई शांतपणे बाजूला उभं राहून बाबांचा बदललेला अवतार बघत होती.

आस्था गेल्यावर हळूच म्हणाली, “काहो दुसऱ्याच्या लेकीच्या डोळ्यात पाणी पाहून हृदय द्रवल नाही तुमचं, स्वतःच्या लेकीच्या डोळ्यात अश्रू काही क्षण पण सहन झाले नाहीना ?”

बाबा हसून म्हणाले, “हो खरंय तुझं नाही बघवलं मला आस्थाला कासावीस होताना, पण माझे डोळे उघडले ह्या विघ्नहर्त्याने….. मी फार तोऱ्यात तुला म्हणालो होतो की बघू ‘तुझे देव स्वतःचं रक्षण करतात का ?’निघालो होतो सगळ्यांना नदीत विसर्जन करायला आणि बघ ना बंगल्याच्या गेटच्या बाहेर सुद्धा त्यांनी मला जाऊ दिलं नाही. आस्थाच्या रूपात त्यांनी माझे डोळे उघडले एवढंच ! देव नावाचं काही मूर्तरूप आहे का हे मी नाही सांगू शकणार.. पण एक अज्ञात शक्ती आहे जी कुठेतरी कधीतरी तुम्हाला स्वतःची जाणीव करून देते एवढं मात्र नक्की.”

आई समाधानाने बोलली, “मला तर ती शक्ती नेहमीच जाणवते.. आपल्यावरची कित्येक विघ्न देवाने दूर केली. पण आज विघ्नहर्त्याने स्वतःवरचं विघ्न दूर केलंय. ”

तेवढ्यात आस्था आली आणि ते तिघेही गणपती बाप्पा बनवण्यासाठी बागेतून माती घेऊन आले..

जो विधाता साऱ्या सृष्टीचं रक्षण करतो तो स्वतःचं रक्षण करणारच ना ? 

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता सती पार्वती पिता महादेवा 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कासावीस…” लेखिका : सुश्री माधुरी काबरे ☆ प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆

☆ “कासावीसलेखिका : सुश्री माधुरी काबरे ☆ प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆

गुडघे धरून भागीरथीबाई उठल्या. ‘थांबा चहा टाकते, ‘ असं म्हणून मंद गतीने कपाटामागच्या बाजूस गेल्या. त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी आडोसा केला होता. त्या कपाटावर वेड्यावाकड्या इंग्रजीत मुलांनी ‘किचन’ असे खरडले होते. भागीरथीबाईंनी स्टोव्ह पेटवला आणि त्या आवाजाने मथूअत्या सुखावली. दुपारी एक पासून येथे आल्याचा फायदा झाला होता. गेले दोन अडीच तास मथूआत्या बडबडत होती. सुरकुतलेल्या चेहऱ्याने आणि तोंडाच्या बोळक्याने चमत्कारिक दिसणारी माथूआत्या गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी भागीरथीबाईंच्या कानावर भसाभसा ओतत होती. भागीरथीबाई चहाला उठल्या तेव्हा ती ‘नको’ असे मुळीच म्हणाली नाही. गरम पाण्यात टाकलेल्या चहाच्या पत्तीचा उत्तेजक सुगंध नाकात भरून घेत ती लुकलुकत्या डोळ्याने भावाचा केविलवाणा संसार न्याहाळत होती.

गावातच मोठा वाडा असूनही केशवराव आपल्या चार मुलांना घेऊन या एका दरिद्री खोलीत राहत होते. ती खोली अत्यंत अव्यवस्थित होती. कधीकाळी तेथे फरशी असावी. आता मात्र मधून मधून कित्येक फरशा उखडल्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यासारख्या भागात वाळू, दगड, कचरा तसाच लोळत होता. एका पसरलेल्या तोंडासारख्या दिसणाऱ्या लांब बोळकांडीत देव होते. भोवतीने कितीतरी तसबीरी होत्या. त्या सगळ्यांवर कधी काळी घातलेल्या आणि आता वाळून कोळ झालेल्या झेंडूच्या माळा लटकल्या होत्या. खोलीची एका बाजूची भिंत अडवून एक मोठा छप्पर पलंग होता… केशवरावांनी भांडून मिळवलेला. त्यावरच्या मच्छरदाणीसाठी असलेल्या नक्षीदार दांड्यावर कळकट कपडे लोंबत होते. पलंगावर चार-पाच गाद्या होत्या. त्यावर उडी मारूनच चढावे लागले असते. पलंगाखाली कसले कसले डबे, बाटल्या, गाठोडी, ट्रंका यांची गर्दी माजली होती. पलंगाच्या लगतच एक भले मोठे उंच कपाट त्या खोलीशी विसंगतपणे उभे होते. त्याने जो आडोसा केला होता, तेच स्वयंपाक घर होते. राहिलेल्या कोपऱ्यात एक माणूस कसाबसा उभा राहील अशी मोरी होती. तिच्या बुटक्या कठड्यावर एक काळपट रंगाचे पिंप स्तब्धपणे पेंगत होते. जवळच दोन बादल्या बेववरशासारख्या लोळत होत्या. त्या खोलीला असलेल्या एकुलत्या एक चारखणी सेल्फचा प्रत्येक खण पुस्तकांच्या गर्दीने ओसंडत होता. आपापल्या खणावर मुलांनी आपली पूर्ण नावे लिहिली होती.

‘भागीर्थी पहिल्यापासूनच आजागळच नाहीतरी’, मथूआत्या मनाशी म्हणाली आणि समोर आलेले दहा मिटक्या मारीत लपालपा पिऊ लागली. भागीरथीबाई चमत्कारीक आवाज करीत चहा पीत मक्ख चेहऱ्याने बसून होत्या. त्यांच्या घामट चेहऱ्यावर एक प्रकारचा मख्ख भाव नेहमी चिकटून असायचा. तशा काही त्या खरोखर मख्ख होत्या असे नाही, पण दिसायच्या मात्र. आणि राहणीही अगदीच काहीतरी होती.

दोघींचा चहा पिऊन झाला. तुडतुडीत मथूअत्या चटकन उठली. त्या पिपातील शिळ्या पिवळट पाण्याने कपबशी धुऊन तिने कपाटाशी पालथी घातली आणि आपल्या झुळझुळीत पातळाचा पदर खांद्यावर ओढून घेत म्हणाली, “भागीर्थीवैनी, जाते आता. स्वयंपाकाला लागायला हवं. येत जा कधीमधी. ”

“वन्स, तिथे येऊन उगीच अपमान करून घ्यायला काय मला हौस आलीय? तुम्हीच आज आलात तशा या केव्हाही. हेही घर तुमचंच आहे. ”

“माझं आहे म्हणून तर आले! जाऊ आता? पाच वाजायला आले असतील. वीस-पंचवीस माणसं जेवणारेत रात्री. ” मथूआत्या सूचकपणे अंदाज घेत म्हणाली. पण भागीरथीबाईंनी लक्षात येऊनही त्यावर रुक्ष हुंकार भरला.

मथूअत्या तरीही चिकाटीने म्हणाली, “कशाला म्हणून नाही विचारलंस बरी?”

“कशाला?”

“अगं, पम्मीचं लग्न ठरलंय ना! ती माणसे यायची आहेत आज. पोरीनं मात्र नशीब काढलंन हो… ”

मथूआत्याचे पुढले शब्द भागीरथीबाईंना कळले नाहीत. त्यांच्या मख्ख देहावर अचानक सरसरून वीज चमकली. मन कुठेतरी व्याकुळ व्याकुळ झालं. मथूआत्याजवळ काहीतरी मनातलं बोलून टाकावसं वाटलं. पण त्यांनी स्वतःला आवरलं. लगबगीने निघालेल्या मथूआत्याने पम्मीच्या स्थळाचे वर्णन अर्धा तास केलं नि ती तुरुतुरु निघून गेली.

ती गेल्याच भागीरथीबाईंना बरंच वाटलं खरं. पण तिथं स्वच्छ धुतलेलं चांगल्यापैकी लुगडं, काटक्यासारख्या हातात खडखडणारे दोन-दोन बिलवर, गळ्यातील चमकदार कंठी आणि कानातल्या कुड्या त्यांच्या डोळ्यासमोर हालत नव्हत्या. वाड्यातल्या घराचं तिने केलेलं रसभरीत वर्णन भागीरथीबाईंना डोळ्यासमोर दिसत होतं. आणि जाताना डोक्यात दगड घातल्यासारखे सांगितलेली पम्मीच्या लग्नाची बातमी भागीरथीबाईंच्या चक्काचूर करत होती. पम्मीचं लग्न! त्यांच्या धाकट्या जावेच्या मुलीचं लग्न! त्यांच्या मनात मत्सर उगवला आणि पाहता पाहता फोफावू लागला. दातावर दात वाजले आणि त्या लग्नात अडथळा आला तर बरं होईल, असं त्या मनापासून घोकू लागल्या. अशुभ घटनांच्या घड्याच्या घड्या रचून उस्कटू लागल्या. मनाची तगमग थोडी शमू लागली.

“आई काय झालं तुला? गप्पशी बसलीस?” विणाच्या उद्गारानं त्या खडबडून भानावर आल्या. वीणा नोकरीवरून परत येऊन पातळ बदलत होती. तिचं थोराड शरीर भागीरथीबाईंना खूपू लागलं. एक दोन मुलांच्या आईसारखी वीणा दिसत होती. पहिलं पातळ एका ट्रंकेत ठेवून दांडीवरचं हिरवट वीटकं पातळ नेसली. तिच्या पोटावरील विद्रुप वळ्यांकडे पाहत भागीरथीबाई सुन्नपणे बसून होत्या. वीणाच मग त्या कपाटामागे जाऊन स्टोव्ह पेटवू लागली. तिला रोज आल्यावर चहा लागायचा. भागीरथीबाई रोज मनापासून करूनही द्यायच्या. पण आज त्यांना हलावंसच वाटत नव्हतं. त्यांना विणेचा राग येत होता. त्यांच्या डोळ्यासमोर नाजूक सडसडीत पद्मजा येत होती. मुंडावळ्या बांधून ती गोड हसत होती… आणि हिरवट वीटकं पातळ नेसून वीणा चमत्कारिकपणे वाकून उभी होती.

“वीणे, पम्मीचं लग्न ठरलं बरं का. दुपारी मथूवन्स आल्या होत्या. ” उपरोधपूर्ण स्वरात भागीरथीबाई म्हणाल्या.

“हो का? वा!” वीणाचा स्वर एकदम वेगळा आला आणि भागीरथीबाईंचं मन तिच्याविषयी एकदम हळवं झालं. आपल्या प्रौढ मुलीला पदराखाली घेऊन थोपटावं असं त्यांना वाटलं. पण त्या तिथेच काळजीत बसून राहिल्या. आत वीणाही गप्प होती. करून घेतलेला चहा तिला घ्यावासा वाटत नव्हता. आपल्या घाऱ्या डोळ्याने कुठेतरी पहात ती आतच बसून राहिली होती. एकदम बधीर झाल्याप्रमाणे तिचं डोकं जड झालं होतं आणि अडगळीत टाकलेल्या वस्तूप्रमाणे सारे विचार दूर टाकून पम्मीच्या लग्नात ती गुरफटली होती.

संध्याकाळ केव्हाच घरात शिरली. बाहेरच्या बाजूला घामट आणि मख्ख भागीरथीबाई आणि कपाटाच्या आतल्या बाजूला थुलथुलीत वीणा! कितीतरी वेळ गेला आणि कलकल करीत मुलांनी त्या शांततेची शकलं करून टाकली. भागीरथीबाई व वीणा एकमेकींची नजर टाळत स्वयंपाक घरात खुडबडू लागल्या. मध्येच कोणीतरी बटन दाबलं आणि धुळीने माखलेल्या बल्ब मधून चोरटा अंधुक प्रकाश लोंबकळू लागला. वीणाने देवांच्या बोळकांडीत एक भित्रट ज्योतीचे निरंजन लावले नि उदबत्तीच्या भडक गंधाने क्षणभर तिथे फेऱ्या मारल्या.

“वीणाक्का, शुभम करोती सांग की’, मुलं म्हणाली. पण त्यांना तीरसटपणे उत्तर देऊन विचित्र चालीने वीणा बाहेरच्या पायरीवर येऊन बसली. समोरच्या घरातून ऐकू येणारा रेडिओ ऐकत नेहमीच तिथे बसायची. पण आज मात्र ते सूर तिच्या कानापर्यंत येऊ शकत नव्हते. एरवी ऑफिसमधल्या लोकांच्या नकला करून विचित्र आवाज करून वीणाक्का खूप मजा करायची. पण आज मात्र आपले घारे डोळे जास्तच गहिरे करून ती आतल्याआत स्फुंदत बसली होती. पम्मी! तिची आवडती बहीण… वाड्यात दोघींची जोडी असायची. गेली सात-आठ वर्षे मात्र त्या दोघी एकमेकांशी बोलल्याही नव्हत्या. गेली आठ वर्षे पम्मी त्या प्रशस्त वाड्यात बागडत होती आणि विणा या दरिद्री खोलीत आयुष्याबरोबर फरफटत होती. बापाच्या हट्टीपणात आणि चिडकेपणात, आईच्या अव्यवस्थितपणात विणा कधीच प्रौढ झाली होती. अकाली सुकून गेली होती. वाड्यात असती तर ती कदाचित आज… पम्मीचा तिला प्रथमच भयंकर संताप आला आणि लगेच तिचा आपल्याला का संताप यावा याबद्दल स्वतःचाही संताप आला. तेव्हा हळूच मनात एक वेदना ओघळली आणि अचानक वेगाने आलेले अश्रू तिला थांबवता येईनात.

कोणालातरी जोर जोराने शिव्या देतच केशवराव घरात आले, तेव्हा मुलं गाढ झोपली होती. भागीरथीबाई त्यांची वाट पाहत पाटावर बसून होत्या आणि वीणा डोळ्यापुढे पुस्तक धरून वेळ काढत होती. कपडे बदलून केशवराव जेवायला येऊन बसले तेव्हा ते तंद्रीतच बडबडत होते, “हरामखोर लेकाचे, समजतात कोण स्वतःला? अरे, तुमच्या हाताखाली नोकरीला असलो म्हणून काय झालं? मनात आलं तर आत्ता लाथ मारीन… ”

त्यांच्या पानात भात वाढत भागीरथीबाई म्हणाल्या, “दुपारी मथूआत्या आल्या होत्या. ”

“घेतलंस कशाला तिला घरात? आमचा अपमान करायला येते साली. तुला एक कळत नाही काडीइतकं… ”

“पम्मीचं लग्न ठरलंय!” त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत भागीरथीबाईंनी त्यांच्याकडे रागारागाने पाहत म्हटले.

“ऑ?” केशवराव एकदम दचकले. त्यांनी वीणाकडे पाहिले. तिचे डोळे भरले होते. केशवराव तोंड दाबल्यासारखे गप्प बसले. त्यांनी कोणालाही शिव्या घातल्या नाहीत की ते तणतणले नाहीत. वचावचा जेवून ते इकडेतिकडे फेऱ्या घालू लागले. भागीरथीबाई न जेवताच भरल्या ताटासमोर तशात बसून राहिल्या आणि गेला तासभर उघडलेले एकच पान वाचण्याचा वीणा पुन्हा प्रयत्न करू लागली.

अंधुक प्रकाशातील त्या केविलवाण्या खोलीत असलेल्या त्या तीन माणसांच्या मनात काहीतरी घुमत होते. त्याचा आवाज एकच होता. त्याचा अर्थ एकच होता. कुठूनतरी गळत आलेली एक व्यथा त्या तिघांच्या आतबाहेर वाहत होती आणि त्यात बुडून ते कासावीस होत होते !

लेखिका: सुश्री माधुरी काबरे

प्रस्तुती : श्री जगदीश काबरे (मधुर जग फाउंडेशन)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ते दोघे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “ते दोघे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळची वेळ..

“अहो दुधाची पिशवी आत आणता का? मगाशीच बेल वाजली.. “

“अरे बेल कधी वाजली? मला नाही ऐकू आली. थांब तू नको उठू.. तुला बरं नाही. आज तू दिवसभर आराम करायचा हे ठरल आहे ना… म्हणून तर सकाळ संध्याकाळ डबा सांगितला आहे. दोन वेळेसचा चहा तो काय….. मी करीन. ” तो एका दमात हे बोलला. ती आत गेली.

त्याच्या लक्षात आल आज आपण प्रथमच दूध आत घेत आहोत….

नाहीतरी प्रत्येक वेळेस बेल वाजली की तीच दार उघडते….

दुधाची पिशवी कापून दूध पातेल्यात घालताना दूध सांडलंच.. पटकन त्यांनी तिथल्या नॅपकिननी ते पुसून घेतलं. ती समोर नव्हती… ते एक बरं..

“अहो दूध तापलं असेल बघा… नाहीतर गॅस मोठा करून तिथे थांबून तापवून घ्या… “

” बरं बरं…. “

च्यायला… दूध तापायला किती वेळ लागतो…. इथे नुसतं बघत उभ राहायचं…..

तो वैतागून पुटपुटला..

शेवटी तापलं एकदाच दुध. तो पेपर वाचत बसला.

सकाळी अकराची वेळ

“अहो तुमचा दुसरा चहा… “

” आता परत दूध तापवायचं? “

“साय चांगली येण्यासाठी मी चारदा दूध तापवते…. “

दुध गॅसवर…. गॅसची फ्लेम कमी झाली का काय… काय कटकट आहे… कुकरला शिट्टी असते तस काहीतरी हव होतं…

मग त्याच्या लक्षात आलं आपल्याच चहासाठी दूध तापवणं चाललं आहे….

तसा बरा झालाय चहा… जमतय आपल्याला पण… अजून प्रॅक्टीस हवी… तो मनातल्या मनात बोलला..

दुपारी पावणेचारची वेळ

“माझ्या लक्षात आहे हं.. चारला आपल्या दोघांचा चहा करणार तेव्हा दूध तापवतो… “

तीनी काही बोलायच्या आताच त्यांनी सांगितलं.

ती खुद्कन हसली…

आज त्याला समजलं की साधा चहा करायचा म्हटलं तरी बराच व्याप असतो.. गाळणं, कप, बशी, चमचा, ते आलं खिसायच…. एका चहाचा ईतका पसारा?

झालं एकदाच आजच्या दिवसातल चहा प्रकरण….

वेळ रात्रीची..

“अहो उद्या दुपारी जेवताना दही लागणार त्यासाठी दूध विरजण लावायच आहे….. ” तो आत आला.

 

 “दही नुसतं नाही घालायच. ती दह्याची कवडी चांगली हलवा.. मग दुध घाला म्हणजे दही घट्ट लागतं.. बास.. ईतके पुरे… सकाळच्या चहाला दुध लागेल… “

तिच्या सुचना सुरू होत्या..

आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी दुध विरझण लावलं.

 

“आता फ्रिज मधला तो साईचा सट घ्या. त्यात साय घाला. पाच दिवसांची साठली आहे. आता उद्या त्याचे ताक करते आणि लोणी काढते… तुमचे आवडते बेरी घालून कणकेचे लाडू करीन… आणि ताकाची कढी… गोळे घालून… गरम भाताबरोबर… “

 

तो बघत राहिला ती बोलतच होती…. आपल्याच तंद्रीत….. थोडं स्वतःशी थोडं त्याच्याशी…

तो नुसता ऊभा..

 

दूसरा दिवस… वेळ सकाळी साडे सहाची…

 

“अग आपला चहा झाला तरी दूध शिल्लकच आहे…. आता याचे काय करायचे… “

“आता हे रात्रीसाठी विरजण लावायचे…. पण इतक्यात नाही…

ताज दूध आलं की मग…

काल कसं… तुमचा मित्र आला की तुम्ही बाहेरून सांगितलं दोन कप कॉफी कर…… म्हणून हे ठेवायचे घरात दूध नाही असे नको व्हायला….. ” ती सांगत होती..

 

कालपासून आपण सकाळ… दुपार… संध्याकाळ…. दुधाच्या पातेल्याशीच खेळतं आहोत असे त्याला वाटले….

अरे देवा… एका दुधाच इतकं रामायण असतं ?

तो विचारात पडला….

स्वयंपाकघरात त्याने नजर फिरवली. भांडी, डबे, फ्रिज, बरण्या, बाटल्या, ताट, वाट्या….. मग या सगळ्यांचे किती असेल…

 

ती हे सगळं मॅनेज करते हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही…

 

सारखं काय स्वयंपाक घरात काम असतं ग….

सारखी आत आत असतेस…

आपण तिला सहज म्हणत होतो…

तीनी केलेले अनेक पदार्थ त्यांना आठवायला लागले..

 

ती आत आली…

“अहो स्वयंपाक घरात काय करताय… “

 

“तू किती आणि काय काय करत असतेस माझ्या कधी लक्षातच आले नाही…. बायको सॅल्युट आहे तुला तो मनापासून म्हणाला….. “

 

“इश्य इतकं काही नाही हं…

आम्हा बायकांना सवय असते..

तुम्ही बाहेरचं सांभाळता आणि मी घरातलं… “

ती सहज म्हणाली

अचानक त्यांनी तिचे हात हातात घेतले…

“आज पर्यंत कधी बोललो नाही पण तू खरच संसार खूप छान केलास. नाती पण सांभाळलीस. कधी गंभीरपणे याकडे मी बघीतलच नाही. परंपरेनी चालत आलेल आनंदानी करत आलीस”

 

तो आज काहीतरी वेगळचं बोलत होता भाऊक झाला होता….

आवाजही नरम आणि कातर झाला होता…..

त्याचे आज एक निराळे रूप ती बघत होती……..

तो आज आतून.. अंतःकरणातून जे वाटले ते बोलत होता…. अगदी मनापासून..

खूप पूर्वीच आपण हे सांगायला हवं होतं असं त्याला वाटलं…..

 

ती तर गडबडूनच गेली होती…

तो अस कधीही आज पर्यंत बोलला नव्हता…

 

अनामिक अशा सुखानी ती भारावली होती… आनंदीत झाली होती…

जीवनाचं सार्थक झालं भरून पावलो असं मनोमन तिला वाटलं….

 

ते दोन जीव हातात हात घेऊन तृप्त मनाने एकमेकांकडे बघत होते…

त्याचे डोळे भरून आले होते तिचेही……..

आता शब्दही मुके झाले होते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्ती… भाग-२ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ तृप्ती… भाग-२ ☆ श्री दीपक तांबोळी

(नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. म्हणून तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.) – इथून पुढे —-

जेवण झालं. त्यांच्या अंदाजानुसार भरपूर भाज्या उरलेल्या पाहून संपतरावांचा जीव कळवळला. या उरलेल्या पदार्थांमध्ये कमीतकमी ५-६ माणसं आरामात जेवली असती. हाॅट वाॅटर बाऊल्स आली. पण त्यात हात न धुता संपतराव उठून बेसीनजवळ गेले. तिथे त्यांनी चुळ भरुन तोंड धुतलं. सध्या दंतवैद्यांचे दवाखाने या हाॅट वाॅटर बाऊल्सच्या थेरांमुळेच तुफान चालताहेत असं त्याचं मत होतं. घरी गेल्यावर आपल्या नातवांना ते खळखळून तोंड धुवायला सांगणार होते. डायनिंग टेबलवर ते परत आले तेव्हा सगळी मंडळी तोंडात शोप कोंबून निघण्याच्या बेतात होती. टेबलवर बऱ्याच भाज्यांच्या डिशेस हातही न लावलेल्या स्थितीत पडलेल्या पाहून संपतरावांना रहावलं नाही. ते प्रथमेशला म्हणाले

“अरे प्रथमेश हे एवढं उरलेलं पॅक तरी करुन घे. कुणा गरीबाचं तरी पोट भरेल”

“कुणाला देणार काका हे?आमच्या सोसायटीत तर कुणी हे घेणार नाही”

“ठिक आहे. मला दे पॅक करुन. मी बघतो कुणाला द्यायचं ते”

“नाना कशाला घेताय ते “सुजीत नाराज होऊन म्हणाला “आपल्याकडे तरी कुणाला देणार?”

“सुजीत अरे नाना बरोबरच म्हणताहेत. वाया जाण्यापेक्षा कुणाच्या पोटात गेलं तर चांगलंच. नाही का?”प्रथमेशचे वडील म्हणाले तसा सुजीत चुप बसला पण त्याची नाराजी मात्र गेली नव्हती. उरलेल्या चार भाज्या दोन बिर्याणी, तीन दाल तडका, आठ बटर पराठे हे सर्व वेटरने पार्सलमध्ये पॅक करुन आणलं आणि संपतरावांच्या हातात दिलं. एवढ्या पदार्थात ४-५ माणसांचं जेवण नक्की झालं असतं.

निरोप घेऊन सगळे आपापल्या गाड्यांमध्ये बसले. ड्रायव्हिंग करणाऱ्या सुजीतला संपतरावांनी सहज विचारलं.

“किती बिल झालं रे जेवणांचं?”

“काही जास्त नाही. फक्त बारा हजार रुपये”

संपतरावांना धक्का बसला. एवढ्या पैशात एखादं कुटूंब महिनाभर गुजराण करतं. त्यांना एकदम आठवण आली की आपल्या सोसायटीच्या केअरटेकरला फक्त दहा हजार पगार आहे. घरात त्याची तीन मुलं आणि बायको मिळून पाच सदस्य आहेत. कसा भागवत असेल तो?मनातल्या मनात त्यांनी त्याला आणि त्याच्या बायकोला सॅल्युट ठोकला.

“आता हे पार्सल कुणाला देणार आहात नाना?” किर्तीने विचारलं

“आपला केअरटेकर-शांताराम आहे ना! त्याला देऊन टाकू”

“आता रात्रीचे दहा वाजलेत. त्यांची जेवणंसुध्दा झाली असतील. आणि तो असं उरलेलं घेईल का?तसा तो स्वाभिमानी आहे”

“बघू या विचारुन. नाही घेतलं तर समोर बांधकाम चालू आहे. तिथल्या मजुरांना देऊन येईन”

किर्तीने तोंड वाकडं केलं. तिच्या मते नाना हा उगीचचा फालतूपणा करत होते.

गाडी थांबली. गाडीतून उतरता उतरता संपतराव म्हणाले.

” तुम्ही जा सगळे वरती. मी आलोच शांतारामकडे जाऊन”

शांतारामने बेसमेंटमधल्या दोन छोट्या रुममध्ये संसार थाटला होता. रुमचं दार उघडं पाहून संपतरावांना हायसं वाटलं.

” नमस्कार नाना “त्यांना दारात पाहून शांताराम आश्चर्यचकीत झाला”काही प्राॅब्लेम आहे का नाना?”

“नाही नाही. तुमची जेवणं झालीत का?”

“पोरांची झाली. माझं आणि घरवालीचं राहिलंय. मी जरा गावाला गेलतो. आताच आलो. का हो नाना?”

“अरे आज हाॅटेलमध्ये पार्टीला गेलो होतो. तिथे ऑर्डर केलेलं बरंच जेवण उरलं होतं. भरमसाठ मागवून ठेवतात आणि वाया घालवतात. म्हंटलं वाया जाण्यापेक्षा कुणाला दिलं तर त्याचं पोट तरी भरेल. उष्टं नाहिये बरं का!अगदी हातही लावलेला नाहीये”

” तो काही प्राॅब्लेम नाहीये नाना. तुम्ही तसं काही देणार नाही याची खात्री आहे मला. पण घरवालीने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी करुन ठेवलीये. ती वाया जाईल ना!”

मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं नाव ऐकूनच संपतरावांचे डोळे चमकले. अचानक त्यांना सपाटून भुक लागल्याची जाणीव झाली. आपण हाॅटेलमध्ये थोडंसंच खाल्ल्याचं त्यांना आठवलं. ते एकदम उत्साहाने म्हणाले

“ती भाजी भाकरी मला दे. मी ती खातो. तुम्ही हे खा ” बोलताबोलता त्यांनी ते पार्सल त्याच्या हातात दिलं.

“पण नाना, तुमचं जेवण तर झालंय ना?”

” मला नाही आवडत ते हाॅटेलचं जेवण. मी काहीच जेवलो नाही तिथे. आणि महाग किती!एकेक भाजी तीनशे रुपयांची. साधा पराठा शंभर रुपयाचा”

शांतारामने डोळे विस्फारले. त्याच्या बायकोने ताटात तीन भाकरी आणि मेथीची भाजी आणली.

“नाना वर घेऊन जाताय ना?”

“नाही नाही. मी इथंच बसतो. या तुम्हीही. आपण बरोबरच जेवू “

संपतराव तिथंच फतकल मारुन बसले.

“अहो नाना, पाट तरी घ्या बसायला”

“राहू दे रे. सवय आहे मला असं खाली बसून जेवायची”

शांतारामच्या बायकोने सगळं वाढून घेतलं. भाजीभाकरीचा पहिला घास घेताच संपतरावांना जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला.

” नाना हिरव्या मिरचीचा ठेचा देऊ?”

“अरे दे ना!व्वा मजा येणार जेवायची “संपतराव खुश होऊन म्हणाले.

” नाना हे जेवण पण खुप छान आहे. तुम्हांला कसं आवडलं नाही?”शांतारामने बिर्याणीचा घास घेत विचारलं.

” अरे कधीतरी खाणाऱ्याला ते चांगलंच वाटणार. आम्ही दर आठवड्याला हाॅटेलमध्ये जातो. कसं आवडणार ते आम्हांला?”

जेवण झालं. संपतरावांनी तीन भाकरी सहज संपवल्या होत्या. पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर त्यांनी दिला. त्यांनी पाहिलं. शांताराम आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरही तृप्ती आणि समाधान विलसत होतं. संपतरावांच्या डोक्यात अचानक एक कल्पना चमकून गेली.

” शांताराम मला कधी खायची इच्छा झाली तर मला भाजीभाकरी करुन पाठवशील. मी पैसे देईन त्याचे “

“अहो नाना. तुम्ही केव्हाही सांगा. मी स्वतः आणून देईन. आणि तुम्ही आमच्या वडिलांसारखे. वडिलांकडून कुणी जेवणाचे पैसे घेतं का?”

संपतराव समाधानाने हसले. ते वर घरात आले तेव्हा सुजीत त्यांचीच वाट पहात होता.

“बराच उशीर केलात नाना. आणि काय झालं?आनंदात दिसताय “

“काही नाही. शांतारामशी गप्पा मारत बसलो होतो. आणि त्याला आणि त्याच्या बायकोला हाॅटेलचं जेवण खुप आवडलं बरं. थ्री स्टार हाॅटेलचं एवढं महागडं जेवण करायला मिळालं म्हणून दोघंही खुप खुश झाले. उरलेलं जेवण उद्या सकाळी मुलांना देणार आहेत “

” चला बरं झालं. मलाही आवडत नाही हो नाना असं अन्न वाया घालवायला. पण काय करता! आपलं स्टेटस् आडवं येतं. पण मी आता यापुढे लक्षात ठेवून. पार्ट्यांमध्ये अन्न उरणारच नाही इतकंच मागवायचा आग्रह धरीन. आणि उरलंच तर पॅक करुन गरिबांना वाटून देण्याची सगळ्यांना विनंती करेन “

त्याच्या या म्हणण्याने संपतरावांच्या चेहऱ्यावरची तृप्ती अधिकच गडद झाली.

— समाप्त — 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्ती… भाग-१ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ तृप्ती… भाग- १ ☆ श्री दीपक तांबोळी

संपतराव बाहेर फिरुन घरात शिरत नाही तोच त्यांचा नातू त्यांना म्हणाला

“आबा पप्पांचा फोन आला होता. तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय. आपल्याला पप्पांच्या मित्राच्या वाढदिवसाला हाॅटेलमध्ये जायचंय”

वाढदिवसाच्या पार्टीला आणि तेही हाॅटेलमध्ये हे ऐकून संपतरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“मी नाही येत पार्टीला. तुम्ही जा “ते उद्वेगाने म्हणाले आणि आपल्या रुममध्ये निघून आले. नातू त्यांच्याकडे बघतच राहीला. आजकाल संपतरावांना हाॅटेलमध्ये जेवायला जाणं अजिबात आवडत नव्हतं. अनेक वेगवेगळे पदार्थ पण अनावश्यक मसाले वापरुन त्यांची मुळची चव घालवून टाकलेली असते असं त्यांचं म्हणणं. एका कंपनीत ते सेल्स एक्झिक्युटिव्ह होते. सगळं आयुष्य प्रवासात गेलेलं. अर्थातच बऱ्याचदा जेवणं बाहेर हाॅटेलातच व्हायचं. त्यामुळे त्यांना आता या हाॅटेलच्या जेवणाचा वैताग आला होता. घरचं साधंसुधं जेवण तेही बायकोच्या हातचं त्यांना अतिशय आवडायचं. पण दोन वर्षांपूर्वी बायकोचं निधन झालं. सुन नोकरी करणारी. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला की हाॅटेलमध्ये जाणं नाहीतर झोमॅटो, स्विगीवरुन बाहेरुन जेवण मागवणं नेहमीचं होऊन गेलं होतं. आणि तेच संपतरावांना आवडत नव्हतं.

ते आपल्या रुममध्ये पुस्तक वाचत बसलेले असतांनाच सुजीत आत आला.

“नाना तयार व्हा ना. आपल्याला पार्टीला जायचंय”

” तुम्ही जाऊन या ना. मला आजकाल पार्ट्यांना जायचा कंटाळा येतो. असंही तिथे माझ्या ओळखीचं कुणी नसतं “

” असं कसं म्हणता?प्रथमेशचे वडील तुम्हांला चांगलंच ओळखतात. त्यांनीच मला “तुझ्या वडिलांना नक्की घेऊन ये “असं सांगितलंय. वाटल्यास त्यांना तुम्हाला फोन करायला सांगतो”

“नको नको. खरं सांगतो तुम्ही जा. मी खाऊन घेईन सकाळचं काही उरलं असेल तर”

” सकाळचं काहिही उरलेलं नाहिये. आणि नाना आता फक्त तुमच्यासाठी किर्तीला स्वयंपाक करायला लावू नका. तीही थकून भागून येते. अशा पार्टीच्या निमित्तानेच तिला आराम मिळतो”

संपतराव चुपच झाले. खरंतर सुजीतला एवढा गलेलठ्ठ पगार असतांना सुनेने नोकरी करणंच त्यांना आवडत नव्हतं. पण एकदा ते असं म्हंटले होते तेव्हा किर्ती उसळून म्हणाली होती ” मग नाना माझ्या वडिलांनी मला इतकं शिकवलं ते काय फक्त रांधा, वाढा, उष्टी काढायलाच का?ते काही नाही. मी नोकरी सोडणार नाही ” तिचंही म्हणणं योग्यच होतं. पण नवराबायको दोघंही नोकरीला असले की घराला घरपण रहात नाही असं संपतरावांना वाटायचं. म्हणून तर त्यांनी त्यांची बायको सावित्रीबाई उच्चशिक्षित असतांनाही तिला नोकरी करु दिली नव्हती. अर्थात त्यावेळच्या मुली घर संसाराला पहिलं प्राधान्य द्यायच्या. त्यामुळे सावित्रीबाईंनी संपतरावांचा निर्णय सहजगत्या स्विकारला होता. आणि तो स्विकारण्यातही त्यांना कोणताच कमीपणा वाटला नव्हता. त्यांच्या सुनेला मात्र करिअर महत्वाचं वाटत होतं. करिअर आणि घर सांभाळतांना बाईची जी प्रचंड ओढाताण होते तिचा सर्वप्रथम परिणाम स्वयंपाक करण्यावर होतो. त्यातूनच मग बाहेरुन जेवण मागवण्याचे किंवा वारंवार हाॅटेलमध्ये जाऊन जेवण्याचे प्रकार वाढले होते. संपतरावांना हे कळत होतं म्हणून तर त्या दिवसापासून संपतरावांनी तोंडाला कुलुप लावून घेतलं होतं.

 

सुजीतच्या आग्रहाखातर ते हाॅटेलमध्ये जायला निघाले खरे पण तिथे जेवणाच्या कल्पनेने त्यांची भुकच मरुन गेली होती. कुठलंस थ्री स्टार हाॅटेल होतं. जेवणाचे रेटही तगडेच असणार होते. प्रथमेशच्या वाढदिवसाची जय्यत तयारी हाॅटेलने केलेली दिसत होती. खरंतर तीन परीवारांची मिळून इनमीन१५-१६ माणसं होती. घरीसुद्धा हा कार्यक्रम करता आला असता. पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं. त्यातून पैसा भरपूर असला की तो उधळायला निमित्तच लागतं. जो कार्यक्रम १-२ हजारात होऊ शकला असता त्यासाठी अनावश्यक १५-२० हजार खर्च केले जाणार होते. प्रथमेशचे आईवडीलही आले होते पण त्यांच्याही चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत नव्हता. बरोबरच होतं. वाढदिवसाचे सोज्वळ, पवित्र सोहळे पाहिलेली ही माणसं. असे भडक दिखाऊ कार्यक्रम त्यांना कसे रुचावेत?

टेबलवर भला मोठा केक आणला गेला. मागे कुठलंतरी वेस्टर्न म्युझिक सुरु झालं. कडक थ्री पीस सुट घातलेल्या प्रथमेशने केकवरच्या मेणबत्त्या विझवून केक कापला तसा सगळ्यांनी एकच जल्लोष केला. एकदोन जणांनी केकवरच आयसिंग उचलून प्रथमेशच्या तोंडाला फासलं. या किळसवाण्या प्रकाराची तर संपतरावांना अतिशय चीड होती. जो पदार्थ खाण्यासाठी आहे तो चेहऱ्यावर फासण्यात कसली आली मजा? केक एकमेकांना भरवून फोटो सेशन झालं. दुर उभं राहून संपतराव हे सगळे प्रकार पहात होते. त्यांना स्वतःच्या वाढदिवसाची आठवण आली. सावित्रीबाई त्यांना पाटावर बसवून ओवाळायच्या. त्यांना प्रेमाने पेढा भरवायच्या. मग ते सगळ्या मुलांना जवळ घ्यायचे. घरात गोडाधोडाचा स्वयंपाक असायचा. एका पेढ्याव्यतिरिक बाहेरचा कोणताही पदार्थ घरात न आणण्याकडे सावित्रीबाईंचा कटाक्ष असायचा. त्या आठवणीने संपतरावांना गहिवरल्यासारखं झालं.

केक कापण्याचा सोहळा आटोपल्यानंतर साताठ वेटर आले. त्यांनी आता जेवणाची तयारी सुरु केली. समोर पडलेलं भलंमोठं मेनू कार्ड संपतरावांनी चाळायला सुरुवात केली. “बापरे !काय भयंकर महाग पदार्थ आहेत. एकही भाजी तीनशेच्या खाली नाही. साधी चपाती सुध्दा तीस रुपयाची?खरंच इतक्या महागड्या जेवणाची शरीराला गरज असते?”ते मनातल्या मनात बडबडले.

वेटरने चायनीज चवीचं सुप आणून टेबलवर ठेवलं. सोबतीला मसाला पापड. मग वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आले. तंदूरी मंचुरियन, पनीर चिली, हराभरा कबाब आणि बरंच काहीबाही. हे स्टार्टर खाण्यातच पोट भरणार होतं. मग जेवणार कसं हा प्रश्न विचारायचं संपतरावांच्या ओठावर आलं होतं. पण पार्टी दुसऱ्याची होती. अर्थात ही पार्टी सुजीतची जरी असती तरी हा प्रश्न विचारण्याचं धाडस संपतरावांना झालं नसतं. त्यांनी प्रत्येक स्टार्टरचा एक एक तुकडा घेऊन फक्त त्याची चव घेतली. त्यांनी आयुष्यात इतके पदार्थ खाल्ले होते की या पदार्थांची नवलाई त्यांच्यासाठी संपली होती. स्टार्टर संपले आता जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्यांच्या ऑर्डर्स दिल्या जात होत्या. इतक्या भाज्यांची खरंच गरज होती का?दाबून स्टार्टर खाऊन झाल्यावर खरंच इतकी भुक शिल्लक आहे?काही वाया तर जाणार नाही?पैसा आहे म्हणून वाटेल ते ऑर्डर करत बसायचं का? हे प्रश्न त्यांच्या मनात आले. पण मघाप्रमाणेच ते आताही चुप बसले. असंही आजकालच्या तरुण पोरांना म्हाताऱ्यांचं‌ बोलणं पटतं कुठे?त्यांनी बसलेल्या सगळ्यांकडे नजर फिरवली. मसालेदार आणि भरपूर तेल, बटर घातलेले पंजाबी पदार्थ खाऊन जवळजवळ सर्वच लठ्ठ झाले होते. अपवाद होता तो प्रथमेशच्या आईवडिलांचा आणि त्यांचा स्वतःचा. साधं, सकस, भरपूर पोषक मुल्य असलेलं महाराष्ट्रीयन जेवण आजकाल मराठी माणसांना का आवडत नाही याचं संपतरावांना नेहमीच कोडं पडायचं. नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. म्हणून तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print