मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 161 ☆ हे शब्द अंतरीचे… नेत्र… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 161 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… नेत्र… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(अष्ट-अक्षरी)

नेत्र पाहतील जेव्हा, तेव्हा खरे समजावे

उगा कधीच कुठेच, मन भटकू न द्यावे…

*

मन भटकू न द्यावे, योग्य तेच आचारावे

स्थिर अस्थिर जीवन, मर्म स्वतःचे जाणावे…

*

मर्म स्वतःचे जाणावे, जन्म एकदा मिळतो

सर्व सोडून जातांना, कीर्ती गंध तो उरतो…

*

कीर्ती गंध तो उरतो, सत्य करावे बोलणे

राज केले उक्त पहा, पुढे नाहीच सांगणे…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

आजी होणे किंवा आजोबा होणे  या इतके परम सुखाचे क्षण मनुष्य जीवनात कोणते असू शकतील?

नातवंडे म्हणजे आजी आजोबांच्या डोळ्यात चमकणाऱ्या दागिन्यांसारखी असतात.

नातवंडं असणे म्हणजे जणू काही जगाचे मालक होणे.

तो असा एक खजिना आहे की त्याचे मूल्य म्हणजे फक्त हृदयातील प्रेम.

नातवंड म्हणजे मुखवटा घालून आलेला देवदूतच.

तुमच्या हृदयापर्यंत, हसण्याचा, तुमचे जीवन आनंदाने भरण्याचा आणि तुमचे जग प्रेमाने भरुन टाकण्याचा देवाचाच मार्ग.

घरात नातीचा जन्म झाला आहे आणि आजोबांचं मन आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. या आनंद भावनांचं हे आनंद गीत आगमन कवी आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध काव्यसंग्रहातून)

☆ – आगमन…  – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली ।ध्रु।।

*

नाजूक जिवणी हळूच हंसली मुग्ध कलीका दरवळली

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगागातुन मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

*

प्रतिक्षेमध्ये तुझाच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी  हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

*

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्त्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविले

संपुनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

 – डॉ. निशिकांत श्रोत्री

अतिशय हळुवार मनातलं, वात्सल्य जागं करणारं हे भावुक गीत. “आजोबा’ या नव्या पदवीने बहरून गेलेलं कवीचं मन गातंय.

मावळतीच्या क्षितिजावरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली।ध्रु।

खरं म्हणजे जीवनातलं हे संध्यापर्व. मावळतीच्या रंगानं रंगत असणारं. पण जीवनाच्या या टप्प्यावर नव्या आशा पल्लवित  करुन स्नेहा तुझे आगमन झाले आणि या संध्येच्या क्षितिजावर नव्या उदयाचीच जाणीव झाली. जणू काही मागे गेलेली अनेक वर्षे पुन्हा एकदा तुझ्या जन्माने नव्याने बहरली.

नाजूक जिवणी हळूच हसली मुग्ध कलीका दरवळली  

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगांगातून मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

गोड गुलाबी कोवळ्या ओठातलं तुझं हास्य जणू काही मूक कळीतून दरवळणाऱ्या सुगंधासारखंच. तुझ्या इवल्याशा चिमुकल्या हाताने माझ्यात कशी नवस्फूर्ती,नवचैतन्य उसळवलं.  तुझी ती इवल्याशा  डोळ्यातली निष्पाप नजर प्रेमाचा एक वेगळाच रंग घेऊन माझ्या अंगा अंगातून मोहरली. खरोखरच या उतार वयात माझ्या जीवनात पडलेल्या तुझ्या पावलाने माझाही जणू नवजन्मच झाला.

प्रतिक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

किती वाट पाह्यला लावलीस ग बाळे?  तुझ्या प्रतीक्षेत घालवलेली ती वर्षे किती कठीण गेली आणि कशी सहन केली ते तुला कसं कळेल! मुलांची लग्न झाली की आता नातवंड कधी मांडीवर खेळेल याची स्वाभाविक उत्सुकता आईवडीलांना असते.पण बर्‍याच वेळा आपली विवाहित मुले मुल होऊ देण्याचा विचार पुढे ढकलत असतात. त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी ते बालरुप दिसावे याची आर्तता उत्कट होत असते.

पण आज मात्र तुझी पावलं जीवनांगणी उमटली आणि स्वप्न पूर्ण झालं. जणू सारं काही भरून पावलं. आयुष्याचे सार्थक झाले.  आता या क्षणी माझी  ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की’” त्या भास्कराचं तेज तुला मिळो! आणि सर्वांच्या वाटा तू या दिव्य प्रकाशाने उजळवून टाकाव्यात.

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविली

संपूनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

वाटलं होतं आयुष्य आता सरत आलं. पण तुझ्या जन्मानं या देहातली विझत चाललेली प्राण्याजोत जणूं काही पुन्हा नव्याने चेतवली गेली. पुन्हा नव्याने जगण्याची आशा पालवली. पुन्हा जगण्यात रंग भरले गेले. तुझ्या जन्माच्या रूपाने जणू काही अमरत्वाचा स्त्रोत वाहतो आहे असं वाटू लागलं.  अंतर्यामी सुकलेले झरे पुन:श्च आनंदाने बरसू लागले आहेत. मी आता निवृत्तीच्या वाटेवर असताना   माझी कर्मवारसारूपी वीणा तुझ्याच हाती सोपवत आहे. म्हणजे पुन्हा सूर सजतील. संपत आलेली मैफल पुन्हा एकदा नादमय होईल. नवे रस, नवे गंध, नवे रंग या माझ्या मावळतीच्या क्षितिजावर पुन्हा एकदा आनंदाने फेर धरतील.

खरोखरच डॉक्टर श्रोत्री यांचं हे गीत म्हणजे वात्सल्य रसाचा अमृतमय झराच. वाचक हो! श्रोतेहो! प्रत्येकाच्या आनंद अनुभवाला जोड देणारं हे ममत्त्व गीत. भावभावनांचा, प्रेमाचा अमृत स्पर्श देणारा, अंतरंगातून सहजपणे वाहणाऱ्या ममतेच्या स्त्रोताची जाणीव करून देणारा अत्यंत कोमल, हळुवार आणि सहज शब्दांचा या गीतातला साज केवळ आनंददायी आहे आणि त्यासाठी कवीला माझा त्रिवार सलाम!

तसं पाहिलं तर साधी सरळ भाषा. अलंकारांचा डोईजडपणा नाही. काव्यपंक्तींमध्ये कुठलेही अवघड वळण नाही.भावनांचा प्रवाह वाचकांच्या मनाशी थेट मिळणारा असा शब्दवेध. सहज जुळलेली यमके, गीत वाचताना मनात एक माधुर्याचा ठेका धरतात.

या गीतामध्ये एक वत्सल दृश्य आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ,कापसासारखी मुलायम तनु.  नाजूक जिवणी, चिमुकले हात पाय, निर्मळ, निष्पाप नजर आणि या साऱ्या विशेषणांतून जाणवणारं एक दैवी, स्वर्गीय निरागसत्व अंतःकरणात मायेचे तरंग उमटवतं.

प्रतीक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली या ओळीतला पिल्ला हा शब्द तर मनाला इतका बिलगतो. खरंच बाळा, लेकरा, चिमण्या या शब्दांमध्ये पाझरतं ते फक्त आणि फक्त अंतरातलं वात्सल्य, दाट प्रेम!

पीजे हार्वे यांनी म्हटलं आहे कोणते गाणे प्रेमाबद्दल नाही? मग ते प्रेम पुरुषाकडून स्त्रीवर असो, आई वडिलांकडून मुलांपर्यंत असो किंवा पुढे नातवंडांपर्यंत असो.. ते पुढे जातच असते.

या भाष्याचा अर्थ डॉक्टर श्रोत्रींच्या या गीतात जाणवतो.

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालवली  ही ध्रुवपदातील ओळ खूपच बोलकी आहे.  स्नेहा हे विशेष नाम असू शकते अथवा  स्नेहरुपा या अर्थानेही असू शकते.  पण यातून जाणवतो तो नातीच्या जन्माचा कवीला झालेला आनंद.  नातीचं बाळरूप पाहता क्षणीच त्यांच्या अंतरात सुखाचा फुलोरा फुलतो.  आणि सहजपणे ते उद्गारतात ज्योतिर्मयी हो  कवीच्या मनातली ही उत्स्फूर्त संवेदना जाणून माझ्या मनात खरोखरच असंख्य मुग्ध कळ्या सुगंध घेऊन दरवळल्या.

या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते.

संपुनी जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली या ओळीतल्या वीणा हाती सोपवणे या वाक्प्रचाराला एक संदर्भ आहे. प्रवचनकार  निवृत्त होताना आपल्या वारसाला  वीणेच्या रुपात प्रवचनाचा वारसा देतात. या इथे कवीने  आपल्या नातीला आपला वारसा मानून जे काही त्यांचं आहे ते तिला देऊन टाकले आहे.

एकंदरच कवीच्या मनातली स्पंदनं या गीतात इतकी सजीवपणे जाणवतात की त्यासाठी डॉक्टर श्रोत्रींना पुन्हा एकदा सलाम.

विषयांतर असूच शकतं पण जाता जाता सहज सुचलं म्हणून लिहिते, डॉ. श्रोत्री हे स्त्रीरोगतज्ञ. व्यवसायाच्या निमीत्ताने त्यांनी अनेक जन्मलेली मुले हाती घेतली असतीलच. तोही अर्थातच व्यावसायिक असला  तरी भावनिक सोहळाच. पण जेव्हा स्वत:ची नात जन्माला येते तेव्हां फक्त आणि फक्त “आज मी आजोबा झालो!”

हेच सुख. तेव्हा त्यांच्यातल्या वैद्याचा कवी कसा होतो याचा अनुभव आगमन या गीतात होतो. आणि त्याचीही गंमत वाटते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “इंद्रधनुष्य…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “इंद्रधनुष्य…” ☆ श्री आशिष मुळे ☆

पसाऱ्यात साऱ्या तुला शोधतो आहे

पसरल्या रंगांत, मी आसमंत शोधतो आहे

*

दगड दगडावरी मारीत बसलो आहे

घोळक्यात इथल्या मी एकटाच आहे

*

तू येणार नाहीस, जरी हे निश्चित आहे

मी निश्चिंत, कारण मीही फकीर आहे

*

नको मानुस वाईट, माझी ही चंचलता

मी समजूनच घेत आहे, तुझी निश्चलता

*

दाखवलेस ना मला अंतरंग थोडेसे तुझे

बघ मी इंद्रधनुष्य आता उचलले आहे माझे

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “हर्षोत्सव…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “हर्षोत्सव– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

किती घातले देहावर घाव 

गणना त्याची नाही  केली

कित्येकांनी साल काढली

मूकपणाने  तीही साहिली

*

गेली पाने शाखाही मोडल्या

सौंदर्यासह श्वास गुदमरला

असंख्य जखमा अंगी घेऊन

बुंधाही  हताशवाणा झाला

*

मुळे परंतु भक्कम होती

पोषण पुरवत होती माती

घरतीमाता मुळे धरूनीया

हिंमत आतून पुरवित होती

*

त्या धरतीने हलके मजला

कोवळा नजराणा दिधला

यातुन वाढव वैभव गेलेले 

वसा हिरवा मज पुन्हा लाभला

*

हर्षोत्सव  माझ्या मनीचा

नवनिर्मितीच्या आनंदाचा

नर्तन करती कोवळी पाने

फुटतील आणखी  जोमाने

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत पंचमी – शारदास्तवन ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ वसंत पंचमी – शारदास्तवन ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी

तुझा वास असू दे सकल अंतरंगी  ||ध्रु||

तुझ्या हाती वीणा मधूर सप्तसुरी

प्रभा तेजःपुंज प्रज्ञे सावरी

विलसे मयुरावरी सप्तरंगी

नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी ||१||

तुझ्या अर्चनेचे दे संपूर्ण दान

तुझ्या ठायी अविचल राहू दे ध्यान

विवेका असो कांस बुद्धीतरंगी

नमो शारदे मंगलाक्षी शुभांगी ||२||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘असंही होतं कधी कधी…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘असंही होतं कधी कधी…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

फोन करून 

व्यवस्थित वेळ ठरवून ती आली

 

 कॉफी गप्पा

 विषय तरी किती

 

 अध्यात्म ते चॅट जीपीटी

 आर्टिफिशियल इंटेलिजन्स

 

 मोदी तर हवेतच…

 हिंदुत्व वगैरे वगैरे ..

नवीन पुस्तकं 

 

नंतर थोडं फार खाणं 

मग रेसिपी

 वेळ कसा गेला कळलंच नाही

 

 जाताना म्हणाली

 येईन ग परत….

 

 बरं बरं…..

 कधीतरी येईल ती….

 

नुसतीच शरीरानी नाही तर

बरोबर  धैर्य …

आत्मविश्वास …घेऊन..

……   मगच ती खरंखरं बोलेल…. मनात साठलेलं…

 

असू  दे…

…. असं होतं कधी कधी…..  मी वाट बघीन….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 209 ☆ रूप गणेशाचे… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 209 – विजय साहित्य ?

रूप गणेशाचे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

सगुण निर्गुण

भक्ती आणि शक्ती

लागते आसक्ती

दर्शनाची…! १

*

चौसष्ट कलांचा

पहा अधिपती

ऋद्धी सिद्धी पती

गुणाधीश…! २

*

रूप गणेशाचे

अष्ट सात्विकात

मूर्ती अंतरात

आशीर्वादी…! ३

*

वक्रतुंड कधी

कधी एकदंत

दाखवी अनंत

निजरूप…! ४

*

कृष्ण पिंगाक्षात

गजवक्त्र वसे

लंबोदर ठसे

नामजपी…! ५

*

विघ्न राजेंद्राचा

अलौकीक थाट

संकटांची‌ लाट

थोपवितो…! ६

*

विकट रूपात

गणेशाची माया

सुखशांती छाया

भक्तांमाजी…! ७

*

धूम्रवर्ण छबी

भालचंद्र कांती

देई मनःशांती

शुभंकर…! ८

*

देतसे दर्शन

गणपती‌ इथे

गजानन तिथे

पदोपदी..!९

*

अष्ट विनायकी

गुणकारी मात्रा

फलदायी यात्रा

सालंकृत…!१०

*

विघ्ननाश करी

व्यक्त प्रेम भाव

पैलतीरा लाव

नाव माझी..!११

*

रूप गणेशाचे

वर्णी कविराज

जन्मोत्सव आज

निजधामी….!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वरुप  शब्दांचे… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वरुप  शब्दांचे☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

   शब्दांना  किंमत   असते

   शब्दांना  वजन    असते

   शब्दांना  खोली   असते

   शब्दांना  उंचीही  असते

   हे शब्दांनो,

  तुमचं खरं स्वरुप  कळण्यासाठी

  तुम्हाला प्रसन्न करुन घेण्यासाठी

  बांधेन मी पूजा तुमची ,

  भक्ताने ईश्वराची बांधावी तशी.

  प्रसाद म्हणून  द्या

  फक्त  शब्द फुले.

  त्या शब्द फुलांच्या माळांनी

  सजवावे मी

  महाराष्ट्र सारस्वताचे मंदिर  !

  एक जरी मोगरा फुलला

  माझ्या हातून

  तर,हे शब्दांनो,

  मी कायमचाच ऋणी राहीन.

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रथसप्तमी… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ रथसप्तमी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

प्रातः स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यं

रूपं हि मण्डलमूचोSथ तनुर्यजूंषि |

सामानि यस्य किरणा: प्रभवादि हेतुं

ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरूपं ||

अर्थ –

ज्याचे रूप ऋग्वेदाची मंडले आहेत, शरीर यजुर्वेद आहे, सामवेद ही किरणे आहेत, जो जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांचे कारण आहे, जो ब्रह्मदेवाचा दिवस असून अचिंत्य व अलक्षी आहे त्या श्रेष्ठ सूर्य देवतेचे मी प्रातःस्मरण करतो.

रोजच सूर्याला नमस्कार करण्याची आपली पद्धत कारण सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे आयुष्य आहे हे आपण केंव्हाच जाणले आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा चांगल्या विचाराने, भावनेने साजरा केला जातो.तसाच हा माघ शुक्ल सप्तमीचा म्हणजेच रथसप्तमी चा  सण, सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तो याच दिवशी साजरा करण्याची कारणे म्हणजे सूर्याचा हा जन्मदिन आहे अशी एक कल्पना, या दिवशी संवत्सर सुरू झाले. याच दिवशी सूर्याला त्याचे वाहन म्हणजे रथ मिळाला ही एक कल्पना!

वास्तव असे आहे की या दिवसापासून सूर्याचे तेज वाढत जाते, तो जास्त वेळ म्हणजे दिवसाचे जास्त तास प्रकाश देतो, आणि आपले आयुष्य आरोग्यदायी करतो.सूर्य आता उत्तरायणात असतो. वसंत ऋतू येतो म्हणजेच सृष्टीची सृजशीलता वाढते.म्हणून सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतू!त्याचे हे वाढलेले तेज सहन करणारे रथाचे घोडे व त्याचा सारथी अरुण यांच्याप्रती सुध्दा कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी रथासह सूर्याची पूजा करण्याची पद्धत आहे.

(सहज मिळाली म्हणून थोडी रथाबद्दल माहिती सांगते. रथ हे आपले फार प्राचीन वाहन आहे. रथाचे अनेक प्रकार आहेत.देवगणांचा तो देवरथ, राजेमहाराजे यांचा पुष्परथ, खेळांसाठीचा क्रीडारथ, स्त्रियांसाठी चा कणीरथ, रथ विद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ.रथ चक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह, उत्कर्षाचे प्रतीक आहे.)

सूर्याच्या रथाला संवत्सर नावाचे एकाच चाक आहे.त्याला बारा राशी म्हणजेच बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बारा आरे आहेत.गायत्री, वृहति, उष्णिक,जगती, त्रिष्टुप , अनुष्टुप, पंक्ती हे सात छंद अश्व रुपात सूर्याचा रथ ओढण्याचे काम करतात. रथाचा विस्तार नऊ हजार योजन तर त्याची धुरा एक करोड सत्तावन हजार योजन आहे.( चौथ्या – पाचव्या शतकात सूर्य सिद्धांतानुसार एक योजन म्हणजे ५ मैल -८ किलोमीटर, पण नंतर १४ व्या शतकात परमेश्वर नावाच्या गणितज्ञाने एक योजन म्हणजे ८ मैल – १३ किलोमीटर आहे असे सांगितले)

एका सूर्य किरणात सात प्रकारच्या ऊर्जा असतात.

प्रभा – तमनाशक, प्राण शक्तिदाता

आभा – धर्मशक्ती दाता

प्रफुल्ला – आत्मज्ञान दाता

रश्मी – सृजनशक्ती दाता

ज्योती – भक्तीरस निर्माती

तेजस्विनी – स्थिती म्हणजेच विष्णूला मदत करणारी

महातेजा – उत्पत्ती व लय म्हणजेच ब्रह्माला व शिवाला सहाय्य करणारी

या सात ऊर्जा रुपी किरणांना त्यांचे त्यांचे रंग असतात. या सात ऊर्जा एकत्रित येऊन सविता तयार होते, ही श्वेत असते.

सूर्याच्या जन्मा बद्दल सांगायचे तर तो आजन्मा आहे. कमळाच्या नाभितून ब्रह्माजी अवतरले. त्यांच्या मुखातून प्रथम ओम् शब्द निघाला, हा तेजरुपी सूर्याचे सूक्ष्म रूप होते. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले. जे ओम् च्या तेजात एकाकार झाले. हे वैदिक तेजच आदित्य आहे. हा वेद स्वरूप सूर्य पंचदेवांपैकी ( शिव, देवी, विष्णू, गणपती, सूर्य ) एक आहे.

वैवस्वत मन्वंतरात अदितीने सूर्याची कठोर आराधना केली, सूर्यदेव प्रसन्न झाले. तिने सुर्यासारखा पुत्र मागितला. कालांतराने अदिती गर्भवती झाली. तिचे कठोर व्रत सुरूच होते. रागावून कश्यप म्हणाले, अशी उपाशी राहिलीस तर गर्भ कसा वाढेल? तिने तो गर्भ शरीरातून काढला तेंव्हा तो सोन्यासारखा चमकणारा होता. कालांतराने त्यातून एक तेजस्वी, सूर्याचा अंश जन्माला आला, त्याचे नाव विवस्वान ठेवले. असे अदिती कश्यप यांना बारा पुत्र झाले, त्यांना द्वादश आदित्य म्हणतात. हे आदित्य अवकाशातील इतर आदित्यांना ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. (म्हणजे अवकाशात अनेक सूर्य निर्माण होतात अशी कल्पना त्याकाळी सुध्दा होती?)

सूर्याचा विवाह देवशिल्पी व विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा हिच्याबरोबर झाला. त्यांना वैवस्वत मनू, यमदेव ही दोन मुले व यमुना (नदी) ही मुलगी झाली. परंतु फार काळ संज्ञा सूर्याचे तेज सहन करू शकली नाही म्हणून तिने आपल्या जागी आपली छाया सोडली व आपण वनात निघून गेली. छायेला सावर्णी मनू, शनिदेव हे दोन मुलगे व तपती ही मुलगी झाली. कालांतराने सूर्याला संज्ञा सापडली, त्यावेळी सूर्य घोडीच्या रुपात होते, त्यांच्या मीलनातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. अश्व रुपात असताना जन्माला आली म्हणून त्यांचे नाव अश्विनीकुमार!

त्रेता युगातील सुग्रीव हा पण सुर्यपुत्र, त्याच्या जन्माची कथा वेगळीच आहे. ऋक्षराज नावाचे वानर होते, ते एका सरोवरात स्नान करण्यासाठी गेले, सरोवराला मिळालेल्या शापामुळे त्यात स्नान केल्यावर त्याला एका सुंदर स्त्री चे रुप प्राप्त झाले. प्रथम त्या स्त्री वर  इंद्रदेव  मोहित झाले त्यामुळे बाली चा जन्म झाला. नंतर सूर्यदेव ही मोहित झाले आणि सुग्रीवाचा जन्म झाला. दोन्ही मुले त्याने गौतम ऋषी व अहिल्या यांच्याकडे सोपविली. द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने कुंतीच्या पोटी जन्माला आलेला कर्ण हा पण सुर्यपुत्र!

सूर्यदेवा,

पहाट वारा जेंव्हा भूपाळी गात असतो तेंव्हा एखादा मोत्यांचा सर  सुटावा तसे मोती धारेवर विखुरतात. कोठून आले हे मोती?  हां! बरोबर आहे, तुझ्या कंठातला तो मोत्यांचा हार पश्चिमेकडे ठेऊन गेला असशील आणि तिने मोत्यांचा सडा टाकला! सूर्यदेवा,  तू येण्याआधीच प्राचीवर गुलाल उधळून तुझ्या येण्याची बातमी अरुण देतो.

माथी किरीट, हाती  कमळ,चक्रधारी, शंखधारी,आशीर्वाद मुद्रा, कानी मकर कुंडलांची प्रभा, गळ्यात हार,लाल रंगाच्या सात  घोड्यांच्या रथावर, वामांगी पत्नीला घेऊन पद्मासनात आसनस्थ झालेलं, सुवर्ण कांती ल्यालेलं हे तुझं देखणं रुप!

तू तर तिन्ही लोकांचा पालनकर्ता अन्नदाता, त्रिगुणधारी,रोगांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी,अध्यात्माचा प्रेरक, आकाश रुपी लिंगाची आराधना करणारा, आकाशाचा स्वामी, ग्रह नक्षत्रांचा अधिपती, तमनाशक, असत्याकडून सत्याकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे नेणारा, धर्मपरायण, धर्माच्या व कर्तव्याच्या मार्गाने जाणारा म्हणून कधीही लोप न पावणारे तुझे तेज, चौदा भुवनांचा पालक, चराचर सृष्टीचा आत्मा, विश्वाचा साक्षीदेव, विराट पुरुषाचा नेत्र, अंतराळाचा अलंकार, अमूर्त अशा अग्नी देवतेचे मुख, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तूच, देव,पितर, यक्ष ज्याची सेवा करतात तो तूच, राक्षस, निशाचर, सिद्ध ज्याला वंदन करतात तो तूच, इतका महान असून तुझे किरण क्षुद्र जीव जंतू, मनुष्य, सर्वांचे चरण स्पर्श करून नम्रतेची शिकवण देतात.

कालस्वरूप, कालचक्राचा प्रणेता, निर्मळ, विकल्प रहित, सर्वज्ञानी आहेस. म्हणूनच मारुतीला आणि कर्णाला तू ज्ञान दिलेस. आणखी काय आणि किती लिहू ? सारं न संपणारे! माझा अवाका ही तेवढा नाही. मला माहित आहे,  अनासक्त आहेस तू, त्यामुळेच तिन्हीसांजेला तुझा एवढा मोठा पसारा क्षणात आवरून घेतोस.

तुला एक वचन देते, मावळताना तू जी सूक्ष्म रूपातील तुझी शक्ती व तेज दिव्यात ठेऊन जातोस, त्याचा सन्मान आम्ही करू, आणि घरात रोज एक ज्योत तेवती ठेवू.

आणखी एक –

स्तुती सुमनांची नाही ओंजळ

 ही तर आहे कबुली प्रांजळ

दिनमणी

आकाशी अरुणिमा पसरली,

 रविरथ चाहूल विश्वा आली

शतशतकोटी किरणे ल्याली,

तमनाशक ती प्रभा उमलली ।।

*

सप्त वारु अन् एक चक्री रथ,

सारथी त्याचा पांगुळा

ना आकाशी,ना धरेवरी

तरीही आक्रमितो भूमंडळा ।।

*

घेऊन संज्ञा वामांगी,

पद्मासनी तो वरद हस्त साजे

शंख, चक्र, पद्मधारी

शिरी सुवर्ण मुकुट विराजे ।।

*

रविवासर तो सप्तमीला

उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आले

तेजःपुंज ते रुप पाहुनी

अदिती कश्यप धन्य झाले ।।

*

सुग्रीव, कर्ण हे तुझेच अंश रे,

ज्ञान दिले तू हनुमंता

ब्रह्मा, विष्णू, शिवस्वरूप तू

पंच महाभूतांचा निर्माता ।।

*

देव, पितर, यक्ष तव सेवेला

ग्रहांचा तू अधिपती

असूर, निशाचर, सिद्ध वंदिती

त्रिलोका तू कालगती ।।

*

रूप ऋग्वेदी, तनू यजुर्वेदी,

सामवेदी तव रश्मी

पितामह तू या विश्वाचा,

आकाशाचा तू स्वामी ।।

*

मार्ग दाविसी आम्हा पामरा

असत्या कडून सत्याकडे

धर्मसूर्य तू नेसी जीवा

मृत्यू पासून अमरत्वाकडे ।।

*

दिपते धरती तव तेजाने

क्षुद्र जीव रे आम्ही सारे

तरी स्पर्शूनी आमुचे चरण तू

नम्रतेचा आदर्श रे  ।।

*

निर्विवाद असे, अधिराज्य तुझे

या त्रैलोक्यावरती

अनासक्त तू , क्षणात सारे,

आवरुन घेशी या मावळती ।।

*

तू येण्याच्या आधीच पडतो,

सडा मोतियांचा भूवरी

कंठातील तो हार देऊनी

जाशी का पश्चिमेवरी ।।

*

जपून ठेवीन ठेव तुझिया

तेजाची अन् शक्तीची

देवघरी या रोज तेवते

एक वात तव ज्योतीची ।।

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग : श्लोक १ ते १० – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग : श्लोक १ ते १० – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच :

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।१।।

कथित अर्जुन 

कर्मसंन्यास उपदेश दिधला श्रीकृष्णा मजला

तरी सांगता आचरण्याला  आता कर्मयोगाला 

कुंठित झाली माझी प्रज्ञा जावे कोण्या मार्गाला

कल्याणदायी असेल निश्चित कथन करावे तेचि मला ॥१॥

श्रीभगवानुवाच :

संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।

तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।२।।

कथित श्रीभगवान 

कर्मयोग अन् कर्मसंन्यास उभय कारीकल्याण

कर्मयोग  तयात श्रेष्ठ सुलभ तयाचे आचरण ॥२॥

*

ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते ।।३।।

*

मनी न द्वेष नच आकांक्षा तोच खरा संन्यासी

भावद्वंद्व रहिता महावीरा मुक्ती भावबंधनासी ॥३॥

*

सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता: ।

एकमप्यास्थित:सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।४।।

*

फलप्राप्ती संन्यासाची तथा कर्मयोगाची

मूढ मानती सांख्ययोगी भिन्न असते तयांची

परमेशाची प्राप्ती ही तर फलप्राप्ती दोन्हीची

पंडित जाणत फला तयांच्या ही किमया ज्ञानाची ॥४॥

*

यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।

एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।५।।

*

सांख्य असो वा कर्ममार्गी वा परमधाम तया प्राप्ती 

दोन्हीचे फल एक जाणतो यथार्थ ज्ञानी त्याची दृष्टी ॥५॥

*

संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।

योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।६।।

*

कर्मयोगाविना वीरा नच प्राप्ती संन्यासाची

रत ब्रह्म्याशी कर्मयोग्या प्राप्ती परमात्म्याची ॥६॥ 

*

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय: ।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।७।।

*

जितेंद्रिय विशुद्धात्मा अद्वैत समस्त जीवांशी

समर्पित कर्म आचरितो राहतो अलिप्त कर्माशी ॥७॥

*

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।

पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ।।८।।

*

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।९।।

*

श्रुती दृष्टी श्वसन गंध भोजन वाचा व्यवहार नेत्रपल्लवी

सकल क्रिया इंद्रियस्वभाव तयांसी मी ना कधी चालवी

दृढनिष्ठा ही मनात ठेवुन अलिप्त वावरी तोचि खरा योगी

कर्म ना करितो मी भाव जागवी ठायी तत्ववेत्ता सांख्ययोगी ॥८,९॥

*

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति य: ।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।१०।।

*

समर्पित कर्मे परमात्म्या विनासक्तीने आचरण

अलिप्त तो पापांपासून जैसे जले कमलपर्ण ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares