चित्रकाव्य
एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆
☆
श्री आशिष बिवलकर
– एक धागा अंतरीचा गाभा… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆
( १ )
गुंफल्या या मूक कळ्या
गजऱ्याची झाल्या शोभा |
शल्य ना मनी कशाचे,
एक धागा अंतरीचा गाभा |
☆
एक एक कळी गुंफली
एकमेकींचे वाढवले सौंदर्य |
क्षणभंगुर या जीवनात,
जोपासले आनंदाचे औदार्य |
☆
रंग रूप गंध लाभे,
एक दिवसाचा साज |
सुकता कुणी न पाहे,
आनंदे जगून घेती आज |
☆
गजरा म्हणून एक ओळख,
कोणाचे कुंतल सजवती |
हातात कुणाच्या बांधून ,
मैफलीत गंध दरवळती |
☆
प्रारब्ध होई धागा,
गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |
क्षण क्षण सत्कारणी लावावा,
सार्थ करावा जीवनाचा सोहळा |
☆
आनंद या जीवनाचा,
सुगंधापरी दरवळावा |
सार लाभल्या आयुष्याचा,
कळ्यांना पाहून ओळखावा |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆☆
श्री ए के मराठे
– एक धागा अंतरीचा गाभा… – ☆ श्री ए के मराठे ☆
( २ )
कळ्या निमूट ओवून घेतात
गजऱ्यामधे स्वतःला
दोष देत बसत नाहीत
सुईला वा सुताला ll
☆
कारण त्यांना माहीत असतं
हेच त्यांचं काम आहे
क्षणभंगुर मिळालेलं आयुष्य
जगण्यामधेच राम आहे ll
☆
रूप,रंग एका दिवसाचा
गंधही उद्या राहणार नाही
फुल होऊन कोमेजल्यावर
ढुंकूनही कुणी पाहणार नाही ll
☆
म्हणून म्हणतो जसं,जेवढं
मिळालंय जीवन जगून घ्यावं
विषालाही अमृत समजून
हसत हसत चाखून प्यावं ll
☆
कवी : श्री ए के मराठे
कुर्धे, पावस, रत्नागिरी
मो. 9405751698
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈