श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ भूक…! ☆
☆
दर महीन्याला रेशन कार्डं वर
रेशन घ्यायला जाताना
कार्डं वरची
लेकरांची खोडलेली नावं पाहिली
की लेकरं मोठी झाल्याची
जाणिव होते…
कारण
आता प्रत्येक लेकरांन
आपआपल्या वेगळ्या घरासारखं
आपआपलं रेशन कार्डं ही वेगळ केलय
आता कार्डंवर…
दोघांचच धान्य मिळतं
ते ही अगदी. ! वाजवी दरात..
एका पिशवीत मावेल एवढंच…
पण … ह्या धान्य ऐवजी जर
दर महीन्याला रेशन वर
एका पिशवीत मावेल एवढाच
लेकरांचा वेळ मिळाला असता
तर किती बरं झालं असतं
कारण….हल्ली
पोटातल्या भुके पेक्षा
लेकरांना भेटण्याची भुकच
जास्त लागते…
कारण जेव्हा पासून
ह्या रेशन कार्डं वरून लेकरांनी
त्यांची नावं खोडलीत
तेव्हापासून त्यांना आम्हाला
भेटण्यासाठी वेळ असा
कधी मिळालाच नाही…
आणि
दर महीन्याला
रेशन कार्ड वरची..
लेकरांची खोडलेली नावं पहाण्याशीवाय
आमच्या समोर दुसरा पर्याय असा काही
उरलाच नाही..
☆
© श्री सुजित कदम
मो.7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈